मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

गोष्ट १९९७ मधली. माऊली हडपसरच्या दुपारच्या विसाव्यावरून दिवे घाटाकडे प्रस्थान करत्या झाल्या होत्या. सकाळपासून शहरात बंद असलेली बससेवा दुपारी काही अंशी सुरु झाली होती. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरून हडपसर गाडीतळापर्यंत बस मिळाली आणि दुपारी तीन वाजता दिवे घाटाच्या रस्त्याला लागता आले.

आभाळात तुरळक ढग होते आणि ऊनही होतंच. वातावरणात उष्मा दाटला होता. दिवे घाटाकडे जाणारी वाहने अर्थातच नव्हती. काही पाण्याचे tankers मात्र पुढे जाताना दिसत होते. तसाच चालत निघालो. वाटेत तहान लागली की रस्त्यावर उभ्या असलेल्या tanker मधले पाणी प्यायलो.. जे त्यातील जंतूनाशक औषधामुळे घशाखाली लवकर उतरत नव्हते.. पण इलाज नव्हता. एकतर त्या दिवशी एकादशी असल्याने सकाळी केलेल्या थोड्याशा फराळावरच दिवस ढकलला होता. दिवे घाटाच्या ओढीने पावले झपाझप पडत होती.

मागील काही वर्षे दिंडीसोबत पुणे ते सासवड आणि पुढे पंढरीपर्यंत पायी वारी घडल्याने घाटातील सुंदर वातावरणाच्या आठवणी मनात दाटून आलेल्या होत्या. वेगाने वाट चालणारे वारकरी, दिंडीची वाहने आणि टाळ मृदुंगाचा ध्वनी अजूनही कानांत घुमत होता. घाटाचा रस्ता काहीसा एका बाजूला उताराचा असल्याने उजव्या पायावर शरीराचे वजन आपसूक जास्त येते. पुढची दिंडी थांबली की आपल्यालाही थांबावेच लागते… त्यावेळी मांडीच्या खुब्याचे हाड आपल्याशी बोलू लागलेले असते. पण तिकडे फारसे लक्ष जात नाही. घाट हिरवागार आणि माणसांच्या अंगावरील वेशाने पांढरा शुभ्र दिसत असतो. त्यात पावसाची एखादी सर येऊन गेली की तो गारवा मनात आनंदाची बरसात करीत राहतो. माऊली… माऊली करीत वारक-यांचे जत्थे पुढे पुढे धावत असतात. पुण्यापासून सासवड हा टप्पा तसा बराच मोठा आहे.

वारीत दोन प्रकारची माणसे चालत असतात. ज्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र दिंड्या आहेत, त्यांची मुक्कामांची जागा आधीच ठरलेली असते. इतर लोक मिळेल तिथे राहतात, खातात आणि वारीसोबत चालत राहतात. वारीत व्यवासायानिमित्त सहभागी असणा-या लोकांची, भिका-यांची संख्याही मोठी असते.

संध्याकाळचा अंधार जवळ येऊ लागला आणि सासवड जवळ येऊ लागले की दिंडीतील वारक-यांना एकत्रित चालणे गरजेचे होऊन जाते. अन्यथा गर्दीमुळे पुढच्या दिंडीत आणि आपल्या दिंडीमध्ये थोडे जरी अंतर पडले आणि चुकामुक झाली की त्या लाखोंच्या समुद्यात आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा सापडणे महामुश्किल होऊन जाते… असा अनुभव पाठीशी असतो. त्यामुळे सासवड जवळ येताच लगबग वाढते.

दिवे घाटमाथा ते सासवड पालखी तळ हेही अंतर मोठे आहे. त्यामुळे वारकरी लोकांची बरीच दमछाक झालेली असते. उपवास असल्याने तशी शारीरिक ताकद कमीच असते. पुण्यातील विश्रांतीनंतरचा हा मोठा टप्पा असल्याने वारकरी काहीसे थकलेले असले तरी मनात उत्साह मोठा असतो.

मी वेगाने चालत निघालो. आणि एका वळणावर मला वारका-यांचा एक गट चालताना दिसला. त्यांना गाठले तर पुढच्या वळणावर चक्क माऊलींचा रथ… घाटातील चढावर चढण्याच्या प्रयत्नात! आधी विश्वासच बसेना… जवळ जाऊन पाहता परिस्थिती लक्षात आली. त्यावेळी रथ बराच जड असे. बैलांच्या अनेक जोड्या लावून रथ ओढावा लागे. वारकरी मंडळी घाईत असल्याने रथाला ओलांडून केंव्हाच पुढे गेली होती. रथापुढे क्रमांक एकची दिंडीसुद्धा बरीच पुढे गेली होती. रथासोबत असलेल्या पाच-पन्नास लोकांनी, सेवेकरी, पोलिसांनी बैलांच्या जोडीने रथ वर वर ढकलत चालवला होता. माऊली! माऊली! असा गजर करीत एका एका चढाचे अवघड वळण पार केले जात होते… मी ही जमेल तसा हातभार लावला!

काही वेळातच पुढे चालणारा जनसमुदाय आणि पालखी रथ यांच्यात योग्य समन्वय साधला गेला. सासवडची भजनी मंडळी घाटाच्या माथ्यावर स्वागतासाठी दिंडी घेऊन आलेली होती… माऊली आता सासवडच्या वेशीतून प्रवेश करत्या झाल्या होत्या! 

घाटाच्या शेवटच्या टोकावर पुण्यातल्या अनेक व्यापा-यांनी त्यांच्या मालगाड्या आणून आधीच उभ्या करून ठेवल्या होत्या… आणि त्यांच्या मार्फत वारक-यांना फराळाचे पदार्थ, उपयोगी वस्तू यांचे मुक्तहस्ते वितरण सुरु होते… ! 

मला पुण्यात तसेच रात्री माघारी यायचे होते. याच मालट्रकमधून येण्याची परवानगी एका चालकाने दिली. अंधार पडू लागला होता. मालट्रक परतण्याच्या तयारीत होते. एवढ्यात मला घाटातून खालून तीन आकृत्या चालत येताना दिसल्या… दोन महिला आणि एक वयस्कर पुरुष! पुरुषाच्या पायात काटा रुतल्याने त्यांचा पाय सुजला होता. पत्नी आणि सूनबाई यांच्या साहाय्याने ते वारकरी गृहस्थ एवढा मोठा घाट चढून आले होते… म्हणून त्यांना एवढा उशीर लागला होता! 

यावेळी पुण्यातून सासवडकडे दिवे घाट मार्गे वाहनांची वाहतूक पूर्ण बंद असते. पण कसा कुणास ठाऊक एक मिनीट्रक मागून येताना दिसला… ! मी त्या वाहनाला आडवा होत वाहन अडवले. चालक नाखुशीनेच थांबला… वाहनाच्या मागच्या बाजूने त्या वारकरी बाबांना वर चढवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्यांच्या पायाला मोठी सूज, वेदना असल्याने त्यांना वेळ लागला… बाबांना वर चढता आलेच नाही.. आणि का कुणास ठाऊक त्या चालकाने त्याचे वाहन पुढे दामटले… आम्ही आवाज देत राहिलो… पण तो चालक वाहन घेऊन निघूनही गेला! त्या दोन महिला आणि ते वारकरी बाबा खालीच राहिले… तेथून त्यांचा सासवड मुक्काम किमान चार-पाच किलोमीटर्स तरी दूर असावा! 

मी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाबांनी मला तोंडभरून आशीर्वाद दिला… आणि म्हणाले… ”असू दे, बाळा! माऊली घेऊन जातील आम्हांला!” आणि असं म्हणत ते तिघेही हळूहळू सासवडच्या दिशेने निघाले. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. माझ्याकडे असलेले फराळाचे पदार्थ त्यांच्या हाती सोपवले!

अंधारून आले होते… मागून एकही वाहन येताना दिसत नव्हते. मी त्या तिघांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो… माझे वाहन पुढे निघाले! घाट उतरेपर्यंत वर येणारे एकही वाहन नजरेस पडले नाही! ती तीन माणसं त्यांच्या मुक्कामाला किती वाजता, कशी पोहोचली असली असतील हा एकच विचार मनात सातत्याने येत राहिला! माउलींनी त्यांना सुखरूप नेले असेलच याची खात्री होती! 

दरवर्षी पुण्यातून माऊली दिवेघाटाकडे निघतात तेंव्हा त्या तीन वारक-यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही! रामकृष्णहरी! 

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

अमानवी, अमानुष किंवा पाशवी हे शब्द अनेकदा माणसांनी केलेल्या कृत्यांसाठी वापरले जातात. बऱ्याच काळापासून ते शब्द मला खटकत आले आहेत. विशेषतः ‘पाशवी’ हा शब्द तर फारच त्रास देतो. ते शब्द अप्रस्तुत वाटण्यामागे माझी काही कारणेही आहेत.

आज त्याबद्दल लिहावेसे वाटण्यासाठी तात्कालिक कारण म्हणावे, तर नुकतीच घडलेली एक घटना वाचनात आली.

पण मुळात, ते शब्द मला का खटकतात? 

मनुष्यप्राण्याच्या हातून घडणाऱ्या काही कृत्यांच्या संदर्भात हे शब्द सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, कुठेतरी कौटुंबिक वादामुळे, किंवा व्यावसायिक शत्रुत्वातून उद्भवलेल्या कडाक्याच्या भांडणानंतर एका गटाचे लोक दुसऱ्या गटातल्या निरपराध व्यक्तींनाही जीवे मारतात. अशा घटनेनंतर ‘अमानुष नरसंहार’ अशा मथळ्याखाली ती बातमी छापून येते.

बलात्काराच्या घटनांमध्येही अमानवी, पाशवी अशी विशेषणे नेहमी वाचनात येतात. पुण्याजवळ नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेचेही वृत्तांकन करताना, ‘पाशवी अत्याचार’, ‘माणुसकीला काळिमा’ अशी विशेषणे वाचनात आली.

एका बाबतीत कोणाचेही दुमत असणार नाही की, मी उदाहरणादाखल दिलेल्या सर्वच घटना निंदनीय आहेत, आणि कोणाच्याही हातून कुठेही त्या घडल्या तरी मनात चीड उत्पन्न होतेच. अगदी दूर कुठेतरी युरोपीय देशांमधल्या ज्यू-धर्मियांवर, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आजही घृणाच वाटते.

आपण या अत्याचारांसाठी ‘अमानवी’ हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्या शब्दात असाही अर्थ गर्भित असतो का, की मानवजातीच्या प्राण्यांच्या हातून अपेक्षित नसली तरी, इतर जातीच्या प्राण्यांकडून तशी कृत्ये घडू शकतात? माझा नेमका आक्षेप त्याच गर्भित अर्थाला आहे. ‘पाशवी’ हा शब्द वापरताना तर तो अर्थ गर्भितदेखील नसतो. आपण सरळ-सरळ असेच म्हणत असतो की ते कृत्य पशूकडून घडले तर काही नवल नाही!

पण हे तर सर्वमान्य आहे की कधीकधी एखादा प्राणी किंवा पक्षी, निव्वळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या प्राण्या-पक्ष्यावर हल्ला करतो. तसेच एखाद्या पशूला जर भूक लागली तर आणि तरच तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपली भूक भागवतो. पण त्यातदेखील एक विलक्षण सत्य दडलेले आहे. सर्वसाधारणपणे, कितीही भूक लागलेली असली तरी पशू भक्ष्य शोधत रानोमाळ हिंडतो, पण सहसा आपल्या जातीच्या प्राण्याला मारून खात नाही. अपवादात्मक परिस्थितीत कदाचित तसेही घडतही असेल.

त्याचप्रमाणे, लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या पशूने बलात्कार केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यासाठीही पशूजातीतल्या नराकडून मादीची, किंवा मादीकडून नराची मनधरणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा समागम होतो असे मी ऐकले-वाचले-पाहिले आहे.

परंतु, मनुष्य हा एकमेव प्राणी असेल जो भुकेपोटी नव्हे तर इतर भावनांच्या प्रभावाखाली चोरी, दरोडे किंवा हत्या करतो. केवळ मनुष्यप्राणीच आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करतो. मग त्याच्या कृत्यांना ‘पाशवी’ म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?

आता, हे सगळे विचार आजच लिहावेसे मला का वाटले?

… आजच वर्तमानपत्रात फोटोसह आलेली एक बातमी वाचली. गुजरातमध्ये पालिताना तालुक्यातल्या गरजिया नावाच्या गावी, काळू परमार नावाचा एक माणूस गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. अचानक एका सिंहिणीने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले. त्यानंतर ती सिंहीण त्या माणसाच्या पायावर आपले वजन ठेवून बसून राहिली. त्याच्या नरडीचा घोट ती अगदी सहज घेऊ शकली असती. पण तिने तसे केले नाही. त्या बिचाऱ्या माणसाला फारसे काहीच करता येत नव्हते. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी दगड मारून त्या सिंहिणीला पळवून लावायचे प्रयत्न सुरु ठेवले. बऱ्याच प्रयत्नांती, ती सिंहीण उठून रानात पळून गेली आणि काळू परमारचा जीव वाचला.

अधिक माहिती अशी समोर आली की त्या सिंहिणीने नुकतीच एक शिकार केलेली होती. कदाचित ती भुकेजलेली नसेलच. आणि म्हणूनच तिने काळूला जीवे मारले नाही!

आता या घटनेला लोक असेही म्हणण्याची शक्यता आहे की, “त्या सिंहिणीने काळूला जिवंत सोडून अक्षरशः ‘माणुसकी’ चा प्रत्यय दिला!”

खरे पाहता, इतकेच म्हणता येईल की त्या सिंहिणीने केवळ ‘पशुधर्म’ पाळला !

 

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊस आला गं… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊस आला गं ☆ संगीता कुलकर्णी ☆

पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंगंध… ! पहिल्या पावसाची गोष्टच काही वेगळी… ! त्याचे आणि माझे नाते खरंतर जिव्हाळ्याचे.. पाऊस आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… शब्दांना पूर घेऊन एक वेडा पाऊस आला… !

 आला आला

 पाऊस आला

 मला भिजवून ओलेचिंब करुन गेला

पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की येणार्‍या मृगाची चाहूल लागते.

सर्वच या सृजन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. पहिल्या पावसाची आतुरता या सृष्टीतल्या प्रत्येक न् प्रत्येकाला ही असतेच ना.. !

पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची किमया डोळे उघडे ठेवून बघत रहावी अशीच…

 पावसाची सर

 कोसळत होती 

 भिजताना सृष्टी

 उमलत होती

चिंब भिजलेल्या सृष्टीचा किमया मी मनात रेखाटत होते.. निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते… ढगांची गर्दी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज..

तो आवाज ऐकला की टाळ मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय असा भास मला होतो.. चिंब भिजलेल्या सृष्टीचा अप्रतिम सुंदर 

देखावा मनात रेखाटत मी पावसाकडे बघत होते… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय… पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा… ! 

 आसुसलेली धरणी 

 मिलनासाठी

 दोन हातांचे पंख

 पसरून उभी

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच पावसाचे ते अगणित थेंब मातीत जेव्हा मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. तुकारामांच्या भैरवीतली “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी” हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.

मातीचा तो धुंद वास…त्याने सुखावत होती.

हसताना मृद्गंगंध पसरवीत होती..

बहरत होती… लाजत होती आणि लाजून चिंब चिंब होत होती.

तो मृद्गंगंध श्वासात किती आणि कसा भरून घ्यावा… !

हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो..

वातावरणात विलक्षण गारवा येतो.

मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण असे नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की तो नुकसानच करून जातो पण मृगाचा पाऊस तो आला की सगळ्यांना सुखावून जातो… सृष्टीतील सर्वांना तो वेड लावतो. पहिला पाऊस नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो.

आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.

माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं आवडत.. जमतं… तो स्वत:हून मला भावना देतो… मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही तर पाऊस त्याही पलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो… पहिल्या पावसात त्याने मला भिजत असलेली पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल… मला बेधुंद जगताना पाहून त्यालाही पावसात भिजायची इच्छा झाली होती… पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात…

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे फरक फक्त इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी कायम मनाला… ! या हृदयाचे त्या हृदयी अशी अवस्था… छळणारा, जाळणारा तरीही हवाहवासा वाटणारा पाऊस…!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”द्वंद्व मनातले..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “द्वंद्व मनातले.. ☆ संध्या बेडेकर ☆

हो की नाही ?? बरोबर की चूक ??

योग्य वर्तन की अयोग्य वर्तन ?? खूपदा हे द्वंद्व आपली परीक्षा घेत असत.

आज सकाळी आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या.

काकू माझ्या जावेची आई वारली हो.

मी म्हटलं,

अरे !! हो का ? मग तुम्ही गेल्या नाही. का बरं ? 

 मला या लोकांचं खूप कौतुक वाटतं 

ही मंडळी नातीगोती आपल्या पेक्षा जास्त छान सांभाळतात.

माहेरी सासरी कोणताही कार्यक्रम असो, या बस चां प्रवास करून तेथे नक्की जाणार. आज पाऊस आहे, ऊन आहे असे प्रश्न यांना पडत नाहीत बहुतेक.

बरं ! असंही नाही की त्या दिवशी त्या कामाला येणार नाही. पायी चालत येणे, काम करणे, पुन्हा घरी पायी जाऊन, बसने दोन तासांचा प्रवास करून, तेथून पुन्हा पायी चालत कधी कधी तर भर चिखलात चालून त्या तेथे पोहचतात.

कौतुक आहे. नाही का ?? 

आपल्या सारखं (म्हणजे मी माझ्या बद्दल बोलतेय) नाही की आपल्या सोयीनुसार आपण जातो किंवा फोन करून आपलं कर्तव्य पार पाडतो.

असं म्हणतात,

एकवेळ सुखात सहभागी झालं नाही तरी चालेल, पण दुःखात माणसाने जरूर जावे, आधार द्यावा.

मावशी म्हणाल्या,

काकू ! जायला तर हवं होत हो, पण मी नाही गेले. त्या पूढे म्हणाल्या,

काल पूर्ण दिवस याच विचारात गेला. एक मन म्हणतं होत जायला पाहिजे, तर दुसरं मन जून्या घटनेची सारखी आठवण करून देत होतं.

 काकू!! दोन वर्षांपूर्वी माझे आई वडील दोघेही गेले, पण या माझ्या जावेने एकदाही विचारलं नाही. साधी चौकशी ही केली नाही. आता आमची लोक पण फोन वगैरे करतातच की. पण एक फोन सुद्धा केला नाही हो.

न येण्याचे खोटे कारणही सांगितले नाही.

फक्त पाऊस पडला की भात लावायला ये असा फोन न चूकता करतात.

 काकू! श्रीमंतीचा भारी माज आहे तिला. हेच जर एखाद्या श्रीमंत घरात घडलं असतं, तर लगेच धावत गेले असते.

बरं! हे असं वागणं काही पहिल्यांदाचच आहे, असं नाही.

मी बरोबर नक्कीच वागले नाही, पण त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव केंव्हा होईल ? 

 काल मी देवाची माफी सुद्धा मागितली.

म्हंटल,

देवा !! आजचे दोन नंबर कापून घे बाबा. पण यावेळी मी असंच वागणार. या दोन नंबरची भरपाई मी कधी तरी करेन.

 गरीबांच्या घरचे मरण म्हणजे मरण नाही का ? काहीच संवेदनशील घटना नाही का ?? 

प्रत्येक वेळेस यांची श्रीमंती महत्वाची, कौतुकाची का ?? 

खरं तर त्यांच्या आईचा काहीच दोष नाही हो यात, पण मी गेले नाही.

माझ्या लक्षात आलं,

हा श्रीमंतीचा रोग समाजातील प्रत्येक पातळीवर आहे.

या रोगाने पछाडलेल्या लोकांची जमात सर्व ठिकाणी आढळते.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच असतात.

तसं मला मावशीचे म्हणणे पटले. अगदी सहज सुलभ प्रत्येकाच्या मनात येणारे हे विचार आहेत.

असे प्रसंग आपल्याला दुविधेत टाकतात. आपली चूक कळत असते, पण झालेला अपमानही लक्षात असतोच ना.

योग्य वर्तन विरुद्ध (×) अयोग्य वर्तन या मध्ये खडाजंगी युद्ध चालू असत.

 आपलेच प्रश्न ? त्यावर आपणच दिलेली उत्तरे, नंतर उत्तरांचे विश्लेषण. यांचे जणू पारायण सुरु असते. एका विचारांवर थांबल्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने तीच सायकल सुरू होते.

हो. की. नाही ???

 यापैकी एकावर येऊन गाडी काही लवकर थांबत नाही. असं किती तरी वेळ / कधी कधी तर बरेच दिवस हा खेळ मनात चालू असतो. यावेळी अनेक वाचलेले सुविचार ही आठवतात.

 कोणी कसं वागावं ? हे आपल्या हातात नाही. पण आपण नेहमी व्यवस्थित वागावं ना.

असं वागल्याने खरंतर ते स्वतःचाच अपमान करतात. आपला कुठे झाला ?

 असे एक ना अनेक विचार मध्ये मध्ये लुडबुड करतात. आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात 

पण का ? का म्हणून नेहमी ऐकायचं ? सहन करायचं ? त्यांचे ऐकत राहिले तर समोरच्या ची हिम्मत वाढते. आपण काहीही करू शकतो, कसेही वागू शकतो, असा त्यांचा समज कधीतरी दूर केलाच पाहिजे.

They should not take us for granted.

बरं एवढं करून श्रीमंत म्हणजे असे काही गडगंज वगैरे नाही. आणि असले तरी त्यांच्या दाराशी आम्ही उभे आहोत का ?? 

मोठी कार, डोळ्यांवर मोठा गॉगल्स, हातात मोठा मोबाईल, मग तो आय फोन असेल तर अजून स्मार्ट, अजून श्रीमंत समजून वागणारे लोक आजूबाजूला बरेच दिसतात.

दोन चार वाक्य इंग्रजीचे बोलता आले तर श्रीमंतीत अजून दोन डिग्री ची वाढ.

 हीच श्रीमंती, हाच स्मार्टनेस बस. बाकी कांक्रीट असं काही दिसत नाही त्यांच्यात.

खरं तर 

Making other people feel small, doesn’t make you big.

अशा लोकांशी वागायची आपली एक पॉलिसी आपल्यालाच तयार करायची असते.

 माझं माझं मी ठरवलंय. अगदी पहिल्या च अनुभवावरून नाही, पण जर असं वागणं नेहमीचच झालं तर, मग मात्र काही तरी ठरवावच लागत. त्यावेळी 

I follow the Principle.

Forget the past but Remember the lesson.

Moral in my life is very simple.

You treat me good, I will definitely treat you better.

कधी कधी आपल्याला आपल्याच वागण्याचे कारण लक्षात येत. की 

We have reduced communication to the people we love, not because we hate them but because they make us feel like, we are nothing to them.

चांगले संबंध नक्कीच असावेत, पण ती काय एकाच पार्टीची जबाबदारी असते का ??

I follow these principles in my life.

मावशीचे बोलणे ऐकून, मी आपल्याच विचारात दंग होते.

मावशींच्या बोलण्याने पुन्हा भानावर आले.

त्या विचारत होत्या,

काकू !! मी बरोबर बोलतेय का ? माझ वागणं एकदम चूकच आहे का ? 

आता काय उत्तर द्यावं ?? कळेना मला.

मी म्हटलं,

“कुसुम ताई कोणावर एवढं नाराज होऊ नका. ” त्याच महत्व आपल्या आयुष्यात कमी करा. पण या अशा प्रसंगी जाऊन या.

तुम्हालाच बरं वाटेल.

नाहीतर तुमच मन तुम्हाला खात राहील.

 शैवटी मला माझंच कौतुक वाटलं. समाधान मिळाल.

चांगले बरोबर विचारांनी चूक अयोग्य वर्तनावर मात केली.

म्हणतात ना,

Be a good person but do not waste time to prove it.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे

 चाळीस – पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यात लक्ष्मी क्रीडा मंदिरात, एका पावसाळ्यातल्या शनिवारी रात्री ९ वा. पंडित भीमसेन जोशींचा “पावसाळी राग”हा गायनाचा कार्यक्रम ठरविला होता. प्रवेश मूल्य रु ३/-फक्त!

शुक्रवार सकाळपर्यंत केवळ बावीस तेवीस प्रवेशिका विकल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात आपण सपाटून मार खाणार याचा अंदाज ठेकेदाराला आला. त्याने दुपारीच आण्णांचे घर गाठले. मी त्याच्याबरोबर होतो. आण्णांच्या अंगात ताप होता. गाणं होईल की नाही अशी शंकाच होती. ठेकेदाराने त्यांना रडून परिस्थिती सांगितली. “गाऊ शकाल का उद्या? ” विचारले. मानधन कमी करण्याची विनंती केली. त्यावर आण्णा म्हणाले, ” हो रे हो, नक्की गाईन आणि ते मानधनाचे नंतर बघू आपण. आधी गाणे तर ठरल्याप्रमाणे होऊ दे. “

शनिवारी संध्याकाळपर्यंत काही तिकीट विक्री झाली.

कार्यक्रम रात्री ९चा. पंडितजींना घ्यायला मी त्यांच्या घरी रात्री आठ वा. पोहोचलो. ते जेवायला बसतच होते. घरात जाताच ते म्हणाले, “बसा. दोन घास जेवून घेतो. म्हणे रात्री xxxxx मोकळा. “

पावणे नऊ वा. त्यांना घेऊन हॉलवर आलो. तिकीट विक्रीच्या टेबलाभोवती काही रसिक उभे दिसले. आत गेलो. साथिदार आधीच येवून बसलेले. वाद्ये लावायला आरंभ केला. पेटीवाल्याने सूर दिला. पंडितजींनी एकेक तंबोरा लावायला सुरवात केली. बाहेर हॉलमधे रसिक जमायला लागले. पंडितजींच्या अंगात कणकण होतीच. साडेनऊ वाजले.

पंडितजी खांद्यावर शाल पांघरून स्वरमंचावर अवतरले. रसिकांना अभिवादन करून बसले. पुन्हा एकदा वाद्ये लावण्याचे सोपस्कार झाले. श्रोतेही जमायला लागले. चित्र बदलत होते.

आण्णांनी आपला धीर गंभीर आवाज लावला आणि काय, सगळा आसमंत क्षणात त्यांच्या भारदसत, गंभीर षड्जाने भरून गेला! बुवांनी मिया मल्हार गयला आरंभ केला.

इकडे बघता बघता प्रेक्षागार रसिकांनी भरायला लागले, भरू लागले, ओसंडून वहायला लागले!

पंडितजींनी अंगावरची शाल मांडीवर आंथरली. आणि पुढे रात्री अडीच पर्यंत असे काय गायले की बस्. श्रोते ते गाणं अवाक् होऊन ऐकत होते. एक एक रचना रंगत होती.

रामदासी मल्हार नंतर बुवांनी श्रोत्यांना विचारले, ” आता पुरे ना? अडीच वाजले आहेत रात्रीचे” ते पुणेरी रसिक. नाही कशाला म्हणतायत. पुन्हा एक छोटीशी रचना गाऊन पंडितजींनी गाणे थांबविले. ती बैठक भैरवी शिवाय संपली!

फक्त मल्हार आणि मल्हारचे विविध प्रकार संपन्न हाले आणि श्रोते अक्षरशः त्या सुरांच्या वर्षाधारात नखशिकांत नाहून निघाले. पंडितजींचे सर्वांग घामाने डबडबले होते, घामच्या धारा अंगांगातून निथळत होत्या!

श्रोते निघून गेले. स्वरमंच आणि प्रेक्षागार सुने सुने झाले.

आता व्यवहारपूर्तीचा क्षण आला. ठेकेदार द्रव्याचे पाकीट आणि नारळ घेऊन उभा ठाकला. पंडितजींच्या हातात मानधनाचे पाकीट ठेऊन त्याने बुवांना खाली वाकून नमस्कार केला. बुवा त्याला खांद्याला धरून उठवीत म्हणाले, “पाकीट तेवढेच आहे ना रे? जीव ओतून गायलोय आज. ” तू समजत होतास तसे काही झाले नाही. पुणेकरांनी गर्दीच केली होती नेहमीप्रमाणे”.

ठेकेदार काय बोलणार! त्यानेही समजून दोन नोटा अधिकच ठेवल्या होत्या मानधनाच्या पाकिटात.

 चक्क पूर्ण २२००/- रुपये

– – खरं सांगू, केवळ पुण्यात वास्तव्य असल्यामुळे पं. भीमसेन, वसंतराव, छोटा गंधर्व, हिराबाई, पु. ल. राजा परांजपे, अभिनेते विवेक, नृत्यांगना रोहिणी भाटे, चित्रकार रवी परांजपे, शि द फडणीस, मंगेश तेंडुलकर, रोहिणी हट्टंगडी, मोहन आगाशे, मोहन गोखले, ग वा बेहेरे, सी रामचंद्र, आबासाहेब मुजुमदार, बाबासाहेब पुरंदरे, गो नि दा, इ इ. इ…

– – अशा अनेक गुणीजनांचे प्रत्यक्ष सहवास लाभले. रँ परांजपे, महर्षी आण्णा कर्वे, स्वा सावरकर, बालगंधर्व, मा कृष्णराव, मेहेरबाबा, स्वामी माधवनाथ, गुळवणी महाराज, स्वामी विद्यानंद, सूफी संत बियाबानी, मामा दांडेकर, बॅ जयकर, इ. इ. थोरांची प्रत्यक्ष दर्शने घडली. या विषयी मी भाग्यवान तर आहेच!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

कुसुमाग्रजांच्या या एका ओळीतच पहाट या शब्दाचा खरा अर्थ दडला आहे. रात्रीचा अंधार संपतो आणि हळूहळू सूर्याची किरणे निळ्या आभाळाला रंगवत पसरत जातात. काल संपलाय, कालचा अंधार नाहीसा झालाय आणि आज पुन्हा पहाट झाली आहे. ही पहाट नवी आहे, नव्या स्वप्नांना, नव्या आशा आकांक्षांना घेऊन आली आहे.

पहाट म्हणजे नवा प्रहर, नवी भविष्यं, नवी उर्जा, नवी ध्येयं. पहाट म्हणजे निर्मितीचा काळ आणि “झालं गेलं विसरून जा आता पुन्हा नव्याने करू सुरुवात” असा संदेश घेऊन येणारा दिवसाचा एक महत्त्वाचा प्रहर.

कोंबडं आरवतं, तांबडं फुटतं, पक्षी घरट्यातून किलबिलत बाहेर पडतात, फांदीवर फुलं उमलतात, तळ्यात कमल दले उलगडतात, भ्रमराची मुक्ती होते, अंगणात प्राजक्ताचा सडा पडतो, सुवासिनी सुस्नात होऊन दारची तुळस पूजतात, सडा शिंपतात, रांगोळ्या रेखातात, देवळातली घंटा निनादते, मंत्रोच्चारांचा गजर होतो. सारं वातावरण कसं पवित्र, मंगलमय, प्रसन्न असतं! जणू सारं जळमट झडून जातं आणि पहाटेच्या या प्रहरी एका नव्या उर्जेने, नव्या क्षमतेने जीवन बहरू लागतं. उदया चली नित्य येणारा हा भास्कर जणू पहाटे काना कानात गुणगुणतो,

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला

उठ आता आणि कामाला लाग.

विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यातील पहाट वेगळी असेल. कुठे धुक्यात लपेटलेली असेल, कुठे दवबिंदूत भिजलेली असेल, बर्फाचे कण पांघरून निवांत कुडकुडत असेल, कुणाच्या मिठीत असेल, शृंगाररंगात थकलेली असेल, कुठे धावत असेल, कुठे चालत असेल पण एक मात्र नक्की की साऱ्या झोपलेल्या चराचराला ती गती देत असते. जाग देते, जाण देते, शक्ती— बळ देते.

पहाट ही नेहमीच सकारात्मक असते, आशावादी असते. मरगळलेल्या मनाला उभारी देते, कर्तव्याची जाणीव करून देते. पहाटेच्या प्रहरात विश्वास असतो जे काल झालं नाही ते आज होईल अशी खात्री देतच पहाट उगवते म्हणूनच म्हटले जाते, ” एक दिवस तुझ्याही आयुष्यात पहाट फुटेल”

किंवा “आज स्वातंत्र्याची पहाट उगवली…”

पहाटेत सौभाग्य दडलेलं असतं. या पहाटेत आश्वासकता असते, आवेश असतो, जोश असतो, प्रचंड ऊर्जा असते. मनावरच्या असंख्य बेड्या झुगारण्याची ताकद पहाटेत असते. पहाट मुक्त असते, स्वतंत्र असते. सत्य शिव सुंदराची ओढ लावणारी असते. पहाटेच्या प्रहरात शांत भक्ती रस असतो मन सहजच आध्यात्मिक बनतं. पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी अशी परमात्म्याची ओढ लागते. सुंदर विचारांचा झरा शरीर प्रवाहतून नकळत वाहतो.

अशी ही नीरव, निरामय, रस गंध नादयुक्त पहाट!

आयुष्याचे नवे गीत गातच उगवते…

 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अल्बम… ☆ उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

4 जुलै माझा वाढदिवस! वाढदिवसाची तारीख आली की मागचे कितीतरी वाढदिवस डोळ्यासमोर येऊन जातात! बालपण डोळ्यासमोर उभे रहातं!

आता सत्तरी ओलांडली तरी जुन्या आठवणी कायमच मनात कोरलेल्या आहेत! 50 /60 वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते.. त्यावेळी कॅमेराच नवीन होता. साधारणपणे 60/ 65 वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता. अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट!

माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे, ह्या गोष्टी ते शिकले होते. स्वातंत्र्यापूर्वी माझ्या वडिलांचे कुटुंब कराचीला होतं, त्यामुळे अजूनही तेथील त्यांच्या घराचे, कराची शहराचे फोटो सुद्धा आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे १६ आणि २४ फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये सुधारणा होऊ लागल्या. तसतसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न, मुंज, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बमला नाव देत! ‘गोड स्मृती’

किंवा ‘स्मृती गंध’ यासारखी! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे. पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

केव्हाही मनात आलं की, एखादा अल्बम काढावा आणि जुने फोटो बघत बसावे यातील आनंद वेगळाच असतो!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या! आईच्या कडेवर बसलेली मी, कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोत दिसली.. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ‘ऋजू’ ही एका फोटोत दिसली!

दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्यावर पांढऱ्या खडीचे परकर-पोलके घालून वडिलांबरोबर रत्नागिरीच्या समुद्रावर फिरायला गेलेली मी मला फोटोत दिसली तर, त्यानंतर स्कर्ट – ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की, तू आता मोठी झालीस! नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रमही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच किंवा खेळ करून दाखवावा लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पाव-भाजी, केक नसे, पण घरी केलेले पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे.. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला.. फोटोसेशन होऊ लागले. मित्र- मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाण-घेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले, परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत काढलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले. ‘आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे, ‘ म्हणून मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी- मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून आला! अरेच्चा, किती मोठे झालो आपण! असे म्हणत अल्बम मधल्या फोटोत भर पडत होती…

आता काय पन्नाशी आली.. मुलांची लग्न कार्ये झाली.. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले. फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय

जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्या इतके केस नाही गं उरले, ‘ असं लेकीला म्हटलं तरी, ‘ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय, ‘ असं म्हटलं की छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे! असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी कडे वाटचाल झाली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तो वाढदिवस असे वाटू लागले! इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला…

पण काळ आपल्यासाठी थांबतो का? ती वाटचाल तर चालूच असते! आत्ता वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण केले तरी वाढदिवसाचा आनंद सर्वांमध्ये वाटून घेताना दिवस कसा जातो कळत नाही!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्ज्वला आणि आता तर उज्ज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटोमुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण सांगू शकत नाही वर्णन करून, पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते! ही तर आहे फोटो अल्बमची किमया!

4 जुलै 2026, बहात्तर वर्षे पूर्ण झाल्याचा वाढदिवस साजरा करताना केक कापून झाला! फोटो काढून झाले! आज मोठ्या भावाची माझ्याकडे असलेली उपस्थिती ही माझ्यासाठी आनंददायी होती.. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले. आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत रहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोंमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत! …

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Out of the box..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Out of the box.. ☆ संध्या बेडेकर ☆

” काही लोक ‘ out of the box ‘ विचार करतात. “

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy ‘. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची.

त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय. अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर ‘ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर ‘मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front ‘ वर काम करावे लागते. घर आणि ओफिस. दोन्ही काम सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण.

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका.

अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. आजोबा थेट विषयावरच आले. एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला काय झाल बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने ? त्याच्या डोळयात पण पाणी आले होते आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहोत. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो.

सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात अहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप काम असतात. आम्हाला दिसतय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही.

आजोबा पूढे म्हणाले, अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?

बघू, म्हणून‌अजय ऊठुन गेला आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले. व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. अजूनही विचार करा. असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend ‘ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषध, फळ व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, अरे !! एवढा वेळ तर आमच्या शी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही. असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box ‘विचार करून बघावे. जमलं तर ठीक नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच.

आज अनयचा वाढदिवस, सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींनी बरोबर. म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभवाचे शहाणपण… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ अनुभवाचे शहाणपण☆ शीला पतकी 

परवा एक वाक्य वाचलं….” माणूस लहान मोठा असू शकतो, त्याच काम लहान मोठ असू शकत पण माणसाचा अनुभव मात्र नेहमीच मोठा असतो…..” वाक्य पुन्हा एकदा वाचलं आणि मनाला पटलं म्हणून तर आपण वयाने मोठे असलेल्या माणसाला तो कितीही कमी शिकलेला असू दे आपण त्याला वाकून नमस्कार करतो, म्हणजे करत होतो आताची पिढी झेन वाली आहे ती माहित नाही… तो नमस्कार त्यानं त्याच्या वयात घेतलेल्या अनुभवाला असायचा. याची एक गमतीदार गोष्ट  एका वक्त्याच्या तोंडून ऐकली. मला ती खूप आवडली आणि खूप बोलकी होती…

कॉलेजमध्ये शिकणारी तीन मुलं रेल्वेमधून प्रवास करत होती. एक शास्त्र शाखेचा एक कला शाखेचा आणि एक वाणिज्य शाखेचा… असे ते तिघे …त्यांच्या वृत्तीही त्याप्रमाणे म्हणजे एखादी गोष्ट पाहिली तर कला शाखेचा विद्यार्थी त्याच्यावर निबंध लिहील कविता करेल…. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ती किती फायदा घेऊन विकता येईल… बाजारात त्याला काय किंमत असेल? त्याचे आणखीन काही प्रॉडक्ट बनतील का ?.असा विचार करेल. विज्ञान शाखेचा विद्यार्थी त्याचं पार डीसेक्शन करून त्यात नेमकं काय काय आहे त्या प्रत्येक गोष्टीमुळे काय घडतं याच संशोधन करेल …!

अशा वृत्तीची ही तीन मुलं प्रवास करत होती तिघे खालच्या बर्थ वर बसलेले. वरच्या बर्थवर एक माणूस झोपलेला होता… साधारण मळके कपडे, डोक्याला बांधलेला फेटा  उशाशी घेऊन चपला जवळ घेऊन तो पाय मोडून झोपला होता. त्याच्या वरच्या बाजूला साखळी होती. डब्यात काही दुर्दैवाने घडलं तर ती ओढून गाडी थांबवण्याची सोय.. आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवता येत असे…! त्या तिघांनी त्या साखळी कडे पाहिलं त्यातला एक म्हणाला,” खरंच का रे साखळी ओढली तर गाडी थांबेल?” सायन्स वाल्यांनी सांगितलं,” अरे हो साखळी ओढली की एक विशिष्ट ब्रेक असतो तो आपोआप लागतो गाडी एक दोन मिनिटात थांबते त्या डब्याचा नंबर तिथे येतो गार्ड त्याप्रमाणे चौकशी करत त्या पर्यंत येतात आणि मदत मिळते” …दुसरा म्हणाला,” खरंच हे असं घडत असेल का रे?” विज्ञानवाल्याने उत्तर दिले,” अर्थात प्रयोग करून बघायचे का?.” त्यावर कॉमर्स वाला म्हणाला,” अरे त्याच्या खाली काय लिहिले वाचा विनाकारण साखळी सोडल्यास तीनशे रुपये दंड होईल… सर्वांनी ती बारीक अक्षरात लिहिलेली सूचना वाचली आणि म्हणाले, “खरंच रे बाबा…” एका मिनिटांनी त्यांच्या डोक्यात परत विचारआला…. काय हरकत आहे आपण प्रयोग करून पाहू ना… कॉमर्स वाला म्हणाला,” अरे पण दंड कोण भरणार? आर्ट्स वाला म्हणाला आपण प्रत्येक जण शंभर शंभर रुपये काऊंट्री काढू आणि तीनशे रुपये दंड भरू …आहेत का बघा सगळ्यांकडे पैसे” सगळ्यांनी खिशे चाचपले प्रत्येकाकडे शंभराची एक एक नोट होती.  शंभर रुपये तर प्रत्येकाकडे आहेतच आपण आज हा प्रयोग करूनच बघू…असे म्हणून त्यातल्या एकाने साखळी ओढली… गाडी थांबली… गार्ड आणि रेल्वेची इतर काय त्यांची जी व्यवस्था होती ती माणसं त्या डब्यापर्यंत आली. डब्यात चढून आल्यावर त्यांनी विचारले कोणी साखळी ओढली? आणि काय झाले? आता हे तीघे  थोडे घाबरले होते.  त्यातल्या एकाने युक्तिवाद केली त्यातला एक जण पटकन म्हणाला ,”आम्ही काय केलं नाही साहेब तो वरच्या बाकड्यावर झोपलाय ना माणूस त्यांनी साखळी ओढली बघा अन आता गपचूप खाली मान घालून झोपलाय” गार्डने त्या खेडूताला हलवून उठले आणि म्हणाला ,”ओ बाबा उठा साखळी कशासाठी ओढली? तुम्हीच ओढली ना साखळी? त्यावर तो माणूस ऊठला म्हणाला,” मला जरा खाली घ्या “दोघांचा हात धरून तो खाली उतरला आणि म्हणाला,” होय साहेब मीच साखळी वडली. गार्डन विचारले “काय झालं तुम्हाला काय आपत्ती होती कि तुम्ही साखळी ओढलीत?” तो म्हणाला, “साहेब लयधरन झालय ही तीन पोरं मला पिडत्यात मला ढुसन्या देऊन मारले.  आणि माझ्या खिशातले तीनशे रुपये  काढून घेतलेत, हे चोर आहेत. माझ खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या खिशात तपासा  बर नुसते घेतले नाहीत तर ते लगेच वाटून प्रत्येकाने आपापल्या खिशात शंभर शंभर रुपये ठेवलेत माझा खोटं वाटत असेल तर तुम्ही त्याची झडती घ्या माझे गरीबाची तीनशे रुपये द्या साहेब .अन निघाले नाही ना तर मग तुम्हाला काय मला शिक्षा करायची ती करा आता माझ्याकडे तर एक पैसा बी नाही” गार्डने  त्या तिघांचे खिसे तपासले आणि त्या माणसाने म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाच्या खिशात शंभर शंभर ची नोट निघाली कारण ही मुलं जेव्हा खाली बोलत होती तेव्हा म्हातारा वरती  गप्प पडून ऐकत होता अन प्रत्येकाच्या खिशात शंभर रुपयात हे त्याला पक्क ठाऊक होतं प्रत्येकाच्या खिशातले शंभर रुपये काढल्याबरोबर म्हातारा म्हणाला,” बघा साहेब म्या म्हणतो ते खर आहे का नाही ?” आता गार्डने तीनशे रुपये म्हाताऱ्याच्या जवळ ठेवले हे घ्या बाबा .बाबा तुमचे पैसे नीट सांभाळा आणि त्याने पोरांना पुढच्या स्टेशनवर उतरून त्यांची धुलाई केली ते म्हाताऱ्याच्या गळ्यात काही अडकवायला निघाले होते आणि म्हातारा एवढा बेरकी आणि वयाने अनुभवी त्यांन बरोबर त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला आणित्याला नाहक गोवल्या बद्दल तीनशे रुपये वसूल केले.

असं कोणाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नये समोरचा माणूस शिकलेला नाही याचा अर्थ शहाणा नाही असा होत नाही ना तो धडा त्या मुलांना जन्मभर बरंच काही शिकवून गेला

एकूण काय शहाणपण शिक्षणावर अवलंबून असतच असे नाही अनुभव समृद्धता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अनुभव हे कोणत्या शाळेत शिकून येत नाहीत ते जगाच्या शाळेत डोळे उघडे ठेवून वावरल्यानेच प्राप्त होतात….!

 

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अडचणींवर मात – पार्किंग” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “अडचणींवर मात – पार्किंग” ☆ श्री सुधीर करंदीकर

आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की पार्कींगला जागा मिळेल का?  हे एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्याच समोर असते, आणि त्याच्या जोडीला हे पण प्रश्नचिन्ह असते, की पार्कींगला जागा मिळाली, तर नंतर गाडी बाहेर काढता येईल कां?

आपला टु व्हीलर वाल्यांचा पार्कींगचा अनुभव साधारण असा असतो –

आपण गाडी घेऊन बॅंकेजवळ, दुकानाजवळ किंवा हॉटेलजवळ थांबतो. गाडी लावायला कुठेच जागा नसते. पुढे जावे कां?  असा विचार करत असतो आणि कुणीतरी त्याची गाडी काढतांना दिसतो. आपण लगेच आपली गाडी आत घुसवतो आणि कामाला जातो. कधी कधी जागाच मिळत नाही, मग लांब कुठेतरी गल्लीबोळात जाऊन गाडी लावावी लागते. काम झाल्यावर आपण गाडीजवळ येतो आणि आपली गाडी आजुबाजुच्या गाड्यांमधे अशी पॅक झालेली असते की तिरपे-तारपे होऊन कसरत करत गाडी बाहेर काढवी लागते. कधी कधी आपल्या गाडीच्या मागे बाईक आडवी लावलेली असते. अशा वेळेस थांबणे किंवा as off sight conditions कसरत करणे हाच पर्याय असतो.

फोर व्हीलरला सहसा पाहिजे तिथे पार्कींग मिळतच नाही. पार्कींग मिळालचं तर समांतर पार्कींग मधून गाडी काढ्णे मुश्कील असते. मागची गाडी एकदम जवळ असते आणि समोर खेटून बाईक उभ्या असतात.

यावर लोक काय डोकं चालवतील हे आपल्या कल्पनेच्या नक्कीच बाहेरचे आहे.

गेल्या सोमवारी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पड्लो. रस्त्यात शंकराचे मंदीर आहे. शंकर देव फक्त सोमवारीच पावतात असा आपला समज. त्यामुळे इतर दिवशी शुकशुकाट असणाऱ्या या मंदीरात त्या दिवशी झुंबड होती. अशा ठिकाणी टु व्हीलर पेक्षा फ़ोर व्हीलर वाले जास्त असतात. या रोड्वर समांतर पार्कींगची सोय आहे.

एका गाडीचा मागचा भाग मला एकदमच वेगळा वाटला. कारच्या मागच्या बंपरच्या मागे साधारण ३ फ़ूट लांब स्टॅन्ड होता आणि त्याला कुलुप होते. मी जरावेळ बघत थांबलो की हा काय प्रकार आहे?  मग लक्षात आले की मागच्या गाडीला पार्क करतांना तेवढे ३ फ़ूट अंतर सोडावेच लागणार.

तेवढ्यात गाडीचे मालक आलेच. त्यांनी आल्या आल्या कुलुप काढ्ले आणि आडवा केलेला स्टॅन्ड गाडीच्या मागच्या भागावर फ़ोल्ड केला. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पनेबद्द्ल त्यांचे अभिनंदन केले. स्टॅन्ड वजनाला एकदम हलका होता. मी स्टॅन्ड फोल्ड – अनफोल्ड करून बघितला. मालक गाडीत बसले. स्टॅन्ड मुळे मागे मोकळी जागा होतीच. त्यांनी गाडी मागे घेतली आणि आरामात बाहेर काढली. काही कारच्या मागे सायकल अड्कवलेली असते त्यावरूनच ही कल्पना मालकांना सुचली होती. सकाळी फिरतांना मोबाईल नसतो त्यामुळे फोटो घेता आला नाही.

अड्चण आपली मानली तर त्यावर मात ही करता येतेच, याची प्रचीती आली.

टु व्हीलर करता अशीच पण लय भारी कल्पना परवाच बघण्यात आली –

दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी रोडच्या बाजुच्या रोड्वर काही कामाला गेलो होतो. फूटपाथच्या बाजुला अगदी एकमेकांना चिकटून भरपूर टु व्हीलर उभ्या होत्या. काहींनी फूट्पाथवर पण गाड्या लावल्या होत्या. लोकांची गाड्या लावण्याची आणि गाड्या काढ्ण्याची कसरत दिसत होती. वयस्कर स्त्री-पुरूषांची दमछाक पण दिसत होती. या सगळ्या सीनमधे एक स्कुटी मात्र लक्ष वेधून घेत होती. गाडीच्या दोन्ही बाजुला एक एक फूट मोकळी जागा होती, गाडीच्या मागे कुणी गाडी लावली नव्हती. आणि गाडीच्या सीटवर एक शिकारी कुत्र्यासारखे दिसणारे कुत्रे आरामात बसले होते. बघून पूर्ण कल्पना येत नव्हती. सीटवरच बाजूला एक चारहि बाजूंनी वाचता येईल असा बोर्ड ठेवला होता. बोर्ड वाचायला जवळ गेलो, कुत्रे शांत होते. बोर्ड वरचा मजकूर असा होता –

“तुमची गाडी या स्कुटरच्या दोन्ही बाजुला फूटभर तरी अंतर सोडून उभी करा. जास्त जवळ गाडी लावलेले टॉमीला आवडत नाही. या गाडीच्या मागे गाडी उभी केलेली पण याला आवडत नाही. अशा वेळेस तो काय करतो हे अनुभवच सांगू शकेल. आणि असा अनुभव घेणे महागात पण पडू शकेल. टॉमी भाड्यानी आणला आहे त्यामुळे याला रॅबीज चे इंजेक्शन दिलेले आहे की नाही हे माहित नाही. Happy parking. ” 

मी विचार केला की गाडीच्या मालकाला भेटून अजून माहिती काढायला पाहिजे. तेवढ्यात एक मोठी बाईक आली आणि या स्कुटीच्या मागे उभी राहीली. कुत्र शांत होतं. आपलाच रस्ता आहे या थाटात, बाईक थांबली होती तिथेच ती पार्क करण्याकरता त्यानी साईड स्टॅंड बाहेर काढला आणि उतरण्याची पोझ घेतली. टॉमीचं डोकं सरकलं आणि त्यानी भुंकण्याचं अस्त्र बाहेर काढलं. सटारणे हा काय प्रकार आहे ते बघायला मिळाले. तो माणूस बाईकचा साईड स्टॅंड वर न करताच बाईक घेऊन पळता झाला.

तेवढ्यात एक मॅडम आल्या. त्यांना बघताच टॉमी सीटवरून खाली उतरला. चान्स बघून मी मॅड्मशी संवाद साधला —

मी : मॅड्म, तुमची टॉमीची कल्पना नुसतीच भारी नाही तर लय भारी आहे. भाड्यानी टॉमी हा काय प्रकार आहे?

मॅडम : २० रू तासानी याला आणले आहे. आमच्या भागात कुत्र्यांचे डे केअर सेंटर आहे. एक मॅडम ते सेंटर चालवतात. लोक गावाला जातांना त्यांची कुत्री त्यांच्याकडे सोडून जातात आणि दिवसभर राहण्याकरता पण कुत्री असतात. त्या मॅडम उत्तम ट्रेनर आहेत. कुत्र्यांना ठेऊन घेणं आणि नीड-बेस ट्रेनिंग देणं अशी कामं त्या मॅडम करतात. Know the society and human beings at large या ट्रेनिंगच्या शिर्षकाखाली त्या कुत्र्यांना अनोळखी माणसांबरोबर नाममात्र चार्जेस घेऊन बाहेर पाठवतात. आम्हाला गळ्यात हा टॅग लावावा लागतो, ज्याला हा टॉमी ओळखतो. टॉमीमुळे पार्कींग मधून गाडी बाहेर काढणे एकदम सोपे झाले आहे. आता जातांना हा समोर पायाशी उभा राहतो. बाईक असेल तर तो मागच्या सीट्बर बसतो किंवा मागे बसणाऱ्याच्या मांडीवर बसतो. मी ट्रेनर मॅडम चा फोन नंबर घेतला, मॅडमना बाय केलं आणि टॉमीला बाय केलं.

कुत्री पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे – त्या पटीत कुत्र्यांची डे केअर सेंटर पण वाढतील – आणि पार्कींगची समस्या थोडी हलकी करायला लवकरच प्रत्येकाच्याच टु व्हीलर वर भाड्याचे टॉमी / जिमी / मोती दिसायला लागणार हे निश्चित!

तुमच्याकडे फोर व्हीलर असेल आणि तुम्हाला जर बाहेर गेल्यानंतर पार्किंगचा प्रॉब्लेम येत असेल, तर मागच्या साईडला फोल्डिंग स्टॅन्ड लावायचा विचार जरूर करा. मला जर ती कार पुन्हा दिसली तर मी नक्कीच तिचा फोटो काढून पोस्ट करीन सगळ्यांच्या माहिती करता.

टू व्हीलर वर मार्केटमध्ये जाताना, किंवा कुठे गर्दीच्या ठिकाणी जाताना, टॉमी ला घेऊन जा आणि पार्किंग चा प्रॉब्लेम विसरून जा.

मंडळी, अडचणीवर मात करायचीच असं जर आपण ठरवलं, तर अशक्य असं काहीच नाही. याचा छान आणि मजेशीर अनुभव आला.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares