मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गजरा स्कॉलरशीप” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “गजरा स्कॉलरशीप” ☆ श्री मंगेश मधुकर

बहुसंख्य विद्यार्थी मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातले असलेली शहरातील मराठी-सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती अनिलराव यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम होता.मुलं,पालकांच्या उपस्थितीनं हॉल खचाखच भरलेला.शाळेचे माजी विद्यार्थी असलेले अनिलराव आता करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं दानशूर व्यक्तिमत्व.त्यांनी सुरु केलेल्या ‘गजरा’ या जरा हटके नावाच्या स्कॉलरशीप विषयी सर्वाना फार आकर्षण होतं.फक्त गरीब,गरजू पण हुशार मुलांना ही स्कॉलरशीप मिळायची. गेल्या पाच वर्षात शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी स्कॉलरशीपचा लाभ घेतलेला. म्हणूनच अनिलरावांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.मुलाखत घ्यायचं काम माझ्याकडं होतं.सत्कारानंतर मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला.

“नमस्कार सर,आपल्या शाळेतर्फे सत्कार स्वीकारताना कसं वाटलं.”प्रश्न ऐकून अनिलराव हसले.माइक हातात घेतला पण काही वेळ तोंडातून शब्द फुटले नाहीत.थोडा वेळानं अनिलरावांनी सुरवात केली.

“माफ करा.हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे म्हणून जरा..”

“सर,तुम्ही जे अफाट यश मिळवलं त्यात खारीचा वाटा या शाळेचासुद्धा आहे.”

“खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे.पुढील आयुष्याचा पाया या वास्तूतच घातला गेला.”

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनत,हुशारी,अंगी असलेलं कौशल्य यामुळे तुम्ही अफाट यश मिळवलंत.एवढा मोठा व्यवसाय असूनही सामाजिक जबाबदारी विसरला नाहीत.हे कसं काय?”

“आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच थोडंफार यश मिळवू शकलो.सामाजिक जबाबदारी विषयी बोलायचं तर अनेक गुणी विद्यार्थी केवळ आर्थिक कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही.अशांसाठी आम्ही स्कॉलरशीप सुरू केली.त्यामध्ये आठवी ते बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च केला जातो अर्थातच त्यासाठी अट ती म्हणजे दरवर्षी गेल्या वेळेपेक्षा जास्त मार्क मिळवायचे.”टाळ्यांचा कडकडाट झाला.अनिलरावांनी पुढे म्हणाले “तेव्हा आणि आता कार्यरत असणारे शाळेचे सर्व आदरणीय शिक्षक,कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार आणि बापुकाकांचे तर विशेष आभार!!”

“बापुकाका कोण??”मी विचारलं.

“ज्यांच्यामुळे मी घडलो.इथं येऊन पोचलो ती व्यक्ती म्हणजे बापुकाका.असामान्य काम करणारा एक सामान्य माणूस.”

“त्यांचं अन तुमचं नातं?”

“माणुसकीचं”

“म्हणजे”

“आमची साधी ओळख पण नव्हती.माझं बालपण फार म्हणजे फारच गरिबीत गेलं.दुष्काळात तेरावा म्हणतात ना तसं काहीसं म्हणजे आधीच घरात दोन वेळचं खायला मिळणं मुश्किल.मजूरी करणारे वडील अचानक अपघातात गेल्यावर आमची अवस्था अजूनच बिकट झाली.आम्ही तीन भावंड,घर चालवण्यासाठी आईनं धुण्या-भांड्याची काम करायला सुरवात केली.थोरला असल्यानं आईची ओढाताण लक्षात आली.आईला मदत म्हणून शाळा सुटल्यावर मी गजरे विकायला सुरवात केली.मित्राकडून सायकल घेतली अन टेकडीच्या रस्त्यावर सगळे फिरायला जातात तिथं “गजरा,गजरा” ओरडत चकरा सुरू झाल्या.मित्र हसायचे.लोकसुद्धा चमत्कारिक नजरेनं बघायचे.सुरवातीला कसंतरी वाटलं पण नंतर सवय झाली.पाच दिवसानंतर पहिला गजरा विकला गेला.एक रुपयाचा फायदा झाला.पहिल्या कमाईचा आनंद काही औरच.”

“तिथचं बापुकाकांची भेट झाली का?”

“हो.काकूंसोबत रोज फिरायला यायचे.दोन-तीनदा गजरे घेण्याविषयी विचारलं पण त्यांनी नकार दिला परंतू माझी रोजची धडपड ते बघत होते. एकदिवशी त्यांनी सगळे गजरे विकत घेतले.फार आनंद झाला.त्यादिवशी रात्री घरी आम्ही खूप दिवसांनी वडापाव खाल्ला.”

“तिथून बापुकाकांची ओळख वाढली.”

“हो.संध्याकाळी भेटलो तर  हसायचो.हळूहळू बोलायला लागलो.एके दिवशी बापुकाकांनी थांबवून विचारपूस केली.घरची माहिती घेतली.फी बाकी असल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही हे कळल्यावर काही बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन माझी फी भरली.त्याविषयी मला शाळेतल्या सरांकडून कळलं.तेव्हा वर्ष वाया जाणार नाही याचाच खूप आनंद झाला अन भरूनही आलं. बापुकाकांना भेटण्यासाठी संध्याकाळी आईला घेऊन गेलो.फी विषयी विचारल्यावर बापुकाका फक्त हसले.आईनं हात जोडले अन रस्त्यातच मी नमस्कारासाठी वाकलो तेव्हा बापूकाका अडवत म्हणाले. नमस्कार होत राहतील.फी भरली ही मदत नाही तर स्कॉलरशीप आहे असं समज.याविषयी कुठंही बोलू नकोस.विसरून जा आता फक्त मन लावून अभ्यास कर,खूप खूप शिक.मोठा माणूस हो आणि सगळ्यात महत्वाचं हे गजरे विकणं बंद करू नकोस कारण त्यामुळे कष्टाची सवय आणि परिस्थितीची जाणीव जिवंत राहीलं.जमिनीशी नातं तुटणार नाही.ते ऐकून माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला.”

“बापुकाकांनी कमी शब्दात खूप काही सांगितलं.”

“माझी बारावीपर्यंतच्या फीची व्यवस्था बापूकाकांनी करून ठेवलेली तरीही ग्रॅज्युएट होईपर्यंत गजरे विकत होतो नंतर नोकरी करून मास्टर्स केलं नंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अन एकेक यशाची पायरी चढत गेलो आणि आज तुमच्यासमोर आहे.”

“आजकाल फुटकळ मदतीचा मोठा गाजावाजा केला जातो.फोटो सेशन केलं जातं.तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या जमान्यात तुम्हां दोघं वेगळा विचार करता.खूप कौतुक वाटतं”

“तीसुद्धा बापुकाकांचीच कृपा!!त्यांच्या मदतीविषयी कधी,कुठं बोलणार नाही हे वचन पंचवीस वर्षांनंतर मोडतोय.आज मनापासून वाटतंय की बापुकाकांविषयी लोकांना कळायला पाहिजे कारण त्यांच्या प्रेरणेतूनच हुशार,गरजू विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशीप सुरू केली.”

“या स्कॉलरशीपचं नाव फार वेगळंयं.”

“गजरा विकण्याच्या निमित्तानं आमची भेट झाली म्हणून ‘गजरा स्कॉलरशीप’ असं नाव बापूकाकांनीच सुचवलं.तेच नाव मी पुढे कायम ठेवलं.”

“बापूकाकांना भेटायला आवडेल”

“समोरच बसलेत,वय वर्ष ८५ फक्त.”सर्वांच्या आग्रहावरून अनिलराव बापूकाकांना स्टेजवर घेऊन येईपर्यंत टाळ्यांचा गजर सुरू होता. उत्सवमूर्ती बापुकाका मात्र निर्विकार होते.सर्वांचे आभार मानत अनिलराव म्हणाले “बापुकाकांचे तत्व होतं की केलेली मदत विसरून जायची.जाहीर वाच्यता तर अजिबात करायची नाही.माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मदत केलीय पण एका शब्दांनं सांगितलं नाही.आयुष्याची गंमत कशी पहा.चांगलं काम ठरवून विसरणाऱ्या बापुकाकांना विस्मरणामुळे बरंच काही आठवत नाही.आताशा फार बोलत पण नाही.ओळखी विसरत आहेत परंतु आजही गजरा पाहिला की चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमटतं.”दोन गजरे  अनिलरावांनी हातात देत नमस्कार केला तेव्हा बापुकाकांच्या डोळ्यात चमक आली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आठवण माहेरची… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆

सुश्री स्नेहल अखिला अन्वित

? जीवनरंग ?

☆ आठवण माहेरची… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित

“तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, सगळं घर धुऊन काढू नका म्हणून. पोरींच्या लग्नापायी कंगाल करून ठेवलत!! राहतं घर विकून टाकलत आणि या भाड्याच्या घरात सगळं डोईजड झालंय आता…

पोरी पैसे देतात तेही घेत नाहीत, नुसत्या पेन्शनवर काय काय भागवायचं आपण? ती तरी कुठे आहे एवढी? घरभाड्यालाच जाते निम्म्याच्यावर.

काय झालं असतं एवढं, स्वतःचं घर राहू द्यायचं होतं हो डोक्यावर…”

चित्राताईंचा त्रागा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. म्हातारपणाची दुखणी खुपणी सुरू झाली होती, आणि पैसा सगळ्यालाच अपुरा पडत होता.

नेहमीप्रमाणे आजही त्या कुरकुरत होत्या, आणि आप्पा आपले शांतपणे पेपर वाचत बसले होते.

दहा तारीख होती, घरमालकाचा कालपासून दोनदा फोन येऊन गेला होता. आज तो प्रत्यक्षात येईलच याची चित्राताईंना खात्रीच वाटत होती. म्हणून सकाळपासून त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता. त्यात आप्पा; बघतो मी, बघतो मी करून गपगार बसून होते. त्याने आणखी त्रास होत होता चित्राताईंना. हात पाय हलवायचे, पोरींना पैशाच्या मागणीसाठी फोन करायचे सोडून पेपर वाचन चाललंय यांचं, चित्राताईंचा आतल्या आत भडका उडाला होता.

“यावेळी दवाखाना लागला म्हणून टंचाई झाली जास्त, पोरींना कळेल की ते, लावा की फोन. कधीतरी लावला तर चालतो, नेहमी मागतो का आपण?,” चित्राताई पुन्हा पुन्हा आप्पांना डिवचून बघत होत्या, पण आप्पा होईल सर्व नीट एवढंच एकच म्हणत होते.

“काय होणार कप्पाळ माझं,” बोलता बोलताच चित्राताईंनी कपाळाला हलकं बडवून घेतलं. वीट आला होता त्यांना या परिस्थितीचा.

खरंतर मुलींची लग्न ठरवायच्या वेळीच त्या आप्पांना सांगत होत्या, आपली परिस्थिती स्पष्ट सांगा दोन्हीकडच्यांना, आम्हाला एवढ्यातच जमेल, थोडक्यातच करू बोला. पण आप्पांना घर दिसत होतं, आपण काय दोघं राहू कुठेही असा विचार करून त्यांनी काही कमतरता न ठेवता मुलींची लग्न बऱ्यापैकी थाटात लावून दिली. सगळ्या हौशीमौजी केल्या त्यांच्या. चित्राताईंच्या तोंडावर सतत हात ठेवला.

आता सगळा घोळ होऊन बसला होता त्यामुळे मात्र……….

जेवणाची वेळ झाली तरी चित्राताईंचं तोंड काही सरळ झालंच नव्हतं. तसच वाकड्या तोंडानी त्यांनी कार्यक्रम उरकला. आप्पा पोटभर जेवले पण चित्राताईंना चार घास कमीच गेले. घरमालक संध्याकाळचा येणार, आणि त्याला आता नाही जमणार थोडे दिवस द्या, हे सांगायला लागणार, हे त्यांना कमीपणाच वाटत होतं.

जेवण झालं आणि दोघं थोड्यावेळ लवंडले. आप्पा आडवे पडले तसे दुसऱ्या सेकंदाला घोरायला लागले. चित्राताईंना काही केल्या झोप येतच नव्हती, सारखं मेलं त्या घरमालकाचं तोंड समोर दिसत होतं.

आप्पांकडे बघून त्यांना वाटलं, “नक्की कोणावर आपल्या चिंता टाकून झोपलाय हा माणूस? अजब आहे बुवा सारं!!”

अख्खी दुपार सगळी आढ्याकडे बघतच काढली चित्राताईंनी.

बरोबर साडेचार वाजता बेल वाजली. चित्राताईंचे ठोके वाढले. त्यांनी गदागदा हलवून निश्चिंतपणे घोरणाऱ्या आप्पांना उठवलं. “अहो उठा, आला बघा तो मालक,आता तरी उघडा त्याच्यासमोर तोंड जरा, मी काही येणार नाही समोर. मला फार लाजिरवाणं वाटतं, दारही उघडा तुम्हीच,” म्हणत त्या तरातरा स्वैपाकघरात निघून गेल्या.

तेवढ्यात बेल अगदी नॉनस्टॉप वाजू लागली. आप्पांनी पट्दिशी चूळ भरली,आणि लगबगीने दरवाजा उघडला आणि समोर न बघता वाकून म्हणाले, या या साहेब.

“आप्पा, झोप अजून गेली नाही की काय? आम्ही काय साहेब दिसतो होय तुम्हाला,” त्यांच्या दोन्ही  मुली रिद्धी सिद्धी हसत घरात शिरता शिरता म्हणाल्या.

“अगं तुम्ही कशा आता यावेळी?,”आप्पांनी अचंबित होऊन विचारलं.

“का? माहेरी यायची काय ठराविक वेळ आहे का काही?,” त्यांच्या मोठ्या मुलीने रिद्धीने त्यांनाच उलट प्रश्न केला. “एकाच शहरात म्हटल्यावर वाटेल तेव्हा येऊ जाऊ शकतो ना आपण?”

“तसं नाही ग, अचानक न कळवता आलात ना म्हणून म्हटलं आपलं,” मुलीशी बोलतच आप्पा निवांतपणे दिवाणावर विसावले.

“आई, अगं आई, ये बाहेर लवकर,” सिद्धीच्या जोरजोरात हाका ऐकून चित्राताई घाईतच बाहेर आल्या. मालक येणार होते, ते मुली आल्या. आता तो मालक आला तर सगळा घोटाळा यांच्यासमोर. देवा मालकाला अडवून ठेव जरा, मनात त्यांचा धावा चाललाच होता.

दोन्ही मुली म्हणाल्या, “चला चला आवरा पटापट. आपल्याला बाहेर जायचय.”

“आता कुठे? आता नको,” चित्राताई भांबावून म्हणाल्या. मालक यायचाय, तो आला आणि टाळं दिसलं घराला तर बरं नाही ते, त्यांच्या मनात तेच चालू होतं.

पण मुलींनी कोणाचं काही चालवू दिलं नाही, दोघांनाही पटापट आवरायला लावून घराबाहेर काढलं.

जायला बूक केलेली गाडी आली, आईवडिलांना दोघींनी त्यात घुसवलं. दोघही कुठं जायचय कुठं जायचय करत होते, त्यांना ठिकाण आलं की कळेल एवढं एकच उत्तर सतत दिलं.

गाडी थांबवून उतरले ते ठिकाण त्यांच्या ओळखीचं होतं. “अरे, इथे का आलो आपण, मागच्या आठवड्यात तर शेजारच्याकडे फेरी झालेली आमची, इथेच यायचं होत तर सांगायचं, त्याचा डबा परत करायचा होता, तो आणला असता,” चित्राताई म्हणाल्या तशा दोन्ही मुली एकमेकींकडे बघून हसल्या.

थोडं पुढे गेल्यावर त्यांचं जूनं घर लागलं. त्याच्याच थोडं पुढं नवीन चार बिल्डिंगची सोसायटी होती. पोरींच्या लग्नाच्या वेळीच नुकतच तिचं बांधकाम पूर्ण झालं होतं.

मुली त्या सोसायटीत शिरल्या, तसे आप्पा म्हणाले, “पोरींनो इकडे कुणाकडे जातोय आपण?”

पोरी म्हणाल्या, “आहेत एक ओळखीचे. तुमची भेट घडवून आणायचीये त्यांच्याशी.”

पहिल्याच मजल्यावरच्या एका ब्लॉकचं लॅच रिद्धीने उघडलं. चित्राताई आणि आप्पा आत आले तसे दोघींनी टाळ्या वाजवून त्यांना वेलकम केलं आणि म्हणाल्या, हे घर तुमचं स्वतःचं आहे आई- आप्पा!!

तुमच्या मुलींनी तुमच्यासाठी घेतलेलं. बघा बरं फिरून तुम्हाला आवडतंय का?

चित्राताई आणि आप्पा जिथल्यातिथे आखडल्यासारखे उभे राहिले. त्यांनी अशी काही कल्पना स्वप्नातसुद्धा केली नव्हती. चित्राताईंना तर अगदी ह्या घरात पाऊल ठेवेपर्यंत तो घरमालकच समोर दिसत होता. तो येऊन गेला असेल तर काय म्हणत असेल आम्हाला, शरीर इकडं अन् मन त्या मालकाकडं होतं त्यांचं.

तिथल्या हॉलमधल्या फ्रेंच विंडोच्या कठड्यावर दोघं बसले. सिद्धीने त्यांना पर्समधली बॉटल काढून पाण्याचे घोट घ्यायला लावले. ते घेतल्यावर त्यांना जर बरं वाटलं.

“काय हे? हे का केलंत पोरींनो?,” आप्पांनी कळवळून विचारलं.

“तुम्ही तर विचारूच नका आप्पा का ते? स्वतःच्या डोक्यावरचं एकुलतं एक राहतं घर आमच्यासाठी विकलत, आम्हाला ताकास तूर नाही लावून दिला अजिबात,” रिद्धी दटावूनच बोलली.

“नाहीतर काय? लग्न झाल्यावर आम्हाला कळलं सारं. आम्ही भले तशाच राहिलो असतो पण घर नसतं विकू दिलं. तुम्हाला विचारलंही होतं आम्ही, कुठून आले पैसे? तर काय म्हणालात, तुमच्या लग्नासाठी पै पै करून साठवले होते.

एका मांडवात आमचं लग्न लावून नंतर मात्र भाड्याच्या घरात बस्तान मांडलत?” सिद्धीला पुढे बोलवलच नाही.

“आई एवढी भडाभडा बोलणारी तू पण गप्प बसलीस?”, रिद्धीने आईकडे मान वळवली.

“तुमच्या आप्पांनी तोंड दाबलं होतं माझं. पोरींचं लग्न झोकात व्हावंसं वाटत होतं त्यांना. त्यांची इच्छा नाही डावलावी वाटली मला. पूर्ण आयुष्यात एकदाच काहीतरी बोलून दाखवलं ग मला त्यांनी…”

“पण आम्हाला कळलं तेव्हा आमच्या जीवाला किती चटका बसला माहिती आहे तुम्हाला? आई बापाला घराबाहेर काढणारं लग्न नको होतं आम्हाला. टोचणी बसली जीवाला किती?” रिद्धीला प्रत्येक शब्दाला भरून येत होतं.

“आप्पा कळलं तसं, आम्हीही ठरवलं मग, जेव्हा आईबापाला त्यांच्या स्वतःच्या घरात आणू, तेव्हाच सुखाची झोप घेऊ”, सिद्धीच्या म्हणण्याला दुजोरा देत रिद्धीही म्हणाली, “खटपट करत होतो खूप पण तरी दोन वर्ष गेली. ती कशी घालवली, ते आमचं आम्हाला माहीत.

मान मोडून काम केलं ऑफिसमध्ये फक्त तुमच्यासाठी, धीटपणे घरी बोललो सर्व. सगळ्यांनी सहकार्य केलं. दोघींना कर्ज मंजूर झालं. आता आमचे पगारही चांगले आहेत, कष्टाचं फळ मिळालं आम्हाला. आमची ऐपत आहे हप्ते हसत हसत फेडण्याची. जूनं घरच परत घ्यायचं होतं आम्हाला, पण ते नाही मिळालं. म्हणून तुम्ही इतके वर्ष राहिलेल्या तुमच्या ओळखीच्या माणसांच्या एरियातच घर निवडलं तुमच्यासाठी. तुमच्या हक्काचं आहे हे.”

“आई, इथे घरमालक नाही येणार बरं का डोक्यावर बसायला. आता येणाऱ्या शनिवारी गणेशपूजन करायचं आणि रविवार पासून आपल्या घरात सुखाचा श्वास घ्यायचा. त्या तुमच्या मालकाचा हिशोब पण आम्ही चुकता करू सगळा, तुम्ही आवराआवर करायला घ्या फक्त आता”

“काय आप्पा?”

आप्पांनी चश्मा काढून डोळे पुसले आणि म्हणाले, “निशब्द झालोय मी आज. माझ्यासारख्या कफल्लक माणसाच्या डोक्यावर पुन्हा स्वतःचं घर असेल असा विचार माझ्या मनाला आतापर्यंत कधी शिवला पण नव्हता.”

“विचारही शिवला नव्हता, आणि कसली चिंताही शिवली नाही कधी. मला नेहमी यांना पाहून वाटायचं, कुणाच्या जीवावर हे कुठल्याही परिस्थितीत एवढे शांत राहतात. आता कळालं, त्यांच्याही नकळत तुम्ही दोघी पोरींनी त्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. ज्या बापाने आपल्यासाठी स्वतःचं घर विकलं, त्या बापाला कधी काही कमी नको पडायला, हे तुमचंच इच्छासामर्थ्य त्यांना सर्व विवंचनेपासून दूर ठेवत होतं बहुतेक…

बाप तशा बेट्या निघाल्या निःस्वार्थी, मी आपली उगाच सगळ्याला दूषणं देत काढली दोन वर्ष.

होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर घर आलं माझ्या वाट्याला माझ्या पोरींमुळे. आयुष्यातला भाग्याचा दिवस उजाडला आज, न मागता सर्वकाही मिळालं.” चित्राताईंनी अभिमानाने पोरींकडे पाहिलं, नकळत त्यांचे हात जोडले गेले. दोन्ही पोरी क्षणात आईकडे झेपावल्या आणि तिला घट्ट मिठी मारून एवढ्या वेळ अडवलेले आनंदाश्रू टपाटपा गाळून आईचे दोन्ही खांदे चिंब भिजवून टाकले.

आप्पांनी स्वतःला सावरलं, तीन खोल्यांचं घर त्यांनी फिरून बघितलं. घरातल्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा अदृश्य हात ठेवणाऱ्या देवाची जागा आणि सासरी गेल्या तरी मनात माहेरची जाण आणि आठवण सतत तेवत ठेवणाऱ्या दोन पोरींंच्या हसऱ्या फोटोची जागा त्यांनी पहिल्या प्रथम फिक्स करून टाकली…!!

© सुश्री स्नेहल अखिला अन्वित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओव्हरलोड – अतिरेक… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ ओव्हरलोड – अतिरेक… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

त्याचा मित्र नंदू घरी आला होता. आणि तो, आपण जीवतोड मेहनत घेऊनही, आपली मुलगी कशी साथ देत नाही, कसा अभ्यास करत नाही असा तक्रारीचा पाढा मित्रासमोर वाचत होता.

त्याला वाटलं नंदू त्याचं कौतुक करेल, ती साथ देत नाही म्हणून तिच्यावर टीकेचा भडीमार करेल, पण झालं उलटंच.

“तुझ्या सांगण्यावरून दोन तीन गोष्टी समजत आहेत, बघ, बरोबर आहेत का,” एखाद्या विशेष मंद विद्यार्थ्याला समजावताना वर्गात प्राध्यापक ज्या आविर्भावात सुरुवात करायचे, तशी नंदूने सुरुवात केली, “आपण हॉस्टेलला असतानाही, अभ्यासाची योग्य वेळ सकाळी लवकरची चांगली का रात्री उशीराची चांगली यावरून आपले वाद व्हायचे.

तू पहाटे उठून अभ्यास करणारा, आणि मी निशाचर. शास्त्रीय दृष्ट्या काय चांगलं काय वाईट ते बाजूला राहू दे एक वेळ, पण कधी असा विचार केला आहेस का की कदाचित तुझ्या मुलीला माझ्याप्रमाणे रात्री अभ्यास करणं  जास्त आवडत असेल?

दुसरा मुद्दा तासन् तास अभ्यास करण्याचा. राजा, अभ्यासाची quality महत्त्वाची असते रे, फक्त quantity नाही. तू हातात छडी घेऊन बसलास म्हणून ती डोळ्यासमोर पुस्तक पकडून बसेलही कदाचित, पण त्यातलं डोक्यात किती जाणार आहे?

शहरात राहून आणि बँकेत नोकरी करून तुझी शेती सध्या कुंडीतल्या तुळस, गुलाब आणि जास्वंदीवरच सध्या थांबली आहे, म्हणून त्याचंच तुला उदाहरण देतो. जर कुंडीत आधीच भरपूर ओलावा असेल, आणि तरी अट्टाहासाने आपण त्या कुंडीत पाणी ओतायचा प्रयत्न केला, तर ते पाणी उपयोगी ठरत नाही, वाहून जातं, आणि जाताना मातीसुद्धा वाहून नेतं.

तसं मनाविरुद्ध तासन् तास बसल्याने पुढचं पाठ आणि मागचं सपाट होत नाहीयेना हे बघायची काळजी घ्यायला नको का?

मुलांनी अभ्यास करावा याचा आपण अतिरेक तर करत नाही ना हे तपासायला हवं. आणि आपल्या अतिरेकाने मुलांची अभ्यासाची गोडी तर नाहीशी होत नाही ना, उर्मी तर नष्ट होत नाही ना ही काळजीही घ्यायला हवी.

मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे, खूप जीवघेणी स्पर्धा आहे हे मलाही मान्य. पण त्यासाठी विचारप्रक्रिया त्यांच्या मनापासून झाली पाहिजे, आपण लादलेली विचारप्रक्रिया असली की ती फारशी लागू पडत नाही.

तुझ्या मुलीच्या बाबतीत पुढचं वाक्य लागू होत नाही. पण काही वेळा मुलांची बौद्धिक कुवतच मर्यादित असते. अशा वेळी त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं योग्य नसतं.

असो, बघतो मी थोड्या गप्पा मारून तिच्याशी.”

जेवताना नंदूने त्याच्या आफ्रिकेतल्या शेताचे वार्षिक नियोजन, जमाखर्च याबद्दलच्या गमतीजमती सांगितल्या, सुरुवातीला त्याच्या काही लहानमोठ्या चुकांमुळे शेती कारभाराच्या नियोजनात त्याची कशी फजिती झाली हे त्यानं सांगितलं.

त्याची लेक रस घेऊन हे सगळं ऐकत होती.

नवीन शहरात, परदेशात गेल्यावर – खाणं पिणं, रहाणं, करमणूक, औषधं, बचत, घरी पैसे पाठवणं यासाठी कशी तारेवरची कसरत करावी लागत होती हे नंदू सांगत असताना, अचानक संपदा उद्गारली, “पण काका, हे सगळं तर बाबा मला आजच शिकवत होते. तुमच्या वेळी नव्हतं का हे अभ्यासात? तुम्ही बाबांना तेव्हाच विचारलं असतं तर तुमची अशी पंचाईत झाली नसती.

आणि या नियोजनाचे भविष्यात असे फायदे आहेत, असे उपयोग आहेत हे आता लक्षात आल्यावर तर आणखीनच detail मध्ये मी त्याचा अभ्यास करेन.”

नंदूने आपल्या मित्राकडे सहेतूक पाहिले – औषधाची मात्रा मित्राच्या लेकीला तर नक्की लागू पडली होती, मित्राला लागू पडली आहे का नाही, याची तो खात्री करत होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिसरा अंक… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तिसरा अंक… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(अविनाशचीही परिस्थिती वेगळी नव्हती.रिटायर झाल्यावर वेळ खायला उठायचा त्याला. आता तो पूर्वीचा रुबाब राहिला नव्हता. लोकांचं येणं जाणं कमी झालं.या घरात पूर्वीसारखे होस्टिंग करणं अशक्यच होतं… सुगी संपल्यावर पाखरं उडून गेली. ) – इथून पुढे —

आत्ता हे सगळं वसुधाला आठवलं. दोघे नातू रोज येत त्यांच्यात थोडा जीव रमे त्यांचा. हे लोक आल्याबरोबर मुलांना संभाळणारी   नॅनी त्यांनी काढून टाकली.केट आणि अमर एखादी चक्कर मारत.

उद्या त्यांची मैत्रीण चारुता भेटायला येणार होती. वसुधाने नातू गेल्यावर स्वयंपाक केला.चारुता त्यांची मुंबईची जवळची मैत्रीण.तिची मुलगी वसुधाच्या गावापासून दोन तास ड्राईव्ह वर होती.म्हणजे अमेरिकन दृष्टीने जवळच. ती येणार होती चारुताला घेऊन वसुधाकडे.

ठरलेल्या वेळी चारुताला घेऊन तिची मुलगी चंदा आली. आल्याआल्या चारुता वसुधाला मिठी मारून म्हणाली, “कितीकिती वर्षांनी भेटतोय ग आपण वसू. कशी आहेस तू?”

दोघी मैत्रिणीच्या डोळ्यात अश्रू आले. वसुधाने केलेल्या स्वयंपाकाला नावाजत त्या तिघी मनापासून जेवल्या.चारुता वसुधाच्या शेजारी बसली.

“आता सांग बघू मला सगळं.कशी आहेस कसं चाललंय तुझं?”

”अग मी मस्त आहे की. जवळच मुलगा सून रहातात,येतात कधीतरी.”

तेवढ्यात बेल वाजली.नेहमीप्रमाणे आजही दोन्ही नातू आत आले.दंगा करू लागले.अविनाशचं आणि वसुधाचं चित्त विचलित झालं.

“ अग मी येणार हे सांगितलं होतंस ना त्या सुनेला?तरी सोडलं याना इकडे?” चारुताने विचारलं.

“अग त्यांचे जॉब असतात ना.मग सोडतात रोज या मुलांना.तेवढीच आमची मदत त्यांना.”

चारुताने विचारलं, “वसुधा, आत्ता अविनाशला एकदम मणक्यांचा त्रास सुरू झाला म्हणालीस ना?तेव्हा ही सून मुलगा आले होते का ग?एम आर आय करायला बरोबर?”

“छे ग चारुता.आम्ही दोघेच गेलो.मी कार चालवली, त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली.सगळं केलं.ही अमेरिका आहे बाई.मुंबई नाही.. मुलगा सून लेक धावत यायला आणि घरी घेऊन जायला.”

वसुधा कडवटपणे म्हणाली. “ अग,त्यांना हे सुचलं सुद्धा नाही की आपल्या आईला किती त्रास होत असेल.तर घरी न्यावे चार दिवस. इकडे  ही पद्धतच नाही.माझा हात दुखावला होता तेव्हाही कोणी आलं नाही.जो बरा असेल त्याने बरा नसेल त्याचं करायचं.”  वसुधाच्या डोळ्यात पाणी आलं.

“चारुता, तू भाग्यवान ग.मुंबईला मुलगा सून नातवंडे एकत्र रहाता. तुझे  मिस्टर गेल्यावरही तू एकटी नाही पडलीस.तुझं मोठं ऑपरेशन झालं म्हणालीस तेव्हा मुलगा सून  कोणीतरी हॉस्पिटलमध्ये झोपायलाही येत होते.”

चारुता म्हणाली “हो ग वसुधा.मी किती भाग्यवान आहे याबाबतीत.लाख आहेत माझी सून आणि मुलगा.पण खरं सांगू का,आता भारतातसुद्धा ओल्ड एज होम्स वाढायला लागली आहेत ग.मुलांना हल्ली म्हातारे आईवडील नकोच असतात.दोघांपैकी एकच मागे उरला तर सरळ त्यांना अथश्री सारख्या उत्तम वृद्धाश्रमात दाखल करतात. काय बोलणार? तेही तिकडे आनंदात जातात.समवयस्क लोक तिकडे असतात.रोजची  नाश्त्यापासून जेवणापर्यंतची कटकट नाही.म्हटलं तर सुख म्हटलं तर एकाकी.

पण तू मला सांग,जवळ घर घेतलंस खरं मुलगा सुनेच्या, पण मग उपयोग काय झाला?त्यांना मात्र तुमचा उपयोग नक्कीच होतोय असं दिसतंय. वसुधा, मुंबईला या ना दोघे माझ्याकडे जरा बदल म्हणून. माझं घर मोठं नाही.पण मन मोठं आहे. शेजारचा फ्लॅट रिकामाअसतो,तिथे मस्त सोय करीन मी तुमची.

येता का?मस्त रहा,नाटक सिनेमे बघा, मी छान जेवायला रोज मस्त करीन.अविनाश,याल का? मी अगदी मनापासून बोलावते आहे. मी तर म्हणते,तो शेजारचा फ्लॅट तुम्हीच का विकत घेत नाही?सरळ हे सोडून मुंबईला शिफ्ट व्हा.सहज शक्य आहे तुम्हाला.” चारुता गंभीरपणे म्हणाली. “आपल्याकडे अजून नोकर मिळतात.चोवीस तास म्हणालीस तरी ते उपलब्ध असतात.डॉक्टर केव्हाही  असतात. हल्ली  खूप बदलला आहे भारत.म्हातारपण सुखाचं आहे बरं भारतात.विचार करा अजूनही. काय ग हे इथे? डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला दोनदोन महिने?सगळा खेळ  इन्शुरन्सचा. साधा डॉक्टर उपलब्ध नाही.कोणतीही मदतनाही.कशाला ग रहाता इथे?मिळवलेत ना ढीगभर ते डॉलर्स?उपयोग काय मग म्हातारपणी? मुलांना द्यायला का?जी तुमच्या मदतीला फिरकत सुद्धा नाहीत. “– चारुता तळमळीने बोलत होती. “सॉरी ग वसुधा.मी जरा जास्तच बोलले.माझ्याकडे असा पैसा नसेल पण माझी माणसं आहेत मदतीला. आणि ज्यांना नाहीत त्यांना अथश्री सारखे पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुमची शेवटपर्यंत नीट काळजी घेतली जाते…”

अविनाश हे ऐकत होता. “अगदी बरोबर बोलते आहेस तू चारुता.तुझी कळकळ समजते आम्हाला. काय झालंय सांगू का?आता आम्हाला इथेच रहावे लागणार.माझं सोन्यासारखं घर मी विकलं तेव्हाच आमच्या आयुष्याचा पहिला अंक संपून दुसरा सुरू झाला.फार जड गेलं ते मला.कबूल करतो मी.आणि हाही भ्रमनिरास झाला की मुलगा सून जवळ आहेत म्हणून आधार मिळेल.तसलं काही होणार नाही.मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही ग.इथे लोक असेच असतात.माझी मुलं नावाला मराठी आहेत.त्यांची आतडी आमच्यात अजिबात गुंतलेली नाहीत. वसुधा खूप गुंतली आहे केट मध्ये.

तिला हे दे.. तिला ते दे,तिला साडीच दे.ती नेतेसुद्धा, पण ती गोरी मुलगी हे कधी  वापरणार ग?

मी हजारवेळा सांगतो, ती आपली नाही.कधीतरी चक्कर मारतात हेही खूप आहे…

…. आमच्या कानडे नावाच्या मित्राचीच गोष्ट सांगतो.अवघ्या साठीत त्याच्या बायकोला डिमेंशियाने गाठले. काही म्हणजे काहीही समजत नाही तिला.दोन्ही मुलं पार दुसऱ्या कोस्टला. हा कानडे एकटा तिचं सगळं करतो.ती आडवीच्या आडवी पडून असते.हाही आता माझ्याच एवढा आहे.त्या भव्य घरात भुतासारखे दोघेच रहातात. हा एकटा ओढतोय हे बायकोचे न बरे होणारे दुखणे.किती छान जोडी होती ती.बघता बघता ती कोशात गेली आणि आता तर नुसती टकमक बघत असते.हा भरवतो,डायपर बदलतो, सगळी सेवा करतो.”

चारुता म्हणाली, “मग का नाही आणले त्यांना भारतात?अल्झायमर आणि डिमेंशियासाठीही वेगळी केअर सेंटर्स आहेत इकडे.तुम्हा लोकांना पैशाला काय कमी आहे?अजून ठेवू शकता त्या बाईना तुम्ही तिकडे.”

अविनाश शांतपणे म्हणाला, “तो त्यांचा प्रश्न  आहे ग चारुता. आमचं म्हणशील तर आता आमचाही तिसरा अंक सुरू झालाच आहे.आम्ही किती जगू,कोण आधी जाईल हे माहीत नाही. मी आणि वसुधा मागच्याच महिन्यात इथल्या एका ओल्ड एज होम मध्ये आमची नावे नोंदवून आलोय.आत्ता नाही पण अगदीच विकलं अवस्था झाली तर आम्हाला तिकडे जाण्याशिवाय पर्यायच नाही. आम्ही आमच्या हाताने भारताचे परतीचे दोर कापून टाकलेत. त्यात मलातरी काही वाईट वाटत नाहीये.

गेली जवळजवळ पंचेचाळीस वर्षं मी इथे वैभवात राहिलो.सगळं  ऐश्वर्य उपभोगलं. आता मलाच भारतात परत यायचं नाही.आमचं तिकडे कोणीही नाही.मग इकडच्याच वृद्धाश्रमात राहू.तिकडच्या कशाला? आमची त्याचीही मानसिक तयारी आहे.इकडे रहाणारे सगळे हेच करतात.तिसरा अंक  शेवटी इथेच ओल्ड एज होम मधेच होतो आणि तिथेच संपतो.”.. गंभीरपणे अविनाश बोलत होता.

वसुधा म्हणाली, “मंडळी फार गंभीर चर्चा झाली.या नादात आपल्या चारुताला आवडतं ते आणलेलं आईस्क्रीम आणखीच गार होईल.थांब ग चारुता… चंदा,तेवढं फ्रीजमधलं आईस्क्रीम काढ बाई.तुझ्या आईला फार आवडतं ना  स्ट्रॉबेरी आईस्क्रीम?”

चंदा हसत हसत म्हणाली “हो ग मावशी.मी वाटच बघत होते की ही चर्चा थांबणार कधी? आई,ही अमेरिकेची वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारली आहे.तू आता विसरून जा सगळं आणि हे मस्त आईस्क्रीम खा बघू.”

.. चारुता हसली आणि आईस्क्रीमचा मोठा बाउल तिने पुढे ओढला.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिसरा अंक… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तिसरा अंक… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

बेल वाजली म्हणून वसुधा हळूहळू हॉल मधून बाहेर आली.अलीकडे गुडघे फार दुखत तिचे.

वय झालं आता सत्तरच्या पुढेआणि अविनाशही झालाच की शहात्तरचा.

आले आले म्हणत वसुधा दाराजवळ गेली.

तिचे दोन नातू  बाहेर उभे होते.वय दहा आणि सात.बहुधा केट त्यांना सोडून गेली असावी. हं म्हणत सुस्कारा सोडत तिने त्यांना आत

घेतले.हाय ग्रँडमा, खायला दे ना.

फर्ड्या अमेरिकन  अँक्सेन्टमध्ये बोलत मुलं आत घुसली.

फ्रीज उघडून आत काय आहे ते बघायला लागली.

वसुधाला खरं तर राग आला पण बोलणार कोण? आता ही मुलं संध्याकाळ पर्यंत इथे असणार.आजी हे दे आजोबा टी व्ही लावा,इंटरनेट जोडून द्या हे सुरू होईल.मग सहा वाजता केट किंवा अमर त्यांना घेऊन जातील.

वसुधाला आज हे अगदी नको वाटत होतं.जरा आराम करावा,  थोडं पडून रहावं असं वाटत होतं तिला.उद्या तिची जवळची  मैत्रीण भारतातून लेकीकडे आली होती,

तिला वसुधाने जेवायला बोलावलं होतं.त्या  माणसांचा स्वयंपाक करायचा होता.

मुलाशेजारी घर घेतल्यापासून हा नवीनच त्रास सुरू झाला होता.

रोज सकाळी  ही मुलं येत आणि संध्याकाळीच जात.शाळा असली की निदान दुपारी त्यांचे आईवडील येऊन घेऊन जाईपर्यंत तरी ती असतच… वसुधाला मागचे दिवस आठवले.

भारतातून अगदी फार कमी लोक तेव्हा अमेरिकेत येत. एक बॅगआणि बरोबर मोजकेच डॉलर्स.वसुधाचा नवरा अविनाश या पहिल्या काही लोकांपैकी एक होता. भारतातून घेतलेली डॉक्टरीची डिग्री आणि हे डॉलर्स याव्यतिरिक्त हातात काहीही नव्हतं.

अविनाशने न्यूयॉर्कला राहून पुन्हा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.उत्तम मार्क्स मिळवत, जॉब करत मास्टर्स पूर्ण केलं.  निष्णात जनरल सर्जन होता तो. त्याचा  जम चांगलाच बसला. वयाची तिशी जवळ आल्यावर  आई म्हणायला लागली,अरे अवी तू लग्न कधी करणार?

त्याकाळी भारतातल्या मुली अमेरिकेला जायला पटकन तयार होत नसत. अवीचा जीव ल्यूसीत गुंतला होता. पण ते फारसं पुढे गेलं नाही. ल्यूसी म्हणाली माझं माझ्या दुसऱ्या कलीगवर प्रेम आहे.मी त्याच्याशीच लग्न करणार आहे.सॉरी अवी.

अवीने  कष्टाने आपला जीव  तिच्यातून सोडवून घेतला  आणि आईला सांगितलं,तू मुली बघून ठेव.मी पुढच्या चार महिन्यात येऊन लग्न करूनच जाईन.

अवी मुंबईला आला.आईने बघितलेल्या मुलींपैकी वसुधा बरी वाटली त्याला.  तिचं करिअर फारसं नव्हतं.दिसायला चांगली होती.पण आईच्या ओळखीची होती ती फॅमिली.जास्त चिकित्सा न करता अवी वसुधाला हो म्हणाला. त्या दोन  महिन्यात लग्न करूनच दोघेही अमेरिकेला गेले.

अविनाशला आता खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला.

वसुधाला नोकरीची  फारशी आवड नव्हती. तरी ती जवळच्या एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉबकरायला लागली.

वसुधाला तीन वर्षात दोन मुलगे झाले.अभय आणि अमर. वसुधाची आई दोन्ही वेळा सहा सहा महिने राहिली.

त्याकाळी अमेरिकेत डाळी, पीठे साबुदाणे कुठे मिळत? आई हे सगळं वसुधाला बोटीने पाठवायची.

फार कठीण होते ते दिवस.आपली माणसं फार तुरळक दिसायची त्यांना. साधी कोथिंबीर मिळाली तरी या  शेजारणी बायका एकमेकींना आवर्जून देत…

वसुधाची मुलं मोठी होऊ लागली.अतिशय उत्तम सांपत्तिक परिस्थिती असलेल्या अविनाशने मुलांना प्रचंड फी देऊन  प्रायव्हेट स्कूल मध्ये घातले. त्या काळात डोळे फाटतील अशी फी होती ती.

मुलं पूर्ण अमेरिकनाईज्ड झाली.,

त्यांना मराठी शिकवायचे वसुधाचे सर्व प्रयत्न फोल ठरले.  आपण मागायचाअवकाश. सर्व काही आपल्या हातात पडतं हे मुलांना माहीत झालं. आपले डॅडी समाजातल्या अतिशय उच्च स्थरात आहेत हे समजायला त्यांना उशीर लागला नाही. वसुधाने त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण  सदैव अविनाश त्यांना पाठीशी घालत असे.

काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुलं अविनाशसारखी डॉक्टर काही झाली नाहीत पण उत्तम शिकली.कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दूरच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊन लागोपाठ घर सोडून गेली. उरले हे दोघे.

मोठं घर,त्याहून मोठं,त्याहून मोठं असं करत हा प्रचंड व्हिलाअविनाशने विकत घेतला.

आता अमेरिकेत खूप लोक भारतातून नोकरी धंद्यासाठी येऊ लागले होते. वसुधा आली त्यावेळची परिस्थिती आता बदलायला लागली.

आता मराठी लोकांची नाटके, मराठी प्रोग्रॅम्स घेऊन महाराष्ट्रातून  प्रथितयश नाटके घेऊन नट येऊ लागले.त्यांचे प्रयोग झाले की मोठ्या कौतुकाने अविनाशकडे हे लोक उतरत.

त्यांचे सगळे होस्टिंग हे जोडपे फार हौसेने करतअसे.

मग तो गाण्याचा प्रोग्रॅम असो किंवा दहा लोक आलेले असोत.

तो भव्य दिव्य व्हिला, ते लेकजवळचं मोठं घर बघून लोकांचे डोळे विस्फारत. अविनाशला हेच हवं असायचं.त्यांच्या डोळ्यातलं कौतुक हेवा. एक मराठी  माणूस शून्यातून हे उभं करतो हे लोकांनी बघावं,हीच सुप्त इच्छा असायची त्यांना बोलावण्यामागेअविनाशची..

लोक येतजात राहिले,पार्ट्या झडत राहिल्या. लोकांचे कौतुक झेलून तेही आता जुने झाले.

आता असे अनेक लोक त्यांच्या शहरात यायला लागले.खूप शिकलेले, पैसे मिळवणारे आणि अविनाशसारखेच उच्च रहाणारे सुद्धा. तरीही अविनाश धडपडत राहिला. सगळ्या प्रोग्रॅमध्ये भाग घेत राहिला.लोकांना बोलावत राहिला. दरम्यान दोन्ही मुलांनी आपापल्या मैत्रिणी असलेल्या अमेरिकन मुलींशी लग्ने केलीआणि नोकरीनिमित्त ती खूप दूरच्या शहरात निघून गेली.लांबूनच हाय डॅडी, ममी,कशीआहेस?इथपर्यंत संबंध ठेवून राहिले दोघेही.

मध्यंतरी वसुधा पाय घसरून बागेत पडली.नशिबाने पायाला दुखापत झाली नाही पण हात मात्र चांगलाच दुखावला तिचा. अविनाशने त्यातल्या त्यात जवळ असलेल्या मुलाला बोलावलं.

“सॉरी डॅडी. मला नाही येता येणार.माझे सुट्टीवर जायचे वेगळे  प्लॅन्स आहेत.मी चार  दिवसातच जातोय ट्रीपला. टेक् केअर.”. मुलगा निघून गेला.

अविनाशने वसुधाची सगळी काळजी घेतली.तिचे लांबसडक केस  तिला पार्लरमध्ये नेऊन  कापून घेतले.शोल्डर कट करून घेतला.

“बघ कशी मस्त मॉडर्न दिसतेस की नाही?”

वसुधाने डोळ्यातलं पाणी लपवत हसून होकार दिला.

“अविनाश, आपण भारतात जाऊया का रे?इथे आता जीव गुदमरतोय बघ माझा.कसली रे ही मुलं आणि कसल्या या सुना. आपल्या माणसात जाऊया ना रे, निदान म्हातारपणी तरी.?इथे राहिलो की रे जवळजवळ चाळीस वर्षे. पुरे ना आता.मला नाही आता इथं रहावंसं वाटत.” वसुधा कळवळून म्हणाली.

अविनाश म्हणाला, “छे ग.आपलं तिकडे कोण आहे सांग?ना घर ना दार.डोकं टेकायलासुद्धा एकही ठिकाण नाही आपलं. तिकडे जाऊन तरी काय करणार आपण?असेच एकटेपण तिकडेही असणारच. बरंय इथेच. मी विचार करतोय, अमरच्या घराजवळ वेगळं थोडं लहान घर घ्यावं.त्यातल्या त्यात तो आणि केट आपल्याला जरा लागून आहेत, थोडे तरी प्रेम करतात.अभय खूपच दूर आहे.मनानेही ते आपल्यापासून खूप लांब गेलेत. मागच्या महिन्यात अमर म्हणत होता,तुम्ही हे मोठं घर विकून टाका डॅडी.आमच्या गावात जवळ घर घ्या.मलाही माझ्या मुलांसाठी गरज आहे तुमची.आणि तुम्हालाही म्हातारपणी मी जवळ असलेला बरा.” बघ.काय म्हणतेस तू?

विचार करून वसुधाने होकार दिला.नाहीतरी या प्रचंड मोठ्या घराची उस्तवार आता त्यांना होईनाशी झाली होती. त्यांना ती  दुरुस्ती ते सगळं  मधेच निघायला लागलेलं दुरुस्तीचं काम आता कटकटीचं होऊ लागलं.

वसुधा म्हणाली “अविनाश,घेऊया आपण अमरच्या जवळ घर..म्हणजे तरी फार जवळ नसणारच.असेल चार लेन टाकून.पण हाक मारली तर येईल अशी आशा करूया.

– – आणि अविनाशने तो भव्य महाल. मन घट्ट करून विकून टाकला.अमरच्या गावात त्याच्या घराजवळ घर  मिळालं त्याला. फार जवळ नव्हतं पण तरी चार लेन्स टाकून म्हणजे जवळच.

सुरवातीला वसुधा बेचैन झाली.या वयात नवीन गाव नवीन वातावरणाशी जुळवून घेणं तिला अतिशय जड गेलं.पूर्वीच्या मैत्रिणी दूर राहिल्या. अविनाशचीही परिस्थिती वेगळी नव्हती.रिटायर झाल्यावर वेळ खायला उठायचा त्याला. आता तो पूर्वीचा रुबाब राहिला नव्हता. लोकांचं येणं जाणं कमी झालं.या घरात पूर्वीसारखे होस्टिंग करणं अशक्यच होतं.

.. सुगी संपल्यावर पाखरं उडून गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिघाड – लेखिका : सौ. तृप्ती देव ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

?जीवनरंग ?

☆ बिघाड – लेखिका : सौ. तृप्ती देव ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

फ्रिज बिघडला.

टीव्ही बंद.

वाय-फाय डाऊन.

…. शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.

“आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!” – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.

सहा वेळा प्लग काढून लावला. टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला. नेट कनेक्शन गायब.

सगळीकडे जणू “No Signal”.

तो चिडून म्हणाला,

“हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय.”

त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.

ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,

“काय झालं?”

“काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?”

ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.

ती म्हणाली—

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?”

क्षणभर तो गोंधळला.

काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणीवेचा प्रकाश पडला….. त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.

फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं…

टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही…

नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…

पण ती?

…… ती अजूनही सकाळी उठून उठून सगळं करत होती. गरम चहा, पोळी भाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…

…. सगळं ‘नॉर्मल’ चालू. ती बिघडत नाही? ती थकत नाही? ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?”

ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं. जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,

ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण? ती तापातही उठते. पाळीच्या दुखण्यातही काम करते.

मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते. सासूबाई टोचून बोलल्या तरी चुप राहते.

…. कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.

तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.

काही वर्षांपूर्वी – –

तो नवीन नोकरीला लागला होता. तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.

ती लग्नानंतर शहरात आली, नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.

सगळं ती शिकत गेली.

रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.

त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.

एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.

तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”

ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच.”

—-

आणि आत्ताच…

तो फ्रिज उघडून पाहतो, “कसं जमवायचं आता सगळं?” पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—

“माझ्या आयुष्याचा तापमान बिघडत असताना… किती वेळा हिने ‘फ्रिज’सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय!”

.. तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो. ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.

“कधी बिघडशील गं तू?” तो हळूच म्हणतो.

ती थांबते. थोडा वेळ शांत. मग म्हणते—

“बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला!”

.. त्याच्या छातीत काहीतरी  धडधडतं.

दुपारी…

तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.

मुलाला विचारतो, “तुला सँडविच खायचंय का?”

मुलगा म्हणतो, “पप्पा, तुम्ही बनवाल?”

तो म्हणतो, “हो, आई विश्रांती घेत आहे.”

ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—

“उद्या काय? पुन्हा मीच चालू?”

तो म्हणतो, “नाही. आता मीही चालू राहीन.”

रात्री…

ती शांत झोपलेली असते. तो तिच्या पायाशी चादर घालतो. लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.

आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—

…… “तू चालू होतीस… म्हणून घर चाललं. पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय— तू बिघडलीस तर मीही संपलो!”

या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो. पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?

तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या…

.. कारण ती जर एक दिवस खरंच “Shutdown” झाली, तर घर चालणार नाही…

…. फक्त ‘जगणं’ चालू राहील… पण त्यात ‘जीव’ नसेल.

घरच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही…

लेखिका: सौ. तृप्ती देव

प्रस्तुती –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पार्किंग” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “पार्किंग” ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची दुपार फार सुस्त. सगळेच निवांत असतात. पॅसेजमध्ये शतपावली करत असताना एकदम आवाज यायला लागला.

“ही गाडी कुणाची ये” १२ नंबरचे फ्लॅटमालक ओरडत होते.

“माझी आहे.काय झालं.” तिसऱ्या मजल्यावरून २० नंबरचा फ्लॅटवाला ओरडला.

“तुमची गाडी काढा”

“का?”

“फ्लॅट ओनर आहे”

“मी भाडेकरू आहे”

“खाली या आणि तुमची स्कूटर काढा.मला लावायचिये”

“दुसरीकडे लावा.जागा आहे की..”

“माझी गाडी रोज इथंच असते.”

“मग???”

“मग काय?गाडी दुसरीकडे लावायची”

“ओ मिस्टर,आधी नीट बोला.पार्किंग सार्वजनिक आहे.”

“असू दे.माझी जागा फिक्स आहे आणि लवकर खाली ये मग बोल”

“स्वतःला कोण समजतो. आलोच”

भाडेकरू तणतणत खाली आला.दोघं एकमेकांना रोखून पाहत होते.

“बघतोस काय?गाडी बाजूला घे” १२ नंबर कडाडला.

“समोर जागा दिसतेय ना.जा तिथं गाडी लाव.”

“मी इथंच लावणार”

“आज माझी गाडी इथून काढणार नाही.नीट बोल्ला असतास तर विचार केला असता पण तू तर एकेरीवर येऊन ऑर्डर द्यायला लागला.”

“अजून एकदा सांगतो.गप गाडी काढ.नाहीतर..”

“खबरदार!! गाडीला टच केलास ना तर तुझ्याकडे सुद्धा गाडी आहे हे लक्षात ठेव.”

“भाडेकरू असून रुबाब दाखवतोस”

“फुकट राहत नाही.पैसे मोजतो आणि कॉमन पार्किंग आहे.”

“ते मला काही माहीत नाही. गाडी काढ उगीच विषय वाढवू नकोस.मालकाला फोन लाव.”

“गरज असेल तर तू फोन लाव.मी कशाला फोन करू.”

“गाडी बाजूला घेऊन विषय संपव.”

“विषय मी नाही तू वाढवतोय?एक दिवस तू दुसरीकडे लाव.काय फरक पडणार नाही.”

“इथं फक्त माझी गाडी लागते.सगळ्या बिल्डिंगला माहितीये”

‘कॉमन प्लेसमध्ये कुणीही गाडी लावू शकतं.मेंटेनन्स सगळेच भरतात.”

“जास्त अक्कल शिकवू नकोस” १२ नंबर

“मला दुसरी कामं नाहीत का?”

“ए xxxx,फार बोलतोयेस”

“सेम टू यू”

शब्दाला शब्द लागत वाद चिघळला.आवाज वाढले. प्रकरण एकमेकांना शिव्या देण्यापर्यंत पोचलं.काही लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला.सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी मध्ये पडले पण नक्की कोणाची बाजू घ्यावी हेच त्यांना कळत नव्हतं कारण एकजण नियम दाखवत होता अन दूसरा हक्क..  त्यामुळे वाद वाढला.  इतक्यात १२ नंबरनं गाडीला जोरात लाथ मारली.  मग भाडेकरूनं सुद्धा तसचं केलं.भांडण हात घाईवर गेलं.गचांड्या पकडल्या गेल्या.एकमेकांच्या सटासट कानाखाली मारल्या गेल्या.चाळीशी पार शिकलेले लहान मुलांसारखं मारामाऱ्या करत होते.शेवटी प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.

दोन -अडीच तास चौकीत  दोघं नुसतेच बसून होते. भांडणाचा आवेश पार उतरलेला.. उलट मनात विचित्र फिलिंग होतं.पश्चातापाची भावना होती.काही वेळानं बोलावणं आलं.“बोला.काय मॅटर आहे”

‘साहेब,यांनी सोसायटीत हाणामारी केली” हवालदारांचं ऐकून इन्सपेक्टरांना आश्चर्य वाटलं.

“कुणी?? यांनी.हे तर चांगल्या घरातले,शिकलेले वाटतात.”

“नुसती मारामारी नाही तर शिव्या देत होते.एकमेकांच्या गाड्यांना लाथा घातल्या.”

“काय हो,जंटलमन,खरंय का?” इन्सपेक्टर यांनी चढया आवाजात विचारल्यावर दोघांनी माना डोलावल्या.

“साहेब,चूक झाली.पुन्हा असं होणार नाही.माफी मागतो.”भाडेकरू.

“मी सुद्धा!!! रागाच्या भरात घडलं.माझी काहीच तक्रार नाही.” १२ नंबरनं हात जोडले.

“दोघं शिकलेले आहात ना?”

“हो,मी बॅंकेत आहे”

“मी आय टीत आहे”

“तरीसुद्धा इतक्या खालच्या लेव्हलला जाऊन भांडलात आणि फालतू गोष्टीसाठी तुम्ही लोक..”

“डोकं फिरलं होतं.रागाच्या भरात तोल सुटला.” १२ नंबर भाडेकरूकडे पाहत म्हणाला.

“मी पण चुकीचं वागलो.संतापाच्या भरात काहीही बोललो.माफ करा.माझी काहीही तक्रार नाही.”

“माझीसुद्धा!!”

“आपसात मिटवलं हे चांगलं केलत.जा आता आणि हो पुन्हा असं वागू नका.” इन्सपेक्टर.

“सॉरी!!! वड्याचं तेल वांग्यावर निघालं.”

“जो तो हेच करतोय.आजकाल राग फार लवकर येतो.भांडायला फक्त निमित्त लागतं.स्वतःवरचा कंट्रोल सुटतो मग संतापाच्या भरात वेडवाकडं घडतं आणि नंतर पश्चाताप करावा लागतो.”

“खरंय साहेब” १२ नंबर.

“आमचचं बघा ना.पार्किंगसारखी साधी गोष्ट पण आम्ही प्रतिष्ठेची केली आणि गुन्हेगार म्हणून चौकीत आलो.डोकं शांत झाल्यावर आपण काय चूक केली हे लक्षात आलं.”

“खरं सांगायचं तर स्वतःचीच लाज वाटली.म्हणूनच प्रकरण वाढवायचं नाही असं ठरवलं.जे झालं ते झालं त्याबद्दल मनापासून माफी मागतो.”

“मी सुद्धा..आमच्यामुळे तुम्हांला त्रास झाला त्यासाठी दिलगीर आहोत.”नंतर साहेबांच्या परवानगीनं दोघं सोबतच घरी गेले.

…… “असाच समजूतदारपणा लोकांनी दाखवला तर आपलं काम सोप्पं होईल.” इन्सपेक्टर हवालदारांना म्हणाले.

“साहेब,सध्या पार्किंगवरून भांडण फार होतायेत.हे नवीनच आहे.”

“महत्वाचं म्हणजे सुशिक्षित लोकं भांडतात हे जास्त काळजी करण्यासारखं आहे. जागा कमी.. गाड्या फार अशी परिस्थिती झालीय.  त्यामुळे प्रत्येकानेच थोडं समजूतीनं घेतलं पाहिजे.”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा + संपादकीय निवेदन – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

✍️ 💐 अ भि नं द न 💐✍️

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आणि ई अभिव्यक्ती मराठी अंकाच्या संपादक मंडळ सदस्या सौ. मंजुषा मुळे यांचे अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन 💐

🖊️स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशन, मुंबई सर्कल (महाराष्ट्र व गोवा) आयोजित लेख स्पर्धेत प्रथम पुरस्कार ✒️

स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशन, मुंबई सर्कल (महाराष्ट्र व गोवा) यांनी आयोजित केलेल्या लेख स्पर्धेत त्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. या यशाबद्दल यांचे अभिनंदन!

🖊️राष्ट्रकवि श्रीकृष्ण ‘सरल’ स्मृति प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार ✒️

हिंदी साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचे त्यांचे कार्य सातत्याने चालू आहे. आतापर्यंत त्यांनी २७५ हून अधिक हिंदी लघुकथांचा अनुवाद करुन त्या कथा मराठी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या या  साहित्य सेवेची दखल घेऊन, सरल काव्यांजलि साहित्यिक संस्था, उज्जैन,(म.प्र.) या संस्थेने राष्ट्रकवि श्रीकृष्ण ‘सरल’ स्मृति प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नुकताच १४ सप्टेंबर या हिंदी दिनानिमित्त त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

या गौरवास्पद कामगिरी बद्दल सौ. मंजुषा मुळे यांचे समुहातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

🖊️✒️

आजच्या अंकात वाचूया तीन लघुकथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

(१) सांगा ना बाबा… श्री भगवान वैद्यप्रखर() हे छानच झालं  श्री संतोष सुपेकर  () खिडकी  श्री भगवान वैद्यप्रखर☆ मराठी अनुवाद / लेखिका : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

?

(१) लघुकथा – सांगा ना बाबा…

(एका हिंदी कवितेवर आधारित) 

‘आता त्या चिमणीला मी कुठल्या भाषेत समजावून सांगू बाबा? तुम्ही कोणत्या भाषेत बोलायचात तिच्याशी … बाबा ते प्लीज एकदा सांगा ना मला.

अजूनही ती न चुकता रोज घरात येते. आधी उंबऱ्यावर बसून चिव चिव करते… तुम्हाला हाका माराव्यात तशी. मग खिडकीत बसते… मान वेळावून सगळीकडे बघत राहते … तुम्हाला शोधत असल्यासारखी. मग बाल्कनीत जाते … नाच करावा तशी स्वतःभोवतीच फिरत राहते… एकीकडे चिवचिवाटही मोठ्याने सुरु असतो…. तो थांबतच नाही…. आणि मी अक्षरशः चक्रावून जातो.

तुम्ही गेलात… ते कळल्यावर भेटायला आलेले नातेवाईक परतले. शेजाऱ्यांनी आणि मित्रांनीही चौकशी करणं थांबवलं. इतकंच काय.. अनेक वर्षं आपला पत्ता शोधत येणाऱ्या पत्रांनी- मासिकांनीही जणू आपल्या घराकडे पाठ फिरवली. हो.. पण घायाळ झालेल्या पाखरासारखी तुमची पुस्तकं मात्र काही दिवस नक्कीच फडफडत राहिली होती … आता त्यांच्यावर धूळ साठलीय तो भाग वेगळा. पण … 

…. पण ती निळ्या पिवळ्या पंखांची चिमणी मात्र अजूनही येते …अगदी रोज… कधी एकटी तर कधी सोबत आणखी बऱ्याच चिमण्या घेऊन — पोलीस ठाण्यात विनाकारण डांबून ठेवलेल्या आपल्या माणसाला सोडावं म्हणून लोक मोर्चा घेऊन जातात ना.. तसंच काहीसं वाटून जातं मला त्यांच्याकडे बघून. आता तिला मी काय सांगू … कसं सांगू बाबा?

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही तिला तांदळाचे दाणे खायला द्यायचात … पेपर वाचून दाखवायचात.. तुमच्या कविता वाचून दाखवायचात.. आणि ते सगळं कळत असल्यासारखं, तल्लीन होऊन ती तुमच्यासमोर शांत बसून रहायची. कधीकधी तीही बहुतेक स्वतःची सुखं दु:खं चिवचिव करत तुम्हाला सांगत राहायची, आणि तुम्हीही शांतपणे ऐकत राहायचात. तुम्ही बागेत काम करायचात तेव्हा तर ती तुमच्याकडे अशी निरखून बघत राहायची की जणू काही तुम्ही तिच्या बागेत काम करणारा माळी असायचात … 

… आत्ता प्रकर्षाने आठवतंय सगळं.

तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक रोपट्याला तिने किती वेळा तुमच्याबद्दल विचारलं असेल …सांगा ना बाबा…आता कसं सांगू.. कसं समजावू मी तिला….

एक दिवस ना बाबा, ती धीटपणाने बेधडक थेट घरातच आली आणि शोधत राहिली…. एकही पेटी.. एकही कपाट असं राहिलं नाही जिथे बसून तिने तुमचा कानोसा घेतला नाही. आरशावर डोकं आपटून आपटून विचारत होती …. तुम्ही कुठे आहात ते. शेवटी हताश झाल्यासारखी तुमच्या टेबलावर जाऊन बसली.. आणि तुमच्या पेनाला विचारायला लागली…. त्याने तुम्हाला शेवटचं कधी पाहिलं होतं ते….

आता तिला कसं समजवायचं बाबा.. आम्हीही तिला तांदळाचे दाणे देतो, पण तोंडही लावत नाही ती. मोठ्याने चिवचिवाट करून नक्कीच गळा कोरडा पडत असणार तिचा.. पण अजूनही तुम्ही झाडाला टांगून ठेवलेल्या पाण्याच्या मडक्याकडे ती बघतही नाही…. दारात, अंगणात, बाल्कनीत, खिडक्यांमध्ये चिवचिव करत भिरभिरत रहाते आणि दमली की निघून जाते….. दुसऱ्या दिवशी परत येण्यासाठी..

– आता तिला कसं सांगायचं की तुम्ही खूप लांब निघून गेला आहात …. परत कधीही इथे न येण्यासाठी… 

बाबा ऐका ना.. हे सगळं सगळं तुम्ही त्या चिमणीला कोणत्या भाषेत सांगितलं असतंत …. ते सांगायला तरी या ना बाबा परत … 

प्लीज बाबा.. या ना…‘

कविवर्य : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ यांच्या ‘बोलो ना पापा’ या हिंदी कवितेवर आधारित.

लेखिका : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?

(२) हे छानच झालं…  

माझा एक मित्र सकाळी सकाळी घाईघाईने कुठे तरी चालला होता. रस्त्यावर नेहेमीची वर्दळ अजून सुरू झाली नव्हती. त्यामुळे त्याच्या टू-व्हिलरचा वेग नकळतच वाढला होता… एक काम करून लगेच ऑफिसला वेळेत पोहोचायचं आहे हाच विचार असणार त्याच्या डोक्यात… आणि रस्त्याने जाणाऱ्या एका वृध्द गृहस्थांना त्याच्याही नकळत त्याच्या गाडीने धडक दिली. तो प्रचंड घाबरला. गाडी बाजूला लावून त्याने त्या गृहस्थांना आधार देत उठवून बसवलं. बरंच लागलं होतं त्यांना. घाबरलेल्या मित्राने मला घाईघाईने फोन केला… ‘पटकन् ये’ म्हणाला, आणि मी लगेच तिथे पोहोचलो. मुद्दाम माझी कार घेऊन गेलो… त्या गृहस्थांना धरून गाडीत बसवलं… हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने जिवाला धोका ठरणाऱ्या जखमा नव्हत्या. औषधोपचार… बॅन्डेज सगळं करून झाल्यावर आम्ही दोघं त्यांना त्यांच्या घरी पोहोचवायला गेलो.

त्या अनोळखी घरात जातांना खरं तर जरा घाबरलोच होतो… आजोबांच्या घरातल्यांचा त्या अपघातावरून आणि त्याहीपेक्षा उपचारांच्या खर्चावरून वाद होणार… आम्ही बोलणी खाणार… पैसेही द्यावे लागणार… या सगळ्यासाठी आम्ही मनाची तयारी केलेलीच होती….

घरात पोहोचताच त्या आजोबांचा तरुण मुलगा तावातावाने माझ्या मित्राला बोलायला लागला… ‘‘खरं तर तुमची रवानगी थेट पोलिस कोठडीत करू शकलो असतो मी… पण माझ्या वडलांना धडक मारल्यावर तुम्ही तिथून पळून गेला नाहीत… त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात… उपचार केलेत… म्हणून सोडून देतोय् तुम्हाला… नाहीतर तुम्हाला जेलची हवाच खायला लावली असती मी… लक्षात ठेवा… आणि आत्ता आमची हलाखीची परिस्थिती तर बघताच आहात तुम्ही. मी दिवसभर घराबाहेर असतो… दोन-दोन नोकऱ्या करून कसं तरी घर चालवतो. आता बाबा अंथरूणावर पडून रहाणार म्हणजे कितीतरी कामांसाठी मला पैसे खर्च करावे लागणार… रजा घ्याव्या लागणार. भरीस भर म्हणून त्यांच्या औषध-पाण्याचा खर्च आहेच. अहो माझे वडील या वयातही सकाळी लवकर उठून पाणी भरायचे… मुलांना शाळेत सोडायला जायचे, येतांना दूध आणि भाजी घेऊन यायचे. पुन्हा दुपारी मुलांना शाळेतून आणायला जायचे. विजेचं बील, पाण्याचं बील भरायचे, रेशन आणायचे. दळण दळून आणायचे. शिवाय रिकाम्या वेळेत सुतारकाम करून थोडेफार पैसेही कमवायचे… आता ही सगळी कामं कोण करणार? तुम्ही असं करा… आम्हाला कमीत कमी साठ-सत्तर हजार तरी द्याच…”

… आणि तिथे अंथरूणावर पडलेल्या वडलांच्या जखमांवर मात्र, मुलगा त्यांची जी खोटी खोटी प्रशंसा करत होता, ते शब्द मलम लावण्याचं काम करत होते. त्या तशा जखमी अवस्थेतही त्यांना छान हसावंसं वाटत होतं… त्यांच्या मनात विचार येत होता की… ‘‘मला हा ऍक्सिडेंट झाला हे तर छानच झालं… आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच मुलाच्या तोंडून माझं या घरातलं महत्त्व तरी ऐकायला मिळालं मला …”

मूळ हिन्दी कथा : ‘अच्छा हुआ!’

कथाकार : श्री संतोष सुपेकर, उज्जैन

मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?

(३) खिडकी…  

“बाबा.. बाबा.. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? ऊन किती तापलंय.. आणि तुम्ही इथे बाल्कनीत निवांत बसलायत.. चला आत चला..“

“हो बाळा, मी उठणारच होतो आत्ता..“

“बाबा मी रोज बघतोय.. तुमची खोली बदललीये तेव्हापासून तुम्ही या बाल्कनीतच जास्त वेळ बसून असता..“

“हां.. बरोबर आहे.. पण अरे असंच येऊन बसतो इथे.. सहजच..“

“नव्या खोलीत कुठली गैरसोय जाणवते आहे का तुम्हाला? सगळं फर्निचर नवं आहे.. आणि ही खोली तुमच्या आधीच्या खोलीपेक्षा थोडी मोठीही आहे.. मग तरी..?“

“अरे गैरसोय वगैरे काही नाही.. सगळी अगदी छान सोय आहे.“

“हो ना? मग खोलीतून उठून सारखे असे बाल्कनीत का येऊन बसत असता?“

“अरे खरंच खास असं काही कारण नाहीये.. पण का कोण जाणे.. इथे येऊन बसलं की फार बरं वाटतं.. आणि अरे वेळही चांगला जातो.. म्हणून.. बाकी काही नाही.“

“बाबा मला कळतेय की तुम्ही सांगत नसलात तरी नक्कीच काहीतरी कारण आहे याचं. अहो ‘आबांची खोली आम्हाला पाहिजे‘ म्हणून किती हट्ट करत होती दोन्ही मुलं.. दोघेही मोठे झालेत आता.. अभ्यासही खूप असतो त्यांना.. त्यामुळे बाबा त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आम्हाला. पण हे बघा त्याविषयी तुम्हाला काही सांगायचं असलं तर मोकळेपणाने सांगा मला.. असं मनात नका ठेऊ.“

– – “आता तू एवढं म्हणतोच आहेस तर सांगतो…. त्या खोलीला एक बऱ्यापैकी मोठी खिडकी आहे ना.. त्या खिडकीपाशी मी तासनतास बसून राहायचो. तिथून रस्त्यापलिकडचं ते वाण्याचं दुकान दिसतं. तिथे सतत माणसांची ये-जा चालू असते.. ती बघत वेळ कसा जातो कळत नाही. आणि माझे ते अगदी जवळचे मित्र होते ना.. काळेकाका.. त्यांचं घर बरोब्बर समोरच्या चौकातच आहे. माझ्याशी गप्पा मारायला ज्या रस्त्याने यायचे ना ते, तो रस्ताही अगदी स्पष्ट दिसतो त्या खिडकीतून. आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला आणखी एका मित्राचं तीन मजली मोठं घर आहे. तो हयात होता तोपर्यंत त्याच्या गच्चीवरच्या कुंड्यांना पाणी घालायला जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा हमखास दिसायचा.. एकमेकांना बघून नुसते हात हलवायचो आम्ही.. पण खूप छान वाटायचं रे.. आता दोघेही गेले हे जग सोडून.. खरं तर एक-एक करत बरोबरचे बहुतेक सगळेच गेले रे.. खूप साऱ्या आठवणी मागे ठेवून.. त्या खिडकीशी बसून त्या सगळ्या आठवणी मी आठवत राहायचो.. जणू पुन्हा अनुभवायचो ते दिवस आणि मन रमवायचो. आता त्या खोलीतून या खोलीत आलोय.. माझं सगळं सामानही इकडे हलवलंय…. पण त्या खिडकीची सोबत सुटली रे.. म्हणून तर सारखा असा इथे या बाल्कनीत….“

– – बोलता बोलता नकळत ओलावलेले डोळे झटकन पुसत त्या वडलांनी मान वळवून शेजारी उभ्या असलेल्या मुलाकडे पाहिलं.. पण – –

– – मुलगा तिथे नव्हताच.. कधी निघून गेला ते कळलंच नव्हतं त्यांना……..

मूळ हिन्दी कथा : ‘खिडकी‘.

कथाकार : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’.

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वरदलक्ष्मी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ वरदलक्ष्मी… ☆ प्रा. भरत खैरकर 

यामिनीने सोबत म्हणून दोन बाहुल्या, सॉफ्ट टाॅय ठेवलेल्या आहे. त्यांची तिने ‘हनी- बनी’ अशी नावं ठेवली आहे.. त्यांच्याशी ती सतत बोलत असते, त्यांना झोपवून पांघरून  घालून.. पाणी पाजून..ती त्यांची काळजी घेते! बाहेर जाताना बाय-बाय.. ‘आतून दार लावून घ्या..’ वगैरे सूचना ती करते.. घरातून येता जाता ती त्यांच्याशी बोलत असते. बऱ्याचदा एकटं  घर  यामिनीला खायला उठायचं. म्हणून ही बाहुल्यांची सोबत! नवऱ्याचे कोणी नातेवाईक आल्यावर तिच्या ह्या बाहुली प्रेमावर हसायचे‌.. पण ती दुर्लक्ष करायची. कारण त्यांच्याशी बोलल्यावर तिला घरात कोणीतरी सोबतीला आहे. असं वाटायचं. घरात एकटं राहून  राहुन तरी किती राहणार. आणि एकटं करणार तरी काय? म्हणून ती तिच्या एका पोलीस मैत्रिणीकडे विरंगुळा म्हणून जायची. तिथे तिच्या आईशी  गप्पा मारायची..मुक्कामी थांबायची.. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लागले तर तिच्या नवऱ्याचा मित्र जवळच राहायचा.. तो सगळं बघून घ्यायचा. ती सतत कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवायची.. निदान चार-पाच तास तरी घराबाहेर काढता यावे म्हणून ती जवळच्याच एका  शाळेमध्ये शिकवायलाही जायची.. पण ते केवळ वेळ जावा म्हणून..

कॅनडातील ओटावा मध्ये असलेल्या आपल्या मुलाला यामिनी कालपासून तिसऱ्यांदा फोन करत होती.. पण काही केल्या फोन लागत नव्हता.. तिला अलीकडे  त्याच्या लग्नाची  काळजी वाटत  होती.. तिने पुण्यातील दोन तीन मुली बघितल्या होत्या..त्यातली एक तिला पसंत पडली होती आणि त्या संबंधित आपल्या मुलाशी बोलावं म्हणून ती तिच्या बाबुला.. म्हणजे आपल्या मुलाला.. अरविंदला फोन लावत होती.

मुलाशी तिचं रोज फोनवर बोलणं  व्हायचं.. त्याला चांगली मुलगी मिळावी आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढीच तिची इच्छा होती!

आपल्या शेवटच्या  दिवसांमध्ये आपल्या मुलाचं कल्याण व्हावं..म्हणून तिने वरदलक्ष्मीचं पूजन घरात मांडलं होतं.. देवीला मनोमन नमस्कार करत असताना ती एकदम जुन्या आठवणीत गेली.

मुळात ती महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वरील   कारवार परिसरातली  कोकणी  नाईक देसाई परिवारातील.. श्री रामनाथ हे त्यांचं कुलदैवत! तिचा नवरा कर्नाटकी.. फायनान्समध्ये मास्टरी केलेला.. हिचं शिक्षण बीएससी केमिस्ट्री होतं.. पण त्यावेळेस तुला नोकरीची गरज नाही. ‘माझा भरपूर पगार आहे.’ असे म्हणून तिला नोकरीपासून त्याने थांबवून.. संसारात लक्ष देण्याची तिला सूचना केली होती.. त्यानुसार तिनेही संसार केला होता..

तो कामसू होता.. आपल्या कामांमध्ये फार हुशार होता.. निर्व्यसनी..साधा भोळा.. बघून कोणी म्हणणार नाही की हा फायनान्समध्ये इतका मास्टर माणूस आहे! सरळ स्वभावी आणि कौटुंबिक मनुष्य..

तो पुण्यातील एका मोठ्या नावाजलेल्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटचा हेड होता. तेथे त्याने बऱ्यापैकी नाव कमावले होते. कंपनीला खूप सारा फायदा त्याच्या कॅल्क्युलेशनमुळे मिळाला होता..  त्याची फायनान्शियल स्किल  सर्वांना माहिती होती.  बऱ्याच मित्रांचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तो भरून द्यायचा. कंपनी व्यतिरिक्त तो सायंकाळी लहान मोठ्या पतसंस्थांमध्ये  ऑडिट करायला जायचा.त्याची कीर्ती कार्पोरेट फिल्डमध्ये चांगलीच पसरली होती.. पुण्याच्याच एका सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या संचालकालाही त्याने फायनान्शिअल सल्ला दिला होता.. त्याचा फायदा त्या शिक्षण संस्थेला खूप झाला. शिक्षण संस्थेच्या संचालकाने त्याची हुशारी बघूनच आपल्या संस्था व त्यांचा फायनान्स  रिपोर्ट त्याला रिटायरमेंटनंतर सांभाळायला दिलं होता.

त्याला शेअर बाजाराच सुरुवातीपासून आकर्षण होतं.

पण अजूनही त्याने ठोस अशी काही शेअर बाजारात गुंतवणूक केली नव्हती. त्याचा शेअर बाजाराचा अभ्यास चालू होता. रिटायरमेंट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गुंतवणूक करावी असा त्याचा मानस होता.. पण तो त्याने काही यामिनीला किंवा मुलाला बोलून दाखवला नव्हता.. सारखा आपल्या कामांमध्ये तो गुंतून राहायचा.. हळूहळू त्याचे शेअर बाजारातील आकर्षण वाढत गेले.त्यातूनच त्याची शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूक ह्यात रुची वाढली होती..

तिच्या नवऱ्याने घरात असलेल्या ५० तोळ्यापैकी ३४ तोळे सोने शेअर बाजारात.. शिवाय रिटायरमेंटच्या वेळी मिळालेल्या ग्रॅज्युएटी व  पीएफचे सर्व  ३४ लाख रुपये  शेअर मध्ये घातले..

त्याला स्वतःच्या कॅल्क्युलेशन वर एवढा विश्वास होता की लगेचच आपल्याला हा पैसा दुप्पट किंवा तिप्पट होईल ही गॅरंटी होती..

मात्र  हाय रे नशिबा.. तसं काही झालं नाही. उलट शेअर बाजार कोसळला आणि कुठे चूक झाली माहिती नाही.. त्याचा सर्वच्या सर्व पैसा बुडाला.. ही गोष्ट  बायको पोराला कशी सांगावी?  ह्या भीतीनेच त्याने धसका घेतला होता.

यातलं काहीच यामिनीला किंवा मुलाला माहिती नव्हतं.. सर्व पैसा बुडाला. आणि अचानक या माणसाच्या किडन्या फेल झाल्या. यामिनीला वाटलं दुसरं काहीतरी असेल! होतातच रिटायरमेंट नंतर तब्येतीचे प्रॉब्लेम..! पण शेअर बाजारात बसलेला फटका आपण मुलाला व बायकोला कसा सांगावा? या भीतीनेच त्याला कापरं सुटलं होतं.त्याचा धसका घेऊन  त्याने बिछाना पकडला होता.

रिटायरमेंटआधी असलेला फ्लॅट विकून पुण्यापासून लांब  त्यांनी एक बंगला बांधला होता तिथे आता रिटायरमेंट नंतर राहू व मुलाला युएसला पाठवू असा काहीसा  निश्चय असतानाच  ही घटना घडली होती..

त्याच्या ट्रीटमेंटसाठी खूप काही खर्च करावा लागला नाही कारण ज्या शैक्षणिक संस्थेत त्याने मदत केली होती त्या संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याची तीन महिने ट्रीटमेंट चालली होती आणि संचालकाने सर्व ट्रीटमेंट  मोफत मध्ये  करायच्या सूचना दिल्या होत्या.

तो किडनी फेल होऊन  मरण पावला होता. त्याहीपेक्षा त्याने धास्ती घेतली होती. नवऱ्याने मृत्यूच्या  दोन दिवस आधी  ” यामिनी, तू आपल्या मुलाला  युएसला  शिक्षणाला पाठवलं पाहिजे.” असं वचन घेतलं होतं.  ‘असं कसं शक्य आहे? मला कसं जमेल?” यामिनी.

तेव्हा तो  म्हणाला,” मला माहिती आहे,तू काय आहे ते! तू करू शकशील सगळं!” हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं..

नवऱ्याचं अचानक जाणं, तिला सोसवत नव्हतं.पण पर्याय नव्हता. आलेल्या संकटावर मात करणे गरजेचे होते. तो बंगला भाड्याने देऊन मुलाला युएसला पाठवून  आता ती स्वतः  एकटी भाड्याच्या घरात राहत होती.

आज जर बाबूचे बाबा असते तर आपल्याला ही धडपड करावीच लागली नसती.  तिचा उर एकदम भरून आला.

आजही तिने श्रावणातील हळदी कुंकवासाठी वरदलक्ष्मीच्या पूजेनिमित्त  बिल्डिंग मधील बायकांना बोलावले होते.. कौतुकाने ती आपल्या  मुलाचे फोटो सर्वांना दाखवीत होती आणि होणाऱ्या सुनेसंबंधी स्वप्नात  रंगली होती.. तेवढ्यात तिला अरविंदचा फोन आला.. आणि ती भरभरून काल बघितलेल्या मुलींबद्दल बोलू लागली…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन् गौर प्रसन्नतेने हसली…… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆

सुश्री स्नेहल अखिला अन्वित

? जीवनरंग ?

☆ अन् गौर प्रसन्नतेने हसली… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित

“अगं थांब त्याला कुठे हात लावतेस, गौरींना नैवेद्य दाखवायचाय अजून!! त्याशिवाय कुणी काही तोंडात टाकायचं नाही, आज्जी ओरडेल नाहीतर,” सुहासी आपल्या सहा वर्षांच्या परीला म्हणाली.

“कधी होणार तुमचं, केव्हाची वाट पाहतेय मी, मला भूक लागली,” परी एवढंस तोंड करून म्हणाली.

“रोज जेवतेस ना वेळेवर, एक दिवस वाट पहायची जरा. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्ण बाईचं पान वाढलं की तुला बसवेन तिच्याबरोबर.”

“एवढाss वेळ, मला खरंच भूक लागली. ती भजी दिसतायत, पुरणपोळी दिसतेय समोर, मला खावंसं वाटतय आणखीनच……” परी काकुळतीने म्हणाली.

“जा आता तिकडे, उगीच इथे स्वैपाकघरात लुडबुड नको करुस, आज्जी ओरडेल उगाच,” असं म्हणत सुहासीने परीला जवळजवळ बाहेर ढकललच.

ती किरकिरतच आतल्या खोलीत जाऊन बसली.

तिला बघून जरा टेकायला म्हणून तिथे बसलेली तिची आज्जी उठली. स्वयंपाकघरात गेली आणि परीचं ताट वाढून गौरीला नमस्कार करून तिला जेवायला सांगितलं.

सुहासीला कळलंच नाही काय झालं ते, ती सासूबाईंना म्हणाली, “काय झालं चुकलं का काही माझं? सवाष्ण नाही आली अजून, गौरीला नैवेद्य नाही दाखवला, तुम्ही तिला का वाढलत? तुमचं तर नेहमी सगळं कडक असतं. ती आली होती माझ्याकडे भूक लागली म्हणून, मी तिला समजावून पाठवलं होतं. थांबली असती ती.”

“हो थांबली असती ती, पण मलाच तिचा चेहरा बघून राहवलं नाही. सवाष्ण कधी येणार काय माहीत? तिने सांगितलेली वेळ जाऊन अर्धा तास झाला. नैवेद्याच सगळं ठेवलंय मी बाजूला. खाऊ दे परीला. घरची चालती बोलती गौर आहे ती!!”

सुहासीला कळेना, एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या या अशा!! दर गौरी-गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी याचं तोंड वाकडच असतं नेहमी.

सगळं नुसतं दडपणाखाली, सणाचा आनंद तो काय घेता येतच नाही कधी!!

आता काय नवीन मनात आलंय कोणास ठाऊक? पोरीला घालतायत खायला, मला जेवताना रडवणार वाटतं……..

सुहासीच्या मनात बरंच काही चाललं होतं, तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलावलं.

ती गेली तशा त्या म्हणाल्या, “आल्या बघ सवाष्ण बाई. गौरीच्या नैवेद्याचं ताट घेऊन ये आणि नैवेद्य दाखवून या सवाष्ण बाईंबरोबर तूही बस. मी वाढते तुम्हाला दोघींना.”

सासूबाई हे बोलल्या, तसे भीतीने तिचे

हृदयाचे ठोके जास्तच वाढले, भरभर ही पळत होते आणि तिला अगदी सहज ऐकूही येत होते!!

ती पटकन म्हणली, “काहीतरी काय, मी कशाला बसू. तुम्ही बसा हवतर. सगळेच बसा एकदम, बाबांना आणि ह्यांना पण वाढते मी.”

“नाही, आज तूच बस जेवायला यांच्याबरोबर. बाकीचे थांबतील थोड्या वेळ. “

सुहासी तर ऐकूनच बिथरली. तिला काही केल्या समजेना, आपल्या सासूला नेमकं झालंय तरी काय? ती पुन्हा त्यांना म्हणालीच, “अहो आई, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही हो. तुम्ही सगळे जेवल्याशिवाय. इतक्या वर्षांची सवय मला शेवटी जेवायची. तुम्हीच बसा मी वाढते.”

“आता सणाच्या दिवशी वाद वाढवत बसणार आहेस का माझ्याशी?” सासूबाईंनी डोळे वटारले तशी, सवाष्ण बाईसमोर आणखी तमाशा नको म्हणून ती मुकाट्याने जेवायला बसली.

सासूबाईंनी तिला अगदी आग्रह करून वाढलं, पोटभर जेवायला लावलं. सुहासीला पहिले जमेचना, असं कधी घडलंच नव्हतं ना यापूर्वी. पण ते कुणी दुसऱ्याने वाढलेले गरम गरम पदार्थ एकेक करून पोटात जायला लागल्यावर तिचं मनच पोटापेक्षा जास्त तृप्त झालं.

सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र सुहासीला राहवलं नाही, ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळेच आपआपली काम सोडून बाहेर आले.

सुहासी रडतरडतच सासूबाईंना म्हणाली, “काय चुकलं असेल तर सांगा, पण असं नका वागू हो. मोठं पाप केल्यासारखं वाटतय मला, तुमच्या सर्वांच्या अगोदर जेवले मी आज. मला हे पचणारच नाही.

दुसरी काही शिक्षा द्या पण हे असं नका वागू हो आई!!”

तिला एवढं रडताना पाहून सासूबाईनी तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, “का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस, कधी तर एवढंस राहत असेल, त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्यासमोर आम्ही संपवून टाकायचो, तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू.

मग आज पहिल्यांदा गौरी जेवणाला घरची गौर तृप्त झाली तर तिला का नाही पचणार?”

“पण आई, हे काय असं अचानक सगळं इतकं बदललं?,” सुहासी मनातलं बोललीच एकदाची.

“सुहासी, या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला, आणि मी तुझ्यावर खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले, तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले त्याक्षणी एकदम. आणि घाबरून काळजात जोरात कळ गेली. भास होता की काय होतं कोणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं!!

जणू गौर मला सांगत होती, घरच्या गौरीला दुखवलस, रडवलस आणि माझं काय कौतुक करत बसलीयेस?? तिच्याकडं बघ पहिले. माझं खरं अस्तित्व लेकिसुनांत आहे. त्यांच्या त्रासाने मी पण दुःखी होणार……….

कितीही मोठी पैठणी नेसवा, सोन्या- रूप्याने मढवा,  कितीही सजवा धजवा, पन्नास प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा मी हसणार नाहीच!!

आणि खरंच ग माझी गौर हसताना मला दिसली नाहीच कधी. अगोदरही नाही आणि आताही नाही.”

छोटया परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली, गौरींजवळ गेली, त्यांना निरखून बघितलं, आणि आनंदाने टाळया वाजवत म्हणाली; “आज्जी, तुझ्या दोन्ही गौरी तर आज हसतयात की ग गोड गोड!!”

परीच्या आज्जीने झटकन गौरींकडे पाहिलं, आणि म्हणाली, “खरंच की!! माझी गौर हसतेय आता…..”

छान वाटलं ना आज्जी आता तुला, परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आज्जीने तिला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेत म्हणाली, “तू आणि तुझी आई, माझ्या खऱ्या गौरी, तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या दोन गौरीच काय आपलं घरही नेहमीच हसायला लागेल, हे कळलंय हो मला आता!!

सुहासी, संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुझ्या मनासारखं कर सगळं. पाहिजे तश्या नटा तुम्ही दोघी घरच्या गौरी, मी नाही काही खुसपट काढणार नेहमीसारखी. पण तुम्हाला नजर लागू नये म्हणून दृष्ट मात्र आठवणीने काढेन हा यावेळी!!”

हे नुसतं ऐकूनच घरातल्या सगळ्या गौराया अगदी प्रसन्नतेने हसल्या …….

© सुश्री स्नेहल अखिला अन्वित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares