श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “संत गाडगेबाबा” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(आषाढवारी निमित्त प्रकट चिंतन)
वैष्णव परंपरा वैदिक म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी धर्माला जवळची तर शैव परंपरा उघडपणे भेदभावाला प्राधान्य देणाऱ्या वैदिकांना विरोध करणारी होती. या दोन्ही संप्रदायांमधील संघर्ष संपवून तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधून सामाजिक समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू यांच्या मूर्तिविधानामध्ये कुठेही न आढळणारी लक्षणे लेऊन विठ्ठल मूर्ती साकारली गेली. अशा लोकविलक्षण मूर्तीला पूजणारा वारकरी संप्रदाय अठरापगड जातींना आपल्या कवेत घेणारा आहे. त्यामुळेच दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने पंढरीची वारी करतात. अशाच वारकरी वर्गामधील कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत होते.
कर्मयोगी संत गाडगेबाबा
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात असलेल्या शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी जन्मलेल्या गाडगेबाबांचे बालपणीचे नाव डेबू असे होते. बाळसेदार व गोऱ्या डेबूला हे नाव मिळण्यामागे त्यांच्या पोटाचा गरगरीत आकार होता. त्यांची आई सखुबाई आणि वडील झिंगराजी जानोरकर . झिंगराजी व्यसनी व कर्जबाजारी होते व त्यात त्यांना पुढे कुष्ठरोग जडला. त्यामुळे गावातील लोक त्यांना टाळू लागले,म्हणून त्यांनी गाव सोडले. डेबू आठ वर्षाचा असतानाच झिंगराजी मरण पावले. अशा स्थितीत सखुबाईने आपले माहेर गाठले. डेबूचे यापुढील आयुष्य मामांच्या छायाछत्राखाली आजच्या भातकुली तालुक्यातील दापुरा येथे गेले. तेथून जवळ असलेल्या ऋणमोचन या गावी त्याने शिवमंदिरात गोपाळकाला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला. जातीपातीचा भेद नसणाऱ्या या सहभोजनात गावातील इतर मुलांसह महार-मांगांच्या मुलांनीही भाग घेतला. त्यामुळे गावातील सनातनी लोकांच्या मनात संताप निर्माण झाला. आपला धर्म डेबूने बुडविला असे ते म्हणू लागले, परंतु त्याची डेबूने पर्वा केली नाही.
वयाच्या बारा-तेरा वर्षाच्या काळातच डेबूला मामाच्या शेतात कष्टाची कामे करावी लागलीत. त्याच्या कर्तबगारीचा दिंडीम दापुराच्या पंचक्रोशीत पसरला होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा विवाह कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची कन्या कुंताबाईशी झाला. एक कुशल शेतकरी म्हणून नावारूपाला आलेल्या डेबूला एक वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. कर्जबाजारी झालेल्या मामाची शेती चंद्रभान सावकाराने आपल्या घशात घातली होती. चौसष्ट एकर जमीन गहाण ठेवून सावकाराने तिच्यावर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे डेबूच्या मामाने या धक्क्यानेच आपला प्राण सोडला. डेबूला त्यामुळे संताप येऊन सावकाराशी दोन हात करावे लागले. शेवटी सावकाराने त्यातील पंधरा एकर जमीन त्याला परत केली. या जमिनीवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होऊ लागली. परंतु डेबू केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. बालपणीच त्याला आपल्या अवती-भवतीच्या लोकांविषयी आस्था होती. समाजातील आळस, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा,जातिभेद, अंधश्रद्धा या समस्यांशी दोन हात करावेत असे त्याला नेहमीच वाटत असे. अध्यात्माविषयी ओढ असलेल्या डेबूने गुरूमंत्र घ्यायचे ठरविले. त्यांच्या गावाजवळच दौलात्गिरी गोसावी नावाचा बुवा प्रसिद्धीस आला होता. त्याचे दर्शन घ्यायला गेल्यावर डेबूला कळले की,दारू प्यायला दिल्याशिवाय तो गुरुमंत्र देत नाही. बुवाची अशी कीर्ती ऐकल्यावर डेबू आल्या पावली परत गेला.
पंढरपुरात डेबूजी
आपल्या मनाच्या शान्तीकरिता त्याने तीर्थयात्रा करायचे ठरविले व तो पंढरपूरला आला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी सारे पंढरपूर फुलून गेले होते. वारकऱ्यांचा उत्साह एकीकडे शिगेला पोचला असताना काही भुरटे चोर मात्र त्यांचे खिसे रिकामे करण्याच्या उद्योगात मग्न होते. व्यापारी व पुजारी भाविकांची लूट करताना त्याने पाहिले. धनिकांसाठी विठूमाउलीची सहज भेट तर भाविक मात्र रांगेत उभे असलेले पाहून त्याला या भेदभावाची अतिशय चीड आली. विठुरायाच्या चरणावर डोके ठेवणाऱ्या भक्तांना गचांडी देणारे बडवे पाहून तर त्याला उद्वेग आला. विठोबाच्या दर्शनापेक्षा तेथे येणाऱ्या गोर-गरीब भाविकांची सेवा करण्याचे त्याने ठरविले. नंतर त्याने कधीही विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. परंतु भाविकांच्या सेवेसाठी तेथे धर्मशाळा बांधली.
डेबूजीचा गाडगेबाबा झाला
भातकुली जवळील ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. १९०५ च्या यात्रेला डेबूजी आपल्या कुटुंबासह आला होता. तेथे भाविकांची होणारी गैरसोय पाहून त्याने त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आपले बिऱ्हाड सोडून त्याने अंगावर फटके कपडे घातले व एका हातात गाडगे तर दुसऱ्या हाती काठी घेऊन तो निघाला. लोकांच्या सेवेत मग्न झालेला डेबूजी आता गाडगेबाबा या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांचाही सहभाग वाढू लागला. गावोगावी फिरून गाडगेबाबांनी कीर्तने सुरू केलीत. अंगावर फाटक्या कपड्यांची ठिगळे लावलेले कपडे आणि चिंध्या पाहून कुणी त्यांना चिंधेबाबा,गोधडे महाराज या नावांनीही संबोधू लागले. गावात गेल्यावर प्रथम ते सारा गाव आपल्या खराट्याने झाडून काढीत आणि नंतर त्याच गावात कीर्तन करीत असत. त्यांचे कीर्तनही प्रचलित कीर्तनकारांपेक्षा वेगळे होते, तसाच त्यांचा पेहेरावही वेगळाच होता. फाटक्या चिंध्याचे वस्त्र,कानात फुटलेल्या बांगड्यांची कर्णभूषणे तर डोईवर फुटलेल्या गाडग्याचे शिरोभूषण. तर पायातील मोजेही वेगवेगळ्याप्रकारचे असत. प्रस्थापित कीर्तनकारांसारखी वाद्यांची साथ-संगतही त्यांच्याजवळ नव्हती. गावातीलच कुणी त्यांना वेळेवर साथ करीत असे.
महाराष्ट्रात वारकरी,पुणेरी व रामदासी अशा कीर्तनाच्या तीन परंपरा आहेत,त्यात कुठेही गाडगेबाबांचे कीर्तन बसत नव्हते. कारण की,ते या प्रकारच्या कोणत्याही परंपरेतून आलेले नव्हते,तर विपरित परिस्थितीतून त्यांनी आपली वेगळी कीर्तनशैली शोधली होती. त्याचप्रमाणे त्यांची निवेदन पद्धतीही वेगळीच होती. परंतु,या पद्धतीला एक प्राचीन परंपरा होती. जगातील सर्वच प्राचीन प्रबोधनकार आपल्या श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची उत्तरे मिळवीत असत. असे प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांचे कीर्तन रंगत असे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व आले आहे. गाडगेबाबांनी तिचा स्वीकार कितीतरी आधीच केला होता. म्हणून त्यांना लोकशिक्षक म्हटले जाते.
वारकरी संप्रदायाचा प्रभाव, पण…
आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा निरर्थक कर्मकांडे आणि अनिष्ट प्रथा-परंपरांवर कठोर प्रहार करीत असत. त्यासाठी ते नेहमी संत तुकोबाराय व संत कबीर यांच्या वचनांचा आधार घेत असत. ईश्वर केवळ मंदिरात नाही,तर सर्वत्र आहे,त्याची भक्ती मंदिरात नाही तर दीन-दुबळ्या लोकांची सेवा करून करा ; असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करीत असत. प्रचलित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांच्या मांडणीपेक्षा त्यांची मांडणीही वेगळी होती. वारकरी संप्रदायातील समतेचे तत्व खऱ्या अर्थाने आत्मसात करून त्याला विवेकवादी विचाराची जोड देवून त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केलीत. त्यांचे मुंबई येथील बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झाले व तेवढेच ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध आहे. त्यातील त्यांच्या मांडणीवरून त्यांच्या विचारांचा परिचय आपणास होतो.
त्यांच्या कीर्तनातून बुद्धाची करुणा,तुकारामांचा परखडपणा आणि कबीराचा बिनतोड युक्तिवाद यांचे दर्शन आपणास होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर विभागांपेक्षा विदर्भातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप वेगळे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रारंभही त्यामुळेच विदर्भात झाला. भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या-नागड्या लोकांना वस्त्र,निरक्षरांना शिक्षण,बेघरांना घर,रोग्यांना औषध,बेरोजगारांना रोजगार,मुक्या प्राण्यांना अभय,गरीब व दुर्बलांना लग्नासाठी मदत आणि दुःखी-कष्टी लोकांना आधार द्यावा असे गाडगेबाबा नेहमी सांगत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. या तिघांच्याही कार्यात त्यांनी मोलाचे योगदान केलेले आहे. आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून त्यांनी डॉ.आंबेडकरांना नेमले होते. १४ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचे शेवटले कीर्तन पंढरपूर येथे झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांचे सारे अवसान गळाले. शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबा आपल्यातून गेलेत. त्यांच्या विचारांचा वसा घेतलेले अनेक विचारवंत आणि अनुयायी आजही महाराष्ट्रात आझेत. त्यापैकी एक आहेत,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विदर्भातील हे दुसरे संत होत. त्यांनी गाडगेबाबांचा अंत्यसंस्कार केला.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुनील देशपांडे
ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







