श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..!..! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!

२ जुलै १९९९ ची रात्र. अंधार माजल्यासारखा अधिकाधिक मिट्ट होत चाललेला. दिवसभर धडाडणा-या तोफा आता थंड करण्याचा,रात्रभर विश्रांती घेण्याचा आणि दिवस उजाडताच पुन्हा मारा सुरु करण्याचा त्यांच्यापुढे एक पर्याय होता…पण तो त्यांनी स्वीकारला नाही. आजचा तसा तिसरा दिवस होता. तोफा आणि तोफा डागणारे सैनिक, त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी यांनी क्षणभर विश्रांती घेतलेली नव्हती. कारण यांनी खालून वर तोफगोळे डागले नाहीत, तर पहाडांवर चढत जाणारे पायदळाचे सैनिक उंचावरून येणा-या पाकिस्तानी गोळीबाराला बळी पडणार होते, हे निश्चित. युद्धाचे सुद्धा एक तंत्र असते. शत्रू त्यांच्या सुरक्षित खंदकामध्ये आरामशीर बसून आपल्या सैनिकांवर गोळीबार करत असताना आपला तोफखाना शत्रूला तुफान बार उडवत  भाजत राहिला म्हणजे त्यांना गोळीबार करण्यात अडचणी येतात…आणि शत्रू असा अडचणीत सापडल्याचा फायदा घेत आपले सैनिक आगेकूच करीत करीत त्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांच्या अधिकाधिक जवळ पोहोचू शकतात! आणि म्हणूनच हा तोफांचा मारा थांबला म्हणजे आपल्या सैनिकांना असणारा धोका वाढत जाणार!

१४ मे १९९९…  ३१५, फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) कारगिल युद्धाच्या आरंभी द्रास सेक्टर मध्ये उतरवली गेलेली पहिली फिल्ड रेजिमेंट ठरली!  पाकिस्तानी घुसखोरांच्या वेशात भारतात घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याच्या कामात इतर चार रेजिमेंटस व्यग्र झाल्या होत्या. तोलोलिंग, point 5140, black tooth, टायगर हिल, गन हिल- point 4875 ही महत्त्वाची ठाणी ताब्यात घ्यायला 1 Naga, 8 Sikh, 17 Jat, 16 Grenadiers निघाल्या होत्या आणि ३१५,फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) वर या चार रेजिमेंटसला साहाय्य पुरवण्याची (Artillery Support)  देण्याची मोठी जबाबदारी दिली गेली होती. ज्या जागेवरून तोफा उडवल्या गेल्या ती जागा शत्रूच्या लक्षात यायला वेळ लागत नाही…मग शत्रूही या जागेवर मारा सुरु करतो. म्हणून तोफांचा जागा सातत्याने बदलत ठेवावी लागते..आणि हे काम अतिशय जिकीरीचे असते…पण तरीही मोठ्या त्वेषाने केले जाते!

रात्र सुरु झाली…आणि आपले सैनिक लक्ष्याच्या समीप पोहोचू पहात होते…वरून पाकिस्तानी मारा सुरु होता…अशावेळी खालून त्यांच्यावर अचूक मारा होणे गरजेचे होते…तसा संदेशही दिला जात होता…दिवसभर तोफा चालवून सैनिक थकलेले होते…सेकंड-इन-कमांड मेजर चंद्रभूषण द्विवेदी साहेब त्यांच्या तंबूत क्षणभर विसावले होते…संदेश कानी पडताच ते तंबूबाहेर धावले…त्यांनी स्वत: एका तोफेचा ताबा घेतला आणि ते फायरींग करू लागले…इतर तोफांतूनही  तोफगोळे सतत आणि अचूक डागले जात आहेत, हे पहात होते…शाब्बास…शाब्बास…फायर! अशा आरोळ्या सुरु होत्या! थांबून चालणार नव्हते…त्यांच्या कवर फायरच्या आधारे जवान इंचा-इंचाने शत्रूकडे सरकत होते…रात्रीच्या अंधारात! भारताकडून तोफांचा मारा काही क्षण जरी थंडावला असता तरी शत्रूला खाली गोळीबार करण्याची उसंत लाभली असती.

सर्व काही सुरळीत सुरु होते….पण शत्रूला आपल्या तोफखान्याची जागा समजली होती….त्यांनी नेम साधला…एक तोफगोळा नेमका साहेब ज्या गनवर काम करीत होते…तिच्या अगदी शेजारी येऊन आदळला…अर्थात मोठा स्फोट झाला…साहेबांचा हातात आणि शरीरात त्या गोळयाचे अणकुचीदार तुकडे मोठ्या वेगाने घुसले…रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या…पण साहेब थांबले नाहीत…शेवटच्या श्वासापर्यंत आदेश देत देत तोफांचा भडीमार करीत राहिले…साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र लढत असणारे लान्स हवालदार मलय्या, नाईक सरवन कुमार, नाईक बिश्नु राय, लान्स नाईक गोपय्या, गनर राजकुमार, गनर सिंघा यांनी सुद्धा तिथेच शेवटचे श्वास घेतले!

आज या बलिदानांना पंचवीस वर्षे पूर्ण झालीत…कारगिल युद्धातला हा एक मोठा निर्णायक प्रसंग होता! मेजर चंद्रभूषण विन्धेश्वर द्विवेदी साहेब मरणोत्तर सेना मेडलचे मानकरी ठरले. बिहार मधील पूर्णिया मध्ये जन्मलेले चंद्रभूषण हे देशाचे भूषण ठरले. सुट्टीवर असताना द्विवेदी साहेब अत्यंत कुटुंबवत्सल आणि सीमेवर अत्यंत कर्तव्यकठोर असत. त्यांची थोरली कन्या नेहा डॉक्टर असून एका सैन्याधिकारी साहेबांशी त्या विवाहबद्ध आहेत. तर  धाकटी कन्या दीक्षा लेखिका आहे. दीक्षा यांनी त्यांच्या पित्याने त्यांना सीमेवरून पाठवलेल्या पत्रांचा संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.

…… हुतात्मा मेजर चंद्रभूषण आणि त्यांच्या सहकारी हुतात्मा सैनिकांना आजच्या स्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद ॥

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments