मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 114 ☆ निरोप ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 114 ?

☆ निरोप ☆

सरत्या वर्षाचा निरोप घेताना,

मनात दाटून येताहेत ,

कितीतरी आठवणी……

या विषाणूंनी शिकवलंय बरंच काही,

पण मनातल्या विषवल्ली,

अजून तग धरून

काहीजणांच्या!

 

कटू गोड  क्षणांचा एक डोह,

मनात तुडुंब भरलेला!

सोडून द्यायचे काही…काही जपायचे,

मोरपीसासारखे!

सरत्या वर्षाचा निरोप घेताना,

मन प्रगल्भ व्हायला हवं,

जायलाच हवं सामोरं,

पेलायला हवीत काळाची आव्हानं,

निरोप गतकाळाचा घेताना,

व्हायलाच पाहिजे अधिक धीट,

खंबीर आणि जागरूक ही !

 निरोप द्यायलाच हवा,

 नैराश्याला, उदासीनतेला!

आणि आभार मानायलाच हवेत,

गतवर्षाने बहाल केलेल्या,

जिवंतपणाला !!

सरत्या वर्षाला निरोप घेताना…..

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोळी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मोळी….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

चर चर कापणाऱ्या

ऊसाच्या पाल्याची सल

सर्वांगभर घेऊन

तो;

कडाक्याच्या थंडीत

ऊसतोड करत,

गारठलेल्या कुटूंबाचा

असा पालापाचोळा घेऊन

ऊसाच्या फडात

जगवतोय लेकरंबाळं.

पिळवटलेल्या शरीरानं

मोळ्या बांधत

कारखानदारी जगवता जगवता

आयुष्याचं चिपाड बनून जातोय.

त्याची वंशावळ

एक दोन कोयत्याच्या

मजूरीसाठी

आयूष्यभर

ऊसाचे फड तुडवतेय.

आणि

मुकादमाची उचल

फेडता फेडता

त्याच्या आयुष्याचीच

अशी

मोळी बनून जातेय….!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

दि.२२।१२।२०२१

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 118 ☆ देवराया ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 118 ?

☆ देवराया ☆

रुबाबाची झूल, होती पांघराया

निराधारावर, केली नाही माया

 

नेता नाही आले, स्वर्गलोकी धन

नाही मोक्ष प्राप्ती, अडकले मन

राख होउनिया, उधळली काया

 

जिंकण्याची मनी, कायमच होड

होता नाही आले, मला कधी झाड

देता नाही आली, परक्यास छाया

 

परमार्थ नाही, कधी साधला मी

मला भेटला ना, कधी कुणी स्वामी

सांभाळून घ्यावे, तरी देवराया

 

मित्रांत खेळलो, प्रेमात पोळलो

मोह माया आदी, व्याधीस भाळलो

आयुष्याचा वेळ, घालवला वाया

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडं म्हणजे!! ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? कवितेचा उत्सव ?

☆ झाडं म्हणजे!! ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

————झाडं म्हणजे!!————

———-झाडं हसतात फुलांतून——–

                झाडं झुरतात मुळांतून

                सळसळतात, कुजबुजतात

                कधी कधी पानं गाळतात   ।

                झाडं सुद्धा माणसांसारखी

                कोणी  उंच, कोणी बुटकी

                कोणी लठ्ठ कोणी रोडकी

                साधी, भोळी किंवा पक्की

                एखादं खादाड असतं

                मुलांसारखा  करतं हट्ट

                डोळे मिटून रुसून बसतं

                किंवा दवातून रडतं  ।।

                मात्र झाडं नसतात पापी

                म्हणुनच होत नाहीत दुःखी

               निसर्गावर मातत नाही

               तो पण त्यांच्यावर कोपत नाही।।

               झाडांपासून शिकावं

               फुलांसारखं हसावं

               त्यांचा खरा धर्म एक

               झाडांसारखं व्हावं नेक।।।

 

©  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 62 ☆ आजचा युवक… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 62 ? 

☆ आजचा युवक… ☆

आजचा युवक कसा असावा

याचा जेव्हा प्रश्न पडावा

विवेकानंदाचा तेव्हा

आदर्श सर्वांनी घ्यावा…१

 

काय त्यांचे तेज

कसे त्यांचे विचार

त्यांच्या विचाराचे

आपण करावे सुविचार…२

 

आजचा युवक

व्यसनाधीन झाला

आजचा युवक

कर्जबाजारी बनला…३

 

आजचा युवक

लाचार आणि बेकार

आजच्या युवक

दारू खर्रा खाण्यात हुशार…४

 

आजचा युवक गुंडगिरी करतो

आजचा युवक आईला छळतो…५

 

आजच्या युवकाने

खूप बेकार कृत्य केले

जन्मदात्या आई-बापाला

वृद्धाश्रमात डांबले…७

 

माणुसकी लोप पावली

काळिमा नात्यास लागली

आपल्याच हाताने युवकाने

नात्याची राखरांगोळी केली…८

 

सख्खी बहीण याला भिते

वासनांध हा झाला

वासनेच्या भरात याने

ऍसिडचा हल्ला केला…९

 

सात्विक आपला भारत

आपण त्याचे रहिवासी

कसे आपण राहावे

न कळत बनला वनवासी…१०

 

हे सर्व थांबले पाहिजे

युवक जागृती महत्वाची

माणूस म्हणून युवकाला

भाषा कळावी आपुलकीची…११

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 27 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 27– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१२५]

या आशा एकांतात

का असं मंदावतं

माझं मन…

का असं झुरतं

कळत नाही मला….

आपल्या छोट्या छोट्या मागण्या

का नाही व्यक्त करत

की जाणवत नाही

की

आठवतच नाहीत त्याला?

 

[१२६]

तुझी इच्छा होईलत्या क्षणी

मालवून टाक हा दीप

तुझा अंधकारही

जाणून घेईन मी

आणि त्याच्यावरसुद्धा      

जीवच टाकीन…

 

[१२७]

आपण

काजव्यासारखे दिसतो

याचं

कधीच भय वाटत नाही

तार्‍यांना

 

[१२८]

पिसार्‍याच्या पसार्‍याचं

ते लांबलचक ओझं पाहून

कीव येते चिमणीला

मोराची

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकेक दिवस जातोय ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ एकेक दिवस जातोय ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

एकेक दिवस जातोय

आयुष्यातून जणू वजा होतोय..

किती पकडावा म्हटलं तरी

वाळूसारखा घसरू पाहतोय..

 

एकेक दिवस जातोय

जगण्याची दिशा बदलून..

सुखाची व्याख्याच बदलीय

थकलाय माणूस धाव धाव धावून..

 

एकेक दिवस जातोय

नुसताच कामात..

नातीही ऑनलाइन झालेत

इंटरनेटच्या जगात..

 

आजीआजोबा, मित्रमंडळी

राहिला मागे कधीच गोतावळा..

मुखवट्याच्या जगात या

कुठे लागतोय एकमेकांना लळा..

 

हल्ली ऑनलाईनच होतय प्रेम

अन ऑनलाईन  ब्रेकअप..

कशी कळणार हुरहूर प्रेमाची

व्हाट्सउप वर होतेय गपशप..

 

एकेक दिवस जातोय

आयुष्यातुन जणू वजा होतोय..

धावत्या जगाबरोबर धावता धावता

जगण्याचा परिघच बदलतोय..

? मनकल्प ?

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घरात हसरे तारे असता… ☆ दत्ता वि.केसकर

? कवितेचा उत्सव ?

☆ घरात हसरे तारे असता… ☆ दत्ता वि.केसकर ☆

घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे

 

छकुल्यांची ग प्रशांत वदने

गोड गुलाबी गाली हसणे

अमृत त्यांच्या ओठी असता कशास मधुघट हवा गडे

 

गोजिरवाणी जशी वासरे

प्रेमळ माझी गुणी लेकरे

स्वर्ग अवतरे घरात माझ्या आनंदाचे पडती सडे

 

गोकुळ येथे गोविंदाचे

झरे वाहती शांतीसुखाचे

वैभव पाहून मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे 

 

– दत्ता वि.केसकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विलक्षण  मराठी  भाषा…… छंदश्रीमंत ….. ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ विलक्षण  मराठी  भाषा…… छंदश्रीमंत ….. ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

रस्ता – मार्ग

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्य

* बोलणं खरं असतं.

* सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.

पहाणं – बघणं

* आपण स्वत:हून पाहतो ते पहाणं

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाड – वृक्ष

* जे माणसाकडून लावलं जातं ते झाड.

* जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळा

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मित – हसणं

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश 

* भरून येतं  ते आभाळ.

* निरभ्र असतं ते आकाश.

प्रस्तुती : – आनंदी केळकर

Please share your Post !

Shares