मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

 डॉ. प्रमोद वि. पाठक

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

पुस्तक : आर्य आक्रमण सिध्दांत आणि भारतीय राष्ट्रवाद

लेखक : श्रीकांत ग. तलगेरी

अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे.

प्रकाशक : साप्ताहिक विवेक,

पृष्ठे : ३७७,

मूल्य : रु. ५००/-

आर्यांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक जनसमूहांवर विजय मिळवला, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, इथे पूर्वीपासून वसती करून असलेल्या लोकांवर आपली संस्कृती लादली हे गृहितक इंग्रजी राज्यकर्त्यांनी लादलेल्या भारतातील इतिहास शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून गेली दिडशे वर्षे शिकवले जात आहे. इ. स. १९२० नंतर मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे झालेल्या उत्खननाने त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. उत्खनित झालेली सिंधू संस्कृतीची शहरे आर्यांनी नष्ट केली असे ठरविण्यात आले. ते गृहीत इथल्या आणि परदेशातील अभ्यासकांच्या मनात इतके घट्ट रुजले की त्याला आव्हान न देता येणाऱ्या सिध्दांताचे महत्त्व प्राप्त झाले. आज सर्वसाधारण सुशिक्षित भारतीय नागरिकाच्या मनावर हेच बिंबलेले आहे की आर्य हे पश्चिमेकडून आलेले आक्रमक होते. त्याला धरून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाण होत राहिले. त्यातून या देशातील विविध जनसमूहांमधे यशस्वी रित्या सामाजिक फूट पाडली गेल्याचे चित्र गेल्या शतकभरात दृढ झालेले आपण पाहतो. त्याचे पडसाद आजही आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पहायला मिळतात. आजकाल हिन्दू-आर्यांना सनातन संस्कृतीशी जोडून त्यांच्या विरोधात प्रक्षोभ आणि संधर्ष उभा करण्याचे राजकारण तेथे चालते आहे.

सिध्दांताचा प्रतिवाद

आर्य आक्रमण सिध्दांत विशेष करून इंग्रजी राज्यकर्त्यांनी जगावर, त्यातल्या त्यात भारतीय आणि युरोपातील जनमानसावर यशस्वीपणे थोपवला. त्याला एक प्रकारे पुष्टी बोगाझकोई येथे हजारोंच्या संख्येने मिळालेल्या लिखित मातीच्या मुद्रांनी मिळाली. कारण त्या मुद्रांवरील मजकूरात वैदिक देवता, इतर संस्कृत नावे आणि संख्यांचा समावेश होता. काही मुद्रांवरील मजकूरानुसार त्यांचा काळ निश्चितपणे इ. स. पूर्व १३८०च्या दरम्यानचा होता हे ठरविता आले. त्याला धरून तो जनसमुदाय मजलदरमजल करत ईराणमार्गे इ. स. पूर्व १२००च्या दरम्यान भारतात पोहचला असा निष्कर्ष सहज काढता आला. मॅक्समुल्लरने अंदाजपंची ठरविलेल्या आर्य आक्रमणाच्या काळाशी तो जुळल्याने त्यावर मोहर लागली. त्याचा अमिट प्रभाव आतही अनेक बिनीच्या प्राच्यविद्या संशोधकांवर आहे. माझ्या मते ही संशोधक मंडळी बोगाझकोई मातीच्या मुद्रांच्या दलदलीत फसून बसली आहेत. आर्य आक्रमण प्रतिपादनाचा सविस्तर संशोधन करून प्रतिवाद करणारे पाच ग्रंथ नारायणराव भवानराव पावगी यांनी १८९०च्या दशकात प्रसिध्द केले होते. याच्याही पुढे जाऊन पश्चिमेतील अनेक प्राचीन साम्राज्ये भारतीयांनी प्रस्थापित केली होती असे त्यांनी नमूद होते.

आर्य आक्रमण सिध्दांताचा ठोसपणे पुरस्कार लो. टिळकांनी केला. त्याचा प्रतिवाद करणारे ग्रंथ नंतरच्या काळात अनेक संशोधकांनी लिहिले. जसे जसे नवे संशोधन होत गेले तसे तसे आर्य आक्रमण सिध्दांताच्या विरोधातील पुरावे पुढे येऊ लागले आहेत. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला THE ARYAN INVASION THEORY: A REPREAISAL हा ग्रंथ (पृष्ठे ३७३) १९९३ साली आदित्य प्रकाशन, नवी दिल्लीने प्रसिध्द केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद साप्ताहिक विवेकने प्रसिध्द केला आहे. तीन दशके जुनी असली तरी, एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती करून घेण्याची संधी या ग्रंथाव्दारे मराठी वाचकांना मिळेल.

प्रस्तुत ग्रंथात विशेष भर भाषाशास्त्रीय विश्लेषणावर आहे. संस्कृत, इराणी, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील शब्द साम्य लक्षात आल्यावर मूळ भाषा कोणती आणि तिचे मूळ ठिकाण कोणते असावे असा प्रश्न समोर येणे साहजिकच होते. त्याचे उत्तर शोधताना मात्र ब्रिटिश संशोधकांनी युरोपीय संस्कृती केन्द्रस्थानी ठेवून या दोन्ही प्रश्नांचे उत्तर, शोधले नाही तर तयार केले. ज्या ब्रिटिशांना १८व्या शतकात डॉ. सॅम्युअल जॉन्सनने इंग्रजी शब्दकोश तयार करेपर्यंत शब्दांचे स्पेलिंग एकसारखे असावे याची अक्कल नव्हती ते, ज्या भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग इ. उच्चारांना धरून संस्कृत व्याकरणाची बांधणी केली, बिनीचे व्याकरणकार दिले त्यांना हे उपटसुंभ संस्कृत भाषा मूळ शिकवू लागले. त्याने सर्व घोटाळा केला. त्यांनी प्राथमिक Indo-European root language – भारोपिय मूळ असलेल्या भाषेची संकल्पना मांडली. ही भाषा युरोपच्या आसपासच्या प्रदेशात निर्माण झाली हेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना ठरवले. त्यातून पुढे जाऊन आर्य स्थलांतर आणि आक्रमणाचे गृहितक मांडले गेले. खरेतर संस्कृत भाषा अति प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात प्रचारात आणि वर्धिष्णू होती त्या प्रदेशात तिचे मूळ असणे अगदी स्वाभाविक होते. त्याच्या उलट असलेल्या दिशेकडून स्थलांतराचे इमले रचले गेले. त्यावर अमाप ग्रंथ रचना झाली. आता स्थिती अशी आहे की सत्य स्वीकारायचे तर आजवर उभारलेल्या आणि आता अवैध ठरू लागलेल्या तुलनात्मक भाषिक संशोधनाच्या महालांवर बुलडोझर चालवून ते जमिनदोस्त करावे लागतील.

अपभ्रंश की उद्भ्रंश

काही वर्षांपूर्वी माझी दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषाशास्त्रीं बरोबर भेट झाली. ते दोघेही अमेरिकेतील प्रख्यात विद्यापिठांत नावाजलेले प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यातील एक मराठी (माणूस) होते. मी त्यांना एकमेकांशी संबंधित असलेल्या शब्दांच्या तीन जोड्यांच्या भौगोलिक प्रवासा विषयी विचारले. ऋग्वेदात इंद्राने वध केलेल्या “वृत्र” या महाभयंकर भुजङ्गाचा वारंवार उल्लेख येतो. त्या भुजङ्गाचे पर्यायी नाव “अहि-दास” असेही आहे. त्याचा वध करणारा या अर्थी इंद्राला “वृत्रघ्न” असे नाव दिले गेले. या वृत्रघ्नाला पर्यायी म्हणता येईल असा शब्द पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्तात “वेरेत्रघ्न” असा आहे. त्याच्या उत्तरेला असलेल्या आर्मेनियात तो “वाहग्न” असा झाला आहे. त्याला समांतर असलेल्या भुजङ्ग दर्शक शब्दांची रूपे “अझी दाहक” आणि “अझो दाह” अशी आहेत. मी त्यांना विचारले होते की हा शाब्दिक अपभ्रंशाचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे की उलट्या दिशेने झाला असावा. त्या दोघांनीही या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले होते. साधारणपणे कठीण उच्चारी शब्दांचे अपभ्रंश सोप्या उच्चारात होतात. “क्षेत्र” चे शेत, (हिंदीत खेत) होते, शेतचे “क्षेत्र” असा “उद्भ्रंश” होत नाही. हे एक व्यवहारातील उदाहरण झाले. तसे वृत्रघ्नचे वेरेत्रग्न आणि वाहग्न असे अपभ्रंश होणे साहजिकच ठरते. पण बोगझकोई मुद्रांच्या दलदलीत फसलेल्या त्या दोघांनी पूर्वे कडून पश्चिमेकडे हा पर्याय स्वीकारला असता तर आजवर केलेल्या दशकांच्या संशोधनाचा डोलारा एका क्षणात जमिनदोस्त होईल, आर्य आक्रमण मोडीत निघेल ही भिती त्यांना होती. तेही माझ्यासारख्या नाव नसलेल्या (उपटसुंभा) कडून.

तसे पाहता भारोपीय भाषा मूळ युरोपात असणे हे थोतांड आहे. तलगेरींनी या थोतांडाचे अंतरंग उघडे पाडून त्यातील खाचाखोचा समोर आणल्या आहेत. त्यांनी अनेक प्रस्थापित आणि नावाजलेल्या भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट केले आहेत. विशेष करून मध्यपूर्वेतील आणि दक्षिण युरोपातील प्राचीन भाषांमधील प्रचलित शब्द आणि त्यांचे मूळ असू शकणारे संस्कृत अथवा संस्कृतोद्भव शब्द यांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून असे दिसते की भाषाशास्त्रीय विवेचनातून आर्यांचे स्थलांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे झाले असण्याचीच शक्यता होती. त्याला आधुनिक पुरातत्त्वीय आणि जनुकीय विस्तारावरील संशोधनाचा ठोस आधार मिळतो आहे. यावर विषयाला धरून दै. मुंबई तरुण भारत (दि. ५ नोव्हे. २०२२) मधे माझा प्रसिध्द झालेला लेख, तसेच “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” या माझ्या पुस्तकातील प्रकरण “आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरूंग” (नचिकेत प्रकाशन २०२३, पृ ९९-१०६) यात वाचकांना वाचता येईल.

पुराणांमधील वंशावळ्या

पाश्चात्य संशोधक आणि त्यांची री ओढणाऱ्या भारतीय संशोधकांनी पुराण ग्रंथांना विश्वासार्ह नाहीत असे ठरवून वैचारिक अडगळीत टाकले होते. त्या पुराणांची ऐतिहासिक उपयुक्तता दाखविण्याचे महत्त्वाचे काम तलगेरिंच्या पूर्वी ए. डी. पुसाळकर आणि पी. एल. भार्गव यांनी केले. पुराणांमधील वंशावळ्या व्यवस्थित लावून कालदृष्ट्या इतिहासाची बांधणी केली जाऊ शकते हे त्यांनी सिध्द केले. तलगेरी त्यांच्या दोन पाऊले पुढे गेले आहेत. त्यांनी वैदिक राजे आणि मध्यपूर्वेतील प्राचीन राजे आणि राजवंशांची योग्य सांगड घातली आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानता येईल. या विषयाला धरून विस्तृत चर्चा या ग्रंथात आहे. पुराणांमधील राजवंशावळ्या भाकडकथा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत हे वास्तव या ग्रंथाने ठळकपणे पुढे आणले.

एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. जर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकच होत्या तर हे स्थलांतर होण्याचे कारण काय होते? त्याचा उलगडा गेल्या दोन तीन दशकातील संशोधनाने अधिक स्पष्टपणे झाला आहे. इ. स. पूर्व २०००-१८०० दरम्यान सिंधू नदी खोऱ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय (Tectonic) उत्पात झाले. त्याच्या परिणामी जवळपास सर्व मोठी शहरे आणि गावे सामूहिक स्थलांतर होऊन ओस पडली. सिंधू संस्कृतीचे लोक चार दिशांना स्थलांतरित झाले. त्यातील जे दोन जनसमूह वायव्येकडे आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले त्यांचा मागोवा तुलनात्मक भाषाभ्यासातून (Comparative philology) घेतला गेला. त्याचा घटनांचा विस्तृत आढावा “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” यात (पृ. ११-२३) घेतला आहे. य़ा स्थलांतरा मागची अभूतपूर्व पूरांची वस्तुस्थिती लक्षात घेतली की तलगेरींच्या आणि प्रख्यात पुरातत्त्वविद डॉ. बी. बी. लाल यांनी प्रतिपादन केलेल्या आर्यांच्या वायव्य आणि पश्चिमेकडील स्थलांतरांचा वस्तुनिष्ठ उलगडा होतो.

प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेले हे भाषांतर एकदम छान झाले आहे. सामान्य वाचकांना वाचताना मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळेल, मात्र एक तांत्रिक तृटी अभ्यासकांना जाणवत राहील. जागोजागी संक्षिप्त रूपात दिलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी त्यात देण्याचे राहून गेलेले दिसते. या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत संदर्भ यादी न चुकता समाविष्ट व्हावी.

परिचय : डॉ. प्रमोद वि. पाठक

नाशिक   भ्र. – ९९७५५५९१५५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अवकाश.. शोध अंतराळाचा” – संपादक : निखिल विद्याधर पंडितराव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“अवकाश.. शोध अंतराळाचा” – संपादक : निखिल विद्याधर पंडितराव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अवकाश … शोध अंतराळाचा 

संपादक : निखिल विद्याधर पंडितराव

पृष्ठ : २००

मूल्य : २४०₹

पृथ्वी भोवतीचे अवकाश… अथांग पोकळी… गूढ… विस्मयकारी… कुतूहल जागवणारी… अभ्यासक, संशोधकांना खुणावणारी… अब्जावधी वर्षांचं संचित सोबत बाळगणारी… ग्रह-ताऱ्यांना मिरविणारी… आव्हान देणारी… पृथ्वी नावाच्या ग्रहावरील मनुष्यप्राण्यास सदोदित मोहवणारी….

आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी… आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे ‘अवकाश’ हे पुस्तक…

अवकाश’ हे पुस्तक अशा सर्व गोष्टींवर भाष्य करते. अवकाशाच्या अमर्याद ताकदीबाबत आपल्याला माहिती करून देते. भारताला प्राचीन काळापासून खगोलशास्त्रीय परंपरा लाभली आहेच; त्याला विज्ञानाची जोड मिळत गेली आणि आज विज्ञानाधिष्ठीत समाज घडवण्यामध्ये इस्त्रो, नासा आदी अनेक संस्था प्रत्यक्षात काम करत आहेत. अवकाशातील विश्वाबद्दल आपले आकर्षण संस्कृतीइतकेच प्राचीन आहे. पृथ्वीच्या पलीकडे जाऊन अत्याधुनिक मोहिमा भारताने यशस्वी करून दाखवल्या आहेत. पृथ्वीच्या पलीकडे असणारे विश्व समजून घेण्याच्या प्रयत्न सातत्याने केला आहे, करत आहोत आणि करत राहणार आहोत. ‘अवकाश’ या पुस्तकात याचाच वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाकांक्षा, संशोधन आणि भविष्यात अवकाशातील माणसांचे जगणे या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.

या पुस्तकात भूषण जोशी, डॉ. बाळ फोंडके, अच्युत गोडबोले/आसावरी निफाडकर, सुरेश नाईक, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. अनिल लचके, प्रा. डॉ. आर. श्रीआनंद, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. संजय ढोले, डॉ. प्रकाश तुपे, प्रमोद काळे, अथर्व पाठक, सुधीर फाकटकर, अनघा शिराळकर, बी. एच. पाटील, सोनल थोरवे, डॉ. व्ही. एन. शिंदे, दिशा सावंत, सुरेंद्र पाटसकर, गोपाळ कुलकर्णी, सारंग खानापूरकर, मानसी शहा, संजय उपाध्ये यांनी सर्वस्पर्शी अवकाशाचा वेध घेतला आहे. भारताच्या अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकणारे विविध लेख त्यामध्ये एकत्र केलेले आहेत, ज्यामध्ये चांद्रयानपासून विविध मोहिमांचा समावेश आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण नवी दृष्टी, विज्ञान आपल्यासमोर उभे करते.

या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयीचा मांडलेला पट नक्कीच उपयुक्त ठरणारा असेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अस्वस्थ पिढी” – लेखक : जोनाथन हाइट – अनुवाद : अभय इनामदार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अस्वस्थ पिढी” – लेखक : जोनाथन हाइट – अनुवाद : अभय इनामदार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अस्वस्थ पिढी

लेखक: जोनाथन हाइट

अनुवाद: अभय इनामदार

प्रकाशक : My Mirror Publications, पुणे 

पृष्ठ: ३६८

मूल्य: ₹३५० 

२०१० पासून, किशोरवयीन मुलांनी साध्या फोनऐवजी सोशल मीडिया ॲप्सने भरलेल्या स्मार्टफोनकडे वळायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जगाचं निरीक्षण करण्याऐवजी, अनुभव घेण्याऐवजी ते ऑनलाइन राहून आभासी जगात आपला जास्तीतजास्त वेळ घालवू लागले. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबतचा प्रत्यक्ष संवाद आणि मानसिक आरोग्य दोन्ही झपाट्याने घसरले..

हे पुस्तक आधुनिक संशोधनाच्या आधारे दाखवून देतं की, मुक्त खेळापासून स्मार्टफोनकडे झालेल्या या संक्रमणामुळे विकास प्रक्रियेत व्यत्यय येतात. अगदी झोपेच्या कमतरतेपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. प्राचीन ज्ञानावर आधारित आणि अत्याधुनिक विज्ञान व उपयुक्त सल्ल्यांनी सजलेले हे आश्चर्यचकित करणारे पुस्तक वेगाने घडत असणाऱ्या बदलांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

या पुस्तकात  

== डिजिटल युगात सुदृढ बालपण जपण्यासाठी पायऱ्या

== किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या व त्यावरील उपाय

== इंटरनेटच्या मायाजालाचा मुलांवर काय परिणाम होतो व मुलींवर काय परिणाम होतो

== चार मूलभूत हानी

== पालक, समाज, शाळा आणि शासन यांनी बजावण्याची भूमिका

मुलांना आभासी जगातून खऱ्या जगात आणण्यासाठी… हे पुस्तक फक्त एक वाचन नाही, तर आजच्या पिढीच्या मानसिक आरोग्याचा आरसा आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या डिजिटल जीवनशैलीचा परिणाम समजून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचावे.

इंटरनेटच्या मायाजालात हरवलेली मुलं – आभासी जगातील अस्वस्थ पिढी – समस्या आणि समाधान

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे☆

श्री विश्वास देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे ☆

पुस्तक : एक चिरंतन चित्रपट: मुग़ल-ए-आज़म 

लेखिका – डॉ. मीना श्रीवास्तव

प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन 

पाने – १५४

किंमत – ₹ ३००

डॉ. मीना श्रीवास्तव

डॉ. मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखनावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ‘ रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष’ आणि ‘महर्षी वाल्मिकी’ या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या अनामिक क्रांतिकारकांच्या आंदोलनाविषयी मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच कलाकारांनी पाहिलेले एक भव्य दिव्य स्वप्न असे म्हणता येईल. या पुस्तकात डॉ. मीना श्रीवास्तव यांनी या स्वप्नाचा प्रवास, त्यामागील निर्मिती प्रक्रिया आणि तो तयार होत असताना करावा लागणारा संघर्ष अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे. 

खरे म्हणजे एखाद्या चित्रपटावर एखादे सुंदर पुस्तक लिहिले जाऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला सुखद धक्का देणारी आहे. तेही १९६० मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाबद्दल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्या काळात जाऊन, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शोधून त्यांचे हे पुस्तक सिद्ध झाले आहे. त्यांचे हे पुस्तक वाचत असताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहोचतो. हे भव्यदिव्य स्वप्न साकार करीत असताना निर्माते आणि कलाकार यांच्या मनातील दडलेल्या संवेदना, त्यांनी केलेला त्याग आणि के. आसिफ यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक यांच्या जिवापाड केलेल्या प्रयत्नांची माहिती त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हे पुस्तक पाहताक्षणीच आपले मन आकर्षून घेते. मधुबाला म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य! मुखपृष्ठावरील आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील घुंघट बाजूला करणाऱ्या मधुबालाची आकर्षक छबी आपले मन मोहून घेते. तिचा हसतमुख चेहरा, बोलके डोळे हे चित्र जिवंत करतात. या पुस्तकात या चित्रपटाबद्दल सगळं काही सांगणारी माहितीपूर्ण अशी १५ प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी लेखिकेने दिली आहे. त्यातून लेखिकेची पारदर्शकता, प्रामाणिकपणा तर दिसतोच परंतु पुस्तकातील माहितीची अधिकृतता सुद्धा प्रमाणित होते. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी या चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींची कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक बोलके होते.

या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखिकेने अपार कष्ट घेतले आहेत. मुगले आजम या चित्रपटाने लेखिकेच्या मनावर आधीपासूनच गारुड केले होते. परंतु हे पुस्तक लिहायचे ठरल्यानंतर संदर्भ ग्रंथ मिळवणे, आंतरजालावरील माहिती मिळवणे या सगळ्या गोष्टीत त्या कमालीच्या गढून गेल्या आणि जवळपास दोन वर्षे त्या मुगले आजमच्या जगातच मनाने वावरत होत्या याची साक्ष त्यांचे मनोगत वाचल्यानंतर मिळते.

शहजादा सलीम आणि दासी अनारकली तरुण वयामध्ये भेटतात. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते पण हे दोन प्रेमी जीव एकत्र येऊ शकत नाहीत. शहजाद्याचे वडील त्यांच्या प्रेमात भिंत बनून उभे राहतात आणि दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशी ही खरंतर साधी सोपी कथा. परंतु या कथेमध्ये दिग्दर्शक के. आसिफ यांनी इतके सुंदर रंग भरले की ही कथा पडद्यावर जिवंत झाली आणि युगानुयुगे लोकांना ती आठवत राहील अशा प्रकारे तिचे सादरीकरण त्याने आणि इतर कलाकारांनी केले. 

या चित्रपटाचे संगीत आणि गाणी हा सुद्धा एक वेगळ्याच संशोधनाचा आणि लेखनाचा विषय व्हावा इतके ते उच्च दर्जाचे आहे. ती गाणी आजही ताजी टवटवीत वाटतात. या सगळ्या गोष्टींचा मनोरम धांडोळा खास स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने घेतला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद अली यांच्याबद्दलची आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती लेखिकेने दिली आहे. लिहिण्याची शैली तर एवढी ओघवती आहे की वाचक उत्सुकतेने पुढे पुढे वाचत जातो.

आधी श्वेतधवल असलेला हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेने नंतर नवरंगात न्हाऊन आला. त्याचप्रमाणे त्याचे रंगमंचीय सादरीकरण देखील झाले. त्या चित्रपटाची ही सगळी रूपे लेखिकेला अपार भावली. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या के. आसिफ यांच्या जीवन चरित्रावर लेखिकेने टाकलेला प्रकाशझोत आणि चित्रपटाला आर्थिक सहाय्य करणारे शापूरजी पालोनजी यांच्या बद्दलची माहिती आपल्याला चित्रपट कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत करते.

त्याचप्रमाणे या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयासाठी अमर झालेले पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, निगार सुलताना, इत्यादी कलाकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल लेखिकेने फार रोचक शब्दात माहिती दिली आहे. त्यांचे जीवनातील फारसे कोणाला माहीत नसलेले हृद्य प्रसंग सांगितले आहेत. 

या चित्रपटातील संवादांचे सौंदर्य लेखिकेने चित्रपटातील प्रत्यक्ष संवाद देऊन वाचकांच्या नजरेस आणले आहे. त्यामुळे चित्रपटातील कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या चित्रपटाशी संबंधित छोटे-मोठे कलाकार, तंत्रज्ञ, त्यासाठी प्राणपणाने मेहनत करणारी सगळी माणसे या सगळ्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही छोटीशी माहिती देखील दुर्लक्षित होणार नाही याची काळजी हे पुस्तक लिहिताना लेखिकेने घेतलेली दिसते. त्यामुळेच चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे मस्ट रीड असे आहे. 

एकदा हातात घेतल्यानंतर हे पुस्तक सोडवत नाही. लेखन, भाषाशैली, चित्रे, छपाई या सर्व दृष्टीने पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे. केवळ चित्रपट रसिकांसाठीच नव्हे तर साहित्य आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रांतातील सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

अशा या सुंदर पुस्तकासाठी मी लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव आणि प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हे पुस्तक वाचकांना नक्कीच एक चांगले पुस्तक वाचल्याची अनुभूती देईल अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.

परिचय : श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव,  मो. ९४०३७४९९३२

– – (पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सऍप नंबर वर संपर्क साधावा.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गाथा कोकणच्या सागरदुर्गांची

लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर 

पृष्ठे: ३८१

मूल्य: ६००₹ 

कोकणचा भूभाग प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा राहिला आहे. दमण-डहाणूपासून ते गोवा-कारवारपर्यंत हा भूभाग निखळ मराठी भाषिक आहे. कित्येक शतकांपूर्वीपासून या प्रदेशातील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावीत आहेत. इथल्या खाड्या एकेकाळी खूप आतवर जहाजांच्या वावरास उपयुक्त ठरल्या होत्या. पण या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथल्या सागरदुर्गांनी बजावलेली दिसते.

कुलाबा,  खांदेरी,  पद्मदुर्ग,  जंजिरा,  सुवर्णदुर्ग,  सिंधुदुर्ग,  अंजदीव हे सागरबेटांवरील जलदुर्ग किंवा पाणकोट जसे कोकणात आढळतात,  तसेच आफ्रिकन सिद्दींनी उभारलेले उंदेरी (जयदुर्ग) आणि जंजिरा (जझीरे मेहरूब) किंवा उत्तर फिरंगाणातील केळवे-माहीमचे किल्ले,  तसेच दक्षिणेस गोव्यातील आग्वाद,  गास्परदियश,  रेईसमागोस,  खोलगड उर्फ काब-द-राम असे अनेक किल्ले पोर्तुगीजांनी बांधून घेतले. त्यातही रेवदंडा आणि वसई यांची दुर्गबांधणी खूप वेगळ्या त-हेची आहे.

हे पुस्तक लिहिताना लेखकाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे… 

कोकणचे किल्ले पाहावयाचे ते ह्यासाठी. आपण का? कसं? कोणासाठी अन् कशासाठी जगायचं? ह्याचा अर्थ या जलदुर्गांच्या सहवासात कळतो. जळणारं मन,  उघडे डोळे अन् चालणारे पाय असतील तर हे सारं नीट कळतं आणि मग अशा जागी गेलं की,  आपले आपण हरवून जातो. सागराची गाज आपल्याला शिवरायांच्या कल्पनेतील झेप अन् मनसुब्यातील फेक सांगू लागते. इथल्या दुर्गाची ढासळणारी तटबंदी शिवस्पर्शाची कहाणी सांगू लागते. तसं झालं की,  अशा किल्ल्यांवर कधीमधी दिसणाऱ्या पुंड तरुणांच्या शहरी टोळक्यांची नाच-गाणी,  हावभाव यांची कीव येते. “देवा,  त्यांना क्षमा कर… ” असं वाक्य आपल्याही तोंडी येतं.

हे किल्ले पाहताना आपला गौरवशाली इतिहास आपल्याला स्मरणार नसेल,  तर हे किल्ले पाहायला जायचंच कशाला? तिथं गेल्याचा ‘पराक्रम’ अजरामर करण्यासाठी खडू,  कोळसा,  विटकर,  चुना आणि तैलरंग अशा गोष्टींचा उपयोग करून घाणेरड्या अक्षरात आपली नावं कोरून ठेवण्याचा उपक्रम करताना आपल्याला स्मरलं पाहिजे की,  आपल्या पूर्वजांनी घाम गाळून अन् रक्त सांडून हे दुर्ग उभारले अन् प्राणपणाने जपले,  पण त्यांपैकी एकानंही आपलं नाव नाही कुठे कोरून ठेवलं. इथं आल्यावर इथल्या वास्तू,  इथली प्रेक्षणीय ठिकाणं,  पूजनीय स्थानं,  इथली माणसं या सर्वांची जाण आपण राखली पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. कारण या देशाचा हा वैभवशाली इतिहास आपला आहे.

या किल्ल्यांवर लोकांनी यावं,  डोळे भरून ही दुर्गरत्नं पाहावीत. शिवरायांनी ही दुर्गपुष्पे समृद्ध रत्नाकराच्या अन् तात सह्याद्रीच्या माथी वाहून केलेली शौर्यपूजा पाहावी,  असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इये मुलखी हिंडणाऱ्यांचे चार गट प्रामुख्याने मला आढळतात. शिवरायांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत श्रद्धेने या गडकोट,  किल्ले अन् दुर्गावर मनापासून प्रेम करणारे,  हा झाला पहिला वर्ग. पाठपिशवी लटकावून ट्रेकिंग -रॉकक्लाइंबिंग करणारे अन् हिमालयात जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सह्याद्रीत हिंडणारे,  हा दुसरा वर्ग. ह्या भागातील पशू -पक्षी -वनस्पती,  भूरचना अशा निसर्गविशेषांचा अभ्यास करण्यासाठी हिंडणाऱ्यांचा तिसरा गट,  केवळ गंमत म्हणून केव्हातरी-कसंतरी-कारणपरत्वे बाहेर पडणाऱ्यांचा चौथा गट. पण हे किल्ले डोळसपणे पाहावेत,  त्यांचं महत्त्व जाणून घ्यावं,  तेथे घडलेला इतिहास समजून घ्यावा; तेथील निसर्गविशेषही परिचयाचा असावा,  असं सर्वसमावेशक असणं,  मला अपेक्षित आहे. पैकी गिर्यारोहण प्रेमींचा कोणत्याही किल्ल्यावर नव्या सुखसोयी,  रस्ते,  विजेचे दिवे,  राहण्याजेवणाची सोय करण्यास सामान्यतः विरोध असतो. या ठिकाणांची दुर्गमता,  निर्मनुष्यपणा,  अडचणी तशाच राहाव्यात असा यांचा आग्रह असतो. पण आश्चर्य असं की, सर्व सुविधा तिथे उपलब्ध झाल्या,  तर त्यांचा लाभही ही मंडळी घेतातच.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ५-१५ किल्ल्यांवर लोकांनी जावं,  तिथला इतिहास स्मरावा; वृद्ध, लहान मुलं,  माता, भगिनी, आजारी, अपंग अशा सर्वांना तिथं जाणं सुकर असावं,  त्यांना तिथं व्यवस्थित राहता यावं,  असं मला नेहमी वाटतं. कारण इथे आपला इतिहास घडला आहे. अवघड वाटा,  दुष्कर मार्ग,  मानवी संपर्कापासून दूर जावं असं ज्या ट्रेकर्सना वाटतं,  त्यांना हिंडायला या दुर्गांच्या देशात अनेक ठिकाणं आहेत. मात्र या साऱ्या सोयींच्या पाठोपाठ येऊ शकणारा बकालपणा टाळणं हे फक्त तिथे जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच हाती आहे. तेवढं सांभाळलं जावं असं आवर्जून वाटतं.

– – – 

अशा ७८ किल्ल्यांची नकाशांसह माहिती प्रसिद्ध दुर्गअभ्यासक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी या पुस्तकात दिली आहे. ती सर्वांनाच निश्चितपणे उपयुक्त ठरेल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)” – लेखकगण  : मिराया पटवर्धन / चित्रा गोडबोले / भूषण पटवर्धन ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)” – लेखकगण  : मिराया पटवर्धन / चित्रा गोडबोले / भूषण पटवर्धन ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आयुर्वेद फॉर किड्स (मराठी)

लेखक गण : मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन

पृष्ठ: १०८ A4 size

मूल्य: ४९९₹ 

आयुर्वेद फॉर किड्स (मराठी) हे लहान मुलांना आयुर्वेदाची ओळख करून देणारे अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन यांनी हे पुस्तक मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून तयार केले आहे.

या पुस्तकात आयुर्वेदातील मूलभूत संकल्पना – शरीराची काळजी, आहाराचे महत्त्व, ऋतूनुसार सवयी, आणि नैसर्गिक पद्धतीने आरोग्य टिकवण्याचे मार्ग – गोष्टीसारख्या शैलीत मांडले आहेत. पुस्तकातील पात्रे आणि रंगीत चित्रे मुलांच्या कुतूहलाला चालना देतात आणि त्यांना आरोग्याबद्दल जागरूक बनवतात.

विशेष म्हणजे, मिराया, चित्रा आणि आबा यांच्या संवादातून मुलांना आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान सहज समजते. त्यामुळे हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून मुलांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देणारे ठरते.

वैशिष्ट्ये :

  • मुलांसाठी सोपी व मनोरंजक भाषा
  • आकर्षक आणि रंगीत चित्रे
  • आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख
  • आरोग्यदायी सवयींचे मार्गदर्शन

– – एकूणच, आयुर्वेद फॉर किड्स हे पुस्तक मुलांना लहानपणापासूनच आरोग्य, आहार आणि निसर्गाशी जोडणारे ज्ञान देणारे उपयुक्त व प्रेरणादायी वाचनीय पुस्तक आहे. आणि फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही अनेक बाबतीत या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग करून घेता येऊ शकेल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

“हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते–स्वामी विवेकानंद 

– – संन्यासी योद्ध्याची जीवनगाथा

लेखिका : सौ. अंजली गोखले.

 संपर्क: ८४८२९३९०११

प्रकाशक : विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग पुणे.

संपर्क: ०२०-२४४३२३४२

पृष्ठे. : ३५६

मूल्य. : रु. ४००/-

स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे, श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य, ज्यांनी हिंदू धर्म व हिंदुस्थानची ध्वजा जगात फडकवली… बस्स ! बहुतांश लोकांना स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. खरे ना ? पण प्रत्यक्षात स्वामीजींचे व्यक्तीमत्व असे होते की ज्याला अष्टपैलू हा शब्दही तोकडा पडेल. कसे होते स्वामीजी नेमके ? त्यांच्या कार्याचा आवाका केवढा होता ? धर्माविषयी त्यांची मते किती स्पष्ट आणि ठाम होती ? अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांना त्यांची भुरळ पडावी असे त्यांच्यात काय होते ? वेद आणि विज्ञान यावरील त्यांचे प्रभुत्व, धर्म आणि देशातील दरिद्रीनारायण यांच्याविषयी त्यांची असलेली मते, विचार आणि प्रत्यक्ष आचार यांचा त्यांनी साधलेला मेळ, युवक आणि शिक्षणपद्धती, उपासना आणि धर्माचरण, आत्मोन्नती आणि समाजोन्नती, त्या काळातील भारतीय महिलांची असलेली अवस्था,… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मिरज येथील सौ. अंजली गोखले लिखित..

अंजली गोखले 

हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते… स्वामी विवेकानंद ‘ हे चरित्र एकदा तरी वाचावे.

एका असामान्य व्यक्तीमत्वाचे जीवन आणि कार्य अत्यंत साध्या, सोप्या भाषेत त्यांनी समजावून दिले आहे. स्वामीजींच्या बालपणापासून ते समाधीस्थ होण्याच्या दिवसापर्यंतचा विशाल कालपट त्यांनी अठ्ठावीस प्रकरणांमधून वाचकांसमोर मांडला आहे. स्वामीजींचे बालपण, तारुण्याच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनातील प्रवेश, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांची होणारी भेट, या भेटीनंतर पुन्हा पुन्हा भेट घेण्याची लागलेली ओढ लेखिकेने अत्यंत सुलभपणे रंगवून सांगितले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिल्यामुळे वाचकाला त्यांच्याविषयी दुर्मिळ अशी माहिती मिळते. पुढील काळात स्वामीजींच्या कुटुंबावर आलेली संकटे, व्यवहारातील चटके आणि त्यातून गुरुकृपेने बाहेर पडण्याचा उपलब्ध झालेला मार्ग याचे वर्णन येते.

आपल्या गुरूंच्या सहवासात स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कशी ठरली हे या सर्व लेखनातून स्पष्ट होते. आपल्या पुढील कार्याचा एक भाग म्हणून स्वामीजींनी केलेली संपूर्ण देशाची पदयात्रा, त्यांचा पहिला परदेश प्रवास, त्यानंतर शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण, या ध्येयापर्यंत पोहचताना आलेल्या अनंत अडचणी, गुरुकृपेने त्यातून बाहेर पडण्याचा मिळालेला मार्ग, त्यांचे अमेरिकेतील कार्य या सर्व घटना लेखिकेने अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर मांडल्या आहेत. स्वामीजींचे पुन्हा एकदा अमेरिकेला जाणे, त्यांचे इंग्लंडमधील दोन दौरे, तसेच अन्य युरोपीय देशांमधील दौरे, त्यांची व्याख्याने, वेदांत प्रसार, वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी चाललेला आटोकाट प्रयत्न, पश्चिमात्य राष्ट्रांची श्रीमंती आणि भारतातील दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात चाललेला वैचारिक कोलाहल, रामकृष्ण मिशनची स्थापना, मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्यासारख्या शिष्योत्तमेचा झालेला लाभ, मातृभूमीला परतल्यानंतर झालेले स्वागत, सभा, व्याख्याने, जगभरातील अनेक नामवंत विचारवंत, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, धनाढ्य यांच्याशी सर्व विषयावर झालेली चर्चा या सर्व बाबी अत्यंत सूक्ष्मपणे लेखिकेने नमूद केलेल्या आहेत.

समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व, त्यांचा मनोनिग्रह, त्यांची ध्येयपूर्तीची आस, या सर्वावर विविध व्याधीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती व त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वामी आपल्या अंतिम ध्येयाकडे कशी वाटचाल करत होते याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते. अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे जाऊनही, वैयक्तिक बदनामी सहन करूनही, मनाचा तोल न ढळू देता एक संन्यस्त जीवन प्रवासी कशा प्रकारे मार्गक्रमण करत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी !

त्यांच्या अलौकिक, असामान्य, अतुलनीय आणि अविश्वसनीय अशा कार्याचा आढावा घेताना लेखिकेने अनेक लहान-मोठे प्रसंग, भावनिक प्रसंग, स्वामीजींना भेटलेली लहान मोठी माणसे, त्यांच्याशी झालेले संवाद, मतभेद या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे स्वामीजींचे कार्य अगदी सहजासहजी पार पडले असे कोणाला वाटत असेल तर ते किती चुकीचे आहे हे समजून येते. स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.

शेवटच्या एका प्रकरणात त्यांनी स्वामीजींच्या काही ह्रद्य आठवणी कथन केल्या आहेत. त्यातून विविध लोकांची त्यांच्याविषयी असलेली मते वाचायला मिळतात. स्वामीजी चार वेळेला महाराष्ट्रात येऊन गेले होते. लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांची व स्वामीजींची झालेली भेट, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण, स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन हे सर्व मराठी मनाला रंजक आणि स्फूर्तीदायक वाटणारे आहे.

परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस, माता सारदा देवी, भगिनी निवेदिता आणि श्री. गुडवीन यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात काय स्थान होते हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येते. गुडविन हे नसते तर स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल असते का ? त्यामुळे ते कोण होते हे जाणून घ्यायलाच हवे. प्रा. रोमा रोलॉनी स्वामीजींचे वर्णन ” विश्वात्म्याच्या वाद्यवृंदाने सादर केलेले उत्कृष्ट संगीत ” या शब्दात का करतात हे समजून घेतले पाहिजे.

स्वामीजींच्या पश्चात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्र या संस्थेचीही निर्मिती करण्यात आली. या विवेकानंद केंद्राचा परिचय व केंद्राचे महाराष्ट्रातील प्रकल्प याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

विवेकानंदांचे व्यक्तीमत्व ‘इंद्रधनुष्यी ‘ होते असे लेखिकेने म्हटले आहे. या इंद्रधनुष्याचे सर्व रंग खुलवून दाखवणे हे खूपच अवघड काम आहे. परंतु लेखिकेच्या लेखणीने हे आव्हान पेलले आहे. अवघ्या साडेएकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यातील एक एक दिवस किती मोलाचा होता, आव्हाने आणि प्रतिकुलता यामुळे स्वामीजींना काय काय सहन करावे लागले, परंतु आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस व काली माता यांच्यावरील अगाध श्रद्धेमुळे झालेली ध्येयपूर्ती… हे सर्व वाचताना, स्वामीजी म्हणजे एक दैवी चमत्कारच होते याची खात्री पटते. या चमत्काराला शब्दबद्ध करुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम सौ. अंजली गोखले यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. स्वामीजींचे हे जीवन चरित्र म्हणजे त्यातील मानाचा तुरा आहे. असेच बहुमूल्य लेखन भविष्यातही त्यांच्याकडून व्हावे ही सदिच्छा.!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ज्ञानाई” – लेखिका : मंजुश्री गोखले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञानाई” – लेखिका : मंजुश्री गोखले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ज्ञानाई

लेखिका : मंजुश्री गोखले

पृष्ठ: ५५१ मोठा आकार 

मूल्य: ९९९₹ 

मराठी संतसाहित्यातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ संतकवी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर ओवीबद्ध भाष्य म्हणून लिहिला. परंतु आजच्या वाचकांसाठी मूळ ओवींचा अर्थ समजणे अनेकदा कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीतील विचार सोप्या, आधुनिक आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न “ज्ञानाई” या पुस्तकातून करण्यात आला आहे.

या पुस्तकात लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ तत्त्वज्ञान साध्या आणि प्रवाही भाषेत उलगडले आहे. प्रत्येक अध्यायातील प्रमुख विचार, अध्यात्मिक संदेश आणि जीवनाला दिशा देणारे तत्त्व स्पष्टपणे मांडले आहेत. त्यामुळे वाचकाला मूळ ग्रंथाचा सार सहज समजतो.

पुस्तकाची भाषा अत्यंत सोप्या मराठीत, ओघवती आणि भावपूर्ण आहे. धर्म, अध्यात्म आणि जीवनमूल्ये यांची सांगड घालताना लेखिका वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. विशेष म्हणजे, हा ग्रंथ केवळ धार्मिक न राहता व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनदृष्टी घडवणारा ठरतो.

पुस्तकाची वैशिष्ट्ये :

– – ज्ञानेश्वरीचा सोपा आणि समजण्याजोगा अनुवाद

– – अध्यात्मिक विचारांचे आधुनिक संदर्भात स्पष्टीकरण

— – विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त

– – मराठी संतसाहित्य समजून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक

संत ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतल्यावर मन प्रेमादराने भरून जाते. कोवळ्या वयात समाजाकडून होत असलेले आघात सोसत असतानाही त्याच समाजाच्या उत्थानासाठी झटणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील आपली असामान्य उंची बाजूला सारत अठरापगड जातीतील संतांना आपलेसे करीत वारकरी संप्रदायाला वेगळे वळण देणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील समानतेचा पुरस्कार करणारे आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी अक्षर साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेला आणि भाषकांना उपकृत करणारे संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांची माउली न होते, तरच नवल! त्यांनी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत केलेला रसाळ अनुवाद म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी! काळाच्या ओघात तत्कालीन मराठी भाषा आजच्या काळात दुर्बोध वाटू लागली आहे. हे जाणवून ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आजच्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने केलेला ओवीबद्ध अनुवाद म्हणजे ‘ज्ञानाई’ हा ग्रंथ!

लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ विचार सरळ आणि सुबोध भाषेत उलगडले आहेत.

संत साहित्याची खरी गोडी अनुभवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

“ज्ञानाई” हे पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विशाल तत्त्वज्ञानाचे सोपे, सुगम आणि जीवनस्पर्शी रूप आहे. ज्यांना संत साहित्याची आवड आहे किंवा ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते.

– – आजच आपल्या संग्रहात जोडा.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन 

लेखक : थॉमस एम. स्टर्नर

मूल्य: २५०₹ 

मन भटकतंय? लक्ष लागत नाही? काम अर्धवट राहतात?

– – यश मिळत नाही कारण मेहनत कमी आहे… असं नाही!

खरं कारण आहे — सरावाची चुकीची मानसिकता.

द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक यश, एकाग्रता आणि कौशल्य विकास यामागील सर्वात महत्त्वाचा घटक — सातत्यपूर्ण सराव (Practice) — यावर आधारित आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे ताण, अधीरता आणि अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलो, तर यश आपोआप मिळते.

हे पुस्तक “परिणामाऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या” हा साधा पण प्रभावी जीवनमंत्र शिकवते.

मुख्य संकल्पना

Present Moment Awareness — वर्तमान क्षणात काम करण्याची सवय.

Process over Result — परिणामापेक्षा सराव महत्त्वाचा.

Patience Development — संयम ही शिकता येणारी कौशल्य आहे.

Mental Discipline — मनाला प्रशिक्षित करता येते.

Small Consistent Steps — छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठं यश.

पुस्तकाची वैशिष्ट्ये  

– – भाषा अतिशय सोपी व समजण्यासारखी.

– – दैनंदिन जीवनातील उदाहरणांमुळे संकल्पना लगेच समजतात.

– – विद्यार्थ्यांपासून कलाकार, खेळाडू, व्यावसायिक — सर्वांसाठी उपयुक्त.

– – आत्मविकासाकडे शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन.

हे पुस्तक “Hard Work” पेक्षा “Right Mindset” कसं महत्त्वाचं आहे हे शिकवतं. यश हे एका मोठ्या उडीने नाही तर दररोजच्या छोट्या सरावातून तयार होतं — ही जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते.

– – स्वतःला घडवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आणि राजू झाला बिझिनेसमन

– – नोकरीपेक्षा व्यवसाय करा!

लेखक : सुरेश हावरे

पृष्ठ: १९६

मूल्य: १९९₹ 

“उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा ” या बेस्टसेलरच्या लेखकाचे नवे पुस्तक!

– – – प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडतील असे यशस्वी उद्योजकाचे अनुभवाचे बोल

हळूहळू मराठी तरुण उद्योग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत… अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंन मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत… जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत.

या पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितल आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या ‘मार्केट्स’ची ओळखअसलेल्या ‘मार्केट्स’ची ओळख करून देतात.

उद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात…

उद्योग का करावा?

कर्ज घेण्यातील बारकावे

उद्योगाची भाषा

नेटवर्किंग

बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र

निर्णय प्रक्रिया

व्यवसायातील चढउतार…

आणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी ‘बिझनेसमन’!

उद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक

… आणि राजू झाला बिझनेसमन!

या पुस्तकात 

उद्योगच करावा! पण का?

उद्योगच करावा! पण कसा?

उद्योगच करावा! पण कशासाठी?

– – या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares