प्रा. भरत खैरकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ वरदलक्ष्मी… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
यामिनीने सोबत म्हणून दोन बाहुल्या, सॉफ्ट टाॅय ठेवलेल्या आहे. त्यांची तिने ‘हनी- बनी’ अशी नावं ठेवली आहे.. त्यांच्याशी ती सतत बोलत असते, त्यांना झोपवून पांघरून घालून.. पाणी पाजून..ती त्यांची काळजी घेते! बाहेर जाताना बाय-बाय.. ‘आतून दार लावून घ्या..’ वगैरे सूचना ती करते.. घरातून येता जाता ती त्यांच्याशी बोलत असते. बऱ्याचदा एकटं घर यामिनीला खायला उठायचं. म्हणून ही बाहुल्यांची सोबत! नवऱ्याचे कोणी नातेवाईक आल्यावर तिच्या ह्या बाहुली प्रेमावर हसायचे.. पण ती दुर्लक्ष करायची. कारण त्यांच्याशी बोलल्यावर तिला घरात कोणीतरी सोबतीला आहे. असं वाटायचं. घरात एकटं राहून राहुन तरी किती राहणार. आणि एकटं करणार तरी काय? म्हणून ती तिच्या एका पोलीस मैत्रिणीकडे विरंगुळा म्हणून जायची. तिथे तिच्या आईशी गप्पा मारायची..मुक्कामी थांबायची.. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लागले तर तिच्या नवऱ्याचा मित्र जवळच राहायचा.. तो सगळं बघून घ्यायचा. ती सतत कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवायची.. निदान चार-पाच तास तरी घराबाहेर काढता यावे म्हणून ती जवळच्याच एका शाळेमध्ये शिकवायलाही जायची.. पण ते केवळ वेळ जावा म्हणून..
कॅनडातील ओटावा मध्ये असलेल्या आपल्या मुलाला यामिनी कालपासून तिसऱ्यांदा फोन करत होती.. पण काही केल्या फोन लागत नव्हता.. तिला अलीकडे त्याच्या लग्नाची काळजी वाटत होती.. तिने पुण्यातील दोन तीन मुली बघितल्या होत्या..त्यातली एक तिला पसंत पडली होती आणि त्या संबंधित आपल्या मुलाशी बोलावं म्हणून ती तिच्या बाबुला.. म्हणजे आपल्या मुलाला.. अरविंदला फोन लावत होती.
मुलाशी तिचं रोज फोनवर बोलणं व्हायचं.. त्याला चांगली मुलगी मिळावी आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढीच तिची इच्छा होती!
आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या मुलाचं कल्याण व्हावं..म्हणून तिने वरदलक्ष्मीचं पूजन घरात मांडलं होतं.. देवीला मनोमन नमस्कार करत असताना ती एकदम जुन्या आठवणीत गेली.
मुळात ती महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वरील कारवार परिसरातली कोकणी नाईक देसाई परिवारातील.. श्री रामनाथ हे त्यांचं कुलदैवत! तिचा नवरा कर्नाटकी.. फायनान्समध्ये मास्टरी केलेला.. हिचं शिक्षण बीएससी केमिस्ट्री होतं.. पण त्यावेळेस तुला नोकरीची गरज नाही. ‘माझा भरपूर पगार आहे.’ असे म्हणून तिला नोकरीपासून त्याने थांबवून.. संसारात लक्ष देण्याची तिला सूचना केली होती.. त्यानुसार तिनेही संसार केला होता..
तो कामसू होता.. आपल्या कामांमध्ये फार हुशार होता.. निर्व्यसनी..साधा भोळा.. बघून कोणी म्हणणार नाही की हा फायनान्समध्ये इतका मास्टर माणूस आहे! सरळ स्वभावी आणि कौटुंबिक मनुष्य..
तो पुण्यातील एका मोठ्या नावाजलेल्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटचा हेड होता. तेथे त्याने बऱ्यापैकी नाव कमावले होते. कंपनीला खूप सारा फायदा त्याच्या कॅल्क्युलेशनमुळे मिळाला होता.. त्याची फायनान्शियल स्किल सर्वांना माहिती होती. बऱ्याच मित्रांचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तो भरून द्यायचा. कंपनी व्यतिरिक्त तो सायंकाळी लहान मोठ्या पतसंस्थांमध्ये ऑडिट करायला जायचा.त्याची कीर्ती कार्पोरेट फिल्डमध्ये चांगलीच पसरली होती.. पुण्याच्याच एका सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या संचालकालाही त्याने फायनान्शिअल सल्ला दिला होता.. त्याचा फायदा त्या शिक्षण संस्थेला खूप झाला. शिक्षण संस्थेच्या संचालकाने त्याची हुशारी बघूनच आपल्या संस्था व त्यांचा फायनान्स रिपोर्ट त्याला रिटायरमेंटनंतर सांभाळायला दिलं होता.
त्याला शेअर बाजाराच सुरुवातीपासून आकर्षण होतं.
पण अजूनही त्याने ठोस अशी काही शेअर बाजारात गुंतवणूक केली नव्हती. त्याचा शेअर बाजाराचा अभ्यास चालू होता. रिटायरमेंट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गुंतवणूक करावी असा त्याचा मानस होता.. पण तो त्याने काही यामिनीला किंवा मुलाला बोलून दाखवला नव्हता.. सारखा आपल्या कामांमध्ये तो गुंतून राहायचा.. हळूहळू त्याचे शेअर बाजारातील आकर्षण वाढत गेले.त्यातूनच त्याची शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूक ह्यात रुची वाढली होती..
तिच्या नवऱ्याने घरात असलेल्या ५० तोळ्यापैकी ३४ तोळे सोने शेअर बाजारात.. शिवाय रिटायरमेंटच्या वेळी मिळालेल्या ग्रॅज्युएटी व पीएफचे सर्व ३४ लाख रुपये शेअर मध्ये घातले..
त्याला स्वतःच्या कॅल्क्युलेशन वर एवढा विश्वास होता की लगेचच आपल्याला हा पैसा दुप्पट किंवा तिप्पट होईल ही गॅरंटी होती..
मात्र हाय रे नशिबा.. तसं काही झालं नाही. उलट शेअर बाजार कोसळला आणि कुठे चूक झाली माहिती नाही.. त्याचा सर्वच्या सर्व पैसा बुडाला.. ही गोष्ट बायको पोराला कशी सांगावी? ह्या भीतीनेच त्याने धसका घेतला होता.
यातलं काहीच यामिनीला किंवा मुलाला माहिती नव्हतं.. सर्व पैसा बुडाला. आणि अचानक या माणसाच्या किडन्या फेल झाल्या. यामिनीला वाटलं दुसरं काहीतरी असेल! होतातच रिटायरमेंट नंतर तब्येतीचे प्रॉब्लेम..! पण शेअर बाजारात बसलेला फटका आपण मुलाला व बायकोला कसा सांगावा? या भीतीनेच त्याला कापरं सुटलं होतं.त्याचा धसका घेऊन त्याने बिछाना पकडला होता.
रिटायरमेंटआधी असलेला फ्लॅट विकून पुण्यापासून लांब त्यांनी एक बंगला बांधला होता तिथे आता रिटायरमेंट नंतर राहू व मुलाला युएसला पाठवू असा काहीसा निश्चय असतानाच ही घटना घडली होती..
त्याच्या ट्रीटमेंटसाठी खूप काही खर्च करावा लागला नाही कारण ज्या शैक्षणिक संस्थेत त्याने मदत केली होती त्या संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याची तीन महिने ट्रीटमेंट चालली होती आणि संचालकाने सर्व ट्रीटमेंट मोफत मध्ये करायच्या सूचना दिल्या होत्या.
तो किडनी फेल होऊन मरण पावला होता. त्याहीपेक्षा त्याने धास्ती घेतली होती. नवऱ्याने मृत्यूच्या दोन दिवस आधी ” यामिनी, तू आपल्या मुलाला युएसला शिक्षणाला पाठवलं पाहिजे.” असं वचन घेतलं होतं. ‘असं कसं शक्य आहे? मला कसं जमेल?” यामिनी.
तेव्हा तो म्हणाला,” मला माहिती आहे,तू काय आहे ते! तू करू शकशील सगळं!” हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं..
नवऱ्याचं अचानक जाणं, तिला सोसवत नव्हतं.पण पर्याय नव्हता. आलेल्या संकटावर मात करणे गरजेचे होते. तो बंगला भाड्याने देऊन मुलाला युएसला पाठवून आता ती स्वतः एकटी भाड्याच्या घरात राहत होती.
आज जर बाबूचे बाबा असते तर आपल्याला ही धडपड करावीच लागली नसती. तिचा उर एकदम भरून आला.
आजही तिने श्रावणातील हळदी कुंकवासाठी वरदलक्ष्मीच्या पूजेनिमित्त बिल्डिंग मधील बायकांना बोलावले होते.. कौतुकाने ती आपल्या मुलाचे फोटो सर्वांना दाखवीत होती आणि होणाऱ्या सुनेसंबंधी स्वप्नात रंगली होती.. तेवढ्यात तिला अरविंदचा फोन आला.. आणि ती भरभरून काल बघितलेल्या मुलींबद्दल बोलू लागली…
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈












