मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी 

बारा वाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

 

काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

 

तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

 

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

 

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

 

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

 

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर

 

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

 

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

 

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

 

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

 

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

 

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फोनवर पुणेरी उत्तरे…” ☆ श्री सुधीर करंदीकर

पुण्याच्या गमतीशीर पाट्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच.

नुकताच मला फोनवर ‘पुणेरी उत्तरे’ याचा छान अनुभव आला, तो शेअर करतोय.

पौड रोडला एक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस आहे. मेडिकल एक्सपेन्सेस करता या इथे मी इन्शुरन्स ची पॉलिसी घेतली आहे.

गेल्या आठवड्यात मला त्या ऑफिसमध्ये एक क्लेम नेऊन द्यायचा होता म्हणून आदल्या दिवशी मी दुपारी त्या ऑफिसला फोन केला –

तिकडे फोनवर मॅडम होत्या.

मी : मॅडम नमस्कार, सकाळी ऑफिस किती वाजता उघडतं

तिकडून मॅडम : सकाळी नऊ वाजता

आणि फोन बंद झाला.

विचार केला उद्या ऑफिस उघडतानाच तिथे पोहोचावं, गर्दी वाढायच्या आत क्लेम द्यावा आणि ऊन वाढायच्या आत घरी पोहोचावं.

दुसऱ्या दिवशी बरोबर नऊ वाजता मी ऑफिसच्या दाराशी पोहोचलो. तेवढ्यात म्हणजे नऊ वाजता एक मावशी तिथे आल्या, दाराचं कुलूप उघडलं, दार उघडं ठेवलं, आणि त्या आत गेल्या.

अगदी डॉट नऊ वाजता ऑफिस उघडत आहे, हे बघून मी खुश झालो. स्टाफ पैकी कोणीच येताना दिसत नव्हते.

मी विचार केला नऊ वाजता ऑफिस उघडणार म्हणजे स्टाफच्या लोकांना यायला पाच एक मिनिट उशीर होऊ शकतो. सव्वा नऊ झाले तरी कोणाचाच पत्ता नाही.

मग मी आतल्या मावशींना विचारलं –

मी : मावशी ऑफिस सुरू किती वाजता होतं

मावशी : मला माहिती नाही. मी रोज नऊ वाजता ऑफिस उघडते. स्वच्छता करते आणि ऑफिसचे वॉचमन आले की मी पुढच्या कामाला जाते. पुढचं काय होतं मला माहित नाही.

मी थोडा वेळ वाट बघितली आणि विचार केला, अजून थांबण्यात काही पॉईंट नाही, उद्या यावं.

दुपारी मी ऑफिसला फोन केला –

मी : मॅडम, ऑफिसचं टाइमिंग काय आहे.

मॅडम : ऑफिसचं टाइमिंग सकाळी साडेदहा ते पाच आहे

मी : अहो काल मी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही नऊ वाजता म्हणाला

मॅडम : हो बरोबर आहे. तुम्ही विचारलं होतं ऑफिस किती वाजता उघडतं. म्हणून मी नऊ म्हणाले. कारण आमच्या ऑफिसच्या मावशी रोज नऊ वाजता येऊन ऑफिस उघडतात. तुम्ही ऑफिसची वेळ विचारली असती तर मी साडे दहा ते पाच म्हटलं असतं.

आणि फोन बंद झाला.

मी (मनामध्ये) मॅडमचं म्हणणं बरोबर आहे. माझा प्रश्नच स्पष्ट नव्हता. विचार केला, क्लेम स्वीकारण्याची काही विशिष्ट वेळ आहे का? ते पण विचारून घ्यावं. म्हणजे पुन्हा एक फेरी वाया जायला नको.

मी पुन्हा फोन लावला.

मी : मॅडम मला असा असा क्लेम सबमिट करायचा आहे. त्याकरता काही विशिष्ट वेळ आहे का

मॅडम : हो क्लेम स्वीकारण्याची वेळ रोज दुपारी साडेतीन ते पाच अशी आहे.

मी : धन्यवाद

मॅडम : जय श्रीराम

मी पण जय श्रीराम म्हटले आणि फोन बंद झाला.

दुसऱ्या दिवशी मी सव्वा चार ला ऑफिसला पोहोचलो. तिथल्या मॅडम ना क्लेम दिला. आणि त्यांच्याशी बोलताना आवाजावरून लक्षात आलं, की फोनवर बोलणाऱ्या मॅडम त्या याच आहेत. त्यांच्या टेबल समोर कुणीच बाहेरचे कस्टमर नव्हते. म्हणून विचार केला दोन मिनिटं यांच्याशी बोलावं. ‘फोनवर जे विचारलं तेवढेच उत्तर’, या त्यांच्या स्टाईलचं मी कौतुक केलं, यावर त्यांनी त्यांचे दोन-तीन अनुभव सांगितले, मी पण माझे इतर ऑफिसमधले दोन अनुभव सांगितले आणि गप्पा वाढायला विषय मिळत गेले. त्यांना वाचनाची आवड आहे हे समजल्यावर मी माझ्या म्हैस, काही आहे का? , आणि हसती खेळती बायको, या पुस्तकांची थोडी जाहिरात केली. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मला दिला (नाव सुचित्रा) आणि पुस्तकं कशी मागवायची ते कळवायला सांगितले. मधे एक चहा पण झाला. गप्पांमध्ये दोन मिनिटांचे पाच कधी वाजले समजलंच नाही. इतर लोक आवरा आवर करायला लागले होते. गप्पा थांबल्या. बाय बाय झाले आणि मी हसत हसत बाहेर पडलो…

(मंडळी प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. शिकण्याची आपली सकारात्मक तयारी मात्र आवश्यक असते. ओळखी वाढतात, हा पण एक मोठा फायदा आहेच. माझ्या वाचकांच्या यादीमध्ये सुचित्राताई यांची वाढ झाली, हा मला बोनस)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ६ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ६ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

पण, लक्षात कोण घेतो?

सामान्य मनुष्याला एक सवय असते. तो नेहमी आपल्या चुकांचे खापर फोडायला काहीतरी अथवा कोणीतरी निमित्त शोधत असतो… तो कधी परिस्थितीला दोष देईल, तर कधी एखाद्या व्यक्तीला दोष देईल तर कधी देवाला…

पण त्याला असे कधीही वाटतं नाही किंवा त्याच्याकडे मी चुकू शकतो हे मान्य करण्याचे धैर्य नसतं असे आपण म्हणू शकतो… माझा मुद्दा आपल्या लक्षात येत असेल…?

आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…

बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?

पोशाख संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?

आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला तसे आचरण करणे उचित आहे का? याचा विचारच नाही. आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, जिथे पंख्याची सोय करणे शक्य नाही, अशावेळी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…) वर वर्णन केलेले चित्र नजरेसमोर आणून पाहावं…

लग्नाच्या नावावर अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरण, आणि इतर अनावश्यक खर्च आणि दैनंदिन जीवन जगताना आपण करीत असलेले अंधानुकरणहे वेताळ नव्हेत?

यातून आपण बाहेर पडायला हवे.

पटतंय ना?

– लेख क्र. ६ 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे खरे सिंघम!! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ हे खरे सिंघम!! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

कधीकाळी पुण्यात घरोघरी वर्तमानपत्रे टाकून शिकणारा मुलगा आज महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा प्रमुख झाला आहे.

सदानंद दाते हे खरेतर 26/11 च्या हल्ल्यावेळचे हिरो. तुकाराम ओंबासेंनी देशासाठी बलिदान दिले तर दाते अखेरपर्यंत दहशतवाद्यांशी लढत राहिले. मात्र जमाना ‘पेड मार्केटिंग’ व मीडियातील चमकोगिरीचा आहे. त्यामुळे ‘कट्ट्या’ वर हिरो म्हणून हल्ल्यावेळी ताजमध्ये लपून बसलेले लोक पुढे आले.

सध्या स्वयंघोषित ‘सिंघम’ म्हणून स्वतःचेच प्रोजेक्शन करण्याची लाट पोलीस दलात आलेली असताना दाते कायम असल्या प्रकारापासून दूर राहिले. प्रामाणिकपणे काम करत राहिले. महायुती सरकारमध्ये प्रामाणिक माणसाचा सन्मान म्हणून, दाते यांना संधी मिळाली हे विशेष!

महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलिसांचा एकेकाळी जगभर दरारा होता. सदानंद दाते ते गतवैभव मिळवून देतील, याच सदिच्छा व शुभेच्छा.

माहिती संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तो नसता तर

“युद्धस्य कथा रम्या!” असे म्हणताना मला खूप वेळा वाटते की प्रवासातही जेव्हा काही थरारक अनुभव येतात, ते आठवून मात्र पुन्हा पुन्हा गंमत आणि नवल वाटतच रहाते. तो प्रसंग, त्या भोवतालचं वातावरण, कारण, त्या वेळची गोंधळलेली मनस्थिती आठवली की वाटतं सारंच किती विचित्र आणि अनपेक्षित होतं! त्या दिवशी खरं म्हणजे काहीही होऊ शकत होतं पण दैवदयेने तसं झालं नाही म्हणूनच आज आपण इतक्या वर्षानंतर हे लिहू शकतो याची जाणीव झाल्यावर तर अधिकच मजा वाटते.

त्यावेळी मी आठवी नववीतच असेन. त्यावर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत भाईंनी (माझे आजोबा, आईचे वडील) काश्मीर सफरीचा दणदणीत बेत आखला. भाई, भाईंची बहीण,(जिला आम्ही  आत्या म्हणत असू), आमचा परिवार आणि मावशीचा परिवार मिळून एकूण १४ जणांच्या ग्रुपची कस्टमाईज्ड टूर एका ट्रॅव्हल एजन्सी कडून भाईंनी नियोजित केली.  जवळजवळ एक महिन्याची अत्यंत आरामदायी आणि मनोवेधक अशी ती दूर होती.

“भारताचं नंदनवन” डोळे भरून पाहणार, तिथल्या सुंदर नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेणार, तिथली उंच दाट झाडी, नाना प्रकारची, विविध रंगांची टवटवीत फुले, तिथली गोरी गुलाबी हसरी माणसं, नद्या, तलाव, हिमालयाची शिखरे, थंडी जे सगळं फक्त भूगोलात वाचलेलं होतं ते “याची डोळा याची देही” भोगणार हा विचारच किती उत्तेजक होता!

साठच्या दशकातलं ते काश्मीर अत्यंत सुंदर होतं. निसर्गाच्या कुशीत, हिमालयाच्या शिखरांनी वेढलेलं, उंचावर वसलेल्या महादेवाच्या मंदिरात होणाऱ्या घंटानादानं पवित्र भासणारं काश्मीर खरोखरच स्वस्थ आणि मंगलमय होतं. झुळझुळणाऱ्या नद्या मानवी जीवनातलं पावित्र्य किनाऱ्यावर ठेवून वाहत होत्या. तेव्हा त्या शुभ्र फेसाळलेल्या होत्या. रक्तरंजित नव्हत्या. त्यावेळेचं काश्मीर आनंदी, मुक्त आणि तिथल्याच गेंदेदार गुलाबांच्या फुलासारखं सतत चैतन्यमयी, हसरं होतं. कसलीही दहशत नव्हती, तणाव नव्हता ,भयमुक्त होतं, धर्मभेद आणि हिंसक राजकारणापासून, सत्ता कारणापासून दूर होतं. 

तिथल्या एक महिन्याच्या वास्तव्यात आम्ही तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासह, तिथल्या भौगोलिक, सामाजिक कला संस्कृतीचाही आनंद भरपूर लुटला.तिथली मुघल उद्याने, तिथली खाद्य संस्कृती मनापासून पाहिली,आस्वादली, अनुभवली पण तरीही हे सगळं आठवत असताना त्या एका प्रसंगाचे मात्र विस्मरण कधीच होऊ शकत नाही.प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवताना वेगवेगळा थरारआणि विचार घेऊनच येतो.

साठच्या दशकात काश्मीरमध्ये प्रवाशांसाठी तांत्रिक सुधारणा फारशा झालेल्या नव्हत्या. बर्फाच्छादित डोंगराडोंगरात  वसलेल्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यावरूनच जावे लागायचे. डोंगरातले कच्चे, दगड मातीचे अरुंद रस्ते, एका बाजूला उंच गिरीमाथे, आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मधल्या अरुंद भागातून घोड्यावर बसून रिकीबीत  पाय घट्ट अडकवून आणि खोगीर दोन्ही हातानी पक्कं पकडून त्या मूक प्राण्यावर आपल्या जीवनाचा भार आणि विश्वास टाकून त्या अनोळखी वाटेवर जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास तसा सोपा नव्हताच पण सुरुवातीला वेगळेपणात उत्तेजकता असतेच. साहस, थ्रील याचाही आनंद वेगळाच असतो. एकदा तुमची मानसिकता पक्की झाली की मनातली भीती आपोआपच दडपली जाते. शिवाय त्या त्या घोड्याचा मालक आपल्याबरोबर येणारच असतो हाही एक मोठा दिलासा त्यावेळी होताच.

श्रीनगर पासून काही अंतरावर असलेल्या एका गावी बसने आल्यानंतर गुलमर्ग पर्यंतचा आमचा घोड्यावरचा प्रवास अत्यंत मजेत, हसत खेळत आणि निर्भयतेने सुरूही झाला. त्यावेळी आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून आम्ही राहत असलेल्या नगीन लेक मधल्या हाऊस बोटीच्या मालकाचा मुलगा गुलाममहम्मद बरोबर होता. २५/२६वर्षांचा असेल तो. खूप आनंदी वृत्तीचा,, बोलका, मनमोकळा आणि प्रवाशांचं मन रिझवणारा, काहीसा मिस्कील  पण काळजी घेणारा असाच तो होता.

घोड्यावरची सफर सुरू झाल्यानंतर आमच्या समूहाची काही वेळानंतर बरीच पांगापांग झाली. काही भराभर पुढे गेले. सोबत असलेले घोडेवाले सोबत सोडून गेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे,” वो(अश्व) जानता है कहाँ जानेका, कोई तकलीफ नही, डरने का नही.” अशी त्यांची एक गाईड लाईन होती. 

माझा घोडेवाला मात्र माझ्याबरोबरच होता पण माझा घोडा फारच हट्टी, आळशी आणि काहीसा मनमानी असावा किंवा त्या दिवशी त्याचं काहीतरी चांगलंच बिनसलं असावं. तो चालतही नव्हता, पळतही नव्हता त्यामुळे मी सर्वांपासून खूपच मागे पडले होते. आमच्या परिवारातले जवळ जवळ सगळेच पोहोचत आले असतील मी मात्र अशीच अर्ध्या रस्त्यावर रेंगाळत होते. मी, घोडा आणि माझा घोडेवाला. माझा घोडेवाला घोड्याची खूप मनधरणी करत होता. शेवटी ‘बाबापुता’ करता करता त्याचाही पेशन्स, धीर, मनावरचा संयम सुटला आणि हातातल्या काठीने त्याने त्या घोड्याच्या पार्श्वभागावर जोरात मारले आणि काय सांगू तो घोडा असा काही उधळला आणि सैरावैरा कसाही धावू लागला की माझी तर ‘पाचावर धारण’ बसली. मी ओरडू लागले, किंचाळू लागले. डावीकडची खोल दरी, उधळलेला घोडा, आणि संपूर्ण ताबा हरवलेली,अननुभवी मी फक्त माझा मृत्यू बघत असताना रिकीबीमधून माझे पाय सटकले आणि आणि मी धाडकन घोड्यावरून कोसळले.काहीच कळले नाही. शुद्ध हरपली असावी माझी. काही क्षण, मिनिटे, तासही गेले असतील कदाचित. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा फक्त एकच सुखद धक्का बसला,” मी जिवंत होते. पूर्णपणे वनपीस होते. शरीराचा एकही अवयव मला सोडून गेलेला नव्हता. निर्जन, घनदाट जंगल, प्रचंड थंडी आणि दगड मातीत आपटलेला पण तरीही शाबूत फक्त खरचटलेला  माझा देह! शून्य स्थिती म्हणजे काय ते त्या दिवशी  मला कळलं. मृत्यूला भोज्या करून आल्यानंतरच्या जीवनात पुन्हा स्थिर होण्यासाठीचा तो एक शून्य क्षण होता. ना मी कुणाला हाक मारू शकत होते, ना कोणाची मदत मिळण्याची मला तिथे शक्यता वाटत होती पण तेवढ्यात कुठून तरी कसातरी पुढे गेलेला गुलाम मोहम्मद धडपडत त्याच्या घोड्यावरून दौडत कदाचित मलाच शोधण्यासाठी तिथे आला. त्याने मला  अशा विव्हळ स्थितित पाहिलं आणि अक्षरश: मला  उचललं आणि त्याच्या घोड्यावर नीट बसवलं. प्यायला पाणी दिलं आणि तो माझ्या पाठीमागे बसला आणि म्हणाला,” डरो मत.  मै हूँ ना! आल्ला की मेहरबानी तू बच गई. शुकरगुजार है हम उसके!”

मला काहीच समजत नव्हतं. मी बोलूही शकत नव्हते. निर्विचार निर्विकार होते मी. फक्त एवढंच जाणवलं हा गुलाम मोहम्मद मला माझ्या परिवाराची नक्की भेट घडवेल. मी त्याचे हात घट्ट पकडले.

पण एवढ्यावरच हा एपिसोड समाप्त होणार नव्हता. पुढे घडलं ते आणखीच अनपेक्षित आणि विचित्र होतं. काही वनाधिकाऱ्यांचं त्या भागात पेट्रोलिंग चालू होतं. त्यांनी मला आणि गुलाम मोहम्मदला असं घोड्यावर एकत्र पाहिल्यावर त्यांच्या डोक्यातला गुन्हेगारी कायदा सळसळला असावा. त्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाम मोहम्मदला वेड्यासारखे मारायला सुरुवात केली. मलाही घोड्यावरून उतरवले. मी बाजूला उभी राहून गुलाम महम्मदची चाललेली बेसुमार  पिटाई बघत होते. माझा जीव कळवळत होता. काश्मिरी भाषेत ते बोलत होते. गुलाम मोहम्मद त्यांची गयावया करत होता. काय घडले ते सांगण्याचा प्रयत्न करत होता पण ते अधिकारी काही ऐकूनच घेत नव्हते. बेभानपणे त्याला नुसते मारतच होते. हळूहळू मला घडत असलेल्या प्रसंगाचा, कारणाचा अंदाज येऊ लागला. या वनाधिकाऱ्यांची अशी समजूत झाली होती की “हा तरुण गुलाम मोहम्मद माझ्याशी काहीतरी अतिप्रसंग करत होता” आणि  अशा गुन्ह्याला कायद्याने फार मोठी शिक्षा होती वास्तविक त्यावेळच्या माझ्या वयाचा आणि आधीच घाबरलेल्या मनस्थितीचा विचार करता मी प्रसंगावधान कसे राखू शकले याचे मला आजही नवल वाटतं. पण त्या क्षणी मी,न घाबरता त्या मारणार्‍या अधिकाऱ्याचा दणकट हात जोरात पकडला आणि जितक्या जोरात मला बोलता येईल तितक्या उच्च स्वरात मी त्याला म्हटलं “छोड दो उसे. मारो मत.आप क्या कर रहे है? ये कोई गुंडा नही है. ये मेरे लिए भाई जैसा है .उसने मेरी सहाय्यता की है,जान बचायी है.”

तरीही हे त्यांना लगेचच पटलं नाही त्यांना पटवण्यासाठी सगळी हकीकत.. आम्ही टुरिस्ट असल्यापासून ते गुलाम महम्मद आमच्या हाऊसबोटीचा मालक असल्यापर्यंतचा आणि त्यावेळी घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत मी जेव्हा माझ्या अत्यंत भेसळ, मोडक्या तोडक्या हिंदीत सांगितला तेव्हा त्यांनी काहीसे नाईलाजानेच पण गुलाम मोहम्मदला अखेर सोडले.

गुलाम महम्मदची मी कशी माफी मागू, कसे आभार मानू मला काहीही समजत नव्हतं पण त्याने मात्र मला व्यवस्थित सांभाळून “गुलमर्गला” आणले. माझे सारे तेरा जिवलग अत्यंत चिंतेत होते. मला पाहून सर्वांना एकदम “हुश्श” वाटले, ताईने, छुंदाने लहानग्या  उषा निशाने(माझ्या बहिणी) मला धावत येऊन घट्ट मिठी मारली. रंजनने (माझा मावस भाऊ) मात्र त्याही क्षणी नेहमीप्रमाणे मला “मूर्ख, बावळट, अतिशहाणी” असेही बोलून घेतले. प्रत्येकाची प्रतिक्रिया काहीही असेल पण या सगळ्यांचा आपल्यावर किती जीव आहे हेच त्या क्षणी जाणवलं आणि माझा रक्षक एक मुस्लिम युवक गुलाम मोहम्मद हे सगळं अगदी मनापासून एन्जॉय करत होता. बाकी घडलेली सगळी कहाणी सर्वांना हळूहळू सांगितली तेव्हा भाईनी गुलाम मोहम्मदला प्रेमाने जवळ घेतले.त्याला बक्षीसीही दिली.

त्यानंतरची आमची संपूर्ण सफर अगदी सुखात,निर्विघ्नपणे पार पडली हे सांगणे नकोच.

आज जेव्हा मागे वळून या प्रसंगाकडे मी पाहते तेव्हा वाटते कोण हिंदू कोण मुस्लिम?

कोणता धर्म कोणती जात?

त्यादिवशी काहीही घडू शकलं असतं. मी दरीत कोसळले असते तर? गुलाम मोहम्मद आलाच नसता तर किंवा खरोखरच त्याची बुद्धी फिरली असती तर? पण माथ्यावरचं विस्तीर्ण आकाश, उंच उंच वाढलेली ती दाट पर्णभार असलेली सुरुची झाडे, सभोवतालची हिमशिखरे आणि या साऱ्यांमध्ये कुठेतरी ईश्वरी लहरींचे, ईश्वरी शक्तीचे अस्तित्व  ज्यांनी माझे सर्वतोपरी रक्षण केले! आजही याच शक्तीला मी विनम्रपणे वंदन करते.

नकळतपणे पिसाळलेल्या,दहशतवादी समूहात हरवलेला गुलाम महम्मदचा चेहराही शोधत राहते.

– क्रमशः भाग ७५ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मसालेभात…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “मसालेभात…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमचा त्या दिवशीचा शाखेतला खेळ होता मसालेभात .

काय म्हणता..

ही तर खायची गोष्ट आहे..

हो खरंच खायचीच गोष्ट..

 

पण त्याचा कसा खेळ होतो ते सांगते .गोल करून सर्वांनी उभं राहायचं  एकीने म्हणायचं मसालेभात… दुसरीने म्हणायचं मी नाही खात… तिसऱीने विचारायचं ..

का नाही खात? चौथीने त्याचे तिला वाटेल ते उत्तर द्यायचं. अर्थात हा सगळा पटापट बोलून खेळला जाणारा खेळ. 

उत्तर येणार नाही ती बाद.

चमचमीत विषय…

मसालेभातानी भरलेलं ताटच सामोर आलं…

आता तो का नाही खात?

याच कारण एक एक जण सांगायला लागली. पहिली तीन वाक्य पटकन म्हणून होतात.. चौथीला  उत्तर तयार ठेवून सांगायचं होतं.

 

अर्थात हा स्वयंपाकातला विषय .. तिथे तर आमचंच राज्य ..आणि हे राज्य फुकट दिलं तरी कोणी घेणार नाही म्हणा

 – – तर काय सांगत होते… मसालेभात

अनेक वेळा केलेला .त्यामुळे हसत हसत लगेच उत्तरं येत होती .मटार नाही त्यात, गाजर नाही त्यात, फ्लॉवर नाही त्यात,  हे सांगता सांगता सांगता…

मीठ ,हिंग ,जिरे ,शहाजिरे ,दालचिनी, लवंग ,वेलदोडे, कोथिंबीर, खोबरं हे सगळं सांगून झालं …

आता फक्त तांदूळच तेवढे राहिले होते ….

मग खेळ खेळता खेळता एक एक जण बाद होत गेली. शेवटी दोघीच राहिल्या. का नाही खात? याला उत्तर देताना त्यातली एकजण म्हणाली, 

” भूक नाही मला आज”

दुसरीला काही सुचलंच नाही .पहिली त्या.खेळात जिंकली .खेळ संपला.

 ” अरे वा किती छान उत्तर तुला  सुचलं.. “म्हणून तिच मी कौतुक केलं.

 

घरी आले. विचार केला. हा काय बर खेळ असेल…

तेव्हा लक्षात आलं की आम्ही सर्वांनी फक्त मसालेभातावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे… 

‘आऊट ऑफ द बॉक्स’…जाऊन  त्याचा संपूर्ण परिस्थितीजन्य वेगळा ही अर्थ असू शकतो हे लक्षातच घेतलं नव्हतं .

मी का खाल्ला नाही येतला ” मी ”  चा विचारच केला गेला नव्हता. संपूर्णपणे एकांगी विचार करून आम्ही  मसालेभातालाच दूषणं देत होतो. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला ट्रोल करत होतो आणि त्याची गंमतही घेत होतो….

 

मला आज नको, माझा खायचा मूड नाही, नंतर खाईन, आत्ता वेळ नाही.. असे अनेक पर्याय मला घरी आल्यावर सुचायला लागले.

समजा त्याच वेळेस ही उत्तरें दिली असती तर कदाचित खेळच बदलला असता….

 

म्हणजे आपल्यासमोर एखादी गोष्ट चुकीची आहे हे दहा वेळा दहा जण सांगायला लागले की आपल्यालाही ती तशीच वाटते .आपणही त्यातले न्यून काय आहे हे हुडकायला लागतो.

 

संदर्भ लक्षात आला का?

असं आपल्या आसपास कुठे घडत आहे  का ?…बघा बरं तपासून…

सध्य:स्थितीत कोण आपली दिशाभूल तर करत नाही ना..

याचा विचार करावा लागेल.

एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू आपल्या समोर येतच नाही असं तर होत नाही ना…

असत्याला आपण सत्य मानत आहोत का?

त्यादिवशी आम्ही अगदी छोट्या शहाजीऱ्यालाही दोष दिला होता…

तसं तर आपलं होत नाहीये ना?

तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्याने या  समाज माध्यमांचा ऊपयोग करून आपल्यावर माहितीचा भडीमार होत आहे…. या सगळ्या गोंधळात नकळत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत का? 

“सावज ” म्हणून कोणी आपल्याला गळाला लावत आहे का? याचा सावधपणे विचार करणे गरजेचे आहे.

 

मात्र यासाठी जे घडतय ते चुकीचं आहे हे सांगणारं …. योग्य कुणीतरी … मार्गदर्शन करणार हवं आहे . त्यांच्याशी आपला  संपर्क आणि संवाद हवा आहे .नाहीतर आपण अविवेकाच्या लाटेत वाहत जाऊ.

 

आपलं हित कशात आहे हे आता राष्ट्र सेविका समितीत जाऊन थोडे  कळायला लागलेले आहे. आम्ही आपल्याच नादात होतो. पण तिथे गेल्यापासून आसपास काय चाललेलं आहे याचा आम्ही… निदान विचार करायला लागलो आहोत.

हळूहळू  सुधारणा होत आहे. समितीत शिकवलेल्या एका गीतातल्या या चार ओळी..

” गलत मत कदम उठाओ

 सोच कर चलो विचार कर चलो

 राह की मुसीबतोंको पार कर चलो” 

 

मुसिबतें कौन सी है..

हमे मालूम है..

फिर विचार तो करना ही पडेगा…

सोच लो …

अरे हो…एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शाखेतल्या खेळातला ” मसालेभात ” ही फक्त ” खायची “गोष्ट नव्हती…

हे तुमच्या लक्षात आलं ना….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुख पर्वताएवढे!! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ सुख पर्वताएवढे!! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सध्या थंडीचे दिवस आहेत. परवाचीच गोष्ट! मी बाहेर माझ्या पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून पेपर वाचत बसलो होतो. कोवळे, सुखद आणि उबदार ऊन अंगाला सुखावत होते. माझ्या मनात सहज विचार आला की मी किती भाग्यवान आहे! कोवळ्या उन्हात बसण्याचं हे सुख अनुभवतो आहे. काही काही सुखांची पैशात तुलना करता येत नाही. पैसे देऊनही असे सुख विकत घेता येणार नाही. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधं हे उन्हात बसण्याचं सुख देखील अनुभवता येत नाही. या छोट्याशा परंतु मौल्यवान सुखाला ते पारखे झाले आहेत. कोणाच्या घरात ऊनच येत नाही तर कोणाला उंचच उंच इमारतींमुळे सूर्यदर्शन घडत नाही. कामाच्या धावपळीत अनेकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कोणी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असतो तर कोणी फायलींच्या ढिगार्‍यात.

संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’. पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आणि मानत आलो आहोत. पण कधीकधी वाटतं, आपण दुःखाच्या पर्वताकडे इतकं टक लावून पाहतो की, हाताच्या तळव्यावर असलेल्या ‘जवा’एवढ्या सुखाच्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो. आणि या दुःखाच्या जाणिवेने आपण विनाकारण स्वतःला गंभीर करून घेत असतो. खरंतर, जर आपण जीवनाकडे डोळस दृष्टीने पाहिलं, तर लक्षात येईल की आपण ज्याला ‘ जवा ‘एवढं म्हणतोय, ते सुख खरं तर पर्वताएवढं विशाल आहे. सुख ही अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही चलनात मोजता येणार नाही. सुख आणि समाधान विकत मिळत नाही, ते फक्त ‘ अनुभवावे ‘ लागते.

आपण अनेकदा सुखाची व्याख्या ‘ वस्तूंमध्ये ‘ शोधत असतो. आपण जर कुणाला त्याला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करायला सांगितली, तर बहुतेकांच्या यादीत मोठी गाडी, आलिशान बंगला, गडगंज संपत्ती हीच नावे येतील. पण खरंच असं असतं का? जर संपत्तीतच आनंद असता, तर जगातले सर्व श्रीमंत लोक सर्वात आनंदी दिसले असते. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. पैशाने सुविधा विकत घेता येतात, पण समाधान नाही. बिछाना विकत घेता येतो, पण शांत झोप नाही.

खरा आनंद कुठे असतो? तो साध्या साध्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. बाहेर सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत असताना आणि पेपर वाचत असताना बायकोने प्रेमाने वाफाळलेला चहाचा कप समोर ठेवावा, त्याचा आस्वाद घ्यावा. तो केवळ चहा नसतो. त्यात असतं प्रेम आणि काळजी! आपल्या माणसाची. आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचताना त्यात पूर्णपणे हरवून जावं. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना सगळे मुखवटे काढून ठेवून काळ-वेळ विसरावा. लहान मुलांच्या खेळात रमून स्वतःही बालपण अनुभवावं. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवावा. आपलं आवडतं एखादं गाणं ऐकावं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रचंड ऊर्जा देणाऱ्या असतात.

पण या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे आपण पाहतो का? बऱ्याच वेळा आपण उजळणी करतो ती दुःखाच्या क्षणांची. हा माझ्याशी असं वागला, तो मला असंच बोलला, हीच का माझ्या उपकारांची परतफेड… असे विचार करून आपण स्वतःला दुखी करून घेत असतो. पण जीवनात पदोपदी येणारे हे सुखाचे छोटे क्षण आपण डोळे भरून पाहतो का? त्यांचा आनंद घेतो का? हे सुखाचे छोटे छोटे क्षण जेव्हा आपण एकत्र करतो, तेव्हा सुखाचा एक भलामोठा पर्वत उभा राहतो.

पाऊस पडून गेल्यावर पानांवर पडलेला पाण्याचा थेंब जसा सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखा चमकतो, तसंच आपलं आयुष्य आहे. फक्त आपली दृष्टी ‘डोळस’ हवी. ज्या दिवशी आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि आनंद दिसायला लागेल, त्या दिवशी आपल्याला जाणवेल की, दुःख कदाचित तात्पुरतं असेल, पण ‘सुख’ हे खरोखरच पर्वताएवढं अथांग आणि विस्तीर्ण आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं एक गाणं आहे. पण खरोखरच सुख म्हणजे नक्की काय ते शब्दात सांगता येणं कठीण आहे कारण ती अनुभवण्याची गोष्ट असते.

चिनी आणि जपानी संस्कृतीतील एक सुंदर कल्पना आहे. ते लोक एकमेकांना शुभेच्छा देताना ” तुम्हाला सर्व सहाही सुखे प्राप्त होवोत ” असे म्हणतात. यातली पहिली पाच सुखे म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार आणि चांगली मुले ही आहेत. तर सहावे सुख म्हणजे वैयक्तिक गोष्ट आहे हे सुख प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते ते ज्याचे त्याने शोधून काढावे लागते. असाच आपल्या जीवनातील आनंद देखील आपल्याला शोधता आला पाहिजे तेच आपले सहावे सुख असू शकेल!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणत्याही सणांपेक्षा राष्ट्रीय सण सर्वात महत्त्वाचे… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ कोणत्याही सणांपेक्षा राष्ट्रीय सण सर्वात महत्त्वाचे… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

July, August महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••

असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••

महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••

देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. •••• 

प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••

याच बरोबर 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.

तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.

आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?

आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.

घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.

कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.

जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील 140 करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…

मग हाच विचार, हीच भावना, असच वागण,, ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..

इतक्यातच घडलेली घटना…

41 वर्षानंतर अंतराळातून

* भारत कसा दिसतो? * 

याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…

* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत 

**सारे जहां से अच्छा** आहे.

त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.

अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.

मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.

* सिंदूर * operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.

परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••

हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो?? . म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.

ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?

कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••

देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.

मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..

**ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।**

म्हणतात ना…

Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.

जय हिंद.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ऐक ना देवा!’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘ऐक ना देवा!’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

नुसतं मागणं नाही रे बाबा! तर तुझ्यापाशी केलेला हा हट्टच समज.

— मातेच्या गर्भातून आल्यावर मायेची ‘कुस’ मला दे. बेंबीच्या देठापासून रडायला, “मी आलोय” हे जगाला सांगायला खणखणीत कंठ मला देशील नां?

— मोकळ्या हवेतला मोकळा श्वास मला घ्यायचाय.

— इवलेसे हात पाय झाडून हट्ट करायला लाडाचे आजी आजोबा मला हवेत.

— देवा अरे! शाळेत जाण्याइतका मोठा होईन ना मी, तेव्हां हे बुद्धीदात्या, गणेशा मला चांगली बुद्धी हवीच ना रे! .. करशील माझ्यावर कृपा देशील मला सद्बुद्धी?

— तारुण्यात मस्ती जगण्यासाठी पैलवानी ताकद दे, उत्साहाचं वारं नसानसांतून वहायला हवंय मला.

तर मग दे नां मला हंडाभर उत्साहाचं वाण आणि सामर्थ्याचं दान.

— सुखस्वप्नांच्या पायघड्यांवरून चालतांना जोडीदाराची आणि तिच्या कोमल हाताची साथ मला लागेलचं नां! . सुखदुःखात मला तुझीही साथ हवी आहे.

— सरला भूतकाळ सरलं आयुष्य. डोकावतयं वार्धक्य, आता अजून एक मागणं…

चालायला धडधाकट हातपाय हवेत. तसंच बोलतांना खातांना जिभेवर ताबा हा हवाच. मनाचं उधळणारं घोडं आवरायला स्थितप्रज्ञतेचा लगाम देशील नां?

— दुःखाचे कढ जिरवण्यासाठी ओठांवर विलसणारं हंसू दे. लहानपणी दिलंस ना अगदी तसंच बोळक्यातलं निरागस हसू परत द्यायला विसरू नकोस रे बाबा! आतां आयुष्यात तेवढच सुख आणि विरंगुळा आहे.

— बऱ्या वाईट कर्मांचा हिशोब तुझ्यापुढे मांडल्यावर तुझ्या कृपेचं, आरोग्याचे दान पदरात पाडून घ्यायचं आहे,

— अरे देवा! तू अगदी मुक्तहस्ताने, भरभरून देशीलच रे! पण माझीच झोळी फाटकी, अपुरी आहे. पण ऐक ना! मी ती आनंदाच्या तुझ्या नामस्मरणाच्या पवित्र धाग्यांनी भरभक्कम शिवलीय.

— मग टाकतोस ना माझ्या झोळीत तुझ्या कृपेचं, आशीर्वादाचं दान?

देवाधिदेवा…

हेची आता शेवटचे मागणे…

यावे तुझ्या दरबारातले लवकरात लवकरचे बोलावणे…

 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बार्गेनिंग…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “बार्गेनिंग…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 – – ‘believe it or not’ असा एक आगळावेगळा अनुभव

बार्गेनिंग हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. बार्गेनिंग मुळे खरंच आपल्याला पैसे कमी मोजावे लागतात का! , का, दुकानदार आधीच तेवढी वरची किंमत सांगतो आणि बार्गेनिंग नि आपल्याला मूळ किमतीवर आणतो, हे कुणीतरी दुकानदारच सांगू शकेल.

रस्त्यावरच्या दुकानात तर सगळेच बार्गेनिंग करतात. सोन्याचांदीच्या दुकानात पण थोडेफार बार्गेनिंग चालतेच. काही जणांना, मी बाटा सारख्या दुकानात पण बार्गेनिंग करतांना पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सकाळी सकाळी एका मित्राचा फोन आला. त्याला नवीन स्कुटर घ्यायची होती. चांगली किंमत मिळाली, म्हणून त्यानी आधीची गाडी विकली होती. नवीन गाडीचे मॉडेल वगैरे ठरले होते.

मला म्हणाला – माझ्याबरोबर दुकानात चल, काही बार्गेनिंग जमलं, तर तेवढीच किंमत कमी होईल. तुला बार्गेनिंग टेक्निक छान जमते

मी म्हटलं – अरे स्कुटर च्या किमतीत, मी काय बार्गेनिंग करणार?

मित्र म्हणाला – अरे चल तर, दुकानात गेल्यावर तुला बार्गेनिंग बरोब्बर सुचेल. गाडीची किंमत ५६-५७ हजार आहे. येन – केन २ – ४- ५ हजार कमी झाले, तर तेवढेच पैसे वाचले. “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” अशी म्हण आहे.

आम्ही ठरवून दुकानात गेलो. गाडी बघितली. टेस्ट राईड घेतली. सेल्समन नी ‘ऑन रोड किंमत’ सांगितली. रु ५६, २५०/-.

मित्रानी डिस्काउंट बद्दल विचारले. संध्या काहीही डिस्काउंट नाही असे त्यांनी सांगितले. या १ तारखेला किमती वाढणार आहेत. आत्ता ३० च्या आत बुक करा, आणि या लोएस्ट किमतीला गाडी उचला.

म्हणजे बार्गेनिंग ला काहीच वाव नव्हता. किंमत खाली कशी आणता येईल? याचे मला उत्तर सापडत नव्हते. म्हणजे “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” या म्हणीला काहीच अर्थ नाही का? असे मनात म्हणत मी वर बघितले, आणि मला मार्ग सापडला.

मी (मित्राला) : तू इतकी वर्ष गाडी चालवतो आहेस. पण वळताना तू कधीही साईड इंडिकेटर देत नाहीस, मग ते घेतले नाही, तर काय हरकत आहे!

(मित्राला काहीच अर्थबोध झाला नाही)

मी (मित्राला) : तुला गाडीच्या वजनामुळे, गाडी मेन स्टॅन्ड ला लावता येत नाही. तू साईड स्टॅन्ड वापरतो. मेन स्टॅन्ड शिवाय गाडी घेतली तर काय हरकत आहे?

आणि मी मित्राला एक एक प्रश्न विचारात गेलो…

तू रात्री स्कूटर कधीच चालवत नाही, आणि गावात गाडी चालवतांना, हेड लाईट आपण डीपर वरचं ठेवतो. अपर कधीच वापरत नाही. मग आपण एकच डिपर दिवा घेतला तर काय हरकत आहे!

तुझ्या गाडीचे मागचे बघण्याचे आरसे कुठल्याही दिशेला फिरलेले असतात. आणि तसे पण त्या आरशातून मागचे कुणीच कधी बघत नाही. लेडीज ना हा आरसा लागतो – थोड्या थोड्या वेळानी आपल्या चेहेऱ्यावरचा मेक – अप बघायला. तुला तर आता भांग पाडायला केस पण नाहीत! मग ते आरसे पण काढून टाकले तर काय हरकत आहे!

गाडी बरोबर टूल बॉक्स येते. ती पण घेऊ नको. आधीच्या गाडीची असेलच!

आपल्या रस्त्याकरता ट्यूब वाली टायर बरी पडतात. आपण ट्यूब लेस टायर घेतो आणि केंव्हातरी समोरच्या चाकात हवा कमी वाटते म्हणून दुकानात गाडी नेतो. दुकानदार म्हणतो, साहेब आठ पंचर आहेत. ८०० रु होतील. ट्युब टाकू का? , ३०० रु ची? आपण मनात वजाबाकी करतो, आणि फायदा दिसल्यावर, म्हणतो ‘ठीक है, ट्युब डालो, लेकिन अच्छे कंपनीवाला डालो’. मग, आताच ट्युबलेस च्या ऐवजी ट्युब वाले टायर घ्यायला काय हरकत आहे? किंमतीत बऱ्यापैकी फरक असतो.

नुकताच आपल्याकडे ‘नो हॉर्न’ डे साजरा झाला. परदेशासारखी आपल्याकडे पण हॉर्न वर बंदी येणार, हे नक्की. सध्या रस्त्यावर उलटीकडून गाडी आणली, तर दंड होतो. आज -ना- उद्या हॉर्न वाजवला, तरी दंड सुरु होईल. त्यापेक्षा हॉर्न काढूनच टाकला तर काय हरकत आहे.

या गाडीला मोबाईल चार्जर आहे. गाडी चालवतांना फोनवर बोलणं तुझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे तू तो कधीच वापरणार नाही. तो पण काढून टाकू.

या गाडीत स्पीडोमीटर आणि पेट्रोल चे गेज वेगळे वेगळे आहेत. तू गावामध्येच गाडी वापरणार आणि तुझा स्पीड मी २० – ३० च्या वर मी कधीच बघितला नाही. तुझ्या मागून रोड – रोलर आला, तरी तू त्याला हातानी खूण करून, पुढे जा असे सुचवतो. तुला स्पीड, २० आहे, कां २५ आहे, कां ३० आहे, याच्याशी काहीच देणेघेणे नसते. मग हे बघायला स्पीडोमीटर ची काय गरज आहे. त्यांना हे सगळे पार्टस काढून टाकायला सांग आणि सांग की हे सगळे नवीनच आहेत, ते स्पेअर पार्ट म्हणून विका.

मित्र : तुझे सगळेच पॉईंट पटण्यासारखे आहेत. संध्याची गाडी मी साधारण ३ वर्ष वापरतो होतो. पण वळताना साईड इंडिकेटर मी कधीच दिला नाही. आपल्याकडे इंडिकेटर देऊन वळणारी माणसं बोटावर मोजण्याइतकीच असतील. आपल्या समोरच्या गाडीचा डावा इंडिकेटर सुरु दिसतो, म्हणूनआपण गाडी उजव्या बाजूला घेतो आणि समोरचा उजवीकडेच वळतो. काही वेळा समोरच्या गाडीचा उजवा इंडिकेटर सुरु असतो आणि मागे बसलेल्या मॅडम डावीकडे हात दाखवत असतात. काही जणांचा डावा इंडिकेटर कायमच सुरु असतो. त्यामुळे, समोरचा आता डावीकडे वळणार – का वळणारच नाही – का उजवीकडे वळणार, याचा अंदाज लावूनच, मागच्यांनी गाडी चालवायची असते. त्यामुळे साईड इंडिकेटर नाही घेतले तरी चालण्यासारखे आहे.

गाडीच्या वजनामुळे मेन स्टॅन्ड वर गाडी लावायला मला कधीच जमले नाही. पूर्वी बजाज – लॅम्ब्रेटा या गाड्या असतांना, साईड स्टॅन्ड चा शोध लागला नव्हता. त्यामुळे मेन स्टॅन्ड वर गाडी लावतांना दमछाक व्हायची, पण पर्यायच नव्हता. आता साईड स्टॅन्ड सोयीचे आहेत, मेन स्टॅन्ड नाही घेतला तरी चालेल.

साईड च्या आरशातून मी मागचे कधीच बघितले नाही. रस्त्यावरचे खड्डे, उंचवटे, स्पीड ब्रेकर, कुठूनही येणाऱ्या गाड्या, कसाही रस्ता क्रॉस करणारी माणसं आणि इतर अडचणी बघता बघता मुश्किल होते, त्यात मागचे कधी बघू? मागच्या आरशांची खरंतर आपल्याकडे काहीच गरज नाही.

गाडीच्या हेड लाईटचे अपर – डिपर चे बटन तर मी कधीच खाली – वर केले नाही. रस्त्यावर, इतर पण कुणी अपर – डिपर वापरत नाही. बहुतेक गाड्यांचे कायमच अपर चे बटन सुरु असते आणि त्यांचे हेड लाईट समोरच्यांच्या डोळ्यावर अंधारी आणत असतात. काही जणांना तर अपर – डीपर हा काय प्रकार आहे, हे पण माहितच नसते. गाडी विकत घेताना जी पोझिशन असते तीच कायम असते

गाडीच्या स्पीडोमीटर वर गाडीचा वेग दिसतो, पण तो बघून आपण करायचे काहीच नसते. बर, स्पीडोमीटर बिघडला, तर आपण तातडीने कधीच तो दुरुस्त पण करत नाही. मग तो असला काय, अन नसला काय!

गाडीबरोबर मिळालेली टूल्स ची पिशवी कधीच मी उघडली नाही / आत काय काय आहे, हे पण मला सांगता येणार नाही.

बरं, गाडीला स्पीडोमीटर नाही, किंवा आरसा नाही, म्हणून पोलिसांनी कुणाला पकडल्याचे पण बघितले नाही.

मित्र : या गोष्टींची गरज नाही, हे बरोबर आहे. तेवढंच गाडीचं वजन कमी होईल – एव्हरेज पण वाढेल. पण नवीन गाडीत हे कमी कसे करणार? आतापर्यंत असं कुणी विचारलं पण नसेल!

मी : आपण त्यांना हे पार्टस काढायला सांगायचे. हे सगळे कमी केले, तर ५ – ६ हजार च्या आसपास किंमत कमी होईल आणि त्यावरचा १८ टक्के जीएसटी पण कमी होईल. सेल्समन ला हे सगळे सांग.

मित्राला हे एकदम पटले, त्यानी सेल्समनला हे सगळे सांगितले आणि किंमत कमी करायला सांगितली. सेल्समनला हा प्रकार कल्पनेच्या बाहेरचा होता. मित्र म्हणाला, जी गोष्ट मी वापरणार नाही, ती मी कशाला घेऊ. तुम्ही हे पार्टस स्पेअर पार्ट मध्ये विका.

सेल्समन म्हणाला, मी मॅनेजरना विचारून येतो. मित्र म्हणाला – त्यांना सांगा, मंजूर असेल तर आताच गाडी बुक करतो.

सेल्समनला मित्राचे म्हणणे मनातून पटले होते, की, जे वापरायचेच नाही, ते घ्यायचेच कशाला. गाड्या विकण्याचे टार्गेट सेल्समन ला पूर्ण करायचे होते, आणि त्याचा मॅनेजर ला पण. सेल्समन आत गेले आणि मॅनेजर ना घेऊनच बाहेर आले.

मॅनेजर : तुम्ही म्हणता तसे आम्ही पार्ट काढून घेऊ. आम्ही ते स्पेअर पार्ट म्हणून विकू, आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला साईड इंडिकेटर पूर्ण काढता येणार नाही, पण आम्ही आतला बल्ब काढून घेऊ. हेड लाईट मध्ये अपर – डीपर करता डबल फिलॅमेंट चा बल्ब असतो. त्यामुळे तो बल्ब पूर्णच काढावा लागेल. पण आमच्या वर्कशॉप मधला एखादा एक फिलॅमेंट गेलेला बल्ब तिथे लावून देऊ, आणि त्याचे पैसे घेणार नाही. गाडीचे आरसे आम्ही काढून घेऊ, वर्कशॉप मध्ये काही जुन्या डिझाईनचे आरसे पडून आहेत, ते तुमच्या गाडीला लावून देऊ फ्री मध्ये. गाडीचे स्पीडोमीटर/ केबल काढून घेऊ आणि वर्कशॉप मधले एखादे बिघडलेले तिथे लावून देऊ.

मॅनेजर नि कॅल्क्युलेटर बाहेर काढला आणि मित्रासमोर धरला आणि बऱ्याच बेरजा – गुणाकार केले.

मॅनेजर : सर, सगळे मिळून टॅक्ससकट ६२५० कमी होतील. म्हणजे उरलेले ५०००० भरा, आणि गाडी घेऊन जा.

मित्रानी डील फायनल केले.

मित्र : गाडी घ्यायला किती दिवसांनी येऊ.

मॅनेजर : सर, आता दिवसांचा जमाना गेला. पैसे भरा, गाडी पसंत करा. नको असलेले पार्ट्स काढण्याकरता आम्हाला अर्धा पाऊण तास द्या, आणि लगेच टेम्पररी नंबरप्लेट लावून गाडी घेऊन जा.

मी (मित्राला) : अरे, तुझ्या मोबाईलवर गुगल पे ऍप आहे ना. लगेच पैसे ट्रान्सफर कर, गाडी घेऊनच जाऊ.

पेमेंट झाले, किंमत कमी करण्याची एकदम आगळी – वेगळी आयडिया दिल्याबद्दल मॅनेजर नी मित्राचे आभार मानले.

मित्रानी माझ्याकडे वळून मॅनेजरना सांगितले की यांचे आभार माना, आयडिया यांची आहे.

मॅनेजर माझ्याकडे बघून : सर तुमची आयडिया एकदम भन्नाट आहे. इतर मित्रांना पण गाडी घ्यायला घेऊन या, त्यांना पण किंमत कमी करून देऊ. धन्यवाद

मॅनेजर बरोबर आमचा छान चहा झाला. तोपर्यंत गाडी तयार होऊन बाहेर आली.

मॅनेजर नी मित्राच्या हातात चावी दिली, गाडीला हार घातला, गिफ्ट म्हणून मित्राला ५०० रु चा वायरलेस स्पीकर दिला.

मित्र मला म्हणाला बघ, तुझ्यामुळे बार्गेनिंग छानच झाले. मला गाडी पण आवडीची मिळाली. या वायरलेस स्पीकर चा मला फार उपयोग नाही, तुला गाणी म्हणायचा शौक आहे, हा तुझ्याकडेच ठेव.

तिथल्या सगळ्यांना आणि दुकानाला बाय करून, आम्ही नवीन गाडीवर घराकडे निघालो.

गाडीचे सस्पेन्शन मस्तच होते, त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे – उंचवटे जाणवत नव्हते.

आता जातांना गाडीचा स्पीड बघायचा नव्हता, वळतांना कुठेच साईड इंडिकेटर द्यायचा नव्हता आणि हॉर्न पण वाजवायचा नव्हता.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares