सौ. गौरी गाडेकर
चित्रकाव्य
चित्र एक… काव्ये दोन : डाव – डॉ. सोनिया कस्तुरे (२) उल्लंघल्या सीमारेखा – डॉ. स्वाती नाईक ☆ प्रस्तुती – सौ गौरी गाडेकर ☆
( १ )
डॉ. सोनिया कस्तुरे
☆ डाव ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆
☆
डाव जाणिवांचा एकदा
निर्भीडपणे खेळून तर बघ
रणरणत्या उन्हात सुद्धा
एकदा फुलून तर बघ
*
अडथळे तुझ्या वाट्याची
कमी नाहीत कधीच
लोकभान विसरून
आत्मभान जगून तर बघ
*
अन्याय अत्याचारी हात
जोडले जातील तुझ्यापुढे
तुझ्या अंतरिक शांततेला
क्रांतीच रूप देऊन तर बघ
*
तुला हीन-दीन अबला मानणारे
कोसळतील एक दिवस
मनातल्या रणांगणात
एकदा झुंजून तर बघ..
☆
© डॉ. सोनिया कस्तुरे
9326818354
☆☆☆☆☆
( २ )
☆ उल्लंघल्या सीमारेखा ☆ डॉ. स्वाती नाईक ☆
☆
पोळपाटाची बॅट झाली
लाटण्याचं हॅन्डल
कणकेच्या गोळ्याचा बॉल
चुलीतल्या ठिणग्या
डोळ्यातुन तडतडल्या
आज आमच्या मुली
वर्ल्ड चॅम्पियन झाल्या.
*
रांधा, वाढा. उष्टी काढा
समीकरणच बदललं
जेंव्हा आमच्या पोरींनी
साऊथ आफ्रिकेला धुनकलं.
*
पोरींनी आज मैदानात
इतिहासच रचला
पुरुषी अभिमानाचा
पार चकणाचूर केला.
*
मुली मुलांच्या बरोबरीच्या
फक्त हे नाही सिद्ध केलं
जगात त्यांचं स्थानच वेगळंय
हे दाखवून दिलं.
*
स्त्री शक्ती काय असते
सगळ्यांना दिसलं
ती महिषासुरमर्दिनी आहे
अख्ख्या जगालाच पटलं.
*
चुलीतली लाकडं
चुलीतच विझली
विश्वकपाच्या झगमगीत
सगळी दुनिया दीपली.
*
सगळे गड सर झाले
सगळ्या सीमारेखा उल्लंघल्या
आता आमच्या पोरी
खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्या.
☆
© डॉ. स्वाती नाईक
अहमदाबाद
प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
























