☆ तो गजराज अजून जिवंत आहे… – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पंचवटीतला फोन खणखणला, समोरून कुठल्यातरी वृत्तपत्राचा पत्रकार बोलत होता, विचारणा झाली ‘ग. दि. माडगूळकर’ यांचे निधन झाले ही बातमी खरी आहे का? . फोन उचलणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वतः गदिमा होते! . स्वतःची मरणवार्ता स्वतःच ऐकत होते. मंगरुळकर, माडखोलकर अथवा मंगुडकर नावाच्या एका कवींचे निधन झाले होते, नाव साधर्म्यामुळे ‘कविवर्य माडगूळकर’ यांचे निधन झाले अशी वार्ता पसरली होती. गदिमा नुकतेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून सावरत होते, त्यात पुण्यातील साहित्य संमेलनातील दुर्गाबाई भागवत यांच्या अनाठायी टीकेमुळे ते व्यस्थित होते, त्यातूनच त्यांच्या लेखणीतून झरझर कविता कागदावर उतरली… “तो गजराज अजून जिवंत आहे… “
☆ तो गजराज अजून जिवंत आहे ☆
तो गजराज अजून जिवंत आहे
आपल्याविषयी,
अशा अफवा का अकारण पिकतात,
याचीच त्याला खंत आहे.
त्याचा देह पहाडासारखा.
रंग आकाशीच्या आषाढासारखा.
त्याचा एकेक दात दधिचीच्या हाडासारखा.
दृष्टी गरुडासारखी.
कान,
अनाहत ऐकतील असे,
शक्तिशाली.
त्याचे पाऊलच मोठे
म्हणून चाल संथ आहे.
तो गजराज अजून जिवंत आहे.
वाऱ्यावर वार्ता वावरत होत्या,
की
अपघाती मरणाने तो मेला.
कोणा एका अवघड घाटातल्या,
वानरांच्या वेडावण्याने,
त्याचा तोल गेला.
तो बावचळला.
खोल खोल,
दरीत खाली कोसळला.
त्याचे गंडस्थल फुटले.
कान फाटले.
दात तुटले.
दरीच्या गवताळ तळात,
रक्ताच्या थारोळ्यात,
त्याचे गवसले,
केवळ कलेवर.
असत्य,
पांढरे स्वच्छ असत्य.
त्याच्या जितेपणी त्याने त्याची,
मरणवार्ता ऐकली (लोकोक्तीनुसार)
त्याचे आयुष्य अनंतआहे.
तो गजराज अजून जिवंत आहे.
एक सत्य, की
अथांग अरण्यात मनसोक्त हिंडणारा
तो चतुर चतुष्पाद,
एका कसरतीच्या खेळात,
शिक्षिका शिकविल तसे वागतो.
रिंगणातल्या रिंगणातच स्वातंत्र्य भोगतो.
त्याच्या चिटुकल्या डोळ्यात
एक अनामिक अग्नी मात्र ज्वलंत आहे.
तो गजराज अजून जिवंत आहे.
┉❀꧁꧂❀┉
कवी : श्री. ग. दि. माडगूळकर
(पूरिया काव्यसंग्रहातून)
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर. ☆ प्रा.भारती जोगी ☆
यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर
तीस वर्षांचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा… जो कदाचित आता पुढच्या जन्मीच भेटणार. आणि अलीकडे उभी आहे सव्वीस वर्षांची त्याची पत्नी, जिने नुकताच पुत्र वियोग साहिला आहे.
निरोप देण्यातल्या आणि घेण्यातली ताकद बघा… नवरा सांगतोयं, ” माई, स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायचा असेल तर आपल्या घराचा धूर नको कां करायला? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप! “
… हे शब्द कानी पडताच त्या पत्नीनं पटकन जाळीतून हात आत घालून त्याच्या पायाला हात लावला, ती धूळ आपल्या मस्तकी लावली आणि म्हणाली, ” हे पाय बघून ठेवते पुढच्या जन्मी चुकायला नकोत म्हणून! “
निरोप घेणा-या या होत्या यमुनाबाई उर्फ माई सावरकर!
आणि निरोप देणारे होते विनायक सावरकर उर्फ तात्यासाहेब!
यमुनाबाई जव्हार संस्थानचे तत्कालीन दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. देशसेवेचे व्रत घेतलेल्या, धाडसी, कणखर आणि परिश्रमी!
सावरकर आणि चिपळूणकर घराण्यांत आधीपासूनच घरोबा होता. त्यामुळे यमुनाबाईंना सावरकरांच्या कुटुंबातील देशभक्ती विषयी, त्यांच्या क्रांतिकारक विचारांविषयी पूर्वकल्पना होतीच. विनायकांशी विवाहबद्ध होतांनाच यमुनाबाईंनी देशसेवेचे व्रत अगदी ” की घेतले न व्रत हे आम्हीं अंधतेने”… अशाच बाण्याने अंगिकारले. त्या सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाशी अगदी एकरूप झाल्या.
पती बॅरिस्टर होण्याचं स्वप्न बघणा-या यमुनाबाईंना जेव्हा त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाल्याचे कळले तेव्हापासूनच यमुनाबाईंनी आपल्या पतीच्या समाजसुधारणेच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. कारण सावरकरांच्या अर्धांगिनीला हे चांगलेच ठाऊक होते की, स्वातंत्र्याचा लढा हे त्यांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच पतीला खंबीर साथ देत राहिल्या.
तात्यासाहेबांनी रचलेले पोवाडे, देशभक्ती ची पदे, रचलेल्या आर्या… हे सगळं काव्य यमुनाबाई आपल्या मोठ्या जाऊबाईंबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या *आत्मनिष्ठ युवती समाज* या संस्थेच्या बैठकीत करत.
स्त्रियांसाठी सहभोजन, हळदीकुंकू समारंभ घडवून आणत. मुलांची मुंज, लग्न ही लावून देत. स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश करत.
भगूर येथील पैतृक वाड्यावर जप्ती आली, घरातील स्त्रिया रस्त्यावर आल्या, हालाखीची परिस्थिती… पण तरीही ही यमुना वहायची थांबली नाही. न डगमगता आल्या संकटाला हिंमतीने तोंड देत राहिली. स्वाभिमानी यमुनाबाईंनी माहेरचा ही आधार घेतला नाही. कारण त्यांनी लग्न लागल्या क्षणापासूनच जणू निश्चयच केला होता…
घातले गळा मी मंगळसूत्र पवित्र
तेव्हाच गुंफिले त्यागाचे ही सूत्र
पदरात दडविल्या अपमानाच्या ज्वाळा
स्वातंत्र्यवीराचे कुंकू लावूनी भाळा
– – अशी ही स्वातंत्र्य लढ्यातील एक अदृश्य नायिका… जिच्या जीवनाची सुरुवातच पतीपासून वेगळं होण्याने झाली… शेकडो मैलांवर, समुद्रापलीकडे अंधा-या कोठडीत पती, पत्नी प्रकाशमय खोलीत पण अंधारलेल्या आयुष्यात एकटी! सगळं आयुष्य वेदना, संघर्ष, सामाजिक बहिष्कार… यांनी व्यापलेलं… पण ही समिधा स्वातंत्र्य होम कुंडात समर्पित होतच राहिली,
आदरणीय श्री. बाजपेयीजीं नी सावरकरांबद्दल काढलेले गौरवोद्गार… यमुनाबाईंनाही लागू व्हावेत असंच त्यांचं कर्तृत्व! त्यासुद्धा होत्या…
तेज, तप, तितीक्षा!!
… सावरकरांची सावली बनल्या, आपल्या जाऊबाईंची ही सावली बनल्या. निर्माल्य बनून समर्पित झाल्या.
… म्हणूनच म्हंटलयं… *दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेला तेजस्वितेचा अंश म्हणजे माई! त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई! *
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६५ आणि ६६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६५ – –
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।
धरी रे मना आदरे प्रीती रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ।६५।
अर्थ :: भक्तीविना जीवन म्हणजे दीनवाणे जगणे. ज्या मुर्खांना हे कळत नाही, त्यांचे दुःख वाढतच जाते. म्हणून हे मना, आदरपूर्वक रामावर प्रेम करायला शीक. सोन्याचे घर जरी असले पण त्यात रामाचा निवास नसला तर त्याची कामना काही उपयोगाची नाही.
(भक्तिऊणे – भक्तीशिवाय, जिणे – जगणे, दूणे – दुप्पट, हेमधामी – सोन्याचे घर, विरामी – ज्यात राम नाही असे)
विवेचन :: आधीच्या श्लोकात समर्थांनी अति काम किंवा अति लोभामुळे काय होते ते सांगितले. या श्लोकामध्ये ते आपल्याला भक्ती विना जीवन म्हणजे काय हे सांगत आहेत. ज्याप्रमाणे अति काम आणि क्रोध यांच्यामुळे व्यक्तीचे जगणे लाचारीचे होते, त्याप्रमाणेच भक्तीशिवाय जीवन म्हणजे दैन्यवाणे जगणे. भक्ती म्हणजे शक्ती! ती दिसत नाही पण जो ती मनापासून करतो, त्याला ती जाणवते. सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र जरी असला तरी प्रामुख्याने तो त्याचा भक्त होता. जवळ पैसा, वैभव नव्हते पण भक्तीचे तेज होते, शक्ती होती. अनेक संतांना विपरीत परिस्थितीत दिवस कंठावे लागले. त्यांच्याजवळ सत्ता, संपत्ती, वैभव यांचा अभाव होता. पण भक्तीची दौलत अपार होती. या भक्तीचे तेज त्यांच्या मुखावर विलसत होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्याची त्यांची वृत्ती होती.
पण ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाही, असे लोक भक्तीविना जगतात. अशा लोकांचा कोणीही सहज बुद्धिभेद करू शकतो. देव कुठे आहे? उगाचच त्यावर श्रद्धा ठेवून कशाला जगायचे? जीवन आहे तोपर्यंत मौजमजा करून घ्या. असे सांगणारे लोक भेटतात. आपल्याला अशा गोष्टी लवकर पटतात. त्यामुळे भगवंतावरील श्रद्धा विसर्जित करून आपण ऐहिक जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. पण ऐहिक जीवनात जेव्हा पदोपदी अपयशाचे, अपमानाचे प्रसंग येतात, संकटे येतात तेव्हा माणूस खचतो. कारण कुठेही श्रद्धा नसते. कुठलाही आधार नसतो. ‘ Faith can move mountains ‘ अशी एक इंग्रजी म्हण आहे. श्रद्धेचे सामर्थ्य अपार असते. श्रद्धा तारक आहे. प्रल्हादाची भगवंतावर श्रद्धा होती. या श्रद्धेनेच त्याला सर्व प्रसंगातून तारून नेले. परंतु श्रद्धाहीन माणसाच्या जीवनात दुःखाचा गुणाकार होतो. म्हणूनच समर्थ तळमळीने आपल्याला आदरपूर्वक रामावर श्रद्धा ठेवायला, प्रेम करायला सांगतात.
हेमधामी आणि विरामी ही दोन विशेषणे समर्थांनी फार सुंदर योजली आहेत. हेमधामी म्हणजे सोन्याचं घर, राजवाडा. विरामी म्हणजे रामाशिवाय. हल्ली काही घरांमध्ये ‘ हे घर श्री महाराजांचे आहे ‘ अशी पाटी लावलेली आढळते. म्हणजे राहणाऱ्यांची अशी श्रद्धा असते की या घरात महाराज किंवा भगवंत राहतो. हे त्याच्याच मालकीचे आहे. म्हणजे भगवंताच्या छत्रछायेत आपण राहत असतो. आणि इथे भगवंत आहे ही भावनाच किती सुंदर! असे घर म्हणजे मंदिरच! हीच कल्पना थोडी आणखी विस्तारली तर आपला देह म्हणजे सुद्धा भगवंताचे निवासस्थान असेही आपल्याला म्हणता येते. त्याच्या श्रद्धेविना असलेला देह म्हणजे फक्त हाडामांसाचे शरीर!
घर सोन्याचे असले तरी घरात राहणाऱ्यांची जर भगवंतावर श्रद्धा नसेल, तर असे घर म्हणजे चार भिंतींचा एक तुरुंग! सोन्याचे घर म्हणजे राजवाडा, वैभव! पण जिथे राम नाही त्या घराची किंमत शून्य. ज्या दगडांवर रामनाम लिहिले जाते, ते दगड सुद्धा तरतात. रामावर म्हणजे भगवंतावर श्रद्धा नसलेली व्यक्ती म्हणजे मूढ पाषाणच! या संसार सागरात ती बुडणारच हे ठरलेले आहे! महाभारत युद्धाच्या प्रसंगी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी जातात. भगवंत म्हणतात, ” एका बाजूला निःशस्त्र असलेला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना. त्यातून ज्याला जे हवे ते त्याने मागून घ्यावे. ” या प्रसंगी दुर्योधन नारायणी सेना मागून घेतो आणि अर्जुन भगवंताला. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अर्जुनाची भगवंतावर दृढ श्रद्धा होती. म्हणून मला भगवंतच हवा असे त्याला ज्या तीव्रतेने वाटले तसे दुर्योधनास वाटणे शक्यच नव्हते. नारायणाशिवाय नारायणी सेना काय कामाची? म्हणून अर्जुनाला जसे तीव्रतेने वाटले की मला भगवंतच हवा तसे आपल्यालाही वाटले पाहिजे. तेव्हा हे मना, आदरपूर्वक रामरायावर प्रेम करायला शीक हेच समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद ::
१) माझ्या जीवनात श्रद्धेचा आधार किती आहे? संकटाच्या वेळी मी खचतो की स्थिर राहतो?
२) मी ‘नारायणी सेना’ (संपत्ती, साधने) निवडतो की ‘नारायणाची ‘ निवड करतो?
३) माझे घर ‘हेमधामी’ आहे की ‘रामधामी’?
४) माझ्या आनंदाचा स्रोत बाह्य गोष्टींमध्ये आहे की अंतर्मनातील भक्तीत?
– – – –
श्लोक क्र. ६६ – –
नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।
जनीं वीष खाता पुढे सूख कैचें?
करी रे मना ध्यान या राघवाचे ।६६।
अर्थ :: हे मना, हा संसार अनित्य आणि असार आहे. घोर म्हणजे भयंकर आहे. तूच याचा जरा विचार करून सत्य शोधून काढ. एखाद्याने विष भक्षण केले तर ते वाईट परिणाम केल्यावाचून कसे राहील? तेव्हा तू भगवंताची भक्ती कर.
विवेचन ::
या श्लोकामध्ये संसाराचा फोलपणा समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. हा संसार असार आहे. विनाशी आहे. संसारात सुखी झाला आणि सुखदुःखे भोगावी लागली नाही असा मनुष्य आढळणे कठीण! त्यातून संसार घोर म्हणजे भयंकर आहे. संत या सगळ्यातून गेले आहेत. संत तुकारामांना भयंकर असा दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यात मुलेबाळे, पत्नी यांची आहुती गेली. पण संसाराचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळेच त्यातून बाहेर काढणारी एकच गोष्ट त्यांना माहित होती. ती सारभूत गोष्ट म्हणजे विठ्ठल. त्याचाच ध्यास त्यांनी घेतला होता. सर्वच संतांनी संसाराचा हा फोलपणा लक्षात घेऊन जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा उपदेश केला. आम्हाला संतांचे सांगणे समजत नाही असे नाही. पण त्यातील फोलपणा ध्यानी घेऊनही आम्ही या विषाचा अनुभव घ्यायला तयारच असतो. विष खाल्ले की ते त्याचे परिणाम दाखवणारच! विष खाल्ले आणि चांगला अनुभव आला असे कधी होऊच शकत नाही. ते त्याचा प्रभाव दाखवणारच. इथे विष म्हणजे विषयासक्ती असाही अर्थ घेता येईल.
म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात, ” हे मना, दुसऱ्यांचे सांगणे तुला पटत नसेल तर तू स्वतः अनुभव घेऊन बघ. तू स्वतः त्यातील सत्य शोधून काढ. कधी कधी माणसे दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होत नाहीत. म्हणून स्वतःला जो अनुभव येतो, त्यावर सारासार विचार करून त्यातून तरी योग्य निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. समर्थ आपल्याला संसाराचा त्याग करा असं सांगत नाहीत तर त्यातील फोलपणा ध्यानी घेऊन त्यातील आसक्ती कमी करा असेच त्यांचे सांगणे आहे. संसाराकडे साक्षीभावाने आपल्याला पाहता आले पाहिजे. पाण्यात आणि चिखलात राहूनही जसे कमळ त्यापासून अलिप्त असते तसेच आसक्तिरहित आपल्याला संसारात राहता आले पाहिजे.
एकदा सत्य लक्षात आल्यानंतर मग त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. संसार करताना आपल्या लक्षात येतं की आपल्याला समजायला लागल्यापासून आपण या प्रपंचात किती गुंतत चाललो आहोत. सगळ्यांची मने सांभाळताना आपली किती ओढाताण होते आहे! किती दिवस ही लटकी नाती जपायची? कोणाकोणाचा अहंकार जपायचा? पैसा कमवायचा तरी किती? किती पैसा मिळवला म्हणजे तो पुरे झाला असे होते? ही संपत्ती, हे घरदार मी कोणासाठी कमावतो आहे? हे सगळे तर इथेच ठेऊन जावे लागणार आहे. आपल्यापुढे दोनच पर्याय असतात. एकतर ठेऊन जा, नाहीतर देऊन जा. बरोबर घेऊन जाण्याचा पर्याय आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही. बरं, ज्यांच्यासाठी हे सर्व करावं, ती पोरंबाळं तरी नंतर आपल्याला विचारतील याची काय खात्री आहे? गेल्यानंतर काही दिवस आपली तसबीर भिंतीवर लागेल. तिची पूजा होईल. काही दिवसांनी तीही निघून जाईल. हे जगच अनित्य आणि मर्त्य आहे. आधीच्या श्लोकांत समर्थांनी सांगितल्यानुसार ‘ मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ‘ अशी परिस्थिती असते. तरी आपल्याला केवढा गर्व असतो, आपल्या पैशाचा, रूपाचा, सत्तेचा!
हा सगळा विचार कदाचित कोणाला निराशावादी वाटण्याची शक्यता आहे. पण वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली तरी वस्तुस्थिती थोडीच बदलते! उलट वस्तुस्थिती समजली तर त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. यावर एकच उपाय आहे. असार संसाराला बाजूला सारून जे सार म्हणजे रामनाम आहे, तेच जीवी धरावे. धान्य पाखडण्याचे सूप आपल्याला माहिती असेल. धान्य पाखडताना ते त्यातील असार म्हणजे खडे, केरकचरा आदी बाहेर टाकून देते. आणि सार म्हणजे जे धान्य आहे ते धरून ठेवते. आपणही सुपाची भूमिका करावी. असार सर्व सोडून द्यावे आणि सार म्हणजे भगवंत त्यालाच घट्ट धरून ठेवावे. रामरायाचे ध्यान सर्व सुख देणारे आहे. ते ‘ मंगल दर्शन पूर्णविराम ‘ असे आहे. ” म्हणून हे मना, या राघवाचे ध्यान कर “असे समर्थ तळमळीने आपल्याला सांगत आहेत.
स्वसंवाद ::
१) मी संसार करताना त्यात अडकतो आहे का, की त्याकडे साक्षीभावाने पाहतो आहे?
२) “विष” म्हणून सांगितलेली विषयासक्ती माझ्या जीवनात कोणत्या रूपात आहे?
३) मी इतरांच्या अनुभवातून शिकतो का, की स्वतः धडपडूनच शिकतो?
४) माझ्या आयुष्यात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?
५) मी रोजच्या जीवनात भगवंताच्या स्मरणासाठी वेळ काढतो का, की तो पुढे ढकलतो?
“शब्दांचेही तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. ”
काल मी व माझी मैत्रीण छाया खूप दिवसांनी भेटलो. छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या. जवळ जवळ सर्व विषय झाले होते. अगदी देशातील राजकारणा पासून ते घराच्या राजकारणापर्यंत. मनसोक्त गप्पा व त्याच बरोबर दोन दा चहा, कांदा भजी, पावसाळी हवा, मज्जा आली. एकुण आम्ही दोघी ‘recharge ‘ झालो. व आता मला माझे घर व घरातली काम दिसत होती.
मी निघणारच तेवढ्यात बेल वाजली. छाया ने दरवाजा उघडला. एक स्मार्ट दिसणारी छान, ऊंच स्त्री कोणाचा तरी पत्ता विचारत होती.
ती म्हणाली, इथे मेधा कुलकर्णी कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का??
कोण मेधा कुलकर्णी??? मला नाही माहित. असं छाया ने उत्तर दिले.
तेव्हा तिने मेधा चे वर्णन केले म्हणाली,
अहो, ती अशी काळी, लठ्ठ चष्मा लावते. बुटकी आहे. बघा. असं तिने मेधा चे वर्णन केले व हावभाव पण तसेच केले.
मला थोड खटकलच. थोडा रागही आला.
आम्हाला मेधा कोण??? माहिती नाही. तिच्या शी कधी आमचा सम्बन्ध येईल की नाही हे ही माहित नाही. मेधा कोणाची मुलगी,? कोणाची बायको? काहीच माहीत नाही. पण तिचे असे वर्णन ऐकून, मनात मेधा ची एक इमेज मात्र नक्की तयार झाली. उद्या काही कारणाने जर हिचे नाव पुन्हा कोणी घेतले तर माझ्या समोर तिचे हेच चित्र उभे राहणार.
कदाचित मेधा असेलही तशीच पण तिची अजून दुसरी ओळख नसेलच का?????
तीचा ‘flat no??? वगैरे. किंवा हेच वर्णन दुसऱ्या शब्दांत ही होऊ शकलं असतं ना Medium height, सावळीशी, चष्मा लावते. (सावळेपणाची डिग्री कमी जास्त होऊ शकते.) असे मेधा चे वर्णन ऐकले असते, तर मनात एक वेगळीच इमेज तयार झाली असती.
ही स्त्री मला आधुनिक वाटली. ‘ well dressed ‘ तर होतीच पण सुसंस्कृत होती का????
त्या स्त्री च्या अशा बोलण्याचे खूप अर्थ निघतात. तिच्याच व्यक्तिमत्त्वाची पुसटशी कल्पनाही येते. स्वतः सुंदर असल्याचा अहंकार? अभिमान? की दुसऱ्या ला कमी लेखणे. उगीच दुसऱ्या ची इमेज खराब करणे. अपमान करणे. की काही ही विचार न करता बोलणे, जे मनात येईल ते.
जर तुम्ही सुंदर अहात तर ती देवाची तुमच्या वर थोडी extra कृपाच म्हणायची. त्यात तुमचे असे विशेष कर्तुत्व काय????
काही लोकांना दुसर्याना कमी पाहण्यात, त्यांच्या चूका काढण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. समाधान मिळते. त्यांचे नेहमी अर्ध्या रिकाम्या ग्लास कडेच लक्ष जाते. तुम्ही दिसायला छान सुंदर उंच म्हणजे सर्वगुणसंपन्न नाही. व व दुसर्याच्या रंग रूपावर बोलण्याचे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलेही नाही.
किंवा असेही असू शकते, की कधी तरी मेधा ने या बाईचा अपमान केला असावा व हे त्याचे प्रत्युत्तर असेल. पण ते तिसऱ्या व्यक्ती समोर कशाला?????
पण काही ही कारण असू दे, हे असे बोलणे चूकच आहे. शब्दांचे पण तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. तुम्ही दुसऱ्या चा अपमान केला, तर त्यांचा अपमान होतो की नाही माहीत नाही. पण तुम्ही तुमचा मान मात्र नक्की कमी करता.
खूप लोकांची सवय असते ते चार चोघात मुद्दाम असे विषय काढतात व एखाद्याला टार्गेट करतात. त्याच्या उपस्थितीत किंवा कधी त्याच्या अनुपस्थितीत.
अपमान कधी कोणी विसरत नाही. जेव्हा मौका मिळतो. तेव्हा तो व्याजासकट परत करतात. हे नक्की, आता अशी देवमाणसे दिसत नाही, जे एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करतील. उलट चार मारतील.
आपण स्वतः ला सुशिक्षित, आधुनिक समजतो मग व्यवस्थित बोलणे हे त्यात येत नाही का? आपल्याला शब्दांची मांडणी बरोबर करणे जमत नाही का? बोलताना विचार करत नाही का? समोरचा उत्तर देत नाही. म्हणजे त्याला बोलता येत नाही. असे नाही. तो सभ्य आहे हे कारण आहे त्याचे
समाजात मिळुन मिसळून राहण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत. याकरिता उच्च शिक्षण, आधुनिक राहणी, हे नसले तरी चालेल. थोडे ‘common sense ‘हवे बस, पण अडचण येथेच आहे ना ‘common sense is most uncommon ‘.
तुमची भाषा अशुध्द असू शकते. उच्चार चूक असू शकतात. आवाज खूप मधुर नाही, हे पण मान्य आहे. पण भाषेतला भाव छान ठेवणे, हे तर आपल्याच हातात असते ना.
चार पुस्तके कमी वाचली तरी चालेल. पण कोणाच्या कमी वर वार करणे चूकच आहे. खरं तर, लक्षात ठेवाव
शब्दांचा तोल सावरला की बोलांना आपोआप मोल येत.
माणसाला मोजायचा मापदंड, त्याची ओळख, म्हणजे फक्त त्याचे रुप रंग हेच आहे का? कर्तुत्व, स्वभाव इतर गुणही महत्वाचे असतातच.
प्रथम दर्शनी तुमचे रंग रूपच जरी दिसत असले, तरी पाठोपाठच तुमचे बोलणे पण असतेच ना.
‘Be positive ‘ आपण म्हणतो. मी किती ‘Positive ‘ आहे? अस स्वतः चे गुणगान करणारे तर खूप भेटतात. रोज सकाळी what’s app वर येणारे सुविचार ही खूप वाचतो. अशा मेसेजेस ना like करतो thumb’s up पण करतो..
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६३ आणि ६४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६३ – –
घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे । ६३ ।
अर्थ ::एखाद्याच्या घरी कामधेनू आहे. पण तो दुसऱ्याच्या घरी ताक मागू लागला तर ही हास्यास्पद गोष्ट ठरते. त्याप्रमाणे आपल्यापाशीच असणाऱ्या भगवंताकडे दुर्लक्ष करून एखादा व्यर्थ वाद घालू लागला तर त्याचे जीवन वाया जाते. एखाद्याच्या हातात चिंतामणी आहे, परंतु तो त्याच्याकडे केवळ काचेच्या तुकड्यांची मागणी करू लागला तर अशा माणसाचे वागणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे ठरते.
विवेचन ::या आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला निजध्यास तुटला म्हणजे काय हे सांगितले. या श्लोकातही तोच मुद्दा पण वेगळ्या शब्दात ते आपल्याला समजावून सांगत आहेत. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरतो तो त्याला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानामुळे. या बुद्धीचा वापर करून तो आत्मज्ञान करून घेऊ शकतो. नराचा नारायण होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. असे असताना कधी कधी तो अगदी हास्यास्पद वागतो. घरी कामधेनू आहे म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी गोमाता आहे. पण याला त्याची जाणीवच नाही. हा दुसरीकडे ताक मागत फिरतो. इथे कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा भगवंत. तो सदैव आपल्याजवळच असतो. पण याची जाणीव नसलेले अज्ञानी जीव मात्र त्याला शोधत इकडेतिकडे फिरतात. भोंदूबाबा, साधूंच्या नादी लागतात. भगवंत आपल्याजवळ आहे. त्याला शोधायला खरं तर कुठेच जायची गरज नाही. ‘ मंदिरात अंतरात तोच नांदताहे… ‘ पण ही गोष्ट आमच्या लक्षातच येत नाही. आम्हाला परमेश्वरासंबंधी जे काही ज्ञान झाले आहे, ते सोडून देऊन आम्ही व्यर्थ, कोरडे आणि निष्फळ वादविवाद करत बसतो.
समर्थ जसे कामधेनूचे उदाहरण देतात, तसेच ते चिंतामणी रत्नाचेही देतात. चिंतामणी हे एक दिव्य रत्न असून त्यामुळे जे हवे ते प्राप्त होते. परंतु काही मूर्ख माणसे मात्र अशा या दिव्य चिंतामणीच्या संपर्कात आले असताना देखील त्याच्याकडे काचेच्या तुकड्याची मागणी करतात. कामधेनू किंवा चिंतामणी ही रूपके समर्थांनी वापरली आहेत. परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू किंवा चिंतामणी! इच्छिलेले देणारा. पण आम्हाला त्याचे महत्वाच कळत नाही. एकदा परमेश्वराची कृपा झाली की काही मिळवायचे बाकी राहत नाही. पण आम्ही मात्र जवळ कस्तुरी असूनही कस्तुरीच्या शोधात फिरणाऱ्या कस्तुरीमृगासारखे रानोमाळ भटकत राहतो. ‘ तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ‘ अशी आमची अवस्था होते.
हरीबोधाइतकी मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला हे समजते पण उमजत नाही. आमची श्रद्धा डळमळीत होऊ लागते. हरीबोध किंवा परमेश्वराची प्राप्ती ही इतक्या सहजासहजी होणारी गोष्ट नसते. त्यासाठी विवेक आणि श्रद्धा आवश्यक असतात. संयमाने उपासना सुरु ठेवावी लागते. पण एकदा का श्रद्धा डळमळीत झाली की नाना प्रकारच्या शंका मनात घर करू लागतात. या आधीच्या श्लोकात समर्थांनी निजध्यास सुटला म्हणजे काय घडते ते सांगितले होते. तेच अशा वेळी घडते. मग परमेश्वर आहे का? तो मला प्राप्त होईल का? मी एवढा वेळ कशाला वाया घालवायचा? त्याऐवजी माझ्या हातात जे आनंदाचे क्षण आहेत, ते मी का गमवावे? असा मनुष्य संतांशी देखील व्यर्थ वादविवाद करीत बसतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता वाचणारे त्यातील सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा मला किती कळते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बसतात. ‘ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक तरी ओवी अनुभवावी ‘ असे म्हटले जाते. पण आम्ही तिची अनुभूती घेण्यापेक्षा व्यर्थ, कोरडे वादविवाद करत बसतो. खरे ज्ञान तेच की हृदयापर्यंत पोहोचते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” मला विद्वानांबद्दल आदर आहे पण प्रेम नाही. “त्याचे कारण हेच आहे. विद्वान माणसे आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. पण भगवंत प्राप्तीसाठी जी तळमळ, श्रद्धा आणि प्रेम लागते, तिचा अभाव त्यांच्यामध्ये असतो. भगवंत उदंड देणारा दाता आहे. त्याच्याकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. भगवंताच्या रूपाने आपल्याकडे सर्वस्व असते. तोच असतो कामधेनू आणि चिंतामणी. तेव्हा त्याच्याकडे क्षुद्र गोष्टी कशासाठी आणि का मागायच्या? पैसा, संसार, मुलेबाळे, सत्ता, प्रसिद्धी, कीर्ती हे तर सारेच मागतात. पण मला भगवंत हवा आहे हे मला तीव्रतेने वाटले पाहिजे. त्यासाठीच समर्थांची ही तळमळ!
स्वसंवाद ::
१) माझ्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींची (श्रद्धा, ज्ञान, साधना) मला खरी जाणीव आहे का?
२) मी बाहेर बाहेर शोधण्यात जास्त वेळ घालवतो का, की अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो?
३) मी आध्यात्मिक ज्ञान फक्त “समजून” घेतो, की खरोखर “जगतो”?
४) मी वाचन, चर्चा, वाद यांत अडकतो का, की प्रत्यक्ष साधना करतो?
५) माझ्या मनात शंका जास्त आहेत का, की श्रद्धा दृढ आहे?
६) मी “चिंतामणी” हातात असूनही “काचखंडे” मागत तर नाही ना याचा कधी विचार केला आहे का?
– – – –
श्लोक क्र. ६४ – –
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ।
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।६४।
अर्थ ::मूढ म्हणजे मूर्ख मनुष्य. अशा व्यक्तीला आपले हित कशात आहे हे कळत नाही. त्याच्याजवळ साहजिकच दृढ बुद्धी म्हणजे निश्चयाचा अभाव असतो. ज्याच्या मनामध्ये विषयवासना मोठ्या प्रमाणात घर करून असतात, त्याच्या मनात साहजिकच भगवंताला स्थान मिळणे शक्य नसते. अती लोभी माणसाला शेवटी क्षोभाला म्हणजे क्रोधाला सामोरे जावे लागते. विषय विकारांच्या अती अधीन झालेला माणूस लाचार आणि दीनवाणा असतो.
विवेचन ::‘अति सर्वत्र वर्जयेत ‘असे संस्कृत वचन आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो सर्वनाशाला कारणीभूत होतो. एखादी गोष्ट आरोग्याला हितकारक जरी असली तरी तिचा अतिरेक झाला तर तो घातक ठरतो. उत्तम प्रकृतीसाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर अंतिमतः हानीच होते. त्याप्रमाणे सर्वच गोष्टींचे आहे. अती खाणे, अती बोलणे, अती निद्रा, अती उर्मटपणा अशी कोणतीही गोष्ट अती झाली की नुकसानच होते. ‘अती तिथे माती ‘ असे आपण म्हणतो ते यामुळेच.
कामवासना किंवा विषय सेवन आपल्या आयुष्यात जेवढे आवश्यक असते, तेवढे करण्याची परवानगी आपल्याला आपली संस्कृती देते. त्यासाठी एक विशिष्ट चौकट आपल्या संस्कृतीने आखून दिलेली आहे. त्यासाठी विवाह संस्कार आहे. तात्पर्य एका मर्यादेत विषय सेवन शास्त्रास मान्य आहे. परंतु विषय सुखाच्या अधीन होऊन त्यापलीकडे दुसरे काहीच न दिसणे हे तामसी वृत्तीचे लक्षण आहे. पशुसुद्धा आवश्यक तेवढाच कामवासनेचा आधार घेतात. प्रजोत्पादन हे त्यांचे उद्दिष्ट असते. परंतु माणूस मात्र कोणतीही मर्यादा पाळत नाही. कामातुराणां न भयं न लज्जा असे एक संस्कृत वचन आहे. सध्या विविध माध्यमांमुळे माणसांच्या वासना भडकवल्या जातात. त्यांचा अतिरेक झाला तर काय होते याचे प्रत्यंतर आपल्याला रोजच्या बातम्या पाहिल्या तरी येते.
अती विषयी माणूस हा मूढ बुद्धी असतो. मूढ बुद्धी म्हणजे आपल्या हिताचे न कळणारा. त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही. पटले तरी ऐकण्याची तयारी नसते. रावण हा स्त्रीलंपट होता. विषयलोभी होता. त्यातूनच त्याने सीतेसारख्या पतिव्रतेला उचलून आणण्याचे पातक केले. बिभीषण, मंदोदरी आदींनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले पण त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असल्याने त्याला आपल्या हिताचा सल्ला देखील रुचला नाही.
ज्यांच्या मनात सदैव विषयवासनेनेच ठाण मांडलेले असते, त्यांच्या चित्तात राम म्हणजे भगवंत राहीलच कसा? परमेश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आणि निर्मळ चित्त हवे. बऱ्याच वेळा अशी काही माणसे भगवंताचे नाम घेताना दिसतात. पण ते लोकांची दिशाभूल करीत असतात. त्यांचा अंतर्गत हेतू वेगळाच असतो. मुहमें राम बगलमे छुरी अशी स्थिती असते. अशा माणसांपासून सावध राहिलेले बरे.
जशी अवस्था अती कामी माणसाची होते, तशीच अवस्था अती लोभी माणसाची होते. अग्नीत जेवढे तूप टाकले तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. काम आणि लोभ यांचे देखील असेच आहे. कुठे थांबायचे हे कळत नाही. गरज आणि लोभ यात अंतर आहे. गरजा मर्यादित असतात. लोभ किंवा हाव यांना कोणतीही मर्यादा नसते. लोभापोटी माणसाच्या हातून अनेक अपराध आणि नको त्या गोष्टी घडतात. आपल्या प्रपंचासाठी जेवढे आवश्यक तेवढे मिळवणे हे प्रापंचिक माणसाचे कर्तव्यच आहे. ते देखील योग्य मार्गाने! पण लोभी माणसाचा विवेक हरवलेला असतो. त्यामुळे माझे ते माझे पण तुझे तेही माझेच अशी त्याची वृत्ती होते. येनकेन मार्गाने तो ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी या गोष्टींची हाव माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते आणि त्याचे अध :पतन घडवून आणते.
आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली की मग अशा माणसांचा संताप होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘ अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. ‘ दुर्योधनाला राज्य आणि सत्तेची एवढी हाव होती की त्याने पांडवांच्या हिश्याचे राज्य तर सोडाच परंतु त्यांना पाच गावेही देण्यास नकार दिला. दुष्ट शकुनीच्या बदसल्ल्याला तो बळी पडली. त्याच्या हिताचे सांगणाऱ्या भीष्म, विदुर, श्रीकृष्ण आदींच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्याला मनःशांती नव्हती. त्याचे चित्त क्षोभाने व्यापलेले होते. शेवटी सत्ता आणि संपत्ती यांच्या अतिलोभाने त्याचा घातच केला.
म्हणूनच दासबोधात समर्थ सांगतात की ‘ अती सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनि वर्तावे. ‘ धर्माने घालून दिलेल्या मर्यादेत सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचि तो मानवी धन्य होतो. ‘ असेच वागणे आपल्या हिताचे आहे. जे अती विषयी माणसे असतात त्यांची अवस्था व्यवहारात अत्यंत दीनवाणी होते. त्यांना किंमत राहत नाही असे समर्थ म्हणतात. दैनंदिन जीवनातही अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यांच्या लोभ किंवा कामवासनेच्या अतिरेकामुळे लोकांमध्ये त्यांची छी थू होते. माणूस जेव्हा विषयांच्या अधीन होतो, तेव्हा तो त्याचा मालक न राहता गुलाम होतो. मग ही गुलामगिरी त्याला वाटेल तसे वागण्यास भाग पाडते. त्यात आपण लाचार किंवा दैन्यवाणे होत जात आहोत हेही त्याच्या लक्षात येत नाही.
स्वसंवाद ::
१. माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा ‘अतिरेक’ होतोय का? (उदा. सोशल मीडिया, खाणे, राग किंवा कामाचा अट्टाहास)
२. माझी कोणतीही कृती ही ‘गरज’ आहे की ‘लोभ’, हे मी ओळखू शकतो का?
३. जेव्हा मला माझ्या आवडीची गोष्ट मिळत नाही, तेव्हा माझ्यात ‘क्षोभ’ (राग) निर्माण होतो का? तो शांत करण्यासाठी मी काय करतो?
४. माझे चित्त ‘निर्मळ’ ठेवण्यासाठी मी दिवसातला किती वेळ स्वतःला आणि परमेश्वर चिंतनाला देत
पावसाच्या पहिल्या सरींसोबत अवतरणारा लाल मखमली निसर्गदूत
पहिला पाऊस पडतो… ग्रीष्माच्या तप्त उन्हाने करपलेल्या धरतीवर अचानक आकाशातून पाण्याचे टपोरे थेंब येवून आदळतात. क्षणार्धात भूमीच्या उदरात दडलेला गंधकोश भंगतो आणि मातीचा रम्य गंध आसमंतात दरवळतो. झाडांच्या फांद्यांवरची नवी पालवी थरथरते. सृष्टीच्या अंगावर जणू नवजीवनाची शाल पांघरली जाते. अंबरात सप्तरंगी अर्धगोल इंद्रधनुष्य प्रकटते आणि अशाच वेळी, काळ्या आईच्या कुशीत वर्षभर लपून बसलेले काही लालभडक, मखमली जीव अचानक धरतीवर प्रकटतात. हिरव्यागार गवतावर विखुरलेले ते लाल ठिपके पाहताना वाटते, जणू निसर्गाने धरतीच्या भाळी कुंकवाची उधळण केली आहे! हा जीव म्हणजे ‘इंद्रगोप’.
पर्जन्याचा देव इंद्र. कदाचित म्हणूनच आपल्या रसिक पूर्वजांनी पावसाळ्यात आकाशात उमटणाऱ्या सप्तरंगी कमानीला ‘इंद्रधनुष्य’ आणि धरतीवर प्रकटणाऱ्या या लाल मखमली जीवाला ‘इंद्रगोप’ अशी नावे दिली असावीत.
हा इंद्रगोप म्हणजे — मराठीतला आपला परिचित मृगकिडा. मृग नक्षत्रात तो दिसू लागतो म्हणून त्याला ‘मृगकिडा’ म्हणतात. महाराष्ट्रात गोसावी किडा, किटकुल अशीही त्याची नावे आहेत. संस्कृतमध्ये तो इंद्रगोप आणि वीरबहूती, तर इंग्रजीत Red Velvet Mite म्हणून ओळखला जातो. भारतीय लोकजीवनात त्याचे आगमन म्हणजे पावसाळ्याची चाहूल. म्हणूनच तो केवळ एक जीव नसून ऋतू परिवर्तनाचा लाल मखमली संदेशवाहक मानला गेला आहे.
कालिदासाच्या काव्यातला लाल ठिपका
भारतीय काव्यविश्वात निसर्गाच्या सूक्ष्म छटा शब्दबद्ध करणाऱ्या महाकवी कालिदासांनी इंद्रगोपालाही आपल्या ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘कुमारसंभव’ या प्रमुख रचनांत वर्णन करून अमर केले आहे.
‘मेघदूता’च्या पूर्वमेघ, श्लोक ४० चा आरंभ _’रक्तैरिन्द्रगोपैश्चितां’_ अशा शब्दांनी पर्वताच्या शिखराच्या सांध्यावर, लाल इन्द्रगोप किड्यांनी सजलेल्या, ‘कामरूपा’ नावाच्या हिरण्य नदीचे वर्णन केलंय.
तपःक्लेशक्षामां… संनद्धैरिन्द्रगोपकणैरिव ॥
या ‘कुमारसंभव’ – सर्ग ३, मधील २६ व्या श्लोकात पार्वतीच्या तपस्वी वेशाला सौंदर्य देण्यासाठी इंद्रगोपाची उपमा दिली आहे. तपस्विनी असूनही तिच्या शरीरावर पडलेली फुलं म्हणजे वेलीवर बसलेले इन्द्रगोप!
‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकात विरहाने व्याकूळ झालेला राजा पुरूरवा आपल्या प्रिय उर्वशीचा शोध घेत अरण्यात भटकत असतो. हिरव्या गवतावर पसरलेल्या लाल इंद्रगोपांकडे पाहून त्याला क्षणभर वाटते— उर्वशीच्या लाल किनारीच्या वस्त्राचा एखादा तुकडाच तर इथे पडलेला नाही ना?
प्रेम आणि विरहाच्या भावनांना निसर्गाच्या रंगांत मिसळून पाहण्याची ही कालिदासांची अद्वितीय दृष्टी.
‘ऋतुसंहार’मध्ये त्यांनी पावसाळ्यातील भूमीचे वर्णन करताना म्हटले आहे…
श्लोक:
इन्द्रगोपकचित्राङ्गा प्रावृट्काले च मेदिनी ।
भाति सम्प्रति सा देवी रत्नाभरणभूषितेव ॥
(सर्ग २ प्रावृट् /वर्षा वर्णन श्लोक २)
अनुवाद: पावसाळ्यात ही पृथ्वी इंद्रगोप नावाच्या लाल किड्यांनी आणि रानफुलांनी चित्रविचित्र नटलेली असते. त्यामुळे ती आता रत्नजडित अलंकारांनी भूषवलेल्या देवीसारखी शोभून दिसते.
आजही पहिल्या पावसानंतर लाल मखमली इंद्रगोपांनी सजलेली हिरवीगार भूमी पाहताना कालिदासांच्या उपमेची प्रचिती येते.
किडा नव्हे, अष्टपादी चमत्कार
लोकभाषेत त्याला किडा म्हटले जाते; पण प्रत्यक्षात तो कीटक नाही. इंद्रगोप हा Trombidiidae कुळातील अष्टपादी (Arachnid) प्राणी आहे. कोळी आणि गोचीड यांचा तो दूरचा नातलग. वर्षातील बहुतांश काळ तो जमिनीखाली, ओलसर बिळांमध्ये लपून राहतो. पहिल्या दमदार पावसानंतर मोठ्या संख्येने बाहेर येणारा हा जीव पूर्वीपासून पावसाचा नैसर्गिक दूत मानला जातो.
धरतीचा लाल प्रहरी
इंद्रगोपाचे सौंदर्य जितके मोहक, तितकेच त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. तो वाळवी, मुंग्या, मावा आणि इतर अनेक सूक्ष्म किड्यांची अंडी खातो. त्यामुळे शेतीतील हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. मातीतील सूक्ष्म जीवसृष्टीचे संतुलन राखण्यातही त्याचा मोठा वाटा असतो. उपयुक्त जीवाणू, बुरशी आणि सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेसाठी तो अप्रत्यक्षरीत्या हातभार लावतो. म्हणूनच इंद्रगोप हा निरोगी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा जैविक निर्देशक मानला जातो. शेतकऱ्याचा हा इवलासा मित्र नकळतपणे जैविक कीडनियंत्रणाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.
रेशमी प्रेमबाग
निसर्गात प्रेम व्यक्त करण्याच्या किती विलक्षण पद्धती असतात याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रगोप. मीलनाच्या काळात नर माइट रेशमासारख्या धाग्यांचा मार्ग तयार करतो. त्यावर पाने, काटक्या आणि सूक्ष्म वस्तूंनी सजावट करतो. या रेशमी मार्गावर तो शुक्रपुटिका ठेवतो आणि नृत्यसदृश विभ्रमांनी मादीला आकर्षित करतो. या लहानशा जीवाने उभारलेली ती प्रेमबाग म्हणजे निसर्गातील एक अद्भुत प्रणयकथा आहे.
अळी ते शिकारी
अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना आरंभी सहा पाय असतात. या अवस्थेत त्या अळ्या इतर सूक्ष्म किटकांवर परजीवी म्हणून जगतात. नंतर वाढीच्या प्रक्रियेत त्यांना आणखी दोन पाय येतात आणि ते पूर्ण विकसित अष्टपादी बनतात. त्यानंतर ते स्वतंत्रपणे जमिनीत राहून सूक्ष्म प्राण्यांची शिकार करतात.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारी त्यांची भूमिका निसर्गातील परस्परसंबंधांची सुंदर जाणीव करून देते.
माणसांचा मित्र
लाल रंगामुळे अनेकांना हा जीव धोकादायक वाटतो; परंतु तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे. तो माणसांना किंवा पाळीव प्राण्यांना चावत नाही, दंश करत नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी तो केवळ कडू आणि दुर्गंधीयुक्त द्रव्य स्रवतो. त्यामुळे पक्षी आणि इतर शिकारी त्याच्यापासून दूर राहतात. त्याचा लाल रंग आक्रमणाचे प्रतीक नसून, निसर्गाने त्याच्या अस्तित्वाभोवती उभारलेली एक सावधगिरीची खूण आहे.
या लाल रत्नांचे जतन करूया
रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक हा इंद्रगोपांसाठी सर्वांत मोठा धोका आहे. व्यापक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अनेक कीटकनाशकांमुळे हे उपयुक्त जीव नष्ट होतात. जैविक उपायांचा वापर, कमी नांगरणी, सेंद्रिय आच्छादन आणि मातीतील ओलावा टिकवून ठेवणे यांमुळे त्यांचे संरक्षण होऊ शकते. निसर्गातील अशा लहान जीवांचे रक्षण म्हणजे शेतीचे, मातीचे आणि पर्यावरणाचे रक्षण होय.
धरतीच्या उदरातील जीवंत रत्ने
पूर्वी ग्रामीण भागात इंद्रगोपाला हळद-कुंकू वाहून मान दिला जाई. त्यामागे अंधश्रद्धा नव्हती; तर निसर्गातील प्रत्येक जीवाशी असलेले आत्मीय नाते होते.
आज विज्ञानाने इंद्रगोपाचे पर्यावरणीय महत्त्व सिद्ध केले आहे; परंतु आपल्या पूर्वजांनी ते खूप आधी ओळखले होते. पहिल्या पावसाच्या सरींनंतर जेव्हा हिरव्यागार धरतीवर हे लाल मखमली जीव विखुरलेले दिसतात, तेव्हा वाटते—आषाढाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी भूमातेने आपल्या ओंजळीतली माणकं, पोवळ्यांची भरभरून उधळण केली आहे. त्यातील प्रत्येक रत्न, प्रत्येक कण जणू निसर्गाने जपून ठेवलेला एक छोटासा चमत्कार असतो. तोच हा इंद्रगोप—पावसाचा दूत, मातीचा मित्र आणि सृष्टीच्या सौंदर्याला लाभलेला लाल मखमली स्पर्श!
हा शब्द अनेक सर्वसामान्य लोकांसाठी नवा शब्द असण्याची शक्यता आहे. नवा म्हणजे नव्याने निर्माण झालेला नव्हे तर वाचकासाठी नवा असलेला, आजवर अज्ञात असलेला शब्द! वैद्यकीय परिभाषेतील असे अनेक शब्द आपल्याला अनोळखी असतात.
Cadaver कडेवअर असा याचा साधारण उच्चार आढळतो.. आणि अर्थ आहे मृतदेह… corpse!
विकार, आजार, वेदना आणि मृत्यू यांपासून तात्पुरती का होईना सुटका मिळावी म्हणून मानवाने वैद्यकीय शास्त्राचा डोलारा उभारला. शरीराचा आतून अभ्यास करणे अनिवार्य झाले. मुळात शरीर रचना हाच एक चमत्कार आहे. कोणत्याही कृत्रिम रचनेला मानवी देहाची सर कधीच येणार नाही. म्हणून अभ्यासासाठी खरेखुरे शरीरच लागते. जिवंत देहांचा अभ्यास करण्यावर मर्यादा असतात, पण मृतदेहांबाबत पूर्ण मोकळीक मिळते. या गरजेतून मग मृतदेह प्रत्यक्ष उघडून पाहून त्यांच्या अंतर्गत रचनांचा अभ्यास करण्याचा प्रघात पडला. आणि मग या देहांच्या साहाय्याने वैद्यकीय अभ्यास, संशोधन, प्रयोग सुरू झाले.
Andreas Vesalius (1514-1564) यांनी वैद्यकीय अभ्यासासाठी सर्वप्रथम शवविच्छेदन केल्याचे समजले जाते. १८३२ मध्ये याबाबतीत ब्रिटनमध्ये कायदा अस्तित्वात आला. भारतात आरोग्य हा राज्य विषय असल्याने आपल्याकडे राज्यांचे स्वतंत्र कायदे दिसतात. महाराष्ट्रात १९४९ मध्ये सदर कायदा केला गेला.
अधिकृत शासकीय परवानगी मिळाल्याने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृतदेह भावी डॉक्टर्स मंडळींचे पहिले गुरू म्हणून भूमिका बजावू लागले! जणू हे मृतदेह पुन्हा सजीव झाले. असुरांचा नाश करण्यासाठी आपल्या देहाचे दान देण्याची बाब भारताला नवी नाही. दधिच ऋषींनी राक्षस निर्मुलनासाठी स्वत:ची हाडे देण्यासाठी देह अग्नीच्या स्वाधीन केल्याचे सांगितले जाते. विविध प्रकारच्या व्याधी या जर राक्षस मानल्या तर त्यासंदर्भात मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करणारे व तो संकल्प सिद्धीस जाण्यास साहाय्य करणारे सर्वच ऋषी मानले गेले पाहिजेत!
कायदेशीर देहदान १९४९ पासून अस्तित्वात आले. तर अवयवदान १९९४ पासून कायदेशीर मान्यताप्राप्त झाले. देहदान आणि अवयवदान स्वतंत्र बाबी आहेत. देहादानात व्यक्तीचा देह काही काळ वापरला जातो. तर अवयवदानात आवश्यक अवयव काढून इतरांसाठी वापरले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी परत केला जातो. वैद्यकीय अभ्यासात एक मृतदेह आणि दहा विद्यार्थी असे प्रमाण अपेक्षित असताना आता वीस ते पन्नास विद्यार्थी आणि एक मृतदेह अशी स्थिती आहे.. कारण वाढती वैद्यकीय महाविद्यालये आणि सतत विकसित होणारे संशोधन.
देहदानाची चळवळ सुरू होण्याआधी वैद्यकीय महाविद्यालये बेवारस प्रेते उपलब्ध होण्यावर अवलंबून असत. आधुनिक पोलिस तपास पद्घती, संपर्क व्यवस्था, माहिती संप्रेषण व्यवस्थेमुळे मृतांच्या वारसांचा शोध घेण्याची प्रक्रिया जलद आणि परिणामकारक झाल्याने बेवारस प्रेतांची संख्या खूप कमी झाली! शिवाय एड्स, काविळ यांसारख्या गंभीर कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह, भाजणे आणि तत्सम बाबींमुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या देहांचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकत नाही. यामुळे cadevers उपलब्ध होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेऊन ही कल्पना रुजवली आणि उदात्त विचारांच्या सुसंस्कृत, शिक्षित नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुण्याची प्राप्ती, समाधान, समाजसेवा या विविध भावना प्रबळ ठरल्या.
देहदानाची कार्यवाही ही पूर्णत: कायदेशीर, नैतिक मूल्यांचे भान ठेवून पूर्ण केली जाते. अभ्यासासाठी मृतदेह दान मिळाल्यावर संपूर्ण व्यवस्था संबंधित वैद्यकीय महाविद्यालय करते. सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, विद्यार्थी एकत्र येऊन प्रार्थना करतात, या वेळी नातलग उपस्थित राहू शकतात, आणि मगच तो देह वैद्यकीय विद्यार्थांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला जातो. आणि साधारणत: वर्षभरानंतर उर्वरीत देह, अवशेषांवर त्या त्या व्यक्तीच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना हिप्पोक्रटिक आणि कडेवअर शपथा दिल्या जातात. त्यांपैकी अभ्यासासाठी उपयोगात आणावयाच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी साधारणपणे पुढील प्रमाणे शपथ दिली जाते, जी इंग्रजी भाषेत असते. पुढे मराठी भाषांतर दिले आहे.. जे इंटरनेटवरून घेतले आहे.
“मी अत्यंत गंभीरपणे आणि निष्ठेने प्रतिज्ञा करतो की, मी या मृतदेहाचा (शवाचा) सर्वोच्च आदर, सन्मान आणि प्रतिष्ठा कायम ठेवीन. मी या देहदात्याला माझे ‘प्रथम शिक्षक’ (पहिले गुरु) मानतो, ज्यांचे निःस्वार्थ दान मला वैद्यकशास्त्राचे ज्ञान आणि कला शिकण्यास मदत करेल. मी माझ्या संपूर्ण अभ्यासात व्यावसायिकता, गोपनीयता (निजता) आणि नैतिक आचरण पाळेन. मी या दात्याने केलेल्या सर्वोच्च त्यागाचा सन्मान करेन आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी, करुणेने आणि सचोटीने करेन. माझ्या या ‘मौन शिक्षकांचे’ (Silent Teachers) अमूल्य योगदान माझ्या सदैव स्मरणात राहील आणि मी त्याचा आदर करेन. ” समाजात आणि समाजातील विविध स्तरांमध्ये विविध प्रकारचे लोक असतात. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट स्तरामधली आहे म्हणून ती अमुक एक प्रकारे वागेल असे नसते. सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणातील व्यक्तीला वैद्यकीय अभ्यासक्रमात कसा प्रवेश मिळाला आहे, याच्या चर्चेस अर्थ नाही! व्यक्तीवरील संस्कार हे हल्ली काही समाजसापेक्ष राहिलेले नाहीत. एकूणच तरुणांची बदललेली मानसिकता आणि सामाजिक अस्वास्थ्य ही मुख्य कारणे आहेत. असो.
मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी देणे आणि मग विद्यार्थ्यांना त्याच्या साहाय्याने शिकवले जाणे आणि त्यासाठी त्या देहाचे विच्छेदन करणे वेगळे… आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करणे वेगळे. शिकवण्यासाठी उपयोगात आणला जाणारा देह क्रमाक्रमाने विच्छेदीत केला जातो. अभ्यास शाखेनुसार ते ते विद्यार्थी विशिष्ट अवयवाचा विशेष अभ्यास करतात. उदा. नेत्रतज्ज्ञ होण्यासाठी विद्यार्थी डोळे आणि तत्सम भागाचा अभ्यास करतील आणि त्यासाठी दान दिलेल्या देहाच्या संबंधित भागाचा अभ्यास करतील. आणि हे तज्ज्ञ, अनुभवी, निष्णात वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्या देखरेखीखाली केले जाते! तर उत्तरीय तपासणीत देह एकदाच विच्छेदित केला जातो, निष्कर्ष नोंदवले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. मृत्यूच्या कारणांची सखोल तपासणी आवश्यक असल्यास त्यादृष्टीने महत्वाचे अवयव/त्यांचे नमुने राखून ठेवून ते संबंधित प्रयोगशाळांकडे पाठवले जातात. गुन्ह्यासंदर्भात काहीवेळा पुन्हा विच्छेदन केले जाऊ शकते.
मनुष्य जिवंत असताना त्याचा देहाचा योग्य तो सन्मान राखला जाणे गरजेचे, अपेक्षित असले तरी निर्जीव देहाचाही तेवढाच सन्मान राखला जाणं नीतिमत्तेस धरूनच आहे. सर्वच माणसांची वागण्याची, विचार करण्यची पद्धत एकच असेल, असं होत नाही. किमान सार्वजनिक जीवनात आदर्श नीतीमत्तेने वागणे हा संबंधित व्यक्तीवर झालेल्या संस्कारांचा, किंवा त्या व्यक्तीने स्वत:वर केलेल्या संस्कारांचा, परिसर, मित्र यांनी टाकलेल्या प्रभावाचा भाग असू शकतो. कुणाच्या मनात काय सुरु आहे, त्याला काय म्हणायचे आहे, त्याला काय वाटते यावर इतरांचे काहीही नियंत्रण असू शकत नाही.
वैद्यकीय क्षेत्राचे मानवी जीवनात अत्यंत मोठे स्थान आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती सन्माननीय ठरतात. यांत अनेक त्यागी व्यक्ती समाजाने पाहिल्या आहेत. काही व्यक्तींच्या वर्तनाने संपूर्ण गटाला दोषी ठरवणे खूप चुकीचे आहे. या क्षेत्रातील लोक दुर्गंधी सहन करतात, बहुतेक वेळा आव्हानात्मक, नकारात्मक वातावरणात काम करीत असतात, त्यांच्या प्रती आपण आभारी असले पाहिजे!
देहदान, त्या देहाचे विच्छेदन करताना संबंधित वैद्यकीय विद्यार्थ्यांचा आपापसांत झालेला तथाकथित अश्लील संवाद याबाबत सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावरून देहदानाबाबत काही ऊहपोह सुरु आहे. या चर्चेच्या दरम्यान एका महिलेने फेसबुक comment मध्ये “मी देहदानाचा संकल्प रद्द करते आहे” अशा आशयाचे विधान केलेले वाचले. यावरून सार्वजनिक ठिकाणी, उघडपणे बोलल्या गेलेल्या शब्दांचे परिणाम समाजावर किती दूरगामी होऊ शकतात, याची कल्पना यावी. हे नुकसान सहजी भरून येणारे नाही. मात्र देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. आपले जनमानस तसे विचारी आहे, या एका प्रकारामुळे लोक य देहदानासारख्या पवित्र कार्यापासून दुरावले जाणार नाहीत, अशी खात्री आहे आणि अपेक्षासुद्धा!
देहादानात आलेला देह आपल्या सास-यांचा आहे हे माहीत असूनही त्या देहाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देणा-या एका महिला डॉक्टर यांच्या विषयी मी वाचले आहे… त्यामुळे किमान माझी तरी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबद्दलची आदराची भावना कायम आहे. कुणा अविचारी, उथळ व्यक्तीच्या तद्दन घाणेरड्या शेरेबाजीमुळे ही भावना दुखावली जाणार नाही! जगाच्या बाजारात मातीही मिळते आणि मोतीही… काय घ्यायचे आपण ठरवायचे!
(मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही. केवळ माहिती घेऊन लिहिले आहे. यातील तांत्रिक माहिती चुकीची, अपुरी असू शकते. देहदानास पाठिंबा आणि कायद्याने अत्यावाशाय्क असलेल्या मरणोत्तर वैद्यकीय तपासणीचा पुरस्कार यासाठी हा लेख लिहिला आहे. खम्मम येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या गेलेल्या शपथेचे छायाचित्र संदर्भांसाठी साभार वापरले आहे.)
समर्थ रामदासस्वामींची प्रस्तुत रचना ही पारंपरिक भक्तिपर प्रार्थनेच्या चौकटीत बसणारी असली, तरी तिचा आशय केवळ वैयक्तिक मोक्षाभिलाषेपुरता मर्यादित नाही. ही गुणयाचना आहे; आणि ती व्यक्तिमत्त्वविकास, लोकसंघटन आणि धर्मसंस्थापना यांचा सूचक आराखडा मांडते. प्रस्तुत लेखात या प्रार्थनेतील मागण्यांची तार्किक संगती, त्यांचे आध्यात्मिक व सामाजिक आशय, तसेच समर्थांच्या धर्म–राष्ट्रकार्याशी त्यांचे नाते यांचा विचार केला आहे.
वाणी आणि करणी : नैतिक अधिष्ठानाची संकल्पना
“कोमल वाचा” आणि “विमल करणी” या दोन संकल्पना समर्थांच्या नैतिक दृष्टिकोनाचा पाया दर्शवितात. वाणीतील कोमलता ही संवादक्षमतेचे, तर करणीतील विमलता ही आचरणशुद्धीचे प्रतीक आहे. संतपरंपरेत वाणीचे महत्त्व अधोरेखित झालेले असले, तरी समर्थ येथे वाणी–करणी सुसंगतीवर विशेष भर देतात.
यातून एक मूलभूत तत्त्व स्पष्ट होते : _नैतिक विश्वसनीयता हीच नेतृत्वाची पूर्वअट आहे_.
प्रसंगावधान आणि ‘धूर्त कळा’ : संताची व्यवहारदृष्टी
“प्रसंग ओळखी” आणि “धूर्त कळा” ही मागणी विशेष लक्षणीय आहे. संतस्वभाव आणि राजकीय व्यवहारदृष्टी यांचा समन्वय येथे दिसतो. ‘धूर्त’ हा शब्द येथे नकारात्मक अर्थाने नसून, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून यथायोग्य कृती करण्याची चातुर्यदृष्टी दर्शवितो.
शिवकालीन अस्थैर्य, सामाजिक विघटन आणि परकीय सत्तेच्या पार्श्वभूमीवर धर्मसंरक्षणासाठी ही व्यवहारबुद्धी आवश्यक होती. समर्थांच्या दासबोधातील उपदेशांमध्येही ही व्यावहारिकता जागोजागी स्पष्ट दिसते.
हितकारकता, बहुजन मैत्री आणि लोकाभिमुख साधना
“हितकारक”, “जनसुखकारक” आणि “बहुजन मैत्री” या मागण्या समर्थांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक आहेत. साधना ही समाजविरहित नसून समाजाभिमुख असावी, ही त्यांची भूमिका होती.
समर्थांनी उभारलेली मारुती मंदिरे, मठसंस्था आणि व्यायामप्रणाली या धार्मिक संस्थांइतक्याच सामाजिक संघटनकेंद्रे होत्या. व्यक्तीची नैतिक व शारीरिक उभारणी ही राष्ट्रधर्माच्या पुन:स्थापनेसाठी आवश्यक असल्याचे समर्थ मानतात.
विद्या, उदासीनता आणि नम्रतेचे तत्त्वज्ञान
“विद्या वैभव” आणि त्यासोबत “उदासीनता” यांची संयुक्त मागणी ही संतुलित दृष्टी दर्शवते. विद्या प्राप्त झाली तरी तिचा अहंकार नको; वैभव आले तरी आसक्ती नको.
“मागो नेणे दे” ही ओळ मानवी मर्यादेची जाणीव व्यक्त करते. ईश्वरनिष्ठा आणि नम्रता या समर्थांच्या आध्यात्मिकतेच्या मूलभूत अटी आहेत.
कला, शब्दसामर्थ्य आणि सावधता : जनजागृतीची साधने
संगीत, गायन, प्रबंध, कथा, शब्दमनोहरता, या सर्व मागण्या समर्थांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती साधली.
“सावधपणा” आणि “बहुत पाठांतर” या मागण्या आत्मशिस्त व अध्ययनशीलता दर्शवितात. समर्थांची साधना भावनावादी नसून अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध आहे.
अभेद भक्ती ते ब्रह्मानुभव : साधनेची अंतर्मुख परिणती
प्रार्थनेच्या उत्तरार्धात मागण्या अधिक सूक्ष्म होत जातात. “अभेद भक्ती”, “आत्मनिवेदन”, “तद्रूपता”, “ब्रह्म अनुभव”.
येथे साधनेचा क्रम स्पष्ट दिसतो :
भक्ती → आत्मसमर्पण → अहंनिवृत्ती → ब्रह्मानुभव.
“मजवीण तू मज दे” ही ओळ अद्वैतानुभूतीचे संकेत देते. ही व्यक्तिनिष्ठ अध्यात्मिकता असली, तरी तिचा परिणाम समाजाभिमुख कर्तृत्वात होतो.
गुणयाचनेतील तार्किक संगती
ही प्रार्थना विस्कळीत मागण्यांचा संच नाही. तिची अंतर्गत रचना क्रमबद्ध आहे :
हा क्रम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सूचित करतो.
समर्थांचे धर्म–राष्ट्रकार्य : गुणांचे कार्यरूप
समर्थांनी प्रत्यक्ष कार्यातून या संपादित गुणांचे प्रकटीकरण केले. छ. शिवाजी महाराजांना दिलेले आध्यात्मिक अधिष्ठान, संघटनप्रवण उपदेश, ‘दासबोधा’तील व्यवहारमार्गदर्शन आणि ‘मनाचे श्लोकां’तील आत्मशिस्त — हे सर्व या गुणयाचनेचे कार्यरूप आहे.
त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे केवळ उपासना नव्हे; तो समाजनियमन, नैतिकता आणि राष्ट्रस्वातंत्र्याचा मूल्याधार आहे.
समारोप:
समर्थ रामदासांची ही गुणयाचना ही संतपरंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती वैयक्तिक मोक्षाभिलाषा आणि सामाजिक दायित्व यांचा समन्वय साधते.
“कोमल वाचा” पासून “मजवीण तू मज दे” पर्यंतचा प्रवास हा व्यक्तीच्या बाह्य शुद्धीपासून अंतर्मुख अद्वैतानुभवापर्यंत आणि तेथून समाजाभिमुख कर्तृत्वापर्यंत जाणारा आहे.
म्हणूनच ही प्रार्थना केवळ भक्तिसाहित्याचा भाग न राहता, राष्ट्रधर्माच्या तात्त्विक अधिष्ठानाचे विधान ठरते.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
(समर्थांनी रामाकडे केलेली गुणयाचना)
*
कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम ।
प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम ॥ १ ॥
* हितकारक दे रे राम, जन सुख कारक दे रे राम ।
अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम ॥ २॥
*
विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम ।
मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम ॥ ३॥
*
तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम ।
संगित गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम॥ ४ ॥
*
धात माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम।
रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम ॥ ५॥
*
दस्तक टाळी मज दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम।
प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम ॥ ६ ॥
*
सावध पण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम।
दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम ॥ ७ ॥
*
पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम।
अभेद भक्ती दे रे राम, आत्म निवेदन दे रे राम ॥ ८ ॥
*
तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम ।
सज्जन संगती दे रे राम, अलिप्त पण मज दे रे राम ॥ ९ ॥
*
ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम ।
मजविण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम॥ १० ॥
☆ पाण्याची expiry date! – – – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆
तुम्हाला पाण्याची मुदतीची तारीख माहित आहे का?
… काही लोक फक्त एक दिवसाचे पाणी फेकून देतात…
… काही जण आठवडाभर साठवलेले पाणी पितात…
… तरीही, हजारो वर्षे जमिनीखाली राहिलेले पाणी आपण सर्वात शुद्ध आणि सुरक्षित मानतो!
– – – – तर मग, पाण्याची खरी मुदतची तारीख काय आहे?
… जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर समजले, तर पाण्याबद्दलचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो.
बऱ्याचदा, आपण आपल्या सोयीनुसार आणि मानसिकतेनुसार पाण्याला एक “मुदतची तारीख” देतो. परंतु, प्रत्यक्षात अशा गृहितकांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. आपल्या सभोवतालच्या या मनोरंजक परिस्थितींचे निरीक्षण करा:
शहरांमध्ये.. जिथे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा दररोज होतो, तिथे लोक अनेकदा कालचे पाणी शिळे झाले आहे असे समजून फेकून देतात.
(त्यांच्या मते, मुदतची तारीख फक्त १ दिवसाची असते.)
ज्या भागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा होतो.. तेच पाणी दोन ते आठ दिवस कोणताही विचार न करता साठवले जाते आणि वापरले जाते.
(त्यांच्या मते, मुदत संपण्याची तारीख २ ते ८ दिवसांची असते.)
लग्नसमारंभात आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये.. पाण्याची नवीन बाटली उघडल्याबरोबर, आधी उघडलेली बाटली अनेकदा दुर्लक्षित केली जाते, सोडून दिली जाते किंवा फेकून दिली जाते.
(त्यांच्या मते, मुदत संपण्याची तारीख फक्त काही मिनिटे किंवा तासांची असते.)
पण सत्य वेगळेच आहे…
वाळवंटात, प्रवासादरम्यान, पाण्याचा पुढचा स्रोत मिळेपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आणि “ताजा” राहतो.
(मुदत संपण्याची तारीख: पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध होईपर्यंत.)
निसर्गात, धरणे आणि जलाशयांमध्ये साठवलेले पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत वापरले जाते आणि दुष्काळात ते दोन-तीन वर्षे समुदायांना पुरते.
(मुदत संपण्याची तारीख: अनेक वर्षे.)
बोअरवेल आणि जलस्तरांमध्ये – – आपण ५० ते ५०० फूट खोल पाण्यातून जे पाणी काढतो, ते शेकडो किंवा हजारो वर्षांपासून जमिनीखाली साठवलेले असू शकते. तरीही आपण त्याला पिण्याच्या पाण्याचा एक सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी स्रोत मानतो.
(मुदत: शेकडो किंवा हजारो वर्षे—कदाचित कधीच नाही.)
– – चिंतन करण्यासारखा एक विचार
वास्तविक पाहता, पाण्याला स्वतःची अशी कोणतीही मुदत नसते. त्याची उपयोगिता केवळ काळाच्या ओघावर नाही, तर त्याची स्वच्छता, साठवणुकीची परिस्थिती आणि उपलब्धता यावर अवलंबून असते.
जेव्हा पाणी मुबलक प्रमाणात असते, तेव्हा आपण त्याला ‘जुने’ किंवा ‘शिळे’ म्हणतो. जेव्हा टंचाई निर्माण होते, तेव्हा तेच पाणी अमृतासारखे मौल्यवान बनते.
म्हणून, आपण जबाबदारीने पाण्याचा वापर करूया आणि प्रत्येक थेंब जपून वापरूया. नाहीतर, पृथ्वीवरील पाणी संपण्यापूर्वीच, आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला तहानलेल्या अवस्थेत राहावे लागेल.
एक विनम्र विनंती
… हा केवळ एक संदेश नाही—हे आपल्या भविष्याचे रक्षण करण्याचे आवाहन आहे.
पाण्याच्या मूल्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी कृपया हा संदेश तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि समाजात शेअर करा.