श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
(अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मूळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे…! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार! )
इथून पुढे – –
आपला पाय तुटून पडला आहे याची अजय सिंग यांना बराच वेळ जाणीवच झाली नाही… अंगावर मांसाचे तुकडे चिकटलेले होते… रक्त लागलेले होते… पण त्यांचे सारे लक्ष लपून बसलेल्या शत्रूकडे केंद्रित झाले होते. त्यांनी त्या दिशेला रायफल वळवली आणि गोळीबार करण्याच्या पवित्र्यात आले!
सहकारी म्हणाला… ”अजय, एकही गोली चली है… ”
त्यावर अजय सिंग म्हणाले, ”ते त्यांच्या रायफली नीट साफ करीत नसतील म्हणून एकच गोळी सुटू शकली! ” याही परिस्थितीत दोघे हसले!
तेवढ्यात सहकाऱ्याचे लक्ष अजय सिंग यांच्या तुटून पडलेल्या पायाकडे गेले… बूट असलेला पाय रक्ताने माखलेला! “अजय… तुम्हारा पैर! ” सहकारी उद्गारला.
“सिर्फ एक पैर ही उड गया है.. बाकी बॉडी तो अभी ठीक है… पहले गोली कहां से आयी देखते हैं! ”
सहकारी अजय सिंग यांच्याकडे बघतच राहिला! खरं तर शत्रूच्या बाजूने गोळीबार झालाच नव्हता. क्लेमोर माईनसाठी जो डेटोनेटर असतो, तो या धावपळीत फुटला आणि त्याचा गोळीसारखा आवाज झाला होता… पण ते लगेच लक्षात आले नव्हते. अजयसिंग यांच्या सहकाऱ्याला वाटले की पाकिस्तान्यांनी बहुदा आर. पी. जी. (रॉकेट प्रोपेल्ड गन) फायर केली आहे ज्यामुळे मोठा खड्डा पडू शकतो!
इतरत्र लपून बसलेल्या पथकांनाही शत्रूचा गोळीबार झाल्याचे वाटले! अशा वेळेस तिथून सुरक्षित माघारी फिरणे हा मार्ग उरला होता. कारण त्या बाजूने पाकिस्तानी सेना येण्याची शक्यता होती, आणि आपले सैनिक जवळजवळ त्यांच्या सीमेत घुसले होते..! स्फोटाच्या आवाजाने पाकिस्तानची आणखी कुमक आपल्या मागावर येण्याची दाट शक्यता होती.
आता या जखमी अवस्थेत अजयकुमार यांना सोडून माघारी फिरता येणार नव्हतं… कुणाही सैनिकाला दुसरा सैनिक असं सोडून येत नाही!
अजय यांना खांद्यावर टाकून त्यांचा ‘Buddy’ (सहकारी) मागे निघाला.. त्यावर अजय म्हणाले… ”ठहर जा! जिसने गोली चलायी है उसे खतम कर के जायेंगे! ” यावर त्यांचे काही न ऐकता सहकारी पुढे चालत राहिला. अजय सिंग मात्र एका हातात तुटलेला पाय सावरत, दुसऱ्या हातातली एके-४७ रोखून सज्ज होते गोळीबाराला उत्तर द्यायला!
या पथकात अगदी हट्टाने सहभागी झालेला एक वैद्यकीय साहाय्यकही होता. त्याचा फायदा झाला. त्याने त्याच्याकडच्या चाकूने सलाईनची बाटली फोडली आणि ते सर्व द्रव अजय सिंग यांच्या जखमेवर ओतले. हे सर्व अंधारात होत होतं. विजेरी पेटवणे धोक्याचे होते! द्रव ओतल्यावर मात्र प्राणांतिक वेदना सुरु झाल्या. पण तोंडातून एक अस्फुट किंकाळीसुद्धा मारता येणार नव्हती!
आपल्या सहकाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मागे सोडून निघून यायचे नाही अशी पक्की शिकवण भारतीय सैनिकांना दिलेली असते. सहकारी म्हणजे Buddyचं स्वत:चं वजन ९५ किलो.. अजय सिंग त्याला म्हणाले, ”आपल्याला इथवर पोहोचायला दोन दिवस लागले होते. तू मला खांद्यावर घेऊन असं किती अंतर धावशील? मला इथंच सोड. मी मागे कुणी आले तर त्याचा समाचार घेईन! ” अर्थात buddy त्यांचं ऐकणार नव्हताच… त्याने अजय सिंग यांना उचलून धावायला सुरुवात केली!
स्ट्रेचर तयार करणे शक्य नव्हते. buddy ने अजय सिंग यांना स्वत:च्या पटक्याने स्वत:भोवती गुंडाळून घेऊन बांधले. पुढे तीस फूट खोल उतरून जायचे होते. तो अजय सिंग यांना घेऊन घसरत खाली गेला आणि दोघेही एका ओढ्यात कोसळले. सलाईनची सुई निघून आली. जखमेवरच्या पट्ट्या ओल्या झाल्या!
भारतीय सीमा अजून बरीच दूर होती. काल रात्री चालायला सुरुवात केली होती. आजच्या दिवसाची संध्याकाळ होत आली होती तरीही वाट उरकेना. पुढे चालताना एका दगडावरून buddy चा पाय निसटला आणि तो अजय यांना घेऊन खाली कोसळला.. यावेळी त्याचा पाय दोन दगडांच्या सापटीमध्ये विचित्र पद्धतीने अडकून बसला. घोटा सुजला. पाय बाहेर काढता येईना. मागून आलेले दोन सैनिक थांबले. त्यांनी त्या ओढ्यात पडलेल्या एका झाडाची जाड फांदी आणली आणि ते दोघे आणि अजय सिंग यांनी जोर लावून तो दगड थोडा बाजूला करण्यात यश मिळवले. buddy च्या पायातील बूट कापून काढावा लागला. सूज प्रचंड होती. पायाचे हाड मोडलेच असावे. तरीही त्याची अजय सिंग यांना खांद्यावर घेऊन चालायची तयारी होती! सोबत प्रत्येकी ३५ किलोचे ओझे होतेच!
आता पुढे आणखी दोन डोंगर चढून जावे लागणार होते. आता शत्रूच्या सीमेपासून काही अंतर पुढे आल्याने त्यांनी थांबून त्यांचे शर्टस, टीशर्टस फाडून स्ट्रेचर तयार केले. पहिला डोंगर चढण्याच्या प्रयत्नात अजय यांच्या पायाचे ड्रेसिंग निघून आले. अंधार आणि निसरडा रस्ता. अजय सिंग स्ट्रेचरवर जवळजवळ बसलेल्या स्थितीत होते. डोंगर चढताना ते ही हाताला लागेल ते गवत धरून जोर लावत होते. पुढे उतार लागला आणि हे सर्वजण पुन्हा खाली घसरून पडले.. पुन्हा उठले.. ”भाई को साथ लेके जायेंगे… ऐसे थोडेही न पिछे छोडके जायेंगे… ” हे म्हणताना आता ते सर्वजण हसत होते!
अजय यांच्या पायांतून रक्त जास्त वाहू लागल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी एक स्लीपिंग bag उपयोगात आणली. तिच्या आत अजय यांचा पाय सरकवला. आतल्या आत विजेरी चालू केली आणि त्या तेवढ्याशा उजेडात ड्रेसिंग केले! शत्रूला उजेड दिसला असता तर त्यांनी तिथे निश्चित गोळीबार केला असता!
सहकाऱ्यांचे हास्यविनोद सुरूच होते. मात्र त्यांच्या मनात अजय यांच्याबद्दल खूप काळजी दाटून आलेली होती. कारण जखमेतून खूप रक्त वाहून गेले होते! मोडलेल्या पायाने चालणारा पहिला buddy तिथवर पोहोचला आणि त्याने अजय यांना पुन्हा खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली…! Don’t Leave Enemies Alive… Don’t Leave Friends Behind! शत्रूला जिवंत सोडू नका… आणि मित्राला रणांगणात सोडून माघारी येऊ नका… असा भारतीय सैनिकांचा दंडक आहे!
आता ते एका पोस्टवर पोहोचले होते पण जिथून हेलीकॉप्टर मिळू शकेल अशी पोस्ट आणखी खूप दूरवर होती!
त्या पोस्टवर पोर्टर लोकांना बोलावून घेतले गेले. ते सारे जण जीवाच्या आकांताने अजय यांना घेऊन धावले. सकाळी साडेसात वाजता हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचले पथक…! रुग्णालयात पोहोचेपर्यंत अजय सिंग शुद्धीवर होते… आणि शांत होते! त्यांचा पाय आणखी वरपर्यंत कापून काढावा लागला!
आपल्याला काही झाले तर घरच्यांना कळवावे यासाठी अजय यांनी त्यांच्या हातावर घरचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता. पण इकडे मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांच्या युनिटमधील एका सैनिकाकडून त्यांच्या गावातील एकाचा क्रमांक मिळवला आणि संपर्क साधला. पण अजय यांचे वडील शेतात गेलेले होते. काही वेळाने त्यांच्याशी बोलणे झाले. साहेब म्हणाले, “आपल्या मुलाचा एक पाय तुटला आहे… पण बाकी शरीर सुरक्षित आहे.. जीवाला धोका नाही! ” त्यावर वडिलांना विश्वास बसला नाही. ते म्हणाले, “अगर ठीक है तो मेरी उसकी बात करावो साब! ”
यावेळी अजय यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले होते त्यामुळे लगेच त्यांच्याशी बोलणे करून देणे अशक्य होते. साहेब म्हणाले, “अभी बात नहीं हो सकेगी! ” त्यामुळे तर वडिलांची खात्रीच पटली.. आपला अजय गेला! त्यांनी घरी काहीही सांगितले नाही. अजय यांच्या पत्नीला सांगितले की तिच्या माहेरच्या एका माणसाचा रस्ता अपघात झाला आहे, त्याला बघायला जातो आहोत.. आणि ते लगोलग जीपमधून श्रीनगरकडे निघाले सुद्धा!
अजय यांच्या मातोश्रींना मात्र अंदाज आला होता.. कारण अजयच्या वडिलांनी तिला एकांतात घेऊन सांगितले होते… ”अजय को प्रोब्लम हुवा है! ”
इकडे अजय यांच्या पायांवर प्रारंभिक उपचार झाले आणि त्यांना बाहेर आणण्यात आले. साहेबांनी पुन्हा अजय यांच्या वडिलांना फोन लावला. त्यावर त्यांना अजयच फोनवर बोलत आहेत यावर विश्वास बसला नाही. त्यावर त्यांच्या सोबत जीपमध्ये असलेल्या व्यक्तीने अजय यांचा फोन घेतला आणि खात्री करून घेतली की अजय जिवंत आहेत! अजय त्यांना सांगत होते की, तुम्ही माघारी जा. इथवर येण्यास खूप वेळ लागेल. बरा झालो की मी गावी येणारच आहे लवकर. पण बापाचे काळीज काही मानायला तयार होईना!
इकडे गावात कर्णोपकर्णी वार्ता पसरली. लोकांची अंत्यविधीची तयारी झाली. अजय यांच्या पत्नीला मात्र काहीच खबर नसल्याने त्या शेजारी जाऊन हास्यविनोद करून येत होत्या, नेहमीची कामेही सुरु होती. अजय यांच्या मातोश्री मात्र त्यांना चोरून लपून रडून घेत होत्या. सुनेला धक्का बसू नये याची त्यांना काळजी होती! शेवटी त्या गावातल्या मंदिरात जाऊन बसल्या!
अजय यांच्या वडिलांना त्यांच्या धाकट्या मुलाचा फोन आला. त्यांनी परिस्थिती सांगितली. तोही म्हणाला, ‘जब तक शकल न देखो… तब तक वापीस नहीं आना! ‘
अजयचे वडील शेवटी खूप तासांनी श्रीनगरमध्ये पोहोचले. पोराचा एक पाय तुटलेला त्यांनी पाहिला आणि रडतच बाहेर पडले. माघारी निघाले आणि अर्ध्या वाटेतून माघारी फिरले.. रुग्णालयात आले म्हणाले… एकच पाय पाहिला… दुसरा पाय दाखव!
संपूर्ण उपचार प्रक्रियेत अजय यांनी वेदना मोठ्या धीराने सहन केल्या. कितीही दुखले तरी ते चेहऱ्यावर दाखवत नसत… जणू आपण किती वेदना सहन करू शकतो याची ते स्वत:च स्वत:ची परीक्षा पहात होते.. यावर डॉक्टरही आश्चर्यचकीत होत असत! पाय अनेक वेळा कापावा लागला, त्यात संसर्ग झाला. पण सोबती असलेल्या buddy ने खूप सेवा केली आणि पाय वाचवला.
पुढील उपचारांसाठी अजयकुमार पुण्याच्या लष्करी उपचार केंद्रात आले. त्यांच्यासारखे कित्येक जखमी सैनिक त्यांनी पाहिले आणि आपली परिस्थिती बरी आहे, याची जाणीव त्यांना झाली. पण आपण असे पंगू होऊन राहायचे नाही, अशी त्यांनी मनोमन प्रतिज्ञा घेतली. कित्येकवेळा शस्त्रक्रिया झाल्या.. पण या सर्व वेदनांवर मात करीत ते कृत्रिम पाय लावून, काठीच्या आधाराविना चालायला आणि पुढे पळायलाही शिकले! आणि पुन्हा सेनेत सहभागी झाले. पूर्ण कार्यक्षमतेने. पण आता प्रत्यक्ष लढाईला जाता येणार नव्हते!
परंतू कामाच्या दर्जामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर आफ्रिकन देशांत दोन वेळा धाडले गेले. तेथेही त्यांनी पारितोषिकप्राप्त कामगिरी बजावली. पण पायाला कृत्रिम पायामुळे जखमा होत होत्याच. सहकारी सैनिक, अधिकारी यांनी वैय्यक्तिक पातळीवर आर्थिक मदत उभारून परदेशातून उच्च दर्जाचा कृत्रिम पाय उपलब्ध करून घेतला!
या सर्व प्रवासात त्यांचे सहकारी त्यांच्या मागे सावलीसारखे उभे होते. एकदा ते मेस मध्ये सर्वांसोबत भोजन करीत होते. खीर आणायला उठले आणि त्यांच्या हातातली खिरीची वाटी खाली पडली. खीर जमिनीवर सांडली. ते पाहून त्यांचा buddy पुढे आला. त्याने ती जमिनीवर पडलेली खीर हाताने खायला सुरुवात केली… म्हणाला.. माझ्या भावाची खीर आहे… यावर सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते… सैनिक एकमेकांचे बंधू असतात ते असे…!
सैनिकी सेवेत काही जगावेगळे करावे असे या वीर सैनिकाच्या मनाने घेतले आणि मग एक निराळाच प्रवास सुरु झाला. पाठीवर दहा किलोचे ओझे, पूर्ण युद्धसाहित्य घेऊन चालण्याचा अहोरात्र सराव केला. पाय चांगला असताना अजयकुमार पर्वतारोहण अतिशय वेगाने करण्यासाठी प्रसिद्ध होते. कृत्रिम पायाच्या साहाय्याने हवालदार अजयकुमार जगातील सर्वांत उंचावर असलेली युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टपर्यंत चढले… त्यांच्या समवेत असे आणखी आठ जवान होते… हा एक जागतिक विक्रम ठरला.
पुढे अजयकुमार यांनी या पायांवर विमानातून छत्रीच्या साहाय्याने यशस्वी उड्या मारल्या. स्कुबा डायविंग शिकून घेतले. नेमबाजीत केवळ ४५ दिवसांचा सराव करीत राष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवले. देशभरातल्या अनेक marathon स्पर्धांत सहभाग घेतला.
अजयकुमार आता तरुणांसाठी प्रोत्साहन देण्याचे उपक्रम करतात. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी ते अपुरेच वाटेल अशी त्यांची कामगिरी आहे. असे सैनिक भारतीय सैन्याला लाभले हे देशाचे सुदैवच म्हणावे लागेल!
— समाप्त —
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





