मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा – ‘सैनिकाची आई‘ / ‘मातीतच संपतो‘ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा – ‘सैनिकाची आई‘ / ‘मातीतच संपतो‘ ☆ श्री मयुरेश देशपांडे

१) सैनिकाची आई…

मी मागे वळून पाहिलं आणि हातातली सतार अलगद खाली ठेवली. शारदा ताईंना झोप लागली होती. मी हळूच खोली बाहेर आले. ओसरीच्या पायऱ्यांवर खांबाला टेकून निवांत बसले. हि रात्र माझ्या आयुष्यात दरवर्षी येते. सकाळपासूनच शारदा ताई अस्वस्थ होतात. मनोसोक्त रडतात. जुन्या आठवणी सांगतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत त्यांना झोप येत नाही. मग मी देवघरातल्या समईची वात सारखी करते. हातात सतार घेऊन देवापुढे बसते व एकेक अभंग गायला सुरवात करते. शारदा ताईच काय सारा आश्रम तल्लीन होऊन ऐकत असतो. कोणी साथ देतो, कोणी तान देतो तर कोणी नुसतच गुणगुणतो.

पाहता पाहता सारा आश्रम शांत झोपी जातो. चार पाच अभंगांनंतर तर शारदा ताईंनाही झोप लागते. आणि मग मी अशीच बाहेर येऊन खांबाला टेकून ओसरीच्या पायऱ्यांवर बसते. साऱ्या आश्रमाला धीर देणाऱ्या शारदाताई स्वतःला मात्र कधीच धीर देऊ शकल्या नाहीत. सगळ्यांना दुःख विसरायला शिकविणाऱ्या शारदाताई स्वतःचे दुःख कधीच विसरु शकल्या नाहीत.

हेमंतराव शहिद झाले तेव्हा अगदीच सुरवातीचे काही दिवस वगळता, त्या धैर्याने उभ्या राहिल्या. आदित्यला सैनिकी शाळेमध्ये आधीच घातले होते. तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि मग लष्करातला बडा अधिकारी असा आदित्यचा प्रवास झपाट्याने झाला. तो वडिलांची जागा घेईल असे म्हणता म्हणता त्याने ती जागा घेतली सुद्धा. शारदा ताईंनी त्याला फोटोंमध्येच मोठा होताना पाहिले. आपले सर्व शिक्षण व लष्करातले पहिले पोस्टिंग संपवून पहिल्यावहिल्या अधिकृत सुट्टीवर तो घरी आला.

सुरुवातीला दार उघडले तेव्हा शारदाताईंना समोर हेमंतराव असल्याचाच भास झाला. तोच उंचधिप्पाड देह, तीच अधिकाऱ्याची टोपी, तोच कडक इस्त्री केलेला गणवेश, उजव्या खिश्याच्या वरती विविध पदकांची दाटी, पण मान मात्र विनम्रतेने खाली झुकलेली. आई आत घेणार नाहीयेस का? त्याच्या प्रश्नाने शारदाताई भानावर आल्या व समोर हेमंतराव नाही तर जणू त्यांचेच प्रतिरुप असलेला आपला मुलगा आदित्य आहे याची त्यांना जाणीव झाली.

आदित्य घरी आला आणि घराचे पुन्हा गोकूळ झाले. त्याच्या मित्रांचे येणे जाणे, त्यांचा गोंधळ, सारे काही त्या कानांत आणि डोळ्यांत साठवून घेत होत्या. त्याचे लाड पुरवता पुरवता त्याची सुट्टी कधी संपत आली हे कळलेच नाही. एके दिवशी भिंतीवरच्या कालनिर्णयावर फुली मारणाऱ्या आईला पाहून, आई मी सुट्टी वाढवून घेऊ का? तश्या बऱ्याच रजा आहेत बाकी, आदित्यने विचारले. इतर कोणाची आई असते ना, तर पटकन हो म्हणाले असते. पण मी एका सैनिकाची आई आहे, शारदाताईंनी आदित्यला आपले उत्तर सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आदित्यला लवकर उठविले. आई झोपु दे ना, परत अशी झोप नाही मिळणार, आदित्य डोक्यावर गोधडी घेत म्हणाला. चल उठ लवकर, आज आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी जायचे आहे, शारदा ताईंनी एवढेच सांगितले. समोरच्या कमानीवर मोठ्या अक्षरांत मातोश्री वृद्धाश्रम असे लिहिले होते. त्याला काहीच कळत नव्हते. ते दोघे कार्यालयात गेले. या शारदा ताई, तुमचा फॉर्म भरुन तयार आहे, निर्मला ताईंनी दोघांचे हसून स्वागत केले.

आई हे काय चालले आहे? आदित्य जवळ जवळ ओरडलाच. शांत हो बाळा. आपण बाहेर पडल्यावर बोलू. हे बघ तुझे बाबा गेले तेव्हाच खरे तर मी एकटी पडले होते पण तुझी जबाबदारी होती म्हणून दिवस कसे गेले कळलेच नाही. आता तुझी जबाबदारी संपली आहे. तु कामावर चालला आहेस. कमीतकमी अकरा महिने तरी घरी परत येणार नाहीस. मग एवढे दिवस घर मला खायला उठेल. इथे माझ्या वयाच्या बायका आहेत, त्यांच्यात मी सहज मिसळून जाईन.

आदित्यला खरे तर आईचा निर्णय पटला नव्हता पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला निश्चिंत करत होता. आठवड्याभरात तो सैन्यात आणि शारदाताई आश्रमात परतल्या. इथे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहता राहता इथल्या कधी झाल्या हेच कळाले नाही. मला तर त्यांनी आपली मुलगीच मानले होते. किंबहुना आश्रमातले सगळेच तसे म्हणतही होते. आम्ही दोघी एकमेकींवर जीवापाड प्रेम करत होतो. माझे संगीत माझे गाणे त्यांना प्रचंड आवडत होते.

तो दिवस आलाच, जो कुठल्याच सैनिकी कुटुंबाच्या जीवनात येऊ नये असे त्या कुटुंबाला कायम वाट असते. दारावरची तार आणि टिव्हीवरची बातमी एकाच वेळी आले. आदित्य नक्षलवाद्यांशी लढता लढता शहीद झाला होता. शारदा बाई कोसळल्याच. आणि यावेळी मात्र उभ्याच नाही राहिल्या. ज्यांनी आयुष्यात अनेकांना उभं केलं त्यांना कोणीच उभं करु शकले नाही. एरवी वर्षभर त्या नॉर्मल असतात. पण हा दिवस आला की कपाटात लपवलेला आदित्यचा फोटो बाहेर काढतात आणि दिवसभर रडत बसतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत.

काही तरी वाजले आणि माझी तंद्री तुटली. मांजरच असावे बहुतेक. मी पुन्हा आत आले. शारदाताईंना शांत झोप लागली होती. त्यांच्या मानेखालची उशी नीट केली. अंगावर पांघरुण घातले आणि मीही आता बाजूच्याच पलंगावर झोपी गेले.

 – लेखक म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

 +९१ ८९७५३ १२०५९

*  *  *   * 

(२) मातीतच संपतो… 

“ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं|”, भिंतीवरती पिवळ्या रंगावर निळ्या रंगाने लिहिलेली अंबूजा सिमेंटची जाहिरात तीने पाहिली आणि इथच घर बांधू असे ती पटकन म्हणाली. माझ्यासाठी ती एक साधी झोपडी असली तरी तिच्यासाठी तीच घर होत. तीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघून मी हि तीथेच झोपडी उभारायचे ठरविले. त्याच सोसायटीमध्ये मी सुरक्षारक्षक म्हणून कामाला असल्याने कोणी विरोध करायचाही प्रश्न नव्हता.

तिने हातातली वळकटी खाली ठेवली. मी हि डोक्यावरचे ओझे उतरवले. तीला सामानापाशीच हुशारीने थांबायला सांगून झोपडी उभारण्यासाठीचे सामान शोधायला निघालो. जवळच हे मंडपवाला होता. खूप विनवणी केली तेव्हा त्याने त्याच्याकडचे त्याच्यासाठी टाकाऊ पण माझ्यासाठी उपयुक्त असे काही बांबू दिले. पुढे थोड्याच अंतरावर एका राजकीय पक्षाचे कार्यालय होते. कार्यालयाच्या मागच्या अडगळीत काही जूने फ्लेक्स पडलेले होते. विनंती करुन ते फ्लेक्स उचलून आणले.

सामान ठेवले होते तिथे आलो. वाट पाहून बायकोने रस्त्यावरच अंग टाकले होते. नुकताच डोळा लागला असावा. उठवावे वाटत होते पण नाही उठवले. मी एकट्यानेच झोपडी बांधायला घेतली. एकाला एक बांबू जोडले. बाजूने व वरून फ्लेक्स बांधले. आतली जमीन थोडी सारखी केली. किमान आडोसा होईल असे बांबूचेच एक दार बनविले. मग एकेक करुन सामान आत ठेवले. जेव्हा तिच्या डोक्या खालची वळकटी फक्त आत ठेवायची बाकी राहिली, तेव्हा तिला उठवले.

आपल्याला झोप लागली हे लक्षात आल्यावर तीची तीलाच लाज वाटली. पण मग जेव्हा समोर उभारलेला रंगीबेरंगी महाल बघितला तेव्हा तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. क्षणाचीही उसंत न घेता तिने आजूबाजूचे आंगण झाडून काढले. दारासमोरल्या मातीवर रेघोट्या ओढत नक्षीदार रांगोळी काढली. मग यलम्मा देवीचे नाव घेत रीतसर उजव्या पायाने तिने झोपडीत प्रवेश केला. माझ्या झोपडीमध्ये आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली.

जुजबी लिहिता वाचता येणाऱ्या तिने झोपडीत प्रवेश करताच ती ओळ पुन्हा वाचली.. ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |” आणि स्वतःशीच हसली. तिला चुलीसाठी विटा व लाकडं आणून दिली. पण बनवायच काय? मस्तपैकी काळ्या कोंबड्याचं वशाट आणा. फक्कड तांबडा रस्सा बनविती तुमच्यासाठी. आज आपला पहिला दिवस हाय ना व्ह. यलम्मा देवीला छानपैकी नैवेद दाखवू आणि सुरवात करु. ” तिची भोळी बाबडी श्रद्धा बोलली.

नविनच सोसायटी होती. अजून बांधकाम शंभर टक्के पूर्णभी झाल नव्हतं. काही बिर्हाड राहिला आली होती, काही यायची होती. मला बिल्डरनेच सुरक्षारक्षक म्हणून कामाला लावले. सहा महिने झालं असतील. माझं नवीनच लग्न झालेलं. किती दिस बाहेरच खाणार आणि किती दिसं बायकोपासून लांब राहणार म्हणून या वक्ताला तीलाबी सोबत घेऊन आलो. गाठीशी थोडी दमडी जमली होती त्यातुनच वशाट आणलं आणि थोडी मीठ मिरची. खोटं कशाला सांगा, वाटेत मापट भर लावून आलो होतो. तीला सांगणार नव्हतोच पण चेहऱ्यावरची तरतरी बघून तीला समजलेच. पहिलाच दिवस म्हणून तीहि काय बोलली नाय.

किती दिसांनी जवळ झोपत होतो. रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठायला उशीर झाला. मालक आले तेव्हा गेट उघडायला कोणीच नाही बघून चिडले पण पहिला दिवस म्हणून माफ केले. एकेक दिवस जाऊ लागले. आमचं बस्तान बसलं होतं. मी सुरक्षारक्षकाचं काम करत होतो. तीने पण सोसायटीत दोन कामे मिळवली होती. सगळे कसे छान चालले होते. आमचा संसार फुलला होता, त्याला दोन फळेबी आली होती.

एक दिवस ती काळरात्र आली. खरे तर गेली चार दिवस तुफान पाऊस पडत होता. पण आज जरा पावसाने रौद्ररुप धारण केले होते. कडाडणाऱ्या वीजा काळजात धडकी भरत होत्या. संध्याकाळी मालक गेला तसे मी गेट बंद करुन झोपडीकडे धाव घेतली. घराबाहेर पडता येत नाही म्हणून पोर कंटाळून गेली होती. त्यांच्याशी गप्पागोष्टी करता करता रात्र झाली. पावसाच्या आवाजाने झोप लागणे अशक्य होते, तरी दिवसभराच्या थकव्याने कशीबशी झोप लागली.

मध्यरात्री धडाम् करुन मोठा आवाज झाला. बायकोला पोरांपाशीच ठेवून मी बाहेर धावलो. सोसायटीच्या भिंतीला लागून असलेले मोठे झाड जमिन खचल्याने सोसायटीच्या कंपाउंड वॉलवर कोसळले होते. त्या कंपाउंड वॉलवर जीला लागून माझी झोपडी होती. मी मदतीसाठी धावणार तेवढयात दुसऱ्यांदा मोठा धडाम् आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर माझी दातखीळ बसली. कारण तो आवाज कंपाउंड वॉलची भिंत कोसळल्याचा होता. आणि त्या भिंतीखाली माझी संसार वेल तीला आलेली फळे सारे काही दबले गेले होते. त्यांचा आक्रोश त्या मातीखाली दाबला गेला होता कायमचाच.

माणूस मातीतून जन्म घेतो आणि मातीतच संपतो असे म्हणतात. मी आज ते अनुभवत होतो. मला राहून राहून माझ्या भोळ्याभाबड्या बायकोने जे वाक्य वाचले होते ते आठवत होते, ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |”.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

टीप: इथे “अंबुजा सिमेंट” हे नाव एक उदाहरण म्हणून घेतले आहे. प्रत्यक्षात माझा त्या कंपनीशी कोणताही हेवादेवा नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(मंगळवारी संतोष ऑफिसमधून येताना दारातच सायली त्याची वाट पहात उभी असलेली दिसली. तो मोहरला, त्याला लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठवले, तेव्हाही सायली अशीच त्याची वाट पहात दारात तिष्ठत असायची हे त्याला आठवलं. आणि त्या धुंदीत तो तिला जवळ घेणार इतक्यात ती त्याला म्हणाली, “चला, पटकन सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ या, नाहीतर बंद होईल ते.”) – इथून पुढे —- 

ती रोमँटिकली नव्हे, प्रॅक्टिकली दारात उभी राहिली होती.

तो उलट पावली निघाला, आणि ते दोघं सर्विस सेंटरला पोचले.

“साहेब, मी आठवडाभरात पार्ट येईल म्हणून सांगितलं होतं, ” तो टेक्निशियन ठामपणे म्हणाला.

“अहो, नाही हो, मंगळवारी येणार म्हणाला होतात तुम्ही, म्हणून तर मी ऑफिसमधून तडकाफडकी इथे आलो, ” तो काकुळतीला येत म्हणाला.

पण टेक्निशियन त्याच्या (नव्या) वाक्यावर ठाम राहिला. आणि असंही तो पार्ट आलाच नसल्याने, फोन अजूनही बंदच होता. त्याची तपासणी होण्याचा आणि त्यानुसार त्याला दुरुस्त करण्याचा प्रश्नच नव्हता.

“चष्मा दुरुस्तीला टाकल्यावर किंवा नवा करायला टाकल्यावर कसा टेम्पररी दुसरा चष्मा देतात, तशी काही सोय नाही का तुमच्याकडे ?” संतोषने चेष्टेने, पण खरं तर मनापासून विचारलं. टेक्निशियनने अर्थातच नकार दिला.

शनिवारी – फोन दुरुस्तीला दिल्यावर आठवड्याभराने यांना फोन करायचा अशी खुणगाठ बांधून ते दोघं तिथून (रिकाम्या हाताने) घरी परतले.

शनिवार – याचा सुट्टीचा दिवस. हा मुद्दाम दुपारी जेवण होईपर्यंत थांबला, पण सर्व्हिस सेंटरहून काही फोन आला नाही. शेवटी यानेच वाट बघून सर्व्हिस सेंटरला फोन केला. फोन उचलला गेला, तिथल्या माणसाला त्याने आपल्या फोनची डिटेल्स सांगितली, फोन दुरुस्तील कधी दिला होता आणि चार्जिंग सॉकेट आलं का ? हे सगळं विचारलं.

त्या माणसाने तो फोन तसाच चालू ठेवून, आतमध्ये दुसऱ्या कुणाकडे तरी विचारणा केली. आणि बऱ्याच वेळाने सांगू लागला, “नाही, ते काय झालं आहे की आमचा कंपनीला ऑर्डर द्यायचा आयडी ब्लॉक झाला आहे. त्यामुळे तुमची ऑर्डर गेलेली नाही अजून. चार्जिंग सॉकेट अजून आले नाही अजून, पण दोन-चार दिवसांनी येईल. “

इतका वेळेपर्यंत संतोषचा राग धुमसत होता. न राहवून तो शेवटी त्या माणसाला म्हणाला, “पहिल्यांदा तुमच्या माणसाने तीन दिवसात येईल म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर सात दिवसांनी सांगितलं, पण एकदाही तुम्ही स्वतःहून कळवण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि आता मी स्वतः फोन केल्यावरती मग तुम्ही उपकार केल्यासारखं सांगताय, की अजून चार दिवसांनी बघा. हे काही योग्य नाही. ” 

समोरच्याचा या बोलण्याने अपमान झाला बहुतेक, कारण तो सांगू लागला, “आम्ही इथे पाचच टेक्निशियन आहोत, ५००च्यावर फोन आमच्याकडे आहेत. कसं बघायचं आम्ही ? आणि ही उपकार करण्याची वगैरे भाषा करू नका. ” 

संतोष आता मात्र पुरता वैतागला होता. “तुम्ही एक काम करा, तो फोन राहू देत तसाच. काही त्याच्यासाठी सॉकेट मागवायची गरज नाहीये. माझा फोन मी परत घेऊन जातो. “

त्या टेक्निशियनला संतोषच्या या पवित्र्याची कल्पना नव्हती. “नाही, येईल दोन दिवसात तो पार्ट नक्की, ” असं म्हणू लागला.

“नको मला तो पार्ट. आला तर तुमच्याकडेच ठेवून घ्या. मी येतोय आणि फोन घेऊन जातोय. ” असं म्हणून तिरीमिरीत संतोष त्या सर्व्हिस सेंटरला गेला आणि आपला फोन ताब्यात घेतला.

पण असा न दुरुस्त केलेला फोन घेऊन त्याला घरी परतायचं नव्हतं. मग google वरती शोधून त्याने जवळचे दुसरे सर्व्हिस सेंटर शोधले. ते चांगले दहा किलोमीटर दूर होते. पण तरीही संतोष तसाच तो फोन घेऊन त्या सर्व्हिस स्टेशनला गेला.

तिथे काउंटरवर बसलेल्या माणसाला त्याने तो फोन दिला, ‘बंद पडला आहे’ सांगितलं. त्या माणसाने फोन चार्जिंगला लावला आणि काय आश्चर्य ! त्याच्यावरती फोन चार्ज होत असल्याचे चिन्ह आले. तो माणूस म्हणाला, “यात काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. फोन तर चार्ज होतोय. ” 

संतोषला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. तो माणूस म्हणाला, “पाच मिनिटे थांबा. बॅटरी पूर्ण उतरली आहे. त्यामुळे एवढ्यात हा फोन चालू होणार नाही. आपण पाच मिनिटांनी बघू. ” 

पाच दहा मिनिटांनी बॅटरी साधारण १२ टक्के चार्ज झाली होती. त्या माणसाने फोन चालू केला. फोन चालू झाला. संतोषने व्हाट्सअप उघडून बघितले, युट्युब लावून बघितले आणि फोन व्यवस्थित चालतो आहे हे लक्षात आल्यावर त्याने फोनवरून घरी फोन लावला.

बायकोने फोनकॉल उचलला आणि कॉलर आयडीवर स्वतःच्याच फोनचा नंबर बघून ती आश्चर्यचकित झाली. “अय्या, फोन दुरुस्त झाला ! काय केलं ? किती खर्च झाला ?”

संतोष म्हणाला, “घरी आल्यावर सांगतो. आता चार्जिंग कमी आहे. ” फोनवरील संभाषणसुद्धा एकमेकांना व्यवस्थित ऐकू येत होते. संतोषने व्हिडिओ कॉलसुद्धा करून बघितला.

फोन छान चालू होता.

त्याने प्रश्नार्थक नजरेने या सर्व्हिस सेंटरच्या टेक्निशियनकडे पाहिले,

तोही हसला, म्हणाला, “सर, फोन व्यवस्थित चालू आहे तुमचा. घेऊन जा परत. ” 

संतोषने विचारले, “किती रुपये द्यायचे ?”

तो म्हणाला, “कशाचे पैसे ? मीतर काहीच केलेलं नाही. ” मग संतोषने त्याला आजवरची रामकहाणी सांगितली. त्यावर तो म्हणाला, “कुठेतरी ओला हात लागला असेल फोनला कदाचित, त्यामुळे तत्कालीक बिघाड झाला असेल. गेल्या आठ दिवसात तो ओलावा निघून गेला, ते मॉइश्चर उडून गेलं आणि फोन पुन्हा चालू झाला. ” 

अशा रीतीने एकही पैसा खर्च न करता बिघडलेला फोन दुरुस्त झाला होता आणि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली होती.

– समाप्त –

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

सकाळची वेळ, नेहमीप्रमाणे सायली देवपूजा करत होती. मोबाईलवर यू ट्यूबवर काही भजन लावलेले होते, आणि अचानक सायलीने संतोषला – तिच्या नवऱ्याला हाक मारली, “संतोष, बाबा रे, हा फोन बघ रे. भजन चालू असता अचानक बंद पडला आहे, आणि स्क्रीन बघ कसा झालाय. . . “.

संतोषने तिचा फोन हातात घेतला. जुन्या काळी अँटिनावाले टीव्ही असताना, सेटिंग बिघडलं की टीव्हीवर कसं रंगीबेरंगी वाकडंतिकडं चित्र येऊन ते चित्र तसंच फ्रीज व्हायचं, तसं काहीतरी स्क्रीनवर दिसत होतं.

“मिशन मंगळ” चित्रपट पाहून आणि आजवरच्या अनेक प्रत्यक्ष अनुभवांनी, विशेषतः फोनबाबतीत असं काही बिघडलं की फोन “रिस्टार्ट” करायचा, ९९% वेळा चूक दुरुस्त होते आणि काम पुन्हा सुरळीत सुरू होते, हा त्याचा अनुभव.

त्यानुसार त्याने रिस्टार्टसाठी फोनचे बटण दाबले. पण फोन रिस्टार्ट झालाच नाही.

तो पूर्णच बंद झाला.

“बॅटरी किती टक्के चार्ज होती ग? ” त्याने पृच्छा केली.

“होती, ६०-७०% तरी होती. ” ती.

याने तरी फोन परत चार्जिंगला लावला. तो थोड्या थोड्या वेळाने फोन तपासत होता, पण काहीच धुगधुगी नव्हती.

याने तिच्या भाच्याला फोन केला. तो नव्या जमान्याचा प्रतिनिधी या नात्यानेही आणि तो तिच्या माहेरचा होता या नात्यानेही, अशा दोन्ही कारणांनी, सर्वच गोष्टींमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं.

आणि कदाचित खाजगीत त्याने कबूलही केलं असतं, की या भाच्याला अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये चांगली गती होती.

तर त्या एवंगुणविशिष्ट भाच्याला फोन लावला गेला. पेशंटची लक्षणं आणि सद्य परिस्थिती सांगितली गेली.

“काका, फोन पाण्यात पडला होता का? ” भाचा विचारता झाला. त्याचं हे संबोधन संतोषला मुळीच आवडायचं नाही. सायली त्याची आत्या, पण भाचा तिला “ताई” म्हणायचा, आणि याला “काका”! झाले असतील थोडे केस कमी, पण म्हणून काय लगेच “काका” म्हणायचं?

पण नेहमीप्रमाणे त्याने आलेला राग गिळला.

“नाही रे, ती म्हणाली नाही तसं काही”. तो विनम्रतेने म्हणाला.

“मग, usually, तुम्ही म्हणता तसा स्क्रीन झाला, तर motherboard चा प्रॉब्लेम असतो. Motherboard बदलायचा म्हणजे पाच दहा हजार रुपयांचा तरीचा खर्च असतो. पण काका, त्यापेक्षा तुम्ही ताईला नवीन फोनच घेऊन द्या ना. दोन वर्षं झाली ती हाच फोन वापरती आहे, ” तिच्या माहेरच्या भाच्याला – नेहमीप्रमाणे – तिचा पुळका आला होता.

“हो का? आणि मग मी पाच वर्षं झाली तोच फोन वापरतोय, ते दिसत नाही का तुला लेका! ” असं जहाल उत्तर त्याच्या तोंडी आलं, पण नेहमीप्रमाणे अत्यंत समजूतदारपणे त्याने ते गिळून टाकलं.

पण पाचेक हजाराची फोडणी बसू शकते, हे ज्ञान त्याला झालं.

त्यापेक्षा फोन सर्व्हिस सेंटरला तपासणीला न्यावा हा एक पर्याय त्याच्या हे लक्षात आला.

पूर्वी परीकथांमध्ये जसा राक्षसाचा जीव कुठल्यातरी डोंगरावरच्या पिंजऱ्यातल्या पोपटात असायचा, तसा हल्ली प्रत्येकाचा प्राण त्याच्या मोबाईलमध्ये अडकलेला असतो. बायकोच्या मोबाईलचे लॉक अगदी नवऱ्यालासुद्धा ओपन करता येत नसते आणि त्याच्या फोनला तिनं हात लावला, तर त्याचा जीव एकाच वेळी घाबराघुबरा आणि कासावीस दोन्ही होतो, अशी परिस्थिती.

तर, तो मृतप्राय झालेला फोन घेऊन या दोघांची वरात सर्व्हिस सेंटरला निघाली. फोनचा वॉरंटी काळ संपला असल्यामुळे आलेला खर्च आपल्यालाच भोगायचा आहे, हे त्याला दिसत होतं. आणि “तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, ” असं स्वतःला बजावत तो सर्व्हिस सेंटरला पोचला.

सायलीचा, संतोषच्या बायकोचा फोन बिघडला होता. म्हणून फोन दुरुस्तीला टाकण्यासाठी ते दोघं सर्व्हिस सेंटरला पोचले. आधी तिच्या भाच्याला याने फोन कसा बंद पडला ते सांगितलं होतं. आता त्याने पुन्हा सगळी रामकथा त्या सर्व्हिस सेंटरला काऊंटरवर जो पोरसवदा इंजिनियर बसला होता, त्याला सांगितली.

“अंकल, फोन भिजला होता का पाण्यात? ” 

या नव्या पिढीचं आपण काय घोडं मारलंय, कोण जाणे. एक जण “दादा” म्हणेल तर शप्पथ. त्याच्या मनात विचार येऊन गेला.

मग पुन्हा कथानकाचा फ्लॅशबॅक देण्यात आला.

जणू हा त्या तिच्या भाच्याचा “मेले मे बिछडा हुवा भाई” असावा तसं त्यानेही motherboard बद्दल शंका व्यक्त केली.

“पण हा चार्ज का होत नाहीये, ते बघायला पाहिजे. कदाचित याचं चार्जिंग सॉकेट बिघडलं असेल, म्हणून हा प्रॉब्लेम आला असेल. “

“बरं, मग आता काय करावं लागेल? ” संतोष विचारता झाला.

“तुम्ही असं करा, हा फोन इथं ठेवून द्या. फोनचा imei नंबर ठाऊक असेल ना तुम्हाला? ” 

प्रत्येक फोनला एक स्वतंत्र imei क्रमांक असतो आणि त्या क्रमांकावरून त्या फोनची इत्थंभूत माहिती मिळते, हे त्याला माहीत होतं, पण बायकोच्या फोनची एवढी कुंडली त्याला पाठ नव्हती.

“बघतो, घरी फोनचा box आहे ठेवलेला, त्यावरून सांगतो, ” संतोष.

“आमच्याकडे या मॉडेलचे चार्जिंग सॉकेट आहे का ते बघतो. नसेल तर मागवून घेतो. आज शनिवार आहे, मंगळवारपर्यंत येईल. मग ते सॉकेट लावतो, फोन चालू करतो, आणि मग काय प्रॉब्लेम आहे ते बघतो. ” वत्सा, तुजप्रत कल्याण असो या थाटात तो टेक्निशियन वदता झाला.

“आणि अंकल, कदाचित काही serious problem नसेलही, ” त्याच्या या आशावादी वाक्याने संतोषचा जीव थोडा भांड्यात पडला, “तुम्ही माझा हा नंबर घ्या, मला संध्याकाळपर्यंत फोन करा, मी तुम्हाला स्टेटस सांगतो. ” असं म्हणत त्याने मोबाईलवर संतोषच्या नाव नंबरची चिठ्ठी लावली आणि यांना निरोप दिला.

मंगळवारी संतोष ऑफिसमधून येताना दारातच सायली त्याची वाट पहात उभी असलेली दिसली. तो मोहरला, त्याला लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठवले, तेव्हाही सायली अशीच त्याची वाट पहात दारात तिष्ठत असायची हे त्याला आठवलं. आणि त्या धुंदीत तो तिला जवळ घेणार इतक्यात ती त्याला म्हणाली, “चला, पटकन सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ या, नाहीतर बंद होईल ते. “

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केस आणि नातं…. ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ केस आणि नातं…. ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“केस आणि नातं यामध्ये साम्य आहे. जोपर्यंत बंधनात असतं, तोपर्यंत बांधिलकीच आहे. एकदा का मोकळं सोडलं की दोघांचाही गुंता होतो.”…….

माझ्या लहान बहिणीला, अनघाला बघायला आज देशमुख कुटुंब आले होते. आमच्या सारखाच मध्यमवर्गीय परिवार. घरी आई- वडील, बहीण, भाऊ, आजी -आजोबा आहेत. मुलाला एक बहिण, एक भाऊ आहे हे ऐकून छान वाटलं. आम्ही दोघी बहिणीच व आई-बाबा. आजी आजोबा येऊन जाऊन असतात. आज या कार्यक्रमाला आवर्जून आले आहेत. आणि आता एक नवीन सदस्य परिवारात सामील झालाय, तो म्हणजे माझा नवरा. देशपांड्यांचा मोठा जावई……

आजचा हा कार्यक्रम जरा ‘हटके’ झाला. दोन्ही घरची सर्व मंडळी एकत्र आली होती. तीन पिढ्या एकत्र बसल्या होत्या. आम्ही सात जण, आणि तेही सातच होते.

सकाळ पासून तयारी चालू होती. उगाच दिखावा करणे, जे नाही ते दाखविणे, ही पद्धत आमच्या घरी नाही. जे आहे त्यात ‘The Best’ करायचा प्रयत्न असतो आमचा. अशा परिस्थितीत टेंशन नसते. जमवा जमवी, लपवाछपवी नसते. विचारांचा किंवा वस्तूंचा सरळ, सोपा, साधा हिशोब असतो. दिखावा नसला तर, बोलणेही आरामात होते. काय बोलायचे? ? अन् काय लपवायचे? ? मुद्दाम काय सांगायचे? ? दाखवायचे? ? असे विचार मनात येत नाही. ‘Manipulations’ नसतात. उगीच’ self created tension’ नसते. आणि या अशा कार्यक्रमांत तर अजिबात नकोच. असे संबंध जे नेहमी करिता असतात, तेथे स्पष्टता असणे हे सर्वात आवश्यक, प्रमूख कर्तव्य व मुद्दा असावा…..

अजय देशमुख परिवार, आमच्या देशपांडे परिवारापेक्षा थोडा उजवाच असावा असा आमचा अंदाज होता. दोघे भाऊ नोकरीत, बहिण पण चांगली शिकलेली व लग्नाचीच आहे…..

आमची अनघा पण चांगली शिकलेली. सध्या नोकरीच्या शोधात आहे…..

आज देशमुखांच्या घरी आम्हाला बोलविले आहे. “तुम्ही पण आमचे घर बघावे अशी आमची इच्छा आहे.” असे देशमुख आजोबांनी, आमच्या आजोबांना फोन करून आमंत्रण दिले. बहुतेक ‘हो’ कडे कल असावा, असा आम्ही अंदाज बांधला…..

आता आमचा निर्णयही आम्हाला घ्यायचा होता. ‌आजतर अगदी गोलमेज परिषदच भरली. खूप गोष्टी झाल्या. या भेटीत ज्याने जे बघीतले, त्यावरून अनुमान काढले. त्यासंदर्भात गोष्टी झाल्या. प्रत्त्येक व्यक्तीने आपल्या वयानुसार अवलोकन केले व चर्चेत भाग घेतला. एकंदरीत परिवार चांगला आहे असे फायनल ‘conclusion’ निघाले. अनघा ला पण अजय पसंत पडला असावा असे वाटले…..

ज्या घरी तीन पिढ्या एकत्र राहतात. तेथील बऱ्याच गोष्टी न सांगताच कळतात. त्यांचे आपापसातील संबंध adjustments चांगले असावे. जूनी पिढी घरी म्हणजे बऱ्यापैकी नियम, सणवार असावेत असा आमचा समज झाला.

वर वधू शोधणे किंवा बघणे म्हणजे सूरवात, अंदाज, समज, judgementsच असतात. जे आपण बघतो, त्यावरून काही तरी ठरवतो. खरं काय आहे? ? ? हे कळायला तर आयुष्यही कमी पडतं…..

आज आम्ही श्री देशमुखांच्या घरी गेलो. ही आमची दुसरी भेट. यावेळी वातावरण जास्त सहज होतं. ओळख झाल्यावर थोडं मोकळं वाटतं. आता दोन्ही आजोबा, आजी, आई- वडील आपले जूने प्रसंग, नोकरी बद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल बोलत होते. Young generation आपल्या नोकरीच्या, projects, politics, cricket, picture अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात दंग होती. एकंदरीत “every thing was going well.”….

आता मात्र पूढच्या गोष्टी करायची वेळ आली होती. आज आजी -आजोबा, आई- बाबा अनघा शी बोलणार होते. आपल्या अनुभवातून काही गोष्टी सांगणे, समजाविणे गरजेचे असते. 

बाबा म्हणाले, “तूझाच निर्णय महत्त्वाचा आहे अनघा. आपल्याला एकतर घाई नाही. तुझ्यावर काहीही दबाव नाही. फक्त व्यवस्थित विचार कर व निर्णय घे. आज नाही तर उद्या लग्न करायचे आहेच. कोणताही मुलगा आपण शोधला तरी adjustment ही असतेच. ते दोघांना अगदी शेवटपर्यंत करायचे असते. फक्त काही वर्षांनी त्याची सवय होते. सुरवातीला जपून, सांभाळुन, शांत राहून वागायचे असते. बोलण्यापेक्षा ऐकायचे काम जास्त करायचे. सर्व चांगलं, अगदी तूझ्या मनासारखं येथे आपल्या घरी पण नेहमीच होतं असं नाही. आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर असणार आहोत. पण तुझ्या चूकीचे, चूक वागण्याचे, चूकीच्या गोष्टींचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही.

लग्न झाल्यावर काही नियम पाळणे अपेक्षित असतेच. घरचे, समाजाचे नियम, शिस्त असते व त्याप्रमाणेच वागणे अपेक्षित असते. याला बंधन समजले तरी चालेल. सूखी संसारासाठी असे नियम, शिस्त पाळलीच पाहिजे.

म्हणतात ना, ‘केस आणि नातं यांत साम्य आहे, जोपर्यंत बंधनात असतं तोपर्यंत बांधिलकीच. एकदा का मोकळे सोडले की दोघांचाही गुंता होतो…..”

बाबा पुढे म्हणाले, “रोज नवीन समस्या समोर येतील. त्या स्वतःच सोडवायचा प्रयत्न करायचा. रोज उठून आईला, आजीला फोन करायचा नाही. तुझ्या घरच्या चांगल्या गोष्टी ऐकायला आम्हाला आनंदच होईल, पण लहान सहान तक्रारींचा पाढा उठसूट वाचायचा नाही. याचा अर्थ काहीही सहन कर असे माझे म्हणणे नाही.

सुरुवातीपासूनच काही नियम पाळायचेच. आम्ही तुझ्या बरोबर नेहमी आहोतच. मित्र मैत्रिणींच्या सल्ल्यापेक्षा घरच्यांचा सल्ला घ्यावा. घरचे घरचेच असतात. बाहेरच्यांना आपल्या घरात शिरायची परवानगी द्यायची नाही. ‘स्पर्धा व तुलना’ या भानगडीत पडायचे नाही. आपल्या नशिबात जे असेल, जेवढं असेल, ते आपल्याला मिळतच. Be patient. Every thing comes to you in the right moment.” 

आज देशपांडे व देशमुख परिवार पुन्हा एकत्र बसले आहेत. अजय अनघाने सर्वांसमोर पसंती दिली आहे. दोन्ही कुटुंबे पुढच्या तयारीला लागली आहेत. लवकरच बार उडणार आहे.

अनघाचा सध्या ‘Training Period ‘सुरू आहे. ज्या प्रमाणे कुंभार ओल्या मातीला हळुवारपणे, प्रेमाने आपला जीव ओतून त्याला आकार देतो, ‘Perfect’ भांडं बनवायचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर, प्रेम, काळजी, जिव्हाळ्यापोटी आई वडील मुलांना सांगत असतात, सावध करत असतात. पूढच्या येणाऱ्या संभाव्य गोष्टी लक्षात घेऊन मुलांना घडवत असतात. ही आई-वडिलांची जबाबदारीच आहे….

बरोबर आहे, 

‘मामुली से कांच के बर्तन का हम कितना ख्याल रखते हैं। ये तो संबंधोंकी बात हैं। संबंध तो अनमोल होते है, उन्हे सदैव संभालकर रखिए ।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोक्याचे वळण… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ धोक्याचे वळण… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(उद्या दुपारी तू काय करणार आहेस? उद्या आमच्या घरी येशील का? निरंजन दोन दिवस दौऱ्यावर चाललाय. कोण जाणे, मला नंतर तुझ्याशी बोलायला सवड मिळेल न मिळेल” नक्की ये ग मी वाट बघते. ” बिल देऊन त्या देवांगीबरोबर बाहेर पडल्या.) इथून पुढे —– 

तेवढ्यात स्वरा आली. झालं बाई माझं काम. म्हणाली आणि तो विषय तिथंच राहिला.

सध्या आईला यातलं काहीच सांगायला नको असं ठरवून देवांगी दुसऱ्या दिवशी दुपारी अमला बाईंच्या घरी गेली.

शांत दुपार, झळा नसलेलं सौम्य ऊन आणि बंगल्यातली हवीहवीशी झाडांची शीतल सावली.

देवांगी घरात शिरली. अमला बाईनी हसून तिचं स्वागत केलं. ”आलीस? ये बस. तिला सरबताचा ग्लास देत त्या म्हणाल्या. निरंजन गेलाय नाटकाच्या दौऱ्यावर. म्हणून मी एकटीच निवांत आहे घरी. युनिव्हर्सिटीला टाकली आज सुट्टी. ”

इकडचं तिकडचं बोलून अमलाबाई म्हणाल्या, ”हे बघ. मी आत्ता बोलतेय ते नीट ऐकून मग तुझा काय तो निर्णय घे. इतकी शिकलेली डॉक्टर मुलगी तू, तुझ्याबद्दल फार वाटतं म्हणून सांगते. तुझ्यात मला हळवी भाबडी अमलाच दिसते. ”

अमलाबाई म्हणाल्या, ” मीही तेव्हा लहानच होते ग. फक्त अठरा वर्षाची. दिसायला सुंदर आणि खूप हुशार. त्या दिवशी कॉलेजमध्ये भय्यासाहेब आले. कॉलेज गॅदरिंगचे नाटक बसवायला. किती रुबाबदार, छान त्यांची पर्सनॅलिटी ग. कोणीही भाळून जावे अशीच. मी नाटकात नायिका होते आणि देवेश हिरो. किती हुशार होता देवेश. आमची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली. त्या वर्षी नाटयोत्सवातली सगळी बक्षिसं आमच्या नाटकाला मिळाली. देवेशचे पाय जमिनीवर होते. त्याला पुढे खूप शिकून परदेशात जायचे होते. नाटकाचे वारे संपले आणि देवेश झटून अभ्यासाला लागला. मी मात्र अजून त्याच धुंदीत होते. दरम्यान भय्यासाहेब मला सतत भेटत, सांगत, ‘तुझा जन्म फक्त नटी, उत्तम स्टेज आर्टिस्ट म्हणून झालाय अमला. हे लौकिक शिक्षण कसलं घेऊन बसलीस? मला तुझ्यात खूप मोठी भावी नटी दिसते. मी घडवीन तुला ‘लहान कोवळं वय ग ते. कोणी स्तुती केली की हुरळून जाण्याचं. त्यातून मला बाहेर काढलं ते माझ्या वडिलांनी…. ‘ हे बघ अमला. तू अतिशय हुशार जिनिअस मुलगी आहेस. त्या भय्यासाहेबांच्या नादाला लागू नकोस. माझ्या कानावर गोष्टी येत नाहीत असं वाटलं का तुला? आज चलच त्या नाटक्याच्या घरी. ‘…. मला ते भय्यासाहेबांच्या घरी अचानक त्यांना न सांगता घेऊन गेले.

दोन खोल्यातलं चाळीतलं घर. त्यांची अगदी साधीसुधी खेडवळ बायको आणि खेळत असलेली दोन मुलं. फाटका बनियन घालून बसलेले भय्यासाहेब आणि डाय उडल्यामुळे दिसणारे पांढरे केस. आणि त्या घरात जागोजागी दिसणारं दारिद्र्य. आम्हाला अचानक बघून ते हादरलेच आणि विलक्षण खजील झाले.

एक अक्षर न बोलता माझे वडील मला घरी घेऊन आले. मला म्हणाले. ”बघितलंस? बघितलास तो संसार? सांगितलं होतं का त्यांनी की त्यांचं लग्न झालंय दोन पोरं आहेत त्याला. हे? मूर्ख मुली. भानावर ये. “

मी हे सगळं बघून घाबरून गेले. त्याक्षणी मी शपथ घेतली, मी कधीही भय्यासाहेब, ते नाटक यांच्या नादाला लागणार नाही. किती उपकारच केले बाबांनी माझ्यावर.

मी झटून अभ्यासात लक्ष घातले. सतत पहिली येत गेले आणि माझ्या आवडीच्या गणित विषयात पीएचडी केलं. बाबांनी माझं लग्न सरदार नाईकांशी लावून दिलं. अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असलेल्या हेमंत नाईकांशी. अतिशय सुंदर संसार केला आम्ही. हा निरंजन आमचा एकुलता एक मुलगा. लहानपणी खूप हुशार गुणी मुलगा ग. पण पुढे त्याचं अभ्यासातून लक्षच उडलं. एका नाटकात यश मिळतं काय आणि हा वेडा त्यातच करिअर करायचं म्हणतो काय. आम्ही दोघेही त्याला सांगून थकलो पण त्याने ऐकले नाहीये अजूनही.

दोनच वर्षांपूर्वी नाईकसाहेब अचानक कॅन्सरने गेले. सुदैवाने आम्हाला भरपूर पैसा आहे, चार घरं आहेत. पण हा मुलगा नीट शिकला नाही याची खंत होतीच त्यांनाही.

“हा माझा मुलगा बुद्धीने आमच्या दोघांसारखा हुशार नाही. अगदी बेताचा आहे ग. नुसतं रूप उपयोगाचं नसतं ग देवांगी. त्याला हे सांगून कधीही समजलं नाही. तू त्याच्यापेक्षा फार सुपिरिअर आहेस बाळा. नुसत्या त्याच्या देखण्या रूपावर आणि हवेत इमले बांधण्याच्या स्वभावावर जाऊ नकोस. नुसतीच मोठी स्वप्ने बघून आणि चार नाटकात किरकोळ कामे करून, या मुलाचा जगात निभाव लागणार नाही हे स्पष्ट दिसतंय मला.. तू त्याच्याशी लग्न केलंस तर चारच महिन्यात तुला तुमच्या बुद्धीतली तफावत जाणवेल आणि मग तो कायम तुझा अपमान करत राहील. तुला हीन लेखत जाईल. तो हे माझ्याशी करतोच ना. माझा हेवा वाटतो त्याला. मी लक्ष देत नाही ते सोड. देवांगी, मला त्या मोहाच्या क्षणी माझ्या वडिलांनी वाचवलं, म्हणून मी आज आहे अशी सन्मानाने जगताना दिसतेय जगाला. माझ्याच मुलाच्या उणिवा तुला सांगताना मलाआनंद होत नाहीये ग. पण देवांगी, मला तुझ्यात भाबडी अमला दिसली म्हणून मी हे तुला सांगितलं. तुझ्या बुद्धीच्या तोलामोलाचा सुरेख साथीदार तू शोध. या नाटकाच्या दुनियेत पाऊल टाकू नको मुली. ” अमलाबाईनी डोळे पुसले.

देवांगी हे ऐकून हेलावून गेली. तिचे डोळे भरून आले.

“काकू, मी आततायीपणे कोणताही निर्णय घेणार नाही. खूप खूप आभारी आहे मी तुमची. मी नक्की पाऊल पुढे टाकलं असतं आणि जन्मभर नशिबी आली असती ती होरपळ.

देवांगी अमलाबाईंच्या पायाशी वाकली. त्यांनी तिला मिठीत घेतलं.

आज विमानात बसल्याबसल्या देवांगीला हे सगळं आठवलं. किती वर्षे झाली या गोष्टीला.

देवांगी स्कॉलरशिप घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. पेडिएट्रिक डेंटल सर्जरीत मास्टर्स करून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदावर होती देवांगी.

तिच्याही आयुष्यात किती घटना घडल्या. तिचाच बॉस असलेल्या हर्ष मराठेने तिला मागणी घातली आणि त्यांचे भारतात येऊन लग्नही झाले. तेव्हा अमलाबाईना भेटणं जमलं नाही पण या भेटीत मात्र आपण अमला बाईना भेटायचेच असं देवांगीने ठरवलं आणि तसं हर्षला बजावून सांगितलं सुद्धा.

हर्षच्या आईवडिलांना भेटून झाल्यावर अचानकच देवांगी हर्षला घेऊन अमला बाईंच्या बंगल्यावर गेली.

बंगला होता तसाच होता. थोडा आणखी वृद्ध झालेला.

बेल वाजवून बाहेर थांबली देवांगी. दार उघडायला आला तो निरंजन. हिला बघून तर धक्का बसलेला स्पष्ट दिसला त्याच्या चेहऱ्यावर. सुंदर, अजूनही तरुण असणारी, दिसणारी, बुद्धीचं तेज आणि संपन्न देशातली संपन्न रहाणी अंगोपांगी दर्शवणारी देवांगी. आणि तिच्या मागे सुंदर, उत्तम पोशाखात उभा असलेला हसतमुख देखणा रुबाबदार पुरुष.

— निरंजनने स्वतःकडे बघितलं. विरळ झालेले केस, सुटलेले पोट डोळ्याखाली वर्तुळं आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या. गबाळा घरी घातलेला पायजमा. या या ना म्हणत निरंजन मागे झाला.

देवांगीने विचारलं, ” कसा आहेस निरंजन? अमलाबाई कुठे आहेत? “

चाहूल ऐकून अमलाबाई बाहेरआल्या. क्षणभर त्यांनी देवांगीला ओळखलेच नाही.

मग मात्र, ” देवांगी, तू? ” म्हणत त्यांनी तिला मिठी मारली.

“अमला काकू, आहात तशाच आहात तुम्ही. “

” बस ग बस त्या म्हणाल्या. ” संकोचून निरांजन शेजारी उभा होता.

” निरंजन, अमला काकू, हे माझे मिस्टर डॉक्टर हर्ष मराठे. अमेरिकेला असतो आम्ही. “

अमला काकूंना देवांगीने आणि हर्षने वाकून नमस्कार केला. त्यांच्या हातात सुंदर स्वेटर, तिकडची चॉकलेट्स आणि निरंजनला एक छान टी शर्ट दिला.

” काकू, तुम्ही म्हणाला होतात तसा हा मिस्टर राईट मला तिकडे मिळाला. माझ्यापेक्षा काकणभर सरसच आहे हा. तुमचे आभार कसे मानू हे समजत नाही मला.

एखाद्या क्षणी देवदूत यावा तशा माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदलून गेलं. फक्त तुमच्यामुळे काकू. नाहीतर मी भलता निर्णय घेतलाच असता. “

अमला काकू हसल्या. ” छान आहे ग तुझा जोडीदार. जावईबापू, आवडलात तुम्ही मला खूप.  

निरंजन आत गेल्यावर त्या हळूच म्हणाल्या, “बघ देवांगी. तू घेतलेला निर्णय योग्य ठरला. निरंजनचे काहीही होऊ शकलं नाही ग. घुसमट झाली त्याची आणि आता तर घरीच असतो. उशिरा समजलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेच ग. तेव्हा आमचं ऐकलं नाही आणि नाटकात सिनेमात काहीही करिअर होऊ शकलं नाही, की नाही लग्न होऊ शकलं. मला आनंद आहे, तू यातून वाचलीस मुली. ” अमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. “वाईट वाटतं ग त्याचं मला, पण हाताने केलेल्या चुका या. ”

अमला बाईंचा निरोप घेऊन देवांगी आणि हर्ष बाहेर आले.

“हर्ष, तुला मी पूर्वीच हे सगळं सांगितलं आहे रे. आज मी निरंजनशी लग्न करायची घोडचूक केली असती तर माझी अशीच वाईट अवस्था झाली असती. मला वाचवलं ते मोठ्या मनाच्या अमला काकूंनी. किती मोठं मन असेल त्यांचं, की आपल्या मुलाशी तू लग्न करू नकोस हे मला सांगणारं? “

काही न बोलता देवांगीला जवळ घेऊन ती आणि हर्ष बंगल्याच्या पायऱ्या उतरू लागले.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोक्याचे वळण… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ धोक्याचे वळण… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

 शिकागोहून येणारी फ्लाईट निघतानाच उशिरा सुटली. आता मुंबईला पोचायला उशीरच होणार हे देवांगीच्या लक्षात आलेच. बरोबर हर्ष ही होताच. देवांगीने विमानात हँडबॅग वरच्या कप्प्यात ठेवली आणि स्वस्थ डोळे मिटून बसली. हर्षने पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. देवांगीला नकळत गाढ झोप लागून गेली. एअरहोस्टेसने हळूच तिच्या खांद्याला हलवले आणि डिनर ठेवलंय असं सांगून ती गेली.

हर्ष आणि देवांगीने जेवण संपवलं आणि देवांगी पुन्हा झोपेच्या स्वाधीन झाली. खूप छान झोप लागली तिला. उठल्यावर म्हणाली, चला, निम्मा प्रवास तर झाला. आता आठ नऊ तासात येईलच मुंबई.

आज चारपाच वर्षांनी देवांगी आणि हर्ष मुंबईला येत होते. हर्षच्या आईला बरं नव्हतं आणि तसा दिराचा फोन आला म्हणून दोघेही येत होते मुंबईला.

देवांगीला नकळत मागची आठवण झाली.

किती वेगळं झालं आपलं आयुष्य ना. अचानक आपलं आयुष्य असं वळण घेईल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं.

देवांगी डेंटल कॉलेजमध्ये होती. कॉलेजच्या गॅदरिंगसाठी नाटक बसवायचं ठरलं आणि मुलं देवांगीला विचारायला आली.

”देवांगी, हिरॉईनचं काम करायला आम्हाला तुझ्याशिवाय कोणीच मिळत नाही ग. प्लीज नाही नको ना म्हणू. ”

” अरे, पण मी जन्मात कधी स्टेजचं तोंड पण नाही बघितलं. मला भीति वाटते रे बाबा. ” पण ऐकतील ती मुलं कसली. त्यांनी तिला तयार तर केलंच आणि वर तिच्या आईबाबांचीही परवानगी घेतली.

नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. नाटकाच्या दिग्दर्शनाला मुलांनी नुकताच प्रसिद्धीला येत असलेला नवीन दिग्दर्शक निरंजन नाईक ला बोलावले होते.

निरंजन अतिशय उत्साही, दिसायला अत्यंत देखणा, अगदी हिरो शोभेल असा होता. त्याची नाटकात सिनेमात जायची धडपड चालू होती आणि तशी छोटी मोठी कामेही मिळत होती त्याला. तालमी सुरू झाल्या आणि देवांगीला त्यात मजा वाटायला लागली.

निरंजन सांगे तसे ती लगेचच करून दाखवी. आकलनशक्ती छानच होती तिची. निरंजनला या हुशार मुलीचं फार कौतुक वाटायचं. इतकी सुंदर हुशार हसरी मुलगी आणि पुन्हा अभिनय पण किती छान करतेय. मी शिकवतो ते सगळं किती पटकन आत्मसात करते ही मुलगी.

नाटक अतिशय उत्कृष्ट झालं. मुलांनी अगदी डोक्यावर घेतलं. निरंजनचा कॉलेजने सत्कार केला. सगळी मुलं थोडयाच दिवसात नाटक विसरून अभ्यासाला जुंपली.

निरंजनच्या मनातून मात्र देवांगी गेली नाही. अतिशय आवडली त्याला ही मुलगी.

त्या दिवशी आपली मोटर बाईक घेऊन तो तिच्या कॉलेजवर आला.

“झाली ना एक्झाम? ”

“ हो बाबा. सुटले. तरी अजून पूर्ण दोन वर्षे जायची आहेत बाबा. कुठून आले मी डेंटिस्ट व्हायला देव जाणे.

तुमची मजा आहे ना? मस्त मनासारखं जगावं, छान स्टेज गाजवावं. मग काय? सिनेमात ऑफर्स आल्या की नाही? ”

“ तेच तर सांगायला आलोय तुला. बस मागे. “

देवांगी त्याच्या बाईकवर बसली आणि निरंजन सुसाट बाईक चालवू लागला. ”, अरे हळू ना. पडेन ना मी. ”मग मला धरून बस की. देवांगीने त्याला कमरेला विळखा घालत हळूच धरले.

शहराबाहेरच्या जरा दूर असलेल्या हॉटेलमध्ये दोघे शिरले.

कॉफी मागवल्यावर निरंजन म्हणाला ” मला एका मराठी सिनेमात ऑफर आलीय. चांगला रोल आहे, पैसेही छान देणार आहेत. ही तर सुरुवात आहे देवांगी. मग बघ मी कुठल्याकुठे जाईन. “

निरंजनचे सुंदर स्वप्नाळू डोळे भविष्याची स्वप्नं बघत होते. देवांगीला फार आनंद झाला आणि ती म्हणाली, ”खरंच. खूप मोठा नट होशील तू. सगळी पोटेंशिअल्स आहेत तुझ्यात निरंजन. ”

देवांगीला निरंजन आवडायला लागला. किती हँडसम आणि रुबाबदार पर्सनॅलिटी होती त्याची. कॉलेजमध्ये आला की उगीच नव्हत्या पोरी त्याच्या भोवती भोवती करत.

निरंजन काहीवेळा देवांगीच्या घरीही यायला लागला. तिच्या आईवडिलांशी बिनधास्त गप्पा मारायचा तो. बाबांना मोठं कौतुक वाटायचं या मुलाचं. ‘ किती ग देखणा आणि नम्र मुलगा आहे हा ‘, म्हणायचे बाबा.

आई मात्र म्हणायची देवांगी, ‘ मित्र म्हणूनच बरा आहे हा मुलगा. उगीच अडकू नकोस हं या उनाड मुलात.

नट म्हणे. तू डॉक्टर होणार आहेस हे विसरू नकोस बरं का. ” 

”नाही ग आई, असं कसं करीन मी? आमची चांगली मैत्री आहे एवढंच. ” देवांगी म्हणायची.

“असं असलं तर मग ठीक आहे. आम्ही मागासलेल्या विचारांचे नाही, पण आई म्हणून माझं कर्तव्य मी करणार, करत रहाणार. ” 

त्या दिवशी देवांगीला निरंजनने आपल्या घरी नेले. किती सुंदर जुन्या पद्धतीचा दगडी बंगला होता तो. जुन्या वैभवाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. हॉल तर फारच सुरेख होता.

निरंजनने आपल्या आईला बाहेर बोलावले. देवांगी त्यांच्याकडे बघतच राहिली. किती सुंदर होत्या त्या. पन्नाशी ओलांडली तरी त्यांचे रूप लपत नव्हते. निरंजनने रूपाचा वारसा कुठून घेतला हे देवांगीच्या सहज लक्षात आलंच.

“बस ना ग. तू देवांगी ना? आमचा निरंजन सांगत असतो तुझ्याबद्दल. खूप छान काम केलंस ना नाटकात? आणि डेंटिस्ट पण होते आहेस ना? शाब्बास”.. त्या तिच्याजवळ बसल्या. कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.

“ निरंजनच्या आई, तुम्ही काय करता? ”

देवांगीने कुतूहलाने विचारलं.

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “अग मी युनिव्हर्सिटीत मॅथेमॅटिक्स शिकवते. मी गणितात पीएचडी केलंय आणि आता पोस्ट ग्रॅज्युएट्सना शिकवते. “ 

देवांगी थक्क झाली. किती हुशार आणि बुद्धिमान होत्या त्या.

तिने सहज निरंजनला विचारलं, “ तू कशात डिग्री घेतली आहेस रे? मला माहीतच नाही तुझं शिक्षण. ”

निरंजन म्हणाला, “ बाई, तेवढं मात्र विचारू नकोस. ते सगळं आमच्या आईसाहेबांकडे दिलंय. तिच्या आग्रहापायी मी बीएस्सी केलं आणि मग नाटक हेच माझं करिअर मी ठरवलं आहे. मला डिग्र्या आणि त्या मळलेल्या वाटांवरून अजिबात जायचं नाहीये. ”

देवांगीने आईंकडे बघितलं. नापसंतीची सूक्ष्म आठी त्यांच्या कपाळावर उमटलेली दिसली तिला.

त्या किचनमध्ये गेल्या आणि जाताना म्हणाल्या, ” थांब हं. चहा आणते आपल्याला. आज आमच्या स्वयंपाकीणबाई रजेवर आहेत. ”

त्यांनी छान चहा करून आणला आणि बरोबर छानसं खायला देखील. , ”घे ग, आणि येत जा अशीच.

आवडेल मला अशी छोटी तुझ्यासारखी मैत्रीण. ” त्या हसून म्हणाल्या. त्यांच्या लोभस हसण्याच्या तर प्रेमातच पडली देवांगी. “ होहो, नक्की येईन मी काकू. ”

देवांगी घरी आली. आई ही देवांगीची सगळ्यात जवळची मैत्रीण. “ आई मी आज निरंजनच्या घरी गेले होते. काय ग सुंदर बंगला आणि त्याहूनही सुंदर त्याच्या आई. काय भारी बाई आहेत ग. ”

आई हसली. “ झाली का भेट अमला बाईंशी? छानच आहेत हो त्या. किती शिकलेल्या आणि जरा गर्व नाही ग आपल्या रूपाचा, शिक्षणाचा. मला काही फारशी माहिती नाही बाई त्यांची ”. आई म्हणाली.

त्यादिवशी देवांगीच्या मामेबहिणीचं, स्वराचं युनिव्हर्सिटीत काम होतं. “ देवांगी, चल की माझ्याबरोबर. येताना तुला मस्त ट्रीट माझ्याकडून. चल की ”.. स्वरा म्हणाली.

देवांगी हसत तयार झाली. “ चल चल. मस्त मजा करू. कित्ती वर्षात मी युनिव्हर्सिटी बघितलीच नाहीये ग”. दोघीजणी स्वराच्या कारने युनिव्हर्सिटीत पोचल्या. स्वरा कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये गेली आणि देवांगी बाहेर बागेत बसली.

“ देवांगी, इकडे कशी तू? ” सहज वर बघितलं तर अमलाबाई तिला हसून विचारत होत्या.

” आज युनिव्हर्सिटीत कुठं? ”

”अहो, स्वराचं, माझ्या बहिणीचं काहीतरी काम आहे म्हणून आलेय तिच्याबरोबर. ”

“ वेळ आहे ना अजून तिला? चल. आमच्या युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीन मधला झकास चहा नाश्ता देते तुला. ”

हो नाही म्हणायची सवड न देताच अमला बाई पुढे झपाट्याने चालल्या देखील. देवांगी धावत त्यांच्या मागे गेली. दोघीजणी एका टेबलाजवळ बसल्या. बाईंचा बराच दबदबा दिसत होता तिथे. अदबीने वेटरने विचारलं, “ मॅडम, नेहमीचाच ना नाश्ता? ” हसून ‘हो’ म्हणत त्या देवांगीकडे वळल्या.

“ मग? काय म्हणतेस? अजून किती वर्षं राहिली ग तुझी? पुढे काय प्लॅन्स आहेत तुझे? ”

देवांगी म्हणाली, “ एकच वर्ष काकू. मग माझ्या हातात डिग्री येईल. मला परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन करायची फार इच्छा आहे. बघूया कसं जमतं. तिकडे फिया मात्र अतिशय आहेत हो. बघू. नाहीतर मी इथे करीन मास्टर्स ” देवांगी म्हणाली.

अमलाबाई म्हणाल्या, “ तू तर नक्की करशीलच. हुशार मुलगी आहेसच तू. मला एकच सांग, स्पष्ट विचारते, निरंजन मध्ये किती गुंतली आहेस तू? त्याने तुला लग्नाचं विचारलंय का”

देवांगी गांगरली. चाचपडत म्हणाली, ”काकू मला खूप आवडतो तो. तो भेटला की मी अगदी भारून जाते त्याच्या बोलण्याने, त्याच्या व्यक्तिमत्वाने. पण तो गेला की मला समजतं की ही वाट माझी नाही. काय करू मी? जादूच होते माझ्यावर त्याच्या वागण्या बोलण्याची. खूप उज्वल भविष्य आहे त्याचं. मोठा नट होईल तो आपल्या डॉ लागूंसारखा. ” स्वप्नाळूपणे देवांगी म्हणाली.

अमलाबाई स्थिर नजरेने तिच्याकडे बघत होत्या.

“इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ती ही अशी”. त्या खिन्नपणे म्हणाल्या.

“ उद्या दुपारी तू काय करणार आहेस? उद्या आमच्या घरी येशील का? निरंजन दोन दिवस दौऱ्यावर चाललाय. कोण जाणे, मला नंतर तुझ्याशी बोलायला सवड मिळेल न मिळेल. नक्की ये ग मी वाट बघते. ”.. बिल देऊन त्या देवांगीबरोबर बाहेर पडल्या.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “त्रिकोण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “त्रिकोण…” ☆ श्री मंगेश मधुकर

रात्रीचे आठ वाजले तरी घरात अंधार पाहून ऑफिसवरुन आलेल्या विशाखानं लाईट लावले. 

“कशाला लावला गं”सोफ्यावर बसलेली मीना खेकसली.

“अजून किती वेळ अंधारात बसणार” शेजारीच बसलेली छाया डाफरली.

“लाईट असले काय अन नसले काय परिस्थिती काही बदलणार नाहीये” मीना. 

“मलाही हेच म्हणायचंयं.नुसता विचार करून डोकं फुटेल यापलीकडे काहीही होणार नाही.हातपाय हलवायला पाहिजेत.माझं ऐका” .. विशाखाच्या बोलण्यावर दोघींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

मीना,छाया,विशाखा जॉब करणाऱ्या रूम पार्टनर. वर्षभरापासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या.तिघींची छान गट्टी जमलेली.सगळं व्यवस्थित चाललेलं पण दोन दिवसांपूर्वी मीनासोबत ऑफिसमध्ये एक घटना घडली अन सगळं बिनसलं.तिघीही प्रचंड टेन्शनमध्ये.पुढे नक्की काय करावं याविषयी एकमत होतं नव्हतं.आपसात वाद सुरू होते.

दिव्यांग असलेल्या मीनाला अल्पदृष्टीचा त्रास होता तरीही मोठ्या कष्टानं,जिद्दीनं पदवी मिळवली.कॉम्प्युटरमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं.त्याच जोरावर नावाजलेल्या कंपनीत नोकरी लागली.उत्तम कामामुळे अल्पवधीत मीनाचा बोलबाला झाला.सर्वांशी मिळून मिसळून वागायची तरी तिचा द्वेष करणारे होतेच.सुट्टी असूनही महत्वाचं काम होतं म्हणून मीना ऑफिसला यावं लागलं तेव्हा अजून आठ-दहाजण सहकारी आले होते.संध्याकाळी घरी जायच्या वेळी वॉशरूमच्या बाहेर कोणीतरी मीनाचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.मीना जोरात किंचाळली तेव्हा बाकीचे धावत आले. तोपर्यंत हात धरणारा पळून गेला.

“मीना,व्हॉट हॅपन,” 

“केवढ्या जोरात ओरडलीस.” 

“काय झालं” एकामागून एक प्रश्नांचा भडीमार.मीनाचे हातपाय लटपटत होते.

पाणी पिल्यावर सावरली.

“काही नाही.पायात काहितरी आल्यासारखं वाटलं म्हणून जोरात ओरडले.”खोटं बोलून मीनानं वेळ मारून नेली पण खूप घाबरली होती.डोक्यात नाही नाही ते विचार सुरू झाले.रूमवर आली पण चित्त थाऱ्यावर नव्हतं.तोंडावर पांघरून घेऊन पडून राहिली. मात्र विशाखा,छाया आल्यावर मीनाचा बांध फुटला.जोरजोरात रडायला लागली.मीनानं घडलेला प्रकार सांगितला.विशाखा,छायाला प्रचंड धक्का बसला. 

“कोण होता तो हलकट” विशाखा. 

“माहिती नाही”

“म्हणजे”

“लाइट पुरेसे नव्हते त्यात माझा दिसण्याचा प्रॉब्लेम.”

“बाई!! थोडक्यात वाचलीस गं.” मीनाच्या पाठीवरून हात फिरवत छाया म्हणाली. 

“हो गं.जोरात ओरडले म्हणून भामटा पळाला.”

“ऑफिसमध्ये तक्रार केलीस ना” विशाखा.

“नाही”

“का?”

“भीती वाटली.तुमच्याशिवाय खरा प्रकार अजून कोणालाच माहिती नाही.”

“तक्रार केली नाही ते चांगलं केलं,नाहीतर उगीच चर्चेला विषय आणि नसता मनस्ताप” छाया. 

“आता पुढे काय करायचं समजत नाहीये.खूप टेंशन आलंय.मनात गोंधळ आहे.”डोळे पुसत मीना म्हणाली. 

“काही गोंधळ नाहीये. पोलिस,ऑफिसमध्ये तक्रार देऊ.मी सोबत येते.”विशाखा.

“काही झालं नाही ना.मग कशाला विषय वाढवायचा. गप्प बस”छाया.

“आज हात धरला उद्या अजून काही केलं तर..असले विंचू वेळीच ठेचले नाहीतर पुन्हा संधी मिळाली की चावा घेतात.गप्प बसलं की अशा संधीसाधूंची हिंमत वाढते.” विशाखा संतापानं फणफणत होती.

“मीने,हिचं ऐकू नकोस.मला वाटतं सुट्टी घेऊन गावी जाऊन ये.बरं वाटेल.तक्रारीच्या भानगडीत पडलीस तर ‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था होईल.अशा घटनेत लोकांना फार इंटरेस्ट असतो.च्युईगमसारखं हाच विषय चघळला जाईल.”छाया. 

“काहीही काय बोलतेस. माणसानं इतकंही घाबरट असू नये.ज्यानं केलं त्याला असाच मोकळा सोडायचा.ते काही नाही.शिक्षा ही व्हायलाच पाहिजे नाहीतर त्याची डेरिंग वाढणार.”विशाखा. 

“मग तक्रार करून काय मिळणारये.आपणच आपल्या इज्जतीचा तमाशा दुनियेला दाखवायचा.एवढं करून हाती काहीच येणार नाही पण मीना मात्र चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होणार हे नक्की!!त्यापेक्षा जे झालं ते वाईट स्वप्न समजून विसरून जा”छाया. 

“मला पण तसंच वाटतंय आणि तसंही कोणी केलं हे शोधणं अवघडयं.”मीना. 

“आम्ही ठेवला पण सगळेच तुझ्यावर विश्वास ठेवतील असं नाही.हजार प्रश्न विचारतील आणि तसंही तू सांगतीस म्हणून यापलीकडं काहीही पुरावा नाहीये.त्यात तू ऑफिसमधे वेगळचं सांगितलंय.तेव्हा नीट विचार कर.भावनेच्या भरात असा कोणातही निर्णय घेऊ नकोस ज्यानं नंतर पश्चाताप करावा लागेल.”छायाचं बोलणं ऐकून विशाखा भडकली.

“ए बाई,कशाला तिला घाबरवतेस.प्रश्न विचारले तर विचारू दे की..त्याला का घाबरायचं.कर नाही तर डर कशाला?दुसऱ्यानं माती खायची अन त्रास तू सहन करायचा.याला काय अर्थ? आणि पुराव्याचं म्हणशील तर ऑफिसमध्ये सी सी टीव्ही असतील ना.” 

“ज्या ठिकाणी हात धरला तिथं कॅमेरा नाहीये.”मीना.

“पण त्यावेळेला तिथं कोण गेलं हे बाकीच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल ना.”

“बाकीचे कॅमेरे चालू आहेत की नाही ते माहीत नाही आणि एकदम सगळ्यांवर संशय घेणं योग्य नाही.पुढे अजून प्रॉब्लेम्स होतील.”मीना. 

“तुझं बरोबरयं.जे घडलं ते सिद्ध करणं अवघड आहे.” छाया

“ते आपलं कामच नाहीये. पोलिस आणि ऑफिस शोधतील.तू लेखी तक्रार कर.”विशाखा. 

“खूप भीती वाटतेय”मीना.

“कशाची?”

“घरी कळलं तर ताबडतोब नोकरी सोडून गावी जाव लागेल नंतर एकदोन वर्षात लग्न की संपलं आयुष्य. सगळ्या शिक्षणाचा चुराडा.”मीना रडायला लागली.

“मीने,बळजबरी नाही पण विचार करून निर्णय घे.निदान ऑफिसमध्ये तरी तक्रार करावी.गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”विशाखा

“विशे,तिची अवस्था बघून बोल.जीवघेण्या प्रसंगातून वाचलीय.यापुढे ऑफिसमध्ये काळजी घे.सोबतीशिवाय कुठं जाऊ नकोस.आता शांत बसणं हेच चांगलं!!.”

“शांत काय बस.अजून मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे..” विशाखाचं ओरडणं छायाला आवडलं नाही.दोघी वाद घालायला लागल्या तेव्हा मीना केविलवाण्या नजरेनं पाहत होती.विशाखा आणि छाया दोघींचे मुद्दे बरोबर होतं. त्यामुळं मीनाचं टेन्शन वाढलं. द्विधा मनस्थिती झाली.

सबुरीचा एक तर आक्रमकतेचा दूसरा आणि निर्नायकी तिसरा असा त्रिकोण झालेला….. 

—-

वाचक हो,

तुम्हाला काय वाटतं .. मीनानं काय करावं….???

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमर प्रेम… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ अमर प्रेम… ☆ डॉ. शैलजा करोडे

लग्नानंतरचा माझा पहिलाच सण आज होता वटपौर्णिमा. लग्न सोहळा, त्यानंतरचे विविध देव दर्शन, नातेवाईकांच्या भेटीगाठी, नवीन सुनेचं कोडकौतुक यातच पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला होता. महिन्याची सुट्टी मी व निलेश ने घेतलेली. आता आम्हांला वेळ हवा होता एकमेकांना समजून घेण्याचा, नवजीवनाची स्वप्ने पाहण्याचा, कल्पनेच्या पंखावर स्वार होण्याचा.

आमच्या दरवाज्यावर टकटक झाली. निलेशने दरवाजा उघडला. काका शिरीष आले होते.

” काय करतेय आमची नव परिणित जोडी ” आणि काका मिश्कीलपणे हसत होते. ” काय काका, तुम्हीही चेष्टा करताय लेकरांची “. “तसं नाही रे, पण नवपरिणित दांपत्याला एकांत हवा कि नको, त्याचीच सोय लावून आलोय. आता दुपारच्याच फ्लाईटने तुम्हांला गोव्याला जायचेय. मिरामार बीचवर हाॅटेल फाॅर्चून मध्ये पाच दिवसांचं बुकिंग केलंय तुमचं. सो गाइझ, आँल दि बेस्ट अँन्ड एन्जाॅय “. मी व निलेशने जोडीने काकांचे चरणस्पर्श केले.

हाॅटेलमधील रूम अँलोट झाली, आम्ही सामान ठेवलं अन फ्रेश झालो. हाॅटेल रेस्टाॅरंटमधून चहा मागवला. चहा पितांनाच निलेशने माझ्या कमरेभोवती हात टाकला. ” हे काय निलेश, सोड ना ” ” आता कशाला सोडायचं, जन्मभराची साथ आहे आमची ” ” अरे हो, पण प्रवासानं दमलेय ना मी “. ” अग, मग तुझा थकवा दूर करतो ना मी, पाय चेपू कि डोक्याला बाम लावू “. माझा चेहरा गोरामोरा झाला होता. चेहर्‍यावर नकळत भितीचं सावट पसरलं होतं. अंगावर शहारे आले होते. ” काय झालं निलिमा, काय होतंय तुला, घाबरू नकोस सखी, तुला त्रास होईल असलं कोणतंही वर्तन मी करणार नाही ” म्हणत निलेशने माझ्या चेहर्‍यावर दोन्ही हात ठेवले, डोळ्यात डोळे घालून पाहू लागला, त्या डोळ्यात मला दिलासा देण्याचा प्रयत्न होता, विनंती होती, आर्जव होतं. ” निलिमा तू थोडा आराम कर. मग सायंकाळी थोडं दोना पावला बीचवर फिरून येऊ. त्यानंतर मस्तपैकी जेवण करू.

निलेशच्या समंजस स्वभावाने मला बराच धीर आला होता,

” अहो माझी बहीण हेमानं निलिमासाठी स्थळ सुचवलंय. मुलगा उच्च शिक्षित आहे. आर्मड फोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट आहे. माणसे सुस्वभावी आहेत. नीलिमाची आई ज्योती तिच्या बाबांशी, प्रकाशरावांशी बोलत होती. ” नाही ज्योती, मला नाही आर्मीतील मुलाला मुलगी द्यायची. सगळं काही चांगलं असलं तरी जीवाची हमी शुन्य असते याठिकाणी. माझी एकुलती एक मुलगी. तिच्या भवितव्यावर नेहमी टांगती तलवार नको आहे मला. ” ” अहो पण एकदा मुलगा तर पाहून घ्या आणि निर्णय निलिमाला घेऊ द्या ना तुम्ही “, ” तुम्ही आणि तुमची बहीण काहीही करा दोघीजणी. ” प्रकाशरावांनी विषय तिथंच संपविला होता. पण देखणा, राजबिंडा, उच्चशिक्षित, आर्मफोर्समधील निलेशला पाहाताच निलिमा प्रभावित झाली. गोरीपान, निळे डोळे, काहीसे सोनेरी केस, उच्चशिक्षित, बँक अधिकारी असलेली निलिमा निलेशलाही भावली. मग कोणतंही देणंघेणं, हुंडा, मानपानाशिवाय, तसेच पत्रिका जमवणं या सोपस्कराशिवाय शुभमंगल पार पडलं होतं.

“ उद्या आपण सगळ्या जणी जरीकाठाच्या साड्या व मॅचिंग ज्वेलरीसह येऊ आँफिसला “ …माझी सहकारी आशा विधाते बोलत होती. “जरीकाठाची साडी ठीक आहे, पण रंग मात्र कोणताही असू दे. त्याचं बंधन नको बाई “. शलाका परांजपे बोलत होती. ” ठीक आहे ना, रंग आपापल्या पसंतीचा ” मीनाक्षी देशमुख म्हणाली. विद्या घोडके व आरती पाटील आँफिस प्यून सावित्रीसह हळदी कुंकवाचं साहित्य व वाण खरेदीसाठी आज जाऊन आल्या होत्या.

निलिमा तू हळदीकुंकू लाव सगळ्यांना. हेमा लोखंडे बोलत होती “नको आज माझी तब्येत बरी नाही. शलाका लावेल हळदीकुंकू ” आशा विधातेने हेमाचा तळहात दाबून खूण केली हे निलिमाच्या नजरेतून सुटले नाही.

तिळाचे लाडू व नाष्टा सगळ्यांनी सेवन केला. उखाण्यांचाही कार्यक्रम झाला. उखाणा घेण्याचा नंबर निलीमाचा आला. आणि सगळ्याजणी शांत झाल्या. ” मी घेते ना उखाणा. निलेश येणार परत. त्याला काहीही झालेलं नाही. शत्रूंनी त्याचं विमान उडवलं, तो बेपत्ता झाला. त्याचा ठाव ठिकाणा नाही की त्याची डेड बाॅडीही मिळाली नाही. माझं प्रेम मला सांगतय तो जीवंत आहे आणि येणार परत. घेते मी उखाणा.

” नवपर्वाची पहाट होऊन निलेश आला माझ्या जीवनी

तूच माझा सखा अन मी तुझी अनुरागिणी ”

निलिमाने उखाणा तर घेतला पण दोन अश्रू तिच्याही नकळत गालावरून ओघळले होते.

हेमा, विद्या, शलाका यांनी हळूच निलिमाच्या खांद्यावर हात ठेवला. ” आय अँम ओ के, मला काही झालेलं नाही. आय अँम हॅपी ” निलिमा उद्गारली. ” होय निलिमा तुला काही झालेलं नाही. आता जायचं का आपण. ” आणि सर्वजणी आँफिसातून बाहेर पडल्या.

अक्षय तृतीयेसाठी निलिमाने आॅफिसला रजा टाकलेली. यादिवशी भगवान विष्णूचे पूजन, जप, नामस्मरण, उपवासादी कर्म ती करायची. गरीबांना दान स्वरूप मातीचे भांडे, जवस, आंबा, छत्री, पादत्राणे, कपडे इ. वाटायची. यादिवशी केलेलं दान अक्षय असतं व दुपटीनं आपल्याकडे परत येतं यावर तिचा ठाम विश्वास होता. आणि असंच अक्षय प्रेम माझं निलेशवर आहे आणि तो येणारच ही तिची दृढ मनोधारणा होती. सगळा विधी यथासांग पार पडला अन तिनं सुटकेचा निःश्वास सोडला.

नेहमी मरगळलेल्या निलिमाच्या चित्तवृत्ती आज फुलून आल्या होत्या. हे तिलाही जाणवत होतं. आरशातील तिचं प्रतिबिंब तिलाच नवखं वाटलं.

आणि दुपारी आर्मफोर्सच्या आँफिसातून फोन आला होता. घनदाट जंगलात टेहळणी करतांना एका आदिवासी पाड्यावर निलेश सापडला होता. पण त्याचा पूर्ण स्मृतिभ्रंश झालेला.

शत्रूंनी त्याचं विमान उडवलं अन विमान भेलकांडत खाली येत असतांनाच निलेशने उडी मारली. पण जमिनीवर आदळतांना मेंदूला मार बसून त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता. ही माहिती त्या आदिवासी पाड्यावरील लोकांनी दिली होती.

“आम्ही येतो निलेशच्या भेटीला”, निलेशचे बाबा पतंगराव बोलत होते.

” बाबा आम्ही निलेशलाच घरी घेऊन येतोय. कदाचित घर व आपली माणसं पाहून त्याची स्मृती परत येईल “.

निलेश आपल्या रूममध्ये आराम करीत होता. निलीमाची चाहुल लागताच त्याची झोप चाळवली. ” कोण? काय हवंय तुम्हांला? ” निलेश असं काय करतोस? आपल्या निलीमाला विसरलास? अन त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिने नजरेला नजर भिडवली. आणि त्या अपरिचित डोळ्यात एक चमक आली, ओठांवर हास्य आलं. स्पर्शाची ऊब कळली, श्वासातला आपलेपणा जाणवला आणि निलेशला सगळं काही उमगलं. ” माझी निलू ” म्हणत त्यानं तिला आपल्या बाहुपाशात ओढलं.

निलिमाचं गहिरं प्रेम आज जिंकलं होतं. सुखाचा अक्षय ठेवा तिला पुन्हा मिळाला होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती… भाग – २  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ ती… भाग – २  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.) इथून पुढे — 

तारांबळ उडवणारा प्रश्न एकच होता… नवऱ्याच्या सात-आठ हजार रुपये पगारात मनासारखं जगणं कसं जमवायचं हा. यथाकाल नव्या पाहुण्याची चाहूल लागली. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तो जमेल तसं तिचं कोडकौतुक करत होता. एका शुभदिवशी तिला मुलगी झाली. आयुष्याने एक नवं वळण घेतलं. तिचं काम वाढलं. खर्चही वाढला. पण ती मनापासून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत होती. चाळीतल्या समवयस्क मैत्रिणींसोबत विचारांची, समस्यांची देवाण-घेवाण करतांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधायची असतात ही खूणगाठ नकळतच बांधली गेली होती. सव्वा वर्षाने पुन्हा नवी चाहूल लागली. योग्य वेळी प्रसूती होऊन, दुसरी मुलगी झाली. मुलगा व्हायला हवा होता, असं अभावितपणे वाटून गेलं खरं क्षणभरच. मुलगा होवो किंवा मुलगी… आईला प्रेमाचा पान्हा फुटतोच… आणि तसाच खर्चालाही पाझर फुटला… कसरत वाढली.

एक दिवस नवऱ्याने नोकरीसाठीची जाहिरात वाचली. आणि मनावर दगड ठेवत, तिला अनपेक्षितपणे सुचवलं की ती नोकरी तिला करण्यासारखी होती. १२ वी पास असणं, एवढीच शिक्षणाची अट होती. वयाच्या अटीत तर ती बसत होतीच. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात जावं लागेल, ही एक अट मात्र अटकाव करणारी होती. मुंबईत ती चांगलीच रुळली होती. पण एकटीने लोकलच काय, बसने प्रवास करणं तरी तिला जमेल का, हाच मोठा प्रश्न होता. आजपर्यंत घर हेच तिचं विश्व होतं. त्या पलिकडेही जग असतं, हे ती जणू विसरलीच होती. पण घरातला पैशाचा ओघ वाढणं अत्यावश्यक होतं. आई-वडलांच्या औषधपाण्याचा, मुलींच्या शाळेचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. आणि त्याचे दोन हात कमी पडायला लागले होते. त्याने नाईलाजाने तिला नोकरीसाठी अर्ज करायची गळ घातली. तिलाही परिस्थिती कळत होती. पैशांची वाढती गरज कळत होती. एकीकडे स्वत: पैसे कमवण्याचा विचार भुरळ घालत होता. पण मनात प्रचंड भीतीही दाटून आली होती. रोज एकटीने इतक्या लांबचा प्रवास करायचा, त्या प्रचंड गर्दीत तग धरून रहायचं, अनोळखी लोकांमध्ये दिवसभर वावरायचं… आणि काम? कित्येक महिन्यात पेन हातात घेतलं नव्हतं… ते सरकारी काम… समजणार होतं का? जमणार होतं का? … आणि मुलींचं, सासू-सासऱ्यांचं काय? त्यांना कोण बघेल? … असंख्य प्रश्न मनाला घेरून, आणखीच घाबरवत होते. ‘‘अगं, अर्ज करून पहायला काय हरकत आहे? लगेच नोकरी मिळेलच असं नाही”… हे त्याचं म्हणणं तिने पटवून घेतलं… अर्ज केला. मुलाखतीला बोलावलं गेलं… प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी मुलाखत दिली… आणि आश्चर्य म्हणजे, महिनाभरात नेमणुकीचं पत्र मिळालं… तिची खरी सत्त्वपरिक्षा सुरू झाली.

चाळीतल्या एक काकू माफक पैशात मुलींना सांभाळायला तयार झाल्या. पण तिला नोकरी मिळाली तरीही घरकामाला बाई ठेवणं अशक्यच होतं. कारण नोकरी ‘लोअर डिव्हिजन क्लार्क’ची… पगारही त्यामुळे त्याच बेताचा. सासू-सासऱ्यांना वेळेवर जेवायला द्यायला एक मोलकरीण तयार झाली. तिचा पगार हा अपरिहार्य खर्च होता. एक एक करत सगळ्याची सोय झाली. हा खर्च वजा जाता तिच्या हातात चार-पाच हजार तरी उरू शकतील, असा तिचा हिशोब होता. आता स्वत:च्या मनाला घोड्यावर बसवणं, हे सगळ्यात अवघड काम राहिलं होतं.

नवऱ्याच्या विश्वासाचा हात घट्ट धरून तेही काम मार्गी लागलं… आणि तिची नोकरी सुरू झाली. आयुष्य खूप वेगाने पुढे पळू लागलं आणि आठवणींची झाडंही त्याच वेगाने मागे पळायला लागली… एक एक करत, मागे जात, दिसेनाशी व्हायला लागली… लोकलच्या खिडकीतून व्हायची तशीच… मुंबईत पहिल्यांदा पाय ठेवला, तेव्हा बरोबर एक स्वप्नांचं गाठोडंही आणलं होतं तिने. त्यामानाने लहान असलेल्या त्या गाठोड्यातली स्वप्नंही खरंतर लहान-लहानच होती… राणीचा बाग पहायचा… म्हातारीच्या बुटात चढून बघायचं… रस्तोरस्ती कितीतरी विविध वस्तूंचा बाजार भरतो म्हणे… मनात आलं की तिथे चक्कर मारून, हवी ती छोटी-छोटी खरेदी करायची… मिठागरं बघायची उत्सुकता तर खूप होती… शिवाय डबल-डेकर बस म्हणजे नेमकी कशी बस ते पहायचं होतं… त्यातून फिरायचं होतं… आणि सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते मुंबईचा समुद्र बघायचं… जन्मापासून त्या सुंदर समुद्राशी जोडली गेलेली नाळ अजिबात तुटू द्यायची नाही, हे मुंबईलाही समुद्र आहे असं कळल्याकळल्या तिने पक्कं ठरवलं होतं… पण आयुष्य त्या चाळीच्या विश्वात गुरफटून गेलं, तशी ही इवलीशी स्वप्नंही मनाच्या गाठोड्यात गुरफटली गेली… गुदमरून गेली… हळूहळू विस्मरणातही गेली.

काळ धावत होता. मुली मोठ्या झाल्या. कसंही करून पदवीपर्यंत त्यांना शिकवायचंच् हा तिचा निर्धार स्वत:च्या बाबतीत काटकसर करत ती तडीला नेत होती. ती आणि नवरा दोघेही फक्त बारावी पास. त्यामुळे स्टोअर कीपर आणि एल्. डी. सी. या दोन्ही पदांच्या उन्नतीचा प्रश्नच नव्हता… लोकलमधल्या आणि ऑफिसमधल्या भिशीत नियमित भाग घेऊन, पगार वाढला तरी त्या वाढीला हातही न लावता, काही रक्कम, थोडे फार सोने, बाजूला टाकले होते. पाठोपाठच्या मुलींची लग्नेही पाठोपाठ करावी लागणार होती म्हणून खूप आधीच, स्वत:च्या लग्नात आई-वडलांनी घातलेल्या चार बांगड्या आणि एक छोटं नेकलेस फार न वापरता तिने तसंच ठेवलं होतं. मुली दिसायला नीटस होत्या. समजूतदार-सुस्वभावी होत्या. पदवी परीक्षा झाल्याझाल्याच दोघींनाही खात्या-पित्या घरातली स्थळं सांगून आली. स्वत:चे हात रिकामे असतांना समोरच्याचे हात गच्च भरलेले नाहीत म्हणून तक्रार का करायची, हा तिचा साधा-सरळ विचार होता. आणि दोन्ही भावी जावईही निर्व्यसनी, दिसायला तरतरीत होते. फारशा जबाबदाऱ्याही नव्हत्या त्यांच्यावर. पगारही समाधानकारक होते. आणि याहून अधिक विचार करायला तिला वाव तरी कुठे होता? एका वर्षाच्या अंतराने दोघीही सासरी गेल्या. पण पैशाचे अपुरेपण मात्र घरात कायमचे ठाण मांडून बसले होते. दोघींच्याही लग्नासाठी काही कर्ज घ्यावे लागले होते. मुलींवरच्या खर्चाची जागा मग कर्जाच्या हप्त्यांनी घेतली; इतकाच काय तो फरक.

… इतक्या वर्षांच्या धावपळीने तिचं फक्त शरीरच नाही, तर मनही पार थकून गेलं होतं… पण आता ते अतिशय तटस्थ, शांत आणि कमालीचं कणखरही झालं होतं. इतकी वर्षं आटोकाट प्रयत्न करून, न थकता सांभाळलेलं जबाबदाऱ्यांचं ओझं थोडं कमी झालं होतं खरं. पण म्हणून लगेच नोकरी सोडण्याचा विचार करणं अशक्य होतं. एखाद्या वर्षात नवऱ्याची नोकरी संपणार होती, तरी तिची ४-५ वर्षं शिल्लक होती. त्याच्या खाजगी नोकरीत पेन्शन हा प्रकार नव्हताच. थोडा फार फंड मिळणार असला, तरी दोघांच्या म्हातारपणाची सोय त्यातूनच करायची होती. शिवाय निवृत्तीचं वय होण्याआधीच तिने नोकरी सोडली असती तर तिला मिळू शकणाऱ्या पेन्शनचा आकडा कमी झाला असता. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. कितीही दमली-थकली असली, प्रकृती त्रास द्यायला लागली असली, तरी मध्येच नोकरी सोडून देण्याचा विचारही ती करू शकत नव्हती. आता पाय झपझप चालत नव्हते… ओढावे लागत होते. पण सगळं काही सहन करत, सकाळची ९ वाजून सात मिनिटांनी सुटणारी लोकल पकडणं अनिवार्यच होतं… 

…. पण अलिकडे या रहाटगाडग्यासारख्या फिरणाऱ्या आयुष्यात, आता एक स्वप्न मात्र नव्याने तिला साद घालत होतं…पूर्वीसारखंच अगदी छोटंसं….. निवृत्त होण्याआधी निदान एका महिन्यापुरता तरी त्या ९-०७ च्या लोकलच्या फर्स्टक्लासचा पास काढायचा, आणि जरा चांगल्या साड्यांचे, ड्रेसचे धक्के खात, मधूनच दरवळणारा परफ्यूमचा वास घेत ऑफिसला पोहोचायचं… आणि मगच रिटायर व्हायचं… बस्… एवढंच एक छोटंसं स्वप्न.. तसं खरं तर शेवटचंच…… पण हे तरी पूर्ण होईल ना? – 

…. ती पुन्हा शांतपणे त्या गर्दीत मिसळून जायची.

समाप्त – 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती… भाग – १  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ ती… भाग – १  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

साडेआठ वाजले तसा पर्समध्ये डबा आणि चपलेत पाय कसेतरी कोंबून ती घाईघाईने घराबाहेर पडली. कितीही भरभर चालली तरी स्टेशनपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागायचाच. त्यामुळे नऊ सातची लोकल पकडायची तर साडेआठ वाजता घराबाहेर पडायला पर्यायच नसायचा. आणि लोकलमध्ये बसायला जागा मिळेल याची शाश्वती कधीच नसायची. कारण याबाबतीत ‘हाजीर तो वजीर’ हा एकच नियम होता. आणि बरेचदा तिला ५, ७ मिनिटं उशीरच व्हायचा निघायला.

खरंतर पहाटे ४-४॥ वाजताच उठायची ती. आणि इतरांची झोपमोड होऊ नये याची काळजी घेत स्वयंपाकाचे काम उरकतांना त्रेधा उडायची तिची. सहा सव्वासहा वाजता, तिचा नवरा सोडून बाकी सगळे उठायचे. बाकी सगळे म्हणजे तिच्या दोन मुली आणि सासू-सासरे. साखर झोपेत असणाऱ्या दहा आणि बारा वयाच्या त्या मुलींना जबरदस्तीने उठवायचं रोजच तिच्या खूप जिवावर यायचं… वाईट वाटायचं. पण त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कसंतरी त्यांचं चहापाणी, अंघोळ वगैरे उरकून, एकदा त्यांच्या घट्ट वेण्या घालून दिल्या, की मग सासू-सासऱ्यांचा नंबर असायचा. दोघांचंही तसं वय झालं होतं. सासऱ्यांचा एक पाय अर्धांगवायू होता होता वाचला होता, पण त्याला साहजिकच अधूपणा आला होता. सकाळचं सगळं आवरतांना त्यांना तिची मदत घ्यावीच लागायची. सासूबाई शरीराइतक्याच मनानेही खूप थकलेल्या होत्या. त्यांचा भार स्वत: पेलत त्यांना बाथरूममध्ये नेऊन, सगळं आवरून पुन्हा कॉटवर झोपवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी जणू तिच्या एकटीचीच होती. पण त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा एकही शब्द कधी उच्चारला जात नव्हता. तिचं जन्मजात कर्तव्यच होतं ना ते. मग पडलेले सगळे कपडे पटापट धुवून वाळत घालायचे. पडलेली भांडी घासून टाकायची. केरवारे करायचे. आधीच करून ठेवलेला नाष्टा सगळ्यांना द्यायचा. तोपर्यंत नवरा उठायचा. मग त्याचे ताल सांभाळत कसंतरी स्वत:चं आवरून घ्यायचं. मुलींचा आणि स्वत:चा डबा भरायचा … ही तिची सतत चाललेली धावपळ अतिशय त्रयस्थपणे आणि निर्विकारपणे पहाणारं भिंतीवरचं पिवळं पडलेलं घड्याळ, साडेआठचा ठोका पाडण्यासाठी जणू आसुसलेलं असायचं, आणि तो ठोका पडताच, मुलींकडे, नवऱ्याकडे, आणि राहून गेलेल्या कामांकडे अक्षरश: पाठ फिरवून ती घराबाहेर पडायची.

आजही ती तशीच बाहेर पडून, तरातरा चालत स्टेशनच्या दिशेने निघाली… त्याक्षणी तसं तरातरा चालणं हे आयुष्याचं एकमेव ध्येय असल्यासारखी… आणि आज गाडी प्लॅटफॉर्मवर लागत असतांनाच ती चक्क नेहेमीच्या ठरलेल्या डब्यापर्यंत पोहोचलीही होती. पटकन् डब्यात चढून आत जाताजाता खिडकीजवळची एक सीट रिकामी दिसली, आणि तिने अक्षरश: झेप घेत ती जागा पटकावली. ‘या गाडीला घरी काही कामं-धामं नसतात वाटतं… ठरल्यावेळी रोजच नेमकी कशी पोहोचते प्लॅटफॉर्मवर? ’… हा न चुकता रोज मनात येणारा गंमतीदार विचार आज तिने मनापासून एन्जॉय केला आणि ती जाम खूश झाली… कारण आज तिला बसायला, तेही खिडकीजवळ बसायला जागा मिळाली होती. आता पुढचा तास-सव्वा तास तरी तिला एकही धक्का पचवावा लागणार नव्हता. कारण आता एकदम शेवटचं स्टेशन येईपर्यंत, ती एका जागी निवांत बसू शकणार होती. आज हा वेळ फक्त तिचा एकटीचा होता… फक्त तिच्या एकटीचा. रोजच्या ओळखीच्या चेहेऱ्यांकडे पाहून ओळखीच्या हसण्याची देवाण-घेवाण झाल्यानंतर, त्या खिडकीच्या चौकटीवर हात टाकून ती निवांतपणे बाहेर बघत बसली. ती खिडकी म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणीचा हक्काचा खांदा आहे असं तिला मनापासून वाटून गेलं… आणि तिचं मन एकदम हलकं झालं. मग मागे पळणाऱ्या झाडांबरोबर तिचं मनही मागे कधी पळायला लागलं ते तिलाही कळलं नाही.

… रत्नागिरी जवळचं ‘वारे’ गाव हे तिचं माहेर… अतिशय रम्य, प्रसन्न, छोटंसं, सुंदर गाव… एकीकडे नितळ निळाशार शांत समुद्र… पांढरट, पिवळ्या वाळूची स्वच्छ चादर पांघरलेला समुद्रकिनारा… पहावं तिथे सुखद-गार वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी नारळी-पोफळीची, सुरुची झाडं… अलिकडे आंब्याच्या झाडांमध्ये शांतपणे विसावलेली, लाल कौलांनी शाकारलेली, टुमदार बैठी घरं… शेणाने स्वच्छ सारवून, छोट्या पण सुबक रांगोळीने सजलेली अंगणं… लहान मोठ्या प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी-वृंदावनात विसावलेली, शांत डुलणारी तजेलदार तुळस… आणि अंगणाच्या सभोवताली अनेक प्रकारची फुलझाडं… कुणालाही पाहताक्षणी मोहात पाडणारं हे तिचं अतिशय आवडतं माहेर गाव. त्यातलंच एक, सदैव आनंदाने-समाधानाने फुलून राहिलेलं तिचं माहेरघर… तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे तिचे आई-वडील… दोघे मोठे भाऊ. पैशाची श्रीमंती फारशी नसली, तरी मनाने कमालीची श्रीमंत असणारी ही माणसं… …. बघताबघता ती कधी तिथे पोहोचली हे तिला कळलंही नाही… नेहेमीच्याच स्टेशनांवर लोकल थांबत होती… उतरणारे-चढणारे चेहेरेही बहुतांशी तेच होते. पण ती मात्र त्याक्षणी जणू तिथे नव्हतीच. एव्हाना तिची ओट्याशी उभ्या असलेल्या तिच्या आईला मागून जाऊन घट्ट मिठी मारूनही झाली होती. वडलांच्या कुशीत विसावून झालं होतं. दोन्ही भावांचे हात पकडून आनंदाने गिरक्या मारून झाल्या होत्या. मग धावतच अंगणात भिरभिरून झालं होतं. सगळ्या झाडांशी गप्पा मारून झाल्या होत्या. आणि आत्ता आईच्या हातचं खमंग थालिपीठ चवीचवीने खात ती अंगणाच्या पायरीवर निवांत बसून आठवणीत रमली होती…..

…. अगदी सहजपणे ती दहावीपर्यंत ज्या शाळेत शिकली होती, ती शाळा, सगळ्या बाई, सगळ्या शाळू-सोबती… सगळं सगळं डोळ्यांसमोर तरळून जात होतं. मोठे दोघे पाठोपाठचे भाऊ रत्नागिरीतल्या कॉलेजमध्ये शिकत होते. हिनेही हट्ट धरल्यावर वडलांनी तिथेच तिचं ११ वी साठी नाव घातलं होतं. तीन तीन मुलांना कॉलेजमध्ये घालतांना वडलांची किती ओढाताण होत होती, हे सत्य तिच्यापर्यंत कधीच पोहोचलं नव्हतं. ती काही खूप हुशार नव्हती. अगदी मन लावून अभ्यास करूनही १२ वीत जेमतेम ५५% पर्यंत पोहोचली होती. पण आईच्या हाताखाली घरकामात मात्र बरीच तरबेज झाली होती. १२ वी नंतर तिचं शिक्षण थांबवावं लागलं. वडील स्थळं शोधायला लागलेच होते. तिचं रहाणं-दिसणं साधंसुधं असलं तरी ती चुणचुणीत होती. लवकरच हे मुंबईचं स्थळ आलं. मुलगाही १२ वी पर्यंत शिकलेला, पण स्मार्ट होता. एका चांगल्या कंपनीत स्टोअर-कीपर म्हणून नोकरी करत होता. स्वत:चं घरदार वगैरे नव्हतं, पण मुंबईत ते असणं, त्याचं वय लक्षात घेता तसं कठीणच असणार, असं सहज गृहीत धरलं गेलं होतं. त्याच्या दोन मोठ्या बहिणी त्यांच्या सासरी सुखात होत्या. त्यामुळे आई-वडील-मुलगा एवढीच माणसं घरात असणार होती. शिवाय ते स्थळ ओळखीतून आलेलं… मग लग्न ठरवायला कितीसा उशीर लागणार? तिलाही मुलगा आवडला, आणि मुंबईला जायला-रहायला मिळणार याचा आनंद तर काकणभर जास्तच होता, इतकं मुंबईबद्दल ऐकलं होतं… नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे चारच महिन्यात वडिलांनी त्यांच्या परीने थाटात लग्न करून दिलं, आणि ती नवी नवरी मुंबईत आली…

… डब्यात एकदम गडबड, गलका सुरू झाला, आणि ती भानावर आली. शेवटचं स्टेशन आलं होतं. डब्याच्या दाराशी उतरण्यासाठी झुंबड उडाली होती. तिला मात्र आज तिथेच तसंच बसून रहावंसं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. सावकाशीने उठून, सगळ्यांच्या शेवटी ती खाली उतरली. आता मात्र पावलं सवयीनेच झपझप पडायला लागली. पण आज मन मात्र सारखं आठवणीत रेंगाळत होतं.

अतिशय उत्सुकतेने नवरा आणि खूप सारी स्वप्नं यांच्या बरोबर ती मुंबईला आली. एका चाळीतल्या वरच्या मजल्यावर त्याचं घर होतं. पण इतकं लहान? … वन रूम – किचन – थोडी रुंद पण स्वतंत्र गॅलरी…. बस् एवढंच्? क्षणभर दचकली होती ती. अंगण नाही… फुलझाडं नाहीत… तुळशी वृंदावन नाही… पण तिने लगेच स्वत:ला सावरलं… होईल की पुढे-मागे स्वत:चं घर असं स्वत:ला सहज समजावलं तिने, आणि मग ते घर तिला मनापासून आपलं वाटलं. सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares