मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कोण होती ? ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ ती कोण होती ? ☆  सुश्री नीला महाबळ गोडबोले

पंचवीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट… लेकीचा जन्म अजून झालेला नव्हता.. मी आणि माझे यजमान दोघेच रहात होतो…

नक्की महिना कोणता ते आठवत नाही.. पण पावसाळ्याचे दिवस होते.

बहुतेक रविवार असावा…

यजमानांचा सेमिनार होता… ते दिवसभर बाहेर असणार होते..

सकाळपासून रिपरिपणारा पाऊस नि त्यामुळे झालेलं कुंद वातावरण…

मन उदास झालं होतं… त्यात एकटेपणा..

अपर्णाकडे जायचं ठरवलं.. बरेच दिवस ती बोलावत होतीच..

“जेवायलाच ये “.. तिचा हट्टी आग्रह.. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं..

बरेच दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. स्वयंपाकाचं झंझट नव्हतं…

पद्मजा फेणाणींची माझी आवडती कॅसेट लावली.. नि मस्तपैकी सगळी कपाटं आवरून काढली…

स्वयंपाकघर चकचकीत केलं. बरेच दिवस रेंगाळलेलं केस धुण्याचं कामही उरकून घेतलं…

छान तयार झाले.. पर्स घेतली नि बाहेर पडले. दाराला कुलूप लावणार एवढ्यात पुस्तक विसरल्याचं आठवलं.. माझ्याकडचं ” चारचौघी ” हे पुस्तक अपर्णाला वाचायचं होतं. ते घेऊन यायला तिने आवर्जून सांगितलं होतं..

तशीच पुन्हा आत गेले.. कपाटातून पुस्तक काढलं.. पर्समधे टाकलं.. नि बाहेर पडले..

कुलूप लावलं… नि चारचारदा कुलूप ओढून पाहिलं…

खरंतर मी संशयी नाही.. पण कुलुपाच्या बाबतीत मला नेहमी माझाच भरवसा वाटत नाही..

कुलूप व्यवस्थित बसल्याची खात्री करून एकदाची निघाले..

अपर्णाचं घर जवळच असल्याने चालतच गेले.. पावसात मस्त भिजत..

ती वाटच पहात होती.. तिचे यजमान पुण्याला गेल्याने तीही घरात एकटीच होती..

गॅलरीत बसून दोघींनी वाफाळतं टोमॅटो सूप प्यायलं.. वाहत्या रस्त्यावरची रहदारी न्याहाळत..

अपर्णानं मला जेवायला बसवलं नि गरमागरम आलू पराठे तव्यावरून माझ्या पानात वाढले…

माझे आवडते आलू पराठे.. तेही गरम नि आयते. घरच्या लोण्याचा गोळा, कवडी दही,. रायतं, कैरीचं लोणचं.. गृहिणीला अजून काय हवं असतं?

पण सुगरण अपर्णाने मला आवडतो म्हणून ढोकळाही केला होता.. गोड पाहिजेच म्हणून बदाम, केशर घातलेली शेवयाची खीर.. शिवाय पुलाव होताच…

भरपेट जेवण झालं.. खरंतर पोटात इवलीशीही जागा नव्हती.. तरी पोटभर गप्पा झाल्या..

यजमानांचा फोन आला.. तेव्हा संध्याकाळचे सात वाजल्याचं कळलं.. ते अर्ध्या तासात घरी येणार म्हटल्यावर मीही घरी जायला निघाले.. पंधरा मिनिटे पुन्हा दाराशी गप्पांची मैफिल झोडून घराकडे कूच केलं..

घराच्या कोप-यावर पोहोचायला नि दिवे जायला एकच गाठ पडली.. पावसाळी वातावरणात अंधाराने घातलेली भर भीतीला आवतण देत होती..

घराच्या दाराशी आले.. दाराच्या बाजूलाच स्वयंपाकघराची खिडकी.. सताड उघडी..

मी जाताना सगळी खिडक्या दारं घट्ट बंद केलेली.. नेहमीच्या सवयीने..

मग ही खिडकी उघडी कशी? कदाचित वादळ आलं असेल.. त्यामुळे उघडली गेली असेल वा-याने..

खिडकीतून आत डोकावून पाहिलं.. सगळा कट्टा भांड्यांनी भरलेला.. फुलपात्रे, ग्लास, चमचे, कप.. यांची मैफल भरलेली.. सोबत चिवडा नि बिस्किटांचा डबाही..

…. मी तर कट्टा साफ करून गेले होते.. मग एवढी भांडी कुठून आली? घरात कधीतरी एखादा उंदीर शिरतो.. किंवा या रिकाम्या खिडकीतून मांजरही शिरलं असेल..

पण उंदीर नि मांजर अशी भांडी कशी काढतील फडताळातून कट्ट्यावर ? शिवाय तो चिवड्याचा डबा?

आता मात्रं भीतीनं जीव कापायला लागला..

म्हणजे एखादा चोर शिरला असेल का घरात?

पण कुलूप तोडलेलं नाही.. कुठलंही दार उघडलेलं नाही.. खिडकीचं दार उघडं आहे पण खिडकीच्या जाळीमधून चोर शिरणं शक्य नाही…

मग. ?

म्हणजे ते भूत, प्रेत वगैरे तर नसेल ? की काळी जादु.. करणी. भानामती तसलं काही?

अरे देवा…

हो.. बरोबरच आहे.. आज अपर्णा म्हणतच होती अमावस्या आहे.. म्हणून तिने घरात नारळ फोडला…

पण असलं काही नसतं.. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.. असले विचार करणंही चुकीचं आहे.

पण मग हा कसला प्रकार ?.. खूप विचार केला.. डोक पिंजून काढलं…. आणि ट्यूबलाईट पेटली..

मिस्टरांकडे एक किल्ली असते.. तेच आले असणार.. चहासाठी भांडी काढली असणार.. चिवड्याच्या डब्यातून चिवड्याची फक्की मारली असणार… अन् मी मात्रं वेड्यासारखी काहीबाही विचार करत बसले होते.. स्वत:चीच मला लाज वाटली..

एकदाचं हुश्शही झालं..

आता निर्धास्तपणे मी कुलूप काढलं.. घरात संपूर्ण अंधार होता … बेडरूममधे टॉर्च होता.. तो आणला.. चालू केला… हॉलमधे टॉर्चचा प्रकाश टाकत स्वयंपाकघराकडे पाणी पिण्यासाठी निघाले..

…. कोप-यात टॉर्चचा उजेड पडला आणि डोळ्याला जे दिसलं ते पाहून जोराची किंकाळी तोंडातून बाहेर पडली..

त्या कोप-यात एक अतिशय कृश आणि बुटकी बाई पाय पोटाशी घेऊन बसली होती..

अंधाराशी स्पर्धा करणारा अव्वल वर्ण, पिंजारलेले मोकळे केस.. बारीक डोळे, नाकात मोठी चमकी नि कशीतरी नेसलेली इरकल साडी.. हे कमी होतं म्हणून की काय..

.. तिचे पुढे आलेले पांढरे पिवळे दात काढून ती माझ्याकडे पाहून हसू लागली..

” कोण आहे तुम्ही ?” मी धीर एकवटून विचारलं.. नि ती पुन्हा खदाखदा हसू लागली..

आता मात्रं माझं अवसान संपलं.. ही नक्कीच कुणीतरी हडळ बिडळ असणार.. माझी खात्री पटली.. मी भीतीने दाराशी पळत सुटले.. नि दाराशी आलेल्या माझ्या यजमानांना धडकले..

” काय झालं ? अशी का पळतेयस?”

माझ्या तोंडातून शब्दच फुटेना..

” भूत.. भूत “

मी कोप-याकडे बोट दाखवायला नि दिवे यायला एकच गाठ पडली..

मिस्टरांनी कोप-यात पाहिलं..

“चिन्नम्मा.. तू कधी आलीस ?”.. मिस्टरांनी तिला सहजपणे विचारलं..

उत्तर न देता ती पुन्हा तशीच हसली..

” तुम्ही या बाईला ओळखता ?”

” ओळखता काय? चांगला ओळखतो.. अगं हिनं दहा वर्ष आपल्या घरी काम केलय.. खूप प्रामाणिक.. अगदी घरच्यासारखं काम करायची.. मुलं मिळवायला लागल्यावर तिने काम सोडलं. परवाच हिचा मुलगा दवाखान्यात माझ्याकडे तपासायला हिला घेऊन आला होता.. हिला स्किझोफ्रेनिया झालाय… कोणीतरी कानात बोलतय.. कोणीतरी फोटो काढतय.. असे भास होतायत.. घरी न सांगता कुठेतरी हिंडत बसते..

अनेक वर्षांनी आज आपल्या घरी आली…. पण तू एवढी घाबरलीयस का? तूच तिला घरात घेतलं असशील नं?”

मी नाही म्हटलं नि घडलेलं सारं सांगितलं..

” पण मग ही घरात कशी शिरली ?”

आम्ही खूप चर्चा केली.. तिला विचारलं.. पण हसण्याशिवाय तिच्याकडून कोणताच प्रतिसाद नव्हता..

नि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

मी अपर्णाकडे जाण्यासाठी दारात आले नि पुस्तक विसरलं म्हणून दार तसेच उघडे ठेऊन खोलीत गेले..

तेवढ्यात ही चिन्नम्माबाई घरात शिरली नि सरळ स्वयंपाकघरात गेली.. आणि मी दाराला कुलूप लावून निघून गेले..

हिने स्वयंपाकघरातील भांडी काढली.. भूक लागल्यावर कदाचित चिवडा, बिस्कीटे खाल्ली नि नंतर बिचारी हॉलच्या कोप-यात येऊन बसली..

– – आम्हाला या प्रकारावर हसावं की रडावं तेच कळेना..

मी तिला चहा करून दिला. चहा, बिस्कीटे खायला घालून, खणानी तिची ओटी भरली नि आम्ही दोघे तिला तिच्या घरी गाडीतून सोडून आलो..

तिच्या घरच्यांची दिवसभर शोधाशोध सुरूच होती. त्यांनी चारचारदा आमची क्षमा मागितली नि आभारही मानले..

चार दिवसांनी ती पुन्हा गायब झाल्याचं तिच्या मुलाकडून कळलं…

पण यावेळी मात्र ती आमच्याकडे आली नव्हती…

– – पंचवीस वर्षात ना ती कुठे सापडली.. ना तिची खबरबात मिळाली..

पोलीस स्टेशनमधे ती अजूनही ” मिसिंग ” आहे..

….. जायच्या आधी मात्र तिच्या ” डॉक्टरदादांना ” भेटून, आमच्या घरी चहापाणी करून गेली.. !!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… ! 

तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !

गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.

गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.

गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.

त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.

मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!

दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.

दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !

मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.

गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.

हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.

रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!

दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

तुळस नसलेली तुळशीबाग… 

अक्कानी म्हणजे माझ्या आत्त्याने तुळशीबागेत रात्रीच्या आरतीला जाण्याचा नेम कधी चुकवला नाही. अधून मधून ती आम्हांलाही घेऊन जायची. सुरुवातीला वाटायचं एवढं काय आहे त्या तुळशीबागेत? पण नंतर लक्षात आलं, काय मिळत नाही ते विचारा तुळशीबागेत?. अहो पूर्वी म्हणे इथे खूप तुळशी होत्या. म्हणून तर नांव पडलं तुळशीबाग. पण गंमत म्हणजे आता तिथे नावालाही तुळशीचं रोपटं सुद्धा नाही. एकदा संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो, आत्या म्हणाली, “मला माझा राम भेटलाय, तुम्हाला जायचं असेल तर जा भटकायला. आम्हाला काय तेच पाहिजे होतं, आम्हीं पूर्ण देऊळ परिसर पालथा घातला. अगदी अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटलं. कानातलं गळ्यातलं, नाकातलं बांगड्यांच्या मोहात आम्ही पडलो. गंमत म्हणून सांगते तुम्हाला, प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडून लग्न झालेली जोडपी पण तिथे ‘हाजीर ‘होती. त्यातल्या काही नवऱ्याचं लग्ना आधी बायकोला गुलाबाचे फुल, गजरा, गुच्छ, सेंट, अत्तर बाटल्या देऊन झाल्या होत्या. पण हाय रे देवा! ते रोमँटिक क्षण मागे पडले. आणि ते मागे सारून नवरे आता पूर्णपणे संसाराच्या बेडीत अडकले होते. आणि केविलवाण्या चेहऱ्यांनी, ताट वाट्या तवा पोळपाट हा संसारातील पसारा घेण्यासाठी बायकोच्या मागे मागे अगदी धरून पकडून आणल्यासारखे चालले होते. आम्हाला तर बाई हंसूच झालं त्यांच्याकडे बघून. तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडून आणीन असं म्हणणारे ते ‘हिरो’ उलथन, झारे, चिमटे असं काही बाही विकत घेत होते. कारण तुळशीबागेत मिळणाऱ्या चमचे, चहा गाळणी, कुंचे, पातेली, सतेली घेऊन त्यांना संसार चालवायचा होता आणि बायकोला खुश करायचं होतं. जुन्या पिढीचं लक्ष होतं रामाकडे, तर तरुणाईंचे डोळे हार, कानांतले, नाकांतले, गोंडे, रिबिनी इत्यादी नकली साज शृंगार वस्तूंकडे वळत होते. मारुतीच्या पायरीवर आत्याने आम्हाला जबरदस्तीने बसवलं आणि म्हणाली, ” पुरे झाले हं, आता भटकणं! मी सांगते ते ऐका! तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. ” आम्हा भाचरांना खाली बसवत ती म्हणाली, ” ही जागा खाजगी वाल्यांची होती. मंदिराची बांधणी मजबूत असून शिखर 140 फूट उंच व कळसच मुळी चार फुटाचा आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामाईच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत की डोळ्याचं पारणं फिटतं, उमाजी बाबा पंढरपूरकरांनी ह्या शुभ, सुंदर, रेखीव मूर्ती मजुरांकडून चाळीस रुपये म्हणजे त्या काळातली मोठी बिदागी देऊन तयार करून घेतल्या होत्या. आपले पूर्वज व्यवहार दक्ष होते नियमित आणि अचूक हिशोब नोंदणी असायची त्यांची. त्यांच्या नोंदणी वहीत ही नोंदआढळली. आमच्या मनात खूप खूप शंका होत्या मी विचारलं, “आत्या पुण्यात खूप रामाची देवळे आहेत का ग? आणि कुठे आहेत?कुणी आणि कधी बांधली गं ? आमच्या बाल सुलभ उत्सुकतेला आत्त्याने हंसून दाद दिली. राम म्हणजे तिचा अत्यंत प्राणप्रिय, आवडीचा विषय श्रोत्यांकडून दाद मिळाल्यावर ती सरसाऊन म्हणाली, “हो तर! ऐका हं!पुण्यात अनेक राम मंदिरे आहेत रास्ता पेठेतला रास्त्यांचा राम, सदाशिव पेठेतला गाय आळीचा राम, रहाळकरांचा राम, फुटक्या बुरुजाकडे जाताना जोशीराम. तर आपल्या आप्पा बळवन्त चौकाकडून केसरी वाड्यावरून लकडी पुलाकडे जातांना लागतो तो भाजीराम. 1762 मध्ये ते मंदिर बांधलं गेलं. “आत्याला मध्येच थांबवत आम्ही ओरडलो, “नक्कीच तिथे भाजीवाले बसत असतील म्हणून तो भाजीराम झाला असेल, बरोबर नागं आत्या? खळखळून हंसत आत्या म्हणाली, “अगदीबरोब्बर. शंभरापैकी शंभर मार्क तुम्हाला. पण अगं तुम्हीं मघाशी चोरखण आळी म्हणालात ना?ते मात्र चूक आहे हं! चोर नाही चोळखण आळीतला वैद्य राम तर टिळक स्मारक, मंदिरात पण बाबा महाराजांचे राम मंदिर आहे. लक्ष्मी रोडवरचं लिखिते मंदिर आणि शिवाजीनगरच्या रोकडोबा समोरचं राम मंदिर पण प्रसिद्ध होत. आत्याला थांबवत आमचे मोठे शिकलेले चुलत बंधुराज म्हणाले, “आत्या तू तर सगळ्या पुण्यातल्या राम मंदिरातून आम्हाला फिरवून आणलंस, हो नागं? आत्या म्हणाली, “मग आता दमलांत की काय? ऐकून दमलात आता चालून दमा. उठा बरं! रामाला प्रदक्षिणा घालायचीय बर का!मगाशी तुळशी बागेला काही बाही खरेदी करायला दुकानं धुंडाळत बाहेरून फेरा मारलात ना! पण आतल्या श्रीरामाला प्रदक्षिणा घालायला विसरलात. उठा बरं लवकर!आणि पळा आता. मला जप करायचाय जपमाळेकडे जाणारे तिचे हात पकडून आम्ही म्हणालो, “अगं आत्तू माळेशिवाय शंभर वेळा जप मगाशीच झालाय तुझा. “तो कसा काय? ह्या तिच्या प्रश्नाला बगल देऊन आम्ही ओरडलो, “आत्तापर्यंत हे राम मंदिर ते राम मंदिर अशी खूप साऱ्या राम मंदिराची ओळख करून देतांना तुझ्या तोंडून हजार वेळा रामाचं नाव निघालं. मग आता कसला वेगळा जप करतेस?” आत्याने पाठीवरून हात फिरवून किताब “दिला, हुशार आहात. ” पण काही म्हण हं आत्या! तुझ्याकडून खूप छान आणि नवीन माहिती आम्हाला मिळाली. आता रामायणातल्या रामाची छानशी गोष्ट सांग ना घरी जाताना. आणि बरं का मंडळी, गोष्टी वेल्हाळ आत्याची रामकथा ऐकता ऐकता आम्ही जोगेश्वरी जवळच्या आमच्या घरी केव्हां पोहोचलो हे आम्हा मुलांना कळलंच नाही..

– क्रमशः भाग २४  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंबईया… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ बंबईया ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

‘संपर्कासाठी भाषा’ हा उद्देश ठेऊन जर तिसरी भाषा शिकवायची असॆल तर २३ वी राज्यभाषा म्हणून तत्काळ ‘बंबईया’ हिंदी ला मान्यता देऊन तिचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही विनंती, अध्यक्ष महोदय !

शिकण्यास, आत्मसात करण्यास सोपी.

घरातून निघाल्या पासून रिक्षा, बस, रेल्वे स्टेशन, लोकल, मेट्रो मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाण, शाळा, कार्यालये ते परतीचा प्रवास, सगळीकडे कायम बोलली जाणारी ही भाषा पहिली पासून मुलांना (किमान MMRDA क्षेत्रातील) शिकवली तर ते त्यांना पुढील आयुष्यात फायद्याचे ठरेल.

मातृभाषेची ‘मुळं’

बंबईया हिंदीची खोडं’

आणि awesome हिंग्लीश ने भरलेली ‘पानं फुलं ‘

– – – असा हा भाषेचा वटवृक्ष, त्री-भाषा सूत्राचा कल्पवृक्षच जणू

या भाषेतील परीक्षेतील काही sample प्रश्ण

१) वडा-पाव कसा मागाल?

उत्तर: भाऊ, दो- वडा पाव ‘पार्सल’,

‘चटणी’ मत लगाना

२) पब्लिक ट्राॅस्पोर्ट मधील संवादाची उदाहरणे द्या.

उत्तर: अ) कंडक्टर : सुट्टा देना, सुट्टा देना. मेरे पास मोड नही है!

          ब) गर्दीच्या लोकल मधे- ए भैया, सरक बाजूला, बिच मे काय को खडा है बे !

३) मित्र/ मैत्रीणींमधील संवाद

उत्तर : out of सिलॅबस, हे शिक्षण १ ते ४ थी अभ्यासक्रमात सध्या तरी नाही

आणि म्हणून

या भाषेची लागवड पहिली पासूनच करावी ही परत एकदा सभागृहाला विनंती

…. (बंबईका सब से बडा स्ट्रगलर) अमोल 

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ 

पुण्यात पहलगाम हल्ल्याची बातमी समजली, तेव्हा मी एका मिटींगमध्ये होतो. आजूबाजूला बरीच माणसं होती. काम संपवून मी बाहेर पडलो आणि तशाच अस्वस्थ मनस्थितीत घरी आलो. येताना डोळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मस्त निवांत आणि आनंदाने मजा करणारे “भारतीय नागरिक” दिसत होते. कुठं कुणी गटागटाने सिगारेट्सचे झुरके घेत उभे होते, कुठे कुणी खाऊगल्लीत मस्त आस्वाद घेत होते, कुठे एखाद्या हॉटेल बाहेर लोक वेटींग मध्ये होते, मॉल खचाखच भरुन वाहत होते. काश्मीरमध्ये काहीतरी विपरीत घडवून आणलं गेलं आहे आणि हिंदू व्यक्तींना वेगळं काढून मारण्यात आलं आहे,हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं.

‘जन्माला आलो हेच कर्तृत्व’ अशा अनेकांच्या वाढदिवसाची तयारी केकशॉप्स च्या बाहेर सुरु होती. आजही बारा वाजता सात-आठ ठिकाणी वाढदिवसाचे फटाके वाजलेच..!

आमच्या बाजूच्या वस्तीत कुठल्याशा कार्यक्रमाचा डॉल्बी चालू होता. काश्मिरबद्दल दुःख व्यक्त करायला सवड कुणाला आहे इथं ?

“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” हे शब्द शालेय वर्षं संपली की लोक विसरुन जातात. नंतर “भारत कधी कधी माझा देश आहे” अशी त्यांची धारणा होते. आणि आणखी काही वर्षांनी “भारत माझ्या फायद्यापुरताच माझा देश आहे” अशी मनस्थिती होते. हेच सत्य आहे.

आपल्याकडे सिनेमा थिएटर्स मधून प्रत्येक शो च्या आधी राष्ट्रगीत होतं. पण किती खाजगी कोचिंग क्लासेस मधून प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला दररोज राष्ट्रगीत होतं? किती भाजी मंडयांमधून रोज राष्ट्रगीत होतं? किती स्पर्धापरीक्षा सेंटर्स मधून दररोज प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला राष्ट्रगीत होतं? किती मॉल्स मधून दररोज राष्ट्रगीत होतं? हे शोधलं आहे का कुणी? शालेय वयात रोज म्हटलं जाणारं राष्ट्रगीत नेमकं कळत्या वयात आल्यानंतर ऐच्छिक कसं होतं? याच्या उत्तरावर कुणी शोधपत्रकारिता केली आहे का?

हिंदू सणांना अवाढव्य डॉल्बी लावणारे, फ्लेक्स लावणारे आता निषेधाचे फ्लेक्स लावणार का? निषेध आंदोलन करणार का? श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करणार का? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? पहलगाम मध्ये अगदी वेचून काढून २८ हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याच्या निषेधार्थ या डॉल्बीजीवी लोकांनी काय केलं? क्रिकेट मॅच जिंकल्यावर रस्त्यांवर एकत्र येऊन जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ? गाड्यांच्या नंबरप्लेट्स वर ‘हिंदू ‘ असं केशरी अक्षरांत लिहून घेणारे आता पहलगाम मधल्या हिंदूंच्या संहाराबाबत काय भूमिका घेणार?

“काश्मीर मध्ये आत्ता काय घडलं, ते तुम्हाला माहिती आहे का?” यावर कुणी पत्रकार किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट पुण्यातल्या मॉल्स मध्ये मुलाखती घेत फिरला का? त्यानं मजा मारणाऱ्या तरुणांना विचारलं का? एका तरी आंदोलक संघटनेला “आता तुम्ही याचा निषेध का केला नाही?”असं विचारलं का? आयपीएल च्या टीम्स काळ्या पट्ट्या लावून खेळणार का? कालपासून एक तरी माध्यम प्रतिनिधी स्वतःच्या दंडाला काळी फित लावून वृत्तांकन करताना दिसला का?

एकाही दुकानाबाहेरची विद्युत रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. कुठल्याही घराची मंगल कार्यासाठी केलेली रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. उलट मोठमोठ्याने डॉल्बी लावून लोक नाचत होते. एखाद्या महापुरुषाच्या बाबतीत काही घडलं की, देशभर दंगली उसळतात. त्याप्रसंगी जे हातात दगड घेतात, बसेस फोडतात, वाहने पेटवून देतात, ते आज हिंदूंच्या अशा प्रकारे कत्तली झाल्यावर व्यक्त का होत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या भावना जितक्या त्यांच्या आराध्य महापुरुषांशी जोडलेल्या असतात, तशाच त्या राष्ट्रभावना आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताशी जोडलेल्या असतात का? ह्याचं उत्तर आजतागायत कुणी शोधून काढलंय का?

कुणी कुठं एखादं वाक्य आक्षेपार्ह बोललं की, त्यावर त्याच्या फोटोला जोडे करण्यापासून ते त्याच्या फोटोवर लघुशंका करेपर्यंत आंदोलक निरनिराळी कृत्ये करतात. इथं तर भारताच्या २८ हिंदू नागरिकांनी केवळ हिंदू असल्यामुळे जीव गमावला आहे, आता कुणाचा आणि कसा कसा निषेध करणार?

काल एकाही मराठी कार्यक्रमाच्या आधी श्रद्धांजली आणि निषेधाची स्लाईड दाखवण्यात आली नाही. पुण्यातल्या चौकाचौकात डिजिटल जाहिरातींचे बोर्ड लावले आहेत, त्यावर निषेधाच्या स्लाईड दाखवण्यात आल्या नाहीत. भर गर्दीच्या चौकात हातात कुठलेशे पाचकळ बोर्ड हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्यांनी काल निषेधाचा बोर्ड हातात घेऊन रिल्स केली नाहीत. एकाही स्टँड अप कॉमेडियनने “मी ह्या कृत्याचा निषेध करतो” असा बाईट केला नाही.

आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही. कारण त्यात आपलं स्वतःचं व्यक्तिगत असं काहीच नुकसान झालेलं नसतं. “ज्यांचं नुकसान झालं आहे, ते बघून घेतील, मला काय त्याचं?” ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार? हा प्रश्न आहे.

अशा घटना घडल्यानंतर समाज म्हणून आपण काय करतो, हे आता तरी देशाचा घटक म्हणून स्वतःच्या आतल्या आवाजाला आपण विचारणार आहोत का?

किती शाळांमधून आज सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मैदानात एकत्र उभे राहून या मृत हिंदूंना श्रद्धांजली अर्पण केली? किती परिवारांमधून पालकांनी आपल्या मुलांशी या घटनेबाबत बसून सविस्तर चर्चा केली? किती कोचिंग क्लासेस नी श्रद्धांजली आणि निषेधासाठी एक मिनिट वेळ दिला? किती स्पर्धा परीक्षा सेंटर्स आणि अभ्यासिकांमधून सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी काल आणि आज या घटनेवर निषेधात्मक भूमिका व्यक्त केली? आहे का ह्याचं उत्तर कुणाकडे? हे सगळे म्हणतील – “ते आमचं कामच नाही आणि असा काही निषेध करायला आम्ही बांधील नाही. आम्ही कशावर व्यक्त व्हायचं अन् कशावर नाही, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.”

मला कालपासून प्रश्न पडला आहे की, आता विद्यापीठातल्या ललित कला केंद्राच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील, त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा होईलच. काही काळापूर्वी रामायणावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगाम च्या घटनेवर आधारित नाटक करणार का? पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया मध्ये पहलगाम घटनेवर आधारित एक तरी स्क्रिप्ट दिसणार का? मराठी नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टी मध्ये या घटनेवर एकतरी वास्तव आली सत्य कथानक पडद्यावर येणार का? आहे का ह्याचं उत्तर?

मातृभूमीला माता मानणाऱ्या परिवारांमधून “आम्हा काय त्याचे” ही वृत्ती आधी खोडून काढली पाहिजे. घराघरांतून मुलांना “आपण असल्या भानगडीत पडायचं नसतं. तू तुझा अभ्यास कर” असले डोस देणं आधी बंद केलं पाहिजे. हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे, हे आपल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबानं मान्य केलं पाहिजे. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार जोवर प्राधान्यक्रमाने होणार नाहीत, तोवर “मला काय त्याचे ” ही भारतीयांची वृत्तीच शत्रूचं बळ वाढवणारी ठरणार आहे. संपूर्ण देश केवळ सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्ष सक्रिय रुपात एकत्र उभा राहिला तरच जगाला योग्य संदेश जाणार आहे.

नागरिक म्हणून आमचं चारित्र्य जितकं प्रखर राष्ट्राभिमानी असायला हवं तितकं आहे का? सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त आमची स्वतःची भारतीय नागरिक म्हणून काही भूमिका आहे का? आणि निरपराध व्यक्तींना केवळ धर्मांधतेमुळे मुद्दाम मारण्यात आलं, ह्याचं सुतक देशातला प्रत्येक हिंदू पाळणार का? ह्या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरं मिळू शकणार नाहीत. कारण, “मला काय त्याचे” ही वृत्ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते…

ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते… स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते… 

दुसऱ्याशी  ती एकरूप होऊन जाते… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं ???) इथून पुढे — 

 

स्वतःला ठेच लागली की, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, हि असते ती वेदना…. 

दुसऱ्याला ठेच लागल्यावर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा होते ती संवेदना… ! 

आपण स्वतःच्या वेदना कुरवाळतो… 

ती दुसऱ्याच्या संवेदना जपते…

गरीब कोण …. श्रीमंत कोण.. ? 

इथे माझे डोळे दगा देतात…

भर उन्हाळ्यात डोळ्यातून मग पाऊस कोसळतो… ? 

तिच्याच पदराला मग मी डोळे पुसायला खाली वाकतो… 

‘का रडतो रं…?’ ती माऊली विचारते

‘कुठे काय ?  मी कुठे रडतोय ?  घाम पुसत होतो…’ हुंदका आवरून मी तिला स्पष्टीकरण देतो. 

‘डोळ्याला कुठे घाम येतो बाळा…?’ कातरलेल्या आवाजात ती बोलते… 

तीच्या पदराला डोळे पुसायला वाकलेला मी…. 

आता माझ्या पाठीवर अश्रूंच्या धारा बरसतात… 

‘मावशी आता तु का रडते ?’ मी मान वर करून विचारतो

‘तुज्यागत माज्या बी डोळ्यांना घाम आला बाळा ….’ ती पदराने डोळे पुसत हसत बोलते. 

फसवा फसवीच्या या खेळात आम्ही रोज फसतो…. रोज रोज फसतो… आणि आपण फसलोच नाही असं दाखवत पुन्हा हसतो पुन्हा पुन्हा हसतो ! 

तर, इतक्या महागाचा हार आणला, पेढे आणले… 

अच्छा, मघाची गहन चर्चा वर्गणीसाठी चालू होती, या वर्गणी मधून हार पेढे आणि इतर साहित्य आणले गेले …

मी माझ्या लोकांना म्हणालो, ‘हा खर्च करायची काय गरज होती ? ऋण काढून सण करणे मला पसंत नाही… ‘ मी माझी नाराजी मोठ्या आवाजात बोलून दाखवली. 

ए आव्वाज खाली… 

शांत बसायचं गप गुमान…  

सांगटले तेवडंच करायचं… 

आज लय शान पना करायचा नाय… 

माझ्या वेगवेगळ्या माणसांकडून, वेगवेगळ्या धमकी वजा प्रेमळ सूचना येत राहिल्या… 

भिजलेल्या मांजरागत, भेदरून मी सर्व ऐकत राहिलो… ते सांगतील ते करत राहिलो.

यानंतर माझ्या लोकांनी रस्त्यावर माझं औक्षण केलं… 

एकाच वेळी उसाचा रस, लस्सी, पाणी, ताक, नीरा , लिंबू सरबत, गुलाबजाम (पाकातले आणि कोरडे), पेढे (खव्याचे/  कंदी /साखरेचे /कमी साखरेचे) केक, वडापाव, समोसा, प्रसादाची खिचडी, शिरा (पायनॅपल/ साधा शिरा /कमी साखरेचा शिरा) या सर्व बाबी पोटात घेऊन मी दिवसभर गर्भार बाईसारखा कमरेवर हात ठेवून मिरवत आहे. 

माझ्यासाठी जे पार्ले बिस्कीट, गुड डे बिस्कीट, शिरा, केळी गिफ्ट म्हणून मिळाली होती, ती सर्व एका बॅगेमध्ये माहेरी आलेल्या मुलीला, सासरी जाताना आई पिशवीत घालून देईल तशा पद्धतीने भरून दिलं. 

आज खूप लोकांनी विचारलं डॉक्टर आज काय विशेष ? 

हो… आज एक हात आणि पाय निसर्गात विलीन झालेली नवरा बायकोची मूर्ती भेटली. 

त्यांची नऊ वर्षांची मुलगी धडधाकट आहे, सुदृढ आहे, गोड बाळ आहे, शिकायची इच्छा आहे. 

मी या दिव्यांग मूर्तीला विचारलं मी काय करू शकतो ? 

ते म्हणाले आमचे आयुष्य संपले आहे, मुलीला शिकवा… 

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी या दिव्यांग मूर्तींना वचन दिले आहे, ‘आज पासून ही पोरगी माझी, जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन. मी जर जिवंत असेन, तर बाप म्हणून कन्यादान करून, तिचे लग्न सुद्धा लावून देईन.’

या वेळी आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले…. 

माझ्यासारख्या पन्नास वर्षाच्या माणसाच्या पदरात, निसर्गाने वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोरगी घातली…. 

यार, वाढदिवस वाढदिवस…. सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे अजून दुसरं काय असतं ? 

आपल्या वाढदिवशी आपलं अपत्य जन्माला यावं…. 

आपला आणि तिचा बड्डे सेम टु सेम दिवशी असावा, याहून भाग्य ते काय… ?? 

एका मुलीचा बाप होऊन आज माझा वाढदिवस साजरा झाला !!! 

साला आज मैं तो बाप बन गया…. ! 

मी आता निघालो. 

पारले, गुड डे, खिचडी, शिरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची माझी बॅग तयार होती. 

बॅगेचे वजन असेल अर्धा ते एक किलो… ! 

एक आजी मध्येच आली आणि म्हणाली, हे पैसे ठेव आणि जीवाला वाटेल ते घेऊन खा…

ती वीस रुपयांची नोट होती… ! 

नाईलाजाने उचलला जातो तो बोजा…  .

दुसरे डोक्यावर टाकतात तो भार…  

आपणहून आपल्या माणसांचं उचलतो ते वजन… ! 

रोज शंभर ते सव्वाशे किलो वजनाचं साहित्य घेऊन या कडक उन्हाळ्यात मी रस्त्यावर फिरतोय… 

मला दिलेल्या गिफ्ट ने ही भरलेली बॅग मात्र उचलताना, आज ती मला अनेक पटींनी वजनदार जाणवली… !  

या बॅगेचे वजन तरी कसं करावं ? 

फुलांचं वजन होतं माऊली, सुगंधाचं वजन कसं करायचं ??? 

गिफ्टच्या बॅगेचं वजन होईल सुद्धा, पण प्रेमाच्या या भावनांचं वजन करण्यासाठी मी कुठला वजन काटा आणू  ? 

आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करताना दरमहा पाच लाख रुपये पगार घेत होतो, बँकेतून पैसे काढून, पाच लाख रुपये एका खिशात सहज मावायचे…. 

“जीवाला वाटेल ते घेऊन खा”… म्हणणारी वीस रुपयांची नोट मात्र आता खिशात बसेल, एवढा मोठा खिसाच आता माझ्याकडे नाही, माऊली… !!!

काय करावं ? कसं करावं ? माझ्याकडे उत्तर नाही… ! 

आज ती किलोभर बॅग आणि ती वीस रुपयांची नोट खूप खूप वजनदार भासली… !

रिटर्न गिफ्ट द्यायची हल्ली प्रथा सुरू झाली आहे… 

मला जे माझ्या माणसांकडून गिफ्ट मिळाले त्या बदल्यात मी त्यांना रिटर्न गिफ्ट काय देऊ ? 

काय देऊ…  काय देऊ…. 

अं… काय देऊ… ??? 

Ok… 

ठरलं….

17 एप्रिल 2025 नंतर माझं जे काही आयुष्य उर्वरित आहे, ते माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना माणसात आणण्यासाठी, जे काही मला करावे लागेल, ते करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित…!!! 

यापेक्षा वेगळं माझ्याकडे रिटर्न गिफ्ट नाही…!!! 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नाते संबंधांची शाल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नाते संबंधांची शाल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज तिने ठरवलचं… ते काम करायचचं… किती दिवस झाले… उगीच मागे पडत होते…

मनातून तिला माहित होतं.. खरतरं ती ते टाळतं होती.. ते करणं भागच आहे.. हे तिच्या लक्षात आलं मग मात्र ती नातेसंबंधांची शाल घेऊन बसली…. दुरुस्त करण्यासाठी..

खोटे आरोप प्रत्यारोप.. रुसवे फुगवे.. याचे त्याला त्याचे याला.. कागाळ्या कानपिचक्या.. बतावणी.. गाॅसीप..

अशा अनेक गोष्टींनी शाल कुठे कुठे उसवली होती.. कुठे फाटली होती.. तर काही ठिकाणी विरली पण होती.. अगदी दुरुस्त होण्याच्या पलीकडची.. आता ही शिवायची कशी.. तिला मोठा प्रश्नच पडला शिवताना चुकून धागे जरा जास्त ओढले गेले तर फाटायची भीती काय करावं बाई.. काही सुचेना… ही शाल कपाटात बंद करून ठेवता येत नाही.. ती अंगावर घ्यावी लागते 

आज ती थोडी हताश झाली.. ही शाल टाकून देऊन दुसरी नवीन घेताच येत नाही.. तशी सोय नाही जन्म झाला तेव्हा एकदा जी मिळते ती आयुष्यभर वापरावी लागते तिने अलगद धक्का न लावता ती शाल अंगाभोवती लपेटली आणि निघाली बाहेर..

मनातून शंकीत होती.. कोण काय म्हणेल ही भीती पण होती.

आजवर तिने इतरांच्या शालीकडे निरखून नीट पाहिलं नव्हतं.. पण आज तिने लक्षपूर्वक पाहिलं त्यांच्याही शालीला अशी बरीच भोकं उघडपणे दिसत होती.. पण त्याबद्दल त्यांना खेद खंत दु:ख नव्हतं नवीन वस्त्र घालावं तशी ती शाल ते सहजपणे मिरवीत होते.. अभिमानानी आनंदाने.. ती आश्चर्यचकित झाली.. मग हळूहळू विचार करता करता तिचं तिला उमगलं…

हे वर्षानुवर्ष नाही तर युगानंयुगे असंच चाललं आहे.. असंच चालत राहणार आहे ही शाल अशीच असते.. तशीच ती वापरायची असते.. ती मनाशी म्हणाली…

…. असू दे वरची शाल फाटकी.. कोणाला न दिसणारं माझं अंतर्मन मात्र मी स्वच्छ ठेवीन.

ते निश्चितच माझ्या हातात आहे.. त्याच्याशी प्रामाणिक राहीन. त्याची सावध साथ असली की इतर कोणी असले काय नसले काय….

आपल्या विचारांनी तिला आत्मविश्वास आला. तिने आज शालीकडे नीट निरखून पाहिले तर काही सोनेरी धागे चमकले….

आपुलकी, माया, प्रेम, स्नेह, मैत्री.. यांचे काही मजबूत धागे तिला दिसले.. ती स्वतःशीच हसली तिचा सन्मार्ग तिला दिसला..

…. ती निघाली.. मनोनिग्रहाने.. सबल मनाने

…. जीवन शांतपणे जगण्याच्या वाटेने

एकटीच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

जात

आयुष्याच्या प्रवासामध्ये घडणाऱ्या धक्कादायक घटनांचा परिणाम हा कायमस्वरूपी असतो का? हा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला मिळणारं उत्तर हे अस्पष्ट असतं. त्याचं कारण असं की आठवणी जरी मागे उरलेल्या असल्या तरी काळानुसार त्या घटनेच्या वेळचा तीव्रपणा, कडवटपणा, त्यावेळी प्रत्यक्षपणे उसळलेली बंडखोरी अथवा वादळ शमलेलं असतं. सरकणाऱ्या काळाबरोबर खूप काही बदललेलंही असतं आणि या जाणिवेपर्यंत आपण पोहोचतो की आता मागचं कशाला उगाळायचं? जे झालं ते झालं किंवा झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्याने धागे विणणे जर आनंदाचे असेल तर ते का स्वीकारू नये?

काही दिवसापूर्वीच माझी एक बालमैत्रीण मला एका समारंभात भेटली. बोलता बोलता ती म्हणाली, ” त्या दोघींना बघितलेस का? कशा एकमेकींना प्रेमाने मिठी मारत आहेत! एकेकाळी तलवारी घेऊन भांडत होत्या. माणसं कसं काय विसरू शकतात गं भूतकाळातले खोलवर झालेले घाव? ”

तिच्या त्या प्रश्नाने माझ्या अंतर्मनातले संपूर्ण बुजलेले व्यथित खड्डे पुन्हा एकदा ठिसूळ झाल्यासारखे भासले.

१७/१८ वर्षांचीच असेन मी तेव्हा. दोन वर्षांपूर्वीच ताईचे तिने स्वतः पसंत केलेल्या मुलाशी थाटामाटात लग्न झाले होते. मुल्हेरकरांचा अरुण हा आम्हाला केवळ बालपणापासून परिचितच नव्हता तर अतिशय आवडता आणि लाडका होता तो आम्हा सर्वांचा आणि अरुणचे काका- काकी म्हणजे बाबा- वहिनी मुल्हेरकर आमचे धोबी गल्लीतले गाढ आमने सामनेवाले. आमचे त्यांचे संबंध प्रेमाचे, घरोब्याचे आणि त्यांच्या घरी नेहमी येणारा त्यांचा गोरागोमटा, उंच, तरतरीत, मिस्कील, हसरा, तरुण पुतण्या अरुणच्या प्रेमात आमची ही सुंदर हुशार, अत्यंत उत्साही, बडबडी ताई हरवली तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते. खरं म्हणजे दोघेही एकमेकांना वैवाहिक फूटपट्टी लावली असता अत्यंत अनुरूप होते. बाबा आणि वहिनी खुशच होते पण अरुणच्या परिवारात म्हणजे त्याचे आई-वडील (भाऊबहिणीं विषयी मला नक्की माहीत नाही पण आई-वडिलांच्या मतांना पाठिंबा देणारे ते असावेत) त्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता आणि त्याला कारण होते.. आमची जात. मुल्हेरकर म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी, उच्च जातीतले. ब्राह्मण जातीनंतरची दुसरी समाजमान्य उच्च जात म्हणजे सीकेपी असावी आणि आम्ही शिंपी. जरी धागे जोडणारे, फाटकं शिवणारे, विरलेलं काही लक्षात येऊ नये म्हणून सफाईदारपणे रफू करणारे वा ठिगळं लावणारे असलो तरी शिंपी म्हणजे खालच्या जातीचे. जात म्हणजे जातच असते मग तुमच्या घरातले अत्यंत उच्च पातळीवरचे संस्कार, बुद्धीवैभव, संस्कृती, जीवनपद्धती, आचार विचार यांना या पातळीवर महत्व नसते त्यामुळे हा धक्का जरा मोठाच होता आम्हा सर्वांसाठी. त्यातून पप्पांनी आमच्यावर एक मौलिक संस्कार आमच्या ओल्या मातीतच केला होता. “जाती या मानवनिर्मित आहेत. मनुष्य कोणत्या जातीत जन्माला यावा हे केवळ ईश्वराधीन असते त्यामुळे जन्माला येणार्‍याची खरी जात एकच. “माणूस” आणि जगताना तो माणूस म्हणून कसा जगतो हेच फक्त महत्त्वाचं. ” अशा पार्श्वभूमीवर ताई आणि अरुणचं लग्न या जातीभेदात अडकावं ही आमच्यासाठी फार व्यथित करणारी घटना होती पण “मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी? ”

कदाचित अरुण म्हणालाही असेल ताईला, ” आपण पळून जाऊन लग्न करूया” आणि ताईने त्याला ठामपणे सांगितले असेल, ” असा पळपुटेपणा मी करणार नाही कारण मी ज. ना. ढगे यांची मुलगी आहे. ”

अखेर प्रीतीचा विजय झाला. अरुणने घरातल्या लोकांची समजूत कशी काढली याबाबतीत अज्ञान असले तरी परिणामी अरुणा -अरुण चे लग्न थाटामाटात संपन्न झाले. त्या रोषणाईत त्या झगमगाटात जातीची धुसफूस, निराशा, भिन्न रितीभातीचे पलिते काहीसे लोपल्यासारखे भासले, वाटले. आम्ही सारेच लग्न किती छान झाले, सगळे मतभेद विरले, आता सारे छान होईल या नशेतच होतो पण नाही हो!

विवाहा नंतरच्या काळातही त्याची झळ जाणवतच राहिली. ती आग अजिबात विझलेली नव्हती. आपली लाडकी बाबी संसारात मानसिक कलेश सोसत आहे या जाणिवेने पप्पा फार व्यथित असायचे. वास्तविक भाईसाहेब मुल्हेरकर (अरुणचे वडील) जे रेल्वेत अधिकारी पदावर होते त्यांच्याविषयी पप्पांना आदर होता पण क्षुल्लक विचारांच्या किड्यांनी ते पोखरले जावेत याचा खेद होता. त्यात आणखी एक विषय पपांना सतावणारा होता आणि तो म्हणजे “बुवाबाजी”. प्रचंड विरोध होता पप्पांचा या वृत्तीवर आणि धोबी गल्लीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या एका बाईकडे बसणार्‍या, लोकांना भंपक ईश्वरी कल्पनात अडकवून त्याच्या नादी लावणाऱ्या “पट्टेकर” नावाच्या, स्वतःला महाराज समजणाऱ्या या बुवाच्या नादी हे सारं कुटुंब लागलेलं पाहून ते संताप करायचे. त्यातून ताई आणि अरुणही केवळ घरातले सूर बिघडू नयेत म्हणूनही असेल कदाचित पट्टेकरांकडे अधून मधून जात हे जेव्हा पप्पांना कळले तेव्हा आमच्यासाठीचा हा महामेरू पायथ्यापासून हादरला आणि माझ्यात उपजतच असलेली बंडखोरीही तेव्हाच उसळली.

या सगळ्या निराशाजनक, संतापजनक दुःख देणाऱ्या पार्श्वभूमीवरही काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले हे विशेष.

आमच्या घरात कित्येक वर्षांनी तुषारच्या जन्माच्या निमित्ताने “पुत्ररत्न” प्राप्त झाले आणि त्याचा आनंद काय वर्णावा! ताई -अरुणला पहिला पुत्र झाल्याचा आनंद समस्त धोबी गल्लीने अनुभवला. जणू काही “राम जन्मला गं सखी राम जन्मला गं” हाच जल्लोष होता. बाबा वहिनींना तर खूपच आनंद झाला. काय असेल ते असो जातीभेदाच्या या युद्धात ते मात्र सदैव तटस्थ होते. त्यांचा आमचा घरोबा, प्रेम, स्नेह कधीही ढळला नाही. त्यांनी लहानपणापासून त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात वाढलेल्या ताईचा सून म्हणूनही नेहमी सन्मान राखला. तिच्यातल्या गुणांचं कौतुक केलं.

आमच्या घरात तुषारचे बारसे आनंदाने साजरे झाले. अरुणचा समस्त परिवार बारशाला आला होता. त्यांनी व्यवस्थित बाळंतविडा, तुषारसाठी सुवर्ण चांदीची बालभूषणेही आणली पण इतक्या आनंदी समारंभात त्यांनी आमच्या घरी पाण्याचा थेंबही मुखी घेतला नाही. आईने मेहनतीने बनवलेल्या खाद्यपदार्थांना हातही लावला नाही. कुणाशी संवाद केला नाही. ।अतिथी देवो भव । या तत्त्वानुसार आई, जीजी, पप्पा यांनी कुठलीही अपमानास्पद वागणूक अथवा तसेच शब्दही मुखातून प्रयासाने येऊ दिले नाहीत मात्र आमच्या याही आनंदावर पार विरजण पडलं होतं.

पाळण्यात बाळ तुषार रडत होता. त्याला मी अलगद उचललं. त्याचे पापे घेतले. त्या मऊ, नरम बालस्पर्शाने माझ्या हृदयातली खदखद, माझ्यासाठी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या तीन व्यक्तींचा झालेला हा अपमान, मनोभंग आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष शांत झाला होता का? पण मनात आले या कडवट, प्रखर आणि माणसामाणसात अंतरे निर्माण करणारे हे जातीयवादाचे बाळकडू या बाळाच्या मुखी न जावो!

पुढे अनेक क्लेशकारक घटना घडणार होत्या. एका सामाजिक अंधत्वाच्या भयाण सावलीत आमचं पुरोगामी विचारांचं कुटुंब ठेचकाळत होतं हे वास्तव होतं. त्याबद्दल मी पुढच्या भागात लिहीन आणि या वैयक्तिक कौटुंबिक बाबीं आपल्यापुढे व्यक्त करण्याची माझी एकच भूमिका आहे की माणसाच्या मनातले हलके विचार किंवा श्रेष्ठत्वाच्या दांभिक भावना जगातल्या प्रेमभावनेचा अथवा कोणत्याही सुंदर आत्मतत्त्वाचा किती हिणकस पद्धतीने कडेलोट करतात याविषयी भाष्य करणे. हे असं कुणाच्याही बाबतीत कधीही होऊ नये. कुठलाही इतिहास उगाळून मला आजचा सुंदर वर्तमान मुळीच बिघडवायचा नाही पण घडणाऱ्या घटनेचे त्या त्या वेळी जे पडसाद उमटतात त्याचा व्यक्तीच्या जडणघडणीवर नक्कीच परिणाम झालेला असतो..

– क्रमश: भाग ३८

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 17 एप्रिल माझा जन्मदिवस!

ज्यांना माहित होते, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, या सर्वांचा मी ऋणी आहे!

आजही मी नेहमी सारखाच भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या स्पॉटवर गेलो, तिथे एक वेगळा सुखद धक्का बसला.

श्री अमोल शेरेकर, स्वतः दिव्यांग असून आपल्या सोहम ट्रस्टमध्ये अन्नदान प्रकल्प पहात आहेत.

यांच्या निमित्ताने अनेक दिव्यांग कुटुंबांनी मला त्यांच्यात सामावून घेतले आहे.

माझ्या स्पॉटवर मी पोचलो, मोटरसायकल स्टँडवर लावताना अचानक माझे पाच-पन्नास दिव्यांग बंधू-भगिनीं समोर दिसले… कुणी कुबडी घेऊन आले होते, कोणी काठी, तर कोणी व्हीलचेअरवर.

नेमकं झालंय काय मला कळेना…

त्यांच्याजवळ जाऊन मी भांबावून विचारले, ‘अरे काय झालं? तुम्ही इथे सर्व कसे? ‘ 

सगळे एका सुरात म्हणाले, हॅपी बड्डे सsssर…!

‘अच्छा असं आहे होय? घाबरलो की रे मी…’ असं म्हणत हसत सर्वांचे हात हातात घेतले.

ज्यांना हातच नाहीत त्यांच्या पायांना स्पर्श केला…!

कोणाला पाय नाहीत, कोणाला हात नाहीत… याही परिस्थितीत कुबड्या काठ्या व्हीलचेअरवर हि मंडळी कुठून कुठून कसरत करत, बस / रिक्षा / चालत आली होती…

हे प्रेम, ही माया कुठून आणि कशी उत्पन्न होत असेल?

मतिमंद म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे अशी तीन मुलं माझ्या कमरेला विळखा घालून, हॅपी बड्डे… हॅपी बड्डे… म्हणत नाचत होती… नव्हे मला नाचवत होती…!

कसं म्हणायचं यांना दिव्यांग?

कसं म्हणू यांना मतिमंद?

समुद्रात / नदीमध्ये विसर्जित केलेली मूर्ती…

कालांतराने या मूर्तीचे हात, पाय, मुकुट आणि चेहऱ्यावरचा रंग अशा अनेक बाबी निसर्गामध्ये विलीन होतात. पण अशी हात नसलेली, पाय नसलेली, मुकुट नसलेली मूर्ती दिसूनही श्रद्धा असलेल्या माणसाचे हात नमस्कारासाठी आपोआप जुळतात…! वेगवेगळ्या समुद्रातून, नदी मधून, तलावामधून अशा सर्व भंगलेल्या मूर्ती आज माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन, मूर्त स्वरूपात मला आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर उभ्या होत्या… कुणी दिव्यांग म्हणो… कोणी मतिमंद म्हणो…. माझ्यासाठी या भंगलेल्या, परंतु पवित्र मूर्तीच आहेत…. भंगलेल्या या पवित्र मूर्तींसमोर मग मी नतमस्तक झालो…!

मी कुठल्याही मंदिर मशीद गुरुद्वारा चर्चमध्ये गेलो नाही… तरी मला भेटायला, आज देवच माझ्या दारात आला, माऊली….! ! !

माझ्या या सर्व देवांनी केक आणला होता, माझे स्नेही डीडी (फेसबुकचा आणि मनाने अत्यंत श्रीमंत असलेला राजा, श्री धनंजय देशपांडे) हे कानीकपाळी ओरडून सांगतात, केक नका कापू, कलिंगड कापून वाढदिवस साजरा करा…!

माझा तोच विचार होता, परंतु या सर्वांनी येतानाच खूप महागाचा केक आणला होता, आता केक नको, कलिंगड कापू असं म्हणून त्यांचा हिरमोड करण्याचं माझं धाडस झालं नाही…. Next time नक्की DD.

तर या सर्व गोष्टी आमच्या भिक्षेकरी आजी-आजोबा, मावश्या, बंधू भगिनी यांच्यासमोरच सुरू होत्या.

.. डाक्टरचा आज वाडदिवस हाय, हे समजल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्यांनी आधी माझी खरडपट्टी काढली.

‘ आगं हो, आरे हो… सांगणारच होतो ‘.. म्हणत वेळ मारून नेली.

मी आमच्या लोकांना मग वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. बाजूला सहज लक्ष गेलं, अनेक आज्या मावश्या आणि माझे भाऊ एकत्र येऊन, गंभीर चेहऱ्याने काहीतरी खलबतं करत होते.

– – भारताची अर्थव्यवस्था, अमेरिकेने भारतावर लादलेले कर, कोसळलेला शेअर बाजार, महागाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते गहन चर्चा करत असावेत; असं समजून हसत मी माझं काम चालू ठेवलं.

माझं काम संपलं… मी उठलो, पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो, इतक्यात एक मावशी आली आणि दरडावणीच्या सुरात म्हणाली, ‘वाडदिस हूता तर आदी आमाला का नाय सांगटलं, पयलं ह्याचं उत्तर दे… ‘ 

‘आगं… ‘

‘आगं आनं फगं करू नगो, हुबा ऱ्हा… ‘ 

रोबोट प्रमाणे तिने जिथे सांगितले तिथे मी उभा राहिलो. यानंतर एक भला मोठा हार माझ्या गळ्यात घालण्यात आला, पेढ्यांचे चार पाच बॉक्स समोर आले. काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला, कोणी लस्सी, कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं.

कुणी पारले बिस्कीट, कुणी गुड डे बिस्किट, कुणी वडापाव, कुणी केळी, तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा… प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी…

मी लटक्या रागाने म्हणालो….

‘म्हातारे तु सहा केळी आणली, बाबांनं चार वडापाव आणले, मावशीनं पारलेचे सहा पुडे आणले… पाच पेढ्याचे बॉक्स आणलेत…. एकदाच खाऊ घालून काय मारता का काय मला वाढदिवसाला…? ‘ 

ती म्हणाली ‘खा रं ल्येकरा, आमी भिकारी हाव, भिकारी म्हणून, आमाला कुनी बी कायबाय देतंया, पण नौकरी, कामधंदा सोडून तू आमच्यासाठी एवड्या खस्ता खातो… तू काय कुटं कामाला जात न्हायी…. मंग तुला तरी कोन देइल…?’

‘खा रं माज्या सोन्या.. तुला माज्या हातानं सोन्याचा न्हाय… पन येवडा तरी योक घास भरवू दे… खा रं… माज्या बाळा… आ कर.. आ कर… हांग आशी… ‘ 

‘आम्हाला कुनी बी देईल, तुला कोण देणार?‘

– – या वाक्याने अंगावर काटा आला… ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते… ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते…

स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते…

दुसऱ्याशी ती एकरूप होऊन जाते…

…… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं???

– क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दात काढणे…” – लेखक : श्री अनिल बापट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “दात काढणे…” – लेखक : श्री अनिल बापट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

अहं..ss..अहं मी क्रियेबद्दल बोलत नाहीये,तर शब्दशः दात काढण्याच्या प्रक्रियेविषयी बोलत आहे.

रोज दात घासत असूनही वयोमानानुसार एक एक दात माझ्याशी दगाबाजी करत होता.

राहिलेल्या दातांवर, खार न खाता, वेळोवेळी आवश्यकतेनुसार दाताच्या डाॅक्टरकडे जाऊन दातांची सफाई व इतर सोपस्कार करण्याचाही आता कंटाळा येऊ लागला होता.

आपल्याला सोसवेल या दृष्टिकोनातून आताच राहिलेले दात काढून घ्यावेत हा माझा विचार माझे डाॅक्टर जवळपास 3/4 वर्षे मोडीत काढत होते.

2025 साली मात्र ,आता परत दातांची तक्रार आली की दात काढायला सुरवात करायचीच ह्या निर्णयाला ठाम राहून डाॅक्टरांनाही तसे कळवून आलो होतो.

साधारण मार्च महिन्यात दात काढण्याची प्रोसेस चालू झाली.

4/5 भेटीत सर्व दातांना फारसा त्रास न होता निरोप देऊन झाला.जखमा भरून आल्या .आता थोडे थोडे पदार्थ मऊ करून खाता (गिळता )येऊ लागले.

कोणतीही गोष्ट चावून खाता येत नाही हे लक्षात आल्यावर खरी परिक्षा चालू झाली.

आयुष्यभर  कोणत्या ना कोणत्या विषयावर ,आपण दुसर्‍याला आवडीने का चावत असतो त्यामागची मेख लक्षात आली.

” मुकाटपणे गिळा ” असे म्हणायचीही सौ.ना मुभा नव्हती, कारण शब्दशः गिळणेच चालू होते.

ती बिचारी मला काय काय खायला देतात येईल,याच्या कायम विचारात व तयारीत असायची.

दात काढलेले असल्याने  मोकळे झालेल बोळके घेऊन बाहेरही फारसे जाता येत  नव्हते. 

शाळा काॅलेजच्या मित्र मौत्रिणींना,आत्ताच ट्रिपचे बेत ठरवण्याचा दांडगा उत्साह आला होता. सोशल लाईफ  जवळपास बंद पडलेले होते.

हिरड्या मजबूत झाल्याशिवाय कवळीचे माप देणे योग्य ठरणार नसल्याने वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परिस्थितीला मी [दाती त्रूण धरून असेही म्हणण्याची सोय नव्हती म्हणून ] निमूटपणे शरण गेलो होतो.

एक मात्र खरे, तोंडातून शब्द बाहेर पडताच, त्याची पूर्तता व्हावी, या माझ्या अपेक्षांना परिस्थितीने काहीसे योग्य वळण दिले होते.आता उरलेल्या आयुष्यात ते वळण तसेच राहो व वाट सरळ न होवो हीच अपेक्षा आहे.

काही काही वेळेस वळणा वळणाचा घाटही सुखावतो त्याचीच प्रचीती आली.

आईच्या दुधावर पोसलेल्या दातांपासून सुरू झालेला हा प्रवास, कृत्रिम कवळीपर्यंत फारसे धक्के बुक्के न बसता सुखावहपणे पार पडला याचेच समाधान आहे.

मला दुधाचा पहिला दात आल्यावर त्याचे आई वडिलांनी केलेले कोड कौतुक आठवता,कवळीचे कौतुक करायला आता ते हयात नाहीत हीच सल आहे.

– – – समाज काय करतो ते पहायचे. 

लेखक : श्री अनिल बापट

बाणेर,पुणे.

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares