नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे “श्रीकृष्णाचा हॅप्पा” (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या “मित्राच्या” पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला “जन्मदिनमिदं…” म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात “दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!” अशी मला दटावणी पण झाली)
साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही “सहज भक्ती” सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!
सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
medhasahasrabuddhe@gmail.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
घरी आल्यावर हातपाय धुतलेस का? चल उठ आधी, तशीच बसलियेस घाणेरडी! अग जेवायला बसायचं ना, हात धुतलेस का स्वच्छ? संध्याकाळ झाली, आधी तोंड धू आणि नीट केस विंचरून वेणी घाल. तोंड पुसायचा टॉवेल हात पुसायला घेऊ नको ग, गलिच्छ कुठली! बाथरूम मधून बाहेर येताना पाय कोरडे कर, ओले पाय घेऊन फिरू नको घरभर! केस स्वयंपाकघरात नको ग विंचरू, अन्नात जातील, शिळ्या भाताचा चमचा ताज्या भाताला वापरू नकोस, खराब होईल तो, दुधाची पातेली एकदम वरच्या खणात ग फ्रीजमध्ये, खालती नको ठेऊ! वाट्टेल त्या भांड्यात दुध नाही तापवायच ग. तुझ्या भांड्याने पाणी पी, माझं घेऊ नकोस, अग केस पुसायच्या पंचाने अंग नको पुसू, बेक्कार नुसती!!! खोकताना तोंडावर रुमाल घे, कितीवेळा सांगायचं, आणि तो रुमाल स्वतः धू, बाकीच्या कपड्यात टाकू नको धुवायला, दुसऱ्याशी बोलताना चांगलं हातभार अंतर ठेवून उभी रहा, थुंकी उडते कधीकधी ?. कशाला जाता येता मिठ्या मारायच्या एकमेकांना, घाम असतो, धूळ असते अंगाला ती लागेल ना! काहीतरी फ्याड एकेक, काय ते प्रेम लांबून करा!!! चप्पल घालून घरात आलीस तर याद राख, काढ आधी ती दारात. खजूर खल्लास, बी टाकून दे लगेच, तशीच ठेवायची नाही,तोंडातली आहे ना ती? नीट जेव, शीत तळहाताला कस लागतं ग तुझं? कसं जेवत्येस! ताट स्वच्छ कर, आणि पाणी घालून ठेव, करवडेल नाहीतर! तोंडात घास असताना बोलू नकोस, इतकं काय महत्वाचं सांगायचंय ??
——–तात्पर्य काय? तुम्हाला जर असं वाढवलं गेलं असेल, तर कोरोना ची अजिबात चिंता करू नका, कारण आज सगळं मेडिकल सायन्स जे सांगतंय, ते आपल्या पितरांनी आपल्याला लहानपणीच शिकवलंय. तेव्हा जाच वाटला खरा, पण आज ह्याच सवयी आपलं कोरोना पासून रक्षण करतील. तेव्हा काळजी करू नका, जसे वागत आलायत तसेच वागत रहा .
——–एक शंका, आपल्या पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे तर कोरोनाच्या रूपाने परत आले नाहीत जगाला स्वच्छता शिकवायला??? नाही म्हणजे, इंग्लंड चा राजा पण शेकहँड करायच्या ऐवजी नमस्कार करतोय म्हणे ??
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
‘राखीची गोष्ट’ सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट.लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे ? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरतला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे..त्यावर ‘वीर जवान , देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.
लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला.खरं तर काजल राखी घेऊन जायचीयेय.तीच ती आर्मीवाली राखी.काजलचे आई बाबाही आहेत बरोबर.तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.
तर काय सांगत होतो ? परमिशन्स,रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला.”बच्ची की चिंता मत करो , हम है ना !”. मी कशाला नाही म्हणतोय…?
लेक खुष. लेक खुष तो तिचा बाबाही खुष.
आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.
ती काय म्हणाली ते ऐका. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवरआहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग.असं वाटलं स्टेनगन घ्यावी,ध डधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”
“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट.काही ठिकाणी दलदल, चिखल.दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. आॅलवेज आॅन ड्यूटी.
बाबा मोस्ट शाॅकींग….आम्ही राख्या घेवून गेलेलो. ऊडालोच. काजलचा भाऊ नही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं.400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली.दे वेयर व्हेरी हॅप्पी.दुर्गा होती प्रत्येक जण.मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय.’चड्डीत रहायचं,नाहीतर….’.बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस…”
तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.
’93 की बात है.कश्मीर में पोस्टींग थी हमारी.अनंतनाग के पास एक सर्च आॅपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये …… घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. ‘ईसे संभालो’ बोल के वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी.’
शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ.आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते !
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कौस्तुभ केळकर नगरवाला
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची. त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं. तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे. गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे.
श्रावणातील शुक्रवार हा आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा वार असायचा. आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ‘ शिगम्यान पावस नी चवतीन गिम ‘ अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे. परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी मॉनिटर वर असायची. फक्त पाच पैसे वर्गणी देऊन मूठभर गरमागरम चणे बुक व्हायचे. आजूबाजूच्या घरातून तवा आणला जायचा. तात्पुरती चूल पेटविली जायची. दुकानातून एक, दोन किलो चणे आणले जायचे. चण्यावर मिठाचे पाणी शिंपडून ते खरपूस भाजले जायचे. हि सगळी कामे करतानाचा आमचा उत्साह कपडे ओले चिंब झाले तरी टिकायचा. घरी गेल्यावर पावसात उनाडक्या केल्या म्हणून आई कडून उत्तरपूजा बांधली जायची ती वेगळी. पण ‘शुक्रवारचे गरम चणे, कुणा हवे का फुसदाणे’ या मस्तीत असे कित्येक पावसाळी शुक्रवार आम्ही बालमित्र मैत्रिणींनी साजरे केलेले अजूनही स्मरणात आहे.
आता ते आठवलं की मनात चणे फुटतात आणि चणे न खाताही ती खरपूस चव जिभेवर रेंगाळते.
एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो ‘रेघ खूप छान बारीक काढली’, तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.
हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’. पण आपलेच खरे हा दुराग्रह न करता, आधी जनांचे ऐकावे हे मात्र नक्की. बहुश्रुत असणे हे खूपदा फायद्याचे ठरते.
संसाराच्या एवढ्या मोठ्या वाटचालीनंतर काही गोष्टी मनात पक्क्या रुजल्या आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट हवी तशी झाली नाही की त्रास व्हायचा. अनुभवाने बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात.काही इतरांच्या हातात असतात तर काही दैवाधिन असतात.आपल्या गोष्टी आपण करू हे ठीक आहे. पण हातात नसलेल्यांचे काय करायचे ?
मग विचारसरणीच बदलली.आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या, इतर गोष्टींमधील जे शक्य आहेत ते प्रयत्न करायचे आणि आपल्या हातात नसलेले सोडून देऊन शांत रहायचे. जे योग्य असते ते अवश्य घडतेच. फक्त यातले आपले प्रयत्न योग्य, प्रामाणिक आणि पुरेसे असायला हवेत.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल त्रागा करून मनस्ताप वाढवायचा नाही. जे ‘आपले ‘आहे ते आपल्याला मिळतेच. मिळणार नाही ते मिळत नाहीच. मात्र खिलाडूपणाने हे वास्तव स्वीकारायचे. या सकारात्मक वृत्तीने आपला आनंद मात्र शाबूत राहतो.
☆ तीन धडे – श्री नारायण मूर्ती ☆ संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆
(यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती यांनी सांगितलेले)
जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.
माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.
एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो.”
त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे.
म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास सुरुवात केली.
जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”
दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”
ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.
पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”
तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”
या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”
माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!
माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, “माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”
मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे..
—— श्री नारायण मुर्ती
संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 6 ☆ श्रीमती सुधा भोगले☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
बर्फीत पडले असावे?
आजोबांनी जे काही रागे भरले, त्याने भिवून मी दुकानाच्या पडवीतल्या दारातून शेजारच्या जिन्यावरून वरती माळ्यावर धूम ठोकली. खरं तर, वर माळ्यावर काळोख होता. एरवी मी वर जायला घाबरायचे. कारण तेथे वाळलेले भोपळे ठेवत, त्याची लहानपणी भिती वाटे का कोणास ठाऊक? बर्फी तयार झाली पण रॉकेल चा वास लपत नव्हता. म्हणजे आता विक्री होणार नाही थोडक्यासाठी नुकसानं झाले. मी त्यात नकळत दोषी ठरले अर्थात माझाही दोष नव्हताच. तो एक अपघाताच होता. पुढे जत्रेतल्या दुकानात ती बर्फी विकायला ठेवली की नाही ते माझ्या बालमनाला कळले नाही.
तेव्हा, दत्तजयंतीला दोन ठिकाणी जत्रा असत. एक थळ फाट्यावरून, आत येताना असलेल्या टेकडीवरच्या दत्तमंदिरात, तर दुसरी चौल च्या डोंगरावरच्या दत्त मंदिरात असे. दोह्नी ठिकाणी दुकाने थाटली जात. मग मुंबईला नोकरी करणारे मामा रजा टाकून, मदतीला येत असत. बरेच सामान डोंगरावर न्यावे लागे. मोरुकाका सुंकलेंची (आजोबा) मिठाई प्रसिद्ध होती. पाकवलेले काजू हीतर खास हातखंडा असलेली पाककृती. लोक आवडीने घेत.
मुल्लुंडला आमचेकडे आजी कमी पाकवलेले काजू, बर्फी असा प्रसाद दरवर्षी मामाबरोबर पाठवी मी फुलवेडी असल्याने माझ्यासाठी चाफ्याची, बकुळीची, गुलाब, अशी फुले केळीच्या पानात बांधून येत. मध्यंतरी चारवर्षा पूर्वी आम्ही दोघं भावंड दत्त जयंतीला तिकडे गेलो होतो आता चौलच्या दत्ताला वरपर्यंत मोटार रस्ता झाला आहे. पायऱ्या चढून जावे लागत नाही माझे बंधू खाली दुकानात पाकवलेले काजू मिळतील असे वाटून बघायला गेले तेव्हा तेथल्या दुकानदारांकडून कळले की ही खासियत फक्त सुंकल्यांच्या दुकानातच मिळत असे. आता पुढची पिढी, नोकर्या करायला लागली त्यांना यात रस वाटेना मग एकेकाळचे प्रसिद्ध दुकान बंदच झाले, अशीच जत्रा आवासला नागोबाच्या देवळात असे. तेथे हि मिठाईचे दुकान असे. महाशिवरात्रीला कनकेश्वर च्या डोंगरावर शिव मंदिर आहे तेथे जत्रा भरे येथेही पायऱ्या चढून वर जावे लागते. सर्व सामान वाहून वर न्यायला लागते अशी हि शेतीला पूरक उद्योगाची जोडणी असे.
हळूहळू संक्रांतीचे सण जवळ येई, शेतात पेरलेल्या वालांना कोवळ्या कोवळ्या शेंगा लागत. मग एके दिवशी ‘पोपटी’ करायचा बेत ठरे ‘पोपटी’ म्हणजे वालाच्या अखंड शेंगा, कांदे, बटाटे, वांगी, सगळे तिखट मीठ मसाला घालून माठात भरायचे आणि तो माठ उलटे तोंड करून निखार्यावर भाताचा पेंढा पेटवून जमिनीत पुरायचा, म्हणजे आतले जिन्नस वाफ धरून शिजत असत. गरमागरम खाण्यात अनोखी लज्जत येई. पण आम्हाला शहरात पाठवताना पोहचेपर्यंत थंडच मिळे. हा प्रकार गुजरात मध्ये ‘उंदियो’ म्हणजे उलट, उपडे असा अर्थ, त्याच प्रकारातला शेतातला नव्या सोन्याचा नमुना!
वायशेत या गावाला आजोबांची शेतजमीन होती तेथे शेतं लावले जायचे पुढे थळ-वायशेत खत प्रकल्पात ती जमीन सरकारने घेतली. घरटी कंपनीत नोकरी मिळण्याकरिता जेवढी तरुण पिढी होती त्यांना प्रकल्प तयार झाल्यावर नोकरीच्या हमीचे ओळखपत्र दिले होते. मग पुढच्या काही तरुणांनी कंपनीत नोकरी मिळवली, ते थळवासी झाले.
पूर्वी आम्ही ओढीने जमेल तेव्हा मामाकडे जात असू, आता आमचा लळा असलेले मामा, मामी नाहीत, आजी-आजोबा काळानुरूप कैलासवासी झाले, पुढची मामे भावांची पिढी आता घरचा व्याप नोकर्या करून सांभाळते गायी गुरे ही सांभाळणे आता होत नाही. विहीरीवर मोटार बसली, रहाटाची कुईsss कुईssss संपली, स्थल काळाच्या दुरत्वाने पुढच्या पिढीशी, आमच्यापेक्षा लहान असलेल्यांशी लळा जिव्हाळ्याचे नातं, नात्या पुरतचं उरलं. तरीही अजून वाटतं “मामाच्या गावाला जाऊ या, आंबे-फणस खाऊ या, सुट्टीची मजा चाखू या!”
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 5 ☆ श्रीमती सुधा भोगले☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
परिमल आनंद देत राही?
काही वेळच्या सुट्टीला पावसाळा सुरु होई. कोकणातला तो मुसळधार पाउस वेड्यासारखा बरसतच राही, हे चक्र दिवस रात्र चाले. आणि सात-सात दिवस थांबण्याचे नाव नसे. त्या पावसाला सातेरे म्हणत. पावसाच्या आवाजाला विशेषण कितीतरी आहेत, एकंदर पाऊस मनाला सुखवून जातो, त्याविना जीवन अशक्यच नाही का?
पावसाळ्यात रानभाज्या उगवत भारम्बीची भाजी, टाकळा, मुद्दाम पेरलेला वाल, त्याच्या वितभर उगवलेल्या भाजीचे केलेले बिरडं सगळं कसं रुचकर लागे.
शेतात भात आता वितभर वाढू लागे. उन्हाळ्यात केलेली नांगरणी मग पेरणी थोडी रोपे तयार झाली की लावणी होई ‘गुडघा, गुडघा’ चिखलात, ‘गुडघा चिखलात’, भाताची पेरणी करू या की ग, करू या की ग! अशी भाताची पेरणी संपन्न होई.
हळूहळू आषाढ संपे श्रावण येई उन पावसाचा खेळ चाले. डोंगरीच्या बाजूने इंद्रधनू दिसू लागे. मग गणपतीचे जुलैत महिन्यात सुरु केलेले काम वेग घेई.
बाजूच्या माजघरात उंचीवर हारीने शाडूच्या मूर्ती विराजत, याची तयारी पावसाळ्या आधीच सुरु होई आजोबा मामा मुंबईला जाऊन शाडू माती रंग कुंचले आणि बरेच साहित्य घेऊन येत. श्रावणापर्यंत मूर्ती वाळल्या की रंगकाम सुरु होई. एका वर्षी मोठे झाल्यावर तेथे होतो घेतला हातात कुंचला मामाला विचारून गणपती रंगवायला बसले. तो आनंद अवर्णनीय होता!
त्यावर्षी विष्णूमामाने गजेंद्र मोक्षाचा देखावा फारच सुंदर केला होता, भगवान विष्णूला खरोखरच लहानसं उपरणंही घातले होते, खूपच सुंदर कलाकृती झाली. आता सारखे पटापट फोटो काढता येत नव्हते एवढेच!
गणपतीच्या डोळ्याची आखणी करणे, हे विशेष कलात्मक काम असे, त्यान मोठा मामा तरबेज होता तो डोळ्यांचे रंगकाम करी. मग चतुर्थीचे आदल्या दिवशी पासून ज्यांनी नोंदणी केली आहे ते मूर्ती न्यायला येत. तो एक आनंदमय व्यापार होता. कलाकृतीचे कारागीर आणि गणेशभक्त यांच्यातला अलौकिक ऋणानुबंध! वर्षानुवर्ष येणारे अनेकजण!
मंगलमूर्तीची पूजा होई गौरीचे आगमन मग पितृपंधरवडा असे करत दसरा दिवाळीचे दिवस जवळ येत. शेतात भातं निसवायला येत (म्हणजे भाताचा दाणा तयार होणं) आणि मग कापणीचा हंगाम! खळ्यामध्ये कापलेले भाताचे भारे येऊन पडत मधे बसलेल्या खांबाला बैल जुंपत मग मळणीचे काम होई त्यावेळी आता सारखी मळणी यंत्र नव्हती बैलाने तुडवून भातं वेगळे होई पोती भरून कोठारात ठेवली जात. भात काढल्यावर वालाची काही भागात पेरणी होई.
शेताची कामे झाली की दिवाळी झाल्यवर गावदेवातांच्या जत्रा सुरु होत. आजोबा पूर्वीपासून या जत्रात मिठाईचे दुकान थाटत असत. बेड्याच्या (गोठा) बाहेर भट्ट्या कायम स्वरूपी केलेल्या होत्या. मग मुंबईला जाऊन मावा (खवा) काजू व मिठाईला लागणारे सामान खरेदी होई. भट्ट्यावर कढया चढत, बत्तासे, मावा बर्फी, पाकवलेले काजू, भेंड, बदामी बर्फी, साखर फुटणे, दुधी हलवा, इत्यादी पदार्थ करत भेंड करण्यासाठी पक्का गोळीबंद, साखर होईल इतका पाक करत. मग त्या पाकाची थोडा थंड झाल्यावर लांब वळी करत. आणि ती एका खांबाला बांधलेल्या खिळ्याला अडकवून त्याला लांब लांब ओढत. पुन्हा वळकटी पुन्हा ओढणे, अस करत पांढरट रंग आल्यावर भेडांना जसे विळखे दिसतात ते पडल्यावर छोट्या वळकट्यांकरून भेंडे कापून लहान लहान आकारात तयार होत.
एके दिवशी, मी त्या सुमारास तेथे होते. तशी लहान पोरंच! त्या वेळी वीज नव्हती कंदील, बत्ती, किंवा भुते असत. हे भुते म्हणजे जाड बाटलीला, वर वात ओवता येईल असे पत्र्याचे तिकाटणे आणि बाटलीत रौकेल वर जोत पेटवायची की उजेड पडे. त्या दिवशी आजोबा बर्फी कढईत ढवळत होते. मला म्हणाले, “बाय, जरा वर उचलून भूत्याचा उजेड दाखव!” मी भूत्या हातात घेऊन तसे केले पण, तेवढ्यात खाली भट्टीला वैलाची तीन गोल गोल भोके होती त्यात पाय अडखळला, भुत्या हेंदकाळला व थोडेसे रॉकेल नकळत बर्फीत पडले असावे.