मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मी म्हटलं, “हल्ली जरा जास्तच भेटतोयस. ”

“तुझं वय बघता networking वाढवून ठेवलेलं बरं, ” तो म्हणाला.

“काहीतरीच काय! ”

“मग तूच सांग. तुमच्याकडे पन्नाशीच्या पुढे डॉक्टर, CA आणि देव या तिघांशी संबंध चांगले ठेवायला सुरुवात होते की नाही? ”

मी हसलो.

देव आज चांगल्या mood मध्ये दिसत होता.

मी सहज विचारलं, “एक सांग. माझ्या आयुष्याचा हिशोब तुझ्याकडे असतो का? ”

“असतो. ”

“सगळा? ”

“सगळा. ”

“म्हणजे मी काय कमावलं, काय खर्च केलं, कुठे गेलो, काय केलं…? ”

“नाही रे. एवढा फालतू data ठेवायला माझ्याकडे server space नाही. ”

मी चमकलो.

“मग कसला हिशोब? ”

तो काही बोलला नाही.

मीच पुढे म्हणालो, “मला वाटलं असेल काहीतरी मोठं account. पुण्य किती, पाप किती… शेवटी net balance. ”

“तुम्ही माणसं ना, मला फार कमी लेखता. मला CA समजता की चित्रगुप्ताचा junior? ”

“मग काय नोंदवतोस? ”

“उदाहरण देतो. परवा तू एका माणसाला फोन केला होतास. ”

“कुठल्या? ”

“ज्याच्याकडून तुला काही काम नव्हतं. ”

मी आठवायचा प्रयत्न केला.

“अच्छा! सहज केला होता. ”

“माझ्याकडे तो सहज नव्हता. ”

“म्हणजे? ”

“त्याचा दिवस खराब गेला होता. तुझ्या दहा मिनिटांच्या फोनने जरा बरा झाला. ”

मी काही बोललो नाही.

“आणखी एक. काही दिवसांपूर्वी घरी सगळे बसले होते आणि तुम्ही कसल्यातरी फालतू विषयावर पोट धरून हसलात. ”

“त्याचीही entry? ”

“मोठी. ”

“आणि मी केलेली महत्त्वाची कामं? ”

“कुठली? ”

“इतकी वर्षं काम केलं, व्यवसाय उभा केला, पैसे कमावले, जबाबदाऱ्या पार पाडल्या… ”

देवाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं.

“त्यासाठी तुला पैसे मिळाले ना? ”

“हो. ”

“मग त्याचं credit पुन्हा माझ्याकडे कशाला मागतोयस? ”

हा मुद्दा मला आवडला नाही.

“म्हणजे achievements ना काही किंमतच नाही? ”

“आहे ना. भरपूर आहे. पण गंमत अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा हिशोब आयुष्यभर ठेवता, त्यांचा मला फारसा ठेवावा लागत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही कुठेच नोंदवत नाही, त्या मला जपून ठेवाव्या लागतात. ”

आता मी शांत झालो.

“उदाहरणार्थ? ”

“तुझ्यामुळे कोणाचा अपमान टळला. कोणाला गरज असताना तू थांबलास. कोणाचं पूर्ण ऐकून घेतलंस. स्वतः बरोबर असूनही एखादा वाद वाढवला नाहीस. कुणाच्या आनंदात मनापासून आनंदी झालास. एखाद्या माणसाला त्याच्या कठीण काळात ‘मी आहे’ एवढंच सांगितलंस. ”

मी म्हणालो, “पण यापैकी बरंचसं मला स्वतःलाही आठवत नसेल. ”

“म्हणून तर मी लिहून ठेवतो! ”

त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खोडकर हसू आलं.

मला अचानक एक शंका आली.

“पण मग चुका? त्या पण लिहितोस? ”

“नक्की. ”

“किती आहेत? ”

“तुला उद्या काही काम नाही ना? ”

“एवढ्या? ”

“अरे, मी देव आहे. जादूगार नाही. ”

मी हसलो.

थोड्या वेळाने विचारलं,

“मग शेवटी माझ्या खात्यात काय उरेल? ”

तो म्हणाला,

“हीच तुमची अडचण आहे. प्रत्येक नातं, प्रत्येक काम, अगदी आयुष्यसुद्धा तुम्हाला शेवटी profit की loss एवढ्यात काढायचं असतं. ”

“मग हिशोब कशासाठी? ”

देव काही क्षण शांत राहिला.

“हिशोब तुला न्यायला नाही रे. तुला कधीतरी दाखवायला. ”

“काय? ”

“तू आयुष्यभर ज्या गोष्टींना मोठं समजत होतास, त्यातल्या बऱ्याच गोष्टी किती लहान होत्या आणि ज्या क्षणांना ‘यात काय विशेष? ’ म्हणून विसरून गेलास, तेच प्रत्यक्षात किती मोठे होते. ”

तो उठून निघाला. मी मागून विचारलं,

“मग आत्तापासून काय करू? ”

त्याने मागे न बघताच उत्तर दिलं,

…. “काही वेगळं करू नकोस. नाहीतर उद्यापासून प्रत्येकाला मदत करून मनात म्हणशील — ‘देवा, entry केलीस ना? ’”

मी जोरात हसलो.

तो थोडा पुढे गेला आणि थांबला.

“फक्त एक गोष्ट कर. ”

“काय? ”

“तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींची पावती मिळत नाही, त्यांना कमी किंमत देऊ नकोस. ”

आणि तो निघून गेला.

आपल्याला पगाराची slip मिळते. Investment चं statement मिळतं. धावण्याला वेळ मिळतो. कामाला appraisal मिळतं. घराला market value मिळते. Social media वर likes मिळतात.

म्हणून त्या गोष्टी खऱ्या वाटतात.

पण आईबरोबर निवांत बसलेली दहा मिनिटं, जुन्या मित्राचा विनाकारण आलेला फोन, मुलांबरोबर झालेलं फालतू हसणं, कोणीतरी अडचणीत असताना आपण न बोलता त्याच्या बाजूला उभं राहणं, यापैकी कशाचीही receipt मिळत नाही.

त्यामुळे बहुधा आपण त्यांचा हिशोबच ठेवत नाही आणि कदाचित आयुष्याची सगळ्यात मोठी गंमत हीच आहे, ज्याचा आपण काटेकोर हिशोब ठेवतो, ते शेवटी इथेच राहून जातं.

आणि ज्याचा कधी हिशोबच ठेवला नाही, तेच बहुधा आपल्याबरोबर येतं.

☆

लेखक : श्री सुबोध गाडगीळ

प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘ कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळीसारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? मनमंजुषेतून ?

☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्याकाळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल! मला आज बहात्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा!

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच? “लिहिता हात” म्हणजे काय? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे? ) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू? काय बरोबर ना मंडळी?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी. आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या!

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई. मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय! टोक काढतांना गाढवासारखं (? ) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं? बस अभ्यासाला! “

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला तरी अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे!

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही? असो! कालाय तस्मै नमः!

तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” नामक आमच्या आठ चाळीच्या संकुलचा एकच नाभिक असलेल्या नाभिकपुढे पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा!

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (? ) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई!

आज वयाच्या बहात्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” अनेक कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच होतं!

केस कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकलमधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो!

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त!

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात!

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल! ” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल! म्हणून सोप्या चालू भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source! ” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे!

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला! “

“टॅक्स! ” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात!

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”रमा.. माझा आदर्श..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रमा.. माझा आदर्श..“ ☆ संध्या बेडेकर ☆

Always Remember Life In Front Of You Is more Important Than Life Behind You.

मी आणि रमा दोघी बाल मैत्रिणी. अगदी शाळेपासून बरोबर. लग्नानंतरही दोघी एकाच शहरात. मी लहानपणी रडू बाई होते. रमा मला सांभाळायची. माझ्यासाठी भांडायची. मला समजावून सांगायची. तिच्या मुळे मी आपली लढाई लढायला शिकले. तिच्या संगतीत माझा आत्मविश्वास वाढला. लग्नानंतर ही आमची दोस्ती आधी पेक्षाही जास्त झाली.

आता तर सर्व मनमोकळेपणाने बोलायला एक भरवशाचे ठिकाण होते. वयाच्या वेगवेगळ्या फेजचे प्रश्नही वेगळेच असतात. त्या त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती प्रमाणे, स्वभावानुसार घेत असतोच. बरोबर कोणी आधार देणारं असेल तर प्रवास थोडा सोपा होतो.

रमा नेहमी म्हणते,    

 अग! आपल्या आयुष्याची १००% जबाबदारी आपलीच असते. आपण कसं वागावं? हा आपला निर्णय असतो. लोकांनी ठरवायला आपले प्रश्न म्हणजे काही ग्राम पंचायतीचे मुद्दे नाहीत.

खूप कमी लोक असतात, जे आपल्याला समजतात.

रमा म्हणजे देवाने मला दिलेलं सुंदर, मुल्यवान उपहारच आहे, असं मी समजते.

असे आमचे एकमेकांच्या सहवासात वैवाहिक जीवन मजेत सुरू होते. आमच्या नवऱ्यांची पण दोस्ती झाली, त्यामुळे आमची चौकडी मजेत होती.

रमा तेथे क्षमा अस बरेच जण म्हणायचेही.

आजही मला ती सकाळ आठवते. रामाचा फोन आला. म्हणाली,    

अग! सेवासदन दवाखान्यात तुम्ही दोघे लवकर या. हे चक्कर येऊन खाली पडले. अजय ऑफिस मध्ये गेलाय.

आम्ही दोघं लगेचच पोहचलो. तोपर्यंत सर्व संपलेल होत. सिव्हीयर‌ हार्ट अटॅक. अचानक सर्व जग बदलल. वयाच्या पन्नाशीतच रमावर सर्व जबाबदारी आली. तिची शाळेची नोकरी, अजय नुकताच नोकरीला लागलेला. रमाच्या मुलीचे पल्लवी चे लग्न दोन वर्षांपूर्वीच झालेलं.

हळूहळू परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतः लाच सांभाळत रमा पुन्हा उभी राहिली.

मागच्या वर्षी अजयचे लग्न झाले. अनिता घरात आली.

अजय अनिता, म्हणाले     

अग! आई तुला नोकरी सोडायची असेल तर तू सोड. अगदी मजेत रहा, नोकरीमुळे तुला तुझे छंद, enjoy करता येत नाहिये. रमा छान गाणं म्हणते. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेते. आपल्या मैत्रिणींचा गृप तयार करून त्यांना पण स्पर्धेसाठी तयार करते. हसतमुख मृदुभाषी रमा सर्वांना आवडते. नोकरी मुळे माझा वेळ छान जातो, म्हणून नोकरी पण करते.

पुन्हा एकदा आयुष्याची घडी व्यवस्थित बसली होती, म्हणण्यापेक्षा वैचारिक ताकदीने तिने आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला होता.

अनुजाचां जन्म झाला आणि घरात पुन्हा नव्याने उत्साह संचारला.

देवाने बहुतेक रमाची परीक्षा घ्यायचे ठरविलेच होते.

पुन्हा एकदा ती भयावह सकाळ होती. रमाचा फोन आला म्हणाली,    

अग! पल्लवी ला बरं नाहिये, म्हणून तिला दवाखान्यात भरती केलय. काय झालं? काय नाही? समजायच्या आत पल्लवीला देवाज्ञा झाली.

एका समस्येतून स्वतः ला सांभाळतच होती तर, दुसरी समस्या समोर उभी. पल्लवी ची दोन लहान मुलं, जावयी आणि अर्ध्यावर संसार सोडून पल्लवी गेली.

कधी कधी देवालाही प्रश्न विचारावेसे वाटतात. असं का? कशासाठी एवढी शिक्षा? एक साधारण जीवन जगणारा माणूस अशी एवढी मोठी कोणती चूक करतो? की ही अशी शिक्षा? ग्रहांचा एवढा प्रभाव, एवढी वक्रदृष्टी?? की ज्या दिवशी देवाने रमाची पत्रिका लिहायला घेतली, त्यादिवशी देवाचा मूड ठीक नव्हता.? की मागच्या जन्माचे भोग? हे तर आपल्या समजण्याच्या पलीकडचे प्रकरण आहे.

देवाचा हा हिशेब आजपर्यंत कोणालाच कळला नाही. त्याची आज्ञा मानन्या पलीकडे आपल्या समोर दुसरा काही पर्यायही नसतोच.

 Sometimes you have to accept the facts that certain things will never go back as they used to be.

 परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलते. कधी माणूस हताश होऊन देवाला, आपल्या भाग्याला कोसतो, तर कधी आपण बघतो 

 Strong men don’t complaint. They adjust, adapt and conquer the situation.

रमा म्हणजे असच एक strong व्यक्तिमत्व.

ती नेहमी म्हणते,    

 Always Remember life in front of you is more important than the life behind you.

पुन्हा एकदा गाडी रूळावरून घसरली. अशा वेळेस प्रत्येक दिवशी एक नवीन परीक्षा असते. Head of the family म्हंटल्यावर तसं वागायची जबाबदारी पण असतेच.

प्रोब्लेम सगळ्यांनाच असतात फक्त त्या प्रोब्लेम मधून बाहेर पडायला भावना, वास्तविकता, समोर उभी असलेली परिस्थिती यांचे विश्लेषण करत दररोज या परिस्थितीत काय महत्वाचे आहे? याचा विचार करून भावनांवर कंट्रोल करता आला पाहिजे. हे तेवढं सोपं काम नाही. त्याकरिता आपल्या पेक्षा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो.

. Strong people never accept the definition of life from others. They say,    

 It is my life. I will define it as per requirements of my family.

रमाने पुन्हा एकदा धैर्याने परिस्थिती ला तोंड दिलं. यावेळेस एक नाही दोन दोन परिवारांना सांभाळलं.

काळ कोणत्याही परिस्थितीवर औषध आहे. हे खरंय.

जसजसा काळ पुढे सरकत होता, पल्लवी ची मुलं मोठी झाली.

आज तर शिक्षण संपवून चांगल्या नोकरीत आहेत.

कोणतेही प्रोजेक्ट कसे successfully पूर्ण करावे? हे कोणीही रमा कडून शिकावे.

मधल्या काळात रमाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच झलक मला दिसली.

अनुजाच्या जन्मानंतर, दुसऱ्या बाळासाठी इच्छा असूनही अजय अनिता दोघे दुविधेत होते.

घरात सर्वच नोकरी करणारे, मग नवीन छोट्या बाळाला कोण सांभाळेल?

यावर चर्चा होताना, रमाने सहजच निर्णय घेतला.

म्हणाली,     

अग! अनिता, मी सोडते ना नोकरी. आता माझी पेंशनेबल नोकरी झालीय. मी लक्ष देईन घराकडे, बाळाकडे. अनुजा ला एक बहिण/ भाऊ नक्की असू दे. अग! काळजी करू नका. मैं हून ना!

हा नोकरी सोडण्याचा निर्णय एवढा सोप्पा होता का? पण अगदी सहजपणे रमाने घेतला. रमा सारख्या लोकांचे विचार vision खूप क्लीअर असतात.

म्हणतात ना,

हम क्या करते इसका महत्व तो हैं ही । परंतु हम किस भाव से करते हैं? इसका महत्व अधिक हैं।

खरंय,

Family is not about blood, It is who is willing to hold your hand when you need to hold it.

आज आम्ही दोघीही सिनियर सिटीझन आहोत. आजही रमाच्या उत्साह बघण्यासारखा आहे. घर, जबाबदारी, त्याचबरोबर आपले छंद जोपासणे याचे गणित/ तालमेल जमत तिला.

मैत्रिणींचा खूप जमावडा नसला तरी चालतो. रमा सारखी एक मैत्रिण म्हणजे माझ्यासाठी लॉकर मध्ये ठेवण्यासारखा मुल्यवान ठेवा आहे.

आम्ही दोघी एकाच वयाच्या मैत्रिणी असलो, तरीही मला तिच्या बद्दल खूप आदर आहे.

Thank you Rama for being with me.

I always enjoy company of People who introduce you to new ways of thinking and new ways of seeing life. They are always very important for me.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सफर!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “सफर!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

☆

‘सफर’ हा हिंदीतला बर का, नाहीतर इंग्रजी शब्द म्हंटल तर अर्थाचा अनर्थ होईल. ! हा सफर म्हणजे प्रवास! यात्रा. !

आता सफर म्हंटल की” हम सफर” हा आलाच.. तो चांगलाच मिळेल तर नशिब.. स्वर्ग दोन बोटे उरले.. वगैरे.. नाहीतर अनुभव.. बाबा आमटे म्हणतातच. ‘An experience is cruel teacher.. it punishes first. teaches later..

आता हम सफर.. हा एक भाग.. दुसरा भाग म्हणजे कशाने प्रवास करणार हा?

‘केल्याने तीर्थाटन! ‘असे म्हंटल आहेच.. कोणताही मोठा पुरुष घेतला तर ते देशभरातून प्रवास करतातच.. अर्थात पायीच. मग ते शंकराचार्य.. जे केरळ मध्ये जन्मले.. अणि श्रीनगर ला पायी गेले.. अणि तपश्चर्या केली.. अणि ह्या प्रवासात भारताचा अभ्यास केला..

गांधीजी, ह्यानी मीठाचा सत्याग्रह पद यात्रेने सुरू केला. विनोबा भावे.. ह्यानी पदयात्रेने भूदान चळवळ सुरू केली..

तर असे हे प्रवास.. !

हा पर्यटन म्हणून आजकाल करतातच.. फक्त साधने बदलली. ‘सजन रे झूट मत बोलो ‘ची बैलगाडी असो वा ‘मांग के साथ तुम्हारा.. ‘ वाली घोडा गाडी.. प्रवास हा आलाच.. साधने तर महत्वाची आहे.. !

कार मध्ये देवानंद ‘चुडी नही मेरा दिल है.. ‘! म्हणतो तर ट्रेन मध्ये ‘ उपरवाला जानकर भी अंजान है’ म्हणून श्लेष साधतो!.. अणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.. !!

तिकडे शर्मिला टागोर जितेन्द्रला.. ट्रक मध्ये ‘हम सफर मेरे हम सफर ‘ म्हणते..

तर जीनत अणि राजेश खन्ना ‘हम दोनो दो प्रेमी’ म्हणत जीवन प्रवासाचा आनंद घेतात..

कारण त्यांना ‘हम सफर ‘ मिळाला आहे फक्त प्रवासच बाकी आहे. !

प्रवासात शॉकच absorber म्हणून भक्कम साथ आहे. !!

ट्रेन, बस ह्याने प्रवास केल्यावर करीना अणि शहीद ह्याना रस्ते आवडून गेले.. अणि ते म्हणतात ‘ मंजिल से रास्ते अच्छे लगने लगे. !

“The last ride together” ही जॉन डन ची कविता खूप गाजली की त्या नंतर जिने हा लग्नाचा प्रस्ताव झिडकारल, त्या गाजलेल्या कवयित्रीने त्याला प्रपोज केले.. and they lived happily ever.. असे झाले.. ! ह्यात कवि म्हणतो.. की. ‘त्याचा सोबत प्रेयसीने घोड्यावर बसावे अणि सोबत त्याने फेरफटका मारावा.. ‘

अणि ती तयार होते. त्या छोट्याश्या प्रवासाचे वर्णन त्याने त्यात केले आहे.. exctasy.. सर्वोच्च आनंद.. देणारा हा प्रवास होता!!

खरा प्रवास हाच आहे की मंजिल दूर आहे.. अणि हम सफर चा हाथ हातात आहे.. शेवटी जन्मापासून मरेपर्यंत हा प्रवास करायचाच आहे.. त्यामुळे destinstion ला पोहोचण्याची घाई नाही करायची बर का… तर प्रवास हाच अनुभव घ्यावा, , उपभोगायचा, साजरा करायचा.. इतक की मंजिल विसरून जाऊ.. ह्यात तद्रूप होऊन जायचे अणि केशवसुतांनी म्हणाल्याप्रमाणे झपूर्झा अवस्थेला पोहोचू शकतो.. !

The road less travelled.. ह्या कवितेत tennyson म्हणतो त्याप्रमाणे धोपटमार्ग.. सोडले की प्रवासात गम्मत येते… अणि काही चांगल करण्याची धमक!!

तर तुमचा प्रवास ठरवा.. साथी निवडा. अणि निघा.. the whole world is with you!!

☆

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

??

☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆

☆

आम्ही छान मराठीत गप्पा मारत चाललो होतो. निनादने याआधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला होता. त्यामुळे त्यालाही हा रस्ता माहितीचा होता. आम्ही गप्पा मारत चालत असतानाच पुढे उजव्या बाजूला एक भारतीय ट्रेकर हळूहळू चालताना दिसला. साधारण पंचावन्न वयाचा, काहीसा स्थूल, पाठीवर छोटी सॅक, कमरेला एक पाऊच, बरोबर एक पोर्टर. त्याच्या खांद्यावर स्वतःच्या बॅगेसहित या माणसाची मोठी डफलबॅग. तो त्या माणसाच्याच चालीने हळू हळू चालत होता.

आमच्या मराठीतील चाललेल्या गप्पा ऐकून तो माणूस थोडा थबकला आणि वळून म्हणाला.

“ पुण्याचे का? ” 

मी म्हणालो “नाही”.

मी ठाण्याचा आणि हा निनाद नाशिकचा.

महाराष्ट्रीयन आहोत. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला.

बाहेरच्या कोणत्याही अनोख्या देशात किंवा अनोळखी ठिकाणी मराठी बोलणारा ट्रॅकर असला की तो पुण्याचाच असतो असा समज बऱ्यापैकी आहे. आणि तो काही अंशी खराही आहे.

“मी पण महाराष्ट्रीयन… इंदोरला असतो. “

मी म्हटलं “अरे वा”… एवरेस्ट बेस कॅम्प का?

“नाही” मी “थ्री पासचा” ट्रेक करायला चाललोय. “

त्याचे एकंदर वय आणि त्याचं शरीराचं आकारमान पाहून मला त्याचं कौतुक वाटलं. त्याच्या एकूण शरीरयष्टीकडे पाहून मला वाटत होतं की, याला हे जमेल की नाही. पण त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. फक्त एक पोर्टर गाईड घेऊन तो सोलो “थ्री पास” करायला निघाला होता.

“थ्री पास” हा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षाही अवघड आहे. मला अजूनही शंका होती.

मी तरीही त्याचं कौतुक केलं.

“अरे वा तुम्ही या वयात पण “थ्री पास” करत आहात आणि तेही सोलो.. ?

नाही म्हटलं तरी हा वीस-बावीस दिवसाचा ट्रेक होता.

“25 दिवस लागले तरीही चालेल. मी हा ट्रेक पूर्ण करण्याच्या उद्देशानेच पूर्ण महिन्याची सुट्टी घेऊन आलोय. ” 

मला त्याचं अजून कौतुक वाटलं. मी त्याचं नाव विचारलं.

“मी पिंगळे”

मी थोडं थांबून विचारलं 

“तुम्ही काय करता”

“मी आयआयटीमध्ये प्रोफेसर आहे इंदोरला” आणि माझे आयआयटीचे क्लासेस पण आहेत. और मेरा लडका इंजिनियर है. बेंगलोरमे सर्व्हिस करता है.. ”

अर्ध मराठी आणि हिंदी बोलण्यावरून तो पक्का इंदोरचा महाराष्ट्रीयन वाटतं होता.

चालत असताना त्याला बोलायला जड जात होतं. थोडी धाप ही लागत होती. त्या अरुंद वाटेवरून खेचर आणि इतर पोर्टर, गिर्यारोहक ये जा करीत होते..

मी आणि निनादने त्यांना थोडं बाजूला थांबवलं. आता माझी उत्सुकता वाढत होती.

निनाद बाजूला शांतपणे उभा राहून आमच्यातील संवाद लक्षपूर्वक ऐकत होता.

आता एका जागी थांबल्यामुळं त्याला बोलायलाही सोपं वाटू लागलं. एकीकडे त्याच्याबद्दल कौतुक पण वाटत होतं आणि काळजीही वाटत होती.

शेवटी मी विचारलंच…

“एवढा अवघड ट्रेक का निवडला. त्याऐवजी नुसता EBC करायचा ”

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला..

“ EBC तो सब करते है. मुझे कुछ चॅलेंजिंग करना था.. ”

और इसके साथमे मेरा EBC भी हो जायेगा..

परत तो एक क्षण थांबला आणि म्हणाला.

“ये मेरा बकेट लीस्टका ट्रेक था. ”

मी म्हटलं “अरे व्वा.. येतो बहोत अच्छा है. दुनियाके हर ट्रेकरके बकेट लिस्टमे ये EBC ट्रेक होताही है. ”

एक दीर्घ उसासा घेऊन लगेच म्हणाला…

“वो क्या है, मेरी वाईफ को कॅन्सर है. सेकंड स्टेज…”

मी एकदम स्तब्ध झालो. माझ्या मनात प्रश्न पडला. यांची पत्नी कॅन्सरने आजारी असूनही हा गृहस्थ एव्हढा अवघड ट्रेक का करतोय.. ?

माझ्या तोंडून निघालं. “ओह.. सॉरी…”

“कोई बात नही. मेरे वाईफ के लियेही मैं ये ट्रेक कर रहा हूँ…”

उसनेही मुझे जबरदस्ती ये ट्रेक पर भेजा. बोली तुम्हारा बकेट लीस्टका ट्रेक है, सपना है… वो पुरा करके आओ. तुम वापीस आने तक मुझे कुछ नही होगा”

धन्य आहे त्या महिलेची. एव्हढा जीवघेणा आजार असूनही नवऱ्याच्या स्वप्नाची काळजी ती करतेय. एव्हढ बळ येतं कुठून…? मी मनातच विचार करीत होतो.

आजूबाजूनी येणारे जाणारे ट्रेकर्स आम्हाला पाहून शुभेच्छा देत होते. आम्हीही ट्रेक पूर्ण करून येणाऱ्यांचे अभिनंदन करीत होतो. ट्रेक रूटवर असा संवाद नेहमीच एकमेकांना बळ देत असतो. थकून येणाऱ्यांना परत उभारी मिळत जाते.

आम्हालाही आता उशीर होत होता. जमेल तर जास्त अंतर आज कापायचं होतं. निनादची पण चुळबुळ चालू होती. आम्ही परत गप्पा मारत हळू हळू चालायला सुरवात केली. त्याने पण आमच्या बरोबर चालायला सुरुवात केली.

त्याला खूप बोलायचं होतं. चालतंच त्याने बोलायला सुरुवात केली…

“मेरी पत्नीको मेरा ट्रेकिंगका पॅशन मालूम है. कुछदिन पहले उन्होने मेरे हातमे एक बुक थमाई… बोली पढो इसे.. मैने दो बार पढी है. “और उनकी डॉक्युमेण्ट्रीभी देखी है …”

माझं कुतूहल हळूहळू वाढतंच होतं. मी माझी चाल हळू केली. त्याच्या बरोबरीने चालू लागलो.

“मैने वो बुक दो दो बार पढी… और डॉक्युमेंटरीभी चार चार बार देखी. और उससे प्रेरणा लेके मैं ट्रेक पे चला हूँ. ”

माझ्या बरोबरचा निनादने शेवटी त्याला विचारलं.

“कोनसा बुक है वो…”

“वो कोई महाराष्ट्रके मुंबईसे कुलकर्णी करके है ”

मी न राहवून म्हटलं “कहीं शरद कुलकर्णी तो नही.. ”

तो लगेच उत्तरला “हाँ वही… जिनकी पत्नीका देहांत एवरेस्टपर हुआ था. ” 

मी आणि निनाद दोघेही स्तब्ध झालो.

पिंगळे पुढे बोलतच होता..

“मैं ये ट्रेक पुरा करुंगा और मेरे वाईफ को समर्पित करुंगा…

उसे बहुत ख़ुशी होगी. ”

आम्ही दोघंही चालता चालता थांबलो.

पिंगळेही थांबले. त्यांचा पोर्टरही पुढे जाऊन आमची वाट पहात थांबला.

निनादला आता राहवलं नाही.

तो हातातला ट्रेकिंग पोल माझ्या दिशेने करीत पिंगळेना म्हणाला.

“तुम्हाला माहीत आहेत का हे कोण आहेत. ? ”

माझ्याकडे शोधक नजरेने न्याहाळत पिंगळे उत्तरले.

“ नाही…याद नही येत. पण कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ”

“ हे शरद कुलकर्णी आहेत ”

आश्चर्याने माझ्याकडे पहात पिंगळे उदगारले.

“ये शरद कुलकर्णी”.. ??

अंजली मॅडमके पती.. ??

जिन्होने वो बुक लिखा है वो.. ?

शेवटी माझ्याच्याने राहवले नाही. त्यांच्याकडे वळत मी सांगितलं.

“हो, मीच तो शरद कुलकर्णी. ”

पिंगळेचा विश्वास बसत नव्हता. परत परत ते विचारत होते. “वो आपही है…? “

… बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो माझ्या पायावर पडायच्या आत मी त्याला सावरले आणि माझ्या गळ्याशी धरले. सारखे त्याच्या तोंडातून तेच शब्द बाहेर पडत होते.

“यहाँ आनेसे पहले.. मैने मॅडमकी फिल्म… चार- चार बार देखी…बार – बार बुक पढी. और निकल पढा.. ”

मैं बहुत भाग्यशाली हूँ…आज मेरी लिये बहुत बढा दिन है.. जिससे प्रेरणा लेके चला हूँ, वह खुद मेरे सामने यहाँ खडा है.. वह भी परदेशमे… मैं मेरे पत्नी को लेके आपसे मिलने जरूर आऊंगा…”

… त्याला झालेल्या अत्यानंदामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

मी त्यांना म्हटलं “अहो तुमच्यासारखे लोक एका चांगल्या उद्देशाने, अशा बिकट परिस्थितीत, तेही या उतार वयात ट्रेक करीत आहात. हे आमच्यासाठीपण खूप प्रेरणादायी आहे. ”

मी त्याला आपल्या बाहुपशात घेऊन थोडं शांत केलं. त्यांना पुढील ट्रेक साठी काही उपयुक्त सूचना दिल्या. शुभेच्छा दिल्या. आणि दोघां उभयंतांना मुंबई भेटीचं आमंत्रण दिलं. आणि पुढील मुक्कामासाठी निघालो.

वाटेतील रोडोडेंड्रॉन गुलाबी फुले आता आणखीन गडद दिसू लागली. त्याचा हलकासा दरवळणारा सुगंध हळुवारपणे मन प्रफुल्लित करित होता. माझं मलाच छान वाटू लागलं.

… तसा मी काही मुळात लेखक नाही. पण आज पहिल्यांदाच माझ्या हातून एक चांगलं पुस्तक लिहून झाल्याचं समाधान वाटलं… अतिशय आनंदायी आणि आत्मसमाधान देणारा अनुभव होता तो…

खरं तर हे पुस्तक लिहायचा मी खूप कंटाळा केला होता.

… पण आता वाटतंय या पुस्तकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही लोकांच्या जीवनात खरीच प्रेरणा मिळतेय… आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आता घेतोय.

☆

लेखक : शरद कुलकर्णी

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आदरणीय डॉ. A. P. J. अब्दुल कलाम सर, माझे रोल मॉडेल, आदर्श व्यक्तिमत्व, माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, सच्च्या दिलाचे माणूस…!

त्यांच्यावर प्रेम करत नाही, असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही…!

त्यांना एकदा तरी भेटून त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे…

आयुष्यातल्या काही इच्छांपैकी ही एक इच्छा…!

… पण आभाळाएवढा माणूस, त्यांच्या पायापर्यंत सुद्धा पोहोचण्यासाठी माझे हात तोकडे पडले.

आदरणीय रतनजी टाटा सर यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, परंतु त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही.

आयुष्यातल्या या काही जखमा.. कधीही भरून न येणाऱ्या…!

यांची वैयक्तिक भेट आता आयुष्यात कधीही शक्य नाही, परंतु त्यांचे विचार आणि पुस्तकं यांनाच गुरु मानून मी तिथे नतमस्तक होतो 

… पण अशी माणसं कुठेही जात नाहीत, शतकांनुशतके ती अमर असतात…!!!

असो…

“लेवा भ्रातृ मंडळ, पुणे” या संस्थेकडून एके दिवशी मला फोन आला, ‘मी पुरुषोत्तम पिंपळे बोलतो, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपले बुके आम्ही विकत घेऊ इच्छितो. ‘ 

भीक मागणाऱ्या लोकांनी भीक मागणे सोडून काम करावे, सन्मानाने जगावे, यासाठी आम्ही एक रोजगार केंद्र सुरू केले आहे. तिथे आम्ही विविध वस्तू बनवतो आणि त्याच्या विक्रीतून तेथील सर्व खर्च भागवतो. मोत्यांचे बुके हे त्यातलेच एक प्रॉडक्ट…

आनंदाने मी बुके पाठवून दिले.

पुन्हा एके दिवशी त्यांचा फोन आला, ‘ पिंपळे सर म्हणाले, ‘आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमचा विशेष सन्मान करू इच्छितो, अमुक दिवशी अमुक वेळेला यावे. ‘ 

त्यांनी बोलावलेल्या दिवशी न टाळता येण्यासारखी बरीच कामं होती, मी त्यांना नम्रपणे माझी अडचण सांगितली, आणि पुढील वेळेला बघूया कधीतरी, पुढील वेळी नक्की येतो असं म्हणालो.

यावर ते म्हणाले, ‘ अहो डॉक्टर, कार्यक्रमाला डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर येत आहेत, त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देत आहोत. ‘

दोन सेकंदासाठी मनातल्या मनात प्रचंड लाटा उसळल्या.

डॉ. सलीम शेख सर म्हणजे आदरणीय कलाम सरांचे नातू (भावाच्या मुलाचे चिरंजीव), Dr. APJ Abdul Kalam International Foundation चे संस्थापक, रामेश्वरम येथील Dr. A. P. J. Abdul Kalam Mission of Life Gallery चे डायरेक्टर… आणखीही बरंच काही…!

… *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय कलाम सरांच्या पवित्र, निर्मळ आणि शुद्ध सहवासाने पुनित झालेलं एक व्यक्तिमत्व…!!! *

.. अत्तराच्या दुकानात बसलेला माणूसही सुगंधी होऊन जातो…!

डॉ सलीम शेख सर यांना भेटून, आयुष्यात हरवलेला आदरणीय कलाम सरांचा सुवास आणि सहवास अशा रूपाने का होईना, पण मिळेल… सरांची भेट, मनाच्या गाभाऱ्यात झालेल्या जखमेवर हळुवार फुंकर तरी मारून जाईल…

या विचाराने सर्वच्या सर्व कामं बाजूला ठेवून गेलो.

मुख्य कार्यक्रमाआधी डॉ. सलीम सरांशी भेट झाली, काम समजल्यानंतर ते सद्गदित झाले, दूर उभ्या असलेल्या मला त्यांनी जवळ बोलावलं, छातीशी लावलं, पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली, खांद्यावर हात ठेवून तुझ्यासोबत आहे म्हणाले…!

हेच ते हात असतील ना? जे कधीतरी इवले होते, आणि या हातांना आदरणीय कलाम सरांचा सुद्धा स्पर्श झाला असेल…?

.. या विचाराने मी रोमांचित झालो, मला काय वाटलं असेल, हे मी शब्दात सांगूच शकत नाही…

भेटीचा हा सुगंध मी श्वासात भरून घेतला, डोळ्यात साठवून घेतला…

मुख्य कार्यक्रम सुरू झाला, सरांच्या हस्ते माझा विशेष सन्मान झाला. सरांचे स्वागत करताना आयोजकांनी आमचा बुके सरांना भेट म्हणून दिला.

डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर यांच्या हाती तो बुके पाहून मी पुन्हा रोमांचित झालो, हृदयातली धडधड वाढली…

आमच्या थरथरत्या वृद्ध अपंग हातांनी हे बुके बनवले होते, तेच बुके आज सरांच्या हाती होते, याच हातांना आदरणीय कलाम सरांचा स्पर्श झाला होता… आता श्वासाचा वेग वाढला…

भर सभेत, व्यासपीठावर, मी पुढे होऊन हा क्षण सरांच्या जवळ जाऊन कॅमेऱ्यात टिपला…

– – खरंतर मी प्रोटोकॉल मोडला होता, पण हे समजायला मी भानावर होतोच कुठं…???

डॉ सलीम सर गालातल्या गालात मंद हसले…

त्यांना माहीत होतं, निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ताच्या हातून अनावधानाने काही चूक घडली तर ती चूक नसते…!

आदरणीय कलाम सरांचा मी भक्त होतो हे त्यांना माहीत होते.

शक्यतो मोठी माणसं कार्यक्रमात मिळालेले बुके, शाल किंवा नारळ अशा गोष्टी घेऊन जात नाहीत, असा अनुभव आहे.

.. कार्यक्रम संपल्यानंतर मी सरांना हात जोडून म्हणालो, सर प्लीज हा बुके आपण घेऊन गेलात, तर आम्ही सर्वजण आपल्या ऋणात राहू…

मंद हसत ते म्हणाले, ‘ Offcourse, इतका सुंदर बुके मी इथे कसा ठेवेन? मी माझ्या ड्रायव्हर कडे आधीच तो दिला आहे, आणि त्यांनी तो व्यवस्थित गाडीत ठेवला आहे. मी तो घरी घेऊन जाणार आहे आणि चांगल्या ठिकाणी, इतरांना दिसेल अशा जागी ठेवणार आहे. ‘ ते सहज बोलून गेले.

… पण माझ्या डोळ्यात पाणी आलं…

माजी राष्ट्रपती, माझे दैवत, आदरणीय कलाम सर, यांच्या मूळ गावी, मूळ घरात, ज्या घराला आदरणीय कलाम सरांचा सहवास लाभला आहे, घर नव्हे जे एक मंदिर आहे, तिथे हा बुके सन्मानाने जाईल…

मी शहारलो…

भीक मागणे सोडून काम करू लागलेल्या आमच्या लोकांचा हा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान होता…!

सर पुढील कार्यक्रमासाठी निघाले, भरलेल्या डोळ्यांनी सरांना निरोप दिला.

मला डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नव्हतं… वाटलं, ज्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं, त्या डोळ्यातल्या आठवणी हे अश्रू पुसून टाकतील…

पण नाही… दगडात कोरलेले शिलालेख सहजासहजी पुसले जात नाहीत.

सरांची भेट आणि अप्रत्यक्षरीत्या झालेला आदरणीय कलाम सरांचा स्पर्श आणि सहवास हा मनावर कोरलेला एक शिलालेख आहे, तो कधीही पुसला जाणार नाही.

… हा शिलालेख मी आयुष्यभर मिरवत राहीन…!!!

श्री पुरुषोत्तम पिंपळे सर आणि समस्त लेवा भ्रातृ मंडळ यांचा मी मनापासून ऋणी आहे…!!!

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”एक स्वस्त छंद..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक स्वस्त छंद..“ ☆ संध्या बेडेकर ☆

एक स्वस्त छंद – – – 

 – – – ALL INDIA RADIO / BBC…

प्रत्येक परिवारात/ मोहल्ल्यात एक BBC /AIR news reader व्यक्ती असतेच. परिवारातील/ मोहल्ल्यातील सर्वांची सर्व माहिती घेणे. मग ती सर्वांना सांगणे.

एखादी बातमी चांगली / वाईट कोणाच्या कानावर पडली तर लगेचच…

त्यांना विचारूया.. म्हणजे BBC ला 

खर काय ते कळेल… अस सहज लोकांच्या तोंडून निघत.

ALL INDIA RADIO वर बातम्या ऐकल्या की देश- विदेश खेलकूद, क्राइम, सोने-चांदीचे भाव, भाजी भावातील चढ-उतार सर्व कळत. BREAKING NEWS च्या नावाखाली अनेक बातम्या कानावर पडतात. कोण कोणाबरोबर पळून गेली, बाॅलीवूड, टाॅलीवूड च्या सर्व बातम्या किती खर्या किती खोट्या हे ऐकणार्याला आपल्या बुद्धीचा वापर करून ठरवायच असत. त्याकडे दुर्लक्ष करायच की लक्षात ठेवायच. हे ही ठरवायच असत.

जर चार बहीण भावांचा एक परिवार असेल तर त्यांच्या घरच्या, याच्या माहेरच्या, तिच्या सासरच्या, त्यांच्या मुलांच्या, जावयांच्या, चूलत, मावस भावडांचे परिवारही असतातच की. इकडच्या तिकडच्या अनेक बातम्या असतातच की.

मग ही BBC news reader आपल्या स्वभावानुसार, आपल्या आवडत्या नावडत्या लोकांना त्या बातम्या आधी एकत्र करणार, मग सांगणार. आवडत्या आणि नावडत्या लोकांना बातम्या सांगायची पद्धत, बातम्यांचा क्रम ब्रेकिंग न्युज वेगवेगळी असते. कोणाला काय सांगायच? काय नाही? याचा विचार करण्या एवढे हे हुशार असतात. कोणाचे कान भरायचे. याचा अभ्यास छान केलेला असतो. कोण कच्च्या कानाचे आहेत? हे सर्व लक्षात ठेवाव लागत.

मला असं कळलं… खर की खोट माहित नाही… अस म्हणून एखादी फुलझडी सोडण सहज जमत त्याना.

मी फक्त तुम्हाला सांगतेय हं! कोणाला सांगू नका. हे वाक्य तर हमखास सर्वांनाच कधी न कधी म्हंटलेलच असत.

अशा लोकांचा मुख्य टाईम पास हाच असतो. आता फोन असल्यामुळे हे काम सोप्प झालय. आणि वेळ छान जातो.. इकडची बातमी तिकडे, तिकडची इकडे. यासाठी खूप मोठी डिग्री, ज्ञान लागत नाही. फक्त वेळ द्यावा लागतो.

एखाद्या/ एखादीला फोन करायच्या आधी त्यांच होमवर्क झालेले असत. कारण सांगितलेल्या गोष्टीचा प्रभाव पडायला पाहिजे ना. तरच तर उद्देश्य सफल होतो. त्या बातमीत किती मसाला टाकायचा, त्याला किती चरफरीत करायचे की गोड पदार्थ करायच हे फोन रिसीव करणार्या व्यक्ती बरोबर त्यांचे संबंध कसे आहेत? यावर अवलंबून असत.

कोणाच लग्न मोडल. कोणाच सूनेबरोबर पटत नाही, कोणाला दारूच व्यसन आहे.

आता व्यसनची डिग्री कमी जास्त करणे हे त्यांच्या सांगण्यावर, आवाजावर अवलंबून असत. Voice modulation जमते त्यांना. कधी कधी एखादी बातमी सांगताना असूरी आनंद ही त्यांच्या आवाजात जाणवतो. म्हणजे तसे ते हुशार असतात.

ही एक कला आहे सर्वांना जमतच अस नाही. त्यासाठी तो Interest, practice, रोज चार तास फोन करायची हौस असावी लागते. ऐर्यागैर्याचे काम नाही ते.

आपल्या घरापेक्षा दुसर्यांच्या घरात जास्त interest असावा लागतो.

मधून मधून स्वतः ची श्रीमंती, स्वतः ची हुशारी बोलायला विसरत नाहीत.. खूप बोलताना आपल्या घरच्या काही गोष्टी पण सांगून टाकतात. आणि स्वःतच मनोरंजनाचे पात्र बनतात.

काय आहे… रोज डेटा फ्री मिळतोच. मग स्वस्तातला हा छंद छान आहे.

उरलेला वेळ You tube च्या बातम्या, whats app वर आलेले मेसेजेस असतातच, ते forward करायचे. हा पण एक added छंद असतो.

हुशार माणसाला अशा लोकांशी सावधान रहाव लागत.

मला कधी कधी अशा लोकांच खूप कौतुक वाटत. किती वेळ, किती energy, खर्च करतात. त्यांचा फोन आला की लगेच लक्षात येत आज काही तरी विशेष ऐकायला मिळणार. त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. आपल्याकडे किती वेळ आहे हे बघून फोन घ्यायचा की नाही हे ठरवायच असत.

AIR / BBC च्या बातम्या ऐकून आपण नेहमी बोअरच होतो अस नाही, कधी कभी मजाही येते नाही का?

खरतर ही अशी माणस आपल्या आयुष्यात रंग भरतात.. म्हणजे प्रयत्न करतात. मनोरंजन करतात.

शोधून बघा तुमच्या परिवारात / मोहल्ल्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का?? …

थोडा डेटा… खूप मजा… छंद किती स्वस्त आहे. कष्ट नको… ज्ञान नको… पलंगावर पडल्या पडल्या वेळ कसा मस्त जातो…

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

(तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द! _

इथून पुढे – – 

त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली… ” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको. ” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला. शेवटी मी ठरवलं की आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना… ” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर संपूर्ण कुटुंब संपून जाईल. ” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!

दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळ्या उरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात ग लोक? मला जमतच नाहीये. ” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात. ” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं. पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय. ” माझं हे भाबडेपण ऐकून ती फोनवर पोट धरून हसायला लागली.

त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही चालू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का? ” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून. ” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाईल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला. ” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते.. मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही.

आणि धडा धड दररोज मर्डर होतात आहे.

मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.

स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. ” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.

संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू. ” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन. ” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री? ” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही! “

त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!

धन्यवाद 

– समाप्त – 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

जीवघेण्या ग्रीष्म वृत्तीची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित…

‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ 

… ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही.

या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा,

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर,

सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की…

‘ये रे ये रे पावसा रुसलास का 

माझ्याशी गट्टीफू केलीस का’ 

(कवयित्री – वंदना विटणकर) 

.. असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत. म्हणून तर अखिल बालक मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो.

 ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ‘ 

(कवी-मंगेश पाडगावकर) 

… असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात.

बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- 

‘पिरपिर पिरपिर पावसाची,

त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ 

(परत वंदनाताईच हो) 

… किंवा झालंच तर ‘अग्गोबाई अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना.

‘ए आई मला पावसात जाऊ दे,

एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’

(आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) 

.. अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं 

अग्गो बाई, ढग्गोबाई, लागली कळ । 

ढगाला उन्हाची केवढी झळ । 

थोडी न् थोडकी लागली फार । 

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ 

(कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय 

‘रिमझिम पाऊस पडे सारखा,

यमुनेलाही पूर चढे,

पाणिच पाणी चहूकडे 

ग बाई गेला मोहन कुणीकडे? ‘ 

(जनकवी पी. सावळाराम) 

निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे!

(ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडेंच्या स्वरात! )

सरींवर सरी: सरीवर सरी…

*

सरींवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरींवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरींवर सरी: सरीवर सरी…

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीरची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो.

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही.

‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ 

(कवी- ग. दि. माडगूळकर) 

… असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय,

… ‘आरं गाभ्रीच्या पावसा! ’ (कवी – स्वप्निल प्रीत)

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, या बहुतेक कविता गेय आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाय गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares