☆ वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी – लेखक : श्री जगदीश काबरे ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी
लेखक : जगदीश काबरे
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
विज्ञान हा मानवजातीच्या प्रगतीचा कणा आहे.चाकाच्या आणि अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे.तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. याच विषयावरील मांडणी करणारे विज्ञान लेखक प्रा.जगदीश काबरे यांचे वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी हे पुस्तक.
श्री जगदीश काबरे
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे जग झपाट्याने बदलत आहे पण तरीसुद्धा लोकांच्या मनात अंधश्रद्धा रुतल्या आहेत.प्रसारमाध्यमातील लेख,बातम्या,फिचर्स यातून पसरलेल्या अनेक समजूती समाज फारशी शहानिशा न करता ग्राह्य धरत असतो आणि यातूनच अनेक अंधश्रध्दा पसरविल्या जातात. म्हणूनच लेखकाने या गोष्टीवर प्रकाश टाकणारे लेखन केले आहे.पुस्तकातील लेखांद्वारे वैज्ञानिक द्रुष्टीकोन सांगताना विवेकी विचारही मांडले आहेत.
विवेकी विचार,ध्यान, सकारात्मक विचार आणि वैज्ञानिक द्रुष्टीकोन यामुळे व्यक्तीला आत्मविश्वास व मानसिक शांतता मिळते असे ते म्हणतात.लोकांना विचारी करायचे असेल आणि समाजसुधारणा करायची असेल तर भावनेपेक्षा बुध्दीला महत्व दिले पाहिजे कारण भावना माणसाला प्रसंगी हिंस्त्र बनवते पण बुध्दी मात्र माणसाला विवेकी बनवते असे लेखक म्हणतात.
दिवस,महिने,वर्ष आणि कालगणना या लेखातून नक्षत्र,महिने,मुस्लिम महिने याबध्दलची अतिशय रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.काळाची गरज म्हणून तर्कसुसंगत कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागते.निरीक्षण करुन,उपलब्ध ज्ञान वापरून तर्काने त्या घटनेमागचे कारण शोधले पाहिजे आणि ते योग्य आहे कि नाही हे पडताळून पहाण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत.
गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मधून अतिशय मौलिक माहिती लेखकाने दिली आहे. वास्तुशास्त्र, पित्रूपक्ष,गर्भसंस्कार, पौर्णिमा-एक अध्यात्मिक द्रुष्टीकोन, आधुनिक अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारे लेख या पुस्तकात वाचताना आपल्याही ज्ञानात नक्कीच भर पडते.एकूणच वेगळ्या विषयावरील अतिशय अभ्यासपूर्ण लेखन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
परिचय : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.
त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.
तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God… Another is Teacher ! ते दोघेही खोटं बोलत नसतात… मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन… ” अशी आॕपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.
प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेंव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले.
तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने ‘आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा ? जाने दो उसे… ‘
वऱ्हाडकरांचे टीचर नांवाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.
कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात ‘आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, ‘ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना…
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
☆
संकलक / लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
न्यूज स्टोरी टुडे प्रकाशन तर्फे लेखिका नीला बर्वे यांचा कोवळं ऊन हा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह वाचनात आला.
या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. विविध विषयांवर या कथा लिहिल्या गेल्या आहेत. आयुष्य जगताना, समाजात वावरताना, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा, तेथील वातावरणाचा, मानसिकतेचा, मानवी स्वभाव वैशिष्ट्यांंचा, डोळसपणे आणि जाणीवपूर्वक वेध घेत या कथा लिहिल्या गेल्या आहेत हे जाणवतं. शिवाय अत्यंत साध्या, सोप्या, सरळ पण प्रभावी शब्दशैलीत या कथांची मांडणी केलेली असल्यामुळे विषय आशयासकट या सर्वच कथा वाचकांपर्यंत हवा तो परिणाम साधत पोहोचतात.
कोवळं ऊन ही या संग्रहातील पहिलीच शीर्षक कथा. मूल होत नाही म्हणून अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेल्या एका दांपत्याची ही भावनिक कथा आहे. आश्रमाच्या नियमाप्रमाणे दत्तक मुलीस “आम्ही तुझे खरे आई वडील नाहीत” हे सांगण्यासाठी मनाची तयारी करत असतानाचा हा एक कष्टदायी मानसिक प्रवास या कथेत वाचायला मिळतो.
अंतरीचे बंध ही हृदयाला भिडणारी अशी कथा आहे. पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्याची एक विलक्षण कथा वाचण्याचा अनुभव या कथेद्वारे मिळतो. या कथेत बद्रीधाम केदारनाथ यात्रा केल्याचाही सुखद अनुभव वाचताना मिळतो. ही एक योगायोगाची कथा आहे असेही म्हणू शकतो पण कथेचा ओघ आणि सुरुवातीपासूनच कथेची मनावर बसलेली पकड “असेही घडू शकते” हे अगदी सहजपणे मान्य करते आणि ही मान्यता म्हणजेच या कथेचं यश आहे.
निर्णय ही कथा तशी लहान आहे पण या कथेतला आशय मोठा आणि चांगला आहे. जीवनात आपण घेतलेल्या निर्णयावर नेहमीच इतरांची टीका होत असते. त्याकडे दुर्लक्ष करून आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून संतुष्ट कसे राहता येऊ शकते अशा प्रकारचा एक संदेश या कथेतून मिळतो.
नाते ही एक अतिशय सुंदर कथा आहे. लग्नाआधी जोडीदाराला अपघात झाल्यानंतरही नायिका त्याच्याशीच लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत कशी पोहोचते हे अतिशय हृद्यपणे या कथेत लिहिले आहे.
मुक्त मी स्वच्छंद मी एक अतिशय मनोरंजक अशी नवल कथा. पाळलेला एक अज्ञात पक्षी त्या मानवी परिवाराच्या सहवासात वाढतो. त्या परिवाराकडून त्याला खूप प्रेमही मिळतं पण काही दिवसांनी त्या परिवाराला एका पक्षी मित्राकडून “तो गरुड असल्याचे” समजते आणि त्याला घरात ठेवणे हे कायदाबाह्य असल्यामुळे अखेर त्याची मुक्तता केली जाते. ही कथा वाचकांसमोर इतकी सहजतेने उलगडते की त्या पक्ष्याशी वाचकांचेही नाते जडते शिवाय एखाद्या पक्ष्याला पिंजऱ्यात बंद ठेवून त्याचं मुक्त आयुष्य हिरावून घेणे हे किती संवेदनाहीन
आहे हाही संदेश या कथेतून मिळतो. एक वेगळाच विषय यात हाताळला आहे.
हल्लीचीच एक गोष्ट “लिव्ह इन रिलेशनशिप” विषयी ही कथा असली तरी यात कोरोनाचा एक भयंकर काळ आणि त्या पार्श्वभूमीवर उलगडणारं प्रेम, घटना, नातेसंबंध, “आजचा आणि कालचा” यातल्या सीमारेषा ओलांडून एकेकाळच्या विरोधाला दूर सारत गोड आणि सकारात्मक शेवटाकडे नेणारी ही कथा नक्कीच मनोरंजक आहे.
मनू चा आनंद या कथेत मनू आणि आनंद हे नायिका नायक आहेत. मनूचा आनंद हे शीर्षक द्व्यर्थी आहे. यात विशेषनामे आणि आनंद हे भाववाचक नाम यांची कल्पकतेने केलेली गुंफण आवडली. थोडक्यात ही एक हळुवार प्रेम कथा आहे.
अपघात – सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारी आणि एका मुलीच्या भोवती फिरणाऱ्या समंजस कुटुंबाची ही कथा खरोखरच सुरेख आहे.
वंशाचा दिवा ही कथा वाचताना खरोखरच काळजाला चटका बसला. मोठी माणसं अशी का वागतात आणि अशा त्यांच्या वागण्याला कधीतरी धारदार उत्तर का देऊ नये? त्यांच्या चुका त्यांना दाखवून एखादा धाडसी पण आदर्श निर्णय घेणे हे कौतुकास्पदच आहे ना? या कथेतला निश्चल या तरुण नायकाची ही कथा वाचताना मन भरून जाते.
पहिली दिवाळी– नव्या जुन्याची सामोपचराने सांगड घालणारी ही कथा हलकीफुलकी असली तरी चांगला संदेश देणारी आहे.
स्वप्न या कथेतूनही खूप सुंदर विचार लेखिकेने मांडला आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून इंजिनियर बनण्याचे स्वप्न अर्धवट सोडून एक दुर्बल मनाचा पण बुद्धिमान युवक पुन्हा गावी परततो आणि वडिलांना शेती कामात मदत करता करता स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेतीविषयक नवनवे तांत्रिक प्रयोग करून भरपूर यश व पैसा मिळवतो. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग गावाचा उद्धार करण्यासाठी तो करतो. त्यामुळे साऱ्या गावाचा कायापालट होतो. त्याच दरम्यान याच नायकाच्या मुलाबाबत पुन्हा तीच रॅगिंगची समस्या उद्भवते त्यावेळी मात्र तो कॉलेजच्या संपूर्ण व्यवस्थापनेला आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून कॉलेजमधला हा गलिच्छ प्रकार समन्वयाने कसा सोडवतो हे सांगणारी ही एक सुंदर सामाजिक कथा आहे.
अस्मिता- मनाला सुन्न करणारी कथा. ऐन तारुण्यात बेदरकारपणे तान्ह्या मुलाला आणि संपूर्ण परिवाराला सोडून गेलेल्या नवऱ्यामागे त्याची बायको कशी खंबीरपणे जीवनाला सामोरी जाते आणि वीस-बावीस वर्षानंतर ठोकरा खाऊन परतलेल्या नवऱ्याला न स्वीकारता स्वतःची अस्मिता कशी जपते हे सांगणारी ही कथा हृदय पिळवटून टाकते. नारीशक्तीविषयीचा अभिमान वाढवते.
कांदा भजी– कोरोना काळातली ही एक कौटुंबिक, भावनिक, मानसिक ओढाताणीची हलकीफुलकी कथा आहे, मात्र वाचताना ती वाचकाचे रंजन नक्कीच करते.
चुकलेलं कोकरू– तारुण्याच्या उंबरठ्यावर मित्र-मैत्रिणींच्या मेळाव्यात काहीतरी थ्रिलिंग अनुभव घेण्याच्या जोशात मुलं भरकटतात, वाट चुकतात. पुढे काही गंभीर परिणाम होण्याच्या आतच त्यांना विश्वासात घेऊन सावरणं ही खरं तर पालकांची कसोटी असते. त्यासाठी लागणारं धैर्य, संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचं दर्शन या कथेत अतिशय प्रभावी पद्धतीने होतं. ही कथा वाचल्यानंतर मन जडावतंही आणि हलकंही होतं.
वरील सर्व कथांचा आढावा घेताना मी प्रत्यक्ष कथानक सांगण्याचा मोह मुद्दाम टाळला आहे. मी फक्त कथेची रूपरेषा, आशय या परीक्षणात मांडले आहेत जेणेकरून कथा वाचनाचा निखळ आनंद वाचकाला मिळावा. त्यांची उत्सुकता टिकावी.
माननीय देवेंद्र भुजबळ यांची सुरेख प्रस्तावना या कथासंग्रहाला लाभली आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे की, “जगाच्या कुठल्याही देशातील संस्कृतीशील माणूस हा या ना त्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या द्वंद्वात अडकलेला असतो आणि त्यातून शब्दबद्ध होणाऱ्या कथा या वैश्विक ठरतात. ”
माननीय नीला बर्वे यांच्या सर्वच कथातून हे अंतर्द्वंद्व जाणवतं हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही मला फार आवडलं. संपूर्ण पांढऱ्या पार्श्वभूमीवर कोवळं ऊन पसरवणारं सूर्यबिंब, चार पानं फुटलेलं एक रोप आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक रेखांकित चेहरा. चित्रातलं रोप हळूहळू उलगडणार्या आयुष्यासाठीचं रूपक वाटतं आणि रेखांकित चेहऱ्याच्या माध्यमातून माणसाचं जगणं टिपणारी एक संवेदनशील लेखिकाच दृश्यमान होते. अर्थात या मुखपृष्ठाचा हाच अर्थ असेल असेही नव्हे. मात्र पुस्तक हातात घेतल्यावर पाहता क्षणीच माझ्या मनात हे विचार आले ते व्यक्त केले.
एकंदरच एक सुंदर पुस्तक वाचल्याचा अनुभव मला मिळाला.
न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाच्या संपादिका माननीय सौ. अलका भुजबळ यांच्या या सुरेख देखण्या प्रकाशनाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि माझ्यासवे समस्त वाचकांतर्फे धन्यवाद!
तसेच सिंगापूरस्थित माननीय नीला बर्वे यांची मराठी भाषिक साहित्याविषयीची तळमळ, संवर्धन वृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे. पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद!
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी नुजूद.. वय वर्षं १० आणि घटस्फोटिता” – लेखक/लेखिका : डेल्फिन मिनोई/नुजूद अली –अनुवाद : सुश्री सुवर्णा बेडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मी नुजूद.. वय वर्षं १० आणि घटस्फोटिता – आधुनिक काळातील नायिका – नुजूद
लेखक: डेल्फिन मिनोई/नुजूद अली
अनुवाद: सुवर्णा बेडेकर
प्रकाशक: माय मिरर प्रकाशन, पुणे.
पृष्ठे: १७६
मूल्य: २५०₹
कोणे एकेकाळी एका प्रदेशातल्या जादुई भूमीविषयी, तिथल्या घरकुलांप्रमाणेच विस्मयकारी दंतकथा प्रचलित होत्या. तिथल्या घरकुलांवर जणू सुंदर, नाजूक नक्षीकामांची छपाई केली होती. ‘जिंजरब्रेड’ किंवा केक अधिक आकर्षक करण्यासाठी ज्याप्रमाणे साखरेचं ‘आयसिंग’ करतात, त्याप्रमाणे तिथल्या बैठ्या घरांची बांधणी होती. ही भूमी आहे अगदी दक्षिण टोकाला असलेल्या अरबी द्वीपकल्पाची! या भूमीला लाल समुद्र आणि हिंद महासागराकडून नित्य स्नान घातलं जातं. हजारो वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर इथे उभे असलेले विटेचे बुरूज, भवताली असलेल्या पर्वतांच्या रांगा आजही तशाच आहेत, असं दिसतं. दगडी पायवाट म्हणता येतील, अशा अरुंद गल्ल्यांमध्ये धूपाचा दरवळ जाणवतो.
या देशाला म्हणतात येमेन.
या देशाविषयी जुन्या काळातील माहितीचा थोडा शोध घेतला तर समजतं की, इथल्या ज्येष्ठांनी ‘अरेबिया फेलिक्स’ म्हणजेच ‘आनंदी अरेबिया’ असं नाव या देशाला दिलं होतं.
आता येमेन म्हणजे स्वप्नांना प्रेरणा देणारं! राणी शेबा हिचं हे राज्य. राणी शेबा अतुलनीय पराक्रमी, मजबूत आणि कमालीची देखणी महिला होती. तिने सोलोमॉन राजाच्या मनात प्रेमाचा अंकुर रुजवला. तिच्या कथांचा बायबल आणि कुराण या पवित्र ग्रंथांच्या पानावर अमिट ठसा उमटला आहे.
सर्वाधिक म्हणजे शंभरहून जास्त काळ राजांनी आपली सत्ता गाजवली. यानंतर गोरा साहेब म्हणजे ब्रिटिश आले. त्यांनी दक्षिणेकडे अडेनच्या आखातामध्ये बंदर उभे केले. या दरम्यानच्या काळात उत्तरेकडे तुर्वांनी आपली दुकाने थाटली होती. एकदा का इथून इंग्रज गेले की, अतिथंड प्रदेशातील रशियनांनी इथल्या दक्षिणेकडे आपले लक्ष केंद्रित केले. घरातल्या मुलांना आवडता केक खाण्याची खूप घाई झालेली असते, तशाच लोभी मुलांप्रमाणे हावरेपणामुळे या सुंदर प्रदेशाचे दोन तुकडे केले गेले.
जुनी-जाणती मंडळी या देशाला अरेबिया फेलिक्स असं संबोधन वापरतात. इथल्या खजिन्यामुळे या देशाविषयी मत्सराची भावना जास्त व्यक्त होत गेली. परकीयांना इथल्या तेलांच्या साठ्यांनी भुलवलं. इथला मधही सोन्याइतकाच मौल्यवान आहे. इथलं संगीतही मनमोहक आहे. इथल्या कविताही तितक्याच सौम्य आणि अलवार. तर इथे मिळणारे मसालेदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ नित्य आनंद देणारे आहेत. अवघ्या जगभरातून पुरातत्वशास्त्रज्ञ इथल्या स्थापत्यकलेचा आणि विविध वास्तूंच्या अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी येतात.
वास्तविक येमेनवर हल्ले करणाऱ्यांनी इथून पलायन करूनही खूप मोठा काळ आता लोटला आहे. मात्र येमेनने गृहयुद्धाची मालिकाच अनुभवली होती. मुलांच्या इतिहासांच्या पुस्तकातील पानं चाळली तर येमेनच्या प्रश्नातील गुंतागुंत लक्षात येते. १९९० मध्ये जरी देश म्हणून एकसंध झाला असला तरी, अजूनही अनेक संघर्षाच्या ठसठसणाऱ्या जखमा इथे ठायी-ठायी दिसतात. घरातल्या एखाद्या वयोवृद्ध आजारी व्यक्तीला बरं करताना उठून उभं करण्याचा, चालवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र त्याला तोल सावरणंही अवघड जात असतं. तसंच काहीसं या देशाचंही झालं आहे. इथे तुम्हाला अनेक शाळकरी मुलं-मुली शाळेत जाण्याऐवजी रस्त्यावर भीक मागताना दिसतात.
अशा अस्वस्थ, अशांत देशात अवघ्या दहा वर्षांपूर्वी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव नुजूद!
नुजूद काही राणी नव्हती की राजकन्या! एका सामान्य घरात जन्मलेली सर्वसाधारण मुलगी. तिला आई-वडील आहेत आणि खूप सारे भाऊ-बहिणीही आहेत. तिच्या वयाच्या इतर सर्व मुलांना ज्याप्रमाणे लपाछपी खेळायला आवडतं, तसंच नुजूदलाही हा खेळ आवडतो. तिला चॉकलेट्स आवडतात. तिला चित्रांमध्ये रंग भरायला आवडतात. तिच्या मनात समुद्रातील कासवांविषयी अनेक मजेशीर कल्पना आहेत. याचं कारण म्हणजे तिने अद्याप कधी समुद्रच पाहिलेला नाही. नुजूद ज्या वेळी हसते, त्या वेळी तिच्या इटुकल्या गालावर एक छानशी खळी पडते.
फेब्रुवारी २००८ मधल्या एका थंडगार आणि उदासवाण्या सायंकाळी तिच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आता तिचा निकाह तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असलेल्या पुरुषाबरोबर केला जाणार आहे.’ हे ऐकताच नुजूदमधली अवखळता जणू अचानक गायब झाली आणि तिच्या डोळ्यात कडूझार आसवं आली. जणू अवघ्या जगाचं ओझं आपल्याच खांद्यावर कुणीतरी टाकलं आहे, असं तिला वाटायला लागलं. काही दिवसांमध्येच नुजूदचं घाईघाईने लग्न उरकण्यात आलं तेव्हा तिचं बालपण अचानक संपलं.या लहानग्या मुलीने आपल्याजवळचं असलं नसलेलं बळ एकवटलं आणि आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या अशक्यप्राय दुःखी नशिबापासून पळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नुजूदच्या पतीने तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल आणि तिच्या धाडसाने घरातून पळून जाण्याबद्दल ती अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये मांडते. स्थानिक वकिलांच्या आणि प्रेसच्या मदतीने नुजूदने तिचं स्वातंत्र्य परत मिळवलं. ज्या देशात अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्न कायदेशीर वयापेक्षा कमी वयात लावून दिलं जातं, अशा येमेनमध्ये ही एक असाधारण कामगिरी होती. नुजूदने येमेनी रितीरिवाजांना आणि तिच्या स्वतःच्या कुटुंबाला धाडसीपणे आव्हान दिल्यामुळे मध्यपूर्वेतील इतर तरुणींना त्यांच्या लग्नाला आव्हान देण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
तिची ही शोकांतिका, तिच्या विजयाची आणि धैर्याची अविस्मरणीय कहाणी आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्र – ४ भाग ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्र – ४ भाग
लेखक : श्री आनंद यादव
शिक्षण घेण्यासाठी अतोनात कष्ट,त्रास सोसून, अतिशय जिद्दीने आणि संघर्षात्मक जीवनाचा सामना करणारे सुप्रसिद्ध लेखक म्हणजे आनंद यादव.
कागलसारख्या लहान गावातील दुसऱ्याच्या शेतात मोलमजूरी करुन, राबणाऱ्या शेतकरीकुटुंबातील रत्नाप्पा जकाते आणि ताराबाईच्या पोटी सर्वात मोठा,पहिला मुलगा म्हणून जन्म घेतलेला ‘आनंद’.वडील रत्नाप्पा अतिशय रागीट स्वभावाचे तर आई ताराबाई नवऱ्याचा मार सहन करत,दरवर्षी एका अपत्याला जन्म देणारी,शेतात,घरात राबणारी अतिशय सोशिक स्वभावाची बाई,घरातील गरिबी आणि वाढत जाणारी खाणारी तोंडे या सगळ्या परिस्थितीत वयाच्या नवव्या वर्षांपासूनच आनंदला कामाला जुंपून घ्यावे लागले.शेतातील कामे,जनावरांची उसाभर, लहान भावंडांची देखभाल अशा कामात लहानगा आनंद दिवसभर कष्ट उपसीत होता,या साऱ्या कष्टातून मन रमवण्यासाठी गावात आलेल्या तंबूतील सिनेमा पहाण्याची आवड निर्माण झाली.मग यासाठी वैरण विकून,शेंगा विकून पैसे गोळा करायची सवय लागली,ही आवड इतकी वाढली कि काही वेळा तंबूत चोरुन जाऊन सिनेमा पहात असे,यातूनच पुढे शिक्षण घ्यावे असेही मनात होतेच, यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शिक्षण घेतले पाहिजे ही ठिणगी मनात फुलत होती.
गावात असणाऱ्या शाळेत जाणारी मुले पाहून मनाचा ओढा शाळेकडे जात होता.पण वडिल मुलांना शाळेत घालणाच्या विरुध्द होते,मुलगा शाळेत गेला तर शेतीची कामे कोण करणार?अशा विचीत्र परिस्थितीत सापडलेल्या आनंदने संघर्ष करुन शिक्षणाचे धडे गिरवायला सुरु केले.त्यातही अनंत अडचणी,वह्या पुस्तके घ्यायला पैसे नसणे,शाळेची फी कुठून भरायची,कामाच्या व्यापातून अभ्यासाला वेळ कसा काढायचा?वर पुन्हा शेतीची कामे रखडली तर वडिलांचा मार तर ठरलेलाच होता.शाळेतही वेळेवर फी भरली नाही तर शिक्षकांकडूनही अनेक दा मार मिळे,मुलांसमोर अपमान केला जाई,अशा आपल्याही अंगावर काटा आणणाऱ्या अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन कागलसारख्या लहान गावातून शिक्षणाच्या निमीत्ताने कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे,पंढरपूर ते अगदी युरोप पर्यंत पोहोचलेल्या अतिशय जिद्द,चिकाटी असणाऱ्या लेखकाचे हे आत्मचरित्र.
ही कहाणी इतकी विलक्षच आहे कि ती एका पुस्तकात मावलीच नाही,म्हणूनच या आत्मचरित्राचे चार खंड आहेत.त्यामध्ये झोंबी,नांगरणी,घरभिंती,आणि कांचवेल अशा चार खंडातून लेखकाचा जीवनप्रवास उलगडत जातो.शिक्षण घेताना आलेल्या अनंत अडचणी,नोकरीतील अनेक कठिण प्रसंग,लग्न,संसार,भावंडांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ,बहिणींची लग्न,आईवडिलांची पैशासाठीची मागणी,त्यांचे आजारपण, शेतातील अनेक अडचणी,कोर्टकचेरी अशा अतिशय दुर्धर प्रसंगातून जाताना लेखकाच्या वाट्याला कसोटीचे क्षण येत होते पण आपला गाव,आपले कुटूंब याबद्दलची एक अनामिक ओढ त्यांच्या मनात होती त्यामुळे ते सदैव त्यासाठी तत्पर रहायचे.
शिक्षणाची एकेक पायरी चढत डॉक्टरेट मिळवूनही ते तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले,शिक्षण घेणं किती अनिवार्य आहे हे मुलांच्या मनात ठसवत राहिले.
या सर्व शिक्षणप्रवासात त्यांना शंकर पाटील,पु.ल. देशपांडे, सुनिताताई देशपांडे,श्री.पु. भागवत,व्यंकटेश माडगूळकर अशा मान्यवर लेखकांचे सतत सहकार्य,मार्गदर्शन मिळत गेले.लेखकानी लिहीलेल्या कथा,कविता,लेख यांचे रेडिओवर सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी व्यंकटेश माडगूळकर यांच्यामुळे मिळाली,त्याकाळात रेडिओवर कार्यक्रम करणे अतिशय मानाचे समजले जाई.त्यामुळे आनंद यादव आपल्या लिखाणामुळे घराघरात पोहोचले. अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या,ललित लेखन त्यांनी केले.अनेक पुरस्काराने ते गौरविले गेले.त्यांच्या झोंबी या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा कागलच्या ग्रामपंचायतीने लेखक आणि त्यांच्या आईंचा जाहीर सत्कार घडवून आणला ही अतिशय मानाची गोष्ट ठरली.
चार भागात असलेले हे आत्मचरित्र वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाहीच तर उलट उत्कंठावर्धकच वाटते.अतिशय प्रेरणादायी असलेले हे आत्मचरित्र वाचकांनी नक्कीच वाचले पाहिजे.
परिचय : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “|| प्रत्यक्षं तत्वमसि ||” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : || प्रत्यक्षं तत्वमसि ||
लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी
प्रकाशक: हेडविग प्रकाशन
पृष्ठे: ३८४
मूल्य: ४८०₹
२०१५ मध्ये जेव्हा आय.एस.आय.एस. या अतिरेकी संघटनेने मोसूल शहरातल्या सरकारी ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक हस्तलिखितांचा लिलाव केला. तेव्हा जगभरातील सरकारी संस्था, गुप्तचर संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहक रोमांचित झाले.
लिलाव झालेल्या हस्तलिखितांमध्ये १८व्या शतकातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नोंदी होत्या. त्यात अब्जावधी डॉलर्स किमतीच्या ऐतिहासिक कलाकृतीचे आणि युद्धाची निर्णायक स्थिती बदलू शकणाऱ्या घातक शस्त्राचे वर्णन होते.
तसेच जनुकीय अभियांत्रिकीच्या सूत्रांचे वर्णन करणारे सुद्धा एक हस्तलिखित होते. जगातील अनेक संस्थांना माहीत होते की ह्या हस्तलिखितातली कलाकृती अस्तित्वात आहे.
त्या सर्व संस्थांना वेगवेगळ्या वेळी ‘इम्रीस ओल्डमन’ नावाच्या एका व्यक्तीने मदत केलेली असते. आणि तिथून सुरू होतो इम्रीस ओल्डमन या व्यक्तीचा शोध. हा इम्रीस ओल्डमन नक्की कोण?
पृथ्वीराज चौहान, समुद्रगुप्त, महाराजा रणजित सिंग यांच्यासारख्या महान राजांनी आणि बाबर, औरंगजेब, नादीर शाह, अहमद शाह अब्दाली यांच्यासारख्या आक्रमणकर्त्यांनी आणि अगदी ब्रिटिशांनीही पाठलाग केलेली ती ऐतिहासिक वस्तू कोणती?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही कथा म्हणजे ‘प्रत्यक्षं तत्त्वमसि’.. सर्वांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
म्हातारपण आयुष्याच्या दरवाज्याला धडका देऊ लागलं. तोच वाचस्पती डॉक्टर वनिता पटवर्धन, ज्ञानप्रबोधिनी मानसशास्त्र विभाग, यांचे ‘कृतार्थ वार्धक्य’ हे पुस्तक वाचनात आले.
अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान तर्फे ‘ रंग समुपदेशनाचे ‘ व ‘ तारुण्यातून प्रौढत्वाकडे: आव्हाने समस्या आणि समुपदेशन ‘ या दोन्ही पुस्तकांच्या यशस्वी संपादनानंतर प्रतिष्ठानाने पुण्याच्या प्रज्ञा मानस संशोधिका, ज्ञानप्रबोधिनी येथे कार्यरत असलेल्या वाचस्पती डॉक्टर वनिता पटवर्धन यांच्यावरच वृद्धांच्या समुपदेशनासाठी काढण्यात येणाऱ्या पुस्तकाची ही जबाबदारी सोपविली. त्यातूनच या अभ्यासपूर्ण पुस्तकाची निर्मिती झाली.
कृतार्थ वार्धक्य या नावातच लेखिकेला काय सांगायचंय हे दडलं आहे. पुस्तक हातात घेतल्याबरोबर आपल्याला दिसतं ते मुखपृष्ठ! त्यातूनच लेखिकेला काय सांगायचं आहे ते सुंदर रीतीने व्यक्त होतं. अनेक पावसाळे काढल्यानंतर उमटणारे इंद्रधनुष्याचे रंग खूप खुलणारे नाहीत. जून झालेले आहेत. तसेच ते दिसतात देखील आहेतच. त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या रेषा व डोळ्यातील निष्पर्ण झाडातील साम्य दाखवतानाच त्याच्यामधून निघणारा स्वच्छ सूर्यप्रकाश पुस्तकाद्वारे काय सूचित करायचं आहे हे स्पष्टपणे सांगून जातो.
वृद्धत्वाची कृतार्थ वाटचाल करताना येणाऱ्या सर्व अंगांचा विचार यात मांडलेला आहे. वृद्ध कोण हे ठरवताना जे कार्य मग्न असतात त्यांच्या वयावरून वृद्धत्व ठरवायचे का?तसेच जे तरुण वयातच उदास जगतात ते अकाली जून झालेली पाने नव्हेत का? असा प्रश्न उपस्थित करून लिखाणाला दिशा दिली आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम वृद्धांनाही लागू होतो.
निसर्ग नियमाप्रमाणे वृद्धत्व येणारच हे प्रत्येकाने गृहीत धरावेच लागेल. व वृद्धत्वातही ‘इकेगाई’ म्हणजे राहिलेल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवून मार्गक्रमण सुरू ठेवल्यास वृद्धत्वाला संध्या प्रकाश असे आपण म्हणू शकू ही एक छान आशादायी गोष्ट मांडली आहे.
वृद्धांची मनोधारणा कशी असते हे सांगणारं ही स्वतंत्र प्रकरण घेतलं आहे. कुणाला पूर्वीप्रमाणे आपण नाही म्हणून आयुष्य रटाळ वाटते. तर कोणी थकलो आहेत हे मान्य करायलाच तयार नसते. वृद्धांची बौद्धिक स्थिती, स्मृती- विस्मृती याबद्दलही आढावा घेऊन कार्यक्षमतेची उपयोगिता मांडली आहे. वृद्धांच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेताना तरुण व वृद्ध यांची बाजू मांडताना न्यायबुद्धीने निरीक्षण मांडून दोन्ही पिढ्यांची बाजू व्यवस्थित मांडली आहे. कृतार्थ वार्धक्य जगण्यासाठी समुपदेशनाचे महत्त्व देखील त्यांनी मांडले आहे. तसेच सूर्यास्ताची चाहूल लागल्यानंतर पुढील सर्व गोष्टींचे नियोजन कसे करावे याचा उपयुक्त सल्ला आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर मिळतो.
शेवटी पु.लं.चे पिकत जाणाऱ्या वार्धक्याबद्दलचे विचार शेवटच्या चौकटीत मांडून भूतकाळातली पुंजी घेऊन वर्तमान काळात उत्साहाने जगणे हीच वार्धक्याची कृतार्थता आहे हे सांगितले आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात निरनिराळ्या तज्ञांनी समुपदेशनाचे महत्त्व सोदाहरण पटवून सांगितले आहे. डॉक्टर मानसी देशमुख यांनी दोन केसेस मांडल्यात. एका केस मध्ये काका व काकूंच्या विरुद्ध स्वभावामुळे उत्पन्न झालेली समस्या दोघांनीही समुपदेशनाला सहकार्य केल्याने व्यवस्थित सोडवल्या गेल्याचे सांगितलंय तर दुसऱ्या अलझायमरच्या केस मध्ये समुपदेशनाला सहकार्य नाकारल्याने वेळ लागतोय हे मांडले आहे.
नंतर श्री. कालिदास पाटील यांनी नाकापुढे बघून संसार केलेल्या पण नंतरच्या पिढीने मी म्हणेल तसेच वागले पाहिजे अशा हट्टग्रही आजोबांची समस्या मांडून समसमूपदेशनाने कशी सोडविली ते सांगितले आहे.
डॉक्टर मृदुला आपटे यांनी अशाच प्रत्येक कामात परफेक्शन हवे असणाऱ्या व इतरांकडूनही, त्यांना त्रास होत असला तरी तशीच अपेक्षा ठेवणाऱ्या सुमतीमुळे कुटुंबात उत्पन्न होणारी समस्या समुपदेशनाने हळूहळू दूर होते हे दाखवून दिले व दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी अती जेष्ठ पालकांना सांभाळताना येणाऱ्या समस्येवरही तोडगा काढता येतो हे दाखवून दिले.
अशा दोन भागात हे पुस्तक आहे.लेखिकेने आपल्या मनोगतात,वाचकांचा कुठे कुठे रस भंग होऊ शकतो असे म्हटले आहे. पण मला तरी एक क्लिष्ट विषय वाचनीय स्वरूपात मांडलेला वाटला. वृद्धपकाळातील तीन टप्पे म्हणजे जणू शरदातील चांदणे, हेमंतातील पानगळती आणि शिशिरातील गूढ शांतता! ” वृद्धांना पुढे येणाऱ्या वसंतातील मोहर आणि कोवळी पालवी यांची चाहूल असेल तर वार्धक्य हे परिपक्व असेल” अशी अलंकारिक भाषा पुस्तकाचे सौंदर्य निश्चितच वाढवते तसेच अधून मधून वापरलेल्या चौकटी विचार मांडणीतली सुसंगताच दाखवतात.
एकंदरीत पुस्तक खूपच छान झाले आहे. एकदा तरी वाचावेच असे आहे. त्यातून तरुण व वृद्धत्वाकडे जाणारे या सर्वांनाच मार्गदर्शन मिळते. डॉक्टर वनिता यांनी वृद्धत्वाला कृतार्थ समृद्ध करण्यासाठी जुन्या वस्तूंचे नियोजन, तसेच पूजा करण्याने शांतता मिळवून घेता येते, या व अशा अनेक बारीक सारीक गोष्टींचे तपशील मांडले आहेत.
थोडक्यात त्यांनी रेखीव पाऊलवाट आखून दिली आहे. त्यावरून डोळसपणे चालल्यास सगळ्यांचेच वार्धक्य कृतार्थ होईल यात शंका नाही.
परिचय: सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गोष्ट रिझर्व बँकेची” – लेखक : श्री विद्याधर अनासकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : गोष्ट रिझर्व बँकेची
लेखक: विद्याधर अनास्कर
पुस्तकाची पाने: २७६
मूल्य: ५५०₹
शेतकर्यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास?
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार्या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक.
भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार्या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर…गोष्ट रिझर्व्ह बँकेची.
पुस्तकातील काही अंश…
पाकिस्तानला दिलेले ‘ते’ पंचावन्न कोटी
पाकिस्तान सरकारने रिझर्व्ह बँकेस पत्र लिहून उर्वरित पंचावत्र कोटी रुपयांची मागणी केली. गव्हर्नर श्री. सी. डी. देशमुख आणि भारत सरकार यांच्यामध्ये पाकिस्तानच्या मागणीवर चर्चा झाली. विभागणी करारानुसार रिझर्व्ह बँकेने पाकिस्तान सरकारला रुपये पंचावन्न कोटी देणे आवश्यक होते, तरी या रकमेचा उपयोग पाकिस्तान भारताविरुद्धच्या युद्धांमध्ये शस्त्र खरेदीसाठीच करेल, याचा ठाम विश्वास असल्याने गृहमंत्री श्री. वल्लभभाई पटेल यांनी सदर रक्कम देण्यास नापसंती दर्शविली.
रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था असल्याने भारत सरकारच्या दबावाखाली पाकिस्तानची मागणी नाकारली असे दिसू नये, म्हणून २४ डिसेंबर १९४७ रोजी श्री. सी. डी. देशमुख यांनी भारत सरकारला पत्राद्वारे कळविले की, अजूनही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर भारतीय नोटा असल्याने, त्याचा हिशेब पूर्ण होईपर्यंत पाकिस्तान ला 55 कोटी न देता दर आठवड्याला तीन तीन कोटी देण्यात येतील..
लॉर्ड माऊंट बॅटन यांनी महात्मा गांधीच्या कानांवर रुपये पंचावन्न कोटींची बाब घातली. महात्मा गांधींनी नैतिकतेच्या मुद्यांवर लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या म्हणण्याला पुष्टी देत जातीय सलोख्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये, रुपये पंचावन्न कोटी पाकिस्तानला देण्याचीही अट घातली. वास्तविक या मुद्यावर इतिहासात दोन प्रवाह आहेत.
महात्मा गांधीजींच्या उपोषणामुळे हतबल झालेल्या भारत सरकारने १५ जानेवारी १९४८ रोजी आपल्या निर्णयावर फेरविचार करीत पाकिस्तानला रुपये पंचावन्न कोटी न देण्याचा निर्णय बदलला व ‘ती ‘ रक्कम देण्याचे मान्य केले. १८ जानेवारी रोजी गांधीजींनी आपले उपोषण मागे घेतले.
३० जानेवारी १९४८ रोजी ७८ वर्षीय गांधीजींची गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येमागे असलेल्या अनेक कारणांपैकी आपल्या आमरण उपोषणाने भारत सरकारला रुपये पंचावन्न कोटींची रक्कम पाकिस्तानला देण्यास भाग पाडल्याचे प्रमुख कारण होते.
या लेखामध्ये १९४६ मध्ये भारतात आलेल्या ब्रिटिश शिष्टमंडळातील लॉर्ड लॉरेन्स पेथीक यांच्याबरोबर असलेल्या महात्मा गांधीच्या फोटोतील चेहरा भारतीय नोटेवर वापरण्यात आला आहे. आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या व भारतीय नोटेवर छायाचित्र असलेल्या गांधींच्या हत्येमागील अनेक कारणांपैकी एक कारण पैशाचे होते, हा देखील विचित्र योगायोग ठरावा.
आपल्या देशाच्या या मध्यवर्ती बँकेबद्दलची महत्वपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच….
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समग्र जिम कार्बेट” – लेखक : जिम कार्बेट – मराठी अनुवाद : सुश्री वैशाली चिटणीस ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : “ समग्र जिम कॉर्बेट “.
लेखक : जिम कॉर्बेट
अनुवाद : वैशाली चिटणीस
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन
पृष्ठे: ८९०₹
मूल्य: ९९९₹
एडवर्ड जेम्स कॉर्बेट ऊर्फ जिम कॉर्बेट (इ. स. २५ जुलै १८७५ ते १९ एप्रिल १९५५) हे एक निसर्गअभ्यासक व निष्णात शिकारी म्हणून विश्वविख्यात आहेत.
जिम कॉर्बेट यांनी जंगली प्राण्यांच्या जीवनक्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच, पण असंख्य फोटोग्राफ्स, अनेक पुस्तके या द्वारा शहरी माणसाला वन्य जीवनाबद्दल -निसर्गाबद्दल सज्ञान केलं. एकूणच, जिमने निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली. इतकेच नव्हे तर, माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेलं!
ब्रिटीश राजवाटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या रूढ पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आव्हान दिलं! त्याहीपुढे जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत, यासाठी त्यांनी भारतात जे काही प्रयत्न केले, त्याला तोड नाही. त्याची दखल अवघ्या जगाला घ्यावीच लागली.
मूळचे शिकारी असलेल्या द्रष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवले की, जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १, ५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले.
नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या. एकूण १९ नरभक्षक वाघ आणि १४ नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.
चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
कॉर्बेट यांचा जंगली जनावरांबाबतचा अभ्यास व अंदाज दांडगा होता. हे लक्षात घेऊन १९२५ मध्ये नरभक्षक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीश शासनाने त्यांना खास बोलावून घेतलं. त्यावेळी गढवाल-रुद्रप्रयाग परिसरात नरभक्षक वाघ व बिबळ्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. तीनशेच्या वर नरबळी घेऊन देखील या प्राण्यांचा बंदोबस्त होत नव्हता! या पार्श्वभूमीवर कार्बेट यांनी सरकारने देऊ केलेल्या सुविधा व स्थानिक लोकांच्या सहाय्याने गढवाल-रुद्रप्रयागच्या विस्तीर्ण क्षेत्राची नाकेबंदी केली आणि तिथल्या नरभक्षक प्राण्यांना ठार मारण्यात यश मिळवलं!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील युद्धसराव करणाऱ्या जवानांना तिथल्या निसर्ग निरीक्षणाचे धडे देऊन कॉर्बेट यांनी प्रशिक्षित केलं! यासाठी कैसर-इ-हिंद आणि स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर या पदव्या देऊन ब्रिटीश सरकारने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला.
खिळवून ठेवणारं लेखन करणारा साहित्यिक आणि निष्णात शिकारी म्हणून कॉर्बेट प्रसिद्ध आहेतच, पण त्याशिवाय त्यांच खरं योगदान हे आहे की, त्यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणाखातर केलेल्या प्रयत्नांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे वनस्पती व कित्येक प्राण्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या संरक्षणार्थ सरकारने खास कायदे केले पाहिजेत, अशी मागणी करुन कॉर्बेट यांनी त्यासाठी स्वतः प्रयत्न केले. कुमाऊं क्षेत्राचं अभयराण्य व्हावं, अशी जिम यांची मोठ्या प्रमाणावर इच्छा होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं! १९३६ मध्ये रामगंगा खोऱ्याचा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैनीताल परिसरातील स्वतःची सर्व मालमत्ता जन्माने आयरिश असलेल्या जिम कॉर्बेट यांनी भारतालाच अर्पण केली आणि आपल्या कर्मभूमीतच कमाऊं जनतेच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अखेरपर्यंत मदत करीत राहिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने १९५७ मध्ये कुमाऊं परिसरातल्या राष्ट्रीय उद्यानाला जिम कॉर्बेट यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत.
या पुस्तकामधल्या बहुतेक गोष्टी नरभक्षक वाघांसंदर्भातल्या आहेत. त्यामुळे वाघ नरभक्षक का होतात, हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं.
परिस्थिती वाघाच्या नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा कोणताही वाघ परिस्थिती अनुरूप आहार स्वीकारतो. थोडक्यात सांगायचं, तर तो स्वतःहून नरभक्षक झालेला नसतो, तर तसं होणं त्याच्यावर लादलं गेलेलं असतं. परिस्थितीमुळे वाघ नरभक्षक होतात, हे अधिक स्पष्ट करून सांगायचं, तर दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये वाघ जखमांमुळे, तर एका प्रकरणामध्ये वृद्धापकाळामुळे नरभक्षक झाल्याचं आढळलं आहे. शिकारीदरम्यान शिकाऱ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या गोळीबारामुळे वाघाला जखमा झाल्याचं दिसून आलं आहे. अशा वेळी संबंधित शिकाऱ्याने माग काढत जाऊन त्या जखमी वाघाला कायमचं वेदनामुक्त करणं गरजेचं असतं, पण शिकाऱ्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याचं नरभक्षक वाघाशी संबंधित एका प्रकरणामध्ये निदर्शनास आलं. त्याचबरोबर साळिंदराची शिकार करताना वाघाला झालेल्या जखमांमुळे तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नसल्याने नरभक्षक झाल्याचंही आढळून आलं आहे. ‘माणूस’ हे काही वाघाचं नैसर्गिक अन्न नाही, पण वृद्धत्वामुळे किंवा जखमांमुळे वाघ जेव्हा शिकार करू शकत नाही, तेव्हा तो जगण्यासाठी नाइलाजाने माणसाची शिकार करून त्यावर गुजराण करायला सुरुवात करतो.
या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत… स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लोक आणि लौकिक’ – श्री जयवंत दळवी ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
पुस्तक : लोक आणि लौकिक
— — अमेरिकन जीवनावरील खुसखुशीत लेखसंग्रह
लेखक : जयवंत दळवी
प्रकाशन – मॅजेस्टिक प्रकाशन
चौथी आवृत्ती २०१६
किंमत १०० रुपये
……..
अमेरिकी माहिती खात्याच्या कामानिमित्त अमेरिकेत तीन-चार महिने फिरण्याच्या योगामुळे आलेले अनुभव, तेथील भेटलेली माणसे, त्यांचे स्वभाव अत्यंत खूमासदार पद्धतीने लेखक जयवंत दळवी यांनी ज्या लेखसंग्रहात केले आहे, ते पुस्तक म्हणजेच ‘लोक आणि लौकिक’.
अमेरिका हे प्रगत राष्ट्र आजही सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय. तेथील आधुनिक प्रगतीचा जनजीवनावर कसा प्रभाव पडला असेल, त्याविषयी प्रत्येकाच्या मनात औत्सुक्य असणारच. या पुस्तकात सामान्य अमेरिकन माणसांचे स्वभाव, त्यांची दैनंदिनी, नाविन्याची आस याविषयी सुंदर रेखाटन लेखकाने केले आहे. एकूण १३ लेखांमधून अगदी विमान प्रवासापासून ते अमेरिकन पाहुणचारासह सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राविषयी खुमासदार लेखन केले आहे.
प्रथमच विमान प्रवास करताना आलेले अनुभव मांडताना त्यांची विनोदी शैली वाचकाला हसविते. विमान प्रवास म्हणजे सामान्य माणसासाठी एक उत्सुकता, तेवढीच जीवाची भिती आणि असे असूनही प्रवासातील सर्व अनुभवांचा आस्वाद घेण्याची इच्छा याचे सुंदर वर्णन केले आहे. वॉशिंग्टनमध्ये फिरताना लेखकाला पदोपदी मुंबईतील जनजीवन आठवते. अमेरिकेतील प्रत्येक घरातील कुणी ना कुणी दुस-या महायुद्धाचा अनुभव घेतल्यामुळे सहानुभुतीचे लोण घरी आणले आहे. त्यामुळे प्रत्येक अमेरिकन इतरांना मदत करायला सदा तत्पर असतो.
कोणतंही काम सुरू करण्याआधीच ते संपेल कसं? याचा विचार अमेरिकन करतात. येथे प्रत्येकाच्या पायाला भिंगरीची गती आहे. शेती, कारखाने, वाहतूक, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्राचा लेखकाने उल्लेख केला आहे.
जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र असूनही अमेरिकन साधेपणाची लेखकाने पदोपदी अनुभूती घेतली. अगदी अमेरिकेचे व्हाईट हाऊसही याला अपवाद नाही. येथील सामान्य अमेरिकन म्हणतो, “एकूण हवी ती व्यवस्था व सोय होत आहे ना! मग रुबाब आणि थाटमाट हवा कशाला? ” प्रतिष्ठेची बेगड ते कधीच लावून घेत नाहीत. तेवढीच अमेरिकन लोकांना नाविन्याची आवडही आहे. लेखकाने अमेरिकन व्यक्तीचित्रणे आपल्या शैलीत हुबेहूब साकारली आहेत. अमेरिकन कुटुंबाच्या पाहुणचाराचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.
अमेरिकन शेती व तेथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन या वर्णनातून तेथील शेती व पशुपालन व्यवसायाच्या प्रगतीचे दर्शन होते. ‘अमेरिकन न्हावी’ व ‘अमेरिकन म्हाता-या’ हे व्यक्तिचित्रणात्मक लेख वाचताना लेखकाची विनोद बुद्धी अधिकच नजरेत भरते.
अमेरिकन रंगभूमीचाही आस्वाद लेखकाने घेतला. ब्रॉडवे या अमेरिकन नाट्यसृष्टीच्या माहेरघराचे वर्णन आपल्या लेखात त्यांनी केले आहे. तेथील लोकशाहीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
निरनिराळ्या देशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांनी आपली संस्कृती अमेरिकेत रुजवली. त्यामुळेच अनेक संस्कृतींचा संगम येथे पाहायला मिळतो. या संस्कृतीचा लेखकांना आलेला अनुभव आपल्याला वाचायला मिळतो. असे हे अमेरिकन प्रवास वर्णन म्हणजे विनोदाची फोडणी असून आपणही ते नक्की वाचा.