श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ७८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागावा तशी ती जखम भळभळून वहात राहिली.)
हा कसा एक नंबरचा हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे हे मला पटवून देताना त्या दिवशी नेमकं काय घडलं हे प्रभुदेसाईंनीही आधी मला सांगितलेलं होतंच. त्यानुसार त्या सकाळी प्रभूदेसाई नुकतेच केबिनमधे येऊन बसले होते. तेवढ्यांत त्या ब्रँचचे एक अतिशय महत्त्वाचे ठेवीदार सपत्निक केबिनमधे आले. त्यांना मोठ्या रकमेची ठेव बँकेत ठेवायची होती. त्यांचं हसतमुखाने स्वागत करून त्यांना वेगवेगळ्या डिपॉझिट स्किम्सची माहिती देत असतानाच हे सहस्त्रबुद्धे केबिनमधे घुसले. त्यांच्या कामाबद्दल तावातावाने बोलू लागले. प्रभूदेसाईंनी त्यांना शांतपणे ‘माझ्या हातातलं काम संपलं कीं तुम्हाला बोलावून घेतो मग आपण बोलू. तोवर तुम्ही थोडावेळ बाहेर बसा.. ‘ असं सांगताच ते खवळले. त्यांना कसं शांत करावं प्रभूदेसाईंना समजेचना. तेवढ्यांत ब्रॅंचचे अकाऊंटंट घाईघाईने आत आले. आजोबांना समजावत बाहेर घेऊन गेले आणि त्यांचं जे काही काम होतं ते पूर्ण करून दिलं असं प्रभुदेसाई म्हणाले होते. यानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सारा दोष आततायी आणि विक्षिप्त असणाऱ्या सहस्त्रबुद्धे आजोबांचाच असूनही उलट त्यांनीच सूडबुद्धीने प्रभूदेसाईंबद्दल तक्रार केलेली होती.
या पार्श्वभूमीवर तीच घटना आज सहस्त्रबुद्धे आजोबा सांगत असताना हाच सगळा प्रसंग दुखावलेल्या अंतःकरणातून आपसूक झेपावत येणाऱ्या शब्दांतून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत होता आणि बोलताना आजोबा दु:खातिरेकाने व्याकूळ झाले होते!
“त्यादिवशी मी महत्त्वाच्या कामासाठी लवकर बँकेत गेलो, तेव्हा सफाई करणाऱ्या शिपायाखेरीज दुसरं कुणीही आलेलं नव्हतं” सहस्त्रबुद्धे सांगू लागले.. *”* मी मुद्दामच लवकर गेलो होतो. कारण माझं काम तसंच महत्त्वाचं होतं. माझी बायको नुकतीच गेली होती. त्या धक्क्यातून मला सावरणं शक्यच नव्हतं. अचानक एक हात मोडलेल्या अपंगासारखी माझी अवस्था होऊन गेली. त्यातूनही कसंबसं सावरत मी माझी दैनंदिन कामं सुरू केली. आम्हा दोघांच्या जॉईंट नावाने असलेली बँक खाती, ठेवी यांच्यावरचं तिचं नाव कमी करून मुलीचं नाव वाढवून घेणं, त्यासाठी अधू मनाने दहा हेलपाटे घालणं.. माझ्या वयाचा विचार करता खूप दमवणारं आणि त्रासदायक होतं. माझी मुलगी मला प्रत्येक ठिकाणी जबाबदारीनं घेऊन जायची, माझी काळजी घ्यायची त्यामुळे दोन-तीन बँकांमधे विखुरलेली ही कामं हातावेगळी करणं मला शक्य झालं होतं. पण युनिट ट्रस्ट आॅफ इंडियाच्या एका युनिट स्कीम मधे गुंतवलेल्या मोठ्या रकमेचे पैसे परत मिळवणं या ना त्या कारणाने अवघड होऊन बसलं होतं. ते काम अखेरच्या टप्प्यावर असताना सर्व युनिटसच्या रिडम्शन फाॅर्मच्या मागं माझी सही करून व ती सही आमचं खातं ज्या बॅंकेत आहे त्या बँकेतील अधिकाऱ्याकडून अॅटेस्ट करून घेऊन प्रस्ताव त्वरित पाठवण्याची सूचना मला यूटीआयने दिली होती. त्यानुसार मी माझी सही करून अटेस्टेशन घेण्यासाठी त्या दिवशी सकाळी मुद्दामच लवकर बँकेत गेलो होतो. लगेचच बँकेतले कर्मचारीही एकेक करून ब्रॅंचमधे येत असतानाच ब्रँच मॅनेजर प्रभूदेसाईही आत आले. केबिनजवळ बाहेर ठेवलेल्या सोफ्यावरच मी त्यांची वाट पहात बसलो होतो. मी उठून त्यांना नमस्कार केला पण त्याची दखलही न घेता ते केबिनमधे निघून गेले. मला याबद्दलही काही वाटलं नाही कारण ते गडबडीत असणार हे मी गृहीत धरलं होतं. तरीही त्यांचं रोजचं रुटीन सुरू होण्यापूर्वी आपलं हे काम करून घ्यावं म्हणून मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी त्रासिकपणे माझ्याकडं पाहिलं. मला थोडावेळ बाहेर बसायला सांगितलं. मी त्यांच्या बोलावण्याची वाट पहात बाहेर येऊन बसलो. माझं लक्ष आत केबिनकडंच होतं. तेवढ्यांत त्यांचा फोन वाजला तेव्हा नाराजीने फोनकडे पहात त्यांनी उभ्या उभ्याच स्वतःचा ड्रॉवर उघडला. आत ठेवलेल्या उदबत्तीच्या पुड्यातून एक उदबत्ती आणि काडेपेटी काढून त्यांनी ती उदबत्ती पेटवली. मागेच भिंतीवर लटकवलेल्या देवांच्या फोटोंना ओवाळत राहिले, दोनदोनदा नमस्कार केला, मग टेबल आणि स्वतःच्या खुर्चीकडे पहात ती उदबत्ती ओवाळून मागच्या फळीजवळ खोचून ठेवली आणि स्वतःच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. आता तरी ते मला बोलावतील असं वाटलं तेवढ्यांत घाईघाईने बँकेत आलेलं एक जोडपं केबिनमधे गेलं. त्यांना पहाताच तत्परतेने उठून त्यांचं हसतमुखाने स्वागत करीत प्रभुदेसाईंनी अतिशय अदबीने त्यांना बसायला सांगितलं. दोन मिनिटांच्या माझ्या कामासाठी मी मनापासून त्यांच्या बोलावण्याची वाट पहात इथं ताटकळत बसलेलो आहे हे त्यांच्या गावीच नव्हतं. त्यांची अॅटॅस्टेशनची सही घेऊन मला पोस्टात जाऊन तिथेही रजिस्टर करण्यासाठी रांगेत तिष्ठत उभं रहावं लागणार होतं. आत जाऊन त्यांना सही करण्याची विनंती करण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. पण मी ‘आत येऊ कां? ‘ असं विचारून दारात क्षणभर उभा राहिलो तेव्हा मला त्यांनी आत बोलावून काय काम आहे एवढं विचारणंच मला अपेक्षित होतं. पण तेही त्यांनी केलं नाही.
“बाहेर बसा. महत्त्वाचं काम करतोय ना मी? मी बोलावलं की आत या असं सांगितलं होतं ना तुम्हाला? मी कामात आहे दिसत नाही कां? ” म्हणाले. एका वयोवृद्ध ग्राहकाशी हा माणूस या पद्धतीने वागूच कसा शकतो? .. या विचाराने मी अस्वस्थ झालो. कसाबसा राग आवरत मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो.
“तुम्ही बँकेत यायच्या आधीपासून गेला अर्धा तास मी तुम्ही बोलावण्याची वाट पहात बसून होतो. साधं माझी सही ऍटॅस्ट करून द्यायचं एक मिनिटाचं काम आहे फक्त. तेवढ्यासाठी एक तास बसून ठेवणार आहात कां मला? “
मी चिडून विचारलं आणि सोबतच्या एनव्हलपमधून मी मागे सही केलेला यूटीआयचा रिडम्शन फॉर्म काढून मी तो त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिलं, तो फॉर्म उचलला, त्यावरील डिपॉझिटर्सच्या नावांमधला मी आणि माझी बायको असा दोघांच्या नावाचा उल्लेख पाहिला आणि अतिशय उर्मटपणे तो फाॅर्म माझी सही अॅटेस्ट न करताच माझ्याकडे भिरकावला.
“जॉईंट आहे ना हो ही इन्व्हेस्टमेंट? मग? दोघांच्या सह्या नकोत कां? फक्त तुमची एकट्याचीच सही आहे यावर. बघाs नीट. बायकोचीही सही घेऊन या. त्याशिवाय अॅटॅस्टेशन करता येणार नाहीss” विजयी मुद्रेने ते म्हणाले. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन पोचली.
“बायकोची सही आणायला वर जाऊ कां आताss तिच्या मागं? ” मी ओरडलो. ” नीट वाचाs तोs रिडम्शन-फाॅsर्म. माझ्या बायकोची डेट आॅफ डेथ आहे त्यावर. आणि सोबत डेथ सर्टिफिकेटही. बायको मेलीsय माझीss. इथल्या माझ्या खात्यातच जमा होणाराय ही सगळी रक्कम नंतर. म्हणून आलोय तुमच्या दारात. खातं तुमच्या बँकेत आहे म्हणून भीक मागतोय तुमच्याकडं….. ” मी असंच किती वेळ बोलत होतो मला माहित नाही. नैराश्य आणि टोकाच्या संतापाने मी बेभान झालो होतो…. ”
ते बोलायचं थांबले तसं सुन्न होऊन ऐकत राहिलेला मी भानावर आलो. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगताना संतापाने बेभान झालेल्या प्रभूदेसाईंनी सांगितलेली घटना आणि आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी भावविवश होत सांगितलेली घटना या दोन्ही एकच होत्या पण दोघांच्या सांगण्यातले क्रम आणि संदर्भ यामधली तफावत लक्षणीय होती. आज ते सगळं या आजोबांच्या तोंडून ऐकल्यानंतर आधी न जाणवलेला प्रभुदेसाईंच्या सांगण्यामागचा त्यांचा स्वतःच्या बचावाचा पवित्रा मला ठळकपणे जाणवला आणि अर्थातच खटकलाही. या उलट आजोबांच्या प्रत्येक शब्दातून पाझरणारी त्यांच्या मनातली वेदना आणि सात्विक संताप माझ्या मनावर ओरखडे ओढून गेला!
‘सत्य’ माणसागणिक कसं रंग बदलणारं असू शकतं याचा मन अस्वस्थ करणारा अनुभव मी घेत होतो! त्यादिवशी नेमकं काय घडलं याच्या प्रभूदेसाईंनी आधी रेखाटलेल्या चित्रातले बेरंग मला आता अधिकच खुपू लागले. सहस्रबुद्धे हे अतिशय हेकेखोर, सतत तक्रारी करणारे, बँकेतल्या मॅनेजर व स्टाफशी बोलताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे असं प्रभूदेसाईंनी केलेलं सहस्त्रबुद्धे आजोबांचं वर्णन वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं तर नसेल? कारण..
“हा एक नंबरचा हेकेखोर, हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे ” असं प्रभूदेसाई म्हणाले होते. याउलट आजोबांनी स्वतःची कैफियत मांडताना कुणावरही थेट दोषारोप न करता राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांकडून ग्राहक सेवेबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबद्दलची वस्तुस्थिती अतिशय नेमक्या शब्दांत पोटतिडकीने मांडली होती आणि हे करीत असताना त्याबाबतचा त्यांच्या मनातला सात्विक संताप टोकदारपणे जाणवलाही होता!
त्यांच्या तक्रारखोर स्वभावाबद्द्लचा माझ्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी त्याबाबत सहज सहस्त्रबुद्धे आजोबांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर अधिकच दुणावला….!!
तरीही या सगळ्यांत आपण भावनिक दृष्ट्या गुंतत चाललोय हे जाणवताच मी भानावर आलो. सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणं ठीक आहे, पण ते तक्रार करण्यामागच्या त्यांच्याच भूमिकेवर ठाम राहिले तर? त्यांनी तक्रार मागे नाही घेतली तर? नाही नाही.. असं होऊन चालणार नाही.. हा तिढा सुटायलाच हवा. तोही समाधानकारक आणि लवकरात लवकर. हे शक्य होईल?
मन असं शक्याशक्यतेच्या हिंदोळ्यावर झुलत असताना मला नेहमीच ‘त्या’ची आठवण येते. आत्ताही आलीच. ‘तो’आहे. पहातोय सगळं. मग काळजी कसली? या विचाराचा स्पर्श होताच मग थोडं शांत झालं.
या दोन दिवसात मनापासून केलेल्या प्रयत्नांती खूप कांही गवसलं होतं पण ते घट्ट धरून कसं ठेवायचं तेच समजत नव्हतं! अनिश्चितता या क्षणी तरी संपलेली नव्हती!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈













