मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूजा आणि वास्तुशांती…!!! – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पूजा आणि वास्तुशांती… !!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(नदी किंवा समुद्राला जाऊन मिळावे इतकी आमची ताकद नाही, नाल्यांपर्यंत वाहत जाऊन गटाराचे पाणी म्हणून नाल्यामध्ये बेमालूम मिसळून जायचं… किंवा डबकं होऊन तिथेच बसायचं…. !) 

इथून पुढे —

पाणी म्हणजे जीवन म्हणतात, आमच्या कणाकणात ते जीवन आहे, परंतु आम्ही ते ना स्वतःसाठी वापरू शकत, ना दुसऱ्यासाठी…. ! किती ही अगतिकता… सांगू तरी कोणाला ??? 

माझ्या या लोकांना घर मिळावे, यासाठी मी अनेक झोपडपट्टी आणि चाळींमध्ये फिरलो….

झोपडपट्टी किंवा चाळी मधल्या एका छोट्या खोलीचे डिपॉझिट चाळीस हजार रुपये आणि भाडे पंधरा ते वीस हजार रुपये दर महिना….. माझ्यासारख्या माणसाला कसे परवडेल ? 

कमीत कमी भाड्याने, माझ्या माणसांना घर मिळावे यासाठी नाही नाही त्या लोकांच्या पाया पडलो, हात जोडले…

आमच्या लोकांना घर देता का घर…. ? 

ज्यांच्याकडे एकाच झोपडपट्टीत किंवा एका चाळीत पंधरा-वीस खोल्या आहेत आणि ज्यांचा खोल्या भाड्याने देणे हाच व्यवसाय आहे, अशा अनेकांना मी जाऊन भेटलो, पाया पडलो…

मी काय काम करतो ते सांगितलं…. आणि एखादी खोली जरा कमी पैशात भाड्याने द्यावी अशी विनंती केली.

…. त्यापैकी एक जण गुटख्याची पिंक शेजारच्या गटारात टाकत, उजव्या खांद्यावरच्या शर्टाच्या बाहीला तोंड पुसत म्हणाले, ‘तुमी काम चांगलं करताय भाऊ, पण आमच्या पोटावर पाय देऊन, तुमी समाज शेवा करणार… तुमाला तरी पटतंय का भाऊ… ? 

‘नाही पटत भाऊ’, म्हणत तोंडात मारल्यागत तिथून परत येतो….

 जशी जमेल तशी भटकंती पुन्हा सुरूच… माझी ही भटकंती कुणाकडे तरी पोच झाली असावी…

जशी चालणारी पाऊले पंढरीला पोहोच होतात… ! 

– – सेंटरच्या जवळच एक रूम आहे, त्याला अटॅचड टॉयलेट बाथरूम आहे अशी माहिती मिळाली, मी रूम पाहायला गेलो, रूम चांगली होती.

‘भाडं डिपॉझिट किती असेल ?’ मी चाचरत विचारलं.

 ‘ज्यांची खोली आहे त्या मॅडम मुंबईला असतात’

‘त्यांचा नंबर मिळेल का ?’

– – मी फोन लावला…. दोन अदृश्यतारा…. संवाद पोहोचवणार होत्या किंवा बिघडवणार होत्या.

फोन उचलण्याआधी वाजणारी रिंग हृदयाची धडधड वाढवित होती… भाडं – डिपॉझिट किती असेल? रूम आपल्याला मिळेल का ? आपल्याला परवडेल का ? पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही अशांना इथे घरात राहायची परमिशन मिळेल का ? रिंग वाजण्याच्या इतक्या कमी वेळात शेकडो प्रश्न डोक्यात उभे राहून गेले.

काही वेळाने हॅलो असा एका ताईंचा आवाज आला, मी थरथरत्या आवाज आणि हाताने म्हणालो, ‘आम्ही तुमची रूम पाहिली आहे, आवडली आहे, भाडं आणि डिपॉझिट किती असेल ? ‘

…. बोलण्यासाठी त्यांनी उसंत घेतली, तोपर्यंत माझ्या छातीची धडधड आणखी वाढली होती. मला जे वाटत होतं तेच झालं…. भाडं आणि डिपॉझिट माझ्या आवाक्याबाहेर होतं. मी कमी करण्याची मनापासून विनंती केली…

ताई म्हणाल्या ‘ भाडं, लाईट बिल, मेंटेनन्स आम्हालाही परवडत नाही हो… तुम्ही सुद्धा थोडा विचार करा ना ‘ 

…. यानंतर, मी त्यांना काय काम करतो ते सांगितलं, माझ्या लोकांची अवस्था, हाल आणि परिस्थिती सांगितली. घर मिळवण्यासाठी किती लोकांकडे फिरलो, प्रत्येकाने ढोलकी वर देतात तशा थपडा मारल्या, या थपडा मी खायला अजूनही तयार आहे, परंतु जर त्यातून मधुर नाद निर्माणच होणार नसेल तर त्या थापडांचा तरी उपयोग काय ? बोलताना माझे हात आपोआप जुळले गेले डोळ्यात पाणी भरलं… ! 

मी आणखीही पुढे बोलत राहिलो….

…. मध्येच त्या अत्यंत मृदू आवाजात मला म्हणाल्या, ‘ डॉक्टर मला समजलं आहे सर्व, 10, 000 रुपये डिपॉझिट आणि 4500 प्रति महिना भाडं इतकं मी तुमच्यासाठी करू शकते, यापेक्षा जास्त काही करणं मला शक्य नाही. ‘ 

‘इतकं डिपॉझिट आणि दर महिन्याचं भाडं…. जमेल का मला ? जमेल पण थोडी ओढाताण होणार…. ‘

मी मनात बोलत होतो ! 

 

– – रद्दीत पडलेले कागद व्यवस्थित लावायचे असतील, त्यांना एकगठ्ठा ठेवायचं असेल, तर रबराचीच आवश्यकता असते, रबराचा जन्मच मुळी ओढण्यासाठी आणि ताणण्यासाठी झालेला असतो.

माझी जर थोडी ओढाताण होणार असेल, परंतु यांच्या आयुष्यात सुखाचा गारवा निर्माण होणार असेल, हे लोक रस्ता सोडून एकगठ्ठा आनंदाने सन्मानाने जगणार असतील, तर ही ओढाताण मला मंजूर आहे…. यांच्यासाठी रबर होणं मला मंजूर आहे…. मला मंजूर आहे…. ! 

‘ ताई आपण सांगितलेले सर्व मला मंजूर आहे… ! ‘..

येत्या आठवड्यात फॉर्मॅलिटीज पूर्ण करून एक ऑक्टोबर 2025 रोजी घर आमच्या ताब्यात मिळणार आहे. म्हणून मी खुश आहे…. प्रचंड खुश आहे…. ! 

.. आमचे लोक आता पावसात भिजणार नाहीत, म्हणून मी खुश आहे…

.. आमचे लोक आता कोसळणारा पाऊस स्वतःच्या खिडकीतून पाहतील, म्हणून मी खुश आहे…

.. रस्त्यावरून त्यांना आता कोणीही उठवणार नाही, ध्रुव बाळासारखे त्यांना स्वतःचे स्थान मिळाले आहे, म्हणून मी खुश आहे…

आपल्याला रूम मिळाली हे सांगण्यासाठी मी धावत पळत सेंटरवर गेलो, त्या सर्वांना ही बातमी सांगितली…. मला वाटलं ते जल्लोष करतील…. पण नाही कोणाच्याही तोंडून इच्छा असताना सुद्धा शब्द फुटत नव्हते…. डोळ्यातल्या पाण्याने मनातली अक्षरं कदाचित धूसर झाली असावीत…

कोणीही काहीही बोलेना… ! 

बरोबर आहे शब्द थिजतात आणि अक्षरं धूसर होतात त्याचवेळी मौनाला अर्थ प्राप्त होतो… ! 

त्यांच्या मौनातून मला समजलं, रूम मिळाली या आनंदापेक्षा, नव्याने पडलेला आर्थिक बोजा तुम्ही कसे उचलणार हि विवंचना त्यांना सतावत होती… ! 

‘ डाक्टर नुसतं भाडं, डिपॉजीट भरलं म्हनजे झालं असं न्हायी, आवो चार-पाच लोकांचे संसार मांडून द्यायचे हायेत, चादरी, गाद्या, उश्या, गॅस, पानी, पंखा अजून बी काय बाय लागणार….. एवडा खर्च आमच्यामुळे तुमच्या अंगावर पडनार आहे…. ‘ त्या पाच जणातील एक वयस्कर गृहस्थ काळजीपोटी बोलले.

डॉक्टर वर आपण आणखी ओझं लादत आहोत याचा त्यांना गिल्ट होता…

मी म्हटलं, ‘ मामा आईबाप जेव्हा मुलाच्या सुखासाठी काहीतरी करत असतात किंवा मुलं आई बापाच्या सुखासाठी काही करत असतात तेव्हा तो खर्च नसतो…. ती बचत असते… ! बाबांनो इथपर्यंत घेऊन आलो आहे, पुढे पण पोहोचवणं ही माझीच जबाबदारी आहे… जबरदस्तीने पाठीवर बोजा लादला जातो, ते “ओझं”.. पण कोणाचा तरी भार आनंदाने डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे “जबाबदारी”… ! तुम्ही माझ्यासाठी ओझं नाही, तुम्ही माझी जबाबदारी आहात…. ! ‘ 

पुन्हा तशीच शांतता… तेच मौन…

खाली बसून कोणी नख कुर्तडत होतं, कुणी हाताच्या बोटाने जमिनीवर उगीचच रेघोट्या मारत होतं…

बाहेर जोरदार पाऊस कोसळतच होता, मी मग सर्वांचे हात ओढून त्यांना भर पावसात घेऊन आलो, हूडहुडी भरेपर्यंत, भिजलो नाचलो…. प्रत्येकाच्या कानात ओरडून सांगत होतो, आज भरपूर भिजून घ्या, आपल्याला भिजवणारा – रडवणारा हा शेवटचा पाऊस… आज शेवटचं भिजून घ्या… इथून पुढे येणारा प्रत्येक पाऊस, आपल्या आयुष्यात श्रावण घेऊन येणार आहे, मनात हर्ष आणि आयुष्यात हिरवळ घेऊन येणार आहे…. आज शेवटचं भिजून घ्या… !!!

आयेगा सावन झुमके….. ! 

येताना मी त्यांच्या डोळ्यातलं पाणी तीर्थ म्हणून घेऊन आलो….

माझ्या आनंदाचा खडीसाखरेचा एक मोठा तुकडा मी त्यांच्या हातावर ठेवून आलो…

झाली इथेच झाली आमची पूजा आणि वास्तुशांती सुद्धा… ! 

मध्येच पावसाचा जोरही खरंच वाढला…

…. हा पाऊस आभाळातून होता की डोळ्यातून ? 

…. हे मात्र समजलं नाही… !

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धर्म ज्याचा त्याचा – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “धर्म ज्याचा त्याचा – –” ☆ सुश्री शीला पतकी 

धर्म हा खरं तर इतका मोठा विषय आहे त्याच्यावर किती जणांनी तरी मोठे मोठे विचार मांडून ठेवलेले आहेत.. आपण काय बोलणार ? फक्त सहज विचार आला, अनेक वाचलेले आठवले, म्हणून हा विचार…

आपल्या घरामध्ये अनेक खोल्या असतात… म्हणजे झोपायची खोली, स्वयंपाकाची खोली, धान्याची खोली, आणि इतर अन्य खोल्या.. पण तशी एखादी हवेची खोली असं असत नाही, कारण प्रत्येक खोलीत हवा असतेच.. तसा धर्म सुद्धा वेगळा करता येत नाही. तो व्यवहारातही असतो, प्रत्येक व्यवहारात असतो.

 मातृधर्म पितृधर्म, पुत्रधर्म, शेजारधर्म, आचार्य किंवा अध्यापक धर्म, .. ज्यामध्ये उत्तम आचरणाचेच मार्ग सांगितलेले असतात.

– – उदाहरणार्थ मुलाने आपल्या मात्यापित्यासंबंधात, कुटुंब संबंधात कसे वागले पाहिजे, कशा जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, आई-वडिलांना कसे सांभाळले पाहिजे, आणि हे सगळं त्याने आयुष्यात व्यवस्थित केलं की त्याचा पुत्र असण्याचा धर्म त्यांनी पाळला.

– – शेजार धर्म… शेजाऱ्यांना गरजेप्रमाणे वेळोवेळी ते आपले नातलगच आहेत असे समजून किंवा ते कुटुंबातीलच आहेत असे समजून मदत करणे, मदतीला धावून जाणे, त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना आधार देणे, अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यामुळे आपल्या नातलगापेक्षाही शेजारी महत्त्वाचा असतो कारण मदतीला येणारा तो पहिला असतो. अशा माणसासाठीसुद्धा धर्मांनं काही कर्तव्य सांगितले आहेत. शेजारी दुःखद घटना घडली तर आपण आपल्या घरात जेवत बसत नाही.. आपणही त्या दुःखद घटनेत सामील असतो. त्यानंतर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सर्वतोपरी मदत करतो, मानसिक आधार देतो. नातेवाईक चार दिवसानंतर निघून जातात पण खरा मदतगार असतो तो शेजारी…. त्यासाठी धर्म सांगितला आहे 

– – व्यापारातही धर्म आहेत. प्रत्येक उद्योगाचा एक धर्म आहे. आता गवळ्याने आपल्याला म्हशीचे किंवा गायीचे उत्तम दूध द्यावे हा त्याचा धर्म आहे. पण त्यांनी आपला धर्म सोडला त्यामुळे त्याचा ‘धंदा’ झाला – ‘व्यवसाय’ संपला. लोकांच्या जिवाची पर्वा न करता एखादी गोष्ट विकणे हे व्यवसायात बसत नाही.. हे व्यवसाय धर्माच्या विरोधात आहे. तारखा निघून गेलेल्या वस्तूच्या तारखा बदलून माल विकणे हा अधर्म आहे पण ही संकल्पना जवळजवळ संपत आली आहे.

….. मला आठवते माझे वडील सांगायचे ती गोष्ट… सोलापूरमध्ये एक मारवाडी गृहस्थ, टिळक चौकात त्यांचे दुकान होते, ते ऋषिपंचमीचे सामान विकत. पंचमीचे व्रत करणाऱ्या सर्व स्त्रिया तेथूनच सामान घेऊन जात. त्यामध्ये भगर, काही भाज्या याचा समावेश असे. त्याचे वैशिष्ट्य असे की त्या दिवशी बैलाच्या कष्टाचे काही खावयाचे नाही. या गृहस्थांची सोलापूरपासून जवळच शेती होती आणि त्या शेतामध्ये ते खास या व्रतासाठी पीक काढत असत जे रेल्वेने सोलापूरला आणले जाई. पण एके वर्षी नव्याने नेमलेल्या त्यांच्या मुनीमाने ते रेल्वे स्टेशन ते टिळक चौक येथे बैलगाडीत घालून आणले. त्यांना त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले कारण ते आता बैलाच्या कष्टाचे धान्य झाल्यामुळे विकू शकत नव्हते आणि त्यांनी यंदा ऋषीपंचमीचे सामान मिळणार नाही असा बोर्ड लावला. याला म्हणतात व्यवसाय धर्म. वास्तविक पाहता हे गृहस्थ तो माल विकू शकले असते.. बैलगाडीत घालून आणले हे लोकांना कुठे कळणार होते ? पण त्यांचा व्यवसायधर्म त्यांना हे करू देत नव्हता. पण आता ही निष्ठा कुठे राहिली आहे? तेव्हा व्यवसायातही धर्म पाळणारे लोक होते.

 – – वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी एक डॉक्टर पाहिले. त्यांची विवेकानंदांवर विलक्षण श्रद्धा होती. त्यांच्या दवाखान्यात विवेकानंदांचा फोटो होता. ते प्रत्येक पेशंटसाठी औषध देताना ते औषध त्या फोटोसमोर ठेवत, विवेकानंदांना नमस्कार करत, प्रार्थना करत आणि लवकर बरे वाटावे अशी कामना व्यक्त करून त्या पेशंटला औषध देत. या त्यांच्या निष्ठेमुळे पन्नास टक्के प्रभाव पेशंटवर पडत असे.. ही त्यांची वैद्यकीय क्षेत्रावरची भक्ती होती.. हा त्यांचा धर्म होता 

– – अमेरिकेमध्ये एकदा एक 12/ 14 वर्षाचा मुलगा जो वसतिगृहात राहत होता त्याने खोकल्याच्या औषधाची बाटली घेतली आणि तो गेला. दुकानदाराच्या लक्षात आले की ‘शेक वेल’ म्हणजे औषध घेण्यापूर्वी ते हलवून घ्या.. याचे लेबल त्याच्यावरती लावले गेले नव्हते. त्यांनी ताबडतोब त्या मुलाच्या वसतीगृहाचा शोध घेतला, पण त्या काळात मोबाईल नव्हते. त्यांनी त्या वसतिगृहात जाऊन तातडीने त्या मुलाला भेटून औषध घेण्याची माहिती दिली. हा झाला त्याचा विक्रेताधर्म.

अशी धर्मपरायण माणसे आजही पाहायला मिळतात. धर्म म्हणजे रंग नव्हे, रंगाचा बेरंग करणे हे नव्हे, कुठल्यातरी रंगाचा उल्लेख दहशतवाद असा करणे तेही चुकीचे आहे.

– – – धर्म म्हणजे नीतीने वागणे आणि इतके आपल्याला समजले तरी धर्म समजला म्हणावयास हरकत नाही.

// शुभम भवतु//

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूजा आणि वास्तुशांती…!!! – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पूजा आणि वास्तुशांती… !!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(रस्त्यावर, फुटपाथ वर, हालअपेष्टांमध्ये जगणाऱ्या काही लोकांना जेव्हा घर मिळते, त्यानंतर आनंद – वेदना – समाधान याचे संमिश्र मिश्रण… त्याची ही कहाणी )

आज मी प्रचंड खुश आहे… ! 

का…. ? सांगतो….

त्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….

आपण एक मे 2025 पासून ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे, पूर्वी याचना करणाऱ्या अंध अपंग आणि वृद्ध 50 लोकांना आपण इथे रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली आहे.

(श्री दानिश भाई शहा सर, श्री विपुल भाई शहा सर, श्री निलेश लिमये सर यांच्या प्रत्यक्ष आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे सेंटर सुरू आहे.. माझे यात कोणतेही श्रेय नाही हे अत्यंत नम्रपणे आणि मनापासून कबूल करतो)

भीक मागणे सोडलेल्या अशा लोकांसाठी असे काही सेंटर भारतात इतरत्र कुठे असेल असे मला वाटत नाही, आणि यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, मी फक्त माध्यम आहे ! 

तर…. आपल्याकडे जे लोक काम करतात त्यातील बऱ्याच लोकांकडे तात्पुरता निवारा आहे…. म्हणजे कुणी झोपडपट्टीत राहतं, कुणी पुलाखाली राहतं, किंवा अजून कुठे….

माझ्याकडे पाच लोक मात्र असे आहेत, त्यातले काही शंभर टक्के अंध आहेत आणि काही वयस्कर आहेत…. या पाच लोकांचा राहायचा कुठेही ठिकाणा नाही….

सेंटरवरून लवकर जायची यांची इच्छा होत नाही, कारण रात्री 11:30 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर सर्वत्र सामसूम झाल्यानंतर एखाद्या दुकानाच्या आडोशाला हे पाचही जण झोपतात….

सेंटर सहाला बंद झाल्यानंतर साडेअकरा पर्यंत करायचं काय… ??? रस्त्यात इकडे तिकडे धडपडत साडेअकराची वाट पहायची….

सेंटरवरून गेल्यानंतर रात्री कोणीही कोणापुढे जेवणासाठी हात पसरू नयेत, यासाठी आपण सर्वांना रात्रीचे पूर्ण जेवण पार्सल देत आहोत, तसे याही पाच जणांना देत आहोत.

प्रश्न उरतो फक्त झोपण्याचा….

आयुष्यात इतक्या विवंचना, तरीही आमचे हे सर्व लोक आनंदी असतात विनाकारणच… “कारणं” शोधून आनंदी व्हायला हल्ली “कारणं” मिळतातच कुठं?

– – तर, दुकानं बंद झाल्यानंतर, साधारण रात्री बाराच्या सुमारास दुकानाच्या बाहेर निवारा शोधून आमचे हे लोक वळकटी टाकतात…. ! अनेक वेळा गस्तीवरील पोलीस, सामाजिक सुरक्षिततेच्या जाणिवेतून यांना दुकानाबाहेर / रस्त्यावर झोपायला मनाई करतात…

अनेक वेळा, अनेक लोक बिअर बारमध्ये जे चेतनादायी आणि ऊर्जात्मक (?) “औषध” मिळते, ते घेऊन रात्री बारानंतर डुलत डुलत चालत येतात…. यांना तिथे झोपलेले पाहून अचानक यांच्यातील “जबाबदार नागरिक” जागा होतो… “सामान्य नागरिक” हा विना गणवेशातील पोलीसच आहे, याची नेमकी याचवेळी त्यांना आठवण होते…. ! 

लाथेने ढोसून ते विचारतात,

‘अय, तुझ्या बापाची जागा आहे का ?’ ( बरं ती यांच्याही बापाची नसते )

 ‘हितं का झोपला? पयला उट… उट पयला…. तुज्या xxx….

‘ आमच्या एरिया मंदी किती चोऱ्या वाढल्यात, साल्यांनो झोपायचं नाटक करता आणि तुम्हीच चोऱ्या करता…. पयला उट… उट म्हणतो ना? का घालू लाथ ‘

– – हे लोक लाथा खाऊन उठतात आणि दुसरा निवारा शोधायला मध्यरात्री बाहेर पडतात….

दुसरीकडे गेल्यानंतर सुद्धा हाच प्रकार….

कित्येक रात्री हे लोक झोपत नाहीत….

आपल्यापैकी कित्येकांचे संसार भरायचे म्हटलं तर एका ट्रकात सुद्धा पुरणार नाहीत…

यांचा संसार फक्त एका पिशवीचा… या पिशवीमध्ये एखाद दुसरा शर्ट, पॅन्ट, टॉवेल इतर काही सटरफटर…. आणि पाच पन्नास रुपये….

(डॉक्टर आम्ही ते पेपरात वाचतो, एखाद्या भिकाऱ्याकडे पाच लाख सापडले, दहा लाख सापडले हे कसं काय ? आणि तुम्ही तर म्हणता पाच-पन्नास रुपये….. ?) 

…. तर, माऊली तो विषय वेगळा आहे, माझ्या पुस्तकात मी याचे सविस्तर विवेचन केले आहे, तरी स्वतंत्रपणे पुन्हा कधीतरी सांगेनच… ! 

तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच देऊन टाकलं….

– – तर, भुरटे चोर या पिशव्यांचीही चोरी करतात… या चोरीसाठी अनेक वेळा अनेकांची डोकी फुटतात. झटापटीत कित्येक वेळा अनेकांचे जीव जातात, हकनाक गेलेल्या जीवांच्या खिशात माझे कार्ड सापडते, मग त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला माझ्या फेऱ्या सुरू होतात…. गेलेल्या लोकांची ओळख पटवून देणे किंवा अन्य इतर बाबींसाठी…. यात खूप वेळ जातो आणि मनस्ताप वेगळा…

एरव्ही पाऊस मला आवडतो…

मी कविता करतो… त्यामुळे ते typical मंद, धुंद, गुलाबी शराबी पाऊस असे शब्द मला आवडतात….

पण या वेळेच्या पावसाने एक इंच सुद्धा जागा कोरडी सोडली नाही….

.. आता तर माझे लोक कुठल्याही आडोशाला सुद्धा झोपू शकत नाहीत…. फुटपाथ नदीप्रमाणे वाहत आहेत… रात्रभर ते बसून किंवा उभे राहतात….

सेंटर सुटल्यावर मी माझ्या घरी येतो… पण ते दुकान आणि पाऊस बंद होण्याची वाट पाहतात… केवळ एका रात्रीच्या झोपेसाठी….

मी मंद धुंद गुलाबी पावसाकडे कौतुकाने पहात असतो…

‘आता तरी थांब ‘ म्हणून ते मात्र पावसाकडे याचना करतात… ह्यावेळी पाऊस रस्त्यावर नाही, त्यांच्या डोळ्यात असतो…

…. मी, मस्त बेडवर झोपतो… ते उघड्या डोळ्यांनी रात्रभर भिजत असतात….

– – आताशा झोपही येत नाही… रात्री विजांचा आवाज आला तर असं वाटतं कोणीतरी यांना तिथून उठवत असेल… रात्री कुत्री भुंकू लागली तर असं वाटतं, ‘की बार मधून “ऊर्जात्मक औषध” पिऊन आलेले लोक यांना लाथा मारत असतील “सामाजिक जबाबदारी” म्हणून…. ! 

पाऊस पडण्याचा आवाज रात्री आला तर एरव्ही आनंदी होणारा मी कुशीवर कूस बदलतो…

.. कारण तिकडे फुटपाथ नदीसारखा वाहत असतो…. माझ्या लोकांचे डोळे असेच वाहत असतील ना… ? 

.. माझी सुद्धा झोप वाहून जाते मग, त्या फुटपाथवरल्या वाहून जाणाऱ्या पाण्यागत…. ! 

– – बेड आहे तो झोपू शकत नाही… आणि ज्याच्याकडे बेड नाही तोही झोपू शकत नाही… किती विरोधाभास आहे…

‘ पावसा जा रे आता… मी तुझ्या पाया पडतो…. ! थोडा वेळ तरी झोपू दे ना त्यांना…. ‘

आमच्या या लोकांच्या कायमच्या झोपण्याची सोय काय करू या विचाराने मी कायम त्रस्त असतो…. ! 

यांना घर घेऊन देऊ शकेल इतका मी पात्र नाही….

सरकारी योजनेत घरकुल देऊ शकेन, इतकी माझी पोहोच नाही… मुळात योजनेसाठी लागेल असं कोणतंही कागदपत्र यांच्याकडे नाही…

…. करू तरी काय ? आपण काहीही करू शकत नाही या भावनेने अगतिक होतो…

पावसा…. मीही तुझ्या सारखाच…. नुसताच कोसळतो रे…. आणि नंतर ओढ्या नाल्यांमध्ये वाहून जातो…

– – एखाद्या खोलगट जागेत मी साठतो आणि माझं डबकं तयार होतं…

रस्त्यावर वाहून शेवटी ओढ्या नाल्यात जाणारा मी….. डबक्यात अडकलेला मी…. कोणाची तहान भागवू शकत नाही, की कुठल्या पिकापर्यंत पोहोचत नाही…

नदी किंवा समुद्राला जाऊन मिळावे इतकी आमची ताकद नाही, नाल्यांपर्यंत वाहत जाऊन गटाराचे पाणी…. नाल्यामध्ये बेमालूम मिसळून जायचं… किंवा डबकं होऊन तिथेच बसायचं…. !

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अक्षर यात्रा… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ अक्षर यात्रा…  डॉ. माधुरी जोशी 

खरंतर चौथीपर्यंत माझं अक्षर वाईट…. खरं म्हणजे घाणेरडं… काय लिहीलंय तेच आईला कळायचं नाही म्हणून फटके खाल्लेत… पण अक्षर सुंदर काढायचं कसं हे कुणीच कधी शिकवलं नाही. ते शिकवलं माजगावकर सरांनी. जरासे चिडके पण वळणदार अक्षरांवर तुडुंब प्रेम करणारे माजगावकर सर.. कशी काय जाणे मला पुस्तीची गोडी लागली… कदाचित आईला अक्षर सुधारून दाखवायची जिद्द आणि तिचे फटके वाचवण्याची पण..

आज माझं अक्षर सुंदर, वळणदार अगदी टाईप केल्यासारखं आहे असं कुणी म्हंटलं की माजगावकर सरांची आठवण आल्यावाचून रहात नाही.. ५वी मधे होते मी… एक दिवस सांगितलं गेलं की पालकांना सांगा… पुढच्या आठवड्यापासून बोरू, दौत आणि पुस्ती आणायची आहे. मग खरेदी झाली. आईनं शिंकाळ्या सारखी दौत बांधून दिली… आप्पांनी पेनासारखं बोरूला टोक तासून दिलं. पुस्तीवर नाव घातलं. माधुरी रानडे… सगळं घेउन मी सोमवारी शाळेत गेले. नेहमीच्या बाई सरांपेक्षा वेगळेच सर वर्गात आले. पु लं च्या चितळे मास्तरांसारखे.. पांढरा धुवट फुलं शर्ट, त्यावर खरंच निळसर ग्रे जुनासा कोट, डोक्यावर काळी टोपी, लाल चॉकलेटी रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, दाढीचे खुंट वाढलेले, काही दात पडलेले… ते सर आजही डोळ्यासमोर आहेत. आणि जन्माचं सुंदर अक्षर देणारी त्यांची पुस्ती पण…. ते अक्षर आज सत्तरी नंतरही सोबत तसंच.. वळणदार, एकसारखं, सुवाच्य…

मला आवडलं ते पुस्ती लेखन आणि जमलं पण… चार ओळीत अक्षरांची उंची, रूंदी, वळणं, काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार सगळं मस्त उमटायला लागलं. माझं अक्षरंच बदललं. खोडून खोडून काळी मिचकूट होणारी, फाटणारी पानं लख्खं हासरी झाली. माजगावकर सरांच्या आशीर्वादानं आजही वाण्याची लॉंड्रीची यादी, वस्तुंना लावलेल्या नावांच्या चिठ्ठ्या डब्या बरण्यांवर छान दिसतात. स्पष्ट, नीट…

आणि मनाशी हे पक्कं झालं की “अक्षर बदलता येतं”… ते रंग रूप उंची देहाची ठेवंण यांसारखं जन्माला चिकटलेलं नाही. अक्षर बदलता येतं.

सरांसारखेच इतरही ठसे उमटतं होते. परीक्षांच्या बैठक व्यवस्थेत मी रानडे.. अल्फाबेटिकली मोहिनी समुद्र नावाची हुषार पुढच्या वर्गातली मुलगी शेजारी बसे. ती स्कॉलरंच होती.. काय देखणं अक्षर… ४/४ मार्गांची दीर्घ उत्तरं अर्धा पाऊण फुलस्केप होत असे. उत्तराबद्दल अजिबात शंका नसलेली ती सरसर सुंदर अक्षरांत लिहीत सुटे. खाडाखोड नाही, बाण नाहीत, अपूर्ण सोडणं नाही, गिचमीड नाही. आजही तिचा पेपर, सरसर लिहीणारी बोटं आणि केशरी शाई पेन डोळ्यासमोर आहे. आणि तिचा बुद्धीमान, मोठं कपाळ असणारा, कुरळ्या केसांतला चेहरा पण…. तो ठसा खोलवर उमटला हे नक्की..

माझं शिक्षण M. A. पर्यंत होतांना विषयाच्या मांडणी बरोबर अक्षराचं पण कौतुक होई… मनात कुठेतरी बरं वाटे.. माजगावकर सरांच्या पुस्ती ची किमया आयुष्यभर गौरवास्पद ठरली खरंच…

पुढे मी पण शिक्षिका झाले. आदरणीय लता जोशी, देवस्थळी, देशमुख बाई त्यांची गोलाकार, वळणदार, एकसारखी अक्षरं आजही स्मरणात आहेत. चंदा काळे, माया संदानशिव अशी पण…. बाकीच्यांची वाईट होती असं नाही पण छान आलंच पाहिजे अशी काळजी, इच्छा, प्रयत्न नव्हते. शिकवण्यातली खोली, अभ्यास, एकात्मता अक्षरात नव्हती. पण शिकवणं सर्वांचं उत्तम.. माझ्या अक्षराचा फायदा घेत मी मुलींसाठी सुंदर साहित्य शोधून साध्या सोप्या भाषेत फलक लेखनातून खूप मजकूर, कविता, विशेष माहिती पोहोचवली. चित्रकलेच्या सुदुंबरे कर बाईंची, हिरवेची छान साथ मिळाली. न्यायला येणारे पालक, मधल्या सुट्टीत मुली ते फळे वाचत उभे रहात. कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटे. तो फळांचं जणू मुलींशी बोलंत असे.. त्यातूनच पुस्तक साकारलं

” बोलका फळा “… चक्क शासनमान्यता मिळालेलं. ज्या मुलींचं अक्षर छान होतं त्यांना फळे सुपूर्द केले. त्या पण ऊत्साहानी लिहीत दिलेला मजकूर… त्यांना शाब्बासकी आत्मविश्वास लाभले.

“लाखो मुलं परीक्षेला बसतात. तुम्ही अभ्यास करता पण पेपरमधे घाण अक्षर असलं की परीक्षक वैतागतो. मग मार्गांवर परीणाम होतो. अक्षर छान करा”…. मुलींना मुद्दा पटला आणि त्या सावध झाल्या… अक्षर सुधारण्याचा प्रयत्न केला त्यांनी… अजून काय हवं शिक्षकाला?

आज हे सगळं आठवायचं कारण आजचा ” जागतिक अक्षर दिन”… अमेरिकेतला एक उद्योजक.. जॉन हॅनकॉक… त्याची सही… स्वाक्षरी फार सुंदर, देखणी, वळणदार, नक्षीदार… त्या स्वाक्षरी मुळे अमेरिकेत २३ जानेवारी हा

” राष्ट्रीय हस्ताक्षर दिन ” म्हणून साजरा करतात. मग जगभर पण.

मला वाटलं अमेरिकेत कशाला जायचं ?हे ज्ञान, सल्ला, महत्व समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलंय की..

“अक्षर सुंदर वाचणे सुंदर”.. आणि ते नेहमी, सतत, तसंच, सुंदर…. कधीतरी नाही… इच्छाशक्ती हवी, सराव हवा. झोकून द्यायला हवं. एकदा साध्य झालं की कामंच झालं… जन्माचं कल्याण… म्हणून समर्थ म्हणतात… “दिसामाजी काहीतरी लिहावे”.. म्हणजेच सराव…

खरंच यांचा अनुभव घेते आहे. अगदी रोजचा सूर्योदय, मैफलीतला ललत, जुन्या वस्तुंचे ऋण नाही तर कामवाल्या बायकांचं जगणं…. अगदी कुठलाही विषय… सत्तरी ओलांडली तरी अगणित विषय, शब्द, प्रसंग स्मृतीत फेर धरतात… पेनातून झरतात… लेख होतात त्यांचे. हे सगळं कुठे असतं?कोण शक्ती देतं?कसं समजतं, सुचतं, बहरतं…. उत्तर न मिळणारे प्रश्न… सतत येतात…

तरी मी लिहिते..

प्रत्येकानं लिहावं कारण प्रत्येकाकडे अनुभवांची, विचारांची, शब्दांची गाठोडी असतातच. पण लोक आळस करतात. संकोच करतात. दुर्लक्ष करतात. खरं तर लिहीण्यात विचार करणारा मेंदू, विचाराला भावनांचा पदर लावणारं मन, अक्षरं उमटवणारी बोटं, त्यांना शक्ती देणारं मनगट, सगळं नीट, निरपेक्ष, सुक्ष्म पाहणारे डोळे… हे सगळं म्हणजे = सुंदर लेखन… ते विचार सुंदर अक्षरांत असतील तर कोजागिरीच्या दुधाला केशराचा रंग गंधंच… मग ते विचार देखणे, कलात्मक, वाचनीय…

पण आता काळंच बदलला… सुंदर अक्षर हवंय कशाला? स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर घेतील बघून फॉंड..

मी मात्र आजही मेसेज करत नाही.. शक्यतो हातांनी लिहीते..

फुलांनी मजकुराचा कोपरा सजवते.. टाईप केलेला आणि हातांनी लिहीलेला मजकूर तोच असतो..

पण हाताच्या अक्षरातलं माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, अभिनंदन, सांत्वन थेट ह्रदयात भेटतं.. लिहिणारी मी आणि वाचणारे सारे आनंदी, समाधानी, तृप्त होतात….

शब्दांचे ऋण मानुया… आणि सुंदर अक्षरांनी पूजा बांधुया…

कराल ना विचार!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘महालक्ष्मी… आईचंच रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘महालक्ष्मी… आईचंच रूप…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

माझ्या आईचं, शैलजा फेणाणीचं सर्वांत लाडकं दैवत म्हणजे ‘महालक्ष्मी’! म्हणून तर तिनं तिच्या मंगळसूत्रामध्ये सुंदर, सुबक, नाजूक, रंगीत मीनाकाम चितारलेल्या आणि कमळात उभ्या असलेल्या ‘लक्ष्मी’चं लॉकेट दिमाखात घातलं होतं!

माझे बाबा, शंकरराव फेणाणी हे भारतातील ‘स्क्रेपर बोर्ड’ या ब्रिटिश चित्रकलेतील मोठे तज्ज्ञ म्हणून गणले जायचे. ते उत्कृष्ट चित्रकार होते. लहानपणी ते कारवारला असताना, त्यांना ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकण्यासाठी आणि चित्रकलेतून उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला यायची फार इच्छा होती. परंतु चित्रं काढून कोणी पोट भरू शकतं का? यावर त्याकाळच्या उच्चशिक्षित (संस्कृत आणि गणितात तज्ञ असलेल्या) माझ्या आजोबांना यावर विश्वास नव्हता. लग्नापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीतही, चित्रकलेच्या माध्यामातून उदरनिर्वाह करण्याची बाबांची जिद्दच, त्यांना मुंबईला घेऊन आली.

बाबा मुंबईला आल्यावर त्यांच्या आयुष्यात, शैलजाच्या पावलांनी मात्र ‘लक्ष्मी’ घरी आली! त्यावेळी घरात केवळ एक खाट आणि कांबळ होती. परंतु दोघांच्या अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाच्या कमाईने, लक्ष्मीच्या हातांनी घर हळूहळू सजू लागलं. जसजसा संसार फुलू लागला, तसतसं आईचं ‘महालक्ष्मी’ मंदिराशीही नातं जुळू लागलं, आणि अधिकाधिक दृढही होऊ लागलं! आई जेव्हा महालक्ष्मीची पूजा करत असे, त्यावेळी तर तिच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज, सोज्ज्वळता, सात्त्विकता याची प्रचिती येई! एका क्षणात् त्या ‘देवत्वाशी’ ती एकरूप होई! तिच्या महालक्ष्मीवरील जबरदस्त श्रद्धेमुळेच माझ्या जन्माआधी, दर शुक्रवारी ती नवचंडिकेची यथासांग पूजा करून, कुमारिकांना बोलावून, सन्मानपूर्वक, भेटवस्तू देऊन, जेवण घालीत असे.

गणेशोत्सवातील हरितालिकेच्या (पार्वतीच्या – शैलजाच्या) पूजेच्या दिवशी आणि गणपती आगमनाच्या दिवशीसुद्धा दोन्ही दिवस, ती निराहार, उपवास करून, ताजे, खमंग आणि स्वादिष्ट असे अनेक तिखटा-गोडाचे पदार्थ करुन शंभरएक नातेवाईक आणि भक्त मंडळींना घरी जेवू घालत असे. पाण्याचा एक थेंबही न घेता, ही ताकद तिला कुठून येत असेल बरं? याचं आम्हां सर्वांना कोडंच पडत असे. नक्कीच तिला तिची ‘महालक्ष्मी’ उदंड ऊर्जा देत असावी!

माझ्या आईचं माहेरचं नाव ‘कमल’. माझ्या जन्मानंतर ‘नवचंडीचा प्रसाद’ म्हणून आणि कमळात जन्मलेली – (पद्मात् जायते इति) म्हणून, आमच्या भाई काकांच्या (म्हणजे सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या) आईनं, “हिचं नाव ‘पद्मजा’च ठेवा, ” असं सांगितलं. ‘नवचंडिकेच्या वरदानाने ही ‘चंडिका’च माझ्या पोटी जन्मली! ’ असं कधीकधी आई गंमतीने माझी चेष्टा करत म्हणायची! त्यानंतर दिवसेंदिवस आईची भक्ती पाहून, मीही देवीची भक्त झाले.

बारावीनंतर माझी अ‍ॅडमिशन मायक्रोबायोलॉजी हा विषय असलेल्या ‘सोफाया’ कॉलेजमध्ये झाली. आणि योगायोग म्हणजे हे कॉलेज ‘महालक्ष्मी’ मंदिराकडून, पायी अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. जणू महालक्ष्मीनेच मला जवळ बोलावून घेतलं होतं! त्यामुळे मीही दर शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे; आणि देवीसमोर, माझे गुरू ‘पद्मविभूषण’ पंडित जसराजजींनी मला शिकवलेलं ‘माता कालिका’ हे सुंदर भजन आणि इतर देवीची भजनंही मी गात असे. ते गाताना देवीची तिन्ही रूपं पाहून मन खूप प्रसन्न होई. तिथली पुजारी मंडळीही माझी दर शुक्रवारी आतुरतेने वाट पाहत, आणि माझ्या गाण्याचा आनंद घेत. त्यानंतर मला ते पेढे, नारळ, हार, फुलं असा भरपूर प्रसाद देत. अशा वेळी मी देवीसाठी गायले म्हणून हा प्रसाद तिनं ‘माझ्यासाठीच’ पाठवला आहे, असं मला वाटे आणि मोठ्या आनंदाने माझी आई त्याचा स्वीकारही करी.

नित्यनियमाप्रमाणे असेच एकदा मी कॉलेजमधून परतताना शुक्रवारी ‘महालक्ष्मी’ला दर्शनाला गेल्यावेळी, तिच्यासमोर मी ‘माता कालिका’ डोळे मिटून अत्यंत भावपूर्णपणे गायले. मी गात असताना शेजारीच कुणीतरी मुसमुसून रडण्याचा मला आवाज आला. मी दचकून पाहिले… तर एक मध्यमवयीन दाक्षिणात्य स्त्री रडत असल्याचं मला दिसलं. माझं भजन संपल्यावर मी तिला, ‘काय झालं? तुम्हाला काही त्रास आहे का? ’ असं विचारल्यावर तिनं मला काय सांगावं? … ती टिपिकल दाक्षिणात्य टोनमध्ये म्हणाली, “आपका गाना सुनकर अमको इतना अच्चा लगता ऐ, तो बगवाऽऽऽन को कितना अच्चा लगता ओगा! ” हे ऐकून मला गालातल्या गालात हसू आवरेना! असे अविस्मरणीय प्रसंग नेहमी परमेश्वराची आठवण करून देत त्याच्या ‘अस्तित्वाचीही’ साक्ष देतात! ……….

साधारणपणे ४२-४३ वर्षांपूर्वी, याच महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन, मी माझे गुरू, ‘पद्मश्री’ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे जात असे. ‘भारतरत्न’ लतादीदींना खास भेटून मी हा प्रसाद देत असे. असंच एकदा दीदींना भेटल्यावर हा प्रसाद देत मी म्हटलं, “आज मला दोन महालक्ष्मींचं सुंदर दर्शन झालं..! ” हे ऐकल्यावर दीदी जोरात, खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, “मी महालक्ष्मी नाही काही… , मी ‘कडकलक्ष्मी’ आहे! ” दीदींची विनोदबुद्धी अफाट होती! तशीच महालक्ष्मीवरील श्रद्धाही!

विशाल अरबी समुद्राच्या एका छोट्याश्या काठावर वसलेल्या या मंदिरात गाताना, मला अपार आनंद मिळे! साथीला समुद्राच्या लाटांचा तानपुऱ्यासारखा ‘लयबद्ध नाद’ मला साथ करीतसे. देवीची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी तिन्ही सुंदर रूपं, मी हृदयात साठवत असे!

एकदा तिथल्या पुजार्‍यांनी, पूजा केलेला तिन्ही देवींचा एकत्र फोटो, माझं गाणं ऐकून मला दिला होता, जो आजही आईच्या देव्हाऱ्यात पूजला जात आहे.

आई मला बालपणापासून सांगे की, ‘या महालक्ष्मी, महाकाली, आणि महासरस्वतीचा मिलाप म्हणजेच स्त्री शक्ती! स्त्रीमध्ये ही तीनही रूपं सामावलेली आहेत. ’

…. यातली महालक्ष्मी म्हणजे सुखसंपत्ती आणि वैभवाचं रूप आहे. ही अतिशय शांत, प्रसन्न, प्रेमळ आणि नेहमीच ऊर्जा देणारी आहे.

…. दुसरी महाकाली – हे समाजाला अत्यंत उपयुक्त असं रूप आहे. ही महाकाली समाजकंटक, गुंडप्रवृत्ती आणि दुष्टांचा नायनाट करणारी महिषासुरमर्दिनी आहे, जी स्त्रियांविरुद्धच्या अन्यायाला चिरडून टाकते. तिच्यातील रौद्ररूप आणि त्वेष आपल्याला मदत करतात. ती शक्तीशाली, बलशाली आणि कणखरही आहे. चांगलं काम करण्याससुद्धा ती प्रवृत्त करणारी आहे.

…. आणि तिसरी म्हणजे महासरस्वती – ही तर आम्हां कला – सारस्वताचं सुंदर रूप आहे, आमचं दैवतच आहे. तिची अमृतवाणी मोहिनी घालणारी आहे. ही वीणापुस्तकधारिणी आहे. त्या पुस्तकातलं ज्ञान आणि विद्या देणारी आहे. तिचं रूप मोहक आणि लोभसवाणं आहे.

संगीत हा आम्हां कलाकारांना परमेश्वराशी जोडले जाण्याचा सोपा मार्ग आहे. तो सर्वांत जवळचा दुवा आहे. ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे.

माझ्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या स्त्रिया, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने घडवलं, त्या म्हणजे – 

…. थोर विदुषी स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई भागवत! त्यांनी मला संगीतकार बनवलं. त्यांचं – माझं नातं म्हणजे आजी नातीचंच जणू! अत्यंत प्रेमळ असलेल्या या दुर्गा आजीचं आणीबाणीच्या काळात, अन्यायाविरुद्ध लढणार्‍या दुर्गा देवीचंच, कणखर रूप पाहायला मिळालं. अशा महान स्त्रीचा सहवास घडणं हे माझं सद्भाग्यच!

…. दुसरी स्त्री महासरस्वती – म्हणजे लतादीदी! माझ्या सांगीतिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, अमेरिकेतील पत्रकारांनी लतादीदींना ‘Is there any other voice ranking alongside you? ’ असं विचारल्यावर, लतादीदींनी क्षणाचाही विलंब न करता, “Padmaja is extremely talented with an outstanding voice and she is my hope! ” असं स्वच्छ सांगून, त्यांनी माझ्याकडून ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ आणि लवलव करी पातं’ सारखी आव्हानात्मक गाणी गाऊन घेऊन, माझ्या पंखांत गरूडभरारीचं बळच भरलं! हेही माझं भाग्यच!

…. आणि तिसरी स्त्री म्हणजे माझी आई – शैलजा – महालक्ष्मीचं रूप! जिच्यामुळे आयुष्यभर मी संगीतातूनच सरस्वतीची आणि महालक्ष्मीची पूजा करत आहे, साधना करत आहे. आत्म्याच्या निकट असणारी एकमेव गोष्ट म्हणजे बुद्धी! ही बुद्धिदेवता- महालक्ष्मी आपल्याला संस्कार आणि समृद्धी देते!

जिनं माझं आयुष्य संस्कारमय आणि सुखसमृद्धीमय केलं, मला घडवलं, त्या माझ्या आई शैलजाप्रमाणेच, ही महालक्ष्मीही, माझ्या ‘आई’चंच रूप आहे!

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता |

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक कन्या दिवस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “जागतिक कन्या दिवस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर international daughter’s day / जागतिक कन्या दिवस म्हणून साजरा होतो.

माझ्या मनात सहज विचार आला की असा दिवस साजरा करण्याचे कारण काय असावं! आणि याची सुरुवात कशी झाली असावी!

यावर विचार करता करता यावरच्या कारणाचा मला उलगडा झाला तो असा —

चांगल्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला नेहमी कुठल्यातरी पुराण कथेत घेऊन जातो. पूर्वी राजे मंडळी / श्रीमंत मंडळी, आपली गादी / वारसा पुढे चालवण्याकरता देवाला मुलगा देण्याची प्रार्थना करायचे. आणि इतर लोक पण आपल्याला कामकाजात मदत करण्याकरता / अर्थार्जन करण्याकरता मुलगा होवो, अशीच देवाला प्रार्थना करत. सगळे आजी आजोबा पण मुलाला सुनेला आशीर्वाद देताना पुत्रं भवतू असाच आशीर्वाद देत. अशी सगळी मंडळी नेहमी याकरता शंकराचीच प्रार्थना करत. कारण शंकर भगवान लगेच प्रसन्न होतात हे सगळ्यांना माहित असायचं. आणि शंकर भगवान तथास्तु म्हणून आशीर्वाद देत. आणि त्यामुळे सगळ्यांनाच मुलं व्हायला लागली. मुलींची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आणि बहुतेक घरात मुलंच दिसायला लागली.

हे चित्र बघून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव चिंतीत झाले. कारण सृष्टी मधल्या सगळ्या मुली संपल्या तर पुढे मुलं मुली होणार कसे! आणि पुढे सगळेच ठप्प होणार. यावर काहीतरी उपाय काढावा याकरता ब्रह्मदेव श्री विष्णू यांच्याकडे गेले. त्यांची प्रार्थना केली आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. आणि यावर आपणच काहीतरी उपाय शोधावा अशी प्रार्थना केली.

सृष्टीचे चालक श्री विष्णू यांनी लगेच उपाय काढला आणि तो अमलात आणला.

एका विचारवंताच्या डोक्यात त्यांनी ‘पहिली बेटी धन की पेटी’ ही कल्पना उतरवली. आणि आता याचा प्रत्यय बऱ्याच जणांना येतोय अशा उदाहरणांची जाहिरात बाजी सुरू केली. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपला विचार बदलून पहिली मुलगी पाहिजे अशीच प्रार्थना शंकराला करायला सुरुवात केली. आणि शंकर देवाच्या आशीर्वादाने अशी प्रार्थना करणाऱ्यांना मुलीचे वरदान मिळायला सुरुवात झाली.

विष्णू देवतेने काही विचारवंतांच्या डोक्यात मुलगी ही म्हातारपणची काठी, अशी कल्पना पण रुजवली. आणि बऱ्याच वयस्कर मंडळींची म्हातारपणी मनापासून सेवा करणारी मुलगीच असते अशी उदाहरणे समाजामध्ये लोकांच्या समोर येतील अशी व्यवस्था केली. त्यामुळे नवीन लग्न झालेल्यांच्या शंकराकडे मुलगीच पाहिजे अशा प्रार्थना सुरू झाल्या.

पूर्वी मुलींना शिक्षण देणे, नोकरी करू देणे, हा प्रकार जवळ जवळ नव्हता. त्यामुळे पण मुलींना दुय्यम स्थान असायचे आणि सगळ्यांची पहिला मुलगाच पाहिजे / दुसरा पण मुलगाच पाहिजे, अशी इच्छा असायची. यावर पण विष्णू देवतेने एक उपाय काढला. आणि मुलींना शिक्षण द्या अशी कल्पना बऱ्याच जणांच्या मनात रूजवली. आणि तशा प्रकारची सगळीकडे बॅकग्राऊंड पण तयार केली. लोकांनी मुलींना शाळा कॉलेजमध्ये पाठवायला सुरुवात केली. मुली मुलांच्या बरोबरीने शिक्षण घ्यायला लागल्या. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षण क्षेत्र, सरकारी ऑफिसेस मध्ये मोठ्या पदांवर आणि राजकारणात पण स्त्रिया वरपर्यंत पोहोचल्या. मुलींची ही अशी प्रगती बघून, सगळेच नव वर -वधू आम्हाला पहिली मुलगी दे अशी प्रार्थना शंकराकडे करायला लागले. शंकर देवाच्या तथास्तु मुळे मुलींची संख्या वाढायला लागली.

अशा रीतीने आपल्याला मुलगी आहे याचा अभिमान सगळ्यांनाच वाटायला सुरुवात झाली.

आता एका कल्पक परदेशी माणसाच्या डोक्यात विष्णू देवतेने मुलींचे कौतुक करण्याकरता वर्षामध्ये एखादा दिवस ठरव असा विचार पेरला. तो महिना होता सप्टेंबर.

त्या कल्पक माणसाने दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला चौथा रविवार हा सगळ्यांनी आपल्या मुलींचे कौतुक करण्याकरता आणि इतरांच्या मुलींचे कौतुक करण्याकरता international daughter’s day म्हणून पाळावा याकरता योग्य ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्यात त्याला यश मिळाले.

तेव्हापासून सगळेजण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवार मुलींचे कौतुक करण्याकरता जागतिक कन्या दिवस म्हणून जगभर साजरा करतात आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात.

चला तर मग या दिवशी ब्रह्मदेवता, विष्णु देवता आणि शंकर देवता, यांना नमस्कार करूया. या घडामोडींमधल्या सर्व कल्पक व्यक्तींना वंदन करूया या. आणि सर्वच मुलींना शुभेच्छा देऊया…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. १३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ अस्मिता… लेख क्र. १५ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“अस्मिता” संस्थेचे दादा पटवर्धन स्वतः आमंत्रण द्यायला आले होते त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी जोगेश्वरीला गेले होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेतील अपंग मुलांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम होता, डोळे, हात, पाय अशा अवयवांचे अपंगत्व असलेले मुलं यात गाणार होती.

सुरुवातीला, अस्मिता शाळेच्या बँडपथकाचे संचलन झाले. डोळे दिपवणारे व अंगावर रोमांच उभे करणारे असे संचलन होते ते. सर्वात पुढे असलेला मुलगा हातात असलेल्या ध्वजदंडाचे विविध प्रकार लीलया करत होता. बँड पथकाने वातावरण निर्मिती खूपच छान केली.

प्रथम गाणे सादर केले त्या व्यक्तीच्या घरातील चारही जण अंध होते (बायको, भाऊ, मुलगी व ते स्वतः). तरीही ते सर्वजण कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते. दुसऱ्या अंध बाई एम ए झालेल्या होत्या, शिवाय संगीतविशारद होत्या. कमरेपासून खाली पायात अजिबात संवेदना नसलेली मुलगी चार्टर्ड अकाउंटंट झाली होती तसेच संगीत विशारदही होती.

अशा विविध प्रकारे अपंगत्व असलेल्या विविध वयोगटातील व्यक्तींचे गीत नृत्य आधी विविध कार्यक्रम पाहिल्यावर त्यांच्या दिला सलाम करावा असेच वाटतं.

आपण धडधाकट असूनही सतत रडगाणे गातो, याचा मला नेहमीच राग येतो. आहे त्या परिस्थितीला हसतमुखाने तोंड दिले तर दुःख सुसह्य होते. संकटांना म्हणावं, “या, तुमचं स्वागत असो, ” आणि देवाला म्हणावं, “संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य मला दे. “

आजच्या “अस्मिता” संस्थेतील कार्यक्रमाने जगण्याची एक नवी उभारी मिळाली.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ भोंडला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “ भोंडला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या लहानपणी देवीचं नवरात्र बसायच्या आधी आई, आजीची पूर्ण घराची स्वच्छता सुरू व्हायची. डबे घासले जायचे.. एकूण एक अंथरूणं, पांघरूणं, धुवायची. वडील, भाऊ मदतीला यायचे. श्रमाचे संस्कार आपोआप व्हायचे. आम्हाला आईच्या हाताखाली कामं करायला लागायची. त्याचे काही वाटायचे नाही…

 कारण देवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा. मी आणि सुधा आमच्या दोघींच्या घरी हे नवरात्र बसायचे. त्यामुळे इतर मैत्रिणी भोंडल्याची वाट बघत असायच्या.

शाळा साडेपाचला सुटायची. आई आजीने तयारी केलेली असायची. पाटावर आजी रांगोळीने हत्ती काढायची. त्यावर हळदीकुंकू वाहून, फुलांनी सजवायची. तजेलदार अशी केशरी पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं फार सुरेख दिसायची.

मैत्रिणी दप्तर ठेवून पळत यायच्या. कपड्यांची फारशी फिकीर नसायची. जरा बऱ्यापैकी फ्रॉक असेल तो घालायचा. वाड्यातल्या काकु, त्यांच्या मुली, सुना फेर धरायच्या. मध्यभागी पाट ठेवायचा आणि हातात हात गुंफून गोल फिरत गाणी सुरू व्हायची. वर्षानुवर्ष या गाण्यांचा क्रम ठरलेला असायचा. आम्ही सर्व गाणी रोज म्हणत होतो… हा वारसा परंपरेने आपोआप पुढे जायचा. आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. गंमत म्हणजे तेव्हा त्या गाण्याचा अर्थ माहित नव्हता. तो नंतर समजला….

.. ऐलोमा पैलोमा गणेश देवा… असं देवाचं नाव घेऊन भोंडला सुरू व्हायचा.

.. अक्कण माती चिक्कणमाती… या गाण्यात अस्स सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं… म्हणताना आई.. काकू खुसुखुसु हसत असायच्या. त्या का हसायच्या हे खूप वर्षानंतर कळलं.

.. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली… आणि श्री कांता कमल कांता…. हे वेड्याच्या बायकोचं गंमतशीर गाणं म्हणताना आम्हाला फार मज्जा वाटायची.

पूर्वी लहान असताना लग्न व्हायची. म्हणूनच ‘ कारल्याचा वेल लाव ग सुने.. ’ या गाण्यातून सासूबाईंचं ऐकायचं हा छानसा संदेश दिलेला आहे. तसंच पुढे सासुरवास होणार आहे.. हेही कदाचित सुचित करायचं असेल…

सुनबाईंच्या समाधानासाठी पुढचे गाणे आहे…..

‘सासुरवाशी सून रुसून बसायची…. ‘ सगळे समजवायला जायचे पण ती कोणाचचं ऐकायची नाही. नवरा जेव्हा समजवायला जायचा तेव्हा बाईसाहेब यायला तयार व्हायच्या….. सासरी गेल्यावर फक्त त्रास नाही तर प्रेम करणारा नवरा आहे… हे तिला माहित करून दिलं जायचं.

… नणंदा भावजया दोघी जणी

घरात नव्हतं तिसरं कोणी

या गाण्यात शेवटी…

… घे काठी घाल पाठी 

घराघराची लक्ष्मी मोठी 

अशा ओळी आहेत. घरातील लक्ष्मीचा आदर झाला पाहिजे… असं सांगितलेलं आहे. खरं तर सुखी जीवनाचं सार या गाण्यात आहे. अतिशय लडिवाळ गोड भावना व्यक्त करणार गाणं आहे.

आज ही गाणी लिहितानाही त्यांचा ताल, लय तो ठेका माझ्या मनात वाजतो आहे….

आता लक्षात येतं की खेळता खेळता शारीरिक व्यायाम होत होता. त्याबरोबर थोडसं शहाणपण शिकवणारी, मनाला आधार देणारी.. हसवणारी अशी ही गाणी होती. भोंडल्यानी आनंददायी वातावरण निर्माण व्हायचं. वाड्यातल्या लोकांचा एकोपा वाढायचा. संस्कृती परंपरा जपली जायची.

” आड बाई आडोणी 

आडाचं पाणी काढोणी

 आडात पडला शिंपला 

आमचा भोंडला संपला “

… इतकं साधं गाणं पण अगदी झोकात आणि जोरात म्हटलं जायचं.

नंतर खिरापतीची गंमत सुरू व्हायची.. ती ओळखता येणार नाही अशी करायची. कोणी ओळखली की जोरजोरात हसू यायचं… खिरापत खाऊन झाली की आमचा घोळका सुधाच्या घरी निघायचा.. तिथे हीच गाणी…. तेवढीच गंमत यायची…

किती सुखाचे दिवस होते…. सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता.

आज वाड्यातल्या काकू, ताई आठवल्या… न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली….. पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली… आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडेसुद्धा ती उचलून टाकायची…

… आम्हाला असं अथांग, निरपेक्ष प्रेम मिळालं…. हे आपल्या पिढीचे खूप भाग्य आहे….

देवी आईचं नवरात्र बसलं आणि आठवणीतून हे सगळं सुख मनात दाटून आलं… मन हळवं झालं…

आज त्या सगळ्यांच्या आठवणीसाठी हे चार शब्द….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वारसा ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ वारसा ☆ श्री जगदीश काबरे ☆

प्रत्येक माणसाचे जन्म आणि मृत्यूचे दिनांक ठरलेले असतात. त्याने जन्म कुठे घ्यावा आणि केव्हा मरावे एवढे मात्र त्याच्या हातात नसते. म्हणून जन्म हा मित्र असला तरी मृत्यू हा शत्रू नाही… ही दोन्ही आहेत ती फक्त शाश्वत सत्ये. 

माणूस जेव्हा हे सत्य स्वीकारतो तेव्हा त्याला जन्मदिनाचा आनंदही होत नाही आणि मृत्यूचे भयही वाटत नाही. त्यामुळे त्याला स्वतःच्या फसव्या समाधानासाठी अमर आत्मा, परमात्म्याचीही गरज लागत नाही. म्हणून तो मृत्यूला हसत हसत सामोरे जातो. कारण त्याला हे कळलेले असते की, मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत. आणि चेतना संपली म्हणजे सगळे संपते. 

माणूस शरीराने मरतो पण उरतो वारसा रूपाने. नंतर विचारभावना आणि जीवनमूल्यांच्या वारश्याच्या पलीकडे काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या प्रियजनांसाठी कोणता वारसा आपण मागे ठेवणार आहोत, हा विचार प्रत्येकानेच जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान मिळालेल्या काळात करायला हवा. नाही का?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कुत्र्याचे शेपूट…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “कुत्र्याचे शेपूट…” ☆ श्री सुधीर करंदीकर

कालचीच गोष्ट आहे, नेहेमीप्रमाणे सकाळी उठ्ल्यावर घराभोवती बागेत चक्कर मारायला बाहेर आलो. बऱ्याच दिवसांनी  बागेत भारव्दाज पक्षाला बघून मन प्रसन्न झाले. आजचा दिवस जरा जास्तच चांगला जाणार आणि कोणीतरी खास भेटणार हे नक्की. बायको मुलीकडे रहायला गेली असल्यामुळे चहाशिवायच फ़िरायला बाहेर पडलो. तेवढाच एक चहाचा कप पोटात कमी, म्हणून खुश झालो.

मारुती मंदिराशी आलो आणि ‘काका’, ‘काका’ असे मंजुळ स्वर कानावर आले. आसपास अजून कोणी काका नाहीत हे बघून मागे वळून पाहिले तर समोर मेघना आणि मनवा.

मनवा : काका, चालतांना थोडे आजूबाजूला पण बघत जा. आमचं लक्ष नसतं तर तुम्ही सरळ पुढे गेला असता!

मी : सॉरी, सॉरी. (मनामधे – अहो, सवयीचा परिणाम. बायको असली की नाही बघता येत, इकडे तिकडे)

मेघनानी बाजूच्या चहाच्या टपरीच्या दुकानदारांना खूण करून 3 चहा सांगितले.

मेघना : काका, इतक्यात कुठली ट्रीप वगैरे ?

मी : नुकतच एका लग्ना करता नागपूरला गेलो होतो. बायकोच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं.

मनवा : मग, आता आम्हाला व्हाट्सअप वर नागपूरचं टूर वर्णन कां?

मी : नाही, लग्न असल्यामुळे फार फ़िरणं झालं नाही. पण एक वेगळेपण नक्कीच सांगतो. आणि त्यावर मला  तुम्हाला एक शंका पण विचारायची आहे.

मी : लग्नाच्या आदल्या दिवशी तिथला मित्र शर्मा याच्याबरोबर त्याच्या बाईकवर नागपूर मध्ये भरपूर भटकंती केली. पण कंबर आणि पाठ यांना जाणवेल असा एकहि दणका तिथे बसला नाही. तिथे रस्त्यावर खड्डे खूप कमी दिसले आणि ते छोटे होते. काही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, पण सगळे एकाच जातीचे.

मेघना : ग्रेट. आता स्पीड ब्रेकर मधे जाती कुठून आल्या ?

मी : जाती म्हणजे प्रकार. तिथले सगळे स्पीड ब्रेकर प्लॅस्टीक सारख्या मटेरियलचे, पिवळ्या रंगाचे आहेत.

मनवा : वा:, आपल्याकडे अनगिनत स्पीड ब्रेकर तर आहेतच आणि प्रत्येकाची उंची वेगळी असते, रूंदी वेगळी असते. रस्त्यावरचे खड्डे काही ठिकाणी भयानकच आहेत. त्यामुळे प्रत्येक हाडाला दणका आणि खुब्याला हादरा बसलाच पाहिजे. चौकामध्ये खड्डा बघू, का सिग्नल बघू, का वेडेवाकडे चालणारे लोक बघू, का वाजणारा मोबाईल बघू, अशी गाडी चालवणाऱ्याची हालत होते.

मी : ह्यावरच माझी शंका आहे. एकाच राज्यात दोन्ही गावे आहेत. मग असा फ़रक का?

मेघना : काका, प्रश्न छानच आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हीच म्हणता की पुण्याचा ट्रॅफ़िक सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखे आहे.

मी : बरोबरच आहे, लोक आणि आजकाल लेडीज पण – सिग्नल पाळत नाहीत, स्पीड लिमीट पाळत नाहीत, नो एन्ट्री पाळत नाहीत. गाड्या उलटीकडून आणणे, फ़ूट्पाथवर नेणे, हे सगळीकडे दिसते. चालणारे कुठुनही चालतात. पार्कींग, साईड इंडिकेटर, हेडलाईट, हॉर्न, हे वेगळेच. हे सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखेच आहे.

मेघना : खरतरं आपल्याकडे कुठ्ल्याहि गावाचा ट्रॅफ़िक सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखे आहे.

कुत्र्यांमधे बऱ्याच जाती असतात. जाती म्हणजे ब्रीड. जसे पामेरियन, डॉबरमन, अल्सेशियन वगैरे.      

ब्रीड प्रमाणे शेपटाचा कडकपणा कमी जास्त असतो, गोलाई कमी जास्त असते. म्हणूनच, जसं ब्रीड, तशी त्याची कमी-जास्त कडक शेपूट आणि त्याप्रमाणे शेपूट सरळ करण्याचे वेगवेगळे तंत्र किंवा टेक्निक. म्हणून नागपूर वेगळे, पुणे वेगळे, मुंबई वेगळे, वगैरे.

मी : म्हणजे रस्त्यावरचे खड्डे, स्पीड ब्रेकरचे प्रकार, हीच ती शेपूट सरळ करण्याची टेक्निकस् आहेत असं आपण समजायचं का ?

हो, आणी नागपूरमध्ये इथल्यासारखे रम्बरलस् पण दिसले नाहीत. पुण्यात काही रस्त्यांवर तर थोड्या थोड्या अंतरावर रम्बरलस् ची माळ असते. गाडीचा वेग कमी केला, तर कंबरेला ‘दण–, दण–, दण–, दण–, ——–’ असे धक्के बसतात आणि वेग कमी नाही केला, तर कंबरेला ‘दण, दण, दण, दण, ——–’ असे दणके बसतात. काय करावे समजतच नाही.

मनवा : रम्बरलस् चा शोध लावणारा नक्की इथलाच असणार ! हा प्रकार आम्ही पण इतर कुठेहि बघितला नाही.

मेघना : तुम्ही म्हणता भूतान मधे स्पीड ब्रेकर नसतात आणि बऱ्याच ठिकाणी सिग्नल पण नसतात. तरीही वाहतूक सुरळीत असते. याला म्हणतात ‘समझ की क्रांति’. परदेशात स्पीड ब्रेकर नसतात, पण कायदे – कानून खूप कडक असतात, तिथे पण सगळे सुरळीत चालते. जिथे या दोन्हींचा अभाव असतो तिथेच शेपूट सरळ करण्याची टेक्नीक वापरावी लागतात !

इथे मोठे मोठे फ़्लाय ओव्हर बांधतात, भुयारी रस्ते बांधतात, तिथे खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बनवणे अशक्य  आहे कां ? रस्त्यावरच्या ड्रेनेज चेंबरचे झाकण रस्त्याच्या लेव्हलला आहे, असे इथे कुठेही बघितले आहे कां? चेंबरवरून गाडी गेली की दणका बसतोच. ही लेव्हल ठेवणे अशक्य आहे कां ?

मी : नक्कीच नाही. मग असे करत का नाहीत !

मनवा : काका, सगळ्याचा कर्ता – करविता ‘तो’ आहे. त्याची लीला तोच जाणे.

मेघना : काका, कुत्र्यानी मनात आणले तर तो आपली शेपूट स्वत: सरळ करू शकतो. कुत्र्यासमोर त्याच्यापेक्षा वरचढ कुत्रं आलं की तो आपली शेपूट सरळ करून पायामधे घेतो.

जोपर्यंत आपल्यामधे ‘समझ की क्रांती’ येत नाही किंवा समोर कडक कायदे येत नाहीत तोपर्यंत, तो आपली लीला करतच राहणार ! आणि तोपर्यंत —–आपण आहोत – आपले गाव आहे – ब्रीड प्रमाणे कुत्र्याचे शेपूट आहे – आणि कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याची टेक्निकस् आहेत – आपली पाठ आहे – आपली कंबर आहे. वर्षे गेलीत, तशीच अजूनही वर्षे जातील.

मी : वाह:, छानच माहिती मिळाली ! ‘समझ की क्रांती’ ला पर्याय नाही हे उघड आहे.

इस बात पर आज की चाय मेरी तरफ़से हो जाये!

मनवा : जरूर, बशर्ते की ——

आम्ही तिघेही एकदम : पेमेंट कैश नही, पेटीएम से होना चाहिये.

तेवढ्यात चहावाले म्हणाले :  मैड्म, बाजूला बघा, तुमच्या गोष्टी ऐकायला सगळे चहा पिणारे मोबाईल बंद करून भोवती जमा झाले आहेत. त्यांचे २-२ चहा झालेत. मला पण छानच् माहिती मिळाली. ‘समझ की क्रांती’ लानी ही पडेगी. आप तिनोकी चाय आज मेरी तरफ़से – ‘फ़्री’.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares