मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शुक्रवारची सवाष्ण… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ शुक्रवारची सवाष्ण… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

जाग आली तरी सकाळ झाल्यासारखं वाटतच नव्हतं. काळ्याभोर ढगांनी आज सूर्यकिरणांना वसुंधरेपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, असा बहुधा पण केला होता..

रात्रभर एका लयीत बरसणारी संततधार अजूनही तशीच होती..

अशा सर्दकुंद वातावरणात आजिबात उठावसं वाटत नव्हतं..

रजईत स्वत:ला लपेटून दिवसभर तिच्या उबेत पडून रहाता आलं असतं तर मी स्वत:ला सा-या दुनियेतली भाग्यवान समजलं असतं!

पण रोजची कामं थोडीच टाळता येतात..?

मनाविरुद्धच उठले नि कामाला लागले. सकाळची आन्हिकं, चहापाणी, लेकीची शाळेची तयारी, तिचा डबा या धावपळीत वेळ कसा पळून गेला, ते कळलच नाही..

यजमान त्यांच्या कामाला नि लेक शाळेला गेली तशी पायाची चाकं आपोआप विसावली..

घड्याळाकडे नजर गेली. अकरा वाजून गेले होते.. दहाच्या काट्याला हजर होणारी शिल्पा आज अजूनही आली नव्हती.. अर्धा तास उशीर होणार असला तरी फोन करून कळवणा-या शिल्पाकडून तास उलटून गेला तरी काही निरोप नव्हता..

” काय झालं असेल? पावसामुळं उशीर झाला असेल का? की आज बुट्टी मारणार असेल?

नाही, पण न सांगता बुट्टी मारणा-यातली ती नाही.. तिच्यासारखं वर्ककल्चर आजपर्यंत कुणाचं पाहिलं नाही.. “

डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं..

शिल्पा….

माझ्याकडं गेली चार वर्षे केर-फरशी करणारी.. तीस-बत्तीशीची.. फार तर चार फुट दहा-अकरा इंच उंची.. शेलाटा बांधा.. थोडक्यात लहान चण.. काळ्याच्या जवळ जाणारा वर्ण.. तारुण्यातल्या पिटिकांनी आपल्या अस्तित्वाच्या खुणा अजुनही चेह-यावर ठेवलेल्या..

काळेभोर दाट केस.. गुंडाळून मोठ्या पिनेत बांधलेले.. सुळसुळीत साडी.. लाल, निळ्या, पिवळ्या.. अशा कुठल्यातरी डार्क नि फ्रेश रंगातली.. स्वस्तातली, पण स्वच्छ.. चापून चोपून पिना लावून नेसलेली..

खोटच पण छान दिसणारं मंगळसूत्र.. खोटं खड्याचं कानातलं.. हातात दोन प्लास्टिकच्या नि दोन काचेच्या बांगड्या.. चेह-याला ” खारा शेंगदाणा ” करून सोडणारी.. घरचा कारखाना आहे की काय असं वाटायला लावणारी भरघोस पावडर…. ती घरात आली की सा-या घराला सुगंधित करून टाकणारी… नि कपाळावर टिकली..

– – तिची कथा सा-या कामवाल्यांसारखीच..

वडील व्यसनी.. आईनं हॉस्पिटलात धरलेलं काम.. हिला शाळेत घातलेलं.. पण शिक्षणाशी हिचं न जमलेलं.. गाडी कशीबशी सहावीपर्यंत पोहोचून बंद पडली.. आईनं चार घरची काम लावून दिली.. त्यात ही खूश..

…. अठराव्या वर्षी लग्न.. पाठोपाठ झालेले दोन मुलगे.. हिच्या नि त्याच्या वडिलांची परंपरा चालवणारा दारूडा नवरा.. कधीतरी लहर आली तर कामावर जाणारा.. इतरवेळी हिच्यावर पुरुषी हक्क गाजवणारा..

जेमतेम तीन माणसं झोपू शकतील एवढी भाड्याची पत्र्याची खोली… घर नावाची.. ते घर चालवायची जबाबदारी हिचीच.. कारण नव-याच्या मते हिनं पोरांना जन्म दिलेला..

.. थोरला मुलगा पायानं थोडासा अधू नि धाकट्या मुलाच्या हृदयात छिद्र..

तिच्याकडे पाहून वाटायचं….

देव एखाद्याच्या मागे असा का लागतो..?

या जगाच्या रणभुमीवर पाठवताना रित्या हातांनी का पाठवतो..?

रूप, पैसा, बुद्धिमत्ता, चांगलं नशीब.. कुठलेच शस्त्र हाती नसताना हिनं ही आयुष्याची लढाई लढायची कशी..?

मला असं वाटत असलं तरी तिला तसं वाटत नसावं..

तिच्यासाठी तिचे दोन हात नि पाय हीच शस्त्रे होती..

तिने आणखी चार घरची कामे धरली..

खरंतर ती महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना घालू शकली असती.. पण तिने त्यांना चांगल्या शाळेत घातलं.. पोरं बिघडू नयेत म्हणून तिनं चांगल्या वस्तीत घर घेतलं.. जास्त भाड्याचं नि अजूनच लहान..

…. घरात व्यसनी नवरा असतानाही पोरं बिघडू नयेत म्हणून घर बदलणा-या हिचं मला कौतुक वाटायचं..!!

पोरांना तिनं ट्यूशन लावलेली.. त्यांना सगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवण्याचा हिचा हट्ट.. पोरंही आईच्या कष्टाचं चीज करणारी..

” वहिनी, अमोल मंथन परीक्षेत दुसरा आला बघा.. ” म्हणत ती माझ्या हातावर पेढा ठेवायची तेंव्हा तिचे नि माझे डोळे भरलेले असायचे..!!

मी तिच्या हातात पोराला बक्षीस म्हणून पाकीट ठेवायचे..

” वहिनी, हे कशाला.. फक्त आशीर्वाद द्या माझ्या पोरांना.. त्यांनी खूप शिकून मोठं व्हावं एवढीच देवाकडं मागणी आहे.. ” म्हणत ती डोळे पुसायची!!

” आता काही शिल्पा येत नाहीत ” म्हणत मी केरसुणी घेतली नि घर झाडायला सुरुवात करणार एवढ्यात दार वाजलं..

” शिल्पा असेल का? “.. नाही.. ती तर दारातूनच जोरानं हाक मारते..

” मग कोण असेल? “..

दार उघडलं..

दारात तीच उभी … ओळखूही न येणारी.. केस विस्कटलेले.. साडी आदलेदिवशीचीच.. चुरगळलेली..

तिने अंघोळ केली नाहीये हे सहज दिसत होतं.. डोळे सुजलेले.. चेहरा सुजलेला.. चेह-यावर जखमा, हातावर लाल वण.. डोळ्याखाली काळं-निळं….

” अगं शिल्पा.. काय झालं, अशी का दिसतेयस? “.. मी दारातच न राहवून विचारलं..

ती उत्तर न देताच आत आली. फरशीवरच बसली नि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.. मी काही न बोलता शेजारच्या खुर्चीवर बसले.

” वहिनी, बाईच्या जन्माला येणं, हे पाप असतं काय हो? माझा नवरा काही करत नाही, पैसे कमवत नाही.. मी सगळं मान्य केलंय. दिवसभर राबून पैसे मिळवते, घर चालवते, मुलांचं करते. माजा पेदाड नवरा रोज दारू पितो, घरी येऊन भांडण करतो.. मारतो.. तरी मी सहन करते. पण काल हद्द झाली. नवरा घरी येताना एका बाईला घेऊन आला. तिचं नि याचं लफडं आहे म्हणे.. तिला घरात ठेवायचं म्हणत होता..

…. मग मात्रं मी भांडले.. मला असं अंगभर मारलं त्यानं.. तेंव्हा मात्रं मला सहन झालं नाही..

सरळ कोप-यातली काठी उचलली नि त्याच्या पाठीत घातली.. ती बाई मधे आली.. तिलाही चार दणके दिले..

नि दोघांना घराबाहेर काढलं.. घराला कुलूप घातलं नि पोरांना घेऊन आईकडं आले..

सकाळी पोलीसस्टेशनला तक्रार नोंदवून आलेय..

घरभाडं मी भरतीय.. नव-याला आता फिरकू द्यायची नाही.. त्याला काडीमोड देऊन टाकते..!!

त्वेषानं ती उठली नि केरसुणी घेऊन कामाला लागली..

दुर्गेच्या रूपातील तिला मी प्रथमच पहात होते..

काम झाल्यावर मी दिलेली चहा-बिस्कीटं खाऊन ती तरातरा निघून गेली…

दुसरा दिवस उजाडला..

श्रावणी शुक्रवार..

पुरण घातलं.. देवीला-लेकीला पुरणानं औक्षण केलं..

पुरणा-वरणाचा स्वयंपाक झाला..

…. “नवरा असणं” या पात्रतेवर एखाद्या महिलेला जेवायला बोलवायचं… नि “नवरा वारला” किंवा ” नव-यापासून दूर राहते “… म्हणून एखादीला टाळायचं.. हे माझ्या पटण्यापलीकडचं… म्हणून 

” सवाष्णजेवण “… माझ्याकडे न होणारं…!!

आज लवकरच लेक नि नवरा घराबाहेर पडले..

” वहिनी “…

रोजच्यासारखी शिल्पाची हाक..

तिला पाहून मी थबकलेच…

जरीची लालबुंद साडी.. केसात शेवंती-अबोलीचा मोठा गजरा.. गळ्यात खोटचं पण मोठं गळ्यातलं..

कानात मोठे झुबे.. हातभर बांगड्या नि दोन्ही हातांना लालचुटुक रंगलेली मेंदी… चेह-यावर भरपूर पावडर नि त्यातून डोकावणारं नेहमीसारखं मोठं हास्य.. कपाळावर मोठी लालबुंद टिकली..

…. कालचं ते नि आजचं हे रूप..

माझं डोकच बधीर झालेलं..

” वहिनी, आज लग्नाचा वाढदिवस माझ्या.. “

” अगं पण काल तुझ्या नव-यानं तुला मारलं, दुसरी बाई घेऊन आला.. तू त्याला काडीमोड देणार म्हणालीस.. आणि आज लग्नाचा वाढदिवस म्हणून एवढी सजून आलीस? नवरा परत आला वाटतं? “

” नाही हो वहिनी… नव-यापाशी मी काय आता नांदत नाही. पण म्हणून मी आजचा दिवस दु:खात का घालवू.. याच दिवशी माझं लग्न झालं.. नवरा बेकार निघाला म्हणून काय झालं.. या दिवसामुळं मला माझी दोन पोरं.. माझे काळजाचे तुकडे मिळाले.. मला जगण्याचं कारण मिळालं.. नाहीतर माझ्या जगण्याला काय अर्थ होता? म्हणून हा दिवस मी दरवर्षी साजरा करते.. आणि पुढेही करणार.. चांगलं धरायचं नि वाईट सोडून द्यायचं.. एवढच कळतं बघा मला.. “

हे ऐकून मी थक्क झाले..

” सकारात्मक कसं जगावं “.. असली कुठलीही पुस्तकं काय ” सकारात्मकता ” हा शब्दही न ऐकलेल्या हिला हे एवढं मोठं तत्त्वज्ञान कुणी शिकवलं?

– – आणि डोक्यातली ट्यूबलाईट पेटली..

देवानं हिला रित्या हातांनी नि रित्या नशीबाने पाठवलं असा माझा देवावर आरोप होता..

 तिला परमेश्वराकडून मिळालेला हा ” सकारात्मक” तेचा खजिना मला आज दिसला.. जो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोलाचा होता..

” आज माझ्याकडे शुक्रवारची.. जिवतीची सवाष्ण म्हणून जेवशील? “…

नवरा नसतानाही पोटच्या अंकुरांना सर्वस्व मानून त्यांच्यासाठी आपलं आयुष्य आनंदाने झिजवणा-या या ” सवाष्णीला ” माझ्या मुखातून त्या ” जिवती ” नंच जेवणाचं आमंत्रण दिलं असावं…!!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भयभीत… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भयभीत… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सुश्री गिरिमा घारेखान

(मागील भागात आपण पाहिले – वैदेहीने बटाट्याचे छोटे छोटे काप करत म्हंटलं. ‘‘ओह गॉड ! किती सुंदर आहे. तुझ्यासारखाच गोरा. गोलमटोल. हात-पाय हलवतोय. वाटलं, त्याला उचलून घ्यावं!’

‘मग असं मूल कोण सोडून गेलं असेल?’ विराजलाही आता बातमीत रुची निर्माण होऊ लागली होती.) आता इथून पुढे….

‘कुणास ठाऊक? त्याच्या आईने कसं धाडस केलं असेल? त्याचा बाप सापडला पाहिजे. तुम्हा पुरुषांचा जुलूम काय कमी असतो?’ वैदेही तेलात कढिलिंब टाकत म्हणाली.

‘पण आशा तर्‍हेने मुलाला सोडून जाण्यामुळे काय बाप पकडला जाईल?’ विराज म्हणाला, पण त्याचा आवाज कापत होता. चेहर्‍यावरील भाव वैदेहीच्या नजरेस पडू नयेत,

म्हणून तो स्वैपाकघराच्या बाहेर आला. वैदेही दोघांच्या नाश्त्याच्या प्लेटस घेऊन बाहेर आली.

विराजला आज बटाटे पोहे चांगले लागले नाहीत पण त्याने खाल्ले नसते, तर वैदेहीचा हजार प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं, म्हणून मग तो एकेक चमचा पोहे तोंडात घालू लागला.

श्री राजेंद्र निगम

वैदेही तर खाता खाताही बोलत होती.

‘विराज, तो नक्कीच पकडला जाईल. त्या मुलापाशी ठेवलेल्या थैलीत, दुधाच्या पावडरचा डबा, दूध पाजायची बाटली आणि एक चिठ्ठीही आहे. ‘

‘चिठ्ठी’ विराजने तोंडात घातलेले पोहे बाहेर येऊ लागले.

‘ चिठ्ठीत लिहलय, की या मुलाचा बाप याच सोसायतीत रहातो. उद्यापर्यंत त्याने या मुलाला नाही नेलं, तर त्याची आई पोलिसात तक्रार करेल आणि खटला भरून त्याची बदनामी करेल. पण जर कुणी आजच पोलिसांकडे तक्रार केली, आणि त्या बाळाला पोलिसांच्या हवाली केलं, तर ती या सोसायटीच्या मधे उभी राहून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करेल. ‘

‘ओह गॉड!’ विराज नाश्ता खाली ठेवून उभा राहिला. ‘आता उद्या काय होईल, ते होईल. मी तर ऑफिसमध्ये असेन….!‘ विराज स्वत:शीच म्हणाला.

वैदेहीला उभं राहता राहता एकदम आठवण झाली, ‘ बाबांनी काही महत्वाची कागदपत्रे कुरियर केली आहेत. उद्यापर्यंत कुरियर यायला हवे. उद्या तू वर्क फ्रॉम होम करशील?’ ती म्हणाली.

विराजने काही उत्तर दिले नाही. तो बाथरूममध्ये घुसला.

‘वर्क फ्राम होम’पासूनच ही झंझट सुरू झाली होती. त्यावेळी काही कारणाने विराज घरून काम करत होता. त्यांची कामवाली सकाळीच काम करून निघून जायची. वैदेही बोलबोलता बोलून गेली, ‘आता साहेब घरूनच काम करणार आहेत. ’ म्हणून मग गावाकडून आलेली तिची धाकटी बहीण पन्नाला ती दुपारचं काम करण्यासाठी पाठवू लागली.

: पन्ना सुंदर होती. चंचल होती. गावाकडून शहरात आल्याने सवाई शहरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. कॉँप्यूटरवर काम करणार्‍या या साहेबांसमोर वटवट करायला तिला खूप आवडे. साहेब काय करताहेत, ते बघण्यासाठी ती त्यांच्या खुर्चीच्या अगदी जवळ जाऊन उभी राही. मग ती कॉँप्यूटरच्या अगदी जवळ आपला चेहरा आणी. मग एक दिवस कॉँप्यूटर एका बाजूलाच राहिला. दुसरीच खिडकी उघडली. यात विराजची कुठलीच जबरदस्ती नव्हती. उलट असं वाटत होतं की पन्नाच जणू समर्पित होण्यासाठी आली आहे आणि एक दिवस खरोखरच पन्नाने जबरदस्ती केली.

एका रविवारी संध्याकाळी वैदेही भाजी आणायला गेली होती. त्यावेळी पन्ना तिथे आली आणि धमकावणीच्या सुरात म्हणाली,

‘सा’ब, म्हारा पेट में थारु छोरो है, इसका क्या करना है ?’

विराज घाबरला. असं काही होईल, याचा त्याने विचारही केला नव्हता. त्यानंतर पन्नाने आपले मोठे मोठे डोळे आणखीनच मोठे करत आणि आपले हात त्याच्यापुढे पसरत म्हंटलं, ‘तू असं समजू नकोस, की मी अडाणी आहे. मला सगळं माहीत आहे. टाकीन त्याला तुझ्या घरी. अजून तरी मी माझ्या बहिणीला तुमचं नाव सांगितलेलं नाही. दोन दिवसांनंतर येईन. पाच लाख रुपये तयार ठेवा…. नाही तर… ’

विराटच्या लक्षात आलं, हिचा ‘बोलवता धनी’ कुणी वेगळाच आहे. तो काहीसा घाबरला. पण कुठल्या तरी खेडवळ मुलीने त्याला मूर्ख बनवून अशा तर्‍हेने पाच लाख रुपये

मागितले, तर काय द्यायचे? या सगळ्या घडलेल्या घटनेत त्याचा दोष काहीच नव्हता. ती मुलगीच गळ्यात पडली होती आणि ते मूलही याचंच असेल, यावर विश्वास तरी कसा

ठेवायचा? तिच्या पोटात मूल असेल, हे तरी खरं कसं मानायचं? केवळ धमकी देऊन पैसे लुबाडायला बघतेय.

विराटने ‘कर जा तुला काय करायचं असेल ते’, असं म्हणून तिला पळवून लावलं, पण आता हे संकट खरोखरच दरवाजाशी येऊन ठेपलं. आता गावाकडची माणसेसुद्धा खूप हुशार झालीत. तिने आणि तिच्या साथीदाराने जे शक्य होतं, ते केलं. आता?

विराटला आता त्याचं प्रमोशन आणि नोकरी हातातून निसटताना दिसली. वैदेही आणि सगळे नातेवाईक आणि त्याचे मित्र त्याच्यावर थू…. थू… करताना दिसू लागले. वैदेहीच्या

वडलांची करोडोंची संपत्ती हवेत उडताना दिसू लागली. याच्या तोंडातून पुन्हा पोहे बाहेर पडले. तो बेसीनपाशी पळाला.

***

सौमिल आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीचा दरवाजा कधीच उघडत नसे. त्याच्या खालीच कचरापेटी होती. त्याचा दुर्गंध बाल्कनीपर्यंत पोचायचा. त्याचे आई-वडील एकदा त्याचं घर

बघायला तिथे आले होते. तेव्हा, आईला काही ते घर आवडलं नाही, पण बाबा म्हणाले, ‘सगळ्या परिस्थितीशी तडजोड करता आली पाहिजे. जीआरई क्लिअर करून तो यूएसला जाईल, तेव्हा तिथे एकाच फ्लॅट मधे तीन-चार जणांना एकत्र राहावं लागतं. वडील डॉक्टर आहेत आणि आई शाळेत प्रिंसिपल आहे, तर त्यालाही काही तरी करून दाखवायला हवं ना! संघर्षाशिवाय काहीच हाती लागत नाही. ’

‘हो. मला खात्री आहे, सौमिल आपला नावलौकिक वाढवेल. ’ सौमिलच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली. सौमिलदेखील मन लावून जीआरईची तयारी करत होता. त्याच्या क्लाससाठीच तो या शहरात आला होता. दोन दिवसांवर परीक्षा आली होती, म्हणून तो अभ्यासासाठी लवकर उठला होता.

आज मागच्या बाजूच्या बाजूने खूपच गडबड ऐकू येत होती. वाटत होतं, सगळी सोसायटी तिथे जमा झालीय. सौमिललाही राहवलं नाही. त्याने बाल्कनीचा दरवाजा उघडून

नजर खाली फिरवली. त्यांचा वॉचमन एका लहान बाळाला घेऊन उभा होता. खालच्या मावशी म्हणत होत्या, ‘आजच्या दिवस तूच लक्ष ठेव. गरज लागली, तर आम्हाला बोलाव.

बघूयात त्या नालायकाच्या हृदयात राम जागतो का ते?’

दुसरी काकू म्हणाली, ‘आमच्या घरासमोर कुणी अभागिनीने अग्निस्नान केलं तर आम्हाला पाप लागेल. आजच्या दिवस सांभाळ त्याला!’

वॉचमन बाळाला घेऊन निघून गेला. पण बायकांच्या तिथे चाललेल्या चर्चेवरून सौमिलला सगळी गोष्ट कळली. त्याने बाल्कनीचा दरवाजा बंद केला आणि तो आत आला.

कॉफी बनवली. घेतली आणि पुस्तक हातात घेतलं, पण त्यात छापलेल्या काळ्या अक्षरांच्या जागी त्याला लीनाचे अश्रूभरले काळे डोळेच दिसू लागले. सौमिलने तिला खूप समजावलं होतं, ‘एकदा चूक झाली, पण तीच धरून बसून कसं चालेल? चूक सुधारून पुढे जाऊयात. ’ त्याने तिला व्यावहारिक बनायला सांगितलं.

‘जीआरई क्लिअर करून मी अमेरिकेला जाईन. या वेळी लग्न करून मी काय इतक्या लहान वयात बाप बनू? मग माझ्या करियरचं काय? चल. उद्याच कुठल्या तरी चांगल्या

गायनॅकला भेटू’ पण लीना काही हे सगळं समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती प्रेमाचंच गीत आळवत होती.

‘तुझ्या करियरसाठी मी काय माझ्या मुलाला मारून टाकू? मला वडील नसतील, पण माझ्या आईचं मला पूर्ण सहकार्य आहे. ती म्हणते, ’ तू तुझ्या बाळाला जन्म दे, मग आपण

त्याच्या बापाचं नाव उजेडात आणू. बघुयातच लग्न कसं करत नाही ते! ते डॉक्टर आणि प्रिन्सिपलही आपल्या मुलाचा पराक्रम बघू देत. ’

अशा प्रकारे ते लोक त्याला उघडं पाडणार होते.

सौमिल विचार करत राहिला. दिवसभरात तो आजिबात अभ्यास करू शकला नाही.

***

दुसर्‍या दिवशी सोसायटीत गरमागरम बातमी पसरली.

वॉचमनने रात्री त्या बाळाला आपल्या केबिनमध्ये झोपवले होते आणि तो बाहेर खुर्चीवर बसला होता. तो रात्री बाथरूमला गेला, तेवढ्या वेळात कुणी तरी येऊन त्या बाळाला

घेऊन गेले. सोसायतीतल्या सगळ्याच बायकांना अतिशय दु:ख झाले. हां. एक वॉचमन तेवढा खूश होता. एका बाळाला अनाथाश्रमात सोडून येण्यासाठी भली मोठी रक्कम, —- — तीही तीन तीन लोकांनी द्यावी?

— समाप्त — 

मूळ गुजराती कथा – फफडाट 

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान, मो. 8980205909.

हिंदी अनुवाद : भयभीत अनुवादक राजेन्द्र निगम, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भयभीत… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भयभीत… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

डोअर बेलचा आवाज आला आणि संतोष गाढ झोपेतून उठला.

दर शनिवारपणे कालही त्याला घरी यायला उशीर झाला होता. उद्या रविवार. आरामात झोपेन, असा विचार करून, तो निवांतपणे झोपला होता. पण एवढ्यात कुणी तरी याला उठवलं होतं.

सुश्री गिरिमा घारेखान

संतोषने घड्याळ पाहीलं. साडे सात वाजले होते. खूप काही लवकर उठावं लागलं नव्हतं. आत्ता कोण आलं असेल? आणि रंजना का दार उघडत नाहीये?

‘उघडेल रंजना दार’, असा विचार करत तो काही वेळ तसाच पडून राहिला. डोअर बेलचा आवाज चालूच राहिला आणि रंजना येण्याची काही चिन्हे दिसेनात. मग त्याने विचार केला, कदाचित बाथरूममध्ये असेल. त्यामुळे संतोषला उठावच लागलं. खिन्न स्वरात त्याने विचारलं, ‘कोण आहे?’ त्याने दरवाजा उघडला, तर समोर रंजनाच होती.

श्री राजेंद्र निगम

‘तू आत्ता यावेळी कुठे जाऊन आलीस? आणि किल्ली घेऊन का गेली नाहीस? तुला माहीत आहे ना, मी रविवारी उशिरा उठतो. ’ तो रंजनाला फटकारत म्हणाला.

आशा परिस्थितीत नेहमी टोमणे मारणारी रंजना… पण यावेळी त्याच्या संतापाचा काहीही परिणाम झाला नाही. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळ्याच प्रकारची उत्तेजना होती.

‘झोप… झोप… काय करतोस? आता मी जे बोलतेय, ते ऐकलस, की तुझी सगळी झोप छूमंतर होऊन जाईल…

‘असं काय झालय?’

रंजनाचा या वेळचा मूड संतोषला काही वेगळ्याच प्रकाराचा वाटला.

घरात ती दोघेच फक्त होती, पण ती इतक्या हळू आवाजात पुटपुटत होती, की जशी काही ती त्याच्या कानातच सांगते आहे.

‘अरे, आपल्या सोसायटीच्या कचरापेटीच्या जवळ कुणी तरी लहान मुलाला दुपट्यात गुंडाळून ठेवलय. किती सुंदर बाळ आहे. तुझ्यासारखेच मोठे मोठे डोळे, गोरा रंग आणि बाळसेदार शरीर. आपला रजत जेव्हा छोटा होता ना, तेव्हा जसा दिसायचा ना, तसाच दिसतोय अगदी. ‘

संतोष डोळे विस्फारून ऐकत होता.

असा मुलगा कोण सोडून गेलं असेल?…. ती?……

त्याच्या पोटात गुरगुरू लागलं. डोक्यात महिन्यांचा हिशेब होऊ लागला. कानात त्याची सेक्रेटरी पूर्वी चावडाचे शब्द गुणगुणू लागले, ‘संतोषसर, आपण मला धोका दिलात. पत्नीला घटस्फोट देऊन आपण माझ्याशी लग्न कराल, असं मला आश्वासनाचं गाजर दाखवून, आपण मला वापरत राहिलात आणि आता म्हणताय, हे शक्य नाही. ऑफिस सुटल्यावर जादा कामाच्या निमित्ताने आपण मला थांबवून घेत होतात. त्यावेळी आपल्या इज्जतीला डाग लागत नव्हता. आता समाज आणि इज्जतीच्या गोष्टी करताय.

आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून कोरा चेक काढून संतोषने तिच्यापुढे ठेवला.

‘घे! लाख… दोन लाख… किती पसे पाहिजेत तुला? तू स्वत: तेवढी रक्कम यात भर.

 पूर्वीने त्याच्या जवळचा चेक ओढून घेतला आणि त्याचे तुकडे तुकडे करून हवेत उधळून टाकले.

‘मला जर पैसेच हवे असते, तर वेळोवेळी मी तुझ्याकडून मोठमोठ्या रकमा उकळल्या असत्या. पण ही पूर्वी चावड़ा काही बाजारबसवी बाई नाही. तू मला ओळखलं नाहीस. मी हे मूल पाडून टाकणार नाही. त्याला जन्माला घालून तुझ्या डोक्यावर आणून बसवीन. बघू, त्याला कसा ठेवून घेत नाहीस ते!’

तिचं हे रूप पाहून संतोष काहीसा घाबरला. तरीही रुबाब दाखवत त्याने शेवटचा प्रयत्न केला, ‘जा. जा. काय करशील? मूल काय कपाळावर बापाचं नाव लिहून घेऊन जन्माला येणार आहे?’ 

पूर्वी तिरस्कारपूर्वक हसली. मग एकेका शब्दावर जोर देत म्हणाली, ‘डीएनए अशी काही टेस्ट असते, माहीत आहे नं? त्या टेस्टमध्ये तू बाप शाबीत होशील. मग कपाळावर नाव लिहिण्याची गरज उरणार नाही. ’ 

त्याच्या पोटात गडबडल्यासारखं झालं. त्याने आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला. ज्या कुशलतेने पूर्वी तो तिला पटवायचा, तसाच हावभाव करत तो तिच्याजवळ गेला मधात घोळवलेल्या आवाजाने म्हणाला, ‘ अजूनही उशीर झालेला नाही. कशाला आपलं दोघांचंही जीवन बरबाद करतेस? मी तुझ्यासाठी चांगल्यातला चांगला डॉक्टर शोधतो. करून टाक अ‍ॅबॉर्शन!’ मग संतोष तिच्या खांद्यावर हात ठेवू लागला. पण तिचं डोकं आधीपासूनच फिरलेलं होतं.

‘खबरदार, मला हात लावलास तर! तुझ्या घराबाहेर ठेवून जाईन. मग सांभाळा आपला पिंड. ’

संतापाने लाली-लाल झालेली पूर्वी तिथून निघून गेली.

मग काय ते मूल पूर्वीने ठेवले असेल?

संतोष भयभीत झाला. कुठे आणि कसे फसलो आपण? त्याला वाटू लागलं. पण लगेचच त्याच्या मनात दुसरा विचार आला, ‘आशा तर्‍हेने ठेवल्यावर आपण त्याला सभाळू असं कसं वाटलं तिला? मूर्ख कुठली! ‘

‘कसला विचार करताय?’ रंजनाच्या बोलण्याने त्याची तंद्री तुटली.

‘अं… नाही… नाही… काही नाही… मी विचार करतोय, त्या मुलाचं काय होणार? पोलिसांना फोन केला?’

‘अरे, त्याच्या आईने सगळा विचार करूनच त्याला इथे ठेवले असेल ना ! असं झालं की आपला वॉचमन…. ’

संतोषला वाटलं, त्याच्या पोटात काल घेतलेली व्हिस्की अजूनही फिरते आहे. त्याला घराबाहेर पोलीस उभे असलले दिसले. घर सोडून जाणारी रंजना दिसली. तिरस्काराने बघत जाणारा रजत दिसला. त्याला वाटलं आपण रंजनासमोर फार काळ उभं राहू शकणार नाही. ‘मी आंघोळ करून येतो’ असं म्हणत तो अशा घाईने बाथरूममध्ये घुसला, जसा काही सगळ्या गोष्टी आंघोळ करताना पाण्याबरोबर वाहवून टाकील. रंजनाला वाटलं, सगळं सांगून झाल्याशिवाय तिला स्वस्थता लाभणार नाही. बाथरूमच्या बाहेर उभं राहून तिने बाकीच्या गोष्टी सांगितल्या. उधाणलेल्या मनाला थंड करण्यासाठी संतोष शरीरावर थंड पाणी घालत राहिला.

 ***

विराजचं वर्तमानपत्र वाचून झालं, पण अजूनही वैदेहीचा ‘नाश्ता तयार आहे. ये लवकर, ‘ असा आवाज ऐकू आला नाही, म्हणून तो उठला आणि स्वैपाकघरात गेला. वैदेही तिथे नव्हती. बाथरूममध्येही नव्हती. रविवारी सकाळी सकाळी ही कुठे गेली असेल? आठवडाभराच्या भाज्या आणायला तर संध्याकाळी जाते. मग?

 विराज बेचैन होऊन विचार करू लागला. त्याला भूक लागली होती आणि स्वैपाकघरात फक्त भिजवलेले पोहे दिसत होते. वैदेहीचा मोबाईलही ओट्यावर दिसत होता. ‘कुणाचा फोन आला असेल, म्हणून ती सगळं टाकून तशीच पळत गेली. ’ विराजला काहीच कळलं नाही.

बाल्कनीमध्ये जाऊन खाली बघण्याचा विराज विचार करत होता, एवढ्यात वैदेही आली. विराजची भुकेची व्याकुळता त्याच्या शब्दातून प्रगट होत होती. ‘अशा तर्‍हेने न सांगता कुठे गेली होतीस? दरवाजाही उघडा होता. ’

‘तू आंघोळीला गेला होतास आणि बातमीच अशी होती, की ती ऐकताच मी धावतच सुटले. ’ वैदेहीच्या बोलण्यात एक प्रकारची उत्तेजना होती.

‘पण बातमी काय होती? आणि बायकांच्या असल्या गावगप्पात तुला कधीपासून रस वाटू लागला की तू अगदी धावत-पळत गेलीस?’

विराजला अजूनही आश्चर्य वाटत होतं.

‘गावगप्पा नाहीत विराज ही हकीकत आहे. आपल्या सोसायटीच्या कचरापेटीजवळ एक लहान बाळ पडलय. ’ वैदेहीने बटाट्याचे छोटे छोटे काप करत म्हंटलं. ‘‘ओह गॉड ! किती सुंदर आहे. तुझ्यासारखाच गोरा. गोलमटोल. हात-पाय हलवतोय. वाटलं, त्याला उचलून घ्यावं!’ 

‘मग असं मूल कोण सोडून गेलं असेल?’ विराजलाही आता बातमीत रुची निर्माण होऊ लागली होती.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ गुजराती कथा – फफडाट 

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान, मो. 8980205909.

हिंदी अनुवाद : भयभीत अनुवादक राजेन्द्र निगम, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Life is a game of chess. You cannot undo the moves but you can make the next move better.”•••

काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमी प्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच, •••••

काय झाले? बर वाटत नाहीये का?? की आॅफिसचे टेंशन?? ••••

अजय म्हणाला, •••• तसं काही नाही ग. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मला पण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय. या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलण होत. तेही आई बरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना. कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, आॅफिसचे टेंशन, त्यांना पण कधी ‘बरं वाटतं नाहिये ‘असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे. त्यांनी कसे मॅनेज केले असेल??? . माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडिल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. •••

अग, आई नेहमीच महत्वाची पण बाबांना का विसरलो मी??? . •••••

आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनी पण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतः ला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थिती च्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली. ••••

‘ बाबा म्हणजे पाठीचा कणा. ‘ म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का?? पण मी त्यांना का समजू शकलो नाही.??? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. ••••

मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचना पण दिल्या होत्या. आई म्हणाली होती, •••”अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात. ” •••

आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलून तरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. ••••

किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या कडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काही ही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात. ••••

आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा. तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहान सहान इच्छा पूर्ण करायच्या. त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून‌ येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ. •••••

यावेळेस अजय अनिताचा ‘ India Visit Plan ‘ ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्या बद्दल काय वाटतं?? तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता. ••••

बरोबर आहे, •••••

” Your best teacher is your last mistake. ” 

म्हणतात ना, ••••

” रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।”••••••

येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत. ••••

आई. बाबांना म्हणाली, ••••• 

यावेळेस आपण आपल्या कडून काही सांगायचे नाही, •••काही काम सांगायची नाही. •••याला भेटा, •• त्यांना फोन करा ••असं काही म्हणायचे नाही. •• एकतर मुलांना वेळ कमी असतो. ••त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. •• खरेदी असते, •• ‘ वैशाली ‘ मधे सर्व मित्र जमतात, •• धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो??? . आॅफिसचे काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते. ••••

आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल, ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय नंतर ही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का?? ••••

असे आईने ठरवूनच ठेवले. •••

आई बाबांना म्हणाली, ••••अहो, तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. , नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्ट वर जायला टॅक्सी व नंतर ही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले. ••••

आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली. ••••

यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे?? या विचारात आई होतीच, तेंव्हा बाबा म्हणाले, •••• अगं! काही ‘ fixed deposit ‘ आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे. काही प्रश्न नाही. आई ने अगदी दोन पाकिट तयार करूनच ठेवली. ••••

दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा ‘ माइंडसेट ‘मात्र वेगळाच होता. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. •• शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिता शी ओळख करून दिली. ••• छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका काकूंना भेटून आले. •••आई बाबांना जेथे एकटं जाण जमतं नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. ••• अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. ••• अजयने बाबांसाठी T shirts आणले. •• जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली. ••••

आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. •••

यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आई चे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती. ••••

अजय बाबांना त्यांच्या नोकरी बद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता?? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते.??? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. •••

कुठे तरी अजयला समाधान मिळत होत. बाबा पण खूप खुश होते. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाचे अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते. ••••

लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. ” थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा” ••••

खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का?? द्यायचे?? घ्यायचे?? बोलायचे?? याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पूढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. ••••

म्हणतात ना, ••••

” Life is a game of chess. You cannot undo the moves but you can play the next move better. ” •••

” इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो. ” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघे… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दोघे… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“ अग पाणी देतेस का? आणि चहा पण टाक, ”.. पेपरमधलं डोकं बाहेर काढत विनयरावांनी ऑर्डर सोडली खरी आणि आपले कान स्वयंपाक घराच्या दिशेला टवकारले,..

नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे तिकडून सिक्सर आलाच,.. “ तुमच्या हातांना काय मेहंदी लागली आहे का?? मी कामात आहे,.. मलाच तुम्ही केला तर चहा मिळेल, ”.. बायकोच्या या वाक्यावर मिश्किल हसत विनयराव आत गेले,.. गाणं गुणगुणत चहाच आधण चढलं,.. हाताने पाणी घेऊन ते पिताना ते म्हणाले, “ठाऊक होतेच आम्हास आपण नेहमीप्रमाणे आमच्याच हातचा चहा पिणार,.. “.. बायको काही बोलणार तेवढ्यात कामवाली रमा आत आली. अगदी जुनी कामवाली,..

 विनयरावांच्या मागेपुढेच लग्न झालेलं असेल,.. पलीकडच्या कासार गल्लीतल्या कमलीची सुन,.. त्याकाळातही चांगलं शिक्षण असुन परिस्थितीमुळे गरिबाशी लग्न झालं,.. लग्न झाल्याबरोबर कमलीने सोबत कामावर लावली. मागे कमली वारली,.. ही पण खरंतर थकली आहे पण एवढं काम पोटासाठी रेटतेच,.. तिला पाहताच विनयरावने चहाचे आधण वाढवलं,.. आधी रमा उशिरा यायची तो पर्यंत हा गप्पांचा चहा दोघांमधला होऊन गेलेला असायचा. पण कालपासून रमाने सांगितले होते ‘सुन बाळंतीण झाली आहे,… मी जरा लवकर येईल कामावर, ’.. चहा उकळल्यावर बायकोने तो ओतला. रमाला मागच्या अंगणात हाक मारुन कप दिला आणि विनयराव आणि ते बसले मस्त झोपाळ्यावर,.. चहा सोबत गप्पा, हास्य मध्येच रागावणं आणि चिडणं आणि परत हास्याची खसखस सुरू होती. पण ह्यात एकदोन वेळा विनयराव यांना जाणवत होतं की मागच्या अंगणातले डोळे चोरून डोकावत आहेत,.. असं आता नेहमीच होत होतं. बागेत काम करणारे डोळे, कान ह्यांच्या गप्पात डोकावत होते,..

 काही महिने गेले आणि एक दिवस बायको अर्ध्यावर्ती डाव सोडून गेली,.. रमा अजूनही कामाला येतच होती,.. तीच वेळ.. विनयराव चहाचं आधण ठेवतच होते,.. तेवढ्यात रमा आली,.. विनयरावांनी आधण वाढवलं,.. चहाचा कप रमाला दिला,.. ती मागच्या दारात बसणार तेंव्हा विनयराव म्हणाले, “इथेच बैस मलाही सोबत वाटेल,.. सोबतीचा चहा पिण्याची सवय झाली आहे ग.. ” रमा अंग आखडून बसली,.. काहीतरी बोलावं म्हणून विनयराव म्हणाले, “रमा इतकी वर्ष तू ह्या घरात काम करतेस पण ह्या काही महिन्यात मला जाणवत होतं कि आम्ही हा चहा घ्यायला बसलो की तू चोरून आम्हाला बघत होतीस ऐकत होती,…. मला आश्चर्य वाटत होतं की एवढी वर्ष झाले तू बघतेसच आम्हाला, मग असं चोरून डोकावून का बघायचीस ग? ? “ 

रमा एकदम चपापली,.. म्हणाली “ खर सांगु तुम्हाला पटणार नाही,.. अग सांग जे खरं आहे “ ते विनयराव म्हणाले,….

रमा म्हणाली, ” मला खुप आवडत होतं तुमचा हा चहा घेताना चालणारा संवाद,.. कुठलंही नातं न ठेवता फक्त निसर्गाने दिलेल्या भुमिका स्त्री आणि पुरुष ह्यांच्या.. मनाचे पैलू एकमेकांना दाखवत चालणाऱ्या गप्पा,…. त्यात इतर कुठल्याही नातेवाईकांचा उल्लेख नाही, राग, द्वेष नाही. फक्त जगताना येत असलेल्या अनुभवांची चर्चा.. त्यातुन सकारात्मक मुद्दा धरून त्याचे होणारे फायदे एकमेकांना सांगणं,.. मग ते जगण्यात आणण्यासाठी असणारी धडपड,… बाईंना एवढा आजार होऊन त्यातून त्या सहज बाहेर आल्या तुमच्या ह्या अश्या जगण्यामुळे,.. मी काम करताना सगळं कानावर पडायचं,.. माझ्याही विचारांना चालना मिळत गेली,.. मला आवडायचं नात्याच्या पलीकडे जाऊन होणारी माणसातली दोघांची भूमिका तुम्ही जगायचे,.. माणसातील माणूसपण जगवण्यासाठी इतर माणसातील चांगलं वेचून त्यावर चर्चा करून ते अंगीकारत होते,.. म्हणुन मग चोरून, डोकावून मी ही साठवू पाहात होते त्या विचारांना स्वतःत,.. बस एवढंच.. “

 विनयराव हसले,.. म्हणाले रमा,.. ” भौतिक सुखांच्या पलीकडे असलेलं हे माणुसकीच जग हरवायला नको म्हणुन तिचा माझा चाललेला हा अभ्यास आहे,.. ह्यावर मोठं पुस्तक लेखन सुरू आहे, पण ती गेली अर्ध्यात सोडून. नियतीला तस मान्य असेल,… असो पण तुला एक विनंती करतो तसा चहा आपण दोघे घेत जाऊ. परत चर्चा.. मालक नोकर ही चाकोरी सोडून माणुस म्हणुन घडू देऊ. काही निष्कर्ष लागतील हाती ती कदाचित त्या पुस्तकाला पूर्ण करतील. बस तेवढं तिचं स्वप्न पूर्ण होईल त्या पुस्तकाचे नाव असेल.. “दोघे… “

रमालाही आनंद वाटला,.. तिने होकार दर्शवला आणि विनयरावांना जाणवलं फोटोतुन बायको हसली म्हणाली, ” हम्म चांगलं केलंत. संवाद साधत काहीतरी शोधत रहा. तिच्याही अनुभवातून माणुसकीची नवी नवी गणितं नक्कीच सापडतील,…. ”

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेचैनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बेचैनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?

‘काय तरी करावे असे वाटते. ’ अजयने फोन ठेवला.) – इथून पुढे —

एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरविले. सासू आणि मालती पण सोबत होत्याच.. अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला.. मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैय्याकडे गेली.. तिने चार शेवपुरी बांधून घेतली, इतक्यात तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या मुलाकडे गेलं.. ती दोन मूल.. अंगात धड कपडे नाहीत.. केसाला कित्येक दिवस तेल नाही.. तिच्याकडे काही तरी मागत होती.. मालतीला गलबलून आलं.. काय ही गरिबी.. तिने झटकन हातातील शेवपुरीची पूडी त्या मुलांना दिली. तिने भैय्याला पुन्हा ऑर्डर दिली. ती घेऊन जाताना ती पहात होती… ती दोन मुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती.. तिच्या डोळ्यात समाधान होत.

तिची सासू आणि जाऊ सर्व पहात होत्या.. तिने त्या भिकारी मुलांना ती पूडी दिल्याचे त्याना आवडले नव्हते.

‘अशाने भिकारी कमी होत नाहीत.. वाढतात.. काम न करता खायला मिळाले ना.. मग काम कशाला करायला हवे?

‘ती करतील हो.. करतील… गरिबी हा त्त्यांचा दोष नाही.. समाजाचा आहे.. समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे.. आहे त्याना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला आहे.. आणि नाही त्याना.. तिला अनुजा आठवली.. धक्के खात रोज नालासोपारा.. मग st.. मग चालत.. पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास..

मालतीला रात्रभर झोप आली नाही.. पार्कमधील ती दोन पोरे.. त्त्यांचे आसूसलेले डोळे, तिचा पिच्छा पुरवत होते. आज या मुलांना आपण शेवपुरी दिली पण उदया कोण देणार? बहुतेक लोक आपल्या सासुसारखे त्याना हिंदीसफिडीस करणार.. मग काय करतील ती मुले..

दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला तेंव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला.. पण त्या आधीच त्याच्या आईने तो सांगितला होता. अजय म्हणाला –‘अशी दरी आहेच, पण आपण काय करू शकतो.. अशा किती मुलांना आपण जेऊखाऊ घालू शकतो..

तिने फोन ठेवला.

त्यान्च्या घरात सरस्वती बरीच वर्षे कामाला येत होती.. मालती लग्न होऊन आली, त्या दिवसापासून सरस्वती होती.. घरातील भांडी.. लादी.. कपडे.. तीच करायची. अचानक ती यायची बंद झाली. तिचा नंबर लक्ष्मीकडे होता.. ती रोज फोन करायची पण कुणीच उचलायचा नाही.. घरातली कामे करायची सवय नसल्याने पंचाईत झाली.. पण मालतीने तिची कामे केली. पण तिच्याही मनात येत होते.. सरस्वती यायची बंद झालीच पण फोन पण बंद? तिने लक्ष्मीला तिच्या घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोचली… ते दारिद्र्य.. ती उघडी गटारे.. नागडी पोर.. डुकरे घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट… दारू, जुगार.. नशिले पदार्थ.. भडक कपडे घातलेल्या मुली.. सगळीकडे नुसती घाण.. मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमांत पाहिली होती. तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती.. नागीण नावाच्या आजाराने तिला घेरले होते. पाठीपासून छातीपर्यत नागीण पसरली होती.. मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला केइएम हॉस्पिटलमध्ये पोचवले..

सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली.. कशी राहतात ही माणसे? यांना कसे बाहेर काढता येईल या घाणीतून? काय करावे?

अनेक प्रश्न तिला पडत होते.

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या सरस्वतीची ती चौकशी करत होती.. उपचारानी सरस्वती बरी होत होती.

.. तीन महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खूष झाली.. तिच्या विचाराचा आदर करणारा घरात तिच्या हक्काचा माणूस अजय होता.

ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली. अजयला पण तीच कौतुक होत.. लहानपणापासून श्रीमंतीत राहून सुद्धा तिला गरिबाबद्दल दया वाटतं होती.. जगातील दारिद्र कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते.. पण सुरवात कशी करावी हे कळत नव्हते.

अजयने तिला एक म्यॅगेझीन आणून दिले.. त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलासाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता.. त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती. ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरना भेटली.. त्त्यांचे काम पाहिले.. ती प्रभावित झाले. ती डॉक्टरना म्हणाली..

‘तुमच्यासारखें मलाही काम करायचे आहे.. सुरवात कुठून करू?

“तुम्ही ओळखता अशा एखाद्या दरिद्री कुटुंबापासून सुरवात करा.. त्या कुटुंबाला आधार द्या.. मुलांना सुशिक्षित करा..

मालती विचार करत राहिली.. कुठून सुरवात करू? अचानक तिच्या डोळयांसमोर सरस्वतीची झोपडी आली.. त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुली आणि तिची दोन मुले होती.. सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती. ती सरस्वतीच्या घरी गेली.. सरस्वतीच्या मुलीची दोन मुले अजून शाळेत जात नव्हती.. आजूबाजूला अशीच आणखी बारा मुले होती. तिने अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या चवदा मुलांना दादरच्या शाळेत प्रवेश घातले. सरस्वती सून घरात बसुन होती तशीच आजूबाजूला सहा मुली घरात रिकाम्या होत्या. कुर्ल्याच्या गारमेंट कंपनीत या मुलींना नोकरी मिळवून दिली..

ही बातमी कळताच अजून स्त्रिया तिला भेटायला आल्या.. त्या सर्वाना तिने हॉस्पिटल, मॉल, कुरिअर सेवा, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या भागात आता तिच्या शब्दाला किमत आली.

अजय कौतुकाने सर्व पहात होता.. मालती खूष होती.. पुण्याचे डॉक्टरपण फोन करून चौकशी करत होते.

मालतीचा व्याप वाढला.. मग संध्या, मीना तिच्या मदतीला आल्या.. काही कार्पोरेट्स कडून मदत मिळू लागली. पेपर मधून मुलाखती येऊ लागल्या. मुलाखतीत ती म्हणाली “मी बेचैन स्त्री आहे.. मी अस्वस्थ असते.. मला पैसे दागिने यात समाधान नव्हते.. समाजातील बरीच लोक दारिद्यात आहेत, त्या सर्वाना आपण बाहेर काढू शकत नाही.. पण निदान काहीजणांना. पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.. प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे. भीक मागून नव्हे..

खुप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेत होती.. अजय गमतीने म्हणाला “मालू.. झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठविलेस..

पण आता आपण आपल्या मुलाचा विचार करूया का..

त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली “, , होय.. आता विचार करूयाच..

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेचैनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बेचैनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि चार महिन्यात अजयला तीन महिन्यासाठी सिंगापूरला जावे लागले. अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले पण तीन महिन्यात तो परत मुंबईला येणार होता. मालती नोकरी करत नव्हती पण या मोठया फ्लॅटमध्ये तिची सासू विदयाताई, दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी.. त्त्यांचा मुलगा अनिकेत एकत्र राहत होती. प्रभादेवीसारख्या उच्चभू वस्तीत तीनबेडरूमचा प्लॅट.. प्रत्येक बेडरूमला ग्यालरी.. उंची फार्निचर, उत्तम किचन.. पार्किंगलॉट मध्ये दोन मोठया गाड्या.. ड्रायव्हर इत्यादी. अजित एका मल्टिनॅशनल औषध कंपनीत प्रॉडक्टमॅनेजर आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर अकाटंट.. त्यान्च्या वडिलांची पण CA फर्म होती.. तीच विराज सांभाळत होता. त्याची पत्नी लक्ष्मी पण श्रीमंत कुटुंबातील आणि मालती पण एका इनकमटॅक्स ऑफसरची मुलगी.

लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या तरी त्यान्च्या माहेरहून भरपूर दागिने घालून आणि सासरच्या मंडळींना मोठया गिफ्ट देऊन या घरात आल्या होत्या. दोघींच्या माहेरहून भरपूर दागिने घातले होते.

असे असले तरी मालतीच्या अंगावर एक ग्रॅमपण सोने नसे.. त्याची तिला आवडच नव्हती पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत. मात्र मालतीला हे आवडत नव्हते.. तिला साधे आयुष्य आवडे.. त्यान्च्या गाड्या होत्या.. ड्रायव्हर होते पण ती बाहेर जाताना चालत जाई किंवा बस ट्रेनने जाई. तिची खरेदी पण साधी असे. एकदा नात्यात लग्न होते म्हणूंन तिच्या सासूबाईंनी दोन्ही सुनेना खरेदीसाठी मुंबईतील मोठया दुकानात नेले. गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्गमैत्रीण अनुजा समोर आली. तिला अनेकवर्षांनी पहाताच ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली.. अनुजा भांबवली.. मालतीला पहाताच तिला आनंद झाला.

“माले.. किती वर्षांनी.. कुठे असतेस?

‘अग लग्न झाल माझं यावर्षी.. नवरा सिंगापूरला गेलाय चार महिन्यासाठी.. या काय सासूबाई आणि ही जाऊ लक्ष्मी…

‘बर बर.. तू नोकरी करतेस ना?

‘नाही ग.. करायची इच्छा होती पण.. घरच्याच म्हणणं काही गरजच नाही तर.. तू नोकरी करतेस ना?

‘हो तर.. नोकरी न करून भागेल कस आमचं? मी फोर्ट मधील खादी भंडारात सेल्सगर्ल आहे आणि नवरा एका खाजगी लायब्ररी मध्ये आहे… तू राहतेस कुठे मालती?

“प्रभादेवी.. गणपतीमंदिर आहे ना.. त्याच्या समोर टॉवर आहे.. राजव्हिला.. सतराव्या मजल्यावर रहातो आम्ही.. आणि तू ग अनुजा?

“नालासोपारा. नालासोपारा स्टेशन च्या बाहेर st असते.. तिथून अंदाजे अर्धा तास.. मग दहा मिनिटे चालायचं..

मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला.. ‘, खुप त्रास होत असणारं तुला अनु..

त्रास होतोच.. पण काय करू.. आमची दोघांची मिळून मिळकत ती किती? इकडे फोर्ट मध्ये कुठे तुम्ही तिघीजणी?

‘अग नात्यात एक लग्न आहे म्हणून खरेदी.. सासूने मला इकडं आणलं.. पण यात फार इंटरेस्ट नसतो..

“बापरे.. असल्या दुकानात खरेदी करायचे आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही… आमची खरेदी रस्त्यावर.. मस्त आणि स्वस्त.. विशादाने अनुजा हसली आणि चालू लागली.

 मालती तिला पाठमोळी पहात राहिली आणि जडपायानी त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली.

मालती त्या महागडया कपड्याच्या दुकानात शिरली, तेंव्हा तिची सासू आणि जाऊ नवीननवीन शालू घेण्याच्या घाईत होत्या.. बरेच शालू पारखून शेवटी त्यानी प्रत्येकी दोनदोन शालू खरेदी केले. मालतीने काहीच खरेदी केली नाही.. तिच्या सासूला आश्चर्य वाटले..

‘का ग,? निवडलेस नाहीस अजून?

‘नकोच मला… लग्नातील आहेत चार.. तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेउंन काय करू?

‘अग पण लग्न आहे माझ्या भाच्याच.. त्याला तू लग्नातील शालू नेसून जाणार?

हो.. मला आवड नाही नटण्याची.. उगाच वायफळं खर्च.. त्यातीलच शालू नेसीन मी..

‘बर बाई.. तुझी मर्जी. पण अजयला म्हणशील.. आईनी आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले.. मला विचारले नाही..

‘मी मुळीच म्हणायची नाही.. त्याना पण कळले आहे मी कशी आहे ती..

लक्ष्मीने नाक मुरडलं आणि गाडीच्या दिशेने निघाली.

मालती गाडीत बसली.. तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या पण ते तिच्या डोक्यपर्यत पोहोचत नव्हते. तिच्या डोळ्यसमोर येत होती.. अनुजा. अनुजा काळे.. वर्गातील सर्वात हुशार मुलगी पण गरीब. तिच्या बुद्धिपुढे आपण कुठेच नव्हतो. पण आज आपण अजयसारख्या देखण्या आणि कर्तबदार पुरुषाची पत्नी आहोत.. प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय.. पैसा, दागिने.. गाड्या सर्व आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा… खाडिभंडारात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करते आहे आणि नालासोपाराहुन रोज फोर्ट मध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येते आहे. असे का? का असा विरोधाभास? कारण तिची गरिबी हे कारण.. आपले वडील इनकमटॅक्स ऑफिसर.. म्हणजे भरपूर पैसे खाल्ले असणारं.. त्यातून पालीहील सारख्या भागात अलिशान घर.. त्याना शोभेल असा त्यानी जावई शोधला अजयसारखा.. दोन्ही बाजू श्रीमंत.. भरपूर दागिने.. सोन्याचे. हिऱ्याचे.. पण यात माझे क्रेडिट कोणते? मग का मी पैसे खर्च करू? गरज नसताना उंची शालू नेसू..

चार दिवसांनी विदयाताईच्या भाच्याचे लग्न. विदयाताई आणि लक्ष्मीची जोरात तयारी सुरु होती पण मालती शांत होती.. लग्नाला जाताना दोघीनी नवीन शालू आणि भरपूर दागिने अंगावर घातले तर मालतीने एकही दागिना घातला नाही.. तिला अशी पाहून विदयाबाई कडाडल्या 

‘काय हे लंकेच्या पार्वतीसारखे.. एकही दागिना नाही अंगावर..

मला दागिन्याची हौसच नाही.

‘अग पण माझ्या माहेरचं लग्न.. सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून.. अशी?

‘लक्ष्मी आहे ना दागिने घालून.. एका सुनेने नाही घातले तर काय होते?

विदयाताईचा नाईलाज झाला.. रागारागाने त्या गाडीत बसल्या. त्यान्च्या बाजूलाच मालती दागिने न घालता बसली.

रात्री अजयचा फोन आला..

‘मालू.. तू कसला त्रास होतो आहे का?

‘नाही..

‘मग आजच्या लग्नात साधी साडी.. दागिने घातले नाहीस..

तिच्या लक्षात आले सासूने मुलाला फोन करून सांगितले असणारं.

‘नाही रे.. खरं तर मला नटणे आवडत नाही.. दागिन्याची हौस नाही..

‘कमाल आहे.. कुठल्या स्त्रीला दागिन्याची हौस नसते.. हे मी प्रथमच पहातो आहे..

“तुझे असे विचार पहिल्यापासून आहेत काय?

“काहीप्रमाणात होते.. पण त्या दिवशी अचानक माझी वर्गमैत्रीण अनुजा भेटली आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले.. मी उंची साडया नेसाव्या, दागिने घालावे असा काय मोठा पराक्रम केला आहे? मी श्रीमंत बापाची लेक आणि श्रीमंत घरातली सून.. एवढाच माझा पराक्रम..

‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?

‘काय तरी करावे असे वाटते.

अजयने फोन ठेवला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

राधाबाईंकडे आज खूप गडबड होती. त्यांच्या लेकीला, कलावतीला बघायला लोक यायचे होते. चार खोल्यांचं घर लखलखीत स्वच्छ करून झालं होतं. बाहेरच्या हॅालमध्ये त्यांचे यजमान, किर्तनकार वामनराव, येरझारा घालत होते. वामनरावांचं किर्तन म्हणजे आयुष्य कसं जगावं याचा धडाच असे पण आज ते स्वत:च थोडे काळजीत होते!

“अहो, मुलाचे वडील प्रसिध्द डॅाक्टर आहेत पण फार रागीट आहेत असं ऐकतोय. काणे मंडळी आहेतच म्हणे रागीट. ” ते पत्नीस म्हणाले.

“हे बघा, योगेश फार चांगला आहे मुलगा हो.. आई प्रेमळ आहे. असेनात का वडील रागीट.. आपली कला शहाणी आहे.. घेईल सांभाळून. ” राधाबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

“रामकृष्ण हरी.. रामकृष्ण हरी” वामनराव त्याच्या नकळत जपात हरवून गेले. या राधेची सकारात्मक वृत्तीच आपली शक्ती बनून आयुष्यभर पुरली होती हे त्यांना परत एकदा जाणवलं!

कलावती तयार होऊन बाहेर आली. ते सात्विक सौंदर्य व त्या मासोळीसारख्या काळ्या डोळ्यातील बुध्दिमत्ता बघून राधाबाई धन्य झाल्या. वामनरावांनाही भरून आलं..

मोतिया रंगाच्या साडीत कलावती किती सुंदर दिसत होती! हिरवेकंच मोरपीसाच्या नक्षीचे काठ, हातात मोत्याची एक एक बांगडी, कानात भोकरं, आणि गळ्यात मोत्याचा सर घातलेली कलावती अप्रतिम दिसत होती. संस्कृत मधे डॅाक्टरेट करत असलेली सुसंकृत लेक आमची! या हिऱ्याला उत्तम कोंदण मिळवून दे रे श्रीहरी.. म्हणत वामनरावांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर हात जोडले..

अंगणात विठूकाका काम करत होता. त्यांनी पण खिडकीतून तर्जनी व अंगठा जोडून छान दिसतेस असं कलावतीला सांगितलं व ते परत बाग नीटनेटकी करू लागले.

कलावतीनं अबोलीच्या फुलांचा सुरेख गजरा केला होता तो आईच्या केसात माळला..

“कले.. अग मला म्हातारीला कसला गजरा घालतेस? तू घाल ना! “ राधाबाई लटक्या रागाने म्हणाल्या.

“घाल ग! गोड दिसत आहेस! ”कलावतीला आईला चिडवल्याखेरीज चैन पडत नसे!

“आवरा, आवरा पटकन! ” वामनरावांनी उठून हॅालमधील आकाशी पडदा सरळ केला. बैठकीच्या गादीवरचे लोड सरळ केले. रामकृष्ण हरी जप करत त्याच्या खुर्चीवर बसले.

बेल वाजली.. मंडळी आली. उंच्यापुऱ्या, देखण्या योगेश कडे बघून वामनराव व राधाबाई खुष झाले. योगेश इंजिनीअर होऊन एका बड्या कंपनीत काम करत होता. त्याचे वडील डॅाक्टर काणे शहरातील प्रसिध्द डॅाक्टर होते. आई शांत व सौम्य दिसत होती.

हवा पाण्याची बोलणी झाली. हॅाल मधे घातलेल्या साध्या सतरंजीकडे बघताना त्यांच्या डोळ्यात तुच्छता तरळून गेली असे वामनरावांना वाटून गेले..

”तुमचं किर्तन कधी ऐकलं नाही कारण मला वेळच नाही कुणाची किर्तनं ऐकायला.. पण काय हो.. किर्तन करून पोट भरणे मला तरी कठीण वाटतं. ” डॅा. काणे वामनरावांकडे बघत म्हणाले.

माणसाच्या वैभवाच्या व्याख्या घर, गाडी, बंगला यापर्यंतच सीमित आहेत हे जाणवून वामनराव मंद हसले.

एकमेकांच्या अंतरीच्या वैभवाकडे बघायला कधी शिकणार? कालच्या निरूपणाचा हाच विषय होता.. अंतरीचे अमृत..

“आम्हाला डॅाक्टर मुलगीच हवी होती पण आमचे युवराज तुमच्या लेकीला भेटले म्हणून आम्ही आज इथे येऊन पोचलो आहोत. बोलवा तुमच्या मुलीला. ” डॅा. काणे गुर्मीत म्हणाले.

कला बाहेर आली.. तिच्याकडे बघून योगेशचा खुललेला चेहरा खूप काही सांगून गेला! तिनं केलेलं मेघदूताचं रसग्रहण ऐकायला गेल्यापासूनच ती त्याच्या मनात भरली होती. आषाढस्य प्रथमदिवसे.. नं तिनं केलेली सुरूवात व महाकवी कालिदासाच्या वाड्ग्मयावरचं तिचं प्रभुत्व बघून तो थक्क झाला होता. तिच्या साधेपणातलं सौंदर्यच त्याचा पाठपुरावा करत त्याला तिच्या घरी घेऊन आलं होतं.. पण आज बाबा कसे बोलतील आज याची त्याला फार काळजी होती.

“वामनराव, जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे तुम्ही.

किर्तनाऐवजी काही दुसरं का केलं नाहीत? ” काणे म्हणाले. वामनराव “देवाची इच्छा.. तो ठरवतो.. म्हणाले पण काणे काही पाठ सोडायला तयार नव्हते.

कलावतीला काण्यांचे प्रश्न खटकत होते… रामदासी किर्तनाने पंचक्रोशी पवित्र करणाऱ्या माझ्या संत प्रवृत्तीच्या बाबांबद्दल यांना थोडाही आदर नाही हे तिला दिसत होतं पण योगेश ते प्रश्न ऐकून इतका गप्प कसा बसतो आहे हे तिला कळतं नव्हतं.

खिडकीतून विठूकाकांनी मुलगा छान आहे असं दाखवलं व ती खुदकन् हसली. विठूकाका तिच्या जन्मापासून त्यांच्याकडे येत असतं.. किर्तनाला येणारे एक साधक! पण वामनबुवांसाठी आपण काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा! ते येत व बगीचा सुंदर करून जातं. कधी बुवांशी चहा घेत गप्पा मारत तर कधी कलावतीला बागकाम शिकवतं..

डॅा. काणे कलावतीला म्हणाले, ”संस्कृतचे क्लास तुम्ही घेऊ शकता. उठून बाहेर कुठं जाऊन नोकरी करायची जरूर नाही. ” ते योगेशला काही बोलूच देत नव्हते म्हणून वामनरावच म्हणाले, ”कला, योगेशना बाग दाखव ना आपली! ”

ते दोघे बाहेर गेले. योगेश चांगला मुलगा होता. वडिलांपुढे मात्र एक अक्षरही मायलेक बोलू शकत नाहीत हे कलेला जाणवले. त्यांनी काहीवेळ गप्पा मारल्या व राधाबाईंनी चहा प्यायला आत बोलावले म्हणून ते आत गेले.

कला म्हणाली, “ अहो विठूकाका, आत या ना चहा प्यायला! ”

डॅा. काणे चहाचा कप हातात घेऊन बाग पहाण्यास दाराकडे वळत असतानाच आत येणाऱ्या विठूकाकाला धडकले व चहा धक्का लागून त्यांच्या शर्टावर सांडला..

“Nonsense! “ ते काकांकडे रागाने पहात ओरडले. काका बिचारे हातातल्या फडक्याने चहा पुसू लागले पण योगेशचे बाबा ओरडले, “ते घाणेरडं फडकं माझ्या कपड्यांना लावू नको. दिसत नाही हातात चहा आहे माझ्या? ” काका शरमिंदे होऊन खाली बघत उभे राहिले..

कलावती एकदम उभी राहिली. ती काण्यांकडे बघून म्हणाली, “तुमचा चहा सांडला का? ”

“हो मग! ” हा गावठी माणूस येऊन धडकल्यावर आणि काय होणार?

कलावती हसली.. “नाही डॅाक्टर साहेब! तुमचा चहा सांडला कारण तुमच्या कपात चहा होता. तुमच्या कपात जर कॅाफी असती तर कॅाफी सांडली असती! बरोबर ना? ”

डॅाक्टर काणे चिडून म्हणाले, ”यात विशेष काय सांगितलंस? जे कपात आहे तेच सांडणार.. का पाणी सांडेल? ”

“आपण मोठे डॅाक्टर आहात.. बरोबर आहे.. जे आत आहे तेच बाहेर सांडणार! आयुष्यात असे अनेक धक्के बसणार आहेत.. परिस्थितीचे, नातेसंबंधांचे.. आणि आत जर विवेक, नम्रता, कृतज्ञता असेल तर त्या धक्क्यांनंतरही हे गुणच बाहेर सांडतील.. पण..

आपल्या आतच जर तुच्छता, अहंकार, क्रोध असेल तर तेच बाहेर पडणार ना.. ज्याचा मला गेले दोन तास त्रास होतो आहे..

.. योगेश मला आवडला आहे. पण आपल्यापुढे तो काही

बोलू शकत नाही.. त्याच्यात नम्रता आहे.. माझ्या आई बाबांबद्दल आदर आहे आणि आपले बाबा आज कसे बोलतील ही काळजीही आहे. ते मला बाहेर अंगणात समजलं म्हणूनच मला तो अजूनच आवडला..

पण भारतीय समाजात लग्न होतं तेव्हा ते दोन कुटुंबांचं असतं. आमचं लग्न झालं तर माझे किर्तनकार बाबा आपले व्याही होणार याचा तुम्हाला त्रास होईल. ते व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्या तोलामोलाचे नाहीत.. पण ज्ञानाच्या बाबतीत त्यांची कोणी बरोबरी करू शकणार नाही..

मी घरात संस्कृतचे क्लास घेणार नाही.. मी विद्यापीठांत जाऊन संस्कृत शिकवणार आहे.. मी पण डॅाक्टरच होत आहे पण कालिदासाच्या वाड्ग्मयावर! रघुवंशातील भाषा थोडी कृत्रिम का वाटते व मेघदूत मनाला का भिडतं हे विद्यार्थ्यांना शिकवणारी..

आणि हे आमचे विठू काका आहेत ना त्यांचा मान राखणारं घरच मला हवं आहे.. तिचे डोळे भरून येऊन आवाज कापरा झाला होता..

बरं झालं की आत जे असतं तेच बाहेर सांडतं.. निदान मला कळलं तरी.. योगेश तू जेव्हा डॅाक्टर साहेबांना सांगू शकशील ना.. बाबा तुमचं आज चुकलं किंवा बरोबर आहे त्यादिवशी येऊन माझा हात हातात घे. ” ती थांबली!

डॅाक्टर काणे जळजळीत नजरेनं बायको व मुलाकडे बघत म्हणाले, “ चला इथून.. खालच्या दर्जाच्या लोकांशी नातं नाही जोडायचं आपल्याला. ” ते तावातावानं बाहेर पडले.. त्यांची पत्नी दु:खी चेहऱ्याने बाहेर पडताना बघून योगेश म्हणाला, “आई, थांब. मला कलावती पसंत आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे! ”

आईनं प्रेमाने कलावतीला जवळ घेतलं आणि वामनराव व राधाबाईंना त्या म्हणाल्या, “सुसंकृत आहे मुलगी असं ऐकलं होतं पण आज “सुसंकृत” म्हणजे काय समजलं”!

कलावती व योगेश नजरेत नजर घालून तो क्षण अनुभवत उभे होते. बाहेरून डॅाक्टर काणे गाडीचा हॅार्न वाजवत होते पण काही वेळात थांबले.. आत असलेलं सारंच बाहेर सांडून जगाला दिसू नये म्हणून!

कलावती हॅार्न थांबलेला बघून मनातच हसली. आयुष्य मोकळा कप देतं.. तो कशानं भरायचा हे आपल्या हातात आहे या विचारात असताना योगेशनं तिचा हात हातात घेतला व अंगठी पुढं केली..

वामनराव रामकृष्ण हरी.. म्हणत स्मितहास्य करत डॅाक्टरांना आत बोलवायला बाहेर गेले.. खरेच सुसंकृत होते म्हणूनच!!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हुंदका…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ हुंदका… ☆ प्रा. भरत खैरकर 

‘आपली गुड्डी आता बरीचशी मोठी दिसते! तिला आठवण वगैरे येत नाही.. कारण आम्ही तिची खूप काळजी घेतो.. “दिदी तेरा देवर दिवाना” ह्या गाण्यावर ती चांगली हातपाय हालविते आणि तोंडाने तोतरे बोल काढून नाचायला लागल्यावर साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनते! आम्ही सर्वजण म्हणजे मी, गुड्डी आणि ‘हे’ होळीला बैतुलला येणार आहोत. तुम्हीही या. भेट तिथेच होईल.

आपलीच 

अलका. ‘

नारायणची ही मागील १५ मिनिटांपासून पत्र वाचायची तिसरी वेळ होती. त्यानं चौथ्यांदा वाचायला सुरुवात केली, तर बाहेर कसलासा आवाज आला. दोन पोरं कंपाऊंडच्या आतल्या ताराचा बंडल काठीने ओढत होते. त्याने दरवाज्यात ठेवलेली काठी संपूर्ण ताकतीने त्या पोट्ट्यांच्या दिशेने भिरकावली. पोरं तार टाकून पळाली.

आता त्याचं मन मात्र पत्रात लागत नव्हतं. कारण तो नुकत्याच गेलेल्या पॅसेंजर गाडीने येणाऱ्या शंकरची वाट पाहत होता. तो मागच्या आठवड्यात, जो गेला तो अजूनही आला नव्हता. आणि आजच्या पॅसेंजरने येतो असं त्यांना सांगितलं होतं. परवाची होळी असल्यामुळे आजच जब्बार सुद्धा उद्या येतो. म्हणून त्या आत्ताच्या पॅसेंजरने गेला होता. पण शंकर परतला नव्हता. तो आलाच नाही.

रेल्वे खात्यात नारायण ठेकेदारीत काम करायचा. शंकर, जब्बारही त्याचे सहकारी होते. ब्रॉड गेजचं काम सुरू असल्याने लाखो रुपयांच सामान शेडमध्ये नि शेडच्या कंपाउंड मध्ये पडलेलं होतं.. त्याची राखण करण्यासाठी सेक्युरिटी म्हणून तीन शिफ्ट मध्ये तिघं काम करत होते आणि एक जास्तीचा होता. शंकर मात्र मागच्या आठवड्यात गेला तो अजून उगवलाच नव्हता. त्यामुळे शंकरची ड्युटी नारायण, जब्बार आळीपाळीने करीत होते.

हे इतकं महागडे सामान आपण दोन- दोन, तीन तीन दिवट्या लागोपाठ करून राखायचं म्हणजे जिकरीचं काम आहे. थोडसं झोपतो म्हटलं तरी बाजूच्या झोपडपट्टीतील पोट्टे काही ना काही पळवायला तयारच असायचे! त्यामुळे नारायण जरा चिडला होता. त्यातल्या त्यात हे पत्र वाचून त्याला ‘कधी गावाला जातो आणि कधी नाही! ‘ असं वाटत होतं.

पण शंकर यायला हवा.. शंकर तर गोंड आहे! त्यांच्यामध्ये होळी आणि दसरा खूप जोशात मनवतात मग दोन दिवसांवर होळी असताना तो येईलच कसा? ह्या विचाराने मात्र शंकरचा नारायणला खूप राग आला. ‘सालं, आपण किती दिवस झाले बैतूलला गेलो नाही. ह्यांचं काय ह्यांना रोज रोज घरचे लोक भेटतात. मला कुठे तसे? धड आठवड्यातून एकदा तरी भेटता येत नाही. रेल्वेशी संबंधित म्हणून बरं! साहेब लोक तिकीट तरी विचारीत नाही. मागे असंच ह्यांच्या अशा सुट्ट्या मारण्याने आपण गावाला जाणार.. पण गेलो नाही. बायकोने तिच्या भावाला अजनी हेडक्वार्टरला ‘कां आले नाही? ‘ म्हणून चौकशी करायला पाठवलं तिथून तो इथे साइटवर भेटायला आला होता.. ह्या खेड्यात.. किती समजावून सांगावं लागलं होतं त्याला आणि हे मस्त उद्या येतो म्हणून चार चार दिवस गायब होतात.. मी तक्रार करीत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो.. आता मी जर उद्या गावाला गेलो नाही तर काय वाटेल घरच्यांना.. बाबा घरचा कर्ता माणूसच लगोलग कळवून सुद्धा आला नाही! आणि आपल्या लहान भावाला काय वाटेल? तो तर तेवढ्या लांबून डेहराडून वरून येतोय.. सोबत अलका येणार आहे.. गुड्डीला घेऊन.. लग्न झाल्यावर आपली त्याच्याशी भेटत नाही.. सालभर झालं बहुदा.. अलकाच्या लग्नात आपली गुड्डी केवढीशी होती. धड तिचं दूधही सुटलं नव्हतं.. तर अलकानं आपल्या बायकोकडून तिला मागून नेलं होतं.. ‘आम्हांला करमणार नाही म्हणायची… शेखर ड्युटीवर गेला की तिला कॉर्टरवर गुड्डीची साथ मिळणार होती.. आपण ह्यांचं नुकतंच लग्न झालंय कशाला मध्ये गुड्डी.. वगैरे पाठवायला नको.. म्हणून ‘नाही नाही ‘म्हटलं तरी रडून रडून तिला नेली होती.. शेखरही हट्टाला पेटला होता. शेखरचा हट्ट आपल्याला कधीच मोडवत नाही मग आपणच गुड्डीला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं..

शेखर किती लहान होता. तेव्हाच आपले बाबा वारले होते. मधल्या भावाने बैतुलला एमआयडीसीत नोकरी पकडली होती. तिथे बायकोसह स्थायिक झाला होता. त्यामुळे शेखरच शिक्षण, आईचा सांभाळ आणि आपली नोकरी एवढं सगळं सांभाळाव लागायचं आपल्याला! तेव्हाचा आपला पगार फक्त दीडशे रुपये होता आता शेखरला एकदम साडेपाच हजार रुपये पगार आहे. आईच्या मताचं ऐकलं असतं तर शेखर आज मिलिटरीत नसताच!!

बैतुलला त्यावेळी मिल्ट्री कॅम्प लागला होता. शेखर सकाळी तिथे दूध पोचवायचा. आपल्यापेक्षा तो धट्टाकट्टा वाटायचा. एक दिवस त्याच्या पेपरमुळे आपण दूध द्यायला गेलो तर मिलिटरीच्या साहेबांनी शेखर विषयी विचारून त्याला मिल्ट्रीत टाका असं म्हटलं. मी किती समजूत घालून शेखरला मिलिटरीत टाकला. आता पाहता पाहता त्याच सातव वर्ष सुरू आहे मिलिटरीतलं! मागच्या वर्षी त्यानं लग्न केलं. अलका सारखी सोज्वल भाऊसून मिळाली.. शेखरला पाहिजे होती अगदी तशीच ती आहे. आणि आता ते सर्वजण होळीला येणार आहे.. मी येथे अडकून पडलो एकटा.. ‘ नारायणला हे सारं आठवून आठवून हुंदका दाटून आला. तो बिछान्यावर आडवा पडला.. तर लगेच बाहेर पुन्हा कसला तरी आवाज आला.. नारायण चिडला.. त्यान पुन्हा काठी उचलली आणि बाहेर आला.. तर दरवाजा उघडून शंकर आत येत होता. त्याला पाहून नारायणचा दाटलेला हुंदका अश्रूच्या रूपाने बाहेर पडला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौनातील आकांत… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मौनातील आकांत… ☆ डॉ. शैलजा करोडे

“सोहम ऊठ बेटा. बघ सकाळचे पाच वाजलेत. मोबाईलचा हा अलार्म दुसर्‍यांदा होतोय बेटा. ऊठ आता. आळस करून कसा चालेल. ऊठ, फ्रेश हो, आणि थोडावेळ कर अभ्यास. सकाळी सकाळी अभ्यास केला तर माईंड फ्रेश असतं, सकाळची शांत वेळ असते, गडबड, गोंधळ, गजबज, विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषण नसतं. अशा शांतवेळी अभ्यास केला तर लक्षातही राहातो बेटा. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगतेय राजा. यंदा तुझं दहावीचं वर्ष. यातील तुझी शैक्षणिक प्रगती, गुणसंख्येवर तुझं भविष्य अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष आहे. तुझ्या जीवनाला दिशा देणारं हे वर्ष आहे. बेटा आजकालच्या परीक्षा या गळेकापू स्पर्धेसारख्या आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला किती हाय परसेंटवर कटआँफ होतोय, पाहातोय आपण. दहावी हा बारावीचा पाया आहे बाळा. चल ऊठ बरं आता. आळस हा वाटणारच. थोडावेळ होईल तसं. मस्त स्नान कर. बघ निंबाची पानं टाकली आहेत पाण्यात. चांगला सुगंधी साबण ठेवलाय. स्नान केल्यानं सगळा आळस दूर होईल तुझा. तोपर्यंत मी मखाणे, काजू, बदाम मिश्रीत दूध तयार करते “

आईचं एवढं मोठं लेक्चर ऐकल्यानंतर सोहमला उठणं भाग होतंच, तरीही त्याने आपली नाराजी व्यक्त केली. ” काय माॅम झोपू देत जा ना मला थोडावेळ. रात्री अभ्यास केलाय मी. अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं आहे मी. मलाही काळजी आहे परीक्षेची. “

” बरं बरं, चल आता. चर्चा नको. मलाही घरातली सगळी कामं उरकून ऑफिसला जायचंय. तुझे पप्पाही उठतीलच एवढ्यात. बाळ माझा शहाणा ” म्हणत मी सोहमची पप्पी घेतली.

सोहमला बाथरूमला पाठवून मी किचनकडे वळले. गॅसवर एकीकडे सोहमचं दूध, दुसर्‍या शेगडीवर आमचा चहा, तिसर्‍या शेगडीवर फोडणीला टाकलेली भाजी. माझा सर्कसचा रोजचा शो सुरू झाला. सर्कसही तीच, प्रेक्षकही तेच, कलाकारही मीच, पण रोज नवनवीन आयटेम सादर करावे लागायचे, सणवार, व्रतवैकल्य, पावणा रावळा, दुखणी खुपणी, सगळेच गेम करावे लागतात. जीवनाच्या नवनवीन वाटेवरुन चालतांना जुनेही सोडता येत नाहीत. मग काय सर्कशीत कपबशीचा खेळ असतो. तसा दोरीवर ताल धरत संसाराचा बॅलन्स साधायचा.

“ मनाली, चहा झालाय का? “ राकेश किचनमध्ये डोकावत बोलले. ” होय, हा घ्या. ” मी राकेशच्या हाती चहा सोपवून सोहमला दूध देण्यासाठी वळले, ” आण दे मला मनाली. मी नेऊन देतो. “

” सोहम, हे घे दूध. अभ्यास कसा काय चालू आहे बेटा. तुला काही नवनवीन पुस्तकं, संदर्भ ग्रंथ पाहिजेत काय? काही शैक्षणिक साहित्य पाहिजे काय? काही आता सुरु असलेल्या क्लासेस व्यतिरिक्त आणखी दुसरी काही मदत हवी काय? हवं ते माग? मी कशाला नाही म्हणणार नाही. पण तू चांगला अभ्यास कर. गुणवत्ता यादीत नाव झळकू दे. मेडीकलला प्रवेश मिळू दे. जी स्वप्न मी पाहिली होती, ती तू पूर्ण कर. कारण मला अशा शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. मिळणारही नव्हत्या. कारण घरची परिस्थितीच गरीबीची. बाबा एकटे कमावणारे, खाणारी चार तोंडे, आम्ही भावंडही शाळा सुटल्यावर छोटी मोठी कामं करत होतो, तरीही सगळा पैसा पोटभरी पुरताच असायचा. मग इतर खर्च कसा करणार, सगळा आनंदी आनंद, होय आनंदच. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” असू दे. पण मी तुला कमी नाही पडू देणार.

 सोहमने एक बारकासा कटाक्ष पप्पांकडे टाकला. मान हलवूनच होकार दिला. काही बोलू मात्र शकला नाही. कारण त्याचं कोण ऐकून घेणार. त्याला तर मम्मी व पप्पांची स्वप्न पूर्ण करायची होती. डाॅक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं होतं. मेरीटमध्ये यायचं होतं, स्पर्धेत पुढे जायचं होतं, धाव धाव धावायचं होतं.

 त्याला मात्र वकील व्हायचं होतं, समाजातील अन्यायाविरूद्ध लढायचं होतं. न्याय देवतेची कास धरून, न्याय हक्कांसाठी लढून सामाजिक समता साधत एका निकोप प्रगत समाज निर्मितीला हातभार लावायचा होता. आणि यासाठी काही त्याला मेरीटमध्ये यावं लागणार नव्हतं. साधी कला शाखेतील पदवी घेऊन पुढे लाॅ ग्रॅज्युएशन तो करू शकणार होता. पण नाही त्याला मम्मी पप्पांचं ऐकावचं लागणार होतं. त्याचं मन काही सांगत होतं तर प्रत्यक्षात वेगळ्या वाटेवर चालायचं होतं, त्याचा हा आकांत मौनातच दाबल्या जात होता.

धावपळ करत मी आँफिस गाठलं आणि फाईलींच्या डोंगरात स्वतःला झोकून दिलं. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं. कामाचा प्रचंड ताण होता. पाहिजे ती माहिती तत्क्षणी पुरवावी लागत होती. सगळं हाताशी तयार ठेवावं लागत होतं. ” मनाली मॅडम उद्या सर हाऊसमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत. सगळी तयारी चोख आहेना. ” ” होय सर” ‘ गुड ‘

सायंकाळी धावतच स्टेशन गाठलं. प्लॅटफाॅर्मवर येताक्षणीच लोकलने हाॅर्न दिला. अगदी फ्रॅक्शन आँफ सेकंदचा फरक पडला असता तर मी खालीच पडले असते. माझ्या मैत्रिणींनी मला वर खेचले होते. ‘ जाऊ द्यायची होती ना ही ट्रेन मनाली. ” ” अग, सोहमचं हे महत्वाचं वर्ष. ही ट्रेन चुकली असती तर आणखी अर्धा तास लेट झालं असतं ” ” काय ग दिपाली तुझ्या मनोजचा कसा काय चालू आहे अभ्यास ” ” अग प्रकाश इंस्टीट्यूशन हा नामांकीत संस्था. चांगली तयारी करवून घेतात. सराव परीक्षाही वारंवार घेतल्या जातात, त्यामुळे मुलांच्या प्रगतीचा आलेखही कळतो. “

‘ माझ्या मोहनला तर या युनिट टेस्टला सर्वाधिक गुण मिळाले ‘ चैताली सांगत होती. मग एकेक जणी आपल्या मुलांचा अभ्यास, त्याचं नियोजन, टि. व्ही पाहण्यावर बंदी, काहींनी तर केबलचं काढून ठेवल्या होत्या. तब्येत चांगली राहावी म्हणून खाण्यावरही कसं बंधन ठेवलं जातंय इ इ इ

मी लॅचकीने दरवाजा उघडला. सोहमच्या रुममध्ये डोकावले. ” मम्मी आलीस, ये ना, जरा बस माझ्याजवळ ” ” होय राजा, जरा फ्रेश होऊन येते ” मी फ्रेश झाले. ” सोहम असं कर ना बेटा, तुच किचनमध्ये ये, म्हणजे माझा स्वयंपाकही होईल आणि तुझ्याशी बोलताही येईल. ” ” ठीक आहे मम्मी ” सोहम किचनमध्ये आला. तो बोलणारही तेवढ्यात डोअरबेल वाजली. दूधवाला आला होता. मी दूध घेऊन किचनमध्ये आले तोपर्यंत कढईत फोडणीसाठी टाकलेले तेल बरेच तापले होते. साहजिकच माझे लक्ष त्यात लागले. भाजी फोडणी घालत नाही तोच पुन्हा डोअरबेल वाजली. समोरच्या फ्लॅटमधील स्वामीनाथन आंटी नात झाली म्हणून मिठाई घेऊन आल्या होत्या. सोहमचं बोलणं राहूनच गेलं, तो आपल्या रूममध्ये निघून आला.

” सोहम बाळ, आज मी तुझ्या रूममध्ये झोपेन तेव्हा बोलू आपण “

सोहमच्या रूममध्ये मी झोपले, सोहमने बोलायला सुरूवातही केली पण झोपेने माझ्यावर अंथरूणावर पाठ टेकताक्षणीच विजय मिळवला.

आजकाल सोहमचं जेवणही कमी झालं होतं. अभ्यासात त्याचं फारसं मनही लागत नव्हतं. चेहराही निस्तेज झाला होता. ” सोहम बरं नाही वाटत काय तुला. ” ” नाही मम्मी तसं काही नाही ” ” तरी एकदा जाऊन येऊ बेटा. काही त्रास असेल तर डाॅक्टर काही औषधं देतील. तसं काही नसेल तर चांगलंच आहे आपल्यासाठी ” ” ठीक आहे मम्मी “

डाॅक्टर देशपांडेनी सोहमचं चेकअप केलं. ” व्हेरी गुड यंग बाॅय, काही झालेलं नाही तुला. खायचं, प्यायचं, मजा करायची, अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, ओ के. आता थोडावेळ बाहेर थांब. मी मम्मी पप्पांशी बोलतो ” 

” बोला डॉक्टर काय झालं सोहमला ” ” ताण. ताण आलाय परीक्षेचा. घुसमटतोय तो आतल्या आत ” ” पण कशामुळे ” ” तुम्ही काही प्रेशर दिलंय काय त्याला परिक्षेतील टक्केवारीच कि इतर आणखी काही ” ” डाक्टर, आम्हांला वाटतं त्याने डाक्टर / इंजिनियर व्हावं, मग टक्केवारी आणि त्यासाठी जीवतोड मेहनत येणारच ना. आम्ही त्याला काही कमी पडू देत नाही आहोत. पण अभ्यास तर त्यालाच करावा लागणार आहे ना ” ” तुम्हांला वाटतं त्याने डाक्टर व्हावं, त्याला काय वाटतं हे कधी विचारलं” ” त्याला काय विचारायचं. ज्या सुविधा आम्हांला मिळाल्या नाही, त्या सर्व आम्ही त्याला पुरवतोय. आणि आमची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही, ती स्वप्न आम्ही मुलात पाहिली तर चुकलं कोठे. ” ” इथेच गल्लत होतेय महाजन सर, त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तुमची स्वप्न पूर्ण करायची. आणि त्याची स्वप्न काय पुढे त्याच्या मुलाने पूर्ण करायची. आणि ही साखळी अशीच पुढे न्यायची. नका थोपू आपली मतं मुलावर. घेऊ देत त्याला मोकळा श्वास, मग बघा अवकाशात कशी उंच भरारी घेतो ती “

” ओ के डाॅक्टर. घेऊ आम्ही ती काळजी “

रात्रीची जेवणं आटोपून मी टी. व्ही लावला. बातम्यांचं चॅनेल लावताच मोठी धक्कादायक बातमी समोर आली ” नीटच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाल्याने बापाची मुलीला बेदम मारहाण. मारहाणीत मुलीचा मृत्यू. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यातील घटना. बातमी पाहाताच माझं व राकेशचं तर धाबचं दणाणलं.

” मनाली उद्या बोलू सोहमशी शांततेने. ” ” होय “

मोबाईलने सकाळी पाच वाजेला अलार्म देऊनही आज आईने उठवले नाही. सोहम आश्चर्यचकित झाला. तोच आता हडबडून उठला. ” साॅरी मम्मी, उठायला उशीर झाला ” 

” अरे झोप, झोप, काय घाई आहे “.

एवढ्यात पप्पाही आले. ” सोहम बाळा झाली झोप. नसेल बरं वाटत तर कर आराम ” 

” नाही, बरं वाटतंय मला. ” 

” O k. good ” 

” सोहम तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना ” 

” होय मम्मी. ” 

‘ मग बोल आता ‘ 

” मम्मी पप्पा मला डाॅक्टर / इंजिनियर नाही व्हायचं तर एक निष्णात वकील बनून अन्यायाविरूद्ध लढायचं आहे. सत्याची बूज राखायची आहे. गोर गरीबांना न्याय मिळवून देऊन एका निकोप व सुदृढ समाज निर्मितीसाठी हातभार लावायचा आहे. एक उत्तम नागरिक बनायचं आहे “

“ Then go ahead my son ” 

” खरंच पप्पा ” 

” अगदी खरं, माझी व मम्माचीही परवानगी आहे. ” 

” Oh my sweet pappa. Oh my sweet mammy. my sweet, sweet, sweet & lovely parents. thank you very much. I love you. ” 

” We both also love our sweet son “

सोहम आनंदात बाथरूममध्ये दात ब्रश करण्यासाठी गेला. एका मौनातील आकांताला आज out let मिळालं होतं … सगळा निचरा झाला होता. मनावरील मळभ जाऊन आता स्वच्छ उजाडणार होतं

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares