मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – कठपुतली ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – कठपुतली ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
"मम्मी, काल आमच्या शाळेत कठपुतलीचा खेळ दाखवला," जमिनीवर बसून वहीत ड्रॉइंग काढत असलेली पारंबी म्हणाली.
"अरे वा, काय काय दाखवलं?" गाईला चारा घालून परत घरात येता येता मम्मीने विचारलं.
"अगं ए, गाईला चारा-पाणी देऊन झालं असेल तर जरा इकडे ये, आणि माझे पाय दाबून दे," कॉटवर आरामात लोळत पडलेल्या नवऱ्याने हुकूम फर्मावल्यासारख सांगितलं.
"सगळं दाखवलं मम्मी--- त्या बाहुल्यांनी विहिरीतून पाणी काढून घरात आणून ठेवणं, चुलीवर स्वैंपाक करणं, मुलांना आंघोळी घालणं, कपडे धुणे, इस्त्री करणं --- सगळं सगळं दाखवलं---" काढलेलं चित्र रंगवता रंगवता पारंबीने सांगितलं.
"कसा वाटला तुला तो कठपुतलीचा खेळ?"--- नवऱ्याच्या पायापाशी बसून आता ती बायको त्याचे पाय चेपायला लागली होती.
"खूपच छान", पारम्बी उत्साहाने सांगायला लागली.
"दोऱ्यांचे एक एक टोक खेळ दाखवणाऱ्या त्या माणसाच्या बोटांना बांधलेले होते, आणि दुसरी टोके त्या बाहुल्यांच्या अंगावर बांधलेली होती. तो माणूस त्या बाहुल्यान्ना इशारा केल्यासारखा बोटं हलवतो, आणि मग त्या बाहुल्यांचे अंग हलायला लागते. मग तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडून करून घ्या. उड्या मारायच्या,...