मराठी साहित्य – विविधा ☆ घट…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ घट….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

नवरात्रातील महत्वाची गोष्ट घटस्थापना ! घटस्थापना म्हणजे आपण मांडलेली पंचमहाभूतांची पूजा !मातीचा घट आणि घटाभोवती नवधान्य पेरण्यासाठी वापरलेली माती हे पृथ्वीच्या सृजनाचे प्रतिक,घटातील पाणी म्हणजेच आप,सतत तेवणारा दिवा तेजाचे प्रतिक,त्यातून निर्माण होतो चैतन्याचा वायु जो सारा आसमंत( अवकाश) उजळून टाकतो.घटस्थापनेच्यावेळी केलेल्या या पंचमहाभूतांच्या पूजेने देवीचे दिवसेदिवस देवीचे तेज वाढते तेअष्टमीला पूर्णत्वाला जाते.त्या पूर्णत्वात घागर( घट)फुंकून आपण देवीला अंतर्मन अर्पण करण्याचा प्रयत्न करतो.घटाच्या अंतरात, पोकळीत जाण्याचा प्रयत्न करतो.तो करतानाजे समाधान मिळते हे समाधान म्हणजेच नवरात्रीचा घटाशी असणारा अन्यसाधारण संबंध!अलिकडे घटस्थापनेसाठी ऐश्वर्याप्रमाणे वेगवेगळ्या धातूचे घट वापरले जातात पण मातीच्या घटाचे ऐश्वर्य कशालाच नाही हे तितकेच खरे!

घट हा शब्द फार पुरातन असून तो आजही आपले अस्तीत्व टिकवून आहे.

आदिमानवाने शेती सुरु केली आणि त्याला मदत करणारे बलुतेदार तयार झाले कुंभार हा त्यापैकीच एक! मातीचे घट बनविणारा कुंभार ! फिरत्या चाकावर कुंभार कौशल्याने वेगवेगळ्या आकाराचे घट बनवितो.अगदी लहानशा बोळक्यापासून मोठ्या रांजणापर्यंत असे हे घट असतात.आकारमान आणि उपयोगाप्रमाणे यांची नावेबदललेली दिसतात.लहान मुलींच्या चूल बोळक्यापासून रांजणापर्यंतचा घटाचा हा प्रवास फार पूर्वीपासून चालू आहे.सुरवातीच्या काळात हेच घट सर्व कामासाठी वापरले जात.

घट म्हणजेच घडा!

मानवाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युनंतरही ज्याची गरज लागते तो घट मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. चूल बोळक्याचा खेळ खेळणारी लग्नमंडपात उभी रहते ती बोळक्यासहीतच फक्त तेथे असतो घट! नवरीने पुजावयाचा गौरीहर !लग्नानंतर संक्रांतीला सुवासिनी सुगड पूजतात ते घटाचेच वेगळे रूप.त्या पूजेतलेच एक रथसप्तमीला सूर्यपूजेसाठी वापरले जाते.असा घट,घडा माणसाने पुण्याचा साठा भरण्याकरिता म्हणजे परोपकाराकरिता वापरला तर योग्य नाहीतर पाप मार्गाने वागणाऱ्या वाल्ह्या कोळ्याप्रमाणे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच!

पूर्वी ‘घट डोईवर, घट कमरेवर,’ म्हणत बायका नदीवरून पाणी आणत आता नळाचेपाणी घटात,माठात भरले जाते.अगदी घरात फ्रिज असला तरी माठातले पाणी पिणारे आजही आहेत.

पंचमहाभूतानी बनलेला आपला देहही एक घटच आहे.’ घटाघटाचे रूप आगळे,प्रत्येकाचे दैव निराळे’ असे कै.माडगूळकरांनी त्या अर्थाने म्हटले आहे.

आता लोकांना मातीच्या घटाचे पर्यावर्णीय महत्ल समजल्याने पुन्हा मातीचे घट स्वयंपाकघरात घरात अग्रस्थान मिळवू लागलेले दिसतात.कितीही निर्लेप आले तरी मातीच्या घटाचे स्थान शेवटपर्यंत अढळच रहाणार !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नवरात्रोत्सवात ऑफिसला सुट्टी म्हणून मानसी,चित्रा,रेवती, स्वाती या मैत्रिणीं महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या. यानिमित्ताने देवळातील पूजा-आरास पाहायला मिळे. निवांतपणे लोकांमध्ये मिसळून उत्सवाच्या वातावरणाची अनुभूती घेता येई.

देवळात खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठी रांग होती.प्रत्येकीच्या हातात पूजेची थाळी होती. रेवती,स्वातीने तेलाच्या पॅक पिशव्या आणलेल्या पाहून चित्रा म्हणाली,”स्वाती तेल पण आणलेस तू ?”

स्वाती– “होय बाई.अग नोकरीसाठी आपण घराबाहेर असतो.सतत तेलवात लावून ठेवणे शक्य होत नाही. मग म्हणलं, देवाच्या दारी तरी आपला दिवा जळू दे.”

“होय ग. आपण बाहेर असताना अखंड दिवा लावणे शक्य नसते आणि ते धोक्याचेही असते. म्हणून मग देवळातील दिव्यासाठी तेल आणले.”रेवतीने तिची ती ओढली.

“ते ठीक आहे,”मानसी म्हणाली,”खूपजण असाच विचार करतात आणि इथे नको इतके तेल जमा होते.तेलाची सांड-लवंड होते, काही तेल वाया जाते,घसरडे होते याचा कुणी गांभीर्याने विचारच करत नाही.”

“हो ना,मग काहीतरी दुर्घटना घडलीकी सगळे एकदम जागे होतात,” चित्रा म्हणाली.

“म्हणूनच आम्ही पॅक पिशवी आणली,”स्वाती.

“ते अगदी छान केलत तुम्ही. पण या गोष्टीचा काही वेगळा विचार नाही का करता येणार ? ज्यांना स्वयंपाकात तेलाचे दर्शन दुर्लभच असते त्यांच्या देवापुढे कधी तेलवात लागणार आहे का ?मग अशांना हे तेल आपण नाही का देऊ शकणार ,” मानसी.

“मानसी, अगदी खरं आहे तुझं. मी पण आता अशा गरजूंना देईन,” चित्रा.

“गेली चार-पाच वर्षे अशा लोकांना मी तेलाची पिशवी देते,” मानसी.

“छान छान” सगळ्या एकदम म्हणाल्या.

“आजकाल खूप गोष्टींचा नव्याने विचार करायला पाहिजे हे यावरून लक्षात आलं बरं का आमच्या,” रेवती.

दर्शनाची रांग पुढे सरकत होती.आत जाताना थोडी रेटारेटी झाली आणि हातातल्या ओटीच्या थाळ्या वेड्यावाकड्या झाल्या. कसल्यातरी आघाताने स्वातीच्या हातातील तेलाची पिशवी फुटून ते सांडू लागले.गडबडीत खूप तेल वाया गेले. स्वातीची साडी तर पुरती खराब झाली.पण इतरांच्या साड्यांना ही तेलाचा प्रसाद मिळाला.गडबड बघून पुढे आलेल्या देवस्थानातील कुणीतरी ते तेल पुसून घेतले.या मैत्रिणी कसेबसे दर्शन घेऊन बाहेर आल्या.आता अशा अवतारात बाहेर कुठे जाणे शक्यच नव्हते. सगळ्या घरी परतल्या.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तेल पिशवी वरून साग्रसंगीत चर्चा झाली.सणवार,परंपरा,दानमहात्म्य यावर गरमागरम चर्चा झाली.जुने रितीरिवाज जपायचे पण काळानुरूप त्यात बदल करणे खूप गरजेचे आहे.दान सत्पात्री असावे.गरजूंना मदत करावी.न सोसणारे उपवास न करता उपाशी लोकांना जेवू घालावे.यावर मात्र एकमत झाले.

परंपरेच्या मुशीत घडतो संस्कृतीचा दागिना

नवा उजाळा देण्या सोडा कालबाह्य कल्पना !!

हे अधोरेखित झाले.

या चर्चेच्या वेळी मानसी गप्पच होती.कुणीतरी तिला याबद्दल विचारले.ती म्हणाली,”मी माझे मत कालच सांगितले.पण यंदा मात्र माझा चांगलाच पोपट झालाय,”

“काय झालं मानसी ,”सार्वजनिक कुतूहल.

“यंदा मी माझ्या कामवालीला तेलाची पिशवी दिली.ती खूपच खुश झाली.म्हणाली,’ वहिनी तुम्ही माझं मोठं काम केलंसा. माझी खूप दिवसाची इच्छा होती का देवीला तेल द्यावं.आता हीच पिशवी मी उद्या देवीला देईन.’

“आता बोला”.

“काय ?” सर्वांनी एकच गजर केला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरे तर पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एकेकाळी विख्यात होते. रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला, गल्ल्यांमधून,वाडयांच्या बोळांमधून, इमारतीच्या पार्किंगमध्ये सायकलीच सायकली लावलेल्या असायच्या. शाळाकॉलेजांमधून, कार्यालयांमधून खास सायकलींचे स्टॅंड तैनात असायचे किंवा एकमेकांवर खेटून-रेलून लावलेल्या असायच्या. सायकलींचेच राज्य होते म्हणा ना! पण काळ काय बदलला आणि जीवनाच्या वाढत्या वेगाशी स्पर्धा न करता आल्याने ह्या दुचाकी वाहनप्रकाराची लोकप्रिय कमीकमी होत गेली.

सायकली गेल्या आणि मोटारसायकलींचा जमाना आला. कालांतराने “आजकाल की नाही सिटीत कुठेही जायचे म्हणजे कार ही इतकी नेसेसिटी झाली आहे ना!” अशी वाक्ये बोलून पुणेकर एकमेकांना कार घ्यायला भरीस पाडू लागले. मग त्यातून कार आणि मोटारसायकलींनी रस्ते तुडुंब भरून वहायला लागले आणि एका सीमेनंतर पावसाळ्याचे पाणी तुंबावे तसे तुंबून पडायला लागले. सिग्नलला उभे राहिले की वायुप्रदुषणाची भयानक जाणीव सर्वांना व्हायला लागली. मधल्यामधे सायकली मात्र पुण्याच्या रस्त्यांवरून पार पुसल्या गेल्या!

वरवर पाहिले तर सायकली गायब होण्यामागे पुणेकरच पूर्णपणे दोषी आहेत असे वाटेल. पण तसे नाहीये. शासनकर्त्यांकडून ’प्लास्टीक रीसायकलिंग’, ’कोरडा कचरा रीसायकलिंग’, ’ओला कचरा रीसायकलिंग’, ’पाणी रीसायकलिंग’ असा नानाविध गोष्टी रीसायकलिंग करण्याचा इतका भडिमार सर्वदिशांनी पुणेकरांच्या कानीकपाळी केला गेलाय की ह्या गदारोळात पुणेकर बिच्चारा ’सायकलिंग’ हा शब्दच विसरून गेला.

पण खर्‍या पुणेकराने घाबरून जायचे कारण नाही…परिस्थिती हळूहळू बदलत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमती बेफाट वाढल्या आहेत. “हिंजवडीला कारने जायचे म्हणजे च्यायला ब्रेक-क्लच, ब्रेक-क्लच दाबून गुढगे पार दुखायला लागतात बुवा! शिवाय ट्रॅफिक जाममध्ये अडकून रोजचे तीन तास प्रवासात जातात ते वेगळेच…!” अशी हताश वाक्ये कानी पडायला लागली असून आयटी कर्मचार्‍यांचा कार पूलिंग करण्याचा किंवा कंपन्यांच्या बसनेच कामाला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यास भरीला म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यातून आरोग्य समस्या उग्र रूप धारण करायला लागल्या आहेत. वजनवाढ, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी अशा आजारांनी लहान वयातच तरुण पिढीला ग्रासले आहे.

ह्यावर उत्तम उपाय म्हणजे, सायकल!  ह्या उपायाचे फायदे खालीलप्रमाणे –

  • सुलभ वापर – लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वजण सायकल चालवू शकतात. बरं पंक्चर झालीच तर हातात धरून ढकलत नेणे काही अवघड नाही. वजनाला एकदम हलकीफुलकी आणि पार्किंगसाठी सडपातळ. खूप लांब जायचे असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर बाइक-कार जरूर वापरा. पण शाळेला, बाजाराला, व्यायामशाळेत, ऑफ़िसला जायचे असेल तर वेगाची काय गरज? सरळ सायकल काढा आणि सुटा.
  • पैशांची बचत – सायकलीची किंमत माफ़क शिवाय दुरुस्तीचा खर्चही परवडण्यासारखा. सायकल चालविताना ना कुठल्या इंधनाचा खर्च, ना वंगणाचा खर्च. आपला देश ह्या दोन्ही गोष्टी आयात करीत असल्याने सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवू शकेल. शिवाय सायकली चालवता ना हेल्मेटची गरज, ना लायसन्स, ना इंशुरन्स, ना पीयुसी आवश्यक. कुठलाही सीट-बेल्ट बांधू नका वा हेल्मेटचा पट्टा ओढू नका. नुसती टांग टाका आणि चालू पडा.
  • शिक्षेची भीती नाही – सुधारीत मोटार वाहन कायद्यामध्ये वरील नियम न पाळल्यास कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तसेच सीसी टीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर सर्व दुचाकी-तिचाकी-चारचाकींवर असणार आहे. स्वयंचलित वाहनांना वेगाची मर्यादा पाळण्याची सक्ती असून ती तोडल्यास जबरी शिक्षेची तरतूद केली आहे. विशेषत: दारु पिऊन चालवणार्‍यांची तर काही खैरच नाही.

सायकलीला मात्र अलगदपणे सर्व नियमांच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. सायकलवाल्याने अगदी वाहतूक पोलिसाच्या अंगावरून सिग्नल तोडून जरी नेली तरी पोलिस त्या कृत्याकडे काणाडोळाच करेल. सायकलवाल्याला पकडणे त्याच्यादृष्टीने पूर्णपणे ’अर्थ’हीन असणार आहे. जास्तीतजास्त शिक्षा म्हणजे ’हवा सोडून देणे’ बस्स! J

  • उत्तम आरोग्यसायकल चालवणे हा फ़ुफ़्फ़ुसांची आणि ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. शिवाय घाम निघाल्याने शरीरातील जादा मेद वापरला जाऊन लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कमी होतो. शरीरातील मांसपेशींचीही वाढ होते, हातापायांचे स्नायु बळकट होतात आणि संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा वाढतो.
  • सुधारीत तंत्रद्न्यान – नवीन सायकलींना गिअर आणि शॉकअब्सॉर्बर आल्याने सायकलवरून भन्नाट वेगाने जाण्याचीही सोय झाली आहे. शर्यतींसाठी अत्यंत कमी वजनाच्या पण तितक्याच बळकट सायकली जगभर तयार आणि सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय सायकलींसाठी सोयीचे खास आकर्षक रंगांचे गणवेश तसेच हेल्मेट बाजारात आली आहेत. सायकलींना बॅग्ज, मोबाईल फोन तसेच पाण्याची बाटली अडकविण्य़ाचीही सोय पर्यटनाला जाणार्‍यांसाठी उपयुक्त ठरते.
  • सायकल म्हणजे कमीपणा नव्हे – युरोपियन देशांमध्ये विशेषत: नेदरलॅंडस वगैरे मध्ये सर्वचजण सायकलीवरून फिरतात आणि सायकलस्वारांना तिथे महत्व आणि प्रोत्साहनही दिले जाते. त्या देशांत जाऊन आलेल्या सर्वांनाच मग पुण्याच्या रस्त्यांवर सायकल चालविण्यात कमीपणा वाटायचे कारण उरत नाही.

अशा प्रकारे स्वयंचलित वाहनांचा वापर कमी होवो आणि सायकलींचा उदंड वाढो, हीच ह्या पुणेकराची इच्छा!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

पंचमहाभूतांनी भरलेल्या या निसर्गाचे काहीच सांगता येत नाही! पृथ्वी,आप, तेज,वायू, आकाश सारी तुझीच रूपे! कोणी त्याला निसर्ग म्हणोत तर कोणी परमेश्वर !पण या मानवप्राण्यासाठी  हे सारे महत्त्वाचे! त्यांचे अस्तित्व  रोजच्या जीवन व्यवहारात आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग कधी एकदम वादळे येतात, आकाश कोसळते , सूर्याचा प्रकोप होतो तर कधी ही जमीन हादरते!असं झालं की आपल्याला निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते आणि सत्य दिसायला लागते!

निसर्गाचा अभ्यास म्हणून हवामान खात्याची यंत्रणा निर्माण झाली. आता ती बरीच शास्त्रशुद्ध झाली आहे. काही वर्षापूर्वी हवामान खात्याचा अंदाज ही विनोद करण्याची गोष्ट वाटे. ‘हवामान खात्याने अंदाज दिला आहे ना पाऊस पडेल म्हणून,मग हमखास येणार नाही’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात पण आता मात्र हे शास्त्र खूपच प्रगत झालंय.त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा धुमाकूळ राहणारच आणि त्यासाठी जमेल तेवढी काळजी घेत आपण राहायचे!

वादळाचे भोवरे समुद्रात अखंड फिरत असतात, त्यांना आपण आवर घालू शकत नाही हे खरे! कधी कधी आपली नजर चुकून मुंबईला न जाता वारे कोकणाकडे वळतात किंवा आपल्या प्रभावाने एखादी किनारपट्टी नाश करतात .

एकमेकांवर अवलंबून असणारी ही पंचमहाभूते आर्यांच्या काळात देव म्हणून मानली गेली. निसर्ग पूजा महत्त्वाची  होती. निसर्गात असणाऱ्या प्रत्येक बदलाचा विचार करून माणसाने त्याचे महत्त्व मानले असेल!

यंदाचे २०२०  हे वर्ष काळाच्या कसोटीवर संकटाचे वर्ष म्हणून आले आहे. करोना महामारी च्या छायेत सारे जग सापडले आहे. पुन्हा एकदा निसर्ग आणि मानव या लढाईत आपले अस्तित्व टिकवायचे आहे. काही वर्षापूर्वी नाॅस्टरडॅम नावाच्या एका शास्त्रज्ञाने असे भाकीत केले होते की पृथ्वीवरील या जीवसृष्टीचे अस्तित्व २०२५ मध्ये संपेल!

तरी यापूर्वी 2005 मध्ये मुंबई बुडणार असेही भाकीत होते. तेव्हा मुंबई खरंच जलमय झाली. अगदी संपली नाही तरी मुंबईला निसर्गाचा खूप मोठा धक्का सहन करावा लागला.एका अरिष्टाची

चाहूल तेव्हापासून चालू झाली असेच वाटते. 2005 मध्ये पाण्याचा प्रवेश सांगली ,कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या शहरांमधून सुरू झाला. दरवर्षी खूप पाऊस आणि भरलेल्या धरणातून होणारा विसर्ग यामुळे या भागाला सतत पुराचा धोका निर्माण झाला. गेल्यावर्षी महाराष्ट्र ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात नद्यांचे पाणी वाढले आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची रेकॉर्डस् मोडली गेली.

शेतीची, वित्ताची हानी तर झालीच पण मनुष्य आणि जनावरे यांची ही हानी झाली.

यंदा जुलै,  ऑगस्ट मध्ये वादळाचा तडाखा श्रीवर्धन, अलिबाग या भागाला अधिक बसला आणि नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या .त्याच दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. सुदैवाने मृत्यू संख्या त्यामानाने कमी होती.

गेले दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा वाईटाची चाहूल देत आहे. आधीच कोरोनाने ग्रासलेल्या लोकांना वादळाचा क्षोभ सहन करावा लागत आहे. नकळत माणसाला आपण निसर्गासमोर किती लहान आहोत हे जाणवते आहे !

आज दोन दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली असे दिसते. नवरात्रीची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली असं समजायला हरकत नाही.  देवीच्या कृपेने यापुढे सर्व चांगले होईल अशी आशा वाटते आणि

चांगल्या दिवसाची चाहूल आजच्या घटस्थापनेपासून लागलेली आहे असे मनाला वाटते ! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णसखा ☆ सुश्री मनिषा कुलकर्णी

☆ विविधा ☆ कृष्णसखा ☆ सुश्री मनिषा कुलकर्णी ☆ 

भगवंता, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझी पूजा करतो, भक्ती करतो. आमच्या मनासारखे झाले की आम्ही खूष. आयुष्यात सगळे मनासारखं व्हावं वाटते पण थोडे मनाविरुद्ध झाले की तुला दूषण देतो. खूप खूप राग येतो रे तुझा  अगदी तुझे नाव सुद्धा घायचे नाही असे ठरवितो पण आज शांत पणे विचार केला का रागावतो आपण त्याच्यावर, माणूस म्हणून जन्माला तर तुला कुठे सुख मिळाले, काय सहन केले नाहीस तू.

अगदी जन्म झाल्यावर मातृसुखाला पारखा झालास, आईचे दूध पण मिळाले नाही. काय झाले असेल त्या माऊलीचे व बाळाचे. नंद यशोदेने लाडाने वाढविले, कोडकौतुक केले पण एक दिवस ते सर्व सोडून निघून गेलास. बालपणीचे मित्रांना सोडलेस. पेंद्या, सुदामाला सोडताना तुलाही वेदना झाल्या असतील ना रे?

पण कुठे गाजावाजा नाही, सहज गेलास. तुलाही भावना अनावर झाल्या असतील ना रे?

राधेवर प्रेम केलेस, खरी सखी ती. तिला पण सोडलेस. बासरी  ही परत नाही वाजविलीस. गोपिकांबरोबर तिलाही सोडलेस. रुक्मिणीशी विवाह केलास. तुला राधेची आठवण येत असेल ना रे? सारे सारे मुकाट्यानं सहन केलेस.

अर्जुनाचा सारथी झालास. आम्हा माणसांना किती कमीपणा वाटला असताना असे काम करताना, आमचा अहं दुखावला असता पण तू सहज स्वीकारलेस. कसे केलेस रे हे तू पण माणूस होतास ना?

मग आम्हाला थोडे जरी दुःख झाले की आम्ही तुला दोष देतो जणू तुला दुःखच नाही झाले सारे आम्हीच भोगतोय. तरी तू आमच्यावर कधी ही रागावत नाही

द्रौपदीच्या बंधुप्रेमाला जगलास, मीरेच्या भक्तीला धावलास, गोपिकांना विवाह करून न्याय दिलास, सुदाम्याच्या मैत्रीला गळाभेट दिलीस. श्रीमंतीचा बडेजाव नाही, गरिबीचा तिरस्कार नाही नाहीतर आम्ही माणसे चार पैश्याच्या घमेंडीत सारे काही विसरतो, सत्तेमुळे झापड येते, मदमस्त होतो थोडया यशाने. यात मात्र थोडे कमी जास्त की तुला दोष.

आम्हाला तुझा जीवनपट आठवत नाही, तुला झालेल्या वेदनांचा आम्हाला विसर पडतो.

“सुख दुःखी सम सदैव राही तोल मनाचा ढळू न देई स्थितप्रज्ञ श्याम”

राम काय श्याम काय, माणूस म्हणून जन्माला आले, सामान्य माणसासारखे भोग भोगले ते ही काही तक्रार न करता.

कृष्णा, आम्हाला माफ कर, आम्ही तुला ओळखलेच नाही रे. अन आम्ही भक्त म्हणवितो तुझे तिथे ही आम्ही स्वार्थी. भक्ती ही निस्वार्थी करत नाही.

 

© सुश्री मनिषा कुलकर्णी

पुणे

भ्रमणध्वनी:-8999058771

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रीमंती….मनाची ☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ विविधा ☆ श्रीमंती….मनाची ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

काल मी व माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो . समोरच  बस उभी  होती. म्हंटल चला आज बसने जाऊ .बस मधे चढ़णे उतरणे  म्हणजे या वयात तसं सोपं नसतं. पण मधुन मधुन मला हे अस करायला आवडत .आपला confidence पण वाढतो.  व पैसेही वाचतात ना. आपली पीढी पैसे वाचवायचा  एकही   Chance  सोडत नाही. वीस मिनिटे चालून ,वीस रुपये वाचविणे, छान जमते आपल्याला .व काही तरी विशेष केल्याचे समाधान ही मिळते . नवीन पीढीला  हे  पटण्यासारखे  नाही. व आवडत तर त्याहूनही  नाही.  असो,  यालाच  जनरेशन गॅप म्हणतात .••••

मी व छाया बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .आमच्याच  बरोबर चढलेली  एक बाई  सहज तेथे बसू शकत होती .पण तिने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा तिने आपली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा  घडला. ही बाई अगदी सामान्य ,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावी ,असा अंदाज  एकंदर  तिला बघून  येत होता.•••

बस मधे चढताना ही बाई माझ्या बरोबर मागे होती . तिला बघून  मी आपली पर्स सांभाळतच  बस मधे चढले होते .आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्या बाईंशी  बोलले. त्यांना विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट  दुसऱ्या ला का देत होता ??  तेंव्हा तिने दिलेले उत्तर हे असे •••••

ती म्हणाली, काकू मी शिकलेली पढलेली नाही हो.  अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी काम करते .व माझ्या परिवाराला थोडा बहुत हातभार लावते. माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही, पैसा नाही. तेंव्हा मी हे अस रोजच करते. हेच मी सहज‌ करू शकते.  दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत. काकू तुमचे पाय दुखत असावेत. हे माझ्या लक्षात आले होते. म्हणून मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला  ना  त्यात मला खूप समाधान  मिळाले. मी कोणाच्या  तरी कामी  आले ना त्याचे .••••••••

असं मी रोज  करते ••••.माझा नियमच आहे तो .•••• आणि रोज मी आनंदाने घरी जाते.•••

तिचे उत्तर ऐकून मी थक्कच झाले. तिचे विचार. तिची समज  बघून या  बाईला  अशिक्षित  म्हणायचे का ?  काय समजायचे ??

कोणाकरिता काही तरी करायची तिची  इच्छा, ••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना .••• मी कशा रीतीने मदत  करू शकते??? त्यावर शोधलेला तिचा  उपाय बघून, मला  तिच्या पासून पर्स सांभाळायचा माझा प्रयत्न आठवला .व मला माझीच लाज वाटली .•••••

देव सुध्दा आपल्या या व निर्मीती वर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . असं दिमाखात सांगत असेल .••••••

आज या बाईने मला खूप गोष्टी शिकवल्या.  स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारी मी तिच्या समोर  खाली मान घालून  स्वतः चे   परिक्षण करू लागले.••••

किती सहज तिने तिच्या समाधानाची व्याख्या सांगितली.•• देव हिला नक्कीच पावला असणार..••मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .••••••••

सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षित   का ??? हीच माणसाची खरी ओळख का ?  मोठं घर, मोठी कार, म्हणजे मिळालेले समाधान का ??

कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व  तुमची धुंदी उतरवेलं  सांगता येत नाही .•••••

या बाईच्या  संगतीने माझे विचार स्वच्छ झाले.

म्हणतात ना •••••

“कर्म से  पहचान होती है इंसानों की । वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में “। •••••••

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुलपाखरु ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ फुलपाखरु ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

 

पंख चिमुकले। निळेजांभळे

हालवुनी झुलते । फुलपांखरुं

 

मी धरु जाता । येई न हाता

दूरच तें उडते । फुलपाखरुं

फुलपाखरु

आपल्याला सगळ्यांनाच आकर्षित करणारा निसर्गातील एक घटक. नाजूक, रंगदार तितकंच नक्षीदारही ! लयदार हालचालीनं, मोहक रंगानं लहानथोर सगळ्यांना खिळवून ठेवणारा हा एक किटक. एका क्षूद्र, कुरुप सुरवंटापासून तयार होतो. निसर्ग, पर्यावरण तसंच जीवसंतुलन राखण्याकरिता अविभाज्य घटक.

खरच, केव्हढा चमत्कार ! काळ्या, काटेरी सुरवंटापासून इतका सुंदर अविष्कार !!

पंख जितके नाजूक, सुंदर, रंगीबेरंगी तितकीच मोहक  हालचालही. त्याचं  आयुष्यही क्षणभंगुर आणि त्याचं आकाशही  इवलंसं. कोणत्याही रंगसंगतीत ते तितकंच आकर्षक. ऊण्यापुर्‍या चौदा दिवसांच्या त्याच्या छोटुल्या जीवनपटात उलथापालथ तरी किती? चौदा दिवस चार टप्प्यांमधे विभागलेलं. अंडी —->अळी(सुरवंट)—-> कोष—-> फुलपाखरु इवलुशा आयुष्यात कोषातील बंदीवासही ते भोगतं आणि  अळीचा  खादाडपणाही; हव्यासही.अती खादाडपणाची ती शिक्षा असावी का? नाही, नसावी. कदाचित नंतरच्या आयुष्यासाठी  ते शिदोरी गोळा करत असावं. नक्कीच ! कारण  निरागसपणान उडणारं फुलपाखरु, त्याचा ऊत्साह; त्याचं बागडणं; निसर्गाबरोबर एकरुप होणं; मकरंदपानाचा स्वार्थ साधताना देखील परागीभवनाचा आनंद फुलांना देणं हे सर्व बघीतलं की नक्कीच  वाटतं की कोषात काही काळ बंदिस्त होणं ही त्याची शिक्षा नसेल . तर ती त्याची ‘ब्युटी ट्रिटमेंट’ असेल. त्यामुळंच तर काटेरी, खाजर्‍या, काळ्या सुरवंटाचं रुपांतर सुंदर, मनमोहक, आकर्षक  फुलपाखरात होत असावं . स्वत:त आमूलाग्र  बदल घडवून आणायचा असेल तर कोषात काही  काळ बंदिस्त हो; अंतर्मुख हो असा  संदेश तर ते देत नसेल ?  म्हणूनच वरकरणी चंचल दिसणारं हे फुलपाखरु मला एखाद्या तपस्व्यासारखं वाटतं !!.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :deepapujari57@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवितेचा जन्म ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ कवितेचा जन्म ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

“काय म्हणता, मी कविता लिहिली

नाही मला ती भेटली

अचानक ह्रुदयाला भिडली

मनाची पाने उलगडली

कायमची तीने माझी पाठ धरली

मीही तिला नाही सोडली

एक नवी दिशा मिळाली

मलाच माझी ओळख झाली

मला ती भावली अन्

कविता माझी झाली

मग कविता मला प्रसवली”

खरच कविता आपण कधीच लिहिली असे होत नाही. ती कधीतरी काही गोष्टी दिसल्यावर आपोआपच ती माझ्या लेखणीतून अवतरते.कारण ती कधी कोणत्या विषयावर लिहिली जाईल ते सांगता येत नाही.  आपण आपले विचार, भावना, इच्छा, एखादा  विशिष्ट विषय जेव्हा व्यक्त करतो तेव्हा त्या चित्र ,न्रुत्याविष्कार, काव्य, लेख याप्रकारातून व्यक्त करतो. काही वेळा माणूस अंतर्मुख होतो तेव्हा तो स्वतःशीच बोलू लागतो. अशावेळी त्या दोन मनांच्या संवादातुन जे बाहेर पडत ते साहित्य होय.त्याचे प्रकार अनेक आहेत. त्याप्रमाणे मला  काव्य स्फुरते.

एखादा फोटो चित्र पाहिल्यावर काही वेळा काही शब्द, ओळी माझ्या  मनाच्या पटलावर लपंडाव सुरु होतो. पाण्यावर येणाऱ्या लाटांसारखे भासतं.आणि मी ती गोष्ट, प्रसंग,अनुभव माझ्या ह्रुदयाला जाऊन भिडतो तेव्हा मला कवितेच्या ओळी स्फुरतात. त्याला कोणतच बंधन रहात नाही. आणि ती लिहील्याशिवाय मला चैन पडत नाही.त्याला मर्यादा नसते. या कवितेचेही  अनेक प्रकार आहेत. उदा. चारोळी, मुक्तछंद, काही वेळा ही कविता विशिष्ट प्रकारच्या शब्दांच्या बांधणीत लिहीली जाते. त्याला व्रुत्त म्हणतात. काही वेळा ती गेय स्वरूपात लिहिली जाते. त्यात कडवीही असतात. काही काही महाकाव्य तयार होतात. महाकाव्याला मर्यादा नसते. आणि विषय कोणता असेल हेही आपण सांगूच शकत नाही.जसा वाळवंटात निवडूंग फुलतो. तसच अवचित काही वेळा शब्दाची ओंजळ भरून वाहु लागते.त्या शब्दांची कविता होते.आपण ह्या कवितेच्या माध्यमातून कुठेही फेरफटका मारून येऊ शकतो. हे मात्र खरं!

आता हेच पहा ना.

निवडूंग हा शब्द वाचला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते काटेरी वाळवंटातील झाड.पण या निवडुंगाची फुलं कधी पाहीली आहेत का?हो.मी लहान पणी शाळेत असताना फक्त पांढऱ्या रंगाची फुले पाहिली होती. पण माझ्या भावाने मला निवडुंगाच्या वेगवेगळ्या फुलांची pdfपाठवली होती. त्यात निवडूंगाचे कितीतरी प्रकार आणि त्याची नाजुक, रंगबिरंगी फुलं यांचे फोटो आहेत. काही निळी, काही लाल, पांढरी, गुलाबी, लहान, मोठी आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. पण ही तर आहे निसर्गाची किमया! आणि अशा गोष्टी, वस्तू, फोटो, चित्र यावरील विचार कवितेच्या रूपाने लिहणे हा मानवी मनाचा चमत्कार.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी

☆ विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी ☆

आठवणीतला गाव…!

खेड्यातील भावबंधन…!

स्वच्छ, मोकळी हवा, चैतन्य अंगावर माखणारा परिसर, दूरवर पसरलेली हरितक्रांत शेते, पक्षांचा मुक्त संचार आणि आत्मियतेच्या प्रांगणात स्थिरावलेला विशाल डोंगरपायथा आणि या डोंगर पायथ्याशी वसलेलं कौलारू, धाब्याची घरं असलेलं एक टुमदार खेडं…!

सूर्याच्या साक्षीने मंगलमय दिवसाची सुरूवात होते. भल्या पहाटे कडाक्याची बोचरी थंडी घालविण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीची आल्हाददायक उष्मा देहावर मायेची ऊब पांघरत असते. माय-भगिनी दारापुढे सडा-रांगोळी घालण्यात मश्गुल झालेल्या असतात. गुरा-ढोरांचा हंबरडा वासरांच्या काळजात वात्सल्याचं उधाण आणीत असतो. पहाटेच्या भक्तीरसात डोंगरमाथ्यावरच्या मंदिराच्या घंटा ताल धरू लागतात आणि प्रत्येकाच्या मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. चुलीवर भाजलेल्या भाकरीच्या घासाने तृप्त होणार्या न्याहरीने दिवसभरातल्या कष्टाला सुरूवात होते आणि खेड्यातलं अनोखं भावबंधन मनामनात घर करू लागते…!

जीवाला जीव देणार्या, एकमेकांशी मायेची नाती जोडणार्या, शेजार्याचं सुख आणि दुःख आपलं मानणार्या माणसांनी हे खेडं एक कुटुंब बनलेलं असतं. व्यक्तिच्या वयाला मान देत दादा, मामा, अण्णा, बापू आणि अगदीच अनोळखी व्यक्तींसाठी ‘राम राम पाव्हणं’ अशी प्रेमळ हाक इथे ऐकू येते, तेव्हा आपणही या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनून जातो. डेरेदार वडाच्या झाडाखाली रंगणार्या पारावरच्या गप्पा भावनिक आणि सामाजिक आदानप्रदानास सहाय्यभूत ठरत असतात. या गप्पांतून प्रत्येकाची सुख-दुःखं वाटून घेतली जातात, तेव्हा सुखाची सावली गडद झाल्याची आणि दुःखाचं आभाळ स्वच्छ, निरभ्र झाल्याची अनुभूती होते. चांदण्यांच्या प्रकाशात बाजल्यावर बसून माय-लेकी, सासू-सुना ‘म्या दिलेली चटणी कशी व्हती?’ ‘कोरड्यास कसं व्हतं?’ अशी आपुलकीनं विचारपूस करतात, तेव्हा त्यांच्या सुगरणतेबरोबरच एकसंघतेचे अतूट बंध अजरामर होत राहतात.

दिवसभरात राबून, कष्ट करून थकलेल्या देहाला विसावा मिळतो तो मंदिराच्या पायरीशी! टाळ, मृदंग, तंबोर्याच्या सुमधुर स्वरांच्या साथीत वातावरण भक्तीमय करणारे अभंग कानावर पडतात, तेव्हा कष्टानं थकलेलं मन नवा जन्म घेत असल्याचा भास होतो.

सण, उत्सव, यात्रा असे कोणतेही लोकोत्सव साजरे करताना पारंपारिक संस्कृतीबरोबरच भावनिक आणि सामाजिक एकात्मतेचं दर्शन इथे घडते.

काळ्या धरणीमातेचं ॠण काळजावर कोरणारी, माणसा-माणसांत जिव्हाळ्याचे बंध पेरणारी, गुरा-ढोरांना जिवापाड प्रेम देणारी, कष्टाला दैवत मानून हात सतत कामात गुंतवणारी आणि लोकसंस्कृतीचा वारसा अखंड चालविणारी ही खेडी मनामनाला जोडणारे सेतू बनून उभी आहेत…!

 

© श्री महेशकुमार कोष्टी

मिरज

शिक्षक व साहित्यिक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

खूप वेळा मनात येत की काही काही आठवणींचे ऋतू असतात. त्या त्या ऋतूत, दिवसात काही आठवणी ताज्या होतात. याचा अर्थ इतर वेळी काही आठवे नसतात अस नव्हे… पण आठवांचे ऋतू काही औरच!

आत आत मनात घर करून बसलेली आठवे कधी कधी खूप उत्साही अन आनंदी करतात…. कधी हेच दिवस पुन्हा यावेत ही मागणीही करतात!

निसर्गाचे जरी तीनच ऋतू असले तरी माझ्या आठवांचे हजारो ऋतू असतात. ‘शब्दांनी’ बहरणारा नी धुंद करणारा माझ्या आठवणीचा…फक्त माझाच….हक्काचा वसंत ऋतू! अस मी म्हणेन…. मला जास्त भावतो. मग तो बाराही महिने असू शकतो. पण…. अस कस होणार!

कुठेतरी चढ उतार असतोच न….

नको असलेले मळभ झटकून टाकणारा, स्वच्छ धूणारा अन परत निरभ्र होणारा.… मनाचा वर्षा ऋतू !

होय! सगळं हलकं हलकं करणारा तन आणि मन चिंब करणारा …. आठवांचे तरंग .. नवतरंग होऊन मिरवणारा! असे अनेक उपऋतु माझ्या आठवणी जाग्या करतात.

कधी मनोमन लाजवतात! रोमांच अंगी उठवतात!

कधी थरारक आठवेही अंग थरथरून टाकतात… हे असे ऋतू मात्र नको वाटतात, पण त्यातून धडे मिळालेले असतात आणि जीवनाला नवी वाटाही … त्यामुळे नको वाटणारे ऋतू खर तर नकळतच एक नवे आव्हान ठरलेला असतो.

एक अवर्णनीय आनंद आणि समाधान देणारा….डोळे बंद केले तरी सगळं हिरवं हिरवं दाखवणारा..मखमल भासवणारा !शांत करणारा…

गुलाबी थंडीतही शब्दांची ऊब माझे ऋतू देतात , शब्दांची चादर अन गोधडी! एक नवं सृजनाचं, सर्जनशील ….सृजन नेहमीच प्रसवत! आणि मन नवे गाणे गाऊ लागत!… हिरव्या ऋतूच…आठवांच्या ऋतूच!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

24/8/2020

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares