मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिवाळीतला किल्ला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दिवाळीतला किल्ला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

झाली एकदाची सहामाहीची परीक्षा… अभ्यासातून पोरं मुक्त झाली. आता दिवाळीची सुट्टी सुरू.. पण पोरांना खरे वेध लागले होते ते किल्ला बनवण्याचे…

तशी त्यांची चर्चा आधीच सुरू झाली होती. शेवटचा पेपर झाला की संध्याकाळी सोसायटीतल्या पोरांची सगळी गॅंग खाली जमली. चवथी.. पाचवीतल्या छोट्या मावळ्यांबरोबर नववीतले दोन सेनापती…. दादा होते.

दगड, विटा, माती कुठून कशी कोणी आणायची याची खलबतं सुरू झाली. मुख्य लागणार होत्या विटा…

मागच्या गल्लीत एका इमारतीचे काम सुरू होते. मग त्यातल्या त्यात साध्याभोळ्या दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या दोन पोरांना या कामगिरीवर पाठवण्यात आले.

ते दोघे अदबीने जाऊन तिथल्या सुपरवायझरच्या समोर उभे राहिले. आणि म्हणाले,

“काका एक रिक्वेस्ट होती. आम्हाला दिवाळीतल्या किल्ल्यासाठी विटा हव्या आहेत. मिळतील का?  दिवाळीनंतर आम्ही परत करतो. “

काकांना हसू आले. ते गावाकडून आलेले होते.. म्हणाले,

” देतो की.. पण अरे आता मातीच्या विटा नाहीत.. या सिमेंटच्या जड आहेत. त्या तुम्ही कशा नेणार?  

” काका ते आम्ही बघतो. “

” तुम्हाला जमतय का न्यायला…. मग घ्या या दहा-बारा विटा. “

कामगिरी फत्ते…

मुलं खुश. सायकली आणल्या… कॅरिअरवर दोन दोन विटा घेऊन आले. आसपास मिळतील तिथून दगड… किल्ल्याच्या बांधकामासाठी येत होते. छोट्या मावळ्यांना माती आणायला पाठवले जात होते. कोणी घरातून पोती आणली होती. तोपर्यंत अंधार पडायला लागला.

आयांच्या हाका सुरू झाल्या..

मातीने बरबटलेले शर्ट पॅन्ट…

पोरं घरी गेली.

दुसरे दिवशी सकाळीच गॅंग परत खाली हजर. दोन्ही दादांनी पन्हाळा किल्ल्याचा अभ्यास केला होता. यावेळेस तोच करायचा ठरला.

दादांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू झाले.

महाराजांचे सिंहासन तयार झाले. गडावर विहीर करणं अवघड व्हायला लागल्यावर पायथ्यालाच विहीर केली गेली.

मध्येच दोन चार जणांची भांडण सुरू झाली. त्यांच्यात समझौता केला गेला.

” खरं तर लाल मातीच्या चार विटा हव्या होत्या ” असं दादा म्हणाला.

मग दोघांनी.. न विचारता शेजारच्या बागेतून विटा चोरून आणल्या.

” चोरी करणं पाप आहे. महाराजांना असे वागणे कधी आवडले नसते. ” असं सांगून दादानी चोरून आणलेल्या विटा परत करायला लावल्या.. त्या दोन मुलांना रडू च आले….

पायऱ्या करताना अडचणी येत होत्या. तहानभूक विसरून पोरं कामं करत होती.

बऱ्याच विचारांनंतर तोफेची जागा ठरली. दोन वाघ होते त्यांच्यासाठी गुहा करण्यात आली.

किल्ला लवकर झाला तर अळीव पेरता येतील म्हणजे नॅचरल लुक येईल म्हणून दोन दिवस पोरं सतत कामं करत होती.

दोन पोरींना किल्ल्याच्या डेकोरेशनची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी हिरव्या कागदाची छान झाडं तयार केली. मोठी कमान किल्ल्याच्या दरवाजापाशी लावली.

गवळणी विहिरीजवळ ठेवल्या.

पोरींनी “पन्हाळगड “असं कार्डबोर्डवर सुरेख अक्षरात लिहून आणले.

किल्ल्याच्या नावाची पाटी तयार होती…. पण हा पन्हाळा वाटतोय की नाही हे कळत नव्हतं. दादाला आयडिया सुचली तो म्हणाला..

” किल्ला अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं आपण सांगूयात.. “. मग तसंच सांगायचं ठरलं..

खाली गाव, घरं, रस्ता, झाडं.. झुडपं भराभर तयार झाली. खरंतर मारुतीचं देऊळ करायचं होतं.. पण मारुती कोणाकडेच नव्हता. एक जण शंकराची छोटी मूर्ती घेऊन आला. ती मूर्ती डोंगरावर ठेवण्यात आली.

तटबंदी घालून झाली. पोरं आपणच केलेल्या किल्ल्याकडे कौतुकाने बघत होती. घराघरातून मातीची खेळणी आणली गेली. किल्ला सजवला गेला.

डोळ्यात तेल घालून पहारा देणारे मावळे दोघांनी आणले होते.

” तुझ्यापेक्षा माझेच मावळे जास्ती शक्तिमान आहेत “

असा थोडा वाद त्यांच्यात निर्माण झाला. पण गडाच्या संरक्षणासाठी चारही मावळे ठेवावे असा निर्णय देण्यात आला.

“आपला किल्ला फार भारी झालेला आहे. डोळ्यात तेल घालून त्याचे रक्षण करा. ” दादांनी बजावले किल्ल्याचे राखण करण्यासाठी दोन दोन तासांच्या बॅच ठरवण्यात आल्या.

आता किल्ला फायनली पूर्ण झाला होता.

दादानी शिवाजी महाराजांना त्यांच्या सिंहासनावर बसवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

इतिहासातही असेच घडले असेल….

शिवाजी महाराजांचे प्रेम…

तसेच त्यांची शिकवण मुलांच्या मनात जागृत करणारा हा….. दिवाळीतला किल्ला बनवायला मुलांना प्रोत्साहन द्या.

कारण तो नुसता किल्ला नव्हता. त्यातून मुलं खूप काही शिकत होती. नियोजन, एकता, आपापसातली मैत्री, प्रेरणा, काही वेळेस माघार घेणं, श्रमाची, कष्टाची जाणीव आणि अजून खूप काही….

यातुनच त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण त्यांना मिळत असते.

मुलांना मातीत चिखलात खेळू दे

शिवरायांकडून थोडी स्फूर्ती घेऊ दे

आवडीचा किल्ला बनवू दे

महाराजांचा जयजयकार करू दे..

तुम्हीही म्हणा…

“छत्रपती शिवाजी महाराज की जय”

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाई मी कशी? देवाने दिली तशी!… ☆ सौ. ज्योती कुलकर्णी ☆

सौ. ज्योती कुलकर्णी

 ? मनमंजुषेतून ?

☆ बाई मी कशी? देवाने दिली तशी!… ☆ सौ. ज्योती कुलकर्णी ☆ 

आमच्या घरात या पिढीतली मी पहिलीच मुलगी. काकूला तीन मुलेच! मी झाल्यानंतर माझा चुलत भाऊ माझ्या पाळण्यापाशी काहीतरी करत होता. (आई सांगायची हो! मला एवढं जुनं काही आठवत नाही.) तो धावत सगळ्यांना सांगत आला, ’ अंगला आऊला (मंगला काकूला) (त्याला काही शब्द म्हणता येत नसत) जादूची मुलगी झाली. तिचा पाय दाबला की लाल लाल होतो. आणि सोडला की रंग ‘……

मी कशाला सांगू माझा रंग तुम्हाला! तो गोरा होता तर लहानपणापासूनच शान मारायचा.

अशी मी खरोखरच जादूची होते की काय? माझ्या मनातले विचार तर जादू भरे असायचे. आम्ही सगळे जेवायला बसल्यावर आमच्या कडील वडीलधारे पोट्ट्यांना सांगायचे, ”पानात टाकायचे नाही! टाकले तर त्याची माळ करून तुमच्या गळ्यात बांधून देईन! ” तो पर्यंत मी पोळीचा कुस्करा वरणात कालवलेला असायचा. तो मी पानात टाकला तर हे कसे काय सुई धाग्यात ओवून गळ्यात बांधतील? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. अन मला मोठ्यांपैकी कोणी तरी वडीलधारे माझ्या समोर बसलेले आहेत आणि मी टाकलेल्या कुस्कऱ्याची दोऱ्यात माळ ओवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे डोळ्यापुढे दिसायचे.

थोडी मोठी झाल्यावर नंतरचा प्रसंग! सांगितलेले काम नीट केले नाही तर आई म्हणायची काडीने मलम लावून कामं होत नसतात. मला प्रत्येकाचाच शब्द शब्दशः खरा वाटायचा! ‘ मुंगेरीलाल के हसीन सपने’प्रमाणे! मला डोळ्यापुढे चित्र दिसायचे की मी काडीवर मलम घेते आहे आणि कसाबसा लावायचा प्रयत्न करते आहे. एक दिवस मी पूर्ण तयारीतच होते. आईने वाक्य उच्चारल्याबरोबर मी आईस्क्रीमची छोटी काडी घेऊन उभीच होते. व त्यावर घेतलेला मलम पायाला लावून दाखवला आईला! त्याबरोबर आईने मला असा जोरदार धपाटा लगावला की बस्स! असा धपाटा का बसला हे अजूनही मला कळत नाहीये हो….

मी कशी मॅट्रिक पास झाले कोण जाणे! माझ्या मॅडम म्हणाल्या ”झाल्या एकदाच्या रडत खडत पास! ”माझा एक भाऊ चिडवायचा ‘म्या केली ट्रिक अन् झाले मॅट्रिक! ’ माझ्या शेजारी राहणारी मैत्रीण मात्र नापास झाली होती. मी माझ्या वडिलांजवळ बसून काॅलेजचा फाॅर्म भरत होते. माझी ती मैत्रीण जवळच बसली होती. अचानक हमसून हुमसून रडायला लागली. खूप विचारलं तिला काय झालं म्हणून! शेवटी मी फाॅर्म भरतेय तर हिला वाईट वाटलं असेल असं समजून मी गप्प बसले तोच तिने गुगली टाकली, ”रंजू तू पण नापास झाली असतीस तर आपण पुढल्या वर्षी सोबत फाॅर्म भरला असता न गंऽऽऽ”.. …

काय काय सांगू बाई तुम्हाला? एक दिवस सासूबाईंनी आवाज दिला, ‘या गं पोरी हो जात्याला हात लावू लागायला. ’ महालक्ष्मीची आंबील त्या जात्यावरच दळायच्या. मला एकदम आठवलं! माझी आई म्हणायची की, “पाण्यात पडल्यावर पोहणं येतं, हातात लेखणी घेतली की लिहायला येतं, आणि जात्यावर बसले की दळायला येतं ” आईवर माझा खूप विश्वास त्यामुळे हे वाक्य माझ्यासाठी शंभर टक्के खरे होते.

तिचं हे वाक्य पक्कं लक्षात ठेवून मैत्रिणीकडल्या मोठ्या विहिरीत पोहायला गेले. तिच्या वडिलांनी मला मोठा दोर कमरेला बांधून दिला होता व धरला पण होता. त्यांना आम्ही सगळे तात्या म्हणत असूं. आईचं वाक्य ऐकून मी दिमाखात विहिरीच्या पायऱ्यांवरून पाण्यात उतरले शरीर पाण्यात जात नाही तोच आकांत केला. ’ तात्या मला वाचवाऽऽ’ ‘तात्या मला वाचवाऽऽ’…’ वर ओढा मलाऽऽ’ …झाले! पोहण्याच्या म्हणीची वाट लागली. लिखाणाचं तुम्ही बघतच आहात! आता जात्यावर बसून बघायचं राहिलं होतं.

पोहायला उतरले त्याच दिमाखात जात्यावरही बसले. झालं! जातं काही ओढवेना! मग काय! मी खुंट्याला नुसताच हात लावला. हात फिरवायची नुसतीच ॲक्शन! मग जातं त्यांनीच ओढलं. वरून त्यांच्या कानपिचक्याही मिळाल्या! ‘ तुला काय वाटलं, जात्यावर बसले की दळायला येतं! ’ त्यांच्या चेहेऱ्यावरचे जगातल्या सगळ्या सासवांसारखे वेडे वाकडे हावभाव बघून मी, ‘आईच तसं म्हणायची’ हे सांगितलंच नाही. ओठावरचं पोटात गिळून टाकलं! हो….. आधीच आई नेहमी म्हणायची मला, ‘ही पोरगी सासरी माझ्या नावाचा उद्धार करणार आहे म्हणून! ’ जाऊ दे झालं! कुणी न सांगताही झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली हेच काय कमी आहे?

एक दिवस रात्री मला झोपच येत नव्हती. मला सारखं वाटत होतं खोलीतल्या कड्यांना दोरी बांधून झोपाळा टांगावा अन् मला कुणी तरी झोके द्यावे. माझी कल्पना सत्यात येणार नाही हे लक्षात आले. शेवटी पुस्तक उघडून वाचत बसले. ह्यांना झोप लागली होती. वाचता वाचताच डास चावायला लागले. डास काही दिसत नव्हते. सावली मात्र दिसत होती. मी खाली सावली कडे बघून वर डास मारण्यासाठी टाळ्या वाजवत होते. तेही बसल्या बसल्याच! शरीर व टाळ्यांचे हात खाली डासांच्या सावली कडे बघून वर गोल गोल फिरवत. टाळ्या चालूच! टाळ्यांचा आवाजही वाढला होता. हे झोपेतून उठले व वैतागाने म्हणाले, ’ हे काय चालू आहे तुझं. घागरी फुंकतात तसं गोल गोल घुमणं आणि टाळ्या वाजवणं! ’ मी म्हंटले…..

”अहो अर्जुनाने फिरत्या मासोळीच्या पडछायेला बघून तिच्या डोळ्याला बाण मारला. मी फिरणाऱ्या डासाच्या छायेला बघून त्याला मारण्याचा प्रयत्न करते आहे. आणखी काय? ”. त्यांनी उठून गुड नाईट लावलं आणि म्हणाले चल झोप आता. माझा चेहेरा येवढासा झाला. येवढं अर्जुनाच्या पावलावर पाऊल ठेवून चालले होते त्याचं काहीच नाही?

सकाळी उठल्यावर नातेवाईकांचा फोन आला. आम्ही येणार आहे म्हणून! आता टाॅयलेट पासून सगळी सफाई एकदम कशी करायची? घरी कोणी येणार असलं की घर स्वच्छ आहे का? टाॅयलेट स्वच्छ आहे की नाही? पाहुणचार काय करावा? किती चिंता असतात नं आपल्याला? तेव्हढ्यात शाहरुख माझ्याकडेच येताना दिसला. त्याला चहा-पाणी न विचारताच सरळ बखोटीला धरून पिवळा ‘सं….. ’ दाखवला आणि म्हंटले…. ’माझा पिवळा सं….. पांढरा करून दे भाऊ, नाहीतर सरळ घराबाहेर हो. त्याला

कसं माहिती होतं कोण जाणे? हारपिक सोबत घेऊनच आला होता माझ्या कडे. माझा अवतार बघून त्यानी लगेच साफ करून दिला. मी खूपच खुश झाले येवढा मोठा स्टार आपल्या कडे येऊन. ……. साफ करून देतो म्हणजे काय?

रिटायर्ड झाल्यापासून यांचं टीव्ही बघणं फारच वाढलं जाहिराती पण पाठ होऊन गेल्यात. इतक्या की वस्तूचं नाव आठवण्या ऐवजी जाहिरातीतलं गाणंच आठवायचं त्यांना. एक दिवस म्हणाले, “अगं आपण लगे आय हाय आणायला जाऊ”. मला समजतच नव्हते, काय आणायला जायचंय ते! तेवढ्यात लागलेली जाहिरात दाखवली त्यांनी. त्या जाहिरात करणाऱ्याचं बनियनची जाहिरात करणं बघितलं. तो बनियन मध्ये अंगठे घालून गिरक्या घेत कृष्णभोवती राधा नाचते की राधेभोवती कृष्ण या थाटातलं नाचत होता. ते बघितलं आणि म्हणाले, ’काही नाही जायचं! ’ तर त्यांनी लगेच लागलेली दुसरी जाहिरात दाखवली. मग “ये नही तो कुछ नही” हे तरी आणू. (बरं झालं मी आधीच रोज घालायचे आतले कपडे आणून ठेवले होते. नाही तर माझ्या सोबत येऊन दुकानात ‘लगे आय हाय’, अन् ‘ये नही तो कुछ नहीं’ मागितले असते तर!) लगे आय हाय आणि ये नही तो कुछ नहीं सारख्या जाहिरातींमुळे त्यांचा खप किती वाढतो हा प्रश्न मनातच ठेवून मी त्यांच्याकडे अशा खाऊ गिळू नजरेने बघितलं आणि मनातल्या मनातच म्हटलं,

“जिथे शोधिशी हास्य मधुर तू
तिथे असे ती कवळी
गतकाळातील गोड स्मृतींना
तिथेच सोडून ये ऽऽऽऽ…. ”

वाचताना आपापल्या कवळ्या काढून ठेवल्या होत्या की लावलेल्या होत्या, जरूर सांगाल मला……

© सौ. ज्योती कुलकर्णी

अकोला.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला आनंदी राहायचे आहे! काय करू?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “मला आनंदी राहायचे आहे! काय करू?…” ☆ श्री सुधीर करंदीकर

कायम आनंदी राहणे हे सगळ्यांनाच आवडते. तरीपण आनंदी राहणारी मंडळी अगदीच बोटावर मोजण्या इतकीच असते.

आनंदी राहण्याचे बरेच मार्ग आहेत पण त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बायकोला खुश ठेवणे.

बरेच जण म्हणतील की दाखवलेला हा मार्ग अगदी बरोबर आहे, पण तो अतिशय खर्चिक आहे. निरनिराळ्या दुकानात त्यांना नेहमी नेऊन त्यांना खुश करणे हे खिशाला परवडणारे नसते.

सगळ्यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जसे बायकोला खुश ठेवण्याचा सोपा मार्ग आणि कठीण मार्ग.

अतिशय सोपा मार्ग म्हणजे बायकोबरोबर कॅरम खेळा, पत्ते खेळा, गाण्याच्या भेंड्या खेळा, आणि, प्रत्येक खेळामध्ये बायकोच जिंकेल अशी काळजी घ्या.

घरामध्ये बायको आसपास असताना बायकोच्या माहेरच्या मंडळींशी फोनवर गप्पा मारत चला, बायकोची तारीफ करत चला.

बायकोने केलेल्या जेवणाची / खाद्यपदार्थांची खुल्या दिलानी तारीफ करत चला. थोडं तिखट मीठ इकडे तिकडे झालं असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करा.

घरामध्ये झोका असेल, घराच्या बागेत झोका असेल, किंवा जवळच्या बागेत नेऊन तिथल्या झोक्यावर, बायकोला छान झोके द्या.

बायको एकदम खुश होणार आणि खुश राहणार हे नक्की. अनुभवाचे बोल असेहि म्हणता येईल.

चला तर मग या छोट्या छोट्या आणि अगदीच बिन खर्चिक गोष्टी करा आणि कायम आनंदी राहा.

देवाला पण आनंदी माणसं आवडतात.

देव प्रसन्न होणार आणि बायको पण खुश होणार…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खरेदीमय… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ खरेदीमय… ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची संध्याकाळ, निवांत होतो. बेल वाजली. दार उघडलं तर एकजण पार्सल घेऊन आलेला. आश्चर्याचा धक्काच बसला. सकाळपासून आलेलं तिसरं पार्सल. चेक केलं तर मुलीच नाव होतं. ती मोबाइलवर बोलत होती म्हणून सौंनी उत्साहानं पार्सल उघडलं.

“अय्या!! , मीने, तुझा ड्रेस आलाय. फार सुंदर आहे गं” मुलगी रूममधून धावत आली. नंतर मायलेकी ड्रेसच्या कौतुकात हरवल्या तर चिरंजीव अजूनही दुपारी आलेल्या शूज आणि जीन्समध्ये गुंतलेले.

दिवाळीच्या निमित्तानं वेगवेगळे ऑनलाइन सेल सुरू झाल्यावर घरात गेल्या काही दिवसात चार ड्रेस, दोन साड्या, चप्पल, बूट, चार टॉवेल, दोन जीन्स, चार बेडशीट, लिपस्टिक, सॅग, ट्रॅव्हल बॅग अशा अनेक वस्तूंची खरेदी केवळ स्वस्त आणि घरपोच मिळतायेत म्हणून झालेली. नवीन आलेल्या वस्तूंनी घर भरलं.

रोजच्या पेपरमध्ये बातम्या कमी अन जाहिराती जास्त येऊ लागल्या, आजूबाजूचं रंगीबिरंगी परिस्थिती यामुळे दिवाळीची चाहूल लागते. यंदाही तेच झालं. टीव्ही आणि सोशल मिडियावर जाहिरातींचा तुफान मारा, भरिसभर ग्रँड सेल, बिग धमाका सेल, महागड्या वस्तु एकदम स्वस्तात वगैरे वगैरे..

सतत पाहिल्या जाणाऱ्या मोबाइलवर सेलच्या जाहिराती पाहून नकळत वातावरण ‘खरेदीमय’ बनलं. काहीतरी घ्यायला हवं अशी मानसिकता तयार होते. त्यात ऑनलाइन खरेदी म्हणजे सुख. काहीच कष्ट नाहीत. फोटो बघायचे. आवडलं की ऑर्डर द्यायची. घरपोच डिलिव्हरी. मग काय……. काय घेऊ अन किती घेऊ अशी अवस्था. मोकाट खरेदी सुरू होते. ऑनलाइन प्रकारानं तर अक्षरश: वेड लावलयं. ऑनलाइन सेल हाच आमच्या घरातला चर्चेचा विषय त्या अनुषंगाने बरीच खरेदी झाल्यानंतर अचानक सौंचा अपराधभाव जागा झाला. स्वतःला दोष देणं सुरू. मी मुद्दामच काही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर न राहवून अस्वस्थ सौंनी सुरवात केलीच.

“अहो, मी काय म्हणते. ”

“बोला”

“आमची खरेदी झालीय. आता तुम्हांला काय घ्यायचं”

“काहीही नाही आणि ऑनलाइन तर अजिबात नको. ”

“तुम्हांला ना कशातच इंटरेस्ट नाही. ”

“हंss”

“नुसतं ‘हंsss’ काय. निदान बघा तरी आम्ही काय खरेदी केलंय”

“बघितलं की छान आहे. तुम्हांला आवडलं ना. मग झालं. ”

“तुमचे बरेच पैसे वाचवले त्याचं काही कौतुकच नाही”

“पैसे वाचवले की??? ”

“बास, आता उगीच खरेदीचा पंचनामा करू नका. ”

“विषय कुणी काढला? ”

“दिवाळीला खरेदी करायची नाही तर मग कधी?? . ”

“पूर्वी फक्त दिवाळीलाच मोठी खरेदी केली जायची. ”

“मिस्टर, आता काळ बदललाय”

“हो ना आणि माणसंसुद्धा. खरेदीचं कौतुकच राहीलं नाही. सतत चालूच असते. ”

“तरीही दिवाळीला खरेदी ही केलीच पाहिजे. शास्त्र असतं ते.. ”सौ हसली आणि खरेदीच्या हिशोबात मग्न झाली.

“अगो बाई, अकरा हजार खर्च झाले. कळलंच नाही. ”सौ.

“किती?? ”कपाळावर हात मारत मी ओरडलो.

“हो, आत्ताच हिशोब केला”

“हातात स्मार्ट फोन त्यावर जाहिरातींचा पाऊस मग डोक्यात स्वस्त सेलच भूत मग काय मोह होणारच. ”

“म्हणजे आम्हांला काही अक्कल नाही. ”

“मी असं काहीच म्हटलं नाही. ”

“मग काय? काय ते स्पष्ट बोला. ”

“शांतपणे ऐकणार असशील तर बोलतो”

“ते काय बोलताय त्यावर अवलंबून आहे”

“म्हणजे नक्की वाद होणार”माझ्या बोलण्यावर सौ मनापासून हसली.

“खरं सांगू. ”

“आता बोला असा मेसेज करू का ”

“तुला राग येईल पण.. ”

“मला मान्ययं, ऑनलाइनच्या नादात वहावत गेले आणि बऱ्याच नको असलेल्या वस्तू घेतल्या. ”

“घरबसल्या सगळं मिळतं त्यामुळे खिशाचा विचार केला जात नाही. बंपर डिस्काउंट, सेल, धमाका ऑफर हा सगळा भूलभुलैय्या आहे. आपण किती अन काय खरेदी करतो हे लक्षातच येत नाही. ”

“हो ना. बघता बघता भरपूर खर्च झाला आणि अजून दिवाळीची खरेदी बाकी आहे. ते कंपनीवाले, फार सुरेख जाहिराती करतात. फोटो तर असले भारी असतात ना की पाहिलं तरी घ्यावसं वाटतंय”

“हीच तर आयडिया आहे. भावनेला हात घालणाऱ्या जाहिराती करून गिऱ्हाईकांना मोहात पाडायचं आणि माल विकायचा. किमती वाढवून भरमसाठ रकमेची लेबल लावायची त्यावर जास्तीत जास्त डिस्काऊंट दाखवायचा हीच तर ट्रिक आहे आणि महत्वाचं म्हणजे आजही ‘स्वस्त’ या शब्दावर लोकांचा फार विश्वास व अतोनात प्रेम आहे. ”

“पण काहीवेळेला चांगल्या चांगल्या वस्तू स्वस्तात मिळतात. ”

“मान्य पण त्याबरोबर बिनकामाची खरेदी होते त्याचं काय?

“कळलं. आता दिवाळीला काही घेत नाही. ”

“चिडू नकोस. एवढंच म्हणायचं की खरेदी करताना करा पण भान सोडू नका. मोबाइलवर दिसतंय म्हणून घेत जायचं असं नको. ”

“तुम्हांला खरंच काही नको”

‘मला दुकानात जाऊन खरेदी करायला आवडतं. आपण जाऊ. ”

“मग मला पण एक साडी.. ”

“घेऊ की”आम्ही बोलत असताना मुलगी धावत आली अन मोबाइल पुढे करत म्हणाली 

“हा टॉप बघ कसला सुपर्ब आहे. घेऊ का”

“अजिबात नाही. आता फक्त सर्फिंग करायचं. ऑर्डर द्यायची नाही. कळलं”मुलगी हिरमुसली त्याच वेळेस ऑनलाइन टी शर्ट दाखवायला आलेले चिरंजीव न बोलता मागे फिरले. तितक्यात पुन्हा बेल वाजली.

“परत पार्सल” मी ओरडलो तेव्हा सौंना जोराचा ठसका लागला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे” – लेखक : मेजर जनरल विजय जगताप ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे” – लेखक : मेजर जनरल विजय जगताप ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

त्याचे असे झाले, २००२ सालातील ही गोष्ट आहे, आज त्या घटनेला बावीस वर्षे होऊन गेली. माझी मुंबईत नियुक्ती झाली होती आणि एक दिवस माझ्या हातात माझी खास नेमणूक झाल्याची ‘ऑर्डर’ पडली. मी उघडून वाचली मात्र, मी आश्चर्याने थक्क आणि आनंदाने वेडा झालो.

त्यामध्ये लिहिले होते, की – – 

‘मला भारताच्या सर्वोच्च अशा महान फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्या मुंबई भेटी दरम्यान सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ’

माझ्या वरिष्ठांनी किती मोठा विश्वास टाकला आहे, ह्या कल्पनेनेच भारावून गेलो होतो. पण थोड्या वेळातच मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली आणि मी भानावर आलो!

मी फिल्डमार्शल माणेकशा यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून त्यांच्या पुढील कार्यक्रमांची माहिती घेतली. लवकरच ते मुंबईमध्ये येणार होते. पारशी कुटुंबीयांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम योजला होता. त्या दोन दिवसांच्या त्यांच्या दौऱ्या मध्ये महान अशा सॅम बहादूर सरांना सतत दोन दिवस कारमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट करणे हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव होता. अगदी एक स्वप्न प्रत्यक्षात येणार होते.

त्या काळात त्याचा करिष्मा जबरदस्त होता. एखाद्या चुम्बकासारखे त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक होते. माझ्यासाठी त्यांचा ओझरता सहवास ह्या पूर्वी झाला होता, त्यांच्याशी संवाद WWII, 1971 पासून माझ्या राजपुताना रायफल्सच्या शौर्यापर्यंत, गोरखा सैन्यापर्यंत होता.

आता मुंबईमध्ये मी त्यांच्या आगमनाची वाट बघत होतो, आणि तो दिवस उजाडला. मुंबई विमानतळावर ते उतरले आणि मी त्यांना एक जोरदार सलाम ठोकून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. त्यांच्या बरोबर गाडीमध्ये बसणे हा देखील एक विलक्षण अनुभव होता. माझे लक्ष सतत सर्वत्र होतेच, एक हात खिशातील होल्स्टर मधील पिस्तुलावर होता.

पारशी समुदायाकडून एनसीपीए नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ उपस्थित राहणार होते.

आम्ही तिथे पोहोचलो. बाहेरील आवारात गर्दी होतीच, मी त्या गर्दीतून वाट काढत त्यांना सभागृहात घेऊन गेलो. आतमध्ये देखील मोठा जमाव जमला होता आणि जोरजोरात जल्लोष आणि पारशी गाणी गायली जात होती. अगोदरच स्टेजवर कोणीतरी निवेदन करत होते.

आम्ही आत शिरताच त्या निवेदकाने थांबून सॅमच्या आगमनाची घोषणा केली. संपूर्ण सभागृह क्षणभर शांत झाले आणि नंतर टाळ्यांच्या कडकडाटात सर्व श्रोते उभे राहिले, ‘सॅम सॅम’ असा जयघोष करत सभागृह डोक्यावर घेतले.

सर्व एका सुरामध्ये पारशी स्वागत गाणे म्हणू लागले.

त्यांना मध्यभागी असलेल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आले.

लोक त्याच्याभोवती गर्दी करू लागले, त्यांना ओझरता का होईना पण स्पर्श करू लागले, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी झटपटू लागले, काही जण त्याच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने बोलू लागले. त्यामध्ये भारतातील अत्यंत महान अशी पारशी घराणी होती.

माझ्यावरील जबादारीची जाणीव सतत मला होतीच. मी, माझ्या कर्तव्यानुसार सर्वांना दूर हलवण्याचा प्रयत्न करत होतो. सर्वाना विनंती करून बाजूला करून त्याच्याभोवती जागा बनवण्याचा प्रयत्न करत होतो.

तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.

मी या व्यक्तीला नम्रपणे हलण्यास सांगितले. पण त्या व्यक्तीने तितक्याच विनयाने हलण्यास नकार दिला, जमिनीवर बसलेल्या अवस्थेमध्येच त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,

काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ.

त्याचे डोळे करुणा, आदर आणि प्रेम आणि आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांची नजर हि माझ्या अंगावरील गणवेशाचा देखील सन्मान करणारी होती.

आणि

मी देखील त्या व्यक्तिमत्वाकडे बघून भारावून गेलो होतो,

पटकन मी थोडा मागे झालो, म्हणालो ‘होय सर. ’ 

समोर खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये नजर टाकली. समोर प्रेक्षकांच्या रांगांमध्ये खुर्च्यांवर गोदरेज, वाडीया, पूनावाला, भाभा, मिस्त्री अशी एकसे एक महान कुटुंबीय मंडळी बसली होती. माझ्या लक्षात आले कि, ‘हा मेळावा कोणाचा आहे, कोणता समुदाय आहे. आपले राष्ट्र महान होण्यासाठी ह्या समाजाने काय योगदान दिले आहे. अल्पसंख्याकांमधील पुन्हा अल्पसंख्याक, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म, परंतु व्यवसायापासून ते सशस्त्र दलापर्यंत, सामाजिक संस्था पासून ते वैज्ञानिकांपर्यंत, सर्वच क्षेत्रात भारताला बलवान करण्यात ह्यां समाजाचे अमूल्य योगदान आहे! . आरक्षण नसताना आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसतानाही या लोकांनी भारतासाठी इतकं काही केलं, त्याला तोड नाही…!

आणि आणि, ह्या सर्व पारशी समुदायाचे मेरुमणी असणारे टाटा कुटुंबीय कुठे आहे? त्यांचा कुटुंब प्रमुख कुठे आहे? माझी नजर हुडकत होती, होय, त्याच वेळी माझ्या डोक्यातील ट्यूब क्षणार्धात पेटली, माझे डोळे भरून आले! माझी मान पुढे वाकली, माझे दोन्ही पाय जुळले, पाठीचा कणा ताठ झाला, छाती पुढे झाली, मी मनातूनच काडकन सलाम केला!

– – – भारताचे सर्वोच्च सेनाधिकारी फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या समोर एक गुडघा टेकून खाली बसलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ते तर साक्षात रतन टाटा होते!

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती… होय, तेच होते महान रतन टाटा!

त्यांच्या नजरेत भारताच्या सर्वोच्च सेनाधिकारी असणाऱ्या ‘सॅम’ प्रती असणारा आदर भरून ओसंडून वाहत होता….. एका उद्योगाच्या बादशहाने भारतीय सैन्याच्या बादशाहाला दिलेला तो आदर युक्त सन्मान होता! एक मानवंदना होती.

माझा आयुष्यातील तो सर्वात प्रेरणादायी क्षण राहिला आहे.

महान रतन टाटा आणि सॅम बहादूर पुन्हा कधीही एकमेकांना भेटले नाहीत, परंतु ते माझ्या आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर आहेत.

आजही माझ्या डोळ्यामध्ये तीच आश्वासक नजर दिसते आहे, कानामध्ये तोच आवाज घुमतो आहे,

“काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ”.

.. स्व. रतन टाटा साहेब यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन… 

(दि. ९ ऑक्टोबर हा श्री. रतन टाटा यांचा स्मृतीदिन.) 

लेखक : मेजर जनरल विजय जगताप 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परमेश्वराचे दर्शन…आई… लेख क्र. १६ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ परमेश्वराचे दर्शन…आई… लेख क्र. १६ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“क्ष” – माझ्या तिसरीच्या वर्गातला अत्यंत शांत मुलगा.

काही दिवसांपूर्वी त्याची आई वारली. तो शाळेत पुन्हा येऊ लागला, तेव्हा पहिल्याच दिवशी प्रार्थना झाल्यावर माझ्याजवळ आला आणि त्याच्या आईचा छोटा फोटो दाखवून मला म्हणाला, “बाई, हा माझ्या आईचा फोटो. आता मी माझ्याजवळ हा फोटो ठेवणार. ”

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मलाच भरून आलं. आठ वर्षांचं ते छोटं बाळ, यापुढे आपली आई नाही हे कसं सहन करेल?

त्याला जवळ घेत मी म्हटलं, “अरे, हा फोटो म्हणजे तुझी आईच आहे. हा फोटो तुझ्या दप्तरात ठेव. म्हणजे तुझी आईच तुझ्यासोबत आहे असं तुला वाटेल. आईचं तुझ्याकडे नेहमी लक्ष राहील. तू जेवतोस ना? अभ्यास करतोस न? हे सर्व आई पाहणार आहे. त्यामुळे तू नीट अभ्यास करशील ना? ” त्याने हसून “हो” म्हटलं.

या लहान वयात आई नसणं किती वाईट! यांचं सर्व जगच आईभोवती फिरत असतं. आईशिवाय त्यांचं पानही हलत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आईच हवी असते. त्याला वर्गात पहात असताना सतत माझ्या मनात एक सूक्ष्म कळ उठत होती. आईविना हे लेकरू काय करील? माझ्या मनात असंख्य प्रश्न उठत होते.

आपल्याकडून आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून त्याला भरभरून प्रेम द्यायचं. आईची उणीव भरून काढण्याचा थोडासा प्रयत्न आपणही करायचा, असं ठरवलं. त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. गोडसं हसून तो जागेवर जाऊन बसला आणि मी माझा मोर्चा अभ्यासाकडे वळवला.

– लेख क्र. १६.

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘माका तुजें जडले पिशें…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘माका तुजें जडले पिशें…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘world sight day’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने..)

‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…

कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू! ” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे? …..

त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.

तेंव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची!

अ‍ॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं. ‘धन्य अ‍ॅना मिलार्ड बाई…! ’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!

त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले, ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला.

त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय.

मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्‍या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं..

बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible.. ’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.

शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्‍या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें…. ’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.

मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,….

….‘माका तुजें जडले पिशें….’

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतफेड – – ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

? मनमंजुषेतून ?

☆ परतफेड – – ☆ श्री विश्वास दाते ☆

रोजच्या गडबडीत मागे वळून पाहायला जमत नाही किंवा लक्षात पण राहत नाही. पण एकदा का भूतकाळात बघायचे विचार सुरू झाले की एखाद्या वेलीला धुमारे फुटावे तसे आठवणीच्या वेलीला नवीन कळ्या येऊ लागतात. वर्षानुवर्षे, कुठेतरी मेंदूच्या कप्प्यात हरवलेल्या आठवणी ताज्या होऊन समोर येतात. असाच अनुभव मला नुकताच आला.

१९६६ साली, इंजिनिअरिंग प्रवेश मिळाला खरा पण प्रश्न होता फी परवडण्याचा. आता गंमत वाटते की त्यावेळची वार्षिक रुपये ३६० ही फी सुद्धा आम्हाला परवडणारी नव्हती. सरकारी स्कॉलरशिप आणि कर्ज मिळाले तरच माझे इंजिनिअरिंग चालू राहणार होते. सुदैवाने मला मेरिट कम मीन्स (म्हणजेच चांगले मार्क आणि पालकाचे कमी उत्पन्न अशी अट असलेली) ही स्कॉलरशिप मिळाली.

परंतु इतर खर्च आणि पुस्तके यासाठी ती स्कॉलरशिप पुरेशी नव्हती. त्यामुळे मला सरकारी शैक्षणिक कर्ज (लोन) हेही घ्यावे लागले. चार वर्षे, लोनची रक्कम मला सेन्ट्रल बिल्डींग येथे मिळत असे. या दोन्ही सरकारी मदतीमुळेच माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले. व त्यामुळे पुढील आयुष्य बऱ्यापैकी सुखात गेले. यासाठी सरकारचा मी आजन्म ऋणी आहे.

खरी गंमत पुढेच आहे. १९७२ सालची गोष्ट आहे. दोन वर्षे नोकरी करून थोडे पैसे साठवल्यावर, मी माझ्या कर्जाची परतफेड करायची ठरवली. कर्जाचे पुस्तक आणि चेकबुक घेऊन मुंबईहून पुण्याला आलो आणि सेंट्रल बिल्डिंग मध्ये चौकशी करत एका कक्षात हजर झालो. संपूर्ण कक्ष एकंदर शांततेत होता. कामाची गडबड अजिबात दिसत नव्हती.

मी जन्मभर सरकारी कचेऱ्याना आणि त्यांच्या मधून येणाऱ्या पत्राना घाबरत आलो आहे. त्या दिवशीही, धडधडत्या छातीने घाबरत, तिथे बसलेल्या एका व्यक्तीला विचारले, “नमस्कार, शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी कोणाला भेटू. ”

वर न बघता त्याने दुसऱ्या एका व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश केला. तेथे बसलेल्या व्यक्तीने, त्याच्या शांततेत भंग झाल्यामुळे थोड्याशा चिडक्या आवाजात विचारले, “काय पाहिजे? ”

मी माझे कर्जाचे पुस्तक पुढे करत सांगितले, “१९६६ ते १९७० या काळात, मी शैक्षणिक कर्ज घेतले होते. गेली दोन वर्षे पुरेसे पैसे साठवण्यात गेले. आता त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आज मुंबईहून आलो आहे. ”

कुणीतरी एखाद्या मंगळ ग्रहावरून आलेल्या माणसाकडे पहावे तसे तो माझ्याकडे बघत राहिला. थोडा वेळ शांततेत गेला. मला पण अपराध्यासारखे वाटू लागले.

“अहो, हे लोन कुणीच परत करत नाही. तुम्ही कशाला या फंदात पडताय? ”

कदाचित माझ्या आधी, काही विद्यार्थ्यांनी कर्ज परत केलेही असेल परंतु मला पळवून लावण्याचा हा एक डाव असावा.

“अहो, मी खरंच माझे कर्ज फेड करू इच्छितो. तुम्ही कृपया गेल्या दोन वर्षाच्या व्याजासह, मी किती रक्कम भरायची तेवढे मला सांगा. ”

‘कोण वेडा आला आहे आणि मला काम करायला सांगत आहे’ हाच विचार त्या गृहस्थाच्या मनात आला असावा. सरकारला पैसे मिळणार यापेक्षा स्वतःला काम करायला लागणार याची जास्त फिकीर त्याला असावी.

“तुम्ही कर्ज परत करायला आलेले पहिलेच” असे पुटपुटत त्याने मला बाहेर बाकावर बसायला सांगण्यात आले. थोड्यावेळाने दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. मी पण जवळच्या ठेल्यावर काहीतरी खाऊन आलो.

नंतर, मी परत एकदा आत जाऊन, ‘मला मुंबईला परत जायचं आहे, तरी कृपया लवकर लवकर मोकळे करा’ अशी विनंती केली. जेवणाच्या सुट्टीनंतर मी परत हजर होईन अशी त्याची अपेक्षा नसावी. तेव्हा मात्र, त्या कर्मचाऱ्याला ‘मी पैसे परत करण्याबद्दल खरंच गंभीर आहे’ असे पटले असावे.

त्याने आज जाऊन भिंतीला लावलेल्या फाईलच्या ढिगाऱ्यातून, कुठून तरी लाल फितीतली एक फाईल धूळ झटकत बाहेर आणली. वर्षानुवर्षे सरकारी रेकॉर्ड ठेवण्याबद्दलच्या शिस्तीबद्दल माझा आदर अचानक खूप वाढला. मग बराच वेळ काहीतरी आकडेमोड करत, अखेरीस त्याने मला एक रक्कमेचा आकडा सांगितला.

तोवर साडेतीन होऊन गेले होते. माझ्याकडून चेक घेऊन, त्याने माझ्या पुस्तकावर कर्ज संपल्याचा शिक्का मारला. त्याचे आभार मानून, मी एक दीर्घ सुस्कारा सोडत परतीच्या प्रवासासाठी पुणे स्टेशनकडे धाव घेतली.

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कर्माचा सिद्धांत… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ कर्माचा सिद्धांत…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

जर तुमच्या कृतीने इतरांचे भले झाले, त्यांना आनंद झाला, तर ते चांगले कर्म समजले जाते. आणि तुम्ही असे चांगले कर्म केलेत, तर त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळतेच मिळते.

…. याउलट, तुमच्या एखाद्या कृतीने दुसऱ्या कोणाला वेदना अथवा त्रास झाला, तर ते वाईट कर्म समजले जाते, आणि त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळते.

– – आणि हाच कर्माचा साधासोप्पा सिद्धांत आहे.

सोमवार सकाळ, चिंचवड स्टेशन, सकाळी ६:३५ ची वेळ. तमाम चाकरमान्यांना मुंबईला घेऊन जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसची वेळ झाली होती. वीकेंड संपवून आठवडाभर कामाच्या गाड्याला पुन्हा जुंपले जाण्यासाठी, नाईलाजाने व दुःखीकष्टी चेहऱ्याने लोकं “आलीया भोगासी असावे सादर” म्हणत फलाटावर उभे होते.

 

तोबा गर्दी होती. गाडीचा भोंगा वाजला, इंजिन दिसू लागलं, आणि रेटारेटी सुरू झाली.

मी आठव्या डब्याशी उभा होतो, सिंहगड एक्सप्रेसचा आठवा डबा चिंचवड स्टेशनला उघडतो, त्यामुळे या डब्यात, पटकन चढता आलं, तर थोडं नीट उभं राहता येतं, आणि नशीब चांगलं असलं, तर चक्क बसायलाही जागा मिळते.

अन्यथा बाकी सर्व विनाआरक्षित, सामान्य (जनरल) डबे मुंबईच्या लोकलच्या गर्दीच्या तोंडात मारेल असे तुडुंब, खचाखच आणि ठासून भरलेले असतात, आणि निदान कल्याण स्टेशन येईपर्यंत दोन तासतरी एका पायावर उभं राहण्याची तपश्चर्या करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते.

मी काही मुंबईला नोकरीला जात नाही, अचानक एका कामानिमित्त जायचं ठरलं म्हणून आरक्षणाशिवाय आज हा असा फलाटावर उभा होतो.

गाडी तशी थोडी धीम्या गतीनेच येत होती आणि नजरेसमोरून जाताना, निम्मा सहावा डबा (विना आरक्षित) चक्क रिकामा दिसला. मी ललचावलो. आणि गाडी थांबण्यापूर्वीच, चालत्या गाडीचा सहावा डबा पकडण्यासाठी मी धाव घेतली.

मी आता अगदी दरवाजा पकडणार, तेवढ्यात एका माजोरी, उर्मट, उडाणटप्पू तरुणाने मला धक्का दिला, माझ्याआधी दरवाजा पकडला, आणि मान मागे वळवून, माझ्याकडे बघत, छद्मी हसत, “जितं मया” आविर्भावात, मला उद्देशून “हट बे बुढाऊ” म्हणत, ढांगा टाकत त्या रिकाम्या डब्यात घुसला, खिडकीची जागा पकडायला धावला आणि…

… एका दारुड्या माणसाने केलेल्या गलिच्छ उलटीमध्ये पाय पडून तो घसरला. त्या डबाभर पसरलेल्या त्या उलटीत तो लडबडला, पार उलटापालटा झाला, आपादमस्तक माखला.

बाकीची गाडी खच्चून भरलेली असूनही डब्याचा हा भाग रिकामा असण्याचं कारण आता कुठे ध्यानात येत होतं. उलटीपासून सुरक्षित अंतर ठेवून अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू फुटलं, पण त्या ढवळल्या गेलेल्या उलटीच्या नव्याने पसरलेल्या उग्र वासाने त्यांनी पटकन आपले चेहरे आणि नाकं रुमालाने झाकली.

मी त्या डब्याचा नाद सोडला, गाडी थांबत होती, चिंचवडला उघडला जाणाऱ्या डब्यात already खूप गर्दी झाली होती, मी त्यात शिरलो, त्या अमाप गर्दीत सँडविचमधल्या काकडी – टोमॅटोसारखा चेपलो गेलो, अगदी एका पायावर जेमतेम उभा होतो म्हणा ना.

पण त्या घाणीत लडबडलेल्या त्या टपोरीपेक्षा मी खूपच सुखात होतो.

Karma returns, जैसी करणी वैसी भरणी हा “कर्माचा सिद्धांत” पुन्हा एकदा सार्थ ठरला होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आठवण अशीही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “ आठवण अशीही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गाठोड्यातली भांडी हा माझा लेख वाचून दादांचा मला फोन आला. लेख वाचला की मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते नेहमी मला फोन करतात. म्हणाले,

” ताई तुम्ही मैत्रिणीला कडीचा डबा दिला हे मला आवडले. मी मात्र शाळेत असताना डबा कधी नेला नाही.. “

 त्यांना म्हटलं,

” का बरं.. ?

 तर ते म्हणाले,

” ताई घरची फार गरीबी होती. आई वडील रोजंदारीन दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायचे. हातावरचं पोट होतं. फडक्यात आई भाकर आणि मिरचीचा खर्डा द्यायची. तोच आमचा डबा…. पण त्याची कधी लाज वाटली नाही. कारण शाळेतली निम्मी मुलं फडक्यातच भाकरी बांधून आणायची. अगदी नेहमीच होतं ते.. शाळेतले मास्तर खूप चांगले होते. म्हणून शाळा आवडायची. त्यांच्यामुळे शिकलो….. पुढे मी नोकरी केली. अभिमानाने त्यांनी सांगितलं. “

नंतर दादा बराच वेळ बोलत होते.

आज दादांचा फोन ठेवताना डोळे भरून आले होते…

मला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. आम्ही तेव्हा माढा या सोलापूर जवळच्या गावात राहत होतो. खूपदा सकाळच्या गाडीने सोलापूरला जाणे व्हायचे. ती गाडी येऊन ऊभी राहिली की ड्रायव्हर जवळच्या जागेत लोक जर्मनचे दोन पुडाचे टिफिनचे डबे आणून ठेवायचे. त्याला चिठ्ठी लावलेली असायची. फडक्यात गुंडाळून भाकऱ्या ठेवलेल्या असायच्या. डब्याच्या हँन्डलला त्याची गाठ मारलेली असायची.

सोलापूरला शिकत असलेल्या मुलांना आई इथून दोन्ही वेळेस चा डबा द्यायची. ड्रायव्हर लोकही समजून वागायचे. एखादे वेळेस डबा यायला वेळ झाला तर ड्रायव्हर गाडी थांबवायचे. लांबूनच पळत पळत वडील, भाऊ, बहिण कोणीतरी डबा घेऊन यायचे.

जाताना जिथे बसचा थांबा नाही तिथेही कोणीतरी डबा घेऊन उभे असायचे. ड्रायव्हर गाडी थांबवायचे. शहरात बाहेरचं खाणं मुलांना परवडायचं नाही. मुलांना गाडी यायची वेळ माहित असायची. स्टॅन्ड वर येऊन मुलं डबा घेऊन जायची

एस टी महामंडळाने ही चांगली सेवा चालू केली होती.

आता वाटतं…. या आया पहाटे कधी उठत असतील ?स्वयंपाक कधी करत असतील?

 लेकरावरची माया असते आईची ती… मोठे झाल्यावर आईचे कष्ट ही मुलं लक्षात ठेवत असतील. आपलं पोरगं शिकून शहाणं व्हावं एवढीच आई बापाची इच्छा असते. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. पोरांनी आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून वागावं एवढीच माफक अपेक्षा असते.

दादा फोन ठेवताना म्हणाले होते,

“तशी भाकर आणि खर्डा परत खायला मिळाला नाही. आज तुमच्यामुळे किती दिवसांनी ही आठवण आली. वाटलं आईच्या लुगड्याचं एखादं तरी फडकं जपून ठेवायला हवं होतं… “

हे सांगताना त्यांचा स्वर हळवा झाला होता…

आपण आपल्याच नादात ठराविक वर्तुळात आपलं जीवन जगत असतो. छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख वाटून घेऊन कुरवाळत असतो. पण त्याच्याही पलीकडे अजून खूप काही आहे…….

 असं करूण वास्तव समोर आलं की आपल्यालाही जरा भान येतं….

न कुरकुरता शांतपणे जगण्याचं…..

आज दिवसभर आठवत राहिली ती फडक्यातली भाकरं आणि तो खर्डा..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares