मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” —

असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात.

अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस.

डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याबद्दल लिहिणारे डॉ. विजय देशपांडे हेही याच संस्थेतील प्राध्यापक होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्र अनुभवांच्या प्रामाणिक मातीवर उभं राहिलेलं आहे.

डॉ. डोक्रस यांच्या कर्तृत्वाचा पाया त्यांच्या विद्यार्थीदशेतच रचला गेला होता. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांना प्रतिष्ठित आय. आय. एस. (IISc – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये एम. एस्सी. साठी शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी एम. एस्सी. ‘डिस्टिंक्शन’सह उत्तीर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच १९४० च्या दशकात त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम. एस. (MS) आणि पी. एचडी. (Ph. D) साठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचा त्या काळातील शोधनिबंध आजही गुगलवर उपलब्ध आहे, जो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष देतो.

डॉ. डोक्रस मोजकंच, पण नेमकं आणि मार्मिक बोलत. एकदा ते आणि डॉ. विजय देशपांडे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील एका उपसंचालकांना भेटायला गेले. पद मोठं होतं, खुर्चीही मोठी होती; पण त्या पदावर बसलेली व्यक्ती मात्र सातत्याने आपल्या अडचणींचा पाढा वाचत होती. आपल्याला अपेक्षित असलेलं काही साध्य होणार नाही, हे लक्षात येताच दोघे बाहेर पडले. तेव्हा डॉ. डोक्रस सहज म्हणाले—

“खुर्च्या मोठ्या केल्या तरी त्यात बसणारी माणसं मात्र खुजीच राहतात. ”

त्यांचे हे उद्गार म्हणजे नेतृत्वाच्या संकल्पनेवरची कठोर पण खरी आणि मार्मिक अशी टिप्पणी होती.

डॉ. डोक्रस हे शिस्तप्रिय होते, पण ती शिस्त जाचक नव्हती. एकदा व्हीआरसीईच्या विद्यार्थ्यांनी एका काश्मिरी पंडित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हॉस्टेलच्या जेवणावरून संप पुकारला. डॉ. डोक्रस यांनी त्यांना समजावून पाहिले, पण विद्यार्थी ठाम होते. तेव्हा त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, “जर मेस बंद झाली, तर तुम्ही जेवणार कुठे? ” विद्यार्थ्यांकडे उत्तर नव्हते. अशा वेळी डॉ. डोक्रस यांनी आपल्या पत्नीला घरी स्वयंपाक करायला सांगून तो डबा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा रोष निवळला आणि तो विद्यार्थी नेता चक्क डॉ. डोक्रस यांच्या पत्नीचे आभार मानायला त्यांच्या घरी पोहोचला. विद्यार्थी हा त्यांचा खरा ‘वीक पॉईंट’ होता. चिडलेल्या विद्यार्थ्यांशी ते असं काही भावनिक संवाद साधत, की क्षणात वातावरण बदलून जाई.

त्यांची तत्वनिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही दिसून आली. १९६७ मध्ये इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या राज्याभिषेकासाठी त्यांना खास निमंत्रण होते. त्यांचे पुत्र डॉ. उदय डोक्रस सांगतात की, हे निमंत्रण शहांच्या थेट ओळखीमुळे नव्हे, तर इराणी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीमुळे होते. याच काळात इराणच्या एका मंत्र्याच्या मुलाला (जो अभ्यासात कच्चा होता) पास करण्यासाठी डॉ. डोक्रस यांच्यावर दबाव आला, पण त्यांनी त्याला कसलीही मदत केली नाही. परिणामी त्या मुलाला रिकाम्या हाती इराणला परतावे लागले. डॉ. डोक्रस हे पूर्णपणे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त होते.

डॉ. डोक्रस हे विद्वान तर होतेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक उमदं, सकारात्मक व्यक्तिमत्त्व होते. मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची व्हीआरसीईच्या प्राचार्यपदी नेमणूक केली. त्यांनी जो मार्ग प्रशस्त केला, त्यावरून पुढे चालणं नंतरच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सुकर झालं.

कामाचा उरक प्रचंड होता. टेबलावर आलेली प्रत्येक फाईल निकाली काढूनच ते घरी जात. डॉ. विजय देशपांडे यांनी एकदा त्यांच्या कामाच्या पद्धतीचं रहस्य विचारलं, तेव्हा ते सहज म्हणाले—

“अरे, कसलं आलंय रहस्य! सारं काही सवयीन जमतं. सवय लावून घ्यायला थोडी बुद्धी, काम करताना लागणारं कसब आणि मुख्य म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्याची मानसिक तयारी—या तीन गोष्टी जवळ असल्या की बाकी सगळं आपोआप जमतं. ”

डॉ. उदय डोक्रस सांगतात की, वडील कायम कामात आणि प्रवासात असायचे. पण त्यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. नागपूरच्या धंतोली भागातील रस्ते शोकसागरात बुडालेल्या जनसमुदायाने गच्च भरले होते.

प्रत्येक माणसाला जन्म असतो, तसा शेवटही असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या पदात नसतं; पदाला मोठं करणारी त्याची उंची असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचं संस्थापक सदस्यत्व ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व—अशा अनेक सन्मानांनी त्यांचं कर्तृत्व अधोरेखित झालं. त्यांच्यातील ‘वसंत’ सदैव बहरलेलाच राहिला. ज्या ज्या निर्जीव खुर्च्यांवर ते बसले, त्या त्या खुर्च्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उंची मिळत गेली.

असा हा हिमालयाएवढ्या उंचीचा माणूस!

… व्यक्तीचं जीवन कसं असावं, याचा हा एक जिवंत आदर्श.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाची मनमानी ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ मनाची मनमानी श्री नागेश शेवाळकर

‘मन’ या एका शब्दात सामावलेली ही दोन अक्षरे! एवढीच का यांची ओळख आहे? बाराखडीतील इतर अक्षरांप्रमाणे का ह्या दोन अक्षरांचा समूह आहे? अक्षरे जरी दोन असली तरी सारे ब्रम्हांड यामध्ये सामावलेले आहे. मन म्हटले की, कोणताही आकार आपल्या समोर येत नाही. मोहून टाकणारा गंध जाणवत नाही. कोणताही रंग लेवून एखादी आकृती समोर येत नाही. तरीही त्याची आपल्या शरीरातील उपस्थिती सातत्याने जाणवते. आपल्या सोबत सक्रिय राहून प्रत्येक कार्यात सहभागी होत असते. हवा आपणास दिसत नसली तरीही तिचे अस्तित्व विविध प्रकारातून जाणवते. आत्मा हाही तसा अदृश्य असला तरी त्यामुळे शरीर जिवंत असते असे आपण मानतो. ईश्वरालाही भक्तांनी भावेल, आवडेल तसे रूप दिलेले आहे. त्यामुळे कदाचित ईश्वराला आकार प्राप्त झाला असेल. तो दृश्य झाला असेल. आत्म्याचे तसे नाही. त्याचे अस्तित्व फक्त जाणिवेच्या रूपाने सोबत असते. आकारहीन, गंधहीन असा आत्मा असला तरी त्यामुळे शरीर सचेतन आहे, सजीव आहे. मनाचेही तसेच आहे. आजीवन शरीरात असूनही आपणापासून दूर असल्याप्रमाणे आहे. आपण मनाला पाहू शकत नाही, परंतु त्याच्याशी संवाद मात्र साधू शकतो. ‘मनातल्या मनात’ बोलणे हा संवाद साधण्याचाच एक प्रकार! मनाशी संवाद साधत असूनही आपण आपल्या मनाला पूर्णपणे ओळखू शकत नाही, ओळखू शकणार नाही.

अदृश्य असले तरी कसे आहे मन? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नेहमीच पडतो. कधी वाटते मन अथांग सागराप्रमाणे आहे. दुसऱ्याच क्षणी वाटते, मन विस्तीर्ण आकाशाप्रमाणे आहे. कधीकधी मन एवढे चंचल भासते की, जणू पत्नीप्रमाणे, प्रेयसीसम! दुसऱ्याच क्षणी मनाची अस्वस्थता जाणवते, अस्थिरता समोर येते. त्याचवेळी त्याची तत्परता आपल्या लक्षात येते. कधी ते हसतं, डोलतं, गातं, नाचतं तर कधी त्याची घाई-गडबड, धांदल, धांदरटपणाही आपल्या समोर येतो. मध्येच मन हे एखाद्या अणुप्रमाणे भासते तर कधी ते पर्वतासम जाणवते. मन मायाळू, प्रेमळ, लाजरे-बुजरे आहे तसेच ते कोपिष्ट, रागीट, संतापी, आडमुठही आहे. मन जसे कीर्तनात रमते तसेच ते तमाशातही रममाण होते. कधी मन क्रियाशील जाणवते तर बऱ्याचवेळा ते प्रचंड आळशी असल्याचे दिसून येते. मन म्हणजे जणू जवळचा मित्र, बरेवाईट याची जाणीव करुन देणारा पण मधूनच त्याला काय होते ते कळत नाही. एखाद्या वैऱ्यासारखे वागते. समोर जो कुणी असेल त्याच्याशी शत्रुगत् वागते. त्याच्या बद्दल नको नको असे विचार करते. म्हणूनच म्हणतात, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’!

मन आणि स्वप्न यांचा फार जवळचा संबंध जाणवतो. जागेपणी आपण जे विचार मनातल्या मनात करतो, ते प्राप्त करण्याचा, साध्य करण्यासाठी बरेच काही करतो तसे विचार मनात घोळत असताना अनेकदा ती गोष्ट आपण स्वप्नात मिळवतो, पाहतो, अनुभवतो. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ती हिच अवस्था! प्रयत्नांती जागेपणी जे मिळत नाही किंवा एखादी गोष्ट भरपूर प्रयत्न करूनही उपलब्ध होत नाही अशी गोष्ट मिळविण्यासाठी स्वप्न मदतीला धावून येते. म्हणूनच मनाला ‘कल्पवृक्ष’ ही उपमा दिली तर ती अनाठायी ठरू नये. असे म्हणतात की, एकेकाळी या कल्पवृक्षाकडे एखादी वस्तू मागितली तर ती तत्काळ मिळत असे. तसे पाहिले तर आजच्या मानवासाठी कल्पवृक्ष म्हणजे तरी काय तर एक स्वप्नील अवस्था! सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाजवळ असलेला कल्पवृक्ष म्हणजे मन! तुम्हाला काय पाहिजे ते मागा, प्रत्यक्षात जरी मिळाले नाही तरी कल्पनाविश्वात म्हणजेच स्वप्नात ती बाब निश्चितपणे मिळणार. आजकाल स्मार्टफोन आणि गुगलचा जमाना आहे. स्मार्टफोन हे एक शरीर मानले तर गुगल म्हणजे त्याचे मन… कलियुगातील कल्पवृक्ष! गुगलकडे तुम्ही जी माहिती मागाल ती तुम्हाला दुसऱ्याच क्षणी घरबसल्या मिळू शकते.

‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असे म्हटले जाते. मन प्रसन्न, आनंदी, समाधानी असेल तर तुम्ही जे कोणते काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल, कार्यसिद्धीचा आनंद प्राप्त होईल. असा या वचनाचा अर्थ होऊ शकतो. व्यवहारात तरी दुसरे काय आहे? आपले मन प्रसन्न असेल तर आपण करीत असलेल्या कामात चुका होत नाहीत, एकच कृती वारंवार करण्याची गरज पडत नाही. मन आनंदी असेल तर शरीर लवचिक बनून जोमाने, आगळ्यावेगळ्या स्फूर्तीने काम करू लागते. मात्र हेच मन काही कारणास्तव आळसावलेले, दुखावलेले, कष्टी असेल तर दररोजच्या कामालाही वेग मिळत नाही, वारंवार चुका होतात, काहीही करावेसे वाटत नाही. मनाची अवस्था सैरभैर झालेली असते. प्रसंगानुरूप मन नेहमीच जगण्याची दुर्दम्य शक्ती शरीरात चेतवते. परंतु हेच मन कधीकधी मानवाला नको ते पाऊल उचलायला, अनिष्ट अशी कामे करायला भाग पाडते. का होत असावी मनाची ही अशी अवस्था? का मधूनच मन नको त्या गोष्टींंची पेरणी करते आणि ‘जनी निंद्य’ ते करायला भाग पाडते? मन जसे भावनाशील आहे तसेच ते भावनाशून्य आहे. मन दोलायमान असले की मनाची एक वेगळीच अवस्था समोर येते. मनाच्या या रुपाला दुसरे मन असे म्हणतो. शेजारी राहणाऱ्या या दोन मनांचे द्वंद्व आपण नेहमीच अनुभवतो. मुख्य किंंवा पहिले मन कणखर, निर्भय, निर्भीड असले की, दुसऱ्या मनाचे काहीही चालत नाही. परंतु पहिले मन थोडेेसेही कमजोर झालेे की मग दुुसऱ्या मनाचे साम्राज्य पसरते आणि मग बऱ्याचवेेळा नको ते घडून जाते. ही दोन मने म्हणजे नेमके काय? भिन्न, परस्परविरोधी विचारधारेचा समन्वय. सकारात्मक आणि नकारात्मक विचारधारा असेही आपण म्हणू शकतो. चांगले गुण, तशी विचारसरणी असलेले मन म्हणजे सकारात्मक किंवा पहिले मन! त्याउलट वाईट विचार आणि अवगुणांचा समुच्चय असलेले ते दुसरे मन…. नकारात्मक मन! या दुसऱ्या मनानेे केेलेेेलेे कार्य ही ‘मनमानी’ ही असू शकते.

तसे पाहिले तर मन एक गुंता आहे. तो कुणालाही तसा सुटलेला नाही. अगदी समर्थ रामदास महाराजांनी ‘मनाचे श्लोक’ या सर्वोत्तम विचारधारेची निर्मिती केली असली तरी मन हे शेवटी मनच आहे. कधी ते देवाप्रमाणे वागते, कधी त्याची वागणूक मानवाप्रमाणे सरळ-साधी असते तर मधूनच हेच मन राक्षसीवृत्ती धारण करते. म्हणूनच… 

मनाचिये मनमानीतून

सांगा सुटका कुणाची

मनाचिया गुंता सोडविण्या

सांगा सरशी कुणाची?

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ४ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ४ ☆ श्री संभाजी बबन गायके 

पालखी सोहळ्यातील ‘अभंग’ व्यक्तिमत्त्वे!

भक्तिगीते आणि अभंग यांच्यात नेमका फरक सांगायचाच झाल्यास तो अनुभूतीचा असतो. शब्दांवर हुकुमत प्राप्त केलेले कवी अतिशय उत्तम भक्तीरचना करू शकतात, यात काहीच वाद नाही. परंतू संतांनी लिहून ठेवलेले अभंग हा त्यांचा प्रत्यक्ष जीवनानुभव असतो आणि म्हणूनच तो कधी भंग पावत नाही!

भारतातील जवळपास सर्वच संतांनी त्यांचे विचार काव्यरुपात लिहून ठेवलेले आढळतात. महाराष्ट्रभू तर संतकवींची खाणच म्हणावी. आणि हे काव्य म्हणजे कुणा व्यावसायिक वा हौशी कवीने प्रसिद्धी, धन, मान यांसाठी योजलेली शब्दयोजना नव्हेत! म्हणूनच कित्येक शतके उलटून गेली तरीही ते शब्द जनमानसावर आपले गारुड कायम ठेवून आहे!

जगदगुरू संत श्री तुकोबारायांसोबत वाट चालत होतो. हे माझे त्यांच्यासमवेतचे पहिलेच वर्ष होतं. दिंडीत खूप ज्येष्ठ वारकरी होते. दिवसभराच्या वाटचालीत एका वयोवृद्ध वारकरी आजोबांनी ‘म्हणा माऊली! ” म्हणत माझ्याकडे वाटचालीत अभंग म्हणायची सूचना केली! मला बोलू ऐसे बोले…. हा अभंग तोंडपाठ होताच… मात्र चाल? चाल रेकॉर्डवरची म्हणजे ध्वनीमुद्रीकेवरची…. छोटा गंधर्व यांनी गायलेला हा अभंग. मी माझ्या आवाजात बोलू ऐसे बोले…. अशी सुरुवात करतात….. मृदुंगावर थाप टाकण्याच्या तयारीत असलेले पखवाजे आणि सोबतचे टाळकरी एकदम थांबले आणि त्यांनी सर्वांनी माझ्याकडे नाराजीनेच कटाक्ष टाकले… मी गोंधळून गेलो!

विणेक-याच्या सोबतीने चालणा-या त्या आजोबांच्या चेह-यावर तर नाराजी अगदी उठून दिसली. “वारकरी चालीत म्हणा, महाराज! ” त्यांनी कडक शब्दांत आदेश दिला. आणि मी थबकलेलो पाहताच त्यांनी स्वत:च सुरुवात केली… बोलू ऐसे बोले… हां… बोलू ऐसे बोले… जेणे बोले विठ्ठल डोले… जेणे बोले विठ्ठल डोले!

चालता चालता टाळाच्या तालावर सहज गाता येणारी चाल. उच्चार स्पष्ट आणि नेमके. त्यामुळे अर्थही मनापर्यंत पोहोचतो…. आजोबांनीच चरणापर्यंत अभंग म्हटला… आणि म्हणाले… आता लावा तुमची शास्त्रीय चाल…… मी मला येते ती साधी चाल लावली…. सर्व सत्ता आली हाता… नामयाचा खेचर दाता! आणि आजोबांच्या मुखावर आनंद परतून आला! तेंव्हा समजलं… वारीत वाट चाल करताना वारकरी, नियमित चालीत अभंग गायचे असतात… येथे शास्त्रीय किंवा प्रथितयश गायकांनी गायलेल्या रचना गाऊन उपयोग नाही! कारण हे चालता चालता गायचे शब्द असतात.

असाच एक नवखा वारकरी कुणाचे तरी भक्तीगीत गाऊ लागला तेंव्हाही आजोबांनी त्याला रोखले. म्हणाले…. संतांचे अभंग म्हणा…. महाराज. हजारो आहेत. आपल्या तुकोबारायांचे तर चार हजार आहेत… कोणताही म्हणा! तेंव्हा समजले की वारीत केवळ संतांचेच शब्द गायचे असतात.

संत त्यांच्या रचनांच्या अखेरीस त्यांची नाममुद्रा गुंफीत असत… जसे एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रावर आपण स्वाक्षरी करतो, शिक्का उठवतो, तसे. उदाहरणार्थ….. तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे… इत्यादी. संतांना त्यांच्या काव्य रचनेत स्वत:चे नाव हवे असायचे, प्रसिद्धी हवी असायची म्हणून ते असा नामोल्लेख करीत असत, हा काही सुशिक्षित लोकांचा (गैर)समज आहे! त्याकाळी copy right विषय नव्हता. तरीही काही नतद्र्ष्ट माणसं स्वत:च्या रचना प्रसिद्ध संतांच्या नावाने खपवीत…. त्या रचनांना क्षेपक अभंग अशी संज्ञा आहे. अभ्यासू वारकरी, भजनकरी संतांचा मूळचा आणि इतरांनी घुसवलेला क्षेपक अभंग अचूक ओळखतात! त्यामुळे वारीत तरी केवळ अधिकृत संत अभंगच गावेत, असा दंडक असतो.

आमच्या दिंडीत चालणा-या त्या आजोबांना संपूर्ण भजनी मालिका, हरिपाठ, गाथा, नाथ महाराजांचा गाथा यांतील जवळजवळ सर्वच अभंग तोंडपाठ होते. विशेषत: तुकोबारायांचा गाथा त्यांना मुखोद्गत होता. दिंडीत कुणी गाताना एखादा शब्द चुकला की ते लगेच दुरुस्ती सांगत. विशेषत: शेवटच्या चरणात, म्हणजे हा अभंग कुणी लिहिला आहे त्या नावाचा उल्लेख करताना अनेकवेळा गफलती होत असतात! पण हे आजोबा म्हणजे आमचे चालते बोलते encyclopaedia होते!

हे आजोबा अत्यंत काटेकोर दिनचर्या पाळीत. दिंडीत सर्वांच्या आधी म्हणजे चार-सव्वाचार वाजता उठून आन्हिके आटोपित आणि तंबूमध्येच एका कोप-यात त्यांची पूजेची पेटी उघडून बसत. पत्र्याच्या त्या छोट्याशा पेटीत त्यांचे सर्व पूजासाहित्य असे. गंध, गंधगुळी, उद्बत्ती, काडेपेटी, छोटा हरिपाठ, विठोबा रखुमाईची कागदी तसबीर इत्यादी. मुखाने हरी हरी म्हणत त्यांची पूजा चाले…. सर्वांगावर गंध लेपन करीत. अंगावर गणवेश तर नेमून दिलेलाच असे…. पांढरे धोतर, पैरण, पटका… कपाळी गंध! बाकीची दिंडी उठून तयारीला लागेपर्यंत आजोबा महाराजांच्या रथासमोर जाऊन उभेही रहात. आणि पालखी रथ विसाव्याला थांबल्याशिवाय खाली बसत नसत. दिवसभर अभंग गाताना कधी थकलेले त्यांना पाहिले नाही. रात्री दिंडी मुक्कामावर पोहोचल्यावर रात्रीचा भजन जागर सुरु होई… त्यात आजोबा उशीरपर्यंत भजने गात. इथं कळलं… त्यांना उत्तम पेटी वाजवता येते. आवाजात माधुर्य नसलं, रागदारीचं फारसं ज्ञान नसलं तरी मनातले भाव आणि पाठांतर अप्रतिम होतं…. कित्येक वर्षांचा परिपाठ असावा!

आजोबा जातिवंत शेतकरी. त्याच्या खुणा त्यांच्या अंगभर दिसून येत. रापलेला रंग, भेगा पडलेले तळपाय, कपाळावर पसरलेलं आठ्यांचं जाळं… आणि विझत चाललेलं डोळे. कुणीतरी केंव्हातरी नंबरचा चष्मा दिलेला असावा… तुटलेला चष्मा… त्याच्या काड्यांना दोरा बांधून काम चालवलेलं. भजनी मालिकेच्या पुस्तकात कधी वाचायचा प्रसंग येत नसे… कारण बहुतेक सर्वच पाठ होतं… पण आपला असावा म्हणून डोळ्यांवर चष्मा असे. पूर्वी कारभारीण आणि ते असे दोघे वारी करीत. काही वर्षांपूर्वी त्या निवर्तल्या. मग आजोबांनी महिन्याची वारी धरली. म्हणजे दर महिन्याला देहू-आळंदी ते पंढरपूर अशी वारी. जमली तशी पायी केली आणि थकले तेंव्हा मिळेल त्या वाहनाने. विशेषत: बार्शी लाईट रेल्वे आवडीची आणि सोयीची!

आजोबांनी आपल्या दिंडीत यावे, असा सर्वच दिंडीचालकांचा प्रयत्न असे. पण आजोबांनी आपली एकच दिंडी धरून ठेवली होती. त्यांच्याकडून कोणी भिशी अर्थात दिंडीचा खर्च म्हणून पैसे घेत नसत… कारण दिंडीमध्ये वाटचालीचे अभंग म्हणायची जबाबदारी, शिस्त पाळायची जबाबदारी त्यांच्यावरच असे. ते सुद्धा एखाद्या सैन्याधिका-याने आपले सैन्यदल दिमाखात, शिस्तीत चालवावे, तशी दिंडी चालवीत!

द्वादशीचा उपवास सोडून दिंडीकरी लगबगीने, घराच्या ओढीने परतत… आजोब मात्र पुढील चातुर्मास पंढरीतच मुक्कामी राहण्यासाठी मागे रहात….. नेमाचे, निष्ठावंत वारकरी. जोडोनिया धन.. उत्तम व्यवहारे वेच करून संसारिक जबाबदा-या पार पाडून आयुष्याच्या संध्याकाळी हरी हरी करीत काळ व्यतीत करणारे संतांचे लाडके सेवक!

एका वर्षी ते दिंडीत दिसले नाहीत….. त्यांच्या नातवाने एका मुक्कामावर त्यांच्या स्मरणार्थ दिंडीला पंगत दिली तेंव्हा समजले…. ते मागील महिन्यात वैकुंठवासी झाले! असे वारकरी हे वारीचे वैभव असतात… त्यांचे दर्शन घडले, सहवास लाभला हे भाग्यच म्हणायचं…. रामकृष्णहरी!

– लेख क्र. ४ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘दर्पणी पहाता रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘दर्पणी पहाता रूप…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

विजया मेहता 

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे!

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे? ” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी, “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली! ” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस, ” असं म्हणत.

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का! ” खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून. ” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!! ”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’!

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते.. ”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’…… ‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाकवी कुलगुरू : कालिदास  ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ महाकवी कुलगुरू : कालिदास ☆ श्री दिवाकर बुरसे

आषाढ शुद्ध प्रतिपदा. महाकवी कालिदास दिन, या निमित्त या विश्वविख्यात महाकवीस माझे विनम्र अभिवादन आणि त्यांच्या चरणी ही अल्पशी भावांजली.

प्रास्ताविक

महाकवीकुलगुरु कालिदास हे भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध महाकवी व नाटककार म्हणून ज्ञात आहेत. काव्याच्या ह्या तिन्ही क्षेत्रात (नाटक, खंडकाव्य व महाकाव्य) त्यांच्या योग्यतेचा दुसरा कवी झाला नाही हे सर्वमान्य आहे.

अशा या विश्वकवीच्या जीवनाविषयी मात्र फार थोडी माहिती उपलब्ध आहे. आज त्यांचे चरित्र केवळ जनश्रुतीवरच आधारित आहे.

कालिदास अशिक्षित, अडाणी आणि मूर्ख होते. शारदानंद नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलीचे नाव होते विद्योत्तमा. ती लावण्यवती होतीच पण विद्वान व सर्वशास्त्रकलानिपुणही होती. तिला तिच्या विद्वत्तेचा अभिमान व गर्व होता. ‘जो मला शास्त्रार्थात पराभूत करेल त्याचाच मी पती म्हणून स्वीकार करेन’ असा पण तिने केला होता. विवाहेच्छुक अनेक विद्वानांना तिने वादविवादात पराभूत केले होते, अपमानित केले होते. तेव्हा विद्वानांनी सूडबुद्धीने एक षड्यंत्र रचले. मूर्ख कालिदासाशी तिचा विवाह घडवून आणला. हा आपला पती मूर्ख आहे हे कळताच तिने कालिदासांचा धिक्कार करून त्यांना अपमानित करून घरातून हाकलवून दिले.

अपमानदग्ध कालिदास भगवती कालीला शरण गेले. तिची उग्र उपासना त्यांनी आरंभिली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन कालीने त्यांना अपूर्व अशी विद्वत्ता व प्रतिभा प्रसादरूपाने प्रदान केली.

प्रतिभासंपन्न कालिदास विद्योत्तमेच्या घरी परतले. घराची कवाडे बंद होती. त्यांनी दार खटखटवले आणि म्हटले, ‘ अनावृत्तकपाटं द्वारं देहि’ (दार उघड). आतून आवाज आला, ‘ अस्ति कश्चित् वागविशेषः? ‘ (काही वाग् वैभव आहे? ‘) पत्नीच्या प्रश्नार्थक वाक्यातील तीन वाक्ये आरंभी घेऊनच पुढे कालिदासाने तीन महाकाव्ये लिहिली.

१) ‘ अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ कुमारसंभव ‘

२) कश्चितकांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ मेघदूत ‘ व

३) ‘ वागर्थाविव सम्पृक्तौ ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ रघुवंश ‘

कालिदासांचा जन्म कोठे झाला?

कालिदास कोठे जन्मले, त्यांची जन्मभूमी कोणती याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. काही विद्वान त्याची जन्मभूमी काश्मीर मानतात तर काही हिमवत् प्रदेश. काहींच्या मते मालव तर काहींच्या मते बंगाल किंवा उडिसा. काहींच्या मते उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी जवळील कविल्ठा गावात कालिदास जन्मले. प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. काहीही असो पण त्यांचे बालपण निश्चितच मालवराजधानी उज्जैनीत गेले असावे. विक्रमादित्यही तेथलाच. त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी कालिदास एक रत्न होते. खेरीज कालिदासाचे उज्जैनीप्रेम त्यांच्या वाङ् मयात ठाई ठाई दिसते.

कालिदास शैव म्हणजे शिवभक्त असावेत. तरीही इतर देव-देवतांविषयी आदर बाळगणारे होते हे त्यांनी केलेल्या विष्णू, ब्रह्मा यांच्या स्तुतींवरून म्हणता येईल.

वेश्यागमन हा कालिदासाच्या चरित्रावरील एक गडद कलंक आहे. श्रीलंकेत एका वेश्येनेच आपल्या घरी कालिदासाची हत्या केली. एका थोर, प्रतिभासंपन्न, शब्दप्रभूची व्यसनाधीनतेतून हत्या व्हावी हे फार क्लेशकारक आहे.

समस्यापूर्ति आणि घात

समस्यापूर्ति ह्या काव्यक्रीडा प्रकारात कालिदास निपुण होते. अनेक समस्यापूर्ति त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. विस्तारभयास्तव त्या येथे सांगणे टाळतो. तरीही एका कथेचा व समस्यापूर्तीचा उल्लेख अनिवार्य आहे.

एकदा आपला मित्र कुमारदास याला भेटण्यासाठी कालिदास सिंहलद्वीपला गेले होते. तिथेच ते एका गणिकेकडे गेले असता तिच्याकडून त्यांना एक समस्या ऐकायला मिळाली. समस्यापूर्तीसाठी राजाने घवघवीत पारितोषिक घोषित केले होते. दिलेली समस्यापंक्ति अशी होती…

‘कमले कमलोत्पत्ति श्रूयते न तु दृष्यते’

(अर्थः- कमळातून कमळाची उत्पत्ती होते हे ऐकिवात आहे पण पाहिले मात्र नाही आम्ही)

कालिदासाशी मनोविनोद करताना त्या वेश्येने ही ओळ त्यांना सांगितली. ओळ ऐकताच कालिदासांच्या मुखातून पुढील ओळ निघाली..

‘बाले तवमुखाम्भोजात्कथमिन्दीवरव्दयम्’

(अर्थः- हे कन्ये, तुझ्या मुखकमलावर नयनरूपी निलकमले कशी बरे दिसत आहेत मग!)

समस्या क्षणात पूर्ण करणारेआपले हे ग्राहक साक्षात् कालिदास आहेत हे त्या गणिकेला ठाऊक नव्हते. उद्या याने राजाला भेटून ही केलेली समस्यापूर्ति ऐकवली तर आपले पारितोषिक हाच घेऊन जाईल या भीतीने त्या व्येश्येने त्याच रात्री कालिदासाचा कपटाने वध केला.

कठोर चौकशीअंती जेव्हा राजाला हे समजले तेव्हा तो फार चटपटला, विव्हळ झाला. तो त्या वेश्येला म्हणाला, हे लोभी गणिके, क्षुद्र मोहापायी तू ज्याला मारलेस तो कवी कालिदास होता. अगं हत्या करण्यापूर्वी मला सांगितलं असतंस तर मी पारितोषिकाच्या दसपट धन तुला दिलं त्या बदल्यात. काय केलंस हे. जग एका महाकवीला मुकलं ना!

कालिदासाचा काल

कालिदास ब्राह्मणकुलोत्पन्न होते. गुरुकुलातून ते विद्यासंपन्न झाले असावेत. त्यांच्या कालाविषयी मतमतांतरे आहेत. डॉ मिराशींनी इ. स. २५० ते ४५० हा कालिदासाचा काळ असावा असे सिद्ध केले आहे.

ते उज्जैनीचे रहिवासी होते. शककर्त्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या पदरी होते. गुप्त व वाकाटक या राजघराण्यांची सोयरीक होती. चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती ही वाकाटकांच्या रुद्रसेनाची भार्या होती. रुद्रसेनाचे अकाली निधन झाल्यावर प्रभावतीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने राज्यशकट चालवायला आरंभ केला. तिच्या सहाय्यार्थ चंद्रगुप्ताने आपले काही अनुभवी अधिकारी वाकाटकांच्या राजधानीला विदर्भातील नंदिवर्धनला, म्हणजेच रामटेक जवळील नंदिग्रामला पाठविले. कालिदासही त्या अधिकाऱ्यांपैकी एक होते.

मेघदूत या खंडकाव्याची रचना तिथेच झाली. मेघदूतातील नायक यक्ष, नागपूरजवळील रामटेक म्हणजेच रामगिरी पर्वतावर कुबेराचा शाप भोगित होता.

कालिदासाने रामायणातील मूळ कल्पनेवर मेघदूताची उभारणी झाली आहे. रामाने मारुतीला दूत नियुक्त करून आपला संदेश सीतेला पाठविला ही गोष्ट मनात ठेवूनच कालिदासाने मेघदूताची रचना केली हे मल्लिनाथाचे म्हणणे सत्य वाटते.

कालिदासाच्या कलाकृती, ग्रंथसंपदा

एकूण अदमासे चाळीस रचना कालिदासाच्या नावावर सांगितल्या जातात.

नाटके

१)मालविकाग्निमित्रम् (राजा अग्निमित्र व मालविका यांची प्रणयकथा)

२) विक्रमोर्वशीयम् (राजा पुरुरवा व अप्सरा उर्वशी यांची प्रणयकथा)

३) अभिज्ञानशाकुंतलम् (राजा दुष्यंत व शकुंतला यांची प्रणयकथा)

महाकाव्ये

१) रघुवंशः (रघुवंशातील वीस कर्तृत्ववान राजांचे चरित्रगान)

२) कुमार संभवः (शिव-पार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा)

खंडकाव्ये

१) ऋतुसंहारः (सहा ऋतुंचे विभ्रमवर्णन)

२) मेघदूतम् (मघाला दूत करून त्याकरवी संदेश पाठविणे)

वरील सात रचना निश्चित कालिदासाच्या मानल्या जातात. याविषयी विद्वानांत एकवाक्यता आहे. याखेरीज अधिक काही रचना अशा आहेत ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. त्यातील काही रचनांची नावे –

१) उत्तम कलामृतम् (ज्योतिषविषयक ग्रंथ) २) श्रुतिबोधम् ३) शृंगारतिलकम् ४) सेतुकाव्यम् ५) पुष्पबाणविलासम् ६) श्यामा दंडकम् ७) ज्योतिर्विद्याभरणम् इ.

१)कुमार संभवम् २) रघुवंशः ३) मेघदूतम् ह्यांना ‘लघुत्रयी’ म्हणतात. मेघदूत हे खंडकाव्य मात्र विश्वविख्यात झाले आहे. दंडिचे अनुयायी याला महाकाव्य म्हणतात, तर पाश्चात्य विद्वान याला गीतीकाव्य (Lyric) म्हणतात.

मेघदूताचे थोडक्यात कथानक असे

एक यक्ष आपला स्वामी कुबेर याच्या सेवेत चूक करतो. कुबेर त्याला शाप देवून एक वर्षाकरिता अलका नगरीतून सीमापार करतो. आपल्या प्रेयसीपासून वियुक्त झालेला, विरहाने कृश झालेला तो यक्ष रामगिरी पर्वतावर वास्तव्य करतो. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी तो आकाशात एक नवीन मेघ पाहतो. त्याचे मन अधिकच कष्टी होते. प्रेयसीची आठवण अधिक तीव्र होते. मग तो या मेघालाच आपला दूत बनवितो व अलकानगरीतील आपल्या प्रेयसीकडे निरोप घेऊन जाण्याची विनंती करतो. निरोप काय, तर हे प्रियतमे, थोडा धीर धरून आपले प्राण धारण करून रहा. चारच महिन्यात मी माझी शिक्षा भोगून त्वरित येईन व मग आपण पुन्हा परस्परांच्या सहवासात आनंदाने राहू.

हे छोटेसे कथानक ब्रह्मवैवर्त पुराणातले. पण त्यावर कालिदासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेने जो भव्य काव्यप्रासाद उभारलाय तो पाहून वाचकाची मति गुंग होते.

मेघदूताचे दोन भाग आहेत.

१) पूर्वमेघ (श्लोक संख्या ६३) 

२) उत्तरमेघ (श्लोक संख्या ५२) 

एकूण श्लोक संख्या ११३.

या खंडकाव्यासाठी महाकवींनी अत्यंत भारदस्त आणि श्रुतिमधुर अशा ‘मंदाक्रांता’ या वृत्ताची निवड केली आहे.

(गण- म भ न त त ग ग)

पूर्व मेघात मेघाने रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत कोणत्या मार्गाने जावे, वाटेत काय काय पहावे याचे विस्ताराने मार्गदर्शन केले आहे. उत्तरमेघात अलकापुरीचे, त्याच्या घराचे व प्रियतमेचे वर्णन आहे. बस!

काव्य शास्त्रदृष्टया मेघदूत

कथेतील नायक धीरललित आहे तर नायिका स्वकीया प्रेषितभर्तृका आहे. काव्यरस विप्रलंभ शृंगार. यक्ष नायक, यक्षपत्नी नायिका हे दोन आलंबन विभाव, मेघागमन हे उद्दीपन, विचारशून्यता, मेघयाचना हे अनुभाव ग्लानि, निराशा इ. सहचारी भाव व रति हा स्थायीभाव आहे. माधुर्य व प्रसाद ह्या दोन गुणांनी हे काव्य अलंकृत झाले आहे.

जगातील अनेक भाषांतून मेघदूताचे अनुवाद झाले आहेत. सर्वात प्राचीन अनुवाद तिबेटी भाषेतील आहे.

दीपशिखा कालिदास

कालिदासाने ‘रघुवंश’ काव्यातील नायिका इंदुमतीला दिलेली ही विश्वविख्यात उपमा, ज्यामुळे त्याला ‘ दीपशिखा कालिदास ‘ही पदवी रसिकांनी दिली.

संचारिणी दीपशिखेव रात्रौ

यं यं व्यतीयाय पतिंवरासा।

नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे

विवर्ण भावं स स भूमिपालः।।

अर्थः- रात्री फिरणा-या दीपज्योतीप्रमाणे ती पतीची निवड करण्यास निघालेली इंदुमती ज्या ज्या राजाला टाकून पुढे गेली, तो तो राजा राजमार्गावरील महालाप्रमाणे काळा ठिक्कर पडला.

कालिदासाचा गौरव करणारे सुभाषित

पुरा कवीनां गणना प्रसंगे

कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्

अनामिका सार्थवती बभूव।।

अर्थः- पूर्वी कवींच्या गणनाप्रसंगी कनिष्ठिकेवर कालिदासाला आधिष्ठित केले. (पण) अद्यापी त्याच्या तोडीचा कवी निर्माण न झाल्यामुळे पुढची अंगुली जी अनामिका ती ख-या अर्थाने अनामिकाच ठरली!

कालिदास स्मृतिदिन

कालिदासाविषयी फार थोडी माहिती इतिहासाला ठाऊक आहे हे वर सांगितलेच आहे. त्याचा जन्मदिन, मृत्युदिन याची कुठेच नोंद नाही. म्हणून कालिदासाचा स्मृतिदिन आषाढ प्रतिपदा हा सर्वानुमते ठरवला गेला. मेघदूताच्या आरंभीच्या दुसऱ्या श्लोकाच्या तिसऱ्या पंक्तीवरून हे ठरविले. तो श्लोक असा..

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

तेव्हा अशा या थोर कविकुलगुरू कालिदासांच्या रम्य स्मृतीस सादर वंदन!!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्हेल माशाच्या तोंडात” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

डॉ. शिरीन वळवडे

अल्प परिचय

म.बी.बी.स (पूर्वाश्रमीची..डाॅ.कुसुम जुगादे), सध्या दिल्लीत प्रायव्हेट प्रॅक्टीस करत आहे.

लेखिकेचे प्रकाशित साहित्य – लुप्ता, कथुल्या, सखा, सासुबाई साल मुबारक, कथागुच्छ, जिचे हाती कढई, वगैरे,एकूण तेरा पुस्तकं प्रकाशीत.

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्हेल माशाच्या तोंडात” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

व्हेल माशाच्या तोंडात – – 

एड्रियन व त्याचे वडील डॅम सिसिमॅकस हे दोघेही व्हेनेझुएलाचे रहिवासी आहेत. मॅगेलनच्या सामुद्रधुनीत ते आपआपल्या लहान बोटी घेऊन जलविहारासाठी गेले होते. एकमेकांपासून काही मीटर्स अंतरावर ते होते.

अचानक एड्रियनला जाणवलं की त्याच्यावर काही तरी आदळलं. त्याने डोळे बंद केले. डोळे उघडले, तेव्हा त्याला जाणवलं की तो त्याच्या लहानशा बोटीसह व्हेल माशाच्या तोंडात होता. त्याच्या चेहर्‍यावर पातळसा ब्रश फिरत असल्याचं त्याला जाणवलं. तिथे त्याला फक्त गर्द निळा व पांढरा रंग दिसला. काय करावं, ते एड्रियलला कळेना. त्यानं श्वास रोखून धरला होता. पण किती काळ त्याला श्वास रोखून धरता आला असता? त्याला काहीच करता येण्यासारखं नव्हतं. पण त्याचं नशीब थोर होतं॰ त्याला जाणवलं की तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतोय. म्हणजे व्हेलने त्याला त्याच्या कयाकसह तोंडातून बाहेर फेकलं होतं.

हे सगळं दृश्य, त्याचे वडील हातबुद्ध होऊन पहात होते. नाहीसा झालेला एड्रियल पुन्हा कयाकसह पृष्ठभागावर आला, तेव्हा त्यांनी नि:श्वास सोडला. नंतर त्यांना व्हेल माशाचं धूड दूर निघून जाताना दिसलं.

उसळत्या लाटांचं चित्रीकरण करता यावं, म्हणून वडील डॅम यांनी. त्यांच्या बोटीच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवला होता. त्या कॅमेर्‍याने या विलक्षण थरारक प्रसंगाचे क्षण टिपले होते.

व्हिडिओमध्ये ते पुन्हा पाहताना, तो व्हेल मासा किती मोठा होता, ते पाहून त्यांना धक्काच बसला.

एड्रियननं नंतर बी. बी. सी. च्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, ‘तो केवळ जीवंत रहाण्याचा अनुभव नव्हता. मला जगण्याची दुसरी संधी मिळाली होती. ‘

व्हेल मासा जरी आकाराने फार मोठा असला, तरी त्याच्या गळ्याचा भाग फार लहान असतो. ते फक्त लहान मासे गिळू शकतात. माशाच्या तोंडात गेलेले लोक मरतात, कारण ते श्वास रोखून धरू शकत नाहीत. मासा त्यांना बाहेर फेकतो, कारण तो त्यांना गिळू शकत नाही.

एड्रियननं श्वास रोखून धरला व तो जीवंत राहिला. ‘ असं मत प्राणीशास्त्रज्ञांनी वर्तवलं.

एड्रियन माशाच्या तोंडातून, म्हणजेच मरणाच्या दारातून परत आला होता.

(सौजन्य – ‘विपुलश्री’ – जुलै 2026)

© डॉ. शिरीन वळवडे

मो. 9911244701

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घरकाम नाही.. ते घरचं योग – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ घरकाम नाही.. ते घरचं योग – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 

“घरकाम नाही, ते घरचं योग” – एका पिढीची गोष्ट

पहाटे 4 वाजता. 65 वर्षांची महिला उठली.

पहिले आसन – मालासन: वाकून रांगोळी काढते. 21 ठिपके. प्रत्येक रेषेसाठी मणका वाकतो, पायांच्या नसा ताणल्या जातात. डॉक्टरांनी सांगितलेला Squat Exercise आजीला 60 वर्षांपासून माहिती आहे. “रांगोळी काढली तर गुडघे दुखत नाहीत, ” असं ती म्हणायची.

दुसरे आसन – उत्कटासन: कपडे धुणं. दोन पाय थोडे वाकवून, कंबर सरळ ठेवून, हातांनी कपडे दगडावर आपटणं. 20 मिनिटं. खांदा, हात, कंबर सगळ्यांचा एकत्र व्यायाम. जिममधल्या Chair Pose + Arm Workout ला आजीने दिलेलं नाव – साडी धुणं.

तिसरे आसन – त्रिकोणासन: ओले कपडे पिळून, दोरीवर वाळत घालणं. पाय एका बाजूला, हात वर, कंबर वाकवणं. शरीर बाजूला ताणलं जातं. लिव्हर, किडनी शुद्ध होतात.

चौथे आसन – अधोमुख श्वानासन: वाकून घर झाडणं. रक्तप्रवाह डोक्याकडे जातो. मेंदू तल्लख होतो.

पाचवे आसन – मार्जारासन: बसून राखेने भांडी घासणं. मनगट, बोटं फिरतात. आर्थरायटिस येत नाही. राखेतला पोटॅश नैसर्गिक जंतुनाशक.

नातू रवीने विचारलं: “आजी, तू मोलकरणीसारखं एवढं काम का करतेस? एकीला ठेवू शकतेस ना? “

आजी हसली: “मोलकरीण? अरे बाळा, मी नाही. हे माझं घरचं योग आहे. हे कामं सोडल्यादिवशी माझं अंग जड होईल, मन बिघडेल. “

लक्ष्मम्माची सून दीपा. सॉफ्टवेअर नोकरी. सकाळी उठल्या उठल्या Washing Machine ऑन, Dishwasher ऑन, Robot Vacuum ऑन. 8 तास लॅपटॉपसमोर बसणं. मान दुखते, कंबर दुखते, BP, शुगर. संध्याकाळी जिमला 2000 रुपये भरून जाते. ट्रेनर सांगतो: “मॅडम, 20 स्क्वाट्स करा, 15 मिनिटं Arm Rotation करा, वाकून झाडा. “

दीपाला अचानक वीजेसारखी जाणीव झाली: “अरे, हे सगळं तर आपली सासू पैसे न घेता घरातच करत होती ना! आपण त्याला काम म्हणून हिणवलं. त्यांनी त्याला आरोग्य म्हणून जगलं. “

त्या दिवसापासून दीपा बदलली. मशीन असूनही, रविवारी मुलांसोबत रांगोळी काढते, कपडे धुते. “आई, हे काम नाही, फॅमिली योग टाईम आहे” असं मुलांना सांगितलं.

चूक कुठे झाली? आपण दोन चुका केल्या.

चूक 1: नाव बदललं. वाकून रांगोळी काढली तर मालासन, घरात काढली तर मोलकरणीचं काम. बाहेर जिममध्ये केलं तर Fitness, घरात केलं तर Chores. नाव बदलताच आदर बदलला.

चूक 2: हेतू विसरलो. आजीने रांगोळी काढली ती घर सुंदर दिसावं म्हणून नाही. “माझं कुटुंब सकाळी उठल्यावर सुंदर काहीतरी पाहून, चांगल्या मनाने दिवस सुरू करावा” या प्रेमाने. स्वयंपाक केला तो भूक भागवण्यासाठी नाही. “माझ्या हातचं खाल्लं तर माझ्या मुलाला माझं प्रेम, माझी शक्ती मिळावी” या तळमळीने. घर झाडलं ते धूळ जावी म्हणून नाही. “माझ्या घरात येणाऱ्यांना आजार होऊ नयेत” या जबाबदारीने.

आपण फक्त काम पाहिलं. त्यामागचं प्रेम पाहिलं नाही. तीच आपली चूक.

योग म्हणजे काय? पतंजली अष्टांग योगात सांगतात: “योग म्हणजे मन, शरीर, श्वास एकरूप करणं. ” आपल्या आज्यांनी तेच केलं. जमीनच योगा मॅट. घरच योग स्टुडिओ. कुटुंबच योग गुरू.

शेवटचा शब्द: “हे मोलकरणीचं काम आहे, ” असं जेव्हा आपण म्हणालो, तेव्हा आपण एका आईच्या प्रेमाचा अपमान केला. “Time Waste” म्हटलं तेव्हा, 5000 वर्षांचं विज्ञान कचऱ्यात टाकलं.

घरकाम ही गोष्ट काम नाही, ते प्रेम वाटण्याची पद्धत आहे. स्वयंपाक करणं म्हणजे चव नाही, आयुष्य वाढवणं. घर स्वच्छ करणं म्हणजे कचरा नाही, वाईट विचार बाहेर झाडणं.

यापुढे कोणी “आई, तू इतकं काम का करतेस? ” असं विचारलं तर असं सांगा: “मी काम करत नाही बाळा. मी माझ्या घरासाठी, माझ्या शरीरासाठी, माझ्या माणसांसाठी योग करते. ही माझी पूजा आहे. “

भारतीय संस्कृतीत काम वेगळं, सेवा वेगळी. काम केलं तर थकवा येतो. सेवा केली तर आनंद मिळतो.

आपल्या आज्या 90 वर्ष जगल्या त्या जिमला जाऊन नाही, घरालाच देवघर मानून, कामालाच योग बनवून.

उद्यापासून तुझ्या घरात काम असेल? की योग सुरू होईल?

 

लेखक – अज्ञात

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण. (गाथा नारी जन्माची)

एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”

आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अवकाशाची सीमा या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

☆ अवकाशाची सीमा  

तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु

 *

ती : हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सुरसमाधि गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

 *

तो : खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २

 *

 तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ती: ज्ञानाची विज्ञानाची

दोघे :वर्षा तुजवर आशीशाची

 तव तेजाचा मार्ग दीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)

हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.

 हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.

  तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु  

या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल. ” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.

“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. नभिचे नक्षत्र आणावे यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.

कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,

 ती: हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सूर समाधी गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.

जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.

आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..

 तो: खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२

आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे, ” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे. इतकी गती, इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.

मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”

या ओळींमध्ये पाकोळी अवकाशाची ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. पाकोळी हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.

“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्‍यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे. ”

पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे

तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ज्ञानाची विज्ञानाची

दोघे: वर्षाव आशीशाची

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३

पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, तव प्रज्ञा विनायकाची

“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे. ”

या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,

ज्ञानाची विज्ञानाची ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे. ”

 या इथे कवीने वापरलेल्या विज्ञानाची हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की, ” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे! ”

मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,

 वर्षाव तुजवर आशीशाचा

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..

आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ”

अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.

॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत. कसलाही दबाव तिच्यावर नाही. एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.

डॉ. निशिकांत श्रोत्री एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं स्त्रीवादीपण प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या अवकाशाची सीमा या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.

अवकाशाची सीमा या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस आणि पक्षीजीवन ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ पाऊस आणि पक्षीजीवन ☆ शालिनी जोशी

४/७/२६. पाऊस आणि पक्षीजीवन

अलीकडे आठ दिवस पाऊस सुरू झाला आहे. प्रतीक्षा करून थकलेल्यांना दिलासा मिळाला. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार. पक्षी जीवन पूर्णपणे झाडावर अवलंबून. घरा शेजारचे आंब्याचे झाड माझ्या डोळ्यासमोर. त्यामुळे पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरू होणारी पक्षी जीवनाची सुरुवात माझ्या परिचयाची. ही सुरुवात सध्या कोकीळ आणि कोकिळेच्या संवादाने. तो अधून-मधून दिवसभर चालूच. कधी सुसह्य तर कधी असह्य, कधी आर्त तर कधी श्राव्य. इतर पक्षांची हालचाल असतेच. बुलबुल आणि नाचण(fan tail) कायमचे रहिवासी. खारुताईची वटवट तर अखंड. शेवटी सांगावे वाटते, बाई आता गप्प बसायला काय घेशील? पुरे कर तो शेपटीचा तुरा घडवणे आणि त्या तालावर आवाज करणे. पोपट दिसत नाहीत पण पोपटपंची मधून मधून ऐकू येते. सुर्यपक्षी कोणाच्या अध्यात ना मध्यात. ते आपल्याच नादात, फुले असलेल्या झाडांच्या आसपास वावर. क्वचित चष्मेवाला, मैना, राॅबिन, टिट यांचेही दर्शन. मी आहे सांगणारी कावळ्यांची कावकाव कधी दूर तर कधी जवळ. अधून मधून भारद्वाजाचा भारदस्त आवाज. असे हे पक्षी जीवन, घरात बसणारी मी त्यामुळे त्यांचा विचार हाच माझा एक छंद.

पण पाऊस सुरू झाला की हे सर्व पक्षी मंडळी कोठे गायब होतात कळत नाही. आवाज नाही, दिसत नाहीत. हिरव्या पानात कसे लपून जातात कळत नाही. आणि पाऊस थांबला की परत जागृती. हालचाल सुरू. यांना पाऊस कसा लागत नाही? भिजणे, थंडी नाही का? कारण घरटे बांधले तरी त्याचा उपयोग अंडी ठेवण्यासाठी. पिल्लूला पंख फुटले उडू लागली की घरटे निकामी. मग भर पावसात पक्षी कोठे झोपतात? काय खातात? आपण छत्री रेनकोट केवढा थाट करतो. गरम चहा, भजाचा आस्वाद घेतो.

पक्षांचे कौतुक कोण करणार? त्यांचे किती हाल होत असतील? पण न कुरकुरता त्यांचे जीवन सुरू असते. असं वाचलं की पक्षांच्या शेपटी जवळ ग्रंथी असतात. त्यातून तेलकट द्रव पाझरतो. आपल्या चोचीने पक्षी तो सर्व अंगाला लावतात. त्यामुळे त्यांचे अंग भिजत नाही. निसर्गाने किती छान योजना केली आहे. त्यालाच सर्वांची काळजी. आपण मात्र मी शहाणाच्या अभिमानात. पण पक्षी काही कुरकुर न करता मिळेल ते खाद्य, पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा, मिळेल त्या आडोशाला निवास, कुणाशी भांडण नाही. अन्नाची साठवण नाही. आनंदाने एकाच झाडावर सर्व राहतात.

पिल्लू उडायला शिकली, स्वावलंबी झाले की त्यांनी कुठेही जावं. आई वडील कर्तव्यातून मोकळे. म्हणून म्हणतात पक्षासारखं जगावं. कर्तव्य करावं पण प्रपंचात अडकू नये. मिळेल त्यात समाधानी असावं. हव्यास तेथे ईर्षा तेथे असमाधान.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वर्ग, नरक, आणि आपण – -” – लेखक : मुक्तक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “स्वर्ग, नरक, आणि आपण – -” – लेखक : मुक्तक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून माणूस आयुष्यभर किती धडपड करतो. कुणी उपवास करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतो, कुणी देवाला नवस बोलतो. जणू काही स्वर्ग म्हणजे एखादी नवीन हौसिंग सोसायटी आहे आणि तिथे 1 BHK बुक करण्यासाठी पॉइंट्स जमा करायचे आहेत.

पण मला एक प्रश्न पडतो.

जर आपण आधीच स्वर्गात राहत असू तर?

जरा सकाळी उठल्यावर आजूबाजूला नीट बघा.

बटण दाबलं की दिवा लागतो. दुसरं बटण दाबलं की पंखा फिरतो. तिसरं दाबलं की एसी सुरू होतो. नळ उघडला की पाणी येतं. गॅस पेटवला की काही मिनिटांत जेवण तयार होतं. मोबाईल काढला की जगभरातील माहिती हातात येते. एखादा मित्र अमेरिकेत असला तरी सेकंदात त्याचा चेहरा दिसतो.

आणि हे सगळं आपण इतक्या सहज घेतो की जणू काही ही पृथ्वीवरची नाही तर जन्मसिद्ध सुविधा आहे.

आजपासून फक्त दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या राजाला जर आपल्या घरात आणलं तर तो कदाचित घराबाहेर पडायलाच तयार होणार नाही.

“हे काय? ” “गरम पाणी. “

“हे? ” “थंड हवा. “

“हे? ” “जगभरातील माहिती. “

“हे? ” “दहा मिनिटांत पिझ्झा घरी. “

राजा म्हणेल, “मी आयुष्यभर राज्य केलं, युद्धं जिंकली, खजिने गोळा केले, पण हे सुख तर मला कधीच मिळालं नाही! “

म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आजचा सामान्य माणूस अनेक बाबतीत कालच्या राजापेक्षा सुखात जगतो.

पण गंमत बघा.

आपण या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही.

कारण माणसाकडे जे असतं त्याची किंमत नसते.

एसी सुरू आहे म्हणून आनंद नाही.

एसी बंद पडला की दुःख.

मोबाईल आहे म्हणून आनंद नाही.

नेटवर्क गेलं की जग संपल्यासारखं.

घर आहे म्हणून आनंद नाही.

शेजाऱ्याचं घर मोठं आहे म्हणून दुःख.

गाडी आहे म्हणून आनंद नाही.

त्याच्याकडे मोठी गाडी आहे म्हणून दुःख.

माणूस स्वतःच्या स्वर्गात उभा राहून दुसऱ्याच्या स्वर्गाची तुलना करत असतो.

पण त्याच वेळी पृथ्वीवर दुसरं चित्रही आहे.

आजही लाखो लोक प्यायच्या पाण्यासाठी रांगेत उभे असतात.

काही जणांकडे राहायला पक्कं घर नाही.

काही जणांना दोन वेळच्या जेवणाची खात्री नाही.

काही मुलांना शिक्षण मिळत नाही.

काही लोकांकडे घालायला पुरेसे कपडेही नाहीत.

आपण ज्या गोष्टींना “सामान्य” म्हणतो, त्या अनेक लोकांच्या आयुष्याचं स्वप्न असतात.

आपल्याला नळातून येणारं पाणी दिसतं.

त्यांना पाण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं.

आपल्याला एसीचा रिमोट सापडत नाही म्हणून राग येतो.

त्यांना उन्हापासून बचावासाठी झाडाची सावली शोधावी लागते.

आपण डाएट प्लॅन शोधतो.

ते पुढचं जेवण कुठून येईल याचा विचार करतात.

म्हणूनच मला वाटतं स्वर्ग आणि नरक हे मृत्यूनंतरचे पत्ते नसावेत.

ते इथेच आहेत.

एकाच शहरात.

एकाच गावात.

कधी कधी एकाच रस्त्यावर.

एका घरात मुलगा नवीन मोबाईल स्लो झाला म्हणून नाराज असतो.

समोरच्या घरात मुलगा ऑनलाइन वर्गासाठी मोबाईल नसल्यामुळे शिकू शकत नाही.

एका माणसाला गरम पाणी उशिरा आलं म्हणून त्रास होतो.

दुसऱ्याला पाणीच मिळालं तर तो आनंदाने आंघोळ करतो.

फरक फक्त परिस्थितीचा नाही.

फरक दृष्टीकोनाचाही आहे.

कारण काही लोक नरकात राहूनही हसतात.

आणि काही लोक स्वर्गात राहूनही कुरकुर करतात.

माणसाची एक सवय खूप विचित्र आहे.

तो जे नाही त्याची यादी रोज बनवतो.

पण जे आहे त्याची यादी कधीच बनवत नाही.

जर प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच गोष्टी लिहिल्या…

आज मला श्वास घेता येतो.

आज माझ्याकडे पिण्याचं पाणी आहे.

आज माझ्याकडे खायला अन्न आहे.

आज माझ्याकडे झोपायला जागा आहे.

आज माझे प्रिय माणसं माझ्यासोबत आहेत.

… तर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.

आपण स्वर्ग शोधत आहोत.

पण कदाचित स्वर्ग ही एखादी जागा नसून एक जाणीव आहे.

आणि नरकही एखादी जागा नसून एक विस्मरण आहे.

जे आहे त्याची किंमत विसरणं म्हणजे नरक.

जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं म्हणजे स्वर्ग.

बाकी मृत्यूनंतर काय मिळेल हे कुणालाच माहीत नाही.

पण जिवंत असताना पृथ्वीसारखा ग्रह, श्वास घेण्यासाठी हवा, प्यायला पाणी, खायला अन्न, प्रेम करणारी माणसं आणि बटण दाबल्यावर मिळणाऱ्या हजारो सुविधा मिळालेल्या असताना सतत दुःखी राहणं… हा देखील थोडासा विनोदच आहे.

कदाचित देव वर बसून हसत असेल…

… “अरे, मी तुम्हाला स्वर्गात पाठवलं होतं. तुम्ही तिथेही तक्रार केंद्र सुरू केलंत! ” 

लेखक : मुक्तक जोशी

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares