मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खोपा शिडीला टांगला ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ खोपा शिडीला टांगला ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

‘टाटा मोटर्स’चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कशिया, स्पथोडिया, ग्लिरिसिडिया, जकरेंडा, पेल्टाफोरम, बाटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल!  जगविख्यात पक्षिनिरीक्षक डा. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी.

चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची ‘इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी. ‘ ‘टेल्को’ कंपनीने ती ताब्यात घेऊन तिथे आपली ‘ मशीन टूल डिव्हिजन’ सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला ‘स्टडर्स बिल्डिंग’ नावाची, इंग्रजी ‘सी’ च्या आकाराची एक बैठी एकमजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतींपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागे उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळे तिथे अनेक पक्षांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत ‘आर अँड डी १’, ‘मेकनिकल अँंड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग’ आणि मेट्रोलॉजि’ हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती.

ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी तीन-चारची वेळ होती. आकाश झाकळून आले होते. सर्वत्र अंधार पडला होता म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हा लक्षात आले की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथल्या ट्यूबलाईट्स लागत नाहीयेत. मी लगेच सी पी ई डीला (सेंट्रल प्लांट इंजिनियरिंग डिव्हिजन) फोन करून कळविले आणि सर्व नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. पाच वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळे मी घरी निघून गेलो.

दुसऱ्या पाळीतील सी पी ई डी च्या कर्मचाऱ्याने तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधील सर्व दिवे बसवले. त्याचे हे काम होईतो जेवणाची सुट्टी झाली. त्याने बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथेच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढे सात-आठ दिवस ती तशीच पडून राहिली.

एक दिवस माझ्या दृष्टीस ती शिडी पडली. मी सी पी ई डी ला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितले. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळाने शिडी न्यायला एक जण आला पण त्याने शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत, आला तसा परत गेला. शिडी तिथे कोपऱ्यात होती तशीच उभी!

दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, “काय चाललंय हे?  ती शिडी का नेत नाही तुम्ही?  आता आठ दिवस होऊन गेले इथले काम करून. काम झाल्यावर पुढचे निस्तरायला नको वेळच्यावेळी? ” पलीकडून मलाच प्रश्न झाला, “काय?  अजून नाही नेली?  कमाल आहे. मी कालच सांगितलं होतं आणायला. इथे आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलंय त्यामुळे. मी आत्ता लगेच पाठवतो कोणालातरी आणि उचलून आणतो. ” मी तरीही जरा जोरातच बोललो, “आत्ताच्या आत्ता हलवा इथून. आहो, म्हणजे आम्ही फाईव्ह एस ची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही ही अशी गलथान कामं करायची?  ते काही नाही. त्वरित उचला इथून. “

तो कर्मचारी परत आला पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमधे शिरला आणि अजिजीने म्हणाला, “एक्स्ट्रिमलि सॉरी सर. काईंडली एक्स्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्या जवळ गेलो तो माझ्या लक्षात आले की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्षांची जोडी आपले घरटे करत्येय. ते अर्धेअधिक झालंय करून. पुढच्या चार-पाच दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी काडी गोळा करून घर बांधायला घेतलंय. दिवसभर आळीपाळीने हेलपाटे मारतायत दोघही. समजा, मी ही शिडी नेली तर त्याचे घरटे तुटेल. दोघांनी केलेले काम वाया जाईल. त्यांचे घरट्याचे स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या साऱ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचा सगळा शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्षांचा अंडी घालण्याचा हा सिझन आहे. म्हणून तर त्यांची लगबग चाललीय येवढी. अशात एखाद्याचे घर असे विनाकारण उध्वस्त करणे बरे दिसते का आपल्याला, तुम्हीच सांगा. असे पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाहीए. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो. पण मनाला पटत नाही हे. सांगा काय करू?  नेऊ का राहू देऊ तिथेच?  महिन्याभाराचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रssकन् उडून. प्लीज कोआँपरेट करा सर. “

त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात येवढे आर्जव होते की मला काय करावे हेच सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे दोन-तीन आपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे पटले असावे. खरे म्हणजे मलाही त्याचे म्हणणे पटले होते. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचे कौतुक करावसे वाटत होते.

तरीही मी म्हणालो, ” अरे असे कसे करता येईल. पुढचे दीड-दोन महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी, त्यावर धूळ, कोळिष्टकं जमायला!  त्या भागाची झाडलोट, स्वच्छता होणार नाही. इट विल लुक अग्लि, अन्-टायडी, इनडीसेंट अँड विच इज नाट अक्सेप्टेबल”.

यावर माझ्याच शॉपमधला एक पुढे आला आणि म्हणला, ” सर, त्याची काळजी आम्ही घेऊ, इथे काम करणारे सगळे. ” “काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार?  जे दिसायला कुरूप आहे त्याला कसे रूप देणार तुम्ही?  उगीच काहीतरी आपलं. ” मी तरीही विरोध दर्शविला.

त्यावर दुसरा म्हणाला, “सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या. उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा. नाही तर हा त्याची लडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण फाईव्ह एस च्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. फाईव्ह एस चे आडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथेच, या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेऊ. साऱ्या जगाला दाखवू आपले कर्तृत्व. ” 

हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परस्पर संबंधांत ताण निर्माण करू पहात होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सहृदयता, भूतदया, पर्यावरणाचे भान, जबाबदारीची जाणीव इ. अनेक जीवनमूल्ये व व्यवसायमूल्ये डोकावीत होती. त्यांचा आदर करणे आवश्यक वाटले मला.

क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथे. बघू नंतर. ” माझा निर्णय सगळ्यांना आवडला. “थक्यू सर. आम्ही काळजी घेऊ. ” असे म्हणत सगळे पांगले, आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मी ही मिटिंगला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफेसमधे आलो. दिवसाच्या कामाचे शेड्यूल सहकाऱ्यांना समजून सांगितले. कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेले टपाल पहायला सुरवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, “सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का?  बघा कसं झालंय ते. ” त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो, “नंतर कशाला?  हा आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो. ” 

बाहेर येवून बघतो तो काय!  शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचे घरटे आकार घेतच होते. पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचे कुंपण उभारले होते. शेजारी एक स्टँड उभा करून त्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते, “please don’t disturb. Work in progress”.

जवळच्या एका झाडाच्या फांदीवर दोन पत्र्याची लहान डबडी लटकवली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो!

 विशेष म्हणजे ज्या ‘फाईव्ह एस’ या जपानी व्यवस्थापनतंत्राचा अवलंब करण्याचे धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचे प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले होते त्या तंत्रातील सूत्रांचे तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले होते!

त्यांना हे तंत्र इथे अवलंबायला कोणी सांगितले?  कोणी शिकवले?  निसर्गातील सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमि, जल, वायू, पर्यायाने आपले पर्यावरण या विषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक, दक्ष आहेत?  ‘हो, आहेत’, हेच या प्रश्नाचे उत्तर. समोर दिसतंय हे त्याचे एक उत्तम उदाहरण!

निसर्गातील सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरुक आहेत, गंभीर आहेत हे पाहून धन्य वाटले. कारखान्यातील तंत्रज्ञान, कौशल्ये इ. विषयात त्यांना प्रशिक्षित केले जाते. ती व्यवसायिक गरज असते. तसे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्ये, सुरक्षितता, समाज विकास इ. विषयी सुद्धा त्यांना प्रशिक्षित केले जाते हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचे वैशिष्ठ्य. हे त्यांना शिकवलेले ज्ञान खालपर्यंत झिरपत आहे हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला, पावलोपावली जे ज्ञान आणि भान दिले जाते, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता.

 मी त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचे आभारही मानले कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून!

पुढील दोन महिने माझे सर्व उत्साही सहकारी एखाद्या पहिलटकरीण लेकीची काळजी तिचे आई-वडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहगयुगुलाची!  त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर ” Entry prohibited”. ते स्वतःही सारे लांब उभे राहूनच काळजी घ्यायचे.

यथावकाश पक्षिणीने त्या घरट्यात चार अंडी घातली. दोघांनी आळीपाळीने ती उबवली. त्यातील तीन अंड्यातून पिले बाहेर आली. एक अंडे वाऱ्यामुळे खाली पडून फुटले. पुढील पंधरा-वीस दिवस हे पिलांचे भरण-पोषण-शिक्षणात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करीत ती पिले घरट्यातून आकाशात आत्मविश्वासाने झेपावली!

ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटे बांधले, त्यात आपला संसार थाटला, तीन पिलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन करून जगायला सक्षम बनवले ते पक्षाचे जोडपे मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासे झाले. आम्ही कर्मचारी मित्रांनी दोन-तीन दिवस त्यांची वाट पाहिली. पण कोणीच फिरकले नाही!

साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि आफीसमधे प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या ‘त्या’ कोपऱ्याकडे लक्ष गेले. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्यावर उभारलेले घरटे अदृष्य झाले होते. फुलांच्या कुंड्या, साखळीचे कुंपण, जवळचा स्टँड, हे सारे उचलले गेले होते. खालची जमीन धुऊन पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवले होते. त्यावर लिहिले होते…

Project completed successfully!  

Thanks to all team members for their active support and participation.”

– Birdees.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यसन – तसे आणि असे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ व्यसन – तसे आणि असे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

साक्षी शहरात लहानाची मोठी झालेली, पण तरीही बऱ्यापैकी orthodox मुलगी. गावातल्या शेती सांभाळून नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न झालं, आणि साक्षी अधून मधून शेतावरही जायला लागली.

दिवसभर शेतात काम करणाऱ्या बायका पाहिल्या की राहून राहून तिला प्रश्न पडायचा – यांची बाळं दिवसभर आयांशिवाय कशी राहत असतील?

न राहवून एके दिवशी तिने हा प्रश्न शेतात काम करणाऱ्या एका बाईला विचारलाच. आणि तिचं उत्तर ऐकून अवाक झाली. “तुला माहितीये की ती बाळं आयांशिवाय दिवस – दिवस कशी राहतात ते?  अग, त्या बायका त्या एवढ्याश्या मुलांना कप कप ताडी (दारू) पाजतात. मग काय दिवसभर ती लेकरं झिंगलेल्या गुंगलेल्या अवस्थेत रहातात.

जसजशी मुलं मोठी होतात, तशी आणखीन आणखी ताडी रिचवतात. बरं, आई वडिलांनी चार उपदेशाचे सल्ले सांगावेत, तर ते स्वत:च मुलांसमोर – आज काय आनंद झाला आहे म्हणून, तर उद्या दु:ख झालं म्हणून, नि परवा सहज म्हणून दारू पितात. मुलांना काय आदर्श रहाणार?

ही व्यसनं मुलांची आयुष्यं बरबाद करत आहेत. “

काळ वाटचाल करत राहिला.

नवऱ्याची नोकरी बदलल्यावर साक्षी त्याच्याबरोबर शहरात आली होती. तिलाही एक गोजिरवाणा मुलगा झाला होता आणि तो आता तेरा वर्षांचा – म्हणजे इंग्रजी परिभाषेत teen ager झाला होता. आज साक्षी, त्याच मैत्रिणीला, मुलगा सदैव कसा मोबाईल घेऊन बसला असतो ही तक्रार करायला फोन करत होती.

“अग, आल्या गेल्याशी सोड, आम्हा आई बाबांशीही बोलणं नाही. धड अभ्यासाकडे लक्ष नाही की खाण्याकडे. शाळेत जातो हे आमच्यावर उपकारच समज. घरी आला की मोबाईल सुरू.

रात्री कधी उठून पाहिलं तरी हा मोबाईलमध्ये डोस्कं खुपसून बसलेला असतो. रात्री झोपायला उशीर म्हणून सकाळी उठायला उशीर. चष्मा लागला आहे, मान दुखते म्हणतो.

या सगळ्याला तो जळला मोबाईल कारणीभूत आहे. आम्ही दोघंही त्याच्या कानीकपाळी ओरडत असतो – ठेव तो मोबाईल, जरा मैदानी खेळ खेळायला जा, जरा घाम तर येऊ दे. पण उपयोग शून्य. “

मैत्रिणीला साक्षीचेच जुने डायलॉग आठवले.

लहानपणी या मोबाईलचं व्यसन साक्षीनेच मुलाला लावले. त्याला दोन घास भरवायचे असले की ती त्याला मोबाईलवर व्हिडिओ लावून द्यायची. आपल्याला सीरिअल पहायची असली की त्याला मोबाईल गेम चालू करून द्यायची.

तोंडाने सांगायचं मोबाईल वापरू नकोस, पण या ना त्या कारणाने स्वतः साक्षी आणि नवरा, दोघेही खूप मोबाईल वापरायचे.

मग करोना काळात तर मुलांना, शाळेच्या बहाण्याने, मोबाईल वापरायचं परमिटच मिळालं. लेकाला स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला गेला आणि मग तो जास्तच वहावत, जास्तच गुरफटत गेला.

“माझं ऐकशील का? , ” मैत्रीण साक्षीला विचारत होती. “पहिलेप्रथम तुम्ही दोघं नवराबायको आपला मोबाईल वापर मर्यादित करा. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही तोंडाने त्यांना उपदेश करत असाल पण स्वतःच त्यात आकंठ बुडाले असाल, तर ही विसंगती मुलं पटकन ओळखतात.

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्याला सांगा, समजावून द्या. त्याच्या झोपेची गणितं कशी बिघडली आहेत, आणि त्याने आरोग्य कसं बिघडलं आहे, ते दाखवून द्या.

Family time ठरवा, त्यात कोणी मोबाईल वापरणार नाही, एकमेकांशी गप्पा मारू असं ठरवा आणि अंमलात आणा.

हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात तर करा. दारूचं व्यसन असो वा मोबाईलचं, ते सोडलं पाहिजे असं व्यसनी माणसाला स्वतःहून वाटलं पाहिजे.

पण याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. लहान मुलाला गूळ खाऊ नकोस म्हणून उपदेश करण्यापूर्वी, स्वतः रामकृष्ण परमहंसांनी आठवडाभर गूळ खाणं सोडलं होतं, आणि मगच उपदेश केला होता.

व्यसन, मग ते दारूचं असो वा मोबाईलच्या अति वापराचं, दोन्हीही घातकच. ” समेवर येत मैत्रीण म्हणाली आणि साक्षीच्या विचारांना आणि तदनुसार कृतीला चालना देत, तिनं फोन ठेवला.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. माधवी त्याची वाटच बघत होती.

“आज बराच उशीर केलात यायला “

माधवीनं विचारलं

“हो. सध्या मंथ एंड आहे ना! त्यामुळे मिटिंगवर मिटिंग

सुरु आहेत “

“बरं तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवायला वाढते “

तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीनं टेबलवर जेवणाची तयारी घेतली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर दोनच ताटं पाहून त्यानं आश्चर्याने विचारलं

“दोनच ताटं?  नयना जेवणार नाहीये का? ” 

“अहो ती बाहेर गेलीये. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज. तिला भेटायला गेलीये. दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत “

” साक्षी बंगलोरला असते? जाॅब लागलाय की लग्न झाल्यामुळे? “

“नाही. लग्न नाही झालं तिचं. मागच्या दिड वर्षापासून ती जाॅबला तिथंच आहे “

” किती पॅकेज आहे? “

” सध्या सहा लाखाचं आहे‌. पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे “

विनायकनं एक सुस्कारा सोडला

” एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाॅबला लागल्या म्हणायच्या तर? “

माधवीनं मान डोलावली

“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पॅकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीनं पुर्ण केली नाही ” विनायक उद्विग्न होऊन म्हणाला

” जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये “

” पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बीए, बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता?  ” विनायक चिडून म्हणाला

” जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल “

” वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये. कसलाच जाॅब करत नाहीये “

” मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. ‘ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली “

” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिनं आपल्यासमोर? खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न ” विनायक उद्वेगाने म्हणाला

” नाहीतर काय! घरात बसूनही काय करते ती? सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक! आपण काही बोललो तर रुसून बसते. चारचार दिवस बोलत नाही “

“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया. आताच ती सव्वीस वर्षाची आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल. खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. उगीच तिला नोकरी लागण्याची

वाट बघत बसलो “

” तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं “

“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं ” विनायक ठामपणे म्हणाला

दुसऱ्या दिवसापासून खरोखरच त्यानं वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले. ‘मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.

काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. नऊ

लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरुन तरी चांगला दिसत होता. विनायकनं त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले. पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानंच माधवीला विचारलं.

“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? “

” बघितलं. नयना नाही म्हणतेय “

” का? सगळं तर चांगलं आहे “

” तिचं नेहमीचंच कारण. नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे “

” बोलव तिला ” विनायक संतापून म्हणाला

माधवीनं नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आली.

“काय बाबा? “

“काय करत होतीस? तुझ्या आईनं इतक्या हाका मारल्या. ऐकू नाही आल्या? “विनायकनं रागाने विचारलं

“काही नाही. गाणी ऐकत होते. कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “

” बरं. मी ते स्थळ पाठवलं होतं, त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “

” हो. मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून “

“मला एक सांग. तू इथे नोकरी करुन काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना? “

” हो बरोबर. पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात “

” पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “

” हो. पण मग त्याला पॅकेजही तर कमीच आहे “

“नऊ लाखाचं पॅकेज कमी आहे? “विनायकनं आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता. हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही. आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पॅकेज सोळाच लाख आहे. त्यामानाने या मुलाचं पॅकेज सुरुवातीलाच एकदम छान आहे. आणि ते पुढेही वाढू शकतं “

” तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत “

” तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत. व्यवस्थित मॅनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना आरामात पार पडतो. तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे. फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या काॅलेजमध्ये शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते. बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस? पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन. तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाहिये? “

नयनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली

” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीये त. आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी. अगदीच काही घरात बसून नव्हते. “

“बरोबर. पण ती किती महिने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने. खरं ना? “

” मग काय करणार? तिथं एक तर पगार कमी आणि हॅरॅसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “

” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हॅरॅसमेंट असणारच. माझंच बघ. सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मिटिंग्स्, काॅन्फरन्सने जीव वैतागून जातो. वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या च. सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही ” विनायक तिला समजावत म्हणाला

” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील “

” फक्त पॅकेजच महत्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यातली माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही “

” असेलही तसं. पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “

” चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल “

” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल? एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली

” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत. जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील. आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल “

” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच

. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत “

रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे बंडखोरी वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.

यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा त्यांच्या मनात कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय; आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच “तुमच्यासाठी आम्ही आहोत” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच “आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित” अशी मानसिकता तयार होते. हा केवळ भीतीचे परिणाम नसून, ती एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.

सामाजिक दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नाच्या मागे दडलेले आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवतात, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे “कुटुंब ठरवेल” हा सोपा मार्ग निवडला जातो.

ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक असते. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे. लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे.

अन्यायाची होण्याची जाणीव असताना व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील निर्णायक टप्प्यांवर, विशेषतः विवाहासारख्या निर्णयात, स्वतःची जबाबदारी का घेत नाही?  हा प्रश्न केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मानसिक रचनेवर प्रकाश टाकणारा आहे. कारण येथे “जबाबदारी घेतली नाही” हा निष्कर्ष जितका महत्त्वाचा आहे, तितकाच “घेऊ दिली गेली का? ” हाही प्रश्नही महत्त्वाचा आहे. या दोन स्तरांमधील ताण समजून घेतल्याशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांची सामाजिक घडण अशी झाली आहे की, आज्ञाधारकता, कुटुंबनिष्ठा आणि समायोजन हाच त्यांच्या चांगुलपणाचा निकष ठरवले गेला. त्यामुळे विवाहाच्या बाबतीत स्वतःची निवड मांडणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, कुटुंबाच्या अपेक्षांना आव्हान देणारे पाऊल ठरते. अशा वेळी “आई-वडिलांसमोर काही चाललं नाही” ही फक्त सबब नसून, ती एक सामाजिक वास्तवाची अभिव्यक्ती आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास ही गोष्ट केवळ वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नसते; ती दीर्घकाळाच्या संस्कारातून, संधींमधून आणि सामाजिक पाठबळातून विकसित होते. म्हणूनच अनेक स्त्रिया उच्चशिक्षित असूनही, निर्णायक क्षणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकत नाहीत.

सामाजिक बंधनांमध्ये अडकलेली व्यक्ती अनेकदा त्या बंधनांना स्वीकारून बसते आणि आपल्यावर अन्याय सहन करत असते. यालाच मानसशास्त्रात संस्कारातील गुलामी मान्य करणे म्हणतात. म्हणजेच बाह्य दडपण हळूहळू व्यक्तीच्या आतल्या विश्वासाचा भाग बनते. परिणामी, ती स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेते, स्वतःच्या निवडीवर विश्वास ठेवत नाही आणि सुरक्षिततेच्या नावाखाली पारंपरिक मार्ग स्वीकारते. येथे अन्याय केवळ बाहेरून होत नाही, तर तो आपल्या अंतर्गतही होत राहतो. तथापि, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीला स्वओळख, शिक्षण आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचा जो प्रयत्न केला, तो पूर्णपणे समाजात झिरपला नाही, हेही वास्तव आहे. यामागे केवळ स्त्रियांची उदासीनता कारणीभूत नाही, तर त्या विचारांना प्रतिकार करणारी सामाजिक रचना अजूनही टिकून आहे. शिक्षण मिळालं तरी निर्णयस्वातंत्र्य मिळेलच असं नाही, कारण घरातील सत्तासंबंध, आर्थिक अवलंबित्व, आणि कुटुंब तुटेल या भीतीमुळे अनेक स्त्रिया तडजोडीचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे स्वातंत्र्याची जाणीव आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी निर्माण होते.

आजची पिढी अशा लग्नाला “डिसफंक्शनल मॅरेज” म्हणून ओळखू लागलेली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. कारण आधी जे ‘नॉर्मल’ मानलं जात होतं ते भावनिक तुटलेपण, संवादाचा अभाव, केवळ सामाजिक बंधन म्हणून टिकवलेलं नातं आता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणी विवाहाबद्दल अधिक सजग झाले आहेत आणि “आपण हा अन्याय स्वतःवर होऊ देणार नाही” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. या बदलामुळेच घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसते. पण वाढते घटस्फोट हा कुटुंब संस्थेच्या अपयशाचा निर्देशक आहे की असमानतेला नकार देण्याचा प्रयत्न आहे, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे फक्त आजच्या पिढीला दोष देणं सोपं असलं तरी ते अपुरं आहे. कारण जेव्हा पिढ्यानुपिढ्या असमानतेवर आधारलेली विवाहसंस्था उभी केली जाते, तेव्हा तिच्या परिणामांना सामोरं जाताना संघर्ष अपरिहार्य असतो. आजचे तरुण-तरुणी समतेची अपेक्षा करतात, भावनिक सुसंवाद शोधतात आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न करतात. जर ही अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर ते नातं तोडण्याचा निर्णय घेतात. हा केवळ ‘अधीरपणा’ नाही, तर ते मूल्यांमध्ये झालेल्या बदलाचे लक्षण आहे.

मग विवाहसंस्थेचा सुकाणू पारंपरिक असमानतेकडून समतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांकडे वळवायचा का?  याचे उत्तर समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जर पालक अजूनही मुलांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा आग्रह धरत राहिले, तर नवीन पिढीशी संघर्ष वाढणारच. उलट, जर त्यांनी मुलांना निर्णयक्षम बनवले, त्यांच्या निवडीचा आदर केला, आणि समतेच्या मूल्यांना पाठिंबा दिला, तर विवाहसंस्था अधिक सुदृढ आणि अर्थपूर्ण होऊ शकते. म्हणून प्रश्न दोषारोपाचा नसून जबाबदारीच्या पुनर्वाटपाचा आहे. स्त्रिया, पुरुष, पालक आणि समाज, सर्वांनी मिळून विवाहाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. समता, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित नातेसंबंध निर्माण झाले, तरच विवाहसंस्था टिकाऊ आणि समाधानकारक ठरेल. अन्यथा, असमानतेवर उभी असलेली कोणतीही रचना कितीही परंपरेच्या आधारावर टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी ती आतून पोखरलेलीच राहील. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, हेच खरे नाही का?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चारचौघे – त्यांची गोष्ट ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ चारचौघे – त्यांची गोष्ट ☆ शीला पतकी ☆

☆

तुम्ही खूप छान लिहाल हो.. चार लोकांनी वाचलं पाहिजे ना? हां बरोबर आहे… चार लोक फार महत्वाचे असतात. चार या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. ते चारधाम चार वेद हे मी सांगणार नाही माझा विषय जरा वेगळा आहे आणि वेगळा विषय मांडला ही आपली खासियत आहे. चार याबद्दल आपण काय काय बोलतो बघा 

लहानपणी आपण ऐकत होतो… अरे चार मुलं बघ ती कशी वागतात तस आपण करावं वागावे वर्गामध्ये चार चांगल्या मुलांची संगत धर… चार चांगली पुस्तकं…

वाच चार बुक शिकला तर जीवनाचे कल्याण होईल 

नाही समजलं तुला तर चार लोकांना विचारवं 

इथपासून प्रवास सुरू होतो मग कधी कधी असं ऐकायला लागतं 

 

चार चौघा जणांसारखा वाढवलं नाही तुम्हाला पाहिजे ते प्रत्येक वेळी देत गेलो म्हणजे यांनी खूप थाटात वाढवले आपल्याला…

लक्षात घ्या पुढे आपण हळूहळू मोठे मोठे होत जातो 

अरे घरात गोष्टीत लक्ष घाल तुला काय स्वातंत्र्य दिलय का? … चार माणसाची चर्चा करावी चार माणसांचा विचार घ्यावा मग पुढे पाऊल टाकावं… कुठल्यातरी चार फालतू मुलांमध्ये हिंडू नकोस…

 

अजून एक सूचना चार चार दिवस घराबाहेर जातो जातोस कुठे?

अरे बापरे हे मात्र अवघड आहे बर का… “अहो चार दिवस झाले मी ओरडते तुम्हाला गॅस संपतआलाय, संपत आलाय गॅसला नंबर लावा… तुमचं महिला कुठे लक्षात नसतं घरात मेलीने मी एकटीने मरायचं”

अगं कशी चालली आहेस… लग्नाला चाललीस ना… अंगावर दागिने घालावेत… चार लोक आम्हाला नाव ठेवतील…

चार माणसात कसं उठवून दिसायला पाहिजे आमची मुलगी चारचौघेत ऊठून दिसेल अशी आहे ईति वधू पिता अर्थात हे पूर्वी होतं…

चार हात कामाला लागले तर बघता बघता कामा संपतात एकमेका साहाय्य करू हा मंत्र…!

“चार माणसात आमची अब्रू काढू नका म्हणजे झालं” वैतागलेली घरची मंडळी!

“चारदा सांगून झालं पण ऐकलं तर खरं ना… “… टोमणा 

दोनाचे चार हात झाले की सुटले बाई मी एकदाची… वैतागलेली आई!

 

घरात भांडण झाल्यावर समजूतीच्या चार गोष्टी सांगताना, “चार भिंतीच्या आत गोष्टी आहे तोवर बरं असतं लोकांना काय त्या भिंतीनाही कान लावून लोक ऐकतात लक्षात ठेवा “अनुभवी सूचना

घरातल्या कर्त्याची सूचना तुझ्यापेक्षा चार पावसाळी जास्त पाहिलेत आम्ही… धाक! कार्ट बेरकी ते म्हणाल ते सगळे दुष्काळी होते.

चार पैसे कमवून आणायची अक्कल नाही निघालेत आम्हाला सांगायला पैसे मागितले की सुरुवात म्हणून मिळेल ते काम बघून पैसे कमवावे स्वतःच्या दोन पायावर उभे राहावे 

आयुष्यात चार माणसे जोडून घेता आली नाहीत कुणाशी न पटलेल्या माणसाबद्दल बोलताना हे वाक्य

हमखास 

 

चार चाकी गाडी घ्यायचे माझे स्वप्न होते ते माझ्या मुलाने पूर्ण केले हो मध्यमवर्गीय कृतार्थ बाप

आजी… अग हातात चार बांगड्या घालाव्यात बाळा बाईच्या जातीला असे भुंडे हात शोभत नाहीत.

भाऊसाहेब रिटायर झाला पण सगळं देऊन बसू नका चार पैसे आपल्या कनवटीलाठेवा… नटसम्राट सल्ला

 

एकत्र कुटुंब पद्धतीतला घरातला मोठा माणूस काका वगैरे… “चारचौघात आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नका म्हणजे झालं शिकायला हरकत नाही पण नको ती थेर घरात नकोत.

काही परदेशात वगैरे जायला नको चार चौघासारखा आयुष्य जगा समाधानाने आपल्या देशात राहा वडीलकीचा सल्ला 

 

एकदा एका सुनेला सासू म्हणाली अगं चार बायकां सारखं रहावं आपण..! हे असले कपडे… कुंकू न लावणं… मंगळसूत्र मनगटाला बांधायला शोभत नाही…! त्यावर सून म्हणाली, “सासुबाई मी पाचवी बाई आहे ती आता जरा समजून घ्या चाराच्या पलीकडे जरा जाऊ द्या ना गाडी हाय का नाही गंमत 

 

शेवटी चार माणसे येतील एवढे तरी चांगलं वागा बाबांनो एक सामाजिक वाक्य 

 

बाहेर चार माणसं तर विचारतात का आणि घरात आमच्या डोक्यावर मिरे वाटतात मनातल्या मनात म्हणाले जाणारे वाक्य

 

काळजी आणि प्रेमापोटी पण वैतागलेला मुलगा… “बाबा चार लोकात जा जरा बसा बरं वाटेल तुम्हाला. घरात काय वाचता टीव्ही बघता… इत्यादी इत्यादी

 

असो अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये चार चा उल्लेख असतो तो का हे मला खूप दिवस कळले नव्हते आता तुम्हाला उत्सुकता मग आता कळले आहे का? थोडे पुढे जाऊयात

 

मी गणिताची शिक्षिका… एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. दोन बिंदूतून एकच रेषा जाते. तीन बिंदू एक प्रतल निश्चित करतात म्हणजे सपाट पृष्ठ भाग… या साठी एसएससी बोर्डाच्या पेपर मध्ये पूर्वी आठवा प्रश्न टॅलेंट क्वेश्चन म्हणून असायचा त्यामध्ये विचारलं होतं सायकल ला स्टॅन्ड का लावतात? त्याचं उत्तर असं होतं की गोल चाकाचा टेकलेला एक एक बिंदू अधिक त्याच एक बिंदू दोन नुसत्या चाकावर सायकल उभी राहू शकत नाही पण स्टॅन्ड लावला की तिसरा बिंदू मिळतो आणि प्रतल निश्चित होते आणि स्टॅन्ड वर सायकल उभी राहते म्हणजे प्रतल निश्चितेसाठी तीन बिंदू लागतात.. इत्यादी इत्यादी… पण प्रतल निश्चितीसाठी तीन बिंदू लागत असले तरी ते बॅलन्स होण्यासाठी चार बिंदू गरजेचे असतात म्हणजे पलीकडच्या बाजूला जर अजून एक स्टॅन्ड लावला तर सायकल तिरकी उभी राहणार नाही ती सरळ उभी राहिल. मग सायकल सरळ उभी राहण्याचे स्टॅन्ड सुद्धा बाजारात मिळत होते ते पाठीमागच्या टाका चाकाला पायाने सरकून लावायचे असावयाचे. म्हणजे चार मुळे समतोल साधला जातो.

याचे एक उदाहरण मी एका मुलाखतीचा ऐकलं होतं मुलाखत होती सलीम जावेद या सुप्रसिद्ध लेखकाच्या जोडी पैकी सलीम यांची त्यांनी सांगितले की डायलॉग लिहिताना त्या वाक्यांमध्ये शब्दांचे समतोल साधणे अत्यंत गरजेचे असते तरच ते डायलॉग ठळकपणे लोकांच्या लक्षात राहतात याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले होते की दिवार मधला डायलॉग

मेरे पास माँ है… हा लिहिताना त्यांनी लिहिले होते मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है? इती अमिताभ… मेरे पास मा है शशी… मेरे पास मा है याला वजन येईना मग त्यांनी ऍड केलं… “मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है तुम्हारे पास क्या है? “मग शशी कपूर शांतपणे म्हणतो, ” मेरे पास माँ है” प्रेक्षकांची शिट्टी आणि टाळ्या!

एका बाजूला तीन शब्द एका बाजूला एक त्या चार शब्दांमुळे त्या संपूर्ण डायलॉग ला वजन आलं आणि तो अजरामर झाला तर असं शब्दांना वजन आम्हाला द्यावं लागतं त्याचा बॅलन्स साधावा लागतो. हे सलीमजीने अनेक उदाहरण देऊन फार छान सांगितलं होतं

* 

मला वाटतं हे चार माणसं काय म्हणतील? चार लोकांचा विचार घ्या… , चार माणसे तरी शेवटी येणार का? इथे सुद्धा बॅलन्सच असावा म्हणून नेहमी आपण चार आकडा वापरतो असे मला वाटते… बघा ना तुम्ही म्हणून बघा… सहा माणसं काय म्हणतील? … पाच माणसं तरी येतील का? … आठ माणसात आमच्या अब्रू घालू नको… मजा नाही यात… जे चार मध्ये आहे! अशा खूप गोष्टी आहेत. आठवा बघा आणि लिहा. चार माणसं वाचतील अशा अपेक्षांनी लिहले आहे पटलं तर घ्या आणि चार जणांना पुढे पाठवा…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सलमान खान हा काही विचारवंत वगैरे अभिनेता नव्हे. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला पार हादरवून टाकलं.

त्याला विचारलं गेलं होतंः “तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस? “

तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला.

म्हणाला, “कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील. “

“माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय! ” 

“माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल. “

“आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते. “

“त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन! “

***

मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती ‘इमोजी’ नाही. तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी मी काही नातं सांगत नाही. आणि, माझ्या अंधाराशी तुझा जैव संबंध नाही!

आपल्याही नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे, हे आपल्या गावीही नाही.

काही लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत, हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं ‘गॉसिप’ होतं, थट्टा होते आणि ‘बरं झालं, आपल्या रस्त्यातला एक स्पर्धक दूर झाला’, असंही लोकांना वाटतं.

तुम्हाला गंमत माहीत आहे? तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये निराश दिसलात, थकलेले जाणवलात तर लोकांना काळजीच वाटेल, असं नाही. ‘त्याला प्रमोशन नाही मिळत बरं का, बघितलंस ना चेहरा कसा रडवेला दिसत होता त्याचा’, असं गॉसिप होणारच नाही, असं नाही.

कला ही आनंदाची सर्जक शक्यता. पण, आनंदाचे झरे फुलवणा-या या क्षेत्रातले लोक तर एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी कसे आणि किती टपलेले असतात, हे तुम्हाला अगदी सामान्य तबलावादकांपासून ते साहित्यापर्यंत आणि गायकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वदूर दिसेल. कुठलंच क्षेत्र इथं अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहे, तेच समजत नाही.

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी ‘रिफ्लेक्स ॲक्शन’सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

मला आठवतं, लहानपणी आम्ही सगळेच मित्र सायकल शिकायचो. एखाद्यानं जरा भारीतली सायकल आणली असेल आणि थोडं स्टाइलमध्ये सायकल चालवत गावभर फिरत असेल तर “असा बाराच्या भावात पडावा लागतो ना…” अशी शुभेच्छा असायची!

माणसं दिसतात सोबत, पण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं. नस्ते गुंते तयार करतं. सोपं जगणं क्लिष्ट करून टाकतं. कोणीच कोणाशी बोलत नाही. ‘डिप्लोमसी’ सुरू असते सगळी. जिथं ‘प्रेमात पडले’, हे पोरगी आईला सांगू शकत नाही, तिथं आणखी काय संवाद होणार? “माझ्याशी भांडायला, खुन्नस द्यायला मी काय भावकी आहे का त्याची? “, असं गावात सहजपणे बोललं जातं. अशा नात्यांचं काय करायचं?

आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे! प्रतिभा, प्रयत्न, प्राक्तन याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पण, त्यासाठी माणसं खोडण्याची, भिंती बांधण्याची ही कसली विखारी विकृती?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेल? संवाद कसा होईल?

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धी, पैसा, यश अशी आकांक्षा असू शकतेच, पण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे.

तुम्ही कलेक्टर आहात, स्टार आहात, मंत्री आहात, शिपाई आहात, उद्योजक आहात की शेतकरी आहात, यामुळे त्यात काही फरक पडत नाही.

मी बी. एस्सी (ॲग्री) केलं. आमच्याकडं सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. माझ्या एकट्या बॅचचे पन्नासेक जण तरी आयआरएस, आयपीएससह क्लास वन ऑफिसर वगैरे असतील. काही ग्रामसेवक, काही कृषी पर्यवेक्षक, व्यावसायिक, एलआयसीत ऑफिसर, काही शेतकरीही. आमच्या बॅचचं ‘गेट टुगेदर’ दरवर्षी करायचं, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी पुढे आली. सुरूवातीच्या ‘गेट टुगेदर’मध्ये ‘वर्गवाद’ असायचा. डेप्युटी कलेक्टरला आपण ग्रामसेवकापेक्षा थोर असे वाटायचे. किंवा, त्याला नाही वाटले, तरी ग्रामसेवकाला न्यूनगंड असायचा. मग डीवायएसपी मोठा, सुपरवायझर बारका असे सगळे पोटभेद होते. गेल्या दहा वर्षांत सगळ्यांच्या लक्षात आलंय की यामुळं काही फरक पडत नाही, यार. तुझ्याकडे इनोव्हा असेल, माझ्याकडं बाइक असेल, पण त्यामुळं काय फरक पडतो? जगण्यातली धमाल महत्त्वाची. जगण्यावर हक्क प्रत्येकाचा आहे. टेरेस कोणाच्या मालकीचं असलं, म्हणून त्यावरून दिसणारं आकाश त्याच्या मालकीचं थोडंच आहे! आता अशी अवस्था आहे की आम्ही दोन वर्षांपूर्वी गोव्यात आणि गेल्या वर्षी दुबईत ‘गेट टुगेदर’ केलं, तेव्हा हे सगळे भेद मुळासकट उपटले गेले होते. ग्रामसेवक कमिशनरला ×××वर लाथ घालून बेडवरून उठवत होता!

आमचा एक मित्र कॉलेजात टॉपर होता. तो पुढं सायंटिस्ट वा आयएएस होणार, अशी आम्हाला खात्री होती. पुढं अगदी सामान्य मार्कांची पोरं एसपी, कमिशनर वगैरे झाली. हा मात्र गायक झाला. आर्थिक आघाडीवर यथातथाच राहिला. पण, तहानभूक हरपून गाताना तो केवढा देखणा दिसतो! पहिल्या भेटीत सगळ्यांनाच त्याच्या नव्या रुपाचा धक्का बसला. आता मात्र आमच्या ‘गेट टुगेदर’चा खरा ‘हीरो’ तो असतो! टॉपर असताना या ‘चष्मेबद्दू’ला कधीच हा सन्मान मिळाला नाही, जो त्याला आज मिळतो.

कोणाला काही त्रास होण्याचा, मदत हवी असण्याचा अवकाश, आमची सगळी फौज कोणत्याही मित्राला मदत करायला उभी असते. मैत्र हे असतं.

केशवसुत म्हणाले तेच खरं.

‘जग केवढं, ज्याच्या- त्याच्या डोक्याएवढं’ 

त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणं, मन विशाल करणं हेच गुपित आहे, तुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतं, जगण्यात मौज आहे. मुक्कामात नाही, प्रवासात गंमत आहे.

त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलच, पण ‘माणूस’ म्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहे, तशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या पश्चात नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल. कोणाच्या शेतातला बांध जेसीबीनं उद्ध्वस्त करण्यापेक्षा या सीमा प्रश्नावर एकमेकांशी बोलावं लागेल.

“गैरों से कहा तुमने,

गैरों से सुना तुमने!

कभी हम से कहा होता,

कभी हम से सुना होता! “

हीच तर सल आहे.

तेव्हा, बोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे, एकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतर, सुशांतसारखे काही आत्महत्या करतील, उरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

हे जग सुंदर करायचं असेल आणि ‘जगणेबल’ करायचं असेल, तर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलता, तेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झाला, यापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललं, याचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत.

सोबत राहू, असेच.

जगू या, जिंकू या!

Love u All

 

लेखक : श्री संजय आवटे 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “राखीची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ “राखीची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट. लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरत ला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे.. त्यावर ‘वीर जवान, देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.

लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जायचीये. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आई बाबाही आहेत बरोबर. तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.

तर काय सांगत होतो? परमिशन्स, रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला. “बच्ची की चिंता मत करो, हम है ना! “. मी कशाला नाही म्हणतोय…?

लेक खुष. लेक खुष तर तिचा बाबाही खुष.

आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.

ती काय म्हणाली ते ऐका.. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवर आहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग. असं वाटलं स्टेनगन घ्यावी, धडधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”

“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल. दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. ऑलवेज ऑन ड्यूटी.

बाबा मोस्ट शाॅकींग… आम्ही राख्या घेवून गेलेलो. उडालोच. काजलचा भाऊ नाही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं. 400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली. दे वेयर व्हेरी हॅप्पी. दुर्गा होती प्रत्येक जण. मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय. ‘चड्डीत रहायचं, नाहीतर… ‘ बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस… “

तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.

’93 की बात है. कश्मीर में पोस्टींग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था, मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये भौxxके. घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपाट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. इसे संभालो’ बोल के 

वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी. ‘

शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ. आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे, ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते! येणाऱ्या 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठा उत्तराची कहाणी… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ साठा उत्तराची कहाणी… ☆ उज्ज्वला केळकर ☆

श्रावणातला मनोहारी निसर्ग बघून बालकवी म्हणतात, ‘श्रावण मासी हर्ष मानसी. ’ श्रावणात, केवळ लेखक कवींनाच हर्ष होतो, असे नाही, तर जनसामान्यांच्याही मनात हर्ष दाटून येतो. त्याचं कारण, या महिन्यात अनेक सण, समारंभ, उत्सव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील चाकोरीपेक्षा, काही वेगळं करताना, नवा उत्साह, नवचैतन्य, नवी उर्जा निर्माण होते.

माझ्या लहानपणी मी या सण-समारंभाच्या कहाण्या माझ्या आजीला वाचून दाखवायची. उदा. नागपंचमीची, दिव्याच्या आवसेची, जीवतीची, शीळासप्तमीची. याशिवाय प्रत्येक दिवसाची कहाणी असे. मला वाचायला त्या खूप आवडत. बाहेरच्या सारखे गूढ, अद्भूत वातावरण कहाणीत असे. त्या मनोरंजकही होत्या, तशाच बोधप्रदही असत. प्रत्येक कहाणीतील कथा वेगळी. त्यांची सुरुवात असे, एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण. किंवा एक राजा होता. मग त्या कथेत एक वसा सांगितलेला असे. म्हणजे वागण्याचा नियम. वसा करणार्‍याला सुख मिळे. तो मोडणार्‍याला दु:ख, संकटे भोगावी लागत. आशा किती तरी कहाण्या. प्रत्येक कहाणीची कथा वेगळी, पण प्रत्येक कहाणीचा शेवट असे, ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण. कहाणी कोणतीही असो, तिचा शेवट याच वाक्याने होत असे.

त्यावेळी मी आजीला विचारायची, ही ‘साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे काय? तिला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी मोठी होत गेले. खूप काही ऐकलं, वाचलं, पण ‘साठा उत्तरीचं कोडं काही सुटलं नाही. अनेक भाषेच्या अभ्यासकांना, विचारवंतांना, संशोधकांना विचारलं, पण मला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

शेवटी एक प्रयत्न म्हणून गुगल बाबाला विचारले. त्यांनी सांगितले, ‘साठा उत्तरी म्हणजे, साठ उतारे असलेली कहाणी म्हणजे कथा. ’. ती पाचा उत्तरी म्हणजे, ’ पाच उतार्‍यात सांगितली. ’ म्हणजे मोठ्ठी लांबलचक कहाणी, थोडक्यात… पाच उतार्‍यात सांगितली.

‘पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे मोठ्ठी कहाणी ऐकून जे पुण्य, फळ लाभेल, ते, ही थोडक्यात सांगितलेली कहाणी ऐकूनही लाभेल. तोच तत्त्वबोध लहान कहाणी ऐकूनही होईल.

लोक हो, मला हे पटलं. तुम्हाला ते पटतय का, बघा!

 

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

परवा पहाटे अंगणातील पारिजातकाच्या हसऱ्या नाजूक फुलांचा सडा अंगणभर पसरलेला बघितला अन् पाय आपोआपच तिकडे वळले. मन उगाचचं या फुलांची नी आपली पहिली भेट नेमकी कधी झाली हे आठवायला लागलं तशी एक नवीनच गोष्ट ध्यानी आली. ती अशी की या फुलापानांच्या झाड झाडोऱ्याच्या रंगीबिरंगी दुनियेशी माझा परिचयच मुळी पारिजातामार्फत झाला. माझ्या आठवणीतील फुलांच्या परिचयाचा विचार करता, मला जितकं आठवतं, त्यानुसार अगदी पहिल्याप्रथम फुल म्हणून जे माझ्या समोर आलं ते पारिजातकाचचं फुल होतं. त्याआधी भलेही कितीतरी फुलं आणि झाडं बघितली असतीलही पण जाणिवेच्या स्तरावर झालेली प्रथम अनुभूती ही प्राजक्ताचीच. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या माझ्या वडिलांच्या क्वार्टरच्या भल्यामोठ्या आवारवजा अंगणात अगदी दारासमोरची भली थोरली दोन पारिजाताची झाडं, श्रावण भाद्रपदात बहरली की प्रत्येक पहाट दूर दूर पर्यंत सुगंधी सुबक गर्द केशरी दांड्यांच्या चांदणंफुलांची उधळण करायची. त्या बालवयात कधी भिजलेली तर कधी कोरडी प्राजक्त फुलं एक एक करून अलगदपणे फ्रॉकच्या ओच्यामध्ये वेचता वेचता पहाट अपुरी पडे. अंमळ जराशाने जरी दिवस वर आला की त्या दिवसातली कोवळी सूर्यकिरणे सुद्धा प्राजक्त फुलांना सोसवेनात. या सगळ्या उद्योगात आवारातील अनेक जण असायचे. आमच्या चिमुकल्या हातातील सुवासिक हसऱ्या फुलांच्या ओंजळींच्या आठवणीने परवाची पहाट अधिकच प्रसन्न करून टाकली. तेव्हापासून मधली काही थोडी वर्षे शिक्षणानिमित्त घराबाहेर राहण्याचा काळ वगळता अगदी आजतागायत घराच्या अंगणात पारिजात माझ्या सोबतीला आहे. पारिजात आपल्या अंगणात नसला तरीही श्रावण भाद्रपदात दरवळणारा तो, कुण्या घराच्या आवाराच्या भिंतीवरून डोकावणाऱ्या डहाळीवरील शुभ्र नाजूक पाकळ्या आणि केशरी दांड्यांच्या मोहक इवल्या फुलांचा सडा रस्त्यावर जाता येता दिसला की क्षणभर तरी तिथे घुटमळायला लावणारा वा तिथून जाताना पावलांची गती तरी मंदावणारा, नकळत सुवासाच्या लालसेने एक दिर्घ श्वास घ्यायला लावणारा. असं हे त्याचं बहरणं, दरवळण आणि लागोलाग तो सुंदर सुवासिक फुलांचा खजिना सर्वत्र उधळूण, त्याच्या अस्तित्वाची नोंद घ्यायला भाग पाडणारं त्याचं वागणं.

हा जादुई पारिजात वृक्ष पूढे पुराणकथांमधून भेटला. समुद्रमंथनातून उपजलेला एक अलौकिक असा स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून त्याची ओळख. सत्यभामेच्या हट्टाखातर श्रीकृष्णाने मोठ्या पराक्रमाने इंद्राला पराजित करून भूलोकी आणलेला. या कथेचा संदर्भ घेऊन बालकवी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘श्रावणमास’ कवितेत लिहितात ‘पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला’ आणि या कवितेच्या निमीत्त्याने पारिजात पुन्हा आम्हाला क्रमिक पुस्तकाच्या पानावर एका वेगळ्या छापील रूपात व गंधात भेटला. आमच्या इयत्ता चौथीच्या शाळकरी वयात मराठी बालभारतीमधील बालकवींचा हा बहरलेला पारिजात आणि हर्षोल्हासित भामा वाचून फार आनंद व्हायचा. पण पुढे असे कळले की कसलं काय, सत्यभामेचा रोष पुन्हा उफाळून आला. ‘पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी’ हे ‘बहरला पारिजात’ या नाटकातील ग. दि माडगूळकर यांनी रचलेलं आणि माणिक वर्मा यांनी गायलेलं हे नाट्यपद जेव्हा ऐकलं, तेव्हा कुठे भामेच्या रोषाचा उलगडा झाला. त्यायोगे पुन्हा एक पारिजात, त्याची आणखी एक खासियत आणि त्यासंबंधीची एक वेगळी पुराणकथा कळली. पारिजात सत्यभामेच्या दारी पण फुलांचा सडा शेजारच्या अंगणात अर्थात रुक्मिणीच्या. त्यामुळे भामेने मनाचा त्रागा करून घेणे हे ओघाने आलेच.

पुराणकथा आणि कवितांमधून बाहेर पडलेला पारिजात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पुन्हा एकदा त्याच्या शास्त्रीय आणि सौंदर्यपूर्ण तपशिलासह डोकावला. जागतिक स्तरावर विचार करता पारिजाताच घराणं हे मूळचं भारतीय उपखंड आणि दक्षिणपूर्व आशिया या भागातलं. भारतामध्ये तर हा सर्वदूर आढळणारा, अत्यंत देखणेपणाने फुलणारा, एकूणच शुभंकर म्हणून सर्वज्ञात. पारिजाताच शास्त्रीय नाव निक्टेन्थिस आर्बोर्ट्रिस्टिस’ (Nyctanthes arbor-tristis) म्हणजेच रात्री फुलणारा आणि पहाटेच्या अंधुक प्रकाशात सूर्योदयापूर्वीच फुलोराचं जमिनीवर शिंपण करणारा. जो रात्रीला असंख्य सुगंधी फुलांनी दरवळतो जणू काही आकाशातल्या शुभ्र चांदण्या आपल्या अंगाखांद्यावर केशरी कुपीतील सुगंधाचे लेणे लेवून मिरवतोय आणि उजाडायला लागलं की एक एक करून सगळी फुलं अलगदपणे जमिनीवर झरायला लागतात व संपूर्ण झाड पुन्हा पुढल्या रात्री फुलायला मोकळं. रात्रीला बहरणाऱ्या या झाडाला इंग्लिशमध्ये नाईट ब्लूमिंग जास्मिन (Night blooming Jasmine आणि उजाडायच्या आधीच फुलांच्या होणाऱ्या गळतीमुळे त्याला ट्री ऑफ सारो (Tree of sarrow), सागरी प्रवाळासारख्या केशरी मोहक दांडीमुळे त्याला कोरल जास्मिन (Coral Jasmine) असेही म्हणतात. इथे शास्त्रीय दृष्ट्या जस्मिन या शब्दाचा इतर अनेक जस्मिन कुळातील सुगंधी फुलझाडांचा दुरान्वयानेही संबंध नाही. विविध भारतीय भाषांमध्ये त्याची अनेक नावं आहेत जसे हिंदी व गुजराती मध्ये हरसिंगार, तमिळ मध्ये पवळा मल्लिगाई, मराठी मध्ये पारिजातक वा पारिजात, मल्याळममध्ये पारिजातकम, बंगाली व संस्कृतमध्ये शेफालीका वा शिऊली, प्राजक्त… वगैरे. पौराणिक कथांमध्ये स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून ओळखला जाणारा प्राजक्त, गंध आणि सौंदर्यामध्ये ज्याचं नाव अग्रक्रमाने घेतले जातं, औषधी शास्त्रातील त्याची महत्ता आणि उपयुक्तता सुद्धा जगनमान्य आहे. फुलांच्या गंध आणि रूप सौंदर्याशिवाय पारिजातक अनेक औषधी गुणधर्म देखील बाळगून आहे. आसाम आणि बंगालमध्ये पारिजात फुलांनी अनेक पाककृतींमध्येही प्रवेश केलायं आणि त्यांच्या खाद्य संस्कृतीचा भाग झालीत. फुलांच्या केशरी दांड्या बऱ्याचदा पदार्थाला रंग येण्यासाठी महागड्या केशरला पर्याय म्हणूनही वापरतात असेही ऐकिवात आहे. दांड्यांचा गर्द केशरी नैसर्गीक रंग हा तर आपल्या रेशमी कापड उद्योगात अगदी अग्रक्रमाने वापरला जातो. झाडावरून जमिनीवर पडलेलं फुल देवपूजेत नको हा संस्कार पण त्याला अपवाद आहे तो केवळ पारिजात फुलांचा, ती वेचायची त्यावर पाणी शिंपावे व खुशाल देवाला वाहायची.

आकोटजवळील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगडच्या निसर्गरम्य परिसरातील भटकंतीत असाच एकदा ध्यानीमनी नसताना, अगदी धारगडच्या महादेवाच्या गुंफेच्या खडकाळ डोंगर माथ्यावर उभा असलेला पारिजात, श्रावणात महादेवाला फुलांचा अभिषेक करीत असताना दिसला आणि कोण आनंद झाला हे शब्दात सांगणं कठीणच. हा वन्य परिसरात भेटलेला पारिजात न विसरणाजोगाच.

आज घडीचा हा अंगणात फुललेला पारिजात, काहीवर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्ताने राहत असलेल्या माझ्या आकोटच्या घरातील पारिजाताच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी. त्याचं झालं असं की आकोट येथील पारिजाताखाली उगवलेलं इवल्यासं रोपटं, आमच्या मित्र परिवारातील अमरावती निवासी कुटुंबाला भेटीदाखल दिलं. त्यांच्या अमरावतीच्या घरी त्याचा छान बहारदार वृक्ष झाला. पूढे जेव्हा आम्ही आमचं बिऱ्हाड आकोटहून अमरावती मुक्कामी हलवलं, तेव्हा त्यांनी त्याचं मैत्रीच्या नात्याने त्यांच्याकडील पुढल्या पिढीचा नवजात पारिजात आमच्या अंगणी लावायला आता पंधरा वर्षांहून जास्त काळ लोटला. कुठलेही फुलण्याचे निश्चित वेळापत्रक नसलेली, वर्षभरात केव्हाही ढगाळ दमट वातावरण जमून आले की लगेच पानोपानी पिवळसर पांढऱ्या हलक्या पोपटी छटेच्या असंख्य घमघमत्या सुगंधीत फुलांनी फुलून येणारी, स्वतःला डेरेदार करण्याच्या नादात चहुकडे विस्तारणारी कुंती वा कामिनी एकीकडे तर आकाशाशी स्पर्धा करणारा शेवगा दुसरीकडे, या दोघांच्या मध्ये माझ्या अंगणातील सध्याचा पारिजात, जमेल तसा अगदी निमूटपणे स्थिरावलाय. त्याची मुळी कुणाशीही स्पर्धा नाही.

जवळपास वर्षभर टपोऱ्या फुलांनी फुलणाऱ्या कोपऱ्यातील ऐटबाज चाफ्यासारखा तो डौलदारही नाही की कोवळ्या वा कडक उन्हाच्या तिरीपाचे कलाबूत लिलया अंगावर खेळवित चमचमणाऱ्या रुपेरी पानांनी भरारलेल्या समोरच्या सळसळत्या पिंपळासारखा देखणाही नाही. पारिजातकाकडे एरवी कुणाच्या कौतूकभरल्या नजरा वळणे तसे कठीणच. तो आपला वर्षभर निव्वळ खरखरीत पाने ओबडधोबड सालीच्या मातकट खोडानिशी ऊभा. जेव्हा दरवर्षी नित्यनेमाने श्रावण भाद्रपदातील दरेक रात्री त्याची फांदीनफांदी अगणित वेधक केशरी दांड्यांच्या नाजूक सुगंधित शुभ्र फुलांनी, जणू आकाशातील तारकाच, लगडून जाते तेव्हा हे स्वर्गीय सौंदर्य बघून अवघा भवताल नक्कीच चकित आणि पुलकित होत असणार यात शंका नाही. त्याला मात्र त्याच्या या अप्रतिम सौंदर्याचे काहीही नाही. ते विलक्षण सुवासिक, नाजूक आणि तितकंच रेखीव पांढऱ्या केशरी रंगाचं वैभव तो अंगावर मिरवीतही बसत नाही. अगदी पहिलं सूर्यकिरण अंगावर पडायच्या आत तो आपलं एक एक विलोभनिय सुगंधित आभूषण धरणीला अर्पण करायला लागतो, एक प्रकारचं अर्घ्य दानचं जणू. त्यासाठी तो वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेची देखील वाट बघत नाही. फांदीवरून एकेक फुल गळताना बघणे, केवळ स्वर्गीय आनंद, त्यासाठी आपली पहाट मात्र मोकळी असायला हवी. बहुगुणी पारिजाताचं श्रावण भाद्रपदातील दरवळलेल दर्शन खरोखरीच विलोभनीय तर आहेच आणि आपसुकच त्याला बघून मनात दातृत्व, मांगल्य, शुचिता अशा भावनांचा उन्मेष उमटल्यास नवल ते काय. पारिजाताला मात्र सुंदर सुगंधी फुलांच्या ओंजळींची मुक्त्तहस्ते उधळण करणे एवढंच ठाऊक.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

मी ड्रायव्हर सीटवर आणि शेजारी आरटीओ (पुण्याच्या रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसचे मुख्य) असा प्रवास — सातारा ते पुणे”

शीर्षक जरा विश्वास न बसण्यासारखं नक्कीच वाटलं असेल. पण हा माझा एक खरा अनुभव आहे. त्याचं झालं असं —

साधारण 1990 ची घटना असेल. मी टेल्को कंपनी मध्ये (म्हणजे सध्याची टाटा मोटर्स) चिंचवडला फाउंड्री या विभागात सर्विस ला होतो.

मशीन ची दुरुस्ती हा विभाग माझ्याकडे होता. ट्रक ला लागणाऱ्या सगळ्या कास्टिंगचा पुरवठा आमच्या फाउंड्री मधून होत असे.

निरनिराळ्या कास्टिंगचे साचे तयार करण्याकरता परदेशातून आणलेली खूप मोठी मोल्डिंग मशीन होती. त्याच मशीन मध्ये एक अजस्त्र पार्ट होता त्याचे नाव होते Anvil.

काही वर्षांच्या वापरानंतर हा भाग वियर आऊट होतो आहे हे लक्षात आले. म्हणून जर्मनीहून नवीन पार्ट मागवण्यात आला. नवीन पार्ट मशीन मध्ये बसवला आणि जुना पार्ट रिपेयर होणार नाही या कल्पनेने स्क्रॅप यार्ड मध्ये नेऊन ठेवण्यात आला. याचे वजन साधारण चार टन होते, उंची साधारण आठ फूट आणि डायमीटर साधारण तीन फूट होता. अशा अजस्त्रेमुळे कोणी स्क्रॅप नेणारे पण त्याला नेत नव्हते.

साहेबांच्या असे लक्षात आले की हा पार्ट रिपेअर करून घ्यायला काय हरकत आहे. कारण आता पुन्हा नवीन पार्ट मागवायचा झाला तर त्याची किंमत साधारण 16 लाख रुपये आहे. जुना पार्ट रिपेअर करता आला तर बराच खर्च वाचू शकेल. साहेबांनी हे काम माझ्यावर सोपवले.

रिपेअर चे काम कसे करता येईल याचा मी आराखडा तयार केला. हे काम कुठे करून घेता येईल याची चौकशी सुरू केली. साताऱ्याजवळ सातारा रोड येथे भारत फोर्ज यांचे मोठे वर्कशॉप आहे, तिथे हे काम होऊ शकणार होते. तिथला सेटअप बघणे, त्यांना कामाची कल्पना देणे याकरता तिथे जाणे आवश्यक होते. मिटिंग मध्ये साहेबांनी लगेच याला ओके दिले. बाहेर गावी जायचे म्हणजे कंपनी टॅक्सी ची व्यवस्था करत असे. मटेरियल्स डिपार्टमेंटचे प्रमुख श्री के एस राव म्हणाले टॅक्सी च्या ऐवजी आपल्या ऑफिसची TATA 206 गाडी न्यायला हरकत नाही. साहेबांनी ओके दिला.

टेल्को नी 206 ही नवी गाडी नुकतीच लॉन्च केली होती. आणि एक नवी कोरी गाडी आमच्या डिव्हिजन ला मिळाली होती.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी गाडीची किल्ली ताब्यात घेतली. आणि गाडी घेऊन घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला घरून सातारा रोड कडे निघालो. कारच्या मानाने या गाडीची लांबी रुंदी बरीच जास्त आहे. गाडीचं समोरचं बोनेट खूपच लांब आहे, आणि ड्रायव्हर सीटवरून बोनेट चा काहीच भाग दिसत नाही. त्यामुळे समोरचा बंपर पण दिसत नाही. त्यामुळे गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवताना जरा मुश्किल होत होती.

भारत फोर्ज कंपनीत पोहोचलो. तिथे श्रीयुत रेड्डी प्रमुख होते. त्यांना भेटून कामाची कल्पना दिली. त्यांनी रिपेअर करण्याची एक वेगळी कल्पना समोर मांडली. ती मला जास्त आवडली म्हणून मी लगेच त्यांना त्याचे कोटेशन तयार करायला सांगितले. तिथला सेटअप बघितला आणि काम व्यवस्थित होऊ शकेल याची खात्री पटली. साधारण दोन लाखाचे कोटेशन होते. दुपारी जेवायला सातारा येथे गेलो होतो.

दुपारी चार वाजता साहेबांना बाय करून पुण्याकडे निघालो. काम छान होऊ शकते म्हणून खुशीत होतो. थोडे पुढे गेलो आणि सातारा-पुणे रोडला लागलो. काही अंतरावर डावीकडे ट्रॅफिक पोलीस च्या दोन गाड्या उभ्या होत्या. एक ऑफिसर उभे होते आणि दोन ट्राफिक पोलीस गाडी थांबवा असा हाताने इशारा करत होते.

मनात विचार आला — की माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण बरोबर गाडी चे कुठलेही कागदपत्र नाहीत आणि माझे ऑफिसचे आय कार्ड पण नव्हते. मी मनातून देवाला नमस्कार केला आणि गाडी तिथे थांबवली. काच खाली केली आणि नमस्कार म्हणालो.

ट्रॅफिक पोलीस : साहेब गाडी कुठे चालली आहे

मी : पुण्याला

ट्रॅफिक पोलीस : आरटीओ साहेबांना बरोबर नेणार का. साहेबांची गाडी बंद पडली आहे.

मी : नक्कीच घेऊन जाईन.

लगेचच बाजुच्या दारातून साहेब आत आले. पोलिसांनी दार बंद केले आणि साहेबांना जोरदार सॅल्यूट ठोकला. आणि आमची गाडी पुण्याकडे निघाली. गाडीत साहेबांबरोबर छान गप्पा झाल्या. आपल्या गाडीत बाजूला खुद्द आरटीओ बसले आहेत आणि आपण गाडी चालवत आहोत याची मला मजा वाटत होती.

पुण्यात शिरल्यानंतर लागणाऱ्या चौकांमध्ये आमची गाडी बघून पोलीस सॅल्यूट करत होते. साहेब म्हणाले निलायम टॉकीज पाशी गाडी थांबवा तिथे मला नेण्याकरता गाडी आली आहे. मी गाडी साईडला उभी केली. तिथे पोलिस उभे होतेच. त्यांनी साहेबांना सॅल्यूट केला आणि दार उघडले. साहेबांनी उतरतांना मला थँक्स दिले आणि मी गाडी छान चालवतो याबद्दल कॉम्प्लिमेंटस् पण दिले.

मी गाडी सुरु केली आणि घराकडे निघालो.

माझे साताऱ्याचे कामं छान झाले होते, आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होणार अशी खात्री पण मनात तयार झाली होती. आणि येताना आरटीओ बरोबर प्रवास करण्याची अशक्यप्राय म्हणा किंवा दुर्मिळ म्हणा, अशी संधी पण मिळाली होती. एकंदरीत मजा आली.

– – life is to enjoy.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares