सौ. उज्ज्वला केळकर
☆ दिवाळीचा फराळ करू नका, पण… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
दिवाळीचा फराळ करू नका, पण त्याची टिंगलही करू नका!
अभ्यंग स्नानानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून दीपावलीच्या सणानिमित्त आणि आनंदाप्रीत्यर्थ फराळ करणे ही आपली पिढ्यापिढ्यांची परंपरा आहे. नंतरही दिवाळीच्या सर्व दिवशी हा प्रघात सुरूच राहतो. करंजी, लाडू, अनरसा, चिरोटे, शंकरपाळे, चकली, शेव, कडबोळी, चिवडा अशा अनेक पारंपरिक पदार्थांची मांदियाळी समोर येते. या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर दही पोहे खाऊन या फराळ कार्यक्रमाची सांगता होत असे.
या कार्यक्रमानिमित्त घरातील सगळ्या नातेवाईकांनी एकत्रित बसून हास्यविनोद करणे, अनेक घरात या निमित्त आलेला एखादा पाहुणा, आधीच्या फराळाच्या आठवणी असा एक गोफ विणला जात असे. घरात फराळ करण्याआधी देवळामध्ये जाऊन देवाला फराळाचे पदार्थ, नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. एखाद्या नातेवाईकाचे, मित्राचे कुणी मागच्या वर्षात निधन पावले असेल तर त्याच्या घरी सर्वात आधी फराळाचे पदार्थ पाठवण्याची पद्धत आजही पाळली जाते. समाजातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, इस्पितळे, सीमेवर लढणारे सैनिक यांना अत्यंत आठवणीने फराळाचे पदार्थ पाठवण्याची प्रथा लाखो लोकं पाळतात. भारतातून दरवर्षी विदेशामध्ये टनावारी फराळाचे पदार्थ पाठवले जातात.
फक्त दिवाळीलाच केले जाणारे हे सर्व पदार्थ, हळूहळू बदलणाऱ्या काळानुसार वर्षभर, मुबलक आणि अनेक प्रकारांमध्ये सहज मिळू लागले. खास दिवाळीचे पदार्थ ही त्याची ओळख आणि प्रसिद्धी पुसट होत गेली.
पण त्याचा दुष्परिणामही असा झाला की दिवाळीला हे पदार्थ खाणे म्हणजे जुनाट बुरसटलेली कल्पना आहे, असेच हळूहळू वाटू लागले. या पदार्थांचा तिरस्कार करणे, ते खाणाऱ्यांना कमी लेखणे, त्यांची थट्टा करणे अशा गोष्टी सुरू झाल्या.
चारचौघं भेटले की जाहीरपणे आम्ही हल्ली फराळाचं काही करीतच नाही, हे अगदी घोटवून, रंगवून सांगितले जाते. ” त्या चकल्या, करंज्या खाण्याऐवजी आम्ही चक्क पावभाजी करतो, पाणीपुरी करतो; गोड गोड अगदी नको वाटते ” अशा गोष्टी रंगवल्या जातात. गोडाला आपण अति नाके मुरडल्यामुळे, अनेकांना मधुमेहामुळे, खरंच गोड खाणे अशक्य झाले आहे. पण त्याच वेळी अनेक मोठमोठ्या नटांनी केलेल्या जाहिरातीतील ” कुछ मिठा हो जाये ” ही चॉकलेट्स आपल्याला चालतात हे आश्चर्यच म्हणायचे!
किती वर्षे तेच तेच लाडू, चकल्या, करंज्या खायचे, अशी आपल्या फराळ संस्कृतीची सातत्याने टिंगल करणारी माणसे मात्र आपला मुस्लिम शेजारी शीरखुर्मा किती छान बनवतो आणि आपल्याला आणून देतो याचे कौतुक करतात. एखादा ख्रिश्चन मित्र ख्रिसमसला किती छान केक पाठवतो, याचेही वर्णन ऐकायला मिळते. त्यांना केक किंवा शीरखुर्मा ऐवजी चॉकलेट खा असे सांगण्याचे कुणाच्यातही धैर्य नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणीही ख्रिश्चन माणूस “किती वर्षे तोच तोच केक खायचा? ” असे म्हणत नाही. कुणीही मुस्लिम माणूस किती वर्षे “तोच तोच शीरखुर्मा खाणार? “, असे म्हणत नाही. किंवा त्याऐवजी शेजारीपाजारी पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस नेऊन देत नाही. ते त्यांचीच संस्कृती पाळतात आणि आपण त्याबद्दल त्यांचे कौतुकही करतो. मग आपण आपल्या इतक्या पिढ्यांच्या परंपरेची टिंगल टवाळी का करतो?
जशा चकल्या, करंज्या, चिवडा, लाडू या गोष्टी वर्षभर उपलब्ध असतात, तशाच पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस वर्षभर उपलब्ध असतेच ना!
एकत्रित फराळ करणे ही आपली कित्येक पिढ्यांची परंपरा आहे. यात आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या, सामाजिक संबंधांच्या अनेक छटा दडलेल्या आहेत. अनेक गरीब महिला आणि संस्था यांना प्रचंड रोजगार उत्पन्न होतो. माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला खरोखरच कंटाळा आला असेल तर फराळाचे पदार्थ बनवू नका, विकत आणू नका, खाऊ नका. पण त्याची जाहीर कुचेष्टा करणे, टर उडवणे या गोष्टी अवश्य टाळा.
लेखक : श्री मकरंद करंदीकर
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈













