मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मुग्धाची आई मंजुश्री मुग्धाची वाट पहात होती. मुग्धा नीट परीक्षा द्यायला सेंटरवर गेली होती. तिला अंदाज होताच.. मुग्धा हसत हसत येणार, कारण तिने फिल्डिंगच तशी लावली होती. तिच्या नवऱ्याचा मध्येच फोन आला..

‘काय आली काय मुग्धा?

‘नाही अजून.. हॉलच्या बाहेर आली कीं लावेल फोन..

एवढ्यात मंजूला मुग्धाचा फोन येतो आहे असे दिसलें…

‘तिचा फोन येतो आहे.. मग करते मी फोन तुम्हाला..

असे म्हणून मंजुने मुलीचा फोन घेतला…

‘बोल ग. कस काय?

‘येस मम्मा.. शंभर टक्के..

‘सेम टू सेम काय?

‘केमिस्ट्री, झुलॉजी सेम.. बायोमध्ये थोडे बदल होते.. पण सहाशेवर निश्चित..

‘देव पावला.. तू लवकर घरी ये.. पण बाबांना काही बोलू नकोस.. त्याना फक्त पेपर सोपे गेलेत म्हणून सांग.

‘त्याना मी कशी सांगेन ममा.. तू माझ्यासाठी शिरा करून ठेव, तोपर्यंत मी पोचतेच..

मंजूला समाधान वाटलं.. गेले वर्षंभर टेन्शन होत.. गोलमाल करायला लागलं आणि ते सुद्धा नवऱ्यापासून लपवून.

मंजुने नवऱ्याला फोन लावला.

‘अहो.. मुग्धाचा फोन आलेला.. खूष आहे ती.. सहाशेवर निश्चित म्हणते आहे..

‘कमाल आहे… कधी फारसा अभ्यास करताना दिसत नव्हती आणि मूळची पण हुशार नव्हे.. तरी म्हणते सहाशेच्यावर?

‘अहो.. क्लासमध्ये अभ्यास करायची, घरी करत नसेल कदाचित..

‘बर बर.. म्हणत मुग्धाच्या बाबांनी फोन ठेवला.

तेव्हडयात मंजूच्या लक्षात आले.. माधवला म्हणजेच तिच्या भावाला फोन करायला हवा, त्यानेच तर हे घडवून आणले..

तिने तिच्या भावाला.. माधवला फोन लावला.. पण तो बिझी येत होता.. तिच्या लक्षात आले, माधवला अनेकांचे फोन येत असणारं, आपल्यासारखे अनेकजण त्याच्या लिस्टमध्ये असणारं..

लेकीने गोड शिरा करायला सांगितलं हे मंजुच्या लक्षात आले.. गाणे गुणगुणत ती किचनमध्ये आली.. तिने रवा बशीत घेतला, निवडून घेतला.. एका पातेल्यात तूप ओतलं आणि गरम करायला घेतल, एव्हड्यात माधवचा फोन आलेला तिला दिसला..

‘काय मंजू.. खूष ना?

‘होय रे बाबा.. मुग्धाने फोन केलेला.. सहाशेच्या वर जाईन म्हणते आहे..

‘निश्चित जाईल, म्हणजे ज्या मुलांना नोट्स मिळाल्यात.. ती सर्वच मुलांची मेडिकल ऍडमिशन पक्की.

‘हो.. बर झालं बाबा… तू त्या मुल्लासरांची गाठ घालून दिलीस, नाहीतर मुग्धा मेडिकलला जाऊ शकली नसती.

‘हो ताई.. बर आठवलं.. त्या मुल्लासरांना अजून दिढ लाख दयायचे आहेत, लक्षात आहे ना..

‘हो.. नवऱ्याला न सांगता पैसे जमवणे फार कठीण असते रे माधव, विशेष करून नोकरी न करणाऱ्या बाईला.. बांगडया गेल्या आता पाटल्या..

‘पण भावोजीना कळले नाही ना अजून?

‘माधव, डुप्लिकेट दागिने कोस्मेटिक्सच्या दुकानात मिळतात ते एव्हडे ओरिजिनल सारखे दिसतात… बायका फसतात तेथे पुरुष फसयला काय?

‘हो ग.. आणि एकदा मुग्धा डॉक्टर झाली कीं खोऱ्याने पैसे मिळवील.. मग हवे तेव्हढे खऱ्या सोन्याचे दागिने कर..

खळखळून हसत मंजुने फोन ठेवला.

शिरा करता करता मंजू विचार करत होती.. ‘आपली एकुलती एक लाडकी मुलगी, आपली आणि तिची पण इच्छा, तिने डॉक्टर व्हावे, साधे नव्हे.. सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंटशिवाय भेटता येत नाही.. अशी डॉक्टर.. पण.. मुग्धा फारशी हुशार नव्हती, म्हणजे दहावीत तिने मिळविले नव्वत टक्के.. पण सध्या नव्वद टक्के म्हणजे काय.. सर्वांनाच मिळतात.. पण मेडिकलला ऍडमिशन म्हणजे, त्यात नीट परीक्षा. ?.. त्याचा अडथळा कसा पार करणार? त्या परीक्षेत साडेपाचशेपेक्षा मार्क्स हवेत.. देशात वीस लाख मुले ही परीक्षा देतात.. त्यात मुग्धा कुठे बसणार? काही लोक पैसे भरून ऍडमिशन घेतात म्हणे.. बरेच डॉक्टर्स लोक आपल्या मुलांना पैसे भरून कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतात.. पण आपला नवरा असे कदापि करायचा नाही.. नायब तहसीलदार आहे पण पाच पैसे लाच घेणार नाही.. सारे नियमाला धरून..

या विचारात असताना आपला भाऊ.. माधव, एकदा घरी आला असताना मी त्याला म्हंटले..

‘माधव.. मुग्धाला मेडिकलला जायचे आहे रे, पण..

‘पण काय?

‘ती फारशी हुशार नाही रे आणि तिला अभ्यासाचा कंटाळा.. नीटची परीक्षा असते ना..

‘अग नीटच्या परीक्षेचेचे टेन्शन घेऊ नकोस… तुला काय वाटते गेल्या काही वर्षात जे मेडिकलला गेलेत ते खरेच हुशार होते.. त्यातील काही हुशार होते हे खरे.. बाकी..

‘बाकी काय?

‘ पैसे मोजले तर प्रश्न दोन दिवस आधी कळतात.. तशी रॉकेट्स सुरु आहेत..

‘काय सांगतोस?

‘तस हे सर्वांनाच सांगत नाही मी.. फक्त जवळच्या माणसांना.. उघड झालं तर सगळे आत जातील.. मी मुग्धासाठी प्रयत्न करतो.. पण बारा पंधरा लाख तरी दयायला लागतील आणि गुपित ठेवावे लागेल.. भावोजीना मात्र सांगू नकोस.

शिरा करता करता मंजू मागील आठवत होती. बारावी परीक्षा झाली आणि एक दिवस माधवचा फोन आला..

‘ताई.. मी व्यवस्था केली आहे, पण या कानाचे त्या कानाला कळता नये.. नाहीतर सगळे आत जातील.. केमिस्ट्री आणि झुवोलोजीचे पेपरसेटर कळले आहेत.. मुल्ला नावाचा माणूस आहे नागपूरचा.. तो फिल्डिंग लावतो आहे.. आता त्याचा तुला डायरेक्ट फोन येईल.. ओके..

मंजू आठवू लागली…

आणि अचानक एकदा एक अनोळखी नंबरवरुन कॉल आला..

‘आप मंजुजी हैं?

‘हा..

‘मैं मुल्लासरके ऑफिससे बात कर रही हूं..

‘हा..

‘माधवसरने आपको बोला होगा..

‘हा..

‘यदी आप इंटरेस्टेड हैं.. तो मैं मेसेज करती हूं.. वो नंबरपर फाईव्ह पेटी जमा करो.. और मुझे उसका स्क्रिनशॉट भेंजो..

‘पाच लाख.. ?

‘टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिनमे..

त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.

त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.

 हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगीने दार उघडायला गेली.

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौफुला… – भाग – २ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ चौफुला… – भाग – २ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

(आत्ताच्या जमान्यात आपण हौसेने घेतलेली मग मोठी तांब्या पितळेची भांडी निरुपयोगी आहेत हे तर खरंच. नूतनचीही आता साठी होईल. तिची सून सुजाता अगदी टापटीपीची आहे. नूतनचा नातूच आता वर्षाचा होईल.) – इथून पुढे – – 

सुजाताचं नाव निघाल्यावर मागच्या वर्षीचा प्रसंग आठवून त्या तिघी हसू लागल्या. सुजाताच्या डोहाळे जेवणासाठी म्हणून वत्सला नूतनकडे गेली होती. डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशी जरा पाय मोकळे करायला, देवळात जायला म्हणून वत्सला बाहेर गेली तर वेड्यावाकड्या उंच स फुटपाथ वर अडखळून पडली. हाताला थोडं फ्रॅक्चर झालं. नातवानं आजीला घराजवळ असलेल्या नर्सिंग होम मध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर ओळखीचे होते या ८० च्या जवळ आलेल्या आजींच्या हाताला प्लास्टर घालायचा आधी केलेल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्याच पाहून डॉक्टरांनीच आजींचं अभिनंदन केलं होतं. चार दिवस तिथे नर्सिंग होम मध्येच राहायचं ठरलं.

वत्सला पुढे म्हणाली, हॉस्पिटलमध्ये चार दिवस आणि नूतनकडे जेमतेम चार-पाच आठवडे काढून प्लास्टर काढल्यावर नूतनला इकडेच पोचवायला लावलं मला. आपल्याच मठीत बरं वाटतं ग!तुम्ही तिघी आणि बाकी इथली नेहमीची सगळी माणसं होती मदतीला. छान बरी झाले लवकर. एक सांगू का आपल्याच दुखण्याचा बाऊ करत बसायचं नाही. सोशिकपणे गुपचूप झोपून चांगली विश्रांती घ्यायची. आपलं आपल्याला आतून बरं करण्याची उमेद धरायची म्हणजे चटकन बरं वाटतं. मुक्या जनावरांच्या दुखण्याखुपण्याला कोण असतंय? त्यांची ती नैसर्गिक बरी होतात. तसंच! 

हो ग अगदी बरोबर बोललीस. आणि खरं सांगू का आता आपल्याला एकटं स्वतंत्र राहायची सवय झालीय. ते सकाळी उठून भांड्यांचे आवाज, कुकरच्या शिट्ट्या, लहान मुलांचे हट्ट, रडणं काऽऽही नको वाटतं आता. इंदू म्हणाली.

पण आता दोन-तीन वर्ष तरी म्हणजे हे नवीन बांधकाम होईपर्यंत आलटून पालटून मला सुरेश आणि साधनाकडे राहावं लागेल. ती दोघं आणि त्यांच्या घरची अगदी अगत्यानं करतात आणिआता आपलं तरी काय? आपल्यानंतर ही नवी जागा आपल्या वारसांनाच मिळणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी या जागेसाठी किडूकमिडूक विकून शिल्लक खर्ची घालून इथे पैसे भरायचा धीर केला म्हणून हे दिवस दिसत आहे. आपण दोघींनी लाडू पोळ्या करून विकल्या. सुशीनं कॉलनीतील नोकरी करणाऱ्या लेकीसुनांची मुलं सांभाळली म्हणून आपल्या मुलांचे शाळा कालेज क्लासेस सारं निभावलं. बाबी तर काय वधू वर मंडळ, महिला मंडळ, सगळे उत्सव, साऱ्यांमध्ये मदतीला तत्पर! मुलं-मुली चांगली निघाली हे मात्र आपलं नशीब.

तेवढ्यात फोन वाजलाच. सुशील तिच्या पंचाहत्तरीची तारीख सांगितली. मग लता म्हणजे सुशीची मुलगी बोलली. या तिघी मावशींनी आठ दिवस तिच्याकडे राहायचं आमंत्रण दिलं. आणि सांगितलं की तुमच्यासाठी सिंगापूर ट्रीपची चौकशी करून आले. आता तुम्हाला बिल्डरकडून ॲडव्हान्स भाडं मिळेल. जरा मजा करून या चौघी मैत्रीणी. वत्सला तिला म्हणाली, अगं तुझी कल्पना छान आहे पण झोपेलाना आम्हाला ते सगळं, तो विमान प्रवास ?

झकास झेपेल. आयुष्याचा प्रवास कणखरपणे केलात. आता ही मजेची ट्रीप करून या चौघी मैत्रिणी. लता म्हणाली. वत्सलानाने बाबीजवळ फोन दिला. तर बाबीने खुसूखुसू हसत, बरं बघूया तिकडे आल्यावर. असं म्हणून फोन बंद केला.

अगं काय झालं, काय म्हणत होती लता या दोघींच्या उत्सुक प्रश्नावर बाबी म्हणाली लता म्हणते ट्रिपमध्ये तुम्ही पंजाबी ड्रेस घाला. त्याचीही खरेदी करूया इकडेच. इंदू म्हणाली, अगं बाकी सगळ्या पॅन्टीत असतील मग आपण कशाला काकुबाई राहायचं असं वाटत असेल तिला. आठवतंय ना आपण नऊवारीतून सहावारीत आलो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आणि बाकीच्यांनाही अवघड वाटत होतं मग झाली सवय आणि आता नाटक सिनेमाला जाताना, गाण्याच्या, व्याख्यानांच्या कार्यक्रमाला जाताना तेच बरं वाटतं.

आणि रात्री घालायला गाऊन घ्यायचे का? फार धुणंपाण्याची कटकट नको. मागच्या वर्षी माझं हाताचं ऑपरेशन झालं ना तेव्हा नूतनन गाऊनच दिले होते घालायला. बरं वाटतं सुटसुटीत आणि मोकळं.

समोरून निर्मलाला येताना पाहून त्या तिघी बोलायचं थांबल्या. तिच्याजवळच्या पिशवीतून डब्यातल्या बटाटेवड्यांचा खमंग वास येत होता. आजी आज इकडे कशा बसलात? घेता का बटाटेवडा? झकास झालाय बघा.

एकच प्लेट पुरे. काल रात्री जरा पोटात खुटखुटत होतं. घेतला लगेच ओवा आणि गरम पाणी इंदू म्हणाली. आणि हे तेलकट आत्ता खाल्लं की रात्री घशाशी येतं बाबी म्हणाली.

आता बारा रुपये प्लेट केली बरं का आजी. सगळ्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत पैसे घेऊन निघताना आ निर्मला म्हणाली. बघते अजून थोडं फिरून. थोडेच उरलेत वडे.

निर्मलाला या चौघींबद्दल कृतज्ञ आदर होता. त्यांनीच निर्मलाला हा मार्ग सुचवला होता. शिवाय पुरणपोळी, मोदक यासारखे पदार्थ निगुतीने करायलाही शिकवले होते. आता त्या कॉलनीत निर्मलाला ऑर्डर्सना तोटा नव्हता. नवऱ्याच्या साध्या नोकरीला ही जोड मिळाली. तोही जमेल तशी मदत करीत असतो. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलांच्या क्लासेसची फी भरायला आता निर्मलाला जड जात नव्हतं. या आजींची तिला शिकवण होती की कॉलनीत सगळेच ओळखीचे पण व्यवहाराला पक्कं रहायचं. अगदी आमच्याकडूनसुद्धा त्याच भावाने पैसे घ्यायचे. पदार्थाची चव आणि रंग छान पाहिजे. बाजार भाव पाहून त्यापेक्षा थोडी कमी किंमत ठेवायची हा गुरूमंत्र निर्मला कसोशीने जपत होती. निर्मलाकडून घेतलेली वडा प्लेट चविष्टपणे खाता खाता पुन्हा तिघींची चर्चा सुरू झाली.

पुण्याला जायला टॅक्सी सांगायची ना आपल्या कॉलनीतल्या निलेशची? इंदूने विचारले. हो चालेल. पण मला वाटतं लता म्हणते म्हणून एखादा ड्रेस घ्यावा. बाकी आपल्या छान छान साड्या नेसूया. ड्रेसची सवय नाही आपल्याला. उगीच अवघडल्यासारखं वाटून ट्रीपची मजाच जायची.

खरंय तुझं! बाबी म्हणाली. आपण असं करू. सिंगापूरहून आल्यावर दुसऱ्या ट्रिपला जायच्या आधी पंजाबीची प्रॅक्टिस करू. बाबीच्या या मिश्किल बोलण्यावर तिघी हसत उठल्या. काळोख पडायला लागला होता. सांजवात लावून स्तोत्र म्हणेपर्यंत टीव्हीवरच्या त्या रोजच्या मालिका सुरू होतील. मग उद्या नेहमीच्या बाकावर बसून आल्यागेल्याशी बोलताना कुठल्या मालिकेला कुणाला नावाजायचं आणि कुणाला नावं ठेवायची ते ठरवता येईल. रात्रीसाठी एखादं थालीपीठ करावे की दोन आंबोळ्या कराव्या की डाळ तांदुळाची खिचडी करावी याचा विचार चालता चालता त्यांच्या मनात घोळत होता.

समाप्त

© पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौफुला… – भाग – १ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ चौफुला… – भाग – १ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

आज संध्याकाळी कॉलनीमध्ये नेहमीच्या बाकावरू न बसता त्या तिघींनी जरा मागच्या बाजूच्या एका कडेच्या बाकावर बसायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे बाबी आणि वत्सला त्या बाकावर बसून इंदूची वाट पाहत होत्या. इथे मागच्या बाजूला बांधकामाच्या सामानाचा जास्त पसारात पडलेला दिसत होता. त्या जुन्या कॉलनीतल्या बिल्डिंग पाडून नवीन टॉवर्स बांधण्याचं काम जोरात चालू होतं. एक दोन महिन्यात उरलेल्या सगळ्यांनी जागा रिकाम्या करून द्यायच्या होत्या. बिल्डर बरोबरच्या कराराप्रमाणे त्यांना दोन-तीन वर्षासाठी भरपूर भाडेही मिळणार होते.

समोरून हातात भाजीची पिशवी घेऊन इंदू इकडेच येताना दिसली. येता येता बघितलं तुझ्या घराकडे तर कुलूप होतं. कुठे गेली होतीस आत्ता? 

बाबीन विचारलं.

अगं बदाम संपले होते ना ते आणले. येताना अंबाडी ताजी दिसली म्हणून घेतल्या दोन जोड्या. तू सांगितल्याप्रमाणे गेली काही वर्ष मी नियमानं रोज रात्री दोन बदाम भिजत टाकते आणि सकाळी नाश्त्याचा वेळी दुधाबरोबर दोन बदाम आणि दोन खजुराचा बिया खाल्ल्या की खरंच बरं वाटतं.

होऽऽ ना! मी सुद्धा तो नियम चुकविला नाहीये बाबीनं सांगितल्यापासून. वत्सला म्हणाली.

किती वाजले ग? आता पंधरा वीस मिनिटात येईल सुशीचा फोन पुण्याहून बाबी म्हणाली आणि गळ्यातल्या लांब दोरीच्या छोट्या पिशवी ठेवलेला मोबाईल, आज सकाळी आठवणीने चार्ज करून ठेवलाय, असं म्हणून तिने तो बाहेर काढला.

बाबी, वत्सला इंदू आणि सुशी या चौघींचा छान जमलेला गोफ, गेली अनेक वर्षं कॉलनीच्या परिचयाचा होता. या चौफुल्यापैकी आता सुशी दोन-तीन वर्षासाठी पुण्याला लेकीकडे राहायला गेली होती. या चौघींमध्ये लहान असलेल्या सुशीची पंचाहत्तरी साजरी करायची होती. त्यासाठी जर्मनीहून मुद्दाम आणि तिच्या मुलगा, सून, नातवंड येणार होती. हॉलची तारीख बहुतेक आज नक्की होईल. उद्या संध्याकाळी फोन करते तुम्हांला तिघींना. असा सुशीचा काल बाबीला फोन आला होता म्हणून त्यांनी आज जरा नेहमीपेक्षा वेगळी जागा बसण्यासाठी ठरवून ठेवली होती.

तशी बाबी आता एकटीच! या कॉलनीत राहायला येऊन चाळीस वर्ष होऊन गेली होती. मूलबाळ झालं नाही. पण नवऱ्याचं मिळकतीत व्यवस्थित संसार करताना कधीही कपाळावर आठी नाही की तोंड आंबट नाही.

सासर माहेर साऱ्यांना धरून होती. जरूर असेल तेव्हा त्यांच्या मुला बाळांच्या कार्यातून हौसेने मदत करीत होती. म् हसतमुख राहण्यामुळे दामोदरपंतांचे शेवटले आजारपण तिने सगळ्यांच्या मदतीने निभावलं. त्यानंतर नेत्रा, तिच्या धाकट्या बहिणीची मुलगी किती आग्रहाने तिच्याकडे राहायला बोलावीत होते. पण या तिघी सख्या मैत्रिणींच्या सांगण्याप्रमाणे तिने एकटीनेनेच राहण्याचा निर्णय घेतला. अधूनमधून कुणी काही निमित्ताने बोलावलं तर चार दिवस जायचं. परत आपल्या या दोन खोलांच्या स्वतंत्र जगात परतायचे तेच छान वाटत होतं. आणि पंचाहत्तरी होऊन गेली तरी प्रकृतीही तशी खणखणीत होती.

दोन-तीन महिन्यांपूर्वी सुदिप वाढदिवस होता म्हणून नेत्रा बाबीमावशीला आग्रहाने तिच्याकडे घेऊन गेली होती. बोलता बोलता नेत्रा म्हणाली, मावशी, सुदीपला मोदक खूप आवडतात पण मला नाही बाई जमत तो पसारा.

हात्तीच्या! सोप्प काम आहे. करूया आपण मोदक.

अगं पण, भाचीला मध्येच तोडंत बाबीमावशी म्हणाली, तुझी कामवाली देईल ना दोन नारळ खरवडून? मी दाखवते तसं तू पुरण कर आणि मोदकाची चांगली पिठी मिळते ती घेऊन ये की झालं.

सुदिपच्या वाढदिवसाच्या दिवशी उकडीवर वाफेसाठी झाकण टाकल्यावर बाबी मावशीनं स्वयंपाक घराचा तो लांबट ओटा मोकळा करून घेतला. स्टुलाच्या मदतीने पटकन ओट्यावर चढून बसलेल्या बाबी मावशीकडे नेत्रा पाहतच राहिली. मोदकाच्या पारीला सारख्या अंतराने चुण्या घालत होती. ते बघताना नेत्राला लहानपणी ती सुट्टीत बाबी मावशीकडे राहायला जायची तेव्हाची आठवण झाली. घरदार लख्ख , करणंसवरणं सगळं नीटनेटकं. दुपारचा चहा झाला की ती आरशाफणीची पेटी घेऊन बसायची. मग नेत्रा तिच्याकडून दोन झकास पाच पेडी वेण्या घालून घ्यायची. बाबीमावशी अंबाडा घालून त्यावरून बारीक जाळी घालून आकड्याने बसवायची. तोंड धुवून हलकीशी पावडर लावली की, पेटीतल्या डबीतल थोडं मेण कुंकवाच्या जागी लावायची. पेटीमध्ये स्टोव्हच्या पिनेचा गोल भोक असलेला मागचा अर्धा भाग ठेवलेला होता. ते गोल भोक मेणावर ठेवून आरशात बघत ती त्यावर लाल गोल पिंजर लावी ते बघायला नेत्राला फार आवडत असे.

आत्तासुद्धा तिने केलेले चुणिदार पाकळ्यांचे, उंचेल्या नाकाचे सारखे मोदक इतके छान दिसत होते की तिने नवऱ्याला आणि सुदीपला मुद्दाम हाका मारून ते दाखवले. दहावीत गेलेल्या सुदीपने चटकन त्याच्या मोबाईलवर मावशीआजीचा मोदकांसकट छान फोटो काढला. नेत्राने फ्रेम करून दिलेला तो फोटो बाबी मावशीनं हौसेने घरात टेबलावर ठेवला होता. नेत्राने एकीकडे गॅसवर मोदक उकडायला आधण ठेवलं आणि दुसरीकडे आठवणीने घरचं लोणी कढवत ठेवलं. ही सुद्धा बाबी मावशीची शिकवण. मोदक पुरणपोळ्या असा बेत असला की त्याच दिवशी कढंवलेलं घरचं ताजं तूप पाहिजे. सुदीपला साजूकतूपा बरोबर भरपूर मोदक खाताना पाहून दोघी खुश झाल्या.

यावेळी मात्र नेत्राने बाबी मावशीचं न ऐकता नवऱ्याला मावशीसाठी सेल फोन आणायला सांगितला. अगं एक फोन घरात असताना हा कशाला दुसरा ?

तुझ्या गळ्यात घालायला. नेत्राने हसतच सांगितलं.

अगं , कधी कधी तू कुठे आहेस, कशी आहेस काहीच कळत नाही. एवढ्या लांबून पटकन उठून येता येत नाही. आणि आले तरी तू भेटशील याची खात्री काय? असू दे हा फोन. आठ दिवसांमध्ये सुदीपने आजीला हा फोन कसा वापरायचा, कसा चार्ज करायचा ते शिकवून प्रॅक्टिस करून घेतली. बाबी मावशीला आता या फोनची थोडी सवय झाली होती. आणि त्याचा उपयोगही लक्षात आला होता.

बाकावर बसून सुशीच्या फोनची वाट पाहत गप्पा चालू होत्या. वत्सला म्हणाली, मी उद्या मोडवाल्याला बोलावलं आहे. आपल्यालासुद्धा आता इथलं हळूहळू आवरायला घ्यायला हवं. नूतनने बजावलं आहे की तिच्याकडे राहायला जाताना अगदी कमीत कमी सामान बरोबर आणायचं म्हणून माळ्यावरची ती सगळी अडगळ देऊन टाकायला सांगितलय तिनं. आत्ताच्या जमान्यात आपण हौसेने घेतलेली मग मोठी तांब्या पितळेची भांडी निरुपयोगी आहेत हे तर खरंच. नूतनचीही आता साठी होईल. तिची सून सुजाता अगदी टापटीपीची आहे. नूतनचा नातूच आता वर्षाचा होईल.

– क्रमशः भाग पहिला 

© पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक होती नलू…” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ “एक होती नलू…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

ही कथा आहे नलू परटिणीची. माझ्या लहानपणी आमच्या घरी नलू कपडे धुण्यासाठी यायची. नवी नवरी असताना ती आपला सासरा मारुती याच्या बरोबर यायची. मारुती न चुकता मंगळवारी भट्टीचे कपडे घेऊन यायचा, अगदी म्हातारा झाला तरी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात भट्टीचे कपडे बांधलेले गाठोडे असायचे. या मारुतीची सून नलू. मारुतीला स्वतःची मुलगी नसल्यामुळे तो नलूची लेकी प्रमाणे काळजी घ्यायचा.

नऊवारी साडी, डोक्यावर भुरक्या रंगाचे केस, कपाळावर रुपया एवढे कुंकू आणि, हसतमुख चेहरा अशी नलू आमच्या घरी आली की आम्हाला खूप मजा वाटायची. माझं तर “ताई ताई “करून कौतुक करायची. अशी मनमिळावू नलू मला खूप आवडायची. पण बिचारीच्या नशिबाला फक्त कष्ट आणि कष्टच होते. तिचा दारुडा नवरा रोज संध्याकाळी दारू ढोसून यायचा आणि तिला बुकलायचा. या मुलीने काय काय सोचले! व्यसनाच्या काळात जे होते ते सर्व. मारहाण, शिवीगाळ, माहेरचा उद्धार. पण अपार कष्ट करूनही कायम हसतमुख असायची.

ती आमच्या घरी कपडे न्यायला आली की साबण चुरा घालून कपडे भिजवायची आणि नदीवर धुवायला जायची. नदीच्या खळखळत्या पाण्यात कपडे धुऊन, पांढऱ्या कपड्यांना नीळ घालून कपडे वाळवून संध्याकाळी घरी घेऊन यायची. सासरा असे पर्यंत तिला थोडीफार मदत व्हायची पण सासऱ्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली. , पदरी एक पोर होतं. पोराला नदीच्या काठावर बसवून, कपडे स्वच्छ धुवायची आणि संध्याकाळी घरी आणायची.

नलू अतिशय प्रामाणिकपणे काम करायची. कपडा गहाळ झाला अशी कोणाची तक्रार नसायची. माझी आई तिच्या पोरावर माया करायची, आमच्या घासातला घास त्याला द्यायची. नलू पावसाळ्यात नदीवर कपडे धुऊन आणायचीआणि माजघरातल्या दांडीवर‌‌ निऱ्या करून काठीवर व्यवस्थित ठेवून, एकही सुरकुती‌‌ न पाडता दांडीवर टाकायची. ते पाहताना मला खूप गंमत वाटायची.

दिवाळीच्या पाडव्याला ती ओवाळायला यायची. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे उशिरापर्यंत लोळायची इच्छा असायची पण वडिलांच्या धाकामुळे पाडव्याला लवकर उठायला लागायचे. पाडव्या दिवशी अगदी सातच्या ठोक्याला नलू तबक घेऊन हजर व्हायची. टोक पदरी साडी, नाकात नथ, कपाळावर रुपया एवढे लाल भडक कुंकू लक्ष्मी सारखी वाटायची. वडिलांसह आम्हा सर्व मुलांना ओवाळायची. ओवाळताना ‘”रुपयाची तबक सोन्याच्या वाती ओवाळते चंद्र ज्योती “असं काहीतरी म्हणायची. आम्ही सर्वजण एक एक बंदा रुपया ओवाळणी ठेवायचो. ओवाळणी पाहून तिचं मन हरखून जायचं. आई तिची साडीने ओटी भरायची. दुसऱ्या दिवशी न चुकता ती साडी नेसून यायची आणि माझ्या आई वडिलांच्या पाया पडायची असे बरेच वर्ष चालू होते.

तिचा मुलगा शाळा शिकत होता आणि तिचा पती बापूराव दारू प्यायचा. माझ्या वडिलांनी त्याला परोपरीने “दारूचे दुष्परिणाम” समजावून सांगितले. ” उद्यापासून नाही मालक”हे त्याचे उत्तर ठरलेले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच.

मुलगा दहावी पास झाला. शहरात लॉन्ड्रीत कामाला लागला. आई बापाला घेऊन शहरात गेला. जरा बरे दिवस आल्यावर नलूने पोराचं लगीन लावून दिलं. , भावाची मुलगी सून म्हणून आणली. काही दिवस छान गेले मग सुनेने आपले गुण दाखवायला सुरुवात केली. कजाग बायको पुढं पोराचं काही चालेना. एक दिवस दारूच्या नशेत बापू गाडीखाली सापडून मेला. घरातील एकंदर परिस्थिती पाहून नलू परत गावाकडे आली, एकटीच खोपट्यात राहू लागली. जमेल तेवढी कामे करू लागली. जसे शरीर थकले तसे तिच्याकडून काम होईनाचे झाले. तिची बरीच कामे सुटली. आमच्याकडे मात्र कामाला यायची. आम्ही होईल तेवढी मदत करायचो. शेवटी तिने लेका कडे जाण्याचा निर्णय घेतला. तिचा मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकून दारू पिऊन धिंगाणा घालत होता. नाही म्हणायला नातू व्यवस्थित काम धंदा करत होता. नलूच्या निर्णयानुसार आम्ही तिला कोल्हापूरचे तिकीट काढून दिले. गाठीला काही असू दे म्हणून पैसे दिले. नलू कोल्हापूरला पोहोचली. स्टैंड वर उतरून चालत महाद्वार रोडला लागली. रस्त्यावरील गर्दी वाहनांचे कर्कश्य आवाज यातून मार्ग काढत ती चालली होती. गर्दीतून एक भरधाव जीप आली आणि तिला जोरात धक्का देऊन निघून गेली. ड्रायव्हर मागं न पाहता फरार झाला.

… नलू रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लोक “कोण म्हातारी? कुठली म्हातारी “?एवढी चौकशी करून काही न करता पुढे सरकत होती. त्यापैकी एका सद गृहस्थाला तिची दया आली. त्यांनी शेजारी पडलेल्या बोचक्यातून तिचा पत्ता शोधून काढला. तिला दवाखान्यात नेण्यासाठी सर्वा पुढे हात पसरले पण नसत्या फंडात कशाला पडा? असा विचार करत कोणीही त्यांना सहकार्य केले नाही. पोलीस येईपर्यंत नलूने प्राण सोडला. पोलिसांनी तिच्या पोराला बोलवून घेतले. अंगावर लक्तरे घातलेला तिचा पोरगा म्हणाला” मी तिचा पोरगा आहे हे खरं !पण मीच अन्नाला‌ मोताद आहे तर मी हिच क्रियाकर्म कसा करणार? माझ्या पोराला बोलवून घ्या”नातू आला. त्याने आजीच्या चेहऱ्याकडे तिऱ्हाईताप्रमाणे पाहिले आणि फिस्कारला”ही माझी आजी आहे, माझी आई थोडीच आहे? ज्याची आई आहे त्यांने क्रिया कर्म करणे हे त्याचे कर्तव्य आहे”. बापलेकात “तू तू मैं मैं”सुरू झाले. शेवटी हवालदारालाच दया आली. त्याने ‌नलूला‌ स्मशानात नेऊन अग्नी दिला. अशी बिचारी नलू जिवंतपणी मुलगा, नातू असूनही प्रेमाला पारखी झाली आणि मृत्यूनंतर बेवारशीच ठरली. ‘

‘मुले वाईट नसतात.. वाईट असतं आपलं म्हातारपण… , हे खरे!

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दडलेली कथा! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ दडलेली कथा! ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

मी श्रीपाद बिराजदार. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर, गेली काही वर्षे, स्फुट लेखन, वर्तमानपत्रांमध्ये सदर लिहिणे असा छंद जोपासतो.

काही कामासाठी आज मी आमच्या “आपल्या माणसांची सहकारी बँक” बँकेत आलो होतो, फॉर्म भरून क्लर्कला दिला आणि त्याने बोलावण्याची वाट पहात होतो. आणि पुकारा आलाच, “SB सर, मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये येता का प्लीज ?”

मी गेलो. तर तिथे एकजण मॅनेजरसमोरच्या खुर्चीत बसतच होते. मला बघून मॅनेजर क्षणभर गोंधळले, पण मग स्वतःला सावरत, त्यांनी समोरच्या व्यक्तीशी माझी ओळख करून दिली, “या, श्रीपाद सर. यांना भेटा, हे इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले सर. “

मला उलगडा झाला. ज्या SB सरांना बोलावले होते, ते भोसले सर होते, मी नाही. नामसाधर्म्याने घोटाळा झाला होता. मी तसं त्या दोघांना बोलून दाखवलं. भोसले सर मनमोकळेपणे हसले. मॅनेजरांनी “मी लेखक आहे” वगैरे ओळख करून दिली. मॅनेजरशी असलेले त्यांचे काम आटोपून ते निघाले.

मी दोन मिनिटे थबकलो, तेव्हा मॅनेजरांनी भोसले सरांबद्दल थोडक्यात माहिती दिली. खूप खडतर बालपणातून चिकाटीने शिक्षण घेऊन पोलीस खात्यात इन्स्पेक्टर झाले होते ते, त्यांचे वडील बँकेच्या डायरेक्टर बोर्डावर होते. “खूप विनम्र आहेत इन्स्पेक्टर साहेब, सगळ्यांशी आपलेपणाने बोलतात, बुद्धीबळ अप्रतिम खेळतात, बरं का, ” मॅनेजर सांगत होते.

योगायोगाने दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमात माझी भोसले सरांची परत भेट झाली, गप्पा झाल्या. “तुम्हा लेखकांना आजूबाजूच्या प्रत्येकच गोष्टीत एखादी कथा दडलेली भासत असेल ना, ” जेवत असताना ते दिलखुलासपणे बोलत होते, “पण माझ्या बाबतीत तसं काही नाही, बरं ! साधं सरळसोट आयुष्य जगलो आहे. नशिबाचे दान माझ्या बाजूने पडत गेलं, आणि इथवर पोचलो, ” ते निगर्वीपणे सांगत होते.

एवढ्यात थोडा गलबला झाला, एक भपकेदार सूट घातलेला, हातात महागडं घड्याळ – ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन आणि चेहऱ्यावर माज असलेला एकजण कार्यक्रमात येत होता. भोसले सर अगदीच त्याच्या रस्त्यात असल्याने, अगदी नाईलाज म्हणून तो क्षणभर थांबला, चेहऱ्यावर कसंनुसं हसू आणलं, सरांनी ओळख करून दिली, “हे उत्तम बेंडखळे, बँकेत महाप्रबंधक – general manager आहेत, बरं का ! आणि विशेष म्हणजे, बुद्धीबळ अप्रतिम खेळतात. “

बेंडखळ्यांचा चेहरा उजळला, “दहा वर्षांपूर्वीची फायनल आठवते आहे ना ?” त्याने विचारलं.

“अर्थात, त्याचा रिझल्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुम्हीच निर्विवाद चॅम्पियन होतात, ” सर दिलखुलासपणे म्हणाले. बेंडखळे सुखावला आणि त्याच्या फॅन्सच्या गोतावळ्यासोबत पुढे निघून गेला.

“आता, या उत्तम बेंडखळ्यांचीच गोष्ट घ्या, त्यांच्या बाबतीतली एक खाजगी गोष्ट शेअर करायला मला आवडेल, ” सर सांगत होते, पण एवढ्यात दुसरे कोणीतरी आलं, आणि तो विषय राहूनच गेला.

पुढच्या आठवड्यात बँकेत गेलो, तेव्हा मॅनेजर सरांशी भेट झाली, उत्तम बेंडखळे यांचा विषय निघाला. का कोणास ठाऊक, पण मॅनेजर थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. मी त्यांच्या बुद्धिबळाचा विषय काढला, ते आणखीनच अवघडले, शेवटी मनाशी काही निर्धार केल्याप्रमाणे ते बोलू लागले, “भोसले सरांच्या वडिलांची आणि बेंडखळे सरांच्या वडिलांची जुनी ओळख. किंबहुना, भोसले सरांच्या वडिलांच्या शिफारसीनेच बेंडखळे सर आमच्या बँकेत नोकरीला लागले.

मग इन्स्पेक्टर साहेबांची बदली झाली, आणि बहुधा त्यांचा आणि बेंडखळे सरांचा संपर्क कमी झाला असावा.

इकडे काही ना काही कारणांनी बेंडखळे सरांचे धाडसी निर्णय सगळ्यांच्या पचनी पडत नव्हते. बँकेच्या दृष्टीने, अनेक risky व्यवसायांना, आमच्या गणितापेक्षा, बेंडखळे सरांनी कितीतरी जास्त कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्या बदल्यात या कर्जदारांकडून ते मोबदला (kickback) घेतात, अशी वदंता होती.

तेव्हा ते तरुण होते, एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्या मुलीच्या वडिलांना, तारणाशिवाय, बँकेकडून त्यांनी भली थोरली रक्कम कर्जाऊ दिली होती. पण कर्ज रक्कम मंजूर झाल्यावर ती तरुणी बेंडखळे सरांना भेटत नव्हती, ब्रेकअप करत होती म्हणे.

बेंडखळे सर दारू पिऊ लागले आहेत, अशा बातम्या पसरू लागल्या होत्या. डायरेक्टर बोर्ड त्यांना चौकशी समितीपुढे उभं करणार असंही ऐकिवात होतं.

नशेत त्यांनी त्या तरुणीच्या वडिलांशी बाचाबाची केली, तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली, सुदैवाने आपले भोसले सरच त्या पोलीस ठाण्यात होते. त्यांनी बेंडखळे सरांना सज्जड दम भरला, कडक शब्दांत त्यांची कानउघाडणी केली, परंतु त्याच वेळी तिच्या वडिलांना तक्रार मागे घ्यायला लावली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या दिवशी आमच्या बँकेने आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेचा अंतिम सामना होता आणि आमनेसामने होते उत्तम बेंडखळे आणि इन्स्पेक्टर भोसले.

भोसले सर ठरवलेल्या वेळी हजर होते, अर्धा तास होऊन गेला तरी बेंडखळे सरांचा पत्ता नव्हता, संयोजकांनी भोसले सरांना विजयी घोषित करायचं ठरवलं, पण सरांनी नम्रपणे नकार दिला, स्वतः बेंडखळे सरांना फोन केला, ते कुठे आहेत त्याची खातरजमा करून घेतली आणि कोणाला तरी पाठवून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन आले.

बेंडखळे सरांचा अवतार पाहण्यासारखा होता, डोळे तांबडेभडक – आता ते झोप न झाल्याने का नशेने, ते सांगता येत नव्हतं, कपडे चुरगळलेले, दाढीचे खुंट वाढलेले.

सामना सुरू झाला. मीही थोडाफार बुद्धीबळ खेळतो, चौथ्या राऊंडला भोसले सरांनीच मला हरवलं होतं आणि पहिल्या दहा पंधरा खेळींतच माझ्या लक्षात आलं, की भोसले सर नीट खेळत नाहीयेत.

दोन तीनदा त्यांनी बेंडखळे सरांचे मोहरे मारायची संधी असूनही ते मारले नाहीत, एकदा आक्रमणाची जबरदस्त संधी असूनही त्यांनी उलट बचावात्मक castling केलं. मी नीट लक्ष देऊन पाहू लागलो. अर्ध्या तासानंतर बेंडखळे सर सावधचित्त झाले, चांगले खेळू लागले आणि सामना जिंकलेही – भोसले सरांनी त्यांना सामना जिंकू दिला, असंच खरंतर म्हणावे लागेल.

अभिनंदन करताना, भोसले सर बेंडखळे सरांच्या कानात म्हणाले, “उत्तम, आजपासून झालं गेलं ते विसरून जा. नवा डाव सुरू करा, आधीच्या चुका पुन्हा करू नका. त्या कालच्या तक्रारदारांना आठवड्याभरात सर्व कर्ज रक्कम परत करण्याचा दम भरला आहे मी. पण आता तुम्ही तुमच्या नावाला जागा, उत्तम कामगिरी करा. ” मी शेजारीच उभा होतो, शब्दन् शब्द ऐकला मी.

सुदैवाने, बेंडखळे सरांनी तो सल्ला मनावर घेतला. बुद्धिमान ते होतेच, आता त्यांनी करीअरवर लक्ष केंद्रित केलं, बढत्या मिळत गेल्या आणि आज ते महाप्रबंधक आहेत. “

ये अंदरकी बात ऐकून, मी स्तब्धच झालो.

भोसले सरांशी झालेल्या पुढच्या भेटीत जेव्हा बँकेचा आणि ओघाओघाने बेंडखळे सरांचा विषय निघाला, तेव्हा भोसले सरच आपणहून म्हणाले, “गेल्या वेळेला, मी तुम्हाला बेंडखळे सरांबाबतची, इतर कोणाला माहित नसलेली गोष्ट सांगत होतो, त्या दिवशी सांगायची राहूनच गेली. “

मी कान टवकारले, आता आपण बेंडखळेला कसं सुधारलं, वाचवलं, त्याचं आयुष्य पुन्हा कसं मार्गावर आणलं हे भोसले सर सांगणार या उत्कंठेने मी ऐकू लागलो.

“अहो, बुद्धीबळ स्पर्धेची अंतिम फेरी. माझ्याशीच लढत होती. आणि आदल्या रात्रीच बेंडखळे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झालेली, बँकेत चौकशीचा ससेमिरा लागणार अशी परिस्थिती आणि तरी हा पठ्ठ्या आला, अप्रतिम बुद्धीबळ खेळला, आणि चॅम्पियनशिप जिंकून गेला.

ती पोलीस कंप्लेंट मागे घेतली गेली, बेंडखळे यांनी दिलेल्या कर्जाची पूर्ण वसूली झाल्याने बँकेने चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, आणि तिथून मग बेंडखळे यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. ग्रेट स्टोरी.

बरं का, तुम्ही लेखक आहात. तुम्ही आवर्जून या दडलेल्या गोष्टीबद्दल लिहा, ” भोसले सर सांगत होते आणि या प्रसिद्धीपरांSमुख माणसाचं निरपेक्ष बोलणं मी तोंड उघडं टाकून ऐकत होतो.

(काल्पनिक कथा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घराचे वय… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ घराचे वय☆ स्वप्ना मुळे (मायी)

आज सकाळपासून ती तापाने फणफणली होती. कालच डॉक्टरांनी अगदी कडक शब्दात सांगितलं होतं, ‘दोन दिवस फक्त आरामच करायचा’ त्यामुळे अभयने आपल्या मावशीला गावाकडून बोलावून घेतलं होतं. गाव तसं तासभर अंतरावर होतं. छोटीशी शेती, घर सांभाळत मावशी एकटी रहात होती.

ठेंगणी, ठुसकी गोरी गोमटी मावशी अभयच्या एका फोनवर सकाळीच दारात हजर. तेंव्हा बाईसाहेबांचं कुरकुरत, वाकत कपबश्या विसळणं सुरू होतं. पोरं शाळेत निघून गेले होते. मावशीने लगेच तिच्या हातातुन कप काढून घेत तिला रूममध्ये झोपायला पाठवलं.

अभय कुरकुरत मावशीला म्हणाला, “अगं फार चिडचिड करत असते ही पसारा, पसारा म्हणत… आता तू जरा समजव तिला, तब्येत बघ कशी झालीये तिची. कालच डॉक्टर म्हणालेत ‘जरा दोन कामं कमी करून आराम करत जा, म्हणजे शरीराला शीण येणार नाही आणि दोन चार महिन्याला असा ताप येणार नाही’ पण ही बया ऐकेल तर. …”

मावशी हसुन म्हणाली, “अरे असंच असत. बायकांना सगळ्याच डगरीवर हात ठेवावा वाटतो. आता आहे मी आठवडाभर, सांगते तिला समजावून. चल तुला डबा भरून देते तू निघ उशीर होईल तुला… “

अभय गेला. मावशीने मस्त आल्याचा चहा बनवला आणि आली रूपाच्या खोलीत. रूपा उठून बसली, “मावशी, अहो चहा कशाला केलात.. ?”

“घे गं, तेवढंच फ्रेश वाटेल तुला… रोज नोकरी, मुलांचं, नवऱ्याचं आणि घराचं करून दमत असशील ना… ” 

मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिला रडूच आलं. “खरं आहे मावशी, खुप थकून जाते मी… कदाचित म्हणूनच शरीर असे दुखणे काढत असेल आरामासाठी, पण काय करणार मावशी, घरात इतका पसारा होतो ना, की खुप वेळ तर माझा घर आवरण्यातच जातो… “

मावशी हसुन म्हणाली, “प्रत्येक घराचं ना वय असतं, ते स्वीकारायला शिकता आलंना मग त्रास होत नाही पसाऱ्याचा… “

तिला कळेना नेमकं काय म्हणायचं आहे मावशींना आणि घराला वय म्हणजे.. ??

मावशींच्या लक्षात आलं.. हिला घराचं वय कळलं नाही… मावशी हसुन म्हणाली, “तू प्राजक्ताकडे जातेस ना, म्हणजे माझी सून गं, नोकरीमुळे नाही राहत माझ्याकडे… तिच्या घरी तू गेली आहेस ना.. ” 

मावशीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, “हो, घरभर खेळणी पसरलेल्या असतात. अगदी उड्या मारून जायची वेळ येते हं! अश्या घराचं वय 1 ते 5 वर्ष… आता तुझ्याकडे आहे का असा पसारा? नाही ना?.

आता तुझ्याकडे गोष्टींची पुस्तकं… रंग, खडू, रंगीत कागद आणि कपडे… म्हणजे तुझ्या घराचं वय आहे 6 ते 15…

आपल्या सुनीलकडे, म्हणजे माझ्या पुतण्याकडे सगळीकडे फोन, चार्जर, कपडे, पुस्तकं… बुटांचे, चपलांचे जोड… ते वेगवेगळे स्प्रे.. ह्याचाच पसारा.. कारण त्या घरचं वय 15 ते 20, आणि आता माझंच घर बघ, काही पसारा नाही, कारण पिल्लं गेलेत गं उडून घरट्यातून, मग कोण पसारा करतंय… सगळं चित्रातल्या सारखं आहे… काही हलत नाही.

मला फार वाटतं.. कसे कसे वय होऊन गेले घराचे… पण आता हे बिनपसाऱ्याचं म्हातारपण पेलवत नाही… म्हणून त्या घरचं ते वय. छान आनंदाने स्वीकारायला शिक कारण आपण बायका उगीच चिडचिड करून सगळ्यांना बेजार करतो आणि हे सगळं समोर असलं ना तर मुलं त्याला हात लावतात, ठेवून दिलं की गेलं नजरे आड…

थोडी फार आवरा आवर ठिक, पण त्यासाठी अगदी दमछाक करून असं आजारपण नको गं… घराचे हे वय परत येत नाही. पिल्लं आहेत तेव्हाच घराची ही मजा अनुभवायची असते… मग आहेच आपलं म्हातारपणीच शांत आणि स्वच्छ घर…

तिलाही पटलं मावशींचं म्हणणं आणि खरंच आठवलं मुलांचं बालपण. सगळीकडे खेळणे… बाहुल्या, सायकली… आता सगळे पुस्तकं, रंग… पण आता मावशींनी घराच्या वयाची दृष्टी दिल्याने नकळत तिला तो पसारा वाटत नव्हता तर घर सजावटीच सामानच वाटत होतं… ती हसुन म्हणत होती 6 ते 15 वयातल आहे माझं घरं… आणि कौतुकानं घराकडे पहात होती.

कुरकुऱ्या स्वभावामुळे स्वतःलाच होणाऱ्या त्रासामुळे वाटत असलेलं तीचं आजारपण कुठल्याकुठे पळून गेलं व मावशीचा पाहुणचार करत आनंदात दिवस जावू लागल्याने घराचं आयुष्य अजूनच तरुण झालं आणि अभय ला ही हायसं वाटलं.

घराचं वय असू शकतं आणि ते आपण अनुभवायचं असतं ही कल्पना भन्नाट खरी, पण खूssssपच गोड !!! नाही का ?

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निश्चयाचे बळ… – भाग – २ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ निश्चयाचे बळ… – भाग – २ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

(पलीकडच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींबरोबर ती सकाळची फिरायला जाऊ लागली. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये केंव्हाच मिसळून गेली. सकाळच्या वाऱ्याबरोबर, व्यायामाबरोबर हास्यविनोद, तिला उत्साहाचे आनंदाचे टॉनिक मिळू लागले. पुन्हा विनय उठायच्या वेळी घरी येऊन चहा करायला ती हजर असायची.) 

इथून पुढे – –

एकदा ग्रुपमधल्या मीनाताईंनी त्यांच्या चार वर्षाचाच्या नातवाची मजेशीर गोष्ट सांगितली. ती आठवंत हसऱ्या चेहऱ्याने सुनंदा घराकडे येत होती. एकदा ग्रुपमधल्या मीनाताईंनी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाची मजेशीर गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की एकदा चिकू खाल्ल्यानंतर सौरभने -त्यांच्या नातवाने- चिकूच्या बिया आपण कुंडीत रूजत घालूया म्हणजे त्याला झाड येऊन आपल्याला छान चिकू खायला मिळतील. असा हट्ट धरला तेव्हा मीनाताईंनी त्याला समजावले की चिकूचे झाड मोठे होते ते कुंडीत होणार नाही. आपण खाली कंपाऊंडच्या कडेला या बिया लावूया. बिया लावून त्या भोवती दगड ठेवून सौरभ तिथे रोज पाणी घालत असे. तळमजल्यावर राहणाऱ्या गोरे आजी त्याला पाणी घालायला देत असत. एकदा आजी त्याला म्हणाल्या अरे सौरभ मी तुला रोज तुझ्या चिकूच्या झाडाला घालायला पाणी देते. मग तुझ्या झाडावर चिकू आले की मला देशील ना चिकू? तर एक मिनिट विचार करून सौरभ उत्तरला झाडाला चिकू आले की मी तुमचं पाणी परत करेन. हे ऐकल्यावर ग्रुपमध्ये हसण्याचा एकच खळखळात झाला होता. आनंदी प्रसन्न चेहऱ्याने सुनंदा घरात शिरली होती. त्या विनोदाचा मूड मनावर होता. चहा घेता घेता ती हसत हसत सौरभचे मजेशीर उत्तर सांगू लागली. मध्येच विनय खेकसला मॉर्निंग वॉकच्या नावाखाली असला धूडगूस घालायला बरी सवकली आहेस. सुनंदाने पुढचे शब्दआणि डोळ्यातले पाणी गिळून टाकले. मनात निश्चय केला की यापुढे घरात येताना बाहेरचे जग बाहेरच ठेवून यायचं. नाहीतर काहीतरी कारण काढून हा मनाला उभारी देणारा आनंदसुद्धा बंद होईल.

मागच्या महिन्यात तर विनयने कहरच केला होता. विनयचे आजारपण, त्याचे घालून पाडून बोलणे यामुळे चारू अलीकडे माहेरी येण्याचे टाळत असे. आणि तिच्या छोट्या सुदीपला सांभाळायला छान मावशी. मिळाल्या होत्या. जोडून सुट्टी होती म्हणून सुनंदाच्या आग्रहाखातर ती राहायला आली होती. मायलेकींच्या मजेत गप्पा चालू होत्या. सुदीप केंव्हा झोपेतून उठून रडायला लागला ते कळलंच नाही. माय लेकींचे हसणे आणि सुदीपचे रडणे सहन न होऊन शुभेच्छा पाठीत घातला की ते पोर कळवळून आणखी रडायला लागले. सुनंदा कावरीबावरी झाली. चारूने सुदीपला जवळ घेऊन त्याची समजून घातली. त्याला शांत केले आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा हसत मुखाने निरोप घेऊन काढता पाय घेतला. आत्तासुद्धा सुनंदा पंधरा दिवस जायचं म्हणते आहे ते चारूच्या जीवावर. आईला पंधरा दिवस चांगला बदल होईल, ताई मावशीची सोबत आहे, सुजलच्या लग्नाला या दोघी हजर राहतील तर सविता मावशीलाही आनंद होईल. शिवाय दुबई आणि इंग्लंडही पाहून होईल. म्हणूनच चारूनेही आईला जाण्यासाठी गळ घातली होत गेली सात आठ वर्ष ती आईची अवस्था पहात होती. ती बाबांना स्वतःकडे राहायला घेऊन जाणार होती. सुदीपला सांभाळणाऱ्या मावशी महिनाभर रजेवर जाणार होत्या. म्हणून तेव्हा चारुही महिनाभर रजा घेणार होती. आणि अनायसे आईच्या जाण्याची वेळही तीच होती. सर्वांनाच थोडा आवश्यक तो बदल झाला असता. पण विनयची कसल्याचं तडजोडीला तयारी नव्हती. चारूकडे मला करमत नाही. तिच्याकडून डॉक्टर लांब पडतील, जावयाकडे कुठे इतके दिवस राहू, चारूला माझं पथ्यपाणी, औषधपाणी सांभाळायला जमेल का? यापेक्षा तूच जाऊ नको असा त्याचा हट्ट वाढत होता. आणि जसा जसा त्याचा विरोध वाढत होता तसा सुनंदाचा जाण्याचा निश्चय वाढत त्याचा विरोध झाला होता तसा तसा सुनंदाचा जाण्याचा निश्चय ठाम होत होता. काय झालं मी फक्त पंधरा दिवस जाऊन आले तर? आत्ता ताईच्या सोबतीने नाही गेले तर पुन्हा कधीच ही संधी कधीच मिळणार नाही. थोडी दुबई बघायला मिळेल. भाचीच्या लग्नाला हजर राहता येईल. आणि पंधरा दिवसांनी मी येणार आहेच ना परत! मी माझी जबाबदारी टाळत नाही. विनय येऊ शकत नाही याचे मलाही वाईट वाटत आहे. त्याचवेळी तिला इतके दिवस केलेली खटपट वाऱ्यावर सोडून द्यायची नव्हती आणि विनयच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्यही बघायचे नव्हते. तिला ताईकडे भरगच्च अहेर करायचा होता. दुबईत मृणालकडे छान गिफ्ट द्यायची होती. शिवाय मौज मजेने पंधरा दिवस मुक्त फिरायचे होते..

क***** ढगातून लख्ख लखन तसे तिला एकदम आठवले त्यांच्या फॅक्टरीच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता या त्या दिवशी पाठ दुखीने हैराण झाल्यामुळे विनय वकिलांबरोबर जाऊ शकत नव्हता. व्यवहार तर त्याच दिवशी पूर्ण करायला हवा होता. शेवटी धंद्यामध्ये पार्टनर असलेल्या सुनंदाने वकिलांबरोबर जावे असे ठरले. त्यावेळी वकिलांनी जरूर लागली तर असू दे एक तुमच्या सहीचा पोरा कागद चेक असे म्हणून विनयची एका कोरिया चेक कर सही घेऊन ठेवली होती नंतर विणायचे ऑपरेशन हॉस्पिटल या गडबडीत ते सारे कागदपत्र तसेच ठेवलेले होते सुनंदा काढणार होती ती रक्कम तशी मोठी होती आणि बँकेच्या नियमांप्रमाणे बँक दुसऱ्या अकाउंट होणार ला कन्फर्मेशन विचारण्याची शक्यता दाट होती. आणि विनायक कडून कन्फर्मेशन मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. विनयची अजिबात गैरसोय होत नाहीये मग काय झालं मी गेले पंधरा दिवस तर? असा विचार करून सुनंदाने विनयच्या विरोधाला डावलून ताईबरोबर जाण्याची तयारी सुरू केली. अकस्मात तिला हे सारे आठवले आणि तो विनयच्या सहीचा कोरा चेक तिला मिळाला तिचा आनंद गगनात मावेनासा झाला

त्याचवेळी तिला इतके दिवसांची तिची धडपड खटपट अशी वाऱ्यावर सोडून द्यायची नव्हती.

आता यातून कसा मार्ग काढायचा या विचारांमध्ये तिला एकदम आठवले की त्यांच्या फॅक्टरीच्या विक्रीच्या व्यवहार पूर्ण होणार होता त्या दिवशी पाठ दुखीने हैराण झाल्यामुळे विनय वकीलांबरोबर जाऊ शकत नव्हता. व्यवहार तर त्याच दिवशी पूर्ण करायला हवा होता. शेवटी धंद्यामध्ये पार्टनर असलेल्या वकिलांबरोबर जावे असे ठरले त्यावेळी वकीलांनी जरूर लागली तर असू दे एक तुमच्या सहीचा कोरा चेक असे म्हणून विनयची एका कोऱ्या चेकवर सही घेऊन ठेवली होती. नंतर विनयचे ऑपरेशन हॉस्पिटल या गडबडीत ते सारे कागदपत्र तसेच ठेवलेले होते. आता अकस्मात ते सारे सुनंदाला आठवले. आणि विनयच्या सहीचा चेक घेऊन तिने उद्या सकाळी निलेशला भेटायचे ठरले. त्या चेकवर स्वतःची सही करून तो चेक बँकेत देणार होती आणि तिचे स्वप्न पूर्ण होणार होते.

अंथरुणावर पडल्या पडल्या सुनंदा विचार करू लागली कुठची बॅग न्यावी बरं प्रवासाला? लग्नासाठी कुठल्या कुठल्या साड्या घ्याव्या? आहेर काय करावा? मृणालसाठी काय भेट द्यावी? मनातल्या या विचारांनी तिला एकदम दचकायला झाले. अपराधी वाटले. पण दुसरे मन तिची समजूत घालू लागले, अग पंधरा दिवसांनी येणारच आहेस ना तू या घरट्यात परत! उलट या पंधरा दिवसांच्या मोकळ्या मुक्त हवेमुळे तुझ्या पंखांमध्ये चांगले बळ येईल तुझे कर्तव्य पार पाडण्यासाठी. झोप शांतपणे. रोजच्यासारखं लवकर उठून फिरायला जायचं ना? निलेशजवळ तो चेक द्यायचाय ना !

समाप्त  

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निश्चयाचे बळ… – भाग – १ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ निश्चयाचे बळ… – भाग – १ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

सुनंदाने आवाज न करता कपाटाचे दार लावले. पलंगावर शांतपणे घोरत असलेल्या विनयकडे एक नजर टाकून ती हॉलमध्ये आली. तिने लहान दिवा लावला आणि कपाटाच्या लॉकरमधून काढलेले त्यांच्या वर्कशॉपच्या विक्रीचे कागदपत्र भराभर चाळले. तिला अपेक्षित असलेला विनयच्या सहीचा एक कोरा चेक पाहून तिचे हृदय आनंदाने धडधडू लागले तिला थोडीशी भीतीही वाटली. बाकीचे कागदपत्र होते तसेच बांधून तिने हलकेच कपाटात ठेवले. विनयच्या सहीचा कोरा चेक छोट्या पर्समध्ये ठेवला. उद्या सकाळी फिरायला जायच्या रस्त्यावर तिला निलेश म्हणजे तिच्या ताईचा मुलगा भेटणार होता. निलेशला तो चेक दिल्यावर मग सुनंदाच्या मार्गातला अडथळा दूर होणार होता. खूप खूप दिवसांची तिची इच्छा पूर्ण होणार होती.

पाणी पिऊन सुनंदा अंथरुणावर पडली पण झोप येत नव्हती. आपण करीत आहोत ते चूक की बरोबर हा गेल्या दोन महिन्यांचा गोंधळ पुन्हा तिच्या मनात गोंधळ घालू लागला. दोन महिन्यापूर्वी सविताचा मँचेस्टरहून फोन आला होता तिच्या लेकीचे सुजलचे लग्न ठरले होते त्यासाठी तिने आग्रहाने सुनंदाला मँचेस्टरला बोलावले होते. सुजाता, सविता आणि सुनंदा या तिघी बहिणी. भाऊ नाही. आणि आता आई-वडीलही नाहीत. सविता इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन वीस वर्षे होऊन गेली होती. ताईकडे म्हणजे सुजाताकडे सविताचा लग्नासाठी बोलावण्याचा फोन गेल्यावर ताई कडच्या लोकांनी तिला आनंदाने परवानगी दिली. एवढेच नाही तर निलेशने त्यांच्या दुबईला असलेल्या मावस बहिणीशी मृणालशी संपर्क साधला होता. मृणालसुद्धा त्यांना किती दिवस दुबईला बोलावित होती. गल़्फ एअरचे तिकीट काढले की या दोघींना चार दिवस दुबईला मृणालकडे राहता येईल. नंतर मँचेस्टरला लग्नाला जाता येईल अशी योजना निलेशने ह्या दोघींसाठी आखली होती. सुनंदाला वाटलं खरंच किती छान होईल सारे जुळून आले तर! खूप वर्षं झाली आहेत आपल्याला असे घराबाहेर मोकळेपणाने हिंडून आल्याला.

सुनंदाने भीत भीत सविताच्या फोनविषयी विनयला सांगितले. ताई लग्नाला जाणार आहे आणि माझीपण जायची इच्छा आहे असे म्हटले मात्र, अपेक्षेप्रमाणे विनयचे आकांड- तांडव सुरू झाले. किती बदलला आहे विनय! मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे?अहंमन्य स्वभावाला धक्का लागल्यामुळे? की आजारपणामुळे?सुनंदाला पूर्वीचे दिवस आठवले 

धडपड्या स्वभावाच्या हुशार विनयने नोकरी सोडून एका छोट्याशा स्वंय उद्योगाचा श्री गणेशा केला होता. मेहनतीने आणि हुशारीने यशाच्या पायऱ्या चढत कॉम्प्युटर पार्टच्या उद्योगात त्याने चांगले यश मिळवले होते. स्वतःच्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान होता. त्याने सुनंदाला नोकरी सोडायला लावली होती. विनयचे कौतुक करताना, त्याच्या मनाप्रमाणे सारे करताना, त्याच्या अहंभावाला खतपाणी घालताना सुनंदा आनंदात होती. विनयच्या शेजारी गाडीत मोऱ्याचा गजरा माळून बसताना, नाटक सिनेमाला जाताना मित्र-मैत्रिणींकडे जाताना तृप्तीची साय- साखर तिच्या मनात विरघळत असायची.

सुट्टीसाठी किंवा काही लग्न कार्यासाठी सविता इकडे आली की तिघी बहीणींच्या गळाभेटी होत. गप्पांना वेळ अपुरा पडे. आपल्याकडे सविता नेहमी आपल्या बहिणींना व बाकी सर्वांना तिकडे घेण्याचा आग्रह करत असे. पण योग आला नव्हता. मुळात विनयला अशी फिरण्याची आवड नव्हती. सुनंदा विनयच्या एकुलत्या एका लेकीच्या, चारूच्या लग्नाला सविता आवर्जून सहपरिवार आली होती. कार्यानंतर निघताना सविताने नेहमीप्रमाणे सर्वांना मँचेस्टरला यायचे आमंत्रण दिले. तिचे मिस्टर विनयला उद्देशून म्हणाले की आता तुमची मोठी जबाबदारी पार पडलीय तर या मुद्दाम तिकडे फिरायला.

छे, छे! माझ्यजवळ असल्या उनाडक्यांसाठी वेळ नाही. असे सर्वांसमोर लागट उत्तर दिले होते. गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुनंदाला डोळ्यातले पाणी लपवीत काहीतरी हसून बोलून वेळ साजरी करावी लागली.

विनयच्या धंद्यातली परिस्थिती एकाएकी बदलू लागली. एका जवळच्या मित्रावर टाकलेला फाजील विश्वास नडला. त्याच वेळी चिनी मालाने बाजारपेठा वाहू लागल्या. स्वस्त पण तकलादू माल लोकांना भुरळ घालू लागला. इथले सारे ॓शासकीय व्यवहार ॔सांभाळून या स्पर्धेला तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागली. धंद्याची गाडी उतरणीला लागली. सुनंदाने काही विचारले की तुला काय यातले कळते गप्प बस. अशी घालून पाडून बोलणी सुरू झाली. मानहानी सुरू झाली. नोकरी सोडल्यानंतर गाडीच्या, ऑफिसच्या मैत्रिणी दुरावल्या होत्या. विनयचे मित्र मैत्रिणींचे ग्रुप तेच आपले ग्रुप मानून सुनंदा त्यांच्यात रमत होती. आता हळूहळू त्याचे मित्रांचे ग्रुप दुरावले. उच्च रक्तदाब आणि मधुमेह त्याची सोबती झाले. अलीकडे पाठदुखीनेही त्याला बेजार केले. एक दिवस दोघं नेहमीच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले असताना तिथेच विनयला अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांनी तपासून लगेच ॲम्बुलन्सची व्यवस्था करून त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. एन्जीओग्राफीनंतर डॉक्टरांनी एन्जओप्लास्टीचा निर्णय घेतला. त्वरित वैद्यकीय सहाय्य आणि तज्ज्ञ डॉक्टर यामुळे विनय या साऱ्यातून सुखरूप बाहेर पडला. वर्कशॉपच्या विक्रीतून चांगले पैसे मिळाले होते. त्यामुळे पैशावाचून तरी काही अडले नव्हते.

गेली सहा सात वर्षं सुनंदाला विनयशिवाय दुसरे विश्व नव्हते. त्याचे पथ्यपाणी, औषधपाणी डॉक्टरांकडील खेपा सांभाळत ती सांभाळत होती. पण त्याच्या चिडचिड्या संशयित, हट्टी स्वभावात भरच पडत होती. त्याचा स्वभावातला बदल ओळखून डॉक्टरांनी त्याला रोज रात्री झोपेची गोळी घ्यायला सांगितली होती. त्यामुळे निदान रात्रीची झोप तरी शांत लागत होती. सुनंदाचीसुद्धा आता साठी उलटून गेली होती. चार महिन्यापूर्वी थोडी चक्कर आल्यासारखे वाटले. डॉक्टरांनी तिला सर्व तपासण्या करून घ्यायला सांगितले होते. त्यात तिची शुगर थोडी वाढल्याचे कळलं. गोड कमी खाणे या उपायाबरोबरच डॉक्टरांनी तिला सकाळच्या मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करायला सांगितला होता. पलीकडच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींबरोबर ती सकाळची फिरायला जाऊ लागली. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये केंव्हाच मिसळून गेली. सकाळच्या वाऱ्याबरोबर, व्यायामाबरोबर हास्यविनोद, तिला उत्साहाचे आनंदाचे टॉनिक मिळू लागले. पुन्हा विनय उठायच्या वेळी घरी येऊन चहा करायला ती हजर असायची.

– क्रमशः भाग पहिला 

© पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाती गुंतागुंतीची… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नाती गुंतागुंतीची… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अनुजा, ये उद्या जेवायलाच. भावाच्या घरी आमंत्रण लागतं हो ग?ये बघू रहायलाच. ”.. प्रेमाने अनुजाला दटावत प्राची म्हणाली.) इथून पुढे – – 

अनुजा प्राचीकडे सकाळपासूनच आली.

“ आजही केतनभाईची ड्यूटी का? कधी भेटायचा ग हा मला?”

“ थांब आता तू इथंच. येईल घरी संध्याकाळी. आज एका पार्टीला आमंत्रण आहे. मिसेस चित्रेच्या मुलीचं लग्न झालं ना, तर एका प्रख्यात गायिकेचं गाणं ठेवलंय त्यांनी. मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. पण आता तू आली आहेस तर चल आमच्याबरोबर. माहीत आहे मला, तुला खूप आवडतं शास्त्रीय संगीत.

कोणीतरी फार नावाजलेल्या करुणा मिश्रा म्हणून आहेत बघ ”… प्राची मनापासून आग्रह करत होती तिला.

“ अग काय सांगतेस प्राची? किती मोठ्या महान गायिका आहेत त्या. याच दिल्लीकडच्या बाजूच्या आहेत म्हणे. मग तर मी येणारच. फार सुंदर गातात ग त्या. महाराष्ट्रात फारशा होत नाहीत त्यांच्या मैफिली. पण इकडे अगदी दुर्मिळ आहे बरं त्यांना भेटणंसुद्धा. चल जाऊया आपण. ”

प्राची केतन आणि अनुजा तिघेही कारने हॉलवर पोचले. अतिशय अभिरुचीपूर्ण सजवलेल्या हॉलमध्ये चित्रे कुटुंबाने त्यांचे मनापासून स्वागत केलं.

“ करुणाबाई येतीलच इतक्यात. आम्ही खास निवडक रसिकांसाठी हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे “. अदबीने चित्रे म्हणाले.

हॉल पूर्ण भरला. बाईंचे साथीदार वाद्यांची जुळवाजुळव करू लागले. मागून बाई आल्या. श्रोत्यांना अदबीने नमस्कार करून स्थानापन्न झाल्या… अतिशय भारी सुंदर काठापदराची साडी, कानात लखलखणाऱ्या हिऱ्याच्या कुड्या आणि फक्त हिऱ्याचे लांब मंगळसूत्र त्यांना फार शोभून दिसत होतं. बाई नुकतीच साठी पार केलेल्या वाटतच नव्हत्या.

… गंभीर आवाजात बाईनी षड्ज लावला.

“ मी आता सावनी कल्याण रागातली बंदिश पेश करणारआहे. संध्याकाळ सरत आली आहे. ही बंदिश माझी आई म्हणायची. स्वतः मोगुबाई कुर्डीकरांनी तिला ती शिकवली होती. ” असं म्हणत श्रोत्यांना नम्रपणे नमस्कार करून बाईनी सुरुवात केली,

‘ देव देव सत्संग श्रीरंगा… ‘

सगळं सभागृह त्यानंतर होणाऱ्या अमृतसुरांनी चिंब झालं.

बाईनी दोन तासांनी भैरवीने गाण्याचा समारोप केला. श्रोते त्या स्वर्गीय सुरातून अजून बाहेरच आले नव्हते.

… दुसऱ्या रांगेत बसलेली प्राची मात्र अस्वस्थ होती. यांना मी बघितलं आहे का यापूर्वी ? आणि त्यांचा हा आवाज इतका ओळखीचा का वाटतोय?…

तिच्या कानाशी लागून अनुजा म्हणाली, ” प्राची, अग या बाई रजनी तर नव्हे ? मला तर यांच्या चेहऱ्यात रजनीच दिसतेय. तुला नाही का वाटत?”

– – प्राचीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ”अनुजा, ही नक्की रजनी आहे. करुणा मिश्रा असेलही, पण ही आपली रजनीच वाटतेय मला… येस.. खात्री आहे माझी. “ 

 श्रोत्यांची गर्दी कमी झाल्यावर प्राची आणि अनुजा बाईना भेटायला अंत गेल्या. नमस्कार करून प्राचीनं विचारलं,

“ बाई, एक विचारू? तुम्ही पूर्वीच्या रजनी तर नव्हे?” 

बाई हसल्या आणि म्हणाल्या, “ प्राची मी तुला मगाशीच ओळखलं ग. आणि अनुजा तुलाही. ”

… प्राचीनं पुढे होऊन त्यांना घट्ट मिठी मारली. ‘ रजनी.. रजनी.. ’ दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

“ रजनी, का?का गं असं केलंस त्या वेळी? माझी जराही विचार आला नाही का ग तुझ्या मनात ? “ 

रजनीच्या डोळ्यात पाणी आलं.

“ प्राची, इथं नको. मी ताजमध्ये उतरलेय. उद्याही आहे मी आणि माझे यजमान. तिकडे तुम्ही दोघी या. याल का? मग सगळं सांगते… किती वर्षांचं बोलायचं राहिलंय ना. ”

.. बाई गेल्या. रात्रभर प्राचीला झोप आली नाही. अनुजा गाढ झोपली पण प्राची कितीतरी वेळ तळमळत होती. कधीतरी उशीरा झोप लागली तिला.

सकाळी सगळं आवरून, रजनीसाठी खूप पूर्वी आईने तिच्याजवळ दिलेला सोन्याचा हार, खूप मिठाई घेऊन अनुजा आणि प्राची हॉटेलवर पोचल्या

.. रजनी त्यांची वाटच बघत होती. “ या ग या. ” रजनीने अत्यंत प्रेमाने त्यांचं स्वागत केलं.

प्राची म्हणाली, “ आत्या! मला आईनं सगळं सांगितलं ग, पण किती उशिरा. माझ्या बाळंतपणासाठी ती आली होती तेव्हा सांगितलं. अगं किती वाईट वाटलं मला ते ऐकून. आईलाही फार पश्चाताप झाला ग.. ती फारसं चांगलं नाही वागली तुझ्याशी म्हणून.. मी क्षमा मागते तुझी. ” प्राची रजनीच्या पायाशी वाकली.

“ अगं प्राची.. वेडे, हे काय? अजूनही अशीच भाबडी आहेस बघ. तेव्हाही मला पाठीशी घालणारी, माझी बाजू घेणारी होतीस तू. तर आता ऐक….. “

 – – – “ माझी आई गोवेकरीण होती. अत्यंत सुन्दर आणि उत्तम गाणारी. पण माझे बाबा मला माहीतच नव्हते. आईने कधी मला सांगितलं नाही की मीही विचारलं नाही तिला. मी गोव्याला शिकत होते.

आईकडे भरपूर पैसा होता. माझी आजी पण गाणारीच. आमचं एक मोठं घर अजूनही आहे गोव्याला. पण अचानक दृष्ट लागावी तशी घरातली मोठी माणसं एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडली. माझ्या आईला कॅन्सर झाला. आणि मग या जगात मी एवढीशी लहान मुलगी एकटी पडले. नाईलाजाने माझ्या आईने माझ्या वडिलांना पत्र पाठवलं. पण ते आधीच गेलेले होते….. तुझी आजी किती धीराची बघ. गोव्याला आली, माझ्या आईला, म्हणजे तिच्या सवतीला भेटली. म्हणाली, ‘ मी रजनीला जन्मभर अंतर देणार नाही. आपल्या दोघींचा नवरा तर गेला. पण मी हिला घेऊन जाते. विश्वास ठेव माझ्यावर. ’ तेव्हा आई जराशी सावरली.. पण नंतर काही दिवसात गेलीच. तुझ्या आजीने मला वाढवलं. पण मग तीही फार आजारी पडल्यावर मात्र तिने तुझ्या वडिलांना म्हणजे माझ्या सावत्र भावाला मला न्यायला सांगितलं….. किती फरपट व्हावी ग माझी. ”

रजनीच्या डोळ्यात पाणी आलं. “ तेव्हा दादा मला म्हणाला होता की, तुझ्या वहिनीला हे अजिबात आवडणार नाहीये. जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आणि हो.. मला दादा म्हणायचं नाही. प्राची म्हणते तसे मला बाबा आणि हिला वहिनी नाही.. तर आईच म्हणायचं. मला नसते घोळ आणि लोकांचे सतरा प्रश्न नकोत. ”…

“ मग मी जराशी भीतभीतच तुमच्या घरी आले. वहिनीनं मला कधीच वाईट नाही ग वागवलं. पण कायम एक अंतर मात्र आमच्या दोघीत राहिलं. मी तिच्या नवऱ्याची खूप लहान सावत्र बहीण हेच नातं मनात जपलं होतं तिनं. मला खायला कपड्याला कशाला कमी नाही केलं तिनं. हे त्यांचे उपकारच कायम स्मरते मी.

आणि दादाचीही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. देवाने मला बाकी काही नव्हतंच दिलं. पण माझ्या गळ्यात मात्र त्याने गाणं रुजवूनच पाठवलं होतं. दादाच्या ते लक्षात आलं होतं आणि म्हणून त्याने मला गाण्याच्या क्लासला घातलं… तिथे अगदी मनापासून रमले होते मी….. आणि तिथेच भेटला मला हा उमेश पाटील.. तोही माझ्याच गुरुजींकडे गाणे शिकायला यायचा. खूप सुंदर आवाज उमेशचा. आणि त्याचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती… पण माझ्याहून बरी इतकंच… “ रजनी क्षणभर थांबली आणि सांगू लागली…

“ मी नकळत प्रेमात पडले उमेशच्या… आणि तोही माझ्या. पण घरी कोणत्या तोंडाने सांगू मी हेच मला कळत नव्हतं. तसा उमेश घरचा बरा होता. मुख्य म्हणजे चांगला शिकलेला होता. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला माझ्याशी लग्न करायची परवानगी जन्मात दिली नसती याची खात्री होती त्याला.

म्हणून मग आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. आणि आपल्या घरात तरी दादा वहिनीने हो म्हटलं असतं याची मला खात्री वाटत नव्हती. पण मी कसंतरी धीर गोल केलं आणि तुझ्या बाबांना हे 

सांगितलं. त्याने वहिनीला न कळू देता गुपचूप मला परवानगी दिली. इतकंच नाही तर माझ्या आणि उमेशच्या हातात बरेच पैसे ठेवले. आम्ही गोव्याला जाऊन लग्न करणार म्हटल्यावर तो नंतर तिकडे आला आणि त्यानेच माझं आणि उमेशचं लग्न मंगेशीच्या देवळात लावून दिलं… किती मोठं मन गं त्याचं. आम्ही अगदी मनापासून त्याला नमस्कार केला.. आणि अजूनही मी देवासमोर हात जोडते तेव्हा देवाबरोबर माझ्या दादालाही नमस्कार करते.

“ मी आणि उमेश गोव्यात सात आठ वर्षे राहिलो. मी एका विख्यात गायकाकडे गाणं शिकले. सोपं अजिबातच नाही ग गेलं आम्हाला हे काही. पण माझ्या आईच घर होतं ना रहायला. उमेशने नोकरी केली.

मग मी हळूहळू स्वतंत्र छोटे प्रोग्रॅम्स करायला लागले. गुरुजी नेहेमी म्हणायचे मला की, ‘रजनी, उत्तम गातेस तू. माझी सगळी विद्या तुला दिली आहे मी. तू दिल्लीकडे जा. तिथे तुझ्या कलेचे खरे चीज होईल. ’

… यावर आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि दिल्लीला जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लवकरच उमेशला दिल्लीला छान नोकरी मिळाली. मी गोव्याचं घर विकून टाकलं, त्याचे खूप पैसे आले आम्हाला. इथे मला ओळखणारं कोणी नव्हतं. मी ‘करुणा मिश्रा’ असं नाव घेतलं. हळूहळू ‘ एक चांगली गायिका’ म्हणून माझं नाव व्हायला लागलं. मी मग रेडिओ स्टार झाले. इथल्या मानाच्या कार्येक्रमात मला सन्मानाने बोलावणी येऊ लागली. प्राची अगं मी आपल्या पुण्यातल्या सवाई गन्धर्वलाही येऊन वाहवा मिळवून गेलेय. तेव्हा खूप खूप वाटलं.. तुम्हा सगळ्यांना भेटावं.. न सांगता अचानक घर सोडून निघून गेल्याबद्दल पाय धरून माफी मागावी.. तिथून गेल्यानंतरचा माझा सगळा प्रवास सांगावा.. पण घरी यायचं धैर्यच नाही झालं गं मला… अत्यंत कष्ट केले आम्ही त्या काळात. उमेशची मला कायम साथ होती या सर्व प्रवासात.. आणि आता अगदी शांत.. स्वस्थ आयुष्य जगते आहे मी. ”… रजनीने थकून जाऊन डोळे मिटले.

तितक्यात आतून एक अत्यंत रुबाबदार पुरुष बाहेर आला… “ मी उमेश मिश्रा. तुमच्या आत्याबाईंचा नवरा. ”

प्राचीने त्यांना नमस्कार केला.

“ आता मी काय बोलू हे कळतच नाहीये बघ मला.. हे सगळंच किती अनपेक्षित आहे माझ्यासाठी.. तुला असं अचानक भेटून मला खरंच फार फार आनंद झालाय् रजनीताई… हो तू अजूनही ताईच आहेस माझी.. पूर्वीसारखी. ”.

“ हो गं.. आणि तू माझी तीच लहानशी बहीण. आणि दादा-वहिनी कसे आहेत गं ? माझी आई झालेली माझी वहिनी कशी आहे ?मी तिची आभारी फार फार आहे खरंच. मला तिने आधार दिला. नाहीतर मी काय केलं असतं या जगात? माझा तिच्यावर अजिबात राग नाही ग प्राची. आता तुझ्याकडे ते आले की मला नक्की फोन कर. मी न्यायला येईन त्यांना माझ्या घरी. आता तू दिल्लीत आहेस तर कायम भेटत राहू आपण. मी दिल्लीपासून दूर रहाते जरा. तिथे माझं छानसं घर आहे… नक्की म्हणजे नक्की ये त्यांना घेऊन माझ्या घरी.. मी आत्तापासूनच वाट बघायला लागले आहे बघ त्यांची.. ” असं म्हणत तिने प्राचीला घट्ट मिठी मारली.

– – प्राचीने बरोबर आणलेला सोन्याचा हार, सुंदर साडी आणि मिठाई तिच्या हातात ठेवली. “ हा हार तुझ्या दुसऱ्या आईने.. म्हणजे माझ्या आजीने तुझ्यासाठी ठेवलेला होता. घे… नाही म्हणू नको. ” दोघींचे डोळे पाणावले..

जराशाने प्राची म्हणाली, “ ताई किती गुंतागुंतीची आपली नाती ग. देवदयेने तुझं फार चांगलं झालं. मला अतिशय आनंद झाला हे पाहून.. आणि हो.. तुझं स्वर्गीय गाणं ऐकूनही. आता आईबाबा आले की नक्की भेटू आपण. त्यांनाही खूप आनंद होईल तुला भेटून.. ” 

पुन्हा एकदा रजनीला घट्ट मिठी मारून डोळे पुसत प्राची घरी जायला निघाली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातलेसुध्दा ‘त्या’चा अलौकिक स्पर्श अनुभवास आलेले अनेक प्रसंग आहेत. ताईच्या संदर्भातला हा प्रसंग त्यातलाच एक प्रातिनिधिक प्रसंग म्हणता येईल. यानंतरचा पुढे कांही वर्षांनी आलेला असाच उत्कट अनुभव देणारा प्रसंगही माझ्या मनावर कोरला गेलेला आहे!)

एका जीवघेण्या अशा सार्वत्रिक संकटाच्या पार्श्वभूमीवरचा तो प्रसंग! जितका भयावह तितकाच चित्तथरारक!

सांगली-कोल्हापूर सारख्या नदीकाठी वसलेल्या शहरांबरोबरच नदीपात्रा जवळच्या अनेक खेडेगावांना उध्वस्त करून गेलेल्या २००५ सालच्या महापुराचा भयावह अनुभव इतिहासजमा झालाय हे गृहीत धरलेल्या आम्हा सर्वांना पुढे अनेक वर्षांनी त्यापेक्षाही जास्त हादरवून सोडलं ते २०१९ सालच्या महापुराने!

६ ऑगस्ट२०१९ ची ती काळरात्र मी कधीच विसरणं शक्य नाही.

कोयना धरण होण्यापूर्वी नद्यांना येणारे पूर ही नदीकाठच्या गावांसाठी त्याकाळी नित्याचीच बाब असे. धरण झाल्यानंतर मात्र नदीचं पाणी वाढलं तरी पुराने घातलेला हैदोस आणि त्याची भयावहता तशी कालबाह्यच झाली होती. त्यानंतर जवळजवळ सहा दशकांचा मधला प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर २००५ साली अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आम्हा सांगलीकरांना हादरवून गेला होता खरा पण तो आमच्या दृष्टीने अपवादात्मकच ठरला. कारण त्यानंतर पुढची सलग १४ वर्षे तो कधीच इकडे फिरकला नव्हता. त्याने अचानक घाला घातला तो खूप नंतर थेट २०१९ च्या पावसाळ्यांत!

तरीही या वेळचा पाऊस २००५ सारखा अतिवृष्टी सदृश नसल्याने आणि तो आधीचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचं फारसं दडपण लगेच जाणवलं नव्हतं हे खरं, पण पाणीपातळीत कणाकणाने होणारी वाढ हळूहळू वातावरण तापवू लागलीच. २००५ साली काळ ठरलेला जून महिनाही यावेळी उलटून गेला, पावसाचा जोरही अधून मधून कमी होऊ लागला त्यामुळे आता स्थलांतर करायची वेळ तरी येणार नाही असंच वाटत होतं.जुलै संपत आला तेव्हापासून मात्र एक दोनदा येणारी उघडीपही नाहीशी झाली. ४ ऑगस्टपासून धुवांधार पावसामुळे वातावरणाबरोबरच मनातली स्वस्थताही गढूळ होऊ लागली. तरीही ५ आॅगस्ट उजाडला तेव्हाही हरिपूर रस्त्याच्या अलिकडून सांगलीहून हरिपूरला वाहणारं नदीचं पात्र बऱ्यापैकी खोल असल्याने पाणी अद्याप पात्राबाहेर पडलेलं नव्हतं.ते बाहेर पडेल तेव्हा बराच चढ चढून हरिपूर रोडला पाण्याने स्पर्श करण्याइतकी पाण्याची पातळी वाढण्यासारखी परिस्थिती तोवर तरी निर्माण झालेली नव्हतीच.आता पाऊसही अधून मधून ओसरू लागला होता.पावसाची तीव्रताही कमी झालेली.पण धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू झाला, धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जायची शक्यता निर्माण झाली, प्रशासनाकडूनही धोक्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि अचानक ५ ऑगस्टची ती मध्यरात्रच काळरात्र ठरली!!

हरीपूर रोडवरील विनायकनगर येथे आमचा बंगला रोडपासून थोडा आत ४ थ्या गल्लीत होता. त्यातील ग्राऊंड फ्लोअरवर किचन, देवघर आणि आमची बेडरूम. दोन्ही नाती आणि अनघा/सलिल यांच्या बेडरुम्स् पहिल्या मजल्यावर. सर्वांची रात्रीची जेवणं आवरली. निजानीज झाली आणि आम्ही गाढ झोपेत असतानाच सलिलच्या हाकांच्या आवाजाने आम्ही दचकून जागे झालो.

“बाबा, हरिपूर रोड क्राॅस करून नुकतंच पाणी पुढं आलंय. कॉलनीतले आम्ही बरेच जण जागे राहून थोड्या थोड्या वेळाने आळीपाळीने पुढंपर्यंत जाऊन बघून येत होतो.आपण आता शक्य तितक्या लवकर इथून निघायला हवंय. तुम्ही दोघेही फ्रेश व्हा. सोबत घ्यायचं सामान बघून बॅग भरुन तयार ठेवा. तोवर आम्हीही आमचं आवरतोय.” तो म्हणाला.

पहाटेचे तेव्हा तीन वाजून गेले होते.कां, कसं वगैरे विचारत बसायची ती वेळ नव्हती. वाईटातली चांगली अशी एकच गोष्ट म्हणजे बाहेर पडून जायचं कुठं? हा प्रश्न आमच्यापुरता आधीच सुटलेला होता. सलिलच्या मावशीचा सुसज्ज फ्लॅट पूरक्षेत्राबाहेर असलेल्या विश्रामबागच्या वाटेवरच्या गुलमोहर काॅलनीत होता.त्यांचं सध्याचं वास्तव्य पुण्यात मुलाकडे असल्याने फ्लॅट बंदच होता. त्याची एक किल्ली आमच्याकडेच होती. मावशीला इथल्या परिस्थितीची कल्पना होती आणि सलिलशीही तिचं फोनवर याबाबत बोलणं झालंच होतं.सलिल/अनघाने अचानक यावंच लागलं तर गैरसोय नको म्हणून दोन दिवस आधीच तिथे जाऊन तो फ्लॅट झाडून स्वच्छ करून ठेवला होता. आमच्या बॅगा भरून झाल्या तेव्हा पहाटेचे सहा वाजत आले होते. त्यापूर्वीच आम्हा सर्वांच्या टू व्हिलर्स त्या दोघांनी दोन हेलपाटे घालून त्या फ्लॅटच्या पार्किंगमधे नेऊन ठेवल्या होत्या. आणि आता आम्हा सर्वांना कारने तिथे सोडून ते दोघे बाकीची जमेल तेवढी आवराआवर करायला पुन्हा इथे परत येणार होते.

आम्हाला फ्लॅटवर पोचवून ते दोघे लगेच परत निघाले तोवर मधे फार तर पंधरा-वीस मिनिटेच गेली असतील. ज्या रस्त्याने आम्ही इकडे आलो होतो तोच रस्ता नेहमीच्या रस्त्यापेक्षा अधिक सुरक्षित असल्याने त्यांची कार त्याच रस्त्याने परत निघाली होती. त्या पंधरा मिनिटांच्या अवधित मघाशी कसंबसं पाऊल बुडेल एवढंच पाणी असणाऱ्या त्या रस्त्यावर आता कारची निम्मी चाकं बुडली जातील एवढं पाणी वाढलं होतं. घरापर्यंत गेल्यावर पाहिलं तर हरिपूर रोड ओलांडून विनायकनगरमधे घुसलेल्या पाण्याने हळूहळू पुढे यायला सुरुवात केली होती.

‘आता बाकी कांही आवराआवर करत न बसता आतील जिन्याखालच्या मोकळ्या जागेत मागे सरकून ठेवलेले नुकत्याच घेतलेल्या जास्तीच्या गव्हाचे डबे तेवढे वर नेऊन ठेवू आणि लगेच परत निघू ‘ असं दोघांनी ठरवलं आणि कुलूप उघडून घाईघाईने आत धाव घेतली.दोन डबे वर नेऊन ठेवल्यानंतर बाकीचे डबे आणायला खाली उतरत असताना सलिलला खिडकीतून पुराचं पाणी आमच्या शेजारच्या रिकाम्या प्लाॅटवर घुसल्याचं लक्षात आलं. अशा परिस्थितीत आता जास्त वेळ तिथं थांबणं धोक्याचं ठरणार होतं. बाकीचे तीन डबे थेट वर नेऊन ठेवण्याऐवजी त्यांनी घाईघाईने जिन्यातल्या वळणानंतर असलेल्या पॅसेजमधेच ठेवून ते दोघे बाहेर पडले. तोपर्यंत रस्त्यावरचं पाणी वीतभर वाढलेलं होतं जे थोडा उशीर झाला असता तर कारच्या बंद खिडक्यांना सहजपणे टेकू शकलं असतं.

त्या दोघांचा हा अनुभव पुढे होऊ शकणाऱ्या वाताहातीची कल्पना यायला आम्हाला पुरेसा होता. आता होईल ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यानंतरचे पहिले चारही दिवस सकाळी लवकरच ब्रेकफास्ट करून बाहेर पडलेले सलिल/अनघा रात्री खूप उशिरा परत येत असत. संपूर्ण दिवस आम्ही दोघे आणि आमच्या नाती घरी असू. पुरामुळे सलिलचं ऑफिस आणि अनघाचे क्लासेस् परिस्थिती निवळेपर्यंत बंदच रहाणार असल्याने घरी न थांबता त्या दोघांनी सांगलीत युद्धपातळीवर सुरु असलेल्या, पूरात अडकून पडलेल्या निराधारांचं रेस्क्यू ऑपरेशन आणि गरजू पूरग्रस्तांच्या रहाण्या-जेवणाची व्यवस्था अशा सामाजिक उपक्रमांशी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ला जोडून घेतलं होतं!

त्या दरम्यानचे त्यांचे ऐकतानाही अंगावर कांटा यावा असे भयानक अनुभव हा एका प्रदीर्घ अशा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. तरीही अशी अवेळ येते तेव्हा जात, पंथ, धर्म, राजकीय पक्षांशी असणारी बांधिलकी असे सगळे भेद विसरुन माणुसकीच्या धाग्याने सगळेजण कसे एकजूट होऊ शकतात याचंही तेच अनुभव म्हणजे एक अनोखं उदाहरण होतं! यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन यांचं सहाय्य होतंच शिवाय रा.स्व.संघाने स्वत:च्या हिंमतीवर सुरू केलेल्या या अभियानाला असा सर्व स्तरातून मिळालेला सक्रीय पाठिंबा मला नक्कीच कौतुकास्पद वाटला होता! पाऊस कमी होत गेला तसं सर्वदूर पसरलेलं पुराचं पाणी हळूहळू माघार घेत पूर्णत: ओसरायला आम्ही घर सोडल्यानंतरचा पाचवा दिवस उजाडला. तरीही लगेच सर्वांनी परत न जाता “तिथं काय परिस्थिती आहे ते आम्ही दोघे आधी बघून येतो आणि मग आपण ठरवू.” असं सलिल म्हणाला. दोघेही तिथली परिस्थिती पाहून परत आले तेव्हा ते सगळं घरी कसं सांगावं याच विवंचनेत होते!

स्टॅंडवरून पुढे हरिपूर रोडला लागल्यानंतर घरापर्यंत जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर पाण्याबरोबर वहात आलेले कपडे, अन्न, फळं, सगळ्यांचे ढीगच्या ढीग कुजून त्यांच्या असह्य दुर्गंधीने त्या परिसरालाच उकिरड्याचं किळसवाणं विद्रूप प्राप्त झालं होतं! पूर्ण नियोजनपूर्वक परिसर सफाईचं काम सुरू करायला प्रशासनाला अजून एखादा दिवस लागणार होताच. तशाच घाणीतून पुढे जात घराची अवस्था पहावी म्हणून ते दोघे घरापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा घराभोवतालची परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. बरेच प्रयत्न करुनही घराचं कुलूप निघेना तेव्हा कुलूप फोडून दार ढकलायचा प्रयत्न केला तेव्हा ते कणभरही हलायला तयारच नव्हतं. प्रचंड शक्ती लावून दोघांनी दार ढकललं तेव्हा कुठे दाराला थोडी फट पडली. त्यातून आलेला दुर्गंधीचा भपकारा आणि दाराला चिकटून आत संपूर्ण हाॅलभर पाय घट्ट रोवून उभ्या राहिलेल्या, पाण्याने स्वत:बरोबर वहात आणलेल्या चिखलाच्या कमरेपेक्षाही उंच अशा अभेद्य भिंतीचं ओझरतं दर्शन त्यांना झालं तेव्हा त्यांना धक्काच बसला.त्या चिखलामुळेच दार पूर्ण उघडलं जात नाहीय हे लक्षात आलं. मग नाईलाजाने दार तसंच ओढून घेऊन ते परत आले होते.अशा परिस्थितीत त्या घरी सर्वांनी लगेच परत जाणे शक्यच नव्हते. नंतर त्यांनीच पुढाकार घेऊन घरसफाईचं तत्परतेने योग्य नियोजन केलं. पुढे सलग दोन दिवस आणि दोन रात्री अथक कष्ट करून निदान त्या घरातला वावर थोडा तरी सुसह्य होईल इतपत स्वच्छता झालीय याची खात्री होईपर्यंत आमचा पुनर्गृहप्रवेश तेवढे दिवस पुढे ढकलायचा असं ठरवून ते दोघे कामाला लागले.पहिल्या दिवशी होईल तेवढी कामे मार्गी लागल्यानंतर रात्री खूप उशीरा ते दोघे परत आले तेव्हा प्रचंड थकलेले तर होतेच पण त्याहीपेक्षा आतून खूप अस्वस्थ असल्यासारखे बराच वेळ गप्प गप्पच होते. पुढे नाईलाजाने सांगणंच आवश्यक होतं ते मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलं खरं पण त्या अल्पाक्षरातूनही स्पष्टपणे जाणवलेलं आमच्या संपूर्ण घराचंच नव्हे तर आजूबाजूच्या घरांचं चित्रही किती विदारक असेल या कल्पनेनेच आम्ही क्षणभर कां होईना मनोमन धास्तावलोच होतो!

सलिल आणि अनघा आमची प्रतिक्रिया अजमावत वाट पहात असल्यासारखे बसून होते. आम्ही नुसतं ऐकूनच इतके अस्वस्थ झालोय. या दोघांना ते सगळे प्रत्यक्ष पहात दिवसभर तिथे वावरताना किती त्रास झाला असेल हा विचार मनात आला आणि मी भानावर आलो. स्वतःला सावरलं. खरंतर या दोघांना याक्षणी आपल्या आधाराची गरज आहे हे लक्षात येताच मी शांतपणे त्यांना सांगितलं.. ‘ आपण सगळे हातीपायी धड आहोत आणि या संकटाला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षमही आहोत. ही परमेश्वराची कृपाच म्हणायची. त्यामुळे नशिबाला दोष देत बसायचं नाही. हे बघा, जे नुकसान झालंय ते भरून काढण्याची शक्ती आधी ‘त्या’नेच आपल्याला दिलीय आणि मग हे संकट आणलंय. मग घाबरायचं कशाला? आता यातून बाहेर कसं पडायचं याचा आपण विचार करुया.” सलिलने चमकून माझ्याकडं पाहिलं.

“हो बाबा. हे आम्हीही मनापासून स्वीकारलंय.पण ते तेवढंच असतं तर कांहीच प्रश्न नव्हता बाबा. पण…”

“पण काय..?”

“बाबा..तुम्ही सहन करूच शकणार नाही अशी एक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला आत्ताच सांगणं आवश्यक आहे. पण तुम्ही त्रास करून घेणार नसलात तरंच सांगेन…” तो कसंबसं म्हणाला. पण घडलंय त्यापेक्षा अधिक धक्कादायक काय असणार? असंच मला वाटतं राहिलं.

“नाही त्रास करून घेणार. बोल तू. काय झालंय?” मी आत्मविश्वासाने म्हणालो.

त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून मी सून्नच झालो!अक्षरश: गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो जे म्हणाला होता ते खरंच होतं.पैशाने ज्याची भरपाईच होऊ शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो…!!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares