मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ एक प्रवास.. तिच्यासोबत…  लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ एक प्रवास.. तिच्यासोबत…  लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : एक प्रवास.. तिच्यासोबत

लेखक – दिनेश कुंभार

नर्मदा परिक्रमा हा विषय तसा आता वाचकांना नवा नाही. जगन्नाथ कुंटे यांच्याप्रमाणेच आणखीनही बऱ्याच जणांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचे सविस्तर अनुभव लिहिले आहेत आणि सर्व प्रकारच्या वाचकांच्या ते पसंतीसही आले आहेत.

अतिशय खडतर अशी समजली जाणारी, तुमच्या निश्चयाची परीक्षा पाहणारी, आणि तुमच्या जीवन विषयक दृष्टिकोनात अमुलाग्र बदल घडवून आणणारी अशी ही परिक्रमा आहे असं म्हणतात. या परिक्रमे दरम्यान येणारे अनुभव हे इतके विचक्षण आणि विलक्षण असतात की प्रत्येक परिक्रमावासीला याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतं. आणि अगदी याच भावनेतून दिनेश कुंभार यांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचं अनुभव कथन करणारे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. केवळ 72 पानांच्या या पुस्तकामध्ये नर्मदा परिक्रमेचं वर्णन बसवणं हीच खरंतर एक मोठी कसोटी आहे. आणि त्यामध्ये ही आपलं लेखन अतिशय रंजकपणे, रसाळपणे मांडणं आणि त्यातून परिक्रमेच्या परिपूर्ततेचा अनुभव देणे हे खरंच एक उत्तम लेखक असल्याचे लक्षण आहे. दिनेश कुंभार यांनी लेखक म्हणून हे मोठं कौशल्य प्राप्त केलं आहे आणि ही गोष्ट हे पुस्तक वाचून कुणीही मान्य करेल.

त्यातही मला विशेष भावली ती म्हणजे या पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना. आतापर्यंतच्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये प्रस्तावना ही बरीचशी वैचारिक पातळीवरती आणि पुस्तकातल्या मजकुराबद्दल वैशिष्ट्य सांगणारी असते, परंतु या पुस्तकातली प्रस्तावना विषयाबद्दल लेखकाबद्दल बोलतेच पण त्याहीपेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनातून या परिक्रमेचं केलेलं निरीक्षण मांडते. केवळ निरीक्षण असंच नव्हे तर त्या बाबतीत स्वतःची मतदेखील पडताळून मांडली गेली आहेत हे जाणवतं. अतिशय प्रगल्भ आणि समर्पक अशी प्रस्तावना आमच्या लेखिका मैत्रीण वर्षा पतके थोटे यांनी या पुस्तकाला दिली आहे. आणि खरोखरच ती अतिशय वाचनीय झाली आहे‌. तर पुस्तक प्रस्तावनेपासूनच आपल्या मनाची पकड घेतं आणि आपण दिनेश कुंभार यांच्यासोबत कारमध्ये बसून या परिक्रमेला सुरुवात करतो.

पायी परिक्रमा करण्याची इच्छा असूनही काही वैद्यकीय कारणामुळे त्यांना ती करता आली नाही. परंतु परिक्रमा करण्याची आस अत्यंत तीव्र असल्यामुळे पायी नाही तरी कार चालवत का होईना पण मी परिक्रमा करीनच हा त्यांचा दृढ निश्चय यातल्या अगदी पहिल्या पानापासून वाचक म्हणून आपल्याला जाणवत राहतो. आतापर्यंतच्या वाचलेल्या परिक्रमांमध्ये पायी परिक्रमांचे अनुभव जास्त होते पण या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे कारने जाणाऱ्या परिक्रमावासीयांना ज्या काही अडथळांना तोंड द्यावे लागत असेल किंवा जे काही फायदेही होत असतील ते मला या पुस्तकातून वाचायला मिळाले. शेवटी परिक्रमा तुम्ही कशी करता, कोणत्या माध्यमातून करता याला केवळ महत्त्व नसून तुम्ही काय भावनेतून ती करता आणि येणाऱ्या अनुभवांना काय दृष्टिकोनातून सामोरे जाता यावरच तिचं महत्त्व अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने ही परिक्रमा एक सुंदर अनुभूती देणारी आहे हे निश्चितपणे म्हणता येईल.

परिक्रमेमध्ये अचानकच त्यांच्या प्रिय आजोबांचं होणार निधन आणि त्याच्या आधी काही क्षण त्यांचं आजोबांशी झालेलं फोनवरचे संभाषण, त्यानंतर त्यांच्या मनात परिक्रमा पूर्ण करतानाच येणारे दुःखाचे कड आणि जीवनाच्या अंताबद्दलची एक विष्षण जाणीव ही सतत पाझरत राहते. पुढील सर्व प्रवास एका गंभीर पण काहीशा अंतर्मुख विचारातून सुरू राहतो. आणि नर्मदा मय्येच्या प्रवाहात आपलं दुःख हलकं करत राहतो. या प्रवासात अनाहूतपणे भेटणारी माणसे त्यांच्याशी होणारा संवाद, त्यातल्या काही जणांबरोबर होणारा दीर्घ काळचा प्रवास, काही जणांशी होणारं दृढ नातं, तपश्चर्या करणारे तेजस्वी व्यक्तिमत्वाचे साधू तसेच अघोरी साधू, नर्मदा नदीत उतरल्यानंतर येणारी अनुभूती, जीवावर बेतणारे प्रसंग, अडचणीच्या प्रसंगी नर्मदा मायेचा केलेला धावा आणि त्या वेळेला त्या अडचणीतून मार्ग सापडणं अशा सगळ्याच गोष्टी अतिशय संक्षिप्तपण भावपूर्ण स्वरूपात वाचायला मिळतात.

दिनेश कुंभार यांची लेखन शैली अतिशय साधी सरळ आणि ओघवती आहे. प्रत्येक प्रसंग आपण समक्ष हजर राहून पाहत आहोत असा भास निर्माण होतो. त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य बघता कवितेचा किंवा प्रतिमा, रूपकांचा त्यांच्या लेखनावर खूप प्रभाव आहे असं जाणवतं. उदाहरणार्थ विसाव्यासाठी थांबले असताना नर्मदेच्या पाण्यातल्या त्यांना दिसलेल्या प्रतिबिंबाचं हे वर्णन पहा, “रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विटांच्या भट्ट्या अर्धवट पाण्यावर तोंड काढून पाहत होत्या. त्या विटांच्या आडून वर येणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पाण्यावर पडल्याने संपूर्ण वातावरण भगवे वस्त्र पांघरून उभं असल्याचा भास निर्माण झाला होता. ” याचप्रमाणे गुहेत गेल्यानंतर तिथला थंडाव्याबद्दल बोलताना ते अगदी सहजपणे म्हणतात, “गार वातावरणानं घट्ट आलिंगन दिलं. ” मंदिरातील दिवे लागण्याच्या प्रसंगांचं वर्णन करताना ते सहज लिहून जातात, “त्या प्रसन्न मंदिरातील दिवे लागताच निशा एखाद्या लावण्यवतीसारखी उजळली. संधिप्रकाशात दिव्यांचा उजेड म्हणजे निषेच्या अंगावरील लखलखणारे दागिने जणू भासत होते. ” अशा अतिशय सुंदर उपमा त्यांनी लिहिलेल्या आढळतात. जे वाचताना आपण रंगून जातो.

नर्मदा परिक्रमा ही बहुतेक जण अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून करतात. त्यामुळे त्याबद्दल लिहिताना अनेकदा आत्मचिंतन जास्त प्रमाणात दिसून येतं. या पुस्तकातही आत्मचिंतन, वैचारिक मंथन आलेलं आहेच. परंतु त्याहीपेक्षा यात जाणवतो तो एका निरीक्षकाचा, केवळ कुतुहल म्हणून चाललेला अभ्यास. आणि या अभ्यासातून निरीक्षणातून येत जाणारी परिपक्वता. याची चुणूक आपल्याला या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच जाणवते. एकूणच भवतालाबद्दल सजग असणाऱ्या, नदीबद्दल ओढ असणाऱ्या, निसर्गाप्रती, माणसाप्रती कृतज्ञता भाव असणाऱ्या कुणालाही हे पुस्तक निश्चितच आनंद देईल.

प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांनीच आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

एक उत्तम स्नेहभेट पाठवल्याबद्दल दिनेश कुंभार यांचे मनापासून आभार!

परिचय – तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आप्पाच्या गप्पा’ – लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आप्पाच्या गप्पा’ – लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : आप्पाच्या गप्पा

लेखक: श्री. दिलीप जमखंडीकर

प्रकाशक: दिपाली जमखंडीकर

 

पुस्तकाची पहिली झलक (मुखपृष्ठ व अर्पणपत्रिका)

आकर्षक मुखपृष्ठ: पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत देखणे असून, त्यावरूनच पुस्तकाच्या नावाचा अर्थ सहज उलगडतो. गोष्टी सांगणारे ‘आप्पा’ आणि त्या गोष्टी ऐकणारे त्यांचे प्रेमळ, उत्सुक आणि हसतमुख नातवंडे या चित्रातून कौटुंबिक नाते अधोरेखित होते.

आदरयुक्त दर्शन व अर्पणपत्रिका: पान उलटताच महालक्ष्मी व प. पू. दादा महाराज यांचे दर्शन घडते. पुढील पानावर दिवंगत माता-पित्यांना आदरपूर्वक पुस्तक अर्पण केल्याची अर्पणपत्रिका दिसते.

प्रेरणास्रोत:

‘माझे प्रेरणास्रोत’ या भागात लेखकाने त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा अतिशय प्रेमळ शब्दांत उल्लेख केला आहे. तसेच पुस्तकात आवश्यक तिथे सुंदर कौटुंबिक छायाचित्रे जोडलेली आहेत.

पुस्तकातील प्रमुख विभाग

१. पूर्वपीठिका

यात वडिलांच्या हस्तलिखिताचा भक्कम आधार घेऊन लेखन केले आहे. ते इतके रंजक आणि जिवंत पद्धतीचे आहे की, वाचताना तो जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.

२. मनोगत

लेखकाने यात अतिशय प्रांजळ कबुली दिली आहे. साध्या आणि सरळ आयुष्याविषयी खूप आकर्षकपणे लिहीत असतानाच, जीवनाला दिशा देणारे अत्यंत थोर विचार यात मांडले आहेत.

३. मनातील मनापासून…

हे वाचताना प्रत्येक ओळ किती मनापासून लिहिली आहे, याची जाणीव पावलोपावली होते. प्रसंगांचे वर्णन इतके हुबेहूब आहे की आपण स्वतः त्या प्रसंगाचा एक भाग आहोत असे वाटू लागते.

बालपण, कोल्हापूरच्या आठवणी आणि रंजक प्रसंग

भोगावती नदीचा प्रसंग:

 निसर्गसौंदर्य पाहत असतानाच, अचानक सुंदर भोगावती नदीच्या पात्रात ८ वर्षांच्या दिलीपदादांच्या जीवावर बेतलेला प्रसंग अंगावर काटा आणतो. म्हशीच्या अंगावर घातलेली सायकल डोळ्यांसमोर दिसते.

निर्मळ विनोद: स्वतःच्या उंचीचे वर्णन वाचताना गंमत वाटते. स्वतःवरच विनोद करून एक निर्मळ मन कसे जतन करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

शालेय जीवन व सकारत्मकता: 

सगळी शाळा आणि मजबूत मुलांचे काम पाहून ‘घोकंपट्टी वाचून बालपण आठवले’. ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, त्यांच्याविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा, त्या कमतरतांनी माणसाला कसे कणखर आणि धीट बनवले, हा सकारात्मक विचार मनाला भावतो.

भावनांची जपणूक: 

गाण्याची हौस कशी शमली हे वास्तव पण मनात कोणतीही खंत न बाळगता लिहिले आहे. ‘मोठ्यांच्या नजरेतील पातळ होणारी जरब हे त्यांचे प्रेम’ अशी सुंदर वाक्ये वापरून कटू अनुभवांची तीव्रता कमी केली आहे.

संस्कारांची शिदोरी: 

वडिलांनी ‘रेडिओ स्टार’ यांचे शास्त्रीय गायन गणपतीसमोर आयोजित करणे, ही आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासारखी आहे. लहानपणी गोळा केलेल्या नोटा अशाच प्रसंगांतून नकळत मनावर चांगले संस्कार करून जातात.

कोल्हापूरचा काळ व शाळा प्रवेश: 

कोल्हापूरमधील विविध कार्यक्रम आणि तिथला तो सुवर्णकाळ लेखकाने सुंदर अनुभवला. शाळेतील पहिल्या प्रवेशाचे अनुभव अत्यंत रंजक आहेत. शाळेतील अनुभव आणि भाषणातील आज्ञा वाचून गंमत वाटते आणि त्या लहान वयात काय घडले असेल, याचा अंदाज येतो.

रेडिओचा स्कोअर: 

रेडिओवर ऐकून लिहिलेला स्कोअर वाचकाला थेट बालपणात घेऊन जातो. स्वतःमधील उणिवा इतक्या विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचे रूपांतर सकारात्मकतेत होते आणि वाचताना चेहऱ्यावर हसू येते.

कौटुंबिक मूल्ये आणि बदलता काळ

व्यास बोळातील घर: या घराचे वर्णन अतिशय सुंदर आहे. सर्व प्रकारच्या गैरसोयी असूनही कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर असलेले अथांग प्रेम आणि ते कौटुंबिक पाश भौतिक सुविधांच्या पलीकडचे कसे असतात, हे लेखकाने फार छान मांडले आहे.

पिढ्यांमधील अंतर: 

एकमेकांची पुस्तके अनेक वर्षे अनेक भावंडांनी वापरणे ही आजच्या पिढीला अज्ञात असलेली पद्धत आपल्या पिढीने कशी अंगीकारली होती, याचे सुरेख वर्णन आहे.

जुन्या आठवणी व करमणूक: 

‘फोनचा उत्सव’ आणि त्यासंबंधीच्या आठवणींमुळे जुने दिवस आठवतात. ‘पु. लं. च्या व्यक्तिरेखा ऑफिसमध्ये सापडल्या असत्या’ हे वाक्य मनाला खूप आवडते.

क्रिकेट, सिनेमा आणि रेडिओ: 

शालेय जीवनातील क्रिकेट व सिनेमाचे किस्से छान आहेत. त्या काळातील हिरोंची वर्णने मस्त जमली आहेत. आपल्या पिढीसाठी वरदान ठरलेल्या ‘रेडिओ’चे वर्णन आणि त्यासोबतच दूरदर्शनची झालेली प्रगती व कार्यक्रमांची झालेली अधोगती याचे वास्तववादी वर्णन केले आहे.

संगीत आणि कला: 

संगीत नाटके बघण्याचा आनंद, संगीताची आवड आणि परिस्थितीची सांगड यांचे वास्तव दर्शन घडते. ‘छोटा गंधर्व’ यांची भेट म्हणजे लेखकाच्या संगीत व स्वरसाधनेला मिळालेले गोड फळच आहे.

सामाजिक जाणिवा व चमत्कार: 

माणसाची सामाजिक गरज अनुभवातून मांडली आहे. सामुदायिक उत्सव का व कसे आवश्यक असतात, याचे महत्त्व समजते. घरातील छोटे समारंभ ते आजचे ‘इव्हेंट’ यातील फरक स्पष्ट केला आहे. ‘प्लेग ते कोविड’ मधील अनुभव आणि ‘आईची दृष्टी परत येणे’ यांसारखे चमत्कार दर्शवणारे अनुभव थक्क करतात. वाईटातून चांगले कसे शोधावे, याची एक नवी दृष्टी हे लेखन आपल्याला देते.

काश्मीरची सहल: 

आपल्या सहलीचे आणि काश्मीरवर लिहिलेल्या कवितेचे वर्णन निसर्गाची आणि अध्यात्माची सुंदर माहिती देऊन जाते.

 स्वलिखित कविता (पुस्तकाचा दुसरा भाग)

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाच्या स्वतः रचलेल्या उत्कृष्ट कविता आहेत:

यात सुरुवातीला सर्व देवतांचे ध्यानरूपी आवाहन केले आहे.

त्यानंतर आई, वडील, पितर, गुरु, आरोग्य, कलाकार, मोबाईल, नातवंडे, कठीण काळ आणि रामनाम अशा सर्वसमावेशक विषयांवर अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत.

हे सगळे विविध अनुभव लेखकाने आपल्या ‘उल्हास शब्दफुलांत’ अतिशय सुंदर रीतीने गुंफले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, हे पुस्तक वाचताना लेखकाचा संपूर्ण ‘जीवनपट’ वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा राहतो!

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आठवणी अंगाराच्या

लेखक : विश्वास विनायक सावरकर

पृष्ठे : १९८

मूल्य : ३००₹ 

आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे – –

तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.

त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.

त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.

तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.

वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.

– – लेखक विश्वास सावरकर 

एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.

या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय. ‘

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : द हिडन लाईफ ऑफ ट्रीज  

(The Hidden Life of Trees)

मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन (Peter Wohlleben)

मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर

हे एक अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारं पुस्तक आहे. आपण झाडांना फक्त लाकूड किंवा सावली देणाऱ्या निर्जीव वस्तू समजतो, पण हे पुस्तक झाडांच्या एका विलक्षण आणि गूढ जगाची सफर घडवून आणतं.

पुस्तकाचा मूळ गाभा आणि विषय

पीटर वोलेबेन यांनी आपल्या अनेक वर्षांच्या वनपाल (Forester) मधील अनुभवावरून हे पुस्तक लिहिले आहे. झाडं केवळ उभी नसतात, तर ती एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यातही ‘भावना’ असतात, हे त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.

प्रमुख आकर्षणे 

झाडांचे सामाजिक जाळे हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. जंगलातील झाडं जमिनीखालील बुरशीच्या  माध्यमातून एकमेकांशी जोडलेली असतात. या नेटवर्कद्वारे ती अन्न, पाणी आणि धोक्याचे संदेश एकमेकांना पाठवतात.

एकमेकांना मदत करणे

 जर एखादे झाड आजारी असेल किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर शेजारील झाडं त्याला मुळांद्वारे पोषण पुरवतात.

मातृवृक्षाची भूमिका करतात. जंगलातील सर्वात जुनी आणि मोठी झाडं ही ‘आई’ सारखी काम करतात. ती आपल्या लहान रोपट्यांचे संरक्षण करतात आणि त्यांना वाढण्यास मदत करतात. इतके दिवस माणसे, प्राणी हेच फक्त असे करतात असे वाटत होते.

धोक्याची सूचना देणे 

एखाद्या झाडावर कीटकांचा हल्ला झाला, तर ते झाड हवेत विशिष्ट गंध सोडते. हा गंध ओळखून आजूबाजूची झाडं स्वतःच्या पानांमध्ये विषारी द्रव्ये तयार करतात जेणेकरून कीटक त्यांना खाणार नाहीत.

पुस्तकाची बलस्थाने

सोपी आणि ओघवती भाषा!  लेखकाने अत्यंत गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय (उदा. वनस्पतीशास्त्र) अगदी साध्या आणि रंजक भाषेत मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकालाही ते सहज समजते.

संवेदना जागृत करणारे हे पुस्तक वाचल्यानंतर झाडांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. झाडं ही सजीव आणि सामाजिक प्राणी आहेत, याची जाणीव तीव्रतेने होते.

वैज्ञानिक पुरावे

 लेखकाने केवळ काल्पनिक गोष्टी सांगितलेल्या नाहीत, तर प्रत्येक दाव्याला विज्ञानाचा आणि संशोधनाचा आधार दिला आहे.

– – काही समीक्षकांच्या मते, लेखकाने झाडांचे खूप जास्त ‘मानवीकरण’ केले आहे. म्हणजे झाडांना माणसासारख्या भावना असतात (जसे की दुःख, आनंद, भीती) हे मांडताना वैज्ञानिक भाषेऐवजी लेखकाने काहीशी भावनिक भाषा वापरली आहे. पण ते आवश्यक वाटते. त्यामुळे झाडांच्या भावना अधिक प्रभावीपणे लक्षात येतात.

पुस्तकात काही मुद्दे परत परत आले असले तरी ते त्या ठिकाणी आवश्यक वाटतात.

‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ हे केवळ निसर्गप्रेमींसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने एकदातरी वाचायला हवे असे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडते आणि पर्यावरणाचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे पटवून देते.

थोडक्यात सांगायचे तर, जर  निसर्गाची रहस्ये जाणून घ्यायला आवडत असतील आणि एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर  जेव्हाही एखाद्या जंगलातून किंवा झाडांच्या जवळून जायची वेळ येईल, तेव्हा  त्यांच्यातील शांत संवाद नक्कीच जाणवेल.

हे पुस्तक वाचून जंगलात जाण्याची तीव्र इच्छा होते. आपण ज्या नैसर्गिक हालचाली समजतो, किंवा वाऱ्याने हलणे समजतो, त्यामागील अर्थ हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतात. फारच छान पुस्तक आहे.

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक :  स्वभाव – विभाव 

लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी

प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्रासारखा गंभीर विषय सामान्य माणसाला समजेल अशा रसाळ भाषेत मांडलेला एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. माणसाचा स्वभाव कसा घडतो आणि त्यात बदल करणे शक्य आहे का, यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.

पुस्तकाचा गाभा म्हणजे स्वभाव आणि विभाव

डॉ. नाडकर्णी यांनी या पुस्तकात मानवी व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत.

स्वभाव म्हणजे जी आपली मूळ वृत्ती आहे, जी आपल्याला अनुवंशिकतेने किंवा संस्कारांनी मिळते.

विभाव म्हणजे स्वभावाचे प्रकटीकरण किंवा आपण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद.

शास्त्रीय मांडणी: लेखकाने यात ‘REBT’ (Rational Emotive Behavior Therapy) म्हणजेच ‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’चा आधार घेतला आहे. क्लिष्ट मानसशास्त्रीय संज्ञा न वापरता अत्यंत सोप्या उदाहरणांतून त्यांनी मानवी मनाचा नकाशा मांडला आहे.

स्वयंमदतीसाठी मार्गदर्शक असणारे हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, तर ते ‘कृती-प्रवण’ आहे. स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखून ते कसे सुधारता येतील, याचे मार्गदर्शन यात मिळते.

नात्यांची समज उलगडून दाखवताना केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचा स्वभाव समजून घेतल्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील तणाव कसे कमी होतात, हे यात प्रभावीपणे सांगितले आहे.

पुस्तकात काही काल्पनिक पात्रांच्या संवादांतून प्रश्न-उत्तर स्वरूपात विषय मांडला आहे, ज्यामुळे वाचक त्या विषयाशी सहज जोडला जातो.

*पुस्तकाची बलस्थाने*

ओघवती भाषा: डॉ. नाडकर्णी स्वतः एक उत्तम लेखक आणि नाटककार असल्याने त्यांची मांडणी नाट्यात्मक आणि ओघवती आहे.

वास्तववादी दृष्टिकोन: स्वभाव पूर्णपणे बदलता येत नाही, पण तो ‘मॅनेज’ करता येतो, हा व्यावहारिक विचार लेखकाने दिला आहे.

दैनंदिन उदाहरणे: राग, भीती, मत्सर, न्यूनगंड यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुस्तकातील उदाहरणे खूप उपयुक्त ठरतात.

निष्कर्ष

“आपण जसे आहोत, तसेच आपण का आहोत?”

या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाने ‘स्वभाव-विभाव’ वाचायला हवे. स्वतःला बदलण्याची इच्छा असलेल्या आणि मानसिक स्वास्थ्य जपणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एका ‘दीपस्तंभा’सारखे काम करते.

जर स्वतःच्या वागण्यातील ‘पॅटर्न’ समजून घ्यायचा असेल आणि आयुष्यात अधिक समतोल हवा असेल, तर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे.

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन पुस्तके – १) “ कथा धार्मिक प्रथांच्या “ २) “ जीवनप्रवास – लेखक : प्रा. देवबा पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ दोन पुस्तके – १) “ कथा धार्मिक प्रथांच्या “ २) “ जीवनप्रवास – लेखक : प्रा. देवबा पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

दोन पुस्तके : १. कथा धार्मिक प्रथांच्या २. जीवनप्रवास 

लेखक. : प्रा. देवबा शिवाजी पाटील. खामगाव.

 ९४२०७९५३०७

प्रकाशक. : १. नावीन्य प्रकाशन, पुणे

 २. कृष्णायन प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या. : ७८, १२०

किंमत. : रु. १५०/. व रु. २००/- अनुक्रमे 

कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.

प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये काव्यसंग्रह, धार्मिक रचना, देशभक्ती, निसर्ग, स्त्री विषयक काव्य, कथासंग्रह, बालकुमार व युवा साहित्य अशा विविधांगी साहित्याचा समावेश आहे. धर्म, परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून कुमारांना समजेल असे लेखनही त्यांनी केले आहे. नुकतीच त्यांची दोन पुस्तके वाचनात आली. या पुस्तकांचा वाचकवर्ग भिन्न असला तरी लेखकाची मूळ विचारधारा पक्की असल्याने, एकाच नदीचे दोन प्रवाह वाहत असावेत तसे हे लेखन झालेले दिसते. पहिले पुस्तक आहे ‘ कथा धार्मिक प्रथांच्या ‘ व दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास ‘. या दोन्ही पुस्तकांना स्वतंत्रपणे समजून घेऊ.

१) कथा धार्मिक प्रथांच्या

हे पुस्तक बाल व किशोर वयोगटातील वाचकांसाठी आहे. त्यामुळे आपण वाचावे की नाही असा संभ्रम पडतो. पण काही पाने वाचल्यावर लक्षात येते की यातील खूपसे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे विषय समजून घेण्याच्या बाबतीत आपण अजून ‘ बाल ‘ च आहोत. त्यामुळे फक्त बालकांनीच नव्हे तर पालकांनीही वाचावे असे हे संस्कारक्षम पुस्तक आहे.

या पुस्तकात रत्ना हे तेरा चौदा वर्षांच्या मुलीचे मध्यवर्ती पात्र आहे. ती हुशार व जिज्ञासू आहे. त्यामुळे तिला सारखे प्रश्न पडत असतात. या प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवीत. ती माहिती न कंटाळता द्यायला हवी. हे काम करते रत्नाची आजी. रत्ना आणि तिची आजी यांच्यातील प्रश्नोत्तरातून घडणारा संवाद म्हणजे या ज्ञानदायी कथा !

कोणते प्रश्न पडतात बरे रत्नाला ? रोजच्या जीवनात ती जे पाहते, कुटुंब व समाजात जे जे दिसते त्या सर्वाविषयी तिला प्रश्न पडत असतात. धार्मिक आचरण करत असताना केवळ परंपरा म्हणून आचरण न करता त्यामागचे शास्त्र व विज्ञान समजून घेतले पाहिजे हे अत्यंत तळमळीने सांगण्यासाठी लेखकाने हा शंका निरसनाचा मार्ग निवडला आहे.

रत्नाला जे समजत नाही ते ती विचारते आणि तिला मिळणा-या उत्तरातून आपले ज्ञान वाढत जाते. उपासना म्हणजे काय ? स्तोत्रे, आरत्या का म्हणायच्या ? संकल्पयुक्त पूजा कशी असते ? देवाचा प्रसाद का घ्यायचा ? गोमूत्र, गोमाता, सडा, रांगोळी, स्वस्तिक, फुले, दुर्वा, सुपारी, बेल इत्यादी विषयीं तिला कुतूहल आहे. त्यामुळे ‘ हे सर्व कशासाठी ? हा प्रश्न‌ तिला पडतो. यासारख्या शंका दूर करतानाच लेखकाने शंख, शंखध्वनी, कापूर, समई, श्रीफळ, प्राणप्रतिष्ठा,

मंदिरातील कासव, नंदी, घंटा, आचमन, अशा धार्मिक क्रियांशी संबंधित अनेक वस्तू व प्रथा यांचे वैज्ञानिक संबंध समजावून दिले आहेत. यावरुन आपल्या लक्षात येईल की धार्मिक प्रथांच्या या संबंधी सर्वांच्याच मनात ज्या शंका असतात किंवा काही प्रमाणात अज्ञान असते ते नात व आजीच्या संवादातून दूर होते.

म्हणूनच हे पुस्तक फक्त बालकांचे नसून पालकांचेही आहे. कुटुंबातील सर्वांनी संवाद साधून समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.

२) प्रा. पाटील यांचे दुसरे पुस्तक आहे जीवनप्रवास‘.

जीवन प्रवास हा ललित लेख संग्रह हातात घेण्यापूर्वी प्राध्यापक देवबा पाटील यांचा आणि माझा काहीही परिचय नव्हता. त्यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केलेले असले तरी माझ्या वाचनात ते फारसे आलेले नव्हते. परंतु जेव्हा जीवनप्रवास हा लेखसंग्रह माझ्याकडे आला आणि तो मी वाचायला वाचायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्राध्यापक पाटील हे जीवनाकडे अत्यंत गंभीरतेने आणि सूक्ष्मतेने पाहणारे लेखक आहेत. वाचन, मनन आणि चिंतन या तीनही पायऱ्या पार केल्या नंतर सरस्वतीच्या मंदिरात त्यांनी शब्दांची जी पूजा आरंभली आहे ती अत्यंत विलोभनीय आणि सर्व वाचकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. विचार प्रवर्तक, बोध प्रधान, स्फूर्तीदायक लेखांचा हा संग्रह म्हणजे लोकांना उपदेश करण्याची भूमिका नसून उलट आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे, जे काही विचारांचे संचित आहे ते इतरांना वाटून द्यावे एवढा एकच उद्देश त्यांनी आपल्या सर्व लेखनामागे ठेवला आहे त्यामुळे ‘शहाणे करून सोडावे सकल जन ‘ हीच त्यांची भूमिका आहे.

या लेख संग्रहातील पहिला लेख ‘जीवन प्रवास ‘ या शीर्षकाचा आहे. या लेखाचे बारकाईने वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल की जीवन जरी एकच असले तरी त्याकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन किती भिन्न भिन्न प्रकारचा असू शकतो. जीवनाला ते ओबडधोबड रस्ता म्हणतात तर त्याच जीवनाला त्यांनी धुळीने बरबटलेला रस्ता असेही म्हटले आहे. हा रस्ता चालल्यानेच संपतो. थांबण्याने नाही. रस्ता चुकला तरी आंतरिक विवेकशक्ती माणसाला योग्य मार्गावर आणून सोडते. आपल्या अंगावर धूळ उडणार नाही याची काळजी घेऊन रस्ता चालत राहायचे असते. जीवनाकडे ते अनेक दृष्टीने पाहतात. कधी जीवन त्यांना आगगाडी वाटते, तर कधी जीवन म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे असे वाटते. माणूस आशेच्या रुळावरून धावत असतो, निराशेचा धूर सोडत असतो आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर थांबत असतो. बुद्धिबळातील सोंगट्यांप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरुष आपापल्या आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करत असतात त्यांना त्यांच्या मर्यादा ही महित असतात. जीवनात प्रतिकूल आणि अनुकूलतेच्या लाटा येतच असतात. त्यामुळे जीवन हे सागरा सरखे आहे असे लेखकाला वाटते. आयुष्यभर तडजोड करत करत जीवन जगावे लागते. त्यामुळे कधी ते तारेवरची कसरत आहे असे वाटते. परंतु त्याच वेळेला जीवन हा एक रंगत जाणारा खेळही आहे. कधी आक्रमक व्हायचे, कधी माघार घ्यायची याचे भान ठेवून खेळल्यास हा खेळ रंगत जातो. सकारात्मकता आणि आशावादी दृष्टिकोन, सामुदायिक जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव, संकटांना सामोरे जाण्याची तयारी, जीवनाचा उद्देश ओळखून तो गाठण्याची तयारी या सर्वावर जीवनाचे यश अवलंबून असते. तीन खंडांच्या या जीवन पुस्तकातील प्रत्येक खंड महत्त्वाचा असतो. आपला स्वच्छ व सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील आनंद टिपत जाण्याची वृत्ती यावरच या तीनही खंडांचे यश अवलंबून असते. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा हा व्यापक दृष्टिकोन उपदेशात्मक नसून मित्रत्वाच्या नात्याने केलेला सुसंवाद आहे असे म्हटले तर अगदी योग्य ठरेल.

आयुष्यातील कर्तव्य कर्म याविषयी ही लेखकाने विचार व्यक्त केले आहेत. कर्तव्य आणि हक्क सदैव सोबतच चालत असतात. प्रत्येकाला कर्तव्ये ही करावीच लागतात. जबाबदारी पेलावी लागते. परंतु कर्तव्य पालन करत असताना ईश्वराचे स्मरण ठेवून केले गेले तर हे देवाचेच काम आहे ही श्रद्धा मनात उत्पन्न होऊन कर्तव्य अगदी सहजपणे पार पाडले जाते. प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कर्म केले तर आपल्या कर्माचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत हे प्रत्येकाने जाणून असावे.

 प्रयत्न व कष्ट हा प्रत्येकाच्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे असे ते म्हणतात. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. यासाठी त्यांनी मुंगी, मधमाशी, छत्रपती शिवाजी महाराज अशी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटवून दिला आहे. परंतु आंधळेपणाने कष्ट न करता कामाचे व आपल्या उद्दिष्टाचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या सूत्रबद्ध आराखडा असेल आणि आपल्या कामावर आपली श्रद्धा असेल तर यश नक्कीच मिळते. काम करण्याची वृत्ती असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अनुभव आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालून आणि मेंदूला सतत ताजेतवाने ठेवून आनंदाने कष्ट करत गेल्यास यश हे हमखास मिळतेच.

या ठिकाणी पहिल्या काही प्रकरणांविषयी सविस्तरपणे लिहिले आहे. उद्देश एवढाच की प्रा. पाटील यांचे लेखन किती वैचारिक आहे व वाचकांना ते कसे उपयुक्त ठरु शकते याची कल्पना यावी. यापुढील सर्व प्रकरणे ही जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडणारी आहेत. माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू, त्यातील गुणदोष, मनोबल व चारित्र्य यांचे महत्त्व, सद्वर्तन व सद्विचार यांची आवश्यकता, मैत्री, पैसा, ताणतणाव, वाचन, मानसिक व शारीरिक आरोग्य व विश्रांती, धर्म, श्रद्धा, पूजा, प्रार्थना, समाजशीलता अशा सर्व बाजुंनी जीवनाविषयी विचार करून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत ते व्यक्त करण्यात प्रा. पाटील यशस्वी झाले आहेत. या शिवाय एका प्रकरणात त्यांनी जीवनोपयोगी गोष्टींची चर्चाही केली आहे.

प्रत्येक लेख वाचताना लक्षात येते की त्या त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करुन मग लेख लिहिलेला आहे. उदाहरणार्थ, ‘ मनाचे सामर्थ्य ‘ हा लेख पाहू. हा लेख लिहीताना मन म्हणजे काय, मेंदूची कार्यपद्धती कशी असते, मन प्रसन्न का असले पाहिजे, मनाचा शरीराशी काय संबंध आहे, अंतर्मन व बहिर्मन म्हणजे काय, ते कसे कार्य करते, मन आणि विचार, इच्छाशक्ती यांचा काय संबंध आहे, मनाची चंचलता, मनाचा वेग तरीही ती एक शक्ती कशी आहे, अशा सर्व बाजुंनी मनाचा विचार करुन मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयीही त्यांनी चर्चा केली आहे. अन्य लेखांच्या बाबतीतही असेच अभ्यासपूर्ण लेखन दिसून येते.

प्रा. पाटील यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखणीतून सुविचाराप्रमाणे अनेक चांगली वाक्ये बाहेर पडली आहेत. संकटे ही पुरुषार्थाची संधी असतात, कर्तव्य हा शास्त्राचा धर्म आहे तर प्रेम हा अंत:करणाचा धर्म आहे, सदाचाराविना जीवन म्हणजे होकायंत्राविना प्रवास करणारे जहाज, मैत्री म्हणजे सहवासाची सुरेल मैफिल असते, नशिबाचे कुलूप उद्योगाच्या किल्लीनेच उघडते यासारखी वाक्ये त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन घडवतात.

‘जीवनप्रवास ‘ हा लेख संग्रह तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरणारा आहे. किंबहुना जीवनाचा प्रवास करणा-या प्रत्येकाने क्षणभर थांबून, या संग्रहातील लेखांचे वाचन करुन पुन्हा प्रवास चालू ठेवला तर पुढचा प्रवास अधिक सुखकर होईल यात शंकाच नाही.

‘कथा धार्मिक प्रथांच्या ‘ आणि ‘ जीवनप्रवास ‘ ही दोन्ही पुस्तके वाचकांच्या ज्ञानात भर घालून सद्विचाराला प्रवृत्त करणारी आहेत.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ऐवज एक स्मृतिबंध” –  लेखक : अमोल पालेकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

“ऐवज एक स्मृतिबंध” –  लेखक : अमोल पालेकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

०`पुस्तक : ऐवज एक स्मृतिबंध

लेखक : अमोल पालेकर 

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे

संपर्क : ८०८७२८८८७२

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे हे आत्मचरित्र वाचायला घेतले तेव्हा वाटले होते की, या चरित्रात त्यांच्या चित्रपटीय आणि नाटकीय आयुष्यात घडलेल्या घटनांची तसेच पडद्यामागच्या अनेक गोष्टींची चटकदार माहिती आपल्याला वाचायला मिळेल. पण पालेकरांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि नाटकांनी जसे धक्के दिले तसेच या पुस्तकाने पालेकरांचा एक वेगळाच पैलू समोर आणला. जी सृष्टी माणसाला प्रसिद्धी वलयात गुंगवून टाकते त्या सृष्टीत राहून प्रसिद्धीचा झोत सातत्याने असूनही जमिनीवर राहून विचार करणारी अमोल पालेकरांसारखी माणसे थोडीच असतात, असे हे पुस्तक वाचून लक्षात आले. प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत प्रेक्षकानुनयापासून दूर राहत ते त्यांचे मनवांच्छित काम करत राहिले. म्हणूनच जगराहाटीपेक्षा वेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि नाटक करण्याचे धाडस त्यांच्या अंगी आले. हे करत असताना वेळोवेळी त्यांनी स्वतःचेही परखड आत्मपरीक्षण कसे केले ते खालील परिच्छेदावरून स्पष्ट होते.

“मी कोण हा प्रश्न अॅरिस्टॉटल, फ्रॉईड, देकार्त (Aristotle, Freud, Descartes) ह्यांसारख्या विचारवंतांपासून ते पार विसाव्या शतकातल्या ‘4E दृष्टिकोना ‘पर्यंत तत्त्वज्ञ, मानसतज्ञ, साहित्यिक अशा अनेकांनी, तसंच विचार करू शकणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाने किसून काढला आहे. मीही त्यातलाच एक! आत्मभान ते 4Es (embodied, embedded, enactive & extended cognition) म्हणजेच जगताना नेणिवेमध्ये शोषला गेलेला भोवताल डचमळून वर येताना, स्वतःच्या जागृत अवस्थेत मिसळत ‘मी’ स्वतः बनतो. माझी ‘जाणीव-नेणिवेतली समज’ ते ‘माणसं परिसर निर्जीव गोष्टींशी संलग्न असलेलं माझं अस्तित्व’, अशा दोन प्रवाहांच्या निर्मितीला ऐंशी वर्षांचा मी साक्षीदार आहे. मार्क्स-लेनीन यांनी संबोधलेलं ‘वस्तुनिष्ठ वास्तव’ असो वा सार्थच्या अस्तित्ववादात संबोधलेल्या ‘मानवी आकस्मिकता’ असोत, त्या सगळ्यासकट ‘मी’ तयार झालो आहे. “

“या सगळ्या परिसरात ‘मी’ चाचपडत असतो. त्या चाचपडण्याची जाणीव होते, विशेषतः एखाद्या रात्री झोप लागली नाही की अंधारात स्वतःकडे बघत असताना! म्हणजे मी आडवा पलंगावर – नजर वर छताकडे; त्याच छतावर मला उलटा करून समांतर तरंगत ठेवला – नजर माझ्या शरीराकडे. माझ्याकडे बघत तरंगणाऱ्या माझ्या शरीराला जितका ‘मी’ समजलो असेन तितका कदाचित मला स्वतःलाही समजलेला नाही. उलटसुलट विचार, पानी-कम-चायच्या चालीवर कौतुक-कम-टीका, भीती, असुरक्षितता, आनंद, प्रेरणा, नैराश्य, गडद, फिका आणि त्याच्या अधलंमधलं सगळं… काय काय त्याने टिपलं असेल माझ्यातलं!”

“सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातले बदल घडत असताना तो निरखत असेल. भोवताल बदलत राहतो तसा मीही बदलत राहतो. मला मात्र बदल होत असताना पकडता येत नाहीत. काही वर्षांनी मागे वळून पाहताना कधीकधी झालेले बदल लक्षात येतात. सतत सावध असणं वा राहावं लागणं हा शाप आहे माझ्या मते. त्या जागृत अवस्थेतून आलेली अस्वस्थता, भीती शरीरासोबत गारठून जाते. त्याच अस्वस्थतेतून रात्री डचमळ होत राहते. विशेषतः मागच्या दशकात गारठून राह्यलेली अस्वस्थता विरघळतच नाही… I feel I’m fossilized. आजूबाजूला इतकं सगळं बदललंय म्हणजे रस्ते-पूल उड्डाण मार्ग इमारती-बोगदे; तशीच माणसं मला माहीत असलेली, नसलेली, जवळची, लांबची, न दिसणारी… सगळीच बदललेली. जहरी, विष प्यायलेली माणसं नंगानाच घालत आहेत; ते विष दुसऱ्याकडे नुसतं बघूनही पसरत जातंय… एखाद्या साथीच्या विषाणूसारखं. माझ्यात ते शिरू शकत नाही कारण मी स्वतःला जपतो आहे, माझ्याभोवतीचा तो बर्फ अजूनतरी अभेद्यच राह्यला आहे. पण माझी आतली घुसमट इतकी विलक्षण आहे की माझ्यातल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडमुळे माझ्याच ठिकऱ्या होऊन मी बर्फाबाहेर येईन असं वाटण्याइतकी वेळ आली आहे. “

“एवढं कसं काय सगळं बदललं? का बदल जोखण्यात मी नाकामी राह्यलो? चाकूने भोसकून, खून करून पाण्यात लोटून दिलेल्या प्रेतातून लाल रक्त पृष्ठभागावर पसरत राहावं, तसा पाण्याचा लांबवर पसरलेला पृष्ठभाग केशरी दिसतोय. तो पसरत सगळी झाडं, डोंगर, दऱ्या, आभाळ एकरंगी करत समुद्राकडे झेपावतोय. पंचमहाभूतंच केशरी झाली तर माझ्या ठिकऱ्या होणंच इष्ट. मात्र त्या ठिकऱ्या काळ्या रंगाच्या असू देत. संपतानाही निषेधाची नोंद घेतली जावी – इतिहासाने नाही तरी तरंगत माझ्या पार्थिवाकडे बघत असलेल्या ‘तो’ने!” (पृष्ठ क्रमांक ८९-९०)

सोपं नसतंच असं स्वतःचं परखड निरीक्षण करून स्वतःला सोलण्यात! महात्मा गांधींनी जसे सत्याचे प्रयोग केले आणि स्वतःविषयीचं नागडं सत्य जगासमोर ठेवलं, त्याचप्रमाणे या पुस्तकात पालेकरांनी स्वतःविषयी पडखड परीक्षण करून त्यांच्या कमतरतांनाही तेवढ्याच निरपेक्षपणे जगजाहीर केलं आहे. हे पुस्तक नुसतेच स्मरणरंजन नसून एका सामान्य माणसाचा उत्तुंग व्यक्तिमत्वात रुपांतरीत होत जाणारा वैचारिक प्रवास आहे. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कुठलाही आडपडदा न ठेवता तेवढ्याच स्वच्छपणे मांडणे हे क्वचितच आत्मचरित्रांमध्ये दिसून दिसून येते. हे इंद्रधनुष्य अमोल पालेकर यांनी या पुस्तकात लीलया पेलले आहे. त्याबद्दल त्यांना standing ovation च द्यायला हवे. वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही, बोजड वाटणार नाही, शब्दबंबाळ होणार नाही आणि पाल्हाळीकही वाटणार नाही, एवढ्या कुशलतेने एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे अशा पद्धतीने हे चरित्र उठावदार झालेले आहे. अमोल पालेकरांनी त्यांचे विचार एवढ्या अप्रतिमरीत्या शब्दबद्ध केलेले आहेत की प्रत्येक वाचकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा” – लेखक : सॅवी कार्नेल अनुवाद : रमा हर्डीकर सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा” – लेखक : सॅवी कार्नेल अनुवाद : रमा हर्डीकर सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : स्पाय स्टोरीज – लक्ष्मी पांडा 

 – – – नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा

लेखक : सॅवी कार्नेल

अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव

मूल्य: ३४०₹ 

लक्ष्मी पांडा यांची कथा ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील (INA) सर्वात लहान वयाच्या गुप्तहेराची (spy) थरारक आणि सत्य कहाणी आहे.

दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…!

ही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते…महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…!

या मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते…

या प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते…

काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची…

लक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…

ही कथा एका अशा विस्मृतीत गेलेल्या नायिकेची आहे, जिने बालपणीच युद्धाची भीषणता अनुभवली आणि देशासाठी स्वतःला वाहून घेतले.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कण कण जीवन” (अनुवादित कथासंग्रह)  – अनुवादिका : उज्ज्वला केळकर ☆ परिचय – ज्योती कुळकर्णी☆

ज्योती कुळकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कण कण जीवन” (अनुवादित कथासंग्रह)  – अनुवादिका : उज्ज्वला केळकर ☆ परिचय –  सौ.ज्योती कुळकर्णी ☆

पुस्तक : कण कण जीवन (अनुवादित कथा-संग्रह) 

अनुवादिका : उज्ज्वला केळकर 

प्रकाशक : स्वरूपदीप प्रकाशन सोलापूर.

मूल्य : 250 रुपये.

आजकाल मला मोबाईल वरच्या वाचनाचा खूप त्रास होतो. त्यामुळे मी लायब्ररी लावली. मी या वेळेला पुस्तक बदलायला गेले तो उज्वलाताई केळकर यांनी अनुवाद केलेले ‘कण कण जीवन’ हे पुस्तक दिसले. दिसल्याबरोबर मी उचलले. खरोखर अप्रतिम कथांचा अनुवाद केलेला आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखकाची प्रत्येक लघुकथा उत्तम आहे. उज्वलाताईंच्या कथा सुद्धा अतिशय उत्तम आहेत.

उज्ज्वला केळकर

वाचन सुरू असताना कामासाठी उठल्यानंतर मध्ये पुस्तक खाली ठेवून देखील वाचता येतं त्यामुळे मला कथा संग्रह नेहमीच खूप आवडतो.

या संग्रहाची सुरुवात घनश्यामजी अग्रवाल यांच्या कथांनी झालेली. खरंच प्रत्येकच कथा छानच आहे. नमुन्या दाखल एक कथा सांगते, ‘ तिचा आतला आवाज’.

– – – डॉक्टरी इलाज पूजापाठ गंडेदोरे करून थकलेलं जोडपं शेवटी अनाथालयात मुलगा दत्तक घ्यायला जाते. एक मूल ते जोडप्याला आवडतं. मॅनेजरही म्हणतो की मुलगा खूप छान आहे घ्या तुम्ही दत्तक! काही दिवसांपूर्वी एक जोडपं इथे आले होते. त्यांना पण हे बाळ खूप आवडले होतं मुलात कुठलीच खोट नव्हती त्याला घेऊन जाणारच होते परंतु त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पत्नी गर्भवती आहे त्यामुळे दत्तक घेतले नाही. दत्तक घेता घेता या जोडप्याला पण आशा वाटते टशकी कदाचित आपलं पण असंच होईल. आणि ते दत्तक घ्यायचं तात्पुरतं रहित करतात व त्या मॅनेजरला सांगतात की आम्ही पण हेच मूल घेणार. पण एक महिन्यानंतर! कारण त्यांना पण आशा वाटलेली असते की या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवल्याबरोबर आपल्याही घरात मूल येऊ शकेल याची. परंतु तसं काही घडत नाही आणि शेवटी ते त्या मुलाला दत्तक घेतात आणि त्या आईचा आतला आवाज मात्र सांगत असतो की मी याची खरी आई नाहीये कारण तसं असतं तर मी स्वतःचे मूल होण्याची आशा वाटली होती त्याही वेळेला या मुलाला दत्तक घेऊनच घेतले असते. अशा प्रत्येकच कथेतून खूप काहीतरी सांगितलेलं आहे. सगळ्याच कथा खूप छोट्या असल्या तरी देखील! त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवतात.

त्यानंतर, ‘भावना वर्मा सरकार’, ‘रामनिवास मानव’, ‘अतुल मोहन प्रसाद ‘, डॉ. राजेन्द्र साहिल, ”नज्म सुभाष, ‘ सिमर सदोष ‘, राजेंद्र परदेशी, श्रीराम ठाकूर दादा, वीरेंद्र नारायण या सर्वांच्याच कथा अतिशय उत्तम! या सर्वांच्याच कथांमधून मानवी स्वभावाचा एक एक स्वार्थी पैलू उलगडलेला आहे. कथा खूप छोटी परंतु आशय मोठा घेऊन येणारी अशी प्रत्येकच कथा आहे. या प्रत्येक कथेमधून मोठी कथा जन्माला येऊ शकेल इतकं सार त्या कथांमध्ये भरलेलं आहे. पूर्ण पुस्तक मुळातूनच वाचायला हवं. कथा कितीही सुरेख असल्या तरी प्रत्येकाचा आढावा घेणं शक्य नाही. वाचकांची उत्सुकता पण संपते त्यांनी.

शेवटी उज्वला ताईंच्या कथा आहेत. सगळ्याच कथा सुंदर आहेत. पहिलीच ‘एका स्वप्नाचा अंत’ ही तर अतिशय सुंदर आहे. आजच्या वास्तवला धरून.

दंगल घडवून आणणाऱ्याला कळतं की एक आतंकवादी मारल्या गेला आहे. त्याला हायसं यासाठी वाटतं की, ज्यांनी प्रत्यक्षपणे आतंकवादात सहभाग घेतला त्याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मग आपणच आतंकवाद घडवून आणला याचा पुरावाच मागे उरला नाही. याचा त्याला आनंद होतो आणि तो ठरवतो की आता दंगा नव्याने सुरू झाला की कम्प्युटरच्या दुकानावर आपण डल्ला मारायचा कारण त्याच्या मुलाला कम्प्युटर हवं असतं. पण थोड्याच वेळात त्याला कळतं की आपला मुलगा पण आतंकवाद्यांसोबत मारला गेलाय. हे कळल्यानंतर मात्र त्याला ऐकता ऐकताच भोवळ येते. म्हणजे आतंकवाद घडवून आणताना दुसऱ्याचं कुणी गेलं तर त्याचं काही वाटत नाही पण आपला मुलगा मारला गेला आहे म्हटल्यानंतर ते दुःख मात्र तो सहन करू शकत नाही. अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट.

त्यांचीच, ‘दुहेरी फायदा’ही गोष्ट पण खूप आवडली. भ्रष्टाचाराची लस देण्याच्या अभिनव कल्पनेतून गोष्ट सुंदर रंगवली आहे. मूळातूनच ती वाचावी.

कथासंग्रहातील आपल्याला कधी एखादी कथा आवडते तर एखादी आवडत देखील नाही. परंतु मी मनापासून सांगते, मला यातील प्रत्येक कथा सारखीच आवडली.

उज्वला ताई धन्यवाद! इतकं सुंदर पुस्तक आम्हाला तुमच्या अतिशय सुंदर अनुवादामुळे वाचायला मिळालं. तुमच्या पण कथा खूप आवडल्या.

परिचय: सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “समिधा” – (आत्मकथन) – लेखिका : साधनाताई आमटे – परिचय : रंजना देशपांडे ☆ शब्दांकन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “समिधा” – (आत्मकथन) – लेखिका : साधनाताई आमटे – परिचय : रंजना देशपांडे ☆ शब्दांकन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(५ मे हा आदरणीय कै. साधनाताई आमटे यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने समिधा या त्यांच्या आत्मकथनाबद्दल) 

पुस्तक : समिधा (आत्मकथन) 

लेखिका : कै. साधनाताई आमटे

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठसंख्या : १८५ 

सत्य हे अद्भुत असूनही अतर्क्य, कल्पनेहूनही रंजक व वास्तवाच्या घटनांमधून तावून सुलाखून निघाल्यानंतर ते साधे, सरळ, प्रांजळ, नर्मविनोदी, पारदर्शक आत्मकथन इतके सुंदर असू शकते की ते वाचकाला खिळवून ठेवते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साधनाताई आमटे यांचे “समिधा” हे आत्मकथनपर पुस्तक.

हे पुस्तक फक्त १८५ पानांचे आहे. परंतु या पानांमध्ये भरलेला अनुभव साऱ्या विश्वाला व्यापून राहण्या एवढा प्रचंड आहे याची जाणीव पुस्तक वाचल्यानंतर येते. पुस्तकाचे सामर्थ्य जसे त्या आत्मकथनामागील प्रांजळ व अद्भुत अनुभवांचे आहे, तसेच ते अद्भुत उत्तम रीतीने शब्दबद्ध करणाऱ्या श्री सीताराम प्रभू यांचेही आहे. पारंपरिक अर्थाने ही आत्मकथा नव्हे आणि आत्मचरित्रही नव्हे. हे आहे जीवनानुभवांच्या आठवणींचे संकलन.

या जीवनयात्रेची सुरुवात होते तीच मुळी नागपुरातील घुले शास्त्री पासून. शिवकालीन गंगाधर भट्टांचे वंशज घराणे, सनातनी धार्मिक जुन्या परंपरांना चिटकून असलेले. साधनाताई दहा वर्षाच्या असताना वडील वारले आणि सर्वात धाकट्या दोन महिन्याच्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी साधनाताईंवर पडली. त्या वयापासून त्यांच्या मातृत्वाच्या भूमिकेचा विकास झाला आणि पुढील आयुष्यात हजारो कार्यकर्त्यांची माता म्हणून जीवनातील एका गावी कार्याचा पाया रचला गेला.

त्यांच्या बालपणीच्या जीवनाकडे पाहिल्यास त्यांच्या स्वभावातील भावुकता, वैचारिकता व कर्तव्य कठोरता यांचा उगम त्याच्यावरील संस्कारातून झाला हे निश्चित.

बाबा आमटे यांचे त्यांच्या घरचे आगमन आणि नंतर त्यांच्या भावविश्वात व त्यांच्या जीवनातील प्रवेश हा सारा अनुभव योगायोगाचा व अतर्क्य असा आहे.

कोणी एक संन्यस्त वेषधारी ब्रह्मचारी त्यांचे घरी येतो काय! त्यांच्या इंदूला पाहिल्यावर त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा विरघळून पडते काय! अन ते या मुलीला मागणी घालतात काय! सारेच अतर्क्यआहे. खरे तर या संन्यासी सुखवस्तु घराण्यातील त्या काळी सुद्धा घरदार, शेतीवाडी, बंगला, मोटार व इतर सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना, वकिलीचे शिक्षण झालेले, चांगली मानाची नोकरी असताना सुद्धा या मुलाने हा मार्ग का पत्करला असेल याची या मुलीला काही कल्पना नसते. परंतु तो काही देशकार्य करतो आहे एवढीच जुजबी माहिती या इंदूला होती.

लग्न ठरल्यानंतर बाबांशी झालेला पत्रव्यवहार व इतर घटना प्रत्यक्ष वाचणे हा एक अनोखा अनुभव ठरावा.

चोरांशी झालेल्या झटापटीत अंगावर झालेल्या सुऱ्यांच्या जखमांमुळे ठिकठिकाणी बँडेज बांधलेला नवरदेव बोहल्यावर पाहण्याचा प्रसंग कल्पनेपेक्षाही विलक्षण ठरावा. तरीही संपूर्ण नास्तिक व स्वतःच्या कार्यावर अमाप श्रद्धा, कार्य सामर्थ्यावरील निस्सिम विश्वास असलेला पती व परमेश्वरावर असीम श्रद्धा असणारी पत्नी यांच्या संसाराचा प्रवास जाणून घेणे खूपच उद्बोधक आहे यात शंका नाही.

पेशाने वकील असलेले बाबा आमटे समाजसेवेचे व्रत अंगीकारून म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष, अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हरिजन आदिवासी लोकांना त्यांच्या माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्ते झाले.

त्या काळात श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कल्पनेतील ‘श्रमाश्रम’ नावाचा समाजकार्याचा प्रयोग, प्रकृती अस्वास्थ्य व आर्थिक तंगीमुळे मध्यावर सोडून देणे भाग पडले. अशा बिकट परिस्थितीत त्यांचा पहिला मुलगा प्रकाशचा जन्म झाला.

परंतु त्या नंतरच्या एक दोन वर्षातील आर्थिक तंगी व प्रकृती अस्वस्थ असूनही या काळात सुद्धा एका नव्या समाजसेवेच्या प्रकल्पाचा विचार या दांपत्याने कसा केला असेल हे समजणे तर्कशास्त्राच्या पलीकडेच आहे.

एका विलक्षण योगायोगाने घडलेल्या लहानशा प्रसंगाने या दांपत्याचे सर्व जीवनच पालटून टाकले आणि महारोगी सेवा समिती या महान प्रकल्पाचा जन्म झाला.

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असलेल्या, स्वतःची प्रकृती वरचेवर त्रास देत असताना एक ते दीड वर्षाचा मुलगा, त्याचा सर्व सांभाळ आईच्या ममतेने करीत महारोग्यांच्या सेवेचे कार्य आरंभणारा हा महापुरुष आणि साधनाताईंच्या स्वतःच्या आजारपणामुळे पतीची होणारी ओढाताण. असहाय्यपणे पहात क्षयरोगाशी झुंज देणारी पत्नी हा अनोखा संसार कोणाच्याही कल्पनेत सुद्धा बसणारा नाही.

अशाही परिस्थितीत रोगाशी यशस्वीपणे लढा देऊन, सद्य आनंदवन म्हणून ज्ञात असलेल्या शहरी वस्तीपासून दूर अशा एका झुडपी जंगलात मिळालेल्या एका ओसाड जमिनीवर हे पती-पत्नी, लहान मुलगा व सहा महारोग्यांसह येतात. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धिमत्ता व प्रभावी शब्द एवढ्याच सामर्थ्यावर आनंदवन नावाचे नंदनवन फुलवितात. हा इतिहास वाचताना डोळ्यातून झरणारे अश्रू वाचकाला आवरता येत नाहीत.

या सर्व कार्यामध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता व पतीचा संतापीपणा जपत, मुलांवर सुसंस्कार करत, सर्व टप्प्यांवर सक्रियपणे सहभागी होत आपल्या पतीच्या कार्ययज्ञात स्वतःची आहुती देणारी ही समिधा, आपल्या मनातील एक कोपरा केव्हा काबीज करते हे समजत सुद्धा नाही.

आनंदवनाची उभारणी व विकास होत असतानाच साधनाताईंची प्रकाश व विकास ही मुले मोठी होत होती. स्वतःच्या मुलांना शहरी शाळेत न घालता कामगार व मजुरांची मुले ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत याही मुलांचे शिक्षण करण्याच्या विचारांमध्ये त्यांच्या स्वतःच्या संस्कारांवरील विश्वासाचे दर्शन होते. निर्भयता, आत्मविश्वास व इतरांवर संस्कार करण्याची क्षमता या त्रिसूत्रीतून बाबांनी कार्यकर्त्यांची आनंदवनातील मानसिकता घडविली. परंतु स्नेह, समानता, प्रेम, सहिष्णुता इत्यादी कोमल भावांमधून एक अतूट भावबंध निर्माण करून कार्यकर्त्यांच्या मनात शाश्वत नात्याची गुंफण करून साधनाताईंनी बाबांच्या कार्याला एक वेगळेच परिमाण बहाल केले. हे वेगळे परिमाण घेऊन आजही आनंदवन एका अनोख्या भावविश्वासाचे प्रतीक बनले आहे.

महारोग्यांना सामान्य माणसाचे जीवन बहाल करताना नुसते जगणे मिळवून देण्याबरोबरच भावविश्व ही फुलविण्याचे काम बाबांचा विरोध असतानाही तो मोडून काढून साधनाताईंनी केले. स्वतःच्या मतांबद्दल आग्रही राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रसंगी पतीच्या मताविरोधात भूमिका घेऊन ती भूमिका निभावण्याचं त्यांचं धैर्य लोकविलक्षणच.

सहा कुष्ठरोग्यांसह एका ओसाड जमिनीवर, समाजसेवेच्या माध्यमातून कुष्ठरुग्ण सेवेची वसाहत उभी करून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा उभ्या करण्यापर्यंतचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांना नवीन साहसाचे धुमारे फुटले नसतील तरच नवल आणि बाबांच्या वाणीने एक नवा एल्गार उच्चारला. “निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे. कारण तीच आहे जन्मदात्री साऱ्या भविष्याची”.

अशा नव्या भविष्याच्या स्वप्नांसाठीही तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केले गेले. साधनाताई म्हणतात, “आपल्या बुद्धीचा कस श्रमाच्या माध्यमातून जो पडताळून पाहतो तोच कार्यकर्ता. तो बुद्धिजीवीही असावा आणि श्रमजीवीही तर असावाच असावा. ” या आवाहनाला प्रतिसाद देत युवक बिरादरीच्या माध्यमातून श्रमसंस्कार छावण्यांना प्रतिसाद देत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक तरुण उत्साही कार्यकर्ते या अभियानात सामील झाले. परंतु इतके सर्व होत असताना या सर्व कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था करण्याबरोबरच त्यांचे मन आणि भावना जपण्याचे कार्य करणाऱ्या धीरोदात्त साधनाताईंची प्रतिमा एवढी मोठी दिसते की ती साऱ्या भाव विश्वाला व्यापून राहते.

एक प्रकल्प पूर्णत्वास आणतानाच दुसऱ्या प्रकल्पाची शून्यातून सुरुवात. पुन्हा कष्ट, जिद्द व अपरंपार दृढविश्वास याच भांडवलावर परत तीच जीवनाची संघर्षमय चाकोरी.

त्यातूनच पुढे आनंदवन, सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, गोकुळ असे एकामागून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प उभे राहत गेले. समाजकार्याची एक एक नवी परंपरा निर्माण करणारे हे प्रकल्प या माउलीच्या असीम त्यागाची महती गातात.

स्वतःची उच्चशिक्षित मुले सुना, नातवंडे यांनाही या कार्यात झोकून देताना पाहून अत्यानंदाने कृतकृत्य भावनेनेसर्व व्यवस्था त्यांच्यावर सोपवून बाबा व साधनाताईंनी पुन्हा नर्मदेच्या काठी एकांतवास पत्करून पुन्हा कष्टमय जीवनाची साथ सोडली नाही. नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग व प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाईलाजाने त्यातून घ्यावी लागलेली माघार. यामुळे काहीसे व्यथित होऊन परंतु स्वतःच्या कार्याच्या प्रगतीने समाधान पावत आपले जीवन सार्थकी लागल्याच्या भावनेने हे आत्मकथन संपते. पण हिमालयापेक्षाही उत्तुंगतेच्या दर्शनाने भारावलेला वाचक अंतर्मुख होतो.

अंतर्मुख होऊन विचार करायला लागल्यावर आजची तरुण मुलामुलींची विचारधारा व त्यांची मानसिकता थोडी तरी बदलण्याचे सामर्थ्य या पुस्तकात नक्कीच आहे हे जाणवते.

साधनाताईंनी ‌अग्निदिव्य म्हणावीत अशा प्रसंगातून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य टिकवले. बाबा आमटे व साधनाताईंच्या स्वभावातही आपणास विरोधाभास जाणवतो. त्यांनी बऱ्याच वेळेला पत्नीच्या होरपळीकडे डोळेझाक केली तरीसुद्धा बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी आयुष्यभर साथ दिली. हे सर्व आपल्या तरुण पिढीने नक्कीच अभ्यासण्यासारखे आहे. साधनाताई व बाबा आमटे यांचे सहजीवन म्हणजे एका समृद्ध सहजीवनाचा नमुनाच आहे.

सहजीवनातील यशस्विता ही एकमेकातील अहं आड न येता दोघांनीही एक एक पायरी खाली येऊन सहजीवनातील आनंद फुलवण्यात आहे. पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात आनंदी समाधानी असतील तर त्या कुटुंबातील वातावरणही उत्फुल्ल, कुटुंबातील नातेसंबंध निकोप, मोकळे व मैत्रीपूर्ण राहतात. मुलेही समृद्ध वातावरणात राहतात व पहिल्या पिढीपेक्षाही दुसरी पिढी काकणभर जास्तच चांगले कार्य करण्याकडे प्रवृत्त होतात.

हे सर्व अभ्यासल्यावर असे वाटते, काळ कोणताही असो, पूर्वीचा असो की आजचा असो. मुलांवर निकोप संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या पालकांमध्ये असणे हे गरजेचे आहे. साधनाताईंची तिसरी पिढीही आजच्या काळातीलच नाही का? त्यांची तिसरी पिढीही आत्ताच्या वातावरणातही सुसंगत असेच जीवन जगताना दिसत आहे. ते साधनाताईंच्या समृद्ध विवेकशील संस्कारांमुळेच.

हेच नाही का साधनाताई व बाबा आमटे यांच्या समृद्ध व उत्तम सहजीवनाचे फलित?

परिचय : रंजना देशपांडे

शब्दांकन व प्रस्तुती : सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares