श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ विचार तर कराल..! ☆ श्री जगदीश काबरे ☆
परमेश्वर चराचरात भरलेला आहे, असं भक्तांचंच तत्वज्ञान सांगतं, तर मग असाल तिथंच आपल्या परमेश्वराची पूजा, अर्चा, प्रार्थना, आराधना करा ना, त्यासाठी मंदिरं, मशिदी, चर्चेस कशाला उघडावी लागतात?
लक्षात घ्या, कोणत्याही कागदावर अधिकृत नोंद नसलेली आणि कसलेही कर न भरणारी देशातली प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे ती धर्माच्या पुजाऱ्यांची. एवढा अमाप पैसा या पुजारी मंडळींवर हा देश देवाधर्माच्या भीतीपोटी विनाकारण खर्च करतोय.
परमेश्वर जर प्रत्येकाचा बाप आहे, तर त्याच्याशी बोलायला, त्याची साधना करायला आपला बाप आणि मुलं यांच्यात मध्यस्थ हे पुजारी लागतात कशाला? घरात तुमच्या बापाशी बोलायला तुम्ही बापाच्या पायाशी पैसा दान करता काय?
काय जो देवधर्म पाळायचाय तो आपल्यापुरता आणि व्यक्तिगत भक्तीपुरता पाळा आणि पुजारी टाळा, पैसा वाचवा आणि तो आपल्या कुटुंबासाठी लावा किंवा शाळा, दवाखाने उभे करायला दान करा.
देवाधर्माच्या नावावर प्रचंड पैसा कमवायची अगदी मोजक्या लोकांच्या हातातली कुठलाही कर न भरणारी आणि सामान्य धार्मिक लोकांचे शोषण करणारी ही इंडस्ट्री आहे.
देवधर्माला खरंच पैसे लागतात का, याचा एकदा शांत विचार करा. भक्ती आणि भक्त हा अतिशय व्यक्तिगत, मामला आहे. तुम्ही देव मानत असाल तर त्याच्या नामस्मरणात तल्लीन रहा ना, आणि तेही तुमच्या स्वतःच्या भाषेत, त्यासाठी मध्यस्थ, कर्मकांडं यांची अजिबात गरज नाही.
ज्याची देवावर खरी श्रद्धा आहे, त्याला देवधर्मावर एकही पै खर्च करावी लागत नाही. देवाच्या आणि भक्ताच्या नात्यात पैसा अजिबात लागत नाही. पैसा जिथं लागतो तिथं तो धंदा झाला, भक्ती नाही. आपल्या देवाशी आपणच एकट्यानं केलेला आपला संवाद म्हणजे अध्यात्म, खरी भक्ती, खरा धर्म. आणि आणि देवाच्या भक्तीसाठी मध्यस्थी करणाऱ्या दलालांवर खर्च होणारा पैसा हा आहे अधर्म.
जगाला आता एकाही देवळाची, मशिदीची, चर्चची गरज नाही. कारण मुळात चराचरात देव भरलेला असेल तर त्याची अशी बंदिस्त ठिकाणं करण्याची गरजच काय?
खरी गरज आहे ती शाळा, दवाखाने, पाण्याच्या सोयी, अन्न यांची. पैसा तिकडं वळवा आणि जगाला सुखी करा, स्वतः सुखी व्हा.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





