मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

आपल्या सर्वांनाच सकारात्मकतेची तीव्र गरज असते – सोमवारी सकाळी जरा जास्तच.

वर्तमानपत्रे असतात, असंख्य वृत्तवाहिन्या आहेत पण TRP व circulation वाढवण्यासाठी अथवा त्यांच्या मालकांच्या आदेशानुसार आपल्याला serve केल्या जातात त्या फक्त खून, बलात्कार, दरोडे यांच्या बातम्या.

या नकारात्मकतेचा कळत नकळत cumulative पध्दतीने sub conscious level ला खूप परिणाम होत जातो, मनातल्या Negative विचारांचे प्रत्यक्ष अनुभवात आणि अनुभूतीत रूपांतर होत जातं, आपल्या मनातले नकारात्मक भाव अधिक दृढ होत जातात आणि एक कधीही न संपणारे नष्टचर्य सुरू रहाते.

या सर्व चक्रात वारकऱ्यांच्या ठायी असलेली श्रद्धा गमावून बसलो आहोत. महिनाभर घरदार सोडून, खरेतर घरदार विसरून, हा अडाणी अशिक्षित वारकरी आपला सर्व भार त्या विठुरायावर टाकतो आणि सुखेनैव मार्गक्रमण करू लागतो. त्या विठूमाऊलीच्या दर्शनाइतकंच त्याच्यासाठी ही वारीच्या पायपीटीची प्रक्रियाही तेवढीच लोभस, आनंददायी आणि फलदायी असते. आणि त्या प्रवासाच्या अंती जेव्हा त्या विठोबाचे दर्शन घडते तेव्हा पूर्ण श्रद्धेने तो माऊलीच्या चरणी मस्तक ठेवता होतो. आपण प्रयत्न करीत रहायचे, पांडुरंग करेल ते योग्यच करेल हा विश्वास, ही खात्री त्याच्या सर्व अडचणी, चिंता दूर करते. प्रयत्न करण्याचा पण श्रेय स्वतःकडे न घेता पांडुरंगाला देण्याचा हा त्याचा निष्काम कर्मयोग आपल्याला साधता येईल का ?

TV वरील सासू सुना, विवाहबाह्य संबंध, कपटीपणा चघळणाऱ्या मालिका न बघता सृजनशीलतेला चालना देणारे, ज्ञानात भर टाकणारे, challenge देणारे काही कार्यक्रम बघता येतील का ? National Geographic आहे, वेगवेगळे sports channel आहेत, अगदी मास्टरशेफ; खानाखजाना; खवय्ये आहेत, tours and travel चे channel आहेत, खूप पर्याय उपलब्ध आहेत.

Internet वर तर अशा positive बातम्यांचे भंडार आहे. Good news network आणि chicken soup for soul आपल्याला आंजारतात, गोंजारतात, या जगात फक्त आपणच दु:खी कष्टी नाही; लोकांनी आपल्याहूनही भीषण परिस्थितीला तोंड देत तिच्यावर मात केली आहे याची आपल्याला जाण करून देतात.

You Tube वरील TED talks – Technology, Entertainment, Design आपल्याला माहितीची आणि प्रेरणेची अनेकानेक नवी दालने उघडून देतात.

नियमित व्यायाम, meditation, प्राणायाम शरीराबरोबरच मनही ताब्यात ठेवते व सुदृढ ठेवते.

जे काही होते ते चांगल्यासाठीच ही खात्री मनाशी बाळगली की प्रयत्न करायला हुरूप येतो. आपणच निर्माण केलेल्या ध्येयांच्या मागे धावताना आपण त्या प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला विसरून गेलो आहोत आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत नवीन target उभं राहिलं असतं त्यामुळे पहिला ध्येयप्राप्तीचा आनंदही आपण घेत नाही.

यातून आपण बाहेर पडण्याची गरज आहे. वारकऱ्यांसारखं त्या प्रवासाचाही आनंद घ्यायचा आहे, संकल्पपूर्तीचाही आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींतून चांगले, positive, शिकण्यासारखे काय आहे ते आत्मसात करू या. सकारात्मक दृष्टीकोन स्वत: ठेवू या, इतरांनाही देऊ या.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

आपुली आपण करी जो स्तुती। तो एक पढत मूर्ख।। 

– – असे संत रामदासांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिमेबद्दल नेमके काय बोलावे, बोलावे की न बोलावे, या संभ्रमात मी आहेच.

स्वतःबद्दल खरे सांगणारी एकच वस्तू आहे. आणि ती म्हणजे आरसा. आरसा खोटे बोलत नाही. पण आरशातली प्रतिमा ही सुद्धा बाह्यरंगी असते ना? आरसा फार तर सांगेल, “तू गोरी नाहीस, तुझे डोळे जरा जास्तच मोठे आहेत, केस आता पांढरे होत चाललेत, रागावलेली दिसतेस, खूश दिसतेस. वगैरे वगैरे. पण अंतरंगातली वादळं, तत्वं आरसा कशी टिपणार? फार फार तर तुम्ही जसे आतून असता, त्याचा तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होतो आणि तो परिणाम, आरशातली प्रतिमा टिपू शकेल असे तूर्तास म्हणूया.

तर स्वप्रतिमा… मी कोण? कशी आहे मी? अगदी “कोsहम” सारखाच हा प्रश्न आहे नाही का? 

आपण आणि आपली समाजातील प्रतिमा ही तंतोतंत जुळणारी असते का? हाही एक प्रश्न आहे. माझ्याबद्दल माझ्या भवतालचे स्नेही म्हणतात, कशी हसतमुख, बिनधास्त आहे, रोखठोक आहे, आत एक बाहेर एक असे मुळीच नाही, वातावरणात एक सहज चैतन्य आणते, एकेका वाक्याला सगळ्यांना हसवते, या वयात ही किती उत्साही आहे वगैरे वगैरे. या सर्व स्तुतिसुमनांनी माझी छाती नक्कीच फुलते. अंगावर मुठभर मासही चढते (लाक्षणिक अर्थाने—नाहीतर त्याची गरज काय?) अगदी हळुवार मोरपीस फिरते. पण जेव्हां मी माझ्या अंतरंगात हळूच बुडी मारते तेव्हां जाणवते— हसतमुख, बिनधास्त, विनोदी ही विशेषणे माझ्यासाठी खरंच योग्य आहेत का?

मला प्रचंड राग येतो. खूप चिडचिड होते माझी. समोरच्या माणसाचे चांगलेच लोणचे घालावे असेही वाटते. बिनधास्त तर मुळीच नाही. जी व्यक्ती काटेकोरपणे वेळ पाळण्यासाठी धडपडत असते ती बिनधास्त कशी असेल? आणि कसली रोखठोक बोलते? ” जाऊदे! याला बोलून काय उपयोग आहे? उगीच तोंडाची वाफ दवडा” या विचाराने मी कितीतरी वेळा गप्पच बसते. माझं विनोदी बोलणं हे ही माझ्या विसंगत मानसिकतेतून आलेलं असतं.

मनात ज्वाळा पेटलेल्या असतात.

मला खूप वेळा जाणवतं, आपल्याला वाटत असतं की आपण असं असावं, असं बनावं, म्हणजे मितभाषी, शांत, सोशिक, शालीन, नम्र वगैरे वगैरे. पण अशा असणाऱ्या लोकांबद्दलही मला नेमकं काय वाटतं तेही मी सांगू शकणार नाही. कधी कधी हीच माणसं मला अगदी पचाक आणि बावळटही वाटतात. मग मी त्यांच्यासारखं का असावं? थोडक्यात एका खिशात तलवार आणि दुसऱ्या खिशात बासरी अशी काहीतरी संमिश्र प्रतिमा आहे माझी, माझ्या मनातली. मी चांगली, मी वाईट, मी अशीही, मी तशीही पण “अशी मी अशी” मी नक्कीच नाही.

माझ्या एका प्रोफेसर मैत्रिणीबरोबर मी एक दिवस गाडीवरची पाणीपुरी खात होते. छान अटोपशीर ड्रेसेस वगैरे आम्ही घातले होते. मस्त मजेत होतो.

“भैय्या थोडा तेज बनाओ, ज्यादा मीठा नही मंगता “वगैरे बिनधास्त हिंदी बडवत होतो. खाता खाता प्रोफेसर मैत्रीण म्हणाली, ” अग! माझ्या एखाद्या स्टुडंटने असे मला पाहिले तर त्याचे माझ्याविषयी काय मत होईल?”

म्हणजे ती माझी मैत्रीण आणि प्राध्यापक या दोन प्रतिमांमध्ये चक्क विभागलेली होती. त्यावेळीही माझ्या मनात आले मग “मी कोण?” मीही बँकेत उच्चपदस्थ होते मग माझ्या मनात असा विचार का नाही आला?

माझ्या आईचे एक म्हणणे असायचे, नाटकाला जाताना साडीच नेसायची.

.. खरोखरच आपल्या प्रतिमा अशा घटकांमध्ये दुभंगलेल्या असतात. या मुद्द्याचा विचार करताना मी जेव्हा माझ्या खऱ्या प्रतिमेंशी येऊन थांबते किंवा मी माझ्या प्रतिमेला शोधत बसते तेव्हा एकच जाणवते, मूळात मी तशी खडूस, स्वान्तप्रिय, स्वतःशीच संवाद साधणारी, अत्यंत अनसोशल, मात्र निसर्गप्रेमी, गंभीर प्रवृत्तीची एक अत्यंत कंटाळवाणी व्यक्ती असावी. कोण जाणे मीच मला अजूनही सापडलेली नाही. खट्टी की मिठी? “मी कोण?”चा शोध अजूनही चालूच आहे. आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहणार.

पण त्यादिवशी गॅलरीत झोपाळ्यावर निवांत बसले होते. संध्याकाळ होत होती. मावळत्या सूर्याने आकाशात सुरेख रांगोळी काढली होती. नजरेसमोर उंचउंच इमारतीच होत्या. त्यातून दिसणारे आकाशाचे हे रंगीन तुकडे मी न्याहळत होते. माणसे आणि वाहनांची गर्दी बघत होते. एका यांत्रिक विश्वाची चाललेली धावपळ, दमछाक निरखत होते आणि या संपूर्ण भौतिक पार्श्वभूमीवर मला एका काहीशा दूरच्या रिकाम्या रस्त्याच्या वळणावर मस्त नारिंगी फुले अंगावर पांघरून ऐटीत उभा असलेला सुंदर “गुलमोहर” दिसला. आणि माझ्या अंतरंगात एक हलकासा तरंग उमटला.

“कोण मी”?… खरं तर याच विश्वाचा फक्त एक अंश मी..

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ संकलक / प्रस्तुती : डॉ. धनंजय देशपांडे

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं सोपं नसत हो sssss 

 

सोपं नसतं हो 

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं !

कारण तिला पसंत नसते 

जी हुजुरी”

झुकत नसते ती कधी जोवर नात्यांमध्ये प्रेमाची भावना असत नाही

तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं

कारण ती शिकलेलीच नसते 

नकली धाग्यात नाती गुंफणे!!

तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या

पाकात बुडवून

आपले म्हणणे मान्य

करवून घेणे!!

तिला तर ठाऊक असते बेधडक

खरे बोलत जाणे!!

फालतू चर्चेत पडणे,

तिच्या स्वभावात बसत नाही

मात्र तिला ठाऊक असते 

तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते

ती वेळोवेळी दागदागिने, कपडेलत्ते 

यांची मागणी नाही करत

ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने

सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती

निरागस स्मितहास्याने

तुमच्या चुकांविषयी ती तुम्हांला

अवश्य बोलणार!! 

पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार

तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत

तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील माहित असत!! 

कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे तिला जमत नाही 

पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,

झुकते जरुर 

पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे

आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व

उधळून देऊ शकते!!

धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच 

अशा स्त्रीवर प्रेम करावे!!

कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,

आणि पुरुषी अहंकाराने,

जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही

कुठल्याही प्रेमाखातर…!

कवयित्री डोमिनैर (पोलंड)

मराठी अनुवाद : भरत यादव 

संकलन : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आषाढीच्या स्वादातली भक्ती… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ आषाढीच्या स्वादातली भक्ती… ☆ तृप्ती देव ☆

आषाढ मास सुरू झाला, की वातावरणात एक वेगळाच ओलसरपणा आणि आल्हाददायक गारवा पसरायचा. आभाळ भरून यायचं आणि त्या ढगांच्या गडगडाटात पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींच्या टाळ-मृदंगाचा नाद ऐकू येतोय असा भास व्हायचा. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय, त्यामुळे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जाणं काही शक्य नसायचं. पण पंढरपूरचं ते अथांग पावित्र्य, तो विठ्ठलमय आनंद दरवर्षी आमच्या घराच्या अगदी लहानशा स्वयंपाकघरात आणि देवघरात अलगद उतरून यायचा.

आमच्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक उपवास नव्हता, तो तर आनंदाचा एक कौटुंबिक ‘चंगल’ असायचा. त्या एका दिवसात आईच्या हाताची चव, आजीच्या शब्दांतली निस्सीम भक्ती आणि संपूर्ण घरभर पसरलेला विठोबाचा अदृश्य पण जाणवणारा वास… हे सगळं असं काही एकवटायचं, की घरचंच पंढरपूर व्हायचं.

“उद्या कोण कोण उपवास करणार रे? “

एकादशीच्या आदल्या संध्याकाळी स्वयंपाकघरातून आईचा हा नेहमीचा प्रश्न यायचा. आणि आम्ही सर्व भावंडं खेळता खेळता, अभ्यासाच्या वह्या मिटता मिटता एका सुरात ओरडायचो— “मी! “, “मी करणार! “, “मी पण! “

कोणीही नाही म्हणायचा प्रश्नच नसायचा. कारण आमच्या बालमनाला माहीत होतं, उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा काहीतरी सोडून देणं नव्हतं; तर उपवास म्हणजे वर्षातून एकदा मिळणारे काहीतरी अत्यंत स्वादिष्ट, खमंग आणि जिभेवर रेंगाळणारे पदार्थ खाण्याची हक्काची पर्वणी!

त्यानंतर स्वयंपाकघरात आई आणि आजीची एक सुरेल, लयबद्ध जुगलबंदी सुरू व्हायची. एकादशीच्या मेजवानीची यादी ठरवली जायची. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ, राजगिरा, लाल माती लागलेले रताळे, बटाटे, सैंधव मीठ… आई एकेक नाव घ्यायची आणि आजी तिच्या अनुभवाच्या पोतडीतून त्यात भर घालायची. यादी लांबत जायची, पण दोघींच्याही चेहऱ्यावर थकव्याचा एकही ओरखडा नसायचा. उलट एक वेगळाच उत्साह दिसायचा.

तेव्हा आजच्यासारखे मिक्सर किंवा फूड प्रोसेसर नव्हते. त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्यांची टरफलं काढणं आणि ते हाताने फिरवायच्या लोखंडी मशीनमध्ये बारीक करणं हे एक मोठं काम असायचं. आई शेगडीवर शेंगदाणे भाजायला लागली, की संपूर्ण घरात त्याचा खमंग वास सुटायचा. आमचं मुख्य काम काय? तर आईची नजर चुकवून त्या गरम-गरम, खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांची मूठभर चोरी करायची आणि तोंडात टाकायची! आईला सगळं समजायचं, ती तिरप्या नजरेने बघून गोड हसायची, पण कधी रागवायची नाही.

कोपऱ्यात ठेवलेल्या पितळेच्या कढईत साजूक तूप वितळत असायचं. आईने तूप कढवून बरणी काठोकाठ भरून ठेवलेली असायची. रात्री झोपण्यापूर्वी आई एका मोठ्या पातेल्यात साबुदाणा भिजत घालायची. कितीही कामं असली, तरी साबुदाणा भिजवायला ती कधीच विसरली नाही. आम्हाला वाटायचं ती आमच्यासाठी हे करतेय, पण खरं तर ती तिच्या त्या सावळ्या “विठोबासाठी” करत असायची.

एकादशीची सकाळ उजाडायची तीच मुळी एका वेगळ्या चैतन्याने. घरात रेडिओवर भीमसेन जोशी किंवा प्रल्हाद शिंदे यांचे अभंग वाजत असायचे. स्वयंपाकघर आणि देवघर यांची विभागणी करणारी एक विटांची भिंत होती, पण मनातील ती सीमारेषा केव्हाच मिटून गेलेली असायची.

एकिकडे देवघरात आजीने अंघोळ करून, सुती साडी नेसून पूजेची तयारी सुरू केलेली असायची. ताजी फुलं, सुवासिक उदबत्ती, कापूर, चंदनाचा गंध आणि बेलपान विठ्ठलाच्या फोटोसमोर वाहिली जायची. आजी डोळे मिटून, अगदी संथ आणि तृप्त स्वरात “पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… ” अशी साद घालायची.

ठीक त्याच वेळी, भिंतीच्या पलीकडे स्वयंपाकघरात आईच्या हातातून लोखंडी कढईत जिरे आणि हिरव्या मिरचीची तडतडणारी खमंग फोडणी पडायची! तो फोडणीचा पहिला तवंग आणि त्याचा तिखट-गोड सुवास जेव्हा घरभर पसरायचा, तेव्हा वाटायचं की भक्तीचा पहिला नैवेद्य विठ्ठलाला पोहोचला आहे.

सकाळचा बेत ठरलेला असायचा— मऊसुत, मोकळी-सळसळीत झालेली दाण्याचे कूट लावलेली साबुदाणा खिचडी, सोबत यायची आंबट-तिखट हिरवी चटणी, आणि तोंडाची चव वाढवणारा शिंगाड्याचा मऊ शिजलेला शिरा. त्या शिऱ्यामध्ये वाहणारं साजूक तूप आणि आईच्या मायेचा सुवास दोन्ही इतके एकजीव झालेले असायचे, की पहला घास तोंडात टाकताच स्वर्गीय सुखाचा अनुभव यायचा.

सकाळची नहारी झाली की दुपारी पुन्हा स्वयंपाकघराची चाकं फिरू लागायची. दुपारचा बेत म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरल्यासारखा असायचा. मऊ शिजलेली भगर, त्यावर ओतण्यासाठी चिंच, गूळ आणि शेंगदाण्याचा रस्सा घालून उकळलेली आंबट-गोड आमटी. सोबतीला लालसर रताळ्याच्या साखरेत घोळवलेल्या मऊ फोडी, घरचं उपवासाचे लिंबाचे लोणचं आणि उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले साबुदाणा-बटाट्याचे पापड.

त्या काळात बाजारातून रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. कोणतीही वस्तू विकतची नसायची; जे काही ताटात यायचं ते आईने स्वतःच्या हाताने, घामाच्या थेंबांनी आणि प्रेमाने तयार केलेलं असायचं. आणि जे घरचं असतं, तेच खऱ्या अर्थाने देवाचं असतं, हा आजीचा नियम होता.

दुपारच्या जेवणाची पंगत बसायची. आम्ही मुलं पोटभर जेवायचो. दिवसभरात घरच्या वातावरणात एक शांत, सात्विक भक्ती न्हाऊन निघालेली दिसायची. जेवणं आटोपल्यावर, सगळी भांडी घासून आई जेव्हा स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर थकून बसायची, तेव्हा तिच्या कपाळावर घामाचे थेंब असायचे. ती आजीकडे किंवा आमच्याकडे पाहून हळूच विचारायची— “जेवण कसं झालं? आपला विठोबा खूश झाला असेल ना गं आज? “

तिचा तो निष्पाप, भाविक चेहरा पाहून मला आतून सांगावसं वाटायचं— “आई, विठ्ठलाचं माहित नाही, पण तुझं हे अथांग कष्ट आणि प्रेम पाहून साक्षात विठोबा देवघरातून बाहेर येऊन तुझ्यासमोर हात जोडून उभा राहिला असेल गं! “

संध्याकाल झाली की दिवेलागणीची वेळ व्हायची. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा लावला जायचा. त्या काळात आमच्याकडे टीव्ही नव्हता, हातात स्क्रीन बिलगलेले मोबाईल नव्हते. पण तरीही घरात अजिबात कंटाळा नसायचा. कारण विठोबा आणि रुक्मिणीचं अस्तित्व घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक नात्यात जाणवत होतं.

आजी संध्याकाळी तिचा उपवास सोडताना किंवा रात्रीच्या वेळी फक्त एकच ठराविक जिन्नस घ्यायची— राजगिऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र लाह्या, एक केळ किंवा सफरचंद आणि वाटीभर दूध. ती नेहमी एक मोलाची गोष्ट सांगायची, “बाळांनो, आपल्या या धावपळीच्या, चपळ आयुष्यात थोडा संयम, थोडी शांतता हवीच. विठ्ठलाला अवाजवी नैवेद्य नको असतो, त्याला मनाचा साधेपणा हवा असतो. “

पण आई रात्री पुन्हा स्वयंपाकघरात हजर व्हायची. रात्रीच्या वेळी आम्हा मुलांसाठी ती उपवासाची खमंग थालीपीठे भाजायला घ्यायची. शेगडीच्या उष्णतेने तिचा चेहरा लाल बुंद व्हायचा. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत, उजव्या हाताने थालीपीठावर तूप सोडणं तिचं थांबायचं नाही.

आम्हा सगळ्यांना पाटावर बसवून ते गरमागरम, खरपूस भाजलेलं थालीपीठ, त्यावर घरात साठवलेल्या दुधाच्या सायीचं काढलेलं पांढरंशुभ्र लोणी आणि बाजूला आंबट-तिखट लोणचं… बास! त्या जेवणात जे समाधान असायचं, ते जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलच्या पक्वान्नात नसेल. ते समाधान फक्त चवीमुळे नव्हतं, तर त्या चवीमागे असलेल्या आईच्या अखंड, निरपेक्ष श्रमांमुळे होतं.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला आमचा उपवास सुटायचा, आम्ही पुन्हा नेहमीच्या जेवणावर यायचो. आमची एकादशी संपायची, पण मला वाटतं आईची एकादशी कधीच संपायची नाही. तिचा विठोबा फक्त भिंतीवरच्या चौकटीतल्या फोटोत नसायचा; तो तिच्या प्रत्येक हालचालीत, मुलांसाठी केलेल्या प्रत्येक कामात, आणि तिच्या सोशिकतेत असायचा. आई म्हणजे माझ्या घराची साक्षात रुक्माई, तिच्या हातात असतो विठोबाचा पवित्र नैवेद्य, तिच्या काळजात असतो अखंड भक्तीचा गाभा, आणि तिच्याच पायाशी असतो माझा पंढरपूरचा राया!

आता खूप वर्षं उलटून गेली. काळाचं चाक वेगाने फिरलं. घरात आधुनिकता आली. हाताने शेंगदाणे कुटायची गरज उरली नाही, कारण मिक्सर आले. रेशनच्या दुकानाची किंवा साहित्याची चिंता नाही, सुपरमार्केट्स आली. उपवासाचे पदार्थ बनवायचे कष्ट नको म्हणून बाजारात विकतचे पापड, रेडीमेड थालीपीठ भाजणी आणि थेट घरपोच मिळणारे डबे आले. सगळं काही अगदी सोपं, सुटसुटीत आणि वेळेची बचत करणारं झालं.

पण… पण त्या आषाढी एकादशीचा तो जुना, मनाला तृप्त करणारा स्वाद मात्र पुन्हा कधीच नाही आला. त्या पदार्थांमध्ये सगळं काही योग्य प्रमाणात असतं, पण आईच्या हाताची ती जादू आणि आजीच्या प्रार्थनेची ती उब त्यात नसते.

म्हणूनच, आजही जेव्हा आषाढी एकादशी जवळ येते, मी भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडते आणि मेरे स्वयंपाकघरात आईसारखीच खंबीरपणे उभी राहते. माझ्या मुलांना जवळ बोलावून त्याच मायेने विचारते— “उद्या कोण उपवास करणार रे? ” ते मुलं आपापल्या मोबाईलवरून मान वर करत नाहीत, कदाचित त्यांना त्याचं महत्त्व नसेल, पण तरीही मी न हार मानता आईसारखीच तयारी करायला घेते. मी आज आईची जागा घेतली आहे खरी, संसार सांभाळतेय, पण तिच्यासारखं विशाल, निखळ प्रेम आणि ती भक्ती मी कुठून आणू? हा प्रश्न मला नेहमी सतावतो.

कधी कधी डोळे मिटले की असं वाटतं, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाखो वारकऱ्यांची माऊली उभी आहे, विठोबा कटेवर हात ठेवून रांगेत उभ्या असलेल्या भक्तांची वाट पाहतोय… पण मी त्या रांगेत नसून, खूप दूर एका कोपऱ्यात, माझ्या आईच्या आठवणींच्या पंक्तीच्या शेवटी बसलेली आहे, तिच्या आठवणीत पूर्णपणे न्हाऊन निघालेली आहे.

तेव्हा मला मनोमन जाणवतं की, माझा विठोबा फक्त दगडी मंदिरात किंवा गर्दीत नाही; तर तो माझ्या आईच्या कष्ट उपसणाऱ्या हातांमध्ये, तिने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र लाह्या आणि लोण्यामध्ये, आणि उपवासाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या शांत, तृप्त हसण्यामध्येच विसावलेला आहे. “जिथे भाव, तिथे देव. ” आषाढी एकादशी साजरी करणं म्हणजे केवळ उपवास करणं किंवा कष्टाची वारी करून पंढरपूर गाठणं नव्हे— तर आपल्याच घरात वर्षानुवर्षे आपल्यासाठी झटणाऱ्या विठोबाला आणि रुक्मिणीला ओळखणं होय. त्या माऊली म्हणजेच आपली “आई” आणि “आजी”— ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचं, प्रेमाचं हे चैतन्य जपलं, आणि आपल्या मनामनात भक्तीची आषाढी कायमची रुजवली.

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दत्तक…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दत्तक…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

हा मला भेटला साधारण तीन वर्षांपूर्वी.. रस्त्यावर पडलेला होता.. मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात होतो तेव्हा मला हा दिसला.. महिना जानेवारी 2020!

उघड्या अवस्थेत असलेला हा एका भिंती कडेला पडून होता. आधी याच्या अंगावर ब्लॅंकेट आणून टाकलं आणि त्याला एडमिट केलं होतं. तो तापाने फणफणला होता. डॉक्टर म्हणाले, ‘वाचण्याची शक्यता कमी आहे’… परंतु तो वाचला.

परत बाहेर आल्यानंतर पुन्हा आजारी पडला. पुन्हा त्याला ऍडमिट केलं. यावेळी डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही काहीच करू शकत नाही’, पण याहीवेळी तो वाचला… आणि काही काळाने पुन्हा आजारी पडला.. श्वासामध्ये घरघर चालू झाली. मी त्याला पुन्हा एडमिट केलं. डॉक्टर म्हणाले, ‘हा काही तासांचा सोबती आहे… ‘ तरीही तो यातून वाचला…

यापुढेही दोनदा तो गंभीर आजारी पडला आणि आपण त्याला ऍडमिट केले आणि तिथेही तो वाचला… मी डॉक्टरांचे आभार मानू की निसर्गाचे????

याला कोणीही नाही. वडील लहानपणी वारले. याच्या आईने याचा सांभाळ केला. परंतु दहा बारा वर्षाचा असताना त्याची आई याला सोडून गेली. आई वर याचा खुप जीव होता! आई… आई… म्हणून तो खूपदा तिची आठवण काढायचा!

पाच वेळा तो वाचला गंभीर आजारातून… त्याला इतक्या गंभीर आजारातून कोण आणि कशासाठी वाचवत होतं…? मलाही कळत नव्हतं…

एकदा पूर्ण बरा झाल्यानंतर मला म्हणाला, ‘सर मी आता परत रस्त्यावर झोपायला जाऊ का? ‘

मी त्याला म्हणालो, ‘पाच वेळा तुला वाचवला.. इतका तुझ्यावर खर्च केला तो तू रस्त्यावर झोपावं म्हणून का रे? मी मूर्ख आहे का रे नालायका? ‘ 

तो यावर हसत लाडीगोडी लावत मला म्हणाला होता, ‘मग मी तुमच्या कामात तुम्हाला मदत करू का? ‘ 

या नंतर मी त्याला माझ्या कामात मदतनीस म्हणून घेतलं परंतु मी त्याला जास्त पगार देऊ शकत नव्हतो. शेवटी भिकारीच की मी!

एकदा त्याला म्हणालो, ‘तुला आता मी भाजी विकण्याचा व्यवसाय टाकून देतो, तो तू कर…! ‘ 

‘व्हय.. चालतंय की सर’, असं तो तेव्हा म्हणाला होता. आणि यानंतर मी त्याला एक सायकल घेऊन दिली. त्या सायकलला कॅरेज लावून दिलं आणि त्याला भाजीचा व्यवसाय टाकून दिला. त्याला सेटल करून मी त्याचा हात सोडला होता. स्वतंत्रपणे जगण्यासाठी..!

आज मला तो पुन्हा भेटला कॅम्प मध्ये.. सायकलच्या कॅरेजला भाजी लावून तो धंदा करत होता… ‘ए.. मेथी घ्या वीस रुप्पय पेंडी.. वीस रुप्पय पेंडी.. वीस रुप्पय पेंडी..! ‘

माझ्या या पोराला पाहून माझा उर भरून आला… हा तोच होता ज्याला पाच वेळा मरता-मरता वाचवलं होतं. माझ्या तोंडावर रुमाल आणि गॉगल होता.. मी त्याच्या जवळ जावून म्हणालो, ‘पाच रुपये पेंडी देतो का? ‘

अर्थात त्याने ओळखलं नाही.. साहजिकच त्याला राग आला. तो म्हणाला, ‘तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमुळे शेतकरी मरत आहे… हे असे बुलेट आणि कार मधून येता.. नाही तिथे खर्च करता… आणि आमच्या सारख्या गरीब लोकांकडे बार्गेनिंग करता… ‘ वगैरे वगैरे तो खूप काही बोलत होता…

या नंतर मी हळूच माझ्या डोक्यावरची कॅप काढली.. रुमाल काढला.. आणि गॉगल काढला.. आणि म्हणालो, ‘ए येड्या, मला “वीस रुप्पय पेंडी” लय महाग वाटती, परवडत नाय.. पन्नास रुपयाला एक पेंडी देशील का..?

मला पाहून तो चमकला. माझ्याकडे त्याने नीट पाहिलं आणि रस्त्यावर लोटांगण घातलं ‘अवो सर.. आवो… तुमि.. आयला.. वलकला नाय.. मापी करा.. ‘

गाडीवरून उतरून मी त्याला आलिंगन दिलं. अक्षरशः त्याच्या कपाळाचं आणि हाताचं चुंबन घेतलं. त्याला पुन्हा हसत म्हणालो, ‘मला वीस रुप्पय नको.. पन्नास रुपयांना पेंडी दे.. ‘

तो म्हणाला, ‘काय किंमत करता सर? आक्ख आयुष्य तुम्ही मला दिलं आहे… सगळ्या पेंढ्या घेऊन जावा की हो. ‘

यानंतर त्याच्या सगळ्या पेंड्या पन्नास रुपये प्रमाणे विकत घेऊन मी रस्त्यात वाटल्या होत्या… यावर तो रडत होता आणि मी हसत होतो..! कुणी रडताना हसण्याची ही माझी पहिलीच वेळ..!!

हा तोच होता… रस्त्यात पडलेला.. कधीही जाईल अशा अवस्थेतला.. पाच वेळा अतीगंभीर अवस्थेतून सुद्धा हा का वाचला? कसा वाचला? कोणी वाचवले याला मला कळलं नव्हतं…!

याच्याच शेजारी एक आजी भाजी विकत होती. ती आमच्या दोघातला संवाद पाहून जवळ आली आणि त्याला खुणेनं विचारलं, ‘कोण आहे रे हा? ‘ 

त्याने, तीला काय सांगितलं मला माहित नाही, परंतु हात जोडत ती माझ्या जवळ आली होती. मी त्याला खुणेनं विचारलं, ‘आता हि आजी कोण? ‘ 

तो म्हणाला, ‘ही माझी आई आहे’.

मी चक्रावलो, मी त्याला म्हणालो, ‘अरे तुझी आई तर तुझ्या लहानपणीच वारली… मग ही कोण…?

तो म्हणाला, ‘ही, आई माझ्यासारखीच रस्त्यावर पडली होती.. मी सावरल्यानंतर तीला म्हणालो, मी भाजी विकतो आई, त्यातली तुला थोडी देतो.. तू सुद्धा विक… ‘ ती तयार झाली आणि आम्ही दोघेही आता तुमच्या पैशातून दिलेली भाजी विकतो..! आई म्हणून मी तिला दत्तक घेतलंय सर…! ‘ तो सहजच बोलून गेला…

माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ‘अरे नालायका, आईबाप दत्तक घेतात रे पोरांना.. तू आज रस्त्यावरच्या आईला दत्तक घेऊन “लायक” झाला आहेस रे… तूच आज बाप झालास कीं रे… ‘ म्हटलं, ‘येड्या, तु हे कुठून शिकलास? ‘ 

म्हणाला ‘सर, मी तुमचा “आशीश्टन्ट” म्हणून काम करत होतो ना तवा शिकलो… आपुन खड्ड्यातून भायेर आल्यानंतर… दुसऱ्याला पण खड्ड्यातून भायेर काढायचं… सर तुमी शिकवलं व्हतं ना… ईसरले ना सर तुमी? मी नाय इसारलो… ‘ 

‘मी कसा इसरेन येड्या…? काय आणि कसं सांगू? ओहो… आत्ता मला कळलं… तुला पाच वेळा मरताना निसर्गानं का वाचवलं? तुला एक आई दत्तक घ्यायची होती ना येड्या…! “

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”जिंदगी की किताब..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “जिंदगी की किताब.. ☆ संध्या बेडेकर ☆

आज फिर मैंने जिंदगी की किताब खोली, देखा तो हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा था।

 काल मी माझ्या एका हिंदी भाषी मैत्रिणीला Mrs Sharma ला फोन केला. आमच्या नोकरीच्या काळात आम्ही बरेच वर्ष म्हणजे जवळपास तीन वर्षे बरोबर होतो. कारण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही कधीच एका ठिकाणी नव्हतो.

तो काळ जरा नाजूकच होता. कारगिल युद्धाचा काळ. आमचे नवरे चार पाच महिने घरी नव्हते. त्यामुळे त्या कठीण काळात एकमेकांना साथ, सहारा, दिलासा आम्ही देत असू. आमची मुल पण जवळपास एकाच वयाची होती. अर्थातच आमचा बॉन्ड मजबूत झाला. कठीण काळातील ती मैत्री आजही टिकून आहे. आता रिटायर्ड होऊनही पंधरा वर्षं व्हायला आलेत.

 ती नेहमी म्हणायची,

 अरे!! STARs सिर्फ आसमान में ही थोडी चमकते हैं। हमारे हजबंड्स के कन्धे पर भी STARS चमकते हैं।

 मी तिला विचारलं,

 कैसे हो.??

तिने दिलेले उत्तर,

सब अच्छा चल रहा हैं।

करीबन करीबन हम सब ठीक हैं। मजेमें हैं। 

 Col. Sharma यांचा एक पाय युद्धात जखमी झाला होता. आणि तो नंतर कापावाच लागला होता.

 Mrs Sharma म्हणजे माझ्यासाठी Power bank आहे. ऊर्जेचा स्त्रोत. तिच्या डिक्शनरीत हारणे, रडणे, निराश होणे, आपल्या नशिबाला कोसणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे हे शब्द/ असे विचार नाहीतच बहुतेक. ती माझी मैत्रीण म्हणजे माझ्यासाठी अगदी लॉकर मध्ये जपून ठेवण्यासारखा अनमोल ठेवा आहे.

मी नेहमी देवाला या गोष्टी साठी धन्यवाद देते. कारण, काबिल दोस्तों का साथ मिलना भी तकदीर होती हैं। बहुत कम लोगों के हाथों में यह लकीर होती हैं।

माझ्या हातावर ती रेखा छान स्पष्ट, गडद आणि लांबलचक आहे. याचा मला अभिमान आणि समाधान दोन्ही आहे.

 तिच्या काही गोष्टी माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. एखादया वेळी जेंव्हा कधी मी low phase मध्ये असते, तेंव्हा मी Mrs Sharma च्या गोष्टी आठवते. आणि लगेच माझे विचार बदलतात.

ती नेहमी म्हणायची,

अग!! माझ्या आईच्या पोटात जेंव्हा माझा अंकुर फुटला, तेंव्हा पासूनच माझ्या जिंकण्याची सुरवात झाली. तेंव्हाच माझ्या किती तरी करोड स्पर्धकांना हरवून मी बाजी मारली होती. आणि माझा जन्म झाला. मी winning attitude घेऊनच जन्माला आले आहे. मग हरायचा प्रश्नच येत नाही.

अग!! आयुष्य म्हंटल तर स्ट्रगल असणारच. कमी जास्त होणारच. That is Part of life.

हे तर प्रत्येकाच्या बाबतीतच सत्य आहे.

आज Mrs Sharma ने पुन्हा एकदा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा? याची आठवण करून दिली. किती तरी जून्या गोष्टी आठवल्या.

साधारण दिसणारी, Mrs Sharma branded कपडे घालत नसे. So called आधुनिक दिसणाऱ्या बायकांमध्ये तिच्या कडे कोणाचे लक्ष पण जाणार नाही, असा तिचा appearance होता.. पण तिचे विचार मात्र branded होते / आहेत.

ती नेहमी म्हणायची,

अग!! एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना आपण पर्याय कोणता निवडतो?? हे नेहमीच महत्वाचे असते.

जेंव्हा एका सैनिकाशी लग्न करायचा निर्णय मी घेतला, तो माझा विचार पुर्वक निर्णय होता, तेंव्हा ज्या agreement वर मी सही केली होती, त्यात भविष्यात होऊ शकणाऱ्या गोष्टी मला माहित होत्या. कोणते प्रसंग माझ्या आयुष्यात येऊ शकतात?? याची पूर्ण कल्पना होती मला.

बर!! त्यानंतर लग्नाच्या वेळेस सात फेरे घेतानाही ‘वचनांचा’ मी अभ्यास केला होता.

अग! देवाची किती मोठी कृपा आहे की Col Sharma आज माझ्या बरोबर आहेत. त्यावेळी तिने दाखविलेले साहस धैर्य अचंभित करणारे होते. कुठे ही रडणे नाही. घाबरणे नाही. तो पिरेड तिच्या करिता नक्कीच कठीण होता. भेटायला येणाऱ्या बायकांना तीच धीर देत होती. त्याही परिस्थितीत युनिटच्या इतर बायकांचे प्रश्न सोडवत होती.

Col. Sharma ना वाईट वाटत होत की या injury मुळे त्यांना पूर्ण युद्ध खेळता आल नाही.

तेंव्हा खरच कोणाला सॅल्युट मारावा?? Col Sharma की Mrs Sharma??

हा प्रश्न फक्त मलाच नाही, तर अनेक जणांना पडला असावा.

मला म्हणाली,

आता पर्यंत अनेक अनुभव आले ग.

म्हणतात ना,

“Experience is the list of mistakes you committed in past life and not to repeat them in future. “

तेच मी नेहमी लक्षात ठेवते.

आता तर मी बऱ्या पैकी शहाणी झाली आहे.

मला म्हणाली,

“Yesterday I was clever. I wanted to change the world. Today I am wise I am changing my self.

आपल्या नशिबात काही गोष्टी नसतातच हे खरय, पण किती तरी, अनेक गोष्टी आपल्या जवळ असतात. हे लक्षात घेतल तर खरच देवाचे किती आभार मानावे?? हेच कळत नाही. वेळोवेळी देवाने दिलेली साथ कळते. प्रत्येकालाच प्रारब्धाला सामोरे जायचेच असते.

मीच का?? मलाच का?? माझ्या नशीबातच का?? हे प्रश्न स्वतः ला किंवा देवाला सुध्दा विचारायचे नसतात.

अग!! मी देवाजवळ रोज एकच गोष्ट म्हणते,

” हे देवा!! माझी बुदधी नेहमी चांगली जागृत राहू दे. योग्य मार्गावर चालण्याची, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा दे. मी पडूच नये अस माझ म्हणण अजिबात नाही, पण पुन्हा उठायची शक्ती दे.

दिवसातून किती दा तरी मी देवाचे आभार मानते.

मला म्हणाली,

आज फिर मैने जिंदगी की किताब खोली, तो देखा हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा हैं।

बरोबर आहे.

म्हणतात ना.

It is not happy people who are thankful.

It is thankful people who are always happy.

दि. २६ जुलै.. हा कारगिल विजय दिवस असंतो. (We may not know them all but we owe them all.)

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोगत रुख्मिणीचे!☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मनोगत रुख्मिणीचे! ☆ शीला पतकी 

पांडुरंगापुढची लोट गर्दी, पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेली पूजा… रुक्मिणी बाई जरा नाराज झाल्या म्हणाल्या… तीन वाजता कोणी उठून आंघोळ घालता का? यांची झोप अर्धवट होते… लोक या माणसाला(देवाला) झोप घेऊ देत नाहीत… बर झोप नाही ते नाही… आंघोळ तरी काय.. दही घाल… दूध घाल पाणी घाल.. मग पंचाने पूस मग तो पोशाख तो टिळा ते चंदन आणि केवढी मोठी ती तुळशीची माळा… तयार करून उभं करतात झालं…! म्हणजे हे उभेच आहेत! मी तेव्हाच म्हणलं होतं देवाला अहो नको खाली जायला नको खाली जायला पण म्हणाले “अगं अगणित भक्त आहेत आपले खाली त्याना दर्शन नको द्यायला? … आणि खरं सांगू रुक्मिणी मी दर्शन देत नाही ग मी त्यांना पाहतो… “आता या वाक्यावर काय बोलावे या माणसाला… नवरे कधी बायकोच ऐकून घेतोयत…?

खाली आलो तर एका भक्तांना वीट टाकून उभं केलं त्याच्यावर यांना. त्याची मातृ-पितृसेवा संपेना मग तेवढ्याशा विटेवरी उभे. मी म्हणल ऊभरहायला चांगली जागा तरी बघा… ते म्हणाले, ” बाई तू माझ्या फंदात पडू नकोस तू पलीकडे जा आता या विटेला तू वीट समजतेस तो त्याच्या भक्तीचा पाया आहे आणि श्रद्धा आणि विश्वासाच्या सिमेंटनं ती वीट जमिनीवर घट्ट करून ठेवली मी इथून हलू शकत नाही… “. अहो पण 28 युग झाली आपण तिथेच आहात तुम्हाला असे एवढ्याशा विटेवर उभ राहिलेले पाहून मला मोकळ चाकळ हिंडता येते का? ” तर म्हणतात कसे… ” तुझा काय कमी थाट आहे का तुझी सुद्धा पूजा नित्यनियमानं चालली आहे भरगच्च दागिने अंगावर आहेत मला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी नाही स्वयंपाकाची कटकट नाही “मग मी फणकार्यान म्हणाले, ” तुम्हाला नाही कळायचं आम्हाला बायकांना वाटत असतं आपल्या हातून काहीतरी छान करावं आणि आपल्या नवऱ्याला बसून खाऊ घालावं… त्याने मग केलेल्या पदार्थाचं कौतुक करावं… माझ्या नशिबी मेले हे सुख नाहीच रोज परातभर गोड पदार्थाचा तो नैवेद्य कंटाळा येत नाही का हो तुम्हाला खाऊन… कधी मेल तुम्हाला माझ्या हातच खावस वाटतच नाही… “त्यावर म्हणतात कसे, “अगं ते भक्तीभावने एवढं करताय मग आपण नको का खायला? “… “अहो पण मग माझी बायको म्हणून काही भक्ती नाही का? … याना मुळी माझी किंमतच नाही” असं म्हणलं की हसतात फक्त! … मग काय बोलणार आठ दहा दिवस काही बोलायचं नाही..! एवढा मोठा प्रवास करून येणारा तो गरीब बिचारा वारकरी पाहिला की माझं मन द्रवतं मग म्हणतात कसे द्रवतं ना तुझं सुद्धा मन मग झालं तर आपल्या भक्तांसाठी एवढी तोशिश आपल्याला घ्यायलाच पाहिजे.

मला मेलीला एक काम करू लागले नाहीत कधी पण त्या जनीला दळू लागले.. कांडू लागले.. पाणी भरू लागले.. कोणाची तरी गुरं राखू लागले.. त्या सावत्याला येणं जमणार नाही म्हणून त्याच्या शेतावर गेले. दर्शन द्यायला..! हे सगळं जमतं या माणसाला पण बायकोला वेळ देणं अजिबात जमत नाही. म्हणून मी गेले एकदा रुसून आणि जाऊन चिंचबनात बसले… मग मात्र जरा यांचं धाब दणाणल… मग विनवणी केली त्यांनी मला म्हणाले… चल बाई चल शेजारी उभी रहा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग… तुझ्या जीवावर तर मी एवढ्या भक्तांवर प्रेम करतो. भक्तांवरचं त्यांचं प्रेम पाहिलं ना.. लंगडी खुळी पांगळी अतिशय गरीब घरी डोक्यावर छप्पर सुद्धा पुरेसं नाही अशी माणसं खांद्यावर पताका घेऊन यांच्या ओढीने… पायात चप्पल सुद्धा नसते… एवढा रस्ता चालत येतात… ते माझ्या पतीला भेटायला…! आणि मला पटतं माझ्या आधी माझ्या नवऱ्यावर त्यांचा हक्क आहे…! मग म्हणते उभे राहा उभे राहा आणि द्या सगळ्यांना दर्शन…! आशीर्वाद द्या त्यांना… आता तुम्ही त्यांचे बाप झाला की मला आई होण भागच आहे. अर्थात तुमच्यामुळे हे भाग्य मला मिळते याची मला जाणीव आहे अहो रुसले रागवले म्हणून काय झालं आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी जगातली इतकी अफाट माणसं आहेत हे पाहून कोणत्याही बाईला अभिमानच वाटतो… पण देवा मी पण तुमची भक्त असं समजून मला थोडा वेळ द्या एवढी बायको म्हणून विनंती आहे तुम्हाला…! ऐकेल ना अहो ऐका ना…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके 

दिंडी अशी वाटचाल करते!

 पंढरपूर जर समुद्र आहे अशी कल्पना केली तर या समुद्राला येऊन मिळणा-या दिंड्या या नद्या म्हटल्या पाहिजेत. ज्ञानोबाराय गंगा, तुकोबाराय यमुना तशाच इतर संतांच्या दिंड्या जणू लहान-मोठ्या नद्या, ओढे म्हणावेत अशा. पंढरीनगरीमध्ये प्रवेश करण्याआधी सुमारे पाच-आठ मैलांवर वाखरी नावाचं छोटं गाव आणि मोठं माळरान लागतं. दिंड्यांचे हे सर्व प्रवाह या ठिकाणी एकजीव होतात. ज्ञानदेव-निवृत्तीनाथ-मुक्ताई येथेच एकमेकांना भेटतात. सोपानदेव तर माउलींच्या सोबतच चालत आलेले असतात. तिकडून तुकोबारायही या मेळ्यात सामील होतात. दुपारचा उभे रिंगण सोहळा याच माळावर रंगतो. पंढरी डोळ्यांना दिसत असते. थकलेल्या पावलांच्या मनातून थकवा आता नाहीसा झालेला असतो. आता केवळ प्रतीक्षा उरलेली असते.

 रिंगण सोहळा म्हणजे वारीतील लष्करी शिस्तीचा परिपाठच असतो जणू. यानंतर पावले पंढरीच्या दिशेने चालायला लागतात. अंतर तसे इतर मुक्कामांच्या मानाने अगदीच कमी असले तरी सर्व प्रवाह एकत्रित झाल्याने दिंड्या रात्री उशीरापर्यंत पंढरीत पोहोचत असतात. अनेक दिंड्या मुख्य मंदिरापासून काहीशा दूरवर मुक्कामी असतात राहुट्या ठोकून. ज्यांच्या गावच्या धर्मशाळा पंढरीनाथाच्या मंदिराच्या परिसरात आहेत, त्यांना तसे सोयीचे जाते. आता पंढरपूरचा विस्तार चारही बाजूंनी झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांनी पंढरपूर परिसरात जागा विकत घेऊन स्वत:च्या धर्मशाळा उभारल्या असून त्यांची बांधकामे दानशूर लोकांच्या आर्थिक साहाय्यातून होत असतात. धर्मशाळांत स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था असते. त्यासाठी लागणारी भांडी, शिधाही दान स्वरूपात प्राप्त होत राहतो. वारीत दिंडीच्या भोजनाचा खर्च करण्याला पंगत देणे असे म्हटले जाते. द्वादशीला दिली जाणारी पंगत विशेष महत्त्वाची समजली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वीच एकादशीचा उपवास सोडून भोजन करण्याचा संकेत आहे. त्यामुळे द्वादशीला अगदी भल्या पहाटे स्वयंपाकाची तयारी सुरु केली जाते.

 परंतू एका वारक-याचा इथपर्यंतचा प्रवासही समजून घेण्यासारखा असतो. गावातील किंवा आसपासच्या काही गावांतील वारकरी मंडळी एकत्र येऊन दिंडीची स्थापना करतात. या दिंडीस परिसरात होऊन गेलेले संत, अध्यात्मिक गुरु, ग्रामदैवत यांचे नाव दिलेले असते. ही दिंडी संबंधित पालखी सोहळ्याकडे नोंदवावी लागते. त्यानुसार सोहळा व्यवस्थापन या दिंडीला नोंदणी क्रमांक देतात. या नावाचे फलक तयार करून ते दिंडीच्या वाहनांवर लावले जातात. सोहळ्यात जे रथ चालतात त्या रथाच्या लगेचच लागून पुढे चालणारी दिंडी ही रथापुढे क्रमांक एक अशी ओळखली जाते. तिच्या पुढची क्रमांक दोन अशा क्रमाने इतर दिंड्यांना क्रमांक मिळतात. तसेच रथामागील दिंड्यांच्या बाबतीत होते. रथामागे लगेच असणारी दिंडी ही रथामागे दिंडी क्रमांक अशी ओळखली जाते. या दिंड्या याच क्रमाने वारीत चालाव्यात असे शिस्तीसाठी अपेक्षित असते. आणि ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न नेटाने केला जातो. सोहळ्याचे चोपदार ही शिस्त पाहतात.

 सोहळ्यापुढे चौघड्याचे वाहन असते. तुतारी वादक असतात. मानाचा अश्व असतो. त्यासाठी खास गणवेशधारी स्वार नेमलेले असतात. पालखी रथ ओढण्यासाठी बैलांच्या जोड्या वापरल्या जातात. आणि हा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी शेतकरी बांधव भक्तीभावनेने चढाओढ करतात.

 पालखी जागेवरून पुढे जाण्यासाठी निघण्यापूर्वी शंखनाद केला जातो. चोपदारांच्या हातात मानदंड असतो. त्या दंडाच्या इशा-यावर थांबणे, पुढे जाणे या क्रिया होतात.

 पालखी रथापुढे दिंड्या क्रमाने उभ्या राहिल्या की चोपदार सूचना आणि इशारा देतात. यात पालखी कुठे विसावा घेणार आहे, कुठे मुक्काम करणार आहे, किती वाजता प्रस्थान ठेवणार आहे, याची माहिती दिली जाते. रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाज आरती होण्यापूर्वी पालखी प्रमुख, चोपदार दिंड्यांना सूचना देतात, हरवल्या-सापडलेल्या वस्तूंची यादी वाचून दाखवली जाते, पूर्वी पोस्टखाते दिंडीमध्ये पोस्टकार्ड्सही पोहोचवत असे. म्हणजे दिंडी क्रमांक आणि नाव लिहिलेले पत्र गावातील पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे… पोस्टखाते वारीमार्गावर ज्याठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोहळा प्रमुखाकडे ही पत्रे नेऊन देत असे. दिंडीत चुकलेल्या व्यक्तींच्या नावांचाही पुकारा केला जातो. अशावेळी एखाद्या दिंडीला काही सूचना द्यायच्या असतील, तक्रार नोंदवायची असेल अशावेळी संबंधित दिंडीमधील लोक टाळांचा गजर करीत राहतात. तो ऐकून सोहळा प्रमुख त्यांच्याशी तेथेच संपर्क साधतात. त्यानंतरच आरती म्हटली जाते. आणि मगच वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणांकडे जातात. पालखीतील पादुकांचा मुक्काम खास उभारण्यात आलेल्या तंबूत किंवा गावातील मंदिरात असतो. स्थानिक लोक या ठिकाणी पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. गावकरी लोक वारकरी मंडळीची भोजनाची व्यवस्था करतात. पालखी तळावर सोहळ्यातर्फे मुक्कामाच्या जागी कीर्तन आयोजित केले जाते.

 इकडे दिंडीमधील वारक-याचा दिनक्रम साधारण असा असतो. पहाटे लवकर उठून आपापली वळकटी व इतर साहित्य दिंडीच्या वाहनात ठेवायचे. आजचे आंघोळीचे कपडे, आवश्यक वस्तू, अल्पोपाहाराचे पदार्थ सोबत घ्यायचे. मुक्कामाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या समुद्यासाठी प्रात:र्विधीसाठी जागा उपलब्ध नसते. यामुळे बरेच वारकरी लवकर उठून पालखीच्या मार्गावर बरेच अंतर पुढे चालत जातात. पूर्वी पालखी मार्गावर शेती, मोकळ्या जागा, विहिरी, तळी इत्यादी भरपूर असे. पुढे चालत गेलेले वारकरी योग्य ठिकाण शोधून आंघोळ, अल्पोपहार उरकून आपल्या दिंडीची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबून राहतात. आंघोळीसाठी वापरलेले कपडे शक्य होतील तिथे धुवून वाळायला घातले जातात. गावातून रथ निघाल्यानंतर आपण जिथे बसलेलो असू तिथपर्यंत आपली दिंडी येण्यास बराच अवकाश मिळतो. आपल्या दिंडीचे विणेकरी आणि इतर सभासद चालत येत असतात. आपण सोहळ्याच्या रथाच्या मार्गावरची माती कपाळाला लावायची आणि वाटेवर पाऊल टाकायचे. रथ, रथापुढे चालणारा अश्व आपल्याला भेटेल तिथे नमस्कार करून घ्यायचा आणि वाट चालायला लागायची.

कोणताही मोठा पालखी सोहळा एकावेळी सलग तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सलग चालत नाही. वाटेत अनेक गावे लागतात. स्थानिक नागरिक पालखीच्या दर्शनार्थ मार्गावर मोठ्या संख्येने उभे असतात. त्यांच्यासाठी काही क्षण रथ थांबवला जातो. वाटेत विसावा घेण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे रथ ओढणारे बैल, चालणारे वारकरी यांना अल्प विश्रांती मिळत राहते. दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी दिंडीची वाहने आधीच येऊन थांबलेली असतात. आपल्याकडील पिशवी या वाहनांत ठेवायची. दुपारचे भोजन उरकायचे आणि थोडे पुढे चालत जाऊन विश्रांतीसाठी जागा शोधायची. काही वेळाने रथ निघतो… आपली दिंडी शोधायची आणि सामील व्हायचे. दिवसभर आपण आणि दिंडी यांची गर्दीमुळे चुकामुक झालेली एकवेळ चालते. पण दिवसाच्या शेवटी मात्र दिंडी सोडून चालत नाही. प्रचंड गर्दी असते. दिंड्यामध्ये शिस्तबद्ध वाटचाल असते. कुणी कुणाला मध्ये शिरू देत नाही. अन्यथा माणसांची चुकामूक होऊ शकते. अंधार पडू लागलेला असतो.. त्यामुळे आपापल्या दिंडीसोबत चालत राहिले की मुक्कामाची जागा शोधण्याची वेळ येत नाही… आपल्या दिंडीच्या चोपदारांच्या मार्गदर्शनानुसार झपाझप चालत राहायचे की झाले! दिंडीच्या वाहनातून आपली वळकटी खाली घ्यायची, आपल्या ठरलेल्या तंबूत, राहुटीत वळकटी घालायची आणि क्षणभर विश्रांती घ्यायची. काही वेळाने रोजच्या नियोजनाप्रमाणे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. तो झाल्यावर पंगती पडतात. रात्रीच्या अंधारात, गर्दीत तंबूपासून दूर गेले की पुन्हा तो तंबू आणि दिंडी सापडणे अवघड होऊन जाते… कारण सर्वच तंबू सारखेच भासतात. रात्री अनोळखी लोकांना कुणी त्यांच्या तंबूत आश्रय देईलच असे नसते. अशावेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते. जेवण उरकल्यावर ज्यांना आवड, सवड असेल असे नेमाचे लोक दिंडीच्या मुख्य तंबूत जमतात. इथे भजनाची व्यवस्था असते. वारकरी रात्री उशीरपर्यंत अभंग गात बसतात… याला जागर म्हणतात… रात्र पुढे सरकत जात असते… कुठे ना कुठे भजन सुरूच असते… दमलेले वारकरी झोपून जातात. काही मुक्काम तर अक्षरश: स्मशानांच्या बाजूलाही असतात. माळरान असते, काटेकुटे असतात, अंधार असतो… पण शारीरिक थकवाच इतका असतो की कशाचाही विचार मनात येत नाही. हल्ली मोबाईल आणि इतर साधने आहेत. पूर्वी तारीख आठवत नसे, वेळ समजत नसे. घरची आठवण येत नसे. काही संपर्काचे साधनही नसे… आणि ते बरेच होते. हल्ली मोबाईलमुळे चार्जिंगची काळजी वाढली आहे!

 आणखी एक गोष्ट वारकरी करतात. जसजसा सोहळा पंढरपूरजवळ जात राहतो, काही ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम पडतो अशावेळी काही वारकरी मिळेल त्या वाहनांनी पंढरपूरला पोहोचतात. दर्शन घेतात आणि पुन्हा मुक्कामाच्या जागी परततात. कारण यात्रा काळात विठ्ठलदर्शन करायला प्रचंड मोठी बारी लागते. नेमाचे वारकरी मात्र दोन दोन दिवस बारीत उभे राहून दर्शन करूनच माघारी फिरतात! काही ज्येष्ठ वारकरी पुढील चार महिने अर्थात चातुर्मासानिमित्त तिथेच मुक्कामी राहतात. तर काही गुरु पौर्णिमेच्या काल्याचा प्रसाद घेऊनच घरी परततात.

 पंधरा-अठरा दिवस घरापासून दूर राहिलेले वारकरी मात्र द्वादशीचा उपवास सोडला रे सोडला की काहीही करून घरी परतण्याचा प्रयत्न करतात. माघारी जाणारे दिंडीची काही वाहने, एस. टी. बसेस एकदम भरभरून जातात… संसाराची ओढच तशी असते. पूर्वी बहुसंख्य वारकरी शेतकरी वर्गातून आलेले असत. शेतीची कामेही डोक्यावर असत. पुढे नोकरदार मंडळी, व्यावसायिक लोकांना रजेचा प्रश्न असतो. पुण्याच्या आसपासच्या गावांत राहणा-या काही जणांना अगदी आळंदी किंवा देहूपासून वारीत सहभागी होता येत नाही. अशी मंडळी मग पुण्यापासूनच्या पुढच्या मुक्कामी दिंडीत सामील होतात! हे अनेक दृष्टीने सोयीचे ठरते.

काही लोक दरवर्षी एक एक मुक्काम चालतात. म्हणजे सासवड येथे आपले वाहन आधीच पाठवायचे किंवा येताना वाहन व्यवस्था पहायची. पुण्यातून सासवडला चालत जायचे. सासवडवरून रात्री पुण्यात माघारी यायचे. पुढील वर्षी सासवडला रात्री पोहोचायचे. वाहन पुढील मुक्कामी पाठवायचे… सासवड ते जेजुरी चालत जायचे व रात्री पुण्यात परत यायचे! लोक अशा नानाप्रकारे वारीत सहभागी होत असतात.

 वारीपूर्वी चालण्याचा सराव केलेला बरा असतो. अंगमेहनत, दूर अंतर चालणे इत्यादीची सवय असलेल्या शेतकरी, ग्रामीण भागातील वारका-यांना वाटचालीचे फारसे श्रम वाटत नाहीत, म्हणून आजही नव्वदी, शंभरी गाठलेले ग्रामीण भागांतील वारकरी भेटू शकतात. शहरी लोकांना मात्र सराव आवश्यक असतो. दूरचे अंतर सलग चालण्यासाठी पादत्राणे योग्य निवडावी लागतात. त्यांचा सराव पायांना करून घ्यावा लागतो.. अन्यथा त्रास होऊ शकतो! नेहमीची औषधे सोबत ठेवणेही श्रेयस्कर ठरते! प्रत्येक दिंडी खर्चासाठी ठराविक शुल्क अर्थात भिशी आकारते. वारी तशी सोपी आहे… मानसिक तयारी मात्र पाहिजे!

अर्थात परिस्थितीनुसार परंपरा, पद्धती निरनिराळ्या असू शकतात.

– लेख क्र. ७  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कौतुकाचे दोन शब्द! ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ कौतुकाचे दोन शब्द! ☆ श्री सुधीर करंदीकर

आपल्याला मदत करणाऱ्याचे अभिवादन करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा करत असतो, कदाचित त्यात स्वतःचा आपण कमीपणा समजतो.

  • आपण ऑटो रिक्षा ने प्रवास करतो, उतरल्यावर मीटर बघून पैसे देतो, आणि व्यवहार पूर्ण करतो आणि चालायला लागतो. आपण थोडासा पॉज घेतला आणि विचार केला, तर लक्षात येईल कि काहीतरी मिसिंग आहे. वेड्यावाकड्या ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हर नी आपल्याला आरामदायी होईल अशी रिक्षा चालवली, आपल्याला त्यांनी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहचवले, त्याबद्दल बोलून आणि मनापासून  त्यांना धन्यवाद द्यायला काय हरकत आहे. थोडं कौतुक करायला काय हरकत आहे. पुढच्या वेळेस असं करून बघा आणि ड्रायव्हरच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघा. 
  • आपण रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर  शहाळ्याचं पाणी पितो, पैसे देतो आणि पुढे निघतो. तोंडाला शहाळ्याचा एक वेगळाच गोडवा आलेला असतो आणि पोट पण शांत झालेले असते. शहाळ सोलायला चांगलंच कठीण असतं आणि हाताला चाकू लागण्याची भीती असतेच असते. शहाळी विकणारा प्रेमानी शहाळं सोलून त्यामध्ये स्ट्रॉ ठेवून आपल्या हातात देत असतो. शहाळं पिऊन झाल्यावर – दादा, धन्यवाद.  शहाळ एकदम गोड होतं. असं त्यांचं अभिवादन करायला काय हरकत आहे.

मंडळी, धंदा म्हटलं की शहाळं सोलून देणं आणि आपण पैसे देणं, हे व्यवहार तर होतच असतात. पण अभिवादन केल्यामुळे समाधानाची देवाण-घेवाण पण होत असते. आणि यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य हमखास उमटतं आणि तेच आपल्याला एक वेगळच समाधान देऊन जातं.  

आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या घडामोडींमध्ये आपला नेहमीच अनेक लोकांशी संबंध येतो, ज्यांच्या सेवांचा आपल्याला उपयोग होत असतो. चांगल्या कामाबद्दल समोरच्याचं कौतुक करणं, त्यांचे आभार मानणे, ह्या गोष्टी म्हटलं तर खूपच छोट्या असतात, पण त्या आपल्या आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद आणतात आणि आपल्या मनाला एक वेगळचं समाधान देत असतात.

निर्जीव वस्तूंचं कौतुक करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात पण एक वेगळाच नक्की आनंद असतो. आपण रोज सकाळी झोपून उठतो, उठल्यावर बाथरूम टॉयलेट वगैरे क्रिया सुरू होतात.  पण बेड जवळ दोन मिनिट थांबून, बेडवरची चादर नीट करून / पांघरूण घडी करून, बेडला नमस्कार केला आणि म्हटलं – तुझ्यामुळे मला छान विश्रांती घेता आली, माझा कालचा दिवसभराचा थकवा पूर्ण गेला आणि आता मी आजच्या  रुटीन करता एकदम फ्रेश आहे. खूप खूप धन्यवाद.

असं केल्यावर बघा मन किती प्रसन्न होतं आणि छान समाधान मिळतं.

आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता मनाचे समाधान हे उत्तम खत आहे, असं जाणकार मंडळी सांगतात.  आणि — Life without positivity is big Zero

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके 

मरणाचा सोहळा आणि सोहळ्यातील मरण!

काही परंपरा परिस्थितीनुरूप तयार होतात आणि जोवर परिस्थिती बदलत नाही, तोवर टिकून राहतात. देहू-आळंदी ते पंढरपूर हे अंतर किलोमीटर्सच्या भाषेत सुमारे २५० किलोमीटर्स एवढे आहे. श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव ते पंढरपूर हे अंतर येताना सुमारे ७५० किलोमीटर्स अंतर कापते… तर येताना मार्ग वेगळा असल्याने ५५० किलोमीटर्स चालावे लागते. कोथळी जिल्हा जळगाव येथून मुक्ताबाई तर थेट जाऊन येऊन थेट सुमारे १५०० किलोमीटर्स अंतर चालतात. पैठण ते पंढरपूर सुमारे ३५० किलोमीटर्स भरते.

देहू-आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इत्यादी ठिकाणाहून पालखीसोबत पंढरीस येणारे बरेचसे वारकरी आषाढी एकादशीनंतर दुस-या दिवशी वाहनांनी घरी परततात. काही मोजके वारकरी पालखी सोबत चालत माघारी जातात… त्याला परतवारी म्हणतात. आणि परत येतानाचा आव्हानात्मक निम्म्याच दिवसांत प्रवास उरकला जातो!

पूर्वी आजच्या इतके रस्ते विकसित नव्हते. बैलगाडी हे वाहन वारीसोबत नेता यायचे. क्वचित घोडागाडी सुद्धा. पण स्वयंचलित वाहनांची सोय नव्हती. वारी काळात पावसाची सोबत असली तरी हवामानानुसार ऊनही असते कित्येकवेळा. दिवसभराची पायी वाटचाल, त्यामानाने लाभणारी कमी विश्रांती, जेवणाच्या वेळांतील, पदार्थातील बदल, पाणी बदलल्यामुळे, दुषित हवामानामुळे काही वारकरी लोकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असतेच. जुन्या काळी तर अनेक आरोग्य समस्यांना वारकरी तोंड देत असत.

लाखो लोक सहभागी असलेल्या वारीदरम्यान वारकरी मृत होण्याचे प्रकार घडणे साहजिकच असे. अशावेळी मृतदेह त्या व्यक्तीच्या मूळगावी घेऊन जाणे अशक्यप्राय होत असे. दळणवळणाची, संपर्क साधने फारशी उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलावून घेणे वेळेच्या कमतरतेमुळे व्यावहारिक ठरत नसे. मग अशा प्रसंगी ज्या ठिकाणी वारकरी मयत झालेला असेल त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जाई. तोवर पालखी सोहळा थांबून राही. टाळ-मृदुंगाच्या आणि अभंगांच्या साथीने अंत्यसंस्कार केले जात. आणि मगच सोहळा मार्गस्थ होई!

भक्तिभाव असल्याने वारीच्या मार्गावर एखाद्यास मृत्यू आला तर ती व्यक्ती दैववान होती, त्याला नामस्मरण करता करता देवाने त्याच्याकडे बोलावून घेतले, अशी लोकभावना होती.

हल्ली वारीत वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वाहनांची उत्तम सोय असते. त्यामुळे असा काही प्रसंग उद्भवला तर मृतदेह त्या व्यक्तीच्या गावी पाठवणे शक्य झाले आहे.

एका वारीच्या प्रवासात माझे ज्येष्ठ स्नेही श्री. संभाजी वाघेरे यांना मुतखड्याचा आत्यंतिक त्रास होऊ लागला. आम्ही नेमके वाखरीवरून पुढे निघण्याच्या गडबडीत होतो. त्या प्रचंड गर्दीतही एक डॉक्टर उपलब्ध झाले. त्यांनी प्रथमोपचार केले परंतू रुग्णाला दुखणे असह्य होत असल्याचे पाहून त्याला रुग्णवाहिकेतून पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि रूग्णाला सोबत म्हणून मी ही त्या रुग्णवाहिकेतून निघालो. लाखो लोकांचा समुदाय लगबगीने पुढे निघालेला होता… पण रुग्णवाहिका पाहताच वाट करून दिली जाई… काळजीपोटी वारकरी आत डोकावून पहात… आणि या माणसाला लवकर बरं वाटू दे… अशी विठ्ठलास प्रार्थना करीत… पंढरीस पोहोचल्यावर शासकीय रुग्णालयात योग्य ते उपचार मिळाले. मात्र रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका खाजगी डॉक्टरांकडून औषधे घ्यावी लागली.

आम्ही खरं तर औषधोपचार झाल्यानंतर पंढरीत जाऊन आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचणार होतो. पण नेमकी त्याचवेळी माझी तब्येत खूप बिघडल्याने मलाही काही सुचत नव्हते. मीही औषधे घेतली. जिथे आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिथून आमची मुक्कामाची जागा खूपच दूर होती… गर्दीत चालणे अवघड होते. म्हणून आम्ही मंदिराजवळच्या एका धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पण इकडे दिंडीत खूपच गोंधळ उडाला होता. दुपारी निघालेलो आम्ही दोघे… आमचा आणि त्यांचा संपर्क होऊच शकला नाही. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. आम्ही शासकीय रुग्णालयात गेलो तर होतो पण तिथून आमचे आम्ही दुस-या दवाखान्यात गेलो होतो. शासकीय रुग्णालयात खूप गर्दी असल्याने आम्ही कुणाला काही निरोपही देऊ शकलो नाही. त्यामुळे आमची दिंडी आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो. दिंडीतील कारभारी लोकांनी विविध माध्यमातून आमचा शोध घेत होते. वारीसोबत असलेल्या पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यांनी रुग्णालयात आमचा शोध घेतला खरा… पण आम्ही तिथे नव्हतोच. सर्वजण अत्यंत काळजीत पडले… रात्र झाली होती… लाखो लोक पंढरीत पोहोचत होते. ठिकठीकाणी तंबू पडलेले होतेच.

रात्रीचे दहा-साडेदहा वाजले होते. संभाजीरावांना आता थोडे बरे वाटू लागले… वेदना कमी झाल्या होत्या. मग आम्ही मुक्कामाची जागा शोधण्याचा प्रयत्न केला… पांडुरंगाची प्रार्थना केली… गर्दीतून कशीबशी वाट काढीत, पत्ता विचारीत विचारीत चालू लागलो… आणि काहीच वेळात आमची माणसं दृष्टीस पडली… सर्वांचाच जीव भांड्यात पडला… पण आधी लोक मला खूप रागावले… पण मीही आजारी पडल्याचे समजल्यावर सर्वांनी मग माझीही आपुलकीने चौकशी केली… जेवू घातले… आणि आमची आरामदायक जागेत सोय केली… बारा वाजले होते… एकादशी सुरु झाली होती… तंबूत भजनी जागर सुरु झाला होता… कुणी आजोबा गात होते… जाऊ देवाचिया गावा… देव देईल विसावा! वारीचे दिवस छान होते…! छान असतात! रामकृष्णहरी!

– लेख क्र. ६  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares