मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छोटीशी कृती… — लेखिका : सौ. शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

दुःख कुरवाळणारी माणसं… — लेखिका : सौ. शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघं नुकतेच अमेरिकेला राहायला गेलो होतो. तीन-चार महिने झाले असतील. नवरा कामात व्यस्त होता, आठवड्यातून तीन-चार दिवस त्याचा प्रवास चालायचा. घरी मी एकटीच. मला अजून अमेरिका म्हणावी तितकी झेपत नव्हती. सारखी भारताची, घरच्या लोकांची आठवण यायची. त्यात अजून तिथे फार ओळखीही झाल्या नव्हत्या. त्यामुळे एकटेपणा खूप जाणवायचा. त्यात तो सरत्या नोव्हेंबरचा काळ होता. शहरातले सगळे रस्ते, मॉल्स, घरे ख्रिसमसच्या रोषणाईने सजले होते. मला मात्र दिवाळी ह्या वर्षी भारतात साजरी नाही करता आली याचं दुःख होतं आणि त्यामुळे ती रोषणाई बघून अजूनच खिन्न वाटत होतं.

त्यातच आम्ही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाणार होतो. ती सुट्टी ऐन वेळी रद्द करावी लागली होती. कारण नवऱ्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. त्यावरून आमची माफक वादावादीही झाली होती आदल्या दिवशी आणि नवरा सकाळच्या फ्लाईटने त्याच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेलाही होता. घरी मी एकटीच होते, त्यामुळे स्व-अनुकंपेला बऱ्यापैकी वावही होता. सबंध दिवस घरात बसून स्वतःची कीव करून थोडंफार रडूनबिडून झाल्यावर त्याचाही कंटाळा येऊन मी घराबाहेर पडले. तशी माझी जायची ठिकाणं तोपर्यंत दोन-तीनच होती. घराजवळची पब्लिक लायब्ररी, एक मॉल आणि कोपऱ्यावरचं कॉफी शॉप!

मॉलमध्ये जायचं ठरवून तिथे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे सगळं उत्सवी वातावरण होतं. मोठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे रोषणाई, ठिकठिकाणी सेल आणि ऑफर्स. बराच वेळ मी निरुद्देश्य भटकले. पण माझं एकटेपण राहून राहून अंगावर येत होतं. शेवटी चालून चालून पाय दुखायला लागले, तेव्हा मी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शिरले. मला बऱ्याच दिवसांपासून बूट्स घ्यायचे होते, म्हणून बायकांच्या फुटवेअरच्या सेक्शनमध्ये गेले. तिथे एक सत्तरेक वर्षांची कृष्णवर्णीय बाई सेल्सवूमन होती. त्यावेळेला मी एकटीच कस्टमर होते. मला काय हवं ते विचारून ती चपळाईने तिथल्या स्टेप लॅडरवर चढून मला हवे तसे बूट दाखवत होती.

आपल्याला सहसा भारतात इतक्या वयस्कर व्यक्तीकडून सेवा घ्यायची सवय नसते. त्यामुळे तिची लगबग पाहून मला थोडं कानकोंडं होत होतं. बूट दाखवता दाखवता आमचं जुजबी बोलणं सुरु झालं. पॅट्रिस नाव होतं तिचं. ’डू यू नो, आय ऍम सेवेंटी टू?’ ती माझ्या पायात बूट चढवता चढवता म्हणाली. मला अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी तिला सांगितलं, मीच ट्राय करते. बुटांच्या सात-आठ वेगवेगळ्या जोडया तिने आणल्या होत्या आणि गुडघ्यांवर बसून ती मला ते बूट ट्राय करायला मदत करत होती. उठ-बस करताना तिचे गुडघे दुखत आहेत, हे मला जाणवत होतं आणि म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून तिला थँक्स म्हणून मी जायला उठले. तर ती पटकन म्हणाली की तिने विकलेल्या दर जोडीमागे तिला कमीशन मिळतं. ‘यू शुड बाय अ पेअर,’ पॅट म्हणाली.

मी एक बुटांची जोडी पसंत केली. ती पॅक करता करता पॅट बरंच काही बोलत होती. कदाचित माझा एकटेपणा तिला जाणवला होता म्हणून असेल, कदाचित तिलाही बोलायचं होतं म्हणून असेल, पण तिने मला तिची कहाणी सांगितली. तिची पाच मुलं होती, त्यातली शेवटची दोन तिच्याबरोबर रहात होती. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी तिशीची आज मुलगा पस्तिशीचा. दोघेही काही करत नव्हते आणि ही सत्तरीची आई त्यांना सांभाळण्यासाठी दिवसातून दोन-दोन नोकऱ्या करत होती, सकाळी नऊ ते चार एका डॉक्टरच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्सवूमन म्हणून, आणि सुट्टीच्या दिवशी बेबीसीटिंग! हे सर्व बहात्तर वर्षाच्या वयात!

‘साऊंडस सो डिप्रेसिंग!’ तिचं बोलणं ऐकण्याच्या नादात अनवधानाने मी बोलून गेले. पॅट हसली,म्हणाली, ‘हन, आय डोन्ट हॅव दी बँडविडथ टू बी डिप्रेसड, आय हॅव माय हॅंड्स फुल’!

मला एकदम चटका बसल्यासारखं झालं. सगळं व्यवस्थित असून फक्त एक विकेंडची सुट्टी मनासारखी नाही झाली आणि अमेरिकेत एकटेपणा वाटतोय हे स्वतःचं इवलंसं दुःख कुरवाळत मी स्वतःची कीव करत पूर्ण सकाळ घालवली होती आणि ही बहात्तर वर्षांची बाई मला सांगत होती की निराश होऊन रडत बसायला माझ्याकडे वेळच नाहीये!

पॅटचं ते वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आजही कधी छोट्या छोट्या कारणांवरून आपण फार दुःखी वगैरे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हा मी प्रयत्नपूर्वक पॅटचं हे वाक्य आठवते. आपोआपच चित्त ताळ्यावर येतं.

स्व-अनुकंपा आणि स्वतःचे खरे-खोटे दुःख कुरवाळत बसणे हे कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने केलेलं आहे. नव्हे, ते अगदी नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकासाठी त्याच्या किंवा तिच्या अडचणी मोठ्याच असतात आणि त्या त्या वेळेला हतबल वाटू शकतं. ‘हे माझ्याच बाबतीत का होतंय’ असे प्रश्नही पडू शकतात, पण हाताशी असलेला रिकामा वेळ जितका जास्त तितकं ह्या स्व-अनुकंपेमध्ये   स्वतःला गुरफटून घेणं जास्त सोपं होतं. जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणाऱ्या, सतत कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला वेळच नसतो.

पूर्वी हा स्व-अनुकंपेचा सोहळा खासगी तरी असायचा. केवळ कुटुंब आणि काही मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोरच हा कार्यक्रम चालायचा. आता सोशल मीडियामुळे दुःख कुरवाळणे हा एक सार्वजनिक इव्हेंट बनत चाललाय. बऱ्याच लोकांसाठी आणि दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. ’मला घरात कुणी समजून घेत नाही’ इथपासून ते ’सासू/सून/नवरा/मुलं/बॉस ऐकत नाही’ इथपर्यंतची सर्व लहान मोठी, खरी-खोटी दुःखे फेसबुकच्या किंवा इन्स्टाच्या चव्हाट्यावर उगाळली जातात.

अशा पोस्टसवर तोंडदेखल्या, खोटया सहानुभूतीचा रतीब घालणारा एक प्रेक्षकवर्ग आहेच, जो ह्या स्व-अनुकंपेच्या रोपट्याला सतत खतपाणी घालून ते जोपासतो आणि मग त्या दुःख कुरवाळत बसण्याची सुद्धा सवय लागते माणसांना. मग कुणी सोल्यूशन दिलेलेदेखील आवडत नाही. कारण मुळात पडलेले प्रश्न सोडवायचेच नसतात, फक्त त्यांचं भांडवल करत मनावरचं दुःखाचं गळू तसंच ठसठसतं ठेवायचं असतं काही लोकांना.

मी ह्या ट्रॅप मध्ये शिरतेय, अशी शंका जरी मला आली तरी मी पॅटचं हे वाक्य मनाशी परत परत आठवते आणि स्वतःला कसल्या ना कसल्या कामात गुंतवून ठेवते. अगदी काही नाही तर दीड-दोन तास चालायला तरी जाते. आपली बरीचशी दैनंदिन आयुष्यातली दुःखं किंवा अडचणी ह्या फुग्यासारख्या असतात, आपण जितकी हवा देऊ तितकी ती फुगत जातात आणि आपण कामाची टाचणी लावली की विरून पण जातात!

लेखिका : सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आज योगासनांचा क्लास जरा लवकरच संपला.

थंडी मुळे सगळ्या गारठून गेल्या होत्या.

सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.

प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.

नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.

मानसी ताईंचे घर खालीच होते.

आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस‌ ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.

“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’

संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.

मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’

किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.

तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.

कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”

काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.

मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.

तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,‌तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.

घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.

आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.

तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.

लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘डेट विथ डॅड…’ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘डेट विथ डॅड…’ ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला.

“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो.” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले.

 

 मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप  बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवीपर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.

 

मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो.

शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं, की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. 

“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय.” नाना फक्त हसले.

“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी  कार्यक्रमाला तू आणि रिया जा.” नाश्ता करताना मी म्हणालो, तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.

“आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस.”-मी 

“ठीकय. एंजॉय पार्टी. पण लिमीटमध्ये”

“डोन्ट वरी, थॅंक यू बायको.”

“दुपारी जेवायला गोड काय करायचं?” बायकोनं विचारलं

“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो.

“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसंय.”

आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो.

“काय रे, काही पाहिजे का?”

“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा!” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मीसुद्धा खूप भावुक झालो.

“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो. ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.

सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी? प्रचंड गिल्ट आला.

“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना.”

“हो, स्वयंपाक करून जाते.”

“नको.”

“का?”

“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!”

“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या.

“नक्कीच! पण नंतर आज दोघंच जातो.प्लीज!” दोघींनी  समजुतीने घेतलं.

“उगीच खर्च कशाला? बाहेर नको.” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही.

संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल, याची कल्पना आली.

पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता. आता मी.

काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.

हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती.

“टेंशन घेऊ नका.रिलॅक्स.” 

“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले.

“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.”

“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यानंतर आजच..”

“बापरे!एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट!” नाना काहीच बोलले नाहीत.

“नाना, सॉरी!माफ करा.”

“अरे, होतं असं आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!”

“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”

“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”

“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात . स्वतःवर बंधनं घालून घेतलीत आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये मात्र तुम्ही नव्हताच.”

“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना

“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं. ” मी हात जोडले.  एकदम आवाज कापरा झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते.

“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतंच.”

“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.

“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली.

“यापुढे काळजी घेईन”

“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”

“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.”

 

 नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच.बॅकलॉग भरायचा होता. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.

“काय झालं? हसताय का?”

“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही.” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं. 

“खरं सांगू? बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.”

“पर्याय नाही”

“मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचं,याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही, तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”

“नक्कीच.”

“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”

“माझ्याही.”

“सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाहीये. ” नाना मिष्किलपणे म्हणाले.

बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती.

“आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली.

“चायनीज खाऊ,” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून  डोळे भरून आले.

बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच  दोघांची नजर आभाळाकडे गेली.

घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना  समर्पित…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बांबूचे बन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ बांबूचे बन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता.

दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या- फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबात काही फराक दिसत नव्हता.

तो माणूस आता विचार करू लागला होता की , हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते, तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोंबाकडे गेला. पाहतो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता आशेने त्या कोंबाला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.

असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेव्हा त्या आंब्या- फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली, तेव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.

तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल, तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे गेले, तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा. जेव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते, तेव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.

ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल?

📍बोध :

इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आमच्‍या संयुक्‍त कौटुंबिक घरात आम्‍ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहायचो.

माझ्या आईचा रोज  वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने  ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत.

परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली. एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य.

माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल, हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची – हे सगळे कुठे आहेत?

माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण  आता तेथे जावेसेदेखील वाटत नाही. एक तर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे.

मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे.

आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?

बऱ्याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतील.

हा कोणता मानवी मूर्खपणा आहे,  की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण  एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो?

 हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे. त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही. त्याच्या अटी- शर्तीवर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही. त्यावर अपील नाही त्यासाठी.कुठले न्यायालयदेखील नाही.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून  उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होतील किंवा त्यासाठी भांडण केली  जातील किंवा त्या विकल्या जातील किंवा नष्ट होतील.

प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो, तेव्हा ‘कायम पत्ता’ विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.

झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहामध्ये एक रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, “काय विश्रांती गृह?तुला हा राजवाडा आहे, हे दिसत नाही का?”. साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो, ती जागा एक विश्रांती गृह आहे.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात, “घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे  बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता.”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक  रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो.

आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील.

मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा!                   

प्रस्तुती: सौ. राधा पै.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेदनेचा आनंद घेणं थांबवा… लेखिका : सुश्री दीप्ती काबाडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

वेदनेचा आनंद घेणं थांबवा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

शीर्षक वाचून आश्चर्य वाटत असेल ना? पण याआधी एक विचार करा. कधी अशा व्यक्ती पाहिल्या आहेत का की ज्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक फक्त अडचणी येत राहतात? शारीरिक दुखणीसुद्धा एकामागोमाग एक सुरू राहतात? म्हणजे एकातून बाहेर पडलं की दुसरं काहीतरी… आपल्याला पाहताना वाईट वाटतं. असा प्रश्न पडतो की या व्यक्तीला सतत इतक्या अडचणी का येतात? दुखणी पाठ का सोडत नाहीत?

मला खात्री आहे प्रत्येकाने अशी एक तरी व्यक्ती नक्कीच पाहिली असेल. अशा व्यक्तींचा स्वभावसुद्धा आठवून पाहा. यांना कधीही विचारा, “कसे आहात?” उत्तर येतं, “काय सांगू! काही न काही सुरूच असतं. मागच्या आठवड्यात पाय घसरून पडले. आता दोन दिवस झाले, खोकल्याने हैराण केले आहे.”

कधीच यांच्या तोंडून ऐकू येणार नाही की मी मजेत आहे.

आता तुम्ही म्हणाल, “यात त्यांचं काय चुकतं? ते तर खरं बोलत असतात. बिचाऱ्यांना खरोखरच काही न काही प्रॉब्लेम्स सुरू असतात. मग मजेत आहे कसं म्हणतील?”

तुम्ही जर मला नवीनच ओळखत असाल तर तुमच्यासाठी माझी ओळख फक्त एक Nutritionist म्हणून मर्यादित आहे. पण जर तुम्ही मला अनेक वर्षे ओळखत असाल, तर माझी सायंटिस्ट ही ओळख तुमच्या मनातून पुसली गेलेली नसणार, हे मला माहीत आहे. त्याच जुन्या ओळखीतून आज काही तरी वेगळं समजावण्याचा प्रयत्न करते आहे. आपला मेंदू आणि शरीर भावनांना कसे हाताळते, ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे.

अचानक आलेलं शारीरिक दुखणं असो किंवा एखादा दुःखद प्रसंग असो, कोणत्याही संकटाच्या काळात शरीरात cortisol नावाचे स्ट्रेस हार्मोन तयार होते. परंतु शरीराला हे हार्मोन दीर्घकाळ शरीरात राहू देणे अजिबात परवडणारे नसते. त्यामुळे शरीर स्वतः त्याचा नाश करण्यासाठी प्रयत्न करू लागते. हळूहळू मनाची स्थिती पूर्ववत होऊ लागते. कारण दीर्घकाळ हे हार्मोन जर शरीरात राहिले तर ते शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करू लागते आणि प्रत्येक अवयवाला इजा पोहोचवू लागते. म्हणूनच शरीर स्वतः या हार्मोनला विरोध करते.

एखाद्याची आई वारली की तो मुलगा हळवेपणाने दोन चार दिवस टाहो फोडून रडतो. पुढचे पंधरा दिवस त्याचे खाण्यावरून लक्ष उडते, तो उदास राहतो. एका महिन्याने तो सावरतो. पुन्हा कामाला लागतो. आईची आठवण झाली की क्षणभर डोळ्यात पाणी येतं, पण तितकंच. पाचव्या महिन्यात तो बायको- मुलांसह एखाद्या मूव्ही थिएटर मध्ये हसताना दिसतो. आपण याला जगरहाटी म्हणतो. पण ही खरंतर शरीराची स्वतःची डिफेन्स mechanism आहे, ज्याद्वारे शरीर स्वतः स्वतः ला recover करते.

परंतु काही माणसे या defence mechanism मध्ये स्वतः अडथळा आणत राहतात. Past मनात सतत उगाळत राहतात. जो भेटेल त्याच्याशी त्याच विषयावर बोलत राहतात. घटना कितीही जुनी झाली तरी त्यातून मनाने बाहेर पडतच नाहीत. शरीर खूप प्रयत्न करते. पण त्यांना त्यात guilt वाटते. आपण इतक्या लवकर या दुःखातून बाहेर पडूच शकत नाही, अशा सूचनाच जणू काही त्यांनी आपल्या मनाला दिलेल्या असतात.  शरीर झुंज करून थकते आणि एका टप्प्यावर हार मानून परिस्थिती स्वीकारते. हाच टप्पा असतो, दुःखाची मालिका सुरू होण्याचा.

ज्या cortisol ला शरीर नष्ट करू पाहत असते, त्या cortisol ला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांमधून, भावनांमधून सतत शरीरात तयार करत राहते, त्या दुःखी भावनांमध्ये सतत राहते तेव्हा शरीर cortisol ला विरोध करणे बंद करते. अन् दुःखी राहणं त्या व्यक्तीचा स्थायीभाव बनतो. शरीरासाठी त्या भावना “comfort zone” बनतात. माणूस आनंदात अस्वस्थ होतो आणि सवयीचं दुःख पुन्हा मिळालं की तो रिलॅक्स होतो.  ब्रेकअप झाल्यावर काही लोक काही महिन्यात सावरतात. तर काही असे असतात जे वर्ष उलटूनसुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत. रोज रात्री झोपताना ते दुःख आठवून झोपणं हे त्यांचं रूटीन बनतं. जर कधी थोडं आनंदी वाटू लागलं तर मुद्दाम sad song ऐकून पुन्हा त्या दुःखात जातात आणि रिलॅक्स होतात. कारण ते  दुःख हा त्यांचा comfort zone बनतो…

Psychology नुसार या परिस्थितीला आपण depression म्हणतो. परंतु physiology नुसार याला आपण cortisol चा long term प्रभाव म्हणू शकतो.

कोणत्याही depression ची सुरुवात दुःख comfort zone बनल्याने सुरू होते. इतकेच नव्हे तर शारीरिक दुखण्याची मालिकासुद्धा दुखणे comfort zone बनल्याने होते. कारण तुम्हाला subconscious level वर ते दुखणं हवंहवंसं वाटत असतं. याची कारणं? लोकांकडून मिळणारी सहानुभूती, कुटुंबात घेतली जाणारी काळजी, एखाद्याकडून मिळणारे प्रेम, attention, काहीही असू शकते. पण भावनिक कारण काहीही असले तरीही cortisol चा शरीरात मुक्काम वाढला की ते सर्व अवयवांना इजा पोहोचवू लागते.

दुःख comfort zone बनण्याच्या आधी जेव्हा शरीर naturally त्याला विरोध करत असते, तेव्हा त्याच पायरीवर शरीराची साथ देऊन त्याला हद्दपार केलं नाही, तर ते शरीराचा ताबा घेऊन कायम त्रास देत राहते. म्हणूनच natural healing ला मनाने कधीही अडवायचे नाही. आनंदी वाटत असताना मुद्दाम दुःखाच्या आठवणी काढून दुःखी व्हायचे नाही. एखाद्याला आपल्या शारीरिक दुखण्याबद्दल सांगताना आपण neutral राहून सांगतो आहोत की एक्साईट होतो आहोत हे observe करा. सतत दुखणी आणि प्रॉब्लेम याबद्दल बोलत रहायला आपल्याला आवडते आहे का, हे नोटीस करा. आणि तसं जाणवलं तर त्यातून बाहेर पडा. Movie पहा, गाणी ऐका, हसा… पण cortisol ला तुमचा स्थायीभाव बनू देऊ नका.

आईच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी थिएटरमध्ये दिसणारा मुलगा नालायक नसतो. तर त्याने फक्त स्वतः च्या शरीराच्या defence mechanism ला support केलेला असतो. So don’t judge happy people based on your nature to remain sad.

लेखिका : सुश्री दीप्ती काबाडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

डिसेंबर महिन्यातील पहिला  आठवडा हा thanks giving days म्हणून साजरा होतो. ह्या आठवड्यात सगळ्या Near and Dear ones ना काही चुकले असेल तर साॅरी म्हणून, त्यांचे आभार आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात….

पण खरं सांगू,

मला हे केवळ परकीयांचे अंधानुकरण वाटते.

हे म्हणजे कसं झालं ना, वर्षभर केलेल्या चुका सुधारण्यासाठी एखादा सत्यनारायण किंवा होम करायचा आणि परमेश्वराकडे क्षमा मागायची आणि पुन्हा त्याच चुका करण्याचा परवानाच घ्यायचा. त्यापेक्षा नित्य नेमाने सद्वर्तन करावे आणि परमेश्वराचे मनोभावे आभार मानावेत ना.

मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही रुसून बसलो की भूक नाही असे सांगत असू. मग माझी आई तिचा हुक्मी एक्का काढायची, ” तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही. ” आता काय बिशाद होती आमची न जेवण्याची आणि आई वर रागावण्याची? पण हे राग रुसवे किती गोड होते.

माझी मुलंही खूप गुणी आणि समजूतदार होती. पण तरीही मुलंच ती.काहीतरी चुकणारच. अशा वेळेस माझी एकमेव शिक्षा म्हणजे” अबोला”!पण तीच त्यांना त्यांची चूक कळायला पुरेशी असायची. काही वेळातच,”आई तू मला रागव, पण अशी गप्प नको ना राहूस….”  असं  म्हणत त्यांनी मारलेली मिठी मला विरघळायला पुरेशी असायची.

शाळेत मैत्रिणीशी  भांडण झाले की आईला काहीतरी छान, तिच्या आवडीचा डबा करायला सांगायचा आणि मधल्या सुट्टीत गाल फुगवूनच तिच्यापुढे तो डबा चक्क आपटायचा, की कट्टीची बट्टी झालीच पाहिजे.

अगदी पती- पत्नीच्या नात्यातलीही रुसव्याफुगव्याची गंमत लज्जतच आणते की.सकाळीच ऑफिसला जाताना झालेले भांडण एखाद्या गजऱ्याने किंवा तिच्या आवडत्या कचोरीने चहाच्या कपातील वादळच ठरते.  त्यासाठी बायकोनेही कन्सेशन घेऊन  तासभर आधी येऊन त्याच्या आवडीचा केलेला झणझणीत वडापावचा बेत घरातील वातावरणातला जिवंतपणा कायम  ठेवतो.

इतकंच काय ,अगदी जवळची, जिवाभावाची सखी असो किंवा फेसबुकवरील तुमच्यासारखे कधीही न भेटलेले तरीही एक अनोखे नाते निर्माण झालेले मित्र मैत्रीणीही, काही दिवस आले नाही तर विचारतात, “काय गं,काही झालंय का ? बरी आहेस ना? ” त्यावेळी ही  जी ओढ, काळजी असते तिची जाणीवही खूप सुखावणारी असते.

एकंदरीत काय तर ,असे रुसवेफुगवे..त्यानंतरचे मनवणे ( अगदी आमच्या सारख्या सिनियर सिटीझनसमध्येही, बरं   का!)  आहे तोपर्यंतच आयुष्यातील खुमारी आहे. सुग्रास जेवणात जसे झणझणीत लोणचे अथवा चटणी हवीच .तसेच आयुष्यातही अशी हक्काने रागावणारी आणि तितक्याच मायेने मनवणारी नाती हवीतच.

त्यांना असे एका दिवसात थॅन्क्स म्हणून किंवा माफी मागून परके करू नये, असे मला वाटते.

म्हणूनच मला  इकडच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अजिबात थॅन्क्स अथवा साॅरी न म्हणता त्यांच्या ॠणातच रहाणे आवडेल.

लेखिका: सौ. प्रतिभा कुळकर्णी.

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ क्षण आनंदाचे – लेखिका : सुश्री माधुरी संजीव कामत ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

थंडी सुरु होऊन तापमान २१..२२..२३ असं रूंजी घालू लागलं की बाजारात हिरव्यागार भाज्यांचे दर्शन व्हायला लागतं. ताज्या ताज्या पालेभाज्या तर दिसतातच, पण रसरशीत फळभाज्यांचे पण ढीग दिसू लागतात… या ढिगांवरून फक्त नजर जरी फिरली ना तरीही मनाला शांती मिळते.

आणि

नेहमीच्या फळभाज्या तर मिळतातच पण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या जसे की वेगवेगळ्या प्रकारचे घेवडा, वालपापडी,डबल बिन्स.

अगदी हिरव्या हिरव्या गार रूपात आपल्याला दिसतात.

आज आमच्या घरी हंगामाची पहिली डबल बिन्स आणली आणि सोलायला सुरुवात केली. सुंदर गुलाबी रंग पाहून डोळे निवले. मनाला तरतरी आली.

आणि

एका शेंगे मधून “ती” सळसळत बाहेर आली.

एक क्षण दचकायला झालं.पण “तिचा” उत्साह बघून थक्क व्हायला झालं.

“तिचं” नजाकतीने चालणं, नव्हे नव्हे, वळवळणं.एकदम लाजवाब.

मी पहातच राहिले. दोन क्षण.

भानावर येताच लक्षात आलं की “ती” टेबलाच्या टोकाला पोचली आहे.

पटकन दोन पानं आणली आणि “तिला” आसन करून दिलं.

आता “ती” छान आसनस्थ झाली.

नवीन आसनाचा अदमास घेऊ लागली.

आणि लगेचच तिथे रूळली पण !

आनंदाने पानं खाऊ लागली.

“तिचा” आनंद मी डोळे भरून पहात होते.

आणि

मनात आलं.

खरंतर “तिचा” आनंद क्षणभंगुरही ठरला असता. कारण तो आनंद माझ्या हातात होता.

तरीही आनंदाचे क्षण किती, हा विचार न करता आनंद आहे, हा विचार करून “तिने” पानं खायला सुरुवात केली होती.

आणि

मी “तिच्या”कडे पाहतच बसले.

आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला केवढा वेळ लावतो. किंबहुना बाहेर यायला उत्सुक नसतोच.

आणि

अगदी बाहेर आलो तरी नवीन ठिकाणी,नवीन परिस्थितीत रुजायला कित्येक दिवस,महिने लागतात. नाही का ?

“ती” एवढीशी “अळी” मला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन गेली.

कुठल्याही परिस्थितीत आनंदी रहा ग.न कुरकुरता.

आनंद किती मोठा आहे, याचा विचार न करता, आनंद मिळाला आहे, याचा विचार करून तो मस्त उपभोगून घे.

आणि

कुठल्याही परिस्थितीत सगळीच दुःखं नसतात. त्या दुःखाच्या पलीकडे असलेल्या चिमूटभर सुखाला शोधायचा प्रयत्न कर.

बघ कसा आनंद मिळतो ते.

लेखिका : सुश्री  माधुरी संजीव कामत

संग्रहिका : सौ. स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझं घर… लेखिका – सुश्री वीणा घाटपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझं घर… लेखिका – सुश्री वीणा घाटपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

शेजारच्या सिंधूताई परवा खूप दिवसांनी भेटल्या. अमेरिकेला दोन्ही मुलांकडे गेल्या होत्या, म्हणाल्या. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केलं. जवळपासची सगळी ठिकाणे दाखवली. अमेरिकन व इतर वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. दर शनिवार – रविवार कुठे ना कुठे जात होत्या. कुठे काही कमी पडू दिले नाही, पण चार महिने तेथे राहिल्यावर मलाच कंटाळा आला. घरचे विचार मनात येऊ लागले. सकाळ झाली की मॅार्निंग वॅाकचा रस्ता मला बोलावू लागला. घरची साफसफाई, वाणसामान भरायचे मला डोळ्यांसमोर दिसू लागले, काही म्हणा पण आपलं घर ते आपलं!

सिंधूताईंचे बोलणे मला १००%. पटले.खरंच प्रत्येकालाआपलं घर किती प्रिय असतं! आपण ८-१० दिवस  बाहेर राहिल्यावर आपल्याला लगेच कंटाळा येतो.कधी एकदा घरी जाऊ असं होतं. २-४ दिवस बाहेरचे खाल्ले की कधी एकदा वरण भात का होईना, तो घरचा खाऊ असे होऊन जातं.

घरातील प्रत्येक वस्तूवर आपलं अधिराज्य असतं .काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात.हा इतकी वर्षं चाललेला कुकर, मला मीनामावशीने माझ्या लग्नात प्रेझेंट दिलेला.उषामामीने मंगळागौरीला पुरण यंत्र दिले होते. मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून पाडव्याची ओवाळणी म्हणून नवऱ्याने मोत्याचा तन्मणी व बांगड्या घेतलेल्या. वाचनाची आवड म्हणून साठवलेल्या पैशांतून चांगल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे आपण घेतली होती. काश्मीरहून आणलेल्या शाली,बेंगलोर सिल्क, आग्र्याहून अगदी जपून आणलेली ताजमहालाची छोटी प्रतिकृती अशा एक ना अनेक वस्तूंच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि न कळत त्या वस्तू आपल्या होऊन जातात.

आपले स्टीलचे कटोरे, ताटल्या, वाट्या भांडी, पोळपाट लाटणे इतके ओळखीचे झालेले असतात व त्यांची इतकी सवय झाली असते की नवीन पोळपाटावर पोळी लाटायला त्रास होतो. बऱ्याचजणांना जागा बदलली, कॅाट बदलली की झोप लागत नाही.

आपल्या घरात आपण free bird असतो. आपल्यावर कुणाचे बंधन नसते.एखादे वेळेस बरे वाटत नसेल, तर आपण आपल्या घरात दिवसभर झोपून राहू शकतो. दुसरीकडे आपल्याला संकोच वाटेल.

प्रत्येकाला आपले घर देवाने लावून दिले आहे.पक्षीसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परततात. गुरेढोरे, गायी वासरे आपापल्या घरी परततात. तर असं हे आपलं ते आपल्याचे महत्त्व आहे. घर कसेही असो, ते आपले असते.

लेखिका : सुश्री वीणा घाटपांडे

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चारचौघातला नवरोबा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चारचौघातला नवरोबा… लेखक : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नातेवाईक जमलेले असतात. गप्पाटप्पा , खेचाखेची करता करता कोणीतरी बहिणाबाई ‘काडी टाकते’. आपल्या बंधुराजांबाबत म्हणते,

“सुनील आमचा साधा आहे बिचारा.” हेच स्टेटमेंट मित्रमंडळी जमलेली असली तर त्या सुनीलच्या मित्राने केलेले असते.

हे किंवा याच टाईपची इतर केली जातात जी स्टेटमेंटस्, ती म्हणजे..

आमचा सुनील कसा शांत आहे,

न चिडणारा आहे,

कसल्याही खोड्या नसलेला आहे.

वगैरे वगैरे.

झालं. हे अस जर कोणी बोललं की सुनीलची बायको सरसावून बसते.

अन सुरू करते अटॅक-

“काय म्हणालात? आमचे हे अन साधे बिचारे? एकदा या घरी चार दिवस राहायला. मग कळेल.”

अन मग वहिनी पाढा वाचतात. त्यांच्या ह्यांचा.

हे आमचे कसे साधे बिचारे नाहीत,पक्के ‘हे’ आहेत,

त्यांच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका,

लांबून तसं वाटत असेल. मी रोज सोबत असते. खरं काय ते माझं मलाच माहीत,न बोलून शहाणे आहेत, आपल्याला हवं तेच करतात,जेवणाच्या बाबतीत पक्के खोड्याळ आहेत,जरा म्हणून चालवून घेणार नाहीत, हे असं हवं..म्हणजे तस्संच हवं”….अन काय काय.

वहिनी हा पाढा वाचत असतात, तेव्हा त्या नवरोबाचा चेहेरा अगदी पाहाण्यासारखा असतो, बरं का. गालातल्या गालात हसून तो बायकोच्या बोलण्याला जणू मूक संमतीच देत असतो. दुसरा पर्यायच नसतो त्याच्यापुढे. ‘बायकोदाक्षिण्य’. ते दाखवायलाच लागते.

एकूणच, “हे आमचे कसे साधेसुधे नाहीत. मी म्हणून कशी चालवून घेते”, असा टोन असतो. म्हणजे …’पहा, माझ्यावर कसे अत्याचार, जबरदस्ती,… हालाची परिस्थिती आहे’ असले काही गंभीर सांगायचं नसतं बरं का.

घरात दोघांचं छान चाललेलं असतं . खरंतर ‘तिचंच’ घरात चालत असतं . हे सगळं लटक्या रागात चालू असतं. गमतीत. अन हे युनिव्हर्सल असतं बरं का.

पण…‘नवरोबा’ म्हटला की तो असाच हवा, चारचौघांसमोर त्याचं रूप असंच ‘कडक’ असायला हवं, असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्यासाठी ही धडपड. हे सारं ‘तिचं’ ‘त्याला’ बोलणं हे काणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘थापा’ या शब्दात मोडणारं.  निरुपद्रवी. गमतीगमतीतलं.

पण हे स्वातंत्र्य नवरोबांना मात्र नसते बरं का. तो म्हणू शकतो का चारचौघात, अगदी गंमत म्हणून देखील? “ही? साधी बिचारी? चांगली पक्की आहे. घरी पहा येऊन कधी!”

चुकून म्हटलं त्याने, तर त्याचं घरी गेल्यावर काही खरं नसतं!

लेखक : श्री अनंत गद्रे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares