मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नवीन वर्षाच्या शुभेच्छा – ३६५ दिवसांकरिता…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “नवीन वर्षाच्या शुभेच्छा – ३६५ दिवसांकरिता…” ☆ श्री सुधीर करंदीकर

वर्षभर निरनिराळे योग साधून, जसे निरनिराळे सण / उत्सव / वाढदिवस / जागतिक दिवस, वगैरे, याकरता आपली शुभेच्छांची देवाण घेवाण सुरु असते. त्या दिवशी बहुतेकांची सुट्टी असते, घरी पूजा असते / काही कार्यक्रम असतो, येणारे जाणारे असतात, गोड खाद्य पदार्थ असतात, आणि शुभेच्छांची जोड पण असते. आणि त्यामुळे सगळ्यांना तो एक दिवस खरंच छान जातो.

आता नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो. पण नंतर पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची किंवा घेणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून पूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.

आता ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा आनंदाचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी वर्षभर त्याकरता काहीतरी करत रहायला पाहिजे.

लगेच प्रश्न उभा राहतो – म्हणजे काय करायला पाहिजे?

आपण आधी बघू – भाग पहिला – शुभेच्छा देणाऱ्यांनी समोरची व्यक्ती वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.

मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.

आता बघू भाग दुसरा म्हणजे – शुभेच्छा घेणाऱ्यांनी मिळालेल्या शुभेच्छा वर्षभर फलद्रूप ठेवण्याकरता म्हणजे स्वतः वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.

१) आपल्यापैकी प्रत्येकाच्या सुखी आणि आनंदी जीवनाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असणार, हे सरळ आहे. म्हणून सुखी आणि आनंदी जीवनाबद्दल आपल्या ज्या काही कल्पना असतील, वर्षभराकरता आपली काही उद्दीष्ट असतील, त्यांचं आपल्याला यावर्षी एक काल्पनिक चलचित्र तयार करायचं आहे, आणि रोज सकाळी उठल्यावर, आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ते बघायचं आहे. झोपतांना पण ते बघायचं आहे. ह्यालाच स्वप्न रंगवणे आणि ते स्वप्न बघणे, असे पण म्हणता येईल. असे यावर्षी नियमित केल्याने आपले स्वप्न साकार होणार / आपण वर्षभर आनंदी राहणार हे निश्चित.

कारण, What you think, so you become & What you imagine, so it happens.

२) मला समोरच्यांकडून ठोस शुभेच्छा मिळाल्या, आता यांचे जर मला सुंदर रोपटे करायचे असेल, ते फुलवायचे असेल, तर मला पण योग्य ती मेहेनत करायला पाहिजे, त्याला नियमित पाणी घालायला पाहिजे / खतं घालायला पाहिजे. मी जर कायम निरुत्साही असलो, कायम निरनिराळे नकारात्मक विचार मनात घोळत बसलो, हे दुखतंय – ते दुखतंय, हेच उगाळत बसलो, तर बियांचे सुंदर रोपटे कसे होणार आणि ते कसे फुलणार? स्वतःला सकारात्मक करण्याकरता / ठोस करण्याकरता, हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे.

ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, अध्यात्मिक गुरूंनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हे असे आहे – —

# रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –

* ३० मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’ टू घरगुती वाद / नकारात्मक चर्चा. रमतगमत चालणे – नो वे! स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे. सकाळी फिरणे जमत नसेल, तर संध्याकाळी जाता येते. चालतांना दोन्ही हातानी ज्ञान मुद्रा किंवा तत्सम मुद्रा केली तर उत्तमच.

* १० मिनिटे प्राणायाम : तुमचा यावरचा अभ्यास असेल, तर त्याप्रमाणे करा. नाहीतर -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम करा आणि ५ मिनिटे दीर्घ श्वसन करा, ५ मिनिटे ओंकार जाप करा.

* १० मिनिटे ध्यान करा : विचारशून्य अवस्थेमधे बसणे 

* १० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.

आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.

# कळते पण वळत नाही —

‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’ हे आपल्याला कळते पण वळत नाही. ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, ‘सिगरेट, दारू प्रमाणात ठेवा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं.

ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.

# आलिया भोगासी असावे सादरं – चित्ती असू द्यावे समाधान —

ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो. अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू शकतं, की, आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा घोडदौड सुरु करता येते. घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या – वाईट घटनांचे शिल्पकार आपणच आहोत, ही समज महत्वाची आहे.

# संवाद —

घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.

एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.

# कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-

रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं? त्यानी असं कां केलं? हा असं कां वागतो? वगैरे, काथ्या कूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपापल्या वरच्या संस्कारांप्रमाणे वागत असतो, आणि ते आपल्याला पटेलच असे नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे आणि आनंदात राहायचे आहे.

# मन चंगा तो सब चंगा —

मानसिक स्वास्थ्य बिघडले, की सगळेच बिघडते, आणि सगळ्याच बाबतीत उतरती कळा सुरू होते. मग आपण ज्योतिषाला हात दाखवतो / पत्रिका दाखवतो. आपल्या पत्रिकेत कुठल्या घरात शनि आहे, कुठल्या घरात राहू – केतू आहेत, मंगळ कुठे आहे, आणि मग त्यांना प्रसन्न कसे करता येईल, यावर आपले तन / मन / धन आपण एकाग्र करतो. आणि आपली भरकटत भ्रमंती सुरु होते.

शांत डोक्यानी विचार केला, तर लक्षात येते, की आकाशातले शनि-मंगळ-राहू-केतू यांचा आपल्यावर प्रभाव जेमतेम १० टक्के असतो. ९० टक्के प्रभाव टाकणारे / मानसिक स्वास्थ्य बिघडवणारे किंवा घडवणारे, खरे शनि-मंगळ-राहू-केतू-बुध-गुरु-चंद्र-सूर्य हे आपल्याच घरात आणि आपल्याच अवति-भवती असतात. एकदा का आपल्या घरात / आपल्या मित्रमंडळीत / आपल्या सहकाऱ्यांमधे, कोण शनी आहे / कोण राहू – केतू आहे / कोण गुरु आहे, – – – -, हे आपल्याला समजले, या जवळच्या ग्रहांच्या आवडीनिवडी आपण समजून घेतल्या, त्यांच्या चाली आपण समजून घेतल्या, तर त्यांना खुश ठेवणारी आणि आपल्याला त्रास न होणारी, आपली चाल आपल्याला ठरवता येते आणि आपले आयुष्य खूप सोपे होते, मनाला ताणतणाव पण राहत नाहीत.

प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो.

स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता – इतरांचा नाही.

# वर्तमानकाळात रहा —

आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच महाऔषधी आहे.

# जर – तर ला बाय बाय —-

बहुतेक जण आनंदी होण्याकरता कुठल्यातरी बंधनाशी जोडी बांधतात. जर नवऱ्यानी माझं कौतुक केलं तर मी आनंदी होईन, जर बायकोनी असं – असं केलं तर मी आनंदी होईन. अशी जर-तर ची आपण लाईन लावतो, आणि परिणाम काय होतो, ते आपण अनुभवतोच. यावर्षी जर-तर ला बाय बाय करायचे आहे. आणि करायचं काय आहे? तर, आपण सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करायचं आहे आणि स्वतः अनकंडिशनल आनंदी राहायचं आहे. असं म्हणतात, की, जर आपलं शरीर प्रेमानी आणि आनंदानी शिगोशीग भरलेले असेल, तर कुठलेही इन्फेक्शन / कुठलाही आजार / कुठलीही व्याधी आपल्या शरीरात प्रवेश करूच शकत नाही, कारण कुठे जागाच शिल्लक नसते.

# कायम आनंदी चेहेरा —

कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो?

आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.

चला तर मग – यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण “ठोस” बनायचे आहे.

नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा!!!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बिच्चारे नवरे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बिच्चारे नवरे…” ☆ श्री मंगेश मधुकर

शीर्षकाविषयी मतभिन्नता असू शकते तरीही विषय जिव्हाळ्याचा आणि घराघरातला आहे. आजच्या संडे डिशचं मूल्यमापन वैयक्तिक अनुभवावर करावे ही आगाऊ सूचना आणि विनंतीसुद्धा.

रविवारची सकाळ, सुट्टीचा दिवस असल्यानं घर निवांत होतं. ‘सौ’पेपरमधलं कोडं सोडवत होती तर ‘अहो’ मोबाइलमध्ये हरवलेले.

“एक विचारू”सौ.

“हं”

“निरागसला समानार्थी शब्द काय?? ”

“नवरा” अहोंच्या उत्तरावर सौंनी डोळे वटारले “काहीही काय? ”

“खरं तेच बोलतोय”

“निरागसचा अर्थ तरी माहितीये का? ”

“चांगलाच”

“तरीही असं बोलता. ”

“हो. कारण नवरे तसेच असतात. त्यांच्याकडं नेहमी ठराविक चष्म्यातून बघितलं जातं”

“असं काही नाही. नवरा आणि निरागस हे कदापि मान्य नाही. ”

“तुझी इच्छा!! पण त्यानं वस्तुस्थिती बदलणार नाही. ”

“सिरियसली बोलताय की गंमत”सौ. वैतागली.

“हीच आम्हां नवरे मंडळींची शोकांतिका. कुणी समजूनच घेत नाही. बिच्चारे!! ”

“बास!! उगाच सेल्फ पिटीवर जाऊ नका. नवरे बिच्चारे वैगेरे अजिबात नसतात. पक्के लबाड. ”

‘बघ. परत तेच. कितीही चांगलं वागलं तरी… पालथ्या घड्यावर पाणी” 

“ओके. क्षणभर तुमचं म्हणणं मान्य करते. नवऱ्यांच्या निरागसपणाचं पटेल असं एकतरी उदाहरण देता येईल. ” पेपर बाजूला ठेवत सौ पुढे सरसावल्या. या अनपेक्षित पवित्र्यानं अहो काहीक्षण गोंधळले पण लगेच स्वतःला सावरत म्हणाले. “एक कशाला?? पन्नास उदाहरणं आहेत.”

“पन्नास नको. दोन-चार सांगितली तरी चालेल. ”

“ऐक तर मग”मोबाइल बाजूला ठेवत अहोंनी बोलायला सुरवात केली.

“आधी एक प्रॉमिस कर. माझं ऐकल्यावर वाद घालायचा नाही. चिडायचं नाही. ”

“घाबरता का? ”

“हा हा हा. विनाकारण वितंडवाद नको म्हणून” 

“ठीकयं. हाच नियम तुम्हांलाही लागू. ”

“मान्य”

“बोला आता!! ”

“चहापासून सुरवात करू. ”

“आधी बोला मग चहा मिळेल. ”

“हेच ते. पूर्ण ऐकून तर घे. मी चहा करायला सांगत नाहीये”

“मग!! ”

“तुला असं वाटतं की मी नेहमी चहासाठी ऑर्डर देतो. ”

“मग त्यात खोटं काय? तुमचा टोनसुद्धा तसाच असतो. ”

“असं काही नाही. बायका सतत बोलत असतात. ते ऐकण्यासाठी ताजंतवानं वाटावं म्हणून नवरे चहाची फर्माईश करतात. ” 

“होssssका? हे नवीनच ऐकतेय. अजून… ”सौ.

“घराबाहेर असलो की इतर सुंदर चेहऱ्यांकडे निरखून पाहिलं जातं. त्याला सुद्धा कारण आहे. ”

“अग्गो बाई!! काय ते!! ”बोलताना सौंनी दोन्ही हाताचे पंजे अहोंच्या समोर ओवाळले.

“त्या सगळ्यांच्या तुलनेत आपली बायकोच अजूनही सुंदरच दिसते याची खात्री करण्यासाठी हे पाहणं असतं. इतका निर्मळ विचार असताना बायकांना वाटतं की… ”

“ही तर निरागसपणाची अत्युच्च पातळी झाली. ”सौ उपरोधिकपणे म्हणाल्या.

“जेव्हा बनवलेल्या एखाद्या पदार्थाला नवऱ्याकडून नावं ठेवली जातात तेव्हा राग येतो पण त्यामागची खरी तळमळ लक्षात घेत नाही. तुमचं पाककौशल्य सुधारून अजून उत्तोमोत्तम खायला मिळावं. एवढाच हेतू असतो”

“खरंच बाई!! नवरे किती कित्ती भोळेसांब!! . ”

“तेच तर सांगतोय. आमचा चांगुलपणा कोणी लक्षातच घेत नाही. चुका मात्र लगेच आणि वारंवार दाखवता. ”

“अरेरे!! ”

“म्हण की बिच्चारे!! ”

“अजिबात नाही. ”

“बायकांची अजून एक तक्रार म्हणजे आमचं घोरणं पण त्यामागचं गुपित सांगतो. आपण एकदम सुरक्षित आहोत. काळजी घ्यायला बायको खंबीर आहे. या भावनेनं नवरे निर्धास्त झोपतात. म्हणून मग… ”अहोंच्या बोलण्यावर सौंकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.

“काय झालं”

“तुम्ही बोला. ऐकतेय”

“तुमच्यामुळे सुंदर झालेलं आयुष्य रोज साजरं करत असल्यानं आणि कामाच्या गडबडीमुळे नवरे वाढदिवस विसरतात. तुमचं आयुष्यात येणं यापेक्षा मोठं गिफ्ट या जगात नाही असं आम्ही मानतो. ”अहो बोलायचं थांबले तेव्हा सौं टाळ्या वाजवत म्हणाल्या. “झालं की अजून आहे”

“अजून बरंच काही आहे पण तूर्तास एवढंच पुरे!! आता पटलं ना की नवरे निरागस असतात. ”

“शंभर टक्के चूक. ही अशीच उदाहरणचं असतील तर माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे. हे मान्य करावचं लागेल. संसारासाठी माहेर, आपली माणसं सोडून आलेल्या बायका केव्हाही ग्रेटच!! . ” 

“वाद नको. म्हणून मी हो म्हणतो”

“म्हणावचं लागेल तीच तर खरी परिस्थितीये. कुटुंबासाठी तडजोडी करत सहन करतो. म्हणूनच फक्त बोलून मन मोकळं करतो आणि तुम्ही म्हणता की बायका अति बोलतात. सासरं त्यातही नवऱ्यांना सांभाळणं सोपं नाहीये. खूप त्रास होतो. पार डोकं आऊट होतं. अनेकदा वाटतं की.. ”बोलताना सौच्या चेहऱ्यावरचे भाव आक्रमक झाले अन मुठी आवळल्या गेल्या. ते पाहून अहोंनी चाचरत विचारलं. “काय वाटतं? ”

“जाऊ दे. बोल्ले तर भांडणं होतील. या चर्चेचं तात्पर्य हेच की नवरे नाही तर आम्ही बायकाच बिचाऱ्या असतो नुसत्या नाही तर डब्बल बिच्चाऱ्या!! . सौंच्या आवेशानं अहोना जोराचा ठसका लागला. सपशेल माघार घेत भाजी आणायचं निमित्त काढून लगेच घरातून काढता पाय घेतला तेव्हा सौ मनापासून हसल्या.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ३ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ३ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

स्पर्धा…

सध्या अनेक प्रकारच्या आणि अनेक विषयांवर स्पर्धा भरवल्या जातात, घेतल्या जातात, आयोजित केल्या जातात. त्या त्या क्षेत्रातील गुणवत्ता यातून झळकावी, योग्य उमेदवारास संधी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे असा यामागील उदात्त हेतू असावा असे सामान्य मनुष्याला वाटणे अगदी स्वाभाविक म्हटले पाहिजे…! सदर स्पर्धांचा थोडा अधिक अभ्यास आणि विचार करताना असे लक्षात आले की यामागे वर नमूद केलेला उदात्त उद्देश नसून त्याला अनेक कंगोरे जोडले गेले आहेत. यामागे अर्थकारण तर आहेच, पण त्यातील स्पर्धा ही निव्वळ गुणवत्तेवर न राहता ती आता सामाजिक माध्यमांच्या ताब्यात, पर्यायाने काही मुठभर लोकांच्या ताब्यात गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल…! आता महान गायक/गायिका व्हायचे असल्यास त्या अथवा तिला रियाज करायला लागेल की नाही ते सांगता येणार नाही पण सामाजिक माध्यमांवर जास्तीतजास्त लाईक्स मिळवणे बंधनकारक…!! *”पतिव्रतेच्या माथी धोंडा, वेश्येला मणीहार”* असा हा प्रकार नव्हे काय?

उदा. म्हणून विचार केला करूया. संगीत ही एक साधना आहे. साधना करून एखादी विद्या किंवा त्या विद्येत प्राविण्य प्राप्त करता येते. पण ते सुध्दा सामाजिक माध्यमांवर अवलंबून ठेवले गेले, किंवा तसे प्रस्थापित केले गेले तर कोणी साधना करण्याच्या फंदात पडणार नाही, आणि काहीही करून यश संपादन करण्याची चुकीची सवय लागू शकेल…

पटतंय ना?

समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा वृत्ती फोफावल्याचे आपल्याला आढळून येईल. वानगीदाखल वरील संगीत क्षेत्राचे उदाहरण दिले आहे. IPL सारखे सामने सुध्दा याचीच री ओढत नाहीत असे म्हणता येईल…? अशा फोफावलेल्या विविध क्षेत्रांतील समाजाने एकत्र येऊन बहिष्कार घातला पाहिजे असे आपल्याला वाटतं नाही का?

हा वेताळ थोडेसे गोंडस रूप घेऊन आपल्या सर्वांच्या निव्वळ मानगुटीवर नव्हे, तर मनावर राज्य करू लागला आहे, त्याला वेळीच आपण सर्वांनी आवर घालण्याची गरज आहे असे सुचवावे वाटते…

बदलत्या जमान्यात स्पर्धांचे प्रकार आणि स्वरूप बदलत गेले…!! ती स्पर्धा आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आता दोन भावांमध्ये स्पर्धा आहे, नव्हे इर्षा आहे, दोन बहिणींमध्ये, नव्हे ती आता मायलेकी पर्यंत पोचली आहे…!! पटतंय ना?

सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था येणे अगदी नैसर्गिक आहे. त्यानुसार शरीराची कांती आणि केसांचा रंग आणि आयुष्य कमीअधिक असणे नैसर्गिक नव्हे काय? वयाच्या पंचविशी मध्ये तसा दिसणे आणि पन्नाशीला मी पन्नाशीसारखा दिसणे हे अपेक्षित नव्हे काय? पण आता यात बदल होताना दिसत आहे. मुलगी आणि आई छान दिसतात असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. दोघी सारख्या दिसता असे म्हणणेही स्वाभाविक म्हणता येईल… , पण आता आयांना मुलीपेक्षा तरुण दिसण्यात धन्यता वाटू लागली आहे… , याला विकृती पेक्षा चांगला शब्द माझ्या मनात येत नाही…

एक कथा आहे. एका राजाला तरुण दिसायचे होते म्हणून त्याने आपल्या मुलाकडून तारुण्य मागून घेतले तरी त्याचे समाधान झाले नाही… , या कथा नाहीत तर आरसा आहेत… , आरसा पाहून आपण आपली दृष्टी नव्हे दृष्टीवर बसलेला वेताळ हाकलून द्यायला हवा…

पहा, पटतंय का?

लेख : तिसरा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संक्रांत… भोगी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “संक्रांत… भोगी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जानेवारी आला की आठवते संक्रांत… त्याच्या आधीचा दिवस भोगीचा.. त्या दिवशी भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी आणि कढी करायची आपली परंपरा आहे.

काय म्हणता… भोगीची भाजी तुमच्याकडे कोणाला आवडत नाही…

मी एक गंमत सांगते तुम्हाला..

तशी भाजी करून बघा बरं…

मटार, चवळी, घेवडा, डबल बी, वाल पापडी, तुरीच्या शेंगा, पावटा यातील ज्या मिळतील त्या शेंगा घेऊन यायच्या. त्याच्या आतले दाणे (बीया) काढायचे. कोवळ्या शेंगा चिरून घ्यायच्या. मीठ घालून हे सगळे कुकरमध्ये शिजवायचे. फ्लॉवर लवकर शिजतो. म्हणून तो थोड्या पाण्यात वेगळा शिजवून घ्यायचा. वांगी, गाजर पण घेऊ शकता. दोन बटाटे मध्यम आकारात चिरून, तेलात तळून बाजूला ठेवायचे. त्याच तेलात कुटलेलं आलं, लसूण, मिरची घालायची. टोमॅटो घालून चांगले परतायचे. मग त्यात शिजवलेल्या भाज्या, फ्लॉवर, बटाटा घालायचे व मीठ घालायचं. ही कोरडी भाजी झाली. रस्सा हवा असेल तर थोडं पाणी घालायचं.

झाली भोगीची भाजी…

आता मजा सांगते…

साई सकट दूध कढईत आटवायचं.

(भाजीच्या प्रमाणात) भाजी गॅसवरून खाली घेतली की कोरड्या भाजीत हे घालून मिक्स करायचं. छानशा बाऊलमध्ये भाजी काढायची. कडेला टोमॅटोच्या चकत्या ठेवायच्या.. मुलांना सांगायचं तुम्ही हॉटेलात तीनशे रुपयाला घेता ना.. ती आज तुमच्यासाठी स्पेशल

” मलई नवरत्न व्हेज”

बनवली आहे कार्टी(खूप दिवसांनी हा शब्द वापरला) उड्या मारत आवडीने खातात.

रस्सा केला तर आवडीनुसार मसाले घालायचे.

बाजरीच्या पुरी एवढ्या छोट्या भाकरी तीळ लावून करायच्या..

त्या खाताना मुलांना गंमत वाटते…

गरम तेलात जिरे घालून त्यात भात कालवला.. थोडसं मीठ घातलं की जिरा फ्राईड राईस…

भातात या ऊकडलेल्या भाज्या व मीठ घातले की प्लेन व्हेजिटेबल राईस तयार…

तुरीच्या सरबरीत वरणात तिखट, मीठ घालायचं भरपूर लसूण घालून फोडणी दिली की” लसुणी तडका डाल ” या भाताबरोबर खायला..

यात मेथी किंवा पालक घातला की नाव फक्त बदलतं आणि त्याची किंमतही वाढते..

पोळी तूप टाकून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत करून घ्यायची. त्याचे दोन भाग करायचे. त्यावर पिझ्झा सॉस लावायचा आणि ही कोरडी भाजी टाकायची. त्यावर चीज पसरायचे आणि पोळी फोल्ड करायची की झाली मुलांची आवडती फ्रॅकी तयार…

आपले पूर्वज फार ज्ञानी होते. त्यांनी हवामान, ऋतू यांना अनुसरून आपला आहार पौष्टीक कसा होईल हे विचारपूर्वक ठरवले आहे.

आपली भारतभूमी सुजलाम सुफलाम आहे. अनंत प्रकारच्या भाज्या, फळं या दिवसात मिळतात.

ती खाल्ली जावीत हा या मागचा हेतू आहे. आरोग्य आपोआप सांभाळले जाते.

रुढी आणि परंपरा म्हणून आपण त्या कराव्यात. त्यात थोडेसे बदल केले की या भाज्या मुलांनाही आवडतील. त्याच्या मागचे शास्त्र आणि हेतू मात्र मुलांना समजावून सांगावा. त्यांच्या भाषेत सांगितले की त्यांना ते पटते.

मल्टीग्रेन च्या नावाला भूलून महाग गोष्टी कशाला घ्यायच्या? आपली पारंपरिक भाजणी काय आहे…

त्यात पालक, मेथी, कांदा घालून केलेली थालपीठ…

कसली भारी लागतात…

जवार कुरकुरे खाण्यापेक्षा ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून केलेलं थालीपीठ खा…

काकडी, कांदा, काॅर्न, सिमला मिरची तुपावर परतून घ्या. ती थालपीठावर घाला. थोडा साॅस घाला. वरून चीज घातलं की थालीपीठ पिझ्झा तयार…

लेकरं चवीनी खातात..

घरची मुग डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी गार झाली की घट्ट होते. हॉटेलातली डाळ खिचडी कशी मऊसर पातळ असते.

द, तूप घालून भात करून घ्यायचा.

मूग डाळ शिजवून त्यात कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर घालून त्याला फोडणी द्यायची. खायच्या वेळेस जेवढं पाहिजे तेवढीच डाळ व भात… दोन्ही प्रमाणात घेऊन गरम करायचं. त्यावर ताजी फोडणी घालायची…

हॉटेलात दीडशे रुपयाला मिळणारी डाळ खिचडी रेडी…

पापडाचे चार तुकडे करून तळून घ्यायचे. (एक एक तुकडा उचलून खाता येतो) त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला घालायचा. वर शेव भुरभुरली की मसाला पापड तयार…

आहे काय नाही काय…

मिलेटस म्हटलं की फार काहीतरी वेगळं आहे असं हल्ली वाटतं. आपली जवस, तीळ, खोबरं,

शेंगदाणा यांची एकत्रित चटणी केली तीला” मिक्स मिलेट्स ” म्हटंल की त्याचं वजन वाढतं… तरुणाईला जी भाषा आवडते.. समजते.. ती वापरायची…

घरच सकस, अन्न खायची सवय आपणच मुलांना लावूयात. भोगीला अजून अवकाश आहे. आधीच हे करून बघा… आणि कशी झाली ते मलाही सांगा. आपली हिंदू संस्कृती किती महान आहे… तुमच्या लक्षात आले असेल…

हे आपल्याच निरामय, आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहे. वर्षानुवर्षे चाललेली आपली परंपरा जतन करून ठेवूया. तरच ती पुढच्या पिढीला समाजेल.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – आमचं घरटं – भाग – ७२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आमचं घरटं

ज्योतिकाच्या लग्नाच्या वेळी माझी आई बोरिवलीला करुणा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. छुंदाचे (माझी धाकटी बहीण) पती श्री. रमेश चाफेकर आईजवळ होते आणि त्यांनी छुंदाला, “तू काळजी करू नकोस मी मम्मा जवळ आहे. ज्योतिकाच्या लग्नाला तू निश्चिंत मनाने जा. आईला काही होणार नाही. she is a strong lady. ” असे खात्रीपूर्वक म्हटल्यामुळे छुंदा लग्नाला येऊ शकली होती. लग्नाचा आनंदमय बहारदार सोहळा पार पडत असताना मनोमन कुठल्यातरी कोपऱ्यात आईची आठवण आणि काळजी सतत होतीच.

ज्योतिका सासरी गेली. तिचे सासर मुंबईतले पार्ले येथील. त्याच दिवशी ती आणि साकेत आईला भेटायला करुणा हॉस्पिटलमध्ये गेले. आई तशी ग्लानीतच होती. हळूहळू ती जीवनाच्या पलीकडे सरकत होती. कुणाला ओळखेनाशी झाली होती पण ज्योतिकाने जवळ जाऊन “मम्मा आजी” अशी हाक मारताच आईने अर्धवट डोळे उघडले. तिच्याकडे पाहिलं. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हातात धरले आणि ती हलकेच हसली. तिच्या त्या क्षीण हास्यातही तिचा स्वर्गीय आनंद दडलेला जाणवला. ज्योतिकाच्या लग्नाचा आईने मनोमन खूप ध्यास घेतला होता. ज्योतिका – साकेत गादीवर असलेल्या आईला नमस्कार करण्यासाठी वाकले तेव्हा आईने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवले. गालावरून हात फिरवले, मुके घेतले. ती काहीतरी बोललीही. शब्द कळत नव्हते पण भाव समजत होते. “सुखी रहा. सुखाने संसार करा, एकमेकांना कधीही अंतर देऊ नका. ”

दोघांचे डोळे अश्रूंनी डबडबले.

२० डीसेंबरला ज्योतिकाचे लग्न झाले आणि ३१ डिसेंबरला आईने जगाचा निरोप घेतला. ती देवाघरी गेली. ज्योतिका चे लग्न होईपर्यंत जणू काही आईने प्राण धरून ठेवले असावेत. अशी असते आई! अशी होती आई! पुन्हा पुन्हा जाणवत राहिले.

या प्रसंगाने आणखी एका गोष्टीची मनात नोंद केली. साकेत, त्याचे आई-वडील आणि त्यांच्या परिवारातले सर्वच किती समंजस आणि भावनांची कदर करणारे आहेत! नुकताच गृहप्रवेश केलेल्या नवदांपत्याला हॉस्पिटलमध्ये मरणासन्न आजीला ताबडतोब जाऊन भेटण्यासाठी पाठवताना तिच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या होत्या. जीवनातले फार मोठे आशय असेच वेचले जातात.

ज्योतिकाचे लग्न जमल्यापासून ते संपन्न होण्यापर्यंतच्या काळात एक सुखद घटनाही आमच्या जीवनात घडत होती. त्याच दरम्यान ‘संकेत काळे’ नावाच्या एलिजिबल बॅचलरशी मयुराचं मैत्रीचं नातं जुळत होतं. त्यावेळी मयुरा अमेरिकेत मेरीलँडला राहत होती आणि संकेत टेक्सासला होता. बरेच दिवस ते फोनवर एकमेकांशी बोलत होते. अजूनही एकमेकांबद्दल दोघांनाही नक्की काय वाटत होतं ते सांगता येत नव्हतं. एक दिवस मयुरा मला असे म्हणाली होती, “आई तो इतकं बोलतो की कधी कधी माझं डोकं दुखतं पण तो खूप हुशार वाटतो. चौफेर ज्ञानी आहे काहीसा व्यवहारी वाटतो. ठामही आहे शिवाय मनमोकळा आणि प्रामाणिक आहे हे मात्र नक्की. “

“तो उंच आणि देखणा ही आहे अत्यंत हेल्थकॉन्शस आणि क्रीडाप्रेमी आहे. ” हे पण तिने मला सांगितले वास्तविक मयुरा म्हणजे अत्यंत आनंदी वृत्तीची, हसरी, खेळती बागडती, काहीशी बिन्धास्त, खर्चिक वृत्तीची पण अतिशय संवेदनशील मुलगी.

एक दिवस मयुरा आणि संकेत मेरी लँडलाच भेटले. खरं म्हणजे दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले होते पण निर्णय काही दोघांनाही घेता येत नव्हता. मयुराने तर हळूहळू त्याच्यातून मन काढून घेण्याचेच ठरवले होते पण त्याचवेळी दुसरी काही प्रपोजल्स बघण्याची तिची मानसिक तयारी होत नव्हती.

दरम्यान सुरेशजी आणि सुमेधाताईंशी (संकेतचे आई वडील) आमचे मधून मधून फोनवर बोलणे होत असे. ते चेंबूरला शेल कॉलनीत राहत. त्यांच्या घरी आम्ही एक दिवस गेलो. घर खूपच लहान आणि नीटनेटकं असलं तरी जरा असुविधांचंच होतं पण का कोण जाणे आमची त्या दोघांशी मात्र खूप चांगली मैत्री जुळली. सुमेधाताई या अतिशय मनमोकळ्या प्रामाणिक, प्राणी पक्षीप्रेमी, अत्यंत धार्मिक आणि भावुक वृत्तीच्या आणि सुरेशजी क्रीडा प्रेमी, दुसऱ्याला सतत मदत करण्याची वृत्ती असणारे, उंच व्यक्तिमत्त्वाचे, स्वतःच्या कपड्यांविषयी अधिक जागरूक असणारे, मनमोकळे, आनंदी असे वाटले. या दोघांचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच प्रेम विवाह झालेला होता. सुरेशजी शहाण्ण्यव कुळी मराठा आणि बडोदा स्थित आणि सुमेधाताई सारस्वत, दादर माहीम येथे राहणाऱ्या. पूर्वाश्रमीच्या दळवी. त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं तेव्हा माझ्या मनात पटकन आले, साकेतचे पप्पाही मराठा आणि बडोद्याचे आणि सुवर्णाताई सुध्दा सारस्वत, मुंबईतच राहणाऱ्या हॉस्कुटे फॅमिलीतल्या. शिवाय तो साकेत आणि हा संकेत. अरे वा! अर्थात म्हणून संकेत मयुराचे लग्न जुळेलच असा काही बालीश विचार करण्याचे मी तेव्हा नक्कीच टाळले पण ज्योतिकाच्या लग्नाचे आमंत्रण मात्र आम्ही त्या दोघांना दिले. मयुराला फारसं रुचलं नव्हतं पण आमच्या अनेक फ्रेंड्स पैकी हे दोघे असे आम्ही तिला पटवूनही दिले.

सुरेशजी आणि सुमेधाताई ज्योतिकाच्या लग्न समारंभात अगदी आमची खूप जुनी मैत्री असल्यासारखेच मिसळले होते. आमच्या जळगावच्या मित्र-मैत्रिणींशीही त्यांनी ओळख करून घेतली. एकंदरीत ते फार कम्फर्टेबल होते. त्यांना मयुराही अतिशय आवडली. संकेत आणि मयूराची जोडी जमावीच असे त्यांनाही मनापासून वाटत असावे कारण त्यानंतरही त्यांच्याशी फोनवर बोलताना आम्हाला हे जाणवलं होतं.

एक किस्सा त्यांनी सहज बोलता बोलता सांगितला होता तो असा. ते दोघेही संगीत प्रेमी आणि दादरला वाघमोडे यांचं (म्हणजे साकेतचे वडील) ‘महाराष्ट्र ग्रामोफोन अँड वॉच कंपनी, नावाचं जवळजवळ सत्तर वर्षांची परंपरा असलेलं अत्यंत प्रसिद्ध असं म्युझिक हाऊस होतं आणि तिथे हे दोघं संकेतसह नेहमी जात. संकेत तेव्हा लहान शाळकरी अथवा महाविद्यालयीन मुलगा असेल. एक दिवस साकेत वडीलांबरोबर दुकानात आला होता. तोही साधारण संकेतच्याच वयाचा होता. त्याला पाहून तेव्हा सुमेधाताई पटकन म्हणाल्या होत्या, ” अरे! हे दोघं किती सारखे दिसतात! यांचं काहीतरी नातंच असलं पाहिजे असंच वाटतं. नावं पण बघा ना कशी! साकेत आणि संकेत! ” जीवनात येणारे असे हे गमतीदार योगायोगच म्हणायचे का?

ज्योतिकाचे लग्न होण्यापूर्वी आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्योतिका टेक्सासलाच ऑस्टिन या गावी काही प्रोजेक्टच्या निमित्ताने होती. त्यादरम्यान ती स्वतःच संकेतला डॅलसला जाऊन भेटून आली आणि तिचे संकेत विषयी फारच चांगले मत झाले आणि तिने तसे आम्हाला कळवले.

बरेच दिवस आम्ही या विषयाबाबत तसे न्यूट्रल होतो. किंचित तणाव, दाब होता कारण एखादा.. मग पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह कोणताच निर्णय लागत नसल्यामुळे दुसरे पाऊल उचलता येत नव्हतं. एका रेषेवर सर्व काही ठप्प झालं होतं आणि माझ्यातल्या एलिझाबेथ बेनेटला ते असह्य होत होतं. विलास मात्र शांत होता नेहमीप्रमाणे.

माझे आणि सुमेधाताईंचे मात्र फोनवर छान बोलणे व्हायचे. मयुराची आणि संकेतची पत्रिका कशी जुळते वगैरे अगदी आशावाद बाळगून सांगायच्या. आम्ही तशा इतरही गप्पा मारायचो कारण सुमेधाताई अतिशय स्वच्छ मनाच्या, प्रांजळ वृत्तीच्या असलेल्या जाणवायच्या आणि संकेत त्यांचा एकुलता एक मुलगा त्यामुळे होणाऱ्या सुनेचं मनापासून कोड कौतुक करणारी एक सुंदर स्त्री मी त्यांच्यात त्यावेळी पाहिली. (या माझ्या त्या वेळच्या विचारांना आणि भावनांना आजपर्यंत कधीही धक्का पोहोचलेला नाही हे विशेष.) 

बरोबर एक वर्ष उलटलं असेल. फायनली मयुराने आणि संकेतने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतरच्या विवाहविषयक ठरवलेल्या योजना भराभर उत्साहाने आणि आनंदात पारही पडल्या. लग्नाच्या आधी लग्न करण्यासाठीच एखादा आठवडाच आधी मयुरा आणि संकेत दोघेही एकत्रच भारतात आले. आम्ही मुंबई विमानतळावरच संकेतला प्रथम भेटलो. हा आमचा होणारा दुसरा जावई! मन हरखून गेले. संकेत -मयुराचं हातात हात घालूनच विमानतळावर आगमन झालं होतं. दोघंही इतके छान दिसत होते! कौतुकाने मन भरून गेलं. मनातल्या मनात या सर्व योगायोगांची मांडणी करत असतानाच परमेश्वराचे आभारही मानले.

ज्योतिका- साकेतच्या लग्नानंतर बरोबर एक वर्षाने म्हणजे १८ डिसेंबर २००६ रोजी जळगावलाच, त्याच ओम लॉन्स वर संपूर्णपणे ज्योतिकाच्या लग्नाचा रिप्ले मयुराच्या लग्नाबाबत संपन्न झाला. अत्यंत खेळीमेळीत, पुरोगामी पद्धतीने, तुमचं -आमचं अजिबात नसलेला एक मित्रत्त्वाचा, नव्या नात्याचा सुंदर सोहळा पार पडला. आनंदी आनंद जाहला.

ज्योतिका आणि मयुराच्या लग्नातली कवीवर्य ना. धो. महानोरांची उपस्थिती आणि त्यांनी केलेलं त्यांच्याच कवितांचं गायन हे कायम स्मरणात राहणारं ठरलं.

 काही बोलू नये तिशी

नुसते डोळ्यांशी बुडावे

आणि बेसावधपणी

नुसते आभाळ झेलावे…

महानोरांचं काव्य आणि त्यांचं गावरान कंठातलं गायन.. संगीत समारंभातला एक अत्यंत सुखद क्षण.

मयुराच्या लग्नातली *पुढारी*चे संस्थापक बाळासाहेब जाधव यांची झेड सिक्युरीटीतली उपस्थितीही लक्षवेधी होती.

बाळासाहेब वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंचावर आले तेव्हा म्हणाले, ”दोघंही भाग्यवान. एकदम अनुरूप! ”

असे ते लाडक्या लेकींचे विवाह सोहळे. आनंदाचे.. सुखाचे.

आमच्या दोन चिमण्या आमच्या उबदार गोजिरवाण्या प्रेमळ घरट्यातून आता मात्र खऱ्या अर्थाने नव्या विश्वात झेप घेण्यासाठी उडाल्या. जरी त्या शिक्षणाच्या निमित्ताने दूरच होत्या तरी आमचं घरटं तेव्हा एकच होतं. दोघींचे विवाह झाले आणि घरट्यातली पोकळी, रिकामपण मात्र जाणवायला लागलं. एकाच वेळी कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि वियोग, दुराव्याच्या लहरीवर हेलकावे घेत आम्ही दोघं आमच्याच जीवनाकडे साक्षी भावाने मागे वळून पाहत राहिलो. आमच्या सहजीवनातल्या घट्ट वीणेत गुंफलेला तो मोत्याचा क्षण होता..

– क्रमशः भाग ७२.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अवतार…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “अवतार…” ☆ सुश्री शीला पतकी 

शेजारची मुलगी विचारत आली आत्या देवाचे अवतार असतात का? मी म्हणाले हो… ” मग देवाचे जर अवतार असतात तर आई मला म्हणाली काय अवतार केलाय जरा आरशात बघ मी काय अवतार केला मग अवतार… म्हणजे नेमकं काय? परवा आजी म्हणाली… आम्ही लहानपणी विठोबाच्या देवळात अवतार बघायला जात असू.. मला खूप कन्फ्युजन आहे की नेमक अवतार म्हणजे काय? आणि मी थोडा मेकअप केला तो आईला आवडला नाही तर ती मला पटकन म्हणाली काय अवतार केलायस? ते जरा आरशात बघ…! त्यात फरक काय? .. मी तिला जवळ बसून घेतले आणि सांगितले बाळा मराठी मध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला अनुभवानेच समजून घ्यावे लागते देवाने अवतार घेतला… देव खाली अवतरले… किंवा काय अवतार केलास ग बाई…! अवतार बघायला जाऊया.. तुझ्या त्या अवतारात तू नाटकात छान दिसत होतीस…! इथे म्हणजे शेवटच्या वाक्यात अवतार म्हणजे गेट अप बाकीच्या सगळ्या अवतारांचा पण अर्थ पाहुयात..!

आपल्या धर्मामध्ये मुख्य देव तीन मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश… प्रत्येक देवाचे वेगवेगळे अवतार आहेत विष्णूचे दहा अवतार शिवाचे 11 अवतार मानले जातात याशिवाय आणखीन काही उप अवतार सुद्धा आहेत. आता हे जे मुख्य देव आहेत हे स्वर्गात आहेत मग लोकांच्या कल्याणाकरता त्यांना वेगवेगळे रूप घेऊन चांगला संदेश देण्यासाठी पृथ्वीवर यावे लागते त्यांचा तो जन्म जो असतो तो साधारण माणसांप्रमाणेच असतो आणि त्या जन्मामध्ये ते जे आपल्याला सांगून जातात त्यांच्या वागणूकीतून शिकवणीतून ते आपल्यापुढे काही आदर्श ठेवतात…! देवाने सुद्धा या निसर्गचक्राप्रमाणेच अवतार घेतले. देव एकदम मानवी रूपात आले नाहीत… विष्णूचा पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा कुर्म म्हणजे कासव वराह म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी मग वामन म्हणजे बुटका असलेला माणूस पराक्रमी असलेला परशुराम आदर्श ठेवणारा राम मग शांतता संदेश देणारा बुद्ध किंवा बलराम त्यानंतर कृष्ण आणि पुढे भविष्यात येणारा कल्की असे हे सगळे अवतार आहेत म्हणजे हे सगळे अवतार उत्क्रांतीला धरून आहेत तसेच शिवाचे पण अवतार आहेत शिवाचे अकरा अवतार वीरभद्र पिपलाद नंदी भैरव अश्वत्थामा शरभावतार गृहपती दुर्वास हनुमान ऋषभ आणि यतीनाथ

एका विशिष्ट महिन्यामध्ये पांडुरंगाला हे अवतार केले जातात त्याच्याभोवती तसे डेकोरेशन करतात म्हणजे त्या अवताराला साजेचा देखावा… तुझी आजी लहानपणी ते देखावे म्हणजे आमच्या लहानपणी ते देखावे पाहायला आम्हाला घेऊन जात असे. दहा दिवस असे दशावतार सादर करतात. कोकणामध्ये दशावताराचे नाटकही होते आणि देवाने अवतार घेतला म्हणजे देवाने जन्म घेतला. नाटकातलं तुझा अवतार अगदी बरोबर होता म्हणजे नाटकात तुझा गेटअप अगदी योग्य होता आणि तुझी आई तुला म्हणाली ना काय अवतार करून घेतला आहेस…? म्हणजे तू अतिशय चुकीच्या पद्धतीने नटली होतीस किंवा तुझा मेकअप केला होतास ते अजिबात चांगला दिसत नव्हतं ते म्हणजे तू आहेस त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळीच दिसत होतीस म्हणून तुझी आई तुला म्हणाली काय अवतार केलास तर अशीही अवताराची किमया!

आत्या मराठी खूप अवघड आहे ना? अगं तुम्हाला अवघड वाटणारच कारण तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकता व मराठीतल्या कुठल्याही शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला कळत नाही आणि सगळेच अर्थ शाळेत शिकून येत नसतात ते बोलीभाषेतून वापरून वापरून आपल्याला समजतात मराठी इतकी समृद्ध भाषा आहे त्याच्यामध्ये म्हणी वाक्प्रचार यांचाही समावेश आहे. थोडक्यात आपलं म्हणणं मांडण्यासाठी म्हणी वापरतात उदाहरणार्थ… नाव सोनू बाई हाती कथलाचा वाळा… म्हणजे नाव सोन्याची संबंधित आणि परिस्थिती इतकी गरीब की अत्यंत कमी दर्जाचा असलेला धातू म्हणजे कथिल त्याची बांगडी तिने हातात घातली आहे. इतकी परिस्थिती वाईट पण हे एवढं सगळं सांगत बसण्याच्या ऐवजी एका म्हणी मध्ये ते व्यक्त होते. अग मराठीमध्ये सुंदर काव्य आहे अभंगाच्या सुंदर रचना आहेत ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत तुम्हाला इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना या भाषेचे सौंदर्य किंवा त्याचा आस्वाद घेता येणार नाही हे तुमचे दुर्दैव आहे म्हणून मी तुझ्या आईला सांगत होते मराठी माध्यमात घाल आपल्या भाषेचे सौंदर्य कळाले पाहिजे. इंग्रजी जागतिक बोलीची भाषा आहे 26 अक्षरांची भाषा.. ती येतेच थोड्या प्रयत्नाने पण मराठी बोलल्याने सरावानेच येते अनुभवाने कळते कामाला हातभार लावावा म्हणजे मदत करावी हे अपसुक कळायला लागतं

“ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरीलीया रंगा”

किती सुंदर अर्थ आहे अभंगात की उस जरी वाकडा असला तरी रस गोडच असतो त्याच्या चवीत बदल होत नाही म्हणून वरवरच्या रंगाला कधीही भुलून जाऊ नका वरच्या रूपाला फसू नका असा संदेश देणारे महानकाव्य आपल्या मराठी भाषेत आहे…! जन्मभरीच्या श्वासाइतके मोजले हरिनाम बाई मी विकत घेतला शाम तुम्हाला इंग्रजी माध्यम वाल्यांना काय डोंबल कळणार यातलं म्हणजे ती बाई म्हणते.. ” की प्रत्येक श्वासाला मी परमेश्वराचे नामस्मरण केले आहे जणू काय मी ते नामस्मरणाचे पैसे मोजून परमेश्वराला विकत घेतला आहे तो माझ्याजवळच आहे “हे लिहिणारे माडगूळकर, सुरेश भट.. ” सरणावर जाताना इतकेच मजला कळले मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते”

“टाळ हाती धराया धजेना कुणी लावणी ने हजारो दिवाणे दिले” हे लिहिणारे श्री सुधाकर इनामदार संदीप खरे हे सर्व कवी अत्रे पु ल देशपांडे यांच्यासारखे प्रतिभावंत लेखक त्यांचे अनमोल साहित्य याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. आणि हेच आमचे दुर्दैव आहे या सर्व साहित्यावर मराठी संस्कार आहे भारतीय परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या धर्मातील गीते सारखे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या कथा आहेत रामायण आहे महाभारत आहे… अग तू तर मला परवा चक्क विचारलं हु वॉज राम अँड सीता अगं त्यादिवशी बेशुद्ध पडायची वेळ आली मला थोडंसं समजून घ्या बसा ऐका मराठी शिकून वाचा आम्ही मराठी माध्यमात असून इंग्रजी वाचतो की नाही मग तुम्हाला मराठी यायला काय हरकत आहे. आपल्या मातृभाषेवर प्रेम पाहिजे बाळा आणि ती इतकी समृद्ध असताना तर पाहिजेच पाहिजे असो तुला आता कळलं ना अवताराचा अर्थ? मग तुझ्या इतर मुलांना मित्रांना पण तो सांग म्हणजे तुझा अभ्यास होईल. ती म्हणाली, “आत्या किती माहिती कळाली मला मी नक्कीच माझ्या मित्रांना सांगेन… आय विल शेअर इट… मी कपाळावर हात मारून घेतला… म्हणाले, ” सांग बाई सांग तरी नाही तर शेअर तरी कर…! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खूबसूरती ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ खूबसूरती ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवाची स्तुती / प्रशंसा करतो. मग आपल्या जवळच्या व्यक्तिबददल चार चांगले शब्द बोलायला उशीर का लावतो??? “•••

आज अजय अनिताला श्रीरंग जोशीकडे नाश्त्याला बोलविले होते. श्रीरंग व अजय एकाच कंपनीत काम करतात. दोघे चांगले मित्र आहेत. अनिता आणि श्रेया पण बऱ्याच वेळा भेटल्या होत्या, पण घरी येणजाण तसं तेवढं झालं नव्हतं. मैत्रीत एक पूढचे पाऊल घेऊन श्रीरंगने दोघांना घरी बोलविले आहे. ••• परिवारातील इतर सदस्यांशी ओळख वाढली तर मैत्री वाढते. असा उद्देश असावा. नातेवाईक असतातच. हम उम्र मित्र पण पाहिजेतच. मैत्रीत संकोच नसतो. आरामात बोलता येत. या वयातील काही प्रश्न मित्रांच्या संगतीत सहज सुटतात. काही सल्ले तर मित्रच छान देतात. ••••

म्हणतात ना, •••

“Deep conversations with right people are priceless. “•••

म्हणून मोजकेच पण जीवाभावाचे चांगले मित्र जपायचे असतात. •••

अजय, श्रीरंग दोघेही एकटेच. भाऊ बहिण नाही. म्हणूनही मित्र जास्त जवळचे आणि महत्वाचे. ••••

घरी येताच अनिताच्या लक्षात आलं, की••• श्रीरंग श्रेयाचे घर छान आहे. खूप काही महागडं सामान नसलं, तरी घर व्यवस्थित आहे. घराची सजावट बघता श्रेयाचा व्यवस्थित पणा, स्वच्छता, एकंदर तिची कलात्मकता लक्षात येते. नवीन आधुनिक विचारांनुसार घरातील ‘Vibes’ छान प्रसन्न positive आहेत. •••

” It seems she is a good home maker. ” •••

 पंजाबी ड्रेस मध्ये श्रेया छान दिसत होती. दोघांनी अजय अनिताचे मनःपूर्वक स्वागत केले. ••••

Wow!! अरे व्वा!!! मस्तच!!! असं सहज कोणीही घर बघून म्हणेल. अनिताचे पण असेच ‘impression ‘ झाले. तिनेही हे सर्व म्हंटलेच. फक्त *मनातल्या मनात*. •••

नाश्ता पण छान होता. एक तर काळ वेळ, वयानुसार मेन्यू ठरविणे महत्वाचे असतेच. नंतर पदार्थांचे ‘Presentation ‘ सजावट हे ही महत्वाचे. त्यामुळे पदार्थांची value वाढते. ते जास्त ‘ tempting ‘ दिसतात, बघताच खावेसे वाटतात. बरे असो, ••••

आलू पराठे बरोबर दही, घरचे लोणी चटणी, सॉस तर होताच. बरोबर ढोकळा, सॅन्डविच, एका बाउल मध्ये फळ चिरून ठेवली होती. केशर घालून केलेला शीरा होता. नंतर कोल्ड कॉफी किंवा चहा कॉफी चे option होतेच. •••

एकंदर सर्व व्यवस्थित, systematic होत. पदार्थ छान चविष्ट झाले होते.. कुठेही गडबड गोंधळ नव्हता. अजय अगदी खुशीत होता. त्याने दादही दिली. श्रीरंग श्रेया दोघांचे’ coordination छान होते. •••

घरी परत आल्यावर अनिता आईंना सर्व सांगत होती. कौतुक ही करत होती. श्रेयाने दिलेलं गिफ्ट आईंना दाखवून म्हणाली, ••• आई!! श्रेया कडून खूप शिकण्यासारखे आहे. मला आवडली ती. •••

अजय हसला आणि म्हणाला, ••• अग!!! पण तेथे तू याबद्दल काहीच बोलली नाही. एकदाही एकाही गोष्टीची, पदार्थांचे कौतुक केले नाही. ••••

अनिता म्हणाली, ••• मला नाही करता येत तुझ्या सारख. •••

आई म्हणाल्या, ••• अग!! अनिता कौतुक करावे. आपल्या मनातले बोलून दाखवले नाही तर समोरच्या ला कसं कळेल??

अग!! आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पुजा, प्रशंसा, स्तुतीच तर करतो ना. मग एखाद्या व्यक्तिबददल चार चांगले शब्द बोलायला उशीर का करतो?? •••

फक्त ” प्रशंसा योग्य वेळी योग्य तेवढी करणे गरजेचे असते. “कौतुकाचे दोन शब्द आपल्यातील मैत्रीचे नातं घट्ट करतात. समोरच्या लाही प्रोत्साहन मिळत. त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. ••••

” बोलायचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे ना, मग बोलावं. ” ••••

अग!! तुला ही एक चांगली मैत्रीण मिळेल. तुम्ही सर्व एकाच वयाचे तर आहात. •••

इतक्यातच नवरात्रात आपल्या घरी भजन झाले. तू म्हंटलेल्या भजनाचे सर्वांनी कौतुक केले. तेंव्हा मला तर खूप आनंद झाला. माझी कॉलर वर झाली. तुलाही नक्कीच चांगल वाटले असेल. ••••

आई पूढे म्हणाल्या, •••• अग!! अनिता. दाद द्यावी. कधी बोलून‌ कधी पाठीवर हात ठेवून. समोरच्या ला तर चांगल वाटतच, आपल्याला ही आनंद मिळतो. उगीच गैरसमज होत नाही. ••••

काही हरकत नाही. आज श्रेया ला फोन कर. धन्यवाद म्हण, तेंव्हा च थोडं कौतुकही कर. ••••

आपल्या स्वभावात थोडा सकारात्मक बदल करत रहावा. आपलंच व्यक्तिमत्त्व खुलत, बहरत. आपलं स्वतःचेच Standard वाढत. ••••

जिममध्ये शारीरिक आरोग्याची आपण काळजी घैतो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं पण आवश्यक आहे. त्याकरिता आपले विचार, वागणं, संगत सर्वच महत्वाचे. त्याकरिता आपण काही सूत्र पाळावी. स्वतः चे काही नियम तयार करावेत. वेळोवेळी त्यात भर घालावी. •••

देवाने आपल्याला जे आयुष्य दिले आहे, त्याला हीऱ्यासारख चमकवायची पूढची जबाबदारी आपलीच असते. त्यासाठी साधा सरळ सोपा उपाय म्हणजे लहान सहान चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या. स्वतःचे परिक्षण करत रहायचे व बदलायच. ••••

अनिताला आईंचे म्हणणे पटले. •••

आई म्हणाल्या, ••••

“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा. कोणी तरी तुम्हालाच शोधत येईल.” •••

म्हणतात ना •••

खूबसूरती इस में नहीं है कि हम कैसे दिखते है, बल्की खूबसूरती इसमें हैं कि औरों के प्रति हम कैसा व्यवहार करतें हैं।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बातमीचा समाचार! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

🎤 बातमीचा समाचार! 📺 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादनानंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक-एक मिनिटांचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे. तसेच, संध्याकाळी सात वाजता,

“नमस्कार, आकाशवाणीच हे मुंबई केंद्र आहे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक बातम्या… ”

वाचकहो, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टीपासून बंगल्या बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली. त्याकाळी रेडियो घरात असणं हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं. सगळ्या मध्यमावर्गी्यांना त्याकाळी परवडण्यासारखी ती गोष्ट नव्हतीच मुळी. आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना आपल्याला यावी! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख पुढे मागे लिहायचा माझा विचार आहे. आता आजचा लेखाचा विषय “बातमीचा समाचार” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून ही ताजी बातमी आपल्याला दिली. असो!

माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य हिंदमाता टॉकीजजवळच्या नायगावच्या ८ बिल्डिंगच्या अहमद सेलर चाळीच्या संकुलात गेलं. त्यावेळी आमच्या चाळीतलं चालत बोलत “वर्तमानपत्र” होतं ते जोशी काकूंच. जोशी काकूंची खोली जिन्याजवळ, त्यामुळे जिन्यावर नुसता पावलांचा आवाज यायचा अवकाश, काकू लगेच बाहेर येऊन आलेल्या गेलेल्याची त्याच्याशी ओळख असुदे अथवा नसूदे, सखोल चौकशी केल्याशिवाय सुटका करीत नसत! आणि मग दुपारी चाळीच महिला मंडळ आपापल्या घरचं धान्य निवडण्याच, भाजी निवडण्याचं काम किंवा शिवणकाम घेऊन चौकात एकत्र जमल्या की मग त्यांच्यासाठी जोशी काकूंच बातमीपत्र सुरु होई.

वाचकहो त्यावेळच्या जोशी काकूंच्या बातमीपत्रास ‘वावडी’ म्हणतात हे थोडं मोठं झाल्यावर मला कळायला लागलं. तसे

‘वावडी’ या शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत, जे संदर्भाप्रमाणे बदलतात. मुख्य अर्थ म्हणजे ‘खोटी बातमी’ किंवा अफवा, अवई, कंडी, हूल, वदंता इत्यादी इत्यादी. थोडक्यात कुठल्याही बातमीची खरी खोटी शहानिशा न करता, ती बातमी जगजाहीर करून स्वतः फुशारकी मारणे.

पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जायचे, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली बरं कां! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती. एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे! त्या योगे तमाम जनतेला राजाच्या नवीन हुकुमाची माहिती होई. तसंच काही काही राजांनी त्याकाळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठीतरी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच आपल्या वाचनात आलं असेलच. आणि ते वाचलेलं आठवत नसेल तर, “कबुतर जां, जां, जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच लक्षात येईल! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा! असो!

काही आफ्रीकन देशातले लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत. नंतर त्याच काळात “रनर”ची परंपरा सुरु झाली. रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे. मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे!

मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला. मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते, जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले. ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते.

बातमी हा विषय असल्यामुळे “केसरी”, “नवाकाळ” आणि “मराठा” या एकेकाळी गजलेल्या तीन वर्तमानपत्रांविषयी लिहिल्या शिवाय हा लेख पूर्ण झाल्यासारखं निदान मला तरी वाटणार नाही. या पैकी “केसरी” हे वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी ४ जानेवारी १८८१ रोजी पुणे येथे सुरू केले होते, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख मुखपत्र बनले, हे आपण जाणताच. हे वृत्तपत्र सुरवातीला विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने सुरू झाले आणि मराठी भाषेतून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी वापरले गेले. “केसरी” संबधीचा बाकी इतिहास सर्वश्रुत आहेच.

मार्च १९२३ मध्ये खाडिलकरांनी स्वतःचे “नवकाळ” हे वृत्तपत्र सुरू केले, जे गांधींच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत होते आणि त्यातील संपादकीय गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत होते.

आचार्य अत्रे यांनी “नवयुग” (साप्ताहिक) आणि “मराठा” (दैनिक) ही दोन प्रमुख वृत्तपत्रे सुरू केली होती, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्यांनी ‘जयहिंद’ आणि ‘तुकाराम’ ही वृत्तपत्रेही चालवली होती, पण ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली वृत्तपत्रे होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

हल्ली पूर्वी सारखी निर्भीड पत्रकारिता आणि त्या अनुषंगाने निष्पक्षपणे बातम्या देणं हे कधीच काळाच्या आड गेलं आहे. त्यामुळे सध्याच्या कुठल्याही वृतपत्रांबद्दल बोलायचं झालं तर त्या त्या वर्तमानपत्राचा “मालक, चालक” किंवा त्याची मालकी असलेली कंपनी यांच्या धोरणानुसार वर्तमानपत्र चालवलं जात, त्यातील बातम्या छापल्या जातात हे त्रिवार सत्य आपण सारेच जाणतो. आणि आता तर “पीत पत्रकारिता” हा नवीनच प्रकार उदयास आला आहे, त्या विषयी न बोललेच बरं!

आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली. स्वतः मालक, चालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वल्लास या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे. सध्याच्या पत्रकारितेतली “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्याकाळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे, म्हणून त्या कादंबरीचा उल्लेख केला इतकंच.

पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव-नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली. उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या स्वतःच्या ख्याली खुशालीची बातमी, अथवा एखादी दुःखद बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येऊ लागली. पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०) पोस्ट कार्ड आणि अंतर्देशीय पत्र या दोघांचा वापर कमी कमी होत गेला. अर्थात या “तारेच्या” सुद्धा अनेक गमती जमती आपण या आधी ऐकल्याच असतील. त्यानंतर मग टेलिफोनचा शोध लागल्यावर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली!

नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या “एकाच चॅनेलवर” वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि आजकाल इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या! या बाबतीत जास्त न बोललेच बरं आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने साऱ्या दुनियेतले सगळे लोकं अख्ख जगच आपापल्या खिशात घेऊनच वावरत असतात म्हणा नां! त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला आसलो तरी बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो!

पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते. जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला! आता तर मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍपस अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्यासारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या कडून वाईट कामच लोकं जास्त करून घेवू लागलेत हे खरंच दुर्दैवी आहे. आणि आता आणखी एक पाऊल पुढे पडल्यामुळे सध्याच्या AI नामक जादूगारमुळे काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करून मोकळे होतात! बरं अशी बातमी बघितल्या बघितल्या त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता ती बातमी काही लोकं आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय?

मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही, अगदी माझ्याकडून देखील कळली, तरी ती पुढे ढकलतांना कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला, अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती!

मंडळी याच बरोबर माझं आजच “बातमीचा समाचार” हे बातमीपत्र संपलं! हे बातमीपत्र आपल्याला आवडल्यास कृपया आपण ते पुढे पाठवायला माझी हरकत असण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे ते आपण निर्धास्तपणे पुढे पाठवू शकता!

आपल्याला कळलेल्या कुठल्याही बातमीचा आपण योग्य समाचार घ्यावा अशी आपल्या पुन्हा एकदा विनंती करतो आणि आजच्या पुरती आपली रजा घेतो!

शुभं भवतु!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अनुभवाचे लेणं…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “अनुभवाचे लेणं…” ☆ सुश्री शीला पतकी 

‘अनुभवाचे लेणं’ हे एका पुस्तकाला दिलेल नाव वाचलं. त्यावर एकांची प्रतिक्रिया होती की लेणं म्हणजे महिलेसाठी असलेले सुंदर सुंदर आलंकार… अनुभव हे जणू अलंकारच आहेत! आपण स्रिया, असलेले अलंकार तर आपण घालतोच पण त्याशिवाय बहिणीचे, मावशीचे, आईचे, सासूबाईंचे, वेगळपण दाखवणारे अलंकारही अंगावर चढवतो आणि आपल सौंदर्य खुलवतो… अनुभवाचे सुद्धा तसच आहे… सगळे अनुभव आपलेच असावे लागतात असं नाही. आपल्यात एक म्हण आहे “पुढच्याच ठेच मागचा शहाणा “म्हणजे इतरांच्या अनुभवावरून आपण काही शिकत असतो… मागच्या पिढीचे अनुभव हे पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळत असतात… आता त्यातून त्यांनी शहाण व्हायचे का नाही ते ठरवायचं असतं.. पण हे अनुभव नक्कीच कामी येतात.

आता या अनुभवांना स्वयंपाक घरात टिप्स म्हणतात… उदाहरणार्थ भाजीला मीठ जास्त झालं की बटाटा घाल असं आईने आपल्याला कितीदा तरी सांगितलेलं असतं आणि ती युक्ती आपल्याला कामी येते तो तिचा अनुभव असतो. जीवनात अशा कितीतरी टप्प्यावर अशा अनुभवांचा आपल्याला फायदा होतो. प्रत्येक अनुभव आपणच घेतला पाहिजे असं नसतं. लहान मुलाला सुद्धा आपण गरम असलेला तवा पोळतो हे सांगतो कधीतरी त्याला चुकून बिचाऱ्याला पोळलेले ही असेल आणि त्यावरून ते शहाणं होतं आणि गार तवा सुद्धा ते मुल ऍक्शन करून सांगतो हा sssआहे… पोळतं…!

इथूनच अनुभव शिकायला सुरुवात होते. मग आपण आपल्या जीवनात अनुभव घेत राहतो. अनुभव हा वसा एकाने दुसऱ्याला द्यायचा. दुसऱ्याने तो टाकायचा का सांभाळायचं हे त्यांनीच ठरवायचे… माझ्या व्यवसायातला किस्सा आहे मी मुख्याध्यापक असताना एका शिक्षकाच्या वर्गावर लेसन पाहायला गेले त्यांनी गणित वगैरे सोडवलं आणि एके ठिकाणी लिहले ए छेद बी a/b जिथे बी बरोबर नाही शून्य आणि ते पुढे गणित सोडवत गेले एका मुलीने त्यांना विचारले b बरोबर नाही शून्य म्हणजे काय ते म्हणाले ते तसंच असतं नियम आहे… तो लेसन संपल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये त्यांना सांगितलं सर ए छेद बी अपूर्णांक संख्या आहे त्याचा अर्थ काय असतो ए अंशात आहे बी छेदात आहे समजाA 4 आहे आणि b5 आहे म्हणजे4/5 याचा अर्थ काय असतो तर एका वस्तूचे पाच भाग केले चार भाग घेतले पण त्या ऐवजी4/0 असे असेल तर त्याचा अर्थ शून्य भाग केले आणि चार भाग घेतले. मग त्याचे भाग केलेच नाही त्याचे भाग घेणार कुठून? यासाठी हे बी बरोबर नाही शून्य असे लिहितात त्यांनी मान डोलावली ते म्हणाले मी असेच गृहीत धरून चाललो होतो बर झाला एक नवीन गोष्ट तुमच्याकडून शिकलो.

कदाचित आम्हीही चुकलो असू पण अनुभवानी शिकलो आणि ते अनुभवाने समृद्ध झाले एक गोष्ट ते नव्याने शिकले हे असे आपण सगळ्याच गोष्टींमध्ये शिकत राहतो आणि मग या अनुभवांचं लेणं होतं आपल्याजवळ.. आपलं सौंदर्य परिपक्व होऊन खुलत राहत! आपण आपल्या आई आजीचे जुने अलंकार त्याला ओल्ड फॅशन म्हणत नाही तर त्याला अलीकडे अँटिक म्हटलं जात त्याचं मूल्य अधिक वाढला आहे तसंच आपल्या आई आजी यांच्या अनुभवाचे मोल आहे ते खरोखरच अमूल्य आहेत. “आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक “ही आपली जुनी कविता मला आठवते. त्या कवितेतली ती आजी किती अचूक वेळा सांगत असते. कुठलंही घड्याळ तिच्याजवळ नसतं पण अनुभवाने ते घड्याळ तीने आत्मसात केलेले असते. कवी घड्याळ हुडकण्यासाठी तिची सगळी गाठोड हुडकतो पण त्याला घड्याळ सापडत नाही. फार सुंदर कविता होती. हे अनुभवाच्या गाठोड्यातलं तिचं घड्याळ किंवा आपल्या आई आजीचे अनुभवाचे ही गाठोडे ही फार मौलिक ठेव आहे.

पक्षी झाडाच्या कुठल्या भागावर घरटी करतो त्यावर यंदा पाऊस किती पडणार हे अनुभवाने सांगणारी मंडळी नेहमीच बरोबर ठरतात. याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. अनुभव आहे हा. हवामान खात्याचे अंदाज वगैरे सुरू झालं पण पूर्वी अनुभवी माणसांच्या सांगण्यानुसार शेती होत होती.

मुंबईमध्ये घडलेला हा किस्सा आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे एक बाई म्हणाली मी सगळे दागिने घालून प्रवास करते बघू कसे चोरतात… तिने सगळे खोटे दागिने घातले होते पण ते अगदी खरे वाटणारे होते ती मुंबईतून प्रवास करून लोकल मधून वगैरे आली आणि म्हणाली बघा काही झालं नाही कोणी माझ्या अंगाला हात लावला नाही की चोरीच्या उद्देशाने कुणी मला काही केलं नाही. त्यावर त्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाई जरा गळ्यावर बघ हातावर बघ तुझे सगळे दागिने तपासून घेतलेले आहेत खुणा आहेत आणि खरोखरच तिच्या मानेवर हातावर किंचित सूक्ष्म ओरखडे होते ते दागिने खोटे आहे ते चोराने तपासून घेतले होते हे ज्या माणसाने सांगितले तो अट्टल चोर होता आणि ते त्याच्या अनुभवाचे बोल होते.

हा किस्सा विनोदी असला तरी खरा आहे. प्रत्येक धंद्यात अनुभव गुरु असतोच ना.. खानावळीतला तुपाचा चमचा कधीही खोलगट नसतो किंवा मग खोलगट चमच्याला मारून मारून तो सपाट केलेला असतो कारण तो नुसता बुडवायचा आणि धरायचा, जास्त तूप पडता कामा नये हे ती मंडळी अनुभवाने शिकली. एका लग्नात व्याही मंडळी लाडूसकट सर्व गरम स्वयंपाक पाहिजे म्हणून अडून बसली. आचारी म्हणाले.. ‘काळजी करू नका ‘.. सगळा स्वयंपाक त्यांनी गरम केलाच होता. त्यानी मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले त्याच्यावर एक मोठा झारा टाकला, त्या झाऱ्यावर एक कापड ठेवले आणि त्या कापडावर दोन दिवसांपूर्वी केलेले लाडू बुंदीचे ठेवून दिले आणि एक पाच मिनिट त्याला वाफ दिली. ते त्यांनी काढले आणि दोन बायकांना ते नुसते दाबून वळायला बसवले. लाडू सकट गरम जेवण सर्वांना दिले. हा त्याच्या अनुभवाचा भाग होता आणि त्यावर लग्नातला संघर्ष टाळला.

अनुभव हा ज्येष्ठ गुरु आहे हेच खरे.. म्हणून वयस्कर माणसांच्या आपण पायावर डोके ठेवतो त्यावेळेला त्याच्या शिक्षणाचा विचार केला जात नाही, त्याच्या अनुभवाचा विचार केला जातो… 

– – म्हणून अनुभव घ्या.. अनुभव सांगा.. अनुभव वाटा.. आणि अधिकाधिक अनुभव गोळा करून समृद्ध व्हा…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कानगोष्ट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “कानगोष्ट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत ” कानगोष्ट ” हा खेळ प्राची फडकेने घेतला. दोन गट केले होते. लाईन मध्ये उभ्या राहीलो. प्रत्येक ओळीत पंधरा जणी होत्या.

पहिलीच्या कानात प्राचीनी एक वाक्य सांगितले. ते तिनी शेजारचीच्या कानात सांगायचे. असं करतं करतं… शेवटपर्यंत एकमेकींना ते वाक्य सांगायचे. असा तो खेळ सुरू झाला.

जी शेवटी उभी असेल तिने पुढे येऊन ते वाक्य सांगायचे. एकीकडून दुसरीकडे जातं जातं त्या मूळ वाक्याचे निराळेच वाक्य तयार झाले होते.

लहानपणी हा खेळ खेळताना पण असेच व्हायचे. आणि खूप हसू यायचे. तसेच आजही झाले. सगळ्याजणी हसत सुटल्या.

मैत्रेयी ताईंनी समजाऊन सांगितले,

” समजा तुम्हाला एखादा संदेश किंवा मेसेज दिलेला असेल.. तर तो जसाच्या तसा दुसऱ्या पर्यंत पोचवायचा. आणि तो तसाच दिला जावा ही जबाबदारी तुमची आहे. या खेळाचा असा अर्थ आहे.”

आज आमच्या खेळातले वाक्य असे होते…

” कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्तीदायक उत्पादने श्रीखंड आम्रखंड बासुंदी तूप.. “

शेवटी जी ऊभी होती तिने वाक्य ऐकले… आणि पुढे येऊन सांगितले ते होते..

” कोल्हापूरच्या डेअरीची उत्तम उत्पादने श्रीखंड आणि बासुंदी “

हे जाहिरातीतले एका कंपनीचे वाक्य होते. त्यातील त्यांचा स्फूर्तीदायक हा महत्त्वाचा शब्द होता तोच गायब झालेला होता. तसेच त्यांच्या उत्पादनाच्या यादीतील शब्दही कमी झाले होते. त्यामुळे त्यांचा जाहिरातीचा उद्देश सफल होणार नव्हता.

अर्थात हा आमचा खेळच होता… त्यामुळे प्रश्न नव्हता.

हे उदाहरण सांगण्याचे तात्पर्य तुमच्या लक्षात आले असेलच.

एकीकडून दुसरीकडे जाताना शब्दांची मोडतोड होते. भरीसभर म्हणजे नकळत… दुसरे शब्द त्यात घातले जातात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

मतितार्थ काय तर…

एखाद्याने आपल्या कानावर काही घातले तर त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. त्याची शहानिशा करायची. चार जणांना विचारून खात्री करून घ्यायची.

लहानपणी खेळताना हसून सोडून देत होतो. ती नुसती गंमत होती…

पण रोजच्या जीवनात वावरताना सत्य काय आहे…

 हे पडताळणी करून तपासून बघायचे. नाही तर आपण फसवले जाऊ शकतो. या बाबतीत सागधगिरी बाळगायला हवी आहे.

अनेक संस्थात बिहेव्हियरल सायन्सच्या (बी एस) ट्रेनिंग मध्ये हा खेळ एक्झरसाइज म्हणून घेतला जातो.

यावरून आपल्या” कानगोष्टी “या पारंपारिक खेळाचे किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या.

व्यवहारातही एखादा आपल्याला सावध करण्यासाठी म्हणतो,

” बघ बाबा माझ्या तर हे कानावर आलेले आहे. म्हणून तुझ्या कानावर घालून ठेवले आहे. “

 म्हणजे पुढे काय करायचे ते तुझे तू बघून घे.

 अशावेळी शांतपणे विचार करायचा. लगेच निर्णय घ्यायचा नाही. कारण खेळातल्या कानगोष्टी सारखी ती गोष्ट बदल होऊन त्याच्यापर्यंत आलेली असू शकते.

म्हणून पुढची कृती विचारपूर्वक करायची.

कोणी काही सांगितले की ताबडतोब व्यक्त व्हायची, मतं, प्रतिक्रिया द्यायची आपली सवय असते.

काही वेळेस आपण घाईघाईत लगेच त्यावर काहीतरी कृती पण करून बसतो. त्याचे दूरगामी घातक परिणाम होऊ शकतात.

खरंतर ही अगदी छोटी गोष्ट वाटेल… पण यातूनच शिकायला मिळते.

योग्य तऱ्हेने वागण्याचे भान येते सकस विचार मनात रूजतात.. हळूहळू शहाणपण येत जाते..

नाहीतरी आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो…

हे लिहिताना शाखेतील गीत आठवले.

” मंत्र छोटा रीत नई आसान हमने पायी है 

छोटे छोटे संस्कारोंसे से बात बडी बन जाती है”

यातील दुसरं कडवं असं आहे

” शाखा में हम ऐसे खेले जिससे प्रेम उमडता हो

कुछ बौद्धिक हो गीत गान हो धर्म ग्यानकी चर्चा हो

भगवा ध्वज हो नित्य सामने त्याग भावना पलती है”

किती सुरेख शिकवण आहे ना…

शाखेत सर्वांची चांगली ओळख झालेली आहे.. आता आपण सगळ्याजणी मैत्रिणी झाल्या आहोत. एकमेकींबद्दल आत्मीयता प्रेम निर्माण झालेले आहे.

– – खेळ खेळता खेळता अशा अनेक गोष्टी शिकत राहू. त्यातूनच आपल्यावर चांगले संस्कार होत राहतील.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares