मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

☆

आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

एका आईच्या हृदयातून निघालेले बोल:

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई, खाऊन बघ छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू, पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज.. सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते..

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई, हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं…

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतंय..

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

 

खूप धन्य वाटतंय..

 

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

 

गर्भगृह – जिथे “मी” संपतो, तिथेच सत्य सुरू होतं.

 

एक प्रश्न विचारतो.

उत्तर देण्याची घाई नको.

फक्त… आत जा.

तुम्ही कधी तरी गर्भगृहात उभे राहिलात?

नक्कीच राहिले असाल,

तेव्हा —

तुम्हाला नक्की काय वाटलं?

शांतता?

भीती?

ओढ?

रडू?

याखेरीज असंख्य भावना

की… काहीच नाही?

ते “काहीच नाही” हेसुद्धा उत्तर आहे.

कारण गर्भगृह तुम्हाला काहीतरी देत नाही —

ते तुमच्याकडून काहीतरी घेतं.

 

 गर्भगृह म्हणजे फक्त एक खोली नाही.

मंदिराच्या आत जाताना आपण दरवाजे ओलांडतो —

पण ते दरवाजे केवळ भौतिक सामग्रीचे नसतात.

ते मनाच्या थरांचे दरवाजे असतात.

पहिला दरवाजा — बाहेरचा गोंगाट सोडून येणारा “मी”

दुसरा — प्रश्नांनी भरलेला, अपेक्षांनी थकलेला “मी”

तिसरा — उत्तराच्या शोधात असलेला, एकटा “मी”

आणि चौथा —

जिथे “मी” उरत नाही.

तिथेच गर्भगृह सुरू होतं.

 

 गर्भगृहात अंधार का असतो?

 

गर्भगृह अंधारं असतं — हा योगायोग नाही.

जसा आईच्या उदरात अंधार असतो, तरीही तिथेच जीव आकार घेतो —तसंच गर्भगृहाच्या त्या काळोखात तुमचे संकल्प, तुमची श्रद्धा, तुमचं भविष्य आकार घेतं.

बाहेरचा प्रकाश डोळ्यांना दिसतो.

आतला प्रकाश आत्म्याला जाणवतो.

गर्भगृह तुम्हाला त्या आतल्या प्रकाशाकडे वळवतं.

म्हणून तिथे दिवे कमी असतात — कारण तिथे तुमचीच ज्योत पेटायची असते.

 

 मंत्र का म्हणतात तिथे?

कारण तिथे भाषा चालत नाही — तर तिथे चालते कंपन, स्पंदन.

तुम्ही जेव्हा “ॐ नमः शिवाय” म्हणता —

तेव्हा तुम्ही फक्त शब्द उच्चारत नाही,

तुम्ही स्वतःच्या पेशींना एक संदेश देत असता.

त्या नादात तुमची भीती विरघळते,

तुमचा अहंकार झुकतो,

आणि त्या क्षणी —

देव तुमच्यात शिरतो, तुमच्यासमोर नव्हे.

 हजारो वर्षांची ऊर्जा

जुन्या मंदिराच्या गर्भगृहात एक वेगळाच भार असतो —

तो दगडांचा नाही.

तो हजारो माणसांच्या अश्रूंचा, प्रार्थनांचा, श्रद्धेचा भार आहे.

शतकानुशतके तिथे कोणी आलं —

मुलासाठी, आजारासाठी, दारिद्र्यासाठी, प्रेमासाठी.

त्या सगळ्यांनी आपापलं काहीतरी तिथे ठेवलं.

ती मूर्ती दगडाची किंवा धातूची नाही — ती लक्षावधी माणसांच्या विश्वासाची घनमूर्ती आहे.

म्हणून तिथे गेलं की काहीतरी होतं.

ते “काहीतरी” विज्ञानाला अजून ज्याला नाव देता आलेलं नाही.

 

 गर्भगृह “सगळ्यांसाठी” का नसतं?

इथे एक खरं बोलतो —

गर्भगृहाचे नियम कोणाला कमी लेखत नाहीत.

ते त्या जागेची कंपनशक्ती टिकवण्यासाठी आहेत.

जसं एखाद्या शस्त्रक्रियागृहात

सगळ्यांना आत सोडत नाहीत —

तिथे तयारी लागते, शुचिता लागते —

तसंच गर्भगृहात मनाची शुचिता लागते.

तुम्ही स्वच्छ आहात की नाही हे कपड्यांवरून नाही —

ते तुमच्या हेतूवरून ठरतं.

 आणि हे सगळ्यात महत्त्वाचं — गर्भगृहात जायलाच पाहिजे असं नाही.

जर तुमचं मन स्थिर असेल, आणि जर तुम्ही कुठेही बसून डोळे मिटलेत आणि त्या शक्तीशी जोडले गेलात तर ती स्पंदनं तुमच्यापर्यंत येतात. अंतर नाही. भिंत नाही. दरवाजा नाही. तरीही ती स्पंदने पोचतात

श्रद्धा हाच रस्ता आहे.

 

शेवटी एकच प्रश्न —

तुमच्या कुलदेवतेचं स्थान तुमच्यासाठी काय आहे?

एक जिवंत ऊर्जास्थान —

जिथे तुम्ही रिकामे होऊन जाता आणि भरून येता?

की एक फोटो काढण्याची जागा?

की एक पर्यटन स्थळ?

हे वाचताना जर आत कुठेतरी काहीतरी हललं,

एखादा श्वास खोल गेला,

डोळे ओले झाले —

तर तुमचं गर्भगृह आत आहे.

ते कधीच बंद नसतं.

गर्भगृहात तुम्ही प्रवेश करत नाही —

तिथून परतताना

तुमचं सत्य घरी परततं.

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

☆

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.

रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात.

उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही, तोपर्यंत ‘घ्या’ म्हणायला माझं काय जातं म्हणा!

तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे.

पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत.

जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो, तसा जिलबी आणि… छे!

जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं

जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात.

रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत.

सकाळी यमन बेचव वाटतो.

सकाळी थालीपीठही बेचव वाटतं.

मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं.

सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं.

सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहोत, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत.

 

अधिकचं हे असं आहे.

लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात.

हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं.

शहाळ्याचं पाणी हापिसात बसून

पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत.

मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे.

आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.

खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेत्ते होते.

उपासाचं खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. ‘उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. ‘

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. ‘हरहर महादेव’ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.

माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.

सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा.

 सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.

होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा.

दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते.

संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर ‘गोड गोड बोला’ म्हणतील लोक.

कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दूध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं.

गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या?

रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन् खडीसाखर…

सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे.

शुभ खाद्यान्न!

☆

लेखक: पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वय असतं का पावसाला? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

☆

वय असतं का पावसाला?

असतं की…

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षांचा असतो.

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षांचा असतो.

ट्रेकिंग करतांना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो.

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची.

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची.

नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात, आणि नातवंडांना ओरडतो पण की अरे भिजू नका रे पावसात.

आपल्याबरोबर बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं, किती पहावा पाऊस

*

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले.

 *

वय पावसाला नाही

वय मला भिवविते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते.

 ☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वेशीपर्यंत आलायस” – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “वेशीपर्यंत आलायस” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

वेशीपर्यंत आलायस…

आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस…

पटकन माप ओलांड आणि आत ये…

 कंजूसपणा करू नको….

दिल खोलके बरस…

येताना चोर पावलांनी नको,

 राजासारखा सनई चौघडे वाजवत ये…

 येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव…

तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल…

एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील…

ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल,

 तरी पण तिथे थांब…

तिच्या शेतात सगळ्यात आधी जा…

आणि तिथल्या मातीत रुजून राहा…

 मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड…

नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड…

 हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस…

धन-धान्यासाठी ये,

छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये…

 

 पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव…

 आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव…

 सगळ्यांना पाणी दे,

प्रेमात पडलेल्यांना गाणी दे,

फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे…

 वाफाळलेल्या चहासाठी ये,

 गरमा-गरम भज्यांसाठी ये,

शेगडीवरच्या कणसासाठी ये…

तर्राट होऊन ये….

सैराट होऊन ये…

आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक………

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

☆

‘जून’ महिना संपत आला…

पण अ’जून’ पावसाचा पत्ता नाही…

असं वाटतं की भि’जून’जावं…

मो’जून’ दोन चार थेंब पडतात…

अंग भा’जून’ जातंय…

चेहरा कोमे’जून’ गेलाय…

कुठे   स’जून’ जाता येत नाही…

 

रात्री १२ वा’जून’ गेले तरी झोप  येत नाही..

 

अरे जरा त्या पावसाला सम’जून’ घ्याना.काँक्रिट जमिनीत विर’जून’ रस्ते करतात. नगरी redevelopment मुळे निळ्या प्लॅस्टिक आणि पत्र्यांनी स’जून’ गेली.

 पाणी जमिनीत  न जाता  ला’जून’   वरच राहतं.

सगळी सृष्टी भा’जून’ शि’जून’  कोमे’जून’ गेली. समुद्रात जायला पाणीच नाही.

मनुष्याचे कर्म फिरून त्यालाच फळ देते. ढग तरी कसे गर’जून’ (गर्जून )पडणार ?तो गरीब बिच्चारा पाऊस  येणार कोठून?

सगळे वातावरण प्रदूषणाने पिं’जून’ गेले आहे.

 

जीवन थि’जून’ गेलंय रे पावसा!

आता मा’जून’ जाऊ नकोस.

लवकर ये.

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निमित्त… कवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निमित्त… कवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

☆

 स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

खावंसं वाटतं पण

करायला नको वाटतं

* 

पूर्वी करून दाखविण्याची

महाभयंकर हौस होती

स्वतःला सिद्ध करण्याची 

चांगलीच खुमखुमी होती

 *

थोडी इतरांनाही  संधी द्यावी

आता असं वाटत राहतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

चविष्ट काही केलं की

वजनाकडे लक्ष जातं

पौष्टिक करायचं म्हटलं की

तोंडाचं पाणी पळतं

 *

जीभ आणि पोटाचं

भांडण कधी थांबत नसतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सकाळ संध्याकाळ काय करावं

प्रश्नचिन्ह सतावत असतं

चहा आयता मिळाला की

मनापासून बरं वाटतं

 *

कमी खावं म्हटलं तर

भुकेनी डोकं दुखतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सगळे चेष्टा करू लागले

‘वय झालं’ म्हणू लागले

ती कुजबुज कानी पडता

मनोमनी भांबावले

 *

खरंच काय कारण असावं

अंतरंग शोधू लागतं

स्वयंपाकघरात शिरायला

का बरं नको वाटतं ?

 *

परमेश्वरी इच्छा असेल

संसारातून  बाहेर पडावं

हळूहळू निवृत्त होत 

वैराग्याकडे वळावं

 *

स्वयंपाकघराच्या निमित्ताने

मन सूचना देत असतं

स्वयंपाकघरात शिरायला

टाळाटाळ करत असतं

☆

कवयित्री : अनामिका

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

काळ्या ढगांवर देवा

क्लिक कर ना माउस

आमच्या पृथ्वीवर आता

पाड ना धो धो पाऊस

* 

पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा

सिमेंटच्या जंगलांचा कहर

बदलून दे ना आता

हिरवागार स्क्रीन सेव्हर

 *

ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर

देवा करून घे अपडेट

नाहीतर उन्हाळ्यात गारा

अन पावसाळ्यात ऊन थेट

 *

जास्त पाणी साठवण्या

हार्ड डिस्कची वाढवून घे जागा

पावसासाठी आम्हाला का

करावा लागतो त्रागा

 *

समुद्री वादळांचा धोका

मान्सूनला नेतो पळवून

त्यांचा बंदोबस्त कर तू

ANTI वायरस चालवून

 *

पाऊस झटपट पाडण्या

देवा वाढवून घे RAM

नाहीतर म्हणावे लागेल

आम्हाला हे राम

 *

देवा इंजिनिअर बोलावून

सिस्टम अपग्रेड करण्यास सांग

नाहीतर पावसावाचून आमचे

जगणे व्हायचे HANG…

☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

आपण IIT-IIM च्या डिग्रीला “इंटेलिजन्स” म्हणतो, पण जी बाई रोज सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत किचन नावाची कंपनी CEO सारखी चालवते, तिच्या IQ चं सर्टिफिकेट कोण देणार?

तू सांगितलेले 8 विषय + माझ्याकडून 2 एक्स्ट्रा:

विषय: किचनमध्ये काय होते?    बाहेरच्या जगात काय म्हणतात?

गणित: “4 लोकांसाठी 2 वाटी डाळ, पण सासूबाई आल्या तर 2. 5”     Resource Planning, Demand Forecasting

भौतिकशास्त्र: तेलाचा “तडतड” आवाज ऐकून तापमान कळणं     Thermodynamics + Acoustics

रसायनशास्त्र : दही लावताना ‘ऊब’ बरोबर लागली का?           Bio-chemistry + Fermentation Tech

मॅनेजमेंट:    गॅसवर डाळ, कुकरमध्ये भात, तव्यावर पोळी, मनात उद्याचा स्वयंपाक     Parallel Processing + Time Management

निरीक्षण:    पोळीचा ‘फुगा’ बघून गॅस कमी-जास्त करणं Quality Control + Visual Analytics

मल्टिटास्किंग : फोनवर नणंद, कुकरची शिटी, मूल “भूक” म्हणतंय – सगळं एकाच वेळी  Crisis Management + Prioritization

अर्थशास्त्र:    महिन्याचं बजेट 8 हजार, तरी 30 दिवस पोटभर जेवण     Microeconomics + Zero-Waste Policy

मानसशास्त्र: नवऱ्याचा चेहरा बघून ‘आज ऑफिसमध्ये टेन्शन आहे’ हे ओळखणं     Emotional Intelligence + Behavioral Science

बोनस 1: Nutrition: ताप आल्यावर पेज, पावसाळ्यात गरम सूप, परीक्षेला दूध-बदाम      Dietician + Preventive Healthcare

बोनस 2: Diplomacy: सासूला कमी तिखट, नवऱ्याला जास्त तिखट – एकाच भाजीत 2 चव Stakeholder Management

3 गोष्टी ज्या कुठल्याही MBA मध्ये शिकवत नाहीत:

  1. “उरलं-सुरलं” ची कला: रात्रीची पोळी → सकाळचा कुस्करा. भात उरला → दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात. Waste = 0%. हे आहे Circular Economyचा बेस्ट नमुना.
  2. “मूड डिटेक्टर”: घरात कोणी उपाशी झोपलं तर तिला झोप लागत नाही. ती कॅलरी मोजत नाही, चेहऱ्यावरचं समाधान मोजते.
  3. “अदृश्य ओव्हरटाइम”: ऑफिसमध्ये 9-5 नंतर OT चे पैसे मिळतात. किचनमध्ये रात्री 11 ला मुलाला भूक लागली तर बिनपगारी एक्स्ट्रा शिफ्ट. तरी तक्रार नाही.

 म्हणूनच रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आईच्या हातच्या वरण-भाताची किंमत जास्त.

 तू आधी पाठवलेल्या “Silent Kitchen” मेसेजचा पुढचा भाग हा आहे. अमेरिका किचन विसरली, म्हणजे तिने “डिग्रीशिवायच्या CEO”ला रिटायर केलं. परिणाम: कुटुंब तुटलं.

 जपान आजही जगात सर्वात जास्त जगतो कारण तिथे “ओफुकुरो नो अजी” = आईच्या हातची चव ही सांस्कृतिक संपत्ती मानली जाते.

 आज काय करायचं? 3 मिनिटांचं “थँक यू किचन” प्रोटोकॉल:

  1. जेवायच्या आधी: 3 सेकंद थांब. ताटाकडे बघ. मनात म्हण: “हे बनवणाऱ्या हातांना सलाम”.
  2. जेवताना: 1 घासानंतर “मस्त झालंय” बोलून दाखव. तिला पगार नको, पावती हवी.
  3. जेवणानंतर: स्वतःचं ताट स्वतः उचल. 2 मिनिटं तिला आराम दे. ती पण माणूस आहे, रोबोट नाही.

 डिग्री पेपरवर असते, इंटेलिजन्स तव्यावर असते.

इंग्लिश येत नसेल, पण ती 5 भाषेत बोलते – प्रेमाची, मायेची, जबाबदारीची, त्यागाची आणि संयमाची.

आज घरी गेल्यावर किचनच्या CEO ला एक कप चहा करून दे. बघ, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या नोबेलपेक्षा कमी नसेल.

तुझ्या घरची “किचन युनिव्हर्सिटीची चॅन्सलर” कोण आहे – आई, बायको, ताई की तू स्वतः?

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

☆

दिव्यसहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला ‘Tape Recorder’ : स्फटिक

कुरुक्षेत्रावर कोणी notes घेतले नाहीत, मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले?

आपल्याला माहीत असलेली गोष्ट :

भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर. युधिष्ठिर समोर. श्रीकृष्ण साक्षीला. वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची एक हजार नावे सांगितली.

आपण सगळे हे जाणतो.

पण एक प्रश्न कधी मनात आला का?

त्या भयाण रणांगणावर, बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी notes घेतल्या होत्या का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का?

नाही.

 आणि इथेच सुरू होते, ती गोष्ट ~ जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल.

भीष्मांनी सांगितले ~ पण कोणी लिहिले नाही!

भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, पाचही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले.

पहिला आवाज आला युधिष्ठिराचा–

“थांबा… पितामहांनी एक हजार नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो. पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला! सहस्त्रनाम हरवले!”

सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले..

“तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल!”

श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले “मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. ”

सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार? 

 मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भूत उपाय!

श्रीकृष्ण म्हणाले : एकच मार्ग आहे. सहदेव.

सगळे चकित झाले. सहदेव? पाचव्या पांडवाला हे कसे शक्य होईल?

श्रीकृष्ण म्हणाले “सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे, जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे, की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले, तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. “

जगातील पहिला ‘Tape Recorder’

स्फटिक!

सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले, जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते.

सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एकेक नाव लिहून घेऊ लागले.

असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले.

हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, “जगातील सर्वात पहिला Tape Recorder म्हणजे हा ‘स्फटिक’ ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. “

हे ऐकून सगळे स्तब्ध झाले.

आणखी एक गोष्ट, जी कमी माहीत आहे.

महाभारतात दोन महान उपदेश आहेत : एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे, विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते!

विचार करा… ज्याची नावे सांगितली जात होती, तो स्वतः ऐकत होता!

 हे किती जुने आहे?

महाभारत युद्ध साधारण इसवीसनपूर्व ३०६७ मध्ये झाले, असे मानले जाते ~ म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास ५१०० वर्षे झाली आहेत.

५१०० वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले; वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो. हा धागा तुटला नाही, कारण श्रद्धा तुटली नाही.

आजचा विचार :

पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा!

कुरुक्षेत्राच्या त्या भयाण रणांगणावर, बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिल; ते ५१०० वर्षांनंतर तुमच्या ओठांवर आहे.

हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत!

॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares