मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वेगळ्या वाटा – भाग – ५९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वेगळ्या वाटा – भाग – ५९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वेगळ्या वाटा

देना बँकेत रुजू होण्याच्या काही दिवस आधी मी विलासला म्हटलं, ” सुरुवातीचे तरी काही दिवस आईंना आपण बोलवूया का? ”

विलास ने थोडा विचार केला. नंतर म्हणाला, ” हरकत नाही. आई येईलही. पण मला काय वाटतं आपण अशी सवय नको लावायला. आपले प्रश्न आपणच सोडवावेत. आपल्या समस्यांचं ओझं कुणाच्या डोक्यावर टाकून असं निवांत राहणं योग्य होईल का? ”

विलासचं हे म्हणणं मलाही पटलं होतं. क्षणभरच माझ्या मनात विचार आला होता की, ” आई येतीलच अशी याला खात्री वाटत नसेल का आणि खरोखरच आईंना, कारण कुठलंही असो पण नाहीच जमलं यायला तर स्वाभाविकपणे आपल्यालाही थोडी नाराजी वाटूच शकली असती. ” पण नंतर मलाही वाटलं आईंना तरी या ‘हो’ ‘नाही’ च्या पेचात आपण कशाला टाकायचं? आणि खरोखरच शेतीचा पसारा, कुटुंबाचा व्याप, सगळ्यांचं ‘हवं नको’ बघण्यातून त्या तरी अजून कुठे निवृत्त झाल्या आहेत? अशा परिस्थितीत आपण आपल्या सोयीसाठी विनाकारणच त्यांच्यावर हा मानसिक आणि नैतिक भार का म्हणून टाकायचा? विलास म्हणतो तेच बरोबर आहे.

दरम्यान मला दिवसभराची एक चांगली मदतनीस मिळाली. ‘विमल’ तिचे नाव. आमच्या घरासमोरच पोलीस कॉलनी होती. विमलचे वडील पोलीस होते आणि ते त्या वसाहतीत राहत होते. विमल सातवी आठवी पर्यंत शिकलेली होती पण नंतर तिने शाळा सोडली होती. तिची आईच तिला माझ्याकडे काम मिळावं म्हणून घेऊन आली होती आणि विमलचीही काम करण्याची इच्छा होती. प्रथमदर्शनीच मला ‘विमल’ शांत, समंजस आणि कामसू वाटली. मी तिला मदतीसाठी योग्य तो पगार देऊन ठेवून घेतली. तिला बजावून सांगितले, ” आम्ही दोघेही घरात नसताना ज्योतिकाला व्यवस्थित सांभाळण्याचं महत्त्वाचं काम तुझं” ज्योतिकाच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळांचं एक पत्रकच मी तिला लिहून दिलं होतं ज्योतिकासाठी भरपूर खेळणी आणली होती. कोणते खेळ तिच्याबरोबर कसे खेळायचे हे विमलला मी शिकवले. एकंदरच विमलला व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यानंतरच मी बँकेत रुजू व्हायचं ठरवलं. शिवाय कॉलनीतल्या पांडे मावशी, पूनम मानुधने, अलका राणे(आम्ही एकाच शाळेतल्या विद्यार्थिनी. जग किती लहान असतं! ), सुचूची आई, क्षमा वाठ या सगळ्यांचा मनापासून आधार होता. विलासचंही ऑफिस घरापासून फार दूर नव्हतं. तो त्याच्या साईट व्हिजिट्स, गावातल्या, गावा बाहेरच्या, नव्या क्लाएंटच्या मीटिंग्ज वगैरे सांभाळून ज्योतिकासाठी, मी ऑफिसात असताना काही तासांसाठी तरी घरी येऊ शकत होता. त्याचा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे त्याला “दहा ते पाच’ असं वेळेचं बंधन नव्हतं बऱ्याच वेळा मी घरी आल्यानंतर तो संध्याकाळ नंतर उशिरापर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये काम करू शकत होता. शिवाय कामाव्यतिरिक्त उगीचच सोशल सर्कलमध्ये रमणारा तो नव्हता. तो कुटुंबवत्सल आणि घराची अत्यंत ओढ असणारा होता. थोडक्यात काहीशा चौकटीबाहेरच्या आमच्या जीवनाचा आराखडा संगनमताने, सहकार्याने नीट साधला गेला होता.

“देना बँक, स्टेशन रोड, नवी पेठ ब्रांच. ” सकाळचे पावणे अकरा वाजले होते. अकरा वाजता ग्राहकांसाठी शाखेचे काम सुरू होत असे. ११ ते ३ ग्राहक सेवा आणि तीन नंतर पाच साडेपाच पर्यंत दिवसभरच्या ट्रांजॅक्शनचा ताळमेळ जमवणे वगैरे इतर कामे..

बँकेत पहिलं पाऊल टाकल्याबरोबरच माझ्या एक लक्षात आलं की मुंबईच्या फोर्ट ब्रांच मधलं कॉस्मॉपोलीटन वातावरण आणि इथलं स्थानिक लोकांमधलं वातावरण यात खूप तफावत आहे. मी बिचकलेली, भांबवलेली, शिवाय घरातून निघताना विमलच्या कडेवर असलेल्या ज्योतिकाला “बाय” करून निघताना झालेली घालमेल घेऊनच बँकेत आले होते. पर्समधून माझं नेमणूक पत्र काढलं. कुणाकडे जावं तेच कळतच नव्हतं पण केबिनमध्ये बसलेल्या शाखाप्रमुखांनीच बाहेर येऊन “या या मॅडम, आत या” असे अगदी आदरपूर्वक म्हटले. एस. व्ही शहा त्यांचे नाव. उंच, गोरे, चेहऱ्यावर समंजस भाव, गोड खालच्या सूरात बोलणं आणि एकंदरच त्यांच्याकडे पाहिल्यावर हे शाखाप्रमुख आहेत असे न वाटणारे, अत्यंत साधं सर्वसाधारण कर्मचाऱ्यांसारखं त्यांचं वागणं होतं. पदाचा रुबाब, दरारा शून्य. मला हा माणूस आवडला. थोडंसं ओझं उतरल्यासारखं वाटलं. मी केबिनमध्ये त्यांच्यासमोर बसले. शहा सरांनी एक दोघांना आत बोलावून घेतले. त्यातले एक होते देशपांडे. (जे युनियन लीडर होते. हे नंतर मला कळले) आणि दुसरे “किशोरभाई शहा’ एक सीनियर किंवा जबाबदार स्टाफ मेंबर. (देना बँकेत शहांची कमी नव्हती. बहुतेक “केम छो” वाले.) असो! माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ” या भांडारकर मॅडम. मुंबईच्या आहेत बरं का! आज पासून आपल्याबरोबर असणार आहेत. त्यांना कामाचा अनुभव आहेच पण तरी त्यांचं डिपार्टमेंट आणि काम याबद्दल थोडं मार्गदर्शन तुम्ही करावे. ”

मला कुठल्याही डिपार्टमेंट विषयी काहीच अडचण नव्हती पण ज्यांच्या बरोबर आता मला काम करायचे होते त्यांचे आणि माझे सूर कितपत जुळतील याविषयी मी थोडी साशंक होते. कारण ही स्थानिक माणसे होती. त्यांची संस्कृती, विचार, जीवन पद्धती, त्यांचं खानदेशी बाजातलं मराठी किंवा गुजराथी बोलणं ही सगळी दुरावा निर्माण करणारी लांबलचक अंतरं होती. प्रत्येकाच्या नजरेत मला जाणवत होतं, ” मुंबईहून आलेली एक शिष्ट, स्वतःला काहीतरी समजणारी एक व्यक्ती, एक बलाच. जाऊ दे म्हणा आपल्याला काय करायचे आहे? ”

त्यांच्या नजरेतले हे भाव जरी मी टिपले होते तरी मला मात्र ही साधी माणसं, अजिबात स्टाईल न मारणारी गावातली माणसं चांगलीच वाटली होती. कधीतरी यांच्याशी आपली नक्की मैत्री होऊ शकेल याची खात्री वाटत होती. ती तशी का वाटत होती याचं नेमकं कारण मलाही माहीत नव्हतं. कदाचित मुंबईच्या वातावरणात नाईलाजाने सॉफीस्टीकेटेड असल्याचा आव आणणारी पण आतून बाळबोध साधी अशीच मी असेन. त्याचवेळी ‘किशोरभाई शहा’ मला म्हणाले, ” तुम्हाला कसलीही अडचण वाटली तर मला सांगा मॅडम. ”

खप्पड चेहऱ्याची, किरकोळ प्रकृतीची, अत्यंत अनाकर्षक अशी ही सावळी व्यक्ती होती. मात्र बँकिंग या विषयात परिपूर्ण आणि तरबेज. सुरेख वळणदार अक्षर. कामातला व्यवस्थितपणा, जाण यामुळे शाखाप्रमुखांचाही या व्यक्तीवर पूर्ण भरवसा होता हे माझ्या लक्षात आले आणि मग मीही, ” आल्याच अडचणी तर याच व्यक्तीला सांगू.. विचारू“असे तेव्हाच ठरवले.

एक सांगते एखादी संसारी स्त्री, घर, लहान मुलाबाळांचे सांभाळून जेव्हा वेगळ्या वाटेवर जगण्याची ईर्षा बाळगते तेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाशी जमवून घेऊन, सामावून घेऊन, स्नेहसंबंध जुळवून, स्वतःचं प्रभावी व्यक्तित्वही सांभाळू शकली तर मग कुठल्याच वाटा कठीण नसतात.

माझ्या जडणघडणीतला हाही एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कंटाळा येतो पण कंटाळायचं नाही… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ कंटाळा येतो पण कंटाळायचं नाही… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उन्हाळ्यामध्ये उन्हाचा कंटाळा येतो.. आपण म्हणतो, ‘ कधी एकदा पाऊस येईल. ‘ पाऊस सुरू झाला आणि चार आठ दिवस झाले की आपल्याला पावसाचाही कंटाळा येतो! माणसाच्या मनाचं ही असंच आहे, जे असतं ते थोड्याच दिवसात नको वाटायला लागतं!

‘कंटाळा’ हा शब्द माणसाच्या वागण्या बोलण्यात नेहमी असतो. लहानपणापासून ‘कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही’ हे आमच्या आईने मनावर बिंबवले होते. एखादे काम कंटाळवाणे वाटले तर कामात बदल करायचा, पण कंटाळायचं नाही अशी मनोवृत्ती त्यामुळे आपोआपच बनत गेली होती. लहानपणी शाळा, अभ्यास हे कंटाळायचे विषय! कधी एकदा परीक्षा संपते आणि खेळायला, झोपायला मिळतं असं वाटत असायचं, पण एकदा का परीक्षा संपली की झोप मुळीच यायची नाही! चार दिवस भटकून, पिक्चर वगैरे बघून झाले की आमच्या कंटाळा येण्याला सुरुवात व्हायची!

मग आई नवनवीन उद्योग लावायची. घरातील काही कामे, भरत काम, शिवणकाम आणि जोडीला दुपारी घरात बसून बैठे खेळ खेळणे तसेच संध्याकाळी फिरणे असं रुटीन लागायचं! जमलं तर कधी चार दिवस गावाला जाऊन येणे आणि या सगळ्यात मग सुट्टी कधी संपायची ते कळायचंच नाही!

शाळेत पुन्हा जायला मिळाल्यावर खूप आनंद व्हायचा! मैत्रिणी भेटायच्या, नवीन पुस्तकं वाचायला मिळायची, अभ्यासाला तर अजून सुरुवात नसायची, पण शाळेमध्ये गेले की मन प्रसन्न व्हायचं! पण थोड्या दिवसात ते रुटीन झालं की आमची कंटाळा यायला सुरुवात व्हायची!

माणसाला सतत बदल हवा असतो. त्याच त्या रुटीनचा कंटाळा येत असतो. विद्यार्थी दशा असताना सारखं वाटायचं की, आई बाबांना किती बरं आहे, अभ्यास नाही, काही नाही! आणि आजी आजोबांना तर फारच छान! नोकरी नाही, काम नाही, टीव्ही बघायचा, गप्पा मारायच्या आणि फिरायचं! आपणही मोठं झाल्यावर असंच करायचं असा विचार मनामध्ये येत असे. कॉलेजला असताना एकदाचा तो अभ्यास संपला.. डिग्री मिळाली. आता नोकरी धंद्याला लागलं की हातात पैसा खेळायला लागेल ही कल्पना च मस्त वाटायची! आता काय मज्जाच मज्जा! मनाला येईल तसं खर्च करायला मिळेल, पण हे नावीन्य लवकरच संपायचं आणि रोज रोज त्याच त्या चाकोरी बद्ध जीवनाचा कंटाळा येऊ लागायचा! ठराविक वेळी उठणे, आवरणे आणि डबा घेऊन कामावर जाणे.. घरी आल्यावर पुन्हा तीच तीच कामं! कंटाळा येऊ नये, बदल हवा म्हणून मग ट्रिप आखायच्या. फिरायला जायचं. चार आठ दिवस ट्रिप ची मजा अनुभवून आलं की पुन्हा कंटाळा येतो! घरी जाऊ या आता असं वाटतं! हा कंटाळा आहे तरी काय? अधून मधून तो येतच असतो. अशा वेळेला पुन्हा आठवतं, ‘ कंटाळा येतो पण कंटाळायचं नाहीं! ‘

सामान्यपणे बायकांची तक्रार असते की, रोज रोज स्वयंपाक घरातील तीच तीच कामे करून कंटाळा येतो! एखादा दिवस तरी पुरुषांनी स्वयंपाक घर सांभाळावे. आमच्या घरी एकदा मे महिन्यात असा प्रयोग केला होता. सुट्टीच्या दिवसात आमच्या घरी दीर, जावा, नणंदा, भाचे, पुतणे अशी सर्व मंडळी जमत असत. मग दिवसभर घरातल्या बायका नाश्ता, जेवण, चहा पाणी करून करून कंटाळून जात असत. तेव्हा एक दिवस पुरुषांनी सर्व सांभाळावं असं ठरलं!

सकाळचा चहा आयता मिळाला. नाश्त्याला कांदेपोहे मिळाले. स्वयंपाकाची वाटणी पण पुरुषांनी करून घेतली. फक्त पोळ्या तेवढ्या सासुबाईंकडे वशिला लावून करून घेतल्या. जेवणाची तयारी करणं, सर्वांना वाढणं आणि जेवण झाल्यावर मागचं आवरणं सुद्धा पुरुषांनी केलं! आम्ही बायका कौतुकानं सर्व बघत होतो, पण स्वस्थ बसायचा पण कंटाळा आला!

मग दुपारी मात्र आम्ही चहाबरोबरच पुन्हा स्वयंपाक घराची सूत्रे हातात घेतली आणि पुरुषांना’ हुश्श ‘ झालं! एक दिवस ठीक आहे, पण सतत हेच करत राहणं कंटाळवाणे आहे हे पुरुषांनी मान्य करून टाकलं!

‘कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही’ या जीवनातील सूत्रामुळे खूप फायदे झाले. आयुष्यात संयम वाढला, चिकाटी वाढली, आपल्याला जर हे करायचंच आहे तर आनंदाने करायचं याची सवय लागली. घरात कोणाचा आजारपण असो वा आर्थिक संकट असो न कंटाळता त्याला तोंड देणं आम्हाला जमू लागलं! कारण ‘ये भी दिन जायेंगे’ असा आशावाद मनाला कंटाळा येऊ द्यायचा नाही!

आयुष्यात कितीतरी वेळा तडजोडीचे प्रसंग येतात. मनाची उमेद खचू न देता काम करत राहावे लागते, चिडचिड होते, पण ‘कंटाळायचं नाही’ हा सोपा मंत्र जपला तर खूप गोष्टी सुसह्य होऊन जातात. कंटाळयाचं मूळ शोधायचं तर ते बरेचदा आळसात असतं! हा आळस कंटाळयाला स्कोप देतो. अलीकडच्या कित्येक लहान मुलांच्या तोंडात “बोअर झालंय” हा शब्द येतो. इतक्या लहान वयात यांना बोअर कसं होतं हे आपल्याला कळत नाही, पण आजची जीवनशैली बघता आपणच या सगळ्याला कारणीभूत आहोत असं वाटू लागतं! मुलांना त्यांचे शाळा, अभ्यास, क्लास यातून खेळायला, स्वतःच म्हणून काही करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळा, अभ्यास या ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या तर काय करायचं हेच त्यांना समजत नाही! त्यासाठी लहानपणापासूनच त्यांना वेगळं काही करण्याची, छंद जोपासण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजे कंटाळवाणे होणार नाही आणि पुढेही आयुष्यात संकटांना, अडचणींना तोंड देताना एखादी गोष्ट ‘लाईटली’ कशी घ्यावी आणि त्यातून मार्ग कसा काढावा हे कळेल!

कोरोनाच्या काळात जेव्हा घराबाहेर पडता येत नव्हते, त्यावेळेला घरातील कुटुंबीय आपोआपच एकत्रितपणे घरातील कामं करत आणि आपला वेळ कंटाळवाणा न घालवता चांगल्या मार्गांनी जावा यासाठी खूप काही उपक्रम करत असत. कोणत्याही कठीण गोष्टीला, प्रसंगाला धीराने तोंड देऊ शकण्याची क्षमता यामुळे वाढते आणि संकटातून आपण बाहेर येणार हा आत्मविश्वास वाढीला लागतो. तसेच कंटाळा आला तरी कंटाळायचं नाही या तत्त्वावर आपण आपला वेळ चांगल्या तऱ्हेने घालवायचा प्रयत्न करतो. निराशेचे काळे ढग येतात पण ते पुढच्या चंदेरी, सोनेरी दिवसांची चाहूल देत असतात. कोणतीही एकच स्थिती टिकून राहत नसते, कधी दुःख तर कधी आनंद, कधी आशा तर कधी निराशा, अशी बदलती स्थिती माणसाच्या जीवनात येते. या परिस्थितीला संयमाने, चिकाटीने तोंड दिले पाहिजे. अशावेळी ‘कंटाळा येतो पण कंटाळायचं नाही’ हे तत्व प्रत्येकाने अवलंबिले तर जीवन कंटाळवाणे वाटणार नाही!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मावळती शब्दावली… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ मावळती शब्दावली  ☆ श्री सुहास सोहोनी

 

अलिकडेच कुठे तरी चंचुपात्र हा शब्द वाचला आणि शाळेचे दिवस आठवले. सायन्सची प्रयोगशाळा आठवली. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत शिकतांना, निरनिराळ्या विषयातले असे किती तरी अनोखे शब्द आठवले. खरं म्हणजे यातले बहुतांश शब्द आता फक्त आठवणीतच राहिले आहेत. कारण व्यवहारातला त्यांचा वापर आताशा कमी कमी होत चाललाय.

बघा, वाचा आणि विषय ओळखा…

खलाटपट्टी, वलाटपट्टी, सामुद्रधुनी, भुशीर, इरलं, खारे वारे, मतलई वारे, खरीप हंगाम, रब्बी हंगाम,

अमूक नदी-तमुकची खाडी,

तमूक नदी-अमूकची खाडी,

वगैरे वगैरे वगैरे…

परीक्षानळी, चंचूपात्र, वसुदेवप्याला, वक्रनलिका, तापमापी, गतीचा सिद्धांत, वक्रीभवन, यूरेका… यूरेका,

वगैरे वगैरे वगैरे…

उतरती भाजणी, चढती भाजणी, गळके हौद, काळ-काम-वेग, प्रमेय, साध्य, कृति, सिद्धता, रायडर, समीकरण

वगैरे वगैरे वगैरे…

वाक्याचं पृथक्करण, द्विगू समास, गणवृत्त, उपमा, उपमेय, उपमान, शार्दूलविक्रीडित

सलाते – सलानाते

चाचीचे – चेच्याची

Adverb clause, Adjective clause of time qualifying the name… दऊत, टांक, बोरू, मराठी नीब, इंग्लिश नीब, पॅड, टीपकागद,

वगैरे वगैरे वगैरे…

गड, दुर्ग, वेढा, गनीम, गनिमी कावा, वाघनखं, डाव शिताफीने उधळला, चांदबिब्बी, रझिया, हूण आले, कुशाण आले, उखळी तोफा,

वगैरे वगैरे वगैरे…

दप्तर, बसकट, कंपास, गुण्या, करकटक, खोडलब्बर, टकळी, अटेरण (A turn चा मराठी अपभ्रंश)

वगैरे वगैरे वगैरे…

आणखी सुद्धा खूप आठवतील. प्रयत्न करा.

© श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ही सुद्धा आदिशक्तीच.. हो ना?? ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ही सुद्धा आदिशक्तीच.. हो ना?? ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

” जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदिशक्तीच नाही का ?? ” •••

आज बऱ्याच वर्षांनंतर माझी मैत्रिण ‘रिया’ भेटली. मधल्या काळात कधी तरी फोन वर बोलणं होतं असे. जून्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती लगेच म्हणालीच, ••• “ओळखलं नाहीस ना मला. “•••

अग !! मी पण तुला ओळखल नाही, ••• आम्ही दोघी मनमोकळेपणाने हसलो.

दोघींमध्ये आमुलाग्र बदल झाला होता. क्षणभर व्यक्तिमत्वांची अदलाबदल झाली की काय ?? असं वाटलं. •••

रिया ला बघून, ••• “हीच का ती स्टाइलिश रिया जाधव ?? “असा प्रश्न मनात आला. ••

त्यावेळेस आमच्या मैत्रिणींमध्ये ‘रिया ‘ म्हणजे सर्वात स्टायलिश, स्वतः भोवती गरगर फिरणारी. फॅशन, योग, जॉगिंग, फिटनेस, प्रोटीन शेक, diet यावर लक्ष देणारी. त्यातच ‘चेरी ऑन केक ‘म्हणजे छान इंग्लिश बोलणारी. आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगळीच उठून दिसणारी. आमच्याच वयाची असली तरी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची ती. कधी कधी हेवाही वाटायचा. •••

प्रत्येक भेटीत तिचा काही तरी नवीन फंडा असायचा. आता काय म्हणे ?? मी पहाटे चारला उठते व व्यायाम करते. •••

आता काय तर, ••• मी प्रत्येक वार प्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. म्हणजे सोमवारी पांढरा तर गुरवारी पिवळा. शनिवारी काळया रंगाचा ड्रेस घालणार. रंग तोच असला तरी प्रत्येक वारी ड्रेस वेगळा असायचा. आमच्या गृप मध्ये रिया म्हणजे सर्वात स्मार्ट, वेगळीच दिसायची. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान. व ती स्वतःला छान कॅरी करायची. एकदम ” smart impressive, fashionable, modern ” वजनावर कटाक्षाने लक्ष देणारी. तिला बघून असं वाटायचं जीवन जगावं तर असं. ••••

 स्वतः जशी टिपटॉप रहायची, तसंच तिच घरही असायचं. घर व इतर गोष्टी चां बॅलन्स तिला छान सांभाळता यायचा. मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं. •••

सर्व गोष्टींची एकानंतर एक आठवण आली. फॅशनमध्ये आम्ही कोणी तिच्या जवळपास ही नसायचो. खास करून मी तर अजिबात नव्हतेच. ••••

 तिच्या नवनवीन गोष्टी ऐकुन मला आश्चर्यच वाटायचे, आपल्याला कसं काहीच सुचत नाही, जमतं नाही. आपण घर, स्वयंपाक, मुल, त्यांचे डबे, परीक्षा, नवऱ्याची काळजी यातच गुंतलेलो असतो. ••••

यातले एखादे काम कमी केले तर वेळ मिळेल का ? ? खरंतर मी अगदी चारला पहाटे वगैरे काही उठू शकत नाही, हे मला नक्की माहित होतं. पण गुरवारी पिवळी साडी किंवा ड्रेस घालणे ही साधी गोष्ट ही आपल्याला जमत नाही. मला तिच्या सारखं रहावं, फॅशन करावी असं वाटायचं, पण जमायच नाही. मनात खूप विचार यायचे. आपण बरोबर की चूक ? याचा गुंता सोडविण्यात मी बिझी असायचे. •••

 जसं फोन मध्ये अनावश्यक डेटा सेव्ह झाला की फोन कसा हॅन्ग होतो ना, तसंच काहीसं माझ्या मनाचं व्हायच. आपल्याच वेळापत्रकाची उलट सुलट तपासणी करत रहायची. फॅशन तर काही कधी जमली नाही पण डिस्टर्ब मात्र नक्की व्हायची. कधी अगदी खूप ठरवून काही केलं तर बरं दिसतय का ?? लिपस्टिक खूप डार्क लावलं का ?? असंही वाटतं रहायचं. म्हणजे आत्मविश्वास असा नव्हताच. ••••

 फॅशन करायला एकतर मनापासून आवड असावी लागते, ती समज, तो सेन्स असावा लागतो. फॅशन तुमच्या पर्सनालिटी ला साजेशी असावी लागते. प्रसंगानुरूप, वेळेनुसार कपड्यांची, रंगाची निवड करता आली पाहिजे. फॅशन म्हणजे काही दुसऱ्यांची काॅपी करायची गोष्ट नाही. हे सर्व कळत होतं. तरी सुप्त इच्छा मात्र होती. रिया सारख कोणाला बघीतल की ती इच्छा पुन्हा पुन्हा जागृत व्हायची. •••

वयाप्रमाणे सर्व च बदलत गेले. मुलं मोठी झाली. अनघा कॉलेज मध्ये जाऊ लागली. अनघाला छान सुंदर तयार झालेलं बघताना मला छान वाटायचे. तिने खूप स्मार्ट रहाव‌ असं मला नेहमी वाटायचे. माझी अपूर्ण इच्छा अनघा पूर्ण करत होती. •••

एकदिवस अनघा म्हणाली, •••आई !! माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, “तुझी आई छान दिसते. She is very well maintained and looks young. “•••

आई तुझा व्यायाम व योग वर्ग बंद करू नकोस हं. अशीच छान रहा. •••

बाबा लगेच म्हणाले, ••• अगं !!! अनघा एकदा आईला बाजारात घेऊन जा. तिच्या personality ला साजेसे नवीन कपडे घे. गरज वाटल्यास प्रोफेशनल हेल्प घे. तिलाही खूप आवड आहे या सर्वांची. ••••

ब्युटिशियन ‘ मालविका ‘. •• अनघाची मैत्रिणी ने माझे ‘makeover ‘करून दिले. माझा हेअर कट केला. म्हणाली, •••

काकू हा ‘ salt n paper hair cut ‘ तुम्हाला छान दिसतोय. वेगवेगळे comfortable dresses घेतले. , make up चे प्रशिक्षण दिले. थोडक्यात मी पण फॅशन जगात / संस्थेत प्रवेश घेतला. •••

आपल्या वयाची मर्यादा सांभाळून मी पण उत्साहाने नवनवीन कल्पना आत्मसात करत होते. आता बऱ्यापैकी समाधान ही झाले आहे. स्वतः ला बदलणे म्हणजे आपल्या’ comfort zone ‘ मधून थोडे बाहेर निघावे लागते. हे कळले. ••••

आता, •••

काकू छान दिसताय. •••हेअर कट छान दिसतोय. ••असे रिमार्क मिळताहेत. •••

चला, •••उशिरा का होईना, एक इच्छा पूर्ण झाली. •••

आज रिया पण म्हणाली, ••• अग !! छान दिसतेस. ••• Very Smart. ••••

पूढे रिया म्हणाली, •••• एक जमाना था, ••• ” When I was very perticular about my looks. “•••

मधल्या काळात आयुष्याने एवढे रंग दाखविले की, आता रंगांचे तारतम्य विसरलेच बघ मी. ••रिया म्हणाली •••

रिया ची मुलगी •• ऋतुजा म्हणाली, •••

” मावशी !!! मागची पूर्ण बारा वर्षे बाबा आजारी होते. आईने बाबांची खूप सेवा केली. आम्हाला सांभाळले. घराकडे लक्ष दिले. “•••

 मावशी !! मला आईला पुन्हा पुर्वी सारखं बघायचंय. तिने पुन्हा तसंच जगाव असं मला वाटतं. बाबांची पण हीच इच्छा होती. ••

रिया ची मागच्या बारा वर्षांची कहाणी ऐकून तिने तिच्या वर आलेल्या कठीण प्रसंगाला तिने ज्या धैर्याने तोंड दिले ते ऐकून पुर्वीची स्टाइलिश रिया नव्याने दिसली. “

आज वेगळीच रिया समोर होती. कणखर, कर्तव्यदक्ष, संयमाने आपली जबाबदारी पार पाडणारी. न डगमगता एकानंतर एक येणाऱ्या समस्यांना तोंड देणारी. ••••

एक वेळेस आपल्या स्त्रीत्वाचा सजून धजून जगण्याचा हक्क बजावणारी, आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेणारी. ••••

आज कर्तव्याला तेवढ्याच जबाबदारी ने पार पाडणारी. •••

खरंच, •••

आयुष्याच्या प्रवासात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक गोष्टी घडतात. परिस्थिती नेहमी एकसारखी नसते. ••••

“न डगमगता जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदीशक्तीच नाही कां ?? “••••

म्हणतात ना, •••

“उस नारी का कोई मुकाबला नहीं, जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो।”•••

रिया म्हणाली, ••• पूर्ण एक तप ग !!!

बहुतेक मागच्या जन्माची काही तरी परतफेड असावी. मला समाधान आहे की मी माझे कर्तव्य /सेवा मनापासून केली. •••

मी विचारलं, •••कस manage केलंस ग हे सर्व ???

रिया म्हणाली, •••अग म्हणतात ना, •••

“Mind is nothing but traffic of thoughts. Select your route carefully. “•••

मी संयमाने गरजेप्रमाणे वागत गेले. •••

या अवधीत मी फक्त एकच प्रार्थना करत होते, ••••

हे देवा, ••••

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय 

माझे मला कळाया, देई रे बुद्धी रामराया.

आज पुन्हा एकदा रियाला बघून मी तिच्या आदरयुक्त प्रेमात पडले. काही लोकांच्या संगतीत आपलं आयुष्य घडत असतं. हे नक्की. •••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्रीचे अनोखे उपवास! ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ नवरात्रीचे अनोखे उपवास! ☆ श्री जगदीश काबरे ☆

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे उपास केले जातात. कोणी निर्जळी करतो, तर कोणी कडकडीत अनवाणी चालतो. पण या कर्मकांडी उपासाच्या ऐवजी या वेळेस एक अनोखा बौद्धिक पातळीवरचा उपवास आपण सर्वांनी केला असता आपल्या तनमनाचे शुद्धीकरण तर होईलच, त्याचबरोबर हे जगही सुंदर दिसायला लागेल.

हा उपवास आपण नवरात्रीच्या निमित्ताने जरी करणार असलो तरी तो वर्षातील कुठलेही सलग नऊ दिवस असा उपवास करून आपल्याला मन:शांती, समाधान आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर निखळ आनंद मिळेल… जगण्याचा अर्थ कळू लागेल. तेव्हा व्हा तयार…

प्रथम दिवस 

– मी माझा सर्व राग आणि द्वेष सोडून देईन.

द्वितीय दिवस 

– मी लोकांच्या विषयी आडाखे बांधणं सोडून त्यांच्या जातीधर्मापेक्षा त्यांच्या गुणांना महत्त्व देईन.

तृतीय दिवस 

– मी माझे इतरांबद्दल असलेले सर्व आकस, पुर्वग्रह सोडून देईन आणि डोळ्यावरचा चष्मा स्वच्छ करून नव्या चष्म्याने सगळ्यांकडे नितळ दृष्टीने पाहीन.

चतुर्थ दिवस 

– मी स्वतःला ओळखून आणि स्वतःविषयी परखड आत्मपरीक्षण करून सर्वांना क्षमा करेन.

पंचम दिवस 

– मी स्वतःला आणि प्रत्येकाला गुणदोषासकट स्वीकारेन.

षष्ठी 

– मी स्वतःवर आणि प्रत्येकावर अटीतटीचे प्रेम न करता बिनशर्त प्रेम करेन.

सप्तमी 

– मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सर्व भावना सोडून प्रत्येकाशी सहकार्याने आणि सौजन्याने वागेन.

अष्टमी (दुर्गाष्टमी) 

– मी माझी सर्व भीती सोडून अंधश्रद्धांचा त्याग करीन आणि विवेकाने जगण्याचा प्रयत्न करेन.

नवमी (महानवमी) 

– माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि मला जे मिळाले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहीन.

दशमी (विजयादशमी)

विश्वामध्ये सर्वांसाठी जागा आहे. विश्वातील वैविध्यतेला मी विषमता समजणार नाही. बिनशर्त प्रेम, साधना, निष्काम सेवा आणि विश्वासाद्वारे मी हे जग सुंदर करायचा प्रयत्न करेन.

तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना नवरात्रीच्या सदिच्छा…

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदरंग… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदरंग…  डॉ. माधुरी जोशी 

पुन्हा कोविदनी झटका दिला.जरा कमी त्रास दिला यावेळी….जरा चेंज म्हणून मागच्या वेळेच्या विकनेसची जागा सर्दी खोकल्यानं घेतली…छळंत राहिला…आता तोही दमून कमी झालाय.काल ८/१० दिवसांनी जरा कमी खोकून,न जागता,न बसून राहता शांत झोपू शकले.नेहमीच्या सवयीनं पहाटे जागही आली.न्युझीलंडमधे या घरांना भिंतीऐवजी भल्यामोठ्या काचांचे दरवाजे आहेत आणि तसेच मोठाले ग्रे कलरचे पडदे.रोज रात्री ते सरकवून ठेवले जातात.कितीही सरकवले तरी एखादी बारीकशी फट असू शकते….

आज पहाटे उठले आणि दिसला हॉलभर गुलाबी रंग…. सुंदर अलगद पसरलेला…हे काय आहे?स्वप्न पडतंय की काय? पडद्यातूनही तीच छटा गुलबट… आणि पडद्याच्या फटीतून तर गडद गुलाबी प्रकाश….हे जरा फारंच झालं….ताडकन उठले.खिडकीशी गेले.पहाटेची प्रसन्न वेळ…गारठा खूप दाट….पडदा सरकवला आणि मन आनंदानी न्हाऊन निघालं….तो पहाटेचा उगवतीचा गुलाल उधळला होता सर्वत्र….बाहेरची लॉन,झाडं,ते मला आवडणारे गवतावरचे ऊंच रेशमी झिरमिळ्यांचे तुरे.अगदी दादूची व्हाईट कारही….

सगळं सगळं त्या आगळ्या  रंगाची हलकी शिंपण घेऊन सजलं होतं….भिजलं होतं माझ्या मनासारखं…..हे सगळं कमाल देखणं होतं…सारं आकाश गुलाबी,सोनेरी,अबोली रंगछटात न्हायलेलं….. मोबाईलनं भराभर फोटो काढले…. मनात कायमचं राहणार होते खरंतर माझ्या तरी पण….

दिवसभर कॉलमधे दमत असणारे मुलगा सून अजून उठायचे होते.नाती उठण्याचं टाळंत गारठ्यामुळे परतपरत  ब्लॅंकेटमधे घुसत होत्या  .म्हणजे आत्ता मी एकटीच श्रीमंत,आनंदी,वेडी झालेली त्या उधळणीमुळे….. काहीसा वेळ गेला .जरा पांघरूण बिंघरूण आवरून ,तोंड धुवून चहा करायला ओट्याशी गेले.तिथेही मोठी खिडकी….म्हणजे चहा करतांना अजून थोडा वेळ रंग भेटणार तर….

पण वातावरण वेगानं बदललं होतं.गुलाबीवर राखाडीचं राज्य पसरलं होतं. मगाचच्या गुलाबीचा मागमूसही नव्हता.अरे…इतकं…इतकं कसं बदललं…१०/१५ मिनीटांपूर्वी तर सगळं घर,अंगण,आकाश असं रंगलं ?होतं त्या गुलालात….आता सगळ्यांवर दाट ग्रे पडदा कसा पसरला होता?….देखण्या आकाशाचं आभाळ झालं होतं अन् त्या मलूल आभाळात सूर्यही चंद्रासारखा अंधुक दिसत होता….अंधुकसा,शांत,तरी “सूर्यंच” होता ना तो…भरल्या आभाळातून देखिल प्रखरता जाणवतं होती.मी जरा हिरमुसले….पण ती पहाट मनात कोंदली होती.न संपणाऱ्या आनंदाचं दान देऊन….

मी कामात गुंतले.घड्याळ सरकत राहिलं.ते दुपारकडे झुकलं तरी ढगाळ उजेड अंधारलेलाच होता जरासा ….जेवणं,मागचं आवरणं झालं…जरा पडावं म्हणून हॉलमध्ये आले…. कार्पेट देखिल गारठलं होतं….इतका गारवा….काचांवरचे पडदे सरकवायला गेले आणि निसर्गाच्या लहरीनं थक्क झाले.चक्क पावसाची रिमझिम चालू होती.हिरवळ,झाडं,पक्षी …सारे गारठून मिटले होते.आता संध्याकाळ होणार तरी “रिमझिम झरती ” हेच गाणं सुरू आहे.माझं मन मात्र त्या पहाटेच्या गुलालानीच माखलंय अजून …हा रंग कधीच डिलीट होणार नाही….तो ऑप्शनच नाही माझ्या मनाच्या कॅमेऱ्यात…..

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सासुरवाशीण ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ सासुरवाशीण ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

‘स्वीकारणे’ हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली ! अर्थात माझी सौभाग्यवती, बायको !! बाबांच्या घरचे सगळे मोहपाश तिने मागे टाकले. आणि घरातील प्रत्येक गोष्ट सहजपणे स्वीकारली, अगदी उणीवांसह !!!

लग्नापूर्वी बोलत असताना कितीतरी वेळा तिच्या तोंडून ऐकायला मिळालं होतं,  ‘माझ्या बाबांच्या घरी असं आहे, तसं आहे’. अगदी तिच्या सगळ्या नातेवाईकनातेवाईकांविषयी देखील ती भरभरून बोलायची. तिच्या माहेरच्या गोष्टींविषयी ‘माझं’, ‘माझे’ या शब्दांचा उल्लेख मी कितीतरी वेळा ऐकला. आणि विशेष करून ‘माझे बाबा’ तिच्या रोजच्या बोलण्यात एक अनिवार्य भाग.

त्याच मुलीच्या लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या माहेरी पहिल्यांदा तिच्या सोबत गेल्यानंतर, तिच्या बोलण्यात एक वाक्य आलं, ज्याने मला आश्चर्य कमी आणि धक्का अधिक बसला !

बोलता, बोलता तिच्या बाबांना ती म्हणाली, ‘तुमच्या घरी असं आहे !’

मी केवळ तिच्याकडे पाहतच राहिलो. ‘माझे बाबा’, ‘माझं घर’, असे म्हणणाऱ्या मुलीने लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी सहजपणे स्वीकारली आणि त्यानुसार ती जगायलाही लागली ! किती सहजपणे ती सासरशी ‘संलग्नीत’ झाली !! जिथे जीवनातील वीस-पंचवीस वर्षे घालवली, त्यांना क्षणार्धात ‘तुमचं घर’ असं संबोधलं, आणि सासुरवाशिण झाली ! या सासुरवाशिणीचा अभिमान वाटला, तो हा पहिला प्रसंग होता !!

पण नंतर नंतर तिने अक्षरशः माझ्या घरावर ताबा मिळवला. आता ‘माझे घर’ केवळ नावापुरतेच राहिले. माझे आई-बाबा तिचे आई-बाबा झाले. माझे नातेवाईक तिचे नातेवाईक झाले. माझी प्रत्येक गोष्ट तिची झाली. ती सहजपणे म्हणायला लागली, ‘आपले आई-बाबा’. पण मी प्रयत्न करूनही तिच्या आई-बाबांचा उल्लेख कायमच ‘तुझी आई’, ‘तुझे बाबा’ असाच केला. तिच्या इतक्या सहजपणे स्वीकारायला मला जमलेच नाही.

जसजसा अनुभव येत होता, तसे तसे घरातील तिचे महत्त्व वाढत जात होते. माझ्या कौतुकाला अक्षरशः ओहटी लागली होती. आई घरातील प्रत्येक गोष्ट तिला विचारून करायला लागली. लग्नकार्य असो, अन्य कोणताही छोटासा कार्यक्रम असो, मला विचारणारी आई सगळं काही तिला विचारायला, सांगायला लागली. अगदीच ‘सुनबाई’ वगैरे म्हणणं नाही. पण नावानेच का होईना, कायम तिचेच नाव घ्यायला लागली. खुप प्रेमाने मी तिचे नाव लग्नात बदलले होते. तर त्यावरही सगळ्यांनीच अधिकार गाजवला. मी आपला वरवरच्या कामा पुरता राहिलो. मला घरातील गोष्टी कळायला लागल्या, त्या ठरल्यानंतर. साधी सत्यनारायणाची पूजा करायची आहे, हे प्रथम मला कळले, ते पूजेसाठी आणायच्या सामानाची यादी हातात आल्यानंतर.

हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की,  नातेवाईकांमध्येही तिचेच नाव ऐकू यायला लागले. पूर्वी नातेवाईकांकडे एकटा जायचो, प्रसंगी आई-बाबांनाही सोबत असायचे, सगळे कसे अगदी छान माझ्याशी गप्पा मारायचे, माझी चौकशी करायचे. पण बायको आल्यापासून नातेवाईकांकडे गेलो तर, केवळ तिच्याशीच गप्पा. तिचीच चौकशी. आणि ती सोबत नसेल तरीही तिच्याच विषयी विचारणार. बायकोने माझ्यावर जादू केली इथपर्यंत ठाऊक होते. पण सगळ्या नातेवाईकांना होईल, याची मुळीच कल्पना नव्हती.

‘आपलेपणा’ आणि ‘अलिप्तपणा’ इतक्या सहजपणे सोबत घेऊन ती आली होती की, मी प्रयत्न करूनही तसे वागू शकत नव्हतो. एकदा तिच्या बाबांच्या विषयी काही सुचवण्याचा, निर्णयाचा विषय निघाला. त्यावर ती ठामपणे तिच्या बाबांना म्हणाली, ‘तुमचा निर्णय. तुम्ही घ्या. आता माझ्यापेक्षा दादाचा तुमच्या अधिक अधिकार आहे’.

‘सासुरवाशीण’ झालेली मुलगी कशी असते, हे मी अनुभवत होतो. आणि समृद्ध होत होतो. आणि कदाचित तिने मला दिलेल्या या नव्या अनुभवामूळे की काय मी केवळ आनंदीच झालो नाही तर व्यापक ही झालो. याच विचारांनी मी आजूबाजूला पाहायला लागलो. तर लक्षात आले की, सगळ्याच सासुरवाशीणी अशाच असतात. ताई, आई, काकू, मावशी, आत्या, आजी अगदी कुणीही असो सगळ्या एकाच जातकुळीच्या.

जीवनात पहिल्यांदा वाटले की, पोटच्या पोरां व्यतिरिक्त अभिमान वाटावा आणि मनमोकळेपणाने कौतुक करावं अशी परक्याची एकच मुलगी असते. आणि ती म्हणजे बायको !  अन्यथा इतरांच्या मुलांची स्तुती आणि प्रगती मनुष्य सहजपणे पाहू शकत नाही, करू शकत नाही. पण ‘सासुरवाशीण’ वेगळी असते.

आणि कदाचित पूर्वजन्माचे पुण्य आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद म्हणून की काय,  जगातील त्या सगळ्या भाग्यवंतांपैकी मी ही एक झालो, ज्याच्या पोटी देवाने मुलगी दिली!

आजही तो प्रसंग आठवतो. दवाखान्यात होतो. 

डिलिव्हरीचा दिवस होता. डॉक्टरांनी आवाज दिला. बोलावून सांगितले ‘मुलगी झाली’ आहे. पेढे आधीच आणून ठेवले होते. आई बाबांना पेढे दिले.  पाया पडलो. आणि वेड्यासारखा व्हरांड्यातील सगळ्यांना पेढे वाटायला लागलो.  आनंदाने सांगत होतो, ‘मुलगी झाली आहे’, ‘मुलगी झाली आहे’. पेढे वाटता वाटता एका आजोबांनी कदाचीत खात्री करण्याच्या उद्देशाने की काय परत विचारले ‘मुलगा झाला वाटते !’

आणि मी अगदी नि:शब्द होऊन उभा राहिलो. 

आणि मनातल्या वाटून गेले, ‘कुणाचेतरी घर संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी माझ्यापोटी ‘सासुरवाशीण’ आली आहे..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विसंवादी सूर… लेख क्र. १४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ विसंवादी सूर… लेख क्र. १४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

दहावीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांचे फोन येऊ लागले. मी सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली होती पण पालक, विद्यार्थी मला विसरले नव्हते याचा आनंद वाटत होता. आज दहावी उत्तीर्ण झालेली ही मुलं प्राथमिक शाळेत असताना कशी होती ते आठवून पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळत होता.

विक्रांत मोरेच्या (नाव बदललेले) आईचा फोन आला, त्यांचा रडवेला आवाज ऐकून मी म्हटलं, “अहो, इतके छान गुण मिळाले आहेत, मग रडताय कशाला?”

त्यावर त्या म्हणाल्या, “बाई, आज ही इतकं सगळं छान तुमच्यामुळे घडू शकलं.”

मला चटदिशी विक्रांत दुसरी इयत्तेत असतानाचा प्रसंग आठवला. त्याला शाळेत सोडायला त्या (त्याची आई) यायच्या. नेहमी हसऱ्या आणि प्रसन्न. सचिवालयात नोकरीला होत्या. सतत धावपळ चाललेली असायची.

विक्रांतला शाळेतून घ्यायला त्याची आजी यायची. तेव्हा तो शाळेत खूप विचित्र वागायचा. वर्गशिक्षिका नेहमी याची तक्रार करायच्या.

मग मी त्याच्याशी बोलायचे ठरवले. घरातल्यांची चौकशी केली. त्यावरून कळलं की घरी सतत भांडणं होत असावीत.

एका शनिवारी मी त्याच्या आईला शाळेत मला भेटायला बोलावलं. त्या घाबरतच आल्या, म्हणाल्या, “बाई, आता त्यानी आणखी काय घोळ घातलाय?” मी हसले, त्यांना आश्वस्त केलं, म्हटलं, “अहो, त्यानं काहीच केलं नाही. सहज तुम्हाला गप्पा मारायला बोलावलं आहे.”

आमच्या गप्पा चालू असताना, घरचा विषय निघाला की मात्र त्या सावधपणे बोलत होत्या. मी त्यांना म्हटलं,”मी त्याची शिक्षिका – बाई नाही, तुमची आई आहे असं समजा आणि मला खरं खरं सांगा.  म्हणजे आपल्याला त्याच्या वागण्याचे कारण कळेल आणि त्यावर उपाय काढता येईल.”

त्यांचे डोळे भरून आले. “बाई, मला आई नाही, आणि वडिलांना त्रास नको म्हणून माझी कर्मकहाणी मी काही त्यांना सांगत नाही.”

त्यांनी सांगितलेली माहिती खरंच धक्कादायक होती. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या सुशिक्षित बायका हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करतात? सासूबाई प्रचंड त्रास देत होत्या. घरची सर्व कामे करायची. त्या म्हणतील तसेच वागायचे. सून अगदी गरोदर असतानाही तिला दूध देताना सासू दुधात अर्धे पाणी घालून द्यायच्या. सुनेला घरात कोणत्याच गोष्टीचे स्वातंत्र्य नव्हते. पण घरही तिनेच चालवायचे, घरखर्चाची जबाबदारीही तिचीच. कारण काय तर म्हणे तापट डोक्याच्या नवऱ्याचे बॉसशी भांडण झालेम्हंकन त्याने नोकरी सोडली होती.

या सर्वावर कळस म्हणजे सासूबाई नातवाला आईविरुद्ध भडकवायच्या. ती वाईट्ट आहे, तिच्याकडे जाऊ नको असं त्याच्या मनात भरवायच्या. नातूही मग त्याच्या आईला वाट्टेल तसं बोलायचा, आईकडे जायचा नाही. या सगळ्यामुळे ती खूप दुःखी होती.

मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत केलं, म्हटलं, “यातून काहीतरी मार्ग काढू.”

तेव्हापासून रोज मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. या गप्पांतून नातवावर आजीचा जबरदस्त पगडा आहे हे जाणवले. मी आईला सुचवले, “थोडे दिवस तुम्हाला वेगळे राहता येईल का? तुमचा लेक आजीपासून थोडा लांब राहिला तर बरं होईल.”

.. त्यांनाही हा विचार पटला. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर कर्ज काढून ब्लॉक घेतला, मुलाला पाळणाघरात ठेवलं.

पुढच्या (शैक्षणिक) वर्षी मुलगा माझ्या वर्गात आला. वेळ मिळेल तेव्हा वर्गात आणि त्याला वैयक्तिकरीत्याही मी आईचं महत्त्व पटवून देऊ लागले.

हळूहळू तो आईशी चांगले वागू लागला. शनिवार रविवार सगळे एकत्र येत होते. सासूबाईही शांत झाल्या होत्या. त्यांना त्यांची चूक समजली होती.

आज कितीतरी वर्षांनी तो प्रसंग आठवला. परमेश्वराचे खूप आभार मानले. संसारात लागू पाहणारा विसंवादी सूर वेळीच आवरला गेला होता, मैफल सुरीली झाली होती.

– लेख क्र. १४

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जीव भांड्यांवर जडला – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जीव भांड्यांवर जडला– –” ☆ सुश्री शीला पतकी 

खरं तर साधारण चार वाजता, असलेले कपडे नीट घड्या करून ठेवणे, घासून आलेली भांडी पुसून स्वच्छ जागेवर लावणे आणि तदनंतर चहा करणे, हा प्रत्येक घरचा रिवाज.  माझ्या घरी मी तेच करते.. आईने लावलेल्या सवयी! मला आवडत नाही पण करते! मोलकरणीला एक सोय करून दिली.. भांडी थोडा वेळ उन्हात ठेवायची, मग टोपली उचलून आणून स्वयंपाक घरात खाली साडीचा दुपदरी मोठा तुकडा अंथरलेला असतो त्याच्यावर भांडी पालथी घालायची.. ती पुन्हा मी सरळ करून ओट्यावर ठेवायची आणि चार वाजता मी ती लावायची!

आज ओट्यावर पडलेली ती सगळी भांडी मला काही वेगळीच दिसायला लागली.  डोक्यात वेगळेच विचार यायला लागले.  नेहमीचीच भांडी.. पण त्या भांड्यामध्ये घरातले एकेक व्यक्तिमत्व दडलेले आहे असं मला वाटायला लागलं.  भांड्यातली ती दोन फुलपात्री मला भालदार-चोपदारासारखी दिसू लागली.  भांड्यातल्या त्या पाच सहा वाट्या चार वाजता निवांतपणे अंगणात गप्पा मारायला बसलेल्या बायकांसारख्या वाटायला लागल्या.  काटे चमचे-बारके चमचे मला अंगणात खेळणाऱ्या  टारगट पोरांसारखे वाटायला लागले, आणि जेव्हा लावले त्यांना तेव्हा गुरुजींनी शिक्षा केलेल्या मुलासारखे वाटायला लागले. ओळीने त्या फडताळात उभे..

मग काय.. नात्यातली माणसं भेटली.. कढई मला सासुसारखी वाटायला लागली.. कान देऊन ऐकणारी पण ‘मला हल्ली ऐकायला येत नाही रे’ असं आवर्जून सांगणारी.  कुकर तर महादेवाच्या पिंडीसारखा  वाटला.. या जगात देवाशिवाय दुसरा कोणी नाही तसं  स्वयंपाक घरात कुकर शिवाय कोणी नाही असं वाटतं.  मोठा गॅस केल्यावर त्याचं होणारं तांडव शंकराच्या तांडवापेक्षा कमी नाही.  चहाचे व साखरेचे डबे जेष्ठा कनिष्ठासारखे वाटायला लागले..  त्यांच्याशिवाय दिवस सुरू होत नाही.  उलथनं एखाद्या टार्गेट पोरासारखं वाटायला लागले..  वर्गामध्ये सगळ्या पोरांना टपल्या मारत  हिंडणाऱ्या  मुलासारखं!

चिमटा घरातल्या मोठ्या नणंदेसारखा वाटायला लागला.. याला धर त्याला धर! पोळू नये म्हणून धरावा पण चिमटा काढल्याशिवाय सोडू नये.  पोळपाट आणि लाटणे भांडणाऱ्या नवरा बायकोसारखं वाटायला लागलं.. तीन पायावर पाय पसरून निवांत बसलेला नवरा आणि त्यावर या बाजूने त्या बाजूने रागाने लाटणारी बायको.. मध्ये कणकेचा मऊ गोळा असतो म्हणून बरे.  भांडण झाल्यावर दोघांनी वेगळ्या खोलीत जाऊन बसावं तसं काम झाल्यावर पोळपाट एकीकडे जातो आणि लाटणं दुसरीकडे जातं. आणि  रवी म्हणजे मला घरातल्या गरीब बिचाऱ्या नापास होणाऱ्या दिरासारखी वाटते.. आपलं काम झालं की कोपऱ्यात जाऊन बसणे..  पण थोड्या वेळाची फिरवाफिरवी तर सोडत नाही बरं! तवा जरा खोल विचारांचा.. त्याला ठाऊक आहे आपल्याशिवाय कोणाचंही पोट भरणार नाही.

मिसळण्याचा डब्यातले ते सात कप्पे म्हणजे घरातली वेगवेगळी तऱ्हेवाईक माणसं.. कोणी तिखटासारखं  लाल तर कोणी मसाल्यासारखं खमंग..  तिकडे तडफडणारी मोहरी एकात, तर कमी तापमानाला उडणारे जीरे दुसऱ्यात. सगळ्यांनी निरोगी राहावं आणि स्वयंपाकाला चव यावी म्हणून दिसणारे हिंग-हळदीचे पाळे!  पळी तर मला दिसते घरंदाज बाईसारखी.. डोक्यावरचा पदर न पडू देता सगळ्यात राबणारी महिला!

गॅस सासरेबुवासारखा.. बायको हा सिलेंडर स्वतःबरोबर असेल तर हे पेटणार एरवी असंच!

उद्या पाणी येणार म्हणून घासून लख्ख केलेली कळशी एखाद्या नव्या नवरीसारखी दिसत होती आणि दहा ठिकाणी पोचे आलेला तो हंडा बसून बसून खाऊन शरीरावर मेद वाढलेल्या एखाद्या माणसासारखा दिसत होता……

…… या सगळ्या कल्पनेचं माझं मला हसू येत होतं.. सगळ्या विचारांच्या नादात भांडी लावून झाली पण त्या चार सहा वाट्या  मला छान काय गप्पा मारत बसलेल्या बाया दिसत होत्या तेवढ्याच लावायच्या  राहिल्यात..

चला एकूण काय सगळ्या भांड्यात कोणी ना कोणीतरी दिसलं आणि माझं काम झालं बघा.. तुम्हालाही काही सुचतंय का ——-

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लग्नाचा थाट आणि आम्ही…” – लेखिका: सुश्री वंदना ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “लग्नाचा थाट आणि आम्ही…” – लेखिका: सुश्री वंदना ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

हल्ली सगळीकडे मेसेज फिरतोय की “लग्नावर अवास्तव खर्च करू नका, लोक एक दिवस जेवतील आणि  नंतर सर्व विसरतील पण आपण त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. हा पैसा नवरा नवरीला दिला तर ते त्यांच आयुष्यात उपयोगाला आणतील “.  हे वाक्य वाचल्यावर पहिला माझा विचार होता की करू दे ना लोकांना खर्च… लग्न हे आयुष्यात एकदाच होते मग ही आठवण मनातल्या हिंदोळ्यावर कोरून ठेवली जाते… महिलांसाठी साडी आणि दागिने खरेदी करायची असेल तर घरच्या मोठ्यांची परवानगी लागत नाही कारण त्यांच्या तोंडून वर्षानुवर्षे ऐकलेले असते “ह्याच्या किंवा हिच्या लग्नात ना मी पैठणी आणि मोहनमाळ किंवा बकुळी हार करणार… वगैरे “त्यामुळे तो आपल्याच हक्क असतो… नवऱ्यासाठी एखाद धोतर कुर्ता किंवा सलवार सूट झाला की बायका त्यांच्या खरेदीला मोकळ्या. घरातलं वातावरण प्रसन्न असतं… ह्याला काय द्यायचं त्याला काय द्यायचं ह्या विचारात घरातली भांडण थांबलेली असतात… लग्नाच्या मुलाचं (कमीच) पण मुलीचे शॉपिंग असेल तर बघायला नकोच. असे आयुष्यातले सहा सात महिने भुरकन आनंदात उडून जातात. मग एक दिवस शांत वेळी नवरा लग्नाचा हिशोब  मांडतो… आपण कानाडोळा करत असतो आणि एक वाक्य येत हळूच… “अपेक्षेपेक्षा जास्त झाला ग खर्च, जरासं बजेट जास्त झालं, हे हे केलं नसतं तर जरा कमी झाला असता खर्च “. तो सांगून जातो आणि आपल्या मनाला थोडीशी हुरहूर लागते…

तसा सोन्याचा हार होता उगाचच मोहनमाळ केली, सुनेला तिच्या आईने बरेच दागिने घातलेले, आपण उगाचच दोन बांगड्या जास्त केल्या तिला…आता तर त्या लॉकरमधे ठेवल्यात कारण ती किंवा मुलगी घालत नाही. पाच महागाच्या साड्या घेण्यापेक्षा दोनच घेऊन तीन ड्रेस घ्यायला पाहिजे होते… जे नेहमी घालते…साड्या पडूनच आहेत “जड “होतात घालायला म्हणून…जवळ जवळ पाचशे माणसे जेवली असतील पण फक्त वीस पंचवीस लोकांनीच सांगितलं जेवण चांगला होते, समारंभ चांगला होता म्हणून…असे अनेक विचार डोकांवतात… मग लेकीचे किंवा लेकाचा लग्नाच्या समारंभा मधला हसरा चेहरा आठवतो आणि परत सगळं विसरून जातो.

ट्रेनमध्ये नेहमी भेटणारी मेधा आठवली, संधिवाताचा त्रास होता तिला, कोणीतरी सीट देईल ह्या आशेने मैत्रिणी बनवायची, बडबडी होती पण चेहऱ्यावर दुःख दिसत होते वाताच्या दुखण्याचं… नेहमी सांगायची “नोकरी सोडायला नवरा म्हणतोय ग, पण दोन मुली पदरात आहेत, सासुबाईंचे आजारपण ह्याला पैसा संपतो आणि आपला पगार हा वाहता पैसा असतो, त्यातच मुलांची लग्न आटोपणार कारण रिटायरमेंट नंतर मुलींच्या इच्छेप्रमाणे लग्न नाही करता येणार कारण तेव्हाचा पैसा हा साचलेल्या पाण्यासारखा असणारं… किती वापरू, कसा वापरू, पुढचं काय? हे प्रश्न उभे असतात “.  परवा सहा वर्षांनी भेटली, कसं काय? गोष्टी झाल्या तर दोन्ही मुलींनी आईवडिलांना सांगितले की आमचं लग्न रजिस्टर करा आणि जो काय खर्च करणार होतात, ती रक्कम आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मदत म्हणून द्या… एकीने घरासाठी डिपॉझिट म्हणून दोन लाख आणि नवीन संसाराला भांडीकुंडी घ्यायला काही पैसे मागितले पण त्यातले पण बरेच परत केले (तेव्हा होते म्हणून द्यायला मिळाले हे आईचे वाक्य). दुसरी लेक परदेशात गेली लग्न करून, तेव्हा तिथल्या कोर्ससाठी आईवडिलांकडून पैसे घेतले आणि नोकरीला लागल्यावर परत केले. बरं झालं लग्नात खर्च नाही केला पण असे पैसे त्यांच्या मदतीला आणि नवीन संसाराला लागले… आम्ही खरंच नशीबवान आहोत…..हे मेधाचे वाक्य ऐकून परत माझे मत बदललं…

असा पैसा उपयोगाला येणार असेल तर… खरंच एवढं मोठे लग्न समारंभ ज्यात हल्ली प्री वेडिंग शूट हा पांचटपणा चालू आहे ज्याचा खर्च अंदाजे एक लाख ते दीड लाखाच्या घरात येतो मग, संगीत थोडक्यात मेहंदी सेरेमनी मग हळद आणि नंतर लग्न… हा पंचवीस लाखाच्या घरातला खर्च करून… “आम्ही ना डेस्टिनेशन वेडिंग “केलं जिथे मोजकीच माणसे होती पण खर्च एक करोड पर्यंत झाला हे आपल्या जखमेवर मीठ चोळले जाते…. आणि आपले पंचवीस लाख किस झाड की पत्ती वाटायला लागतात… त्यापेक्षा रजिस्टर मैरिज मस्त … मुलगा किंवा मुलगी हनीमूनला गेले की आपण पण एक टूर मारायची… मस्त पैकी मन आणि शरीर मोकळं करून यायचे… मुलांना गरजेचा पैसे द्यायचे कारण ते आपले असले तरी शेवटी आपण प्रेमळ आईबाप आहोत… हे आपल्याला सिद्ध करायचे असते.

तुम्हाला काय वाटते?

लेखिका: सुश्री वंदना

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares