मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतोे.रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.

नाशिक आलं तसा एक देखणा तरुण ब्यागा घेऊन आत चढला.माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली.तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली.तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !

“कुठं जाताय?”तो तरुण मला विचारत होता.

“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.

” थोडं लक्ष ठेवाल का?मिसेस गोंदीयाला जातेय.एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे” 

तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.

” हो ठेवेन की.त्यात काय विशेष!”

मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली.गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं.समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली.माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती.खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती.मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या.त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती.तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते.विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती.माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती.बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे.पण तीची फिगर अतिशय सुरेख होती.मनात विचार आला,स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का?की हिच्यापेक्षा जास्त?नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.

मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो.ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती.मुलाला बाटलीने दुध पाजतांना,त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.

एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं.तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली.नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती.पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा,भडकपणा नव्हता.घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती.काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं.ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा  तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती.

मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.

आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो.भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा.तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.

“या जेवायला”

अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम  गडबडून गेलो.

” मी आताच जेवलो बघा”

ती सौम्य हसली. मग म्हणाली

” हो पाहिलं मी.हे स्वीट तरी घ्या” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली.मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.

” नागपूरला रहाता?”

तिनं जेवता जेवता विचारलं.

“नाही.इंटरव्ह्यूला चाललोय”

” कोणत्या कंपनीत?”

मी कंपनीचं नाव सांगितलं.

“इंजीनियर आहात?”

“हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये” मी जरा अभिमानानेच सागितलं.

“मी सुध्दा इंजीनियर आहे”ती म्हणाली.”एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”

मी वरमलो.माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.

” मग जाँब करताय कुठे?”मी विचारलं

” नाही.करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं.”

” मिस्टर काय करतात तुमचे?”मी थोडं इर्ष्येने विचारलं.

” ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात.” 

” फँक्टरीज?”

” हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे,मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “

बापरे!मी गार झालो.एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो.तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो.माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील.तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती.कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.

” तुम्ही एकट्याच जाताय?नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?”

एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं

“का? कशासाठी?नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं.गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच.एका रात्रीचा तर प्रश्न होता.तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत.त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं “

” तरीपण कुणीतरी..….”

“अहो मागच्या महिन्यात  मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले,आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला.हा तर आपला महाराष्ट्र आहे.इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.

क्रमशः…

© श्री दीपक तांबोळी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-4☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागत आपण पाहिले,- ‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’  ‘नको. गावाकडची  दोघे-तिघे  आहेत.’ आता इथून पुढे )

ती आनंदाला सोडून गेली. तिला यायला दुपारचे तीन वाजले होते. नंतर तिने आंघोळ केली. मी दिलेली साडी नेसली. तिला जेवायला वाढलं. त्याक्षणी जीवनातील तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याप्रमाणे,  ती एकेक घास मनापासून खाऊ लागली.

जेवण झाल्यावर तिला विचारलं,  ‘असं कसं झालं?’

ती म्हणाली, ‘रात्री दारूच्या नशेत गवताच्या गंजीवर जाऊन झोपला. झोपेत कधी तरी साप चावला. ओरडलासुद्धा  नाही. सकाळी  बघितलं तर काळा-निळा पडलेला. झोपण्यासाठी खाट आणायला  दोनदा पैसे साठवले होते. दोन्ही वेळा दारूत उडवले.’

मी  म्हंटलं,  ‘आता कसं  करणार?  डोंगराएवढं आयुष्य पुढे पडलय….’

‘मी  कष्टांना  घाबरत  नाही.’  मग जरा घुटमळली मग म्हणाली,  ‘मला थोडं  बोलायचय. आनंदाचं शाळेत जायचं वय झालय. त्याला तुमच्याकडे  ठेवू का? तुमच्याकडे  राहिला,  की चांगला शिकेल.  फुकट ठेवणार नाही. त्याच्या खर्चाची पै न पै मी देईन. मुलाला पोसायला माझे हात समर्थ आहेत. शे-सव्वाशे तरी दुध्या कोहळ्याचेच होतील. शिवाय भाजीपाला आहे. एखादी गाय पाळीन. म्हणजे दुभतं होईल. थोडं घरात. थोडं विकायला. माझ्या आनंदानं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, असं वाटतय मला. तसंही तो असता, तरी मी आनंदाला इथेच ठेवायचं ठरवलं होतं. त्याच्या सावलीत मला माझ्या मुलाला मुळीच वाढू द्यायचं नव्हतं.’

मग पुढे म्हणाली, ‘गावात तूर मका उगवेन. पेरू,  डाळिंबाची लागवड करेन. गावातील घर-शेत संभाळेन आणि इथे तुमचं अंगण, परसूही बघेन. साफ-सूफ करेन. फुला-फळांची रोपे लावेन.’

मी मुग्ध होऊन ऐकत राहिले. तिच्या बोलण्यातली जादू मला संमोहित करत होती. मला घरातले हंडे-कळशा झळझळलेल्या दिसू लागल्या. मागच्या बाजूच्या मुलूल पडलेल्या लिंबा-डाळिंबाच्या डहाळ्या टवटवित झाल्या. अंगणात चारी बाजूंनी पांढर्या  पिवळ्या फुलांच्या वेलींवर फुलांचे झुबके झुलू लागले.

मी म्हंटलं,  ‘हे घर तू आपलंच घर समज. तुझ्या मुलाला इथे कष्ट होणार नाहीत.’

ती थोडी थांबली. नंतर एखाद्या दु:स्वप्नातून मुक्त होत असल्यासारखी म्हणाली,

‘कुणाला आवडणारी लाजरी,  नखरेल कटाक्ष टाकणारी सुंदर पत्नी होणं, माझ्या आवाक्यात नव्हतं. हा देह,  हे रूप माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाधा होती. पण चांगली आई होऊन दाखवणं, तर माझ्या हातात आहे ना?  आई-मुलामध्ये कुरुप शरीर कधीच बाधा आणत नाही. हा मोठ्ठाच फरक आहे मर्द आणि मुलगा यात!’

तिचा सहा वर्षाचा मुलगा कधीपासून बावचळून आईच्या पदराला चिकटून उभा होता.

‘निघते….’ तिने मुलाचं बोट धरलं. ‘घराचं छप्पर मोडलय. ते दुरुस्त करायचय. दुसर्या् नांगराची व्यवस्था करायला हवी. ‘

ती गेली. दूरवर जात दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोर्याो  आकृतीकडे पहात राहिले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.)

पुढे आणखी काही दिवसांनी आणखी काही बातम्या आल्या. याच्या विपरितशा. मामाला दारूचं व्यसन लागलय. पैसे हाती आले, की नशापाणी करतो. पैसे नाही मिळाले, तर घरातल्या हाताला लागतील त्या वस्तू विकतो. तिने आपला कोल्हापूरी साज विकून नांगर आणला, तर मामाने पुन्हा तो नांगर विकून टाकला. कारण विचारलं, तर बाळंतपणाचा खर्च कुठून करायचा म्हणाला.

तिला मुलगा झाला. तिच्यासारखा नव्हे. मामासारखा गव्हाळी वर्णाचा. गोंडस. तो तिचा आनंद होता. तिचं सुखनिधान होतं. तिने मुलाचं नाव आनंद ठेवलं. मामाला असं झालं होतं, की ती कधी एकदा बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर येते आणि नेहमीसारखी विहिरीवरून पाणी आणणं, शेतात खपणं वगैरे कामे करते. रोजच्या रोज विहिरीतून कोण पाणी ओढणार? आपल्याच्यानं नाही होणार!

दहा दिवस सरले आणि तिने बाळंतिणीची खोली सोडली. ती पुन्हा कामाला लागली. घरात-शेतात राबू लागली. काटकी काटकी जोडून संसार बांधू लागली. शेतात पीक उभं राहिलं. लोक मामालाम्हणाले, ‘सगळं बायको करतेय. तू निदान राखण तरी कर. ‘ तो रात्रीचा राखणीला गेला. दारूचा अंमल जरा जास्तच झाला होता. मचाणावर आडवा पडला. रात्री चोरांनी उभं पीक कापून नेलं. याला जाग आली नाही. नंतर एकदा कोहाळे काढून ढीग लावून ठेवला होता. रात्री रानांजरं आली. कोहाळ्यांचा सत्यानाश झाला. हा दारूच्या नशेत.

मामाचं दारूचं व्यसन आता खूपच वाढलं होतं. ती काटकी काटकी जोडत होती. तो मोडून खात होता. अशातच तिचा आनंद वाढत होता. आता तो रांगायला लागला होता. ती एकदा विहिरवर धुणं धुवयला गेली. तिथेच असलेल्या सदाला त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणून सांगून गेली. ती धुणं धुवून येते, तर आनंदाने रांगत जाऊन चुलीतल्या गरम राखेत हात घातला. चटका बसताच रडायला लागला. सदा तिथेच, पण दारूच्या अमलाखाली. आनंदला जाऊन उचलणं, त्याला सुधारलं नाही. पुढे त्याला शहरातल्या दवाखान्यात नेऊन औषधपाणी करावं लागलं. आता तिने आनंदच्या बाबतीत त्याच्यावर विसंबणं सोडून दिलं.

दिवसामागून दिवस, रात्रीमागून रात्री, दिवस, महिने, वर्षं सरत होती. आमच्या घरातली मुलेही कुणी शिकण्यासाठी, कुणी नोकरीधंद्यासाठी शहरगावी जाऊन स्थिरावली. इथे आम्ही चार-सहा जणच उरलो. सगळ्या गावची अशीच तर्हार.

एक दिवस सुनुमामी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हाताशी धरून माझ्या दारात उभी राहिली.

‘सुनुमामी तू?… आणि मामा कुठाय?’ तिने गल्लीच्या तोडाशी उभ्या असलेल्या हातगाडीकडे बोट दाखवलं. त्यावर मामाचं प्रेत बांधलं होतं. तिथे आणखी दोघे-तिघे उभे होते.

‘म्हणजे मामा…’ मी न बोललेले शब्द जसे तिने ऐकले.

‘तो जिवंत होता कधी?’ प्रश्नाचं उत्तर तिच्या डोळ्यात होतं.

इथपर्यंत याला घेऊन आले. इथून पुढे नेणं काही शक्य नाही. आनंदाला इथे ठेवते. मला यायला दोन-तीन तास तरी लागतील.’

‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’

‘नको. गावाकडची दोघे-तिघे आहेत.’

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – या घरात आपला नवरा आणि आपण अश्रित आहोत, याची जाणीव तिला घरी आल्या आल्या दोन दिवसातच झाली होती. आता इथून पुढे)

एक दिवस गावाकडून निरोप आला,  सुनुमामीचे वडील अत्यावस्थआहेत. ती गावी जायला निघाली. आण्णा सदाला म्हणाले,  ‘तूही जा.’

‘मी जाऊन काय करणार?’

‘जे तिथे जाऊन करावं लागेल,  ते करायचं.’

सुनुमामीने पिशवी भरली. रोजच्या नेसायच्या दोन साड्या,  सदामामानं  अरेबियन नाईट्सचं पुस्तक पिशवीत टाकलं. सुनुमामीचे वडील तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. तिला बघण्यासाठी,  भेटण्यासाठीच जणू त्यांनी आपल्या कुडीत प्राण राखून ठेवले होते. सुनु आली. त्यांनी तिच्या डोक्यावरून, अंगावरून हात फिरवला. सुनु त्यांना थोपटत राहिली. हळूहळू त्यांचा श्वास कमी होत होत एका क्षणी थांबला. सुनुच्या डोळ्यातून जसा पाऊस सांडला. पण थोड्या वेळाने तिने स्वत:ला सावरले. शेजारी-पाजारी आधीपासूनच जमले होते. त्यांनी पुढची व्यवस्था केली.    

सुनुने स्वत:च वडलांना अग्नी दिला. मामा मात्र  त्याचा कशाशीच संबंध नसल्यासारखा बसून होता. दुसर्या: दिवशी घरी निघून गेला. सुनुमामी सगळे दिवस वगैरे यथासांग करून घरी परत आली. त्या पूर्वी तलाठ्याकडे जाऊन घर, जमिनीला आपलं नाव लावून आली. एका शेतकर्या.ला आपली जमीन अर्धुलीनं करायला देऊन आली.

दिवस सरत होते. एक दिवस माझी मुलगी मंजू म्हणाली, ‘आई, सुनुमामीच्या साड्या किती  विरल्यात  बघ.’ माझ्याही लक्षात आलंच होतं आणि दोन घरात  नेसायच्या बर्या  साड्या काढून ठेवाव्या असं म्हणत होते. एव्हाना कापणीचा हंगाम आला होता. सुनुमामी म्हणाली,  ‘चार दिवस गावाकडे जाऊन येते.’ तिच्या शेतात ज्वारीची मळणी चालू होती. आपल्या देखरेखीखाली तिने निम्मी ज्वारी घरात टाकायला लावली. एक पोतंभर ज्वारी भरून बाजूला ठेवली. गावात गुर्हाहळं लागली होती. गूळ करणं चालू होतं. एकाला ज्वारी देऊन बदल्यात गुळाची ढेप आणली. एकाला ज्वारी देऊन बदल्यात शेंगांचं पोतं घेतलं. बाकीची ज्वारी जयराम वाण्याला विकली. त्यातून स्वत:साठी दोन फिक्या रंगाच्या नाजुक फुलांचे  डिझाईन असलेल्या वायल घेतल्या. दोन पोलकी शिवून घेतली. दोन परकर आणले. मामासाठी दोन पायजमे,  कुडते, एक टेरिलीनची पॅंट बुशशर्ट घेतला. गाडी केली आणि सगळं घेऊन घरी आली. शेंगा, गूळ पाहून पोरं खूश. मामाने कपडे पुन्हा पुन्हा पारखून बघितले. ‘हं! बरय कापड!’ तो उद्गारला.

असेच आणखी काही दिवस गेले आणि तिच्या लक्षात आलं,  आपल्याला काही तरी होतय. एक नवा जीव तिच्या पोटात अंकुरत होता. ती खुशालली. घरात बाया-बापड्यांची मात्र बडबड सुरु झाली. ‘ आता हीचं बाळंतपण,  सेवा-सुश्रुषा,  खाणारी तोंडं दोनाच्या ऐवजी तीन होणार…’

एक दिवस तिने सांगून टाकलं,  मी माझ्या गावी जाऊन माझा संसार मांडते.’ घरातल्यांना हुश्श्य  झालं. सुंठीवाचून खोकला जातोय. जाऊ दे. तिने आपलं सामान गोळा केलं. गाठोडं बांधलं. पिशवी भरली आणि निघाली. घरचे मामाला म्हणाले, ‘तू पण नीघ.’

‘पण मी तिथे जाऊन  काय करू?  ना पाणी ना वीज.’ मामा कटकटला.

‘असं आहे. दिवस गेलेली बाई. पहिलटकरीण. एकटी  गेली, तर लोकात तरी बरं दिसेल का?’  मामाला  मग  निघावंच  लागलं. घराला चिकटलेलं बांडगूळ असं अचानक दूर करता आलं.

नंतर अधून मधून गावाकडच्या काही बातम्या येऊ लागल्या. तिने छप्पर नीट बांधून त्यावर कोहळ्या,  भोपळ्याचे वेल चढवलेत. दोडके,  शेंगा,  दुधे लावलेत. रेताड जमिनीत तूर आणि हरभरा लावलाय. निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.

क्रमश: …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सुनुमामी  म्हणजे  आमच्या  सदामामाची  बायको. सुनीता. तिला सुनीता या नावाने कुणीच,  कधीच   हाका  मारल्या  नाहीत. सदा मामा लग्न करून तिला घरी  घेऊन  आला, तेव्हा  घरातल्या  सगळ्यांना  आश्चर्याचा  धक्काच   बसला. आमच्या  गोर्या,पान  राजस रुपाच्या सदामामाची ही असली बायको. हे म्हणजे रेशमी शेल्याची गाठ चिंध्यांच्या वाकळीशी मारल्यासारखं होतं. काळा रंग. किंचित पुढे आलेले दात. जाड ओठ,  रुंद जबडा. फताडं नाक. खरोखर अगदी ध्यानच होतं ते! नाही म्हणायला तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. बघणार्या च्या डोळ्यात तिने थेट पाहिलं, की बघणार्यायने वरमून खाली बघितलंच पाहिजे.

‘सदामामा एक फुकट्या… आता हिलाही त्याच्याबोबर पोसलं पाहिजे. ‘ घरातल्या बायका बडबडत. कधी एकमेकींशी हळू आवाजात, कधी मोठ्याने हिला ऐकू  जाईल असं. सुनुमामी काहीच बोलत नसे. मान खाली घालून ती फक्त घरातली कामे  करी.  

त्याच्या लग्नाबद्दल घरातल्या बायका-पोरांना कल्पना नव्हती, पण पुरुष माणसांना माहीत  असावं. लग्न झाल्यावर तरी त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काही तरी कामधंद्याला लागेल, असं वाटलं होतं त्यांना. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नव्हतं.

सदामामाचा उद्योग म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकणे. त्यांच्याबरोबर पत्ते कुटणे, घरात आल्यावर बाहेरच्या दिवाणावर पडून अरेबियन नाईटस, हतीमताई, विक्रम वेताळ यासारखी पुस्तकं  वाचणे. घरातल्या पुरुषांनी त्याला कामालालावायचा अनेकदा प्रयत्न केला होता. घरातल्या पेढीवर ठेवला. पण दोनच दिवसात आपल्याला ते बैठं काम जमणार नाही म्हणाला आणि पेढीवर जाणं सोडून दिलं. एका ओळखीच्यांच्या किराणामालाच्या दुकानात समान देण्यासाठी ठेवला, तर तो मालात भेसळ करतो,  मला असला माल देणं जमणार नाही म्हणाला. एका गॅरेजमध्ये   ठेवला, तर असलं काम केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल,  म्हणाला. थोडक्यात काय,  तर या ‘जोरूका भाई’ला कामाला लावायचे  सगळे प्रयत्न फसले. शेवटी  पुरुषांनी ठरवलं, घरात दहा माणसं जेवतात, हा अकरावा  जेवेल. लग्नं  झालं, पण सदामामाच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही.

सुनुमामीचं गाव शिवारी,  आमच्या  गावापासून  पंध्रा-वीस किलो मीटरवर. ती आणि तिचा म्हातारा बाप दोघेच होते एकमेकांना. तीन खोल्यांचं बैठं घर. थोडा जमीन तुकडा. दोघे राबत होते. पोटापुरतं मिळवत होते. म्हातार्या.ला एकच चिंता. मुलीच्या लग्नाची. मुलगी गुणाची, पण लग्नाच्या बाजारात गुणाला कुठली किंमत असायला?  रूप हवं. ते तर आजिबात नाही.

गावातले लोक काहिशा कुचेष्टेनेच सदामामाला विचारायचे, ‘काय सदाभाऊ, लाडू, कधी देणार?’

‘देऊ की…त्यातकाय?’

‘पण कधी? लग्न करायचा विचार आहे नं? की जन्मभर ब्रह्मचारीच रहाणार?’

‘अं… करायचं की लग्न!’

‘कधी?’

‘मुलगा मिळाली की.’

आता नाकर्ता सदा आणि कुरूप सुनीता,  लोकांनी जोडी लावून टाकली. ते सदाकडच्या पुरुषांना विचारायला आले. पुरुषांच्यात मसलत झाली. न जाणो, लग्न झाल्यावर सदामामाला जबाबदारीची जाणीव होईल,’  त्यांना वाटल़ं मग त्यांनी मध्यस्तांवरच जबाबदारी टाकली. मंदिरात लग्न लागलं. ना सनई. ना बँड. सुनीताला कुंकवाचा धनी मिळाला. गोरा-गोमटा जावई बघून म्हातारा खूश झाला. ‘आता मी मरायला मोकळा झालो.’ म्हणाला.

सदा बायकोला घेऊन घरी आला. ही माझी बायको. त्याने घरात सांगितले. माप ओलांडणं नाही. गृहप्रवेशाचा सोहळा नाही.  थट्टा-मस्करी नाही. दहीभात ओवाळणं नाही. नाव घ्यायलासुद्धा कुणी तिला सांगितलं नाही. ती सरळ तशीच घरात आली.

क्रमश: …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंध…भाग 3 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 3 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला, आणि आज त्या अशा प्रकारे नंदिनीच्या घरी दाखल झाल्या. )

हळूहळू दिवसागणिक नंदिनी आणि मावशींचे सूर चांगले जुळत चालले होते. त्यांच्या व्यक्तित्वाचे एकेक पैलू नंदिनीला उलगडत गेले. सेवानिवृत्त नंदिनी घरच्या घरीच गाण्याचे क्लास घेत होती. स्वयंपाकघरात काम करता करता मावशींचे कान मात्र क्लासमध्ये चाललेल्या गाण्याकडे असायचे. कोणाचा सूर चांगला आहे, कोण बेसुरा आहे हे त्यांना चांगले समजायचे. कानावर अती बेसूर स्वर पडले तर त्यांना सहन व्हायचे नाही. कसलीही भीडभाड न बाळगता सरळ तोंडावर सांगायच्या, “ताई तुमचा गळा बेसुरा आहे, त्याकडे पहिले लक्ष द्या. “नंदिनीला वाटायचे ह्या अशा एकदम कशा काय बोलू शकतात? किती वेळा नंदिनी त्यांना समजवायची, “मावशी, असे एकदम तीर सोडू नका. “पण मावशी म्हणजे स्ट्रेट फाॅरवर्ड.. . !

त्यांचा आवाज इतका गोड होता, सूर ताल, लय अगदी उत्तम. किती गवळणी त्या नंदिनीला गाऊन दाखवायच्या.  “हरी माझ्या पदराला सोड रे”ही गवळण त्या फार भावपूर्ण गात असत. कधी कधी तर दोघींची मैफीलच जमायची. मावशी गवळणी गायच्या आणि नंदिनी पेटीवर त्यांना साथ द्यायची. दोघी कशा अगदी रंगून जायच्या. नंदिनीकडे काही बायका भजने शिकायला येत असत. मावशीही बसायच्या त्यांच्याबरोबर.. ..

कधी शाळेत गेल्या नाहीत. लिहिता वाचता काही येत नव्हते पण त्यांचे बोलणे ऐकत रहावे असे. अगदी साधे बोलतानासुद्धा सहजपणे किती म्हणी आणि वाक् प्रचार वापरायच्या. नंदिनीची बहीण तर नेहमी सांगत असे, “ताई तू मावशींचे बोलणे लिहून ठेव. “

नंदिनीने त्यांच्यासाठी बाराखडी, मुळाक्षरांचे पुस्तक आणले, पाटी पेन्सील आणली आणि त्यांना ती लिहिण्या वाचण्यास शिकवू लागली.

रोज तासभर तरी अभ्यास करायचा असा नियमच नंदिनीने त्यांना घालून दिला.  त्याही ईमानाने शिकू लागल्या.  थोड्याच कालावधीत त्या वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचू लागल्या. करता करता जोडाक्षरांचीही त्यांना चांगली ओळख झाली. स्वतःची सही करायला शिकल्या.  नंदिनीने त्यांना बँकेत खातेही उघडून दिले.

प्रसंगामुळे त्या अशा दुसर्‍याच्या दारात आल्या पण खरोखरीच त्यांचे आचार विचार फार उच्च होते.

सहा महिन्यांच्या कालावधीतच त्या इतक्या रुळल्या की घर त्यांचे की नंदिनीचे असा प्रश्न पडावा कोणाला.. .

नंदिनीकडे येणार्‍या तिच्या मैत्रीणी, बहीणी, नणंदा, दीर हेही आल्या आल्या “काय मावशी,  कशा आहात तुम्ही?”म्हणून पहिली त्यांचीच चौकशी करणार. नेहमी नंदिनी आणि मावशी कुठेही एकत्रच जाऊ लागल्या. नाटक, सिनेमा, कधी सोशल व्हिजीट्स. बाजारातही दोघी एकत्र जात. चूकून कधी मावशी सोबत दिसल्या नाहीत तर वाटेत भेटणारी मंडळी विचारत, “ताई आज तुम्ही एकट्याच?मावशी कुठे गेल्या?”

हा काहीतरी दोघींचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंधच होता जणू. परमेश्वरी योजना. नंदिनीला देवाने एकटे ठेवले नाही. मावशींच्या रूपात ईश्वरच जसा नंदिनीला साथ देत होता. तिच्या एकट्या जीवनाला उभारी देत होता. तिला आनंदी ठेवीत होता.

समाप्त

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंध…भाग 2 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 2 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(“बघा तुम्हाला  ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ” असे सांगून तो निघून गेला)

रात्री दोघींचे जेवणखाण उरकले. त्या आल्यापासून दोघीजणी बोलत बोलतच संध्याकाळची कामे उरकत होत्या.

“मी तुम्हाला मावशीच बोलत जाईन. चालेल नं?” नंदिनीने विचारले. “चालेल की ताई. “मावशींचे प्रत्यूत्तर. तेव्हापासून त्या मावशी आणि ती ताई झाली. असेही तिच्या धाकट्या बहीणींची ती ताईच होती.

मावशी सातारकडच्या. त्याही तिघी चौघी बहीणी होत्या आणि सगळ्या बहीणींचा एकच मोठा दादा होता. दादाची सांपत्तीक स्थिती चांगली होती. शेतीभाती होती, स्वतःचे घरदार होते. त्यांची वहीनी स्वभावाला अतिशय प्रेमळ. मावशी दादा~वहीनींविषयी भरभरून बोलत होत्या. “ताई काय सांगू तुम्हाला? अहो, माझ्या कातड्याचे जोडे करून दादांच्या पायात घातले तरी त्यांचे माझ्यावरचे उपकार फिटायचे नाहीत.”

“का हो? असं का बोलता?”

मावशींनी तिला त्यांची कर्म कहाणी सांगण्यास सुरवात केली.

मावशींनी नवर्‍याच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडले. मुलगी लग्न होऊन सासरी नांदत होती, पण तिचा कावीळीचा आजार बळावला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. संजू आणि बंडू दोन मुलांना घेऊन त्या दादांकडे येऊन दाखल झाल्या. दादा~वहीनींनी त्यांना अगदी प्रेमाने आधार दिला. मावशी दादांच्या किंवा गावातील शेतकर्‍यांच्या शेतावर मिळेल ते काम करून पूर्ण भार दादांवर नसावा ह्या सूज्ञ विचाराने जीवन कंठू लागल्या.

मुले मोठी झाली. संजू, बंडू दोघांचेही लग्न झाले, पण बंडूची बायको माहेरी निघून गेली.

नंदिनीकडे त्या कामाला आल्या त्यावेळी त्या संजूकडे होत्या.  संजूने गावात त्याचा संसार थाटला होता, बर्‍यापैकी बस्तान बसविले होते. त्याचा मुलगा व मुलगी शाळेत शिकत होते.

सुनेचे आणि त्यांचे मात्र कधीच जमले नाही. बंडूची तर फारच मानहानी होत होती. कारण त्याच्याकडे धड काम नव्हते. तो म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. . . !

मावशींना हे सहन न झाल्यामुळे त्या बंडूला घेऊन तडक मुंबईत भांडूपला रहाणार्‍या त्यांच्या बहीणीकडे आल्या. बहीणीच्या मुलाने बंडूला ओळखीने कुठेतरी सिक्यूरिटीत चिकटविले.

मावशी तशा स्वाभिमानी. बहीणीकडे किती रहाणार?कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला आणि आज त्या अशा प्रकारे नंदीनीच्या खरी दाखल झाल्या.

  क्रमशः…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंध…भाग 1 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 1 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

नंदिनीच्या आयुष्यात मावशी आल्या आणि तिच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले. आई गेल्यावर ती अगदी एकाकी झाली. पती निधनानंतर दहा वर्ष्ये आईने तिला सावलीसारखी साथ दिली होती. पण आई का जन्मभर पुरणार? दोन्ही मुले अमेरिकेत. . . !एकटेपणा काय असतो ह्याची जाणीव खर्‍या अर्थाने आईच्या स्वर्गवासाने तिला झाली. तशी अवतीभवती बरीच माणसे होती, बहीणी होत्या, दीर~नणंदा होत्या, पण त्यांची साथ कायम कशी काय शक्य? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे संसार, जबाबदार्‍या होत्याच ना?

नंदिनी तशी अतिशय खंबीर मनाची. पतीच्या अकस्मात निधनानंतरही तिने स्वतःला पूर्णपणे सावरले, स्वतःचे व्यक्तिमत्व जपले.  आज एकटी आहे म्हणून रडत बसणे हा तिचा स्वभावच नव्हता.

तिच्या शेजारच्या घरात एक चोवीस तासांची बाई होती. शेजारीण फार चांगली. ती म्हणाली, “आँटी, तुम्ही एकट्या आहात म्हणून मी माझ्या बाईला रात्री तुमच्यासोबत झोपण्यासाठी पाठवत जाईन. ” तिला बरे वाटले नाही, परंतु शेजारणीने इतके आस्थेने सांगितल्यावर नाही म्हणणेही प्रशस्त वाटले नाही.

शेजारची बाई तिच्याकडे येऊ लागली. तिच्या मनात आले की आपणही अशीच एखादी चांगली बाई ठेवली तर?मग तिने चौकशीला सुरवात केली.  शेजारची बाई एका नोकरवर्ग पुरविणार्‍या एजन्सीतून आली असल्याचे रात्री झोपताना केलेल्या गप्पा~गोष्टींवरून नंदिनीला समजले. “ताई , तुम्ही आमच्या मॅडमना विचारा. त्यांच्याकडे एजन्सीचा नंबर असेल. त्या देतील तुम्हाला. “अशा रीतीने भंडारीबाईंकडून तिला नंबर मिळाला. एजन्सीमार्फत एक दोन बायका तिच्याकडे आल्याही परंतु त्यांच्या सोबत सतत रहाणे नंदिनीला रास्त वाटले नाही. दहा बारा दिवस असेच गेले. शेजारच्यांच्या बाईला असे किती दिवस बोलवायचे? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का?नंदिनी फार अस्वस्थ होती. एजन्सीला रोज फोन लावून चांगली बाई मिळण्याची शक्यता आहे की नाही याचा अंदाज घेत होती. “ताई तुम्ही निश्चिंत रहा. लवकरच आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखी चांगली बाई मिळवून देतोच” असे तिला आश्वासन मिळत होते.

एक दिवस संध्याकाळी दारावरची बेल वाजली, एजन्सीचा माणूस बाईला घेऊन आला होता.

साधारण पन्नाशीतली बाई. गळ्यात ठसठशीत सोन्याची बोरमाळ आणि कानात सोन्याचे झुमके, कानावर सोन्याच्या पट्या लावून

ठाकठीक बसवलेले. प्रथमदर्शनी कोणाचीही नजर खेचून घेणारे. सावळा वर्ण पण नाकी डोळी नीटस. पदर पिनप करून सिंथेटिक साडी व्यवस्थित परिधान केलेली. केस काळेच, मधूनच एखादी रूपेरी छटा. कपाळावर लाल मध्यम आकाराची टिकली. केसांना तेल लावून आंबाडा घातलेला. नीट नेटकी, स्वच्छ. चाल एकदम ताठ. . . !प्रथमदर्शनीच त्यांच्याशी जमण्यास काही अडचण येऊ नये असे नंदिनीला वाटले.

एजन्सीच्या माणसाने त्या बाईशी ओळख करून दिली आणि त्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेऊन “बघा तुम्हाला  ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ. “असे सांगून तो निघून गेला.

  क्रमशः…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो आणि ती – भाग -3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तो आणि ती – भाग -3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असेही सांगतो……आता पुढे)

म्हातारा थोडा गडबडतो, काय बोलावे हे त्याला सुचत नाही, त्याचे अभिनंदन करून म्हातारा, मुलाला, मेहनत घेऊन वाढविलेल्या बँकेतल्या शिल्लक असलेल्या शून्यांविषयी काय करायचे ते विचारतो. आता परदेशातल्या शून्यांच्या मानाने म्हाताऱ्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते.

तो म्हाताऱ्याला एक सल्ला देतो, “एक काम करा ते पैसे एका वृद्धाश्रमाला द्या. पुढेमागे कदाचित तुम्हांला त्याचा उपयोग होईल.” पुढचे थोडेसे जुजबी बोलून मुलगा फोन ठेऊन देतो.

म्हाताऱ्याचा तोल जातो. स्वतःला सांभाळून तो पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसतो. म्हाताऱ्याला आज पहिल्यांदा  जाणीव होते की आपल्या मुलापेक्षा आपण खूप नशीबवान होतो. आपल्याला, आपल्या आई वडिलांची सेवा करायचे भाग्य मिळाले.  आपल्या मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या नशिबात ते भाग्य नाही.

म्हातारीची  दिवाबत्ती  झालेली असते.

तो तिला हाक मारतो, “अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू.” आणि म्हातारी चक्क म्हणते, “हो आलेच”. म्हाताऱ्याचा विश्वासच  बसत नाही. आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.

त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु  खाली येतो, तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो…. त्याच्या डोळ्यातले तेज कमी कमी होत जाते…आणि काही क्षणांत त्याचे डोळे निस्तेज होतात. म्हातारी आपली देवपूजा आटपून म्हाताऱ्या शेजारी झोपाळयावर येऊन बसते आणि म्हणते, ” बोला काय बोलायचय”

म्हातारा काहीच बोलत नाही. ती म्हाताऱ्याचा हात  आपल्या हातात घेते. शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे निस्तेज झालेले असले तरी एकटक म्हातीराला बघत असतात.

क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते. तिला काय करावे हेच सुचत नाही, पण लगेचच ती स्वतःला सवारते…हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते आणि पुन्हा झोपाळयावर येऊन बसते.

म्हाताऱ्याचा थंडगार हात ती पुन्हा आपल्या हातात घेते आणि म्हणते, ” चला कुठे नेता फिरायला आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला ? बोला “

म्हातारीच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळत असतात. एकटक नजरेन ती म्हाताऱ्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रुही गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाताऱ्याच्या खांद्यावर पडते.

बँकेतल्या शून्यांना बरोबर न घेता,  ते आपल्या लाडक्या मुलासाठी येथेच सोडून, तो आणि ती,  दोघांनी एका न संपणाऱ्या अशा लांबच्या प्रवासाला सुरवात केलेली असते.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो आणि ती – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तो आणि ती – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(चाळीशी ओलांडलेली होती……. आता पुढे)

बैंकेतील पाच शून्यांच्या आधी काही दोन आकडी संख्याही  जमा झालेली असते.  एका निवांत क्षणी,  त्याला कॉलेजचे ते जुने दिवस आठवतात. आजूबाजूला कोणी नाही अशी वेळ साधून तो तिला म्हणतो, “अग, ये जरा अशी समोर, बस माझ्या जवळ. पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू. कुठे तरी फिरायला जाऊ.”

ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, ” कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला! जरा मुलगा मोठा झाला आहे त्याचे तरी भान ठेवा. ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत. चला व्हा बाजूला.”

मग येते पंचेचाळीशी, त्याच्या आणि तिच्या डोळ्यावर चश्मा चढलेला असतो. एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात. दोघांच्याही केसांनी आपला काळा  रंग  सोडून द्यायला सुरवात केलेली असते. मुलाने आता शाळेमधून कॉलेजसारख्या मोठ्या आणि वेगळ्या दुनियेत प्रवेश केलेला असतो. त्याच्या गरजा वाढत जातात. बैंकेतील सहा शून्यापर्यंत गेलेली शिल्लक वाढत न जाता कमी होत जाते. ती स्वतःचा वेळ मैत्रिणींबरोबर किटी पार्टी किंवा भजनी मंडळात घालवत असते. त्याचे  वीकेंडच्या  बैठकीचे  कार्यक्रम  सुरुच असतात. तरीही तो आणि ती, त्याची आई लवकर गेल्याने खचलेल्या म्हातार्याा वडिलांची  काळजी घेत असतात. त्याच्या म्हातार्याआ वडिलांना त्याचा आणि तिचा एक मानसिक आधार कायम असतो. एकाचवेळी मागच्या पिढीला  आणि पुढच्या पिढीला सांभाळण्याचे एक अतिशय कठीण असे काम तो आणि ती सहजतेने करत असतात.

कॉलेज मधून बाहेर पडून मोठे झालेले बाळ आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्याला पंख फुटलेले असतात, आणि एक दिवस ते त्याच्या आणि तिच्या बँकेतले सगळे शून्य वापरून दूर परदेशी उडून जातो.

आता त्याच्या केसांनी, काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. आता तिलाही केसांना काळा  रंग लावायचा कंटाळा आलेला असतो.

काही काळाने त्याच्या म्हातार्या   झालेल्या वडिलांनी त्याला आणि तिला, म्हातारा- म्हातारी बनवून त्यांची साथ सोडून सुखाची झोप घेतलेली असते.

आता तो तिला म्हातारी म्हणू लागतो,  कारण स्वतःही तो  म्हातारा झालेला असतो. साठीची वाटचाल सुरु झालेली असते.

प्रॉव्हिडन्ट फंडामुळे बैंकेत आता परत काही शून्य जमा झालेली असतात. एव्हाना त्याचे बैठकीचं प्रोग्रॅम कमी झालेले असतात आणि डॉक्टरांच्या भेटी वाढून औषध, गोळ्या यांच्या वेळा  ठरतात.

बाळ मोठे झाल्यावर लागेल म्हणून घेतलेले मोठे घर अंगावर येऊ लागते.  बाळ कधीतरी परत येईल ह्याची वाट बघण्यात  तो आणि ती आणखी  म्हातारे  होतात.

आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते.  म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत आपल्याच गत आयुष्याचा विचार करत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबून तिच्यात झालेले बदल न्याहाळीत असतो  आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने उठून फोन घेतो, फोनवरून मुलगा बोलत असतो. तो आपला फोन स्पीकरवर टाकतो. त्याचा आवाज ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाच्या स्मितरेषा  उमटतात. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि त्याचा आणि तिचा, तो  तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असल्याचे सांगतो.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares