मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’  लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’  लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर 

” अवघा रंग एक झाला…! “

बाहेर माध्यान्हीचं रखरखीत ऊन… घरात प्रवेश केल्यावर मात्र शीतल चंद्रकिरणांचा शिडकावाच झाला जणू… ‘गानतपस्विनी’ मोगूबाईंच्या दर्शनानं!

… एक ‘सौम्य’ तरीही तितकंच करारी व्यक्तिमत्त्व! शुभ्र फुलांची ज्वाळाच जणू काही! त्यांना प्रणाम करून मी समोरच्या भिंतीवरचं त्यांचं तैलचित्र न्याहाळू लागले. तेवढ्यात, मागून किशोरीताई आल्या.

“ही माई! ” तैलचित्राकडे निर्देश करत त्या म्हणाल्या. मी मानेनेच होकार देत ताईंना अभिवादन केलं. “तू खूप चांगलं पोर्ट्रेट करतेस असं ऐकलंय”… ताईंच्या चेहर्‍यावर कौतुक होतं.

मग मिष्किलपणे हसत त्या म्हणाल्या, “तुला एक सांगू?  मला वाटतं, मला चित्रात पकडणं मात्र तितकंसं सोपं नाही हं! आणि म्हटलं तर कठीणही नसावं कदाचित! कारण माझं पोर्ट्रेट करायचं, म्हणजे माझ्या आत जगणाऱ्या गाण्याला, त्यातल्या सुरांना चित्रात बंदिस्त करायला हवं! बाकी… नाकाच्या बाबतीत म्हणशील तर, आम्ही अगदी शिवाजी महाराजांच्या वंशातले बरं का…! ” असं म्हणत किशोरीताई खळखळून हसल्या.

… ‘पोर्ट्रेट’ रंगवायचं तर केवळ बाह्यरूपच नव्हे तर ‘अंतरंग’ चितारायला हवं, हे ताईंनी किती अचूक हेरलं होतं!

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये होणार्‍या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी मुलाखतीसाठी आले होते. गप्पांच्या ओघात या विदुषीच्या प्रज्ञा कोषातली एक एक पाकळी हलकेच उमलत गेली, मला विस्मयचकित करीत! कृष्णमय मीरेविषयी बोलताना अचानक ताईंची स्वरसमाधी लागली. काय अलौकिक सूर तो! त्या दैवी सुरांचं सामर्थ्य, माझ्या समक्ष, आत्मा आणि देहाचं अद्वैत साधून एक तेजोशलाका उजळवून गेलं!

माझ्या अंतरंगाच्या तारा हळूवार छेडीत मग ताईंच्या सहवासात, पुढल्या तीन चार तास चाललेल्या सूर-संवादांच्या बंदिशरुपी मैफिलीत माझे किशोरीताईंशी जे सूर जुळले ते कायमचेच!

मुलाखत संपल्यावर मी घरी निघतेवेळी त्यांनी मला अगदी हक्काने बजावलं… “हे बघ, कार्यक्रमाच्या ठिकाणी तू मला तुझ्या गाडीतून घेऊन जायचंस आणि परत आणायचंस. तू माझ्यासोबत असायला हवीस. ” माझ्यासाठी खरंतर हा एक अतुल्य आनंदाचा योग होता. पण… विधिलिखित वेगळंच होतं.

कार्यक्रमाच्या केवळ काही दिवस आधी मला Renal colic चा जबरदस्त अटॅक आला. तीव्र वेदनेनं मी हैराण झाले. ताईंना तसं कळवलं. तशा त्या खूप अस्वस्थ झाल्या. हे समजताच मला राहवेना आणि माझ्या त्याही अवस्थेत मी ताईंना माझ्याबरोबर घेऊन जायचा निर्णय घेतला. सोबत ताई, त्यांचे तानपुरे आणि दोन शिष्य यांना दाटीवाटीने माझ्या गाडीत घेऊन मी कॉलेजच्या प्रांगणात पोहोचले.

ताई खूप खुशीत होत्या. त्यांनी मला आज्ञा केली… “माझ्या समोर बैस! ” 

मैफिल ऐन रंगात आली होती… आणि अचानक मला पुन्हा वेदना जाणवू लागल्या. मैफिलीची सांगता होईस्तोवर तिथं थांबणं शक्य होईल, असं मला वाटेना. पुन्हा ताईंना सोबत घेऊन जायचीही जबाबदारी होती. ताईंचा हिरमोड होईल ही चिंता ग्रासून राहिली. मन दृढ करूनही माझा धीर खचत चालला.

अखेर डोळे मिटून ताई ध्यानमग्न गाताहेत, ही संधी साधून मी एकटीच कशीबशी घरी परतले. माझं मन खूप अपराधी झालं!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळानंतर, ताईंचा घरी फोन आला काळजीपोटी. त्यांच्या चाणाक्ष नजरेला मी समोर नसल्याचं लक्षात आलं होतं.

 ”तू आता ठीक आहेस ऐकून बरं वाटलं. का कुणास ठाऊक, पण मध्यंतरानंतर आज मैफिल काही मनासारखी जमली नाही, रंगली नाही. “.. ताईंचा सूर नाराजीचा होता.

मला गलबलून आलं.

माझी अपराधीपणाची भावना लक्षात येताच मला समजावत त्या म्हणाल्या,

“तू का उदास होतेस?  यात तुझा काही दोष नाही! मला आत्मिक समाधान मिळालं नाही म्हणून, मीच मग आयोजकांना पुन्हा कार्यक्रम करीन, म्हणून आश्वासन दिलंय. तू का काळजी करतेस? आता लवकर बरी हो. ” 

त्यांच्या स्वरात, प्रेम, जिव्हाळा होता. आईचं ममत्त्व होतं.

आता मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या.

‘का बरं एवढा जीव लावावा या असामान्य, अलौकिक कर्तृत्त्वाच्या कलावंताने, माझ्यासारख्या वयाने, मानाने छोट्या कलाकारावर? ‘ ही ऋणानुबंधाची किमया म्हणावी काय?  

ताईंनी आयोजकांना दिलेला शब्द पाळला आणि काही दिवसातच एक अभूतपूर्व मैफिल रसिकांना अनुभवता आली. सर जे. जे. च्या वास्तूतलीही ती एक चिरस्मरणीय मैफिल ठरली!

याच दरम्यान चित्र प्रदर्शनासाठी मी लंडनला प्रयाण केलं. दोन वर्षांनी मुंबईत परतल्यावर ताईंना वचन दिल्याप्रमाणे, त्यांच्या आवडीचं अत्तर घेऊन मी त्यांच्या भेटीला गेले. ताई खूप आनंदल्या. माझ्या लंडन वास्तव्याचा वृत्तांत आणि सांगितिक, अशा खूप गप्पा रंगल्या आमच्या. ताई मला खूप excited वाटल्या. काही दिवसांनी मला अचानक त्यांचा फोन आला. म्हणाल्या, “भेटायला ये, आणि हो, पद्मजाला माझ्याकडे गाणं शिकायला पाठव. ” मी चमकलेच!

संगीत क्षेत्रातले दोन महान शिरोमणी! एकीकडे गानसरस्वती किशोरीताई तर दुसरीकडे संगीत मार्तंड (तेजोनिधी संगीतसूर्य) पंडित जसराजजी… दोघांनीही आपणहून पद्मजाला स्वतःच्या शिष्येचा मान द्यावा हे पद्मजाचं परमभाग्यच!

संगीतातल्या या दोन्ही अद्भुत किमयागारांच्या सुरमयी सहवासात संमोहित झालेले कितीतरी तृप्त क्षण माझ्या परदेशातल्या वास्तव्यात मला सदैव साथ करत राहिले.

कित्येकदा एखादी बंदिश ऐकताना किशोरीताईंच्या स्वरमंदिरातल्या मंजुळ घंटेच्या आवर्तनांचा नाद, मनाच्या गाभाऱ्यात हळूवार आंदोलत राही अन् त्याच्या घुमार्‍यातून त्यांचं एक वलयांकित सतेज रूप मन उजळवून जाई.

तसं पाहिलं तर किशोरीताईंच्या सहवासाचा योग हा केवळ काही काळापुरताच, पण आमच्यातल्या स्नेहबंधाला जणू ‘अवघा रंग एक झाला! ‘… हेच रूप आलं.

मध्यंतरी बराच काळ मी परदेशात असल्याने ताईंशी माझा संपर्क तुटला. मी पुन्हा भारतात आल्यावेळी त्यांना फोन केला. वाटलं, ताईंना जगभरात माझ्यासारखे त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो भक्त, चाहते, स्नेही असणार. मला कदाचित त्या आत्तापर्यंत विसरल्याही असतील! मी तसं त्याना विचारलंही!

तशा त्या हसत हसत म्हणाल्या, “विसरेन बरी मी तुला! तू प्रेमानं भेट दिलेलं अत्तर देतंय ना मला तुझी आठवण करून नेहमी! ” 

मला ठाऊक होतं, अत्तर हे केवळ ‘निमित्त! ‘

किशोरीताई जेंव्हा एखाद्याला आपलं म्हणतात, तेव्हां त्या त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. मी खरंच त्या भाग्यवंतांपैकीच एक!

‘त्या’ अत्तराच्या कुपीतलं अत्तर उडून भलेही ती कुपी कधीचीच रिती झाली असेल… पण किशोरीताईंसोबतचं माझं ‘सखीपण’ प्रेमभरे मिरवताना, आजही त्या आठवणींचा मदमत्त गंध, माझं चित्त ‘हर्षधुंद’ करत राहतो!

लेखिका : उषा फेणाणी पाठक 

प्रस्तुती : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू.

(भारतीय सैन्याच्या The Army Medical Corpsचा स्थापना दिन ३ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला! त्यानिमित्ताने विशेष लेख)

जेंव्हा दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकतात… तेंव्हा केवळ दोन सैन्यदलं लढत नाहीत… तर दोन व्यवस्था, दोन मनोवृत्ती युद्धभूमीत दोन हात करीत असतात… आणि जिंकते तेच सैन्य ज्याच्यातील प्रत्येक घटक देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेलेला असतो… आणि हिंदुस्तान असाच एक देश आहे!

आपल्यासाठी तळहातांवर प्राण घेऊन लढणा-या सैनिकांच्या पाठीशी अनेक यंत्रणा कार्यरत असतात… त्यात अगदी रणभूमीवर स्वत:चे प्राण संकटात टाकून उभे असतात ते डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंटस… हे जणू स्टेथोस्कोपधारी सैनिकच!

वर्ष १९९९. १९८९ मध्ये पुण्याच्या The Armed Forces Medical College मधून एम. बी. बी. एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशाच्या विविध सीमांवर intern म्हणून अनुभव घेतल्या नंतर लखनौ येथील Officers’ Training College मध्ये the Medical Officers’ Basic Course हा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधीत लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. या प्रशिक्षणात पी. टी. , संचलन, लष्करी कायदे, लष्करी जीवनपद्धती, शस्त्र चालवणे इत्यादी सर्व शिकावे लागते… एखाद्या सैनिकासारखे. कारण सेनेत फिल्ड हॉस्पिटल्स अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर तात्पुरत्या उभारल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये तैनात डॉक्टर्स सैनिकांच्या सदैव जवळपास असतात… हे परिपूर्ण सैनिकी डॉक्टर्स असतात!

१९९९ वर्ष सुरु होते. लेफ्टनंट डॉक्टर अरूप यांना काश्मिरात कारगिल भागातल्या एका छोट्या गावात स्थित असलेल्या एका सैनिकी फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला होता. इथले सर्जन काही महिन्यांच्या रजेवर जात होते, त्यांच्या जागी अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. डॉक्टरसाहेब सर्जरीमध्ये तज्ज्ञ होते… या छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्तृत्वाला कितीसा वाव मिळेल?  अशी त्यांना शंका होती. ते रुजू झाले मात्र कंटाळून गेले. तिथे अन्य काही डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंस होतेच, पण सर्जन असे ते एकमेवच होते. शिवाय इथं आधुनिक असं फारसं काही नव्हतं. आपले इतर सहाध्यायी शहरांमध्ये, अत्याधुनिक रुग्णालयांच्या सुसज्ज शस्त्रक्रियागृहांत सर्जरी करीत असतील आणि इथं आपण या दुर्गम भागात आपले सर्जरीमधले कौशल्य सराव नसल्याने गमावून बसू की काय असं डॉक्टर बसू यांना वाटणं स्वाभाविकच होतं! शिवाय काश्मीर पुस्तकातील वर्णनात अगदी सुंदर, छान, आल्हाददायक असले तरी सीमेवर प्रचंड थंडी असते, रस्ते धोकादायक आणि वातावरण तसे नीरस… शिवाय अतिरेक्यांचा धोका तर चोवीस तास!

काहीही कितीही कारणे सांगितली तरी भारताच्या डोळ्यांत माती उधळीत पाकिस्तान भारताच्या सीमेत अगदी खोलवर घुसून बसला आहे, हे संरक्षण यंत्रणेच्या लवकर लक्षात आलं नाही! आणि याची किंमत जीवाच्या आकडेवारीच्या संख्येत सांगायची झाल्यास ५२७ मृत आणि १३६३ जायबंदी एवढी प्रचंड आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान मोठे असणार यात शंका नाही!

पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सैन्यठिकाणे, सैन्यचौक्या परत मिळवायला सैनिकांना उंच पर्वत चढत जायला लागले… आणि पाकिस्तानी सैन्य नेम धरून गोळीबार करायला मोकळे होते… मोक्याच्या जागी सज्ज होते!

लेफ्ट. डॉक्टर बसूंच्या रुग्णालयात आता थंडी-तापाचे रुग्ण येत नव्हते… तर शरीरात गोळ्या घुसलेले, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या मुखात जाण्याच्या बेतात असलेले रुग्ण येऊ लागले! सुरुवातीला रोज रात्री दोन, चार नंतर नंतर तीस-चाळीस. पंधरा-वीस खाटांचे ते रुग्णालय. गोळीच्या जखमा म्हणजे शस्त्रक्रिया अत्यावश्यक. उपलब्ध यंत्रसामग्री आवश्यकतेच्या मानाने तोकडी!

सैनिक दिवसा उजेडी पहाड चढत होते, लढत होते… जखमी होत होते! त्यांना दिवसाउजेडी खाली आणणे म्हणजे खाली आणणा-या लोकांच्या जीवाला मोठा धोका. कारण पाकिस्तानी गोळीबार दिवसा तर अगदीच अचूक होणार! मग आपल्या सैन्याच्या बहुतांश मोहिमा रात्रीच्या अंधाराचा आडोसा घेत सुरु झाल्या. आता जखमी सैनिक रात्रीच्या वेळीच रुग्णालयात आणले जाऊ लागले. सैनिक रात्री जखमी झाला, आणि त्याला खाली रुग्णालयात हलवताना दिवस उजाडला की रात्रीचा अंधार पडेपर्यंत काहीही हालचाल करता येणे शक्य नसे… कारण तेच… पाकिस्तानी गोळीबार!

डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण रात्र या जखमी सैनिकांवर उपचार करण्यात घालवीत… संख्या वाढत चालली होती म्हणजे… युद्धात आपली अजून सरशी होत नव्हती! प्रत्यक्ष समोरासमोर लढण्यापूर्वीच आपले सैनिक शत्रूने लपून केलेल्या हल्ल्यात जायबंदी होऊन खाली परतत होते… सैनिक मनातून हताश होते आरंभी! भारतीय वायुसेना युद्धात उतरली आणि भारतीय सैनिक वेगाने पुढे जाऊ लागले… पण युद्धभूमी अजूनही शत्रूवरच मेहरबान होती!

२९ मे, १९९९. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा साहेबांचा देह अशाच एका रात्री रुग्णालयात आणण्यात आला! आहुजा साहेबांना पाकिस्तान्यांनी अनन्वित छळ करून मारले होते… उत्तरीय तपासणीत सारं स्पष्ट होतं! … युद्ध पुढं सुरूच होतं… रात्री जखमी सैनिक रुग्णालयात आणले जात होते… डॉक्टर आणि इतर सेवेकरी अपु-या साधनांच्या सहाय्याने पूर्ण प्रयत्न करून त्यांना अत्यावश्यक उपचार देत होते… आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून पुढे उपचारार्थ नेले जात होते… प्राणांतिक जखमांवर आरंभीच्या Golden Hour मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते… ते डॉक्टर बसू आणि त्यांचे सहकारी महत्प्रयासाने देत होते.

डॉक्टर साहेब जखमी सैनिकांशी संवादही साधत होते. त्यांनी सांगितलेले अनुभव वहीत टिपूनही ठेवत होते… अशा अनेक गोष्टी ज्या कुठेही नोंदवल्या गेलेल्या नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी राहिलेले सैनिक, केवळ बर्फ चघळत जिवंत राहून सातव्या, आठव्या दिवशी रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलेले सैनिक, युद्धातील प्रचंड संहार पाहून मानसिक संतुलन गमावलेले सैनिक… प्रत्येकाची कहाणी वेगळी!

इथल्या रुग्णालयात सर्जरी करण्याची संधी मिळणार नाही म्हणून निराश झालेले डॉक्टर बसू आता रोज चार, पाच सर्जरी करीत होते… मात्र यात त्यांना आनंद नव्हता… तरुण सैनिक असे घायाळ झालेले त्यांना पाहवत नव्हते…! पण काळजावर दगड ठेवीत तहान-भूक विसरून काम सुरु होते!

रुग्णांना रुग्णालयात हलवण्यासाठी तयार केलेल्या Helipad पर्यंत शत्रूचे तोफगोळे येऊन आदळत होते… त्याही स्थितीत पायलट उड्डाणे करीत होते! डॉक्टर्स रुग्णावर उपचार करीत आहेत आणि त्यांच्या पासून केवळ काही मीटर्सवर गोळा आदळतो आहे… अशीही स्थिती होत होती… रुग्नालां सोडून पळून दूर जाताही येत नव्हतं. सैनिक म्हणत होते… ”डॉक्टर साहेब, आमच्यावर गोळा पडला आणि आम्ही जखमी झालो तर आमचा जीव वाचवायला इथं तुम्हीच आहात… तुमच्यावर गोळा पडला आणि तुम्हीच जखमी झालात तर आमचं कसं होईल? ” सैनिकांचं बरोबर होतं… पण त्याला काही इलाज नव्हता. रुग्णालयाच्या छतावर तोफगोळ्यांचे तुकडे आदळत असताना डॉक्टर बसू आणि सहकारी डॉक्टर्स सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मोठ्या कौशल्याने बाहेर काढीत त्यांच्या जखमा शिवत होते… त्यांना मृत्यूमुखातून बाहेर आणीत होते. यांपैकी काही तर पुन्हा लढायला निघूनही गेले… this is Indian Army!

९ जून, १९९९. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदार सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले… उत्तरीय तपासणीसाठी! नृशंस शब्दाला जर समानार्थी शब्द द्यायचा झाल्यास या हुतात्म्यांचे देह दाखवावेत अशी परिस्थिती! हे देह पाहून, त्यांच्यावरच्या जखमा पाहून रुग्णालयात जखमी होऊन पडलेले जातिवंत सैनिक म्हणत होते… ”आम्हांला लवकर बरे करा… आम्हांला परत लढायला धाडा… आता आम्ही शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय परतणार नाही! ” पेटून उठलेल्या सैनिकांनी पुढे इतिहास घडवला. भारतीय वाघांनी अंगावर आलेल्या कोल्हया-कुत्र्यांच्या नखांचे ओरखडे सहन करीत त्यांची नरडी फोडली!

वाघ रक्तबंबाळ झाले, काही कामी आले… पण सरशी झाली ती वाघांचीच. ज्याला लोक सशस्त्र संघर्ष म्हणतात ते युद्ध त्यात लढलेल्या सैनिकांसाठी महायुद्धच होतं… अत्यंत विपरीत परिस्थितीत लढावं लागणं म्हणजे महायुद्धच. यात कामी आलेले सैनिक कोवळ्या वयातले, तरणेबांड होते… शेकडो मातांनी त्यांचे एकुलते एक मुलगे गमावले. वीरपत्नी सुद्धा संख्येने भरपूर झाल्या… फार मोठी किंमत म्हणजे हीच! ज्यांची मुले, ज्यांची सौभाग्ये गमावली गेली… त्यांच्यासाठी जग बुडाले!

ऑपरेशन विजय त्यावेळेपुरते संपले! डॉक्टर साहेबांची सर्जिकल ऑपरेशन्ससुद्धा संपली तात्पुरती. ३०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या त्या ५६ दिवसांत. वरिष्ठ डॉक्टर्स लोकांनी डॉक्टर बसू यांचे नामकरण केले… The Kargil Surgeon! यातील दोन सैनिकांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत… कारण त्यांच्या जखमाच जीवघेण्या होत्या… आणि दिवसा त्यांना रुग्णालयात आणता आले नव्हते… उशीर झाला होता!

हे सारे अनुभव लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू यांनी पुढे शब्दबद्ध केलेत… The Kargil War Surgeon’s Testimony हे या पुस्तकाचे शीर्षक असून ते मी विकत घेतले आहे. याचे भाषांतर करायला मिळाले तर भारी होईल. असो.

या पुस्तकात आकडेवारी, लष्करी व्यूहरचना यात नाहीत… यात अनेक प्रश्न आहेत… ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतील! पण देश युद्ध कुणाच्या रक्ताच्या बलिदानाने जिंकतो हे मात्र समजू शकते. रणांगणात आपल्या देशाचा ध्वज रोवल्याशिवाय आपण युद्ध जिंकले आहे असे होत नाही… आणि हे करणारा पायदळाचा साधा सैनिकच असतो! असं डॉक्टर बसू म्हणतात!

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांच्या मागे सावलीसारखे राहून, प्रसंगी जीवाचे बलिदान देत भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी एक प्रकारचे युद्धच लढत असतात, हे खरेच. Army Medical Corps च्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्या सर्वांना अभिवादन करूयात. महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर साहेबा यांनी या दलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांनी तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष पहाडांवर जाऊन जखमी सैनिकांचे जीव वाचवले आहेत… स्वत: शत्रूवर गोळ्या झाडलेल्या आहेत. भारतीय सैन्यात अशा मराठी सैनिक-धन्वंतरींची संख्याही मोठी आहे!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष… भाग – २ –  लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

☆ मोक्ष… भाग – २ –  लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆

(खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.) — इथून पुढे – – 

संध्याकाळी अंधार पडू लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमू लागले. कोणी फुलं हार तर कुणी उदबत्ती असं घेऊन आले. विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टी सुद्धा पोचली. परिक्रमावासीचा नर्मदा किनारी मृत्यू होणे हे भाग्याचं लक्षण आहे. तो दुःखाचा नाही तर आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बँड बाजा.. खूपच गहिवरून आलं होतं मला. रात्री साडेनऊच्या सुमारास परांजपे यांचा मुलगा, मुलगी आणि जावई तसेच श्री. वाळुंजकर तिथे पोहोचले. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. निशब्दपणे एकमेकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. वाजत गाजत अंत्ययात्रा नर्मदा किनाऱ्यावर गेली. कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र अगदी माथ्यावर आलेला होता.

त्यांच्या मुलीला – पूजाला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले. भांबावली होती बिचारी. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेलीत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघे मात्र आश्रमातच थांबले आहेत. न राहवून मी विचारलं त्यांना, “ दिवसभर तुम्ही इतकं सहकार्य केलं. मग आता अंत्यविधीसाठी का नाही गेलात? ” कदाचित जलसमाधी दिली नाही म्हणूनही स्वामीची गेले नसावेत असं मला क्षणभर वाटून गेलं. पण ते म्हणाले, “हम कैसे जा सकते है?  हमारा असली काम तो अब चालू होगा | इन लोगोने भोजन नही किया है।भोजन की तयारी भी तो करनी है |” दोघांनीही आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले. त्यांनी दाल बाटी चा बेत केला. कमी वेळात जास्त माणसांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर दालबाटीला पर्याय नसतो.

अंत्यविधी झाल्यानंतर मंडळी परतली. त्यात गावकरीही होते. त्या सगळ्यांना स्वामीजींनी आणि त्यांच्या त्या गावातल्या सहकाऱ्याने प्रेमाने जेवू घातलं. दुसऱ्या दिवशी अस्थिकलश घेऊन कै. माधव परांजपे यांचे चिरंजीव शांतिशआणि लेक- जावई पुण्याला परतले.

अशीच एक घटना गेल्या वर्षी घडली. दिलीप गोखले हे माझी नाशिक ची मैत्रीण सौ. माधुरी माटे हिचे बंधू.

ते नर्मदा परिक्रमेत आहेत हे समजलं होतं. अशी अनेक मंडळी परिक्रमेत असतात. प्रत्येक वेळी भेट होऊ शकतेच असेही नाही. मुळात लेपा, भट्याण आणि छोटी खरगोन या ठिकाणी आमच्या ज्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी निशुल्क शाळा चालतात त्याचे व्यवस्थापन आणि आर्थिक जुळवाजुळव यामध्येच वेळ इतका जातो की परिक्रमावासी आमच्याकडे लेपाला आले तरी त्यांच्याशी फार गप्पा गोष्टी होऊ शकतात असं नाही. नंतरही प्रत्येकाशी फारसा संपर्क राहतोच असेही नाही. त्यामुळे दिलीप गोखले येऊन गेले असतील आमच्याकडे पण मला नाव आठवत नव्हतं. एक दिवस भल्या पहाटे माधुरीचा फोन आला. तिचा भाऊ दिलीप नरसिंगपूर जवळच्या एका आश्रमात रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावला. त्याचं कुटुंब मुंबईला तर माधुरी नाशिकला. दोन्ही कुटुंबांनी लवकरात लवकर नरसिंगपूरला पोहोचायचं ठरवलं तरी दीड दोन दिवस लागणार होते. श्री दिलीप गोखले यांच्या मोबाईल मध्ये मुलाचा नंबर मिळाला म्हणून संपर्क तरी झाला. एकटेच परिक्रमा करत होते. म्हणून पोलिसांनी पोस्टमार्टेम करावं लागेल असं सांगितलं. आता काय करायचं?  माधुरी आणि तिचे नातेवाईक काळजीत होते. माझ्याशी फोनवर संपर्कही चालू होता. अचानक मला आठवलं, महिनाभरापूर्वीच नरसिंगपूरचे डॉक्टर चांदोरकर व त्यांच्या पत्नी आमच्याकडे लेपाला येऊन गेले होते. त्यांचा परिचय झाला होता. त्यांना मी फोन केला. ही अडचण सांगितली. तर म्हणाले आता तुम्ही कुठलीच काळजी करू नका. या पुढची सर्व जबाबदारी माझी. माझा फोन नंबर दिलीप गोखले यांच्या नातेवाईकांना द्या. विशेष म्हणजे पोस्टमार्टेम करून घेण्यापासून तर पार्थिवाला बर्फाच्या पेटीत ठेवून स्वतःच्याच दवाखान्यात ठेवणे ही सोय त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी दिलीप गोखले यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तर बर्मानघाट येथे अंत्यसंस्काराची सर्व सोय आधीच तयार होती. मानवता म्हणून ही सोय करणं, त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची भोजनाची सोय करणं हे मी समजू शकते. पण प्रसंग ओळखून त्यांच्या परतीच्या प्रवासा साठी रेल्वेचे आरक्षण करणे – जे मला कदाचित सुचलं देखील नसतं, ती व्यवस्थाही डॉक्टर चांदोरकर यांनी करून ठेवली होती.

नर्मदा परिक्रमा करत असताना एक महंत मला म्हणाले होते, “ नर्मदा परिक्रमा केलीत म्हणजे तुमचा सीमित परिवार असीम परिवार होतो. ” याचा अनुभव या अशा प्रसंगातून येतो.

नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासी जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते अथवा मोक्ष मिळतो असे म्हणतात. स्वर्ग आणि मोक्ष ही काय भानगड आहे हे आपण स्वतः मेल्याशिवाय कसं कळणार?  अशा वेळी मात्र मला विनोबाजींनी केलेली मोक्षाची व्याख्या आठवते. विनोबा म्हणतात, मोक्ष म्हणजे काय?  मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. ही व्याख्या मला मनापासून पटते. कारण भौतिक आयुष्यात कुठलाच मोह उरलेला नसतो म्हणून हे लोक परिक्रमेला येतात.

मला मात्र मोक्ष म्हटला की स्वामी विवेकानंद यांची आठवण येते. ते म्हणत मी साधना भलेही करत असेन. पण ती मोक्षासाठी नाही. जोपर्यंत या देशातला एखादा बेवारशी कुत्रा देखील उपाशी आहे तोपर्यंत मी मोक्षप्राप्तीची कामना करणार नाही. स्वामी विवेकानंद माझे आदर्श! त्यांच्या या संकल्पात मला थोडी भर घालावीशी वाटते. माझ्या स्वतःच्या बाबतीत. जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब मुलगा अथवा मुलगी शिक्षित होत नाही तोपर्यंत मलाही मोक्ष नको. अगदी मी नर्मदा किनार्‍यावर रहात असले तरी.

समाप्त –  

लेखिका : भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ)  जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

गौतम बुद्ध यांची पत्नी – यशोधरा.

अबला जीवन हाय! तेरी यही कहानी,

आंचल में है दूध और आंखोंमें पानी! 

हे उद्गार आहेत… हिंदी कविवर्य मैथिलीशरण गुप्त यांच्या एका प्रसिद्ध रचनेतील!

एक रात्र… शाक्य गणराज्याच्या राजपुत्र सिद्धार्थ ची पत्नी *यशोधरा* सुशील, सौंदर्यवती, जिच्या प्रसव वेदना अजुनही ताज्या च आहेत मनात… एक दिवसाचा नवजात पुत्र राहुल मातेच्या कुशीत आश्वस्त होऊन गाढ झोपलेला… यशोधरा ही क्लांत पण पुत्र जन्माच्या आनंदात,

पुढील आयुष्याच्या स्वप्नात शांत, निश्चिंत मनाने झोपलेली! आणि… अशावेळी अघटित घडते… तीन प्रसंग 

जरा, मृत्यू आणि व्याधी बघून व्यथित झालेला सिद्धार्थ, जीवनाचं सत्य शोधायला… पत्नी यशोधरा, पुत्र राहुल, राजसी ऐश्वर्य, आणि परिवार या सगळ्याचा त्याग करून… दूर निघून जातो. सुंदर पत्नी, नवजात पुत्र यांचा मोह ही त्याला थांबवू शकत नाही. नंतर त्याला कठोर तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती होते, तो *गौतम बुद्ध* होतो. त्याची कथा इतिहासात, आणि आध्यात्मिक इतिहासात नोंदली गेली. पण… *यशोधरेचं* काय?  जिला तो न भेटताच, तिचा साधा निरोप ही न घेता… निर्मोही बनून, तिला मागे नवजात पुत्रासह सोडून गेला??  

त्याच्या मागे यशोधरा आणि राहुल कसे राहिले?  त्यांचं काय झालं?  याची कुठेच नोंद नाही. सिद्धार्थ च्या तपात तिचंही… एक पत्नी, एक सून, एक माता म्हणून योगदान उपेक्षितच राहिलं ना!

यशोधरा फक्त सिद्धार्थ ने सोडून दिलेली पत्नी नाहीच मुळी!! तिचेही अधोरेखित करावेत असे किती तरी पैलू आहेतच की!!

यशोधरा… मौनातल्या दृढतेची आणि धीरोदात्त, खंबीर, निग्रही आणि एका सच्च्या क्षत्राणीची कहाणी… म्हणजे यशोधरा!! सिद्धार्थ ची पत्नी… येवढीच तिची ओळख पुरेशी नाहीच! तिला बुद्धाच्या छायेतून, सावलीतून बाहेर काढून बघितलं तर लक्षात येते ती तिच्या परिपक्वतेची, समंजसपणाची आणि एका आदर्श पत्नी आणि मातेच्या आदर्शाची उंची, खोली आणि व्याप्ती!! आपल्या पतीला राजकुमार ते बुद्ध या परिवर्तित रूपात, संयमाने, धीराने, स्थिर चित्त होऊन बघणं सोपं नाही ना एका पत्नी साठी??  पण हे परिवर्तन तिनं पेललं समर्थ पणे! तिने तिचं विरहाचं दु:ख, तिच्या अनावर भावनांचा आवेग… आक्रोशात नाही व्यक्त होऊ दिला.

तिने अत्यंत शांत आणि समजदार भूमिकेतून, सिद्धार्थ ने स्वीकारलेल्या मार्गाकडे बघितलं… आणि तिच्या लक्षात आलं की, सिद्धार्थचा हा मार्ग त्या दोघांना त्यागणं यापेक्षा त्या दोघांपेक्षा ही काहीतरी, मोठं, महान, महत्त्वाचं असं मिळवणं यासाठी होता.

आणि बस्स्… त्याच क्षणी यशोधराने ही भगवी वस्त्रे परिधान करून, राजसी वस्त्रालंकार त्यागून.. दिवसातून एकदाच भोजन करण्यास सुरुवात केली… तिने ही पत्नी धर्म पालन करंत, पतीच्या तपात स्वतः च्या तपाच्या समिधा अर्पण करंत, त्याला मौन साथ देत जणू पाठबळंच दिलं. त्याच्या बुद्ध होण्याच्या मार्गात ती आक्रोशाची, ऊलाहनेची धोंड न होता… त्याच्या आध्यात्म प्रवासातील खरी *अर्धांगिनी* होत… *सहधर्मचारिणी* सिद्ध झाली… सिद्धार्थ ची सिद्धा झाली! योग्याची योगिनी झाली. त्याग आणि प्रेम दोन्ही ही हातात हात घालून चालू शकतात, हे सिद्ध केलं यशोधरेने!

पती असा न सांगता सोडून गेला… उरात न मावणारं, उर फुटून बाहेर येणारं दु:ख होतंच की… पण यशोधरेने समजावलं स्वतःला…

 अब कठोर हो वज्रादपि ओ कुसुमादपि सुकुमारी,

 आर्य पुत्र दे चुके परीक्षा, अब है मेरी बारी!!

आणि दाखवून दिलं की… खरं प्रेम स्वार्थाचा पलीकडचं असतं! खरा वारसा तोच… जो आत्म्याला शांती आणि मोक्षा कडे घेऊन जाईल. तिला पती ने दिलेला हा वारसा कळला, पटला ही… आणि तिने तोच वारसा मग पुत्र राहुल यालाही देऊन त्यालाही भिक्षू/ भिख्खू बनण्याच्या वाटेवर चालण्याचं सामर्थ्य त्याच्या पावलांत देत, चालायला शिकवलं.

यशोधरेला फक्त एकच सल मनात बोचला की, पती तिला न सांगता गेला. तिचा स्वाभिमान दुखावला! एक पत्नी ची वेदना उरी दाटली की… पतीचा तिच्यावर येवढा ही विश्वास नव्हता की ती एक क्षत्राणी आहे… जी आपल्या पतीला औक्षण करून, मंगल तिलक लावून, त्याच्या यशाची कामना करते आणि अभिमानाने त्याला निरोप देते! पण सिद्धार्थ ने तिला आणि राहुल ला आपल्या मार्गातील बाधा मानले. ती तिच्या सखी जवळ हेच म्हणंत राहिली…

सखी वे मुझसे कहकर जाते, कह, तो क्या वे मुझे अपने पथ की बाधा पाते? 

त्याने तिला ओळखलंच नाही… याचं मात्र तिला दु:ख खूप च झालं. स्वाभिमान दुखावला तिचा. पण तरीही तिने नंतर बुद्धांकडूनच पुत्राला ही बौद्ध धर्माची दिक्षा देवविली आणि स्वतः ही घेतली. अरहंत पदापर्यंत ही जाऊन पोहोचली. भद्रकात्यायनी या नावाने ही ओळखली जाते.

अशी ही अलक्षित… पण… स्त्री जातीला महिमा आणि गरिमा मंडित करणारी… परित्यक्ता नाहीच… तर… तपस्विनी, त्यागमयी, तेजोमयी शलाका… जी चैतन्य युक्त, चेतलेलीच ठेवू यात.

– लेख क्र. ३ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण?  अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी?  बघा, विचार करा?  

याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.

  • आधुनिक जीवनपद्धती,
  • विभक्त कुटुंब व्यवस्था,
  • हातात खेळणारा पैसा,
  • मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,
  • नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
  • मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
  • सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर… ,
  • सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
  • वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
  • व्यायामाचा अभाव
  • आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.

अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ

  • अमली पदार्थांचे सेवन
  • वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर
  • स्टेटस जपण्याची स्पर्धा

यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…

मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल…

मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.

  1. स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का?
  2. मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
  3. शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
  4. छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
  5. सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
  6. प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
  7. काळजीत वेळ घालवू नका.
  8. छंद जोपासा.
  9. मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
  10. पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
  11. सकाळी फिरायला जा.
  12. योग, प्राणायाम व ध्यान.
  13. हसतमुख रहा/ Be Cheerful 
  14. मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
  15. मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
  16. *आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज* यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
  17. शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
  18. आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
  19. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
  20. नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो.
  21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
  22. कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
  23. दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
  24. मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
  25. श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
  26. रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
  27. चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
  28. मेंदूचा वापर सतत असावा.
  29. रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
  30. मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
  31. रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
  32. एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
  33. वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
  34. अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
  35. वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
  36. चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
  37. मी काही चूकीचे करतोय का? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
  38. पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
  39. SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
  40. TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
  41. चांगली मुल्ये आनंदी करतात.
  42. श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
  43. रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
  44. खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
  45. संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
  46. नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
  47. ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
  48. आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
  49. भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
  50. नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
  51. परस्परावर विश्वास ठेवा.
  52. लोकांचे आवडते बना.
  53. सॉरी म्हणायला शिका.
  54. जबाबदाऱ्या जाणा.
  55. गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
  56. विवेकाने वागायला शिका.
  57. माणूस बनायला शिका प्राणी नको.
  58. बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
  59. मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
  60. चांगला दृष्टीकोन हवा.
  61. *व्यक्त व्हा…! *
  62. *मन आनंदी तर हृद्य आनंदी…! *
  63. सत्संगती

देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल…!

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

 – जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज

सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.

विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्माचं सार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कर्माचं सार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

 

मी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केलं आणि त्या त्रिवेणीच्या पाण्याला विचारलं,

“माझी पापं तू गोळा केलीस का? ”

नदी म्हणाली, “हो. ”

मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार? ”

त्रिवेणी हसत म्हणाली,

“मी वेडी आहे का ती माझ्याकडे ठेवायला?  ती मी समुद्रात जमा करीन. ”

 

मग मी समुद्राकडे जाऊन विचारलं,

“त्रिवेणीकडून माझी पापं तुझ्याकडे आली का? ”

 समुद्र म्हणाला, “हो. ”

 मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार? ”

समुद्र हसून म्हणाला,

“मी वेडा आहे का ती माझ्याकडे ठेवायला?  ती मी ढगांकडे सोपवीन. ”

 मी मग ढगांकडे जाऊन विचारलं,

“समुद्राकडून माझी पापं तुमच्याकडे आली का? ”

ढग म्हणाले, “हो. ”

मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार? ”

ढग हळूच कुजबुजले,

“आम्ही वेडे आहोत का ती ठेवायला?  आम्ही ती पावसाच्या रूपाने पुन्हा खाली बरसू. ”

मी विचारलं, “कोणावर? ”

ढग खट्याळपणे हसले आणि म्हणाले,

“तुझ्यावरच! ”

त्या क्षणी मला एक गूढ जाणीव झाली —

आपण कुठेही गेलो तरी कर्म आपला पाठलाग करतंच.

विश्व आपल्याला सतत स्मरण करून देतं की चांगलं करा, चांगलं जगा, कारण आपल्या कृतींचं फळ शेवटी आपल्याकडेच परत येतं.

हेच खरं कर्माचं सार आहे.

कवी:अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “एच. टी. डी. ओ. – ई स्टिकर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “एच. टी. डी. ओ. – ई स्टिकर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“HTDO –Hold The Door Open. “

‘E’ Sticker

‘E’ stands for ‘Elders’

हे स्टीकर ‘ Senior citizens ‘ ने आपल्या कार वर लावायचे. याचा अर्थ असा की, ही कार एक जेष्ठ काका चालवित आहेत. असा होतो.

अक्षय कुमार व राहुल द्रविड ची जाहिरात बघीतली.

मला खूप आवडली ही जाहिरात.

कारण समोरची कार कोण चालवतय ?? हे मागे येणाऱ्या वाहनात बसलेल्या वाहकला कळत नाही. दिसत नाही. समोरचे वाहन हळूहळू चालत असेल, तर मागच्या वाहनाला खूप त्रास होतो. आणि त्यात जर एखादा तरूण मुलगा बसला असेल तर त्याला तर ही ‘स्लो स्पीड ‘असह्य होते. त्याचे ‘patience’ च संपतात.

प्रत्त्येक गोष्ट ‘हाय स्पीड ‘ने करणारा हा तरुण वर्ग. यांच्या करिता कोणतिही गोष्ट हळूहळू करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असते.

मग ते हॉर्न वाजवून समोरच्या ड्रायव्हरला दम भरतात. त्याचे ब्लड प्रेशर वाढवतात.

समोरच्या कार मधील जेष्ठ नागरिक स्वतः ला सांभाळत, आपले दुखणारे पायाने ब्रेक दाबत कार चालवायची हिम्मत करतो.

“आता ‘reflexes’ हळू झाले आहेत. गर्दी बघीतली की जीव घाबरतो. दृष्टी अधू झाली आहे. कार पार्क करणे हे तर सध्या खूप मोठे संकटच आहे. “असं सर्व आपल्या मनाशी बोलतच असतो.

तरी तो हिम्मत करून मोठया आत्मविश्वासाने कार काढतो. ” आता मी रात्री तर ड्रायव्हिंग करणे सोडलेच आहे. डोळ्यावर प्रकाश डायरेक्ट पडला की त्रास होतो. ” हे तो जाणून आहे. आजही दिवसा ढवळ्या कार चालवायची हिम्मत आहे त्यांची. एक तर घरी कार आहे, तर तिला मधून मधून चालविणे पण गरजेचे आहे. नुसती उभी ठेवली तर खराब होईल. तिचा वर्षभराचा खर्च ही आहेच. आजींना बाहेर न्यायचे म्हणजे, कारने जाणे सोयीस्कर आहे. कारण स्कूटर वर बसणे आता आजींना जमत नाही. भीती वाटते. तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून जेष्ठ कार चालवतात.

आता ते, हे ‘E ‘ sticker आपल्या कारच्या मागे पूढे लावतील, तर मागून येणाऱ्या कारला हे कळेल, की समोरची कार कोणी तरी जेष्ठ काका चालवित आहे. म्हणून स्पीड कमी आहे. हे समजून तो हॉर्न वाजवणार नाही. व पूढे जायचा दुसरा मार्ग शोधेल.

खरंय, म्हातारपण आयुष्यातील एक वेगळीच फेज आहे. खूप जास्त किंवा खूप कमी आत्मविश्वास दोन्ही उपयोगाचे नाही. वयामानाप्रमाणे अगदी लहान सहान गोष्टींचा ही त्रास होतो. चिडचिड होते. लगेच उत्साह मावळतो. पेशन्स कमी होतात. त्यामुळे खूप मोठा आवाज, सारखा हॉर्न ऐकुन त्रास होतो. गोंधळायला होत. बी पी वाढत.

आता हे समजणे पण गरजेचे आहे की रस्ता तर सर्वांसाठीच आहे. आणि यंग मुलं आपल्या वयाप्रमाणेच वागतील. ते त्यांचे ‘natural ‘वागणे आहे. त्यांच्या करिता ऑफिसला जाणे. इतर कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची पण चूक नाही.

फक्त एकच गोष्ट होण्यासारखी आहे. ती म्हणजे दोघांनी एकमेकांची सोय बघावी. मान द्यावा. व समजदारी दाखवावी. “दादागिरी करण्यापेक्षा समजदारी केंव्हा ही चांगली”.

प्रत्त्येक परिस्थितीतून निघायचा एक मधला मार्ग असतोच. जसे “उकळत्या पाण्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही. पण तेच शांत पाण्यात व्यवस्थित दिसत. त्याचप्रमाणे शांत डोक्याने विचार केला तर मार्ग मिळतोच”.

आजचे तरूण उद्या जेष्ठ होणारच आहेत ना.

या सर्व गोष्टी सवयीचा भाग आहे. मानसिक, वैचारिक सवयी लावायच्या असतात.  समाजात काही चालीरीती रुजवायच्या असतात.

नवयुवकांनी थोड़े लक्ष दिले, जेष्ठांना मदतीचा हाथ दिला, तर दोघांना आनंद होईल. आपण खूप दा स्वतः चाच विचार करून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतो स्वतः ला ‘ जिंकलो ‘ असं समजतो. आनंदी होतो.

कधी कधी कार पार्क करताना, एका जागेवर दोन गाड्या पोचतात. एक तरूण मुलगा सवयीप्रमाणे पटकन त्या जागेत आपली कार पार्क करतो. व दुसऱ्या कार मधील जेष्ठ राहुन जातो.

कधी आपली जागा दुसऱ्याला देऊन तर बघावे. दरवाजा उघडून स्वतः आत जाऊन खाडकन दरवाजा बंद करण्या ऐवजी, दरवाजा उघडून दुसऱ्याला आधी आत जाऊ द्या. असे करून तर बघा. माझ्या साठी कोणीतरी दरवाजा उघडला आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

स्वतः च्या आधी, थोडा दुसऱ्याचा विचार करून तर बघा, चांगले वाटेल.

आपल्या करिता आपण करतोच. थोडं स्वतः ला मागे ठेवून दुसऱ्या करिता केले तर, त्यात नुकसान कमी, आनंद जास्त मिळेल. दुसऱ्या ला महत्व देऊन तर बघा. जर तो दुसरा कोणी जेष्ठ असेल तर आनंद व आशिर्वाद दोन्ही मिळेल.

रस्त्यावर जेष्ठ सूखरूप राहतील. असे वागून तर बघा. सर्वांच्याच समस्या दूर होतील.

थोडा वेगळा विचार करायची गरज आहे. दुसऱ्या करिता आनंदाने जागा द्यायला, दुसऱ्यांकरिता दरवाजा उघडायला शिका.

Give a thought on life changing lesson—‘ HTDO ‘– “Hold The Door Open. “

“क्यों न थोड़ा-सा अलग बने, खुश रहने की वजह बने । “

 म्हणतात ना,

” It is nice to be important. but it is more important to be nice. “

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष… भाग – १ –  लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

☆ मोक्ष… भाग – १ –  लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆

ही घटना आहे 27 नोव्हेंबर 2012 ची. नर्मदा किनारी नगावा नावाचे एक गाव आहे. गंमत आहे ना ! गावाचे नाव नगावा. तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळा मध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचे एक अनौपचारिक शिक्षण केंद्र होते. आपण निशुल्क कोचिंग क्लास असे म्हणूया त्याला हवं तर. सकाळी दहा साडेदहा ची वेळ होती. मी वर्गात शिकवत होते. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर दोन परिक्रमावासी येताना दिसले. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या खिडकीतून डोकावून मला विचारले, “भारती ठाकूर से मिलना था | कहा मिलेगी ?” मी हसून म्हटलं, “मीच आहे ती. दमून आला आहात. थोडं बसा, एवढा विषय संपवून मी येतेच. ” 

जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची रहाण्याची सोय होती. तिथल्या ओट्यावर दोघेही माझी वाट बघत थांबले. थोड्यावेळाने मी तिथे पोहोचले. एकमेकांशी परिचय झाला. पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ होते. एक श्री माधव परांजपे आणि दुसरे श्री मुकुंद परांजपे. दोघांचीही वयं सत्तरीच्या आसपास असावीत. थोरल्या भावानी बॅगेतून एक वही काढली. त्यातल्या एका पानावर काही जणांची नावे लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमेत या लोकांना अवश्य भेटणे आहे. त्या चार -पाच नावांमध्ये माझेही एक नाव होते. माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहिला.

त्या मंदिरात आमचे नेहमीच जाणेयेणे असल्यानेतिथली सगळीच मंडळी माझ्या ओळखीची होती. तिथल्या व्यवस्थापकांना मी सांगितलं, “ये हमारे पुना के मेहमान है । जरा अच्छेसे ध्यान रखना इनका |” आणि मी तिथून पुन्हा लेपाला परतले.

 दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे श्री मुकुंद परांजपे यांचा फोन आला. “ ताई-दादा गेले. मी मुकुंद परांजपे बोलतोय” मला काही कळेना की कुठे गेले आणि इतक्या सकाळी ? मी विचारलं कुठे गेले? “ गेले म्हणजे दादा वारले काल रात्री. पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आम्ही भटयाण येथे गोधारी आश्रमात थांबलो आहोत. काल नगाव येथे जेवण करून पुढे निघालो आणि संध्याकाळपर्यंत गोधारी आश्रमात पोहोचलो आणि तिथेच थांबलो. आम्हाला रात्री झोपायला स्वतंत्र खोली पण मिळाली. रात्री झोपेपर्यंत दादा व्यवस्थित होते. पहाटे अडीच तीनला मला त्यांच्या हालचालीने जाग आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे मला जाणवलं. मी त्यांना प्यायला पाणी दिलं. एखाद-दोन घोट पाणी प्यायले असतील. पण लगेच त्यांचा प्राण गेला. आश्रमातल्या स्वामीजींनी डॉक्टरांना बोलावले पण काही उपयोग झाला नाही. प्राण गेला होता. काय करावे मला सुचत नाहीये. मी घरी पुण्याला कळवलं आहे. पण घरचे लोक कुठल्याही वाहनाने आले – अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना रात्रीचे नऊ-दहा वाजतील यायला. ” थोरल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या धाकट्या भावाची अवस्था मी समजू शकले.

 मी म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. मी पोहोचते तिथे. मी आमच्या दोन कार्यकर्त्यांना काय घडलं ते सांगितलं आणि लवकर तयार व्हा आपल्याला निघायचे आहे अशी सूचना देखील दिली. ताबडतोब आम्ही तिथे पोहोचलो. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. गोधारी आश्रम नर्मदा किनाऱ्यावर परशुरामांची तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे. मी बरोबर जाताना भगवद् गीता आणि इतर काही स्तोत्रांची पुस्तकं आठवणीने बरोबर घेऊन गेले. करण दिवसभर त्या भावाशी काय बोलणार ? 

दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासीचे नर्मदा किनारी देहावसान झाले आहे ही बातमी आसपासच्या गावात वार्‍यासारखी पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की नर्मदा किनारी परिक्रमावासीचा मृत्यू आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणे याला भाग्य लागतं. या भाग्यामध्ये श्री परांजपे यांचं ॲडिशनल भाग्य हे होतं की ते चित्पावन ब्राम्हण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला.

दिवसभर लोक दर्शनासाठी येत होतेच. आश्चर्य म्हणजे कोणीही रिकाम्या हाती आलं नाही. कोणी आमच्यासाठी चहा आणत होते तर कोणी दूध. कुणी साजूक तूप. कुणी गोवऱ्यांची व्यवस्था करत होते तर कुणी प्रेतावर पांघरण्याचे वस्त्र. गावातल्या बायकांनी आठवणीने मला सांगितले, “ दीदी, आमच्याकडे भरपूर लाकूडफाटा आहे. स्वयंपाकासाठी आम्ही तो गोळा करून ठेवतो. ती लाकडे घेऊन जा. आमची पिकअप व्हॅन या कामासाठी उपयोगी पडली. भरपूर गोवऱ्या आणि लाकडे लोकांनी किनाऱ्यावर रचून ठेवली. तो संपूर्ण दिवस खूप अस्वस्थतेत गेला. दर तासाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क चालू होता. त्यांचे इंदोर मधले परिचित श्री वाळुंजकर हे या परिवाराला भट्याणला घेऊन येणार होते. आम्ही त्यांच्याशीही संपर्कात होतो नर्मदा किनाऱ्यावर सरणाची तयारी चालू आहे आणि चिता रचली गेली आहे हे गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना समजताच त्यांनी वेगळा पेच प्रसंग माझ्यापुढे उभा केला. श्री परांजपे परिक्रमेत होते. म्हणजे तो एक प्रकारचा सन्यासच असतो. आणि संन्यास घेतलेल्या व्यक्तीचे नर्मदा किनारी दहन होत नाही तर ते पार्थिव शरीर नर्मदेला अर्पण केलं जातं. पार्थिवाला जल समाधी दिली जाते.

अनेकदा अशी काही पार्थिव शरीरे जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात आणि कुजतात हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं आणि एक-दोन ठिकाणी बघितलेही होतं. त्यामुळे हे जलसमाधीचे खूळ लोकांच्या डोक्यातून निघावं अशी माझी इच्छा होती. मी तसा वाद घालूनही पाहिला.. लोकांचं म्हणणं असं कि शरीर सडतं हे खरं आहे पण ते मासे खाऊन टाकतात. त्यांना अन्न मिळतं. माझी समजूत पटेना. कारण तेच पाणी गावातले लोक हंडे भरून पिण्यासाठी आपल्या घरी नेतात. नर्मदेवर स्नानासाठी आलेले भक्त सुद्धा तेच पाणी पितात. त्यांचे काय ? खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ)  जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ मन– – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

.. मन हे माणसाचं सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली साधन आहे.

.. ते दिसत नाही पण आपल्या प्रत्येक विचारामागे निर्णयामागे आणि कृतीमागे मनच असतं.

.. मन शांत असेल तर जग सुंदर वाटतं आणि मन अस्थिर असेल तर सर्व काही अस्थिर वाटू लागते.

.. मनाला सतत काही ना काही हवं असतं. कधी आनंद, कधी मान, कधी अपेक्षा..

.. पण हेच मन जर समजून घेतलं तर ते आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतं.

.. मनावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही पण जागरूकता आणि स्वानुभवाने ते शक्य होतं.

.. मनाला जबरदस्तीने शांत करण्यापेक्षा त्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे.

.. जेव्हा आपण आपल्या विचारांकडे निरीक्षक म्हणून पाहतो तेव्हा मन हळूहळू स्थिर होतं.

.. राग, भीती, अपेक्षा हे सर्व मनाचेच खेळ आहेत.

.. शेवटी मन जिंकलं तर जग जिंकलं.

… म्हणूनच मनाशी मैत्री करा त्याला समजून घ्या आणि शांततेकडे वाटचाल करा.

मित्रांनो काळजी घ्या…

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २९ – – 

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |

बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे |

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|

अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर (त्यांच्या डोक्यावर) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी (आणि श्रीकृष्णांनी सुद्धा) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत (त्यांच्या रक्षणासाठी)विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर (राम) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.

(ब्रीद – प्रतिज्ञा, रिपु – शत्रू, कांबी – धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी – नगरी)

विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण (कोदंडधारी) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.

सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा – – 

 जे खळांची व्यंकटी सांडो |

तया सत्कर्मी रती वाढो ||

– – असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |

धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे || 

– – हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.

जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.

परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात, ” आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.

समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच (कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !

स्वसंवाद :: 

१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?

२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते? 

३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो? 

४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ? 

– – – 

श्लोक क्र. ३० – – – 

समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|

अर्थ :  एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

विवेचन“नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.

सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया.

हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच ! 

सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !

समर्थांचा (भगवंताचा) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे… अशी त्याची वृत्ती होते.

सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? हा भगवंत असा आहे की त्याच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे वर्णन तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो आणि सगळेच त्याचे गुणगान गातात.

एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.

स्वसंवाद :: 

१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”? 

२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे? 

३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो? 

– क्रमशः श्लोक २९ आणि ३०. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares