मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अद्वितीय कैलास मानस” – लेखक : सुभाष काळे – परिचय : प्रा. मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“अद्वितीय कैलास मानस” – लेखक : सुभाष काळे – परिचय : प्रा. मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

 

पुस्तक : अद्वितीय कैलास मानस

लेखक: सुभाष काळे

पृष्ठ: १८८

मूल्य: ३००₹ 

“१५ ऑगस्ट २०१९. समोर मानस सरोवर पसरलेला अथांग जलाशय. सकाळची आठची वेळ. थंडी मी म्हणतेय. सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेला आसमंत. सशस्त्र चिनी सैनिकांनी वेढलेला परिसर. भारताच्या विविध राज्यांतून वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांमधून आलेले तीन-चारशे स्त्री-पुरुष अचानक दोन-तीन रांगांमधून उभे राहतात आणि खणखणीत आवाजात सुरू होते ‘जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता’. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनानंतर आकाशात मूठी उंचावून ‘भारत माता की जय!’, ‘वंदे मातरम्!’

प्रा. मिलिंद जोशी

आमच्या समोर ध्वजस्तंभ नव्हता की, त्यावर तिरंगा नव्हता. तो फडफडत होता आमच्यापैकी प्रत्येकाच्या हृदयात.

परस्परांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पूर्वनियोजन न करता अगदी सर्व काही स्वयंस्फूर्तीने. कैलासाच्या साक्षीने चिन्यांच्या छाताडावर साजरा झालेला हा अविस्मरणीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा.

भलेही आपल्या भाषा वेगळ्या असतील, प्रांत वेगवेगळे असतील, पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तनाने-मनाने आम्ही एक आहोत! भारतीय आहोत!! त्याचे हे प्रत्यंतर! यालाच म्हणतात राष्ट्रीयता! यालाच म्हणतात एकात्मता!!

सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनादेखील वंदनीय असलेल्या शिव-पार्वतीचे हे निवासस्थान. पांडवांनी राज्यत्यागानंतर येथूनच स्वर्गारोहण केले. हिंदू धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन आलेल्या शंकराचार्यांनी येथे देह ठेवला. ऋषभदेवाने आठ पावले चालून कैलासाच्या पायथ्याशी चिरनिद्रा घेतली. वारकरी सांप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या संत नामदेवांनी या कैलासाची परिक्रमा केली. आसेतू हिमाचल भ्रमंती केलेल्या गुरुनानक देवांनी येथेच कैलासापुढे माथा टेकविला, तर आपल्या पावलांचे ठसे उमटवत भगवान बुद्धांनी याच कैलासाभोवती प्रदक्षिणा घातली. हजारो वर्षांपासून ही भूमी आमची आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून ती आमची आहे. आज येथे येण्यासाठी आम्हाला व्हिसा घ्यावा लागतो हे आमचे दुर्दैव! पण एक दिवस असाही उजाडेल की त्या दिवशी मानस सरोवराच्या काठावर तिरंगा फडफडताना दिसेल!“ 

वेगळे परिमाण लाभलेले प्रवासवर्णन

भारतीय माणूस हा जत्रा, यात्रा, तीर्थाटन आणि पर्यटन यात आनंद मानणारा आहे. ‘वडिली जे निर्माण केले। ते पाहिले पाहिजे।’ या समर्थ रामदासांच्या वचनाचे अनुकरण करण्याची वृत्ती महाराष्ट्रातल्या माणसांच्या नसानसात भिनलेली आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील नितांत सुंदर स्थळे पाहिली पाहिजेत. त्याशिवाय आपले जीवन सार्थकी लागणार नाही, असे मनापासून वाटणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे.

सगळेच प्रवास साधे, सोपे आणि सरळ नसतात. काही यात्रा व प्रवास पर्यटकांच्या सहनशीलतेची, हिमतीची आणि शारीरिक क्षमतेची सत्त्वपरीक्षा पाहणारेही असतात. कैलास-मानस सरोवर यात्रा ही त्यापैकी एक. यात्रेच्या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे माहीत असूनही माणसे हे आव्हान स्वीकारतात. सर्व अडथळे पार करीत ध्येय गाठतात. शब्दातीत आणि कल्पनातीत असा आनंद आणि समाधान अनुभवतात. अशा माणसांपैकी एक आहेत पत्रकार सुभाष काळे. ते पत्रकारितेच्या क्षेत्रात रमले. प्रवास हा लहानपणापासून त्यांच्या आवडीचा छंद होता. पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांची देशभर भ्रमंती घडली. ती भ्रमंती केवळ बातमी आणि लेख एवढाच मर्यादित हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली नव्हती. सजग पत्रकारितेसाठी आवश्यक असलेले संवेदनशील मन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि समकालीन स्थितिगतीचे अवलोकन करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या भ्रमंतीदरम्यान मजकुराच्या पलीकडे खूप काही पाहिले. असे पाहणे हा त्यांचा स्वभावच होऊन गेला. कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यानंतर आणि निवृत्तीनंतर त्यांना कैलास मानस सरोवर खुणावू लागले. त्या वेळी त्यांचे वय एकोणसत्तर वर्षाचे होते. वयाच्या सत्तरीनंतर चीन सरकारने कैलास मानस सरोवरसाठी व्हिसा देणे बंद केले होते. काळे यांच्यासाठी ही शेवटची संधी होती. अनंत अडचणींचा सामना करीत या संधीचा लाभ त्यांनी कसा घेतला आणि यात्रा कशी पूर्ण केली हे त्यांच्या ‘अद्वितीय कैलास मानस सरोवर’ प्रवास वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. कैलास मानस सरोवरची यात्रा करणाऱ्यापैकी अनेकांनी आपले अनुभव आजवर शब्दबद्ध केले आहेत. पत्रकार सुभाष काळे यांचे हे पुस्तक आजवर या संदर्भातल्या प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वेगळे ठरते. याचे कारण या पुस्तकात केवळ प्रवासाच्या नोंदी नाहीत, केवळ भारावून टाकणारे निसर्गचित्रण नाही, संकटावर आणि अडचणींवर मात करीत गाठलेल्या ध्येयाविषयीची फुशारकी नाही तर या प्रवासादरम्यान त्यांना घडलेले जे व्यक्ती, समाज आणि संस्कृतीदर्शन आहे त्याची इतिहास, वर्तमान आणि भविष्याशी सांधेजोडणी करीत ते जी मांडणी करतात त्यामुळे हे पुस्तक केवळ एक प्रवासवर्णन राहत नाही. त्या पलीकडे जाऊन वाचकांना सर्वार्थाने श्रीमंत आणि समृद्ध करणारा ज्ञानप्रवास ठरते. त्या अर्थाने या पुस्तकाचे मोल काही वेगळे आहे.

मुंबई ते काठमांडू आणि काठमांडू ते मुंबई आणि पुणे परत अशा अकरा प्रकरणातून काळे यांनी वाचकांना या यात्रेचा अनुभव दिलेला आहे. काठमांडू दर्शन या प्रकरणात ते रिचर्ड स्लोविन या शिकागोत जन्मलेल्या माणसाची पशुपतिनाथाच्या दर्शनाची कथा त्याच्यात शब्दात सांगतात. कैलास मानससरोवर माहात्म्य विशद करताना त्याच प्रकरणात तिथे जाणाऱ्या विविध मार्गाविषयी माहिती देतात. सायब्रुबेशी ते केरुंग या प्रकरणात प्रवासासोबतच एकेकाळी आपल्या ताब्यात असलेला कैलास-मानससरोवरचा भाग चिन्यांनी कसा बळकावला हे समजण्यासाठी तिबेटच्या इतिहासाचा मागोवा घेणे का आवश्यक आहे हे विशद करतात. चिन्यांच्या टाचेखालील तिबेट या प्रकरणात आयुष्यभर जमा केलेली संपत्ती ‘सेव्हन इअर्स इन तिबेट’ या भव्य चित्रपटनिर्मितीत घालविणारा हॅरेर, बंगालचा बिमल डे, आप्पासाहेब पंत, दलाई लामा यांचे संदर्भ वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे आहेत. संपूर्ण जगाचाच नंबर एकचा शत्रु असलेल्या चीनच्या अंतरंगाविषयीचे त्यांचे विवेचन भारत-चीन संबंधाविषयीच्या लेखकाच्या अभ्यासाचे दर्शन घडविणारे आहे. मानस सरोवरावरील स्वातंत्र्यदिन हा या पुस्तकातला सुरेख लेख आहे. सहा प्रकरणात त्यांनी ही परिक्रमा कशी पार पडली याचे जे वर्णन केले आहे, ते वाचताना आपणच ही परिक्रमा करीत आहोत, असेच वाचकांना वाटते. इतके आपण त्या अनुभवांशी जोडले जातो. या खडतर प्रवासात उत्सुकता, जिज्ञासा, कुतूहल, भीती, नैराश्य, थकलेपणा, उत्साह अशा नानाविध भावनांच्या मिश्रणातून मिळणारा स्वप्नपूर्तीचा आनंद लेखकाबरोबर वाचकांनाही अनुभवायला मिळतो. अनेक कथा, तपशील, संदर्भ सांगत काळे वाचकांचे बोट धरून त्यांनाही कैलास-मानस सरोवर यात्रा घडवितात. हेच या पुस्तकाचे यश आहे. कैलास मानस सरोवर या संदर्भात आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमधले लक्षणीय पुस्तक म्हणून या पुस्तकाची नोंद जाणकारांना घ्यावी लागेल.

सामान्यांतल्या सामान्य माणसांना समजणारी भाषा पत्रकारांनी वापरली पाहिजे‘, या लेखनधर्माचे काळे यांनी हे सुंदर पुस्तक लिहिताना निष्ठेने पालन केले आहे. साध्या, सोप्या भाषेला त्यांनी आशयाच्या सौंदर्याने नटविले आहे.

परिचय : प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पेंच” – लेखक : श्री अतुल धामनकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पेंच” – लेखक : श्री अतुल धामनकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : पेंच

लेखक: अतुल धामनकर

पृष्ठे: २०१ संपूर्ण रंगीत

मूल्य : ३००₹ 

लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रूडयार्ड किपलींगलिखित ‘जंगलबुक’ पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी. इथे आजही मोगलीचे सवंगडी शेरखान, भालू, कबाकी, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. अशा या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या रांगेत पसरलेल्या जंगलात लेखकाला वाघ व वन्यजिवांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली होती. वन्यजीव अभ्यासक असलेले अतुल धामनकर यांच्या अनेक थरारक अरण्य अनुभवांनी आणि ओघवत्या शैलीतील लेखनाने नटलेलं हे एका जंगलाचं जणू आत्मचरित्रच आहे.

भारत हा एक महान देश आहे जो वनस्पती आणि प्राण्यांच्या अफाट विविधतेसाठी समृद्ध आहे. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि ते इतरांपेक्षा वेगळे आहे. काही जंगले वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहेत. ‘पेंच – मोगली आणि जंगल बुकच्या अरण्य’ हे अतुल धामणकर यांनी लिहिलेले वन्यजीवांवर माहितीपूर्ण पुस्तक आहे. ते एक प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार, स्वतंत्र वन्यजीव लेखक आणि संशोधक आहेत ज्यांनी वन्यजीवांवर असंख्य पुस्तके लिहिली आहेत. पेंच हा मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. मोगली आणि त्याचे साथीदार जंगल बुक याचे आपल्या आठवणीत आणि प्रत्येक मुलाच्या बालपणात एक विशेष स्थान आहे.

पुस्तकात जंगल बुक प्रत्यक्ष पाहण्याची थेट अनुभूती मिळते. पुस्तकात जंगलात भेटलेल्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे विस्तृत चित्रे आहेत आणि सोबत त्यांच्या आठवणीही लिहिल्या आहेत. पेंच राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन काही दर्जेदार वेळ घालवायला आवडणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच वन-स्टॉप डेस्टिनेशन आणि वन्यजीवांचे संदर्भ मार्गदर्शक असे म्हणता येईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जागर विश्वजननीचा” -लेखिका : सुश्री कल्याणी हर्डीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जागर विश्वजननीचा” -लेखिका : सुश्री कल्याणी हर्डीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : जागर विश्वजननीचा 

लेखिका: कल्याणी हर्डीकर

पृष्ठे: २७२

मूल्य : ३९५₹ 

या विश्वाच्या उत्पत्तीला कारण ठरली आहे स्त्रीशक्ती, मातृरूपातल्या या स्त्रीशक्तीची प्राचीन काळी सर्वत्र पूजा होत असे. तिला देवी मानले जात असे, तिचा सन्मान राखला जात असे. तथापि कालांतराने पितृसत्ताक धर्माचा प्रभाव वाढत गेला आणि हिंदू धर्माच्या प्रभावाखालचा आपला भारत देश वगळता दुर्दैवाने इतरत्र सर्वत्र मातृपूजा किंवा देवतांचे अस्तित्व यांचा लोप होत गेला…. भारतात मात्र या आदिशक्तीची विविध रूपांत उपासना होतच राहिली. अनेक आक्रमणांना धैर्याने तोंड देत आणि असंख्य संकटांवर मात करीत भारतात विविध देवतांचा वेळोवेळी जागर होत राहिला. त्या अभिमानास्पद, अद्वितीय वारसा संस्कृती याचा अर्थ समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. आणि त्याच बरोबरीने आजही देशोदेशीच्या संग्रहालयांमधून अवशेषांच्या रूपात आढळणाऱ्या विविध मातृस्वरूप देवतांचा धांडोळाही या पुस्तकात घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता जगात, प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांत, ठिकठिकाणी मातृदेवतेच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याचे जोमदार प्रयत्न होताना दिसत आहेत. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील त्या परिवर्तनाचीही चाहूल घेणारे हे पुस्तक आहे. सर्जनशक्ती धारण करणाऱ्या स्त्रीला म्हणजेच मातेला देवतास्वरूप मानण्यामागच्या धार्मिक-सांस्कृतिक-सामाजिक मानसिकतेचे रहस्यही या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहे. एका चिरंतन विषयाचा कालसुसंगत अन्वयार्थ मांडणारे हे पुस्तक सर्व जिज्ञासू भाविकांच्या संग्रही हवेच!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा” – लेखिक : श्री सुरेश सोनी – अनुवाद : डॉ. क. कृ. क्षीरसागर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा” – लेखिक : श्री सुरेश सोनी – अनुवाद : डॉ. क. कृ. क्षीरसागर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

पुस्तक : भारताची उज्ज्वल विज्ञान – परंपरा

लेखक : सुरेश सोनी

अनुवाद : डॉ. क. कृ. क्षीरसागर

पृष्ठे : २०७

मूल्य: २००₹ 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर पाश्चिमात्त्यांची मक्तेदारी आहे असे चित्र निर्माण केले जाते. पाश्चात्त्य वैज्ञानिक स्वतःलाच विज्ञानाचे जनक म्हणवून घेतात, जणू विज्ञान क्षेत्रातील प्रकाशाचे पहिले किरण पाश्चात्त्य आकाशातच फाकले गेले आणि त्यामुळे अवघ्या विश्वाचे विकासचक्र गतिमान झाले आणि हे होत असताना पूर्वेकडील विज्ञानाचे आकाश मात्र अंधकारमय होते, अशीच भारतातील लोकांची मनोधारणा आहे. आणि या मनोधारणेला आपल्याच देशातील बुद्धिवादी व्यक्ती, संस्था आणि प्रसारमाध्यमे यांनी इतिहासाकडे दुर्लक्ष करत खतपाणी घातले. या गैरसमजामुळे आपल्या देशाला काही विज्ञानपरंपरा होती. वैज्ञानिक दृष्टी होती हेच नव्या पिढीला माहीत नाही. आणि त्यामुळेच आमचा वैज्ञानिक दृष्टि आणि वैज्ञानिक ज्ञान नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे.

वास्तविक भारत फक्त धर्म आणि दर्शन क्षेत्रातच नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर होता. इतकेच नव्हे तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वयही साधला होता.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी आचार्य प्रफुल्लचंद्र राय, ब्रजेन्द्रनाथ सी जगदीश चंद्र बसू, रावसाहेब वझे आदी विद्वानांनी आपल्या गाढ्या अभ्यासाने सिद्ध केले होते की भारत फक्त धर्म, दर्शन क्षेत्रातच नाही तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ही अग्रेसर होता इतकेच नाही तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय साधला होता. त्यातून निर्माण झालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विज्ञानाचा विकास जीवसृष्टीला अनुकूल आणि मंगलदाय असावा अशी दृष्टीही प्राप्त झाली.

या आपल्या समृद्ध ठेव्याकडे लक्ष वेधले आहे सुरेश सोनी यांनी. ‘भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा’ या पुस्तकातून भारताची ही गौरवशाली विज्ञानपरंपरा मराठी वाचकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या ग्रंथाने होणार आहे. विद्युतशास्त्र, यंत्रविज्ञान, धातुविज्ञान, विमानविद्या, नौकाशास्त्र, वस्त्रोद्योग, गणितीशास्त्र, कालगणना, खगोलविज्ञान, स्थापत्यशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती, कृषी, प्राणी, आरोग्य, ध्वनि इ. विषयीच्या विज्ञानात, भारतीयांनी केलेले संशोधन व मांडलेले सिद्धान्त आजही जगाला उपयुक्त आहेत. भारतीयांची विज्ञान क्षेत्रातील ही अजोड कामगिरी निश्चितच या ग्रंथातून वाचकांसमोर येईल. आणि भारतीयांना नकारात्मक भावनेतून मुक्त करण्यासाठीही या ग्रंथाचा उपयोग होईल.

विज्ञानाच्या विविध विषयांची सरळ, सोप्या भाषेतून मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

हा ग्रंथ भारतीय ज्ञान-विज्ञानाची ओळख करून देणारा तर आहेच, शिवाय आपल्या देशाविषयीचा अभिमान जागृत करेल आणि उमलत्या नव्या पिढीला नवसंशोधनासाठी प्रेरणा देईल.

वैज्ञानिक अभ्यास व संशोधन करणारे भृगु, अत्री, भारद्वाज, नारद, वसिष्ट, गर्ग, शौनक, कणाद, शुक्र, चाक्रायण, धुंडीनाथ, नंदीश, अगस्त्य आदी ऋषी होऊन गेले त्यांनी केलेले संशोधन, विज्ञानपरंपरेची ओळख यातून करून दिली आहे. याचा मराठी अनुवाद क. कृ. क्षीरसागर यांनी केला आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “१९६५ भारत – पाकिस्तान युद्धकथा” – लेखिका: सुश्री रचना बिश्त रावत – मराठी अनुवाद: श्री भगवान दातार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “१९६५ भारत – पाकिस्तान युद्धकथा” – लेखिका: सुश्री रचना बिश्त रावत – मराठी अनुवाद: श्री भगवान दातार ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : १९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा

लेखिका : रचना बिश्त रावत

अनुवाद : भगवान दातार

पृष्ठ : १६८

मूल्य: २९५₹ 

१ सप्टेंबर १९६५… पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील चुंब जिल्ह्यामध्ये हल्ला चढवला. शांतताप्रिय भारत देश युद्ध छेडणार नाही, अशी पाकिस्तान्यांची समजूत होती. पण ती चुकीची ठरली. त्या आक्रमणामुळे रक्तपाती युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाडा-युद्ध म्हणून ओळखलं गेलं, ज्यात पाकिस्तानकडील अमेरिकी पॅटन रणगाड्यांना भारतीय सैनिकांनी नामोहरम केलं.

लष्करी नोंदी आणि युद्धात सर्व जागी झालेल्या सैनिकांच्या तसंच हुतात्म्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतींच्या आधारे लेखिका रचना बिश्त यांनी हाजी पीर, असल उत्तर, फिलोरा यांसारख्या लढायांची माहिती, त्यांमधले डावपेच, अचानक उभी ठाकलेली आव्हानं आणि त्यांवर केलेली मात यांबद्दलचं विश्वासार्ह कथन या पुस्तकात केलं आहे. तसंच वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या हृद्य स्मृतींना उजाळाही दिला आहे.

पॅटनचं कब्रस्तान

१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील रणगाडा युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासातलं सर्वांत मोठं रणगाडा युद्ध मानलं जातं. या भीषण युद्धात दोन्ही बाजूंनी सुमारे एक हजार रणगाडे रणांगणावर उतरवण्यात आले होते

असल उत्तर याचाच अर्थ मुंहतोड जवाब. खेमकरण भागातल्या भिकिविंड गावाजवळ रणगाड्यांचं हे घनघोर युद्ध झालं. भारतीय जवानांनी मोठ्या संख्येने काबीज केलेले पाकिस्तानचे रणगाडे रांगेत उभे केलेले होते.

रणगाड्यांची ही रांग हीच या युद्धातली सर्वांत मोठी आणि अभिमानास्पद ट्रॉफी होती. ताब्यात घेतलेल्या रणगाड्यांची संख्या १०३ होती. एवढ्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी रणगाडे इथे ठेवण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी लगेच या ठिकाणाला ‘पॅटन नगर’ म्हणावयास सुरुवात केली.

युद्धानंतर फिल्म्स डिव्हिजनने यावर एक माहितीपटही चित्रित केला. काही जण याला ‘पॅटन रणगाड्यांचं कब्रिस्तानहीं’ म्हणायला लागले.

पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनीही या स्थळाला भेट दिली. मी तर माझ्या आयुष्यात तुटलेल्या बैलगाड्यासुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने पाहिल्या नाहीत, असं ते गमतीने म्हणाले.

भारतीय सैनिकांच्या अतुल्य धैर्याच्या, वीरश्रीच्या आणि शौर्याच्या कथा म्हणजेच १९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॅमिली बजेट” – लेखक : श्री विनायक कुळकर्णी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “फॅमिली बजेट” – लेखक : श्री विनायक कुळकर्णी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : फॅमिली बजेट

लेखक : विनायक कुळकर्णी 

मूल्य : २००₹ 

पृष्ठे : १४१

जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चाना तोंड द्यावे लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण… एक ना अनेक! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते! !

आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद करणे केव्हाही श्रेयस्कर! पण हे फॅमिली बजेट कसे आखावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राधान्य कशाला द्यावे, विवाह आदी मोठ्या खर्चाबरोबरच आणखी कोणत्या खर्चासाठी नियोजन आवश्यक आहे, कुटुंबाचा आरोग्य विमा कसा आवश्यक आहे, बचतीचे नवीन पर्याय कोणते, अशा विविध गोष्टींचे सखोल मार्गदर्शन सर्वसामान्यांना मिळाले तर त्यांना त्यांच्या फॅमिलीचे बजेट व्यवस्थित आखता येईल आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक सुखकर होऊ शकेल, या विचारांतून हे पुस्तक आकारास आले आहे. सर्वसामान्य कुटुंबांबरोबरच दिव्यांगांसाठी आर्थिक आखणी, आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुण तरुणींनी आपल्या खर्चाची विभागणी कशी करावी, त्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, याचा उहापोह या पुस्तकात केला आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्हिंग विल, वाढत्या खर्चाचे नियोजन याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. थोडक्यात, जुन्या-नव्या सर्वांनी कौटुंबिक अंदाजपत्रकाचा आराखडा आखण्यापूर्वी विचारात घ्यावयाचे टप्पे सांगणारे आणि कुटुंबाच्या आनंदाची, समाधानाची चौकट नव्याने आखून देणारे आर्थिक समुपदेशक विनायक कुळकर्णी लिखित मार्गदर्शक पुस्तक ‘फॅमिली बजेट’ 

—-

फॅमिली बजेटया आपल्या पुस्तकाविषयी लेखक आपल्या मनोगतात म्हणतात –

मी लिहीत असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ वर्तमानपत्रातून नवीन वर्षासाठी आर्थिक सदर हवे आहे, असा फोन आला. दोन दिवसांनी मुंबईच्या निवासी संपादकांनी फोन करून या वेळी लेखन जरा ‘हट के’ आणि वाचकांशीच संवाद होत असल्यासारखे होऊ दे, असे सुचवले. सदराचे नामकरण ‘फॅमिली बजेट’ असे केले होते. संवादी शैलीतून आर्थिक व्यवहारांवर गुंतवणुकींवर पहिल्या काही लेखांतून मी केलेले भाष्य सर्वांना आवडले. पहिल्या दोन महिन्यांतच फॅमिली बजेटमधील ‘श्रीकाका’ वाचकांच्या घरात आणि मनात वसल्याची पोचपावती मिळू लागली होती. ‘फॅमिली बजेट’साठी विषय कसे मिळतात, असे ओळखीचे तसेच अनोळखी लोकही विचारत. अर्थात, काही वाचकांचे व्यक्तिगत प्रश्न आणि माझ्या व्यावसायिक अनुभवातून आलेले प्रश्न यांचा मेळ घालून हे कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर अधिकतर भाष्य करणारे ‘फॅमिली बजेट’ जन्माला आले.

गुंतवणूक आणि आर्थिक समुपदेशक म्हणून माझ्या चार दशकांच्या व्यावसायिक अनुभवातून मिळालेली अनुभूतीच जणू ‘फॅमिली बजेट’ मधील लेखांची जननी आहे, असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही, सर्व काही व्यवस्थित असतानाही वृद्धाश्रमात स्वतःहून जाण्याची तयारी केलेले वयोवृद्ध जोडपे माझ्या पुस्तकांचे वाचक होते. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाला पुढे इंजिनीअरिंगमध्ये एम. एस. करण्यासाठी अमेरिकेत शिकायला पाठवण्याकरिता आर्थिक तयारी कशी करायची, हे विचारायला आलेल्या पालकाने मला दोन लेख विषय मिळवून दिले होते. सामाजिक संस्थांत वावरणाऱ्या मित्राकडून समलिंगी व्यक्तींचे विश्व समजून घेता आले आणि त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन किती आवश्यक आहे याची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देता आल्याचा आनंद मला घेता आला. एका ग्राहकाला ‘लिव्हिंग विल’समजून देताना ही काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे, हे अधोरेखित झाले होते. दिव्यांग मुलांचे प्रश्न त्यांच्या पालकांना चिंतातुर करतात आणि याबाबत चर्चा करताना हृदयावर दगड ठेवून व्यावहारिक निर्णय घेणारे पालक बघून नकळत हात जोडले गेले आणि डोळ्यांत अश्रू साठले. एका कुटुंबाच्या बजेटपुरते हे सदर मर्यादित राहिले नाही, याचा एकीकडे आनंद आहे; तर दुसरीकडे समाजाच्या कौटुंबिक बजेटचा आलेख आणि आवाका लक्षात घेता आल्याने, त्यातून काही सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे शोधता आल्याने मिळालेले आत्मिक समाधान खूपच मोठे आहे. अर्थात, यात माझ्या वाचकांचा वाटा खूपच मोलाचा आहे.

– – 

सर्वांनी आवर्जून वाचायला हवे असेच हे पुस्तक आहे.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “वळणबिंदू” – लेखिका : डॉ. अंजली जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वळणबिंदू” – लेखिका : डॉ. अंजली जोशी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : वळणबिंदू  

लेखिका : डॉ. अंजली जोशी

मूल्य : २६२

मूल्य: ३५०₹

आपल्या डोळ्यांसमोर वाढणारी आपली मुलं जेव्हा तारुण्यात प्रवेश करतात, तेव्हा येणारा टप्पा हा पालक मुलांच्या नात्यातला एक महत्त्वाचा वळणबिंदू असतो. वळणबिंदू अनुभवण्यासाठी खूप मोठी घटनाच घडावी लागते असं नाही, तर त्यांचा एखाद्याशी झालेला संवाद, त्यांचं व्यक्त होणं, बाजू मांडणं हेही वळणबिंदू ठरू शकतात. असे अनेक ‘वळणबिंदू’ पालकांना अनुभवण्यास मिळावेत, या उद्देशाने ‘वळणबिंदू’ ही लेखमाला २०२३ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत दर पंधरवड्याला लिहली होती. सर्वसाधारणपणे पालकांसाठी लिहिल्या गेलेल्या लेखनात पालकांच्या बाजूवर भर दिला जातो. मुलांबद्दल पालकांना काय वाटतं, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यावर काय केलं पाहिजे, हे त्यात विशद केलेलं असतं. पालकांना ही बाजू आपण स्वतः त्या भूमिकेत असल्यामुळे माहीत असते. पण तरुणांच्या बाजूबाबत पालक अनेकदा अनभिज्ञ असतात. म्हणूनच तरुणांची फारशी सामोरी न आलेली बाजू पालकांपुढे मांडण्याच्या उद्दिष्टाने या लेखमालेची निर्मिती झाली होती. ज्या पालकांची मुलं पूर्व-प्रौढावस्थेच्या (early adulthood) टप्प्यात म्हणजेच १८ ते ३५ वर्षे या वयोगटात आहेत, त्या पालकांना डोळ्यांसमोर ठेवून ही लेखमाला लिहिली होती.

तरुण पिढीच्या मानसिक स्पंदनांचा आवाज पालकांना अनेकदा ऐकू येत नाही. पालक स्वतःच्या मानसिक आवर्तात इतके गुरफटलेले असतात, की दुसरे आवाज ऐकू येण्याचे दरवाजे त्यांनी बंद केलेले असतात. मुलांचं म्हणणं पालकांपर्यंत पोचतच नाही. मुलांचे ताणतणाव, भावनिक चढउतार, आपल्यापेक्षा भिन्न असणाऱ्या त्यांच्या विचारपद्धती हे पालकांना परकं वाटू लागतं. त्यांना समजून घेण्यामध्ये एक भिंत उभी राहते आणि मग ही पिढी स्वार्थी आहे, चंगळवादी आहे, एन्टायटल्ड आहे, असे शिक्के पालक सहजपणे त्यांच्यावर मारून मोकळे होतात. पण त्यामुळे त्यांना समजून घेण्यातलं अंतर कमी तर होतच नाही, पण उलट वाढत जातं!

पूर्व-प्रौढावस्थेत प्रवेश केलेल्या मुलांचं शिक्षण एकतर संपलेलं असतं किंवा त्यांच्या उच्च शिक्षणाचा शेवटचा टप्पा चालू असतो. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा हा काळ असतो. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित होत असते. नवीन नाती जोडली जात असतात. वेगळे मार्ग, वेगळ्या वाटा निवडाव्याशा वाटत असतात. नवीन मतं, नवीन विचार, नवीन दृष्टिकोन यांचं आकर्षण असतं. एकूणच हा काळ स्थित्यंतराचा असतो. अनेक आव्हानं समोर ‘आ’ वासून उभी असतात. शिक्षण-नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढल्या असल्या तरी तिथेही रस्सीखेच चालू असते. नोकरी-घर-छंद यांच्यातल्या प्राधान्यक्रमाचा पेच असतो. मैत्री जशी जुळते तशीच ती तुटूही शकते, याचं प्रत्यंतर ब्रेकअप्समधून अनुभवायला येत असतं. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. पण त्यातली गुंतागुंतही ते अनुभवत असतात, मग तो प्रेमविवाह असो नाहीतर जुळवून आणलेला! जोडीदाराच्या अपेक्षा, तडजोडीचे निकष, अनुरूपतेच्या कल्पना पारखून घेण्याचा हा काळ असतो. या सगळ्यांतून स्वतःसाठी सुयोग्य जोडीदार निवडणं सोपं नसतं. घटस्फोट घेणं हे पूर्वीसारखं अपवादात्मक राहिलेलं नसलं, तरी ते मानसिकदृष्ट्या थकवणारं असतं. ‘लिव्ह-इन’, ‘लाँग टर्म रिलेशन्स’ यांसारखे सहजीवनाचे अनेक पर्याय समोर येत असले तरी त्यांतही आव्हानं असतात.

या आव्हानांना तोंड देताना या मुलामुलींचा स्वतःशी, पालकांशी, समाजाशी सूक्ष्म किंवा मोठ्या पातळीवर संघर्ष चालू असतो. मुलांच्या आयुष्यात येणारी ही स्थित्यंतरं फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहत नाहीत, तर पालकही या स्थित्यंतरांतून नकळतपणे जात असतात. मुलांबरोबर त्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनांशी जुळवून घेताना पालकांचीही दमछाक होत असते. मग नात्यामध्ये तणाव येतो. हा कधी दृश्य असतो तर कधी अदृश्य. पण तोपर्यंत पालक-मुलांच्या नात्याचा स्थिर रेषेतला चाललेला प्रवास चढउताराचा होऊ लागतो. संघर्षाच्या ठिणग्या उडतात. आरोप-प्रत्यारोप होतात, खटके उडतात, मनं दुखावली जातात. कधी कधी सांधली न जाणारी दुखापत होते. संवादाला विपरीत वळण लागतं. तणावाची नवीन आवर्त तयार होतात. आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे चूक, या हमरीतुमरीमध्ये काय म्हणायचंय तेच हरवून जातं.

ऐकून घेण्याची मानसिकता जोपासणं म्हणजे इतरांना त्यांची बाजू असू शकते, ती आपल्या विरुद्धही असू शकते, पण ती तशी असण्याचा त्यांना अधिकार आहे, हे मान्य करणं. अनेकदा हा अधिकार आपण मान्य करत नाही. जवळच्या माणसांच्या बाबतीत तर हे हमखास होतं. त्यांना आपल्यासारखंच वाटलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्यासारखाच विचार केला पाहिजे, असा दुराग्रह धरला जातो. मात्र त्यांना जर आपल्यापेक्षा वेगळं वाटलं, तर आपण म्हणतो की त्यांना असं कसं वाटू शकतं? त्यांना असं वाटताच कामा नये. मग आपण त्यांचं वाटणं कसं चुकीचं आहे, हे सांगायला जातो, त्याची छाननी करायला जातो आणि संवाद फिसकटतो. एकदा त्यांना असं वाटू शकतं याचा स्वीकार केला, की मग पुढल्या पायरीवर त्यांच्या मतांची छाननी करता येते. पण वाटण्याचा स्वीकार न करताच मतांच्या छाननीवर घसरलो तर संवाद सुधारण्यापेक्षा तो जास्त बिघडत जाण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच ‘ऐकून घेण्याची मानसिकता’ जोपासण्याचं व विरोधी विचार स्वीकारण्यासाठी खुली जीवनदृष्टी ठेवण्याचं आवाहन प्रस्तुत पुस्तकात केलं आहे. दुसरी बाजू कळली तर समतोल विचार करता येईल, युवा पिढीशी होणाऱ्या संघर्षाची धार निवळत जाईल, दुराव्याचं अंतर कमी होऊ शकेल, परस्परसंवाद वाढीला लागेल आणि हेच ‘वळणबिंदू’ या पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट आहे.

पालकांशी संघर्ष होणाऱ्या तरुण पिढीचे मनोव्यापार व त्यांची भावनिक आंदोलनं उलगडून दाखवण्यासाठी या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक पात्रांची मनोगतं यात सादर केली आहेत. अशा परिस्थितीतून प्रवास करणाऱ्या पालकांनी व मुलांनी परस्परांतला तणाव निवळण्यासाठी काय करावं, याबाबतच्या टिप्स दोन्ही बाजूंसाठी स्वतंत्रपणे नमूद केल्या आहेत. तसंच पालक व मुलं ह्या दोघांनाही त्या परिस्थितीत उपयोगी पडेल असं मानसशास्त्रीय तंत्र सुचवून ते कसं अवलंबात आणावं, याबद्दलही मार्गदर्शन केलं आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी” – लेखिका : सुश्री आशा उगांवकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी” – लेखिका : सुश्री आशा उगांवकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी

लेखिका : आशा उगांवकर

पृष्ठ : ११२

मूल्य : १७५₹ 

अनंत काळापासून मिठाने व्यापलेली पृथ्वी आणि माणसांसह, प्राणी, वनस्पती यांना असलेली मिठाची गरज आपण जाणून आहोत. दैनंदिन जीवनात मीठ खाल्याने होणारे फायदे आणि तोटे यावर नेहमी भाष्य केले जाते. गाईम्हशी या पाळीव प्राण्यांना जरुरीचे असणारे मीठ वैरणीतून कसे देता येईल अगर त्यांना चाटता यावे यासाठी काय करावे यावर देखील विचार होतो. मृदूकाय प्राण्यांना मिठाने अपाय होतो हे सिद्ध झालेले आहे. नैसर्गिक संरक्षक़ अशी त्याची ख्याती आहे.

मिठामुळे जगात अनेक युद्धे झाली, साम्राज्ये बनली आणि गडगडली! जगातील सर्वांत प्राचीन व्यापार हा मिठाचा होता, जिथे मिठाची उपलब्धी अधिक तिथे आपली सत्ता हवीच म्हणून ती मिळविण्यासाठी मोठमोठी युद्धे होत असत. मिठाच्या व्यापारी मार्गाला ‘लवण मार्ग’ (सॉल्ट रूट) असे नाव मिळाले. या मार्गावर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्तही ठेवला जात असे. मीठ इतके मौल्यवान होते. तस्करी हा शब्दप्रयोग खरे तर सोन्याशी निगडित अर्थाने वापरला जातो. परंतु मीठ सोन्यासारखेच मौल्यवान असल्याने एकेकाळी त्याची देखील तस्करी होत असे.

अशा मिठाबद्दल मानवी मनात जगभर खास आकर्षण आहे. खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी जरुरी असलेल्या मसाले आणि मीठ यामुळे परकीय आक्रमणे झाली, युद्धे सुद्धा झाली आणि आपल्यावरील परकीय सत्तेच्या काळात मिठावर कर कर लादल्यामुळे मीठ इतिहासात अजरामर झाले! जेथे मिठाचे उत्पादन होत नाही अशा देशांना मिठाची आयात करावी लागते. आपल्याकडील मुबलक उत्पादकतेमुळे आपण त्याला महत्त्व देत नाही.

वाक्प्रचार, म्हणी, बोलीभाषा इ. वाङ्मय प्रकारातून मिठाचा खारटपणा व्यक्त झाला आहे. अशा जीवन मरणाशी संबंध असलेल्या मिठाबाबतचे लिखाण हृदयस्पर्शी ठरावे. मिठाच्या मैलोनमैल पसरलेल्या जागांना सॉल्ट फ्लॅट्स अशी इंग्रजी संज्ञा आहे. या जागांचा मराठीमधील उल्लेख मीठव्याप्त सपाट जागा असा केला आहे.

मिठाची विपुलता असली तरी आणि मिठाविना जीवन अळणी असले तरी जगभरातले शेफ (प्रशिक्षित आचारी) कोणताही खाद्यपदार्थ बनविताना स्वादानुसार, चवीनुसार आणि शुद्ध मराठी बोलीभाषेत सांगायचे तर ‘चिमूटभर’ असाच शब्दप्रयोग वापरतात. खाद्यपदार्थाची रुची वाढविण्यासाठी त्याची आवश्यकता अल्प प्रमाणात असते. पण मिठासंबंधी

सर्वांगीण विचार केला तर त्याची व्याप्ती मुठीत न मावणारी आहे. त्यामुळे मिठाबद्दल बोलताना “चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी” सांगण्याचा मानस दृढ झाला आणि या लवणानंदातून पुस्तकाचा जन्म झाला.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ लेखक : विंग कमांडर – विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त) ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर” – लेखक : विंग कमांडर – विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त) ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर  

लेखक : विंग कमांडर – विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त)

पृष्ठे : १७४

मूल्य : ३००₹ 

दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निर्घृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कारवाई केली.

पाकिस्तान आणि पाक- व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हल्ल्यांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्ससहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या. परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले.

– – हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे

अर्थात ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी. आर. डी. ओ. , इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण या पुस्तकात दिलेले आहे.

… हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचावे असेच आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ ” – लेखिका : ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण” – लेखक : सीए शिरीष देशपांडे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण “

लेखक: सीए शिरीष देशपांडे

पृष्ठ: २३६ 

मूल्य: ३००₹ 

सायबर सजगता अभियान!!!! 

बदललेली समाज व्यवस्था, त्या बरोबरच तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे इंटरनेट म्हणजेच आंतरजालाचा वाढता प्रभाव हा प्रत्येकाच्या सध्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून बहुसंख्य लोक इंटरनेट वापर आणि मोबाईल वापर प्रचंड प्रमाणात करत आहेत. सायबर चोरटे बरोबर ह्याचा बेमालूम फायदा उठवत आहेत.

होम मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन सायबर क्राईम को ऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या २०२५ मध्ये नोंदवल्या गेलेल्या सायबर गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक आणि काळजी वाढवणारी आहे. त्या अहवाला-नुसार रोज नवीन नवीन युक्त्या लढवून सायबर चोरटे हा लूटमारीचा मोठ्ठा व्यवसाय म्हणून करत आहेत.

ह्या पुस्तकात सध्या होत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील काही महत्त्वाचे गुन्हे, त्यांची कारणे आणि ते होऊ नयेत म्हणून उपायही सुचवले आहेत. सदरहू लेख वेळोवेळी दैनिक सकाळ, पॉझिव्ह्यू सकाळ, सकाळ मनी आणि लोकसत्तामध्ये छापून आले आहेत. अनेक वाचक आणि हितचिंतक यांचे आग्रहामुळे एक संकलित पुस्तक छापावे म्हणून हा सायबर सजगतेचा प्रयोग.

सायबरगुन्हे होण्याच्या मागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे. पहिले म्हणजे अदृश्य भीती अथवा घाबरून जाणे आणि चोरटे त्याचा फायदा घेऊन समोरच्याच्या मेंदूचा ताबा घेतात, आणि त्यात ‘मी आहे ना’ असा खोटा मदतीचा हात पुढे करतात. दुसरे कारण पैशाचा मोह ह्यामध्ये कोणतीही व्यक्ती त्यात पटकन अडकत जाते. तिसरे कारण सायबर गुन्ह्यांची अजिबात माहिती नसणे किंवा तंत्रज्ञान वापराचे धोके माहीत नसणे. चौथे कारण म्हणजे आभासी जगतातील सर्व माहिती खरी समजणे. ह्या सर्वावर उपाय म्हणजे क्षण प्रतिक्षण सतर्कता. हे पुस्तक वाचून ही सतर्कता नक्कीच वाढू शकेल.

भावना-भीती-भावनिक मनस्थिती याद्वारे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्या ह्या सायबर चोरट्यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने स्व-रक्षण करणे म्हणजेच सतर्क राहणे गरजेचे आहे. जे आपले आई बाप देतात तेच फुकट असते बाकी सर्व फुकटच्या गोष्टींची किंमत मोजावीच लागते. समाज माध्यमांचा अतिवापर मर्यादित करणे, आपले इंटरनेटचे वाढते व्यसन काबूत आणणे, ह्या गोष्टी आता प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे.

सायबर गुन्हेगारीचा हा विळखा वेगाने वाढत आहे. दर मिनिटाला हजारो नवीन टेलिफोन कनेक्शन्स घेतली जात आहेत. आर्थिक स्तर थोडा उंचावला कि ते स्मार्ट फोन वर जात आहेत आणि असे नवीन नवखे ग्राहक चोरट्यांच्या हातात आयते सापडत असावेत.

आगामी काळात नुकत्याच आलेल्या Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) ह्या तंत्रज्ञांनामुळे आणि स्टार लिंक (आंतराष्ट्रीय इंटरनेट कंपनी) च्या वेगवान इंटरनेटमुळे हे सायबर गुन्हे वेगाने माहितीचा वेध घेतील आणि कळायच्या आतच वेगाने लोकांना लुबाडण्यात यशस्वी होतील ही मोठ्ठी भीती आहे. वाचक हे पुस्तक वाचून येऊ घातलेल्या सायबर युद्धाची तयारी म्हणून सतर्कतेचे धडे घेतील अशी लेखकाला आशा वाटते.

हे पुस्तक वाचून बहुसंख्य वाचक स्वतःला संभावित गुन्ह्यापासून वाचवतील अशी लेखकाला खात्री आहे.

या पुस्तकात खालील विषय संदर्भात फसवणूक कशी होते आणि घ्यावयाची काळजी याची माहिती देण्यात आली आहे……

समाजमाध्यमांवरील मैत्री नवी सायबर गुन्हेगारी.

‘टेलिकॉम’ फसवणूक 

‘क्रिप्टो’ गुंतवणूक आणि फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’मुळे कोट्यवधींचा फटका.

हॉटेल बुकिंग करताना सावधान! . ९१

व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका! सावधान! .

पॅनकार्ड २. ०च्या नावाने फसवणूक.

समाज माध्यमांवर ८०० वेबसाइट्स फसव्या.

फसवे ‘एसएमएस’

बनावट वेबसाइट आणि फसवणूक ऑनलाइन कामाच्या मोहापायी नुकसान! . १३०

‘ऑनलाइन गेम’चे अघोरी व्यसन १३५

‘पिग बुचरिंग’ फसवणुकीचे नवे तंत्र… मृत व्यक्तीच्या नावाने सायबर गुन्हेगारी.

क्रेडिट कार्डावरून फसवणूक 

फसव्या लिंकद्वारे फसवणूक कशी टाळाल? . इत्यादी

अजून बरेच विषय आहेत. विषय वाचून आणि लिहून दमायला झाले. किती नवीन नवीन प्रकारे फसवणूक होऊ शकते आणि आपण काय do’s and don’ts केले पाहिजेत हे या पुस्तकात सांगितले आहे.

सर्वांच्या घरात हे पुस्तक असेलच पाहिजे.

सायबर गुन्हेगारी संदर्भात सगळ्यांनी बघावा असा एक माहितीपर व्हिडिओ.

https://www. facebook. com/share/v/1E8uB2yNuG/

**

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares