सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ यशोधरा… – लेख क्र. १४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
सात वर्षे झाली त्यांनी घर सोडून! ते कपिलवस्तुत येणार होते धर्मप्रसारासाठी! राजवाड्यात यायला प्रथम तयारच नव्हते पण महाराज शुद्धोधदनानी फारच आग्रह केल्यामुळे यायला तयार झाले. त्यांना आता काय म्हणून हाक मारायची? हा प्रश्न महाराजांसह आम्हा सर्वांना पडला होता. सिद्धार्थ? मला तर आधी नावानेच हाक मारायची सवय होती. लग्नानंतर ‘अहो’ म्हणणं, नाव तोंडात येऊ न देणं किती अवघड गेलं होतं! आता कसे दिसत असतील? मला तर आठवतात ते स्वयंवराच्या वेळचेच. त्यावेळी माता पमिता म्हणत होत्या, सिद्धार्थला संसाराची आवड नाही त्यामुळे त्याचा विचार करू नको. पण जमलेल्या राजकुमारांचे डोळे बघ व ज्या डोळ्यात तुला प्रेम वाटेल त्यालाच निवड. मी पाहिलं, सगळ्या राजकुमारांच्या डोळ्यात मला माझ्या सौंदर्याची ओढ, लालसाच दिसली. फक्त सिद्धार्थांचे डोळे तेजस्वी व शांत होते. त्यामुळे मी त्यांनाच निवडलं. लग्न थाटामाटात झालं. लग्नानंतर त्यांना कधी हाक मारायची पाळीच आली नाही. ते कधी माझ्या कक्षात आले नाहीत. त्यांच्या कक्षात जाण्याची मला परवानगी नव्हती. ते त्यांच्या कक्षात ध्यान लावून बसायचे. संन्यासी वृत्तीने राहायचे. दोघांचं वय अवघं सोळा वर्षांचं होतं. महाप्रजापती गौतमी, म्हणजे सासूबाईंना मी विचारलं, की असंच राहायचं होतं तर लग्न कशासाठी केलं? स्वयंवराला आपण होऊन कां आले? सासूबाई म्हणायच्या आता लग्न झालंय ना, बदलेल तो! त्यात तुझ्यासारखी रूपवान पत्नी मिळाल्यावर बघशील हळूहळू रमेल संसारात. पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडेना. सासूबाईंचाही धीर सुटायला लागला. त्या मला म्हणायच्या, तू त्याच्याशी बोल. त्याला आपलंसं कर. एकदा मूल झालं की मग ते निरागस रूप बांधून ठेवेल सगळ्यांना! महाराजांनाही प्रश्न पडला. सिद्धार्थांनी राजकारणात लक्ष द्यावं म्हणून ते प्रयत्न करत होते.पण सिध्दार्थना शाक्त संघाचे विचार पटले नाहीत. त्यांची न्याय प्रणाली पटली नाही. त्यामुळे शाक्त सभेत स्पष्ट बोलले व परिव्रजा घेईन म्हणून सांगून निघून आले.आता जर सिध्दार्थानी परिव्रजा घेतली तर राज्याला वारस कसा मिळणार या विवंचनेत महाराज होते. शेवटी वारस दिल्यावर परिव्रजा घेण्याचे ठरले.पण त्यासाठी एकमेकांची मने ही गुंतावी लागतात नं? लग्नानंतर तेरा वर्षांनी मुलगा झाला. कपिलवस्तूत सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते तो सिद्धार्थ शय्येवर नव्हतेच. राजवाड्यात कुठेही नव्हते. लक्षात आलं की त्यांची फार वर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सगळं ऐश्वर्य त्यागून निघून गेलेत. पण ते मला कांही न सांगता कां निघून गेले?याचं मला फार वाईट वाटलं. त्यांचा माझ्यावर एवढाही विश्वास असू नये. एका शब्दानं बोलले असते तर, मी त्यांना कधीच अडवलं नसतं! हे कधीतरी होणार हे मी जाणून होते. माझ्या सौंदर्याचा, पत्नी पदाचा किती वेळा अवमान झाला होता.किती सहजपणे ते पत्नीची व मुलाची जबाबदारी धुडकावून निघून गेले. “यशोधरा” हाकेने माझी विचारांची शृंखला तुटली. लगबगीने महाप्रजापती गौतमी आल्या. म्हणाल्या, “लवकर खाली चल. तथागत आले आहेत.” आणि मी एकदम चमकून पाहिलं. इतिहासाची सावली वर्तमानावर कितीही पडू द्यायची नाही म्हटलं तरी ती पडतेच. मी सासूबाईंना सांगितलं,” मी खाली येणार नाही. त्यांना जर मला भेटायची इच्छा असेल तर ते माझ्या कक्षात येतील. यापूर्वी आपल्याला भेटण्यासाठी त्यांनी नकार दिला होता. पुन्हा अपमान सहन करणार नाही.”
बिंदुसार राजाकडे ते जेंव्हा राहत होते तेव्हा त्यांच्या विषयीच्या सर्व बातम्या इकडे कळत होत्या. ते भिक्षू झाले. परिव्राजक झाले. बोधिसत्व वृक्षाखाली त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली. आणि ते तथागतही झाले. तशी या सात वर्षात मीही खूप बदलले होते. मीही शृंगार उतरवला होता. त्यांच्याप्रमाणे एकभुक्त राहत होते. धरणीची शय्या करून झोपत होते. मलाही आता कसलाच मोह, आसक्ती राहिली नव्हती.एकदम माझ्या मनात आलं, मला या रूपात पाहून त्यांना काय वाटेल? आश्चर्य कां आनंद! पण ते तर आता कांही वाटण्याच्या पलीकडे गेले आहेत. “यशोधरा” इतकी प्रेमळ हाक! मी वळून पाहिलं,तर ते खरंच माझ्या कक्षात आले होते. पण काय बोलावं ते दोघांनाही कळलं नाही. आणि तो तेजःपुंज चेहरा पाहून मी मात्र मंत्रमुग्ध झाले. ते कक्षातून कधी गेले कळलंच नाही. भानावर आल्यावर मी सासूबाईंना विचारलं की मी त्यांच्याबरोबर जावू का? तथागतांनी त्याला नकार दिला. पण मी ठरवलं राहुलला तरी त्यांच्याबरोबर पाठवायचं. मी राहुलला दाखवलं की ते तेजस्वी चेहऱ्याचे तुझे वडील आहेत त्यांना जाऊन सांग,आईने सांगितले आहे की तुमच्याकडे मौल्यवान खजिना आहे. तो तुम्ही मला देणार आहात. राहुल तथागतांकडे गेला. धाडसाने त्यांच्याशी बोलला. तथागत राहुलला म्हणाले माझ्याकडे जो खजिना आहे तो तुला देईन पण तुला बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी लागेल.अवघा सात वर्षाचा राहुल, त्याला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला की नाही कुणास ठाऊक! पण तो ‘हो’ म्हणून त्यांचा हात धरून दूर निघून गेला. महाराज शुध्दोदनांच्या निर्वाणानंतर मी व सासुबाईनी बुद्धांचे विचार पटणाऱ्या, त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरुन जायला तयार असणाऱ्या अशा ५०० महिला एकत्र केल्या. सर्वांनी केशवपन केले. भगवी वस्त्रे धारण केली. भिक्क्षुणी म्हणून त्यांच्या अनुयायात सामील झालो. बुद्धांनी सांगितलेली वासना, इच्छा, आसक्ती,आवड,ज्यावर नियंत्रण ठेवायला हवं, अशी ही चार आर्य सत्ये, नीती व सदाचाराचा अष्टांग मार्ग, धम्माची शील, समाधी आणि प्रज्ञा ही तीन अंगे, दहा पारमिता म्हणजे जन्म मृत्यूच्या भव चक्रापलिकडे जाण्यासाठी आवश्यक गुण, पंचशील म्हणजे पवित्र जीवनाची आचारसंहिता. या सर्वांचे आचरण स्वतः करून व ते इतरांना करण्यासाठी प्रवृत्त करत होतो. हळूहळू अनुयायांची संख्या प्रचंड वाढली. बौद्ध धर्म प्रस्थापित झाला. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लोकांना सुख, शांती, समाधान मिळविण्याचा मार्ग दाखविण्याचे कार्य केले. पण माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय होतं हे मात्र शेवटपर्यंत मला कळलं नाही. नियती ज्या दिशेला नेत होती त्या दिशेला मी फरपटत जात होते इतकंच!
– – – –
यातील काही शब्दांचे अर्थ – –
तथागत म्हणजे जी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याप्रमाणे वागणारे,सर्व क्षणभंगुर घटनांच्या पलिकडे गेलेले.
परिव्राजक म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करून तपस्वी म्हणून जीवन जगणे.स्वतःचा शोध घेणे.
पण एकाच ठिकाणी वास्तव्य न करता परिभ्रमण करत समाजाला आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन करणे.
भिक्खू म्हणजे बौद्ध धर्मातील संन्यासी.. जे बुद्धांच्या शिकवणीनुसार विशिष्ठ नैतिक नियमांचे पालन करतात. स्वतःच्या घरादाराचा,भौतिक गोष्टींचा त्याग करून धम्माच्या प्रचारासाठी आणि आत्म उन्नती साठी आपले जीवन समर्पित करतात. उदरनिर्वाहासाठी लागेल एवढीच भिक्षा मागून जीवन कंठतात
– लेख क्र. १४
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






