श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ अपभ्रंश आणि परभाषांच्या देणग्या…. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आपल्या मायमराठीत रूळलेल्या अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असतात. पण त्या शब्दाचे कूळ / मूळ शोधण्यासाठी, त्या शब्दात असणाऱ्या शब्दांचा विग्रह केला तरी त्याची तार्किक व्युत्पत्ती चटकन ध्यानात येत नाही. आणि अर्थ ठाऊक असला तरी त्याचे मूळ न समजल्याने अस्वस्थता येते. मात्र बऱ्याच वेळी, ‘मूळ शब्दांचा झालेला अपभ्रंश’ किंवा ‘परभाषेतून आलेले शब्द’ ह्यांमुळे ती तर्कसंगती लागत नाही. कधीकधी, सध्या अस्तंगत झालेल्या पण पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या चालीरीतींमुळेही काही शब्द / शब्दप्रयोग निर्माण झालेले असतात. काही अश्याच शब्दांचा घेतलेला रंजक मागोवा. एखाद्या शब्दाबद्दल – इथे नमूद केलेल्या व्युत्पत्ती किंवा ‘मूळा’पेक्षा काही वेगळे आपणांस ठाऊक असेल तर जरूर निदर्शनास आणून द्यावे.
अगरबत्ती / उदबत्ती – नागालँड, मिझोराम, आसाम ह्यां प्रदेशांत अगरु नावाचा एक सुगंधी वृक्ष आढळतो. त्याच्या खोडापासून सुगंधी तेल काढतात. त्या अगरु ह्या संस्कृत शब्दाचे हिंदी व बंगालीत ‘अगर’ झाले आणि पंजाबीत ‘उद’.
अनवाणी – पायात पादत्राणे न घालता चालणाऱ्याला ‘अनवाणी’ असे म्हणतात. हा वाणी कोणी सत्यनारायणातील साधूवाण्याचा भाऊबंद नव्हे. तर तो मूळ शब्द आहे ‘अन-वहाणी. ‘
दक्षिणा – पूर्वी पूजा सांगणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा म्हणून गाय द्यायची प्रथा होती. ती देताना गाय पुरोहितांच्या उजव्या हाताजवळ – म्हणजेच दक्षिण दिशेला उभी करत. त्यामुळे पुरोहितांनी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यास नाव पडले ‘दक्षिणा’.
अनागोंदी – हा शब्द कन्नड भाषेतील शब्दांमुळे तयार होऊन मराठी भाषेत आला आहे. कानडी भाषेत ‘अन’ म्हणजे हत्ती आणि ‘गोंदी’ म्हणजे लहान रस्ता – अरुंद गल्ली. त्यामुळे, अरुंद गल्लीतून हत्ती नेताना जो काही गोंधळ होईल त्यासारख्या कारभारास म्हणू लागले ‘अनागोंदी’ कारभार.
झोपडी – झोप देते ती जागा म्हणजे झोपडी.
डबघाई – शाहीर लोक पोवाडा, कवने सादर करताना, त्याच्या शेवटास साहजिकच डफ वाद्याची लय वाढते. म्हणजे डफाची घाई सुरू झाली की कवन/ पोवाडा संपत आल्याचे ध्यानात येते. त्या डफघाईचे झाले डबघाई. कोणतीही गोष्ट शेवटास / लयास आली की त्यांस म्हणले जाऊ लागले ‘डबघाईला येणे’.
दिलासा – अरबी भाषेतून आलेला शब्द. दिल म्हणजे अर्थातच हृदय आणि आसा म्हणजे धीर, सांत्वन, उत्तेजना.
भुरटे चोर – भुट्टा म्हणजे कणीस! त्याची चोरी करणारा तो ‘भुरटा’ म्हणजे किरकोळ चोऱ्या करणारा चोर.
अब्दागीर – सूर्य आणि त्याच्या उन्हाला फारशी भाषेत म्हणतात ‘आफताब’. त्यामुळे राजाच्या चेहऱ्यावर ऊन पडू नये म्हणून छत्र उभे धरून राहणारे ते ‘आफताबगीर‘. त्याचे मराठीत झाले ‘अब्दागीर’. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवलेला चपखल प्रतिशब्द म्हणजे ‘सूर्यपान’.
खांदेपालट – एखादी जबाबदारी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याच्या प्रक्रियेला ‘ खांदेपालट’ म्हणतात. हा शब्द आला थेट अंत्ययात्रेच्या विधीमधून. प्रेत तिरडीवरून घेऊन जात असताना, ती तिरडी खांद्यावर धरणारे ते ‘खांदेकरी’ आणि खांद्याला कळ लागल्यावर दुसऱ्या माणसाने पुढे येऊन आपल्या खांद्यावर तो भार घेतला की त्याला म्हणायचं ‘खांदेपालट‘.
उचलबांगडी – एखाद्या पदावरून एखाद्याला उचलणे / काढणे ह्याला म्हणतात ‘उचलबांगडी’. खरेतर ह्याचा बांगडीशी काही संबंध नाही. मूळ शब्द आहे तो ‘उचलपांगडी’. ‘पाग‘ किंवा ‘पांग’ म्हणजे मासे वाहून न्यायचे जाळे. त्या उचलपांगडीची झाली उचलबांगडी.
घिसाडघाई – एखादी क्रिया अतिजलद किंवा भरभर करणे म्हणजे ‘घिसाडघाई’. ‘घिसाड’ म्हणजे लोहार. आणि त्याला लोखंड तापविल्यावर त्याला आकार देण्यासाठी ते थंड होण्याआधी पटापट घणाचे घाव मारावे लागतात – म्हणून घिसाडघाई.
पुराणातील वांगी – ही वांगी नव्हे तर वानगी (म्हणजे उदाहरण / दाखला / संदर्भ). ‘पुराणातील वांगी’ म्हणजे एखादी जुन्या किंवा कालबाह्य गोष्टीचा दाखला.
रुमाल – फारसी भाषेत ‘रु’ म्हणजे चेहरा आणि ‘माला’ म्हणजे फडके. चेहरा पुसायला वापरले जाणारे फडके.
घोडं पेंड खातं – एखादी गोष्ट घडण्यास वारंवार विलंब होऊ लागली की आपण म्हणतो – ‘घोडं कुठे पेंड खाते आहे तेच कळत नाहीये. खरेतर पेंड हे काही घोड्याचे खाद्य नव्हे. तो मूळ शब्द ‘पेंड’ नसून ‘पेण’ आहे. पेणं म्हणजे थांबणं. थांब्याला पेणी असेही म्हणतात. घोडेस्वारांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वारंवार थांबे घेतले की उशीर होणारच. त्या ‘घोडं पेण खाते’ ह्याचं झालं ‘घोडं पेंड खाते’.
सूप वाजणे – एखाद्या समारंभाची / कार्यक्रमाची सांगता होणे म्हणजे ‘सूप वाजणे’. पूर्वी लग्न सोहळ्यातील विविध विधी अनेक दिवस चालत असत व लग्नाचे देवक सूपात मांडलेले असे. सर्व विधी संपले की त्या सूपातील देवक विसर्जित करून घरातील स्त्रिया ते सूप जोरजोरात वाजवीत असत. त्यावरून शब्दप्रयोग आला ‘सूप वाजणे’.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





