मराठी सारस्वताच्या मुकुटात मानाचे तुरे अनेक आहेत. त्यातील एक सुंदर तुरा खोवला कवयित्री शांता शेळके यांनी! शांताबाईंनी मराठी साहित्य सोनियाच्या खाणीत विविध शब्द रत्नांची भर घातली आहे.
त्यांनी काव्याचे विविध प्रकार रसिकांपुढे मांडले आणि ते सारे रसिकांना भावले. भक्तीगीते, प्रेमगीते, विरह गीते कोळीगीते लावणी,’ ऋतू हिरवा’ सारथी निसर्ग गीते स्त्रीसुलभ भाव मांडणारी भावगीते आणि बालगीते असे विविधरंगी काव्य त्यांनी लिहिले जणूं साहित्यातील रंगतदार इंद्रधनुष्य रसिकांपुढे सुरेख मांडले हे सर्वच रंग सुंदर आहेत त्यांच्या कविता लय तालांनी सजलेल्या असल्यामुळे त्याची सुरेल गीते झाली त्यांनी रसिकांचे कान आणि मन तृप्त झाले
यातील बालगीतांचा रंग मला अधिक भावला बाल मनातील भावना अगदी त्यांच्या शब्दात या कवितांमधून व्यक्त झालेल्या दिसतात आणि म्हणूनच त्याची सुरेल बालगीते झाली अगदी मुंगीपासून बाल वयात आवडणाऱ्या
विविध विषयावर त्यांनी कविता लिहिल्या आणि त्या बालां बरोबरच सर्वांना प्रिय झाल्या. त्यापैकी एक कविता प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्यापुढे मांडत आहे हे लोकप्रिय बालगीत आहे,”किलबिल किलबिल पक्षी बोलती”! या गीतातील कल्पनेतला गाव लहानांसह सर्वांना आवडणारा आहे.यात आलेले निसर्ग वर्णन पक्ष्यांची किलबिल झुळझुळ झरे पाने-फुले व भिरभिरणारी फुलपाखरे हे वर्णन अगदी कोणालाही मोहून टाकणारे आहे यात प्रत्येक शब्द अगदी यथार्थ व परिपूर्ण आहे कवीची प्रतिभा म्हणजे शब्द जणू हात जोडून उभे आहेत.ओळी ओळीत बाल मनातील भावना व्यक्त होत आहेत कवी कल्पना खरंच जे न देखे रवी अशाच असतात या गावात सर्व जण मुलेच असतात. कारण तिथे लहान-मोठे हा भेद नाही तसेच इथे शाळा पुस्तके असे मुलांना कंटाळवाणे वाटणारे काहीच नाही फक्त खेळावे, बागडावे असे हे गाव आहे मुलांना आवडणारी गाणी हसऱ्या प-या आणि झाडावर च चेंडू आणि ब्याटी आहेत.
असा बहरलेला गाव लहानांसह सर्वांना आवडणारच! मग ही कविताही गीत रूपात सर्वांना आवडते.ही सारी गंमत कवीच्या शब्दांनी निर्माण केली त्यातील शब्दांचा गोडवा,भावपूर्ण मांडणी, चित्रमय वर्णन हे सारे कवीचे प्रतिभासंपन्न असे यश आहे अशा बालगीत लेखनाने शांता शेळके यांनी मराठी बालगीता ना साज चढवला आहे.
म्हणून च थोडक्यात असे म्हणावेसे वाटते,” असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे.”हेच खरे!
नवोदितांना प्रेरणा देणाऱ्या शांताबाईंच्या काव्य स्मृतीस विनम्र अभिवादन!
या भावनेने शेवटपर्यंत स्वत:चा आणि जगाचा शोध घेणाऱ्या सिद्धहस्त लेखिका म्हणजे शांताबाई शेळके. साहित्यातले विविधांगी प्रकार लीलया हाताळणाऱ्या शांताबाईंची अनेक रूपे आहेत.प्राध्यापिका, पत्रकार, कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, समीक्षक, ललितलेखक, संकलक, बालसाहित्यकार जणू आरसेमहालात दिसणारी असंख्य प्रतिबिंबच. यातले प्रत्येक रूप हे अंगभूत अशा अभ्यासू वृत्ती, उत्कटता, संपन्न साहित्य दृष्टी आणि रसिकतेने ओथंबलेले. सर्वच रूपे हवीहवीशी वाटणारी.
शांताबाईंच्या साहित्याच्या वाटेवरचा खरा जडणघडणीचा काळ होता तो सर परशुराम भाऊ कॉलेजमधली सहा वर्षे. इथे काही अभ्यासू सवयी लागल्या, जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, रसिकता डोळस झाली. त्यामुळे उदंड आशा,उल्हास आणि जीवनाबद्दल अपार आसक्ती वाटू लागली. एम.ए ची पदवी घेतल्यावर मुंबईत आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिक आणि ‘नवयुग’ साप्ताहिकात काम सुरू केले.खुद्द अत्र्यांसारख्या प्रतिभासंपन्न, सर्जनशील साहित्यिकाच्या सहवासात त्यांना साहित्यविषयक, वृत्तपत्रीय लेखनाचे वस्तुपाठच मिळाले. अनुवादक, समीक्षक, स्तंभलेखक, मुलाखतकार या शांताबाईंच्या रूपाचा पाया इथेच घातला गेला.
शांताबाईनी नामवंत वृत्तपत्रं आणि मासिकांमधील सदर लेखनाच्या निमित्ताने विपुल असे ललित लेखन केले. उत्कट जिज्ञासा, भरपूर व्यासंग,मनुष्य स्वभावातील विविध छटांबद्दल असणारे तीव्र कुतूहल, निसर्गप्रेम आणि तरल काव्यात्म वृत्ती यामुळे शांताबाईंच्या ललित लेखनाला खास त्यांचे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. विविध संदर्भांनी संपन्न झालेली शैली आणि निवेदनातील जिव्हाळा यामुळे हे ललित लेख वाचणे हा एक अत्यंत आनंददायक असा अनुभव आहे.
यामुळेच ‘मदरंगी’, ‘एक पानी’, ‘जाणता -अजाणता’ यासारखे स्तंभलेखन आणि ‘आनंदाचे झाड’, ‘ सांगावेसे वाटले म्हणून’, ‘गुलाब – काटे- कळ्या’, ‘आवड-निवड’ यासारखे त्यांचे ललित लेखन खूपच वाचकप्रिय ठरले.
‘सांगावेसे वाटले म्हणून’ मधील सामाजिक जीवनात कसे वागावे हे सांगणारा ‘ सलगी देणे ‘ हा लेख,त्याग करणारा व त्याचा गैरफायदा घेणारा यातील सीमारेषा दाखवणारा ‘ आयुष्याचे उखाणे ‘ लेख, आईवडिलांनी मुलांना देता येईल ते द्यावे अथवा देऊ नये, पण मनाप्रमाणे जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावू नये हे सांगणारा ‘ ययातीचा वारसा ‘ लेख, आनंद आणि दुःख वाटून घेण्याचे महत्त्व सांगणारा ‘ हेमाला मुलगी झाली हो ‘ हा लेख, तसेच जाणता-अजाणता मधील दुःख-संकटातही जगणे आनंदी करणारां विषयी ‘आत्मकरूणेची चैन ‘हा लेख, यशस्वी आणि अपयशी माणसांच्या मनोवृत्ती विषयी ‘ स्वार्था तुझा रंग कसा ‘ हा लेख, सहभोजनाचे महत्त्व सांगणारा ‘ कर्माबाईची खिचडी ‘हा लेख, जनमानसातील प्रतिमा आणि स्वतःच्या मनातील प्रतिमा जपणाऱ्यां विषयी ‘ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट,’ हा लेख असे आयुष्याशी संबंधित सर्वच गोष्टींचा सर्वंकष आढावा घेणारे लेख वाचणे म्हणजे नव्याने आयुष्याचा अभ्यास करण्यासारखेच आहे.
शांताबाईंजवळ संपन्न साहित्यदृष्टी, रसिकता आणि प्रचंड मोठा व्यासंग होता.त्यांचे सगळेच लिखाण अतिशय सुंदर,अभिरुची संपन्न आहे. यातील ललित लेखनाचे वाचन करणे हा एक आनंददायी, आपले जगणे समृद्ध करणारा अनुभव आहे.
☆ शांता शेळके आणि बालकविता ☆ सौ. दीपा नारायण पुजारी☆
बालगीतं मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडतात. अडगुलं मडगुलं पासून सुरु होणारी ही बडबडगीतं बाळाचं आईबरोबरचं नातं दृढ करतात. बोलता येत नसलेल्या वयापासून आई – आजीची ही बडबडगीतं बाळाला शब्द ओळख करून देतात.
तरल भावगीतं, लावणी, चित्रपटगीतं अशा अनेक प्रकारच्या काव्य शैलीचा सुरेल नजराणा ज्यांनी रसिकांना दिला, त्या थोर कवयित्री शांताबाई शेळके यांनी बालकविता ही लिहिल्या आहेत. बालविश्वात बालिका होऊन शब्दांना गोड बाल बोलीत बांधून ठेवलं आहे.
‘मुंगीबाई मुंगीबाई काम करतेस फार
सदानकदा कामाचा डोईवर भार’
असं म्हणत सहजच ठेक्यात, काम करत राहण्याचं महत्त्व त्या पटवून देतात.
‘हे ग काय आई
थांब ना बाई’
या कवितेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातील संवाद मांडला आहे.त्यांच्या कविता ताल, सूर, लय, नाद यांच्याशी जवळीक निर्माण करतात.आकारानं लहान, साधी, सोपी रचना यामुळं त्या कविता मुलांना भावतात.सहज लक्षात राहतात.
‘किलबिल किलबिल पक्षी बोलती
पानोपानी फुले बहरती….’
या कवितेत किलबिल, पानोपानी, झुळझुळ, भिरभिर अशी शब्दांची पुनरावृत्ती करून लय, ताल, यांचा सुरेख संगम या गीतात झाला आहे. शब्दांचं बोट धरून त्या मुलांना स्वप्ननगरीत घेऊन जातात.अपेक्षांचं ओझं लादणारी, नियम पाळायला लावणारी, निरागस वयात रॅटरेस मध्ये सहभागी व्हायला लावणारी मोठी माणसं या स्वप्नातल्या गावात नाहीतच मुळी! खेळणारं, बागडणारं, अवखळ बालविश्व चित्र काढल्यासारखं डोळ्यासमोर उभं राहतं.शब्दातून चित्र उभं करणं, तेही बालकल्पनेतलं आणि बालरंगातलं! त्यांना सप्तरंगी शब्दकुंचला गवसला होता.
‘पाकोळी’ या कवितेत,
‘गोजीरवाणे करडू होऊन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलाफुलांतून उडू?’
स्वैर विहार करताना रानपाखरांशी संवाद साधायला शिकवतात. ओल्या हिरवळीच्या मखमली स्पर्शाचा अनुभव देतात. मखमल, हिरवळ, निळसर अशा अक्षरांच्या आणि शब्दांच्या पुनरावृत्तीमुळं कवितेला गेयता येते तशीच ती कविता मुलांच्या तोंडी सहज बसते.
‘कमळफुलांची आणि कळ्यांची
सळसळ चाले निळ्या तळावर
झुळुक झुळझुळे वारा येता
फुले कळ्याही हलती भरभर.’
‘अक्षरगाणी अंकउजळणी’ या पुस्तकातून अक्षर ओळख करून देताना ‘ळ’ या अक्षराची ओळख किती लयबद्ध केली आहे. ‘ळ’ ची पुनरावृत्ती झाल्यामुळं ही चारोळी हसत खेळत लक्षात न राहिली तर नवल!
या अक्षर ओळखीतून निसर्ग, तसंच आपले रितीरिवाज, सण, खाद्य संस्कृती यांचीही ओळख त्यांनी करून दिली आहे.
‘ हळदीकुंकू चैत्रामधले
मखरामध्ये गौर सजते’
हे सांगताना मराठी भाषेचा गौरव करायला त्या विसरल्या नाहीत. ज्ञानदेवांना माऊली म्हणून नतमस्तक व्हायला मराठमोळ्या बालकांना त्यांनी सांगितलं. मराठी भाषेतील अक्षर ओळख करुन देताना ‘ अमृतातेही पैजा जिंके’ हे त्यांनी आठवणीनं सांगितलं. इथं त्यांच मराठी भाषेवरील प्रेम दिसून येतं. भाषेचा अभिमान दिसून येतो.
शांताबाईंच्या बालकविता मोठ्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जातात. आजोळच्या वाटेवरील दाढीवाल्या वडाला सूरपारंब्या खेळायला बोलावतात. पालक आणि मुलं यांना एकत्र राहण्याचा आनंद देऊ शकतील अशा आहेत. बालक पालक नातं सुदृढ करणाऱ्या आहेत. मुलांच्या कल्पना, भावनिक विकास, संवेदनशीलता यांची वाढ करणाऱ्या आहेत.
आजी – आजोबा, आई – बाबा आणि नातवंडं या तिन्ही पिढ्यांना एकत्र जोडणारा आनंदठेवा आहे.
☆ जीवलगा राहिले दूर घर माझे – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
जिवलगा sss
श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शांता शेळके यांना सादर वंदन. साहित्याच्या सर्वच प्रकारात ज्यांनी उत्तम आणि असामान्य कामगिरी केली आहे, अशा शांताबाईंबद्दल किती आणि काय लिहावे? पण सामान्य रसिकांपर्यंतही सर्वाधिक पोहोचली ती त्यांची काव्यलेखनातली कारागिरी. काव्याचेही अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले होते. आज त्यांच्या स्मृती जागवतांना, अतिशय लोकप्रिय असणारे त्यांचे गीत ‘जिवलगा…’, याबद्दल काही लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न?
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे ।
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे ॥३॥
कविता नुसती वाचण्यापेक्षा तिला चाल लावून सादर केली तर ऐकणाऱ्याला जास्त भावेल या विचाराने कवी सोपानदेव चौधरी, संजीवनी मराठे अशासारख्यांनी १९३०च्या दशकात आपल्या कविता चालीत सादर करायला सुरुवात केली, आणि नकळत भावगीताचे बीज रोवले गेले, ज्याचा अल्पावधीत मोठा वृक्ष झाला. आधी काव्य आणि मग त्याला चाल ही भावगीताची पाहिल्यापासूनची पध्दत. पण, काळाच्या ओघात भावगीतनिर्मितीप्रक्रियेत बदल झाला. संगीतकारांनी आधी चाल तयार करायची आणि मग कवी/ गीतकारांनी त्या चालीत चपखल बसेल अशी काव्यरचना करायची, असे भावगीत उदयाला येऊ लागले. हे काम खरंतर अतिशय अवघड. इथे चालीला धरून नुसते लयीतले शब्द नाहीत, तर प्रतिभेचा साज लेवून नटलेले सुंदर काव्य अपेक्षित असते. आणि अशा गीतांपैकी पहिल्यान्दा आठवते ते गीत अर्थातच ——‘जिवलगा…’
पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मनात, श्री आणि गौरी या संध्याकाळच्या, थोड्याशा उदास, हुरहूर लावणा-या दोन रागांवर आधारित एक चाल घोळत होती, ज्यावर त्यांना गीत लिहून हवे होते. शांताबाई ते उत्तम लिहितील अशी खात्रीही होती. अर्थात त्या चालीनुरूप गीतात भाव हवेत,आणि ती एक अस्सल कविताही असायला हवी—हे सोप्पे नव्हते. पण शांताबाई जातिवंत कवयित्री होत्या. ‘जिवलगा…’, हे संबोधन हृदयनाथांनी सुचविले मात्र, आणि तेवढ्या एका शब्दापुढे शांताबाईंनी पुढचे गीत लगेच लिहिले. ती चाल आणि गीताचे शब्द एकमेकांना इतके अनुरूप होते, की दुधात साखर मिसळावी तसे चालीतून सुचवले जाणारे भाव, आणि गीतातले केवळ शब्दच नाहीत, तर त्यांचा अर्थही एकमेकात विरघळून गेले.
भावगीत म्हणून ‘जिवलगा…’ अजरामर झालंच. पण काव्याच्या दृष्टीने या गीताचा विचार करतांना शांताबाईंपुढे नतमस्तकच व्हावे लागते. शब्दांचा हात पकडून अर्थाचे साम्राज्य उभे करणे हे तर त्यांचे वैशिष्ट्यच. हे काव्य म्हणजे एक उत्तम रूपक आहे——- अध्यात्ममार्ग म्हणजे काटेरी वाट. त्या वाटेने जाणाऱ्या साधकाची काय अवस्था होऊ शकते, त्याचे या काव्यात अतिशय सुरेख, मनाला भिडणारे वर्णन केलेले आहे. या मार्गावरून जाऊ पाहणाऱ्या एका स्त्री-साधकाची हताश मनोवस्था, यातल्या शब्दाशब्दात शांताबाईंनी उत्कटपणे व्यक्त केली आहे…. पुढचे सगळे मार्ग अंधारुन आलेत, ध्येयापर्यंत पोहोचण्याची आशा, दिवस मावळावा तशी मावळत चालली आहे. उत्साहाने या वाटेवर जायला निघालेले पाय थकलेत, डोक्यावरचं ध्येयाचं ओझं जड वाटायला लागलंय, पेलेनासं झालंय, अशा भयाण अवस्थेत ही स्त्रीसाधक ‘जिवलगा…’ अशी आर्त साद, तिच्या जिवाच्या सर्वात निकट असणाऱ्या परमेश्वरालाच घालत, स्वत:ची अवस्था सांगते आहे…… ‘जिथून निघाले तो गाव कधीच मागे पडला आहे. घटकाभर जिथे विसावा घेतला त्या धर्मशाळेचे, अर्थात घराचे दरवाजेही आता बंद झालेत, आणि पुढे अंधारच अंधार आहे…. सुखांचा तर स्वत:च त्याग केला आहे, आणि आता चालतांना पायतळीचा पाचोळा वाजतोय, तेवढीच एक आधाराची खूण शिल्लक आहे….. ‘
हे ऐकतांना, एखादे चित्र पहावे तशी त्या स्त्रीची असहाय्य अवस्था डोळ्यासमोर उभी रहाते. चित्रदर्शिता हा शांताबाईंच्या काव्याचा विशेष इथेही प्रकर्षाने जाणवतो. तिची अगतिकता, एकटेपणा, ‘निराधार मी… मी वनवासी’ या शब्दातून ऐकणाऱ्याला झटकन् जाणवतो. त्या अगतिकतेतून, ‘घेशील केव्हा मज हृदयासी’ अशी अतिशय आर्त विचारणा ती करते. शेवटी, ‘तू अनाथांचा नाथ आहेस, असा तुझा महिमा आहे’… अशी जणू त्या परमेश्वरालाच आठवण करून देत, त्यानेच आता आधाराचा हात व्हावे अशी प्रार्थना करते. त्यातली तळमळ, असहाय्यता, हतबलता या सगळ्याच भावना, अगदी मोजक्या शब्दात तंतोतंत व्यक्त झाल्या आहेत. कविता अल्पाक्षरी आणि रेखीव असणं हे तर शांताबाईंच्या काव्याचे वैशिष्ट्य— आणि भावोत्कटता हा काव्याचा गाभा… आणि पायाही. त्यामुळेच ‘जिवलगा…’ सारख्या हुकमी गीतरचना त्यांना अगदी सहजतेने झटकन् सुचायच्या हे तर निर्विवादच.
या गाण्याचे, आत्ता सांगितल्यापेक्षा काही वेगळे अर्थही अभ्यासकांना सापडू शकतात. म्हणूनच, काव्याच्या अभ्यासकांसाठी हे गीत म्हणजे एक आव्हान आहे, असे म्हणावेसे वाटते.
एक मात्र खरे की, ‘जिवलगा’ हा शब्द कुठल्याही संदर्भात ऐकला, तरी सर्वात आधी या गाण्याचीच आठवण व्हावी, इतके या गाण्याने रसिकांवर गारूड घातलेले आहे.
प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, शांता शेळके या तीन शब्दात त्यांचे वर्णन करुन आपल्याला थांबता येत नाही. त्यांच्या साहित्य सेवेचा आलेख खूप विस्तृत आहे.
त्या प्राध्यापिका होत्या. लेखिका, संगीतकार, बालसाहित्य लेखिका, पत्रकार होत्या.मराठी चित्रपटातील त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.
शांता जनार्दन शेळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. पुण्यातील हुजूरपागा येथे शालेय शिक्षण आणि नंतर स. प. महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले.मुंबई विद्यापीठातून संस्कृत आणि मराठी भाषेत एम्. ए. मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
आचार्य अत्रे यांच्या नवयुग मध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलं. समिक्षा स्तंभ लेखिका, पत्रकारिता यांचा त्यांना चांगला अनुभव मिळाला. हिस्लाप महाविद्यालय नागपूर, मुंबईतील रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालय येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून ही काम केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण पुण्यात; जोडीला प्राध्यापिका, पत्रकार, सहसंपादिका म्हणून अनुभव; असे असले तरी महाराष्ट्राचं ग्रामीण जनजीवन त्यांच्या साहित्याचा मूळ आधार होता. कारण बालपणातील बराच काळ खेड मंचरच्या परिसरात गेला. प्राथमिक शिक्षणही तिथंच झाले.त्यामुळं लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय होता.
स्री मनाच्या अनेक अवस्थांचे वर्णन नेमक्या शब्दात व्यक्त करणारी अनेक गाणी लोकप्रिय झाली. तरुण स्रीचा खट्याळपणा असो, धीटपणा असो, अगर सल्लज भावना; त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध निरागस आत्मविष्कार दिसून येतो. भाषाप्रभूत्व असल्याने त्या सहजतेने लिहून जातात, तरी त्यातील प्रासादिकता वाढतच जाते. त्यांची काव्य शैली ओघवती आणि लालित्यपूर्ण असल्याने कविता असो किंवा चित्रपटातील गाणी, ती अनेकदा ऐकली तरी परत परत वाचाविशी वाटतात, ऐकावीशी वाटतात.
☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शांता शेळके मराठीतल्या एक सुरेल कवयित्री. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी काव्यप्रवाहात शांता शेळके यांच्या कविता लहरी खळाळल्या. उचंबळल्या. त्यांच्या विलोभनीय नर्तनाने, दर्शनाने रसिकांना मोहीत केलं. त्यांचा खळाळ, त्याची गहन गंभीर गाज श्रोत्यांना नादावत गेली
‘सखे कविते आपुला युगायुगांचा स्नेह’
कविता शांताबाईंची जिवलग सखी. त्या म्हणतात, ‘तिनेच आपल्याला सुख-दु:खात सोबत केली. आपले हर्ष –खेद त्यांनी तिलाच सांगितले. मनीची गूजेही त्यांनी तिच्यापुढेच उलगडली. अमूर्त स्वप्ने मूर्त झालेली तिच्यातच पाहिली.
जीवनमार्गावरती क्षणभर
येती जाती किती सुहृज्जन
सखे आपुला युगायुगांचा
स्नेह परी राहील चिरंतन’
कवितेच्या संगतीतच त्यांनी आपले जीवन रंगवले. काव्यातील जीवनात रंगल्यामुळे, जीवनातील काव्याला आपण मुकलो, अशी खंतही त्या क्वचित व्यक्त करतात पण असा क्षण एखादाच. एरवी त्यांचे मन काव्यरंगी रंगलेलेच असते. अंतरीची दु:खे, विफल प्रीतीच्या वेदना, आपलं एकाकीपण हे सारं बोलून दाखवण्याचं तेच एक विश्वसनीय ठिकाण शांताबाईंना वाटतं म्हणूनच आपल्या प्रीय सखीशी त्यांचं नित्य हितगुज चालतं॰
‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’
युगायुगांचा कवितेशी असलेला चिरंतन स्नेह ज्या शब्दांच्या रूपबंधातून समूर्त, साकार होतो, त्या शब्दांचा शांताबाईंना विलक्षण लळा. शब्दातून त्यांची कविता साकारली आणि कवितांतून जागोजागी त्यांनी शब्दांचे कौतुक मांडले. कधी त्या म्हणतात, ‘हे शब्द माझा चेहरा हे शब्द माझा आरसा’ कधी त्या आर्तपणे विचारतात, ‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’ आपण शब्दांबरोबरच जन्मलो, वाढलो, म्हणत त्या लिहितात,
‘शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले
हे शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा
… मी जाणते इतुकेच
की यांच्याविना कंगाल मी
पाषाण हे यांच्यावरी,
मी लाविते मजला कसा…
शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा
हे अंतहीन समुद्रसे, माझा पारी दुबळा पसा’
शब्द ‘अंतहीन समुद्रसे’ हे खरेच ! पण शांताबाईंचा पसाही काही दुबळा नाही. अनेक सुंदर, तेजस्वी, मोहक, मनोहारी शब्द त्यांच्या पशात आहेत. पसा पसरला की घननीळ बरसावा, त्याप्रमाणे शब्द त्यांच्या पशात येऊन स्थिरावतात. शब्द आपसूकपणे त्यांच्या मनात उमलतात. ओठात उमटतात नि लेखणीतून कागदावर उतरतात. पण ही आपसूकता म्हणजे योगायोग किंवा चमत्कार नव्हे. त्यामागे त्यांनी केलेली शब्दब्रह्माची उपासना आहे. संस्कृत अभिजात साहित्याचा अभ्यास, संत-पंत- तंत साहित्याचे त्यांचे वाचन होते. जुने-नवे, जे जे समोर येईल, ते ते त्या वाचत गेल्या. आपल्या व्यक्तिमत्वात मुरवत गेल्या. त्यातून त्यांची सुभग सुंदर शब्दकळा घडत गेली॰ केवळ शब्दकळेवरच नव्हे, तर त्यांच्या एकूण काव्यप्रीतीवरच या सार्याचा संस्कार झाला. शांताबाई म्हणतात, ‘जुन्या-नव्या कवींपैकी जवळ जवळ प्रत्येकाच्याच कवितेने माझ्या काव्यप्रेमाला थोडा बहुत हातभार लावलेला आहे.’
पारा चिमटीत पकडता येत नाही. तसेच, उचित नेमके शब्द जाणिवेच्या कवेत कवळणं अवघड पण शांताबाईंनाही किमया साध्य झालीय. रूपरसगंधनादस्पर्शाची लावण्ये शांताबाईंचे शब्द आपल्यापुढे नेमकेपणाने उभे करतात.
‘जोराने नुकतीच ही सडसडा येऊन गेली सर’ शब्दातील, ध्वनीची अनुभूती, किंवा ’रात शितळली’ म्हणताना ‘शितळ’ शब्दातून व्यक्त झालेला हवाहवासा वाटणारा कोवळा गारवा, किंवा ‘किर्र बोलते घाना वनराई’ मध्ये ‘किर्रs’ शब्दातून अंगावर ओरखडणारा चारा नि ‘घन या अगदी साध्याच शब्दातून सुचवलेले वनराईचे निबीडपान असे किती तरी नेमके अर्थवाही शब्द त्यांच्या कवितेत भेटत रहातात.
शांताबाईंनी शब्दाला पाषाण म्हंटले आहे. पण ते काही साधे-सुधे पाषाण नव्हेत. सुवारणाचा कस जोखणारे ते नमुनेदार पाषाण आहेत. या पाषाणावर आपले अनुभव, भावना, कल्पना, विचार, चिंतन त्यांनी कसाला लावलय. शांताबाई अखंडपणे साठ वर्षे लिहित राहिल्या नि या पाषाणांनीही त्यांच्या काव्यमुद्रा बावनकशी सोन्याच्या आहेत, असे दाखवून दिले. मात्र हा झळाळ नेत्रदीपक नाही, नेत्रसुखद आहे. सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांची झळाळी त्यात आहे. शांताबाई लिहितात, ‘शब्दामागे उभा अर्थ अर्थामागे उभे मन
मनाच्याही पैलपार बोले कुणीसे गहन
मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय.
चीनच्या वुहानहून निघालेल्या ‘करोना’ नावाच्या वादळानं आपल्या सर्वांच्या मानसिकतेवर आघात केला. पाठोपाठ अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या ‘तौक्ते’ नावाच्या वादळानं आपली नैसर्गिक संपत्ती जमीनदोस्त केली. आपल्या मातृभूमीचं प्रवेशद्वार घायाळ झालं तसं आपलं मन ही…..
या वादळाचं रौद्र रूप पाहताना, अनुभवताना,आपल्या मनाची किनार उध्वस्त झाली.सागराच्या छातीवर दिमाखानं झुलणारी गलबतं, त्याच्याच पोटात बुडून गेली. कित्येक दर्याचे राजे काळाच्या पडद्याआड गेले.राण्यांना वैधव्य आले.अश्रू परवानगीशिवाय डोळ्यातून सांडू लागले.
समस्त दर्यावर्दीना नेमेची भेटीला येणारं वादळ परिचयाचं असं.. सागराच्या भरती-ओहोटीचा खेळ सुख-दुःखाच्या लाटांगत अंगावर झेलत जीवन जगणारी ही माणसं. जीवनाच्या बोटीवर आनंदाचं शीड फडकवणारी ही जमात… हा विचार मनांत येताच ‘वादळ वारं सुटलं गं, वार्यानं तुफान उठलं गं.. या ओळींचं स्मरण झालं. शब्दप्रभू शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गीतानं वादळाकडं सकारात्मक हेतूनं पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला.
‘प्रतिभा’ हा शब्द थिटा पडावा अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई म्हणजे अनेकविध काव्य प्रकारांची एकाच काव्यशेल्यात गुंफण करणाऱ्या मनस्वी कवयित्री! त्यांची तीन कोळीगीतं म्हणजे बिल्वदलंच जणू! प्रत्येक गीत आनंदाच्या लाटा अंगावर घेत मस्तीत झुलावं अशा अवीट गोडीची….
कथाप्रवण आणि भावप्रवाही असणारी अशी ही तीनही गीतं…..
***वादळ वारं सुटलं गं……
प्रत्येक वेळी समुद्रात जाळं टाकताना जीवाची पर्वा न करणारा निधड्या छातीचा हा ‘दर्याचा राजा’आणि तितकीच निडर अशी ‘कोळीवाऱ्याची राणी’.समुद्राच्या रोजच्या वर्तनाबद्दल अनभिज्ञ असणारी ती, नेहमीच लाटांना आव्हान देत आनंदात गाते.तिचा तिच्या नाखवा यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच हे शक्य आहे. वारं,वादळ, तुफान,दर्याला येणारी भरती,पावसाचा कहर या सगळ्यांचं आव्हान ती स्वीकारते, नारळी पौर्णिमेला दर्याची पूजा करून आपल्या नाखव्यासाठी साकडं घालते, आणि आत्मविश्वासानं जगते.
एरवी नाखव्याला भेटीचा निरोप ज्या ढगांकरवी ती देत असते तेच ढग आज बेईमान झाले आहेत. वादळ, वार आणि तुफान या त्रिकुटाची तीव्रता ढगांच्या गडगडल्याने जास्त गंभीर होते आणि नकळत राणीच्या हृदयाची धडधड वाढते. शांताबाईंनी ह्या तिच्या धडधडीला ‘जणू शिडाची फडफड’ असं म्हटलं आहे.
नाखवा कामावर गेल्यावर रोजंच ती एकटी असते.पण तो एकांत असतो. आजचं आहे ते जीवघेणं एकटेपण… त्यामुळे माडांची सळसळ आणि खोपीतलं एकटेपण यामुळं तिचा डोळा लागत नाहीये.स्वप्नभंग होतोय की काय?अशी शंकेची पाल तिच्या मनांत चुकचुकतेय. तिची मानसिकता रंगवणाऱ्या शांताबाईंनी आपल्या काव्य प्रतिभेने येथे सर्वांना मंत्रमुग्ध केलय.
तुफान वारा सुटल्यावर आपल्या डोलकराला साद घालणारी आर्त, अगदी मनाला भिडणारी… हा हा हा रे……म्हणत गानकोकिळेतनं ती अचूक साधली आहे. प्रीतीचा जल्लोष असलेलं हे गीत, केवळ अप्रतिम!!
पाण्याला जसं उधाण येत चाललं तसं गाण्यातला वादळाचा वेगही वाढू लागला.ऋजू स्वभावाच्या शांताबाईंनी राणीच्या तोंडी एक सकारात्मक चारोळी देऊन वातावरण आनंदमयी करून टाकलंय. ‘सरसर चालली होडीची ताल’ म्हणत दर्याची राणी तिच्याच तालात नाचू लागते. नाखवा, त्याची बोट, फेसाळणारं पाणी यांना पाहून ती खूश होते. चांदणस्पर्शानं चमचमत्या झालेल्या मासोळ्या अर्थातच ‘दर्याचं धन’ गोळा करणाऱ्या तिच्या नाखव्याला ती ‘दर्याचा राजा’ म्हणते आणि स्वतःला दर्याची राणी म्हणवण्यात धन्यता मानते. मासळीबाजारात हा ताजा म्हवरा विकायला घेऊन जाताना ती सुखावते……
** राजा सारंगा माझ्या सारंगा….
वरील गाण्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं हे गीत…. वाऱ्यानं पाण्यात अलगद लाटा उसळाव्यात तसं हळुवार असं! या गीतातील दर्याची राणी वातावरणाची थोडी अनामिक भीती घेऊन जगते आहे. ‘सारंगा’ म्हणजे तिच्या नाखव्याची बोट…. तिला ती स्वतःचा धाकला दीर संबोधते त्याला ती ‘माझ्या डोलकराला अलगद घेऊन चल घरी’ अशी विनंती करते.वातावरणाचा अंदाज नाखवालाही आहे, तरीदेखील ती पुन्हा पुन्हा त्याची जाणीव करून देते. शेवटी अगतिक होऊन तिचे डोळे पाण्याने डबडबतात. शांताबाईंनी तिच्या डोळ्यातील अश्रुंना ‘पाण्याचा पूर’म्हणून विषयाचं गांभीर्य आणखी गडद केलंय…. संबाल संसार सारा… या ओळीतून तिची कळकळ जाणवते.
** डोलकर डोलकर दर्याचा राजा..
पराकोटीची वेगळी जातकुळी असलेला वेलवेट व्हॉइस (मखमली आवाज) असणाऱे हेमंत कुमार आणि लतादीदी यांचं हे द्वंद्वगीत….. बिल्वदलातलं हे तिसरं पान….कोळी भाषेतील शब्दांची साखरपेरणी करत शांताबाईंनी लिहिलेलं हे गीत, कोळीवाड्याचा माहोल डोळ्यासमोर उभं करतं. आपसूकच मन कोळी नृत्य करू लागतं……
लता मंगेशकर यांचं कौतुक ते काय करावं आम्ही पामरांनी? ‘या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा……..हे ऐकताना मोठा हा शब्द अवाढव्य होतो. ‘उठतया डोंगर लाटा लाटा लाटा…………..हे ऐकताना डोंगराएवढ्या लाटांची भीती वाटण्याऐवजी त्यावर बसून झुलाव असं वाटतं.
पंडित हृदयनाथ यांचं वादळी पण सुमधुर संगीत, प्रतिथयश गायकांचा आवाज आणि शांताताई यांची शब्दरचना असलेली ही कोळी गीतं ऐकताना मन कोळीवाड्यात भन्नाट फिरून येते…. पदन्यास घालतं….उधाण वारा पिऊन मन तृप्त होतं…
आमच्या लहानपणी गणेशोत्सव असला की गणराज रंगी नाचतो, नाचतो पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! व
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
ही गीते लाउडस्पीकरवर सतत वाजायची. पुढे मोठे झाल्यावर ही गाणी शांताबाईने लिहिली हे कळले. त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. शांताबाई एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके आहे. त्यांचा जन्म इंदापूर यथे झाला. त्यांनी आपले बालपण मंचर येथील खेड येथे घालवले. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत.एकूण ही पाच भावंडे त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या.आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. शांताबाईचे वडील रेंजर फॉरेस्ट ऑफिसर होते. वडिलांच्या बदलीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी येथे राहावे लागले. चित्रकलेचे संस्कार आणि वाचनाची आवड शांताबाईवर कायमच राहिली.. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्या कानांवर विविध पारंपारिक गाणी, कविता आणि श्लोक पडले. म्हणूनच त्यांचे काव्यप्रेम, वाचनावरचे प्रेम या ग्रहणशील युगात रुजले. १९३० मध्ये शांताबाईच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या.चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. 1938 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. आणि पुणे येथून पदवीधर झाल्या. महाविद्यालयातून बी. ए पूर्ण झाले. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली.या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला.प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला.हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ताआणिइतरगोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिकमराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.
आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार :- गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६, सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी), केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल
साहित्यसंपदा :- कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३) गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), कळ्यांचेदिवस, फुलांच्याराती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) एक गाणे चुलीचे – स्नेहवर्धन प्रकाशन, कविता विसावया शतकाची – उत्कर्ष प्रकाशन, कविता स्मरणातल्या- मेहता प्रकाशन, गोंदण – मेहता प्रकाशन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा- सुरेश एजन्सी, निवडक शांता शेळके- उत्कर्ष प्रकाशन, हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
शांताबाईंची भक्तिगीते :-
गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो !
कटि पीतांबर कसून भर्जरी बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो !
नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग धिमि वाजतो !
देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !
नादयुक्त शब्दरचना कशी असावी याचे हे गीत आदर्श उदाहरण ठरावे. यातल्या प्रत्येक शब्दाला एक अनोखा झंकार आहे, यातली गेयता कर्णमधुर ठरावी अशी आहे कारण याची टिपेला जाणारी स्वररचना होय. त्याचबरोबर बालगणेशाचा ह्रदयंगम कौतुक सोहळा चपखल शब्दात अवीट गोडीच्या चालीत इथे रचला आहे. या गीतावर आपल्या नकळत आपली मान डोलावते.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
गणेशोत्सवात हे गाणं ऐकलं नाही असं सांगणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या या भक्तीगीताने मराठी माणसाचे खुद्द गणेशासोबतचे नाते दृढ केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं हे गाणं गणेशोत्सवाशी एकरूप झाले आहे.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. लता मंगेशकरांनी छान गाईले आहे. राम भजन कर लेना, जय शारदे वागीश्वरी, शोधितो राधेला श्रीहरी, नको रे नंदलाला ही भक्तिगीते आपण वारंवार ऐकली आहेत।
शांताबाईंची कोळीगीते :-शांताबाईंची कोळीगीते कथाप्रवण आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते. कोळीगीतातली लयबद्ध गोडी हे या गीताचं विशिष्ट्य ठरावं. या गीतात देखील कथात्मकतेची विण आहे, तिचा बाज प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे. लडिवाळीकतेच्या अंगाने जाणारे हे एक युगलगीत आहे, ज्यात ते दोघेही एकमेकासाठी आसक्त झालेयत अन निसर्गाला साक्षीस ठेवून ते साद घालताहेत.
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्यानं घेतंय झेपा
नथ नाकान साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाल्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय् मौजा
वादलवारं सुटलं गो वार्यान तूफान उठलग
तुफानवारं सुटल्यानंतर आपल्या डोलकराला साद घालणाऱ्या कोळीणीची आर्तता मनाला भिडणारी आहे, डोळ्यात पाणी आणून ती म्हणते की, ‘डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा..’ या गाण्याला सुरसंगीताचा अप्रतिम साज चढवल्याने ते अत्यंत श्रवणीय झालेय.
माज्या सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय् सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा
माजे रानी माजे मोगा, माजो लवताय डावा डोळा ही गीते कायम स्मरणात राहतात.
शांताबाईने लिहिलेली प्रेमाची गाणी:- शालू हिरवा पाच नि मढवा वेणीत पेढी घाला साजणी बाई येणार साजण माझा, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, शोधू मी कुठे कशी, सांगू कशी प्रिया मी, पायावरी प्रियाच्या सर्वस्व, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना, प्रीति जडली तुझ्यावरी, घन रानी साजणा, प्रीतफुले माझी सोनेरी, प्राणविसावा लहरि सजण, चित्र तुझे हे सजीव होऊन, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, तळमळतो मी इथे तुझ्याविण ही गाणी खूप लोकप्रिय झाली.
शांताबाईने लिहिलेली निसर्गाची गाणी:- पाऊस आला वारा आला, श्रावणसरी, ऋतु हिरवा, ऋतु बरवा तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, पुढे त्या म्हणतात भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…’ अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.
चंद्र चांदण्याचे गाणे :- चांदणं टिपूर हलतो वारा, चांदण्या रात्रीतले ते, शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलव झूला, पुनवेचा चंद्रम आला, चंद्र दोन उगवले, आज चांदणे उन्हात हसले, तोच चंद्रमा नभात ही गाणी अनेकांच्या ओठावर आपसूकच येतात.
बालगीते:- विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्ही?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !
बडबडगीताच्या चालीवर आधारित भातुकलीच्या विवाहप्रसंगातलं लोकगीतही शांताबाईंनी मोठ्या तन्मयतेने लिहिले आहे. त्याला तितकीच रसिकमान्यताही मिळाली ! या गाण्याला गाताना आजही बालपणातला आनंद अनुभवता येतो.
बाळ गुणी तू कर अंगाई, बाळा माझ्या नीज ना, टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा, जो जो गाई कर अंगाई, झुलतो झुला जाई आभाळा, किलबिल किलबिल पक्षि ही सारी बालगीत आजही मनाला आनंद देतात.
देशप्रेमाच्या कविता :- ‘शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
शांता शेळके यांनी लिहिलेले हे गीत शाळकरी मुलापासून ते उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठापर्यंत सकलांच्या अंगावर रोमांच उठवते. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये स्फुरण निर्माण होते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात लता मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम स्वरात हे गाणं गायले आहे.
लावणी:- शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोर्यात अवचित आला माझ्या होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला? हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !
इतक्या विविध विषयावरची आशयघन सहजसोपी व तितकीच रसिकप्रिय काव्यरचना मराठी कवितेत अन्य कुणा कवयित्रीच्या हातून प्रसवली गेली नाही. यात शांताबाईंच्या कवितेची वेगळी उंची दिसून येते.
आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या शांता शेळके प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळ्या अवस्थेत भेटत गेल्यात ; बाल्यावस्थेत बडबडगीते, तारुण्यात प्रेमगीते, पोक्तवयात भावगीते आणि उतार वयात भक्तिगीते – भावकविता असा त्यांचा प्रत्येकाशी संवाद होत गेलाय.
☆जागतिक पर्यावरण दिन निमित्त – पर्यावरण दिन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज ५ जून – जागतिक पर्यावरण दिन. जसे फादर्स डे, मदर्स डे तसाच … वर्षातून एकदा तरी आईवडील हे शब्द त्यानिमित्ताने नक्की आठवतात, ही आई-वडिलांसाठी समाधानकारक गोष्ट. पण ‘पर्यावरण दिन’? – म्हणजे पर्यावरणाची आठवणही अशीच फक्त एक दिवस काढायची?
“पर्यावरण”… केवढा व्यापक शब्द… हा सकल सजीवसृष्टीचा आधार. क्षणाक्षणाला घेतल्या जाणा-या श्वासाची प्रत ठरवणा-या या पर्यावरणाबद्दलची कृतज्ञता, वर्षातून फक्त एकदाच? तीही फक्त शाब्दिक ? एरवी त्याचे सर्रास हाल करायचे— किती कृतघ्नपणा आहे. निसर्गातल्या सर्व सजीव घटकांमधला, माणूस हा एकच प्राणी असा आहे, जो त्याच्या जीवनदात्याशी अतिशय बेपर्वाईने, निष्ठुरपणे वागतो. इतर सगळे घटक स्वत:च्या मर्यादा ओळखून जगतात आणि म्हणूनच कदाचित् माणसापेक्षा जास्त आनंदात जगतात. इथे एक कविता आठवते……
मुक्त विहरती कशी पाखरे
किलबिल किलबिल आकाश भरे
ऐकियला का कधी कुणी हो
कलरव त्यांचा उसासे भरे ….
वृक्ष-वेली अन् बागा फुलत्या
वा-यासंगे नितचि डोलत्या
पाहियल्या का कधी कुणी हो
वैतागती अन् हिरमुसती त्या…
… ही मुक्तपणे जगणारी पाखरं, मिळेल त्या अन्नपाण्यावर होता होईतो फुलून रहाणारी झाडं-वेली, कधीतरी ‘आणखी’ साठी हपापलेत, देणा-यालाच ओरबडताहेत, वेळप्रसंगी त्याला संपवायचा घाट घालताहेत, असं पुसटसं तरी जाणवतं का? अशक्यच. पण माणूस? तो या सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळा. जन्माला येतानांच श्वासाबरोबरच हव्यासही घेऊन आलेला… ‘आणखी’ मध्ये जाणवणारा असंतुष्टपणा, हाव, हा तर त्याचा स्थायीभावच …
‘इवलीशी जरी चोच, तिने सतत काही टिपतांना, पोटापुरतंच घ्यावं…
हा पोच बघ आहे का?’
…… हा प्रश्न पक्ष्यांना, आणि मतितार्थाने प्राण्यांनाही विचारण्याची कधी गरज पडत नाही. पण माणूस?… स्वत:च्या पोटाची गरज तर लक्षात घेतच नाही, उलट त्याला एकट्यालाच वरदान म्हणून मिळालेल्या प्रतिभेचा वापर प्रगतीसाठी करण्याच्या नादात, ज्या पर्यावरणामुळे त्याचे जीवन सुरक्षित, सुखी रहाते, त्याचीच अनिर्बंध नासधूस करतो आहे…
खळखळ झरझर पाणी वाहे
समुद्री आणि नदी प्रवाहे,
पाहियले का कधी कुणी हो
वैतागून ते थांबून राहे …
असं अगदी निर्मळपणे पाण्याचं कौतुक करणा-या कवीचाही पूर्ण भ्रमनिरास व्हावा, असं वागत, आज माणूस काय करतो आहे? या नितळ पाण्यात असंख्य प्रकारचा कचरा, घाण, रासायनिक द्रव्यं, मृतदेहाच्या अस्थी, आणि प्रसंगी पूर्ण मृतदेहही टाकण्यात तो जराही कचरत नाहीये. पाणी म्हणजे जीवन म्हणत, तो स्वत:च ते जीवन निरूपयोगी करायला मागे-पुढे पहात नाहीये, हे फक्त पर्यावरणाचंच नाही, तर त्याचं स्वत:चंच दुर्दैव आहे, हे त्याच्या लक्षात येतच नाहीये, की लक्षात घ्यायचंच नाहीये? त्याची गुर्मी, माज, लोभ-मोह, सगळं इतकं वाढलंय, की स्वत:चं वागणं फक्त स्वत:वरच नाही, तर सगळ्या जगावर उलटू शकतं, हे कळत असूनही वळेनासे झालंय् त्याला … हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. या विचाराशी थबकल्यावर कवितेतल्या पुढच्या ओळी आठवताहेत…
वाटे मजला रोजच यांना
पहाटेच तो देव भेटतो
षड्रिपु त्यांचे बांधून ठेवून
मुक्त तयांना करून जातो ॥
आम्ही माणसे पाखंडी किती
सुखनिधान ते उरी गाडतो
षड्रिपु सारे मुक्त सोडुनी
सुख शोधत अन् वणवण फिरतो ॥ ….
—खरंच्, पशु-पक्षी, झाडं-वेली अशा निसर्गातल्या इतर गोष्टी लोभ-मोह-मत्सर –सगळ्यापासून दूर असतात, मुक्तपणे जगतात. माणसं मात्र या रिपूंच्या विळख्यात बहुतेक वेळा स्वत:च स्वत:ला अडकवून घेतात, आणि त्या निसर्गाच्या, पर्यायाने पर्यावरणाच्या बाबतीत ‘पाखंडी’पणे वागतात. जगतांना त्याच्या अस्तित्वावाचून पर्याय नाही या सत्याकडेही, स्वत:च्या स्वार्थासाठी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. पर्यावरणाचा वाढता -हास बघता, ‘प्रगती’ हे नाव गोंडस असले, आणि प्रगती होणे गरजेचेही असले, तरी त्यात दडलेला स्वार्थ, त्या ‘प्रगती’लाच बदनाम करतो, हा विचार माणसाच्या मनात डोकावतही नसेल का? हा प्रश्न वारंवार पडावा, अशीच सध्या सगळीकडची परिस्थिती दिसते. म्हणजे माणसाची मानसिकताच आता अशी झाली आहे का … की …
‘निसर्ग जणू खेळणेच आम्हा, ओलिस त्याला आम्ही ठेवू ।
फुकट सापडे हाती तर त्या, बिगा-यास मुळी मोल न देवू ॥’
हे आता गृहीतच आहे का ? सिमेंटच्या जंगलांसाठी, आणि अल्पजीवी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड वृक्षतोड, कधीही विघटन होऊ शकणार नाही अशा कच-याची अतोनात निर्मिती, स्वत:च्या गरजेनुसार, पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची, प्रवाहांची दिशा आणि गतीही बदलणे, सोय म्हणून नदीत कचरा टाकत पाणी प्रचंड प्रदूषित करणे, उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे प्रचंड विषारी वायू, त्यांचे घातक परिणाम माहिती असूनही वातावरणात मुक्तपणे सोडणे… अशासारख्या, पर्यावरणाची पूर्णपणे वाट लावणा-या गोष्टी जगभर दिवसेंदिवस सर्रासपणे वाढत असतांना, वर्षातला एक दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करणे म्हणजे, पर्यावरणाचा घोर अपमान करणेच आहे. स्वत:च्या आईला निलाजरेपणाने कसेही वागवायचे आणि फक्त ‘मदर्स डे’ला, ‘मदर’ हा फार व्यापक अर्थाचा शब्द केवळ उच्चारायचा, तसंच वाटतं, आज ‘पर्यावरण दिन’ आहे म्हणतांना … हे अहितकारक चित्र बदलायलाच पाहिजे… स्वतःला बुद्धिमान ‘माणूस’ म्हणवणा-यांनीच बदलायला पाहिजे.
☆ पुणेरी मिसळ – गुंड्याभाऊंचा कोरोना! ☆ श्री अभय जोशी ☆
प्रिय गुंड्याभाऊ,
स. न. वि.वि.
तुला कोविडबाधा झाल्याचे समजले. मीही दोन दिवस तापलो होतो. पण ते लसीकरणामुळे. तुला सांगणारच होतो. तेवढ्यात तुझ्या बाधेचे वृत्त समजले. घालमेल सुरू झाली. अखेर परवा चि. मोरूने व्हिडीओकॉल लावून दिला. पण तुला खोकल्याची उबळ येत होती. बोलणे शक्य नव्हते. अखेर आज हे पत्र तुला पाठवतोय. त्या दिवशी मोबाईलवर चेहराच दिसला तुझा फक्त. खाली किती वाळला आहेस, याचा अंदाज आला नाही. असो. स्कोअर फारच कमी आहे तुझा, ही आनंदाची बाब. (शाळा-कॉलेजात कधी तुझा स्कोअर वाढला नव्हता, ही चिंतेची बाब होती) बहुतेक कोरोनाला तुझी बाधा झाली असावी, असो. तू नक्की खडखडीत बरा होणारेस. ज्या वयात ‘मदनबाधा’ व्हायला हवी होती, तेव्हा काही झालं नाही. आता भलत्या वयात ‘कोविडबाधा’ मात्र होतेय. (हास जरा मेल्या. खोकू नकोस). डॉक्टर सांगतील ती सारी औषधे घे. पथ्ये पाळ. ‘मी दणकट आहे, काही होणार नाही,’ या भ्रमांत राहू नकोस. या कोरोनाने भल्या भल्यांना ग्रासलेंय. कोविडबाधेत माझा आधी नंबर लागेल, असं वाटलं होतं. पण तू लावलास. असो. लवकर बरा हो. अशक्तपणा घालवण्यासाठी अति पौष्टिक आहाराचा फार मारा करू नकोस. सुक्यामेव्याचा तोबरा भरणे, वरणभाताच्या ढिगाऱ्याचा फडशा पाडणे, भाकऱ्यांची चळत संपवणे… असले अघोरी प्रकार करू नकोस. मिताहार कर, पण पौष्टिक कर. नाही तर अति आहारानेंही कोविड स्कोअर वाढतो म्हणे. शिवाय गृह विलगीकरणात आहेस. चौदा दिवसांनी त्या खोलीच्या बाहेर यायचेंय. नाही तर लठ्ठपणा वाढल्याने दारातच अडकशील. (हसू नकोस, खोकला येतोय तुला.) ऑक्सिमीटरचा चिमटा जवळ ठेव. नियमित तपास. फक्त त्या चिमट्यात बोटं घालण्याचा नाद लावून घेऊ नकोस. बॅटरी संपेल. मग ते मीटर काहीच दाखवणार नाही. तुला वाटेल ऑक्सिजन संपला की काय? घबराट उडेल. त्यानेंही ऑक्सिजन खालावतो. अशा वेळी पालथा झोप. (ढेरीमुळे ते किती शक्य होईल, शंकाच वाटते. सीसॉ होईल शरीराचा) तरीही झोप तसाच. त्याने ऑक्सिजन वाढतो म्हणतात. असो. बरा झाल्यावर उंडारू नकोस लगेच. भलता अशक्तपणा असतो. आमच्या शेजारचे चिंतोपंत असेच चौदाव्या दिवशी उंडारायला लगेच बाहेर पडले. तर रस्त्यात पँटच घसरली. ते सावरताना त्यांनाही चक्कर आली. आधी चक्कर आली की पँट घसरली, नेमकें आधी काय घडले, ते समजले नाही. पण जे काही झालें ते अशक्तपणामुळेच. असो. तू मात्र हे लक्षात ठेव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढच्या वेळी घरी प्रत्यक्ष भेटू.
– तुझा चिमण.
≡≡≡≡≡≡≡≡≡
प्रिय चिमण,
स. न. वि.वि.
तुझं पत्र मिळालं. बरं वाटलं. या कोरोना विलगीकरणाच्या वैराण वाळवंटात तुझं पत्र मरुद्यान वाटलें. चिमण, तू काढलेले चिमटेही याही अवस्थेत हसवून गेलें. मला सोडून तू एकटेच लसीकरण केलेंस. त्यामुळेच तापलास लेका. ‘लस नव्हे तर तुला नर्स लक्षात राहिली,’ असें काऊ वहिनी फोनवरून सांगत होती. चावट कुठला. असो. हे विलगीकरण अगदी नकोसें झालेंय बघ. परवा ताप-खोकल्याचं निमित्त झालं नि आप्तेष्टांनी धोशाच लावला. कोरोना चाचणी करून घ्या म्हणून. शेवटी केली एकदाची चाचणी. ती सकारात्मक असल्याचा माझ्यासाठी नकारात्मक अहवाल मिळाला. अन् तोंडचें पाणी पळालें, त्यापाठोपाठ चवही गेली. नंतर वासही येणेंही बंद झालें. आप्तेष्टांनी खोलीत बंद करून टाकलेंय. नाश्ता-दोन वेळच्या जेवणाचं ताट दारातून आत सरकवतात. एखादा कैदी किंवा श्वापद झाल्यासारखा भास मला होतोय. खोलीत नुसता येरझाऱ्या घालत असतो. काळजी करू नकोस. येरझाऱ्या घालण्याने ऑक्सिजन काही कमी होत नाही माझा. उलट ऑक्सिमीटर आधी ९५ असेल तर येरझाऱ्यांनी ऑक्सिजन स्तर ९७ दाखवतो. ऑक्सिमीटरच्या चिमट्यात मी कायम बोट घालून बसतो, हा तुझा गैरसमज आहे. देव करो तुला कोरोना कधीही न होवो. नाही तर तू पाचही बोटांत ऑक्सिमीटर घालून त्या वेगवेगळ्या आकडेवारीची सरासरी काढत बसशील. पाचही बोटांत ऑक्सिमीटरचे चिमटे, काखेत एक अऩ् तोंडात एक थर्मामीटर ठेवून कानटोपी घालून बसलेला चिमण माझ्या डोळ्यांसमोर येतोय. (हास मेल्या. मी खोकतो.) अरे या उन्हाळ्यात वाफारे घेणे, गरम पाणी पिणे, गुळण्या करणे म्हणजे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा आहे रे. परवा खिडकीतून फळवाल्याला हातवारे करून फळे पाठवण्यास सांगत होतो. तर दाढीतील माझा अवतार ‘खिलौना’ चित्रपटातील खिडकीतील वेड्या संजीवकुमारप्रमाणे भासत होता, असें शेजारी सांगत होते. रस्त्यावरची दोन-तीन माणसे मला पाहून सैरावैरा धावत सुटली. असो. सध्या प्राणायाम सुरू आहे. जलनेतीचा प्रयोग फसला. नाका-तोंडात पाणी गेलं. माझ्या खोलीतच खोलवर बुडाल्याचा भास झाला. माझा सोटा घेऊन कोरोनाला झोडपावेसे वाटतेय. असो झेपेल तेवढें व्यायाम करतोय. लवकरच बरा होऊन उकडीचे मोदक चापायला येईनच तुझ्याकडे.
– तुझा गुंड्या.
– श्री अभय नरहर जोशी
abhayjoshi27@gmail.com
(लेखक ‘लोकमत’च्या पुणेआवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈