☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..!..!☆ श्री संभाजी बबन गायके☆
सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!
२ जुलै १९९९ ची रात्र. अंधार माजल्यासारखा अधिकाधिक मिट्ट होत चाललेला. दिवसभर धडाडणा-या तोफा आता थंड करण्याचा,रात्रभर विश्रांती घेण्याचा आणि दिवस उजाडताच पुन्हा मारा सुरु करण्याचा त्यांच्यापुढे एक पर्याय होता…पण तो त्यांनी स्वीकारला नाही. आजचा तसा तिसरा दिवस होता. तोफा आणि तोफा डागणारे सैनिक, त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी यांनी क्षणभर विश्रांती घेतलेली नव्हती. कारण यांनी खालून वर तोफगोळे डागले नाहीत, तर पहाडांवर चढत जाणारे पायदळाचे सैनिक उंचावरून येणा-या पाकिस्तानी गोळीबाराला बळी पडणार होते, हे निश्चित. युद्धाचे सुद्धा एक तंत्र असते. शत्रू त्यांच्या सुरक्षित खंदकामध्ये आरामशीर बसून आपल्या सैनिकांवर गोळीबार करत असताना आपला तोफखाना शत्रूला तुफान बार उडवत भाजत राहिला म्हणजे त्यांना गोळीबार करण्यात अडचणी येतात…आणि शत्रू असा अडचणीत सापडल्याचा फायदा घेत आपले सैनिक आगेकूच करीत करीत त्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांच्या अधिकाधिक जवळ पोहोचू शकतात! आणि म्हणूनच हा तोफांचा मारा थांबला म्हणजे आपल्या सैनिकांना असणारा धोका वाढत जाणार!
१४ मे १९९९… ३१५, फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) कारगिल युद्धाच्या आरंभी द्रास सेक्टर मध्ये उतरवली गेलेली पहिली फिल्ड रेजिमेंट ठरली! पाकिस्तानी घुसखोरांच्या वेशात भारतात घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याच्या कामात इतर चार रेजिमेंटस व्यग्र झाल्या होत्या. तोलोलिंग, point 5140, black tooth, टायगर हिल, गन हिल- point 4875 ही महत्त्वाची ठाणी ताब्यात घ्यायला 1 Naga, 8 Sikh, 17 Jat, 16 Grenadiers निघाल्या होत्या आणि ३१५,फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) वर या चार रेजिमेंटसला साहाय्य पुरवण्याची (Artillery Support) देण्याची मोठी जबाबदारी दिली गेली होती. ज्या जागेवरून तोफा उडवल्या गेल्या ती जागा शत्रूच्या लक्षात यायला वेळ लागत नाही…मग शत्रूही या जागेवर मारा सुरु करतो. म्हणून तोफांचा जागा सातत्याने बदलत ठेवावी लागते..आणि हे काम अतिशय जिकीरीचे असते…पण तरीही मोठ्या त्वेषाने केले जाते!
रात्र सुरु झाली…आणि आपले सैनिक लक्ष्याच्या समीप पोहोचू पहात होते…वरून पाकिस्तानी मारा सुरु होता…अशावेळी खालून त्यांच्यावर अचूक मारा होणे गरजेचे होते…तसा संदेशही दिला जात होता…दिवसभर तोफा चालवून सैनिक थकलेले होते…सेकंड-इन-कमांड मेजर चंद्रभूषण द्विवेदी साहेब त्यांच्या तंबूत क्षणभर विसावले होते…संदेश कानी पडताच ते तंबूबाहेर धावले…त्यांनी स्वत: एका तोफेचा ताबा घेतला आणि ते फायरींग करू लागले…इतर तोफांतूनही तोफगोळे सतत आणि अचूक डागले जात आहेत, हे पहात होते…शाब्बास…शाब्बास…फायर! अशा आरोळ्या सुरु होत्या! थांबून चालणार नव्हते…त्यांच्या कवर फायरच्या आधारे जवान इंचा-इंचाने शत्रूकडे सरकत होते…रात्रीच्या अंधारात! भारताकडून तोफांचा मारा काही क्षण जरी थंडावला असता तरी शत्रूला खाली गोळीबार करण्याची उसंत लाभली असती.
सर्व काही सुरळीत सुरु होते….पण शत्रूला आपल्या तोफखान्याची जागा समजली होती….त्यांनी नेम साधला…एक तोफगोळा नेमका साहेब ज्या गनवर काम करीत होते…तिच्या अगदी शेजारी येऊन आदळला…अर्थात मोठा स्फोट झाला…साहेबांचा हातात आणि शरीरात त्या गोळयाचे अणकुचीदार तुकडे मोठ्या वेगाने घुसले…रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या…पण साहेब थांबले नाहीत…शेवटच्या श्वासापर्यंत आदेश देत देत तोफांचा भडीमार करीत राहिले…साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र लढत असणारे लान्स हवालदार मलय्या, नाईक सरवन कुमार, नाईक बिश्नु राय, लान्स नाईक गोपय्या, गनर राजकुमार, गनर सिंघा यांनी सुद्धा तिथेच शेवटचे श्वास घेतले!
आज या बलिदानांना पंचवीस वर्षे पूर्ण झालीत…कारगिल युद्धातला हा एक मोठा निर्णायक प्रसंग होता! मेजर चंद्रभूषण विन्धेश्वर द्विवेदी साहेब मरणोत्तर सेना मेडलचे मानकरी ठरले. बिहार मधील पूर्णिया मध्ये जन्मलेले चंद्रभूषण हे देशाचे भूषण ठरले. सुट्टीवर असताना द्विवेदी साहेब अत्यंत कुटुंबवत्सल आणि सीमेवर अत्यंत कर्तव्यकठोर असत. त्यांची थोरली कन्या नेहा डॉक्टर असून एका सैन्याधिकारी साहेबांशी त्या विवाहबद्ध आहेत. तर धाकटी कन्या दीक्षा लेखिका आहे. दीक्षा यांनी त्यांच्या पित्याने त्यांना सीमेवरून पाठवलेल्या पत्रांचा संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.
…… हुतात्मा मेजर चंद्रभूषण आणि त्यांच्या सहकारी हुतात्मा सैनिकांना आजच्या स्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद ॥
” हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस,यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा,..?”अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळाली देखील,…
पाणी पिताना येणार हसू दाबत,..अनुने हातानेच खुणावल,..आणि घोट गिळत विचारलं,”नक्की बरा आहेस ना,..?”अभि अगदी फुल मूड मध्ये,..हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”
आता अनु त्याच्या जवळ जात त्याला दटावत म्हणाली, ” अभ्या नाटकं नको हं,पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”
“नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला,..”
अनुने लाडाने त्याला पाठीत हलकं चापट देत म्हटलं,..” ताईंकडे चाललास मग असं सांग ना,..हे काय नवीन,..म्हणे माहेरी चाललो,..”
अभिने शर्टची घडी केली,इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे तिचा हात हातात घेऊन म्हणाला,..” “म्हणू दे मला हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाच पाकीट ठेवलं,..”
मी म्हंटल, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”
तर ताई म्हणाली,..”ओवाळणी नाही रे तुला माहेरपणाला बोलावतीये,..”
मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला पटकन जवळ घेतलं,..खुप रडली गळ्यात पडून.. म्हणाली, “आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात, पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो त्या उजळवण्याची जागा माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना,..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं म्हणजे माझ्याकडे,.. अनु आली की तू निघणार आहेस,..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी “.. एवढं सांगून तायडी गेली,..
आता मी चाललो माहेरी,..”जाऊ ना राणीसरकार,..?”
अनु म्हणाली, ” आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..”नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुज स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?”
अनु म्हणाली, ” जा बाबा जा.. जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वहाणं,… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”
अभि म्हणाला, ” असं मग येतोच हे सुख उपभोगून,..”
अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं खरंच भारी कल्पना आहे ही भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,..
“ये ना दोन दिवस. अभि गावाला गेलाय.. मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..
दोन्हीकडे माहेरपण रंगले,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना उत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..
हा खरंतर आमच्या केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा. अगोदर लिहिलेल्या केदारनाथ यात्रेचा पूर्वार्ध. यमुनोत्री यात्रेत घोडेबाजार सह रस्ता, पायी, घोड्यावर, पीट्टू, आणि डोली ने प्रवास कसा होतो हे पाहण्याचा सगळा अनुभव पहिल्यांदा आला. आणि काहीप्रमाणात पुढील केदारनाथ प्रवास कसा असेल याची थोडीफार जाणीव झाली ती याच प्रवासात. पण जाणीव असणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती, यात काहिवेळा प्रत्यक्ष परिस्थिती थोडी बिकट असते असा अनुभव येतो. तो मात्र केदारनाथलाच आला.
एखाद्या पैसे गुंतवण्याच्या जाहिरातीत जसं काही जोखीम किंवा आर्थिक धोका असणार्या काही गोष्टी पटापट सांगीतल्या तर जातात, पण आपल्याला त्या नीट कळत नाहीत. तसाच काहीसा प्रकार यमुनोत्री आणि केदारनाथ प्रवासात जाणवला.
यमुनोत्री यात्रेत केदारनाथ यात्रेची कल्पना आली असली तरी ती फक्त चुणूक होती. कारण या यात्रेचा प्रवास छोटासाच होता. अंतर जास्त नव्हतं. वातावरण बदलाचा प्रभाव तेव्हढा नव्हता. आणि पायी, घोडा, किंवा डोलीच्या प्रवासाच्या अगोदर आणि नंतर पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.
पण घोड्यावर बसण्याचा त्रास लक्षात आला तो इथेच. आम्ही घोडे करायचे ठरवल्यावर त्या घोडेवाल्यांना आपलाच घोडा घेऊन आपल्यालाच पैसे मिळावेत याची इतकी घाई झाली की आमच्यापैकी दिसेल त्याला, बाई आणि माणूस यांना उचलून घोड्यावर बसवायची स्पर्धाच सुरु झाली आहे असं वाटलं.
मी वर जावं की नाही. जायचच असल्यास घोडा करावा की डोली. याचा विचार करण्याअगोदरच चारपाच जणांनी जमेल तसं उचलून एखाद पोतं चढवून त्याला हलवून नीट कराव तसं समोर असलेल्या घोड्यावर मला चढवलं सुध्दा. त्यातही पहीला प्रयत्न थोडा असफल झाल्यावर माझ्या शरीराकडे आणि हालचालींकडे पाहून एक त्यातल्यात्यात कमी उंचीचा घोडा आणला.
यावेळी मला दहीहंडी उत्सवाची आठवण झाली. फक्त तिथे पहिला प्रयत्न असफल झाल्यावर दुसरा संघ येतो. पण लक्ष्य तेवढंच उंच असतं. इथे मला घोड्यावर चढवणारा संघ त्याच घोडेवाल्यांचा होता. पण कमी उंचीचा घोडा आणून गोंविंदाला (मला) कमी उंचावर चढवलं जाणार होतं. यात मी मात्र कदाचित मनातल्यामनात खऱ्या गोंविंदाचा धावा केला असावा.
या सगळ्या गदारोळात आमच्यापैकी दोन तीन जणांना याच पध्दतीने घोड्यावर चढवलं सुध्दा होतं. असा प्रसंग अगोदर आला नसल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून कमी अधीक प्रमाणात, वेगवेगळे आवाज निघाले होते. या आवाजात भिती, किंचाळणं, सवय नसणं, या प्रकारे उचलतील याचा अंदाज नसणं याचे संमिश्र भाव होते. मला त्रास झाल्याने माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता, तर मला घोड्यावर बसायचंच नाही म्हणून मी चक्क ओरडत होतो. पण ते ऐकणार कोण……. कारण सगळ्यांच्याच बाजूला घोडे आणि घोडेवाले यांचीच गर्दी.
मी घोड्यावरुन काहिही करून खाली उतरण्यासाठी धडपडत होतो. आणि आलेलं गिर्हाईक जाऊनये याचा खटाटोप घोडेवाले करत होते. यात थोडा गोंधळ झाला. पण या सगळ्या गोंधळात एकच जण त्यातल्यात्यात शांत होता….. तो म्हणजे घोडा…….
म्हणजे माणसं घोड्यासारखी आणि घोडा माणसासारखा वागत होता…….
मी अगदी थोडावेळच घोड्यावर होतो. पण तेवढ्या अल्पकाळात माझ्या नजरेसमोर घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन, ती घोड्यांबरोबर चालवणारे मावळे. आणि पाठीशी लहान मुलाला बांधून मेरी झांसी नही दूंगी असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी येऊन गेले. आणि मनातल्यामनात त्यांची माफी मागत. तडफेने घोड्यावरुन पायउतार झालो.
राजकारणात पायउतार व्हाव यासाठी खटाटोप असतो. तर इथे मी पायउतार होवूनये म्हणून प्रयत्न सुरु होते. पण शेवटी विजय माझाच झाला असलातरी आता काय करावं?……. या विचारात घोडेवाले आणि माझ्या बायकोसह ज्यांनी मला बरोबर नेले होते ते सगळेच मान खाली घालून वीचार करत होते. शेवटी तुुम्ही सगळे जा…… मी यमुनोत्रीच दर्शन घेतलं नाही तरी चालेल….. या विचारावर माझा प्रवास थांबला आणि इतरांचा सुरु झाला.
यांच्या पूर्ण प्रवासाला दोनतीन तासांचा कालावधी अपेक्षीत होता. पण जेमतेम अर्धाच तास झाला असेल. माझ्या बायकोच्या सांगण्यावरून परत एक सहकारी कुलकर्णी यांचा फोन…….. काय विचार करताय….. परत केव्हा येणार आहोत…. करा हिंमत….. डोली करा पाहिजेतर……. आम्ही रस्त्यात, नाहीतर वर थांबतो, वाट बघतो.
मग काय?……. माझ्या अंगात परत एकदा झाशीची राणी, आणि मावळे यांच स्फुरण चढलं. फक्त चढाईसाठी घोड्याएवजी डोली वापरावी असा निर्णय माझाच झाला. (कधीतरी मी एकटासुध्दा धाडसी आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढला.) आणि परत आमच्या चारचाकीच्या सारथ्याला सोबत घेत मी एक डोली ठरवून त्यात त्याच डोलीवाल्यांच्या साहाय्याने अगदी पेशवाई थाटात नाही, पण पाय जमतील तसे जवळ लांब करत वीराजमान झालो. सुदैवाने वातावरण चांगले होते.
मी वीराजमान झाल्यावर आमचा प्रवास सुरु झाल्याची वार्ता उलट टपाली भ्रमणध्वनी द्वारे पाठवण्याची काळजी मीच घेतली. ती पोहोचेपर्यंत त्यांचा गड सर होत आला होता. त्यांच्यासाठी ही आनंदी वार्ता होती. बायको जवळ त्या वेळी तिथे साखर असती तर कदाचित तीने त्या बसल्या घोड्यावरुनच साखर वाटायचा आनंदही घेतला असता. पण तो योग नव्हता.
मी सुखरुप वर पोहोचलो. आमची मंडळी आणि सोबतचे सहकारी यांची भेट झाली. आणि यमुनोत्री दर्शन व परतीचा प्रवास सुखरुप झाला.
या वेळी एक गोष्ट घडली ती आमचे सहकारी नंदेश परदेशी यांनी लक्षात आणली. बर्याचशा सिनेमात लग्नाची द्रृश्य आवर्जून दाखवली जातात. या सगळ्या सोहळ्यात नयनरम्य द्रृश्य असतात. असच नयनरम्य द्रृश्य आमच्या या प्रवासात पण होतं. फक्त सिनेमात वर हा घोड्यावर असतो. आणि वधू डोलीत असते. आमचा लग्न सोहळा कधीच पार पडला होता. पण आज माझी बायको घोड्यावर स्वार होती. आणि मी मात्र डोलीत होतो. आज खर्या गोष्टीला क्रूतीची साथ होती. आणि साक्ष होती यमुनोत्री.
आजच नाही तर आजच्या आधीच्या इतर प्रवासातच काय….. बाहेर जातांना सुध्दा खर्या अर्थाने ती पुढाकार घेत असते, आणि मी त्यातल्यात्यात सुरक्षित आणि कमी खडतर मार्ग माझा असतो, आणि खडतर तिचा. पण आज ते घोडा आणि डोली या प्रवासात जाणवलं.
कालच कळलं.. अण्णांना ‘आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालाय.
यंग इंडिया ऑर्गनायझेशन दरवर्षी हा पुरस्कार देतं.. पाच लाख रुपयांचा. मज्जा आहे बुवा अण्णांची.
अण्णा वेडा माणूस. त्याहून वेडी माई… हे वेड मजला लागले. वेड्याची बायको.. माईला वेड्याची बायको होण्यात काय सुख वाटायचं कुणास ठावूक? आपण तरी काय करणार?
.. तर काय सांगत होतो? हा अण्णा चांगला मुख्याध्यापक होता जिल्हा परिषदेच्या शाळेत. मोजून पंधरा वर्ष नोकरी केली. आयुष्यभर काटकसरीत जगला. पै पै साठवला… खरं सांगतोय.. परवडायचं नाही म्हणून मूलही होऊ दिलं नाही. काय म्हणायचा माहित्येय? शाळेतली मुलं ही माझीच मुलं. असला वेडा माणूस…
त्याला माईची साथ… कल्याणमस्तु!
एक दिवस वेडाचा झटका आला. दिली नोकरी सोडून. गेली दोघं जव्हारच्या जंगलात. झोपडीत राहिली तिथं दोघं. कुठली तरी ठाकरवाडी. एक एक पोरगं गोळा केलं. शाळा सुरू केली… झोपडीतच.
तो सुद्धा संपत आला. शाळा हा एकच ध्यास. त्यासाठी सगळा अट्टहास. दिसेल त्याच्यापुढे हात पसरले.
.. अण्णा नेहमी म्हणायचे. चांगल्या कामासाठी, शिक्षणासाठी, हात पसरताना कधीही लाजू नये. सरकारी अनुदानासाठी धडपड चालू होती. अण्णांच्या चपलांचे अनेक जोड झिजून मेले. टेबलाखालचे व्यवहार अण्णांना कधी जमलेच नाहीत.
वाईट माणसं भेटली तशी काही चांगलीही. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेलं. अण्णांनी सगळं लक्ष विद्यार्थ्यांवर केंद्रित केलं. नुसत्या मार्कांची फॅक्टरी नको होती अण्णांना… चांगल्या माणसाचं वाण देणारी शाळा हवी होती.
– अण्णांनी शाळा तशीच घडवली… शिस्त पाळणारी… संस्कार जपणारी… मातीला न विसरणारी.
अण्णांची शाळा म्हणजे हिऱ्याची खाण… जिथं मुळाक्षरं पोचली नव्हती, तिथली मुलं शिकली. मोठी झाली.
कुणी सरकारी अधिकारी झाले. कुणी डाॅक्टर झाले. कुणी इन्जिनिअर झाले… आणि कुणी शिक्षक….. अण्णांच्या तालमीत तयार झालेले शिक्षक पुन्हा अण्णांना येवून मिळाले. अण्णांची काळजी मिटली.
शाळा एकदम जाऊ दे जोरात. ते जाऊ दे हो.. प्रत्येक जण ‘चांगला माणूस’ झालाय. बरीच जणं शहरात गेली. तरीही मातीला विसरली नाहीत. जमेल तेवढी मदत आठवणीनं करायची. शाळेसाठी, वाडीसाठी.
अण्णा आणि माई… सेकंड इनींग्जची सुरवात. आयुष्यभर कधी ‘टाईमप्लीज’ म्हणलं नाही. आता दोघंही थकली..
सदानंद… अण्णांचाच विद्यार्थी. इंजिनिअर झालाय. काही दिवस नोकरी. आता स्वतःचं युनिट काढलंय भोसरीला. जेवढं कमावतो, त्यातले निम्मे वाटतो. त्याची बायकोही त्याला साजेशी. दोघंही अण्णांचेच विद्यार्थी. अण्णांवर दोघांचा भारी जीव. माई अण्णा दोघं आता त्याच्याकडेच असतात.
…. अण्णांना पुरस्कार मिळाल्यापासून सगळे आनंदात.
समारंभ छानच झाला. तुडुंब गर्दी. अण्णांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम संपवून मंडळी घरी.
बक्षिसाचा चेक अण्णांनी माईच्या हातात दिला…
” यावर तुमचा हक्क. आयुष्यभर तुमची कुठलीही हौसमौज पुरवता आली नाही. स्वतःच्या सगळ्या इच्छा तुम्ही मारून टाकल्या. तुमचं एखादं तरी स्वप्न यातून पुरं करा..”
माई गहिवरल्या..
” खरं सांगू, डोळे भरून युरोप बघायचा होता एकदा…”
”ठरलं तर मग.”
.. “आधी तुमच्या दोघांचा पासपोर्ट काढायला हवा. महिनाभरात होऊन जाईल ते काम. मग तुमच्या युरोप टूरचं बुकींग करू…” सदानंद उवाच.
सदानंदने फारच मनावर घेतलं. चार आठवड्यात पासपोर्ट आला सुद्धा.
” उद्या जाऊ यात टूरिस्ट कंपनीच्या आॅफीसात ” अण्णांनी माईंना आठवण करून दिली.
” काही नको. पैसे संपले. काल गजा आला होता. तुम्ही गेला होतात चेकअपला. वाडीतल्या शाळेतली शिक्षकाची नोकरी सोडलीये त्यानं. तो तिकडे निघालाय बीड जिल्ह्यात… ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढतोय. तुमची खूप वाट बघितली. शेवटी कंटाळून गेला. लगोलग सदाला बोलवून घेतला. पुरस्काराची ती रक्कम त्याच्या खात्यात वळती केली. त्या पैशाची खरी गरज तिथं होती. म्हणून म्हणलं, टूरटूर करू नका फार…”
…. अण्णा गडगडाटी हसले… अगदी मनापासून. कौतुकानं त्यांनी माईंकडे बघितलं. माई नव्या नवरीसारख्या लाजल्या.
☆ एका संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले.. बाहेर दत्तू होता..
‘काय हो काका? आज सकाळीच…
‘मास्तर आसत..?
‘अजून झोपलाय तो.. काल रात्री गेटमिटिंग करून आलाय.. उठवू का?
तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला..
‘काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच..?
मास्तर.. कालच्या मिटिंगमध्ये काय ठरला संपाचा?
‘नाही हो.. मालक मागण्या मान्य करत नाही.. आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही असे साहेबांचे म्हणणे..
‘मास्तर.. यात आमी उपाशी रवलव.. दोन वरसा झाली.. संप आज मिटात. उदया मिटात म्हणून.. खायचा काय?
‘होय हो काका.. मला का समजतं नाही.. एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती.
‘मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणटत?
‘बघू.. आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना.. त्याना कालच्या गेटमिटिंग बद्दल पण सांगायचे आहे..
‘मास्तर.. जास्त वेळ काढू नकात.. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय.. दोन वरसा झाली.. तेच्या घरची चौकशी करतत.. गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी.. आणि लग्नाचो खर्च.. कपंनी बंद.. पैसे खायसून हाडू?
‘बर मी आज म्हणतो अण्णांना.. तुमचा विषय पण सांगतो.. या तुम्ही..
‘उदया येतंय मास्तर.. बरी बातमी घेऊन या.. म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.
आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली..
‘गेले दत्तूकाका?काय म्हणत होते?
‘संप केंव्हा संपणार? त्यान्च्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली.. त्यान्च्या गावाकडील आहे मुलगा.. कणकवली जवळचा.. पोलीस आहे.. लग्न करायचे पण खिशात काय तरी हवे ना..
‘या तुमच्या संपामुळे खुप लोकांचे वांधे झाले.. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?
‘सोळाशे.. आणि स्टाफ वेगळा..
‘म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारवाचून आहेत.. एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत.
‘होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत.. दत्तू काका सारखे..
‘विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती पण माझी नोकरी आहे म्हणून.. कशी काय असेना..कमी पगाराची का असेना पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.
‘बर.. मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे.. बस साठी.. सिगरेट्स पण संपल्यात.. श्रद्धाने पर्स मधून पन्नास रुपये काढून दिले.
विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला. आत अण्णाच्या समोर पाचसहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पहाताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले..
‘झाली काल गेट मिटिंग? कामगारांचे काय म्हणणे?
‘अण्णा.. कामगार घायकुतीला आलेत.. त्त्यांचा संयम संपला.. त्यान्च्या दोन वेळ जेवणाचे वांधे झालेत.. पोरीबाळींची लग्ने अडकलीत.
‘पण त्या वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणे पट्टीत दहा बारा कंपनीत भरगोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली..मिलचा संप फसला.. डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?
‘म्हणजे अण्णा.. मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?
‘होय रे बाबा.. खूपच बदल झाला.. डॉक्टर एवढे स्ट्रॉग.. एवढा मिलकामगार त्यान्च्या मागे.. तरी संप यशस्वी झाला नाही.
‘का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?
‘कारण मुंबई.. येथील जमिन.. जमिनी विकून कोट्यावधी पैसे मिळतात तर मिल चालवायला कुणाला इंटटेस्ट आहे? आणि राज्यकर्ते.. दोघांची आतून सेटलमेंट..
‘मग आपला संप? त्याचे काय होणार?
‘विश्वास.. मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही.. कारण माझे यूनियन मुंबईतील अजून दहा कंपनीत आहे आणि पुणे.. नाशिक भागात पण आहे.. हा संप फसला तर इतर कंपनीत परिणाम होईल… मला माझे यूनियन सुरु ठेवायचे आहे आणि त्यावर माझी डाळचावल आहे.
‘जीवो जिवश्य जीवनम.. हा डार्विनचा सिंद्धांत तुला माहित असेलच. अश्या लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात.
‘हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत..
‘मग कामगारांना तू का सांगत नाहीस.. संप मोडून कंपनीत जा म्हणून?
‘मला तसें सांगावेसे वाटते.. पण मला हे मान्य करायला हवे.. अजूनही बऱ्याच कामगारांचा तुंमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यात तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण..
‘कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…
‘मला माहित आहे.. तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत.. त्याना तुम्ही पोसताय.. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल..
अण्णा मोठ्याने हसले..’तुला माहित आहे ना सर्व.. मग गप्प बस..
रागाने विश्वास बाहेर पडला.. बस पकडून घरी आला.. घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडतं नव्हते.. पुढे काय करावे हे त्याला कळेना.. त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी.. कामगार.. त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचं. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला.. त्त्यांचे लहानसहान प्रश्न सोडवू लागला.. त्यामुळे तो यूनियनलीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते. ते विश्वासबरोबर बोलत.. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.
विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..
मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.
छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.
मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.
मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”
“अग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.
आई म्हणाली,” नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”
एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.
मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की ग आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.
आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.
आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.
त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”
“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे.” आजीने डोळे पुसले.
मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात.
त्या म्हणाल्या,”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”
मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”
मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे त्यांना नोकरी लावून दिली व डॅाक्टरना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.
आई, तू किती चांगली आहेस ग! म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली,” तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं…
कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं.
“अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एका प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.
“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतय. एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं. ” आई म्हणाली.
“मग आई या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.
आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behaviuor therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्याची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”
मी आईकडे अभिमानाने बघितलं. १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.
मी आईला घट्ट मिठी मारली! “आई ग तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”
आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असते. आत लपलेले बरच काही आपल्याला सहजी दिसत नाही..
Before you judge someone, at least walk a mile in his shoes म्हणतात ते उगीच नाही!
☆
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कोकणामध्ये आंबोली घाट उतरून खाली गेलो की हिरण्यकेशी नदीचा उगम आहे.. तिथून अजून खाली उतरलो तर तिलारी नावाचा एक मोठासा जलाशय आपणास दिसतो.. आणि अजून खाली उतरलं तर मग गोवा बॉर्डर सुरू होते.काही अंतरावर कर्नाटक बॉर्डर आहे. त्या निसर्गरम्य भागात राहणाऱ्या एका गावातील आजीची ही गोष्ट..
कोकणामध्ये पंधरा-वीस वर्षापासून सारखा हत्तीचा धुमाकूळ आणि त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून येतात.. आजीचे शेत मुख्य गावापासून साधारण सात आठ किलोमीटर जंगलामध्ये.. तेथे आजी व आजोबाने एक झोपडी वजा राखण करण्यासाठी मचानासारखं घर बंद होतं.. बाजूलाच विहीर होती.. जंगलातील हत्ती कित्येक वर्षापासून आजी आजोबांना बघायचे.. आजी आजोबा सुद्धा.. हत्तींना सरावले होते.. विहिरीचं पाणी प्यायला मिळत असल्याने म्हणा.. किंवा त्या भागात हत्तींना सेफ वाटत असल्याने.. तोच त्यांच्या येण्या- जाण्याचा व विसाव्याचा मार्ग होता.. हत्ती बऱ्याचदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह आजीच्या ह्या घराजवळ बराच वेळ घालवायचे.. आजोबा आजी हत्तींचा हा कुटुंब कबीला लांबून निरीक्षण करायचे.. कधीही त्यांना ढोल बडवून किंवा मोठा आवाज करून.. फटाके लावून.. करंट लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.. उलट त्यांच्यासाठी सुरक्षित असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले..
एक दिवस दुपारी आजी आजोबा लांबून हत्तींना बघत असताना.. एक भली मोठी हत्तीण जमिनीवर गडबडा लोळायला लागली.. तिला वेदना होत होत्या असं वाटलं.. आणि थोड्याच वेळात.. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.. तीन चार हत्ती तिच्या बाजूला घोळका करून बघत होते.. बराच वेळ झाला तरी हत्तीण जागेवरून उठत नव्हती.. त्यामुळे इतर हत्तीची कासावीस वाढली होती.. ते काळजीपोटी मागेपुढे.. मागेपुढे करत होते.. काय करावं त्यांना सूचना! आजीने हे लांबून बघितलं.. तिच्या लक्षात आलं.. शेवटी आजीही एक आईच होती.. तिने हिंमत करून हत्तीजवळ जायचं ठरविलं.. आजोबा ‘नको.. नको’ म्हणत असतानाही आजी गेली.. तिने विहिरीतून दोन-तीन बदल्याभरून पाणी काढलं.. आणि ते पाणी बेशुद्ध झालेल्या हत्तीणीच्या सोंडेवर आणि अंगावर ओतलं.. थोडसं पाणी तिने हिमतीने.. सोंडेतही टाकण्याचा प्रयत्न केला.. आणि काय आश्चर्य पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये हत्तीण उठून उभी झाली.. हत्तीणीच्या डोळ्यांमध्ये एक कारुण्य भाव होता.. नंतर तो कळप थोड्याच वेळात जंगलात निघून गेला.. आजी आणि आजोबाही आपल्या गावात आले..
दरम्यानच्या काळात कोरोना संकट आल्याने.. दोन अडीच वर्ष.. कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते.. शिवाय आजीचीही तब्येत बऱ्यापैकी खालावली होती.. कारण नेहमी रानात फिरणारे आजी आजोबा कोरोना पायी घरात बसून बसून अजून थकले होते.. खेड्यातील माणसाला विशेषता रानातल्या माणसाला.. रानाशिवाय कसं जगवेल..? पण त्यांचं रानात जाणं मात्र बंद झालं होतं..
बऱ्याच दिवसानंतर.. गावातलाच एक गुराखी खूप घाबरत घाबरत आजीकडे आला आणि म्हणाला,” आजी तुमच्या जंगलातल्या घराकडे रोज दहा-बारा हत्तीचा कळप येतो.. तो तुमचं घर पाडणार आहे.. आम्ही हाकलायचा खूप प्रयत्न केला.. पण ते काही तिथून हलत नाही.. रोज दुपारी तुझ्या झोपडीजवळ त्यांचा राबता असतो.. बघ काहीतरी कर जंगलच्या लोकांना सांग.. नाहीतर तुझा घर काही रहायचा नाही.. काहीतरी सुतळी बॉम्ब वगैरे लाव.. फटाके वगैरे फोडून हाकलून देऊ आपण त्यांना..” असं मनात गुराख्याने उपाय सुचविला.. आजी म्हटली” अरे हो, गप कि जरा! मला बघू तर दे!”
” उद्या जाते मी रानात अन् बघते काय करायचं ते?” असं सांगून आजीने त्या गुराख्याला त्याच्या घरी पाठवलं..
दुसऱ्या दिवशी आजी आजोबा सह अडीच तीन वर्षानंतर पहिल्यांदा जंगलातील शेतावर गेली.. तिला हत्तींची दुपारची येण्याची वेळ माहिती होती.. तोच वेळ तिने साधला.. आणि गेल्यावर पाहते तर काय.. आता दहा-बारा हत्ती होते.. त्यातला एक हत्ती आजीला पाहताच.. पुढे येऊन आपली सोंड वर करून “जणू इकडे ये.” असं सांगतो आहेस वाटत होतं.. आजीने ओळखलं ही हत्तीण तीच होती.. जिला आपण पाणी पाजलं होतं.. ती आपली सोंड सारखी.. कधी आजीकडे तर कधी छोट्या पिलांकडे करत होती.. जणू ती आजीला आपलं मूलं दाखवीत होती.. आणि जवळ येण्यासाठी सारखी सोंड खालीवर करून आजीला बोलवत होती..!
आजोबा ‘नको.. नको’ म्हणत असतानाही.. आजी हिंमत करून पुन्हा त्या हत्तीणीपाशी गेली.. तर आश्चर्य.. हत्तीणीने सोंडेने आजीला स्पर्श करत.. आपल्या छोट्या बाळाच्या दिशेने हलकसं ढकललं.. जणू काही “हा तुझा नातू आहे बघ!” असंच काहीसं त्या हत्तीणीला सांगायचं असेल.. आजीनेही मग त्या छोट्या हत्तीच्या पाठीवरून हात फिरवून त्याला अंजारलं..गोंजरलं.. विहिरीतलं तीन-चार बादल्या पाणी काढलं.. छोट्या हत्तींना पाजलं.. पाणी पिऊन झाल्यावर पुढच्या काही क्षणातच संपूर्ण कळप जंगलाच्या दिशेला निघाला.. आजीही आपल्या घरी आली..
तिने पुण्यातल्या आपल्या सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या नातवाला फोन करून सांगितलं, ” बाबू, आपल्या रानात हत्ती आले आहेत.. आपल्या शेतात राहतात.. तुला बघायचे असतील तर तू दिवाळीमध्ये ये.. तुला दाखवते मी हत्ती जवळून..!”
आजीचा हा फोन ऐकून नातवाला आश्चर्य वाटलं. तो सुरुवातीला आजीवर रागावला.. “कशाला ह्या गोष्टी करतेस.. हत्ती पिसाळला वगैरे तर ठेवेल कां तुला?”
वगैरे समजावलं.. पण आजीच म्हणाली, “अरे, तू डरपोक की काय? मला नाही भीती वाटत.. तू ये तुझा कॅमेरा घेऊन.. वाटल्यास लांबच उभा रहा आणि माझा फोटो काढ बरं हत्ती आणि त्याच्या पिला सोबत…!” तेवढाच तुला फेसबुक का काय म्हणतात त्याला स्टेटस ठेवायला बरं.. नाहीतर रिल बनवायला बरं..” म्हणून आजीने फोन ठेवला..
दुपारचे जेवण आटोपून प्रभाकरराव झोपाळ्यावर विसावले होते. सावित्रीबाईंनीही किचनमधील कामे संपवून दिवाणखान्यात मोर्चा वळविला. आरामखुर्चीवर ऐसपैस बसत त्या थोड्या विसावल्या हल्ली पायांनाही खूप रग लागते, गुडघे अतोनात दुखतात म्हणत गुडघ्यांवर तीळाच्या तेलाने त्या अलगद माॅलीश करू लागल्या.
” झोपलात काय हो “
” नाही ग, यावेळी झोप कसली. डोळे पेंगू लागले तसा आडवा झालो. लगेच दहा मिनिटात झोप गायब. “
” बरं आता निवांतपणा आहे तर बोलते. आपल्या अलकाच्या लग्नाचं मनावर घ्यायला हवं, यावर्षी तिचं शुभमंगल उरकलं कि आपण जवाबदारीतून मोकळे. माझ्या भावानं सुचवलंय स्थळ. मुलगा देखणा आहे, उच्चशिक्षित आहे, कौटुंबिक पार्श्वभूमिही चांगली आहे. आपण त्यांना निमंत्रण द्यायचं काय? “
” हो देऊया ना, का नाही द्यायचं? चांगलं स्थळ असेल तर नक्कीच विचार करू. “
” मग मी माझ्या भावाला फोन करते “
आई बाबांचं बोलणं आपल्या रूममधून अलका ऐकत होती. आई आता मामाला फोन लावणार. निमंत्रण जाणार, मंडळी येईल, तत्पूर्वी आपण आता बोललं पाहिजे. प्रितेशविषयी सांगितलं पाहिजे.
” आई ” अलकाने दिवाणखान्यात प्रवेश केला. ” ये ये अलका. आता तुझाच विषय सुरू होता ” ” ऐकलंय आई मी सगळं. पण मला काही सांगायचंय तुम्हांला ” ” अग हो, काय सांगायचं ते सांग ना बेटा, त्या परवानगी कसली मागतेस. मनमोकळेपणे बोल. ” ” आई बाबा, माझं प्रेम आहे प्रितेशवर ” ” कोण आहे हा प्रितेश? कोणाचा मुलगा? ” ” माझ्या काॅलेजात एकाच वर्गात आहोत आम्ही. लोकनेते प्रतापराव जाधवांचा मुलगा आहे प्रितेश जाधव. ” ” अलका राजकारणातील ती माणसं. आपल्यासारख्या सामान्यांना ती झेपतील काय? नको पोरी हा विचार नको करूस. तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन मी. पण हा हट्ट नको. ।
बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी लग्न करीन तर प्रितेशशीच. नाही तर कोणाशीही नाही. ” ” भलताच हट्ट करू नकोस पोरी. बाप आहे मी तुझा. तुझ्या भल्याचाच विचार करीन. ” ” तुम्ही माझ्या भल्याचा विचार करताय. मला चांगलं स्थळही पाहून देणार, पण मला प्रितेश नाही मिळनार बाबा जो माझा श्वास आहे. माझा श्वासचं हिरावून घेऊन एका निर्जीव पुतळीचं लग्न लावणार का तुम्ही
” प्रभाकरराव निरूत्तर झाले. काय बोलणार होते ते. पोरीच्या हट्टापुढे त्यांनी नमतं घेतलं. ते स्वतः प्रतापराव जाधवांकडे निमंत्रण देण्यास गेले. ” काय म्हणताय राव. प्रितेशचं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. मोठा छुपा रुस्तमचं निघाला पोरगा. विचारतो त्याला आज. तसं असेल तर येतो तुमच्याकडे प्रितेश व त्याच्या आईसह.
दिवाणखान्यात मंडळी बसली होती. कांदा पोहे, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम संपला.
” प्रभाकरराव मुलांंनी स्वतःचं पुढाकार घेऊन जमवलंय. आमच्यासाठी काही कामचं ठेवलं नाही. फक्त अक्षंता टाकायच्या. आता पुढचं आपण ठरवाचंय. प्रितेश माझा धाकटा चिरंजीव. शेवटचं लग्न माझ्या घरातलं, त्यामुळे सगळी हौस मौज झाली पाहिजे. लक्षात येतंय ना तुमच्या. हुंडा वगैरे नको आम्हांला. पण आमचं घराणं, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं असं लग्न झालं पाहिजे. लग्नकार्य एखाद्या चांगल्या रिसाॅर्टमध्ये व्हावं. पाहुण्यांची बडदास्त राखली जावी. त्यांचा योग्य तो मानपान झाला पाहिजे. माझी अनेक शुभचिंतक, हितचिंतक मंडळीही राहिल. त्यांच्याही स्मरणात हे लग्न राहावं म्हणून त्यांनाही सुंदरशी भेट द्यावी. त्यांचे लाखमोलाचे आशीर्वाद वधूवरांना मिळणार आहेत, त्यापुढे हा खर्च अगदीच नगण्य आहे, नाही काय? “
” होय प्रतापराव मी करीन ही सगळी व्यवस्था. मुलं खुश तर आपण खुश. “
” कसं बोललात, द्या टाळी ” म्हणत प्रतापराव गडगडाटी हसले.
” प्रभाकरराव, मुलांच्या खुशीसाठी करतोय आपण सगळं. मुलीला हळद लागणार, नवरी बनून जाधव घराण्याची सून होणार, ती कशी साजेशी हवी ना, लंकेची पार्वती थोडीच राहणार. म्हणून फार नाही हो फक्त 50 तोळे सोनं घाला मुलीच्या अंगावर, अर्थात ते तिचं स्त्रीधनचं राहणार आहे. जावई श्रीविष्णूचं रूप मानून तुम्ही कन्यादान करणार, मग त्याचा योग्य सन्मान वरदक्षिणा देऊन तुम्ही करणारच आहात यात मला तरी शंका वाटत नाही. “
” होय, करीन मी सगळं माझ्या लेकीच्या सुखासाठी “.
प्रभाकररावांनी जाणलं ही लालची मंडळी आहे. त्यांनी परत अलकाला समजावण्याचा प्रयत्न केला ” अलका विचार कर. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन बेटा. बाप आहे मी तुझा. तुझं कल्याण व्हावं, तू सुखी राहावीस हीच इच्छा आहे ग माझी. तुला जर काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही बेटा “. पण अलका ऐकायलाच तयार नव्हती. “बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर आणि स्त्री आयुष्यात एकचदा प्रेम करते. तुम्ही दुसरं चांगलं स्थळही शोधाल माझ्यासाठी, पण मी सुखी होऊ शकेन काय? उलट आम्हां तीन जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल. कोणीच सुखी होणार नाही बाबा. प्रितेश नाही तर कोणीच नाही. राहीन मी जन्मभर अविवाहित. नका काळजी करू तुम्ही. ” शेवटी लेकीच्या हट्टापुढे बाबांना झुकावच लागलं.
माझं शुभमंगल पार पडलं आणि मी जाधवांच्या उंबरठ्यावरील माप ओलांडले. बाबांनी लग्नात कसलीही कमतरता भासू दिली आहे. वरपक्षाकडून छोट्या मोठ्या बारीक सारीक मागण्या होत्याच, पण बाबांनी कसलीही कटकट न करता सहज पूर्ण केल्या. रूखवतात संसारोपयोगी भांडी कुंडी गोदरेजची कपाटे, सोफा सेट, दोन लाकडी दिवाण, झोपाळा सगळं सगळं दिलं. सांजोर्या, करंज्या, पाच प्रकारचे लाडू, शेव, चकली सगळं सोबतीला दिलं. माहेर सुटलं, मन हळवं झालं, निरोप देतांना बाबा डोळ्यातील अश्रू लपवू शकले नव्हते.
माझ्या सासरीही काही धार्मिक विधी पार पडले. कुलदेवता व विविध दर्शन ही पार पडले. आणि हनीमून साठी आम्ही निघालो. नैनितालच्या टाॅवर हाॅटेलमध्ये दहा दिवसांचं बुकिंग बाबांनीच करून दिलं होतं. नवजीवनाची मी रंगविलेली स्वप्न, प्रितेशच्या रुपात मनासारखा मिळालेला जोडीदार, नैनितालमधील सुखद गारवा देणारं वातावरण मला रोमांचित करीत होतं. ” काय ग अलका, थंडी वाजतेय काय? ” ” नाही तर ” ” मग अंग एवढं कसं शहारलंय. ” ” नैनितालचा गारवा तर जाणवणारचं ना “. ” हूमम, बातमे दम है, चल मग तुझा गारवा लगेच दूर करतो की म्हणत त्यानं मला बाहुपाशात ओढलं. ” ” अहो, काय हे. ” ” माझ्या बायकोशीच बोलतोय ना, जगावेगळं तर काही करत नाही आहे ना “. ” तसं नाही हो ” ” मग कसं ” ” मला बाई ” म्हणत माझी मान लज्जेने खाली गेली तशी माझी हनुवटी उचलत त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं, माझे डोळे नकळत बंद झाले आणि त्याक्षणी त्यानं माझं हलकसं चुंबन घेतलं “
नैनितालहून परतले. सासुबाईंच्या मैत्रिणी, काही नातलग नवीन सूनबाईला बघायला येतच होते. राजकारण्यांचं घर असल्याने कार्यकर्त्यांचा राबताही राहात होता. मी हळूहळू अंदाज घेत होते. प्रत्येकाचा स्वभाव जाणून घेत होते. नव्या नवलाईचे दिवस असल्याने घरातील सगळेही बरे वागत होते.
दिवाळी आली. मलाही माहेराची ओढ लागलेली. पहिला दिवाळीसण असल्याने बाबा जावयाला निमंत्रण द्यायला आले. मला व प्रितेशला कपडे, प्रितेशला सोन्याची अंगठी दिली. प्रितेशने लॅपटाॅपचीही मागणी केली. बाबांनी सव्वा लाखाचा लॅपटाॅप घेऊन दिला. हळू हळू माझ्या माहेराहून विविध वस्तूंची पैशांची मागणी होऊ लागली. नंतर हे प्रमाण वाढू लागलं तसा मी विरोध केला. मग माझा छळ होऊ लागला. ” हजारो मुली सांगून येत होत्या माझ्या मुलासाठी. पण प्रितेशचं प्रेम होतं म्हणे हिच्यावर. मुलाच्या सुखासाठी केला समझोता. पण दळभद्री निघाली. आमचंच नशीब फुटकं”. घरातून असे विविध टोमणे, माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार करणे, मी काही बोलली तर मारहाण करणे सुरु झाले. त्यात मला कडक डोहाळे लागलेले. पण माझ्या तब्येतीकडे सगळेच दुर्लक्ष करायचे, ज्याच्यावर माझं प्रेम होतं, लग्न करुन त्याच्या जीवनात आले तो प्रितेशही दुर्लक्ष करू लागला, माझं ऐकेनासा झाला. माहेरी ही सर्व वार्ता सांगितली तर बाबा म्हणाले मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी होतं. मी तुला न्यायला येतो. काळजी करु नकोस. अशा अवस्थेत मन शांत ठेव. बाळाच्या जन्मानंतर होईल सगळं ठीक.
अमेयचा जन्म झाला, आणि जणू त्रिभुवनाचं सुख माझ्या कुशीत आलं. मी माझं सारं दुःख, विवंचना विसरले. बाळाचं आगमन मला संजीवनीसमान होतं. माझ्या सासरी कळवलं. पण कोणी बाळाला बघण्यास आले नाही.
कामाच्या व्यापात जमत नाही म्हणाला प्रितेश. ” असं कोणतं काम आहे प्रितेश कि बाळाला तुम्ही भेटत नाही. ” ” बाळाला भेटण्यासाठी बाळ माझं तर पाहिजे ” ” काय बोलताय तुम्ही, असं बोलवतं तरी कसं ” आणि मला चक्कर आली. मोबाईल खाली पडला. आई धावत आली, तिने मला सावरले.
बाळ दोन महिन्यांचा झाल्यावर बाबांनी मला सासरी पोहचविले. घरातील लोकांच्या वागणुकीत खूप फरक पडला होता. पण बाळासाठी, संसार टिकविण्यासाठी मी सगळं सहन करीत होते. प्रितेश आता वारंवार माझ्या अंगावर हात उचलत होते. मारहाणीचे व्रण माझ्या शरीरावर उमटू लागले होते.
माझी नणंद शोभासाठी स्थळपाहणी सुरु होती. आणि एकाठिकाणी पसंतीही झाली. आता बैठक होणार होती देवाण घेवाणीची. त्यात नवपरिणित जोडीसाठी मुंबईत एक फ्लॅट पाहिला होता. चांगल्या लोकेशनमधील 3BHK फ्लॅटची किंमत तीन करोड होती.
कधी नव्हे त्या सासूबाई चांगलं बोलू लागल्या. ” किती वाळलीस ग. बरं नाही का? अमेय खूप त्रास देतो ना. उद्या जाऊ दवाखान्यात. शोभानेही गरमागरम उपमा आणला. ” आण वहिनी बाळाला दे माझ्याकडे. तू आधी नाश्ता करुन घे “
हळूच सासूबाईंनी माहेरचीही चौकशी केली. अलका, शोभा या घरची मुलगी, आपली जवाबदारी. तिला फ्लॅट घेऊन द्यायचाय आपल्याला. काही रक्कम कमी पडतेय. सव्वा ते दीड कोटी. तुझ्या बाबांना सांग तेवढी मदत करायला. शेवटी आपल्या घर परिवारासाठी तुझंही कर्तव्य आहे ना. ” पण मी यावेळी खमकी होती, स्पष्ट नकार दिला, ” कितीदा मदत करायची हो माझ्या माहेरच्या लोकांनी. माझ्या सुखासाठी आजवर भरपूर लुटलं त्यांनी तुमच्यावर. त्यांनी कमवायचं आणि तुम्हांलाच देत राहायचं काय? स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायचं काय त्यांनी”
” अरे देवा देवा, एवढं काय आणलंस ग तू माहेराहून कि त्यांना घरावर तुळशीपत्र ठेवावं लागलं. आम्ही काही कमवतचं नाही. तुझ्या माहेरच्या मेहेरबानीवरचं जगत आहोत नाही काय? तुझं माहेर तालेवार, आम्ही भिकारडे नव्हे काय? मग कशाला राहातेस या भिकारी लोकांमध्ये. जा की माहेरी. ” मी तशीच मुसमुसत राहिले. बाळ लहान, नवर्याचं बदललेलं वागणं, माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा, वारंवार मला होणारी मारहाण. कंटाळले मी या जीवनाला. नको हे जीवन, नको तो काचेच्या वाटेवरील संसार,. नको आईबाबांनाही त्रास, त्यांचं ऐकलं नाही मी, प्रेमात आंधळी झाले होते. पण ते प्रेम नव्हतं, तो एक सौदा होता. पाहिजे तेव्हा त्यांची मागणी पूर्ण करणारा. पण आता ही चूक मी सुधरवणार. माझ्यामुळेच घडतंय ना हे सगळं आणि जीवनभर घडतच राहणार, आईबाबांना त्रास देणारी मी पनवतीचं ठरणार. नाही, नाही, हे सगळं थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मी थांबवेन. बस झाला निर्णय. आजच याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लावीन गळफास, होईल थोडी तडफड, मग एकदम शांत शांत शांत.
(ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यातील कथानक व पात्रांशी कोणी व्यक्ती व संस्थेचे नामसाधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)
☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
(निर्विवाद सत्यकथा आहे.)
“अरे बाबा लक्षात आहे ना? माझे दोनशे रुपये बाकी आहेत तुझ्याकडे. ” कुणीतरी कानात बोलले महेशच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो. घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी महेशच्या जवळचा. पण नेमका कुणाचा ते महेशच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती.
कुणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कुणाकडून घेतले, जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कुणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे दोनशे रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.
अचानक लकलकले डोक्यात त्याच्या. गुरूचरण.. हो गुरूचरणच तो. त्याचा कॉलेजमधला लास्ट इयरचा रूम पार्टनर. एक्झाम फी भरायला नेमके दोनशे रुपये कमी पडत होते. मुदतीचा शेवटचा दिवस. कामाचे पैसे पण मिळाले नव्हते. वरखाली झाला महेशचा जीव. अन देवासारखा धावून आला गूरू.
खरेतर तीस वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर पैसे आले पण गुरूचरण काही कामासाठी गावी गेला होता. इथे महेशची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेलवर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. गुरूचरणला महेशने पत्र ही लिहिले की रिझल्टच्या दिवशी भेटू, तुझे पैसे देतो तेव्हाच. पण त्या दिवशीही गुरू आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की तो गावीही नाही आता. नाईलाजाने महेश पैसे घेऊन परत आला.
एकदम भरून आले महेशला. ऐन वेळेस पैसे मिळाले नसते तर वर्ष वाया गेले असते त्याचे आणि तो चक्क विसरूनच गेला गुरूला. मग आठवले त्याला नुकत्याच फॉर्म केलेल्या त्याच्या कॉलेजच्या व्हाॅटसअप ग्रुपवर विषय झाला होता गुरूचा. तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितले कुणीतरी, नंतरही काहीच माहिती मिळाली नाही गुरुबद्दल.
सकाळ होताच महेशने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कुणालाच माहित नव्हते गुरुबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा. गाव त्याचे चांगलेच लक्षात होते पत्र व्यवहारामुळे.. कॉलेजमध्ये असताना केलेला. पत्ता आता आठवत नव्हता. पण कुणालातरी विचारता येईल, खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल तरी किती वाढणार.?
सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा मृणाललाही आश्चर्य वाटले.. असे अचानक?
महेश गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरी ही त्याने गुरूचरणचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले. एकजण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? गुरूचरणकडे येणारे अनेक असावेत?
घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा टच दिलेला होता टाईल्स वगैरे बसवून. महेश गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणि पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर गुरूचरण झोपलेला होता. महेशला कळलेच नाही आधी. तसे ही गुरूला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काच बसला.
अगदी बारीक झालेली शरीरयष्टी. बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या. गालफडं आत गेलेली. त्याने हाक मारली.. “गुरूचरण ऽऽऽ,.. गुरू…. “
गुरूचरणने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला. “महेश ऽऽ…… तू कसा आलास? ” त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किलीने विचारले.
“तुझे दोनशे रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो. “
“कुठले दोनशे….? “
मग महेशने त्याला आठवण करून दिली कितीतरी वर्षांपूर्वीची आणि शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.
त्याला आठवले.. पण त्यासाठी एवढ्या दूर..? गुरूने खूप वेळ महेशचा हात हातात धरून ठेवला. जुनी मैत्री आठवत आसवे गाळत.
रात्र झाल्यामुळे गुरूचरणच्या मुलाने महेशला निघूच दिले नाही आणि गुरूचरणनेही. जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपतांना गुरूच्या मुलाने सांगितले सारे.
गुरूचरणच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्टअटॅकने. वडिलांचे क्रियाकर्म होत नाही तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून त्याच्या ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला. पर्मनंट झाला. तिथेच सेटल झाला.
सगळे काही सुरळीत चालू असतांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधं उपचारासाठी भरपूर मदत दिली पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर गावी जाऊनच मरू हा निश्चय करून गुरू पुन्हा गावी आला आणि आता मृत्यूची वाट पाहत आहे.
दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने महेशला झोप लागली तरी स्वप्नात त्याच्या बरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याश्या गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. गुरूचरण रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता. त्याच्या हातात मात्र अजूनही काल महेशने दिलेले दोनशे रुपये होते.
गुरूचा अंत्यविधी करून खिशातल्या जितक्या नोटा होत्या त्या गुरूच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन महेश घरी परतला. किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो ह्याचे समाधान घेऊन.
खूप दिवस झाले आणि अगदी अचानक एका सकाळी गुरूचरणचा मुलगा महेशच्या घरी आला. काहीश्या आश्चर्याने आणि आनंदाने महेशने त्याचे स्वागत केले. नाश्तापाणी होताच मुलाने विषय काढला. “वडिलांचे वर्षश्राद्ध आहे पंधरा दिवसांनी. तुम्हाला तेच सांगायला आलो काका. आणखी एक.. ” मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.
“हे काय….? “
“तुम्ही निघतांना मला दिलेले पैसे… आठ हजार सातशे. “
“अरे पण ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही. आणि तुला एकदम मोजून ठेवायला कुणी सांगितले? “
“पप्पांनीं….. “
“म्हणजे ऽऽऽऽ…? “
गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात, तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम ही त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते. ते म्हणाले ‘ वर्षाच्या आत परत कर बाळा. ‘
थरथरत्या हाताने महेशने पैसे घेतले. तेवढ्यात त्याच्या मुलाने एक भारीपैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहीश्या आश्चर्याने त्याने विचारले. “हे कशासाठी? का हेही गूरूनेच द्यायला सांगितले? “
“हो. पप्पा म्हणाले, पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणि रिकाम्या हाताने गेला. तेव्हा….. “
गुरूचरणचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला. आणि हा त्या शर्टपीसवर हात फिरवत निशब्द. हे खरेच असते का काही… गुरूने स्वप्नात येऊन आठवण देणे. मरण्याआधीची भेट… अन आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे.
मृत्यूनंतर स्वप्नात येणे महेशने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे, याला काय म्हणता येईल….? त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्कवितर्क वगैरेच्या पलीकडील असतात.
महेशने कॅलेंडरवर गुरूच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो. जावेच लागणार होते त्याला.
– एक सत्यकथा
लेखक – अनामिक
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नर्स रूबी नेहमीप्रमाणे हॅास्पिटलच्या इमर्जन्सी रूम (ER) मध्ये येऊन पोहोचली. गेली तीस वर्षं तिनं त्या हॅास्पिटलच्या इमर्जन्सी वॅार्डात मनुष्य स्वभावाचे हजारो नमुने बघितले होते. खरच पेशंट प्राण पणाला लावून झगडत असतो. त्याचा संघर्ष बघताना ती नेहमीच कासावीस होत असे. अनेकांशी रक्तापलीकडचं नातं जुळले होते.
तिला जाणवत असे.. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असलेले जीव किती शुध्द असतात.. समाजात वावरताना घातलेले मुखवटे, अहंकार, द्वेष, ईर्षा सारं काही गळून पडतं! अशा जीवाचं दर्शन तिला नेहमी परमात्म्याजवळ नेत असे.
तिच्या ॲाफिसमधील कॅाफी मेकर भुस्स भुस्स आवाज करून कराफे मध्ये कॅाफी ओतत होता. कोलंबियन कॅाफीचा तो हवाहवासा वास तिनं श्वासात भरून घेतला. खुंटीवरचा एप्रन घातला व जेमतेम दोन घोट पोटात गेले असतील नसतील तेवढ्यात तिचा पेजर खणखणला..
“रूबी, रिपोर्ट टू रूम नंबर १० प्लीज..
रिपोर्ट टू रूम नंबर १०”
तो परिचित मेसेज बघून ती कॅाफी तिथेच ठेऊन ती रूम नंबर १० कडे धावली.
“गुड मॉर्निंग आजोबा! कसे आहात? ” तिच्या परिचित आवाजाने आजोबांच्या चेहऱ्यावर हसू झळकलं..
“सुखाने घरी बसलो होतो मिस रूबी, पण तुला फार मिस केलं म्हणून भेटायला आलोय. ” साधारण ऐंशीला पोचलेले आजोबा कसेबसे हसले. १०३ ताप, उलट्या व सतत लागलेल्या धापेमुळे ते दमून गेले होते.
डॅाक्टर साठे हसऱ्या चेहऱ्याने आत आले पण आजोबांचा चार्ट बघताच त्यांचं हास्य लुप्त झालं. त्यांनी पटकन काही टेस्ट करायला सांगितल्या. आजोबांचा आजार त्यांना माहित होता. तातडीने ॲापरेशन करण्याची वेळ आली होती.
ॲापरेशन झालं. आजोबा जगले पण त्यांना वेदना सोसत नव्हत्या. ऐंशी वर्षाचं शरीर प्राप्त व्याधीशी झगडून गलितगात्र होऊन गेलं होतं.. त्यापेक्षा गेले असते तर सुटले असते हा विचार रूबीनं डॅाक्टरना बोलून दाखवला.. आजोबांचे हाल बघून तिच्या पोटात तुटत असे..
तिथून बाहेर पडताच ती डॅा साठेना म्हणाली, ” सर, कधी काळी मी जर अशा एखाद्या आजाराने ग्रासलेली असेन तर मला अजिबात जगवू नका.. अशा पेशंटला वाचवून आपण त्याचे हालच करतो.. किती सहन करायचं त्या जीवाने? ही चूक माझ्या बाबतीत करू नका..
साठ्यांहून वीस वर्षाने मोठ्या असलेल्या रूबीकडे साठे पहात राहिले.. या चर्चेची त्यांना सवय होती.
“टेक इट ईझी, रूबी. एवढी पेशंटमधे गुंतत जाऊ नको. ” एवढं बोलून ते पुढच्या पेशंटकडे गेले.
आजोबा त्यानंतर सहा वर्षं जगले.. असेच विव्हळत, रडत-खडत, कसेबसे.. अनेक औषधाच्या साईड इफेक्टमुळे बेजार होऊन दुखणं परवडलं पण हे साईड इफेक्टस नकोत म्हणत.. पण जगण्याची इच्छा मात्र चिरतरुण होती..
रूबी सारं जवळून बघत होती.. तिला आश्चर्य वाटायचं.. हे पेशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत? शरीर आपलं आपण नैसर्गिकरित्या जे ठरवेल ते नक्कीच जीवाला कमी वेदना देणारं असेल.. तो मृत्यू सोपा असतो असे डॅा साठे मेडिकल स्टुडंटसनाही शिकवतात पण या भयानक प्रोसिजर चालूच राहतात.. याला जगणं आणि जगवणं म्हणायचं?
…
रूबीनं आपला शेवट कसा असावा हे स्वत:च्या विल मध्ये लिहून ठेवलं होतं..
“मी आजारी पडले तर माझे कोणतेही ॲापरेशन करू नका. ज्या उपचारामुळे माझी पंचेद्रिय निकामी होतील असे कोणतेही उपचार माझ्यावर करू नका. मला शेवटपर्यंत बोलायचं आहे, देवाचं रूप बघत जायचं आहे, मोगऱ्याचा वास घ्यायचा आहे.. हे जमणार नसेल तर मला वाचवू नका. ”
आता रूबी पंचाहत्तर वर्षाची झाली होती.. एक दिवस चक्कर येऊन पडली म्हणून तिला त्याच ER ला आणण्यात आलं.
“रूबी, काय पराक्रम करून आली आहेस? ” डॅा साठे वातावरण हलके फुलके करायला बघत होते. त्यांनी चष्मा नीट केला.. तिचे रिपोर्ट बघून ते जरासे खाकरले..
“रूबी, ॲापरेशन करून तुझ्या आतड्याचा काही भाग काढून टाकायला हवा.. तुझी इच्छा मला माहित आहे. ॲापरेशन कोणत्याही परिस्थितीत करायचे नाही हे तू लेखी दिले आहेस.. तर या परिस्थितीत तुला किती दिवस मिळतील सांगता येत नाही.. few weeks may be.. ”डॅाक्टर तिच्या नजरेला नजर देणं टाळत होते..
आता रूबीची खरी परीक्षा होती.. ॲापरेशन करून घ्यायचं का नाही? रिकव्हरी सोपी नव्हती. ॲापरेशन यशस्वी होण्याची शक्यता केवळ १५-२०% होती..
रूबीनं डॅाक्टरांकडे बघितलं. अशा गोष्टी डॅाक्टर जेव्हा बेडवर पडलेल्या पेशंटला सांगत असत तेव्हा ती डॅाक्टरांच्या
बाजूला उभी असायची..
पेशंट गडबडून गेलेला असे..
एखादं दिवस विचार करून तो करा जे करायचं ते सांगत असे.. पेशंट बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास त्याची मुलं बाळं “काही करून वाचवा” म्हणत..
आज ती त्या बेडवर होती..
शेजारी उभी नव्हती..
तिच्या डोळ्यात आशा एकवटून आल्या होत्या.. समोर तिला तिची मुलं दिसत होती.. वर्षाचं नातवंड चालायचा प्रयत्न करत होतं.. नवरा.. तो आपल्याशिवाय काही करू शकत नाही.. साधी कॅाफी करता येत नाही त्याला.. अंगणातील जाई जुई शेवंती एकटी पडेल आणि तिचा आवडता कुत्रा टायगर.. त्याला कोण समजावणार..
ती डॅाक्टरांकडे बघत बोलली..
“सर, करा ॲापरेशन. १५-२०% तरी सक्सेस मिळण्याची शक्यता आहे ना?
मला जगायचं आहे!
जी लागेल ती ट्रिटमेंट मला द्या.. ते विल फाडून टाका माझं..
मला जगायचं आहे सर..
I want to live..
I really want to live..
I really really want to live..
डॅा. साठे रूम मधून बाहेर आले. डोळ्यातलं पाणी पुसतं त्यांनी परत एकदा जीवाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते ते अनुभवले..
एकेक अवयव निकामी होतो..
वेदना सहन होत नाहीत..
यापेक्षा गेलं तर बरं वरवर म्हणतात पण.. अजून काय करता येईल विचारणारे सिरिअस पेशंट्स..
कितीही त्रास झाला तरी त्यांची जगण्याची इच्छा कधीच मरत नाही..
“मला जगायचंय” या तत्वावर उभं असलेलं जग.. त्यातील माणूस, प्राणी, किडा, मुंगी सारे जगण्यासाठी धडपडत असतात..
ही केवळ जैविक प्रेरणा नसते..
जीवांच्या गाभ्यातून उसळणारी शक्ती असते..
अस्तित्वाच्या गुढतेतून आलेली..
आत्म्याच्या अमरत्वातून निर्मिलेली..
गाभ्यातून जळणाऱ्या दीपांनं प्रखर केलेली..
म्हणून तर जग चालू आहे..
आजवर काही पेशंटना नैसर्गिकरित्या मरू द्यावं म्हणणारी रूबी जेव्हा स्वत: पेशंट झाली तेव्हा विल मध्ये लिहलेले सारे काही गळून पडले होते..
पाण्यातील मासा, झोप घेतो कैसा।
जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे ॥
आतून एकच आवाज येत होता..
“मला जगायचंय”
“I want to LIVE! ”
.. सर, आज मला कळलय.. टर्मिनल इलनेस असला तरी पेंशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत..
कारण everyone wants to LIVE!
डॅाक्टर साठ्यांनी ॲापरेशनचे पेपर लगेच पुढे पाठवले.. आत येऊन त्यांनी रूबीची सही घेतली..
“Ruby, will try our best! ”
ॲापरेशनचा सक्सेस रेट ते परत परत शोधू लागले..
(सत्य घटनेवर आधारित)
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
९८६०००६५९५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈