मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळ आला होता, पण – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ काळ आला होता, पण – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – ‘गोळी मार स्साल्याला!’ टकलूने माझ्या कानपटीवर पिस्तुलाची मूठ मारली. डोळ्यात एखाद्या बोगद्यातला अंध:कार भरत चालला. धरणीकंप झाला. जग गोल गोल फिरायला लागलं. अंधारात शेकडो रातकिडे एकदम किरकिरू लागले. वेदनेची एक लहर वीजेसारखी शरिरातून गेली. मग अंधार अधीक गडद झाला. लडबडून मी जमिनीवर बसलो.) — आता इथून पुढे

‘सगळं माहीत आहे याला. माहीत असूनसुद्धा सांगत नाही. गोळी मार याला!’

काळ्या बोगद्यात अशुभ वटवाघळे फडफडत होती. मेंदूत कुणा टाईम बॉम्बची टिक्  टिक् ऐकू येत होती.

एक ना एक दिवस प्रत्येकालाच मरायचे आहे. मरणाला काय भ्यायचं? पण थोडा अधीक वेळ जर मिळाला असता तर…. अनेक अर्धवट कामे तशीच पडून रहातील.

टकलूने कॉलर ओढून मला उठवले. सदर्‍याची वरची बटणे तुटून जमिनीवर पडली.

‘ऊठ, ऊठ भल्या माणसा, तू काय इतक्या लवकर मरू इच्छितोस. आता तरी सांग भल्या माणसा, कुठे आहे के. पी.?’

‘ मी सांगतो ना, ‘गोळी मार स्साल्याला!’

माझी कानपट जळत होती. एक टेंगुळ आलं होतं. ते विलक्षण ठणकत होतं. वाटत होतं, डोकं फुटून त्याचे हजार तुकडे होतील. जेव्हा वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसून त्याला कहाणी सांगत असे आणि काठीण प्रश्नाचं उत्तर विचारात असे, तेव्हा विक्रमालाही तसंच वाटत असेल का?

रात्री पार्टीत धीमने म्हटलं होतं, तुझी कुंडली पहिली आहे. शनीची साडे-साती सुरू झालीय. त्रास होईल. ‘हनुमान चालीसा’चा पाठ सुरू कर आणि मीठ कमी खा.’

‘काय रे, सांगतोयस के.पी. चा पत्ता की दाबू ट्रिगर? सरळ वरचं तिकीट कापलं जाईल.’ मृत्यू माझ्या माथ्यावर टक टक करत होती.

‘जर मी कुणा के.पी.ला ओळखतच नाही, तर तुम्हाला त्याचा पत्ता कुठून देणार?’

माझा आवाज विझत आलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीसारखा  कापत होता.

‘अच्छा, तू के.पी.ला ओळखत नाहीस?’  दाढीवाला खंबीरपणे चालत माझ्यापाशी आला

‘नाही.’

‘तू शर्मा नाहीस?’ टकलूने विचारले.

‘आहे. ‘

‘विश्वास ठेवा, मी कुणाही के.पी. नावाच्या माणसाला ओळखत नाही.’

‘खोटं बोलतोय हा! गोळी मार याला!’ दाढीधारीने माझा उजवा हात धरून मागे मुरगळला. ‘आई ग!’ वेदनेच्या अजगराने हात आणि खांदे मजबूतपणे जखडले. मी कळवळलो. म्हंटलं, ‘हां हां  मारा मला. क्षणोक्षणी मरत रहाण्यापेक्षा  यातना लवकर संपून गेल्या, तर बरंच होईल!’

‘खरं खरं सांग, तू रजत शर्मा नाहीस? के.पी.चा पार्टनर?’ टकलूच्या पिस्तुलाची नळी आता माझ्या गळ्याच्या निळ्या नसीला कुरवाळत होती.

म्हणजे हे खुनी मला रजत शर्मा समजत होते तर…..

नाही’ विव्हळत मी म्हंटलं.

रजत शर्माला मी ओळखत होतो. शहरात आलेल्या काश्मिरी विस्थापितांची देख-भाल करणारी एक संस्था होती. त्या संस्थेचा तो सक्रिय सभासद होता. त्याशिवाय त्याचा स्वतःचा काही व्यवसायदेखील होता. जवाहर नगरमधे राहात होता. एक दोन वेळा देणगीच्या संदर्भात मला भेटला होता.

‘खोटं बोलतोय हा! मी म्हणतोय, गोळी मार साल्याला!’

‘तू रजत शर्मा नाहीस, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा?’ टकलूने माझ्याकडे टवकारून पहात विचारलं, जसं काही तो पोलिसवाला आहे आणि मी गुन्हेगार.

‘कोटाच्या खिशात माझं आधार कार्ड आहे. बघा.’ माझा आवाज प्रकाशाची पायवाट शोधत होता.

टकलूने खुंटीवर टांगलेल्या माझ्या कोटाच्या खिशातून माझे आधार कार्ड काढले आणि काळजीपूर्वक बघू लागला. जसं काही त्याच्या अशा बघण्याने लिहिलेली अक्षरे बदलणार आहेत.

काळ जसा तिथे गोठला होता. मला वाटलं त्याच्या नजरेच्या ऊष्णतेने माझं आधार-कार्ड जळून जाईल. भिंतीवर चिकटवलेलं मधुबालेचं छायाचित्र थरथर कापून उठेल. कॅलेंडरमधून डोकावणारे,  सोनल मान सिंहाचे  काजळभरले डोळे घामेजल्या सारखे दिसत होते. सिलिंग फॅनच्या आडून एक पाल खाली पाहत होती.

थोड्या वेळाने टकलू म्हणाला, ‘हं… तू रजत शर्मा नाहीस तर…. राकेश शर्मा आहेस. ‘

गोठलेला काळ जसा वितळून वाहू लागला. बाहेर कुठे तरी एक कोकीळ जोराने कुकला. पाल सिलिंग फॅनच्या आडून बाहेर आली.

‘हो.’ मी म्हंटलं.

‘रजत शर्माला ओळखतॊस?’

‘नाही.’

मी या खुन्यांना रजत शर्माचा पत्ता काय म्हणून सांगू?

‘खोटारड्या, गोळी मार साल्याला.’ त्याचा आवाज पुन्हा एकदा तीक्ष्ण चाकूसारखा टोचला.

‘छोट्या, सोडून दे याला. हा तो नाही.

‘पण….. ‘

‘छोट्या आपण चुकीच्या माणसाला पकडलय.’

‘जा. मर साल्या ‘   दाढीवाल्यानं  मला जोरात धक्का दिला. मी भिंतीवर जाऊन आदळलो. थोडंसं  जुनं प्लॅस्टर  खाली पडलं.

‘तू नशीबवान आहेस,की तू रजत शर्मा नाहीस, राकेश शर्मा आहेस.’ टकलू म्हणाला.

‘पण याने सगळं ऐकलय. याला जिवंत सोडून कसं जाता येईल? मी तर म्हणतो, गोळी मार स्साल्याला.’दाढीवाला  माझा पूर्वजन्मीचा शत्रू वाटत होता.

‘राहू दे छोट्या! ऐक साध्या माणसा, तुला कळलंच असेल आम्ही किती भयंकर, धोकेबाज माणसे आहोत. आम्ही आज आलो, तर पुन्हा उद्याही येऊ शकतो.  कुठेही, कधीही तोंड उघडू नकोस. कळलं! तू काहीच पाहीलं नाहीस. काहीच ऐकलं नाहीस. तू स्वतःवरच उपकार करशील. आपलं  तोंड शिवून टाकशील. गांधींची तीन माकडेच आता तुला वाचवू शकतील. ‘

टकलूच्या गळ्यातून एक बिघडलेला पंखा घुर्र घुर्र करत होता.

मी मान हलवली. वा: खुन्यांनो, गांधीजींच्या तत्वज्ञानाचा हा उपयोग!

‘आणि आम्ही गेल्यावर अर्ध्या तासापर्यंत बाहेर पडायचं नाही. टकलूने  ताकीद दिली. मी होकार भरला. वेदनेचा अजगर माझं  अंग आवळत होता.

टकलूने  पिस्तुल पँटच्या खिशात ठेवले आणि दरवाजा उघडला. उन्हाचा एक उत्सुक तुकडा गुप्तहेरासारखा घराचा शोध घेत खोलीत घुसला आणि आत पसरलेल्या तणावाला हुंगू लागला.

‘वाचला स्साला! पण काही गडबड केली, तर तुला गोळी मारायला मी स्वतः येईन. शब्दांच्या सुरीने मला अर्धमेला करत दाढीवालाही टकलूबरोबर  बाहेर पडला. मी गुपचूप भिंतीला चिकटून उभा होतो. छाती अजूनही भात्यासारखी चालू होती.  बाहेर मोटार सायकल  स्टार्ट झाली होती. शेजारच्या मिस सैलीचा अल्सेशियन कुत्रा भुंकू लागला. मग मोटरसायकलच्या इंजिनाचा आवाज दूर  होत होत गेला आणि कुत्राही भुंकायचा थांबला.

मला वाटलं, जसं काही कुणी माझ्या गळ्या वर ठेवलेला चाकू हटवलाय. एक दीर्घ श्वास घेऊन मी दरवाजापाशी आलो. ते गेले होते. बाहेर एप्रीलच्या रस्त्यावर एकाकीपण विखरून पडलं होतं. रस्त्याच्या  कडेला उगवलेल्या उघड्या झाडा-झुडुपांवर  नवी पालवी फुटू लागली होती. हवेत, शेजारच्या मंदिरात होणारा घंटानाद पसरत होता. तेवढ्यात उशिरा उठलेला कोंबडा उतावळ्या स्वरात बांग देत होता.  मनगटावरील घड्याळात आठ वाजले होते.

मी कपाळावरचा घाम पुसला. नसांमधून धावणारी वेदना आता काहीशी कमी झाली होती. कानपटीवर उभारलेल्या टेंगुळावर हात फिरवला. रक्त येत नव्हतं. केवळ सूज होती. मृत्यू माझ्याजवळून वास घेऊन निघून गेला होता. आज त्याचा दिवस दुसरीकडे कुठे तरी होता. आज माझी पाळी नव्हती. कुठे तरी, कुणी तरी होतं, ज्याला वाटत होतं, मी अजून जगावं… त्याला मनोमन धन्यवाद दिले. मग खाली पडलेलं वर्तमानपत्र उचललं आणि आत डोकावलो. शेजारच्या कारखान्याचा सायरन पुन्हा वाजू लागला…… मला वाटलं, असा एखादा कारखाना, नाही का निघू शकत, जो केवळ चांगल्या आणि प्रामाणिक माणसांचंच उत्पादन करू शकेल?

– समाप्त – 

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळ आला होता, पण – भाग – १ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ काळ आला होता, पण – भाग – १ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला!’ मोठ्या दाढीवाल्याचा टोकदार आवाज धारदार चाकूसारखा टोचला.

——

सकाळी सात वाजता कारखान्याचा भोंगा मोठ्या आवाजात वाजला, तरी मला उठावसं वाटत नव्हतं. अजूनही डोळ्यात झोप होती. रात्री उशिरा झोपलो होतो. काल संध्याकाळी नीलोफरकडे पार्टीला गेलो होतो. तिथे अशी काही मैफल रंगली, की वेळेचा पत्ताच लागला नाही. सकाळी भोंगा वाजल्यानंतर काही वेळ निद्रा आणि जागृती यांच्या सीमा – रेषेवर डुलक्या घेत राहिलो.

‘उठा शर्मा जी, आज सोमवार आहे.’

डोक्याच्या कुठल्या तरी कोपर्‍यात प्रकाश पडला. डोळे उघडले. बिछान्यावर पडल्या – पडल्याच इष्ट देवतेला हात जोडले. ‘कल्याण कर प्रभू!’ मग उठून आळस दिला. आत वॉश बेसिनवर जाऊ तोडावर पाणी टाकलं. एवढ्यात दरवाजाची घंटी अपरिचित पद्धतीने वाजली. इतक्या सकाळी सकाळी कोण मरायला आलय, कंबखत!

टॉवेलने तोड पुसून दरवाजा उघडला, तर दरवाजात सात फूट उंचीचा एक धिप्पाड, मिशाळ, टाकल्या मला मागे सारत आत घुसला. त्याच्या हातात पिस्तुल होते. त्याच्या बरोबर एक मोठा दाढीवालादेखील घुसला. त्याने दरवाजा आतून बंद केला.

‘हे… हे… काय होतय? कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कुणाला भेटायचय?’ मी घाबरून विचारलं. हे सगळं पापणी लावते, न लावते, तोच घडलं होतं. मी खोलीमधे स्तंभित होऊन उभा होतो.

‘चूप! प्रश्न आम्ही विचारणार. तू फक्त उत्तरे द्यायचीस. के. पी. कुठे आहे?’ माझी कॉलर धरून टकलूने विचारले.

‘कोण के. पी.? मी कुणा के. पी. वी. पी. ला ओळखत नाही.’ मी त्यांच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपडू लागलो. त्याची ऊंची माझ्या खुजेपणाची टवाळी उडवत होती.

‘ तू के. पी.ला ओळखत नाहीस. के. पी.चा लंगोटी यार!’

उलट्या हाताची एक जोरदार थप्पड माझ्या कानपटीवर पडली. सगळं डोकं भणभणलं. डोक्याच्या गल्ल्या गल्ल्यांमधून खूप सार्‍या माशा भणभणल्या.

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला!’ मोठ्या दाढीवाल्याचा टोकदार  आवाज चाकूच्या तीक्ष्ण धारेसारखा टोचला.

‘ऐकलस ना? खरं खरं सांग, कुठे आहे के.पी.?’ टकलू फाटक्या आवाजात म्हणाला. त्याचा डावा हात माझा गळा आवळत चालला होता. उजव्या हातात पिस्तूल होतं. त्याचा आवाज ऐकून वाटत होतं, जसा काही एखादा बिघडलेला पंखा घुर्र-घुर्र करत फिरतोय.

‘मला माहीत नाही. मी खरोखरच कुणा के.पी.ला ओळखत नाही.’ मी बसलेल्या आवाजात म्हणालो. माला श्वास घ्यायला त्रास होत होता. कपाळावरून घामाची नदी वाहू लागली होती. कान गरम झाले होते. हृदयाची धडधड घाबरलेल्या घोड्यासारखी पळत होती. समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाची सुई सात वाजून पाच मिनिटावर थांबलेली होती.

‘असा नाही बोलणार हा मादर… गोळी मार याला!’ मोठया दाढीवाल्याने टकलूला पुन्हा चावी मारली.

‘तुला काय वाटतय, आम्ही इथे नाटक करायला आलोय? सरळ सरळ सांग, के. पी. कुठे आहे?’

टकलू मुच्छ्डने माझ्या मानेवरची पकड अधीक घट्ट केली. वेदनेचा अजगर मला जखडू लागला, पण मी गप्प बसलो. मौन हेच माझे एकमेव हत्यार होते.

‘मी सांगतोय ना, गोळी मार स्साल्याला!’

दाढीवाल्याने टेबलावर असलेली पुस्तके इकडे तिकडे केली. तिथे काय शोधत होता, कुणास ठाऊक? त्याला काय अशी शंका आली की काय, की मी के. पी.ला पुस्तकाच्या कुठल्याशा पानात लपवून ठेवलय.

‘नाही… नाही…  हा सज्जन माणूस आहे. मरू इच्छित नाही. हां! तर सज्जन माणसा, आम्ही कोण आहोत, माहीत आहे? आम्ही व्यावसायिक खून करणारे आहोत. चल. फटाफट सांग कुठे आहे के. पी? आम्ही तुला सोडून देऊ.’ टकलूने प्रेमाने लहान मुलासारखं पाठ थोपटत म्हंटलं, जसं काही के. पी.चा पत्ता सांगितल्यावर, तो मला बक्षीस म्हणून लॉलीपॉप देणार आहे.

‘तुमचा काही तरी गैरसमज झालाय. मी कुणा के. पी.ला ओळखत नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवताय.’

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला! याचं प्रेतच बोलेल.’ दाढीवाल्याने आता कपाट उघडून त्यात शोधाशोध सुरू केली, जसं काही मी के. पी. ला कुठल्या तरी कपाटात बंद करून ठेवलय.

‘नाही… नाही… हा चांगला माणूस आहे. हा स्वत:च सांगेल, हं, तर भल्या माणसा, आता तू मला सांगशील, की के. पी. कुठे आहे? ‘ असं म्हणत म्हणत टकलूने पिस्तुलाची नळी माझ्या कानपटीवर ठेवली. माझं डोकं गरम झालं. श्वास थांबू लागला. सगळं संपणार की काय? आत्ता? इथेच? याचवेळी? आणि मी भिंतीवर टांगलेल्या एका फोटोफ्रेममध्ये जाऊन बसणार? मला असं मरण येणार? अनोळखी गुंडांकडून? ऐन तारुण्यात? अकारण? काय हीच माझी नियती आहे? मला असं मरण यावं, असं मी काहीच केलं नाही. मी आस्तिक आहे. अलीकडेच झालेल्या चमत्काराच्या वेळी मी शेजारच्या मंदीरातील गणपतीला दूधही पाजले. माझी कुणाशीही व्यक्तीगत दुश्मनी नाही. मी कधीही कुणाच्याही हक्कावर आक्रमण केलं नाही. अगदी साधा सरळ माणूस आहे मी. आंथरण्या-पांघरण्यासाठी  मूठभर विश्वास आहे, बस्स! मग हे खूनी काय आज माझी हत्या करतील? माझ्या विश्वासाचीही हत्या करतील?

मी खरोखरच के. पी. नावाच्या कुणा व्यक्तीला ओळखत नव्हतो. पिस्तुलाची राक्षाशीण माझ्या कानपटीवर तणलेली होती. माझी ओठ सुके होते. कानपटी जळत होती. खाक घामाघूम झाली होती. हात घामाने चिपचिपित झाले.

मी तीन आकडे मोजतो. तोपर्यंत याने नाही सांगितलं तर याला गोळी मार. दाढीवाल्याचा टोकदार  आवाज चाकूच्या तीक्ष्ण धारेसारखा टोचला. हात घामाने चिपचिपित झाले. डोळ्यांपुढे अंधेरी आली. हृदयाची धडधड, भितीवर हातोडा मारावा, तशी होत होती. मी मृत्यूची वाट बघू लागलो. जे होणार आहे, ते कोण टाळू शकणार?

लहानपणी एकदा एका दुष्ट नोकराने, एक कबुतर पकडलं आणि ब्लेडने त्याचा पाय कापला. तेव्हा मी खूप रडलो आणि ते लंगडं काबूतर त्याच्याकडून हिसकावून घेतलं नि त्याला उडवलं. पण ते उडताच दहा-बारा कावळे त्याच्या मागे लागले. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी, ते घाबरलेले कबुतर तीन-चार मिनिटे  इकडे-तिकडे व्याकुळपणे उडत राहिले. नंतर थकून खाली पडले. मग त्या सगळ्या कावळ्यांनी त्या लंगड्या कबुतराला टोचून टोचून खाल्लं.

‘नाही… नाही…हा मोठा प्रेमळ माणूस आहे. आत्ता सांगेल. काय रे, प्रेमळ माणसा? तुला काय आम्ही मस्करी करणारे वाटलो. आम्ही खुनी आहोत खुनी.   के. पी. तर मरेलच, पण त्याचा पत्ता सांगितला नाहीस, तर तू आधी मरशील. कळलं?’

मी गुपचुप श्वासोछ्वासाचा आवाज ऐकत राहिलो. काय सांगणार? त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांच्यासाठी माझे शब्द आपला अर्थ हरवून गेले होते.

‘गोळी मार स्साल्याला!’ टकलूने माझ्या कानपटीवर पिस्तुलाची मूठ मारली. डोळ्यात एखाद्या बोगद्यातला अंध:कार भरत चालला. धरणीकंप झाला. जग गोल गोल फिरायला लागलं. अंधारात शेकडो रातकिडे एकदम किरकिरू लागले. वेदनेची एक लहर वीजेसारखी शरिरातून गेली. मग अंधार अधीक गडद झाला. लडबडून मी जमिनीवर बसलो.

– क्रमश: भाग पहिला

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याचं माहेरपण… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ त्याचं माहेरपण… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

” हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस,यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा,..?”अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळाली देखील,…

अभि जाम मूडमध्ये ओरडला,”मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..”

पाणी पिताना येणार हसू दाबत,..अनुने हातानेच खुणावल,..आणि घोट गिळत विचारलं,”नक्की बरा आहेस ना,..?”अभि अगदी फुल मूड मध्ये,..हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्या जवळ जात त्याला दटावत म्हणाली, ” अभ्या नाटकं नको हं,पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला,..”

अनुने लाडाने त्याला पाठीत हलकं चापट देत म्हटलं,..” ताईंकडे चाललास मग असं सांग ना,..हे काय नवीन,..म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली,इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे तिचा हात हातात घेऊन म्हणाला,..” “म्हणू दे मला हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला  ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाच पाकीट ठेवलं,..”

मी म्हंटल, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..”ओवाळणी नाही रे तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला पटकन जवळ घेतलं,..खुप रडली गळ्यात पडून.. म्हणाली, “आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात,  पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो त्या उजळवण्याची जागा माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना,..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं म्हणजे माझ्याकडे,.. अनु आली की तू निघणार आहेस,..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी “..  एवढं सांगून तायडी गेली,..

आता मी चाललो माहेरी,..”जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, ” आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..”नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुज स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?”

अनु म्हणाली, ” जा बाबा जा.. जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वहाणं,… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” असं मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं खरंच भारी कल्पना आहे ही भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,..

“ये ना दोन दिवस.  अभि गावाला गेलाय.. मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगले,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून  आठवणींच्या गप्पांना उत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..

…. भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पुरस्कार…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “पुरस्कार…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

घराला काल रात्रीपासून झोप नाही.

कालच कळलं.. अण्णांना ‘आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालाय.

यंग इंडिया ऑर्गनायझेशन दरवर्षी हा पुरस्कार देतं.. पाच लाख रुपयांचा. मज्जा आहे बुवा अण्णांची.

अण्णा वेडा माणूस. त्याहून वेडी माई… हे वेड मजला लागले. वेड्याची बायको.. माईला वेड्याची बायको होण्यात काय सुख वाटायचं कुणास ठावूक? आपण तरी काय करणार?

.. तर काय सांगत होतो? हा अण्णा चांगला मुख्याध्यापक होता जिल्हा परिषदेच्या शाळेत. मोजून पंधरा वर्ष नोकरी केली. आयुष्यभर काटकसरीत जगला. पै पै साठवला… खरं सांगतोय.. परवडायचं नाही म्हणून मूलही होऊ दिलं नाही. काय म्हणायचा माहित्येय? शाळेतली मुलं ही माझीच मुलं. असला वेडा माणूस…

त्याला माईची साथ… कल्याणमस्तु!

एक दिवस वेडाचा झटका आला. दिली नोकरी सोडून. गेली दोघं जव्हारच्या जंगलात. झोपडीत राहिली तिथं दोघं. कुठली तरी ठाकरवाडी. एक एक पोरगं गोळा केलं. शाळा सुरू केली… झोपडीतच.

वह्या, पुस्तकं, औषधं, पोरांना पुरेसं अन्न… सब कुछ… स्पाॅन्सर्ड बाय आण्णा.. साठवलेल्या पैशातून.

तो सुद्धा संपत आला. शाळा हा एकच ध्यास. त्यासाठी सगळा अट्टहास. दिसेल त्याच्यापुढे हात पसरले.

.. अण्णा नेहमी म्हणायचे. चांगल्या कामासाठी, शिक्षणासाठी, हात पसरताना कधीही लाजू नये. सरकारी अनुदानासाठी धडपड चालू होती. अण्णांच्या चपलांचे अनेक जोड झिजून मेले. टेबलाखालचे व्यवहार अण्णांना कधी जमलेच नाहीत.

वाईट माणसं भेटली तशी काही चांगलीही. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेलं. अण्णांनी सगळं लक्ष विद्यार्थ्यांवर केंद्रित केलं. नुसत्या मार्कांची फॅक्टरी नको होती अण्णांना… चांगल्या माणसाचं वाण देणारी शाळा हवी होती.

– अण्णांनी शाळा तशीच घडवली… शिस्त पाळणारी… संस्कार जपणारी… मातीला न विसरणारी.

अण्णांची शाळा म्हणजे हिऱ्याची खाण… जिथं मुळाक्षरं पोचली नव्हती, तिथली मुलं शिकली. मोठी झाली.

कुणी सरकारी अधिकारी झाले. कुणी डाॅक्टर झाले. कुणी इन्जिनिअर झाले… आणि कुणी शिक्षक….. अण्णांच्या तालमीत तयार झालेले शिक्षक पुन्हा अण्णांना येवून मिळाले. अण्णांची काळजी मिटली.

शाळा एकदम जाऊ दे जोरात. ते जाऊ दे हो.. प्रत्येक जण ‘चांगला माणूस’ झालाय. बरीच जणं शहरात गेली. तरीही मातीला विसरली नाहीत. जमेल तेवढी मदत आठवणीनं करायची. शाळेसाठी, वाडीसाठी.

अण्णा आणि माई… सेकंड इनींग्जची सुरवात. आयुष्यभर कधी ‘टाईमप्लीज’ म्हणलं नाही. आता दोघंही थकली..

सदानंद…  अण्णांचाच विद्यार्थी. इंजिनिअर झालाय. काही दिवस नोकरी. आता स्वतःचं युनिट काढलंय भोसरीला. जेवढं कमावतो, त्यातले निम्मे वाटतो. त्याची बायकोही त्याला साजेशी. दोघंही अण्णांचेच विद्यार्थी. अण्णांवर दोघांचा भारी जीव. माई अण्णा दोघं आता त्याच्याकडेच असतात.

…. अण्णांना पुरस्कार मिळाल्यापासून सगळे आनंदात.

समारंभ छानच झाला. तुडुंब गर्दी. अण्णांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम संपवून मंडळी घरी.

बक्षिसाचा चेक अण्णांनी माईच्या हातात दिला…

” यावर तुमचा हक्क. आयुष्यभर तुमची कुठलीही हौसमौज पुरवता आली नाही. स्वतःच्या सगळ्या इच्छा तुम्ही मारून टाकल्या. तुमचं एखादं तरी स्वप्न यातून पुरं करा..”

माई गहिवरल्या..

” खरं सांगू, डोळे भरून युरोप बघायचा होता एकदा…”

”ठरलं तर मग.”

.. “आधी तुमच्या दोघांचा पासपोर्ट काढायला हवा. महिनाभरात होऊन जाईल ते काम. मग तुमच्या युरोप टूरचं बुकींग करू…” सदानंद उवाच.

सदानंदने फारच मनावर घेतलं. चार आठवड्यात पासपोर्ट आला सुद्धा.

” उद्या जाऊ यात टूरिस्ट कंपनीच्या आॅफीसात ” अण्णांनी माईंना आठवण करून दिली.

” काही नको. पैसे संपले. काल गजा आला होता. तुम्ही गेला होतात चेकअपला. वाडीतल्या शाळेतली शिक्षकाची नोकरी सोडलीये त्यानं. तो तिकडे निघालाय बीड जिल्ह्यात… ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढतोय. तुमची खूप वाट बघितली. शेवटी कंटाळून गेला. लगोलग सदाला बोलवून घेतला. पुरस्काराची ती रक्कम त्याच्या खात्यात वळती केली. त्या पैशाची खरी गरज तिथं होती. म्हणून म्हणलं, टूरटूर करू नका फार…”

…. अण्णा गडगडाटी हसले… अगदी मनापासून. कौतुकानं त्यांनी माईंकडे बघितलं. माई नव्या नवरीसारख्या लाजल्या.

…. अण्णांनी दुसऱ्यांदा’जीवनगौरव पुरस्कार’पटकावला.

|| माई अण्णा प्रसन्न || 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एका संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली.. ) – इथून पुढे —-

‘भेटले का सारंग?’

‘होय. मग?’

‘मग काहीच नाही..त्त्यांचे म्हणणे तसा संप मागे घेऊ शकत नाही.’

‘का?’

‘त्यांची आणखी अनेक कंपन्यात यूनियन आहे..त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर इतर कंपन्यात परिणाम होतील.’

‘पण मग कामगारांनी काय करायच? दत्तूकाका सारखेच बाकीचे.. मग तू का प्रयत्न करत नाहीस संप मागे घ्यायचा?’

‘मी तस करू शकत नाही कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारंगअण्णा मोठी पगारवाढ देतील अशी आशा आहे आणि दुसरे..’

‘दुसरे काय?’

‘ही यूनियन चालवाणारी माणसे सरळ नसतात.. गुंड पोसत असतात हे.. मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला तर मलाच ठार मारतील ही लोक.. ‘

‘बापरे… तू नको पडूस यात.. चल जेवायला.. मी जेवण गरम करते…

ती दोघे जेवण करत असताना दार वाजू लागले म्हणून जेवणावरून उठून श्रद्धाने दार उघडले तर दत्तूकाका बाहेर होता..

‘मास्तर इलेत?

‘होय.. जेवत आहेत.. बसा.

दत्तूकाका आत येऊन बसले.

जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला..

‘काका, सारंगअण्णांना भेटून आत्ताच आलो.. पण त्त्यांचे संप मागे घेण्याचे मन नाही..

‘मग.. आमी काय करायचा? किती दिवस उपाशी रवायचा?

‘मी सगळं सांगून बघितलं.. पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि अण्णा अटी शिथिल करत नाहीत.. आपलंच चुकलं.. आपण उगीचच या यूनियनच्या मागे धावलो..

‘पण मास्तर.. माका पैशाची गरज आसा हो.. माज्या चेडवाचा लगीन करुचा आसा..

‘होय काका… मला समजतंय.. पण माझ्याकडे पण काहीच नाही.. तुमच्या सारखा मला पण दोन वर्षे पगार नाही. श्रद्धाला शाळेत काय थोडे पैसे मिळतात, त्यावर.. नशीब आम्हाला मूल नाही अजून.. नाहीतर..

‘पण माका आसा ना.. दोन चेडवा आसात.. दोगांय लग्नाची झालीत. थोरल्याचा लगीन ठरान दोन वरसा झाली. आता ती माणसा थांबतीत काय? मास्तर… मी अण्णाका भेटाक जावं.. माजी परिस्थिती सांगतय.. माज्यासारखी बरीच जणांची परिस्थिती अशीच..

‘ठीक आहे दत्तूकाका.. तुम्ही अण्णांना भेटा.

दुसऱ्या दिवशी दत्तूकाका सारंगअण्णाच्या ऑफिसमध्ये पोचले. दोन तास बाहेर बसल्यावर त्याना आतमध्ये घेतले..

‘बोला.. कोण तुम्ही..

‘मी दत्तू सावंत.. आमच्या कंपनीत संप सुरु आसा.. काल विश्वासमास्तर तुमका भेटून गेले.

‘बर.. तुम्ही त्या कंपनीत आहात. काय काम?

‘साहेब.. दोन वरसा आमी भायेर आसवं.. दोन वरसा म्हणजे चव्विस महिने पगार नाय.. कसा जगायचं?

‘तुम्हीच मंडळी माझ्याकडे आलात ना? मी तुमच्याकडे आलो होतो काय? तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे.. पण थांबायला नको? कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली.. पण तो देत नाही.. म्हणून संप.. मला काय हौस आहे संप पुकारण्याची?

‘पण अण्णा.. माझी खूप कुचम्बणा झाली हो.. माका दोन मुली.. दोघी पण लग्नाची झाली.. थोरलीचा लग्न ठरला पण.. माझ्याकडे पाच पैशे नाय हो.. लग्न करुचा कसा धाडस करू सांगा?

‘या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका.. संप केला की हे सोसावंच लागत.. डॉक्टरनी मिलचा संप पुकारला.. तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले.. मी असं ऐकलं की गिरणीकामगारांच्या मुली डान्सबार मध्ये नाच करतात म्हणे.. अजून करतात.. त्यानी आपल्या बापाचे कर्ज फिटवले, असे ऐकतो मी. असं होत..

दत्तूकाका रागाने लाललाल झाले.. त्त्यांचे मस्तक गरम झाले… रागाने ते म्हणाले..

‘म्हणजे तुमचा म्हणणं.. माज्या मुलींनी डान्सबारमधी नाच करुचो..

‘असं म्हणत नाही मी…

‘मग काय म्हणताय. तुमका संप मागे घेऊक जमणा नाय आणि असलो सल्लो देतास?

रागाने दत्तूकाका बाहेर पडले.

दत्तूकाका विश्वासच्या घरी आले तेंव्हा तो सिगरेट ओढत बसला होता.. बाजूलाच श्रद्धा मुलांचे पेपर तपासत होती.. चिडलेले दत्तूकाका विश्वासला म्हणाले..

‘सालो भडवो माका सल्लो देता.. म्हणता गिरणी कामगारांचे मुली डान्सबार मध्ये नाच करतत.. तेनी बापाचा कर्ज फेडला.. नालायक सालो.. माका असो राग इलो, साल्याचो गळो दाबीन म्हणून..

‘शांत व्हा काका.. शांत व्हा.. अहो हे पुढारी असेच.. त्याना कामगार कसे राहतात याची कल्पनाच नसते.. मी आणि श्रद्धाने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे.

‘काय?

‘होय काका… आम्ही पनवेलमध्ये एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षांपूर्वी. दिढ लक्ष भरले होते.. परत पैसे भरणे जमलेच नाही.. आजच आम्ही पनवेल मध्ये जाऊन ते अग्रीमेंट रद्द केले.. बिल्डर खूष झाला कारण आता डबल दर झाले आहेत तिकडे… ते पैसे पंधरा दिवसात मिळतील. तेंव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा.. तोपर्यंत पैसे येतील.. लग्न होऊन जाईल..

दत्तूकाका रडू लागले..’अजून देव आसा या जगात तुमच्यासारखो..

दत्तूकाका डोळे पुसत घरी गेले. विश्वास, श्रद्धाला समाधान वाटले कारण कितीतरी दिवसांनी दत्तूकाका हसले.. समाधानाने घरी गेले.

त्या रात्री खुप दिवसांनी विश्वास गाढ झोपला.

पहाटे पहाटे दारावर थापा सुरु झाल्या. एवढ्या पहाटे कोण म्हणत.. श्रद्धाने दार उघडले..

दत्तूकाका छाती पिटत ओरडत होते..

‘काय झाले काका?

‘काय सांगा बाय.. राती पासून माजा चेडू नायसा झाला.

‘आ.. कुठे गेली? शोधलंत का?

एवढ्यात विश्वास बाहेर आला.

‘काय झाल काका?

‘मास्तर.. माज्या चेडवान फसवल्यानं माका.. त्या बंडूदादाबरोबर पळणं गेला.. देवळात जाऊन लगीन पण केलान.

‘अरे.. काय हे? तुम्हाला काहीच कल्पना नव्हती?

‘थोडी थोडी होती.. तेचा तरी काय चूक? तीस वरसा झाली.. अजून लगीन नाय.. माजी कपंनी बंद.. मी तेचा लगीन ठरवलंय.. पण लगीन करूंक पैसो नाय.. शेवटी वाट बघून बघून तेना दुसऱ्याचो हात धरल्यानं. पण ता दुसरेपणाक..

म्हणजे?

‘त्या बंडू दादाचा पयला लग्न झाला हो.. तेका दोन झील आसात.. आणि तेचो मटक्याचो धंदो.. चार दिवस आत चार दिवस बाहेर..

‘अरेरे.. वाईट वाटले..

“आता तेका सोडूचय नाय.. सोडूचय नाय.. म्हणत संतापाने लाल झालेला दत्तूकाका बाहेर पडला..

त्याच दिवशी दुपारपासून टीव्ही वरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली..

कामगारनेते जयवंत सारंग (अण्णा)  यांचा त्यान्च्या ऑफिस बाहेर पोटात सुरा खुपसून खून..

खुनी दत्तू सावंत याला अटक.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एका संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले.. बाहेर दत्तू होता..

‘काय हो काका? आज सकाळीच…

‘मास्तर आसत..?

‘अजून झोपलाय तो.. काल रात्री गेटमिटिंग करून आलाय.. उठवू का?

तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला..

‘काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच..?

मास्तर.. कालच्या मिटिंगमध्ये काय ठरला संपाचा?

‘नाही हो.. मालक मागण्या मान्य करत नाही.. आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही असे साहेबांचे म्हणणे..

‘मास्तर.. यात आमी उपाशी रवलव.. दोन वरसा झाली.. संप आज मिटात. उदया मिटात म्हणून.. खायचा काय?

‘होय हो काका.. मला का समजतं नाही.. एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती.

‘मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणटत?

‘बघू.. आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना.. त्याना कालच्या गेटमिटिंग बद्दल पण सांगायचे आहे..

‘मास्तर.. जास्त वेळ काढू नकात.. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय.. दोन वरसा झाली.. तेच्या घरची चौकशी करतत.. गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी.. आणि लग्नाचो खर्च.. कपंनी बंद.. पैसे खायसून हाडू?

‘बर मी आज म्हणतो अण्णांना.. तुमचा विषय पण सांगतो.. या तुम्ही..

‘उदया येतंय मास्तर.. बरी बातमी घेऊन या.. म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.

आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली..

‘गेले दत्तूकाका?काय म्हणत होते?

‘संप केंव्हा संपणार? त्यान्च्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली.. त्यान्च्या गावाकडील आहे मुलगा.. कणकवली जवळचा.. पोलीस आहे.. लग्न करायचे पण खिशात काय तरी हवे ना..

‘या तुमच्या संपामुळे खुप लोकांचे वांधे झाले.. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?

‘सोळाशे.. आणि स्टाफ वेगळा..

‘म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारवाचून आहेत.. एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत.

‘होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत.. दत्तू काका सारखे..

‘विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती पण माझी नोकरी आहे म्हणून.. कशी काय असेना..कमी पगाराची का असेना  पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.

‘बर.. मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे.. बस साठी.. सिगरेट्स पण संपल्यात.. श्रद्धाने पर्स मधून पन्नास रुपये काढून दिले.

विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला. आत अण्णाच्या समोर पाचसहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पहाताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले..

‘झाली काल गेट मिटिंग? कामगारांचे काय म्हणणे?

‘अण्णा.. कामगार घायकुतीला आलेत.. त्त्यांचा संयम संपला.. त्यान्च्या दोन वेळ जेवणाचे वांधे झालेत.. पोरीबाळींची लग्ने अडकलीत.

‘पण त्या वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणे पट्टीत दहा बारा कंपनीत भरगोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली..मिलचा संप फसला.. डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?

‘म्हणजे अण्णा.. मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?

‘होय रे बाबा.. खूपच बदल झाला.. डॉक्टर एवढे स्ट्रॉग.. एवढा मिलकामगार त्यान्च्या मागे.. तरी संप यशस्वी झाला नाही.

‘का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?

‘कारण मुंबई.. येथील जमिन.. जमिनी विकून कोट्यावधी पैसे मिळतात तर मिल चालवायला कुणाला इंटटेस्ट आहे? आणि राज्यकर्ते.. दोघांची आतून सेटलमेंट..

‘मग आपला संप? त्याचे काय होणार?

‘विश्वास.. मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही.. कारण माझे यूनियन मुंबईतील अजून दहा कंपनीत आहे आणि पुणे.. नाशिक भागात पण आहे.. हा संप फसला तर इतर कंपनीत परिणाम होईल… मला माझे यूनियन सुरु ठेवायचे आहे आणि त्यावर माझी डाळचावल आहे.

‘म्हणजे अण्णा.. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कपंनीतील कामगारांना उपाशी ठेवणार? केवढे हे पाप?

‘जीवो जिवश्य जीवनम.. हा डार्विनचा सिंद्धांत तुला माहित असेलच. अश्या लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात.

‘हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत..

‘मग कामगारांना तू का सांगत नाहीस.. संप मोडून कंपनीत जा म्हणून?

‘मला तसें सांगावेसे वाटते.. पण मला हे मान्य करायला हवे.. अजूनही बऱ्याच कामगारांचा तुंमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यात तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण..

‘कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…

‘मला माहित आहे.. तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत.. त्याना तुम्ही पोसताय.. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल..

अण्णा मोठ्याने हसले..’तुला माहित आहे ना सर्व.. मग गप्प बस..

रागाने विश्वास बाहेर पडला.. बस पकडून घरी आला.. घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडतं नव्हते.. पुढे काय करावे हे त्याला कळेना.. त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी.. कामगार.. त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचं. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला.. त्त्यांचे लहानसहान प्रश्न सोडवू लागला.. त्यामुळे तो यूनियनलीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते. ते विश्वासबरोबर बोलत.. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट काचेची… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वाट काचेची… ☆ डॉ. शैलजा करोडे

दुपारचे जेवण आटोपून प्रभाकरराव झोपाळ्यावर विसावले होते. सावित्रीबाईंनीही किचनमधील कामे संपवून दिवाणखान्यात मोर्चा वळविला. आरामखुर्चीवर ऐसपैस बसत त्या थोड्या विसावल्या हल्ली पायांनाही खूप रग लागते, गुडघे अतोनात दुखतात म्हणत गुडघ्यांवर तीळाच्या तेलाने त्या अलगद माॅलीश करू लागल्या.

” झोपलात काय हो “

” नाही ग, यावेळी झोप कसली. डोळे पेंगू लागले तसा आडवा झालो. लगेच दहा मिनिटात झोप गायब. “

” बरं आता निवांतपणा आहे तर बोलते. आपल्या अलकाच्या लग्नाचं मनावर घ्यायला हवं, यावर्षी तिचं शुभमंगल उरकलं कि आपण जवाबदारीतून मोकळे. माझ्या भावानं सुचवलंय स्थळ. मुलगा देखणा आहे, उच्चशिक्षित आहे, कौटुंबिक पार्श्वभूमिही चांगली आहे. आपण त्यांना निमंत्रण द्यायचं काय? “

” हो देऊया ना, का नाही द्यायचं? चांगलं स्थळ असेल तर नक्कीच विचार करू. “

” मग मी माझ्या भावाला फोन करते “

आई बाबांचं बोलणं आपल्या रूममधून अलका ऐकत होती. आई आता मामाला फोन लावणार. निमंत्रण जाणार, मंडळी येईल, तत्पूर्वी आपण आता बोललं पाहिजे. प्रितेशविषयी सांगितलं पाहिजे.

” आई ” अलकाने दिवाणखान्यात प्रवेश केला. ” ये ये अलका. आता तुझाच विषय सुरू होता ” ” ऐकलंय आई मी सगळं. पण मला काही सांगायचंय तुम्हांला ” ” अग हो, काय सांगायचं ते सांग ना बेटा, त्या परवानगी कसली मागतेस. मनमोकळेपणे बोल. ” ” आई बाबा, माझं प्रेम आहे प्रितेशवर ” ” कोण आहे हा प्रितेश? कोणाचा मुलगा? ” ” माझ्या काॅलेजात एकाच वर्गात आहोत आम्ही. लोकनेते प्रतापराव जाधवांचा मुलगा आहे प्रितेश जाधव. ” ” अलका राजकारणातील ती माणसं. आपल्यासारख्या सामान्यांना ती झेपतील काय? नको पोरी हा विचार नको करूस. तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन मी. पण हा हट्ट नको. ।

बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी लग्न करीन तर प्रितेशशीच. नाही तर कोणाशीही नाही. ” ” भलताच हट्ट करू नकोस पोरी. बाप आहे मी तुझा. तुझ्या भल्याचाच विचार करीन. ” ” तुम्ही माझ्या भल्याचा विचार करताय. मला चांगलं स्थळही पाहून देणार, पण मला प्रितेश नाही मिळनार बाबा जो माझा श्वास आहे. माझा श्वासचं हिरावून घेऊन एका निर्जीव पुतळीचं लग्न लावणार का तुम्ही

” प्रभाकरराव निरूत्तर झाले. काय बोलणार होते ते. पोरीच्या हट्टापुढे त्यांनी नमतं घेतलं. ते स्वतः प्रतापराव जाधवांकडे निमंत्रण देण्यास गेले. ” काय म्हणताय राव. प्रितेशचं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. मोठा छुपा रुस्तमचं निघाला पोरगा. विचारतो त्याला आज. तसं असेल तर येतो तुमच्याकडे प्रितेश व त्याच्या आईसह.

दिवाणखान्यात मंडळी बसली होती. कांदा पोहे, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम संपला.

” प्रभाकरराव मुलांंनी स्वतःचं पुढाकार घेऊन जमवलंय. आमच्यासाठी काही कामचं ठेवलं नाही. फक्त अक्षंता टाकायच्या. आता पुढचं आपण ठरवाचंय. प्रितेश माझा धाकटा चिरंजीव. शेवटचं लग्न माझ्या घरातलं, त्यामुळे सगळी हौस मौज झाली पाहिजे. लक्षात येतंय ना तुमच्या. हुंडा वगैरे नको आम्हांला. पण आमचं घराणं, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं असं लग्न झालं पाहिजे. लग्नकार्य एखाद्या चांगल्या रिसाॅर्टमध्ये व्हावं. पाहुण्यांची बडदास्त राखली जावी. त्यांचा योग्य तो मानपान झाला पाहिजे. माझी अनेक शुभचिंतक, हितचिंतक मंडळीही राहिल. त्यांच्याही स्मरणात हे लग्न राहावं म्हणून त्यांनाही सुंदरशी भेट द्यावी. त्यांचे लाखमोलाचे आशीर्वाद वधूवरांना मिळणार आहेत, त्यापुढे हा खर्च अगदीच नगण्य आहे, नाही काय? “

” होय प्रतापराव मी करीन ही सगळी व्यवस्था. मुलं खुश तर आपण खुश. “

” कसं बोललात, द्या टाळी ” म्हणत प्रतापराव गडगडाटी हसले.

” प्रभाकरराव, मुलांच्या खुशीसाठी करतोय आपण सगळं. मुलीला हळद लागणार, नवरी बनून जाधव घराण्याची सून होणार, ती कशी साजेशी हवी ना, लंकेची पार्वती थोडीच राहणार. म्हणून फार नाही हो फक्त 50 तोळे सोनं घाला मुलीच्या अंगावर, अर्थात ते तिचं स्त्रीधनचं राहणार आहे. जावई श्रीविष्णूचं रूप मानून तुम्ही कन्यादान करणार, मग त्याचा योग्य सन्मान वरदक्षिणा देऊन तुम्ही करणारच आहात यात मला तरी शंका वाटत नाही. “

” होय, करीन मी सगळं माझ्या लेकीच्या सुखासाठी “.

प्रभाकररावांनी जाणलं ही लालची मंडळी आहे. त्यांनी परत अलकाला समजावण्याचा प्रयत्न केला ” अलका विचार कर. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन बेटा. बाप आहे मी तुझा. तुझं कल्याण व्हावं, तू सुखी राहावीस हीच इच्छा आहे ग माझी. तुला जर काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही बेटा “. पण अलका ऐकायलाच तयार नव्हती. “बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर आणि स्त्री आयुष्यात एकचदा प्रेम करते. तुम्ही दुसरं चांगलं स्थळही शोधाल माझ्यासाठी, पण मी सुखी होऊ शकेन काय? उलट आम्हां तीन जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल. कोणीच सुखी होणार नाही बाबा. प्रितेश नाही तर कोणीच नाही. राहीन मी जन्मभर अविवाहित. नका काळजी करू तुम्ही. ” शेवटी लेकीच्या हट्टापुढे बाबांना झुकावच लागलं.

माझं शुभमंगल पार पडलं आणि मी जाधवांच्या उंबरठ्यावरील माप ओलांडले. बाबांनी लग्नात कसलीही कमतरता भासू दिली आहे. वरपक्षाकडून छोट्या मोठ्या बारीक सारीक मागण्या होत्याच, पण बाबांनी कसलीही कटकट न करता सहज पूर्ण केल्या. रूखवतात संसारोपयोगी भांडी कुंडी गोदरेजची कपाटे, सोफा सेट, दोन लाकडी दिवाण, झोपाळा सगळं सगळं दिलं. सांजोर्‍या, करंज्या, पाच प्रकारचे लाडू, शेव, चकली सगळं सोबतीला दिलं. माहेर सुटलं, मन हळवं झालं, निरोप देतांना बाबा डोळ्यातील अश्रू लपवू शकले नव्हते.

माझ्या सासरीही काही धार्मिक विधी पार पडले. कुलदेवता व विविध दर्शन ही पार पडले. आणि हनीमून साठी आम्ही निघालो. नैनितालच्या टाॅवर हाॅटेलमध्ये दहा दिवसांचं बुकिंग बाबांनीच करून दिलं होतं. नवजीवनाची मी रंगविलेली स्वप्न, प्रितेशच्या रुपात मनासारखा मिळालेला जोडीदार, नैनितालमधील सुखद गारवा देणारं वातावरण मला रोमांचित करीत होतं. ” काय ग अलका, थंडी वाजतेय काय? ” ” नाही तर ” ” मग अंग एवढं कसं शहारलंय. ” ” नैनितालचा गारवा तर जाणवणारचं ना “. ” हूमम, बातमे दम है, चल मग तुझा गारवा लगेच दूर करतो की म्हणत त्यानं मला बाहुपाशात ओढलं. ” ” अहो, काय हे. ” ” माझ्या बायकोशीच बोलतोय ना, जगावेगळं तर काही करत नाही आहे ना “. ” तसं नाही हो ” ” मग कसं ” ” मला बाई ” म्हणत माझी मान लज्जेने खाली गेली तशी माझी हनुवटी उचलत त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं, माझे डोळे नकळत बंद झाले आणि त्याक्षणी त्यानं माझं हलकसं चुंबन घेतलं “

नैनितालहून परतले. सासुबाईंच्या मैत्रिणी, काही नातलग नवीन सूनबाईला बघायला येतच होते. राजकारण्यांचं घर असल्याने कार्यकर्त्यांचा राबताही राहात होता. मी हळूहळू अंदाज घेत होते. प्रत्येकाचा स्वभाव जाणून घेत होते. नव्या नवलाईचे दिवस असल्याने घरातील सगळेही बरे वागत होते.

दिवाळी आली. मलाही माहेराची ओढ लागलेली. पहिला दिवाळीसण असल्याने बाबा जावयाला निमंत्रण द्यायला आले. मला व प्रितेशला कपडे, प्रितेशला सोन्याची अंगठी दिली. प्रितेशने लॅपटाॅपचीही मागणी केली. बाबांनी सव्वा लाखाचा लॅपटाॅप घेऊन दिला. हळू हळू माझ्या माहेराहून विविध वस्तूंची पैशांची मागणी होऊ लागली. नंतर हे प्रमाण वाढू लागलं तसा मी विरोध केला. मग माझा छळ होऊ लागला. ” हजारो मुली सांगून येत होत्या माझ्या मुलासाठी. पण प्रितेशचं प्रेम होतं म्हणे हिच्यावर. मुलाच्या सुखासाठी केला समझोता. पण दळभद्री निघाली. आमचंच नशीब फुटकं”. घरातून असे विविध टोमणे, माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार करणे, मी काही बोलली तर मारहाण करणे सुरु झाले. त्यात मला कडक डोहाळे लागलेले. पण माझ्या तब्येतीकडे सगळेच दुर्लक्ष करायचे, ज्याच्यावर माझं प्रेम होतं, लग्न करुन त्याच्या जीवनात आले तो प्रितेशही दुर्लक्ष करू लागला, माझं ऐकेनासा झाला. माहेरी ही सर्व वार्ता सांगितली तर बाबा म्हणाले मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी होतं. मी तुला न्यायला येतो. काळजी करु नकोस. अशा अवस्थेत मन शांत ठेव. बाळाच्या जन्मानंतर होईल सगळं ठीक.

अमेयचा जन्म झाला, आणि जणू त्रिभुवनाचं सुख माझ्या कुशीत आलं. मी माझं सारं दुःख, विवंचना विसरले. बाळाचं आगमन मला संजीवनीसमान होतं. माझ्या सासरी कळवलं. पण कोणी बाळाला बघण्यास आले नाही.

कामाच्या व्यापात जमत नाही म्हणाला प्रितेश. ” असं कोणतं काम आहे प्रितेश कि बाळाला तुम्ही भेटत नाही. ” ” बाळाला भेटण्यासाठी बाळ माझं तर पाहिजे ” ” काय बोलताय तुम्ही, असं बोलवतं तरी कसं ” आणि मला चक्कर आली. मोबाईल खाली पडला. आई धावत आली, तिने मला सावरले.

 

बाळ दोन महिन्यांचा झाल्यावर बाबांनी मला सासरी पोहचविले. घरातील लोकांच्या वागणुकीत खूप फरक पडला होता. पण बाळासाठी, संसार टिकविण्यासाठी मी सगळं सहन करीत होते. प्रितेश आता वारंवार माझ्या अंगावर हात उचलत होते. मारहाणीचे व्रण माझ्या शरीरावर उमटू लागले होते.

माझी नणंद शोभासाठी स्थळपाहणी सुरु होती. आणि एकाठिकाणी पसंतीही झाली. आता बैठक होणार होती देवाण घेवाणीची. त्यात नवपरिणित जोडीसाठी मुंबईत एक फ्लॅट पाहिला होता. चांगल्या लोकेशनमधील 3BHK फ्लॅटची किंमत तीन करोड होती.

कधी नव्हे त्या सासूबाई चांगलं बोलू लागल्या. ” किती वाळलीस ग. बरं नाही का? अमेय खूप त्रास देतो ना. उद्या जाऊ दवाखान्यात. शोभानेही गरमागरम उपमा आणला. ” आण वहिनी बाळाला दे माझ्याकडे. तू आधी नाश्ता करुन घे “

हळूच सासूबाईंनी माहेरचीही चौकशी केली. अलका, शोभा या घरची मुलगी, आपली जवाबदारी. तिला फ्लॅट घेऊन द्यायचाय आपल्याला. काही रक्कम कमी पडतेय. सव्वा ते दीड कोटी. तुझ्या बाबांना सांग तेवढी मदत करायला. शेवटी आपल्या घर परिवारासाठी तुझंही कर्तव्य आहे ना. ” पण मी यावेळी खमकी होती, स्पष्ट नकार दिला, ” कितीदा मदत करायची हो माझ्या माहेरच्या लोकांनी. माझ्या सुखासाठी आजवर भरपूर लुटलं त्यांनी तुमच्यावर. त्यांनी कमवायचं आणि तुम्हांलाच देत राहायचं काय? स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायचं काय त्यांनी”

” अरे देवा देवा, एवढं काय आणलंस ग तू माहेराहून कि त्यांना घरावर तुळशीपत्र ठेवावं लागलं. आम्ही काही कमवतचं नाही. तुझ्या माहेरच्या मेहेरबानीवरचं जगत आहोत नाही काय? तुझं माहेर तालेवार, आम्ही भिकारडे नव्हे काय? मग कशाला राहातेस या भिकारी लोकांमध्ये. जा की माहेरी. ” मी तशीच मुसमुसत राहिले. बाळ लहान, नवर्‍याचं बदललेलं वागणं, माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा, वारंवार मला होणारी मारहाण. कंटाळले मी या जीवनाला. नको हे जीवन, नको तो काचेच्या वाटेवरील संसार,. नको आईबाबांनाही त्रास, त्यांचं ऐकलं नाही मी, प्रेमात आंधळी झाले होते. पण ते प्रेम नव्हतं, तो एक सौदा होता. पाहिजे तेव्हा त्यांची मागणी पूर्ण करणारा. पण आता ही चूक मी सुधरवणार. माझ्यामुळेच घडतंय ना हे सगळं आणि जीवनभर घडतच राहणार, आईबाबांना त्रास देणारी मी पनवतीचं ठरणार. नाही, नाही, हे सगळं थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मी थांबवेन. बस झाला निर्णय. आजच याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लावीन गळफास, होईल थोडी तडफड, मग एकदम शांत शांत शांत.

(ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यातील कथानक व पात्रांशी कोणी व्यक्ती व संस्थेचे नामसाधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(निर्विवाद सत्यकथा आहे.)

“अरे बाबा लक्षात आहे ना? माझे दोनशे रुपये बाकी आहेत तुझ्याकडे. ” कुणीतरी कानात बोलले महेशच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो. घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी महेशच्या जवळचा. पण नेमका कुणाचा ते महेशच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती.

कुणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कुणाकडून घेतले, जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कुणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे दोनशे रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.

अचानक लकलकले डोक्यात त्याच्या. गुरूचरण.. हो गुरूचरणच तो. त्याचा कॉलेजमधला लास्ट इयरचा रूम पार्टनर. एक्झाम फी भरायला नेमके दोनशे रुपये कमी पडत होते. मुदतीचा शेवटचा दिवस. कामाचे पैसे पण मिळाले नव्हते. वरखाली झाला महेशचा जीव. अन देवासारखा धावून आला गूरू.

खरेतर तीस वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर पैसे आले पण गुरूचरण काही कामासाठी गावी गेला होता. इथे महेशची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेलवर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. गुरूचरणला महेशने पत्र ही लिहिले की रिझल्टच्या दिवशी भेटू, तुझे पैसे देतो तेव्हाच. पण त्या दिवशीही गुरू आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की तो गावीही नाही आता. नाईलाजाने महेश पैसे घेऊन परत आला.

एकदम भरून आले महेशला. ऐन वेळेस पैसे मिळाले नसते तर वर्ष वाया गेले असते त्याचे आणि तो चक्क विसरूनच गेला गुरूला. मग आठवले त्याला नुकत्याच फॉर्म केलेल्या त्याच्या कॉलेजच्या व्हाॅटसअप ग्रुपवर विषय झाला होता गुरूचा. तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितले कुणीतरी, नंतरही काहीच माहिती मिळाली नाही गुरुबद्दल.

सकाळ होताच महेशने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कुणालाच माहित नव्हते गुरुबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा. गाव त्याचे चांगलेच लक्षात होते पत्र व्यवहारामुळे.. कॉलेजमध्ये असताना केलेला. पत्ता आता आठवत नव्हता. पण कुणालातरी विचारता येईल, खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल तरी किती वाढणार.?

सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा मृणाललाही आश्चर्य वाटले.. असे अचानक?

महेश गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरी ही त्याने गुरूचरणचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले. एकजण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? गुरूचरणकडे येणारे अनेक असावेत?

घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा टच दिलेला होता टाईल्स वगैरे बसवून. महेश गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणि पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर गुरूचरण झोपलेला होता. महेशला कळलेच नाही आधी. तसे ही गुरूला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काच बसला.

अगदी बारीक झालेली शरीरयष्टी. बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या. गालफडं आत गेलेली. त्याने हाक मारली.. “गुरूचरण ऽऽऽ,.. गुरू…. “

गुरूचरणने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला. “महेश ऽऽ…… तू कसा आलास? ” त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किलीने विचारले.

“तुझे दोनशे रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो. “

“कुठले दोनशे….? “

मग महेशने त्याला आठवण करून दिली कितीतरी वर्षांपूर्वीची आणि शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.

त्याला आठवले.. पण त्यासाठी एवढ्या दूर..? गुरूने खूप वेळ महेशचा हात हातात धरून ठेवला. जुनी मैत्री आठवत आसवे गाळत.

रात्र झाल्यामुळे गुरूचरणच्या मुलाने महेशला निघूच दिले नाही आणि गुरूचरणनेही. जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपतांना गुरूच्या मुलाने सांगितले सारे.

गुरूचरणच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्टअटॅकने. वडिलांचे क्रियाकर्म होत नाही तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून त्याच्या ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला. पर्मनंट झाला. तिथेच सेटल झाला.

सगळे काही सुरळीत चालू असतांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधं उपचारासाठी भरपूर मदत दिली पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर गावी जाऊनच मरू हा निश्चय करून गुरू पुन्हा गावी आला आणि आता मृत्यूची वाट पाहत आहे.

दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने महेशला झोप लागली तरी स्वप्नात त्याच्या बरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याश्या गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. गुरूचरण रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता. त्याच्या हातात मात्र अजूनही काल महेशने दिलेले दोनशे रुपये होते.

गुरूचा अंत्यविधी करून खिशातल्या जितक्या नोटा होत्या त्या गुरूच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन महेश घरी परतला. किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो ह्याचे समाधान घेऊन.

खूप दिवस झाले आणि अगदी अचानक एका सकाळी गुरूचरणचा मुलगा महेशच्या घरी आला. काहीश्या आश्चर्याने आणि आनंदाने महेशने त्याचे स्वागत केले. नाश्तापाणी होताच मुलाने विषय काढला. “वडिलांचे वर्षश्राद्ध आहे पंधरा दिवसांनी. तुम्हाला तेच सांगायला आलो काका. आणखी एक.. ” मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.

“हे काय….? “

“तुम्ही निघतांना मला दिलेले पैसे… आठ हजार सातशे. “

“अरे पण ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही. आणि तुला एकदम मोजून ठेवायला कुणी सांगितले? “

“पप्पांनीं….. “

“म्हणजे ऽऽऽऽ…? “

गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात, तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम ही त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते. ते म्हणाले ‘ वर्षाच्या आत परत कर बाळा. ‘

थरथरत्या हाताने महेशने पैसे घेतले. तेवढ्यात त्याच्या मुलाने एक भारीपैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहीश्या आश्चर्याने त्याने विचारले. “हे कशासाठी? का हेही गूरूनेच द्यायला सांगितले? “

“हो. पप्पा म्हणाले, पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणि रिकाम्या हाताने गेला. तेव्हा….. “

गुरूचरणचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला. आणि हा त्या शर्टपीसवर हात फिरवत निशब्द. हे खरेच असते का काही… गुरूने स्वप्नात येऊन आठवण देणे. मरण्याआधीची भेट… अन आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे.

मृत्यूनंतर स्वप्नात येणे महेशने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे, याला काय म्हणता येईल….? त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्कवितर्क वगैरेच्या पलीकडील असतात.

महेशने कॅलेंडरवर गुरूच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो. जावेच लागणार होते त्याला.

– एक सत्यकथा 

लेखक – अनामिक

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे

नर्स रूबी नेहमीप्रमाणे हॅास्पिटलच्या इमर्जन्सी रूम (ER) मध्ये येऊन पोहोचली. गेली तीस वर्षं तिनं त्या हॅास्पिटलच्या इमर्जन्सी वॅार्डात मनुष्य स्वभावाचे हजारो नमुने बघितले होते. खरच पेशंट प्राण पणाला लावून झगडत असतो. त्याचा संघर्ष बघताना ती नेहमीच कासावीस होत असे. अनेकांशी रक्तापलीकडचं नातं जुळले होते.

तिला जाणवत असे.. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असलेले जीव किती शुध्द असतात.. समाजात वावरताना घातलेले मुखवटे, अहंकार, द्वेष, ईर्षा सारं काही गळून पडतं! अशा जीवाचं दर्शन तिला नेहमी परमात्म्याजवळ नेत असे.

तिच्या ॲाफिसमधील कॅाफी मेकर भुस्स भुस्स आवाज करून कराफे मध्ये कॅाफी ओतत होता. कोलंबियन कॅाफीचा तो हवाहवासा वास तिनं श्वासात भरून घेतला. खुंटीवरचा एप्रन घातला व जेमतेम दोन घोट पोटात गेले असतील नसतील तेवढ्यात तिचा पेजर खणखणला..

“रूबी, रिपोर्ट टू रूम नंबर १० प्लीज..

रिपोर्ट टू रूम नंबर १०”

तो परिचित मेसेज बघून ती कॅाफी तिथेच ठेऊन ती रूम नंबर १० कडे धावली.

“गुड मॉर्निंग आजोबा! कसे आहात? ” तिच्या परिचित आवाजाने आजोबांच्या चेहऱ्यावर हसू झळकलं..

“सुखाने घरी बसलो होतो मिस रूबी, पण तुला फार मिस केलं म्हणून भेटायला आलोय. ” साधारण ऐंशीला पोचलेले आजोबा कसेबसे हसले. १०३ ताप, उलट्या व सतत लागलेल्या धापेमुळे ते दमून गेले होते.

डॅाक्टर साठे हसऱ्या चेहऱ्याने आत आले पण आजोबांचा चार्ट बघताच त्यांचं हास्य लुप्त झालं. त्यांनी पटकन काही टेस्ट करायला सांगितल्या. आजोबांचा आजार त्यांना माहित होता. तातडीने ॲापरेशन करण्याची वेळ आली होती.

ॲापरेशन झालं. आजोबा जगले पण त्यांना वेदना सोसत नव्हत्या. ऐंशी वर्षाचं शरीर प्राप्त व्याधीशी झगडून गलितगात्र होऊन गेलं होतं.. त्यापेक्षा गेले असते तर सुटले असते हा विचार रूबीनं डॅाक्टरना बोलून दाखवला.. आजोबांचे हाल बघून तिच्या पोटात तुटत असे..

तिथून बाहेर पडताच ती डॅा साठेना म्हणाली, ” सर, कधी काळी मी जर अशा एखाद्या आजाराने ग्रासलेली असेन तर मला अजिबात जगवू नका.. अशा पेशंटला वाचवून आपण त्याचे हालच करतो.. किती सहन करायचं त्या जीवाने? ही चूक माझ्या बाबतीत करू नका..

साठ्यांहून वीस वर्षाने मोठ्या असलेल्या रूबीकडे साठे पहात राहिले.. या चर्चेची त्यांना सवय होती.

“टेक इट ईझी, रूबी. एवढी पेशंटमधे गुंतत जाऊ नको. ” एवढं बोलून ते पुढच्या पेशंटकडे गेले.

आजोबा त्यानंतर सहा वर्षं जगले.. असेच विव्हळत, रडत-खडत, कसेबसे.. अनेक औषधाच्या साईड इफेक्टमुळे बेजार होऊन दुखणं परवडलं पण हे साईड इफेक्टस नकोत म्हणत.. पण जगण्याची इच्छा मात्र चिरतरुण होती..

रूबी सारं जवळून बघत होती.. तिला आश्चर्य वाटायचं.. हे पेशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत? शरीर आपलं आपण नैसर्गिकरित्या जे ठरवेल ते नक्कीच जीवाला कमी वेदना देणारं असेल.. तो मृत्यू सोपा असतो असे डॅा साठे मेडिकल स्टुडंटसनाही शिकवतात पण या भयानक प्रोसिजर चालूच राहतात.. याला जगणं आणि जगवणं म्हणायचं?

रूबीनं आपला शेवट कसा असावा हे स्वत:च्या विल मध्ये लिहून ठेवलं होतं..

“मी आजारी पडले तर माझे कोणतेही ॲापरेशन करू नका. ज्या उपचारामुळे माझी पंचेद्रिय निकामी होतील असे कोणतेही उपचार माझ्यावर करू नका. मला शेवटपर्यंत बोलायचं आहे, देवाचं रूप बघत जायचं आहे, मोगऱ्याचा वास घ्यायचा आहे.. हे जमणार नसेल तर मला वाचवू नका. ”

आता रूबी पंचाहत्तर वर्षाची झाली होती.. एक दिवस चक्कर येऊन पडली म्हणून तिला त्याच ER ला आणण्यात आलं.

“रूबी, काय पराक्रम करून आली आहेस? ” डॅा साठे वातावरण हलके फुलके करायला बघत होते. त्यांनी चष्मा नीट केला.. तिचे रिपोर्ट बघून ते जरासे खाकरले..

“रूबी, ॲापरेशन करून तुझ्या आतड्याचा काही भाग काढून टाकायला हवा.. तुझी इच्छा मला माहित आहे. ॲापरेशन कोणत्याही परिस्थितीत करायचे नाही हे तू लेखी दिले आहेस.. तर या परिस्थितीत तुला किती दिवस मिळतील सांगता येत नाही.. few weeks may be.. ”डॅाक्टर तिच्या नजरेला नजर देणं टाळत होते..

आता रूबीची खरी परीक्षा होती.. ॲापरेशन करून घ्यायचं का नाही? रिकव्हरी सोपी नव्हती. ॲापरेशन यशस्वी होण्याची शक्यता केवळ १५-२०% होती..

रूबीनं डॅाक्टरांकडे बघितलं. अशा गोष्टी डॅाक्टर जेव्हा बेडवर पडलेल्या पेशंटला सांगत असत तेव्हा ती डॅाक्टरांच्या

बाजूला उभी असायची..

पेशंट गडबडून गेलेला असे..

एखादं दिवस विचार करून तो करा जे करायचं ते सांगत असे.. पेशंट बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास त्याची मुलं बाळं “काही करून वाचवा” म्हणत..

आज ती त्या बेडवर होती..

शेजारी उभी नव्हती..

तिच्या डोळ्यात आशा एकवटून आल्या होत्या.. समोर तिला तिची मुलं दिसत होती.. वर्षाचं नातवंड चालायचा प्रयत्न करत होतं.. नवरा.. तो आपल्याशिवाय काही करू शकत नाही.. साधी कॅाफी करता येत नाही त्याला.. अंगणातील जाई जुई शेवंती एकटी पडेल आणि तिचा आवडता कुत्रा टायगर.. त्याला कोण समजावणार..

ती डॅाक्टरांकडे बघत बोलली..

“सर, करा ॲापरेशन. १५-२०% तरी सक्सेस मिळण्याची शक्यता आहे ना?

मला जगायचं आहे!

जी लागेल ती ट्रिटमेंट मला द्या.. ते विल फाडून टाका माझं..

मला जगायचं आहे सर..

I want to live..

I really want to live..

I really really want to live..

डॅा. साठे रूम मधून बाहेर आले. डोळ्यातलं पाणी पुसतं त्यांनी परत एकदा जीवाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते ते अनुभवले..

एकेक अवयव निकामी होतो..

वेदना सहन होत नाहीत..

यापेक्षा गेलं तर बरं वरवर म्हणतात पण.. अजून काय करता येईल विचारणारे सिरिअस पेशंट्स..

कितीही त्रास झाला तरी त्यांची जगण्याची इच्छा कधीच मरत नाही..

“मला जगायचंय” या तत्वावर उभं असलेलं जग.. त्यातील माणूस, प्राणी, किडा, मुंगी सारे जगण्यासाठी धडपडत असतात..

ही केवळ जैविक प्रेरणा नसते..

जीवांच्या गाभ्यातून उसळणारी शक्ती असते..

अस्तित्वाच्या गुढतेतून आलेली..

आत्म्याच्या अमरत्वातून निर्मिलेली..

गाभ्यातून जळणाऱ्या दीपांनं प्रखर केलेली..

म्हणून तर जग चालू आहे..

आजवर काही पेशंटना नैसर्गिकरित्या मरू द्यावं म्हणणारी रूबी जेव्हा स्वत: पेशंट झाली तेव्हा विल मध्ये लिहलेले सारे काही गळून पडले होते..

पाण्यातील मासा, झोप घेतो कैसा।

जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे ॥

आतून एकच आवाज येत होता..

“मला जगायचंय”

“I want to LIVE! ”

.. सर, आज मला कळलय.. टर्मिनल इलनेस असला तरी पेंशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत..

कारण everyone wants to LIVE!

डॅाक्टर साठ्यांनी ॲापरेशनचे पेपर लगेच पुढे पाठवले.. आत येऊन त्यांनी रूबीची सही घेतली..

“Ruby, will try our best! ”

ॲापरेशनचा सक्सेस रेट ते परत परत शोधू लागले..

(सत्य घटनेवर आधारित) 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज सुदैवाने तो कामावरून लवकरच घरी आला होता. चांगलंच झालं, गणपती तोंडावर आले होते, घरी तयारीला मदत झाली असती.

तो आला, बायको बाहेर जायच्याच तयारीत होती, “अहो, बरं झालं आलात. येता का दोन मिनिटं माझ्याबरोबर? गौरीचे खडे मिळतात का बघू या. “

त्याची आई – तिची सासू हा संवाद ऐकत होती.

तिच्या नजरेसमोर पंचवीस तीस वर्षांपूर्वीची नव्या नवलाईची सून – ती स्वतःच उभी राहिली. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला नदीवर जायचं, आणि तेव्हाच नदीपात्रातून निवडून सात गोल गुळगुळीत खडे घेऊन यायचे. तोंडात पाण्याचा घोट घ्यायचा, आणि घरी येईपर्यंत एक अक्षरही बोलायचं नाही. मग त्या गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरींना सगळं घर फिरवून दाखवायचं, हळदकुंकवाची पावलं घरभर फिरवायची, आरास करायची, सगळंसगळं कसं झर्रकन नजरेसमोर उभं राहिलं.

पण पुढे नवऱ्याच्या निधनानंतर ही शहरात मुलाकडे आली, इथं कुठली नदी आणि कुठले खडे!

सून चांगली होती, कुळधर्म निगुतीने सांभाळायची. श्रावण भाद्रपद आला की तिचा खडेगौरीसाठीच्या खड्यांच्या शोध सुरू व्हायचा. पण यावेळी या ना त्या कारणाने राहूनच गेलं होतं.

आणि आता गौरी अगदी आठवड्यावर आल्या होत्या. म्हणून तिची धावपळ सुरू होती.

तो आल्यापावली परत फिरला. खेळाची मैदानं, इमारतींची बांधकामं, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कडेला मांडलेले बांधकाम साहित्याचे ढिगारे – सगळं धुंडाळून झालं.

हल्ली बहुधा वाळू चाळूनच आणत असावेत, किंवा सरळ दगडाच्या कपच्याच वापरत असावेत.

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून हवी तशी गोल गरगरीत खडी मिळतच नव्हती.

देवीच्या देवळाशेजारी बागेशी जरा बघावं म्हणून हे दोघं त्या दिशेने वळले, गुरुजींनी पाहिलं, म्हणाले, “खडेगौरी का शोधत आहात? नका घेऊ रे बाबांनो इथून. कुत्रीच काय पण माणसंदेखील लघवी करतात हो इथं निर्लज्जासारखे. ” 

त्यांचं हे वाक्य ऐकून तिथं शोधाशोध करायची इच्छा मरूनच गेली दोघांचीही.

हताश होऊन रित्या हाताने दोघेही परतले.

पण आईचा चेहरा थोडा प्रफुल्लीत होता. “अरे, तुम्ही एक काम करा, ” ती उत्साहाने सांगू लागली, “आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तिनं गाडगीळांकडून चक्क चांदीचे खडे आणले आहेत. फक्त त्यांचं विसर्जन करायचं नाही, बरं का! ” नर्म विनोद करत तिनं वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.

लेक आणि सून पु ना गाडगीळांच्या पेढीवर चांदीचे खडे घ्यायला निघाले. तिथे त्यांना जेम्सच्या गोळीच्या आकाराचा चांदीचा भरीव खडा दाखवला गेला. ४०-५० ग्रॅमच्या त्या एका खड्याची किंमत तब्बल ६, ००० रुपये म्हटल्यावर याचे तर डोळेच फिरले. अहो, सात खडे घ्यायचे होते ना!

“कमी किंमतीत आहेत का हो? ” यानं विचारलं. त्यावर साधारण त्या भरीव खड्याच्याच आकाराची पण पोकळ असा एक सोंगटीसारखा खडा त्याला दाखवला, तो होता ६०० रुपयांना. म्हणजे असे सात खडे ४, ००० रुपयांच्यावर पडणार होते.

महाग तर होतेच शिवाय त्यांचा तो सारीपाट खेळण्याच्या सोंगटीसारखा आकार काही तिला खडेगौर म्हणून रुचलाच नाही. यावेळी बहुधा पहिल्यांदाच गाडगीळांच्या दुकानातून ही दोघं रिकाम्या हाताने माघारी फिरले.

लगेहाथ वन ग्रॅम ज्वेलरीची दुकानं पालथी घालून झाली, वैशंपायनांचा सोनचाफा, आष्टेकर, सोनिगरा, रांका – सगळे ज्वेलर झाले. पण सगळीकडे नन्नाचाच पाढा.

हिरमुसले होऊन हे दोघं आपल्या सोसायटीत परतले, बिल्डिंगच्या दारात रखवालदाराला त्याने ही सगळी रामकहाणी सांगितली.

तो तोंडांत माव्याचा तोबरा भरून बसला होता. भूतदया दृष्टीने त्याने त्या मुखरसाला त्यागले, त्यामुळे मुक्त कंठाने ज्ञानरस वाटायला तो आणि त्याचा गळा मोकळा झाला होता. “बहुतही आसान है. आप ऐसा क्यो नहीं करते? आप अमेजॉन या फिलीपकार्टपर जाव, और पेबल्स मंगाव ना. सफेद, कलरवाला सब चॉईस रहता है उधर. वो फिशटँक में डालने के लिये या ऐसेच डेकोरेशन के लिये मंगाते है ना लोग. और १०० रुपयेमे काम हो जायेगा. ” त्याने आकाशवाणी केली आणि नव्या दमाने तो पुन्हा मौनात गेला.

नदीवरून गौरीचे खडे आणणाऱ्या आईच्या सुनेची वाटचाल आता अशी ऑनलाईन रंगीत खड्यांपर्यंत होणार आहे हा प्रवास त्याला काही झेपला नाही, आणि सुन्न होऊन तो तिथेच मटकन खाली बसला.

“अगर ये आप नहीं करनेवाले, तो फिर सिर्फ उपरवालाही आपकी मदद कर सकता है. ” रखवालदार.

त्याचं हे वाक्य ऐकू अचानक तिचा चेहरा उजळला, “बाई, बाई, बाई! कशी मी अशी वेंधळी? अगदी काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाली माझी. अहो, चला, हा म्हणतो आहे ना, उपरवाला मदद करेगा, अगदी बरोबर आहे हे. चला, चला, पहिल्या मजल्यावरच्या ओसवालांच्या घरी चला, ” तिने उत्साहात फर्मावलं.

“अगं, ते शेजारच्या इमारतीत भाड्याने रहात आहेत सध्या, त्यांच्याकडे renovation चं काम चाललं आहे ना. भिंती फोडल्या आहेत, नवीन बांधणार आहेत. पार लाद्यासुद्धा बदलून काढत आहेत ते, ” तो म्हणाला, आणि बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की भिंती, लाद्या बदलत आहेत म्हणजे सिमेंट रेती खडी आलीच की.

तोही नव्या दमानं तिला सामील झाला.

ते ओसवालांच्या घरी गेले, तिथल्या बांधकाम साहित्यात तिला चटदिशी तिला हवे तसे गोल गरगरीत खडे मिळाले.

तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिच्या खडेगौरीच्या शोधाची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली होती.

पर्समधून पाण्याची बाटली घेऊन ती घोटभर पाणी प्यायली, नवरोबा काहीतरी तिला विचारत होता, पण ती मुग्धच राहिली.

आता खडेगौरी सोबत होत्या ना, आता वरच्या मजल्यावर, घरी पोचेस्तोवर ती मौनातच राहणार होती.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares