मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ बाज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“अरे,सायकलवर कशी जमेल ही बाज न्यायला..? तुला लोडिंग रिक्षा करून न्यावी लागेल. माझ्या ओळखीचा आहे एकजण, विचारतो त्याला..” एवढं बोलत समोरच्या माणसाने फोन लावला आणि श्यामने खिशातले पैसे काढून मोजायला सुरुवात केली. कळकट, गुंडाळलेल्या दहाच्या, पन्नासच्या नोटा.. फार नसतील पण रिक्षा ठरली तर पुरतील का? ह्या विचारात त्याने पटापट सरळ करून त्या एकात एक घातल्या आणि परत खिशात ठेवल्या. मनात हिशोबाचे खेळ सुरूच होते. ह्यांना आपण महिनाभर बाज मागणार, त्याचेच पैसे किती घेतील माहीत नाही. त्यात ती नेण्याची गाडी नाहीच परवडणार…

… समोरचा माणूस फोनवर बोलून श्यामकडे आला आणि म्हणाला, ” गाडीवाला पाचशे रुपये म्हणतोय.. बघा जमतंय का? “

श्यामने कपाळावर आलेला घाम पुसला.. ” नको, राहू द्या. मी बघतो कशी न्यायची ते ” म्हणत आपल्या सायकलला न्याहाळले… तिच्यावर हात फिरवला आणि तिच्याजवळ वाकून म्हणाला, ” तुला मदत करावीच लागेल गं…” 

शेजारच्या किराणा दुकानातून त्याने सुतळी विकत घेतली आणि बाज उचलली. त्याक्षणी जाणवलं, बाज जड होती, त्यामुळे पण तिला घरी नेण्याचा प्रश्न उभा राहणार होताच.. हे अगदी आपल्या घरापासून  दूर असलेलं घर. पण इतर ठिकाणी बाज खूप महाग, आपल्याला परवडणार नाही अशीच…. आणि बायकोची तर मागणी होती, ” लेकीला बाळांतपणाला बाज आणा.. माझ्या बाळांतपणाला मी सहन केलं… खाली पोतड्यावर झोपले. पण कोवळ्या अंगात सर्दी अशी भिनली की आयुष्यभर दुखणे सहन करून जगणं सुरू आहे. आता माझ्या लेकीचे नातवंडाचे हाल नको..”  तिच्या ह्या वाक्यावर त्याक्षणी आपल्याला आठवलं… आयुष्यात कुठलेही अट्टहास नव्हते हिचे.. कोवळ्या वयात हिने आपला संसार सुरू केला.. पण गरोदरपणातही ओठ घट्ट मिटून सगळं काही सोसलं ते आयुष्यभर. पण आता नातवंड आणि लेक, तिला त्यांच्याबाबतीत हेळसांड नकोय …. स्वतः घरचं सगळं करून चार घरचे भांडे घासते.. थोडं थोडं तूप, बदाम, मनुके, सगळं लाडूचं सामान.. घरातला कोपरा स्वच्छ करून ठेवलाय बाळंतिणीची बाज टाकायला…

स्वतःच आयुष्य कसंही गेलं तरी येणाऱ्या जीवासाठी तिची ही तगमग खरंच आपल्यालाही सकारात्मक करून गेली.. आपणही मग चार खेपा धान्याच्या गोण्या दुकानातून गिऱ्हाईकाच्या घरी नेहमीपेक्षा जास्त केल्या…. त्यादिवशी ह्या कोपऱ्यातल्या घरात पोते टाकले आणि निघताना त्या माहेरवाशीण लेकीची तगमग बघितली.. तिच्या घरातले सगळे नेमके शेजाऱ्याच्या लग्नाला गेले होते आणि घरातला नोकर माणूस तिच्या आक्रोशाने गडबडला, आपल्याला म्हणाला.. ” कसंही कर आणि रिक्षापर्यंत हिला नेऊ लाग..”

सगळे पोते काढलेल्या हातगाडीवर ती बिचारी कशीबशी बसली.. दाराशी कार उभी असून तिच्यावर ही वेळ आली.. कोपऱ्यावर मिळालेली रिक्षा आणि मग सगळी धावपळ.. त्यादिवशीची कमाई तिच्या चहापाण्यात गेली होती.. पण आपल्या लेकीसारखीच होती ती.. त्यांनतर आलेले तिचे घरचे लोक.. आपले आभार मानत होते.. त्यांनी आपल्याला दिलेलं बक्षीस आपण नाकारलं होतं.. तेव्हा तो माणूस म्हणाला होता.. ” काही मदत लागली तर नक्की सांग., आम्ही कायम तुझ्या ऋणात राहू,..”

आज ह्या घटनेला सहा महिने झाले. म्हणजे त्यांच्या घरात जी बाई बाळंत झाली ती आता त्या बाजेवर झोपत नसेल.. बघू तर विचारून… म्हणून आपण शब्द टाकला….  ” तुमच्या ताईची बाळंतिणीची बाज मिळल का..? नाही, फक्त एखादा महिना.. लेक बाळांतपणाला आली आहे माझी..? “

आपलं बोलणं ऐकून खुर्चीत बसलेल्या आजी म्हणाल्या होत्या, ” बाज अगदी जन्मापासून आपल्याशी जोडलेली असते.. खरंतर बाज हा शब्द माणसाच्या बाण्याशी निगडित आहे.. ‘ काय बाज आहे त्यांचा ‘ असं आपण म्हणतो.. पण तुम्ही ओळख नसताना, परिस्थिती नसताना.. हिम्मत दाखवून आमच्या नातीसाठी जे केलं.. तो माणुसकीचा बाज आज क्वचितच सगळ्यांमध्ये दिसतो.. तुमच्यासारख्या माणसाला ही बाज देण्यात आनंदच आहे.. आणि हो, बाज आणण्याची गडबड नको.. ठेवा आठवण म्हणून, माणुसकीची बाज अशीच ठेवा. त्यावर सुखाची झोप नक्की घ्या..”

आजीचं वाक्य मनाला भिडलं आपल्या.. आपली आई नेहमी म्हणायची, ” माणुसकीची बाज विणत राहा.. वेळेकाळेला एकमेकांना मदत करून ही बाज विणली की ह्या बाजेवर येणारी झोप आनंदाचीच…”

मनात आलेल्या ह्या विचारांनी आणि लेकीसाठी मिळालेल्या बाजेने त्यालाच खूप आनंद झाला. फक्त हिला नेणं मात्र सर्कस आहे. पण जमवावं तर लागेल, म्हणत तिला सायकलला घट्ट बांधून तो निघाला होता…  आवश्यक त्या परिस्थितीत आपल्या प्रामाणिकपणामुळे मिळालेलं ते बक्षीस घेऊन जातांना त्याला दिसत होती त्याची पोटुशी लेक आणि हसरी बायको … त्या बाजेवर समाधानाचं आयुष्य विणणारी…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्‍हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही. – आता इथून पुढे )

डॉ. हंसा दीप

साशा पूर्ण ताकदीनिशी ओरडला, ‘ए, थांब… यू ….. बास्टर्ड …’ पण ट्रक वेगाने लोकांना चिरडत जातच होता. पुरुष, महिला, बालके, जे समोर येईल, ते चिरडत ट्रक पुढे पुढे चालला होता आणि शेवटी एका झाडाला धडकून थांबला. साशा भान विसरून त्या ट्रककडे धावत सुटला. पण मधे मधे तडफडणारी शरीरे त्याला थांबवत होती. त्याच्या पायाला त्या मुलाचा हात लागला. त्याच्या हातात आईस्क्रीमचा कप होता. साशा त्याच्यावर पडता पडता वाचला.  समोर एक नवयुवती रक्ताने न्हालेली होती. तिच्या अर्ध्या चेहर्‍यावर तिचे कुरळे केस होते आणि अर्ध्या चेहर्‍यावर कुणा अन्य लाल हातांनी आपला आधार शोधला होता. काळ्या-सोनेरी रंगाची पर्स आपल्या मालकिणीकडे बघत होती, जी तिच्यावर आत्यंतिक प्रेम करत होती. व्हील चेअरवर बसलेल्या महिलेचे हात अजूनही हॅंडलवर  होते, पण व्हील चेअर तुटून चपटी झाली होती.

साशा एक प्रकारच्या उन्मादाने ओरडत होता. रडत होता. आणि किंचाळतही होता. कण्हणं, किंचाळया, पोलिसांचा सायरन, अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन, सगळ्यांचे एकत्रित आवाज वातावरणात घुमत होते. मिनिटापूर्वीचं ते चैतन्यमय वातावरण आता कानफोडू आवाजात बदललं होतं. चारी बाजूला हाहा:कार होता. धावपळ होती. लोक त्या जागेपासून धावत सुटले होते, जसा काही तो ट्रक पुन्हा परतून येणार आहे. सायरन आणि माईकमधून पोलिसांचा आवाज अजूनही ट्रकमधे असलेल्या ड्रायवरला चेतावणी देत होता.

ज्या उद्देशाने साशाने भाड्याचा ट्रक आणला होता, त्या उद्देशाचा त्याला विसरच पडला. असंच तर सगळं तो करणार होता. असंच लोकांना तो चिरडू इच्छित होता. पण आता या क्षणी तो लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या बरोबर संतापही वहात चालला होता आणि संतापाबरोबर आणखीही खूप काही वाहून जात होतं. जसा काही त्याचा भूतकाळच वाहून जात होता.  

किंचाळणारं क्रंदन, भयभीत क्रंदन, वेदनामय क्रंदन, सगळीकडे क्रंदनच क्रंदन. काही प्रेतं होती, काही जिवंत प्रेतं होती. फुटपाथवरून वहाणारं रक्त होतं, रक्तरंजित कपडे होते. आणखीही खूप काही होतं, ज्यांच्यासाठी शब्द ध्वनीविहीन झाले होते. पोलिस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन अधीक जोरात वाजू लागला. साशा, जखमी  होऊन पाडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी धावपळ करत होता. आपण काय करतोय, हे त्याला कळत नव्हतं. पण जे लक्षात येईल, ते करण्याचा प्रयत्न करत होता. जखमींना अ‍ॅम्ब्युलन्सपर्यन्त पोचवत होता. कुणी मृत झाला आहे, असं वाटून पुढे जात होता, तर समोर पाडलेल्या शरीरात श्वास चालू आहे, असं प्रतीत व्हायचं. रक्तप्रवाहाच्या वाढत्या गतीबरोबर मेंदूची गती ताळमेळ साधत नव्हती. वेदनेच्या सागरात तो डुबक्या घेत राहिला होता. भागदौड होती, कोलाहल होता, चित्कार होते, संताप होता. माणसाचं वाहणारं रक्त आणि वाहणारे अश्रू, एकमेकांशी जसे स्पर्धा करत होते. कुणाचा वेग जास्त आहे.

साशाचे हात रक्तरंजित होते, पण हे हात मदत करणारे होते. खून करणारे नव्हते. आपल्या त्या हातांकडे तो टवकारून बघत होता. ते हात भक्षक होता होता, एकाएकी रक्षक झाले होते. यात कुणी त्याचे नव्हते. मात्र हेच लोक त्याची शिकार होणार होते. हेच करायची इच्छा होती त्याची?

मग त्याने ऐकलं, त्या खुन्याला पोलिसांनी पकडलय. त्याला पकडल्यावर तो ओरडू लागला. ‘मला मारा.’, ‘मला शूट करा.’ त्याचा हा आवाज त्याच्या भ्याडपणाचं प्रतिबिंब होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याचे हात-पाय बांधले. त्याला गाडीत टाकून दिले आणि त्याला घेऊन ते निघाले. बंदूकधार्‍यांच्या काही गाड्या त्याच्या मागून चालल्या. आता सारे पोलीसवले, फायर ब्रिगेडवाले लोकांना मदत करू लागले होते. शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती त्या खुन्याची छी… थू… करू लागले. साशाला वाटलं, ते सारे साशाबद्दल बोलाहेत. त्याची छी… थू… करताहेत. या जघन्य अपराधासाठी त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव होतोय. सगळ्या भाषेतल्या शिव्या. पण…. हा कोण मधेच आला त्याची शंभर टक्के प्रतिछाया बनून. अगदी त्याच्याच सारखा विचार करणारा . त्याच्याच सारखा न्यायाच्या शोधात असलेला. हा माणूस मधे आला नसता, तर साशाच सगळं करणार होता.

जर तसं खरोखरंच झालं असतं, तर साशाच्या बाबतीत न्याय झाला असता? अखेर कसा न्याय त्याला हवा होता? निर्दोष लोकांना मारून कापून त्याला, लहानपणी भोगलेल्या भोगांचा न्याय मिळणार होता? की ज्याने त्याच्यावर अन्याय केला होता, त्याला शिक्षा मिळणार होती? आणि जे निर्दोष लोक मेले त्यांचा न्याय-निवाडा कोण करणार होतं?

या सगळ्याचा विचार करण्याची शक्ती त्याच्यात आली, तेव्हा तो इतका थकला होता की आता तिला ताबडतोब घरी जावंसं वाटलं. त्याच्या कानात अजूनही चीत्कार घुमत होते. दुपारच्या वेळी हालचाल आणि चैतन्यपूर्ण असणारा हा भाग आता स्मशानघाट बनला होता. पोलिसांच्या पिवळ्या पट्ट्यांनी घेरलेला हा भाग आता मृत्यूच्या विहीरीसारखा प्रतीत होत होता.

साशा रडत होता. मोठमोठ्याने रडत होता. त्याच्या मनात साठलेला क्रोध त्याच्या आसवांतून वाहून जात होता. त्याच्या समोर घडलेल्या खून-खराब्याकडे बघताना त्याला वाटू लागलं, या तूलनेत आपल्याबाबतीत काहीच विशेष घडलं नाही. ज्याने हे घडवलं, तोदेखील आपल्यासारखाच वर्षानुवर्ष मनात आग बाळगून होता का? त्यालादेखील आपलं लहानपण वेदनेने विव्हळत आणि ओरडत-किंचाळत घालवावं लागलं होतं का?

साशासारखं अनेकांच्या बाबतीत घडलेलं असू शकतं, असा विचार त्याच्या स्वप्नातही कधी आला नव्हता. त्याला वाटत राहीलं, सगळा जुलूम आपल्यालाच सहन करावा लागलाय. दुसर्‍या कुणालाच नाही. आता मात्र त्याला वाटतय, असे अनेक लोक असतील, ज्यांच्या मनात असले घाव घर करून राहिले असतील.

त्याच्या डोक्यात वळवळणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला आता मिळालेली  होती. त्या जागेतील रक्तरंजित शरीरे आता कुठल्याही न्यायाबद्दल उमेद बाळगू शकणार नाहीत. साशाने ज्यांना मदत केली, ते काही त्याचे आपले नव्हते, पण त्याला असं केल्याने खूप समाधान, शांती मिळाली होती. ही त्याच्यात अद्यापही असलेल्या माणुसकीची ओळख होती. आपल्यातली द्वेषभावना संपुष्टात यावी, म्हणून हा रक्तपात आवश्यक होता का? तीस सालापर्यंत मनात भरून राहिलेली तिरस्काराची भावना आता प्रेमात बदलत चालली होती. असं प्रेम, जे मनाच्या तळात किती तरी वर्षे लपून राहिलं होतं. यावेळी त्याला असा संतोष वाटत होता, जो यापूर्वी कधीच वाटला नव्हता.

साशाला वाटलं, आता आपण एकटं नाही राहू शकणार. त्याने लीसाला फोन करण्यासाठी आपला फोन शोधला. पण तो कुठे तरी पडून गेला होता. बेसावधसा तो कुणाला तरी बघत होता. कुणाला तरी शोधत होता. कुणाच्या तरी जगण्यासाठी प्रार्थना करत होता. कुणाचा हात कापला गेलेला होता तर कुणाचा पाय. तो त्या सार्‍यांसाठी देवाची करुणा भाकत होता.

त्या ट्रकच्या जवळपासही साशाला जावसं वाटत नव्हतं, ज्याला तो दैत्य बनवून घेऊन आला होता. ट्रकमध्ये बसल्यापासून त्याच्या मन-मस्तकात घोळत असलेल्या विचारांच्या जवळपासदेखील तो फिरकू इच्छित नव्हता. ज्या विचाराने त्याचे मन-मस्तक कलुषित केले होते. ज्या ड्रायव्हरच्या सीटवर बसून त्याने जसा विचार केला होता, तसंच घडताना उघड्या डोळ्यांनी त्याने पाहीलं होतं. आता त्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची त्याची हिंमत होत नव्हती.

एकाएकी त्याला आपल्या गळ्यापाशी भार पडत असल्याचं जाणवलं. दोन कोमल हात त्याच्या खांद्याला स्पर्श करत दिलासा देत होते. त्याने क्षणार्धात मान वळवून पाहीलं. ती लीसा होती. तिला आपल्या हातांनी मिठी मारत साशा रडू लागला. तीही मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या काळजाचा थरकाप झाला होता. दोघांची थरथर कापणारी शरीरे, एकमेकांना आधार देत होती, सांत्वना देत होती. शहराच्या इतिहासातील त्या खूनी दिवसाचे ते दोघे साक्षीदार होते. भरल्या बाजाराला स्मशानघट बनवणार्‍या त्या क्षणांचे ते दोघे साक्षीदार होते. साशाच्या हृदयाची धडधड अबोल होती, पण ती धडधड, खूप काही सांगत होती. भूतकाळाला, भूतकाळात झोकून देऊन नव्या पानावर नवी कहाणी लिहू पाहत होती. नि:संदेह लीसाच्या बाहूत आता एक नवी व्यक्ती होती. नवे विचार असलेली व्यक्ती. साशा…. शंभर टक्के परिवर्तीत साशा….

मूळ हिंदी  कथा 👉 ‘शत प्रतिशत’- मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर. आता इथून पुढे)

आपल्यावर खूप अन्याय झालाय आणि काही झालं तरी याचा बदला आपण घ्यायचाच असा ठाम निश्चयही त्याने आता केला. इतकी वर्षे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब करत, तो मानवी नात्यांपासून दूर राहिला. त्याने कुणाला संधीच दिली नाही, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण करायची.

डॉ. हंसा दीप

कोर्टाने जेव्हा त्याला, जोएना आणि कीथ या दांपत्याच्या हवाली केलं तेव्हा त्याच्या माथ्यावर एक छत आलं. रहाण्यासाठी चांगलं घर, आणि जगण्यासाही जे जे आवश्यक, ते सारं तिथे होतं. या दोघा पती-पत्नीमध्ये कधी भांडणे झालेली त्याने पाहिली नाहीत. सगळे कसे हळू आवाजात विनम्र होऊन बोलायचे. त्या घराने कधी, कुणाचा मोठा आवाज ऐकला नव्हता. त्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे, हे कधी ल्क्षातच आलं नाही त्याच्या. त्याला वाटायचं, पोलीस आणि कोर्ट यांच्या भीतीमुळे, ते त्याच्याशी चांगलं  वागतात. थोडा जरी आवाज झाला, तरी तो खडबडून उठून बसे. त्याला वाटायचं, आत्ता त्याच्या थोबाडीत बसेल. असेच दिवस जात राहिले. होता होता तो सतरा, अठरा वर्षाचा झाला. या दरम्यान त्याचे दत्तक आई-वडीलही गेले. तो शाळेत गेला होता. दोघेही रेग्युलर चेक आपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. ते परत कधी आलेच नाहीत. तो शाळेतून परत आला, तेव्हा नातेवाईकांची, परिचितांची तिथे गर्दी झाली होती. त्याच्या कानावर आलं, की रस्त्यावर एका अपघातात, त्या दोघांचा मृत्यू झालाय. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिथे राहायला सांगितलं. पण तो आपल्याच नादात मुक्त पक्षाप्रमाणे, आपली वाट शोधत आपलं घरटं बनवण्यासाठी तिथून बाहेर पडला.

आता तो एकटा… अगदी एकटा होता. त्याच्या आई-वडलांना त्याच्यापासून हिरावून घेणं, हा त्याच्यावर झालेला अन्याय होता. त्यानंतर तो मिळेल ते आणि जमेल तसं काम करू लागला आणि स्वत:च स्वत:चा चरितार्थ चालवू लागाला. स्वत:ला खूश ठेवण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं, ते सारं त्याने केलं, पण तो कुणाचा मित्र नाही बनू शकला. त्याला एकच भीती होती, कुणी त्याच्या जवळ आलं आणि हिंसक बनलं, तर काय होईल?

तो बुद्धिमान होताच. मनापासून अभ्यासही केला. जोएना आणि कीथने त्याच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च केला होता. तो त्यांना निराश करणार नव्हता. ते चांगले होते, पण त्याला सतत वाटायचं, की त्यांनी त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवायला नको. त्याचंच त्याला दु:ख व्हायचं. त्यांचं लाडा-कोडाचं वागणं, त्याला पोकळ वाटायचं. सगळ्यात त्याला जास्त भीती कशाची वाटायची, तर त्याच्या आत धुमसणार्‍या संतापाची. तो कधीही उसळून बाहेर येऊ शकत होता.

सगळ्याचा विचार करता करता तो खूप पुढे आला होता. आता या मनोकामनेचा अंत करण्याच्या दृष्टीने तो खूप जवळ पोचला होता. बस्स! ही शेवटचीच लाल बत्ती. त्यानंतर तो लगेचच त्या ठिकाणी पोचेल.

‘अरे साशा तू? ‘ शेवटच्या लाल दिव्याशी गाडी थांबली, तेव्हा कुणी तरी हवेत हात फडकावत म्हंटलं.

आपलं नाव ऐकल्यावर तो गडबडून गेला. त्याला वाटलं, कुणी तरी आपली चोरी पकडलीय. त्याने वळून पाहिलं. ती लीसा होती. ती आत्ता इथे काय करतेय? साशाला प्रश्न पडला. ती नेहमीच साशाच्या अवती-भवती रेंगाळायची. पण काम झाल्यावर. ‘आत्ता इथे…?’ ही तर कामाची वेळ होती. आज त्याच्याप्रमाणेच लीसानेही कामातून रजा घेतली आहे का? यावेळी लीसाशी बोलत राहीलं, तर तो आपल काम करू शकणार नाही. तिची नजर चुकवून निघून जाणंच योग्य होईल. त्याने तिला न पाहिल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत काही तरी शोधत असल्याचे नाटक करू लागला. तिथे खरं तर काहीच नव्हतं.

“साशा, साशा!” ती इतकी मोठमोठ्याने ओरडत होती, की आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तर लोक तिला वेडीच समजतील. त्याला हार मानावी लागली.

हो. मीच! सगळं ठीक आहे ना? तू यावेळी इथे कशी? कामावर गेली नाहीस का? ‘ साशाच्या स्वरात आश्चर्य होतं आणि पाठ सोडवून घ्यायची घाईही होती.

‘आज मी रजा घेतलीय, पण तू इथे कसा? तू पण रजा घेतलीयस का?’

‘रजा नाही घेतली. पण एका मित्राला घर बदलण्यासाठी मदत करतोय. त्यानंतर कामावर जाईन.’

‘चल साशा! कॉफी घेऊयात. नंतर जा म्हणे.’ लीसाच्या डोळ्यात चमक होती, ’ठीक आहे’ साशा म्हणाला. दिवा बदलला होता आणि त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोचायचं होतं. मधेच लीसा आली, तर सगळंच अवघड झालं असतं. त्यापूर्वी तिच्याबरोबार कॉफी होऊन जाऊ दे. काही बिघडत नाही. थोड्या वेळाने तो आपलं काम करू शकतो.

लीसाला पसंतीचा अंगठा दाखवून त्याने आधी विचार करून ठेवला होता, तिथे गाडी पार्क केली. आजचीही मुलाखत लीसाला संस्मरणीय वाटायला हवी, असा विचार करत तो तिच्यासोबत आत जाऊन बसला. त्याच्या आतल्या धोकादायक इच्छांचा तिला वासही लागू नये, यासाठी नेहमीपेक्षा तो जास्तच काळजी घेत होता. लीसाला जरा आश्चर्यच वाटलं.

‘काय झालं? आज जरा वेगळा वाटतोयस तू! ‘ लीसा म्हणाली. या आकस्मिक झालेल्या भेटीचा आनंद लीसाच्या चेहर्‍यावर झळकत होता. 

‘लीसा आज तू फार गोड दिसते आहेस.’ लीसाच्या डोळ्यात बघत तो प्रेमाने म्हणाला.

 ‘आज तू प्रथमच माझ्याकडे नीटपणे बघतोयस.’ आपले खोडकर डोळे नाचवत लीसा म्हणाली.

‘ मग काय आधी डोळे बंद होते? ‘ सगळं माहीत असूनही साशा आजाण बनू पहात होता. त्याला अभिनय काही करता येत नव्हता. आज प्रथमच तो अगदी मनापासून बोलत होता.

‘मला तरी असंच वाटतय, की तू कधी माझ्याकडे नीटपणे पाहीलंच नाहीस. मीच तेवढी अशी आहे, की कित्येक दिवसापासून तुझ्या मागे मागे फिरते आहे आणि एक तू आहेस, जो माझ्यापासून दूर दूर पळतो आहेस.’

‘माहीत आहे.’ हत्यार खाली ठेवण्यातच आपली भलाई आहे, हे साशाच्या लक्षात आलं.

‘शाळेपासून हे असंच चाललय. कधी कधी मला वाटतं मी वेडी आहे, जी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतेय. मरतेय तुझ्यासाठी. आता तर आपण दोघे मिळवायलाही लागलोत. आता तू कुठल्या गोष्टीसाठी वाट बघतोयस, कुणास ठाऊक?’ लीसा आणखी थोडी त्याच्याजवळ सरकली. तिची जवळीक साशाला चांगली वाटली. शरीराच्या ऊबेचं आकर्षण प्रथमच त्याला जाणवलं. एक वेगळीच ओढ, ज्याच्या पकडीत तो यापूर्वी कधीच आला नव्हता.

लवकरच कळेल तुला, मी कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतो.’ तिचे हात आपल्या हातात घेऊन साशा म्हणाला आणि क्षणभर विसरलेलं त्याचं लक्ष्य त्याच्यासमोर आलं.

‘खरच!’  त्याच्या हाताचं चुंबन घेत लीसा म्हणाली, ‘ओह! साशा, चल, मग आपण लग्न करू. आता प्रतीक्षा करणं आवघड झालय! ‘

‘लीसा तू चांगली मुलगी आहेस. किती तरी चांगली मुले तुला मिळू शकतील. ‘ तिचा आनंद साशाला जाणवत होता, पण एक शंकाही होतीच.

‘अनेक जण मिळतील, पण तू नाही ना मिळणार! बरं ते जाऊ दे. हा भाड्याचा ट्रक घेऊन तू निघलाहेस कुठे? घर बदलण्यासाठी कुठल्या मित्राची मदत करायला निघाला आहेस?’

‘आहे एक जुना दोस्त. ‘ पुन्हा एकदा आपली विचारांची गाडी रुळावर आणीत साशा म्हणाला. ‘लीसा प्लीज़ आता मला जाऊ दे. जरा घाईत आहे. ल्ग्नासारख्या गोष्टीवर विचार करण्यासाठी थोडा वेळ तरी हवा ना!’

‘ हो! हो! नक्कीच! जरूर वेळ घे, पण इतकाही वेळ लावू नको, की आपण म्हातारे होऊ. पण साशा आज आणखी थोडा वेळ थांब ना! जीवनातील हे रोमांचक क्षण, मी आणखी थोडा वेळ अनुभवू इच्छिते.’ लीसाला प्रथमच इतक्या निवांतपणे    साशा भेटला होता आणि हे क्षण ती हातचे जाऊ देऊ इच्छित नव्हती.  

‘ नाही लीसा मला जायला हवं. मी माझ्या दोस्ताला वेळ दिलीय.’  साशाच्या डोक्यातील विचारांची वावटळ त्याला घाई करायला उसकत होती.

‘मी पण येऊ का तुझ्याबरोबर?’

‘नको.’ तिचा पाठलाग चुकवणं, तसं आधीपासूनही त्याला अवघड वाटायचं. तिला खूप आवडायचा तो, पण तिला माहीत नाही, आज त्याचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास आहे. आज त्याचात परिवर्तन होणार आहे. यानंतर ना आठवणी रहातील, ना तो. ना भूतकाळ राहील, ना भविष्यकाळ.

कॉफी शॉपमधून उठून आता तो तिला बाय म्हणत होता, एवढ्यात त्याच्या समोरून एक ट्रक धडधडत- खडखडत निघाला आणि फुटपाथवर चढला. फुटपाथवर चढताच त्याने अशी गती पकडली की जणू जमिनीवर कुणीच नाही आहे. त्याचा अ‍ॅक्सीलेटर दाबला जात होता आणि किंचाळ्यांचा आवाज  आकाश फाडू पाहात होता. भूकंप झाला होता जसा. जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. कुणी वाचले. कुणी टायरच्या खाली आले. कुणी मधेच अडकून ओढले जाऊ लागले. आता सगळीकडून पायी चालणारे वाट फुटेल तिकडे अंदाधुंद पळत सुटले. गर्दीला डोळे नव्हते. गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्‍हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही.

क्रमश: भाग ३

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी. आता इथून पुढे)

त्याच्या मनात आलं, या सार्‍यासाठी मग आजचाच दिवस का निवडू नये? आज जीवनातला आपला खास दिवस आहे. आज आपला वाढदिवस आहे. भयमुक्त होण्यासाठी, यापेक्षा दुसरा चांगला दिवस कोणता असेल? आज नाही केलं, तर पुन्हा कधी करायला जमेल?

अकस्मात मनात आलेल्या या विचारात त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी दडून राहिलेला उन्माद सामील झाला. त्याच उन्मादाने रस्ता दाखवला. एका भाड्याने मिळणार्‍या गाडीच्या ऑफीसचा. त्याने अनेकदा कार, जीप भाड्याने घेतली होती. मग विचार केला, आज एक ट्रकच भाड्याने घेतला तर- नंतर विचार करू काय करायचं ते. जेवढ्या त्वरेने हा विचार त्याच्या मनात आला, तेवढ्या त्वरेने त्याने तो अमलातही आणला. नाही तर एखादा निर्णय घेण्यासाठी त्याला किती तरी दिवस, महीने, वर्षसुद्धा लागायचं.

डॉ. हंसा दीप

साशाने एक छोटा ट्रक भाड्याने घेतला आणि वेगाने ट्रक चालवू लागला. त्याच्या गतीपेक्षा त्याच्या डोक्यातील विचारांची गती किती तरी पटीने जास्त होती. आज तो तीस वर्षांचा झाला होता. पूर्णपणे लायक झाला होता. आज नाही, तर पुन्हा कधीच नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायला, तो अगदी उतावीळ झाला होता. शांती आणि सौहार्द बाळगत तो इथपर्यंत पोचला होता. आता यापेक्षा तो जास्त प्रतीक्षा करू शकत नव्हता.

एक गोष्ट करणं शक्य होतं. गाडीचा वेग वाढवायचा. ती फुटपाथवर चढवायची. फुटपाथवर असलेल्या लोकांना चिरडत सुसाट वेगाने गाडी पुढे न्यायची. रस्त्याच्या शेवटी कडेला जे झाड आहे, त्याला गाडी टकरवायची. मग गाडीही वाचणार नाही आणि तोही.  गाडीला नंतर आग लागली, आणि त्याची नावनिशाणीही मिटून गेली, तर सोन्याहून पिवळं. आणि अशा तर्‍हेने त्याच्या ‘मिशन सूड’ या मोहिमेचा यशस्वी अंत होईल. तो तृप्त होईल आणि समाधानाने मरेल.

पण का  कुणास ठाऊक, गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळली. कदाचित आपल्या घराचा निरोप घ्यावासा वाटला त्याला. धिम्या गतीने तो गाडी चालवत होता. त्याला लोकांना भासवायचं होतं की तो घर बदलतोय आणि सामान घेऊन जाण्यासाठी त्याने ट्रक आणलाय. तो मात्र घरच नव्हे, तर शहर, देशच काय जगही बदलायची इच्छा धरून आलाय. घराजवळ त्याच्या परिचयाचे अनेक चेहरे आपल्या कामावर जाताना त्याला दिसत होते.

“गुड मार्निंग, काय म्हणातोयस दोस्त?” जवळून निघलेला जेसन एका क्षणासाठी थांबला. तो कामावर जाताना रोजच सकाळी भेटायचा.  जेसनच नव्हे, तर अनेक लोक याचवेळी कामावर निघण्यासाठी बाहेर पडत.

“गुड मार्निंग जेसन, सगळं ठीक आहे.” आपले हात हवेत पसरून त्याच्या अभिवादनाला उत्तर देत, साशाने स्मितहास्य केलं.

‘आज ट्रक घेऊन कामावर निघालायस?’

‘हं! एका दोस्ताचं सामान शिफ्ट करायचय. नंतर कामावर तर जायलाच हवं!’

‘ काम तर करायलाच हवं! ठीक आहे परत भेटू!’

जेसन तिथेच कुठे तरी रहायचा. तसेच आणखी काही लोक होते। येता-जाता दिसायचे. त्यापलीकडे कुणाशी तसा काही संबंध नव्हता. रोज याच वेळी भेटणार्‍यांना हाय-हॅलो करून तो पुढे निघाला. कुणालाही जराशीही कुणकुण नव्हती की आजचा दिवस त्याच्यासाठी किती खास दिवस आहे. मुक्तीचा दिवस. त्या विचारातून मुक्ती मिळवण्याचा दिवस, ज्या विचाराने आजपर्यंत त्याची पाठ सोडली नव्हती. त्या जखमेपासून मुक्ती, जिची वेदना त्याला रक्तबंबाळ करत त्याच्या काळजापर्यंत पोचली होती. शरीराचे घाव केव्हाच भरून आले होते, पण त्या जखमांनी मनावर घातलेले घाव अजूनही ताजेच होते. त्यामुळे आजपर्यंत तो कुणालाही आपलं मानू शकला नाही. प्रत्येक जण त्याला दहशतवादीच वाटायचा. मुखवटा घालून आलाय आपल्यापुढे, असं वाटायचं त्याला. मुखवटा काढला, तर आत हिंसक पशूच असणार आहे, जो त्याला पकडीत जखडणार आहे असं वाटायचं त्याला. तो धडपडेल. तडफडेल. मदतीसाठी इतरांना हाका मारेल, असे विचार त्याच्या मनात यायचे.

साशाचे पालन-पोषण करताना, त्याच्या दत्तक माता-पित्यांनी त्याला खूप काही शिकवलंही होतं. अनेकदा भूतकाळ त्याची पाठ सोडायचा, तेव्हा तो असा माणूस बनायचा, की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटायचा. प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करू लागायचा. रुंद कपाळ, भुरे केस, छोटीशी फ्रेंच कट दाढी. मोठा आकर्षक दिसायचा तो. त्याचे नाव घेऊन मुली दीर्घ निश्वास टाकत. त्याची शालीनता बघून अनेक जणी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत. पण कुणीच त्याच्या मनाच्या तळापर्यंत पोचली नाही. एक एक करत सगळ्यांनी आपले हत्यार टाकले. अपवाद फक्त लीसाचा.

लीसा अजूनही त्याच्या मागे आहे. तिचं शालेय शिक्षण त्याच्याबरोबरच झालय. अनेकदा ती त्याला भेटायला येते. त्याच्या घराच्या बाहेरही आणि कामाच्या बाहेरही.  साशाने तिची उपेक्षा केली, बघून न बघितल्यासारखं केलं, तरी ती आपली सावलीसारखी त्याचा मागे असते. तिचा स्वत:चा परिवार आहे. ती कामदेखील करते. साशाला कधी कधी समजतच नाही की साशा तिच्यापासून दूर का रहातो?       

साशाची इच्छा असूनही तो लीसाला समजावू शकला नाही, की ती त्याला आवडते, पण त्याच्या आत जी भीती आहे, तिला तो घाबरतोय. ती भीती त्याला अशा तर्‍हेने जखडून टाकते, की कुठल्याही व्यक्तीतला चांगुलपणा त्याच्या ल्क्षातच येत नाही. त्याला नेहमी तेच तेच आणि तेवढंच दिसतं. चांगल्या चेहर्‍यांच्या आतही त्याला कुठे ना कुठे तरी पशुता दृष्टीस पडते. मनापासून वाटूनही पापुद्र्यांखाली जमलेल्या भीतीपासून त्याला मुक्ती मिळत नाही. ओल्या मातीला जसा आकार दिला जाईल, त्याच आकारात ती वस्तू कायम रहाते, तुटल्या-फुटल्याशिवाय या वस्तूचं दुसरं काहीच होऊ शकत नाही तसंच. साशाचं बालमनदेखील त्या भीतीत असं घट्ट जखडलं गेलय, इतकं पक्कं झालय की बदलायला तिथे कुठे वावच उरला नाही.

लीसाकडेदेखील, तो त्या पद्धतीने बघू शकला नाही, ज्या पद्धतीने त्याने बघावं, असं लीसाला वाटत होतं. साशालादेखील तिच्या संगतीत खूप छान वाटायचं. तो तिच्या संगतीत वेळ घालवू इच्छ्त असे. पण काही क्षणातच ते विचार त्याच्या डोक्यात प्रहार करू लागत, आणि ते त्याला एकटं  राहायला भाग पाडत. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एक दिवस लीसा साशाला म्हणाली, ‘ मी तुला मुळीच आवडत नाही का? ‘

या प्रश्नासाठी तो तयार नव्हता. उत्तर लगेच द्यायला हवं होतं. त्यामुळे गोष्ट घुमवून फिरवून तो बोलू शकला नाही. तो म्हणाला, ‘तू मला खूप आवडतेस.’

‘खरंच!’ लीसाचे डोळे चमकले. साशाच्या डोळ्यात खोलवर काहीतरी शोधताना तिचा चेहरा प्रफुल्लित झाला. तिच्या आंगोपांगातून खुषी झळकू लागली. असं उत्तर येणं तिच्यासाठी खूप रोमॅंटिक होतं आणि खूप रोमांचकही.

‘ हो. अगदी खरं!’ तो स्वत:ला थोपवू शकला नाही. एका तरुण हास्यासह तो तिच्याकडे एकटक बघत राहिला.

‘मग माझ्यापासून दूर का रहातोस?’

‘कारण मी अजून तरी कुठलंही नातं जोडायला तयार नाही.‘

‘ काही हरकत नाही. मी समजू शकते. तुला हवा तेवढा वेळ तू घे. मला तुझी सदैव प्रतीक्षा राहील.’

लीसा आसपासच कुठे तरी राहायची  आणि साशाची येण्या-जाण्याची वेळ बघून त्याला भेटण्याचा प्रयत्न करत करायची. साशादेखील सामान्य दिसण्याचा, रहाण्याचा प्रयत्न करत रहायचा. आपल्या आत कोणतं युद्ध चालू आहे, याची त्याने कुणालाही जराही जाणीव होऊ दिली नव्हती.

जेव्हा भूतकाळच्या आक्रमणापासून तो दूर असायचा, तेव्हा तो सगळ्यांना खूप मदत करायचा. सगळ्यांच्या मनात त्याने आपल्यासाठी खास जागा निर्माण केली होती. गरजावंतांसाठी जे जे करणं शक्य असेल, ते ते तो करत होता.     आज मात्र तो जसा विचार करत होता, तसा त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता. आज त्याच्यात इतकी आकड आली होती, की स्वत:ला सशक्त दाखवण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो निघाला होता. टोरॅंटो शहराच्या नार्थ यॉर्क एरियात, फिंच अ‍ॅव्हेन्यूपासून पुढे जात  यंग स्ट्रीट आणि शेपर्ड अ‍ॅव्हेन्यूच्या चौकाजवळ त्याला पोचायचं होतं. आपलं काम पूर्ण करण्यासाठी. त्या प्रत्येक घटनेबद्दलचा न्याय मिळवण्यासाठी, काही खास लोकांचे चेहरे काजव्याप्रमाणे चमकत होते आणि अदृश्य होत होते. त्याच्यावर दया दाखवणार्‍यांचेही चेहरे त्यात सामील होते.

‘बिच्चारा..’

‘राक्षसाच्या घरात जन्माला आलाय हा निष्पाप मुलगा…’

‘मार खाऊन खाऊन दिवस काढतोय.‘   

‘सारखा भेदरलेला असतो. ‘

लोक दहा तोंडांनी बोलत. जेवढी तोंडे, तेवढे बोल. सगळ्यांची तोंडे तो आता बंद करेल.

गाडी पुढे… पुढे… पुढे चालली होती. लाल दिवा, हिरवा दिवा, याच्याबरोबर त्याच्या छातीची धडधड वाढत होती… कमी होत होती. दुपारची वेळ होती. रहदारी जास्त नव्हती. एकदा तिथे पोचलं, की गाडी कुठून कशी वर चढवायची, याचा तो विचार करणार होता. आपल्या हातातलं स्टियरिंग व्हील त्याने आशा तर्‍हेने धरून ठेवलं होतं, जशी काही  कुणाची तरी मानगुटच त्याने धरून ठेवलीय. त्याला जुनी आठवण झाली. मागे एकदा त्याच्या वडलांनी त्याची अशीच मानगुट धरून ठेवली होती. ती कशी बशी सोडवून घेऊन तो आपल्या खोलीत आला होता. खोलीचा दरवाजा बंद करून तो दिवसभर आत उपाशी तापाशी तसाच बसून राहिला होता. अशीच एकदा त्याच्या आवडत्या सायकलीची मोडतोड करण्यात आली होती. सायकलीच्या प्रत्येक भागाचे तुकडे तुकडे होत असलेले बघताना त्याला वाटत राहिलं, आपल्या शरिराचेच बोटा बोटाएवढे तुकडे होऊन फेकले जाताहेत. सायकलचा प्रत्येक भाग तोडताना होणारा आवाज त्याला आपल्याच ओरडण्यासारखा वाटला, मदतीसाठी जणू तो कुणाला तरी हाका मारत होता.

त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर.

    क्रमश: भाग २

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा !’

‘आज भलताच गोड दियातोयस.  काही खास…’

’आज मौज-मस्ती करण्याचा दिवस आहे ना!’

‘खायचं… प्यायचं… आणि दिवसभर भटकायचं’

‘भाड्याची गाडी घेऊन ड्रायव्हिंगचा आनंद लुटायचा. ‘

आज साशाचा तिसावा जन्मदिवस. केस नीट-नेटके करत आणि आरशाशी बोलत तो हसतो. स्वत:शी गप्पा मारायला त्याला आवडतं. आज तर खास दिवसाची खास सकाळ आहे. मस्तपैकी तयार होऊन स्वत:ला वाढदिवसाची भेट देण्यासाठी बाहेर जायचय. रजा आधीच घेऊन झालीय. शहरातल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण त्याहून खास अशा चांगल्या जागी. भूकदेखील इतर दिवसांच्या मानाने तीव्रतर झालीय. खास रेस्टॉरंटमधील खास पदार्थांचा दरवळ आत्तापासून नाकपुड्यातून वहात पोटापर्यंत जाण्यासाठी उतावीळ झालाय. 

डॉ. हंसा दीप

आपल्या संथ गतीने आरामात कपडे बदलून बूट घालण्यासाठी तो बाहेर आला. घाईघाईत जवळच्याच स्टुलाला धडकला आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्नात जी उडी मारली, ते तो भिंतीवर जाऊन आपटला.  शरिराचं सारं वजन हातांनी पेललं. इतकी वेदना झाली, की काही काळ डोळे रहाटगाडग्याप्रमाणे गरगरले. त्याने या छोट्याशा दुर्घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. आता उत्तम पॉलीश केलेले बूट घालण्यासाठी तो सेल्फमध्ये मोजे शोधू लागला.

अर्ध्या बाहीचा आपल्या आवडीचा टी – शर्ट घालून बुटाची लेस बांधताना जाणवलं, त्याचा हात जरासा आखडलाय. हात कुरवाळत, चोळत त्याने कोपरापर्यंत पाहिले. तिथे हिरवे-निळे डाग उमटले होते. त्या डागांजवळ चांगली जखम झाली होती. त्याच्याजवळच्या कातडीवर रक्ताचे लहान लहान थेंब चमकत होते. बाहेर येण्यासाठी उसळ्या मारत होते. हा डाग किवा हे आलेलं रक्त साधंसं रक्त नव्हतं. त्याचा सगळा इतिहास त्यात सामावलेला होता. एक दोन पाने नव्हेत. सगळंच्या सगळं पुस्तक होतं. इतिहासाचं हे पुस्तक असं होतं , की जे उघडायचं, तेव्हा त्याचं मन आणि मस्तक पूर्णपणे विषासक्त करूनच बंद व्हायचं. हेदेखील आज व्हायला हवं होतं? आज तो खूप खूश होता. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी छानपैकी सजून – धजून तयार झाला होता. जखम झाली, त्याठिकाणी त्याची नजर गेली, तेव्हा एक क्षणही लागला नाही, त्याला, ती — त्यावेळची—- दृश्ये डोळ्यापुढे यायला, ज्यावेळी, तो भिंतीवर आपटावा, म्हणून त्याला धक्का मारला जात होता. अशाच प्रकारच्या काळ्या-निळ्या खुणा त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी उमटत होत्या. या खुणा नष्ट होण्यासाठी  जितका वेळ लागायचा, त्यापेक्षा किती तरी जास्त वेळ त्याच्या मनाती भयाची भावना नष्ट व्हायला लागायचा. जेव्हा असे डाग डोळ्यासमोर यायचे, तेव्हा तेव्हा, तो त्या ठिकाणी पोचायचा, जिथे त्याला कधीच जायची इच्छा नसे. 

एकदा त्याच्या हातून दुधाचा कप पडला, दूध सांडलं आणि ते टेबलाच्या कडेने  वहात, जवळच बसलेल्या त्याच्या वडलांची पॅंट आणि कोट ओला करून गेलं. त्यावेळी त्याने जशी काही सिंहगर्जना ऐकली. त्याला एक जोरदार थप्पड मारली गेली. तो भेलकांडला. खुर्चीवरून खाली पडून भिंतीला टक्करला. डोकं, हात, पाय, नाक सगळ्याला जखम झाली. त्यावर हिरवे-निळे डाग उभारले. नाकातून रक्त वाहू लागलं. टप- टप दुधात रक्ताचा लालिमा मिसळला आणि एक नवाच मातकट रंग तयार झाला. त्या निरागस मुलाचं मन मळून गेलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा दुधाचा कप हातात येई, तेव्हा तेव्हा त्याचे हात कापू लागत. डोळे घट्ट मिटून तो दूध गटकत जाई आणि कप खाली ठेवूनच श्वास घेई.

हानपणापासूनच तो भयाच्या अंधार्‍या विहिरीत ढकलला गेला होता. बाहेरचे जग समजून घेण्यासाठी जेव्हा त्याला बाहेर काढलं गेलं, तोपर्यंत त्या विहिरीचं साठलेलं, दुर्गंधयुक्त पाणी त्याच्या रक्तात मिसळलं होतं. शरीरात पसरलेली ही घृणेची दुर्गंधी, जेव्हा तेव्हा बाहेर येऊन, त्याला श्वास घेणं अवघड करायची. त्याला अशा तर्‍हेने विचलित करायची, की तो गुदमरून जायचा. हे ते जग होतं, जिथे त्याने हिंसेशिवाय दुसरं काहीच बघितलं नव्हतं. जनावरांनी केलेली हिंसा, त्यांच्या पोट भरण्याशी संबंधित असते. पण माणसाने केलेल्या हिंसेची भूक अनेक प्रकारची असते. कधी ती त्याच्या अहंकाराशी जोडलेली असते, कधी त्याच्या नशेशी, कधी त्याच्या चीड-त्राग्याशी जोडलेली असते, कधी त्याच्या अपयशाशी. अशा तर्‍हेची दानवीयता, मानवतेला गिळून, चांगल्या माणसाला राक्षस बनवते आणि हिंस्त्र श्वापदाप्रमाणे जीवन जगायला भाग पाडते.

हेच सगळं त्याने पाहिलं होतं. शिकवलं होतं किंवा असं म्हणा, त्याला दाखवलं गेलं होतं. तो जे काही लहानपणापासून शिकला होता, ते त्याने साठवून ठेवलं होतं आणि तेच मनातल्या मनात शिंपडत होता. आपल्या तिरस्काराच्या पेरलेल्या बियाणाला तो पाणी देत राहिला. ते अंकुरित झाले. फुलले, फळले. आतल्या क्रोधाला, वैरात रूपांतरीत करत, त्याच्या तळतळाटाची वाढ करत राहिले. हे त्याचा आतील युद्धं होतं. ते जिंकण्याचा तो किती तरी वर्षे प्रयत्न करत होता, पण जिंकू शकत नव्हता. जेव्हा त्याला मार दिला जायचा, तेव्हा त्याला वाचवणारं कोणीच नसे. आसपास कोणी नसेच, तर येणार तरी कोण? शेजारी दूर होते. त्याच्या हळू आवाजातलं ओरडणं, किंचळणं त्यांच्यापर्यंत पोचतच नसे. त्याच्याजवळ होती फक्त भीती.

एक दिवस खेळता खेळता, त्याने बॉलला मारलेली कीक वर टांगलेल्या काचेच्या झुंबरावर जाऊन आदळली. झुंबर महागडं होतंच. शिवाय त्याच्या दिवाणखानाभर विखुरलेल्या काचा गोळा करायचं काम… त्याच्या वडलांचा संताप आटोक्याबाहेर गेला. त्या दिवशी रागावलेल्या वडलांनी त्याला असं काही मारलं की त्याचे दातच तुटले. तोडातून वहाणारं रक्त, त्याच्या डोळ्यात उतरलं होतं. सुडाचं एक बीज त्याच्या मनात अंकुरू लगलं. तो काही सांगू शकत नव्हता, पण आपली वेदना एकत्र करू लागला होता. घाव, जखमा, वेदना आणि भीती यांचा एकत्रित प्रभाव त्याला माणसांपासून तोडत राहिला.

पुढल्या वेळी त्याच्या शरीरावर चामड्याच्या पट्ट्याची अशी बरसात झाली, ज्याची वेदना तो अद्यापही विसरू शकला नाही. त्यावेळी त्याने आपल्या वडलांना एका बाईबरोबर पाहिल्यावर तोंड विचकले होते. वडलांचा संताप, पट्ट्याबरोबर साशाच्या शरिरावर उतरत होता. इतकं मोठं झाल्यावरही, कधी कधी झोपेत ते दु:स्वप्न त्याचा पाठलाग करायचं. दचकून घामाने थबथबत तो झोपेतून जागा व्हायचा. अर्ध्या रात्री, ते दृश्य झोपेतून त्याला उठवून आपल्या बाहुंचा विळखा घालायचा आणि तो त्यात धसत जायचा. 

काळानुसार हे घाव भरण्याच्याऐवजी ते अधिकाधिक खोल जात आहेत. छोट्या- मोठ्या घावांचा त्याने हिशेबच ठेवला नाही. मोजण्यासाठी अनेकदा त्याला ती दृश्ये डोळ्यापुढे आणावी लागत. अनेकदा त्याने ती पीडा अनुभवली होती, कारण ती दृश्ये, ती वेदना तो विसरूच शकत नव्हता.

जेव्हा रोजच्या ओरडण्या-किंचाळण्याचा आवाज वाढत गेला, आवाज मोठा होऊ लागला, तेव्हा शेजारी-पाजारी त्रासले. मुलाची स्थिती लक्षात आली, तशी माणुसकी पाझरली. कुणी तरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस, कोर्ट वगैरे सोपस्कार होऊन त्याला दत्तक आई-वडलांकडे सोपवण्यात आलं. ज्यांना स्वत:चे मूल नव्हते, असे पालक, अशा  निरागस मुलांना, अन्न, वस्त्र, निवारा देण्यासाठी स्वेच्छेने तयार असत.

साशा नवीन घरात गेला, पण इथेही त्याची भीती कमी झाली नाही. नवी आई जोएना  आणि नवीन डॅडी कीथ प्रयत्न करत राहिले, ‘साशा, घाबरू नको. आता हेच तुझे घर आहे. इथे तुला जे हवं असेल, ते तू करू शकतोस. बोल तुला काय पसंत आहे? चल. फिरायला जाऊ. तुझ्यासाठी खूप खेळणी घेऊन येऊ.’

तो मान खाली घालून ऐकत राहयचा. त्याला भयमुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच असायचे.  कित्येक दिवस तो काही बोललाच नाही. नंतर बोलायला लागला, तोही घाबरतच. त्याला वाटायचं, हे प्रेम नकली आहे. थोडीशी जरी चूक झाली, तरी त्याला पुन्हा शिक्षा होईल. गप्प बसणंच योग्य. जे जसं असेल, तसं तो स्वीकारायचा. खायला सांगितलं, खायचा. झोपायला सांगितलं, बिछान्याकडे जायचा. मग झोप येवो, अथवा न येवो. जे सांगितलं जाई, ती काळ्या दगडावरची रेघ समजून तो तसं वागायचा. कुणालाही एवढीही तक्रार करायला जागा मिळू नये, असं तो वागायचा. नाही तर पुन्हा कुणाचे तरी हात त्याला मारायला उठतील, असं त्याला वाटायचं.

शाळेत जाताना अनेक मुले रस्त्यावरून आईचा हात धरून जाताना त्याला दिसायची. पण त्याला काही फरक पडत नसे. तो आई या शब्दाशी परिचित होता. आईच्या नात्याशी नाही. आईच्या आकार- प्रकाराशी परिचित होता. आईच्या ममतेशी नाही. आपल्यावर थोपलेल्या घरात तो कैद होता. आपल्या घरातून तो मुक्त झाला, तरी जोएनाला आईच्या रूपात बघण्याचा त्याने कधी प्रयत्नच केला नाही.

एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे शालीन बनून त्याने हे दिवस काढले. एका मेहनती व्यक्तीप्रमाणे तो आपले जीवन जगत होता. मात्र एक विचार सतत त्याच्या मनात यायचा, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेतला पाहिजे. ‘मीच का?’, ‘माझ्याच बाबतीत असं का व्हावं?’ हेच प्रश्न त्याच्या मनात वारंवार यायचे. त्याला टोचत रहायचे. या जखमातून अजूनही पू वाहत होता. त्यावर मलमपट्टी करण्याची वेळ आली होती. स्वत:ला न्याय मिळवून घेऊ इच्छित होता तो. आपल्या मनातील या टोचणीपासून त्याला मुक्ती हवी होती, पण कशी? त्याला कळत नव्हतं.

बालपणीच्या सहनशीलतेची त्याला आता किंमत वसूल करायची होती. आताही प्रतिकार केला नाही, तर जगातले सगळे लोक आपल्या हिंसक स्वभावाने प्रत्येक मुलाला आपली शिकार बनवतील, असं त्याला वाटायचं. कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी.

    क्रमश: भाग १

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फुंकर… भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ फुंकर… भाग-1 डॉ. ज्योती गोडबोले 

(जाई सासरी रमून गेली आणि अरुण  माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. ) इथून पुढे —

अरुण पुढची परीक्षा पास झाला आणि त्याला घसघशीत पगारवाढ मिळाली. माईंच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं.  ‘ जाई, हे श्रेय तुला जाते ग बाई ! तू किती समजूतदारपणे बदल घडवलास अरुणमध्ये ग ! मी खूप प्रयत्न केले ग पण माझं काही चालेना बघ आबांसमोर ! सतत त्याचा पाणउताराच केला नंदिनी आणि त्यांनी ‘.

‘जाऊ दे हो माई, आता झालंय ना सगळं चांगलं? गुणी आहे हो अरुण ! मला हे आलं होतं लक्षात पहिल्यांदाच.म्हटलं मी एक शिक्षक आहे ना, तर हा विद्यार्थी बघू सुधारतो का ! त्याच्या आत्मविश्वासावर बसलेल्या राखेवर मी फुंकर घालायचं काम केलं इतकंच हो !’ माईंचे डोळे भरून आले. गुणांची पोर ग बाई माझी म्हणून डोळे पुसले त्यांनी.   

पुढच्या वर्षी नंदिनी भारतात आली. अरूणच्या लग्नाला ती येऊ शकली नव्हती. यावेळी नंदिनी एकटीच आली होती. तिच्या नवऱ्याला  रजा नव्हती इतकी ! आल्याआल्या नंदिनीने घरात झालेले बदल एका क्षणात ओळखले. 

“आबा माई, काय म्हणतात नवीन सूनबाई? “ नंदिनी म्हणाली.

“ तूच आता प्रत्यक्ष बघ ना “  

जाई सकाळी  नाश्ता घेऊन नंदिनीच्या खोलीत गेली. नंदिनीताई, इथेच घेता का येता डायनिंग टेबलावर?सगळे वाट बघत आहेत तुमची ! जाई हसतमुखाने म्हणाली. नंदिनी बाहेर आली.आबा माई अरुण तिची वाट बघत होते. “ ये ग नंदिनी ! तुला आवडतात तसे दडपे पोहे केलेत जाई ने !” अरुण म्हणाला. नंदिनीने बघितलं, केवढा बदलला होता अरुण. आनंदी, अभिमानाने उंच झालेली मान आणि पूर्वीचा चाचरत, डोळ्याला डोळा न देता बोलणारा अरुण जणू गायबच झाला होता.  नंदिनीला समजले या घरातले पूर्वीचे स्थान डळमळीत झाले आपले. जाईला पाहून ती म्हणाली, “ जाई, छान हुशार आहेस ग तू. आमच्या अरुणला कसं काय पसंत केलंस? “ जाई हसून म्हणाली,” का हो ताई? किती चांगला आहे तुमचा भाऊ ! आता सगळेच कसे डॉक्टर आणि वकील आणि मोठ्या पोस्टवर असणार? आमच्यासारख्या शिक्षकांचीही गरज आहेच की समाजाला, आणि अरुणसारख्या लोकांची फॅक्टऱ्याना ! त्याशिवाय यंत्र आणि माणसांचं कसं चालेल? “  अरुण कौतुकाने जाईकडे बघत होता. असा त्याचा ‘स्व’ कोणीच नव्हता जपला. . त्याची अशी बाजूही नव्हती कोणी घेतली इतकी वर्षं. आणि हसत हसत नंदिनीसमोर धीटपणे बोलायची हिम्मतही नव्हती कोणी दाखवली आजपर्यंत !

चार दिवसात  नंदिनीच्या लक्षात आले, आबा माई सगळे जाई जाई करत असतात. त्या दिवशी जाई शाळेत गेली तेव्हा नंदिनी आणि माई बाल्कनीत चहा पीत गप्पा मारत होत्या. नंदिनी म्हणाली, “ माई, जाईने चांगलीच छाप पाडलीय ग तुमच्यावर ! आबा सुद्धा जाई जाई करत असतात.” 

“ नंदिनी हो ग. फार गुणी आणि कर्तृत्वाची आहेच बघ जाई ! अरुणची काळजी होती ग बाई मला फार. कसा हा मुलगा, वडील  सतत हेटाळणी करत असायचे आणि मी तरी किती संभाळून घेऊ?  माझी फार ओढाताण व्हायची ग ! पण बघ ना, जाईला पसंत करताना आम्हाला माहीत होतं, ही गरीब घरातून आलीय. तिला ऍडजस्टमेंटची सवय असणार. ती आणि अरुण लग्नाआधी चारवेळा भेटले होते त्यामुळे अरुण कसा आहे ते तिला समजले होतेच. आमचा निर्णय योग्य ठरला अगदी. बघ ना,आता लग्नाला तीन वर्षे झाली की. किती बदल घडून आला घरात. अरुण इतका सुखी आणि आत्मविश्वासाने वावरलेला मी कधीही बघितला नव्हता.” 

“ हो माई, छानच आहे ग जाई.  आवडली मला.” 

नंदिनीचे परत जायचे दिवस जवळ आले. अरुण नंदिनीला म्हणाला,  “उद्या दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊया .आमच्याकडून तुला ट्रीट.! “  हा अरुण कोणी वेगळाच होता. एका छानशा हॉटेलमध्ये अरुणने सगळ्यांना जेवायला नेलं. कॉन्फिडन्सने ऑर्डर देणारा, विनोद करणारा अरुण बघून नंदिनीला खूप आनंद झाला.

कौतुकाने नंदिनी म्हणाली. “  किती छान वाटतंय रे अरुण, तुला असं आनंदात बघून. जाई, हे सगळं श्रेय मी तुला देईन. माझ्या भावात आमूलाग्र बदल घडवून आणायचं !. किती छान फुलवलंस ग तू त्याला. हे खरं तर मी करायला हवं होतं.  पण मी माझ्या यशाच्या धुंदीत असायची आणि अरुण कोमेजतच गेला. माझी चूक झाली. आणि मीही लहानच होते ग जाई त्यावेळी. माझ्या हे लक्षातच आलं नाही कधी. आबा,तुमचीही खूप चूक होती तेव्हा. किती उपमर्द करत होतात या बिचाऱ्याचा तेव्हा तुम्ही ! एकटी माई तेवढी उभी असायची अरुणसाठी .अरुण, मला माफ कर हं.” नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. आबाही म्हणाले  “अरुण, माझं चुकलं. दोन मुलात इतका जमीनअस्मानाचा असलेला फरक मला सहनच व्हायचा नाही रे. मला तुझं अपयश हा माझा  पराभव वाटायचा. मी तुला समजू शकलो नाही. माई,अरुण मला माफ करा रे तुम्ही !” 

जाई म्हणाली, “ काय चाललंय हे ! अरुण हे केव्हाच विसरून गेलाय.  हो ना अरुण? ही सगळी तुम्ही आपली, आमची माणसं आहात. आमचं तुम्ही कायम भलंच चिंतणार.  होतात चुका हो आपल्या हातून. आमचंही चुकत असणार. अरुणही चुकला असेल त्यावेळी !” अरुण हसला आणि म्हणाला,” हो !वाईटच होते ते दिवस. पण तेव्हा  मला जाईसारखी मैत्रीण मिळाली असती तर मी असा डिप्रेशन मध्ये नसतो गेलो. माझंही खूप चुकलं. आता वाटतं, आबांच्या वरच्या रागामुळं मी  मुद्दाम पुढं शिकलो नाही. किती चुकलं माझं.  पण जाई माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या स्वाभिमानावरची धूळ झटकली. माझ्यातला स्फुल्लिंग जागा केला आणि मी  माझ्या नोकरीत किती तरी वर जाऊ शकलो. थँक्स जाई. पण एक सांगतो, मी चांगला पिता होईन आणि माझ्या मुलावर कधीही अन्याय  होऊ देणार नाही, की त्याची हेटाळणी करणार नाही.”   

माई हसून म्हणाल्या, “ हो का? जाई, पिता होण्याची तयारी झालेली आम्हाला  नाही का सांगायची?” 

जाई लाजून लाल झाली आणि म्हणाली,” माई अरुण तरी ना !अहो, कालच तर आला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह.”  माईंनी उठून जाईला मिठीच मारली आणि ते कुटुंब आनंदात  बुडून गेलं.

… हे सगळं आत्ता माईंना आठवत होतं.

आबा कालवश झाले आणि नंदिनी  महिनाभर राहून कालच अमेरिकेला गेली. माई एकट्या बाल्कनीत बसून हा भूतकाळ आठवत होत्या. आबांच्या आठवणीनं पाणी येत होतं त्यांच्या डोळ्यात ! शेवटी शेवटी किती बदलले आबा. छोट्या अद्वैतचा जन्म झाल्यावर तर ते पूर्ण बदलून गेले. आबा असे मृदू, प्रेमळ आजोबा असतील हे  माईंना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.  आबांच्या आठवणींनी डोळे भरून आले 

त्यांचे ! अद्वैत माईंना शोधत बाल्कनीत आला, आणि  म्हणाला, “ रडू नको ना माईआजी ! आपले आबा देवबाप्पाकडे गेले ना?  तू रडलीस तर त्यांना वाईट वाटेल.” आपल्या छोट्याशा हातानी अद्वैतने त्यांचे डोळे पुसले आणि तो त्यांना घरात घेऊन गेला.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फुंकर… भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ फुंकर… भाग-1 डॉ. ज्योती गोडबोले 

वर्षभर आजारी आणि अंथरुणाला खिळलेले  आबा अखेर देवाघरी गेले. रीतीप्रमाणे चार लोक येऊन सांत्वन करून,  चार गोष्टी सांगून गेले आणि घरात माई अगदी   एकट्या पडल्या. त्यांना सगळं मागचं आठवलं. नंदिनी तिकडे  दूर परदेशात ! आणि अरुणला तेव्हा आबांचं प्रेम कधीच नव्हतं. त्यांचा अतिशय शीघ्रकोपी स्वभाव, आणि दुसऱ्याला सतत मूर्खात काढायची वृत्ती. त्यामुळे माणसे कधीच जोडली गेली नाहीत. नोकरीत खपून गेलं, पण एकदा रिटायर झाल्यावर कोण ऐकून घेणार ! आबांची हुशारीही दुर्दैवाने अरुणकडे आली नाही. तो वारसा मात्र नंदिनीला मिळाला आणि अतिशय तल्लख बुद्धी घेऊन आलेली नंदिनी डॉक्टर झाली आणि आपल्याच वर्गमित्राशी लग्न करून परदेशात गेली ती कायमचीच. माई आबा अगदी कौतुकाने दोनचार वेळा तिच्याकडे जाऊनही आले.  पण मग पुढेपुढे त्यांना तो प्रवास, ती थंडी झेपेना. जमेल तशी नंदिनी येत राहिली पण तिचंही येणं हळूहळू कमीच होत गेलं. आबांनी हरप्रयत्न करूनही अरुण जेमतेम बी.कॉम. झाला आणि पुढे मला शिकायचं नाही यावर ठाम राहिला. खूप वशिले आणि ओळखी काढून आबांनी अरुणला खाजगी नोकरीत चिकटवून दिला. निर्विकारपणे अरुण ती नोकरी करू लागला. ना कसली जिद्द,ना कसली पुढे जाण्याची इच्छा! माईना अरुणचं काही वेळा वाईट वाटे. लहानपणी अरुण चांगला हुशार होता शाळेत. बोलका, खेळात भाग घेणारा,अभ्यासातसुद्धा  चांगले असत मार्क्स त्याला. पण नंदिनी शाळेत गेली आणि त्याच्यापेक्षा  तीन वर्षानी लहान असूनही अभ्यास, खेळ , वक्तृत्व सर्व गोष्टीत चमकू लागली तेव्हा शाळेत आपोआप अरूणची तुलना तिच्याशी होऊ लागली आणि घरीही आबा सतत त्याला तुच्छ वागवू लागले. अरुण अबोल झाला  मनाने खचूनच गेला आणि पहिल्या दहा नंबरात असणारा अरुण पार शेवटच्या नंबरात जायला लागला. माईंनी खूप प्रयत्न केले, त्याला शिकवणी लावली, पण त्याची घसरण थांबलीच नाही. हसरा आनंदी अरुण अबोल घुमा झाला आणि  त्याला जबर  इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आला.  दिवसदिवस त्याचा आबांशी संवाद होत नसे आणि  माईंशी मात्र तो जरा तरी खुलेपणाने बोलत असे. नंदिनीनेही कधीही अरुणला विश्वासात घेतले नाही, की त्याच्यावर प्रेम केले नाही. त्या दोघा भावंडात अजिबात ओढ प्रेम काहीही नव्हते कधीही.  नंदिनी भावाच्या सदैव वरचढच राहिली. माईना हे समजत होते पण त्या काही करू शकायच्या नाहीत. उलट काही सांगायला गेलं तर नंदिनी म्हणायची, “दादा अगदी मंद आहे माई ! शाळेत सुद्धा नुसता शेवटच्या  बाकावर बसलेला असतो. बाई मलाच म्हणतात,जरा शिकव तुझ्या दादाला.लाज वाटतेअगदी ! असा कसा ग हा.” माई हताश व्हायच्या पण दोन्ही मुलं आपलीच ! शिकवणी लावली म्हणून तो निदान बरे मार्क्स मिळवू लागला. नंदिनी लग्न करून गेल्यावर अरुणला उलट हायसेच वाटले. जरातरी तो घरात माईंशी बोलायला मन मोकळं करायला लागला. माई आता त्याच्या लग्नाचा विचार करायला लागल्या. आबा कुत्सितपणे म्हणाले, “ कोण देणार याला मुलगी ? एवढ्याश्या पगारात भागणार आहे का दोघांचे तरी? मग मात्र माई संतापल्या.“ तुम्ही कधी त्याला आपले म्हणालात? सतत त्या नंदिनीचा उदोउदो ! अहो, स्वभाव बघा की त्याचा. किती चांगला आहे अरुण आपला. त्याचे गुण, मदत करायची वृत्ती, गरीब, समंजसपणा दिसत नाही का तुम्हाला? आहे ना त्याला घरदार ! भरेल हो पोट आपलं आणि बायकोचं. तुम्ही  नका करु बरं काळजी..असेल त्याच्या नशिबात ती नक्की येईल समोर. इतकाही कमी पगार नाही त्याला. तो सांगत नाही तुम्हाला कधी ,पण मागच्या महिन्यातच पगारवाढ झाली आणि सुपरवायझर झाला माझा अरुण.” ‘माईंच्या डोळ्यात पाणी आलं. ……त्या दिवशी सहज म्हणून जुन्या वाड्यातल्या कुसुमताई माईंकडे भेटायला आल्या. “ छान आहे हो फ्लॅट माई ! मी प्रथमच येतेय ना इतक्या वर्षांनी.”  मग नंदिनीची, तिच्या मुलांची चौकशी करून झाली आणि म्हणाल्या, “ अरुणचं कसं चाललंय? किती पगार आहे त्याला? “ माईंनी सांगितल्यावर म्हणाल्या

“चांगला आहे की मग ! लग्न करताय का? आहे एक मुलगी. पण आईबाप गरीब आहेत हो ! मुलगी खरोखर चांगली आहे बघा, पण पैसा नाही म्हणून लग्न रखडलंय. मुलगी लाख आहे, पण लग्नात काही मिळणार नाही. घेता का करून? बघा बाई.हवी तर घेऊन येते उद्या. अरुण, आबा, तुम्ही बघा भेटा तिला “   माई हरखून गेल्या. “ कुसुमताई,आणा तिला उद्याच.बघू या. काय योग असतील तसं होईल बघा. “ 

दुसऱ्या दिवशी कुसुमताई जाईला घेऊन आल्या. काळीसावळी पण तरतरीत जाई त्यांना बघता क्षणीच आवडली. किती चटपटीत होती मुलगी. साधीसुधी साडी होती अंगावर पण नीट नेसलेली आणि छान गजरा  मोठ्या लांब डौलदार शेपट्यावर. म्हणाली, “ मला खूप शिकायचं होतं हो, पण ऐपत नाही माझ्या आईवडिलांची ! मग मी डी.एड. केलं आणि मला शाळेत नोकरी आहे. इतका इतका पगार आहे मला.मी नोकरी केलेली चालणार आहे ना तुम्हाला? “ अरुणला जाई आवडलीच. माईंनाही जाई पसंत पडली. आबा म्हणाले, “ छान आहे मुलगी. ती हो म्हणू दे आपल्या  चिरंजीवांना म्हणजे झालं ! “ 

जाईचा होकार आला आणि  तिच्या आईवडिलांनी साधंसुधं लग्न करून दिलं. जाई माप ओलांडून घरात आली. जाई घरात आली आणि माईंचं घर चैतन्याने भरून गेलं. कधी नव्हे ते आबा स्वयंपाकघरात बसून चहा घेत अरुण माईंशी बोलू लागले.माई माई करत जाई सतत त्यांच्या मागे असायची. शाळेत जायच्या आधी ती सगळा स्वयंपाक उरकून जायची. ‘तुम्ही फक्त कुकर लावा माई, मी डबे भरलेत आमचे दोघांचे !’   माईंचा हात हलका झाला जाईमुळे. रोज शाळेतून आली की शाळेतल्या गमती ऐकताना आबासुद्धा  त्यात भाग घेऊ लागले. अरुणमध्ये आमूलाग्र बदल झाला जाईमुळे. मुळात तो हुशार होताच पण जी काजळी त्याच्या व्यक्तिमत्वावर बसली होती ती जाईने झटकून टाकली.

गोड बोलून तिनं त्याला त्याच्या फॅक्टरीत पुढच्या परीक्षा द्यायला लावल्या. माईना हा बदल अतिशय आवडला. हसतमुख जाई कधी दोन दिवस माहेरी गेली तर करमायचे नाही माईंना. तिच्या गरीब, साध्यासुध्या माहेरघरी किती अदबीने स्वागत होई माई अरुण आणि आबांचे ! तिची सुगरण आई छान पदार्थ आवर्जून पाठवी अरुणरावांनाआवडतात म्हणून. आपली गुणी मुलगी या श्रीमंत घरात पडली म्हणून कौतुकच वाटायचे तिच्या आईवडिलांना माईंचे. जरी अरुण आबांच्या दृष्टीने कमी होता तरी जाईच्या माहेरी त्याची पत चांगलीच होती. त्यांना त्याचा पगार खूपच वाटायचा. जाई सासरी रमून गेली आणि अरुण  माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.) इथून पुढे —-

सगळेच मोठे होत होते.  रिया, तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन काॅपने त्याला घरी आणले.  पण काॅपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लाॅ बद्दल खणखणीत सुनावलं.दंडाची रक्कम वसूल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षलच्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे ! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.  तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली, ” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसिव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो “

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम !”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार ! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला, ” नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लाॅ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली.आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो अमिताच्या पायात घुटमळत होता. अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनोबरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर ! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.

पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा ! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

 येईल का ती कधी भरून? 

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँडवर बराच पसारा पडला होता.  सिंकमध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊचवर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटरवर होता.  तिने पाहिलं तर जॉर्जचा फोन होता.

” हॅलो ! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर ”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्सबर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटरमध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं, ” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.” 

हर्षलला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता, ” बी ब्रेव्ह अमिता  खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.” आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.

 “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर. 

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले..  पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनोचा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेकवर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटरमध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला !  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबरने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठसुट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशीचे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला ऍडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला.आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोसच्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली 

अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

“ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला आंघोळ घालायची का?”

“आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत असेल का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

रजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘ भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत  ’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘ तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस ’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! ‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’ हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो ! 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. तिच्या मनात तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पूजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्याइतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘ थकवा वाटतोय ’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरात धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ‘ ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले. ‘ आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली ’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरात विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. ‘ तुझी  उपयोगिता संपायला आलीय ‘ याची जाणीव लोक आडून पाडून  तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासूसाठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘ देवा, उचल मला ’ म्हणून प्रार्थना करायची. ‘ भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला ’ म्हणत मनातल्या मनात त्याला दुषणे देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते….!

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता ! ‘ तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं….

मित्रांनो !

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा. हे असे प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी गृहीत धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर जर घडत असतील, तर हे फारच भयानक व हृदयद्रावक चित्र आहे.

  * “ जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ” *— 

लेखक : अज्ञात . 

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares