सुश्री वर्षा बालगोपाल
इंद्रधनुष्य
☆ “उठा, जागे व्हा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
…. उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका!-
” उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ” ही घोषणा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांनी लोकप्रिय केली होती.जगाला त्यांच्या संमोहित मनःस्थितीतून बाहेर पडा आणि त्यांचे खरे स्वरूप शोधा हा त्यांचा संदेश होता.
हे वाक्य त्यांनी लोकप्रिय केलेले असले तरी त्याच मूळ कठ उपनिषेदात मिळते.
कठ उपनिषदातील बालनायक नचिकेताला त्याचे वडील वाजश्रवा यांनी मृत्यूचे देव यम यांच्याकडे पाठवले होते. यमच्या निवासस्थानी त्याने नचिकेताच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याला आत्मज्ञान आणि योगाच्या पद्धती शिकवल्या. “उठा, जागे व्हा…” हे शब्द पुस्तकाच्या १.३.१४ अध्यायात आढळतात, जिथे यम नचिकेताला सल्ला देत आहे..उठा! जागे व्हा! थोरांकडे जा आणि शिका.तो मार्ग वस्तऱ्याच्या धारदार धारेसारखा आहे,असे शहाणे म्हणतात – चालणे कठीण आणि ओलांडणे कठीण. अशा उपनिषेदात नमूद केलेल्या भाष्याचा वाकयांश स्वामी विवेकानंदानी तरुण पिढीला संदेश देताना अगदी योग्य पद्धतीने वापरला आहे.
स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना त्यांच्या संमोहित मनःस्थितीतून बाहेर पडण्याचा संदेश दिला होता. हे वाक्य त्यांच्या देशवासियांना त्यांच्या “झोपलेल्या आत्म्याला” जागे करण्यासाठी आणि “प्राचीन माते” ने जगाला दिलेल्या शांती आणि आशीर्वादांचा संदेश प्रसारित करण्यासाठी आवाहन करण्यासाठी होते. “जागे व्हा” म्हणजे एखाद्याच्या वास्तविक स्वरूपाचे जागरण आणि परिणामी समृद्धीची सुरुवात आपल्या देशवासियांनी केली पाहिजे अशा तळमळीतून हे उद्गार त्यांनी काढले.
२४ एप्रिल १८९७ रोजी विवेकानंदांनी सरला घोषाल यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी जनतेला फक्त सकारात्मक शिक्षण देण्यावर भर दिला, कारण त्यांचा असा विश्वास होता की नकारात्मक विचार माणसांना कमकुवत करतात. असे लिहून पुन्हा त्यांनी उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! हे पत्रात नमूद केले.
१२ नोव्हेंबर १८९६ रोजी लाहोर येथे दिलेल्या व्याख्यानात ते म्हणाले…लाहोरच्या तरुणांनो, अद्वैताचा तो शक्तिशाली ध्वज पुन्हा एकदा उंच करा, कारण जोपर्यंत तुम्हाला तोच परमेश्वर सर्वत्र उपस्थित असल्याचे दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला ते अद्भुत प्रेम इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. प्रेमाचा तो ध्वज फडकावा! “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.” उठा, पुन्हा एकदा उठा, कारण त्यागाशिवाय काहीही करता येत नाही.
असे अनेक व्याख्यानातून प्रवचनातून जेव्हा जेव्हा जशी संधी मिळेल तसे हेच वाक्य तरुणाईवर बिबावण्यासाठी पुनः पुन्हा उदघोषित केले.
सिस्टर क्रिस्टीन यांनी त्यांच्या’स्मृतिचिन्हे ऑफ स्वामी विवेकानंद’ या निबंधात लिहिले की बाकी सर्व खोटे असू शकते, फक्त हेच खरे होते. विवेकानंदांना ते जाणवले. स्वतःच्या महान जाणीवेनंतर, जीवनाचा एकच उद्देश होता – त्याच्यावर सोपवण्यात आलेला संदेश देणे, मार्ग दाखवणे आणि त्याच सर्वोच्च ध्येयाच्या मार्गावर इतरांना मदत करणे. “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.”
असे अतिशय प्रभावशाली, परिणामकारी, प्रेरणादायी, चळवळीला आमंत्रित करणारे महत्वाचे वाक्य त्यांचेच घोषवाक्य म्हणून प्रसिद्ध झाले.
उठा म्हणजे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय जागृतीसाठी एक उत्कट आवाहन होते.
जागे व्हा म्हणजे जाणीव करून घ्या आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे समजून घ्या आणि ही परिस्थिती बदलण्या साठी जागृक व्हा. हे सांगणे होते.
“ध्येय” साध्य होईपर्यंत “थांबू” नये. हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आवश्यक होते. त्याचे भान सगळ्यांना विशेषत: तरुणाईला द्यायचे होते.
जसा वडीलधाऱ्या माणसांचा आदेश आला की त्या पूर्ततेसाठी कोणी झटकन उठून त्या आदेशाचे पालन करतो, तसेच हा एक आदेश आहे त्याचे पालन आपण तंतोतंत केले पाहिजे असे वाटून स्वातंत्र्यासाठी प्रत्येकजण पेटून उठला होता आणि स्वतंत्रतेचे ध्येय गाठेपर्यंत खरंच शांत बसला नव्हता.
आजही हे वाक्य तेवढेच प्रभावशाली आहे. तितकेच प्रेरणादायी आहे. फक्त तरुणाईलाच नव्हे तर प्रत्येकाला लागू होईल असेच आहे. हे वाक्य नुसते वाचायचे, लिहायचे, ऐकायचे नसून प्रत्येकाने आचरणात आणायचे आहे. या आदेशाचे पालन करायचे आहे. तरच सगळ्यांची प्रगती होऊ शकते. आपली स्वप्ने, ध्येये पूर्ण होऊ शकतात.
मला वाटतंय याचाच परिणाम म्हणून अलीकडे नव्याने आता थांबायचं नाय हा सिनेमा आला असावा.
पण खरंच उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! हे वाक्य प्रत्येकाने अंगीकारायला काय हरकत आहे? निदान तसा प्रयत्न तरी करत राहायला हवा.
तेव्हा आता थांबायचं नाय…. काय बरोबर ना?
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





