मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ध्यास वंदे मातरम् चा” – लेखक : श्री मिलिंद प्र. सबनीस – परिचय : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ध्यास वंदे मातरम् चा” – लेखक : श्री मिलिंद प्र. सबनीस – परिचय : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन

लेखिका : सुनीला सोवनी 

पृष्ठ: ३९८

मूल्य: ३५०₹ 

७) पुस्तकावर बोलू काही

“ ध्यास वंदे मातरम् चा “ लेखक : मिलिंद प्र. सबनीस परिचय : प्रवीण दवणे प्रस्तुती : हर्षल भानुशाली

 

पुस्तक : ध्यास वन्दे मातरम् चा 

लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस

पृष्ठे: १६०

मूल्य: २३०₹

– – एका अमर राष्ट्रगीताची दीडशेवी वर्षपूर्ती होत आहे. त्या निमित्ताने…

वन्दे मातरम् हे शब्द शालेय जीवनात रोजच शाळा सुटताना उच्चारत असलो, तरी त्याबद्दलची फारशी माहिती आजही सर्वसामान्यांना नाही. शालेय विद्यार्थ्यांना तर बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, एवढीही माहिती फार कमी प्रमाणात असते.

अमरेंद्र गाडगीळ हे त्या काळातील बालकुमारांसाठी संस्कारक्षम आशयाच्या कथा लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधक, अभ्यासक अशा कोशकाराचा होता. अमरेंद्र गाडगीळ हे ‘वन्दे मातरम्’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहिणारे पहिले लेखक. १९७३च्या सुमारास मराठीत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीसह आणखी काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात या पुस्तकातील काही भागावर सरकारी यंत्रणेकडून आक्षेप घेण्यात आला. आणीबाणीच्या आसपास सरकारनं सुचवलेला भाग वगळून या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झाली तरी आणीबाणी उठल्यानंतरच्या काळातल्या सर्व आवृत्त्या मात्र मूळ मजकुरासह प्रकाशित झाल्या व पुढे हे पुस्तक अधिकच लोकप्रिय झालं. पुस्तक पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं छोटं असलं तरी आशयात्मकदृष्ट्या मोठं होतं. वन्देमातरम् विषयी अधिक उत्कंठा निर्माण करण्याचं सामर्थ्य अमरेंद्रांच्या शब्दांत होतं.

राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचा ध्यास लेखकाला कसा जडला, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे.

ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते.

परिचय : श्री. प्रवीण दवणे (ज्येष्ठ साहित्यिक)

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माणूस आणि मन” – लेखिका : डॉ. संयोगिता नाडकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“माणूस आणि मन” – लेखिका : डॉ. संयोगिता नाडकर्णी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : माणूस आणि मन  

 – – माणसाची दृष्टी आणि मनाचा कोन

लेखिका: डॉ. संयोगिता नाडकर्णी

पृष्ठ: २६४

मूल्य: ३९९₹

माझं चुकतंय का?

हा अहंकार आहे का?

माझी चूक नसताना मी का ऐकून घेऊ?

मला नाही जमत, काय करू?

शेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना!

रागावल्याशिवाय कामं होत नाहीत.

यांना धडा शिकवल्याशिवाय कळणार नाही

मीच नेहमी का सहन करायचं?

होत कसं नाही… झालंच पाहिजे!

लोक काय म्हणतील?

मला काही फरक पडत नाही!

– – मी मी आणि मी! मीला सावरता येत नाही आणि आवरताही येत नाही… मीचं काही करता येत नाही, पण मीचं कोडं सुटलशिवाय पुढं जाताही येत नाही!

.. कोडं सुटणार कसं? मी कळला, तर कोडं सुटेल. मी कळेल कसा? मी कळवून घेण्यासाठीच हा पुस्तक प्रपंच! पण ‘प्रपंच’ म्हटल्याने घाबरून जाऊ नका. तो आपल्या मनाच्या गुंत्याइतका अवघड नाही. उलट गुंता सोपा करणारा आहे.

किचकट संज्ञा आणि कठीण आकृत्या म्हणजे मन नाही… आपलं वागणं म्हणजे आपलं मन! आपल्यासारखी वागणारी, विचार करणारी आणि रागावणारीसुद्धा माणसं आपल्याला या पुस्तकात भेटतील… अगदी आपण आपल्यालाच भेटू तशी!

– – आणि ती तशी का वागतात… खरंच ती मुळातून (की आपण) भित्री, चिडकी, बेरड, लबाड, नीरस असतात का? पृथ्वीच्या पोटाप्रमाणे मनाच्याही पोटात स्वभावाची काही रहस्यं दडली आहेत का? आणि असतील, तर ती सोडवायची कशी?

– – – या सगळ्या आणि याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्वत:ला समजून घेण्याचे साधे-सोपे मार्ग आपल्याला या पुस्तकात भेटतील.

ते आपल्याला चूक-बरोबर ठरवणारे नाहीत; उलट मित्रासारखे मन हलकं करणारे आहेत.

‘A simple, relatable guide to understanding your mind, emotions, and ego. Discover why you react the way you do—and learn to befriend yourself with compassion.’ 

जे कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे, ‘Understanding is the beginning of change‘ 

अर्थात – ‘समजणं’ हीच बदलाची सुरुवात आहे.

आपल्याला कित्येकदा स्वतःत बदल हवा असतो, पण त्याचा मार्ग खूप वेळा माहीत नसतो. ‘काहीतरी चुकतंय’ किंवा ‘काहीतरी वेगळं हवंय’ अशी फक्त आपल्याला जाणीव असते. ह्या जाणिवेतून मानसशास्त्राचा जन्म होतो. मात्र मन समजायला तसं सोपं नाही. म्हणून मानसशास्त्र कित्येकदा क्लिष्ट वाटतं. त्यात शब्दांची गुंतागुंत दिसते. म्हणून इंटरनेटवरची एखादी संज्ञा समजून घेताना आपण अनेकदा गोंधळून जातो.

या गोंधळातून वाट काढून ‘मनाचं’ शास्त्र उलगडून दाखवणं, हा ह्या पुस्तकाचा हेतू आहे. त्यामुळे त्यात अनेक उदाहरणं आहेत. ह्या उदाहरणांशी जोडून घेऊन वाचकाला त्याचं किंवा इतरांचं मन समजायला जास्त सोपं जाईल.

‘आजकाल ‘संवाद’ बिघडत चालला आहे’ असं आपण म्हणतो. पण ‘संवाद’ सुद्धा मनातूनच येतो. ‘सांगणं’ आणि ‘ऐकणं’ यांमधून संवाद तयार होतो. सांगण्यापेक्षासुद्धा अधिक ऐकण्यातून संवाद मूळ धरतो. ‘ऐकायला’ मनाची तयारी लागते. ‘ऐकणारा’ जेव्हा ‘बोलणाऱ्या’च्या भूमिकेतून पाहू लागतो, तेव्हा ‘संवाद’ला आकार यायला लागतो.

मन आपल्या प्रत्येक कृतीवर प्रभाव टाकतं. त्यामुळे कुठल्याही बदलाची वाट ‘मना’तूनच जाते. मनाच्या या ‘वाटा’ समजाव्यात, म्हणून पुस्तकात वेगवेगळी ‘तंत्र’ दिलेली आहेत. ही ‘तंत्र’ तुम्हाला व्यवहारात नक्कीच मदत करतील; पण नुसत्या ‘तंत्रां’नी माणसाची मानसिक प्रगती होणार नाही. त्या ‘तंत्रां’ची पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. म्हणून हे पुस्तक ‘व्यक्तिमत्त्व विकास’ किंवा ‘जीवनाची गुरुकिल्ली’ यासाठी उपयोगी पडेलच, पण त्याहून अधिक स्वतःला “समजून” घेण्यासाठी ते दृष्टिकोन देईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आनंदयात्री रवींद्रनाथ” – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय –  डॉ. मीना श्रीवास्तव ☆

डॉ. मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आनंदयात्री रवींद्रनाथ” – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय –  डॉ. मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – आनंदयात्री रवींद्रनाथ 

लेखक – विश्वास देशपांडे

प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे

पृष्ठसंख्या – २१० पाने

पुस्तकाचे मूल्य – ३०० रुपये

‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ हे जेष्ठ साहित्यिक श्री विश्वास देशपांडे लिखित नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. या आधीही ललित लेखांवर आधारित अनेक पुस्तकांत, विशेषतः ‘अष्टदीप’ या पुस्तकात लेखकाने विविध व्यक्तिरेखांना अतिशय सुरेखरित्या शब्द्बबद्ध केले होते. ते वर्णन कांही पानांपुरतेच मर्यादित असे. मात्र या ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ चा पोतच निराळा! कारण बंगालचे सुपुत्र कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, रवींद्रसंगीताचे प्रणेते, गायक, नृत्यकार, शिक्षक, तत्वज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते आणि ‘जन गण मन’ या आपल्या राष्ट्रगीताचे तसेच बांगला देशाच्या राष्ट्रगीताचे लेखक, थोर राष्ट्रभक्त असे रवींद्रनाथ टागोर अथवा विश्ववंदित खरेखुरे १ नंबरी विश्वगुरू ‘कवींद्रनाथ’ हे या चरित्रलेखनाचे महानायक आहेत!

बंगालच्या उपसागराच्या साक्षीने या बालरवीचे एका तेजोनिधी लोहगोलात जेव्हा रूपांतर झाले, तेव्हा ते तेज त्यांच्या पैतृक जोराशंको वाडीत मावेनासे झाले आणि अखिल भूमंडळाला वेधते झाले. त्यांच्या गगनभेदी कर्तृत्वाचे मोजमाप त्यांना प्राप्त झालेल्या अगणित पुरस्कारांनी तर सोडाच, अगदी प्रतिष्ठित नोबेल पुरस्काराने देखील करता येणार नाही! गुरुदेवांच्या कॅलिडोस्कोपसम व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दर्शवणे म्हणजे रविकिरणांच्या सोनेरी गर्भरेशमी जाळीला आपल्या ओंजळीत पकडून त्यांचे इंद्रधनुषी रंग वाचकांना दर्शवणे झाले. त्यांच्या विशालकाय साहित्यनिर्मितीची गगनभरारी अक्षरशः अवाक करणारी आहे! ‘गीतांजली’तील आणि ‘सहजपाठ’ या प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांसाठी त्यांनी रचलेल्या सहजसुंदर कविता, ‘काबुलीवाला’ सारख्या भावपूर्ण कथा, आधुनिक महाकाव्याचा दर्जा लाभलेली ‘गोरा’ ही दीर्घ कादंबरी, ‘रक्तकरबी’ हे अलौकिक प्रतीकात्मक नाटक, या आणि अशाच अनेक लक्षवेधी सृजनशील साहित्यकृतींची निव्वळ माहिती न सांगता त्यांचे लेखकाद्वारे रसिक मनोवृत्तीने केलेले विश्लेषण आपल्याला निव्वळ मोहून टाकत नाही तर त्या समग्र साहित्यकृती (मूळ बंगाली नाही तर किमान आपल्याला येणाऱ्या भाषानुवादात) वाचण्यास प्रवृत्त करते हे निश्चित! या अनुभवास कारणीभूत आहे देशपांडे सरांची ओघवती व प्रतिभासंपन्न लेखन शैली.

लेखकाने रवींद्रनाथांच्या संपर्कात आलेल्या लोकांतील महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन इत्यादींच्या सानिध्याचे देखील मनोरम वर्णन केलंय. त्याचबरोबर गुरुदेवांचा जन्म आणि मृत्य पाहिलेली कोलकत्ता येथील प्रसिद्ध जोराशंको वाडी, शांतिनिकेतन, श्री निकेतन, विश्वभारती, पद्मावती नदीतील त्यांच्या मुक्कामाची पद्मा बोट, यासारख्या निर्जीव वस्तू आणि वास्तूत देशपांडे सरांनी प्राण फुंकले आहेत असा भास होतो. त्यांच्याद्वारे निर्मित स्थावर त्रिमूर्ती म्हणजे शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती या तिन्ही परममंगल वास्तू गुरुदेवांच्या सत्य, शिव आणि सुंदर संकल्पनेचे प्रारूप जणू! लेखकाच्या सहज, सोप्या व निरामय भाषासौंदर्याने नटलेल्या वर्णनशैलीद्वारे या कर्ममंदिरांची आपल्याला या पुस्तकाद्वारे सफर घडते. त्यावरून आपल्या लक्षात येते की या निर्जीव वास्तू नव्हेत तर गुरुदेवांच्या परिसस्पर्शाने पुनीत झालेल्या साहित्य, कला, नवनिर्मिती, संशोधन आणि मानवाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या निरंतर कार्यमग्न असणाऱ्या अलौकिक प्रयोगशाळाच आहेत. लेखकाचे एक सुंदर वाक्य गुरुदेवांचे विचार प्रकट करते. “दौत आणि औत हे हातात हात घालून चालावेत”. अशा अत्युत्कृष्ट अर्थपूर्ण भाषासौंदर्याशी आपली या पुस्तकात कैकवेळा गाठ पडते! मंडळी, हे पुस्तक वाचल्यावर आपण जणू या ‘रवि’किरणांच्या तेजोमय प्रकाशात नखशिखांत न्हाऊन निघतो.

या चरित्रात वर्णित रवींद्रनाथांच्या सर्वसमावेशक कर्तृत्वाचा अफाट आवाका आपल्याला विस्मयचकित करतो. मोजकीच उदाहरणे बघा! वयाच्या केवळ बाराव्या वर्षी शेक्सपियरच्या ‘मॅकबेथ’चे भाषांतर, १८ व्या वर्षी ‘वाल्मिकी प्रतिभा’ या नाटकाचे लेखन, सादरीकरण, संगीत-नृत्य निर्देशन आणि अभिनय, २५०० पेक्षा अधिक कविता, ५० हून अधिक नाटके, पत्रांचे १२ खंड, हे आणि इतर लेखन! त्यांची ‘कालमृगया’ आणि ‘चित्रांगदा’ ही सुप्रसिद्ध नाटके पौराणिक कथांवर आधारित होती, पण त्यांना गुरुदेवांचा मिडास टच आणि त्यांची सृजनात्मक नवनिर्मिती लाभल्याने ही नाटके अजरामर झाली. या अवलियाचे हे बहुउद्देशीय कलाप्रेम कमी होते म्हणून की काय, पासष्टी ओलांडलेल्या चित्रकार रवींद्रनाथांच्या जीवनातील आणखी एक कलादालन लेखकाने वाचकांसाठी खुले केलेले आहे. २००० पेक्षा अधिक अनवट चित्रे रेखाटणारी ही ऋषितुल्य व्यक्ती! कित्येक देशात त्यांची चित्रप्रदर्शने लागतात काय आणि रसिक चित्रप्रेमी त्यांची अभिनव चित्रे विकत घेतात काय! आपल्यासाठी सगळेच अगम्य म्हणायचे. निसर्गचित्रे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनर्चित्रण, यासारख्या रवींद्रनाथांनी स्पर्श केलेल्या या श्रीमंत चित्रकलेचे अतिशय तरल आणि संवेदनशील वर्णन देशपांडे सरांसारखा भावनाशील लेखकच करू जाणे. रवींद्रनाथ बंगाल प्रांताच्या कणाकणाला व्यापून दशांगुळे उरतातच, म्हणूनच त्यांचे सर्वसमावेशक प्रगल्भ विचार अवघ्या सीमा ओलांडून बंगालच्या सीमा ओलांडून वैश्विक होतात. बघा ना! परदेशात त्यांच्या प्रशंसकांना दिलेल्या स्वाक्षऱ्यांसोबत त्यांनी लिहिलेल्या चारदोन उर्जावान वाक्यांच्या संग्रहाचे अद्भुत वाग्ङ्मय होते. गुरुदेवांद्वारे निर्मित शब्दाशब्दाला आणि एक-एक रेषेला जगन्मान्य दर्जा प्राप्त होतो! यात विविध भारतीय आणि विदेशी भाषांत त्यांच्या साहित्याचे झालेले अनुवाद, दूरदर्शन मालिका, चित्रपट, इत्यादींची मांदियाळी सोडूनच द्या!

१२ व्या वर्षापासून ते ८० व्या वर्षी झालेल्या त्यांच्या ‘देखण्या देहांता’पर्यंतचा हा कलासक्त जीवनप्रवास म्हणजे जणू दिव्य दीपस्तंभच. या देवतुल्य व्यक्तिमत्वाच्या अनेकानेक नवथर स्वरुपांना एका २०० पानी पुस्तकात सामावून घेणे महासागराच्या मोत्यांना आपल्या ओंजळीत सामावून घेण्याइतकेच दुष्कर! पुस्तकातील लालित्यपूर्ण भाषा आणि उत्कट भावभावनांच्या लहरींवर डोलणाऱ्या ४२ प्रकरणांपैकी मला सर्वाधिक आवडले ते ‘जन-गण-मन’ या आपल्या राष्ट्रगीताविषयीचे प्रकरण. ११ डिसेंबर १९११ रोजी कोणत्या परिस्थितीत गुरुदेवांना हे गीत स्फुरले आणि त्यांनी लिहिले, त्यापायी त्यांना किती मानहानी सोसावी लागली, तसेच त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीवर केलेले लांछनास्पद आरोप किती निराधार होते, याचे हृद्य स्पष्टीकरण आणि सांगोपांग विवेचन देशपांडे सरांनी अतिशय स्थितप्रज्ञतेने केले आहे. दुसरे म्हणजे ‘सहजपाठ’ हे गुरुदेवांच्या बंगालीत रचलेल्या बालकवितांचे प्रकरण मला अतिशय मनोज्ञ वाटले! शांतिनिकेतन मध्ये कांही काळ व्यतीत केलेले आपले लाडके पु. ल. या प्राथमिक काव्यरचनेचे गोडवे गात म्हणतात, “असे शिक्षण भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे. ” या दोन्ही प्रकरणांतील विचार राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याइतके महत्वाचे आहेत.

या पुस्तकाला सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि ‘रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव’ या पुस्तकाचे लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांची मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक प्रस्तावना लाभली आहे. शेवटी दिलेली संदर्भसूची टागोरांच्या वैश्विक स्तरावर केलेल्या विशाल साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा लेखकाने केलेला सखोल अभ्यास दर्शवते. ‘एकला चालो रे’ या स्फूर्तिदायक शब्दांसह गुरुदेवांच्या आनंदयात्रेत ते आपल्याला संपूर्णपणे सहभागी करून घेते हेच या पुस्तकाचे गमक आहे. या महान भारतपुत्राच्या जीवनाचे सर्वंकष दर्शन घडवणारे हे पुस्तक त्यातील विचार आपल्यात समाहित होईपर्यंत वाचावे असे आहे. आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला हे पुस्तक संग्रही तर ठेवावेच पण, रवींद्र-संस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची प्राधान्यक्रमाने निवड करावी. माझ्या मते हे पुस्तक मराठी साहित्यातील चरित्रलेखनाचा एक उत्कृष्ट मापदंड ठरावे!

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

 भ्रमणध्वनी – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन” – लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन” – लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन

लेखिका : सुनीला सोवनी 

पृष्ठ: ३९८

मूल्य: ३५०₹ 

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी कटिबद्ध होऊन अनेक कार्यकर्ते समाज जीवनाच्या अंगोपांगांमध्ये, बहुविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आहेत. हिंदुत्वाचा हुंकार सर्वदूर जसजसा दुमदुमू लागला. तसतशी अनेक प्रसारमाध्यमे, तथाकथित पुरोगामी संघटना, संस्था, यांनी निरनिराळ्या मुद्द्यांवर हिंदुत्वाच्या विरोधात जोरदार आवई उठवायला सुरुवात केलेली आहे.

.. विशेषकरून अमेरिकेतील अनेक विद्यापीठातून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे अत्यंत विकृत व अयोग्य असे चित्र रंगविलेली पुस्तके व प्रकाशने पाहावयास मिळतात. अशी इंग्रजी पुस्तके वाचूनच मते बनवणारा तथाकथित सुशिक्षित वर्ग हिंदू संस्कृतीतील महान परंपरा, श्रेष्ठतम दृष्टीकोन यापासून फार फार दूर राहतो आहे. विशेषतः स्त्रीविषयक हिंदुत्वाचा दृष्टीकोन हा अत्यंत प्रगल्भ व शारीरिक, मानसिक, बौद्धिक इ. चा समतोल विचार करून मांडला गेलेला आहे व ‘आचार परमो धर्मः’ या न्यायाने प्रत्यक्ष व्यवहारात पुरुषाने ‘स्त्री’ संबंधीचा केवळ समान भाव न ठेवता अत्यंत श्रेष्ठ भावच मनात बाळगला पाहिजे अशी शिकवण लहानपणापासूनच तो संस्कार मुलांच्या मनावर बिंबवण्याची व्यवस्था या देशात निर्माण करण्यात आलेली आहे. ‘मातृदेवो भव’ म्हणून प्रातर्वंदनाची सुरुवात करणारा हा धर्म आहे. राष्ट्राकडेदेखील ही आमची मातृभूमी असे रामायणकालापासून येथे शिकविण्याची पद्धत आहे.

नेहमीच्या रूढ संकल्पनांनुसार व विशिष्ट पद्धती म्हणजेच श्रेष्ठ व योग्य पद्धती असा विचार न करता मुक्त चिंतन, विश्लेषणात्मक चिंतन, भारतीय जीवनमूल्ये उद्ध्वस्त करणाऱ्या कारवायांना सडेतोड उत्तर म्हणून लेखन करण्याची गरज होती, अशा अध्ययनातून सौ. सुनीला सोवनी यांनी हे लिखाण केले आहे.

वारंवार खोटी गोष्ट सांगितल्यावर ती खरी वाटते हे ‘गोबेल्स’ प्रणीत तत्त्व अंगीकारून सध्या देशावर जे अमेरिकन संस्कृतीचे प्रचंड आक्रमण चालू आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती वाईट, जे-जे भारतीय, ते ते मागसलेले, बुरसटलेले-खराब अशी नवशिक्षितांची धारणा होऊ पाहत आहे. स्वतःच्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल अशी तिरस्काराची, घृणेची भावना देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी-राष्ट्रोत्थानासाठी फार मोठा अडथळा ठरणार आहे. राष्ट्रोत्थान कार्यातील अडथळा दूर करून आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची भावना जागविण्याची गरज आहे. त्यासाठी गहन चिंतन, अध्ययन करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. या गरजपूर्तीसाठीच ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ हा शोधनिबंध प्रस्तुत करण्याची आवश्यकता आहे.

—- अर्थात येथे हे स्पष्ट करायला हवे, की हे चिंतन करीत असताना ते पूर्वग्रहविरहित व्हायचे असेल तर खालील सुभाषित मनात साठवायला हवे.

“पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम् । सन्तः परीक्ष्यान्यतरत् भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ।।

जे जे पुराणात सांगितलेले आहे, ते सर्व योग्य आहे चांगले आहे. बरोबर आहे असे नव्हे, तसेच एखादे काव्य नवीन आहे म्हणून ते अवध-त्याज्य आहे आहे असेही मानता कामा नये. विधानांची नीट तपासणी करून काय योग्य, काय अयोग्य हे ठरवायला हवे आणि जे विचारी असतात, श्रेष्ठ असतात से विधानांची परीक्षा करूनच त्यांचा स्वीकार करतात, परंतु मूर्ख लोक इतरांचे जे म्हणणे त्यावरच आपले मत बनवतात. हे सुभाषित मनात ठेवून जे जे भारतीय, जे जे जुने, ते ते सर्व चांगले असा समज मनात ठेवून चिंतन करणे योग्य ठरणार नाही व सर्व नवे अयोग्य असेही म्हणून चालणार नाही.

त्याच वेळी ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, ‘जाळूनी’ किंवा ‘फोडूनी’ टाका, ही मानसिक धारणादेखील निःपक्ष चिंतनासाठी उपयोगाची नाही. विशेषकरून प्रचारमाध्यमांच्या द्वारे पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव अधिकाधिक वाढत असताना समाजात अनेक विकृती निर्माण होऊन समाजस्वास्थ्यच धोक्यात आलेले आहे. अशा वेळी स्वस्थ समाजरचनेसाठी जे योग्य ते स्वीकारार्ह व जे अयोग्य ते त्याज्य अशीच सुस्पष्ट भूमिका घेऊनच चिंतन व्हायला हवे. सुदैवाने ‘हिंदुत्व’ हे सुरुवातीच्या कालखंडापासून आजतागायत अशी सुस्पष्ट भूमिका घेणारे असल्यामुळे ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ शक्य आहे आणि आवश्यक आहे. कारण आपण कधीच असे म्हटलेले नाही की जे जे पाश्चिमात्य ते ते वाईट. उलट ऋग्वेदातील ऋचा असे सांगते की ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ विश्वातून सर्व बाजूंनी चांगले, शुभ म्हणजेच जे जे भद्र आहे ते ते विचार इ. आमच्याकडे येवोत. त्यामुळे बाह्य गोष्टींचा डोळसपणे स्वीकार करताना हिंदूंना काहीच अडचण वाटणार नाही. हिंदू विचारवंत व ख्रिश्चन संत यांच्या कोणत्याही विषयाकडे पाहण्याच्या मनोधारणा कशा आहेत हे केवळ दोन उदाहरणांवरून स्पष्ट होऊ शकते. आद्य शंकराचार्य म्हणतात ‘शीतो अत्रिन अप्रकाशो वा इति ब्रुवन, श्रुतिशतमपि न प्रामाण्यम् ब्रुवंति ।।’ अग्नी हा थंड अप्रकाशी असतो असे सर्व श्रुती, वेद जर शंभर वेळ सांगतील तर ते केवळ वेदात, श्रुतीत सांगतात म्हणून आम्ही खरे मानणार नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण जर अनुभूती देणारे आहे की अग्नी शीत नसून दाहक आहे, प्रकाशमान आहे तर आम्ही श्रुतींवर मुळीच विश्वास ठेवणार नाही. वेदप्रामाण्य मानणाऱ्या शंकराचार्याची ही वैचारिक बैठक हिंदू चिंतन आहे. उलट ख्रिश्चन संत मदर तेरेसा यांना विचारण्यात आले की बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे असे म्हटलेले आहे व पृथ्वी गोल आहे हे जगभर फिरणाऱ्या आपणा सर्वांना प्रत्यक्ष माहीत आहे तर तुम्ही काय म्हणाल? तर त्याचे उत्तर, ‘माझा बायबलवर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे, बायबल चूक असे मी कधीच म्हणणार नाही. ‘ हिंदू व ख्रिश्चन वैचारिक बैठक इतकी भिन्न आहे हे लक्षात ठेवावेच लागते.

या पार्श्वभूमीवर आज जे स्त्रीविषयक साहित्यांमधून विचार मंथन होत आहे त्यावर प्रकाश टाकण्याची गरजच काय? जे काही होते आहे ते मुक्त आहे, अनिर्बंध आहे, असेना का? असा विचार स्वाभाविक वाटेल. परंतु राष्ट्रपुनर्निर्माणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाज घटकांच्या वैचारिक बैठकीसाठी काही सुस्पष्ट विचारसूत्र असण्याची गरज स्त्री संघटनेमध्ये प्रत्यक्ष काम करीत असताना भासत होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ज्या राजकीय, सामाजिक सुधारणांच्या चळवळी झाल्या, त्यामध्ये हिंदूंच्या पारंपरिक स्वत्वाबद्दलच्या श्रद्धेचा पाया होता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्यातही अलीकडील वीस-पंचवीस वर्षात भारतातील सांस्कृतिक मूल्ये, धर्मसंकल्पना व राष्ट्रीय स्वत्व या सगळ्यालाच जोरदार धक्के बसत आहेत. स्त्रीविश्वाला अपरिहार्यपणे या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना मी कोण आहे? माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे? माझा जीवन उद्देश काय असावा? याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात आजची स्त्री पडताना दिसत नाही.

जागतिकीकरणाच्या वातावरणात पश्चिमी विचार आचारांचा प्रभाव देशातील स्त्रीजीवनावर अधिकाधिक वाढत आहे. आमची श्रद्धास्थाने, जीवनमूल्ये, नष्टभ्रष्ट होत आहेत याची जाणीव होते. चकचकीत फॅशन शो किंवा तत्सम बाजारूपणाला प्रसिद्धिमाध्यमांकडून जी प्रसिद्धी दिली जाते, त्यावरून हिंदू जीवनमूल्यांवरील असे आघात हे राष्ट्रोत्थानास बाधक ठरतील. या जाणिवेतून हा शोधप्रबंध साकारण्यात आलेला आहे. परंतु तो तसा तयार करीत असताना हा प्रबंध आजकालच्या डॉक्टरेटसाठी केलेला, विशिष्ट चौकटीत बसणारा न करता वेळोवेळी भाषणांमध्ये, लेखनांमध्ये मांडलेल्या विचारांचे संकलन या स्वरूपात केलेला आहे.

अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारांची मांडणी करण्यास एकत्रित, संकलित असे अनेक ‘स्त्रीविषयक’ संदर्भ या ग्रंथाद्वारे उपलब्ध होतील असा प्रकाशक (भारतीय विचार साधना) यांना विश्वास वाटतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आभाळाचे तुकडे” – लेखक – श्री अभिराम भडकमकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आभाळाचे तुकडे” – लेखक – श्री अभिराम भडकमकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आभाळाचे तुकडे

लेखक – अभिराम भडकमकर

पृष्ठे: १६८

मूल्य : २७०₹ 

गेल्या ३०-३५ वर्षांत या ना त्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. निमित्तंही वेगवेगळी. कधी पुलंच्या घरी चोरी झाल्याचं निमित्त तर कधी पावसाचं. कधी बडोदा येथील साहित्य संमेलनातील अध्यक्षपदावरून बोलल्याचं, तर कधी एखाद्या महोत्सवातून चित्रपट वगळल्याचं. कधी कलावंत-लेखकांनी काढलेल्या पत्रकाचं तर कधी नाट्यसंमेलनाच्या शतक महोत्सवाचं.

काही लेख हे वृत्तपत्रांतून लिहिलेल्या साप्ताहिक सदरातील आहेत. त्यात काही व्यक्तिचित्रंही आहेत. असं एकूण विविध प्रकारचं हे ललित, वैचारिक लेखन.

या लेखांना एखाद्या विषयाचं अथवा आशयाचं समान सूत्र नसल्यामुळे एकाच कॅनव्हासवर वेगवेगळ्या काळात मारलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या फटकाऱ्यांप्रमाणे त्यांचं स्वरूप आहे. हे लेख म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद, त्यातून झालेलं थोडंसं मनन चिंतन या सगळ्याचा परिपाक आहे. त्यामुळे हे मुद्रित केलेल्या क्रमानुसार वाचले काय किंवा शीर्षक वाचून ज्या लेखाबद्दल उत्सुकता निर्माण होईल तो काढून वाचला काय सारखंच असेल.

मानवी जीवन, निसर्ग, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव यांचा वेध घेणारा अप्रतिम लेखसंग्रह! 

या पुस्तकात तुम्हाला—

✔️ जीवनातील विविध अनुभवांची जाण

✔️ निसर्ग व पर्यावरणाची जाणीव

✔️ सामाजिक व राजकीय परिस्थितीचे वास्तव दर्शन

हे सर्व लेखकाच्या प्रभावी लेखनातून अनुभवायला मिळणार आहे.

– – विचार करायला लावणारे आणि मनाला भिडणारे असे हे लेख नक्की वाचा!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कल्पक व्हावं कसं?” – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कल्पक व्हावं कसं?” – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : कल्पक व्हावं कसं?

लेखक : शिवराज गोर्ले 

पृष्ठ: २८८

मूल्य: ३५०₹ 

“ऑल क्रिएटिव्हिटी इज अबाउट माइन्ड ओव्हर मॅटर, द मॅटर माइट बी पेंट, इंक, पेपर और ऑल्मोस्ट एनीथिंग. द मॅटर डझन्ट मॅटर, बिकॉज इट इज ऑल इन द माइन्ड! “

– रॉड जडकिन्स

कल्पक व्यक्तींची काही खास वैशिष्ट्ये असतात काय? अभ्यासकांचा हा एक लाडका प्रश्न आहे आणि त्याची अगदी स्पष्ट उत्तरंही शोधली गेली आहेत.

कल्पक व्हायचं असेल तर त्यांतील शक्य तितकी वैशिष्ट्यं आपणही आत्मसात करायला हवीत. त्यातूनच ‘कल्पकता’ आपल्याही मनीमानसी रुजू शकेल. वृत्ती, सवयी, म्हणूनच अतिशय महत्त्वाचं आहे. ही वैशिष्ट्ये तुमच्याही कल्पकतेचा पाया ठरु शकतील.

हा मुद्दा अगदी सहज पटण्यासारखा आहे तरीही काही प्रश्न नक्कीच उद्भवतात. आपल्याकडे नसलेली वैशिष्ट्ये आपण जाणीवपूर्वक आत्मसात करू शकतो का?

आपली स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात, ती जर कल्पकतेला पूरक नसतील तर ती आपण बदलू शकतो का?

‘होय’ हे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आहे.

आजच्या काळात सर्वांच्या हाती उच्च तंत्रज्ञान आलं आहे.

लहान मुलंही ‘टेक्नो सॅव्ही’ होत आहेत, तशातच आता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही अवतरली आहे, अशा परिस्थितीत तुम्ही जर ‘क्रिएटिव्ह’ असाल तरच इतरांपेक्षा वेगळे ठरू शकणार आहात आणि तरच यशस्वी होणार आहात, ‘करिअर’ मध्येच नव्हे तर जीवनातही. एक तर निश्चित, या पुढील काळात ‘कल्पकता’ हीच असणार आहे यश, आनंद आणि समृद्धीची गुरुकिल्ली!

आनंदवार्ता अशी की कमालीचा कल्पक असा ‘उजवा मेंदू’ तुम्हालाही लाभलेला आहेच. ‘कल्पकते’ची तंत्रे वापरून त्याला चालना मात्र द्यायला हवी. हे पुस्तक त्यासाठीच तर आहे!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अद्वितीय कैलास मानस” – लेखक : सुभाष काळे – परिचय : प्रा. मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“अद्वितीय कैलास मानस” – लेखक : सुभाष काळे – परिचय : प्रा. मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

 

पुस्तक : अद्वितीय कैलास मानस

लेखक: सुभाष काळे

पृष्ठ: १८८

मूल्य: ३००₹ 

“१५ ऑगस्ट २०१९. समोर मानस सरोवर पसरलेला अथांग जलाशय. सकाळची आठची वेळ. थंडी मी म्हणतेय. सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेला आसमंत. सशस्त्र चिनी सैनिकांनी वेढलेला परिसर. भारताच्या विविध राज्यांतून वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांमधून आलेले तीन-चारशे स्त्री-पुरुष अचानक दोन-तीन रांगांमधून उभे राहतात आणि खणखणीत आवाजात सुरू होते ‘जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता’. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनानंतर आकाशात मूठी उंचावून ‘भारत माता की जय!’, ‘वंदे मातरम्!’

प्रा. मिलिंद जोशी

आमच्या समोर ध्वजस्तंभ नव्हता की, त्यावर तिरंगा नव्हता. तो फडफडत होता आमच्यापैकी प्रत्येकाच्या हृदयात.

परस्परांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पूर्वनियोजन न करता अगदी सर्व काही स्वयंस्फूर्तीने. कैलासाच्या साक्षीने चिन्यांच्या छाताडावर साजरा झालेला हा अविस्मरणीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा.

भलेही आपल्या भाषा वेगळ्या असतील, प्रांत वेगवेगळे असतील, पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तनाने-मनाने आम्ही एक आहोत! भारतीय आहोत!! त्याचे हे प्रत्यंतर! यालाच म्हणतात राष्ट्रीयता! यालाच म्हणतात एकात्मता!!

सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनादेखील वंदनीय असलेल्या शिव-पार्वतीचे हे निवासस्थान. पांडवांनी राज्यत्यागानंतर येथूनच स्वर्गारोहण केले. हिंदू धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन आलेल्या शंकराचार्यांनी येथे देह ठेवला. ऋषभदेवाने आठ पावले चालून कैलासाच्या पायथ्याशी चिरनिद्रा घेतली. वारकरी सांप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या संत नामदेवांनी या कैलासाची परिक्रमा केली. आसेतू हिमाचल भ्रमंती केलेल्या गुरुनानक देवांनी येथेच कैलासापुढे माथा टेकविला, तर आपल्या पावलांचे ठसे उमटवत भगवान बुद्धांनी याच कैलासाभोवती प्रदक्षिणा घातली. हजारो वर्षांपासून ही भूमी आमची आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून ती आमची आहे. आज येथे येण्यासाठी आम्हाला व्हिसा घ्यावा लागतो हे आमचे दुर्दैव! पण एक दिवस असाही उजाडेल की त्या दिवशी मानस सरोवराच्या काठावर तिरंगा फडफडताना दिसेल!“ 

वेगळे परिमाण लाभलेले प्रवासवर्णन

भारतीय माणूस हा जत्रा, यात्रा, तीर्थाटन आणि पर्यटन यात आनंद मानणारा आहे. ‘वडिली जे निर्माण केले। ते पाहिले पाहिजे।’ या समर्थ रामदासांच्या वचनाचे अनुकरण करण्याची वृत्ती महाराष्ट्रातल्या माणसांच्या नसानसात भिनलेली आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील नितांत सुंदर स्थळे पाहिली पाहिजेत. त्याशिवाय आपले जीवन सार्थकी लागणार नाही, असे मनापासून वाटणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे.

सगळेच प्रवास साधे, सोपे आणि सरळ नसतात. काही यात्रा व प्रवास पर्यटकांच्या सहनशीलतेची, हिमतीची आणि शारीरिक क्षमतेची सत्त्वपरीक्षा पाहणारेही असतात. कैलास-मानस सरोवर यात्रा ही त्यापैकी एक. यात्रेच्या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे माहीत असूनही माणसे हे आव्हान स्वीकारतात. सर्व अडथळे पार करीत ध्येय गाठतात. शब्दातीत आणि कल्पनातीत असा आनंद आणि समाधान अनुभवतात. अशा माणसांपैकी एक आहेत पत्रकार सुभाष काळे. ते पत्रकारितेच्या क्षेत्रात रमले. प्रवास हा लहानपणापासून त्यांच्या आवडीचा छंद होता. पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांची देशभर भ्रमंती घडली. ती भ्रमंती केवळ बातमी आणि लेख एवढाच मर्यादित हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली नव्हती. सजग पत्रकारितेसाठी आवश्यक असलेले संवेदनशील मन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि समकालीन स्थितिगतीचे अवलोकन करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या भ्रमंतीदरम्यान मजकुराच्या पलीकडे खूप काही पाहिले. असे पाहणे हा त्यांचा स्वभावच होऊन गेला. कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यानंतर आणि निवृत्तीनंतर त्यांना कैलास मानस सरोवर खुणावू लागले. त्या वेळी त्यांचे वय एकोणसत्तर वर्षाचे होते. वयाच्या सत्तरीनंतर चीन सरकारने कैलास मानस सरोवरसाठी व्हिसा देणे बंद केले होते. काळे यांच्यासाठी ही शेवटची संधी होती. अनंत अडचणींचा सामना करीत या संधीचा लाभ त्यांनी कसा घेतला आणि यात्रा कशी पूर्ण केली हे त्यांच्या ‘अद्वितीय कैलास मानस सरोवर’ प्रवास वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. कैलास मानस सरोवरची यात्रा करणाऱ्यापैकी अनेकांनी आपले अनुभव आजवर शब्दबद्ध केले आहेत. पत्रकार सुभाष काळे यांचे हे पुस्तक आजवर या संदर्भातल्या प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वेगळे ठरते. याचे कारण या पुस्तकात केवळ प्रवासाच्या नोंदी नाहीत, केवळ भारावून टाकणारे निसर्गचित्रण नाही, संकटावर आणि अडचणींवर मात करीत गाठलेल्या ध्येयाविषयीची फुशारकी नाही तर या प्रवासादरम्यान त्यांना घडलेले जे व्यक्ती, समाज आणि संस्कृतीदर्शन आहे त्याची इतिहास, वर्तमान आणि भविष्याशी सांधेजोडणी करीत ते जी मांडणी करतात त्यामुळे हे पुस्तक केवळ एक प्रवासवर्णन राहत नाही. त्या पलीकडे जाऊन वाचकांना सर्वार्थाने श्रीमंत आणि समृद्ध करणारा ज्ञानप्रवास ठरते. त्या अर्थाने या पुस्तकाचे मोल काही वेगळे आहे.

मुंबई ते काठमांडू आणि काठमांडू ते मुंबई आणि पुणे परत अशा अकरा प्रकरणातून काळे यांनी वाचकांना या यात्रेचा अनुभव दिलेला आहे. काठमांडू दर्शन या प्रकरणात ते रिचर्ड स्लोविन या शिकागोत जन्मलेल्या माणसाची पशुपतिनाथाच्या दर्शनाची कथा त्याच्यात शब्दात सांगतात. कैलास मानससरोवर माहात्म्य विशद करताना त्याच प्रकरणात तिथे जाणाऱ्या विविध मार्गाविषयी माहिती देतात. सायब्रुबेशी ते केरुंग या प्रकरणात प्रवासासोबतच एकेकाळी आपल्या ताब्यात असलेला कैलास-मानससरोवरचा भाग चिन्यांनी कसा बळकावला हे समजण्यासाठी तिबेटच्या इतिहासाचा मागोवा घेणे का आवश्यक आहे हे विशद करतात. चिन्यांच्या टाचेखालील तिबेट या प्रकरणात आयुष्यभर जमा केलेली संपत्ती ‘सेव्हन इअर्स इन तिबेट’ या भव्य चित्रपटनिर्मितीत घालविणारा हॅरेर, बंगालचा बिमल डे, आप्पासाहेब पंत, दलाई लामा यांचे संदर्भ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे आहेत. संपूर्ण जगाचाच नंबर एकचा शत्रु असलेल्या चीनच्या अंतरंगाविषयीचे त्यांचे विवेचन भारत-चीन संबंधाविषयीच्या लेखकाच्या अभ्यासाचे दर्शन घडविणारे आहे. मानस सरोवरावरील स्वातंत्र्यदिन हा या पुस्तकातला सुरेख लेख आहे. सहा प्रकरणात त्यांनी ही परिक्रमा कशी पार पडली याचे जे वर्णन केले आहे, ते वाचताना आपणच ही परिक्रमा करीत आहोत, असेच वाचकांना वाटते. इतके आपण त्या अनुभवांशी जोडले जातो. या खडतर प्रवासात उत्सुकता, जिज्ञासा, कुतूहल, भीती, नैराश्य, थकलेपणा, उत्साह अशा नानाविध भावनांच्या मिश्रणातून मिळणारा स्वप्नपूर्तीचा आनंद लेखकाबरोबर वाचकांनाही अनुभवायला मिळतो. अनेक कथा, तपशील, संदर्भ सांगत काळे वाचकांचे बोट धरून त्यांनाही कैलास-मानस सरोवर यात्रा घडवितात. हेच या पुस्तकाचे यश आहे. कैलास मानस सरोवर या संदर्भात आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमधले लक्षणीय पुस्तक म्हणून या पुस्तकाची नोंद जाणकारांना घ्यावी लागेल.

सामान्यांतल्या सामान्य माणसांना समजणारी भाषा पत्रकारांनी वापरली पाहिजे‘, या लेखनधर्माचे काळे यांनी हे सुंदर पुस्तक लिहिताना निष्ठेने पालन केले आहे. साध्या, सोप्या भाषेला त्यांनी आशयाच्या सौंदर्याने नटविले आहे.

परिचय : प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पेंच” – लेखक : श्री अतुल धामनकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पेंच” – लेखक : श्री अतुल धामनकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : पेंच

लेखक: अतुल धामनकर

पृष्ठे: २०१ संपूर्ण रंगीत

मूल्य : ३००₹ 

लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रूडयार्ड किपलींगलिखित ‘जंगलबुक’ पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी. इथे आजही मोगलीचे सवंगडी शेरखान, भालू, कबाकी, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. अशा या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या रांगेत पसरलेल्या जंगलात लेखकाला वाघ व वन्यजिवांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली होती. वन्यजीव अभ्यासक असलेले अतुल धामनकर यांच्या अनेक थरारक अरण्य अनुभवांनी आणि ओघवत्या शैलीतील लेखनाने नटलेलं हे एका जंगलाचं जणू आत्मचरित्रच आहे.

भारत हा एक महान देश आहे जो वनस्पती आणि प्राण्यांच्या अफाट विविधतेसाठी समृद्ध आहे. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि ते इतरांपेक्षा वेगळे आहे. काही जंगले वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहेत. ‘पेंच – मोगली आणि जंगल बुकच्या अरण्य’ हे अतुल धामणकर यांनी लिहिलेले वन्यजीवांवर माहितीपूर्ण पुस्तक आहे. ते एक प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार, स्वतंत्र वन्यजीव लेखक आणि संशोधक आहेत ज्यांनी वन्यजीवांवर असंख्य पुस्तके लिहिली आहेत. पेंच हा मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. मोगली आणि त्याचे साथीदार जंगल बुक याचे आपल्या आठवणीत आणि प्रत्येक मुलाच्या बालपणात एक विशेष स्थान आहे.

पुस्तकात जंगल बुक प्रत्यक्ष पाहण्याची थेट अनुभूती मिळते. पुस्तकात जंगलात भेटलेल्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे विस्तृत चित्रे आहेत आणि सोबत त्यांच्या आठवणीही लिहिल्या आहेत. पेंच राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन काही दर्जेदार वेळ घालवायला आवडणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच वन-स्टॉप डेस्टिनेशन आणि वन्यजीवांचे संदर्भ मार्गदर्शक असे म्हणता येईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जागर विश्वजननीचा” -लेखिका : सुश्री कल्याणी हर्डीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जागर विश्वजननीचा” -लेखिका : सुश्री कल्याणी हर्डीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : जागर विश्वजननीचा 

लेखिका: कल्याणी हर्डीकर

पृष्ठे: २७२

मूल्य : ३९५₹ 

या विश्वाच्या उत्पत्तीला कारण ठरली आहे स्त्रीशक्ती, मातृरूपातल्या या स्त्रीशक्तीची प्राचीन काळी सर्वत्र पूजा होत असे. तिला देवी मानले जात असे, तिचा सन्मान राखला जात असे. तथापि कालांतराने पितृसत्ताक धर्माचा प्रभाव वाढत गेला आणि हिंदू धर्माच्या प्रभावाखालचा आपला भारत देश वगळता दुर्दैवाने इतरत्र सर्वत्र मातृपूजा किंवा देवतांचे अस्तित्व यांचा लोप होत गेला…. भारतात मात्र या आदिशक्तीची विविध रूपांत उपासना होतच राहिली. अनेक आक्रमणांना धैर्याने तोंड देत आणि असंख्य संकटांवर मात करीत भारतात विविध देवतांचा वेळोवेळी जागर होत राहिला. त्या अभिमानास्पद, अद्वितीय वारसा संस्कृती याचा अर्थ समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. आणि त्याच बरोबरीने आजही देशोदेशीच्या संग्रहालयांमधून अवशेषांच्या रूपात आढळणाऱ्या विविध मातृस्वरूप देवतांचा धांडोळाही या पुस्तकात घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता जगात, प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांत, ठिकठिकाणी मातृदेवतेच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याचे जोमदार प्रयत्न होताना दिसत आहेत. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील त्या परिवर्तनाचीही चाहूल घेणारे हे पुस्तक आहे. सर्जनशक्ती धारण करणाऱ्या स्त्रीला म्हणजेच मातेला देवतास्वरूप मानण्यामागच्या धार्मिक-सांस्कृतिक-सामाजिक मानसिकतेचे रहस्यही या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहे. एका चिरंतन विषयाचा कालसुसंगत अन्वयार्थ मांडणारे हे पुस्तक सर्व जिज्ञासू भाविकांच्या संग्रही हवेच!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हृद्य”- लेखिका : सुश्री रेखा इनामदार साने – परिचय : श्री ओंकार बागूल ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हृद्य”- लेखिका : सुश्री रेखा इनामदार साने – परिचय : श्री ओंकार बागूल ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

 – – संवेदनशील मनांचा आरसा.

 – – व्यक्तिचित्रांचा एक अनोखा प्रवास!

पुस्तक : हृद्य

लेखिका: रेखा इनामदार – साने

प्रकाशक : रोहन प्रकाशन 

पृष्ठ – १६८ 

मूल्य: २९५₹ 

हृद्य.. हृदयाला चांगले वाटणारे, आवडणारे. जे मनाला, हृदयाला सुखद, प्रिय किंवा आनंद देणारे असे आहे. काहीतरी आकर्षक, मोहक किंवा सुंदर. आयुष्यात अनेक क्षण, घटना, आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाला आणि हृदयाला सुखद अनुभव देतात. अशा काही गोष्टी ज्या कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. एखादं उदाहरण द्यायचं झाल्यास, माझ्या आजीच्या हाताचे जेवण नेहमीच हृद्य असायचे. केवळ जेवणाची चव नव्हे, तर त्यात असलेली तिची माया, प्रेम आणि आपुलकी ही प्रत्येक घास अधिक चविष्ट बनवायची.

खरेतर, ‘हृद्य’ म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर ते आत्मिक समाधान आणि निखळ आनंद देणारे अनुभव होय. एक उबदार, प्रिय आणि मनाला भिडणारी अनुभूती असते, जी आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायम जपून ठेवावीशी वाटते. आपल्याला जीवनात भेटलेल्या काही माणसांच्या आठवणीदेखील अशाच असतात. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण जणू काही शुभ्र मोत्यांसारखे असतात. याच अनुषंगातून, लेखिका रेखा इनामदार – साने यांनी ‘हृद्य’ हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक लिहिले आहे. रेखा इनामदार-साने या एक मराठी लेखिका, प्राध्यापिका आणि समीक्षक आहेत.

हे पुस्तक विविध व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह आहे. लेखिकेने साहित्य, कला, संगीत आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील काही सर्जनशील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या संग्रहात एकूण १२ व्यक्तिचित्रणे आहेत ज्यांत स. शि. भावे, प्रभाकर आणि कमल पाध्ये, मालती बेडेकर, जगदीश गोडबोले, वसुंधरा कोमकली, मोहन आगाशे, अरुण फडके, सरोज देशपांडे, राम कोलारकर, जब्बार पटेल, राम बापट आणि कुमार गंधर्व यांचा समावेश आहे. मुळात ही सारी व्यक्तिचित्रणे केवळ बाह्य ओळख किंवा यशोगाथा म्हणून या लेखांतून समोर येत नाहीत.

लेखिकेने या कलावंतांच्या माणुसकीच्या पैलूंचा शोध घेतला आहे. त्या या व्यक्तींकडे एका कलासक्त रसिकाच्या आणि चिकित्सक समीक्षकाच्या दृष्टीने पाहतात. हे केवळ व्यक्तींचे चरित्र नसून, तो लेखिकेचा आत्मशोधाचादेखील प्रवास आहे. ज्या वाचकांना या महान व्यक्तींविषयी माहिती आहे, त्यांच्या मनातली ही शिल्पे ‘हृद्य’ वाचल्यानंतर अधिक ठसठशीत होतात. ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एका पूर्ण सांस्कृतिक कॅनव्हासचे विलोभनीय दर्शन घडवते. साहित्यिकांच्या, कलावंतांच्या जीवनातील ताण, त्यांच्या वैयक्तिक मर्यादा, आणि त्यांच्या निर्मितीमागील वेदना याचा सखोल विचार करून हे लेख लिहिले आहेत.

लेखिका रेखा इनामदार-साने यांची खरी ताकद त्यांच्या चिकित्सक रसिकतेत आहे. त्या केवळ व्यक्तीचे प्रशंसा करत नाहीत, तर त्यांच्या कामातील बारकावे, विचारधारेतील द्वंद्वे आणि त्यांच्या कृतीमागील हेतू यांचा अधिक सूक्ष्मतेने शोध घेतात. वाचक जेव्हा हे लेख वाचतो, तेव्हा त्याला जाणवते की लेखिका स्वतः त्या व्यक्तींच्या आयुष्यात डोकावताना, स्वतःच्या जीवनाचा आणि विचारांचाही शोध घेत आहेत. या लेखांतून निर्मिती आणि वैयक्तिक आयुष्य यातील संघर्ष दिसून येतो. या संग्रहातील लेख कलावंत आणि माणूस या दोन भूमिकांमधील द्वंद्व स्पष्ट करतात.

लेखिकेने या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून मांडलेले साहित्यिक आणि कलावंतांचे संदर्भ खरे विशेष आहेत. या साऱ्या साधारण सत्तरीच्या दशकानंतरच्या व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याचे त्या काळातील महत्त्व आणि त्यांची दीर्घकाळ टिकणारी प्रासंगिकता या लेखांतून स्पष्ट होते. संबंधांचे स्वरूप, निष्ठेचे प्रश्न आणि आयुष्यातील निवडीचे परिणाम यासारख्या मूलभूत प्रश्नांवर यांतून चिंतन केले आहे. केवळ माहिती न देता, व्यक्तीचे सर्वांगीण चित्रे याद्वारे रेखाटली आहेत. शिवाय व्यक्तिनुरूप या लेखांच्या विषयांमधील विविधता सुंदर पद्धतीने समोर येते.

याखेरीज, ‘हृद्य’ या संग्रहातून पुरुषांच्या लेखनात दुर्लक्षित झालेले भावनिक पैलू प्रभावीपणे व्यक्त झालेले दिसून येतात. ‘प्रतिमा’ आणि ‘वास्तव’ यांचा भेद अचूकपणे निदर्शनास येतो. लेखिकेच्या स्व-जाणिवा आणि विषयाच्या जाणिवा यांतील उत्तम समन्वय साधला गेला आहे. या व्यक्तींची व्यक्तिचित्रणे रेखाटताना, त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचे तत्त्वज्ञान अप्रत्यक्षपणे समोर आणले आहे. या संग्रहातील लेखांची एक सुंदर बाब म्हणजे कलाकृती आणि ती निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे जीवन एकमेकांत कसे गुंफलेले असते, यावर केलेले भाष्य.

व्यक्ती बदलल्या तरी सर्जनाची प्रक्रिया आणि त्यामागील प्रेरणा कालातीत कशी राहते, याचे विश्लेषण यांतून वाचायला मिळते. लेखिकेने सहानुभूती आणि तटस्थता यातील नाजूक समतोल उत्तमरीत्या साधला आहे. त्यांनी व्यक्तीची बाजू मांडताना, सत्य आणि वास्तव यांना धक्का लावला नाहीये. हे व्यक्तिचित्रांचे स्वतंत्र लेख असले तरी, एका विशिष्ट जीवनदृष्टीमुळे पुस्तकाला एकसंधता मिळाली आहे. मुळात लेखिकेने या व्यक्तींची चित्रे रेखाटताना त्यांच्यातील ‘अपूर्णत्व’ आणि ‘अप्राप्यता’ अगदी सहज स्वीकारलेले आहे.

हृद्य हा संग्रह वाचताना, जणू काही भूतकाळातील व्यक्तींचा ‘आज’शी संवाद साधल्याचा अनुभव येतो. निर्मिती, कलावंत आणि रसिक या तीन घटकांचा अंतरंग यातून उलगडला आहे. लेखिकेने महानता आणि सामान्यत्व यातील सीमारेषा आणखी स्पष्टतेने अधोरेखित केल्याचे जाणवते. हा संग्रह म्हणजे मनोविज्ञान आणि साहित्य यांचा संगम असल्यासारखे वाटते. अनेक लेखांची सुरुवात एखाद्या विशिष्ट घटनेतून, संवादातून किंवा आठवणीतून होते, ज्यामुळे लगेच वाचकाचे लक्ष वेधले जाते. त्यांनी या लेखांतून स्मृती आणि विस्मृती यावर केलेले भाष्य अधिक खोल आहे. शिवाय प्रत्येक लेखाचे शीर्षकदेखील तितकेच रुचकर आहे.

या संग्रहाच्या निमित्ताने लेखिका रेखा इनामदार साने यांनी मानवी नात्यांतील अधिकांश कोमल भावना टिपल्या आहेत. तर तितक्याच प्रभावी पद्धतीने समीक्षात्मक, तटस्थ राहून परखड मते व्यक्त केली आहेत. त्यांनी व्यक्तिरेखांचे मानसशास्त्र सूक्ष्मपणे उलगडले आहे. त्यामुळे हे लेख वाचकांशी थेट भावनिक नाते जोडतात. त्या साध्या घटनांमधून जीवनाचा गहन अर्थ व्यक्त करतात. त्यांनी अलंकारिक भाषेचा अतिशय अचूक वापर केला आहे. लेखिकेने त्यांच्या आत्मनिवेदनाचा अंश लेखांमध्ये मिसळल्याने त्यांत आणखी सुबकता आली आहे. प्रत्येक लेखातून लेखिकेचा विवेक, अभ्यास आणि संवेदनशीलता अनुभवता येते.

‘हृद्य’ हा केवळ व्यक्तिचित्रांचा संग्रह नसून, तो मराठी ललित गद्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल अनुभव आहे. हा ललित संग्रह वाचकाला स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतो आणि प्रत्येक सर्जनशील मानवाच्या ‘हृद्यतेचा’ स्वीकार करण्यास शिकवतो. हे पुस्तक वाचकाला जीवन आणि कलेच्या रहस्यावर स्वतःचे चिंतन करण्यास प्रेरित करते. अखेरीस, ‘हृद्य’ आपल्या मनात कलेकडे पाहण्याची एक अनोखी संवेदनशील दृष्टी देऊन जाते, जी दीर्घकाळ आपल्या सोबत राहते.

परिचय : श्री ओंकार दिलीप बागल

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares