मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

.. आय ॲम समथिंग स्पेशल 

.. आय हॅव टॅलेंट… आय ॲम ग्रेट 

.. आय से थँक्यू फॉर द लाईफ 

.. आय ॲम एन्जॉईंग…!

 एका ऑपेरात ऐकलेलं आवडतं गाणं गुणगुणत लीना बाथरूममध्ये शिरली. शॉवर घेतल्यावर तिने टबभोवतीच्या स्टॅंडमधल्या रंगीत सुगंधी मेणबत्त्या लावल्या. सुवासिक फेसाने भरलेल्या टबमध्ये अलगद बसून तिने बाजूचा बुकस्टॅन्ड जवळ ओढला. सर्वांगाला गरम सुगंधी शेक घेत तिने बुक स्टॅंडवरच्या पुस्तकांवरून नजर फिरवून एक पुस्तक निवडण्याचा प्रयत्न केला. पण डोक्यात विचारांची गर्दी उसळली होती. अस्वस्थ मनाला दिलासा देण्याचा तिचा प्रयत्न सफल होत नव्हता. नीरज आणि एमिलीची वाढती सलगी तिच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. अमेरिकेतल्या गेल्या जवळजवळ वीस वर्षांच्या वास्तव्याने तिथल्या मनमुक्त स्वैर वातावरणाला ती सरावली होती. पण हे एमिली प्रकरण हाताबाहेर जातंय या भीतीने तिच्या मनात घर केलं होतं. बुडबुड्यांच्या आवाजाने तिचे विचार विचलित झाले.

टबमध्ये तरंगणारे, डुलणारे इंद्रधनुष्यी बुडबुडे न्याहाळताना तिचं मन खूप मागे, गावच्या शंकराच्या देवळ्यामागल्या तळ्यावर पोचलं. पाणी भरायला आलेल्या बायकांच्या घागरींमुळे तळ्यावर लहान- मोठे बुडबुडे नाचत होते. त्यात छोटासा दगड भिरकावत आपण शेजारी बसलेल्या इशाला म्हटलं होतं, इशा या गावंढळ गावातून सटकायचा एकच मार्ग म्हणजे लग्न. थोडी तडजोड स्वीकारून एखाद्या मोठ्या शहरातला मुलगा पत्करला तर आपल्या मनासारखं आधुनिक जीवन अनुभवायला मिळेल.

इशाची आणि आपली मैत्री लहानपणापासूनची. दहावीनंतर दोघींनीही घरी हट्ट करून, तालुक्याच्या ठिकाणी राहून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्या पुढचं शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. नशिबानं त्याचवेळी सरकारी योजनेमुळे गावात मुलींसाठी मोफत कॉम्प्युटर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. त्या संधीचा फायदा घेऊन दोघींनी कॉम्प्युटरच्या मायाजालातल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. एका क्लिकवर होणाऱ्या विश्वरूप दर्शनाने त्यांची शहरी, श्रीमंत, चैनीच्या आयुष्याची ओढ वाढली होती. स्वतःच्या सौंदर्यावर हुशारीच्या जोरावर काहीतरी वेगळं मिळवण्याची त्यांची धडपड होती.

त्यावेळी इशाने तिचे बदामी पिंगट डोळे आपल्यावर रोखून म्हटलं होतं,  ॓अगं तेच सांगायला मी तुला इथे बोलावलंय. माझ्या दूरच्या, डोंबिवलीत राहणाऱ्या आत्याने तिथलं स्थळ माझ्यासाठी जमवत आणलंय. तो दिसायला अगदी सामान्य आहे पण नोकरी चांगली आहे. स्वतःची जागा आहे. जबाबदारी अशी काही नाही. आमचा जोडा विजोड दिसेल पण मी ॓हो ॔म्हणायचं ठरवलं आहे. पैशांची अडवणूक नाही त्यामुळे घरचेही खुश आहेत.

काँग्रॅटस् इशा. गो अहेड. नंतर मलाही शहराचा रस्ता शोधायला मदत कर. इशाने बाजी मारल्यामुळे मनातून थोड्या नाराजीने पण वरकरणी हसून आपण तिचं अभिनंदन केलं. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता तरी ॓कॉम्प्युटरच्या बाईंनी स्पेशल क्लासला बोलवलय ॔ अशी घरात थाप मारून आपण दुपारी बाहेर पडलो. तालुक्याच्या ठिकाणाहून या गावात मुलींना कॉम्प्युटर शिकवायला आलेल्या सरकारी बाई एकट्याच एक खोली राहत घेऊन रहात होत्या. घरातून निघताना पर्समध्ये हळूच भरून घेतलेले भोपळ्याचे पाच-सहा घारगे बाईंपुढे करत आपण म्हटलं आईने दिलेत. आणि सांगितलंय की त्या कॉम्प्युटरवर स्थळं शोधता येतात ना तर बाईंच्या मदतीने बघ काही बरं ठिकाण दिसतंय का ते! घारगे पाहून खुश झालेल्या बाईंनी त्यांच्या घरातला कॉम्प्युटर उघडून दिला. नशिबाने इंटरनेट कनेक्शन होतं. दोन-तीन तास खर्च करून आपण स्वतःच अशोकचं स्थळ शोधून काढलं. अमेरिकेत नोकरी करीत होता म्हणजे हुशार असणार. पण त्याच्या चेहऱ्यावरचा बावळेपणा लपत नव्हता. अगदी साधा शामळू दिसतो म्हणून अनेक मुलींनी नाकारलेला असावा. आपण अशोकला पत्करायचं ठरवलं. घरी आल्यावर बाईंच्या नावाने या स्थळाची माहिती सांगितली. भावाच्या मदतीने पुण्याला पोहोचलो. लांब केसांचा घट्ट शेपटा घालून दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन भावी सासू-सासर्‍यांना वाकून नमस्कार केला. दोघेही खुश झाले. यथावकाश अमेरिकेहून आलेल्या, चेहऱ्यावर बावळट हसू ओघळणाऱ्या अशोकशी लग्न होऊन आपण अमेरिकेत या स्वप्न नगरीत पोचलो तेव्हा नातेवाईक आणि गावकरी म्हणावे ॓नशीबवान आहे मुलगी !॔

तीन-चार वर्षांनंतर आपल्या बाळंतपणासाठी सासू-सासरे अमेरिकेत आले. त्यावेळी आपणच पुढाकार घेऊन स्वतःच्या बेबी- शॉवरचा घाट घातला. गेल्या चार वर्षात जमविलेल्या अनेक मित्र मैत्रिणींनी हौसेने येऊन भरपूर धमाल केली. पण अशोक तोंडदेखलं बावळट हसू हसून थंडपणे त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता त्याला सोशल लाईफची मौज मस्तीची अजिबात आवड नव्हती. शिवाय एवढे डॉलर्स खर्च करणंही त्याच्या जीवावर आलं होतं. मुुलगा झाल्यावर सासू-सासर्‍यांवर मुलाला बिनधास्त टाकून आपण आपलं पूर्वीच सोशल लाईफ सुरु ठेवलं.

अशाच एका पार्टीत नीरज भेटला. आपल्या ड्रेसचं, दिसण्याचं, ग्रेसफुल डान्सचं त्यानं भरभरून कौतुक केलं. आपल्या सर्वांगावरून त्याची नजर भिरभिरत होती. आपण मनातून सुखावलो. हवं असं काहीतरी सापडल्यासारखं झालं. उच्चपदस्थ नीरज घटस्फोटीत होता. फारसा विचार न करता पुढच्या पायऱ्या भराभर ओलांडून आपण अशोक बरोबर घटस्फोट घेतला.

अशोकचं घर सोडताना चार-पाच वर्षांच्या छोट्या आनंदसाठी पाय अडखळत होते पण नीरजला मुलाबाळांचा गुंतवळा नको होता. त्याला फुलपाखरासारखं स्वच्छंदी, रंगीबेरंगी आयुष्य उपभोगायचं होतं. चैनीच्या स्वैर, विलासी आयुष्याचा आपल्यालाही मोह पडला.

जवळजवळ दहा वर्ष आपण नीरज सोबत ऐषोआरामात काढली. या काळातही तो दुसऱ्या काही स्त्रियांच्यात थोडाफार गुंतला होता. तरी आपण हुशारीने, सावधपणे नीरजवरची पकड अधिकच घट्ट केली. पण हे एमिली प्रकरण डोईजड होतंय. आपल्याला सोडून नीरजने एमिलीशी लग्न करायचं ठरवलं तर आपलं भवितव्य काय? या अफाट अमेरिकेत आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? कपडे घालता घालता लिनाचं विचारचक्र सुरू होतं. तिने मान झटकली आणि निश्चय केला,  ॓छे! अशी हार मानून चालणार नाही. आयुष्यातलं हेही वळण सफाईन पार केलं पाहिजे मात्र आता स्थिर आयुष्याच्या दृष्टीने विचारपूर्वक, हुशारीने पावलं टाकली पाहिजेत. पन्नाशी जवळ आलीय. चांगली संधी मिळेपर्यंत नीरजला दुखावून चालणार नाही या विचारांनी तिला थोडं हलकं वाटलं.

 ****

 नीटनेटका भरलेला डबा आणि पाण्याची बाटली लीनाने किल्ली न्यायला आलेल्या ड्रायव्हर जवळ दिली.

 पावसाचं लक्षण दिसतंय. छत्री आहे ना गाडीत? आणि दुपारी वेळेवर जेव बरं का. डब्यात वरतीच दुपारची औषधं ठेवल्येत. ती घे. मी फोन करीनच. लीनाने प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने सदानंदला बाय केलं.

  ॓अगं हो हो! किती काळजी घेशील? आणि आता जरा रेस्ट घे. काल रात्रीही एअरपोर्टवरून यायला उशीर झालाय. गेला महिनाभर धावाधाव चाललेय तुझी. मावशीनाही आज सुट्टी दे. संध्याकाळी आपण बाहेरच जाऊ. सदानंदने लीनाला अच्छा करताना प्रेमाने बजावलं.

सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली .॔

झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अंगतपंगत… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ अंगतपंगत… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

“चल कल्पना, जरा शेवयाची खीर करून घेतेस का? मी समोरची खोली झाडून घेते… खरंतर आमची अंगतपंगत नेहमी गच्चीवर लिंबाच्या सावलीत असते पण आज नेमकं आभाळ आहे ना त्यामुळे आपल्याकडे ठरलंय, तू आटपून घे लवकर, कारण बायकांचा घोळका आला ना की गप्पांमुळे काही सुचणार नाही. “

 कल्पनाने शेवया परतायला घेतल्या, एकिकडे दूध तापवायला ठेवलं. तिला वहिनींमधला सकाळचा नवरा बायकोचा संवाद आठवला, “अहो जरा दूध जास्त आणायचं आहे, आज आमची अंगतपंगत आहे. काहितरी गोडधोड म्हणून खीर करते. जोशी काकु येतील आज. नवरा वारल्यानंतर त्यांना बोलवायचं राहिलं. पलीकडच्या अविच्या बायकोची गोड बातमी आहे, सुमती आजीची नात मोठी झालीए, तिचंही कौतुक करायचं आहे, माणकेबाईंचा पोरगा मेरीटमध्ये आला त्या माऊलीचं कौतुक गोडधोडाने होईल… “

 त्यावर त्यांचे नवरोबा म्हणाले, “अहो राणीसरकार तुमचा निर्णय आम्ही नाही थोडीच म्हणणार आहे, हे घ्या शंभर रुपये आणि हवं ते आणा म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी गजरे ही आणा हवे तर, आणि तुम्ही लावा एखादा, तुम्हालाही गोड खीर हवी ना, आपलं सगळं आहे, त्यात धकवून नेहमी आनंदी राहता तुम्ही… “

 वहिनी लगेच म्हणाली होती, “अहो हे आनंदी राहणं ना तुमच्या चाळीतल्या बायकांनी शिकवलं आहे मला… ह्या अंगतपंगत मधून. सहा एक महिन्यात कधीतरी आम्ही भेटतो, रोजच्यापेक्षा वेगळं, एकमेकींचे लाड पुरवायला वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी भरते, कुणाचं तिखट तर कुणाचं अंबट, कुणाचं गोड तर कुणाचं साधं जेवण, आणि त्या सोबत संवादाची असणारी देवाणघेवाण ह्या पदार्थांसारखीच सुरू असते. कुणीतरी आयुष्यातला गोड अनुभव सांगते. तेवढ्यात कुणाचं तरी जखमेवर मीठ चोळल्या जावं असा आयुष्याचा अनुभव असतो, कुणीतरी साधं सरळ काहितरी नात्यातलं मांडतं तर कोणी अध्यात्माचं सारं गप्पांतून मांडून जातं… चला, बोलत बसायला विषय तसा आवडीचा आहे, द्या ते पैसे, तुम्हालाही मिळेल हो आज गोड खीर” असं म्हणत उत्साहाने वहिनींनी सगळी तयारी केली होती.

 विनयच्या ऑफिसच्या कामामुळे आपण दोन दिवस पाहुण्या असलो तरी आपली अडचण न वाटून त्यांनी अंगतपंगत करायचं ठरवलंच होतं, कल्पनाला मनात वाटलं खरंच हाय सोसायटीत असला आनंद नाहीच घेता येत, प्रत्येक जण आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवतो. आता अंगतपंगत तर आपल्या सोसायटीत होतच नाही, पण भिशी पार्टी अशीच काहीशी पण पदार्थांपासून इतर सगळ्याच गोष्टींचं प्रदर्शन करणारी. खरंच हि अशी अंगतपंगत व्हायलाच हवी असं कल्पनालाही वाटून गेलं.

 वहिनी आत आल्या तेंव्हा कल्पनाने हे बोलून देखिल दाखवलं.. त्यावर वहिनी म्हणाल्या, “खरंतर मी आले त्या वातावरणात असलं काही नव्हतंच, शिष्टाचाराने दार लावून जेवणं, कोणी आलं तरी हॉलमधून ताट घेऊन आत पळत जाणाऱ्या संस्कृतीतून मी आले. मला नवीन नवीन रुळायला वेळ लागला पण आवडायला लागलं हे असं अंगतपंगत मधुन होणारं वेगवेगळ्या आयुष्याची देवाणघेवाण करणं, आपण जगत असतो आपलीच सुखदुःख कुरवाळत, फारसं कोणाशी विचारांची देवाणघेवाण न करत अगदी आपल्या रोजच्या जेवणासारखं आपलं आपलं जेवून घ्यायचं, पण त्यात हि संकल्पना आवडली. जुनीच असली तरी हल्ली बऱ्यापैकी बंद पडलेली, पण ह्या सोसायटीत अखंड चालू असलेली अंगतपंगत देवाणघेवाण.

 आपल्यापेक्षाही संघर्ष करत जगणारे आयुष्य असतात त्यांना बघून शिकता येतं. ह्या विचारांच्या अंगतपंगत मधुन भावना आणि पदार्थ दोन्ही खुप काही शिकवून जातात. एक वेगळाच उत्साह, एक वेगळी किनार आयुष्याला मिळते. तू बघच आज” म्हणत वहिनींनी मघाशी आणलेले गजरे दोन दोन तुकड्यात केले, “अग सगळ्यांना पुरवायला हवे”.

 दाराशी सुंदर रांगोळी सजली, देवासमोर सुंदर सुवासिक उदबत्ती लावली आणि छोट्याशा वाटीत खिरीचा नैवेद्य देवासमोर ठेवत वहिनी म्हणाल्या, “आमच्या अंगतपंगत मधला तू मुख्य पाहुणा, प्रत्येकाच्या चैतन्यातून डोकावणारा, मग पहिले आजची स्पेशल डिश तू घे आणि अशीच सगळ्यांच्या विचारांनी आयुष्याची अंगतपंगत आंनदी होऊ दे, “

 छान आवरून चाळीतल्या एकएक जणी येत होत्या, आपले डबे मध्यभागी मांडून पटापट पान मांडत होत्या. काही ज्येष्ठ बायका ‘हे सगळं परंपरेने चालू आहे आपल्या सोसायटीत’ ह्याचं कौतुक करत होत्या… पदार्थांची ताटात रेलचेल झाली होती.. खिरीच्या वाट्या सजल्या.. ‘वदनी कवल घेता’ म्हणत हसत खेळत जेवणं सुरू झाली.. गप्पांना वेग आला, अगदी मनमोकळेपणाने पदार्थांसारखीच भावनांची देवाणघेवाण सुरू होती, कुणाचं एखादं दुखणं त्यावर दहा तरी उपाय सापडत होते, कुणाच्या आर्थिक अडचणींसाठी घरगुती तोडगे सांगितले जात होते, कुणी फार दिवसात कुणाशी बोलणं झालं नाही म्हणत मनसोक्त गप्पा मारत होत्या, कुणी कुठे काय छान मिळतं याची यादी देत होत्या, एकंदर सगळं हलकंफुलकं वातावरण होतं,.. तेवढ्यात जोशी काकूंना ठसका लागला, डोळ्यातून खळखळ पाणी आलं. ठसक्याचं पाणी काकांच्या आठवणीने वहायला लागलं हे सगळ्यानी ओळखलं. सगळ्यांचेच डोळे पाणावले, कारण हि अंगतपंगत चाळीत काकांनीच सुरू करायला लावली होती बायकांना… काका म्हणायचे.. “तुम्ही बायका एकट्या असल्या की विचार तुमच्यावर राज्य करतात, जरा महिनाभरात एकमेकींना भेटत जा, एकमेकींचे लाड करत जा, ह्या अंगतपंगत मध्ये सगळ्याच तुम्ही सासुरवाशिणी आपलं माहेरचं अंगण सोडून आलेल्या इथे एकत्र येऊन एकमेकींना आई, मावशी, ताई बनवा आणि चालू द्या विचरांची अंगतपंगत म्हणजे मोकळ्या राहताल, साचत गेल्या तर मानसिक उपचार करायची वेळ येईल. मी बघतो, आमच्या दवाखान्यात येतात अश्या बायका, तेंव्हा वाईट वाटतं, ह्यांना कोणीच कसं जमवता आलं नाही आयुष्यात, मग वाटतं, आपल्याच भोवताली असतात ही माणसं, म्हणून ही अंगतपंगतची कल्पना सुचली… आपल्याच शेजारी पाजारी बनणारे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊ या आपल्या ताटात, तेंव्हाच समोरच्यांच्या आयुष्याचीही चव लक्षात येईल, संवादातून मग कळेल ‘अरे संघर्षात जगणारे फक्त आपणच नाही, तो प्रत्येकाला आहे, फक्त प्रत्येकाच्या संघर्षाचा रंग वेगवेगळा आहे, कुणाला लेकरू नसल्याचा, कुणाला नोकरी नसल्याचा, कुणाला पैश्याने, कुणाला आजाराने संघर्ष करावाच लागतोय.. मग ह्यात काय, जशी दुसऱ्याची भाजी अंगतपंगतला ताटात घेतल्यावर बरं वाटतंय तस दुसऱ्याला पण संघर्ष आहे, आपण काही एकटे नाही, ही भावना बळावून जगण्याला आणखी उत्साह येणार आहे. जसा दुसऱ्याच्या घरचा पदार्थ खाऊन जेवणाला चव येते तसंच आहे हे. ह्यातून जगण्याचा सोहळा करायला शिका. एखादा गोड पदार्थ निमित्त म्हणून खाऊ घाला सगळ्यांना. मनाला आनंद मिळतो पण तो मिळवण्याची तयारी पाहिजे.. इतकं साधं अंगतपंगतच गणित मांडून काका आज हि परंपरा चालू ठेवून निघून गेले होते.. सगळ्यांनी डोळे पुसले. परत विषयांतर झालं… हसत खेळत अनेक विषय हाताळले. मनं मोकळी झाली. संवादाची देवाणघेवाण होऊन गजऱ्याच्या सुगंधी निरोपाने अंगतपंगत संपली.. घरभर मोगऱ्याची दरवळ झाली….

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”) 

इथून पुढे —

म्होरक्याने आपला चहा संपवला. बसकडे पाहत. झोपलेली माणसं — वृद्ध, मुले, कुटुंबे.

म्होरक्या बसच्या मागच्या बाजूला गेला. लोक झोपले होते. एक मूल एका टेडी बेअरला बिलगले होते. एका वृद्ध महिलेच्या बोटात जपमाळ होती. कोणीतरी घोरत होते. सामान्य माणसे. त्याच्या गावातील लोकांसारखी, त्याच्या आईसारखी, मावशीसारखी, आजीसारखी.

तो किशनजींकडे परतला. “माझी आजी… ” तो थांबला.

“त्यांचं काय? ” किशनजींनी विचारले.

“ती दरवर्षी याच मार्गाने प्रवास करायची— खाटू, पुष्कर. ती म्हणायची की यामुळेच तिला शांती मिळते. तीन वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. मी तिला शेवटच्या वेळी घेऊन जाऊ शकलो नाही. मी busy होतो. ” त्याचा आवाज दाटून आला.

किशनजींनी मान डोलावली. “तुम्हाला माहित आहे का, ” ते म्हणाले, “या मार्गाबद्दल मला सर्वात जास्त कशाचा त्रास होतो? चेकपॉइंट्सचा नाही. खराब रस्त्यांचा नाही. पण जेव्हा कोणी म्हणतं— “माझ्या अमुक अमुकला ही यात्रा करायची होती, पण ती होऊ शकली नाही. ”

म्होरक्याने डोळे मिटले.

“या बसमधील प्रत्येक व्यक्ती असा वेळ खर्च करत आहे, जो त्यांना कदाचित नंतर परत मिळणार नाही. ते असे पैसे खर्च करत आहेत, जे कदाचित अन्य काही कामासाठी वापरले जाऊ शकले असते. पण ते या प्रवासावर ते पैसे खर्च करत आहेत. का? कारण आतून काहीतरी त्यांना जाणवत आहे की त्यांनी आत्ता इथेच असायला हवे. ”

त्यांनी डॅशबोर्ड उघडला. एक जुनी, जीर्ण डायरी बाहेर काढली. “बघा, ” ते म्हणाले. “४० वर्षांहून अधिक काळातील प्रवाशांच्या सह्या. हजारो नावे. हजारो कथा. काहीजण आता या दुनियेत नाहीत, पण त्यांची श्रद्धा अजूनही इथे आहे. ”

म्होरक्याने ती डायरी हातात घेतली आणि पाने चाळू लागला. आणि तो थबकला. एक नाव वाचून. “मंजू देवी त्रिवेदी, १६ ऑगस्ट, २००३. खाटू श्याम यात्रा—नातवाच्या आरोग्यासाठी. ”

त्याचे हात थरथरू लागले. “ही… ही तर माझी आजी आहे. ”

किशनजींनी हळूच मान डोलावली. “मला माहित आहे. जेव्हा तू बसमध्ये चढलास तेव्हाच मी तुला ओळखले होते. तुझे डोळे अगदी तुझ्या आजीसारखेच आहेत. ती नेहमी म्हणायची, “माझा नातू एके दिवशी लोकांचे रक्षण करेल. ”

एक क्षणभर शांतता.

म्होरक्याने डायरी बंद केली. “तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? ” त्याने जड आवाजात विचारले.

“काही नाही, ” किशनजी म्हणाले. “फक्त तू कोण आहेस हे ठरव. लोकांचे रक्षण करणारा मंजू देवीचा नातू की प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्ता गोळा करणारा एक गुंड. ”

म्होरक्या बसमधून खाली उतरला, आपल्या माणसांमध्ये उभा राहिला.

आकाश मंदपणे उजळत होते.

“चला, ” तो म्हणाला, “रस्ता मोकळा करा. बसला जाऊ द्या. ही बस आज जाईल. प्रत्येक वेळी. “

वाहने बाजूला झाली. रस्ता मोकळा झाला. म्होरक्या परत आला.

“धन्यवाद, ” किशनजी म्हणाले, “तुम्हाला नाही, तुमच्या आजीला. तिने तुमच्यावर केलेल्या संस्कारांना. “

बस पुढे सरकली. प्रवासी जागे होत होते पण पहाटे काय झाले होते, हे किशनजींनी कोणाला कधीच सांगितले नाही.

पण पुढच्या शनिवारी, जेव्हा ते त्याच मार्गाने पुन्हा जात होते— ४७ व्या किलोमीटरवर, वाहने तिथे रस्ता अडवून होती. पण यावेळी, जेव्हा बस जवळ आली, ते फक्त बाजूला झाले. कोणताही इशारा नाही. कोणतेही प्रश्न नाहीत. थांबवणे नाही. आणि त्या वाहनांपैकी एकाच्या खिडकीवर, कोणीतरी खाटूश्यामजींचे एक छोटे चित्र चिकटवले होते.

किशनजींच्या ते लक्षात आलं, ते हलकेच हसले. त्यांनी हॉर्न वाजवला आणि बस पुढे काढली.

त्या सकाळच्या सहा महिन्यांनंतर, त्यांच्या घरी, दारात एक पाकीट पडलेलं त्यांना दिसलं. कोणताही पत्ता नाही. पाठवणाऱ्याचे नाव नाही. फक्त हाताने लिहिलेले होते— किशन यादव. आत दोन गोष्टी होत्या. पहिली— एक ५०० रुपयांची नोट, त्यासोबत एक छोटा कागदाचा तुकडा— “बसच्या आणि भक्तांच्या देखभालीच्या निधीसाठी. ” — एक हितचिंतक आणि दुसरी गोष्ट— एक जुना फोटो. त्या फोटोमध्ये, मंजू देवी त्रिवेदी किशनजींच्या बससमोर उभ्या होत्या. वर्ष २००३ होते. त्या हसत होत्या. त्यांच्या मागे, सुमारे १० वर्षांचा एक मुलगा उभा होता, बसकडे पाहत होता.

फोटोच्या मागे, थरथरत्या अक्षरात लिहिलेले होते— “आजीचे म्हणणे खरे होते. तिचा नातू आता खरंच लोकांचं रक्षण करतो. धन्यवाद. ” मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. —मंजू देवीचा नातू”

किशनजींनी तो फोटो आपल्या जुन्या डायरीत ठेवला— अगदी त्याच पानावर जिथे मंजू देवीची सही होती.

नंतर जेव्हा जेव्हा ते तो किलोमीटर ४७ वरून जायचे तेव्हा तेव्हा तिथे, त्या मैलाच्या दगडाशी ते बसचा हॉर्न वाजवायचे.

लोकांनाही ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी घडलेली घटना आता ठाऊक झाली होती.

किशनजी आणखी सात वर्षे त्याच मार्गावरून चालले. मग डोळे आणि हात साथ द्यायला कमी पडू लागल्यावर ते थांबले. त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या दिवशी, किलोमीटर ४७ वर, काहीतरी वेगळे होते. तिथे कोणतीही वाहने नव्हती. तिथे फुले होती— शेकडो फुले, रस्त्याच्या कडेला.

आणि एक फलक— “श्रद्धेचे रक्षण करणाऱ्याचे आभार. “

किशनजींनी बस थांबवली. त्यातले एक फूल सोबत घेतले – खाटूश्यामला वाहण्यासाठी.

काळ वहात राहिला. किशनजी राहिले नाहीत. ते खाटूश्यामजींच्या चरणी विलीन झाले.

पण तो मार्ग तसाच आहे. नवीन चालक त्यावर गाडी चालवतात. नवीन यात्रेकरू त्यावरून चालतात.

आणि प्रत्येक वेळी जेव्हा बस ४७ व्या किलोमीटरवरून जाते— तेव्हा चालक तीनदा हॉर्न वाजवतो. यात्रेकरू हात जोडतात. आणि प्रत्येकजण एक मिनिट मौन पाळतो.

त्या चालकासाठी – जो घाबरला नाही.

त्या माणसासाठी – ज्याला आठवले की तो कोण आहे.

आणि त्या आजीसाठी – जिने श्रद्धेचे आणि संस्कारांचे बीज पेरले.

– समाप्त –  

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज शनिवार होता, बस पहाटे नेहमीप्रमाणे निघाली होती. हा प्रवास किशनजींना काही नवीन नव्हता, दर शनिवारी पहाटे जयपूरहून निघायचं, आधी खाटूश्यामजींचे दर्शन घ्यायचं, मग तिथून पुष्करला ब्रह्माजींचं मंदिर आणि संध्याकाळपर्यंत जयपूरला परत. गेली चाळीस वर्षे किशन यादव शनिवारी याच रूटने ट्रॅव्हल्सची बस चालवायचे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी. प्रत्येक जत्रेसाठी. प्रत्येक नवसासाठी.

४७ किलोमीटरचा मैलाचा दगड जवळ येत होता, आणि किशनजींना बसच्या मागच्या आरश्यात प्रखर हेडलाईट्स दिसू लागले. तीन एसयुव्ही गाड्या वेगाने बसचा पाठलाग करत होत्या. त्यांना आश्चर्य वाटले नाही, ते चलबिचल झाले नाहीत. त्यांचे हात स्टिअरिंग व्हीलवर स्थिर होते. त्यांनी मागे झोपलेल्या ६२ यात्रेकरूंना जागे केले नाही. कारण त्यांना माहित होते की ते येणार आहेत.

खरं तर, ते तीन दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एक निनावी फोन आला होता, “या शनिवारी, खाटूश्यामजींच्या दर्शनाला पहाटे निघणारी तुमची बस ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी थांबवली जाईल. ” एवढंच सांगून फोन कट केला गेला होता.

किशनजी पूर्ण पाच मिनिटे फोनकडे पाहत राहिले. नंतर ते फक्त गूढ हसले. त्यांनी ना आपल्या दैनंदिन व्यवहारांत बदल केला, ना आपल्या पत्नीला – ना ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला या फोनबद्दल काही सांगितलं.

फोननंतर दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे गाडी मेकॅनिककडे घेऊन गेले. ब्रेक, तेल पाणी वगैरे सर्व तपासून घेतलं, प्रवासात काही तांत्रिक अडचण यायला नको होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व प्रवाश्यांना फोन केले. “तुमची औषधे सोबत आहेत का? ”, “तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगितले आहे का? ”, “तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला जायचेच आहे? ” आपल्या नातवाच्या आरोग्यासाठी नवस करणाऱ्या ८४ वर्षीय शांती देवी म्हणाल्या, “बाळा, मी सहा महिन्यांपासून वाट पाहत आहे. भले माझा हा जीवनातील शेवटचा प्रवास ठरला, तरी मी जाईनच. ” 

फोनवर होकार दिलेले सर्व प्रवासी आपापल्या पिशव्या, थर्मास, जपमाळा आणि आशा घेऊन गाडीत बसलेले होते, माळा जपत असलेल्या वृद्ध स्त्रिया, संपूर्ण कुटुंबे, घोंगड्यांमध्ये गुंडाळलेली मुले – सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.

आरशात दिसणारा हेडलाईट्सचा प्रकाश अधिक तेजस्वी झाला. मैलाचा दगड जवळ येत होता. पुढे काय होणार हे किशनजींना ठाऊक होतं, त्यांनी ब्रेक लावायला सुरुवात केली. मैलाचा दगड आला आणि त्याच क्षणी, एसयूव्ही गाड्या बसचा मार्ग रोखत तिला आडव्या थांबवल्या गेल्या.

किशनजींनी ब्रेक दाबले. बसच्या एअरब्रेकने एक मोठा सुस्कारा सोडला. बस थांबली. साइड मिररमध्ये त्यांनी पाहिलं, एसयूव्हीमधून माणसे खाली उतरत होती. सहा – आठ – दहा. हातात वॉकी-टॉकी, फ्लॅशलाइट्स — आणि ती चाल – ज्यांना आव्हान देण्याचे धाडस कोणी करत नाही.

त्यांच्यापैकी एकजण, बहुधा त्यांचा म्होरक्या, बसच्या दरवाजाजवळ आला. बोटांनी काचेवर दोनदा थाप मारली. किशनजींनी बटन दाबून आत येणाऱ्या दरवाज्याचे दार उघडलं, बसचे इंजिन बंद केलं, आणि म्हणाले, “बोला. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्ही इथे बस थांबवणार हे सांगणारा फोन आला होता मला. “

तो म्होरक्या, सुमारे ३५ वर्षांचा, धिप्पाड शरीरयष्टीचा, करारी नजरेचा— बसच्या पहिल्या पायरीवर चढला. त्याच्या टॉर्चचा प्रकाश किशनजींच्या चेहऱ्यावर पडला. “आम्ही तुम्हाला थांबवणार हे माहित होतं, आणि तरीही तुम्ही आलात? ”

किशनजींनी सरळ त्याच्या डोळ्यात पाहिले. “मी गेली ४० वर्षे या मार्गावरून प्रवास करत आहे. मी लष्करी चेकपॉईंट पाहिले आहेत. मी पोलीस अधिकारी पाहिले आहेत. तुमच्यासारखी माणसे. इतर टोळ्या. दरोडे, अपहरण, लाचखोरी—सगळं काही. आणि या सगळ्यातून एकच शिकलो, पाठ दाखवायची नाही, लपायचं नाही. लपल्याने गोष्टी नेहमीच बिघडतात. ”

तो म्होरक्या किशनजींकडे पाहत राहिला— त्यांच्या नजरेतली भीती शोधत, कमकुवतपणा शोधत, आवाजातील कंप शोधत. पण त्याला यापैकी काहीच आढळलं नाही. आणि याच गोष्टीमुळे त्याला सर्वाधिक अस्वस्थता वाटत होती.

“आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहीत आहे का? ” त्याने विचारले.

“मला माहीत आहे, ” किशन म्हणाला. “तुम्ही गेल्या आठ महिन्यांपासून या भागावर नियंत्रण ठेवले आहे. तुमच्याआधी कोणीतरी दुसरे होते. आणि कदाचित काही वर्षांनंतर कोणीतरी दुसरे असेल. ”

मग त्यांनी आपले डोके मागे वळवले— जिथे प्रवासी बसमध्ये झोपले होते. “पण ही माणसे… ती येतच राहतील. कारण श्रद्धा अमर आहे. ”

म्होरक्याचा एक साथीदार बसमध्ये चढला. तरुण. थोडा घाबरलेला, गोंधळलेला. त्याचे बोट वायरलेस रेडिओच्या बटणाजवळ होते. “सर… आता आपण काय करायचे? ” तो कुजबुजला. म्होरक्याने उत्तर दिले नाही. तो अजूनही किशनजींकडेच पाहत होता.

“तुम्ही बसमध्ये काय घेऊन जात आहात? ” त्याने विचारले.

“६२ भाविक. १७ मुले. २८ महिला. १७ पुरुष. ” किशनजींनी लगेच सांगितलं. “खाटूश्यामला जात आहेत. काहीजण आभार मानण्यासाठी. काहीजण चमत्काराची मागणी करण्यासाठी. ” 

मग त्याने हळूच मागे बोट दाखवले. “सीट नंबर २३ वर बसलेल्या शांती देवी त्यांच्या नातवासाठी प्रार्थना करायला जात आहेत. त्याला कॅन्सर आहे. रामस्वरूपजी सीट नंबर १५ वर आहेत— आपल्या मुलीच्या जगण्यासाठी घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी. आणि ८ ते १२ पर्यंत शर्मा कुटुंब आहे— गेल्या पुरात त्यांचे घर वाहून गेले. ते फक्त नव्याने सुरुवात करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायला जात आहेत. ”

म्होरक्याने डोळे मिचकावले. “तुम्हाला जणू प्रत्येकाची कहाणी आठवते, नाही का? ”

“प्रत्येकाची, ” किशनजींनी मान डोलावली. “कारण तेच माझे काम आहे, फक्त बस चालवणे नाही—मी कोणाला घेऊन जात आहे, का घेऊन जात आहे, हे जाणून घेणे, हे माझे काम आहे. माझी बस फक्त एक बस नाही, ते एक चालतेफिरते मंदिर आहे. श्रद्धाळूंच्या आशेचे प्रतीक! ”

आणखी काही न बोलता किशनजींनी आपला थर्मास बाहेर काढला, एक कप चहा स्वतःला घेतला, दुसऱ्या कपात चहा ओतला आणि त्या म्होरक्याला देऊ केला. “चहा घ्या, थंडी आहे. “

म्होरक्याने एक घोट घेतला. चहा गरम होता—वेलची आणि गुळाच्या सुगंधाने दरवळणारा. अगदी तसाच, जसा त्याची आजी लहानपणी त्याला बनवून द्यायची. आणि त्या क्षणी— फक्त एका क्षणासाठी— तो त्या भागातला शक्तिशाली माणूस – भाई – डॉन राहिला नाही, तो फक्त एक ३५ वर्षांचा माणूस होता, जो वीस वर्षांपूर्वीच्या एका प्रेमळ स्वयंपाकघराची आठवण काढत होता. “तू घाबरत का नाहीस? ” त्याने हळूवारपणे विचारले.

किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.) 

इथून पुढे – – – 

काळ कोणासाठी थांबतो का?

सहा महिने झाले वामनरावना जाऊन. माणिकच्या मैत्रिणी येत तिला फिरायला नेत. तिचे मन रमवत. मोठा आधार होता तिला या सगळ्या सख्यांचा.

असे आठ महिने झाले आणि एक दिवस मंगेश म्हणाला, ”आई, मी आणि देविका वेगळा फ्लॅट घेऊन रहाणार आहोत. सध्या भाड्यानेच घेतलाय. जवळच बघितला आहे म्हणजे सोयीचे होईल आपल्याला. ” 

माणिकला हा मोठा शॉकच होता. मटकन सोफ्यावर बसत तिने विचारलं “अरे पण का? मंगेश, अरे एकदम असं काय घडलं की तुम्हाला माझ्यापासून वेगळं व्हावंसं वाटलं? काय कमी केलं मी आणि कुठे चुकलं माझं? अरे, बाबा जाऊन अजून वर्ष पण नाही झालं आणि खुशाल एवढ्या मोठ्या बंगल्यात मला एकटीला सोडून तुम्ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये जाताय? हे किती चूक आहे रे. ”, माणिक कळवळून म्हणाली.

मंगेश मख्खपणे उभा होता. न बोलता तो आपल्या खोलीत निघूनच गेला. देविकाशी बोलायची तर सोयच नव्हती.

पुढच्या आठवड्यात एक ट्रक आला. आपले बेडस् काही सामान, गोदरेजचे कपाट असं घेऊन मंगेश निघून गेला.

माणिकला किंचाळून विचारावसं वाटलं अरे मीच खर्च करून घेतलेले हे डबल बेड या गाद्या, हे कपाट हे सगळं सामान कसं नेतो आहेस उचलून?

पण माणिक काहीच बोलली नाही. नमस्कारसुद्धा न करता दोघेही ट्रक मध्ये बसून निघून गेले. आता घरात उरली फक्त माणिक.

त्या रिकाम्या घरात ती भुतासारखी सगळ्या खोल्यातून वणावणा हिंडली. रडत रडत स्वतःलाच विचारत राहिली, माझं काय चुकलं?

तिने न राहवून तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन केला. नीला तिची जवळची मैत्रीण. नीला दहा मिनिटातच माणिकच्या घरी आली. तिला मिठी मारून रडत माणिक म्हणाली, आता मी एकटी कशी राहू इथे? का गेला असेल ग माझा मुलगा मला सोडून? ”

नीलाने तिला शांत होऊ दिलं.

“हे बघ माणिक, हे सत्य आहे आणि तुला ते स्वीकारायला हवंच. वाटेल काही दिवस वाईट. पण होईल तुला सवय. आम्ही आहोत ना?

रोज कोण येणार तुझ्या घरी तुला सोबत म्हणून झोपायला?

आजपासूनच सवय कर. घट्ट कर मन आता. आपलं स्वतःचं घर आहे, त्यात कसली ग भीति? आणि वामनराव कायमआहेत तुझ्यासोबत इथं. ”

नीलाने तिला घरून आणलेला डबा खायला लावला.

म्हणाली “अजिबात कोणाकडे रात्री झोपायला जायचं नाही. आपली नीरा कितीतरी वर्ष एकटी रहातेय. तिला तर मूलबाळ पण नाहीये..

किती आनंदात रहाते ना ती? होईल तुलाही सवय. ”नीला निघून गेली.

माणिकने रात्र तळमळून काढली.

दुसरा दिवस उजाडला. माणिकने चहा करून घेतला.

आज मंगेश देविका नव्हते की नव्हते त्यांचे ब्रेकफास्ट आणि डबे.

कामवाली कलाबाई आली नऊ वाजता. तिला सगळं सांगताना माणिकला पुन्हा रडू कोसळलं. कलाबाई म्हणाली “रडू नका वहिनी.

असलीच पोरं तुमची हल्लीची. गेली तर जाऊद्यात की. आम्ही आहोत की तुम्हाला. उलट त्रास वाचला म्हणा. डबे नकोत करायला त्यांचे आणि स्वयंपाक पण नको रोज करायला त्यांच्या आवडीचा.

होतं ते चांगल्यासाठी. चला.

डोळे पुसा. मी पोहे करते आपल्या साठी. कलाने पोहे केले माणिकला खायला लावले.

त्या दिवशी माणिकला रिकामपण जाणवलं. पण काहीच काम उरलं नव्हतं. तिने घर आवरलं. सगळं पसारा आवरून टाकला.

मैत्रिणीचे फोन आले. गप्पा मारताना माणिक मोकळी होत गेली. आता आपण कायम एकट्या असणार हे हळूहळू मान्य करायचं ठरवलं तिनं.

चार दिवसांनी स्नेहाचा फोनआला.

”माणिक, मला पंचवीसइडलीचटणी करून देशील का प्लीज?

मला उसण भरलीय ग आणि नेमके पाहुणे यायचे आहेत ब्रेकफास्टला.

माझा ड्रायव्हर येऊन घेऊन जाईल. हं. ”

माणिकने स्नेहाला इडलीचटणी पाठवली. ड्रायव्हर बरोबरच स्नेहाने भरपूर पैसे पाठवले होते. आणि चिठ्ठी…हे घ्यायचे मुकाट्याने. नाही म्हणू नकोस. थँक्स माणिक.

माणिकला फार मस्त वाटलं.

कलाबाई म्हणाली” लै भारी की हो ताई. आता घ्यायला लागा अशा ऑर्डरी. मी आहे की. सगळी मदत करीन तुम्हाला. आणि हसत म्हणाली “मग वेगळे पैसे द्या बरं का या कामाचे. ”माणिक हसून, हो ग कला. नक्की देणार तर. म्हणाली. तो दिवस किती छान गेला आपला असं वाटलं माणिकला.

मग बहुतेक स्नेहाने हे ग्रुपमध्ये सांगितलं असणार. तिच्या मैत्रिणीची पावभाजीची ऑर्डर आली. माणिक सुगरण तर होतीच. आणि सढळ हाताने भरपूर द्यायची सवय होती तिला. मैत्रिणीला पावभाजी खूप आवडली.

घरबसल्या माणिकला आता अशा छोट्या ऑर्डर यायला लागल्या.

माणिक अगदी रमून गेली या आवडीच्या कामात.

आणि पैसे खुळखुळू लागले हातात. ऑर्डर आली की कलाबाई मदतीला थांबायची. जास्त ऑर्डर असेल तर कलाची मुलगी यायची मदतीला. त्यांनाही पैसे मिळायला लागले.

आईचा खूप दिवसात फोन आला नाही म्हणून मंगेश जवळजवळ सहा महिन्यांनी घरी आला.

बघतो तर आई खुशीत पेपर वाचत आणि चहा पीत बसलेली.

य म्हणतोस मंगेश? ठीकचाललंय ना सगळं? घे रे चहा. माणिकने विचारलं. तिने मंगेशला विचारलेही नाही की सहा महिन्यांनी आईची आठवण झाली का?

मंगेश म्हणाला”, आई. रहायला येतेस का माझ्याकडे? देविकाला दिवस गेलेत. तिची आई जमणार नाही यायला म्हणाली. तू ये ना. ” देविकाला खूप त्रास होतोय.

माणिकने शांतपणे त्याच्याकडे बघितलं”. छे रे. मलाही अजिबात जमणार नाही यायला. बघितलंस ना, माझा केटरिंगचा व्याप आता खूप वाढलाय. मला उठून तुझ्याकडे यायला जमणार नाही.

फार तर मी डबा देऊ शकेन तुला. न्यावा मात्र लागेल तुला इथून”

चिडून मंगेश म्हणाला, कशाला ग असले भिकार स्वयंपाकीण बाईचे धंदे करतेस? शी. ऐकलं आहे मी लोकांकडून. तुझी आई केटरिंग करते असं.

बंद करून टाक हे सगळं. शोभत नाही माझ्या प्रतिष्ठेला. ”

माणिक आता मात्र संतापली. ”. हो का? कोणती तुझी प्रतिष्ठा? हे तू बोलत नाहीयेस मंगेश. देविका बोलतेय तुझ्या तोंडून. मूर्ख मुलगा. खुशाल एका दिवसात निघून गेलास मला सोडून, तेव्हा नाही लोक काय म्हणतील असं वाटलं रे तुला? तेव्हा लोकांनी कौतुकच केलं असेल ना तुझं.? एकट्या आईला सोडून निघून गेलात म्हणून… हे बघ. हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं ते मी ठरवणार.

तुमच्या गरजेला उभं रहायला नक्की आवडलं असतं मला. मला आनंदच आहे तुला मूल होणार म्हणून. पूर्वीची मी भाबडी माणिक असते तर धावत आलेहीअसते. पण आता मी बदलले. तू मला बदलायला भाग पाडलंस मंगेश… ज्या पद्धतीने तू वागलास ते मला नाही, कोणालाच आवडण्यासारखं नाही मंगेश.

देविकाचं सोड. , ती परकीच मुलगी आहे पण तू तर माझा पोटचा मुलगा आहेस ना? जराही वाईट वाटलं नाही का आईला एका दिवसात सोडूनजाताना? देविकाच्या माहेरी जाताना मिठाया घेऊन जाता आणि दिवाळीला आईच्या घरी यावंसं सुद्धा वाटलं नाही? असा काय गुन्हा केला मी?

… उलट आता मला मोकळीकच मिळाली असं वाटतं हल्ली. तुला काय आवडेल देविकाला काय वाटेल हा धाकच राहिला नाही आता. तुमचे डबे करा, भाज्या आणा, तुम्ही केलेले पसारे निमूट आवरा, हे कमी झालं एकदम. आता मी मस्त एकटी रहाते. माझ्या प्रिय मैत्रिणींबरोबर ट्रिप्स करते, फार्म हाऊसवर जाते. आता आम्ही परदेशी ट्रीपला जाणार आहोत. पटाया बँकॉकला. जे तुम्ही असताना मला जमलं नसतं कधी… ते जाऊदे.

… काय रे, इतक्या महिन्यात एकदा तरी बोलावलंत का मला? नवीन घर बघायला तरी? निदान जेवायला तरी? हे बघ… मला गोष्टी समजत नाहीत असं वाटलं का? तिच्या माहेरची माणसं खुशाल राहिलेली चालतात का? मग आता का येत नाहीये तिची आई लेकीच्या मदतीला?

… सॉरी मंगेश. मी येणार नाही. मला माहीत आहे, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस. माझे हातपाय थकल्यावर तूच येशील मदतीला….. पण मला आता तोही भरवसा उरला नाही तुमचा.

बघू पुढचे पुढे. मी इतका विचारच करत नाही हल्ली. आहेत खूप वृद्धाश्रम. जाईन तिकडे. ”

… माणिकच्या डोळ्यात अश्रू आले.

… मंगेश मान खाली घालून निघून गेला.

 शांतपणे माणिकने डोळे पुसले आणि आलेली ऑर्डर पुरी करायला ती किचन मध्ये निघून गेली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

परवा मंगेशचं लग्न झालं. सोन्याच्या पावलांनी देविका घरी आली आणि माणिकला धन्य धन्य झालं.

एकुलता एक मुलगा. चांगला शिकलेला आणि खूप मोठ्या पगाराची नोकरी. पण म्हणतात तसे इतके वर्षं योगच नव्हते लग्नाचे.

किती विवाह मंडळात नावे घातली ओळखीच्या लोकांना सांगून ठेवलं पण लग्न काही जमेना.

माणिकचे यजमान साध्याच नोकरीत आणि यथातथाच नोकरी.

बिचाऱ्या माणिकनं नोकरी करून संसार पुढे रेटला.

असाही तिला काही फार पगार नव्हता पण तरी हातभार लागायचा तेवढाच.

माणिक जितकी उत्साही, आयुष्यात रस घेणारी, समरसून जगणारी तितकेच वामनराव आळशी, सुस्त आणि निरुत्साही.

रोज ऑफिस कसेबसे करून घरी आले की येऊन पेपर वाचत बसायचे.

कोणी मित्र नाहीत की कसला छंद नाही. छंद एकच. सतत चांगलंचुंगलं खायचं. बाहेरच्या आराम खुर्चीवर बसून माणिक स्वयंपाकघरात काय करते त्यावर लक्ष ठेवायचं. आणि खेकसायचं तिच्यावर.

बिचारी माणिक सहन करायची सगळं. तिला धड माहेरचा आधार नाही, आईवडील भाऊ बहीण कोणी नाही. ही अनाथ मुलगी काकांच्या घरी वाढली. काकाने हा बंगला आणि हा नोकरीचा मुलगा बघून करून दिलं माणिकचं लग्न.

कुलकर्णींनी ही दिसायला चांगली मुलगी लग्नाचा सगळा खर्च आपणच करून घरात आणली,

म्हणून माणिक आधीच दबलेली होती. त्यात अतिशय माणूसघाणे आणि विक्षिप्त वामनराव पदरी पडले.

तरी हसतमुख माणिकने लगेचच कॉलनीतल्या मैत्रिणी जोडल्या.

हसून खेळून त्यांच्याबरोबर आयुष्य आनंदात घालवू लागली माणिक.

 

यथावकाश माणिकला दिवस गेले आणि छानसा मुलगा झाला.

माणिकने कामावरून रजा घेतली.

माणिकच्या सासूबाई चांगल्या होत्या. आपला कर्तृत्वशून्य मुलगा त्यांना चांगलाच माहीत होता. त्या म्हणाल्या”मी संभाळीन ग लेकाला तुझ्या. जा ग तू रजा संपली की नोकरीला. हा वामन्या काही तुला साथ देणार नाही बघ. तू नोकरी सोडू नको माणिक. आणखी चांगली नोकरी शोधत रहा.”

माणिकने लहानमोठे कोर्सेस केले आणि एका ऑफिसमध्ये तिला खरंच चांगली नोकरी मिळून गेली.

शहाणी माणिक एकाच मुलावर थांबली. तिच्या सासूबाईंना तिचं फार कौतुक होतं. पगार वाढल्यावर माणिक सासूबाईंना हौसेने पॉकेटमनी देई आणिम्हणे, सासूबाई घ्या हो हे पैसे. करा थोडी मजा. ”

माणिकचा मुलगा शाळेत चांगली प्रगति करत होता.

आपली आई आणि आजी त्याचे सर्वस्व होते. बाबांपासून तो लांबच असे. वामनरावांशी त्याचे सूर फारसे जुळले नाहीत. त्यांनाही मंगेशचं कौतुक नव्हतं. समजच कमी होती त्यांना जरा.

मंगेश शाळा कॉलेजमध्ये चांगले यश मिळवत पुढे गेला. त्याची सगळी फी माणिकने भरली.

ठराविक रक्कम हातात ठेवली की वामनराव वर एक पैसा देत नसत.

मग माणिक कुठून पैसे आणते, काय करते याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसे.

मंगेश कॉलेजला गेलाआणि थोडे कमी मार्क पडले त्याला बारावीला.

गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणेआता अशक्य होते.

माणिकने आणि मंगेशच्या आजीने त्याला धीर दिला. दोघीनी आपलं सोनं विकायचं ठरवलं आणि मंगेशची सोय केली.

मंगेशच्या डोळ्यात पाणी आलं.

आई आजी, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही ग. तो गहिवरून म्हणाला.

आजी म्हणाली “माझं सोड मंगेशा. पण या आईला कधी विसरू नको रे बाबा. फार सोसलंय बर पोरीने. ”आजी डोळे पुसत म्हणाली. “

नाही ग आजी. मीआईला कधीतरी अंतर देईन का? ”मंगेश गहिवरून म्हणाला.

मंगेशने मग मात्र मागे वळून बघितलं नाही. , खूप हुशार नसला तरी कष्टाळू होता मंगेश. अहोरात्र मेहनत करत तो चांगले मार्क्स मिळवत पास झाला.

मंगेशला एका कंपनीत चांगली नोकरी लागली. त्यामानाने बरा पगार होता मंगेशला.

मध्यमवर्गात वाढलेल्या आणि कमी अपेक्षा असलेल्या त्या कुटुंबाला तो पगारही खूप मोठाच वाटला.

दरम्यान अगदी छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन मंगेशची आजी अचानक गेली. आता मात्र मंगेशचं लग्न व्हायला हवं असं माणिकला वाटायला लागलं.

तिशीजवळ आलेला मंगेश लहान नव्हता आता लग्नासाठी.

खूप खूप मुली बघितल्या माणिकने. पण मुलींच्या अपेक्षाच फार. शहरातल्या मुली तर इतक्या चढलेल्या की मंगेशचा पगार बघून त्या नकारच देत.

माणिक अगदी हताश झाली. तिचा मुली बघायचा उत्साह अगदी कमीच झाला. पण योग असावा तसे हे नागपूरजवळच्या मुलीचे स्थळ सांगून आले.

मुलगी एमबीए,, दिसायला बरी आणि मुख्य म्हणजे पुण्यात बदली मिळण्यासारखी होती. दिसायला डावीच होती देविका जोशी. पण सगळा विचार करून मंगेशने आणि माणिकने होकार दिला.

जोशींची परिस्थिती बेताचीच होती.

ठराविक रक्कम आम्ही तुमच्या हातात ठेवू. बाकी काही करू शकणार नाही. जोशी म्हणाले.

 

माणिक नाराज झाली पण मंगेश म्हणाला “असू दे ग आई. ती मिळवती मुलगी आहे. आपल्याच घरी येणार आहे ना. करू आपण जमेल तसा खर्च. ”

माणिकने पहिलाच मुलगा म्हणून खूप खर्च केला. आपल्या फंडातले खूप पैसे खर्च केले, सुनेला दागिने केले. खूप लोकांना हौसेने बोलावून बराच फंड रिकामा केला. मैत्रिणी सावध करत होत्या तरी त्यांचे न ऐकता.

नीला म्हणत होतीच. ”माणिक, अग काय हा खर्च? जरा विचार कर. असा तुझा घामाचा पैसा उधळू नकोस. एकुलता एक मुलगा असला म्हणून काय झालं? ”पण माणिकने ऐकलं नाही.

सून घरात आली. माणिकला सून नवीन असताना कौतुक वाटलं म्हणून तिला रोज हातात चहा, नास्ता, अगदी कौतुकाने रोज काय करू विचारून करी माणिक.

उन्हे डोक्यावर आली तरी यांची बेडरूम बंदच. , माणिकच्या घराचे सगळे रुटीन विस्कळित झालं.

एक दिवस वामनराव फिरून आले आणि दारातच पडले. त्यांना उठताच येईना. धावाधाव करून त्यांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये अँडमिट केलं. त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया ताबडतोब करायला हवी असं सर्जनने सांगितलं.

खर्च सांगितला पाच लाख रुपये.

माणिकचा पाऊण पैसा तर मंगेशच्या लग्नातच आणि घराच्या रिनोव्हेशन मधेच गेला होता.

मंगेशने न बोलता जमवाजमव करून सगळं बिल भरलं आणि वामनराव घरी आले. घरी आले ते उठूच शकले नाहीत. त्यांच्या पायातली ताकदच गेली होती.

डॉक्टरांनी सांगितले, मणके झिजले आहेत आणि आता त्या नर्व्हज् दाबल्या गेल्यामुळे हे आता चालू शकणार नाहीत.

माणिकला अतिशय वाईट वाटलं. तिने खूप प्रयत्न करून बघितले. आयुर्वेदिक होमिओपॅथिक सगळ्या चिकित्सा करून झाल्या पण वामनरावाना कधीच उभं रहाता आलं नाही.

मग आलं डायपर आणि सेवेसाठी बायका ठेवणं. त्यांचे भक्कम पगार आणि खर्च माणिकच्या मागे लागले. खर्चाने पिचून गेली माणिक.

मुलगा सून ठराविक रक्कम हातात ठेवत. बाकीचा डोईजड खर्च माणिक कुठून करणार?

एक दिवस माणिक मंगेशला म्हणाली”अरे मंगेश, जरा जास्त पैसे देत जा तू. निदान तुमच्या दोघांचे जेवणखाण डबे वीजबिल हे नको का तुम्ही द्यायला? किराणा दुप्पट लागतो हल्ली. मला झेपत नाही रे हा खर्च. ”

लगेच देविका म्हणाली, हे बघा आई, बाबांचे पाच लाख बिल मंगेशनेच भरलं ना?

आणि आमच्या लग्नात मंगेशने नव्हता तुम्हाला खर्च करायला सांगितला. सगळा फंड उधळून टाकलात. आम्हाला नाही जमणार जास्त पैसे द्यायला. ”न बोलता मंगेश आणि देविका निघून गेले. माणिक हताश झाली. तिचे आणि वामनरावांचे तुटपुंजे पेन्शन तिला पुरेंना.

अशी चार वर्षे गेली. माणिक चार वर्षात काळज्या कष्टानं म्हातारी झाली. वाकून गेली पाठीत माणिक.

मैत्रिणी येत धीर देत. तिला बदल म्हणून कार मधून फिरायला नेत. हळहळून म्हणत, बघ माणिक.

आम्ही सांगत होतो ते ऐकलं नाहीस. किती उधळपट्टी केलीस लग्नात. सगळा फंड घालवलास वाया. आहे का त्या सुनेला मुलाला त्याचं काही? ”

पाच वर्षे अशी अंथरुणात काढून एका रात्री वामनराव झोपेतच गेले.

सुटले असेच भाव होते सगळ्यांच्या तोंडावर. माणिक आता रिकामी झाली. चोवीस तास वामनरावांच्या सेवेत गुरफटलेली माणिक आता एकदमच रिक्त झाली. काहीच काम राहिलं नाही तिला.

पडून असलेल्या वामनरावांशी तिला सोबत होती. ती त्यांना पुस्तके वाचून दाखवायची. दोघेजण पत्ते खेळायचे. या आजारपणामुळेदोघेही जवळ आले होते एकमेकांच्या.

गप्पा मारत, मागच्या आठवणी काढत ते त्यात रमून जात.

वामनरावांनी तिची अनेकवेळा क्षमा मागितली. मी तुला समजू शकलो नाही माणिक. असं अनेकवेळा ते म्हणाले.

“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बालिशपणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “बालिशपणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

रविवारची निवांत संध्याकाळ, हवेत गारठा होता. मस्त आलं घातलेल्या चहाचा आस्वाद घेत मी खिडकीत उभी होते. सोसायटीतल्या मंदिराजवळ काहीजण गप्पा मारत बसलेले. बाजूला मुलांचा आरडाओरडा चाललेला… 

“मार, मार”

“सोडू नकोस. ”

“ए तिकडं नको. इकडे बघ”

“क्या कर रहा है. उडा दे”

“इडियट”

“अक्कल है के नही”

“अबे xxxxx” 

“मेलो, मेलो”

“संपलं, फिनिश”

“ए xxx खेळता येत नाही तर येतो कशाला? ”

शाळकरी वयातली मुलं मोबाइलवर गेम खेळत होती. खरं सांगायचं तर त्यांचं बोलणं इतकं भयानक होतं की ते सगळं लिहिणं शक्य नाही. आश्चर्य म्हणजे तिथल्या मोठ्या लोकांना याबद्दल काहीच वाटत नव्हतं किवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत होते.

… सध्या हे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसतं. तसंही मारधाडीच्या गेम खेळताना भान राहत नाही. सर्रास शिवीगाळ केली जाते त्यात लहान-मोठे सगळेच आले. फोन स्मार्ट झाला पण वापरणाऱ्यांचा बावळटपणा वाढतोय. एवढं मात्र खरं…

पूर्वीचं आणि आत्ताचं ‘बालपण’ याबद्दल विचार डोक्यात असताना तिथंच बाजूला असलेल्या छोट्या मुलीनं लक्ष वेधलं. मान खाली घालून ती हातातला थर्माकोलचा तुकडा कठड्यावर घासत होती. बारीक बारीक भुसा खाली पडत होता. प्रचंड एकाग्रतेनं काम चाललेलं. बाजूला अजून दोन चार थर्माकोलचे तुकडे पडलेले. एक झालं की दुसरं असा उद्योग चाललेला. तल्लीन झालेल्या छोटीला आजूबाजूच्या जगाशी देणं घेणं नव्हतं. गुंग झालेल्या छोटीचं फार कौतुक आणि हेवा वाटला. मोबाइलनं जग व्यापलं असताना छोटीचं ‘बालपण’ अजूनही शिल्लक होतं.

– – त्या तिच्यासारखेच बिनकामी उद्योग मी, तुम्ही, सर्वांनीच केलेत. उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकं, पेपरमधल्या फोटोंना दाढी-मिशा काढणं, धूळ बसलेल्या गाडीवर चित्र काढणं, अभ्यास करता करता पेनानं वहीमध्ये गोल गोल काढत राहणं. गोष्ट ऐकून कल्पनेत हरवणं हे सर्व डोळ्यासमोर आलं. त्या रम्य आठवणीत हरवले असताना लेकीची हाक आली.

“ममा एवढं काय बघतेस” सोनूनं विचारलं.

“इकडे ये. गंमत बघ” खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत मी म्हणाले.

“ईsssss, मोबाइल गेम तर खेळतायेत. सो कॉमन”

“ती बाजूची मुलगी बघ. ” छोटी अजूनही त्याच कामात हरवलेली.

“ए, ती काय करतीये ” सोनू आश्चर्यांनं म्हणाली.

“खेळतीये”

“हे असं”

“भारी ना”

“त्यात काय भारी”

“तुला त्यातली मजा कळणार नाही. ”

“मजा??? .. व्हॉट फन इन टू धिस. काहीही काय? मी असलं काही कधी केलं नाही. ”

“कारण प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायची तुझी सवय. बुद्धिबळ सोडून तर दुसरं काही खेळली नाहीस. लहानपणापासून सोफिस्टीकेटेड. ”

“येस्स. त्यात काहीच चुकीचं नाही. ”

“गप बस. ही कौतुकाची गोष्ट नाहीये. प्रत्येक ठिकाणी लॉजिक लावायचं नसतं. काही गोष्टी आनंदासाठी करायच्या. ’

“व्हॉट डू यू मीन”

“फक्त बालपणीच मनाला वाटेल ते करता येतं. वागता येतं. जबाबदारी नसते की बंधनं नसतात आणि लोक काय म्हणतील याचीही चिंता नसते. व्यवहार या शब्दाबरोबर ओळख व्हायच्या आधीचा सुवर्णकाळ. फक्त एंजॉयमेंट!! ”

“आणि एकदम हॅप्पी!! नो टेंशन, नो वरी. ”

“बरोब्बर, आताच्या मुलांविषयी वाईट वाटतं. फार लवकर मोठी होतायेत. नको ती आणि नको इतकी माहिती सहज मिळत असल्यानं समज वाढतेय आणि निरागसता मात्र कमी होतेय. तसंही अनेक निखळ आनंद मोबाईलच्या राक्षसानं खाऊन टाकलेत. ”

“चांगलं आहे की… नाहीतरी असल्या खेळण्याचा गोष्टींचा पुढच्या लाईफमध्ये उपयोग नाही. ” सोनू.

“बाळा, बालपण फार थोड्या काळासाठी आणि मोठेपण मात्र आयुष्यभर सोबत असते. ”

“ममा, पसंद अपनी अपनी. ती मुलगी जे करतीये. दॅट इज वेस्ट ऑफ टाइम. “

‘बालिशपणा’. ”

“करेक्ट, माय डियर!! हाच ‘बालिशपणा’ आपण विसरलोय. फायदा-तोट्याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे हरवणं दुर्मिळ झालंय. एकाग्रता कमी होऊन बेचैनी वाढलीये. ”

“नो चॉइस!! आजची लाईफस्टाइलच तशीये. ” सोनू 

“म्हणूनच सदासर्वकाळ दिखाऊपणाची झूल पांघरून फिरतो. वागणं-बोलणं सगळंच नाटकी. आपसातला संवाद आणि विश्वास कमी झालाय. त्यातही एखादा मोकळं ढाकळं वागणारा, बोलणारा, खळखळून हसणारा भेटला तर ऑकवर्ड वाटतं. स्वतःचे छंद, आवड हेच तर केव्हाच विसरले. माणसांची यंत्र झालीत. ” मी भान हरपून बोलत होते तेव्हा सोनू एकटक पाहत होती.

“असं काय पाहतेस”

“ममा, खूप छान बोलतेयेस. मी यावर विचार करीन. आपण पत्ते खेळायचे”

“हो, चालेल की, काय खेळायचं”

“रमी” सोनू.

“त्यापेक्षा भिकार-सावकार खेळू. ” 

“मला येत नाही”

“सोप्पंयं, मी शिकवते. जाम मजा येते. ”

– – मग काय मायलेकीत पत्त्यांचा डाव बेफाम रंगला. हसणं खिदळणं, धमाल चाललेली. तेव्हा आमचा आवाज ऐकून नवरोबा कडाडले… “काय ‘बालिशपणा’ चाललाय”

“अय्या!! खरंच!! , ” मोठ्यानं म्हणत सोनू आणि मी हसलो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वास्तुशांती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वास्तुशांती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

घरात हळूहळू एकेक पाहुणा येत होता. वर्दळ वाढत होती. ” अरे शशांक (माझा मोठा मुलगा) माळी काकांनी फुले नाही पाठवली अजून. त्यांना फोन कर. मी सगळं पूजा साहित्य, होमासाठीच्या समिंधा व इतर साहित्य सगळं व्यवस्थित चेक केलंय. तू ही बघ जरा. आणि अहो तुम्ही ऐकलंत का? जरा गुरूजींना फोन करा. अरे श्रीकांत (माझा धाकटा मुलगा) तू काय करतोस रे. बघ दूधवाल्या काकांना आज पाच लिटर दूध आणायला सांग. नैवेद्यात पूर्णाहूती आहे. खीरसाठी दूध लागेल. पाहुणे मंडळींसाठी चहा. बरीच पाहुणे मंडळी येत आहेत. त्यात लहान मुलांसाठीही दूध लागेल. अगं मोना (माझी नात) तुझी रांगोळी झाली काय काढून, मी अंगणात डोकावत बोलले. मोनाने सुंदर घरकुल रेखाटले होते. विविध फुलांच्या माळांनी ते सजविले होते. पुढे छोटेसे अंगण, त्यात विविध फुलझाडे, दरवाज्यावर स्वस्तिक व सुंदर कलश, अगदी हुबेहूब घरकुल तिने रांगोळीत साकारलं होतं. ” काय ग आजी, काय म्हणतेस. बघ झाली माझी रांगोळी. कशी वाटते. ” क्षणभर मी पाहातच राहिले होते कि मोनाच्या बोलण्याने मी भानावर आले. ” अरे व्वा. काय अप्रतिम रांगोळी रेखाटलीस ग. बाळ रांगोळीतच तू इतकं सुंदर घरकुल रेखाटलंस तर आयुष्यात किती चांगलं घर सजवशील. ज्याच्या घरी जाशील त्याचं कल्याणच होईल. गुणाची ग माझी बाळी ” म्हणत तिच्या बलाया घेत माझ्या कानाजवळ कडाकड बोटं मोडून मी दृष्ट काढली.

चार दिवस झाले माझी (सारिका) अशी धावपळ सुरू होती. आणि का करू नये? माझ्या शशांकनं आज स्वतःचं घरकुल उभारलं होतं आपल्या मेहनतीवर व कष्टावर. मुलांना आम्ही काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवू शकलो नाही कि त्यांच्यासाठी फारसा खर्चही करू शकत नव्हतो. अंगावर कापड आणि पोटभर अन्न यापलिकडे आम्ही काही करूही शकत नव्हतो. मी ओद्योगिक वसाहतीत जाऊन मिळेल ते काम करत होते कधी मेंदीचे पॅकेट तयार करणे तर कधी बाटल्यांचे बूच तयार करणे, आणि आमचे अहो अगरबत्ती आणून विविध सुंगंधाची फवारणी करुन त्यांची पाकीट तयार करुन मार्केटमध्ये विविध दुकानात पुरवायचे. अशा आमच्या तुटपुंज्या कमाईत आम्ही मुलांचे कोणते श्रीमंती चोचले पुरवणार होतो. किंवा मुलांचे साधे हट्टही आम्ही पुरवू शकत नव्हतो. पण माझी मुले ही समजदार. उलट ते ही आम्हांला कामात मदत करायचे. स्वतःचे शिक्षणही कमवा व शिका स्वरूपाचेच त्यांनी केले. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मिळेल ते काम करुन ते आपला शैक्षणिक खर्च व गरजा भागवत होते.

” या या वन्स, केव्हाची वाट पाहात होते. प्रवास ठीक झाला ना ” इतक्यात निलाक्षीने पाण्याचे ग्लास आणले. आत्या तुम्ही फ्रेश व्हा. मी गीझर चालू करते. ” ” अग होईल ग बेटा. तू आधी तयार हो. गुरूजी येतीलच इतक्यात. आमचा शशांक कोठे आहे. होय आत्या आलो आलो म्हणत शशांकने मीना वन्सचे चरणस्पर्श केले. ” ” आयुष्यमान भव. घराकडे चौफेर नजर फिरवत मीना वन्स म्हणाल्या, खूपच सुंदर, मस्त, छान प्रगती केलीस ” ” रात्रंदिवस मेहनत करतो तुमचा भाचा वन्स. आणि मित्र परिवारही खूप आहे त्याचा. समाजात मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं असतं त्याचं. ” ” अग सारिका, तुझे संस्कारही आहेत ग त्यात, तूच त्यांच्या मनात जिद्द, काही करुन दाखविण्याचं बळ निर्माण केलंस.

हाॅलमध्ये पूजा, होमहवन सुरू होते. मी आणि माझी बहीण आम्ही किचन व पाहुण्यांच्या आगत स्वागतात व्यस्त होतो. आणि माझी विचार शृंखलाही त्याच वेगानं धावत होती. शशांकने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व नोकरीचा शोध सुरू केला. IDFC बँकेत त्याला Investment Agent म्हणून काम मिळालं अर्थात मुलाखत व सर्व सोपस्कर होऊन. तीन चार वर्ष त्याने काम केले पण मेहनतीच्या मानाने त्याला मिळणारा मोबदला कमी होता. एवढे काम मी स्वतःच केले तर? मीच स्वतःची एजन्सी सुरू केली तर. थोडे पैसे जमा झालेत माझे. करावं का मी हे धाडस? मी धाडस करावे आणि यश नाही आले तर? आहे तो पैसाही जायचा.

“काय झाले शशांक? आजकाल खूप बैचेन दिसतोस? मी व अहों नी त्याला बोलतं केलं. ” अरे मग नुसता विचार नको करूस पुढे पाऊल टाक. आम्ही आहोत सोबत. आणि शशांकने ” सप्तशृंग फायनान्सशियल असेट् स अँन्ड फोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा शुभारंभ केला. सुरूवातीला प्रतिसाद कमी होता पण हळूहळू वाढत गेला. दरम्यान शशांकसाठी सांगून मुली येऊ लागल्या व एका शुभमुहूर्तावर निलाक्षीसोबत शुभमंगल पार पडलं. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. माझीच दृष्ट ना लागो या माझ्या संसाराला अशी माझी स्थिती झालेली. धाकट्या श्रीकांतनेही ट्रव्हल एजन्सीमध्ये जम बसवला होता. माझ्या घरात आता चिमणी पावलेही उमटण्याची चिन्हे दिसू लागली. मोनाचा जन्म म्हणजे घरात आनंद पर्वणी ठरला, पाठोपाठ आला जयेश.

या दरम्यान श्रीकांतचंही शुभमंगल पार पडलं. माझं घर तसं लहान. पण करत होतो अंडजेस्ट. आणि एक दिवस श्रीकांतने फ्लॅट बुक केल्याची बातमी दिली. ” म्हणजे तू वेगळा होणार श्रीकांत” ” नाही आई, आम्ही इथेच राहू. रात्री झोपण्यापुरतं तिथे जाऊ ” हा परिपाठ वर्षभर चालला. श्रीकांतला घरी परतायला कधी रात्रीचे दहा अकराही वाजायचे, जेवण करून मग फ्लॅटवर जायचे. रियाची कुचंबणा होऊ लागली आणि त्यात तिची प्रेग्नन्सी. म्हणून एक दिवस आम्हीच उभयतांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटवर शिफ्ट होण्याची परवानगी दिली..

” चला पूजा संपन्न झाली. आता गृहप्रवेश विधी व त्यानंतर आरती संपन्न होईल. कुटुंबातील सगळ्यांनी बाहेर अंगणात थांबा, गृहप्रवेश विधी संपन्न करायचाय, श्रीकांत व निलाक्षी आता उजवा पायाने घरात प्रवेश करा, मग एकापाठोपाठ सगळ्यांनी यासचंय.

आरती, नैवैद्य, ब्राम्हणभोजन यथासांग पार पडले. सायंकाळी शशांकने मोठे रिसेप्शन ठेवले होते. लोक येत होते, शुभेच्छा देत होते. फुलांचे बुके व भेटवस्तू जमा होत होत्या आणि मी जीवनाचे सार्थक झाले म्हणून समाधानी होते.

नवीन घरात पाहुण्यांची गर्दी म्हणून आम्ही दोघे आमच्या जुन्या घरी झोपायला आलो. सकाळी मी पुन्हा शशांकडे हजर झाले, निलाक्षीवर कामाचा ताण पडू नये म्हणून मी चार दिवस कंपनीतून रजा घेतलेली.

शशांक व निलाक्षी ने दोन चार दिवस जुन्या घरी ये जा केली. आणि हळूहळू ते येणे कमी केले. ” शशांक आम्हीही तिकडे येतो आता. हे घर भाड्याने देऊ. “आई बाबा, तुम्ही तिकडे येऊ नका म्हणत नाही मी. पण आईचं कामाचं ठिकाण तेथून लांब पडेल. शिवाय या घरातील सामान तिकडे नाही मावणार एवढा. ” अरे शशांक मुलांना शाळेत ने आण कशी करणार, मी येतो तिकडे ” ” बाबा ती काळजी नका करू हो. मुलांना स्कूलबस लावेन मी. आयुष्यभर तुम्ही कष्ट केले, आता करा आराम. आणि आम्ही काही कुठे गेले आहोत काय? गावातच आहोत. सणवार आपण एकत्रच माझ्या घरी साजरे करू. आणि काही लागलंच तर मला फोन करा. लगेच हजर होईन मी.”

माझ्या मुलाने घरकुल उभारलं, मला वाटलं, आता माझे कष्ट संपले. सुखसोईंनीयुक्त या घरात आता आरामात जीवन जगायचं. पण त्या घरकुलात आम्हा उभयतांना जागा नव्हती. आज वास्तुशांती झाली होती. पण त्या वास्तुत आम्हांला जागा नव्हती. खरंच माझी मुलं खूपच मोठी झाली होती.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “पूर्वी रजा मागितली की आधी जोशी साहेबांचे चाबकाच्या फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे.. ” आवाज भरून आला तसं देशपांडे बोलायचे थांबले.

“देशपांडे.. जस्ट रिलॅक्स.. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “

ऐकलं आणि देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले.

“काय झालं देशपांडे? घरी काही प्रॉब्लेम?

“मुलाला बरं नाहीय. “

संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.

“किती वर्षाचा आहे तुमच्या मुलगा? “

“सहा वर्षांचा.. “

“रहातो तुमच्याशिवाय? आठवण नाही काढत? ” संदीपने विचारले

देशपांडे आपलं हरवलेल़ं सुख शोधत राहिले..)

इथून पुढे – – – 

“मला ओळखतच नाही तो. म्हणजे इथं आजारी पडला तेव्हा वर्षाचाही नव्हता. रिकेटस् चा अॅटॅक होता. इथं धड दवाखान्याची सोयही नाही. मग खूप धावपळ करून तिकडे नेला, पण बराच उशीर होऊन गेला होता हो. तेव्हापासून अंथरूण सोडलंच नाहीयन्. चालणं नाही, बोलणं नाही, नजरेत ओळखीचं हसू नाही, मांसाचा एक लोळागोळा.. लाळ गाळत पडून असतो… “

“ओह.. आय फील व्हेरी सॉरी देशपांडे. मला हे सगळं माहित नव्हतं. जोशी बोलले नव्हते कधी. “

” त्यांना तरी इतकं सगळं कुठं माहित होतं? “

” कां? तुम्ही बोलला नव्हतात कधी? “

देशपांडे मानेनेच नाही म्हणाले. ” बोलावसं वाटलंच नाही हो. एकदा असंच पत्र आलं होतं घरचं. लगेच जाणं आवश्यक होतं. तेव्हा ते मला.. ‘तुमचा मुलगा खरंच आजारी आहे कां ते एकदा तुमच्या घरी येऊन बघायला हवं’ असं म्हणाले होते. ते ऐकलं त्या क्षणापासून माझा संवादच तुटला. “

” यापुढे असं होणार नाही देशपांडे. मुलाच्या काळजीचं दडपण मनातून काढून टाका तुम्ही”

देशपांडे एवढंसं हसले.

” मला मुलाची काळजी फारशी वाटत नाही साहेब. कारण ती करायला माझी बायको तिथं आहे. पण तिची काळजी करायलाच कुणी नाही हो. सगळं ओझं एकटी ओढत असते. दोन्ही घरच्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न केलेलं. त्यामुळे सगळ्या मायेच्या माणसांनी आमच्याकडे पाठ फिरवलीय. वाटत होतं या आमच्या दयनीय अवस्थेत तरी सर्वजण आम्हाला जवळ घेतील, मागचं सगळं विसरतील. पण… “

देशपांडेंचं बोलणं सुरू असतानाच पोस्टमन दारात उभा होता. त्याने पुढे केलेला टेलिग्राम संदीपने शांतपणे स्वीकारला.

“कुणाचा… कुणाचा आहे टेलिग्राम? ” देशपांडेंनी थरथरत्या आवाजात विचारलं. टेलिग्राम वाचून संदीपने शांतपणे त्याची घडी घालून तो खिशात ठेवून दिला. देशपांडेंचा स्वतःवरचा ताबा हळूहळू सुटत चालला. त्यांचं उभं अंग थरथरू लागलं. ते श्वास रोखून पहात राहिले. मुलाच्या काळजीने आतून व्याकुळ होऊ लागले. तोल सावरता येईना तसे हेलपाटत समोरच्या खुर्चीत टेकले. थोडंसं पुढं होऊन त्यांना अलगद थोपटत संदीप ते शांत व्हायची वाट पहात राहिला.

“देशपांडे, टेलिग्राम तुमचा नाहीये.. “

खोल दरीत कोसळत असताना अगदी अनपेक्षितपणे कुणीतरी अलगद झेलावं तशी देशपांडेंची अवस्था झाली.

” मग.. मग कुणाचा आहे टेलिग्राम? “

संदीपने कांही न बोलता खिशातली टेलिग्रामची घडी काढून त्यांच्यापुढे केली.

‘तेजू नीडस् यू. स्टार्ट इमिजिएटली.. ‘

” ही तेजू कोण? “

“मुलगी माझी. ” मनातली काळजी शक्यतो लपवत संदीप म्हणाला.

“काय होतंय तिला? आजारी आहे कां ती? “

” नो.. नो.. नाॅट अॅट आॅल.. ” संदीपने ते विचार तत्परतेने झटकून टाकले. ” शी.. शी मस्ट बी आॅल राईट.. ” तो स्वतःच्याच मनाला समजावल्यासारखा बोलून गेला. आता मात्र त्याला आपल्या काळजातली व्याकुळता लपवता येईना. त्याच्या चेहऱ्यावरचे हे बदलत जाणारे भाव देशपांडेंच्या नजरेतून सुटूच शकले नाहीत…

” साहेब, तुम्ही माझ्याकडे चार्ज घेऊन दोन दिवस जाऊन या.. ” ते मनापासून म्हणाले.

” नाही नाही देशपांडे… अहो, भलतंच काय? माझ्यापेक्षा तुमचं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. “

” साहेब, आय कॅन वेट. मला सवय आहे त्याची. शिवाय मी आधी गेलो तर यावेळी कदाचित चारदोन दिवस जास्त रहावं लागेल. तिथं माझ्यासाठी काय वाढून ठेवलं असेल कुणास ठाऊक? त्यामुळे माझं परत येणं कदाचित लांबलंच तर तुम्ही विनाकारण इथे अडकून पडाल. ऐका माझं. त्यापेक्षा तुम्हीच आधी जाऊन या. तेजूला भेटून आलात कीं तुम्हालाही बरं वाटेल. ” देशपांडे मनापासून म्हणाले.

वरून ओबडधोबड, मळकट, निस्तेज दिसणाऱ्या देशपांडेंच्या अंतर्मनात भरून राहिलेल्या माणुसकीने संदीप आतून हलला. पण.. पण देशपांडे करत होते तो त्याग स्वीकारायला त्याचं मन मात्र तयार होईना. तो काही बोलणार एवढ्यात मघाशी देशपांडेंनी वाचून टेबलवर ठेवलेला तो टेलिग्राम फडफडून संदीपचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ लागला. त्या टेलिग्रामच्या कागदातून तेजूचा म्लान केविलवाणा चेहरा संदीपकडे झेप होता. त्या कोवळ्या जीवाच्या आर्त हाकेला त्याला नाही म्हणवेना. भावनातिरेकाने थरथरत त्याने उत्कटतेने देशपांडेंचे हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबले. या क्षणी मनातल्या भावना नेमकेपणाने व्यक्त करायला दुसरे शब्दच त्याच्याजवळ नव्हते!

… संदीपचं मन घराकडे धाव घेत राहिलं पण एस्. टी तो वेग घेईना. तेजूच्या काळजीचं मणामणाचं ओझं मनावर घेऊन त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा रात्र बरीच उलटून गेली होती. तो भुकेला, गलितगात्र, पूर्णत: थकलेला.. पण या कशाचा स्पर्श त्याच्या मनाला होत नव्हताच. मनात काळजी होती फक्त तेजूची!!

” काय झालंय तेजूला? ” दार उघडताच त्याने अधीरतेने विचारलं.

“श्शू.. हळू बोला. आत्ताच झोपलीय ती.. ” त्याच्या हातातली बँग घेत प्रिया म्हणाली. संदीपला बूट काढायचंही भान नव्हतं. तो तसाच बेडरूमकडे झेपावला. तिथे तेजू शांत पहुडली होती.

” आणि हे काय? आई कुठे आहे? ” बाहेर येत त्यांने प्रियाला विचारलं.

” अहो, भाऊजींचं पत्र आलं होतं. जाऊबाईंना बरं नाहीये. चार दिवस जाऊ येते म्हणाल्या. मग रजाच घेतली मी. दिवसभर घरी नुसतं बसून तुमची आठवण छळायला लागली, मग मीच केला टेलिग्राम.. ‘तेजू नीडस् यू.. ‘ म्हणून. खरंतर ‘आय नीड यू व्हेरी मच” प्रिया त्याच्याकडे पाहून सूचक हसली. पण तो..? तो शून्य… विमनस्क…!!

“संदीप, का रे? काय झालं? “

” तू त्यासाठी असा टेलिग्राम केलास? “

टेलिग्राम केला त्या क्षणापासून त्याची आतुरतेने वाट पहाणारी प्रिया संदीपच्या या प्रश्नाने ढासळलीच.

” कां? नको होता करायला? टेलिग्राम ऐवजी खरं कारण लिहिलेलं दोन ओळींचं पत्र पाठवलं असतं तर आला असतात कां असे धावत? तुम्हाला काय माहित गेले पंधरा दिवस आणि पंधरा रात्री मी कशा काढल्यात ते? दिवसभर जीवघेणी धावपळ आणि रात्री… सगळं सांगायलाच हवं का हो तुम्हाला? “

” नाही प्रिया. आय कॅन अंडरस्टॅंड यू. पण तुझ्या या अनवधानाने केलेल्या कृतीचे तीक्ष्ण घाव तुला कल्पनाही करता येणार नाही इतके जीवघेणे आहेत गं… “

” म्हणजे? काय झालंय संदीप? “

“तिथे ब्रॅंचमधे देशपांडे म्हणून हेडकॅशिअर आहेत आमचे. तिकडे गावी त्यांचा एकुलता एक मुलगा अंथरुणाला खिळून आहे प्रिया… त्यांना लगेच निघणं आवश्यक होतं. पण तुझा टेलिग्राम आला आणि तो पाहून ते थांबले. आधी मला जा म्हणाले. केवळ त्यांच्या आग्रहाने आणि तेजूच्या काळजीने मी हा असा धावत येऊ शकलोय. येताना त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्या मनावर होतं आणि आता परत जाईन तेव्हा त्या ओझ्यापेक्षा कणभर जास्त अपराधीपणाचं ओझं मला बरोबर घेऊन जावं लागणाराय. “

“संदीप, चुकलं माझं. माझ्या भावनांचा आवेग मी झोपवू शकले नव्हते. पण ही चूक पुन्हा होणार नाही. तुम्ही हातपाय धुऊन दोन घास खाऊन घ्या. तोवर मी बेड तयार करते. खूप दमला आहात तुम्ही. थोडा आराम करा. आणि.. ” संदीप तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात राहिला. “आणि एक विनंती करते. रागावू नका प्लीज. पहाटे थोडं लवकरच उठू आपण दोघेही. तेजू जागी होण्यापूर्वीच तुम्ही… निघून जा. “

” नाही प्रिया.. प्रिया, कां म्हणून ही शिक्षा? तू.. तू रागावलीयस माझ्यावर. अशी निष्ठूर नको ना गं होऊस.. “

” नाही अरे. मी रागावलेली नाहीये संदीप. अगदी मनापासून सांगतेय. आणि शिक्षा फक्त तुम्हालाच कशी? तिलाही आहेच कीं. तुम्हाला माहित नाहीये संदीप, तुम्ही प्रथम गेलात तेव्हा ओळीनं चार रात्री तुमची आठवण काढून ती आक्रोश करत रडत झोपायची. खूप त्रास दिलाय तिनं मला आणि आईना. तिला पुन्हा बिथरवू नका प्लीज. अहो विरह आणि वनवास पत्करायचाच जर आहे तर तो फक्त तुम्ही आणि मीच कां म्हणून? त्यातला तेजूचा वाटा तिलाही उचलू दे.. “

संदीपला काही बोलता येईना. ट्रान्सफर ऑर्डर आली तेव्हा संदीपला वाटलं होतं, प्रियाला हे सगळं स्वीकारणं जड जाईल. आज? आज प्रियानं अतिशय निर्धारपूर्वक सर्व कांही मनापासून स्वीकारलं होतं पण.. संदीपलाच ते स्वीकारणं अवघड जात होतं!

त्याचं मन भरून राहिलेला अस्वस्थ अंधार त्याला उध्वस्त करू पहात होता. त्याच अंधारात अंथरुणाला खिळून राहिलेला, देशपांडेंचा कधीही न पाहिलेला तो एकुलता एक मुलगा शेवटचे आचके देत असल्याचा भयंकर भास त्याला झाला… आणि.. तो धडपडत त्या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला..!

भानावर येऊन त्याने पाहिलं, तेव्हा प्रिया शांतपणे त्याची बॅग भरत होती!!

– समाप्त – 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(*पूर्वसूत्र-* “प्रियाs, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावणार बरं? ” संदीप म्हणाला. प्रियाला कांही धरताही येईना न् सोडताही..

“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच. आणि तब्येतीला जपून रहा. ” ती म्हणाली.

संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांध घालायचं भान ती त्याच्याच मिठीत कुठंतरी हरवून बसली होती…! )

इथून पुढे – – 

अतिशय खडतर आणि कंटाळवाणा प्रवास संपवून संदीप बसमधून उतरला तेव्हा त्याचं सगळं अंग थांबून गेलं होतं. उभं रहायची शक्तीही त्याच्याजवळ नव्हती. या गलितगात्र अवस्थेत इथं या खेड्यांत एखादी रिक्षा त्याची वाट पहात असेल अशी त्याची अपेक्षा नव्हती, पण इथे धड एखादा टांगाही नव्हता किंवा हमालसुद्धा. आता यापुढं आपली सगळी ओझी आपल्यालाच उचलत रहावं लागणाराय या वास्तवाची जाणीव परिस्थितीने अशा क्रूर पद्धतीने त्याला करून दिलेली होती! ओझं हातात घेऊन तो पाय ओढत चालत राहिला. त्याला त्या अवतारात ब्रँचच्या दारात पाहून ब्रॅंचमॅनेजर जोशींच्या कपाळावर आठ्याच पडल्या.

“येस् प्लीज.. ” त्यांनी त्राग्यानेच विचारलं.

” मी कर्णिक.. संदीप कर्णिक. “

ऐकलं आणि देव भेटावा तसं जोशी आनंदाने उठले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या केव्हाच विरून गेल्या होत्या.

“ओs देशपांडेs.. , अहो उठाs.. त्या पिंजऱ्यातून बाहेर या,.. बघा तरी कोण आलंय. एs शंकर अरे बघत काय उभा राहिलायस? हो पुढं. बॅगा घे साहेबांच्या हातातल्या… ” जोशींना प्रयत्न करूनही आपला आनंद लपवता येईना.

“देशपांडे, या. हे नवीन साहेब तुमचे आणि कर्णिक साहेब, हे देशपांडे. इथले हेड कॅशिअर. “

संदीपने देशपांडेंकडे पाहून हसत शेकहॅंडसाठी आपला हात पुढे केला. देशपांडे बावचळून थोडावेळ तसेच उभे राहिले. मग कसेबसे हात जोडून त्यांनी नमस्कार केला. या अशा बावळट माणसाच्या सहवासात दिवस काढायचे या कल्पनेनेच संदीप अस्वस्थ झाला.

“चला कर्णिक, दमून आलायत, थोडं फ्रेश होऊन चहा घेऊ. “

ब्रॅंचपासून जवळच एका दगडी जिन्याच्या टोकावर एक छोटी रूम होती.

” हा पहा, हा माझा

राजमहाल. म्हणजे.. आजपासून तुमचा! ” स्वत:वरच खूश झाल्यासारखे जोशी मनापासून हसले. “बघा बरं, कशी वाटतेय रूम? “

संदीपला रूमपेक्षा

ब्रॅंचबद्दलच जास्त उत्सुकता होती.

” ही ब्रँच कशी आहे? “

“हां.. आहे.. तशी बरीच म्हणायची. म्हणजे.. नॉट बॅड. इथं काम म्हणाल तर पूर्ण आराम आहे बघा. ब्रॅचमधे फोन नाही त्यामुळे डिव्हिजनल

ऑफिसकडून कसले तगादे नाहीत. तालुक्याच्या गावातून दिवसातून एकच एस्. टी येते आणि तीच परत जाते. बाकी शुकशुकाट. पावसाळ्यात मधल्या ओढ्याला एकदा पाणी आलं की ती एस्. टी. सुद्धा चार चार महिने इकडे फिरकत नाही बघा. “

“आणि कस्टमर्स कसे आहेत? “

“कस्टमर्स? अहो इथं असल्या खेड्यात कस्टमर्स कुठून असायला? ते फक्त तिकडं आपल्या शहरात असतात. इथं सगळेच आंगठेबहाद्दर आणि तरीही एकापेक्षा एक बेरकी. त्यातले कुणी बँकेकडे फिरकतही नाहीत आणि आपण त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही. निगेटिव्ह ग्रोथ आणि लॉस मेकिंग ब्रॅंच म्हणून डिव्हिजनल मॅनेजर दर मीटिंगमधे आपली खरडपट्टी काढत असतात. ते खाली मान घालून ऐकून घ्यायचं. तेवढं केलं की बाकी कश्शाचा कांही त्रास नाही बघा. “

संदीप उदास हसला. जोशीना जे सहज वाटत होतं ते खाली मान घालणंच त्याला अवघड होतं आणि एरवी सुद्धा असं पाण्याबाहेर बसून रहाणं त्याला मानवणारही नव्हतं. या ब्रँचचं संपूर्ण चित्र बदलून टाकायचं हे एक आव्हानच होतं. अर्थात संदीपचे प्रयत्न त्या दिशेनेच सुरू रहाणार होते. ‘पण…? पण हे सगळं आपल्या एकट्याला जमेल? ‘ तो विचारात पडला. ‘एकटा कां म्हणून? देशपांडे आहेतच की बरोबर.. ‘ त्याला अचानक मनात कुठेतरी आधार मिळाल्यासारखा वाटला.

” जोशीसाहेब, ते देशपांडे कसे आहेत हो कामाला? ” संदीपने विचारलं.

जोशींचं तोंड पुन्हा वाकडं झालं. “हां म्हणजे आहे तसा बरा, पण फार किरकिरा आहे बघा. अहो, हेडकॅशिअरशीप मिळत होती म्हणून स्वत: अर्ज करून इथं आला होता. तेव्हा नवीनच लग्न झालं होतं. लहान बाळही होतं. इथला एकंदर रागरंग बघून कातावला होता बघा. पुढे मुलाला कसल्यातरी किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि मग इथं दवाखान्याची सोय नाही म्हणून बायको मुलांचं पार्सल दिलंन्

तिकडं पाठवून. त्यालाही सहा वर्षं होत आलीत. तेव्हापासून आता एकटाच बसलाय इथं बोंबलत. “

कानावर ओरखडे ओढणारे जोशींचे हे शब्द त्याला कसेसेच वाटले. इथं येतानाचा त्याचा उत्साह हळूहळू विरून जाऊ लागला. एव्हाना जोशींनी चहा स्टोव्हवर चढवून ठेवला होता. त्यालि मनाच्या त्या अस्वस्थतेत अचानक प्रियाची आठवण झाली… ‘अरे प्रियाला फोन करायचाय.. ‘

“जोशीसाहेब, चहा घेऊन लगेच जरा पोस्टात जाऊन येऊया. मिसेसला फोन करायचाय हो. ती वाट पहात असेल. “

जोशींनी तोंड वाकडं केलं.

” कर्णिक, इथं तुम्ही उगीच त्या फोनबीनच्या फंदात पडू नका बघा. ” जोशी कशाचाच निर्भेळ आनंद याला मिळूच नये म्हणून धडपडत असल्यासारखे म्हणाले.

“कां बरं? फोन करायचा तर पोस्टात जायला हवंच ना? “

“अहो, वन मॅन पोस्ट इथलं. तो पोस्टमास्तरसुद्धा कधीच जागेवर नसतो. त्यातून नंबर मिळायचा म्हणजे रात्रभर तिथं बसून रहावं लागेल बघा वाट बघत. “

संदीपच्या हातातल्या त्या वाफाळलेल्या चहाची चवच बेचव होऊन गेली.

“मग… काय कर्णिकसाहेब, आज रिलीव्ह होऊ कां मी? ” जोशी आशाळभूतपणे मुद्द्यावर आले. तिकडे फोनची वाट पहात बसलेल्या प्रियाला नजरेआड करीत या वास्तवाचा समाधानाने स्वीकार केल्यासारखं संदीप म्हणाला, ” येस्स.. बाय ऑल मीन्स! “

—–

तीन दिवस सलग धडपड करून सुद्धा फोन लागला नाहीच. अखेर कंटाळून मनातल्या नेमक्या भावना व्यक्त करणारं एक भलं मोठं पत्र त्याने प्रियाला लिहिलं आणि तिच्या उत्तराची वाट पहात राहिला. आजच्या इनवर्ड मेलमध्ये एक इनलॅंड लेटर आलेलं पाहून त्याने झडप घालून आधी तेच हातात घेतलं. पण ते पत्र त्याचं नव्हतंच. ते देशपांडेंच्या नावाचं होतं. देशपांडेंच्या या छोट्याशा आनंदात सहभागी होण्याइतकं संदीपचं मन मोठं होतं आणि त्यामुळे त्याने उत्सुकतेने देशपांडेना हाक मारली.

” देशपांडे, हे पत्र आलंय बघा तुमचं. ” संदीपला वाटलं आता देशपांडे धावत येतील. पण ते नेहमीप्रमाणे पाय ओढत चालतच आले होते. ‘या माणसाला कधी कशाचा आनंद कसा होत नाही? ‘ त्याला प्रश्न पडला. देशपांडेंच्या दाढीचे वाढलेले खूंट कधी नव्हे ते संदीपच्या नजरेला खुपू लागले. देशपांडेंनी निर्विकारपणे ते पत्र घेतलं, थंडपणे त्याकडे पहात राहिले क्षणभर. मग वळले आणि पाय ओढत परत गेले.

एव्हाना शंकरने बाकीचं इनवर्ड मेल व्यवस्थित जुळवून संदीपच्या टेबलवर आणून ठेवलं होतं. ते समोर घेऊन संदीप बघायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच ओढलेल्या चेहऱ्याने देशपांडे पुन्हा संदीपच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांना पाहिलं आणि आपल्या कपाळावर आठ्या पडणार नाहीत याची जाणीवपूर्वक खात्री करून घेत संदीप अतिशय प्रयत्नपूर्वक प्रसन्न हसला.

” काय म्हणताय देशपांडे? “

देशपांडे उदास हसले.

“देशपांडे, अहो सांगा ना, काय झालंय? “

” साहेब, चार दिवस रजा हवी होती. “

” एवढंच ना? त्यात काय? अरे मग घ्या ना.. ” संदीप मनापासून म्हणाला. ऐकलं आणि देशपांडे स्वतःच्या कानांवर विश्वासच नसल्यासारखे बघतच राहिले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे ते दाढीचे खुंट वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसे खुदकन् हसले.

“थँक्यू सर.. थँक्यू व्हेरी मच”

” अरे थँक्स कशाबद्दल? ” देशपांडे पुन्हा कोमेजले.

” पूर्वी अशी मागितल्याबरोबर कधी रजा मिळालीच नव्हती साहेब. रजा मागितली की आधी जोशीसाहेबांचे चाबकाच्या

फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे. ” देशपांडेंचा आवाज भरून येत होता.

” देशपांडे, जस्ट रिलॅक्स. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “

या थोड्याशा आपुलकीचा धक्काही सहन न होऊन देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले. संदीप मनातून थोडासा हलला.

” काय झालंय देशपांडे? घरी कांही प्रॉब्लेम? “

” मुलाला बरं नाहीय”

संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.

“किती वर्षांचा आहे मुलगा? “

“सहावं सुरू आहे. “

” रहातो तुमच्याशिवाय? तुमची आठवण नाही काढत? “

देशपांडे आपलं हरवलेलं सुख शोधत राहिले…!!

– क्रमश: भाग दुसरा 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares