☆ आयुष्य हे… – लेखिका- सुश्री सायली साठे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
“आता फार काही करु नका डॉक्टर, आता 87 वर्षांची झाले मी, किती त्रास द्यायचा सगळ्यांना.” राजे आजी म्हणाल्या..
“अहो आजी, पण तुमच्याकडची माणसं सगळी चांगली आहेत, किती काळजी घेतात तुमची.. नाहीतर बरेच लोक एवढ्या म्हाताऱ्या लोकांची काळजीचं घेणं बंद करतात.. त्यांच्यासाठी तरी असं म्हणू नका ” डॉक्टरांनी आजींना समजावलं.
“ते बाकी खरंय, पण करायचं काय एवढ्या आयुष्याचं.” आजी निश्वास टाकत म्हणाल्या.
संध्याकाळी शेजारच्या बेड वर एक नविन पेशंट आला.. पोरगेलासा.. अगदी 22 23 वर्षाचा असेल.. आजींचे लक्ष जाताच त्यांच्याकडे बघुन हसला.. आजी नुसत्या बघत राहिल्या..
सकाळी काहीतरी गुणगुणत होता तो.. आजींचे लक्ष गेले तशी तो थांबला.. “किती दिवस झाले? नविन दिसत्ये आजे ” त्याने विचारले.
“हो, कालच ऐडमिट झाल्ये..” आजी उत्तरल्या..”
“मी परमनंट मेंबर बरं का, काही लागलं तर आपल्याला सांगायचं, इकडे सगळे ओळखतात आपल्याला.” तो हसत म्हणाला.. त्याची धीटाई बघुन आजींना पण हसू आले..
दुपारी आजींना एकदम आठवले तसे त्यानी विचारले, “सकाळी काय गुणगुणत होतास रे?” त्यांनी त्या मुलाला विचारलं.
मुलगा हसला, म्हणाला “त्याला रॅप म्हणतात आजे.. एक नंबर बनवतो आपण.. कोणत्या पण सब्जेक्ट वर.. तू तुझा आवडता सब्जेक्ट सांग.. मी तुला रॅप बनवून दाखवतो.”
आजी हसल्या. म्हणल्या, “माझा आवडता सब्जेक्ट म्हणजे माझा कृष्ण, त्याच्यावर करशील तुझा रॅप?”
“थोडा difficult सब्जेक्ट आहे पण जमेल.. थांब जरा” असं म्हणत त्याने थोड्या वेळात खरचं कृष्णावर रॅप म्हणून दाखवला.. थोड्या वेगळ्या ठेक्याचा गाण्याचा प्रकार ऐकुन आजींना मजा वाटली..
रोज त्याच्याशी बोलण्यात वेळ जाऊ लागला.. सतत काही ना काही बोलत असायचा.. बुधवार आला तसं आजींचा मुलगा आणी सुन हॉस्पिटल मधेच केक घेउन आले छोटासा.. त्यालाही दिला, तसं तो म्हणाला “एवढी म्हातारी वाटत नाही गं तू आजे..”
“झाले खरी एवढी म्हातारी, काय करु सांग.. आता काय येईल तो दिवस आपला.” आजी थोड्या नाराजीनेच म्हणाल्या.
त्यांना निरखत तो म्हणाला “आजे, तुला देऊ का एक काम मग?”
हसू आवरत आजींनी विचारलं “कसलं काम रे, झेपणारं दे बाबा ह्या वयात.”
तसं तो म्हणाला, “काळजी करु नको आजे, तुला जमेल मस्त.. फक्त तू मनावर घ्यायला पाहिजे” तो म्हणाला..
“बघ आजे, मी काही दिवस आहे फक्त.. तुझ्यासारखं म्हातारं व्हायचं होतं मला पण तो तुझा कृष्ण तिकडेच बोलावतोय.. माझ्यासारखे किती असतील.. एवढं मोठं आणि छान आयुष्य मिळालंय तुला..
असं जेव्हा तुला वाटेल ना ,की फार आयुष्य आहे, तेव्हा आम्हाला आठव आणी आमच्यासारख्यांच आयुष्य पण तुच जग.. एकदम रापचिक स्टाइल ने.. आपल्या रॅप सारखं…” आजी त्याच्याकडे बघतच राहिल्या.
दूसऱ्या दिवशी आजीना डिस्चार्ज मिळाला.. तेव्हा शेजारचा बेड मोकळा होता.. आजी काय समजायचं ते समजल्या..
घरी आल्यावर आजींमधे खुप बदल झाला.. घरी एका खोलीत असणाऱ्या आजी आता सगळ्यांमधे मिसळत होत्या.. काहीबाही पदार्थ करत होत्या.. त्यांची आवडती पेटी माळ्यावरुन खाली आली होती.. घरातल्या सर्वांना फार फार बरे वाटत होते..
आजी आता भरभरुन जगण्याचा आनंद घेत होत्या.. ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी.. आणी.. त्याच्यासाठीही…
लेखिका- सुश्री सायली साठे
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी (अलका) ☆ प्रस्तुती श्री मेघःशाम सोनवणे ☆
गेल्या वर्षीची गोष्ट…
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अगदी तसंच महत्त्वाचं काम निघालं म्हणून अगदी टळटळीत उन्हातून दुपारी रविवार पेठ भागात गेले होते ….एरवी या गजबजलेल्या व्यापारी पेठेत जाणं नको वाटतं…
कोविडची भीती बरीच कमी झालेली. त्यामुळे नेहमीसारखंच वातावरण होतं. अरुंद रस्ता.. दुतर्फा लहानमोठी दुकानं.. टेम्पोमधून माल उतरवून घेण्याची घाई.. वाट काढत नागमोडी जाणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा.. वाहनांना चुकवत चालणारे पादचारी.. कर्कश हॉर्न…
एरवी अशा गदारोळात चालताना इकडे तिकडे न बघता मी वाहनाचा धक्का लागणार नाही ना या काळजीने स्वतःला सांभाळत चालते…. पण त्या दिवशी त्या गर्दीत सुद्धा डावीकडे असलेल्या एका साड्यांच्या दुकानाकडे लक्ष गेलं…
लहानसं दुकान. शोकेसमध्ये पाच सहा साड्यांचा सुरेख display. दाराजवळ हिरवीकंच साडी परिधान केलेली मॉडेल. तो रंग दुरून सुद्धा मनात भरला. साडी खरेदीचा विचार त्या क्षणापर्यंत मनात आला सुद्धा नव्हता, पण आपसूकच पावलं दुकानाकडे वळली.
पुतळ्याचा सुबक चेहरा, ओठांवर छानसं स्मितहास्य कोरलेलं. डौलदार हातावर जरीचा पदर लहरत होता. त्या हिरव्यागार रंगाच्या, बारीक जरी बॉर्डर आणि नाजूक बुट्टे असलेल्या आकर्षक साडीमुळे पुतळ्याला सोज्वळ सौंदर्य प्राप्त झालेलं…!
साडी हातात धरून पोत पाहिला. सिल्क बरं वाटलं. लहान बॉर्डर तर माझी आवडती. किंमत सुद्धा परवडण्यासारखी. आणि झाडाची पालवी तरुण होताना जो हिरवा रंग धारण करते त्या रंगाची सुरेख हिरवीगार छटा. म्हटलं मंगळागौर येईल तेव्हा सुनेच्या हातात हीच साडी ठेवावी. परत अशी सुरेख साडी मिळेलच असं नाही. आणि दूर रहायला गेल्यामुळे लक्ष्मी रोडवर सारखं येणं सुद्धा आताशा होत नाही… अशाच विचारांमध्ये दुकानात शिरले.
दुकानदार तरुण मुलगा होता. 27/28 वर्षांचा असेल. “अगदी सेम अशीच साडी दाखवा…” पुतळ्याकडे निर्देश करून त्याला म्हटलं…
“Sorry मॅडम… हरएक पीस अलग है.. लेकिन और साडी तो देखो….”
मी थोडी नाराजीने दुकानात गेले. त्याच्या व्यापारी कौशल्यानुसार त्याने ‘सकाळपासून एकही साडी विकली गेली नाही.. तुमच्या हातून भोवनी होऊ दे.. नवीनच स्टॉक आहे… discount पण मिळेल…’ अशी सर्व बडबड करत माझ्यापुढे साड्यांचा एक लहान ढीग टाकला. मला एकही साडी आवडली नाही. “नको” म्हणत मी दुकानातून बाहेर पडण्याची तयारी केली…
मघापर्यंत टळटळीत वाटणारी उन्हं अचानक खूप मंदावली होती. थोडा वाराही होता. अवेळी पावसाची शक्यता वाटत होती…
“आपको वही साडी पसंद आई है ना मॅडम? कल मै आपको वह साडी दे सकता हुं… कल आके लेके जाना प्लीज… क्षमा करे लेकिन आज नहीं दे सकते…”
दुसर्या दिवशी केवळ साडी साठी दूरवरून परत त्या भागात मी येणं शक्य नव्हतं. मुलगा नम्र होता म्हणून म्हटलं, “ठीक है, कोई बात नही, फिर कभी दुसरी एखाद साडी लेके जाऊन्गी।” म्हणत मी बाहेर पडले आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला लागलेच. तो मुलगा धावतच बाहेर आला आणि सांभाळून त्याने पुतळा दुकानात नेला.
पावसात भिजत जाणं शक्य नव्हतं म्हणून मीही परत दुकानात दाराजवळ थांबले. आता परत थोडा वेळ त्याची बडबड ऐकावी लागणार म्हणून माझा चेहरा थोडा त्रासिक झाला…
“कल चाहिये तो कुरिअर कर सकते है.. वह चार्जेस आप देना.. आज भागीदार कामकी वजहसे बाहर गया है.. कल उसको कुरिअर के लिये बोलता हूॅं।”
“मॉडेलची साडी नको. तुम्ही किती दिवस ती बाहेर ठेवत असाल. धूळ बसत असणारच. तसाच दुसरा पीस असला तरच मला हवा होता…”
“क्या है ना मॅडम, बिझिनेस छोटा है.. नया भी है.. तो बहुत ज्यादा stock नही रखते। Model की साडी दुकान बंद होनेके बादही रोज चेंज करते है… ताकी साडी खराब ना हो….” आणि मग पुतळ्याकडे निर्देश करून म्हणाला, “इनका भी सन्मान रखते है.. इनमे जान नही है तो क्या… नारी है… किसीकी नजर बुरी होती है इसलिये दुकान बंद होनेके बादही चेंज करते है।”
त्या शब्दांनी एकदम मनात काहीतरी चमकलं….असेच किंवा या अर्थाचे शब्द मी फार पूर्वी याच संदर्भात ऐकले आहेत…. स्मृतींचे दरवाजे उघडले… सर्व लख्ख आठवलं….
मी तेव्हा कॉलेजमध्ये अगदी पहिल्या दुसर्या वर्षात होते. माझी मामेबहीण माणिक मुंबईहून आमच्याकडे आली होती. लग्नाच्या वयाची, सुरेख, पदवीधर मुलगी…. योगायोगाने त्याच वेळी माझ्या आई वडिलांच्या घनिष्ठ ओळखीच्या एका डॉक्टरांचा मुलगा सुद्धा रत्नागिरीत आला होता. आईला माणिकसाठी ते स्थळ फार योग्य वाटलं होतं. त्यामुळे तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला…
माणिक तयार झाली आणि आमचे डोळे विस्फारले! मुळात माणिकला अनुपम सौंदर्याची देणगी होतीच…आणि त्यात तिने नेसलेल्या सुरेख साडीमुळे ते सौंदर्य आणखी खुललं होतं… त्या वेळी मैसूर जॉर्जेट साड्यांची फार फॅशन होती. केशरी रंग, लहान बॉर्डर आणि अंगभर नाजूक सोनेरी बुट्टे… माणिकचा केतकी वर्ण त्या केशरी साडीमध्ये तेजस्वी वाटत होता…
नंतर माणिकने सांगितलं की पदवीधर झाल्याचं बक्षीस म्हणून वडिलांनी… म्हणजे माझ्या मामाने तिला साडी घेण्यासाठी पैसे दिले…. माणिक दुकानात गेली तर आतमध्ये मॉडेल च्या अंगावर ही सुरेख केशरी साडी होती. माणिकला तीच साडी पसंत पडली. दुकान मोठं होतं. त्यांनी ढीगभर साड्या दाखवल्या. पण तिला दुसरी कुठलीच साडी आवडेना.
दुकानातल्या लोकांनी तिला सांगितलं की ती साडी आज मिळू शकत नाही. त्यासाठी परत दुसर्या दिवशी यावं लागेल. मुंबईतल्या अंतराचा आणि लोकल ट्रेन, बस यांच्या गर्दीचा विचार करता ते शक्य नव्हतं… तरुण वय…. डोळ्यांना पडलेली साडीची भूल यामुळे तिथून तिचा पायही निघत नव्हता…
दुकानाचे मालक प्रौढ गृहस्थ होते… ते तिला म्हणाले, “बेटा, ही साडी बदलण्याचा एक रिवाज आम्ही सांभाळतो. रोज दुकान बंद केल्यावर या मूर्तीच्या चारही बाजूनी पडदे लावून मग आम्ही मूर्तीची साडी बदलतो. दुकानातला बाकी स्टाफ तेव्हा काम आवरत असतो. साडी बदलणारे लोकही ठराविक दोघे आहेत. इतर कोणाच्या नजरेसमोर हे काम केलं जात नाही. ही दगडी मूर्ती आहे. पण देह तर स्त्री चा आहे ना… तिला योग्य मान देणं… तिचं लज्जारक्षण करणं आमचं कर्तव्य आहे !”
माणिक प्रभावित झाली… लगेच म्हणाली की “मी उद्या परत येऊन ही साडी घेऊन जाईन…”
आम्हाला तेव्हा त्यांचे विचार ऐकून फार भारी वाटलं होतं….
ते दुकान मुंबईत होतं… हे पुण्यात… ते गृहस्थ या मुलाचे आजोबा.. पणजोबा असण्याची शक्यता पण कमीच… पण तरीही जवळपास तशाच प्रसंगात आज इतक्या वर्षांनी मी त्याच अर्थाचे शब्द या तरुण मुलाच्या तोंडून ऐकत होते…. कदाचित साड्या विकण्याचा बिझिनेस करताना समस्त स्त्री वर्गाबद्दल आदर वाटावा यासाठी सुद्धा असे संस्कार करत असतील… ते प्रत्येक पिढीत झिरपत येत असतील… असं मला वाटून गेलं!
इतक्यात त्याचा बाहेर गेलेला भागीदार परत आला. पाऊस कमी झाला होता म्हणून मी निघण्याची तयारी केली. त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं.
भागीदार म्हणाला, “ऐसा एक अलग कलर का पीस है… वह दिखाया क्या?” त्याने कोणत्या कपाटात ती साडी आहे ते सांगितलं. दोघांनी मला आणखी दोन मिनिटं थांबून ती एक साडी बघण्याची कळकळीची विनंती केली. खरंच दुसर्या मिनिटाला तो मुलगा साडी घेऊन आला. तशीच सेम लहान बॉर्डर, तसेच नाजूक बुट्टे, तसाच पदर…. रंग मात्र जांभळा होता….
ही पण साडी चांगली होतीच…पण त्याहून चांगले होते ते त्या तरुण दुकानदाराचे विचार… त्याचे संस्कार.. त्याची स्त्री कडे पाहण्याची दृष्टी…
मी लगेच ती जांभळी साडी खरेदी केली… पैसे दिले.. आनंदाने दुकानातून बाहेर पडले… न ठरवता केलेली ही साडी खरेदी मला अविस्मरणीय वाटते!
एकीकडे रोज खून, बलात्कार, चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, याबद्दल च्या बातम्या वाचून निराशेने मनाचं शुष्क वाळवंट होत असताना हे असे तुरळक ओअसिस मनाला उभारी देतात!
लेखिका – सुश्री श्वेता कुळकर्णी (अलका)
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ 🔸 ऐसे हळूवारपण 🔸 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.
ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं! त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका.
चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं– म्हणजे किती नाजूक कल्पना. हळूवारपणाच्या या व्याखेनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो.
रस्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाशी ती थांबली.
डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.
सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं. बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये, म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढं उन्ह आहे बाहेर…’
बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.
‘किती घेता पाटयाचे?’
‘दोन रुपये.’
‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘
‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती
‘नवरा आहे?’
‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’
किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?
‘मुलं आहेत?’ सुमती.
‘दोन हायेत.’ ती
‘शाळेत जातात?’
कधी मधी! पाऊस झाला, अन् शेण गोळा कराया न्हाई गेले, तर सालेत जातात कारप-रेशनच्या’
२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!
सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता.
सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.
‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.
‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’
‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले.
‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.
‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.
बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली,
‘लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही’
जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती.
बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे, या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते.
अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.
‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
मो. ९३७१८९८७५९
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक युवक साधूकडे गेला आणि म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय पण मला यश हुलकावणी देते, काय चूक होत आहे, मला कळू शकेल का?
साधू म्हणाले एक काम कर, बाजूला नदी आहे त्या नदीतून समान आकाराचे शंभर गोटे घेऊन ये, मग मी पुढे काय करायचं ते सांगतो. आज्ञेप्रमाणे युवक नदीकाठी जाऊन साधारण समान आकाराचे शंभर गोटे घेवून साधूकडे घेऊन आला. साधूनी पूढ़े सांगितले, हे पहा, आपल्या आश्रमासमोर जे पटांगण आहे तिथे एक खांब रोवलेला आहे, त्या खांबापासून शंभर फुटावर एक चबुतरा आहे, तुला तिथे उभे राहायचे आहे आणि एक एक गोटा त्या खांबाला फेकून मारायचा आहे. तुझा जो गोटा खांबाला लागला, तिथे थांब आणि माझ्याकडे परत ये. तूझा फेकलेला गोटा खांबाला लागला तर जीवनात यशस्वी होशील आणि जर तुझा कोणताच गोटा लागला नाही तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीस.
ठरल्याप्रमाणे युवक सर्व गोटे घेऊन खांबापासून शंभर फुटावर असलेल्या चबुतऱ्याजवळ उभा राहिला आणि एक एक गोटा त्या खांबाला मारत राहिला. पहिले पंचवीस तीस दगड त्या खांबापर्यंत पोहोचलेच नाहीत. या टप्यावर त्याने थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा बळ एकवटून एक एक गोटा फेकण्यास सुरुवात केली. आता त्याने मारलेले गोटे खांबाच्या आसपास पोहोचू लागले पण खांबाला मात्र एकही गोटा लागला नाही.
अर्थात तो थोडासा निराश झाला, पाहता पाहता त्याच्याकडे केवळ पाचच गोटे उरले जे त्याला अगदी मन लावून ते फेकणे आवश्यक होते. संपूर्ण एकाग्र चित्त करून शेवटचे पाच गोटे पुन्हा जोर लावून फेकण्यास त्याने सुरुवात केली आणि काय आश्चर्य शंभरावा गोटा खांबाला अचूक लागला.
अत्यंत आनंदाने ओरडत, युवक पळत आश्रमात येऊन साधू ना घडलेला वृत्तांत सांगू लागला. साधू म्हणाले, तुला यातून काय बोध घ्यायचा आहे ते मी आता समजावून सांगतो.
प्रथम माझ्याकडे भरपूर गोटे आहेत, आणि काम खूपच सोपे आहे, म्हणून मी ते सहज करू शकतो या विचाराने पहिले काही गोटे तू बेफिकिरीने फेकलेस, म्हणून लागले नाहीत.
इथे तुझा दृष्टिकोन उथळ होता.
मात्र जेव्हा पहिल्या तीस पैकी एकही गोटा खांबाला लागला नाही, तेव्हा तुझ्या मनात कुठेतरी भिती निर्माण होऊ लागली, आणि तू किंचित चिंताग्रस्त झालास.
त्यानंतर तू एक छोटीशी विश्रांती घेतलीस, नियोजन केले, योजना आखलीस आणि पुन्हा नव्या दमाने उरलेले दगड फेकू लागलास. या काळात बेफिकिरी जावून हळू हळू तू एकाग्र होऊ लागलास, म्हणून तुझे दगड खांबाच्या आसपास पोहोचू लागले, यातून तुला दगड फेकण्याची विशिष्ठ लय सापडली.
लय सापडली खरी, पण अजुन तुझे चित्त म्हणावे तितके एकाग्र झाले नाही.
आता जेव्हा शेवटचे पाच गोटे उरले, तेव्हा तू गंभीर झालास. जर आता माझा कोणताच गोटा लागला नाही तर, मी आयुष्यात पूर्णतः अपयशी होणार ही भिती तुला सतावू लागली. इथे तू तुझ्या इष्ट दैवताचे नाव घेवून, चित्त एकाग्र करून, लय साधून गोटे फेकू लागलास, आणि तुझा शंभरावा दगड खांबाला अचूक लागला.
मला अंतर्ज्ञानाने माहित झाले होते की तुझा शेवटचा गोटा खांबाला लागणार आहे. पण मी जर तुला ते आधीच सांगितले असते तर, तू पूर्णपणे बेफिकीर राहिला असतास, त्याचा शेवट असा झाला असता की तुझा कोणताच गोटा खांबाला लागला नसता. याचा परिणाम म्हणजे, माझ्यावरचा तुझा विश्वास उडाला असता, आणि मी भोंदू आहे असा तू निष्कर्ष काढला असतास.
बोध
लक्षात ठेव, उथळ वृत्तीने केलेल्या कामात कधीच यश मिळत नाही. नोकरी, व्यवसायात सुद्धा आपले सातत्य, एकाग्रता, व चित्त केंद्रित असेल तरच यश मिळते. आता तूला लक्ष कसे साध्य करायचे याचे आकलन झाले आहे असे मी मानतो.
संग्राहिका– सुश्री मृदुला अभंग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कडुलिंबाची फांदी… ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆
“हे घे अमृता” म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, “काय ग, वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला?”
अमृता म्हणाली, “नाही, वर्ष नाही झालं. पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे.”
काकु म्हणाल्या,” कधी मन एकरूप होत गेले कळलंच नाही. पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहीलं ना. एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय. कोरोनाचा. त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा, आणि तू ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हं.”
त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, “आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकु तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमगरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाहीत. तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे. तुम्ही कसं करता काही लागलं तर?”
काकु म्हणाल्या, “अग लागतंच किती दोघांना, आणि फोनवर मागवतो किराणा, भाजीपाला, दूध. आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीआड असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या. थोडं खोलवर पण आहे ना आमचं घर. जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे…”
“हो ना काकु, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात, मला तर आईच्या रुपात भेटल्या तुम्ही.”
हे असं सगळं चालु होतं आणि पाडव्याची चाहूल लागली. पलीकडची काकूंच्या घराची योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती. अमृताने आदल्या दिवशीच सांगुन ठेवलं, “काकू, उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हं तोडून.” काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत.
सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरीची साडी नेसली. नवरोबा सुद्धा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी, गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की!
अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली, “अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डगळी द्या ना. माझी गुढी उभारणं थांबली आहे.”
काकूने, “नाही जमणार गं ..” असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला, “अरे काय कमाल आहे ह्या काकूंची. ह्यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी ह्यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली आणि ह्या एवढी छोटी गोष्ट का देत नाहीत.”
तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, “अगं, तू जरा शांत हो. नसेल जमत तोडायला त्यांना. म्हणून लगेच, तू केलेल्या उपकारांची लिस्ट काय वाचतेस तू. त्या मोठ्या आहेत वयाने. तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस?? बघू,मी शोधून आणतो.”
अमृता म्हणाली, “नाही. तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचे. माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसांपासून, मॉर्निंगवॉकला गेले होते तेंव्हा. म्हणून तर ह्यांना सांगून मोकळी झाले. चांगल्या ठसठशीत तर दिसतात. एक लांब कडी घेऊन जरा टाचा वर केल्या कि तोडू शकतील त्या फांदी.”
नवरा म्हणाला, “वाद नको, आणि ह्या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस. जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. चल काही बिघडत नाही कडुलिंब नसेल तर. गाठी आणि आंब्याची पानं आहेत ना. तीच बांधू.”
अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती. आज खरंतर काकु तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकुंचंही कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ती फांदी होती.
दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळेच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नातं अडकून संपून जाईल.
अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले. अमृता म्हणाली “कशाला जायचं पण आपण. त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला..”
त्यावर तो म्हणाला, “अमृता, अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकु एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या. असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही गं. माझ्या आईने मला सांगितलंय कि, कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं.”
बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता. जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. ‘एवढा सण पण साधी रांगोळी काढली नाही. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या’ असं अमृताच्या मनात पण आलं.
“काकू” म्हणत दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही.
एकदम खालून आवाज आला, “या या. अहो, लेक आणि जावई आलेत.” म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या.
अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुढग्यापासुन पायच नव्हते.
काका खूप आजारी दिसत होते पण खोलीत प्रसन्नता होती. छोटयाशा देवघरात छोटी गुढी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता.
अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, “दोन वर्षांपूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहाळजेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली गं.
ह्यांच दुखणं खूप जुनं. त्यात मी अशी झाले. निराशेचे ढग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जीवणात आली. कदाचित देवाची मर्जी.
तुला हे सगळं सांगावसं वाटत होतं. पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिलीस. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तो तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस ‘मला हे खावं वाटतंय’ तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते ग तुझ्यात. हे काय तुझ्या डोहळजेवणाची हळूहळू तयारी करतेय.” म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. “बघ हरणाच्या गाडीत बसवते तुला.”
आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निपचित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच, “आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते.”
काकूंनी पटकन दोन वाट्यात बासुंदी दिली. काकूंचं ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं. “काकू, आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो. खरंच आभार तुमचे.”
काकू म्हणाल्या, “आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत रहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहाते.”
दोघे निघाले. काकू निरोपासाठी दरवाज्याकडे येणार तेंव्हा अमृता म्हणाली, “मागूनच या आपल्याच जागी. दासबोधाची वेळ झाली ना.
“हो ना!” म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अश्या जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो. आता कळलं, हि गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते.
तिने काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही थाटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आंनदी दिसत होती.
अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फुल सगळा आसमंत दरवळून टाकत होतं. अमृताला जणू सांगत होतं, तू ही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक.
(मागच्या भागात प्रेम कथा लिहिणारी लेखिका, प्रेम कथा तिच्या पठडीतली कशी असावी हे सांगते…. आता पुढे)
३०—४० वर्षांपूर्वीची, सरू आणि विजयची प्रेम कहाणी माझ्या मनात अजून आहे. सरुने हलकेच माळलेलं सोनचाफ्याचं पानासकट असलेलं फुल, चेहऱ्यावरचे लाजरे, बुजरे, काहीसे धुंद भाव आणि आतुरतेने त्या गावकुसाकडच्या पुलाखाली, खिशात हात घालून वाद घालणारा विजय. .या प्रेमात, लपून-छपून भेटी होत्या, चोरुन पाठवलेली पत्रं होती,चुंबने होती, धाकधूक होती, दु:खं होती, घरच्यांनचा विरोध होता, वियोग ही होता! पण तरीही ती एक सफल प्रेम कथा होती. चारी अंगाने फुललेली आणि विवाह बंधनात सुखरूप परिणती झालेली, सुरेख, गोजिरवाणी, स्वच्छ!
कल्पनांना एकसारखे धक्के बसत होते! कधी कधी तर माझंच मला आतून ठकठकायचं. हे सारे प्रवाह जुनाट, आऊटडेटेड वाटायला लागायचे. माझे मलाच वाटायचे, ज्या पिढीचं मी प्रतिनिधित्व करते, त्या पिढीच्या विचारांना, कल्पनांना, अनुभवांना आजच्या या नव्या बदलत चाललेल्या समाजाला खरोखरच काही महत्त्व आहे का? त्याहीपेक्षा काही उपयोग आहे का? आपण त्यांच्या पाठी की पुढे आहोत? हा एक गोंधळ वाढवणारा प्रश्न. पण मनाच्या एका अदृश्य पडद्यावर मला स्पष्ट दिसायची ती फक्त या नव्या समाजाची पाठच. मीच आपली धावते त्यांच्या मागे. माझ्याकडे जे काही थोडेफार आहे, त्याचं गाठोड घेऊन. कधी कधी माझं मलाच ते जीर्ण, सुकलेलं, रसहीन, बेचव वाटते. माझी प्रेम कथा तर अगदीच मुळमुळीत आहे असे वाटते. काही गरम मसाला नसलेलीच जाणवते.
प्रेमाचे रंग बदलत आहेत. ते, अधिक उग्र, गडद डोळ्यांना सुखद वाटण्यापेक्षा, भयभीत,करणारे रौद्र, भीषण, अचकट —विचकट झालेत. सूत्र प्रेमाचं आहे, गाभाही प्रीतीचा आहे, पण ती मृदूता, तो मुलायमपणा कुठेतरी हरवलाय.
हे सगळं वाटायचं एक कारण होतं. अंतर्बाह्य ढवळून काढणारं, हादरवणारं, धक्का देणारं, अगदी जवळच घडलेलं असं काही. याच काळातली ती घटना.
त्याचं म्हणे तिच्यावर प्रेम होतं! वय वर्ष १९ . ती ही त्याच्याच वयाची. एकाच कॉलेजमधले, एकाच वर्गातले. तिला तो आवडायचा म्हणे. पण मित्र म्हणून. तसे तिला मित्र खूपच होते. ती होतीच छान! आकर्षक, गोरी, उंच, सडपातळ, शिवाय हुशारही, पैसे वाली. थोडक्यात अगदी सिनेमातल्या हिरोईन सारखी. तशीच लांबलचक गाडीतून यायची, शोफरने दार उघडल्याशिवाय गाडीतून उतरायची नाही. दिमाख, डौल होताच तिच्यात.
त्याची नजर तिच्यावर गेली. आणि त्याने ठरवलं,
” लग्न करायचं ते हिच्याशीच. नव्हे! ती आपली झालीच पाहिजे.” तिच्या मनाचा विचार त्याच्या खिजगणतीतही नव्हता. ती दुसऱ्या कुणात गुंतली होती असेही काही म्हणता येणार नाही, पण त्याला मात्र ती सांगायची, अगदी विनवून विनवून,
” अरे मला तू आवडतोस! पण मित्र म्हणून. मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करणार नाही.”
त्याचे मित्रही त्याला चिडवायचे. त्याची टिंगल करायचे. त्याला आव्हान द्यायचे. त्याच्या स्वप्नांना डिवचायचे. तो तो त्याचा राग सळसळायचा. अधिक चीड, अधिक संताप, अधिक उद्रेक. टोकाची इर्षा. मनात अक्षरश: तांडव.
आणि एके दिवशी कॉलेजच्या आवारात ते घडलं. त्या कॉलेजच्या आवारातली जुनी वठलेली झाडंही थरथरली. किती युवा पिढ्या त्यांच्या छायेत वावरल्या असतील! प्रेमाची कुंजनं, वियोगाचं कारुण्य, मनोभंगाची दुःखं, अश्रू सारं पाहिलं असेलच त्यांनी. पिढ्या पिढ्यांच्या नात्यांचे, भावबंधांचे, अनुबंधांचे ते साक्षीदार होते. पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं, त्यामुळे ते स्तब्ध झाले असतील. मुळापासून कळवळले असतील. त्यांची पानंफुलं मिटून गेली असतील. विदीर्ण झाली असतील.
तिचा आणि त्याचा बराच वेळ वाद झाला म्हणे! हिसका हिसकी झाली. तिने पाठ फिरवली तरी त्याने तिचे हात खेचले. तिने त्याला झटकलं. कडवट, कठोर तिरस्काराचे शब्द वापरले. जळजळीत प्रतिकार केला तिने. त्याने डोळे विस्फारले. छाती फुगवली. त्याच्यात बळ होतं. शक्ती होती. त्याच्या नसानसात बेदरकारपणा होता. संहार स्फुरत होता. मग काही उरलं नाही. ना प्रेम ना ओलावा! ना दया ना करुणा. फक्त अहंकार, दुराभिमान, एक प्रचंड विकृत आत्मकेंद्रीतपणा. सारं उपटून फेकून देण्याची वृत्ती. एक विनाश. एखाद्या प्रेमाचा फक्त एकच रंग. लाल. लबलबीत, चिकट मनाची दुर्गंधी.
आता ती त्याचीही नव्हती आणि कुणाचीच नव्हती. सारं काही संपलं होतं. उरल्या होत्या त्या फक्त चर्चा. सुरुवातीला दबक्या, कळवळून केलेल्या आणि मग हळूहळू विरत जाणाऱ्या. नव्हे! पुन्हा अशाच प्रकारच्या घटनांना बोथटपणे सामोऱ्या जायला लावणाऱ्या.
अशा साऱ्या पार्श्वभूमीवर, सामाजिक विकृतीच्या संदर्भात, माझी जन्माला येणारी प्रेमळ, लडिवाळ, हसरी रुसवी, राग —अनुरागाची प्रेम कथा एक सारखी हिंदकळत होती. डळमळत होती. वास्तवतेच्या आणि अवास्तवतेच्या सूक्ष्म रेषेवर चक्क मरगळून गेलेली दिसत होती.
एक दिवस सहज मनातलं कुणाजवळ तरी बोलावं म्हणून माझ्याच उमलत्या वयातल्या लेकीला मी म्हणाले,
” किती भयंकर घडलं नाही ग त्या कॉलेजमध्ये!”
तिच्या हातात भलं मोठं बर्गर होतं! ते अख्खच्या अख्ख तोंडात घालतच तिने विचारलं,
” कशाबद्दल म्हणतेस मम्मी तू.?”
” अगं तुला माहित नाही? इतकं पेपरात रोज येत होतं ते! टीव्हीवरही तुम्हा कॉलेज तरुण— तरुणींच्या प्रतिक्रियांचाही कार्यक्रम झाला. सूर हाच होता, त्यानं तिची अशी हत्या करायला नको होतं. “नाही”म्हणायचा तिचा नैतिक अधिकारच होता.
” त्या दोन-तीन महिन्यापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतेस का तू? काय मम्मी” अजुन तुझ्या डोक्यात तेच विचार आहेत? तू इतकी सेंटी होऊ नकोस. हे असं नेहमीच घडतं. एखादी घटना जरा जास्तच डिस्कस होते. आजकाल हे काही नवीन नाही. आधी प्रेमात पडायचं, फसवणूक झाली तर आत्महत्या करायची, नाहीतर तिचा किंवा त्याचा खून करायचा. सट्टॅक. फिनिश! धिस इज लाईफ. आणि तू मला हेच का विचारतेस, त्याचाही मी अंदाज करू शकतेच. पण मी तुला सांगते, तू एवढा विचार नको करूस. तुझी मुलं तशी नाहीयेत. चांगली, विचारी, अभ्यासू, सरळ मार्गी सुसंस्कृत, आणि काय काय… तुला जशी हवी तशी आहेत. एवढं पुरे नाही का तुला?”
तिने ते भलं मोठं बर्गर संपवलं. पाणी प्यायली आणि टीव्ही ऑन केला. कुठला तरी इंग्लिश चॅनेल सेट करून त्यावरचं कार्टून पाहण्यात, ती पुढल्या काही सेकंदातच रमून गेली.
मी मात्र पहात राहिले तिचा कोरडेपणा. अलिप्तपणा. आपल्याच विश्वात मस्तपैकी रमायला लावणारा बिनधास्तपणा.
सारं काही शांत झाल्यावर मी देव्ह्यारात सांजवात केली. मंदपणे तेवणारी ज्योत, अन् उदबत्तीचा संथ सुगंध माझ्या डचमळणाऱ्या मनाला कुठेतरी आधार देत असल्यासारखं वाटलं.
मी पुन्हा घेऊन बसले, माझं अर्धवट राहिलेलं लिखाण. माझ्या कहाणीतल्या त्याला आणि तिला क्षणभर सुन्नपणे पाहिलं. मला त्यांच्याबाबतीत असं काही घडू द्यायचं नव्हतं पण डोकं बधिर झालं होतं. शब्दसुद्धा सोडून गेलेत आपल्याला, असं वाटत होतं. मी म्युझीअम मधल्या वस्तु जशा आपण कुतुहलाने पाहतो ना तशा सार्या घटनांना पाहत बसले. माझ्या या कथेतल्या प्रेमिकांचा सारा अभिनिवेश जुनाट, मळका, गढूळ, धुळकट वाटला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले प्रेमाचे भावही अगदी शामळु वाटायला लागले. एखाद्या कृष्णधवल चित्रपटातल्या नायक नायिके सारखे. केवळ गिमीक्स. वास्तवापासून दूर.अगदीच कृत्रीम. अनैसर्गिक.
पण का कोण जाणे! लिहूच नये असेही वाटेना. या काळाचीच प्रेमकथा मी लिहावी का? वाचकांना तीच अधिक रुचेल. पण म्हणून, वास्तवाचा आग्रह धरुन समाजाला हे विकृत द्यायचं का? नाही. हा धुरळा जरा झटकता आला तर आतमध्ये अजूनही खूप काहीतरी शिल्लक आहे. जे मला जाणवत होतं. एक शांत, सुखावणारं, शीतल असं प्रेमरंगाचं मधुर मिश्रण! तेच उलगडून दाखवायची गरज आहे. फक्त भडक, गर्द डोळ्यांना, केवळ रुद्रताच भासवणाऱ्या रंगात ते मिसळायला हवं, म्हणजे भीषणतेची, रौद्रतेची दाहकता कमी होईल. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, याचा अविष्कार झाला पाहिजे. प्रेम म्हणजे हत्या नव्हे. प्रेम म्हणजे त्याग..
मी पुन्हा लेखणी हातात घेतली. माझी प्रेम कथा सुंदर, स्वच्छ ,निर्मळ शब्दांची गुंफत गेले. मोगर्याच्या गजर्यासारखी. रुसणं, फुगण,! राग अनुरागात बांधलेली. संहारापासून तर कितीतरी दूर. फक्त भावबंध जपणारी, गोड, मिठ्ठास. हातात हात गुंफणारी. जन्मोजन्मीची. साथसोबतीची.
एखादी प्रेम कथा लिहावी असं मनाशी ठरवलं, आणि त्या दिशेने मनात स्वाभाविकपणे काही प्रवाह वाहू लागले.
तिची आणि त्याची एक प्रेम कहाणी. म्हणजे कहाणीत ती आणि तो असणारच. कथेतली “ती” सुंदर असायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नव्हती.. पण पाहता क्षणीच म्हणा, अथवा काहीशा ओळखीने म्हणा, त्याला ती आवडायला लागली. तोही अगदी काही सिनेमातला हिरो टाईपच हवा, असं नव्हे. पण त्याचं बोलणं, चालणं काहीसा हसरा, मिस्कील, विनोदी स्वभाव आणि बराचसा बिनधास्त पणा तिला आवडला आणि गुटर गु व्हायला लागलं.
जमतय. ओढ वाटतेय् . पुन्हा पुन्हा भेटावसं वाटतंय. एकमेकांना दिलेल्या छोट्या-मोठ्या वस्तू सांभाळून ठेवाव्याशा वाटतात. तेच तेच गोड शब्द कानात रुंजी घालताहेत. त्यामुळे ओठावर, नकळत वेळी अवेळी हंसू उमटते. निसटते स्पर्श, त्याने अंग मोहरते. गोड गोड लहरी जाणवत आहेत. प्रीतीचा अविष्कार हाच नाही तर कोणता?कथेतले ती आणि तो एकमेकांत गुंतत आहेत.
कथा तशी कोंबातच आहे. पण उलगडेल हळूहळू. तिची आणि त्याची आकृती नक्कीच तयार झालीय्. कथेत मीही हळूहळू गुंतत चाललले आहे, त्यापेक्षा कथा मनावर पांघरतेय.
त्या दिवशी दामोदर आला. दामोदर आला म्हणजे काही तरी बातमी असणारच. तीही सनसनाटी. आणि माझी अपेक्षा खरी ठरली.
चहापाणी, शिवाय गरमागरम कांद्याची भजी खाल्ल्यावर, दामोदर जरा मुळावर आला. म्हणजे सुरुवातीला अवांतर बोलणं झालं.
” काय वहिनी? इतक्या ठिकाणी मी भजी खाल्ली आहेत पण ही चव नाहीच.”
मग गरमागरम भजीचा आस्वाद घेत त्याने एखादी अनधिकृत गोटातली बातमी सांगावी तसा अविर्भाव करून, म्हटलं,
” वहिनी कळलं का तुम्हाला?”
” कशाबद्दल? काय ते?”
” अहो सदानंद बद्दल?”
” सदानंद? काय झालं त्याचं?”
” सांगतो मी. पण सांभाळून! नाहीतर एखादी कथाच लिहाल त्याच्यावर. म्हणजे तसा प्लॉट कथेसाठी चांगलाच आहे.”
” अहो पण झालं काय?”
” सदानंदची बायको सदानंदला सोडून गेली.”
” सोडून गेली? मग ही काय अशा रीतीने सांगण्याची बातमी आहे का?”
” अहो सोडून गेली म्हणजे वरती नाही हो! रश्मीकुमार सोनी बरोबर ती पळून गेली.”
” काय सांगताय काय?”
” सदानंदच्या बायकोबद्दल ऐकलं आहे मी. लोक काहीही बोलतात रे! चांगली आहे ती. शिवाय टॅलेंटेड आहे. त्यांची मुलं किती हुशार आहेत! शिवाय कसली कमतरता नाही संसारात. ती कशाला अशी वागेल?”
” वहिनी! तुम्ही पण साध्या आणि सरळ आहात. पण दुनिया फार निराळी आहे. दिसतं तसं नसतं. आणि रश्मीकुमारचे अन मिसेस सदानंदांचे संबंध काही आजचे नाहीत. फार पूर्वीपासूनचे आहेत. ते काहीसं म्हणतात ना प्लॅटॉनिक लव, समान वैचारिक कल, जीवनाकडे पाहण्याचे कलात्मक दृष्टिकोन वगैरे… बरीच मोठी स्टोरी आहे. सांगेन सवडीने. पण सध्या सदानंद पार हादरला आहे. प्रतिष्ठा, पोझिशन. ठीक आहे. पण त्याचं काय आहे शो मस्ट गो ऑन. वरवर तो भासवतोय्, “मला काही फरक पडत नाही.”
मग जाता जाता दामोदर एवढेच म्हणाला, “काय वहिनी? दिलं की नाही कथानक तुम्हाला? आता कल्पनेने रंग भरत बसा त्याच्यामध्ये.”
खरंय्. प्रेम कथा लिहायचं ठरवले आहे मी. तो आणि ती आहेतच माझ्या कथेत. अजून त्यांचं वय, आकार, काळ ठरायचंय पण त्याच्यात “रश्मी कुमार” आणि तिच्यात सदानंदची बायको ,हे काय माझ्या कथेच्या साच्यात बसत नव्हतं. म्हणजे घटना असेल प्रेमाची, पण माझ्या कथेतील प्रेम, त्याचं स्वरूप, रंग हे नाहीत एवढे नक्की.
अगदी नदीकिनारी, मावळता सूर्य, डोंगर, क्षितिज, गुलमोहराचे झाड, वगैरे काव्यमय संकेत घालायचं टाळत होते मी. कारण प्रेमाच्या बदलत्या परिभाषेचं भान ठेवायचं ठरवलं होतं मी. म्हणजे डॉट कॉम, ई लँग्वेज वापरायला हरकत नव्हती. प्रेमाचा गाभा तोच असला तरी, नवं स्क्रीन आणि इतर आधुनिक साधनं उपयोगात आणायला हरकत नव्हती. पण “रश्मी कुमार “आणि “सदानंदची बायको” ही प्रेम कथा या पठडीतली नव्हती. ती जरा वयस्कर, वाकड्या वाटेने जाणारी, आणि असंस्कृत वाटत होती. म्हणजे संस्कृतीच्या ज्या चौकटी आपण आखल्या आहेत आपल्या भोवती, त्यात बसणारी नव्हतीच मुळी.
मला असं काही लिहायचं नव्हतं. म्हणजे उच्च अभिरुची, ढासळलेल्या समाजाची घडी, बदलत्या माध्यमाचा वेडावाकडा प्रभाव ,वगैरे इतकं काही उंचीचं, टोकाचं नाही म्हणायचं मला. पण एक नक्की, ज्या समाजात मी वावरले, जगण्याची दिशा नक्की ठरली आहे त्या समाजात हे असं काही नव्हतं, म्हणून मला असं काही लिहिता येणार नाही.
(मागील भागात आपण पाहिले, – सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला. आता इथून पुढे)
तीन महिने झाले की सावनी आणि नुपुर मुंबईला येणार होत्या. तिचा भाऊ आणि आई-बाबा येणार होते पोचवायला. इकडचे आजी-आजोबा पण नातीच्या आगमनाच्या तयारीत गुंतले होते. पण त्याआधीच दोन दिवस फोन आला सौमित्रच्या बाबांना. सावनीच्या बाबांनी त्यांना ‘तुम्ही लवकरात लवकर इकडे या, सावनीची तब्येत खूप बिघडली आहे. बाकी इकडे आल्यावर सांगतो. ‘ असं म्हणून फोन ठेवला. तात्काळद्वारे रिझर्वेशन करून सौमित्रचे आई-बाबा दुसर्या दिवशी सकाळी रतलामला पोचले.
काय आहे ते बघून मग सौमित्रला कळवू, असं त्यांना वाटलं पण ते तिथे पोचले तेव्हा सावनी घरी नव्हतीच. तिचे आई-वडील डोक्याला हात लावून बसले होते. काही न बोलता त्यांनी सौमित्रच्या बाबांच्या हातात एक चिठ्ठी दिली. ती सावनीची होती. ‘ मला डान्समध्येच करिअर करायचं आहे. त्यासाठी मी घर सोडून सुमंतकडे चालले आहे.’ चिठ्ठी वाचून सौमित्रचे बाबा एकदम खालीच कोसळले. सौमित्रच्या आईदेखील हतबुद्ध झाली. डाॅक्टरना बोलावलं, त्यांनी हार्ट अॅटॅकचं निदान करून सौमित्रच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. सौमित्रला हे कळवणं भागच होतं. रजा घेऊन आणि तिकिट मिळवून दोन दिवसांनी तो रतलामला पोचला. त्याचा मित्र सलील त्याच्याबरोबर आला होता.तोच या सगळ्यांना मुंबईला परत घेऊन आला.
बाळाच्या अंघोळीसाठी बाई येणारच होती. थोडी खटपट करून स्वैपाकालाही बाई मिळाली. या धक्क्यातून सावरून नुपुरकडे दिवसभर बघणं, शिवाय बाबांचं पथ्य-पाणी, औषध हे सर्व सांभाळणं सौमित्रच्या आईसाठी खूपच अवघड काम होतं. पण या परिस्थितीत ते निभावणं भागच होतं. सौमित्रलाही हा आघात पचवणं सोपं नव्हतं. त्याची मनःस्थिती पार बिघडून गेली होती. त्यानं कंपनीकडे महिनाभर रजेसाठी अर्ज केला. कंपनीला कॅनडात त्याच्या जागी दुसर्या माणसाची नेमणूक करावी लागली. त्यामुळे कंपनीने त्याची रजा मंजूर केली पण प्रमोशन रद्द केलं. नुपुरसाठी वेळ देता यावा म्हणून सौमित्रने इतरत्र नोकरी शोधायला सुरुवात केली. सात-आठ महिन्यांनंतर त्याला तशी नोकरी मिळाली. आठवड्यातून एक दिवस ऑफिस आणि बाकी घरून काम. त्यामुळे आईलाही थोडी स्वस्थता मिळाली.
पण दैव माणसाची सत्त्वपरीक्षाच घेत असतं. सौमित्रच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यांची ट्रिटमेंट सुरू झाली. नुपुरला पाळणाघरात ठेवायची वेळ आली. पण तिची तब्येत खूप नाजूक होती. ती वारंवार आजारी पडायची.मग तिच्यासाठी काही दिवस घरी बाई ठेवली.
सौमित्रची खूपच ओढाताण होत होती. मित्रांनी, नातेवाईकांनी दुसर्या लग्नाचा सल्ला दिला. पण आधीच्या कटू अनुभवामुळे त्याचं मन या गोष्टीला तयारच होत नव्हतं. शिवाय नुपुरला तो तळहाताच्या फोडासारखं जपत होता. तिला सावत्रपणाचा त्रास झाला, तर त्याला ते अजिबात सहन झालं नसतं.
सौमित्र आत्ताशी बत्तीस वर्षांचा होता. त्यानं एकट्यानं उभं आयुष्य काढावं हे त्याच्या आई-बाबांना देखील पटत नव्हतं.
‘सगळीच माणसं वाईट नसतात रे! शिवाय आम्ही थोडेच तुझ्या आयुष्याला पुरणार? आमच्या तब्येती या अशा! नुपुरलाही आईची गरज आहेच.’ असं हरप्रकारे समजावून त्यांनी त्याला परत लग्न करायला तयार केलं.
मिथिलाचं स्थळ सलीलनं, त्याच्या मित्रानं सुचवलं.
मिथिला त्यांच्याच एका मित्राची चुलत बहीण. बी. कॉम. झाली आणि लग्न ठरलं. एकुलता एक मुलगा इंजिनिअर, अमेरिकेत नोकरीला. आई-वडील पुण्यात. एका मध्यस्थामार्फत माहिती कळली, नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच. पण लग्नानंतर सहा महिन्यांनी अमेरिकेला पोचल्यावर खरी परिस्थिती उघड झाली. तो आपल्या मैत्रिणीबरोबर रहात होता आणि त्यांना एक मुलगाही होता. मिथिला भारतात परतली आणि दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. सध्या ती घरीच ट्यूशन्स घेत होती. तिचे आई – वडीलही तिनं दुसरं लग्न करावं म्हणून प्रयत्नशील होते.
सलीलकडून एकमेकांची पूर्ण हकिकत दोघांना कळली होती. त्यानंतर अनेकदा फोनवर बोलून आणि प्रत्यक्ष भेटून सौमित्र आणि मिथिलानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिथिलानं नुपुरला पोटच्या पोरीसारखंच वाढवलं. आईशिवाय तिचं पानच हलत नव्हतं. ती नुपुरची सख्खी आई नाही हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. आई-बाबांचंसुद्धा ती प्रेमानं करत होती. सौमित्र आणि ती एकमेकांना समजून वागत होते.
आणि आता हा बाॅम्ब येऊन आदळला होता.
सावनी सुमंतकडे पुण्यात निघून गेली. त्यानं मुंबईतून आपलं बस्तान पुण्यात हलवलं होतं. मुंबईत कार्यक्रमाच्या आणि सरावाच्या निमित्ताने त्यांना एकमेकांचा सहवास घडला होता आणि जवळीक निर्माण झाली होती. तिचं नृत्यातलं आणि शिकवण्याचं कौशल्य त्यानं जवळून पाहिलं होतं. त्याच्या क्लासमध्ये मुलींना शिकवायला घरचीच आणि नृत्यनिपुण शिक्षिका मिळणार होती. सौमित्रशी घटस्फोट झाल्यावर त्यांनी लग्न केलं. पण आपल्या या व्यवसायात अडथळा नको, म्हणून काही वर्ष मूल होऊ द्यायचं नाही, यासाठी त्यांनी खबरदारी घेतली.
सहा-सात वर्षांत त्यांनी पुण्यात चांगलाच जम बसवला. पण सततच्या गर्भनिरोधक औषधांचा सावनीच्या गर्भाशयावर अनिष्ट परिणाम झाला होता. उपाय चालू होते, पण तिला मूल होणं अवघड होतं. काळ पुढे सरकत राहिला. नंतर आलेल्या कोरोनानं सगळं चित्रच पालटून टाकलं. दोन वर्षांत होत्याचं नव्हतं झालं. क्लास बंद ठेवावा लागला. ऑनलाईन क्लासमधून जेमतेमच पैसा मिळत होता. अशात कोविडनं सुमंतचा बळी घेतला. त्याच्या उपचारासाठी होती-नव्हती ती सर्व शिल्लक खर्च झाली. सुमंतच्या घरच्यांना हे लग्न फारसं पटलं नव्हतंच. त्यांनी सावनीशी असलेले जुजबी संबंधही तोडून टाकले. मधल्या काळात सावनीचे वडीलही वारले होते. आई भावाकडे राहात होती. सावनी घर सोडून निघून गेल्यामुळे माहेरच्यांशीही संबंध दुरावले होते. सावनी एकटी पडली होती.
करोनाचं सावट ओसरल्यावर तिनं परत डान्स क्लास सुरू केला होता. तिच्या नृत्य नैपुण्यात काही उणेपणा नव्हता. म्हणूनच ती ‘नृत्य-मयूरी या मानाच्या पुरस्कारास पात्र ठरली होती. पण आता पहिली उमेद राहिली नव्हती. एकटेपणाची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली होती. म्हणून नुपुरच्या आधारासाठी तिनं चाचपणी सुरू केली होती.
नुपुरवर दुसर्या कोणी हक्क सांगणं ही कल्पनाच मिथिलाला सहन होत नव्हती. ती म्हणूनच अस्वस्थ होती. सौमित्रही गोंधळून गेला होता. नुपुरला हे सगळं कसं सांगायचं, हा तर खूपच मोठा पेच होता. पण सांगावं तर लागणारच होतं. त्यानं आपल्या मनाची तयारी केली होती.
नऊ वाजता नुपुर उठली. आवडता नाश्ता बघून तिची कळी खुलली. पण आईला बरं नाही हे कळताच, नाश्त्याची प्लेट हातात घेऊन, ती तशीच तिच्यापाशी गेली. मिथिलानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळयांना धार लागली. गोंधळलेल्या नुपुरला जवळ घेऊन सौमित्रनी तिला आधी नाश्ता करायला लावला. मग हळूवारपणे त्यानं तिला सगळं काही सांगितलं. काही वेळ नुपुर स्तब्ध बसून राहिली. मग तिचे डोळे अश्रूंनी डबडबले, तिनं उठून सौमित्रचे हात घट्ट पकडले. त्याने तिला प्रेमाने कवेत घेतले. मग मुसमुसतच तिने मिथिलालाही मिठी मारली.
मग अचानक आपलं रडं आवरून ती सौमित्रला म्हणाली, ‘ बाबा, मी तयार आहे तिला भेटायला. असं कर ना तिचा मोबाईल नंबर आहे का? आपण इथूनच व्हिडिओ कॉल करूया. बघ ना नंबर मिळतोय का? तोवर मी आजी-आजोबांना पण इकडे घेऊन येते. सौमित्र संभ्रमात पडला. तिचे वकिल फोनवर डायरेक्ट बोलायला देतील की नाही याची त्याला शंका होती.
तेवढ्यात नुपुर आजी-आजोबांना तिथे घेऊन आली देखील आणि सौमित्रकडे नंबरची विचारणा करू लागली. मिथिलानं हळूच सौमित्रला आजच्या पेपरमध्ये आलेली बातमी सांगितली होती. त्याला एकदम शशिकांतची आठवण झाली. त्याचा हा आतेभाऊ प्रेस रिपोर्टर होता. सौमित्रनी त्याला फोन करून, सावनीचा नंबर मिळवायला सांगितला. पाच मिनिटात त्याचा मेसेज आला आणि सौमित्रनी फोन लावला. नुपुर तुला व्हिडिओ कॉल करतेय, एवढं सांगून त्यानं फोन नुपुर कडे सोपवला. नुपुर काय बोलणार याकडेच सगळ्यांचे कान लागले होते.
नुपुरचा व्हिडिओ कॉल सुरू झाला होता.
‘ सावनीमॅडम तुमचं अभिनंदन ! आपल्या तीन महिन्याच्या मुलीची पर्वा न करता, तिला सोडून जाणाऱ्या बाईला,’ हिरकणी’च्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळावा हे गौरवास्पदच आहे नाही का? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मिथिलाच माझी आई आहे आणि मी तिची मुलगी. इतर कोणीही केवळ जन्म दिला म्हणून माझ्यावर हक्क दाखवू शकत नाही. आमच्या या कुटुंबात तुम्हाला कोणतंही स्थान नाही आणि यापुढेही मिळणार नाही. मला तुम्हाला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. ‘
सावनीच्या हातून फोन गळून पडला होता. मिथिलानं अश्रू भरल्या डोळ्यांनी नुपुरला कवेत घेतलं होतं. सौमित्रही त्यांना सामील झाला. आजी-आजोबांचा आनंद डोळ्यांतून पाझरत होता. भरून आलेलं आभाळ मोकळं झालं होतं.
☆ अशक्य ते शक्य करिता सायास… श्री सुहास कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर☆
शिवथरघळची ट्रिप एकंदरीत छान झाली असे म्हणत घरी आलो आणि वेगळीच गोष्ट लक्षात आली. घरी आल्यावर चेहरा धुताना माझ्या पत्नीला ( सौ. मीना ला) जाणवले कि, गळ्यातील लहान मंगळसूत्र गायब आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी गेलो होतो. कुठे पडले असेल अंदाज बांधणे कठीण. अनेक शक्यतांपैकी एक शक्यता म्हणजे आम्ही वापरलेल्या रेंटल कार मध्ये असू शकते. ड्रायवरशी लगेच संपर्क साधला पण काहीही मिळाले नाही.
निदान कुठे पडले समजले तर काहीतरी करता येईल या विचाराने आमच्यातील डिटेक्टिव्ह जागृत झाला. ट्रिप चे सर्व फोटो झूम करून पाहिले तेव्हा असे लक्षात आले कि शिवथरघळ च्या अलिकडे एका टपरीवर आम्ही चहा भजी खाल्ली तेव्हा मंगळसूत्र होते आणि त्या नंतरच्या फोटोत म्हणजे शिवथरघळ च्या पायर्या चढण्यापूर्वी पायथ्याशी काढलेल्या फोटोत मंगळसूत्र नव्हते. याचाच अर्थ एकतर ते गाडीत पडले किंवा पायथ्याशी असलेल्या पार्किंग एरियात पडले. ट्रिप ला बरोबर आलेला मित्र प्रकाश महाजन याच्या कानावर सदर घटना घातली. त्यांनी पण ड्रायवरला पुन्हा शोध घेण्यासाठी सांगितले तसेच दुसर्या दिवशी शिवथरघळ च्या ट्रस्टींना फोन करून घटना कानावर घातली.
दोन चार दिवस फोनाफोनी व पाठपुरावा केल्यानंतर सत्य स्विकारून जीवन चालू होते. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी अचानक फोन आला. सौ. मीनाने तो घेतला.
” हॅलो, आपण मीना कुलकर्णी ना?”
” हो, आपण कोण ”
“. मी PNG मधून स्मिता घाटपांडे बोलतीय. आपले मंगळसूत्र हरवले आहे का?”
” हो ”
” कुठे हरवले होते? “
” शिवथरघळला”
” आमच्या सरांबरोबर बोलता का प्लिज?”
” ओके”
” नमस्कार मी प्रफुल्ल वाघ.
आपले मंगळसूत्र कधी हरवले?
गळसूत्राचा एखादा फोटो आहे का?
मंगळसूत्राची पावती आहे का?
महाडच्या एका कुटुंबाला आपले मंगळसूत्र सापडले आहे. ते त्यांना द्यायचे आहे. त्यांची फक्त एकच विनंती आहे. आपण त्या मंगळसूत्राचे मालक असल्याची खात्री पटवावी. मग आम्ही तुम्हाला त्यांचा फोन नंबर देऊ. “
तर, हे कुटुंब कोणते व या स्टोरीत PNG कुठून आले? हा किस्सा जाणून घेणे रोचक आहे.
शिवथरघळहून तीस किलोमीटर अंतरावर महाड येथे पाथरे कुटुंब राहते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांसह ते सर्वजण त्याच दिवशी शिवथरघळला आले होते. त्या कुटुंबातील आजींना ते मंगळसूत्र सापडले. त्याचवेळी तेथे असलेल्या माकडांनी आजींची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत मंगळसूत्राबद्दल कोणाला सांगायचे राहून गेले. त्या नंतर आजींचे आजारपण झाले. त्यानंतर मात्र आजींनी याबद्दल चर्चा केली. आजींचा आणि कुटुंबाचा मानस पक्का होता. मूळ मालक शोधायचा व मंगळसूत्र त्यालाच द्यायचे.
काम थोडे अवघड होते. शिवाय मंगळसूत्र खोटे असेल तर खटाटोप कशाला असा विचार करून त्यांनी ते मंगळसूत्र ‘ रत्नदीप ज्युवेलर्स ‘ या स्थानिक सोनारास दाखवले. त्यांनी ते खरे असल्याची ग्वाही दिली आणि ते PNG ( पुणे ) यांचेकडून केलेले असल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्येक दागिन्यावर एक नंबर असतो ज्या आधारे पावती व मालक शोधणे शक्य असते असेही सांगितले. इतकेच नाही तर PNG च्या काही ब्रांचेसला दागिन्यावरील नंबर सांगून माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला पण उपयोग झाला नाही. मग रत्नदीप ज्युवेलर्सने असा सल्ला दिला की पुण्यात सिंहगड रोडवर अभिरुची माॅलमध्ये PNG चे कार्पोरेट आॅफिस आहे तेथे सर्व ब्रांचेसचा एकत्र डेटा असतो त्यामुळे मंगळसूत्राच्या मालकाचा शोध लागू शकतो.
या घटनेनंतर सुमारे महिनाभराने पाथरे कुटुंबियांस पुण्यातील आजारी नातेवाईकांस भेटावयाचे होते. त्याचवेळी ते PNG च्या कॉर्पोरेट आॅफिसमध्ये मंगळसूत्र घेऊन गेले. मंगळसूत्राची पावती संगणकावर सापडली. मालकाचे नाव कळले पण त्यावर पत्ता अपूर्ण होता व मोबाईल नंबर चा एक अंक चुकला होता. शोधकार्याच्या अगदी जवळ जाऊन सुद्धा काही साध्य झाले नाही. पाथरे कुटुंबीय नाईलाजाने मंगळसूत्र घेऊन घरी गेले. PNG ने शोधकार्य चालूच ठेवले. नावावरून जुन्या पावत्या शोधल्या त्यात त्यांना मोबाईल नंबरचा अंदाज आला आणि अखेर 14 फेब्रुवारीला आम्ही त्यांना सापडलो.
आम्ही what’s app वर मंगळसूत्राची पावती पाठवली. मंगळसूत्राचा फोटो नव्हता म्हणून ज्या फोटोत मंगळसूत्र गळ्यात आहे असे ट्रिपचे. ग्रुप फोटो त्यांना पाठवले. पावतीमुळे गाडगीळांची खात्री पटली आणि ग्रुप फोटो पाहून पाथरे कुटुंबियांची. त्यांनी आम्हाला लगेच ओळखले कारण ते आणि आम्ही एकाच दिवशी एकाच वेळी शिवथरघळला होतो.
हे सर्व घडण्यासाठी कष्ट घेणार्या पाथरे कुटुंबातील व्यक्ती म्हणजे श्रीयुत महेश व सौ. श्रुती पाथरे. आमचा शोध लागावा म्हणून पाथरे आजी रोज देवाला साकडे घालत होत्या. जर आमची त्यांची भेट झाली नसती तर मंगळसूत्र गंगार्पण करायचे आजींनी ठरवले होते. प्रामाणिकपणाच्या जोडीला प्रामाणिक प्रयत्न केले तर काय घडू शकते याचा हा प्रसंग वस्तुपाठ आहे.
खरंतर पाथरे कुटुंबियांच्या नावाला कुठेही प्रसिद्धी देऊ नये अशी श्रुती पाथरे यांनी विनंती केली होती पण अशी माणसं आजही असतात हे नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे.
पाथरे कुटुंबियांची प्रामाणिक तळमळ गाडगीळांच्या लक्षात आली असावी. रविवर्मा यांच्या चित्राची एक फ्रेम पाथरे यांना देण्यासाठी आमच्या घरी आणून दिली. आम्ही पण त्यांना अल्प भेटवस्तू दिल्या. यावर त्यांनी आम्हाला प्रत्येकाला काही ना काही रिटर्न गिफ्ट म्हणून दिले. महाडच्या ज्या रत्नदीप ज्युवेलर्सने या विषयात मदत केली त्यांची आमची भेट पाथरे यांनी घालून दिली.
आज आम्हाला मंगळसूत्राच्या जोडीला बरेच काही मिळाले.
मनाने श्रीमंत माणसांचा लाभलेला सहवास
निर्मळ प्रामाणिकपणा
मनापासुन केलेले आदरातिथ्य
प्रसिद्धीपासून दूर स्वभाव
भरभरून देण्याची वृत्ती
PNG च्या माणसांनी सचोटीने केलेला पाठपुरावा
रत्नदीप सोनारांनी out of the way जाऊन केलेली मदत.
सर्वच विचारापलिकडचे .
खरोखर हा प्रसंग धन्यतेचा अनुभव देणारा होता.
मंगळसूत्र मिळाल्यावर आम्ही पुन्हा शिवथरघळला गेलो. दर्शन घेतले. समर्थ कृपेनेच हा अद्भुत चमत्कार घडून आला असेच म्हणावे लागेल.
अशी ही साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.
लेखक : श्री सुहास कुलकर्णी
कोथरूड पुणे.
प्रस्तुती : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मिथिलाचे हात यांत्रिकपणे काम करत होते, पण मन मात्र सैरभैर झालं होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून मिथिला किचनमधून पटकन बाहेर आली आणि दार उघडून तिनं पेपर आत घेतला. टिपॉयवर पेपर ठेवताना, सवयीनं तिची नजर हेडलाईनकडे वळली. ‘ पंतप्रधानांची पाकिस्तानला ताकीद’, आणि त्याच्या बाजूलाच दुसरी बातमी आणि फोटो.. ‘सावनी सुमंत यांना नृत्य मयूरी पुरस्कार ‘ बाजूला हातात चांदीची मोराची प्रतिमा असलेला सावनीचा हसरा फोटो . हिरकणी या नृत्य नाटिकेतील उत्कृष्ट नृत्याभिनयाबद्दल, सावनीला हा विशेष पुरस्कार देण्यात आला होता.
हं, पेपर बाहेर ठेवायलाच नको, असा विचार करून तिनं तो चक्क आपल्या वॉर्डरोबमध्ये कोंबला.’ निदान सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांचा मूड खराब व्हायला नको.’
कालच लेकीची- नुपुरची आठवीची परीक्षा संपली होती. मग संध्याकाळी ती मैत्रिणींबरोबर सिनेमा बघायला गेली होती. सिनेमा संपल्यावर पावभाजी आणि आईस्क्रीम हादडून घरी पोचायला साडेदहा वाजले होते. सुट्टी लागल्यामुळे बाईसाहेब काही आज लवकर उठणार नव्हत्याच. दुसरा शनिवार म्हणून सौमित्रलाही सुट्टी होती.
मिथिलाला रात्री नीट झोप लागलीच नव्हती. पण सातला ती उठलीच. नुपुरच्या फर्माइशीनुसार नाश्त्यासाठी सँडविचची सर्व तयारी तिनं करून ठेवली. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या, हिरवी चटणी टेबलवर नीट झाकून ठेवली. मिथिलाचे सासू-सासरे मॉर्निंग वॉक करून घरी येण्याची वेळ झाली होतीच. त्यांच्या चहाचं आधण ठेवावं म्हणून भांड्यात पाणी घ्यायला ती वळली आणि तिच्या डोळ्यांपुढे एकदम अंधारी आली. कशीबशी ती जवळच्या खुर्चीवर टेकली. तेवढ्यात सासू-सासरे घरात आलेच.
‘काय ग, बरं वाटत नाही का? चल आतमध्ये जाऊन जरा पड बघू. आराम कर, मी बघते चहाचं.’, असं म्हणत त्या तिला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेल्या. त्यांच्या चाहुलीनं सौमित्र जागा झाला.
‘आई, काय झालं?’ म्हणत त्यानं मिथिलाला हात धरून बिछान्यावर झोपवलं.
‘ झोप झाली नसेल रे नीट टेंशनमुळे! आधीच खूप हळवी आहे ती!’
काल रात्री नुपुर घरी आली, तेव्हा मिथिलानं तिची तब्येत बरी नाही, असं तिला सांगितलं. त्यामुळे बाईसाहेबांचा मूड खराब झाला होता.कारण उद्या आई-बाबांबरोबर बाहेर पडून धमाल करायचा प्लॅन होता तिचा. परीक्षेच्या आधीपासून ठरलंच होतं मुळी त्यांचं. ‘दोन दिवस ताप येतोय, तुझी परीक्षा चालू होती म्हणून बोलले नाही , हे स्पष्टीकरण देताना मिथिलाचा चेहरा कावराबावरा झाला होता. पण परीक्षा संपल्याच्या आनंदात नुपुरच्या ते लक्षात आलं नाही.
असं काही होईल याची मिथिलानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सावनीनं तिच्या वकिलामार्फत नुपुरला भेटण्याची मागणी केली होती. सावनी ही सौमित्रची पहिली बायको. सौमित्र मुंबईत राहणारा तर सावनी रतलाम.. मध्यप्रदेशची. सौमित्रच्या नात्यातल्या कोणीतरी स्थळ सुचवलं आणि हे लग्न जमलं. सावनी संगीत विषय घेऊन बी. ए. झाली होती आणि कथ्थकही शिकत होती. रंगानं गोरी, चारचौघांत उठून दिसणारी! ‘मला नोकरी करायची इच्छा नाही’, हे तिनं लग्नाआधीच सौमित्रला सांगितलं होतं. सौमित्र , मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च अधिकारी. त्यामुळे बायकोनं नोकरी करावी, असा त्याचा आग्रह नव्हता. दादरला त्याचा चार खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. सौमित्र एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-बाबांबरोबर एकत्र राहायची सावनीची तयारी होती.
कामानिमित्त सौमित्रला अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे. मुंबईत असला तरी सकाळी साडेआठला तो कंपनीत जाण्यासाठी बाहेर पडायचा. घरी परत यायला आठतरी वाजायचे. कधीकधी त्याहीपेक्षा उशीर व्हायचा. शनिवार-रविवार मात्र सुट्टी असायची. मग दोघांची भटकंती चालायची. सावनीला मुंबई-दर्शन घडवायला सौमित्र घेऊन जायचा. कधी कारमधून, कधी ट्रेन तर कधी बस. सासू-सासरेही सूनबाईंचे लाडच करायचे.
एक वर्ष कसं उडून गेलं ते कोणाला कळलंच नाही. नव्याची नवलाई संपली आणि रूटिन सुरू झालं.
सौमित्रला प्रमोशन मिळालं आणि त्याच्या परदेश वाऱ्याही सुरू झाल्या. आठ-आठ दिवस तो घरी नसायचा. सावनीला मग कंटाळा यायचा. घरात सासूबाई पण सगळं करणाऱ्या होत्या. वरकामाला बाई होती. त्यामुळे सावनीला काम तरी किती असणार ?
एक दिवस दादरला बाहेर फिरता फिरता कथ्थक नृत्य मंदिराची पाटी दिसली आणि तिच्या मनात आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचा विचार आला. येऊन-जाऊन दीड-दोन तासच वेळ जाणार होता. बरं क्लासही चार ते सहाच्या वेळेत. तिला तेवढाच विरंगुळा,म्हणून घरात कोणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. सावनीचा क्लास सुरू झाला. सावनी अधून-मधून क्लासमध्ये किंवा मुंबईत नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. अजून सुटवंग असल्याने सरावासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागला, तरी सावनीला ते जमत होतं. शक्य असेल तेव्हा, सौमित्र आणि त्याचे आई-बाबा कौतुकाने या कार्यक्रमांना हजेरीही लावत.दोन वर्षांनी सावनी कथ्थक विशारदही झाली. सुमंतसरांनी गळ घातल्यामुळे, तिच्या क्लासमध्येच ती नवीन विद्यार्थ्यांना शिकवायला जाऊ लागली. तिचा बराच वेळ क्लास आणि कार्यक्रम यातच जाऊ लागला.
आता सौमित्रच्या आई-बाबांना आपलं नातवंड यावं, असं वाटायला लागलं. सौमित्रलाही बाबा व्हायचं होतंच. त्यानं सावनीजवळ तसं बोलूनही दाखवलं. आणि लवकरच ती गोड बातमी आली. घरात आनंदाला उधाण आलं. सासू-सासरे, सूनबाईंचे आणखीनच लाड करू लागले, काळजी घेऊ लागले. सौमित्रही खूष होता. मुंबईबाहेर जाणंही तो शक्यतो टाळू लागला. सावनीचे डोहाळे पुरवण्याचा, तिला खूष ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. पण मध्येच ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटायची. ‘ या अवस्थेत कधीकधी बायका तऱ्हेवाईकपणे वागतात, मनावर ताणही असतोच ‘, असं आईनं म्हटल्यावर, त्याने याबाबत तिला फारसं छेडलं नाही.
सातव्या महिन्यात डोहाळजेवण झालं आणि सावनीचे आई-बाबा तिला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन गेले. सावनीनं एका गोड छोकरीला जन्म दिला. सौमित्र , आई-बाबांसह लेकीला भेटायला लगेच रतलामला गेला. तिथून घरी परततअसताना वाटेतच, त्याला फोनवर, पुढच्या प्रमोशनची बातमी मिळाली. पंधरा दिवसांनी त्याला कंपनीच्या कॅनडाच्या युनिटमध्ये हजर व्हायचं होतं. मग सर्वानुमते बाराव्या दिवशीच बारसं करून घ्यावं, असं ठरलं. सगळी धावपळच होणार होती. पण बारसं थाटात पार पडलं. बाळाचं नाव ‘नुपुर’ ठेवलं. सावनी जरा नाराज वाटली,’ पण तू आता कॅनडाला जाणार नं’ असं तिनं म्हटल्यावर, त्याला पटलं. लेकीला लवकर भेटता येणार नाही, याचं त्यालाही वाईट वाटत होतंच. पण प्रमोशन कसं नाकारणार? पॅकेजमध्येही जबरदस्त वाढ मिळणार होती. ‘ पहिली बेटी, धनाची पेटी’, असं म्हणत सगळ्यांनीच आनंद साजरा केला. सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला.