मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्राजक्ता आहेच थोडा असा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्राजक्ता आहेच थोडा असा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

प्राजक्ता आहेच थोडा असा 

 कोवळ्या पाकळ्यांनी फुलणारा 

 वाऱ्याची हळूच झुळूक येता 

 हिंदोळ्यावर झुलणारा 

 रात्रीच्या अंधारात 

 शुभ्र फुलात डवरलेला 

 फांदी फांदीवर चांदणं जणू 

 अंगोपांगी मोहरलेला 

 *

 प्रभातीच धावतो खाली 

 अंगणाच्या ओढीने 

 सुगंधी शुभ्र गालिचा 

 भूमातेला घालतो लाडीगोडीने 

 *

 केशर कांती देठाने 

 रंगांची करतो उधळण 

 सडा पाहून प्राजक्ताचा 

 बेधुंद होते माझे मन 

 *

 हळूच सांगतो कानात 

 अलगद उचल हं मला 

 पाकळी जर तुटली माझी 

 काळजात दुखेल हो तुला 

 *

 सुगंधी जखमांना 

 घेऊन वावरशील कशी 

 तुटलेल्या पाकळीला सांग ना 

 मग सावरशील कशी 

 *

 श्रीहरीच्या चरण कमलावर 

 विनम्र भावे नतमस्तक होताना 

 त्याच्या इतकच व्हावं कोमल 

 प्राजक्ताला ओंजळीत घेताना 

 *

 क्षणात विरक्त होतो तो 

 सर्वस्वाचे दान देऊन 

 निर्माल्य होताना हा प्राजक्त 

 जातो गोड आठवणी ठेवून

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देश आमुचा… ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सौ. ज्योती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देश आमुचा… ? ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

(वृत्त : पादाकुलक) 

जय जवान हो जय किसान हो 

शास्त्रीजींचा होता नारा

हिंद देश हा आहे न्यारा

असे तिरंगा अम्हास प्यारा

*

पोशिंदा हा धान्य पिकवितो

हलधर येथे कष्ट करीतो

रक्षण अपुले करण्यासाठी 

जवान हाती शस्त्र धरीतो

*

चला शिकू या आपण काही

घेऊ थोडी जबाबदारी

मदत करू या पकडायाला 

दिसले जर का भ्रष्टाचारी

*

घेत काळजी प्रदूषणाची 

निसर्गापुढे सदाच वाकू

शत्रू सगळे मिळुनी शोधू

परकी शक्ती उखडू फेकू

*

विकास व्हावा सर्वांगाने

देशात हवी अम्हास शांती 

मतभेदाच्या तोडत भिंती

घडवू आपण नवीन क्रांती

कवयित्री : सुश्री ज्योती कुळकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दु:ख बोलवेना… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दु:ख बोलवेना … ? श्री आशिष  बिवलकर ☆

खंदा सहकारी | गेलाय सोडून |

आक्रित घडून | गेलं आज ||१||

*

रिकाम्या खुर्चीस | होतेय वेदना |

दुःख बोलवेना | मुकी स्तब्ध ||२||

*

नि:शब्द चेहरे  | अश्रू ओघळती |

मिश्किल सोबती | दुरावला ||३||

*

क्रूर नियतीने | केला असा घात |

मालवली वात | नेतृत्वाची ||४||

*

चटका मनास | बसलाय आज |

व्यथित समाज | घटनेने ||५||

*

महाराष्ट्र बुडे | शोक सागरात |

हुंदका कंठात | वियोगाचा ||६||

*

दादा माणसाचा | ऐसा कैसा अंत |

हळहळ खंत | ह्रदयात ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाते हे अतूट…!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नाते हे अतूट…!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

विठू माऊलीची

अशी गळाभेट

मिळते का सांगा

करिता पायपीट!

*

जयाच्या मनी

सदा भक्तिभाव

त्यालाच भेटतो

असा तिथे देव!

*

आपसूक होते

अशी गळाभेट

भक्ताशी देवाचे

नाते हे अतूट!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई गं आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई गं आई… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं आई 

एवढी का तुला घाई 

पावसात हात धरून चाललीस तरातरा 

मनी भूभू भिजतय बघ ना तू जरा ||

*

ज्ञानेश्वरांचे पसायदान तूच तर शिकवले 

भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितले 

मग मला या दोघांशी मैत्री करू दे 

माझ्या छत्रीत दोघांना घेऊ दे ||

*

आता नको म्हणू मस्तीखोर

अगं मीच तुझा ना चित्तचोर

बघ तू माझे मित्र आपल्या बरोबर राहतील

पसायदान ते पण शिकतील ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाले ऊन पावसाचा 

इथे क्षणोक्षणी खेळ,

छत्री घ्यावी कां न घ्यावी 

लागेना मनाचा मेळ!

*

दिसे मकाऊची सुंदरता 

उंच टॉवरवरून छानशी,

तीन बेटांचे वसले शहर

लगट करुन चीनशी!

*

डोळे दिपविणारी सारी

दिसे मकाऊ नगरी,

खिसे रिते करण्या इथे 

जमती जगातून जुगारी!

*

एका पेक्षा एक कॅसिनो 

मनं आकर्षित करतो,

“डायमंड शो” गॅलॅक्सिचा 

डोळ्याचे पारणे फेडतो!

*

करून रामराम मकाऊला 

परत माघारी वळणार,

रहाट गाडगे रोजचे

दोस्तीत सुरु होणार!

दोस्तीत सुरु होणार!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मळभ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मळभ… ? श्री आशिष  बिवलकर ☆

अर्ध्यावर साथ सोडून गेलीस,

या खुर्चीला तुझी आस आहे |

पदोपदी, श्वासाश्वासात मज,

भोवताली तुझाच भास आहे |

*

सावली होऊन वावरलीस,

अर्पण करून तुझं सारं काही |

आयुष्यभर भरपूर देत राहिलीस,

उरल्या वाटेवर तुझी सोबत नाही |

*

नियती तिचा घाला घालून गेली,

आयुष्यभराचा घायाळ करुनी |

भळभळत्या जखमेवरती फुंकर,

तुझ्या सोबतचे रम्य क्षण स्मरुनी |

*

घराला उरल्यात फक्त भिंती,

ते घरपण आता जाणवत नाही |

किती वेळ एकांतात बाहेरच असतो,

आतुरतेचा उंबरठा खुणावत नाही |

*

स्वागतास नाही रंगीत रांगोळी,

नाही उंबऱ्याच्या बाजूस दिवा |

तिन्ही सांजांना सांग ना गं सखे,

उरलाय फक्त तुझ्या आठवांचा ठेवा |

*

पुढे पडणारं एक एक पाऊल,

न कळत जड वाटू लागलंय |

स्तब्ध एकाच जागी राहून,

ह्रदयात मळभ दाटू लागलंय |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कशास काढावे गळे!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कशास काढावे गळे!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

नाल्यावरती घरे दुकाने

सांडपाण्या अडथळे

नदी शिरली गावात की मग

कशास काढावे गळे!!

*

डोंगर फोडा झाडे कापा

करा रस्त्यांचे जाळे

पडतो पाऊस केंव्हाही मग

कशास काढावे गळे!!

*

थकल्यावरती मनोरंजन

मनरंजनीच रमती खुळे

मोबाईलने पिढी बिघडली

कशास काढावे गळे!!

*

मोह पाडते आभासी जग

वास्तवाचे भान खळे

परस्परांचे कुशल न घेती

कशास काढावे गळे!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कनकभरली फुले… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कनकभरली फुले… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या 16 यती 8 व्या अक्षरावर)

उंच उंच डोंगरात झाडेवेली घनदाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||ध्रु||

*

रिमझिम रिमझिम पावसाच्या येती सरी

घाटाघाटातली झाडी वेली त्यात रंग भरी

कनकभरली फुले सोनमोहोराचा थाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||1||

*

हिरव्यात डोकावती पहा देखणी पिवळी 

पर्ण पाचूवर आली कळी कोवळी कोवळी

मधू प्राशनास धावे फुलपाखरु सुसाट

किती सारी साजरी धुकं भरली पहाट ||2||

*

वाटा वळणे वळणे झरे पाण्याचे खेळणे

ताम्रफुले पहुडली त्यांचे मातीशी लोळणे

पायघड्या देखण्याश्या वारा घालतो मोकाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||3||

*

माकडांचे लोट आले इकडे तिकडे पळे

ताम्रशेंगा पितवृष्टी खळखळून ओघळे

माझ्या कवन शेल्याला पितंबरी ताम्र काठ

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||4||

*

कुठे बेफाटला वारा कुठे पाऊस सरारा

ताम्रवृक्ष उंच उंच फुले घागरा गरारा

ओंजळीत सोनफुले शब्दांची वाहती लाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळ… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बकुळ… ?

बकुळीच्या झाडाखाली 

 वेचत असता फुले 

मनाच्या ओंजळीतून 

 खूप काही सांडले 

*

वेचता वेचता फुले 

 लहानपण आठवले

उशीर झाला म्हणून 

 पाठीतले धपाटे आठवले

*

एक फूल माझ्याशी 

 व्यथा मांडून गेले 

तेव्हापासून मनात

 त्याचे दुःख कोरले गेले

*

हल्ली मला उचलून घ्यायचे 

 कष्ट कुणी घेत नाहीत

तसंही मला माळण्यासाठी

 लांब केसही उरले नाहीत

*

दोन वेण्यातली परकरी नात 

 बघता बघता गायब झाली

सर ओवत बसलेली 

 आजीही नजरेआड गेली

*

बरं झालं तू आलीस 

 ओंजळ तुझी भरली 

कुणीतरी आमची 

 दखल आज घेतली

*

माहिती आहे मला 

 माझे जीवन एका दिसाचे 

पण व्रत मात्र आमचे 

 अव्याहत सुगंध लुटायचे

*

रोज झाडावरून ओघळून 

 जमिनीकडे झेपावतो

तेव्हाच आमच्या मनात 

 विचार एक येतो

*

असो जीवन एक दिवसाचे,

 आपण सुगंध लुटावा

प्रत्येकाच्या आयुष्याचा 

 माझ्यापरी बकुळ व्हावा 

*

सुकून गेलो तरीही 

 गंध मागे ठेऊन जातो

प्रत्येकाच्या हृदयात 

 अविरत मी दरवळतो

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares