मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा–

चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग

दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड

तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना ।।

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो, मी काय म्हणतो? कुठे हरवलात? ” यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.

इंद्रायणीचा काठच सुपीक! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुसरा तुकोबांनी. या मळ्यामध्ये विठ्ठल भक्तीचे अमाप पीक आले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता येथून विठ्ठल भक्तीचे बीज नेऊ लागली तरी ते कमी न होता उलट वाढतच गेले. इंद्रायणीच्या काठीच भागवत धर्माचा पाया रचला गेला. एकाने पाया रचला आणि दुसऱ्याने कळस.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस ।।

दोघाही संतांच्या शिकवणुकीत विलक्षण साम्य. दोघानाही समाजातील दांभिकतेची चीड. दोघानाही सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ. भागवत धर्माच्या रत्नजडीत मुकुटात हे दोन अमुल्य हिरे जडवलेले आहेत. समाजातले वाईट, अमंगल नष्ट व्हावे हीच आस या दोघांच्या मनी. असे करताना समाजातील वाईट, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्यांची दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी म्हणून दोघेही प्रयत्नशील. ज्ञानोबा आपल्या पसायदानात म्हणतात-

 जे खळांचीची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो ।

 भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे ।।

आणि तुकोबाराय म्हणतात, 

 मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे ।

 भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ।।

अशा या सर्व संतांच्या शिकवणुकीत साम्य आहे. असे म्हणतात की परमेश्वराला सर्वत्र जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्मिली. तसेच मी म्हणेन की परमेश्वराला सर्वाना समजावणे शक्य नव्हते, म्हणून त्याने संतांची निर्मिती केली. सर्व संतांचे हृदय हे आईचेच हृदय. मातेच्या ममतेने संतांनी समाजाचे पालन पोषण केले. माता प्रसंगी बालकाला रागावतेही पण ते त्याच्या हितासाठी. तसे तुकोबा कधी कधी कठोर झाले. पण ते समाजातील अंधश्रद्धा, रूढी, दुष्ट चालीरीती यावर प्रहार करताना. आणि त्या काळात अशा प्रकारे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लोक आपले कर्तव्य विसरले होते, गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनली होती, ढोंगीपणा, बुवाबाजी यासारख्या गोष्टीना ऊत आला होता. लोक देवाची खरी भक्ती विसरले होते आणि नवस सायास करू लागले होते. अशा वेळी ‘ नवसे पुत्र होती, तरी का करणे लागे पती ‘ यासारखे परखड बोल तुकोबांनीच समाजाला ऐकवले. दांभिकतेवर प्रहर करताना ते म्हणतात-कथा करोनिया दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लतिका धरी बोंडी नासिकाची ।

टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी

गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ ।

* 

कीर्तनाचे वेळी रडे, पडे, लोळे, प्रेमेविण डोळे गळताती

तुका म्हणे ऐसे भाषेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही ।

तुकोबांची दुसरी पत्नी आवली. कजाग आणि कर्कश मावली. आणि तुकोबा विठ्ठल भक्त. एवढेच आम्ही जाणतो फक्त. पण खरे म्हणजे असे नव्हते. आवली असेल कजाग आणि कर्कश पण तुकोबांवर तिचे अतिशय प्रेम. म्हणतात ना ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीवरच आपण रागावतो. ते जेवल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा कणही घेत नसे. आणि तुकोबांची योग्यता ती जाणून होती.

घरामध्ये खायला काही नसायचे. मुलेबाळे, पत्नी उपाशी. अशा परिस्थितीत एखाद्याला आपल्या संसारासाठी थोडा स्वार्थ सुचला असता तर ते क्षम्यच होते. पण तुकोबांनी त्यांच्याकडे चालून येणारा नजराणा नाकारला. शिवरायांनी त्यांच्याबद्दल अतीव आदराने तो पाठवला होता. पण ‘ काय उणे आम्हां विठोबाचे पायी ‘ या भावनेतून तो नम्रपणे नाकारला. त्यांनी त्या नजराण्यावर तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले-

सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती

तुका म्हणे आले, घरी वैकुंठ सगळे.

आणि त्यांनी त्या नजराणा घेऊन आलेल्या सरदारांबरोबर निरोप पाठवला, ‘ शिवाजीराजांना सांगा! तुम्ही स्वतः आमच्याहून थोर आहात. तुम्ही आहात म्हणून देहू गावावर परचक्र आलेले नाही. हाच नजराणा मोलाचा. आम्हाला द्रव्य काय करायचे? आम्हाला काय उणे आहे?

असे हे निरिच्छ तुकोबाराय. त्यांचे अभंग तरले कारण ते खऱ्या अर्थाने ‘अ-भंग’ होते. काळाच्या कसोटीवरही ते टिकून राहिले. ते अजरामर आहेत आणि राहतील. वर्षानुवर्षे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Reverse Counting…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Reverse Counting…“ ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताई कडे गेले होते. काहीही कारण नसताना, हक्काने जाण्यासाठी माझे एकमेव ठिकाण म्हणजे, माझ्या ताईचे घर. फोन करायची गरज नाही, काहीही संकोच न करता जाता येते. खरंतर ही माझ्यासाठी एक जमेची बाजू आहे.

“Count your blessings. ”

असं कोणी म्हंटल तर त्यात हे एक प्रमुख ‘blessing’ आहे. formalities नाही. मन हलकं करायला, काही सल्ला घ्यायला, काहीही न लपवता, रडायला, हसायला एक तरी हक्काची जागा असावी ना, ती माझ्या जवळ आहे. आजच्या जगात तर ही खूप मोठी जमेची बाजू आहे. नाही तर अकडून, आखडून जगून जगून थकायला होत. काय बोलायचे?? काय नाही?? याचे गणित मांडता मांडता घाबरायला होत. तसंही म्हणतातच ” नातं टिकवण्यासाठी गणित विषय कच्चाच असलेला बरा “. बरे असो.

काल भाऊजी खूप खुश होते. मी विचारलं आज काय विशेष?? खूप आनंदात दिसताय. ‘Sensex’ ने सत्तर हजार पार केले म्हणून का‌?? आज किती हजारांचा फायदा झाला तुम्हाला?

भाऊजी म्हणाले,  छे! ग!! आता ते सर्व मी काही करत नाही. आता दोनाचे चार करायला मी जात नाही. तसेच कोणाशी चार हात करायची पण आता हिम्मत नाही, म्हणण्यापेक्षा करायचे नाही. अशा कोणत्याही भानगडीत पडायचे नाही. हे मी ठरवलंय. वादविवादात पडायचेच नाही.

अग!! काल मला चालताना त्रास होत होता. आज सकाळी उठल्यावर अगदी व्यवस्थित चालता आले. आहे की नाही आनंदी रहायचे कारण. अग!! आता रोज सकाळी प्रत्त्येक अगांकडे लक्ष द्यावे लागते. इतके वर्ष यांच्या कडे लक्षच दिले नाही. सर्वांना गृहित धरले, आता चांगलाच बदला घेतायेत सगळे. मी पण काही कमी नाही. मी म्हणतो,  या! या!! मैदानात मी काही घाबरत नाही कोणाला??

आजकाल आनंदाची परिभाषा बदलली आहे ग.!! आता फक्त “अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय ” एवढं मिळाले तरी खूप.. याच आवश्यक गोष्टी झाल्या आहेत.

झोप छान लागली, कार छान चालवली. जूना मित्र भेटला, फिरायला गेल्यावर चार ओळखीची माणसे भेटली. की तो दिवस आनंदात जातो.

आता ‘ Reverse counting ‘ सुरू झाले आहे ना.. तेंव्हा आता आयुष्याची व्याख्याच बदलली. ‘Priorities’ बदलल्या.

लहानपणी ‘ Reverse counting’ शिकताना १००, ९९, ९८ असं मोजत असू, पण आयुष्याचे तसे नाही ना. कोणता नंबर/ वर्ष /महिना / दिवस/वेळ आहे??? तो शेवटचा नंबर/ क्षण माहीत नाही.

म्हणून रोजचा दिवस उगवला की, अरे व्वा!!

‘Thank you God’ असं मी म्हणतो. आजचा दिवस काही तरी विशेष (चांगले) करायला देवाने दिला आहे. असं मी समजतो.

काल सकाळी फिरायला गेलो, तर ‘धुक’ (fog) होत. समोरचे काही स्पष्ट दिसत नव्हते. रस्त्याच्या त्या end वर काय आहे??? ते तर अजिबात दिसत नव्हते. रस्ता कुठे संपतोय??? हेही कळत नव्हते. तेंव्हा एक एक पाऊल पुढे टाकत गेलो, हळूहळू पूढचे दिसत गेले व मी चालत राहिलो..

आज धुक्याने एक गोष्ट शिकवली. खूप पूढचे दिसत नाही ना, तर मग जास्त विचार न करता एकेक पाऊल पुढे टाकावे. आता मी फक्त रोजच्या दिवसाचे ‘ planning’ करतो.

आयुष्यात प्रत्येक फेज मधे आपले ‘planning ‘ वेगळे असते. आता पुस्तकाचा शेवटचा चॅप्टर वाचायचा राहिला आहे. गोष्टींचा शेवट कसा होतो??? याकडे लक्ष आहे. मी आजकाल तीच पुस्तके वाचतो, ज्याचा शेवट हिंदी सिनेमा सारखा चांगलाच होईल, याची खात्री असते मला. जे होणार असेल ते होईल. पण गोष्ट तरी छान, आनंदी वाचावी नाही का??

” विनाकारण उदास खूपदा झालोय. आता विनाकारण आनंदी रहायला शिकतोय. ”

मागच्या वर्षीचा अनुभव खूप काही शिकवून गेला ग!! .

म्हणतात ना.

अनुभवाची एक ठोकर चांगल्या चांगल्या माणसांना सरळ करते.

हे बरोबर असले तरी,

“कोशिश ऐसे करनी चाहिए कि, हारते हारते भी कब जीत जाओ पता ही ना चले ।”

काल अजय म्हणाला,  बाबा सर्व गोष्टी ‘on line’ होतात. मग का बाहेर जाता तुम्ही??

मी म्हंटल,  अरे!! मला व्यवस्थित चालता फिरता येत. आपली काम करता येतात. स्कूटर चालवता येते. एकदा हे सर्व करण सोडलं, तर मात्र मग पुन्हा करता येणार नाही. तेंव्हा जाऊ दे मला. चार लोक भेटतात. बोलणं होतं. संपर्क राहतो. अरे! शेवटी चार माणसांचे महत्व नाकारता येत नाही. ते चार नेहमीच गरजेचे /महत्वाचे. नाही का??

ताई म्हणाली,  अग! आजकाल वेगळ्याच मोडमधे आहेत. आता सर्व ठिकाणी मला घेऊन जातात. काल बॅंकेत गेलो होतो.

परवा डॉक्टर कडे गेलो होतो. त्याला म्हणाले,  डॉक्टर साहेब, रात्री बेरात्री काही त्रास झाला, तर वेळेवर घेण्यासाठी काही औषध असेल का?? .

म्हणजे ‘first aid’ म्हणतात ना ते, द्या. अहो!! आम्हाला औषधांचे काही कळत नाही. वेळ सांगून येत नाही. आणि वेळेवर आम्हाला काहीही सुचणार नाही. हे पण नक्की. आम्ही दोघेच घरी असतो म्हणून विचारले.

मला भाऊजींचे कौतुक वाटले. आश्चर्य ही वाटले. जूने भाऊजी आठवले. त्यांचा नोकरीचा रूबाब, दबदबा आठवला. कोणाला त्यांच्या समोर बोलायची हिम्मत नव्हती. ताईला ही व्हायची नाही. भीती युक्त आदर होता सर्वांना.

मागच्या वर्षी एका आजारानंतर खूप बदलले भाऊजी. शरीरातील सर्व गाठी तर विरघळून गेल्याच. मनातील अहंकाराची, नोकरी तील पोझिशन ची गाठ तर पार नाहीशी झाली. आता बासरी सारखे आतुन पोकळ झालेत. आता एक वेगळेच व्यक्तिमत्त्व दिसतंय.

दहा चांगल्या गोष्टी कितीही वाचा, ऐका त्या लवकर समजत नाही. पण एक कठीण वेळ / अनुभव/ ठोकर उदाहरणासहित सर्व समजावून देते. आपला चेहरा, विचार, वागणे सर्व पार बदलते.

म्हणतात ना,

” अकड़ और अभिमान एक मानसिक बिमारी है। जिसका इलाज कुदरत और समय जरूर करते हैं ।”

भाऊजी म्हणाले,

अग! “चालता चालता कधी तरी ठेच लागणारच, जगायचं म्हंटल तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालण सोडायचे का?? दुःखात ही आनंद शोधायचा.

भाऊजी पूढे म्हणाले,

काल मी माझ्या पायांना विचारले,

” काय रे?? इतके वर्ष माझा भार उचलून, चालून चालून थकला का तुम्ही??

पाय म्हणाले,

छे! छे! अजिबात नाही.

तू फक्त मनाने थकू नकोस. थोडे बदल कर. जे आवडतं ते कर. आयुष्यभर ‘perfection’ च्या मागे धावत राहिलास. आता मोकळेपणाने बिनधास्त जग. आम्ही आहोतच.”

So, Enjoy everyday as last day of life.

“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा. ”

“जीवन एक पेन की भांति हैं।इंक खत्म हो उससे पहले अपनी कहानी लिख लो ।

लोग क्या कहेंगे???? ये सोचना बंद करो ।”

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवनाचे नियम ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ जीवनाचे नियम ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

हे एक गंभीर चिंतन आहे. माझे नाही तर आजपर्यंतच्या अनेक संत माहात्म्यांनी, तत्वचिंतकांनी, विचारवंतांनी केलेले. मी केवळ त्यातले मला जे उमजले, ते माझ्या शब्दात मांडले आहे.

`“फोडिले भांडार, धन्याचा तो माल। मी तो हमाल, भारवाहू।।”* येवढीच माझी भूमिका.

 हे चिंतन थोडे दीर्घ वाटेल, नव्हे आहेच, पण वाचकांना प्रार्थना की त्यांनी थोडी कळ सोसून हे अंतापर्यंत वाचावे. मला विश्वास आहे, तुम्हाला ते निश्चित काही देऊन जाईल.

☆ जीवनाचे नियम ☆ 

☆

जीवन दिसते तेवढे सरळ नाही

वाटते तेवढे सोपेही नाही.

करतो काही, घडते काही

असे का? समजत नाही.

* 

नुसता त्रागा, चिडचीड होते

सारे आयुष्य यातच जाते!

याला काही उपाय आहे?

आहे, आहे, निश्चित आहे.

 *

जीवनाचे काही नियम आहेत.

ते समजून घ्यायला हवेत.

नियम बदलता येत नाहीत

तशा प्रयत्नांना यश नाही.

पण, जगायचे तर बदलायला हवे-

स्वतःला, नियमांना नव्हे!

आपल्या जीवनावर आपला अधिकार.

” तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार “

ज्यांना हे कळते, त्यांचे जीवन कृतार्थ होते!

 *

पेराल तरच उगवेल

म्हणून आधी पेरायला हवे.

खडकावर पेरून कसे चालेल?

सुपीक भूमीत रुजवायला हवे.

जे पेराल तेच उगवेल.

धोत्र्याला केशर कसे लागेल!

 *

आधी कष्ट मग फळ

कष्ट नाही ते निर्फळ.

केले तर सारे होते

न केले तर तसेच राहते.

 *

गमावण्यासाठी असायला हवे.

सापडण्यासाठी शोधायला हवे.

समजण्यासाठी विचारायला हवे.

कुणी सांगितले, तर ऐकायला हवे.

 *

मोती, रत्ने हवी असतील

तर सागरतळ गाठायला हवा.

किना-यावर बसणा-याला

माती, रेती, खारी हवा!

 *

अंधार आहे? दिवा घ्यावा.

अवघड वाट? आधार घ्यावा.

मागे कुणी यायला हवे?

आपण पुढे व्हायला हवे!

 *

देणे-घेणे व्यवहार आहे.

नुसते घेणे बेकार आहे.

देणारा दानशूर होतो.

नुसते घेणारा भिकार ठरतो!

 *

यश हवे? अपयश पचवा.

शांति हवी? कलह मिटवा.

एकी हवी? बेकी तोडा.

अंतराळ हवे? भूतल सोडा!

 *

येत नसेल? शिकायला हवे.

जमत नसेल? साधायला हवे.

घडवायचे असेल तर करायला हवे.

मरायचे नसेल तर जगायला हवे!

 *

इथे कर्म करायलाच हवे.

त्याखेरीज सुटकाच नव्हे.

कर्मात दोष असुदे काही,

निर्दोष कर्मे शक्य नाही.

त्यातील दोष तेव्हाच जळतील

जेव्हा कर्मे यशस्वी होतील!

 *

सार काय? असार काय?

याचा विचार व्हायला हवा.

मी कोण? कोठून आलो? जाणार कोठे?

याचा शोध घ्यायला हवा.

 *

कर्मासाठी काया दिली.

ज्ञानासाठी इंद्रिये दिली.

भवनांसाठी मन आहे.

निर्णय करणारी बुद्धी आहे.

जन्मसिद्ध हा ठेवा

अहंकार मात्र दूर ठेवा!

 *

दिसेल ते नासेल, रचेल ते खचेल.

चढेल ते पडेल, पडेल ते चढेल.

वाढेल ते मोडेल, येईल ते जाईल.

पसरेल ते आक्रसेल, जन्मेल ते मरेल.

 *

या स्वाभाविक नियमांच्या चौकटीत

आपले जीवन बसवायला शिका.

आनंदाने जगता जगता

आत्माराम विसरू नका!

 *

संशय नको, नाश पावाल.

विश्वास ठेवा, ज्ञानी व्हाल.

जेव्हा जग सोडून जाशील

सारे काही इथेच राहील.

आलास तसाच निघून जाशील

कीर्ति परिमल पसरत राहील!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी.. एक अपघाती शिक्षक ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मी.. एक अपघाती शिक्षक ☆ शीला पतकी ☆

☆

वरील शीर्षक वाचून अपघाती शिक्षक म्हणजे काय? हा प्रश्न मनामध्ये सहजच निर्माण झाला असेल पण खरच मी अपघाती शिक्षक आहे.

– – झालं काय की लहानपणापासून जरा अभ्यासात हुशार असल्यामुळे आपण पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं हे ठरवलं होतं आणि त्या काळात ते शक्य पण होतं आणि अभ्यास करून मार्क मिळवले तर पैशाचा फारसा प्रश्न नव्हता अर्थाचा प्रश्न मला नव्हता पण पालकांना असणार आहे लहानपणीचे हे स्वप्न एफ वाय बी एस सी नंतर भंग पावलं कारण जानेवारी 23 पर्यंत मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैशाची जमवाजमव आणि लग्न पार पडणे यातच होते 135 रुपयाच्या शिकवण्या घरोघरी जाऊन मी घेत असे त्यातून अभ्यासाला जो मिळेल तो वेळ आणि ग्रंथालयात मिळतील ती पुस्तके त्यामुळे आमची गाडी जमतेम 58% अर्थात त्याकाळी 59- 60% ला मिरज मेडिकलला मिळत होते पण परगावी ठेवून शिकण्याची ऐपत नव्हती तो विषय तिथेच संपला.

मग सरळ B.Sc. केलं शिक्षक होण्याचा विचार मनात नव्हता मग ठरवलं वकील व्हावे पण नेमके बीएससी झाल्यावर मला सेन्सेक्स टॅबयुलेशन येथे नोकरी लागली ती सरकारी होती पुढे सरकारी नोकरीत सामील करून घेतले. त्याच वर्षात मी एल एल बी ला ऍडमिशन घेतली ऑफिस सहा सहा वाजता सुटत असे चार किलोमीटर अंतरावरच्या कॉलेजमध्ये जायचे रात्री नऊला कॉलेज सुटायचे सकाळी परत दहाला ऑफिस.. पगार फक्त दीडशे रुपये.

नोकरी संपली वर्ष संपले मी सुट्टीमध्ये वैजापूर या ठिकाणी आले तिथे माझी बहीण शाळेत शिक्षिका होती त्यांच्या शाळेत गणित शिकवायला कोणी नव्हते सरकारी शाळा, सरकारी नोकरी ताबडतोब नोकरी लागली आणि गणित विषया असल्यामुळे मी सकाळपासून शिकवण्या घेत होते 17 नंबर फॉर्म भरलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सगळेच विषय शिकवत होते त्यामुळे माझे उत्पन्न हजारापर्यंत गेले 150 रुपये तोळा सोना होते त्यावेळेला माझे हजार रुपये म्हणजे खूप झाले नवनवीन प्रयोग करता येत होते विद्यार्थिनींची शाळा होती मुली जवळपास माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान होतया खेडेगावात शिक्षण उशिरा सुरू होते. माझ्यापेक्षा अनेक शिक्षक वरिष्ठ होते त्यामुळे माझ्या प्रत्येक उपक्रमाचे कौतुक कामाला खूप प्रोत्साहन मिळाले आणि मग शिक्षकी पेशा आवडायला लागला पण त्याला आवश्यक आपल्याकडे डिग्री नाही परत सोलापूरला आले आणि दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला b. ed चे वर्ष पूर्ण केले त्या काळात आमचे शिक्षक शिक्षण क्षेत्रातील गुरू आदरणीय डॉक्टर सुरेश करंदीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि दुसऱ्या विभागात विद्यापीठात पहिल्या येण्याचा मान मला मिळाला माझ्या शाळेत अर्थात सेवासदन मध्ये मला नोकरी मिळाली कारण त्यावेळेला बीएससी बीएड शिक्षक मिळत नसे त्यामुळे नोकऱ्यांना काही कमी नव्हते माझ्या शिक्षकी पेशाची अशी अपघाती सुरुवात झाली…

… आणि मला एका घटनेची आठवण झाली मी सेवा सदन मध्ये असताना इयत्ता दहावी मध्ये मी एक छोटी कविता केली कवितेचे नाव होते आमची हि सर्विस करते आणि आमच्या मराठीच्या बाईंना दाखवली त्यांचं नाव होतं आदरणीय प्रतिभा बाई देव! बाई कौतुकाच्या त्यांनी माझी कविता आमचे मुख्याध्यापक नानासाहेब पाठक यांना दाखवली वरंड्यात उभे राहूनच ती कविता वाचली आणि मला म्हणाले माझ्याबरोबर चल मी त्यांच्या मागोमाग गेले ऑफिसमध्ये त्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर श्री स्वामी समर्थांचा फोटो लावलेला होता. आजही आमच्या ऑफिसमध्ये तो आहेच त्यांनी मला सांगितले तू यांना नमस्कार कर मी फोटोला नमस्कार केला नानानाही नमस्कार केला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला “खूप मोठी होशील माझा तुला आशीर्वाद आहे समर्थ पाठीशी आहेत आणि या शाळेला तुझा खूप उपयोग होणार आहे. ” दहावी म्हणजे शिंगं फुटायचे दिवस कशाला आम्ही शाळेत परतुन येतोय पण आपण मोठे होणार मग शाळेला मोठी देणगी देणार कारण त्या काळात देणगी देणाऱ्यांचे आमच्या शाळेत खूप मोठे सत्कार होत असत कदाचित त्यासाठी आपण परत येऊ असे वाटले होते मी ती गोष्ट फार गांभीर्याने घेतली नव्हती माझ ते ध्येय सुद्धा नव्हते.

नानासाहेब हे शंकर महाराजांच्या शिष्याचे शिष्य त्यांनाही काही सिद्धी प्राप्त होत्या पुढे पुढे तर ते आलेल्या माणसाचे मनातले ओळखत होते. आचार्य अत्रे अत्यावसथ आपल्या गुरूंच्या आज्ञावरून ते त्यांना भेटावयास गेले त्यांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि आचार्य अत्रे उठून बसले कारण त्यांच्या गुरुने एक शक्ती त्यांना प्रदान केलेली होती ही घटना मी अनेक पुस्तकात वाचली आहे. एकूण काय तर नानासाहेबांना सिद्धी प्राप्त झाली होती. माझे काहीही ठरले नसताना आणि सेवा सदन शाळेतच तिथेच माझ्या आयुष्याची कारकीर्द घडली नानासाहेब बसत त्याच खुर्चीवर मी बसले तोच स्वामींचा फोटो माझ्याही मागे होता यशाची कवाडे खुली झाली सामाजिक कार्याला दिशा मिळाली आणि कार्यामुळे नावलौकिक वाढला तो माझ्या शाळेचा आणि माझाही.

आजच्या शिक्षक दिनाला माझ्या शिक्षकी पेशाबद्दल विचार करताना मला हे जाणवतं की इथे सुद्धा मला खूप संघर्ष करावा लागला अनेकदा स्वतःला सिद्ध करावे लागलं बरीच आव्हान पेलावी लागली शिक्षकाची नोकरी साधी नव्हती विद्यार्थिनींना घडवताना अनेक प्रसंगातून मी सुद्धा तावूनसुलाखून पार पडत होते.

अपघाती घडले असले तरी मनापासून मी या क्षेत्रात रमले स्वतःला शिक्षक म्हणून शोधत गेले अर्थात अजूनही हा शोध सुरू आहे माझ्या सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णजन्माची मंगलरात्र… एक वेगळा विचार ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆  कृष्णजन्माची मंगलरात्र… एक वेगळा विचार ☆ राधिका भांडारकर ☆

श्रावण संपत आलेला असतो आणि आकाशात अजूनही ढगांची लगबग सुरू असते. मातीला ओल असते, पानांवर पावसाचे थेंब असतात आणि वातावरणात सणांची चाहूल लागलेली असते. अशाच या प्रसन्न दिवसांत येते गोकुळाष्टमी.

कृष्ण म्हणजे केवळ देव्हाऱ्यातला देव नाही. तो म्हणजे घराघरात हसणारे बालपण. तो म्हणजे लोण्याच्या गोळ्यासारखे निर्मळ हास्य. तो म्हणजे आईच्या पदराला धरून केलेली एखादी खोडी आणि ती खोडी पकडली गेल्यावर चेहऱ्यावर आणलेले निरागस भाव!

गोकुळाष्टमी म्हटली की डोळ्यांसमोर येते ती काळी यमुना नदी, अंधारी रात्र, डोक्यावर टोपलीत नवजात कान्हाला घेऊन, यमुनेच्या पाण्यातून चालणारा वसुदेव, आणि बालकाच्या पदस्पर्शाने दुभंगलेली नदी आणि त्यानंतर ते छोटेसे गोकुळ. नंदाचे अंगण, यशोदेची लगबग, गोप-गोपींची धावपळ आणि सगळ्यांच्या लाडक्या कान्हाची खोडकर पावले.

आजही आपल्या घरात कृष्णजन्म साजरा करताना त्या गोकुळाचीच एक छोटीशी प्रतिकृती तयार होते. देव्हाऱ्यात सुंदर सजावट केली जाते. पाळणा सजतो. त्यात छोटासा बाळकृष्ण ठेवला जातो. तुळशीपत्र, फुले, सुगंधी धूप आणि निरांजनाच्या प्रकाशात मध्यरात्रीची वाट पाहिली जाते.

आणि मग तो क्षण येतो…

“नंद घरी नंदलाला जन्मला! “

पाळणा हलतो आणि नकळत मनही हलते.

मला गोकुळाष्टमीचा हा क्षण नेहमीच विशेष वाटतो. कारण कृष्णाचा जन्म हा केवळ एका युगपुरुषाचा जन्म नाही; तो आशेचा जन्म आहे. अंधाराच्या रात्री जन्मलेला कृष्ण जणू सांगतो. अंधार कितीही गडद असला, तरी प्रकाश जन्म घेण्याची वेळ येतेच.

कृष्णाच्या बाललीला तर आपल्या संस्कृतीच्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. दही-दूध चोरणारा कान्हा, गोपिकांच्या तक्रारी ऐकणारी यशोदा, त्याच्या खोड्यांवर हसणारे गोकुळ. या सगळ्या कथा ऐकताना आपल्या मनातले बालपणही अलगद जागे होते.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कदाचित ती मातीची अंगणे नाहीत, उंबरठ्यावर रांगोळी नाही, घराघरांत लोण्याची मडकी नाहीत. पण कृष्ण अजूनही आहे.

एखाद्या मुलाच्या खट्याळ हसण्यात,

एखाद्या आईच्या काळजीत,

मैत्रीतल्या निरागसपणात,

आणि संकटाच्या वेळी मनात जागणाऱ्या धैर्यातही तो आहे.

कृष्णाने आपल्याला प्रेम शिकवले, पण त्याचबरोबर कर्मही शिकवले. त्याने बासरी वाजवली, पण वेळ आली तेव्हा सुदर्शनही हाती घेतले. म्हणूनच कृष्णाचे व्यक्तिमत्त्व इतके व्यापक वाटते. तो बालकही आहे आणि मार्गदर्शकही; सखा आहे आणि सारथीही.

गोकुळाष्टमीच्या रात्री पाळण्यातला तो छोटासा कृष्ण पाहताना एक विचार मनात येतो—आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा कान्हा असतोच. कधी मुलाच्या रूपाने, कधी नातवाच्या रूपाने, कधी एखाद्या जिवलग मित्राच्या रूपाने; जो आपल्या आयुष्यात थोडे हसू आणतो, थोडी खोडी करतो आणि नकळत आपले जगणे अधिक सुंदर करून जातो.

म्हणून गोकुळाष्टमी म्हणजे फक्त उपवास, पूजा आणि मध्यरात्रीचा जन्मसोहळा नाही.

ती आहे मनातल्या निरागसतेला पुन्हा एकदा जागवण्याची रात्र.

देवघरातला पाळणा हलताना आपल्या मनातही एखादा छोटासा पाळणा हलावा;

ज्यात विसावलेला असावा,

आपला निरागस कान्हा,

आपले हरवलेले बालपण

आणि जगण्यावरचा अजूनही टिकून असलेला विश्वास.

हात जुळतात आणि ही प्रार्थना करावीशी वाटते,

“कान्हा,

तू देव्हाऱ्यात राहा किंवा न राहा,

पण माझ्या मनातलं बालपण

कधीच हरवू देऊ नकोस. ”

कदाचित हाच गोकुळाष्टमीचा खरा अर्थ असावा.

बाहेरच्या गोकुळात कृष्णाचा जन्म साजरा करताना,

आपल्या आतल्या गोकुळालाही पुन्हा एकदा जागं करणं.

 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यवसायातील राज ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆

श्री राजेश्वर बी. पारखे

??

☆ व्यवसायातील राज ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆

☆

आज सकाळीच गणेश सलून मध्ये कटिंग करण्यासाठी गेलो असता माझ्या आधीच एक गृहस्थ त्यांची कटिंग चालू होती,.. जुन्या ओळखीतून नमस्कार झाला,

स्व.अशोकराव अग्रवाल शेठ यांचे धाकटे चिरंजीव सन्माननीय विकास अग्रवाल यांची भेट झाली,

अनेक जुन्या आठवणीला वळसा घालताना फ्लॅश बॅक मध्ये गेलो,

त्यांच्या मोहक लाघवी गोड वाणीतून मनाला खूप बरे वाटले…

मला ते म्हणाले “माफ करा साहेब तुमचे नाव मला माहित नाही परंतु लॉर्ड्स मारुती व्हॅन वाले म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखतो…

इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मी त्यांना विचारले… “गोपाल प्रिंटिंग प्रेस” चे नाव तुम्हीं अजूनही व्यवसायातून जपून ठेवले आहे,

“ते म्हणाले आमच्या आजोबांची आणि वडिलांची ती कृपा आणि संस्कार आहेत…”

या यशस्वी व्यवसायाचे अती महत्वाचे राज त्यांनी बोलून दाखविले…

ते म्हणाले…”आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे आमच्या तिघा भावांना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकविल्या…”

“एक प्रत्येक ग्राहकांशी अगदी प्रेमाने अदबीने विनम्रपणे वागायचे कारण प्रत्येक ग्राहक आम्हाला काही न काही देऊनच जातो, “

“आणि दुसरे अतिशय महत्वाचे आपल्या कामगारांचे पगार दुनिया इकडची तिकडे होवो महिन्याच्या 1 तारखेला त्यांचा पगार झालाच पाहिजे, “

एवढे बोलल्यावर त्यांच्या आवाजात एक कंपन आले आणि गंभीर आणि भावनिक शब्दात ते सांगू लागले…

“वडील म्हणायचे महिन्याच्या 1 तारखेला कामगार नाही तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर त्याच दिवसाची प्रकर्षाने वाट पहात असतो, “

घरातील किराणा असेल, लेकरांची कपडे लत्ते असतील, शालेय सामग्री असेल, चपला असतील, दूधवाला असेल, प्रत्येकाची देणेदारी, दवाखाना असेल…अशा अनेक गरजू गोष्टीची पूर्तता महिन्याच्या 1 तारखेला मोठी आशा धरून दरवाजाच्या उंबऱ्यावर उभी असते, “

“त्या एक तारखेला जेंव्हा आपला कामगार घरी जातो ना! “

“तेंव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जण मोठ्या आशेने दरवाज्याकडे टक नजर लावून बसलेले असतात, “

“आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा आपण हिरमोड कधीच करायचा नाही”

थोडेसे भावनिक ते म्हणाले,

 “या दोन वडिलांच्या तत्वावर आज आम्हीं “गोपाल प्रिंटिंग प्रेस” ला इथपर्यंत म्हणजे 82 वर्षानंतर ही व्यवस्थित चालू शकलो…”

पुढे जाऊन ते हेही म्हणाले…”आजही आम्ही तिघे भाऊ दीपक शेठ, संदीप शेठ आणि मी विकास एकत्र आहोत…”

“आमचे विचार आचार एक आहेत…”

“आमचे तिन्ही भावांचे कुटुंब एकत्र आहे…”

मी मनाशीच पुटपुटलो…

पवित्र ग्रंथ सांगतो…”तीन पदरी दोर सहसा तुटत नाही”

याचा प्रत्यय आज याची देही आला…

 1943 साली अग्रवाल कुटुंबियांनी सुरू केलेले हे श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील दालन आजही “गोपाल प्रिंटिंग प्रेस” या नावाने दिमाखात यशस्वी रित्या चालू आहे…

छोट्याश्या भेटीतून दोन मूलमंत्र उराशी घेऊन आजचा दिवसाचे अत्यंत सार्थक झाल्याचे खूप मोठे समाधान आज मला झाले…

© श्री राजेश्वर पारखे

जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर

 9822258403

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

गाडी गेटसमोर आल्यावर दोन-तीनवेळा हॉर्न वाजवूनही सिक्युरिटीनं दार उघडलं नाही.साहेब प्रचंड चिडले.ड्रायव्हर गाडीतून उतरणार इतक्यात घाईघाईनं दार उघडलं.गाडी आत गेली.काही वेळातच साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला.गार्डला दरदरून घाम फुटला.ड्युटीच्या पहिल्याच दिवसाची सुरवात वाईट झाली. 

“दार उघडायला उशीर का झाला”साहेब. 

“माफ करा.पुन्हा असं होणार नाही”गार्डनं हात जोडले तेव्हा साहेबांनी केबिनमधल्या इतरांना बाहेर जायला सांगितलं. 

“इथं कधीपासून कामाला आहे? ”साहेब 

“आजचा पहिलाच दिवस”

“बस.चहा घेणार”साहेबांनी विचारल्यावर गार्डनं नको म्हणाला.

“चहा का नको.”

“इथं नको.आता ड्युटीवर आहे”

“ड्यूटी संपल्यावर भेट”निरोप घेऊन गार्ड केबिनच्या बाहेर पडला.ऑफिसमधल्या नजरा टाळत गार्ड गेटवर आला.

—-

संध्याकाळी टपरीवर चहा घेताना साहेबांनी विचारलं “भल्या माणसा कुठे होतास.तीन वर्षांनी भेटतोयेस.”

“माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी झाल्या त्यामुळे कोणाच्याच कॉटॅक्टमध्ये नव्हतो.नंबर पण बदलला.”

“एकदम सिक्युरिटी लाइन मध्ये..”

“अचानक कंपनी बंद पडली.काहीतरी हातपाय चलवावे लागणार होते.म्हणून मग…”

“मी काही मदत..”

“नाही नको.आता व्यवस्थित चाललयं.थँक्स.”

“ऑफिसमध्ये चहा नको का म्हणालास”

“ते बरोबर नव्हतं”

“म्हणजे, ”

“तिथं तू मालक मी कामगार”

“आणि इथं?? ”

“मित्र तेही लहानपणापासूनचे”

“तरीही असं बोलतोस.चहा घेतला असता तर आभाळ कोसळलं नसतं.मैत्री अशी ठिकाणानुसार बदलत नाही.”

“खरंय!! पण परिस्थितीनुसार वागावं लागतं.आपल्या मैत्रीतली ‘लक्ष्मणरेखा’ मला ओलांडायची नव्हती.”

“एकदम असं का बोलतोयेस.”

“आपल्यातल्या अंतराची जाणीव आणि मर्यादाही मला माहितीये”

“पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो या गोष्टी आपल्यात कधीच नव्हत्या.”

“आताही नाहीत.हेच बघ ना माझ्यासोबत टपरीवर चहा घेतोयेस यातच सगळं काही आलं.तू बदलला नाहीस.”

“आणि बदलणारही नाही.”साहेब.

“करेक्ट!! ”

“तरीही तू असा विचार करतोस.आपली मैत्री जगाला कळली तरी काय फरक पडणार आहे”

“मलाही तेच म्हणायचयं.”

“काय? ”

“आपली ‘मैत्री’ जगाला दाखवायचीच कशाला?? लोकांना विनाकारण चर्चेसाठी विषय द्यायची गरज नाही.”

“हे पण बरोबर आहे, आणि आता भेटत राहू.” चियर्स म्हणत दोघांनी चहाचे ग्लास भिडवले.तेव्हा एफएम वर मन्नादा आणि किशोरदा गात होते “ये दोस्ती, हम नही तोंडेगे…”

— 

पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो असल्या गोष्टींना मैत्रीत स्थान नसलं तरी एक लक्ष्मणरेखा मात्र असते.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”हा EGO नाही तर SELF RESPECT…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “हा EGO नाही तर SELF RESPECT...“ ☆ संध्या बेडेकर ☆

 – – कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असत.

आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वस्थच होते मी.स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणार, तस काहीतरी वेगळच. 

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळं बघीतल.आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगण चालू होत.

आज काही खर नाही.विचाराची दिशा चूकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला. 

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते.हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

 जोर का झटका जोर से ही लगे असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असत ना.

दणका द्यायचे दोन फायदे होतात. 

 एकतर आपल्याला आपली शक्ति कळते.वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची strategy तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील. 

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही.असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत भांडायच नाही. आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले. 

 कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची testng पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

 अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. चर्चांचा दौर सुरू होतो.जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो. 

 हे सर्व मनात येत राहत. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे अस किती दिवस चालेल? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झाल की लवकरात लवकर भांडण थांबविण आवश्यक असत. कधी कधी लोक दुसर्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात.इंग्रजीत भांडतात.त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही. 

भांडताना केंव्हा थांबायच? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण? किती जण आहेत? आपल्याला उक्सवणारे किती आहेत? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण? किती? शुभचिंतक किती? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच.या अशा लोकांच्या तावडीत जायच नाही.

 There are lot of jealous people with friendly faces around us.We must always remember this truth.

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फूकट मध्ये मजा घेतात.नुक़सान तर आपलही होतय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, Cease fire करण जमल पाहिजे. 

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

 If you want to make wrong decision, ask everyone.

 Cease fire मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पूढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती.एवढ समजण्या इतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझ, माझ्या कुटुंबाच हित समजण्या एवढी हुशार मी नक्कीच आहे. फूकटच काही मिळतय म्हणून लाळघोटेपणा करण, जमत नाही मला. हा माझा

 EGO नाही SELF RESPECT आहे.

 सकाळी विचलीत असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

 Revenge is just waste of Time, Skip people.

हे जरी खर असल तरी कधी कधी छान दणका देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात.तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असते.

 छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुंकेगे तो बिल्कुलही नही.

हा मेसेज देणे आवश्यक असत…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. 

हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते. 

कोणाला सांभाळायच? आणि कोणापासून सांभाळून रहायच? हे ही समजलच पाहिजे. नाही का?

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राखी बंधन : आधुनिक विचार… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ राखी बंधन : आधुनिक विचार… ☆ राधिका भांडारकर ☆

श्रावणातल्या पौर्णिमेची चाहूल लागली की मनाच्या एखाद्या हळुवार कोपऱ्यात बालपण पुन्हा जागं होतं. रंगीबेरंगी राख्या, मिठाईची ताटं, भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि त्यानंतर मिळणारी छोटीशी ओवाळणीची भेट… राखीबंधनाचा हा सोहळा केवळ एका दिवसाचा नसतो. तो आठवणींच्या धाग्यांनी विणलेला असतो.

पूर्वी राखी म्हणजे बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला संरक्षणाचा धागा, अशी त्याची साधी व्याख्या होती. भाऊ बहिणीचे रक्षण करेल, तिच्या पाठीशी उभा राहील, अशी त्यामागची भावना. त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीत या भावनेला निश्चितच महत्त्व होते.

पण काळ बदलला आहे. आजची बहीणही सक्षम आहे, स्वावलंबी आहे, स्वतःचे निर्णय घेणारी आहे. ती भावाकडून केवळ संरक्षणाची अपेक्षा करत नाही. तिला त्याची साथ हवी असते, पण त्याचबरोबर तीही भावाच्या आयुष्यातील आधारस्तंभ होऊ शकते.

म्हणूनच आज राखीचा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा.

‘तू माझं रक्षण कर’ ऐवजी ‘आपण एकमेकांसाठी उभे राहू’, हा आजच्या राखीचा अधिक सुंदर अर्थ असू शकतो.

भाऊ बहिणीच्या स्वप्नांना पाठिंबा देईल आणि बहीण भावाच्या संघर्षात त्याचा हात घट्ट धरून ठेवेल. यशाच्या क्षणी दोघे एकमेकांसाठी टाळ्या वाजवतील आणि अपयशाच्या क्षणी एकमेकांना सावरतील. हे नाते संरक्षणाच्या एकतर्फी भावनेतून सहजीवनाच्या आणि समानतेच्या भावनेत प्रवेश करेल.

आज अनेक भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत, देशांत राहतात. स्क्रीनवरून होणाऱ्या भेटी, व्हिडिओ कॉलवरच्या गप्पा आणि कुरिअरने पोहोचणारी राखी यामुळे अंतर कमी होते. मनगटावर राखी बांधली जात नसली तरी मनातला धागा तसाच घट्ट राहतो.

कधी कधी तर राखीचा अर्थ रक्ताच्या नात्यापलीकडेही जातो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटलेली मैत्रीण, संकटात धावून आलेला मित्र, आधार देणारा सहकारी—ही नातीही आपल्याला सांगून जातात की माणसाला सुरक्षित वाटण्यासाठी रक्ताचं नातं असणं आवश्यक नाही; विश्वासाचं नातं असणं आवश्यक आहे.

आजच्या पिढीला राखी देताना आपण तिला केवळ एक परंपरा म्हणून देऊ नये. तिच्यामागचा विचारही द्यायला हवा. स्त्रीचे संरक्षण करण्यापेक्षा तिचा सन्मान करणे, तिच्या निर्णयांचा आदर करणे आणि तिच्या स्वातंत्र्याला साथ देणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच भावालाही आपल्या भावनांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा, कमकुवत क्षणी आधार मागण्याचा आणि बहिणीकडून आधार स्वीकारण्याचा तितकाच अधिकार आहे.

बहिणीला राखीच्या बदल्यात महागडी भेटवस्तू देणे, पैसे देणे किंवा तिच्या नावावर काहीतरी देऊन आपले कर्तव्य पूर्ण झाले असे मानणे, यापेक्षा तिच्या कर्तृत्वाची दखल घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तिला ‘घेणारी’ म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभी राहणारी, निर्णय घेणारी आणि कुटुंबाच्या जडणघडणीत समान वाटा उचलणारी व्यक्ती म्हणून पाहणे गरजेचे आहे.

बहिणीला दानाची नव्हे, सन्मानाची गरज आहे. तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन, तिच्या करिअरला पाठिंबा, तिच्या मताला महत्त्व आणि तिच्या स्वप्नांना मोकळे आकाश—हीच तिच्यासाठी सर्वात मोठी राखीची भेट ठरू शकते.

राखीचा धागा कितीही नाजूक असला तरी त्यात नातं घट्ट बांधण्याची ताकद असते. त्या धाग्यात मालकी नसावी, बंधन नसावे; असावी ती फक्त आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाची गाठ.

म्हणून या राखीपौर्णिमेला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना एवढंच म्हणावं—

“तू माझं रक्षण करशील, यापेक्षा मला खात्री आहे की तू माझ्या पाठीशी उभा राहशील. आणि तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात मीही तुझ्या सोबत असेन.”

कदाचित हाच आधुनिक राखीबंधनाचा खरा अर्थ आहे.

मनगटावरचा धागा काही दिवसांनी जुना होईल, तुटेलही. पण परस्पर विश्वासाचा धागा आयुष्यभर टिकला, तरच राखीबंधन सार्थकी लागेल.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनोळखी गुरू… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ अनोळखी गुरू…  ☆ तृप्ती देव ☆

गुरुपौर्णिमेच्या दिवस होता ऑफिसमधून परतताना एसटी स्टँडवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती.

एका बाकावर मी आणि एक वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होतो. साधा पांढरा कुर्ता, हातात जुनी कापडी पिशवी आणि डोळ्यांत विलक्षण शांतता. एकीकडे माझ्या शेजारी एक तरुण सतत मोबाईलवर ओरडत होता. बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, प्रत्येक गोष्टीत सल्ले देऊ नका, मी आता लहाना राहिलेला नाही, माझं आयुष्य मी स्वतः बघेन, तुम्ही उगाच माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं बंद करा, असा रोजचाच त्रास झालाय मला तुमचा, असं रागारागाने बोलून त्याने फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनालाही वाटलं की आजकालची मुलं आईवडिलांचा आदरच करत नाही. कोणाची परिस्थिती कशी आणि मनस्थिती मला ओळखता. येत नव्हती. नक्की काय झालं हे कळत नाही. पण एका बापाची काळजी समजत होती. कुठलातरी ताण मुलाच्या मनावर होता त्याच्या शब्दातून तो जाणवत होता.

तेवढ्यात समोर बसलेले आजोबा उठले आणि त्या मुलाजवळ गेले. ते रागावले नाहीत किंवा त्यांनी उपदेशही केला नाही. त्यांनी फक्त अत्यंत आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बाळा एक विनंती करू. तो चिडून म्हणाला की काय. आजोबा हसले आणि म्हणाले की आज घरी गेल्यावर बाबांच्या खोलीत जा, ते झोपले असतील तर त्यांच्या पायाशी दोन मिनिटं शांत बस. तो हळूच हसला आणि म्हणाला की त्याने काय होणार. आजोबा अतिशय हळुवार आवाजात म्हणाले की काही नाही झालं तरी चालेल,

पण एक दिवस असा येईल की त्या खोलीत पलंग असेल, उशी असेल, त्यांच्या चप्पलाही दारात तशाच असतील, त्यांचा कपड्यांचा वासही खोलीत असेल, फक्त हाक मारायला बाबा नसतील आणि त्या दिवशी पश्चात्तापाचे अश्रू ढाळले तरी ती गमावलेली दोन मिनिटं जगातील संपूर्ण संपत्ती दिली तरी विकत मिळत नाहीत. क्षणभर संपूर्ण स्टँडवर गहिवरलेली शांतता पसरली. त्या शब्दांचा थेट त्याच्या हृदयाला स्पर्श झाला.

आईवडिलांचं असणं हे किती मोठं छत्र असतं आणि आपण काय गमावून बसू शकतो याची जाणीव त्याला झाली. त्याच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी आलं. त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा फोन काढला आणि बाबांना फोन लावला. यावेळी त्याचा आवाज पूर्णपणे बदलला होता, गळ्यात हुंदका दाटून आला होता. तो कातर आवाजात म्हणाला की बाबा मला माफ करा, मी खरंच खूप चुकलो, मी आत्ताच घरी येतोय, आज आपण एकत्र बसून चहा पिऊया आणि मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काय उत्तर आलं माहीत नाही, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापानंतरचं एक वेगळंच समाधान आणि हसू होतं. मी त्या आजोबांकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही शिक्षक आहात का. 

ते हसले आणि म्हणाले की नाही बाई, मी फक्त आयुष्याकडून शिकलेला विद्यार्थी आहे. इतकं बोलून ते गर्दीत बस मधे चढून निघून गेले. मी त्यांचं नावही विचारू शकले नाही. आज अनेक वर्षांनीही गुरुपौर्णिमा आली की मी देवापुढे दिवा लावते, पण त्याआधी घरातल्या माणसांसोबत दहा मिनिटं बसते. कारण त्या अनोळखी वृद्धाने मला शिकवलं की गुरू तो नसतो जो मोठमोठी प्रवचनं देतो, गुरू तो असतो जो एका वाक्यात आयुष्याचा आणि नात्यांचा अर्थ बदलून टाकतो. त्या अनोळखी माणसाचं नाव मला आजही माहीत नाही, पण प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी मनात त्यांना नमस्कार करते. कारण काही गुरू पुस्तकात भेटतात, काही मंदिरात आणि काही अचानक एखाद्या एसटी स्टँडवर. मनामध्ये गुरुचे स्थान मिळवतात.

असे गुरू कोणत्याही शाळेच्या पाटीवर किंवा पुस्तकात नसतात, तर ते आयुष्याच्या वळणावर अचानक भेटतात. त्यांची एकच साधी गोष्ट आपल्याला नात्यांचं खरं मोल शिकवून जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनाला स्पर्श करून आयुष्य बदलणारा हाच अनुभव खऱ्या अर्थाने गुरू असतो.

 ┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares