मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळे आणि माय मराठीची समृद्धी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

डोळे आणि माय मराठीची समृद्धी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

दोन डोळे आणि पहा माय मराठीची समृद्धी:

 १. डोळा लागणे (झोप लागणे)

 २. डोळा मारणे (इशारा करणे)

 ३. डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

 ४. डोळे येणे (नेत्रविकार होणे)

 ५. डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

 ६. डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

 ७. डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

 ८. डोळे खिळणे (एकटक पाहणे)

 ९. डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

 १०. डोळे दिपणे (थक्क होणे)

 ११. डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

 १२. डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

 १३. डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

 १४. डोळे भरून येणे (रडू येणे)

 १५. डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

 १६. डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

 १७. डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

 १८. डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

 १९. डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

 २०. डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

 २१. डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

 २२. डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

 २३. डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

 २४. डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

 २५. डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

 २६. डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

 २७. डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

 २८. डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

 २९. डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

 ३०. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे, पण स्वतःची मोठी चूक न दिसणे).

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “सुखाचे गुंफलेले काही क्षण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “सुखाचे गुंफलेले काही क्षण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

▪ कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग

▪ आलं घातलेला वाफाळणारा चहा

▪ अंगणातला प्राजक्ताचा सडा,

▪ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर,

▪ अवीट गोडी असलेलं… लताचं – “सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के… “,

▪ लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात

▪ पुलंचं पुस्तक, त्यांचं पेटीवादन… त्यांचं कथाकथन,

▪ आशाच्या हुकमी आवाजातलं – ” जाईए आप कहा जाएंगे…, “

▪ बिस्मिल्लांचे सनईचे सूर,

▪ सुधीर फडके यांचं “धुंदी कळ्यांना …” भावगीत

▪ सोनचाफ्याची फुलं

▪ अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी

▪ थोडीशी तिखट भेळ, गरम भजी, चुलीवरची भाकरी, गरम हुरडा आणि चटणी

▪ रातराणीचा सुगंध,

▪ थंडीत खाल्लेलं टेंडर कोकोनट,

▪ गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र,

▪ पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी

▪ अचानक नजरेला पडलेला भारद्वाज

▪ आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी

▪ दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं …

 

सुख सुख म्हणतात ते हेच…

… आणखी काय पाहिजे… छोटी छोटी सुखं शोधाल तर जीवन जगाल !

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जगातली सर्वात सुंदर नोकरी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

ब्रेकिंग न्यूज: मुलांनी शेवटी जगातील सर्वात सुंदर नोकरी शोधली आहे… ‘आजोबा’ होणे!

 

एका लहान मुलाला शाळेत निबंध लिहायला सांगितला होता: “माझी महत्त्वाकांक्षा”.

त्याने लिहिले — मला राष्ट्रपती व्हायचे नाही, मला डॉक्टर व्हायचे नाही, मला शास्त्रज्ञही व्हायचे नाही. यापैकी काहीच नको! माझी भविष्यातील महत्त्वाकांक्षा आहे — आजोबा होणे!

कारण आजोबा होणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे!

कारण माझे आजोबा —

 सकाळी उशिरा उठू शकतात,

 दुपारी शांतपणे झोपू शकतात,

संध्याकाळी टीव्ही पाहू शकतात आणि लवकर झोपू शकतात.

 कोणताही गृहपाठ नाही,

 उन्हाळ्याच्या सुट्टीचे कोणतेही असाइनमेंट नाही,

 आणि कोणतीही ट्यूशनसुद्धा नाही.

 जर काहीच काम नसेल, तर ते झाडाखाली बसून वाऱ्याचा आनंद घेऊ शकतात,

किंवा पार्कमध्ये जाऊन कोणासोबत तरी बुद्धिबळ खेळू शकतात.

 त्यांना हवा तितका वेळ ते व्हिडिओ गेम्स खेळू शकतात — कोणीही तक्रार करत नाही!

 सकाळी कॉफी, दुपारी चहा, रात्री वाईन — राजासारखे आनंदी जीवन.

बसमध्ये मोफत प्रवास,

आणि नशीब चांगले असेल तर कोणीतरी जागाही देते.

 हाय-स्पीड ट्रेन आणि चित्रपट — अर्ध्या किमतीत!

त्यांना जे वाटेल ते ते खाऊ शकतात — गरम पदार्थ जसे की कांदा भजी, राईस केक, सूप, ग्रील्ड सॉसेज आणि बरेच काही. थंड पदार्थांमध्ये आईस्क्रीम, पुडिंग, जेली, चीज — आणि त्यांना कोणीही थांबवत नाही (जोपर्यंत ते जास्त खात नाहीत).

 त्यांना आवडेल ते ते करू शकतात — गाणे, डान्स, पेंटिंग, पियानो किंवा ट्रम्पेट वाजवणे, गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगला जाणे!

 आणि खिशात पैसे असतील तर ते जगभर फिरू शकतात!

 आजोबा होणे खरोखरच खूप छान आहे!

प्रेरणा: खुद्द आजोबांनाही कदाचित माहीत नसेल की ते खरोखर किती आनंदी आहेत!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझे वाचन खूप वेगवेगळ्या विषयांवर, पण फार विस्कळीत असते. माझ्या बेडसाईड टेबलवर एकाच वेळी चार ते पाच तरी वेगवगळ्या विषयांवरची आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, आणि थोडे हे पुस्तक, थोडे ते पुस्तक असे चाखत माखत वाचन सुरु असते. फक्त मंदिर स्थापत्य, भारतीय वस्त्रकला आणि एकूणच कला हे तीन आवडीचे आणि अभ्यासाचे विषय सोडले तर माझे वाचन बरेचशे बेशिस्त, अघळपघळ आणि विस्कळीत आहे, बट समहाऊ, इट वर्क्स फॉर मी!

आता हेच बघा ना, शंकर रामाणींची कोकणी कविता मला थेट माझ्या बालपणीच्या गोव्यात घेऊन जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला गोव्याच्या खाऱ्या वाऱ्याचा गंध आहे, तिथल्या तांबड्या मातीचा रंग आहे, तिथल्या जाई-सुरंगीचा परमळ आहे आणि तिथल्या आठवणींची आंबटगोड अमूरपिकी चव आहे. आता हीच, छोटीशीच कविता पहा ना,

खंयचो हो गांव?

पांचवेंचार सेम

अपरूपाचे ब्रह्म

चंवरता.

 

पालवली वात ;

फांतोडेची भूल

उजवाडाचो धुल्ल

म्हज्या दारां.

पहिल्या वाचनात ही कविता अगदीच साधी वाटते; पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की रामाणी कुठली अध्यात्मिक जाणीव कवितेत जिवंत करू पाहतात.

‘खंयचो हो गांव? ’ हा प्रश्न साधा नाही, आपण कोण? कुठले? कुठे उभे आहोत? हे विचारणारा हा साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर कवी उभा आहे, तिथे तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतोय. पांचवेंचार सैम/अप्रूपाचे ब्रह्म ह्या ओळीत कवी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सैम म्हणजे निसर्ग, जो स्वतःच जणू अप्रुपाचं ब्रह्म आहे. सगळं निसर्गचक्र एकमेकांत गुंफलेलं आहे. माती, पाणी, उजेड, वारा, आणि मानवी जीवन सारं एकाच धाग्यात ओवलेलं. समुद्राच्या पाण्यात अदृश्य रूपात मीठ असावं तसं हे ब्रह्मरूप आहे. म्हटलं तर हा साक्षात्कार सोपा आहे, पण जीवन इतकं सोपं, सरळ नसतं.

‘फांतोडेची भूल’ हा किती अचूक शब्द वापरलाय रामाणींनी. आयुष्यात किती तरी वेळा आपल्याला चकवा लागतो, पहाटेच्या धुक्यात पुढ्यात पुढ्यात रस्ता असूनही आपण कधी कधी चुकीच्या वाटा धरतो. ‘उजवाडाचो धुल्ल म्हज्या दारां’, म्हणजे प्रकाश आहे, पण तो स्वच्छ नाही. प्रकाशाचा धुरळा आहे. सत्य आपल्या पुढे आहे, पण ते स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी नजर आधी स्वच्छ करावी लागते. मला रामाणींची कविता भाषेचं साधं सौंदर्य आणि तरीही त्या कवितेला व्यापून उरलेली एक प्रकारची अध्यात्मिक गूढता ह्यासाठी आवडते.

‘देखणा देहान्त जो’ हे वनिता पटवर्धन ह्यांचे पुस्तक सर्वांगाने मृत्यूविषयी भाष्य करते. जरा वेगळा विषय आहे, पण अध्यात्मिक, साहित्यिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला मृत्यूचा धांडोळा वाचनीय आहे. तसेही कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल एक सुप्त आकर्षण असतेच.

नितीन वैद्य Neeteen Vaidya हे फेसबुकवरचे माझे एक आवडते लेखक. ते मुखत्वे पुस्तकांविषयी लिहितात. त्यांच्या वाचनात कमालीचे सातत्य आणि शिस्त आहे, जी बघूनच माझी छाती दडपून जाते. इतक्या शिस्तीने मी काहीच करू शकत नाही, पण ‘वाचून उरणारी पुस्तके’ हे त्यांचे त्यांच्या वाचनप्रवासाबद्दलचे पुस्तक खरोखरी छान आहे. ते म्हणतात तसे ‘पुस्तके तुम्हाला वेगवेगळ्या शक्यतांच्या तिठ्यावर आणून सोडतात’.

भैरप्पांचे सार्थ हे माझ्या अतीव आवडीचे पुस्तक. आठव्या शतकातल्या भारताचा प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक पट वाचकांपुढे उलगडणारे हे पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकते. आता एक दीर्घ लेख लिहिण्याच्या निमित्ताने कितव्यांदा तरी परत वाचून काढले. भैरप्पांच्याच जास्त लोकप्रिय असलेल्या आवरणचं प्रिक्वेल म्हणून प्रत्येकाने सार्थ वाचावं असं मला वाटतं. भारताच्या ऱ्हासकाळाची सुरवात सार्थ मध्ये नोंदली गेली आहे तर मध्य आवरण मध्ये.

ह्यातलं ‘आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी’ हे पुस्तक इतर पुस्तकांहून वेगळं आहे. बचत, गुंतवणूक आणि खर्च ह्या तिन्ही संकल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारं हे पुस्तक पैश्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. जवळचा पैसा खर्च करणं म्हणजे फक्त नोटा मोजून एखादी वस्तू विकत घेणे नव्हे, तर आपण पैसे केव्हा, कसा आणि कशावर खर्च करतो ह्यातून आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राथमिकता परिभाषित होतात हेच हे पुस्तक विविध उदाहरणे देऊन सांगतं. पैशाला नाकारायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्याचा राजाही बनवायचं नाही हेच हे पुस्तक सांगतं. अनुभवांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, नात्यांवर केलेला खर्च ही उधळपट्टी नसते, ती आपल्या आयुष्यात केलेली गुंतवणूक असते हा महत्त्वाचा धडा हे पुस्तक देतं.

ही सगळी पुस्तकं एकाच वेळी वाचताना मला असं जाणवत होतं ही पुस्तकं वेगवेगळी असली, तीन वेगवेगळ्या भाषांमधली असली तरी कुठेतरी ह्या सगळ्या पुस्तकांना जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो म्हणजे वाचक म्हणून माझा दृष्टिकोन. रामाणींच्या कवितेतला “खंयचो हो गांव? ” हा प्रश्न, भैरप्पांच्या लेखनातून उमटणारी इतिहासाची जाणीव, वनिता पटवर्धनांची मृत्यूकडे पाहण्याची शांत, थेट नजर, नितीन वैद्यांचे ठासून सांगणे की पुस्तके मित्र असतात, जगण्याला आधार देतात पण जगावं मात्र आपल्यालाच लागतं आणि मॉर्गन हौसेलची पैशाकडे बघण्याची प्रगल्भ समज हे सगळंच शेवटी वाचक म्हणून आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतं.

वाचन शिस्तीत करता आलं तर आनंदच आहे, पण तसं ते नसलं तरी जिवंत असावं लागतं. थोडं असं, थोडं तसं, कधी विस्कळीत, कधी नेमकं, पण सतत आपल्याला घडवत राहणारं. जसं समुद्राच्या वाऱ्यात मीठ असतं, तसं या सगळ्या वाचनात वाचक म्हणून आपल्या अनुभवांचं, आठवणींचं आणि जाणिवांचं एक सूक्ष्म पण कायम राहणारं अस्तित्व असतं. आणि मग लक्षात येतं, शंकर रामाणी शोधत असलेलं ‘गांव’ हे बाहेर नसून, या सगळ्या शब्दांमध्ये, त्यातून मिळणाऱ्या अनुभूतींमध्ये, स्वतःच्या आतच कुठेतरी शांतपणे वसलेलं आहे.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महान राजा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “महान राजा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

व्हियेतनाम या लहानग्या देशानं

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला

नमवलं होतं.

जवळपास वीस वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती.

 

विजयानंतर व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्षांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला.

साहजिकच तो यु्द्ध कसे जिंकलात हाच असणार! किंवा

अमेरिकेला कसं नमवलं हाच असणार!

 

त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा…

“मुळात अमेरिका बलाढ्य देश. मात्र त्याच बलाढ्य देशाला नमवण्यासाठी

मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं. त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनीतीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला…

पुढे पत्रकारानं विचारलं की, कोण होता तो महान राजा?

 

मित्रांनो, जेव्हा मी हे वाचलं तेव्हा माझीही छाती चांगलीच फुगली, जशी आता तुमची फुगेल..

 

तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले

आणि

छत्रपती शिवाजी महाराज” असं नाव घेतलं.

नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज दिसत होतं!

 

पुढे ते म्हणाले की, असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता,

तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.

 

काही वर्षांनंतर या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर ‘शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधिस्थ झाला’

असं लिहून ठेवलंय…

 

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचा दौरा केला. ठरलेल्या राजकीय

कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली.

 

मात्र हे दाखवत असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे विचारलं.

तेव्हा…

तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख केला…

 

परराष्ट्र मंत्री रायगडावर आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

 

समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली.

यावर पत्रकारांनी या मातीमागचं कारण विचारलं. त्यावर मंत्री महोदय म्हणाल्या की,

“ही माती शूरांची आहे.

या मातीत महान राजा जन्माला आला. हीच माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे.

जेणेकरून आमच्या देशामध्ये असे शूर वीर पुरुष जन्माला येवोत… “

 

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून

संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे!

 

छत्रपती शिवाजी महाराज की जय!  

अपेक्षा व्यक्त करतो की, आपण ही आलेख मोठ्या अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करावी..!

 ज्यांचं टीचभर आहे ते हात भर सांगतात आणि माझ्या राजाच आभाळभर आहे तरी ते सांगायला आपण कमी पडतो.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवनाचे सार… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जीवनाचे सार… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

आयुष्य फार सुंदर आहे!

खिशातून ५०रुपयांची एक नोट जरी पडली तरी कावराबावरा अन् बेचैन होणारा माणूस आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी, त्याच्यात परिवर्तन येत नाही, बिनधास्तच वागतो! काय दुर्दैव आहे!

स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही!

काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पितो!

माणूस समजतो: मी जगतोय!

माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती‌ वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत!

तर चला, उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया!

पासबुक आणि श्वास बुक. दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.

म्हणून

`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.

आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?

जीवनाचे सार:

जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.

रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.

रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही.

ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.

बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.

ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.

मित्रांनो, जीवन सुंदर आहेच, फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत, तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रस्थान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रस्थान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

माझ्या घरासमोर एका बंगल्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. सिमेंट, लाकडं, विटा येऊन पडत होत्या. एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात दोन महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक हडकुळे ३ वर्षाचे पोर ओढल्यागत चालत होते. आल्या आल्या बाईने बंगल्याच्या आवारात दोन लाकडी खांबांना जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. शेजारी बंगल्याचे बांधकाम वेगाने सुरू झाले. ती दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.

जाता येता मी त्या परिवाराशी बोलत असे. कधी चॉकलेट-बिस्किटे, नाश्ता देत असे. सिमेंट रेती विटांचे काम सुरू होते. बघता-बघता बंगला उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही ऊन्हातान्हात दगड-वाळूत खेळू लागले. पुढे पावसाळा सुरू झाला, तशी तिची रवानगी बंगल्यातल्या अर्धवट बांधलेल्या खोलीत झाली. मी तिला, तिच्या नव-याला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा कंत्राटदार दोन-चार दिवसांत कधीतरी यायचा. मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी उगवायचा. एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे. सगळ्यांची अस्सल मातीशी बांधिलकी. मुलं दगडामातीत ऊन- थंडी- पाऊस झेलत खेळायची. पण कधी आजारी पडली नाहीत.

आमच्या बोलण्यात माणूस गप्प असायचा. ती मात्र मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची. हळुहळू बंगला पूर्ण झाला. मग प्लास्टर. लवकरच बंगल्याला आतबाहेर सुंदर रंग दिला गेला. बंगला छान सजू लागला.

एक दिवस मी सहज खिडकीबाहेर पाहत होतो. त्या घरासमोर ट्रक आला. त्यात कुदळ, फावडे, टोपल्या असे सामान होते. ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या मुलाला ट्रकमध्ये उभे केले, तीही नव-यासह ट्रकमध्ये चढली. ट्रक निघाला! जेव्हा तो ट्रक आमच्या घराजवळून जाऊ लागला तेव्हा मी धावतच जाऊन तो थांबवला. तिच्या डोळ्यात पाणी होते. ट्रकच्या आवाजात ऐकू येणार नाही, असं वाटून ती ओरडून म्हणाली, ‘दादा, आमचा मुक्काम संपला. येते जी मी! ‘ मला तो धक्का होता. मी ओरडूनच विचारले, ‘का हो, असे अचानक चाललात? ‘ तिचे हसून उत्तर आले, ‘मालकाचा निरोप आलाय. नव्या साईटीवर काम सुरू होणार आहे. आता तिथे बघायला नको का? ‘ तिने मायेने हात हलवला. आणि ट्रक दिसेनासा झाला.

मी सुन्न होऊन बघतच राहिलो…

एखाद्या सुगरण पक्षिणीने गवताची एकेक काडी गोळा करून खोपा विणावा, तसे तिने जीव ओतून घर बनविले. तिला कधी आपलेही घर असावे असे वाटत नसेल का? कसे यांचे जीवन? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमले उभारायचे. ऊन्हा-तान्हात पोरं वाढवायची. घर पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे! जवळजवळ वर्षभर ती बाई ज्या घरात राहिली, तिचा संसार फुलला, जे घर तिने इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ती चालली होती. कसला मोह नाही, लोभ नाही, तक्रार नाही. आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला.

मनात विचार आला…

जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का?

तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का?

जे मिळविले, निगुतीने सजविले, ते तसेच सोडून जावे लागणार नाही का?

त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही दुसऱ्या साईटवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते? अगदी एक क्षण, एक श्वासतरी जास्त मिळतो का कुणाला?

सर्वांना जावेच लागते की! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का?

एकदा अवश्य विचार करून पहावा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मित्र… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ मित्र… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मैत्री केली तर

गरज पाहू नका,

आणि मदत केली तर

ती बोलून दाखवू नका.

कारण कोणत्याही

बाटलीचा सील,

आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की

विषय संपला.

 

मित्र गरज म्हणून नाही

तर सवय म्हणून जोडा,

कारण गरज संपते पण

सवय कधीच सुटत नाही.

 

‘मित्र’ नावाची ही दैवी देणगी

जिवापाड जपून ठेवा,

कारण.. जीवनांतील

अर्धा गोडवा हा

मित्रांमुळेच असतो.

 

कोणीतरी विचारले

“मित्रांमध्ये एवढे काय विशेष

नातेवाईकांपेक्षा? “

त्यांना सांगितले,

“मित्र हे फक्त मित्र असतात.

त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र

असं काही नसतं.

ते ‘थेट’ मित्रच असतात. “

 

मैत्रीचे धागे हे

कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही

बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहूनही

मजबूत असतात.

तुटले तर श्वासानेही तुटतील,

नाहीतर वज्राघातानेही

तुटणार नाहीत.

 

प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार

होतातच असे नाही.

काही दुखणी

कुटुंब आणि मित्र मंडळी

यांच्या बरोबर हसण्या आणि

खिदळण्यानेही बरी होतात.

 माणसाने

कितीही प्रयत्न केले तरी

अंधारात ‘सावली’

म्हातारपणात ‘शरीर’

आणि..

आयुष्याच्या

शेवटच्या काळात ‘पैसा’

कधीच साथ देत नाहीत.

साथ देतात ती

फक्त आपण जोडलेले

जवळचे मित्र.

 

मित्र बोलवत आहे,

पण तुम्हाला जावेसे

वाटत नसेल तर..

समजा की तुम्ही म्हातारे झालात.

म्हातारपण येऊ न देणे

आपल्या हातातच आहे ना!

 

मित्रांसोबत राहा

व आनंदात

जीवन भर जगत राहा.

कवि : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अवयवांची गंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “अवयवांची गंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

०१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.

०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.

०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.

०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता.

०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.

०७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात. तो अधिकार मला का नाही? “त्यावर पाय हसून म्हणाले, “त्यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही. “

०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!

०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? ” त्यावर हारातील फुले म्हणाली, ” त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. “

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लावतो.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘हातात हात पकडला पाहिजे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘हातात हात पकडला पाहिजे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

 

नातं कोणतंही असो

मतभेद कितीही असो

संबंध तोडण्याची भाषा

मुळीच कधी करू नये

 

प्रत्येक माणूस वेगळा

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी

कहाणीच आगळी-वेगळी

 

बापासारखा मुलगा नसतो

मुलासारखी सून नसते

नवरा आणि बायकोचे तरी

कुठे तेवढे पटत असते?

 

जरी नाही पटले तरी

गाडी मात्र हाकायची असते

अबोला धरून विभक्त होऊन

सारं गणित चुकायचे नसते

 

काही धरायचं असतं

काही सोडायचं असतं

एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून

एकमेकाला सोडायचं नसतं

 

चुकल्यावर बोलावं

बोलल्यावर ऐकून घ्यावं

एकांतात बसल्यावर

अंतरंगात डोकवावं

 

राग मनात ठेवला म्हणून

कोणाचं भलं झालं का?

बिनफुलाच्या झाडाजवळ

पाखरू कधी आलं का?

 

समोरची व्यक्ती चुकली तरी

प्रेम करता आलं पाहिजे

झालं गेलं विसरून जाऊन

गच्च मिठी मारली पाहिजे

 

स्वागत होईल न होईल

जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे

समोरचा जरी चुकला तरी

म्हणा “खुशाल ठेव देवा त्याला! “

 

आयुष्य खूप छोटं आहे

हां हां म्हणता संपून जाईल

प्रेम करायचं राहिलं म्हणून

शेवटी खूप पश्चात्ताप होईल

 

लक्षात ठेवा नात्यापेक्षा

दुसरं काहीही मोठं नाही

आपलं माणूस आपल्याजवळ

यासारखी श्रीमंती नाही

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares