श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ एक अविस्मरणीय असा सोहळा… ☆ श्री जगदीश काबरे ☆
डॉ. शरद अभ्यंकर
एक अविस्मरणीय असा सोहळा – –
कुठलेही धार्मिक कर्मकांड न करता साजरा झालेला अविस्मरणीय सोहळा – –
काल वाई येथे डॉ. शरद अभ्यंकर यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सुहृद मित्रमंडळींनी जीवनगौरव समारंभाचे आयोजन केले होते. या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. याप्रसंगीही त्यांनी केलेल्या खुसखुशीत भाषणात त्यांच्या खास मिश्किल भाषा शैलीतून जमलेल्या सगळ्या सदिच्छूकांना काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे देत प्रबोधन करणे सोडले नाही. आयुष्यभर ते डॉक्टरकीचा व्यवसायासोबतच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही चिकाटीने करत आहेत. वाईसारख्या धर्मप्रेमी लोकांच्या शहरात राहूनही गेली 70 वर्षे ते आपली नास्तिकता जाहीरपणे व्यक्त करत आलेले आहेत आणि तरीही त्यांचा अख्ख्या गावात कोणीही शत्रू नाही. हा त्यांचा गुण वैशिष्ट्यपूर्ण आहे.
त्यांनी 1961 पासून 35 वर्षे रक्तपेढी चालवली, कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण, देहदान याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे बहुमोल कार्य केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष असलेल्या विश्वकोशात वैद्यकीय लिखाणही केले. तरुणांना वैचारिक दिशा मिळावी म्हणून ’बुवाबाजी हटाव’, ’जरा डोळस होऊया’, ’जरा शहाणे होऊ या’, ’भारतातील प्रमुख धर्म’ इ. विविध प्रकारची पुस्तके ओघवत्या भाषाशैलीत लिहून प्रबोधनही करत आहेत.
असे विविध पैलू असलेला हा माणूस आजही तेवढ्याच उत्साहाने वाईतील सर्व सामाजिक कामामध्ये भाग घेत आहे, आणि सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदतही करत आहे. समाजात अशा व्यक्ती आभावानेच दिसतात, असे याप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले प्रख्यात रंगकर्मी गिरीश ओक म्हणाले.
या संपूर्ण कार्यक्रमात त्यांच्या भाषणातील दोन मुद्दे मला सर्वात जास्त आवडले. त्यातील पहिला मुद्दा त्यांच्या लहानपणातील संघाच्या आठवणीचा होता. ती आठवण सांगताना ते म्हणाले, “लहानपणी मी संघात जात होतो. आणि माझ्याबरोबर अनेक मित्रांनाही नेत होतो. त्यात माझा एक मुस्लिम मित्रही होता. हा मुस्लिम मित्र शाखेत आलेला पाहून इतर संघ स्वयंसेवकांनी मला एका कोपऱ्यात नेऊन विचारणा केली की, ’हा लांड्या आपल्याकडे तुझ्याबरोबर का आला?’ हे ऐकून मला धक्काच बसला. कारण आमच्या घरात लहानपणापासून जात आणि धर्म यातील भेदभाव कधीच शिकवला नव्हता. जेव्हा शाखाप्रमुखाला हे कळले तेव्हा तो स्वयंसेवकांना काहीही न बोलता त्या मुलाला मात्र म्हणाला की, ’बाळ, उद्यापासून तू शाखेत येऊ नकोस.’ हे ऐकल्यावर मी कालांतराने शाखेत जाणे सोडून दिले आणि मग राष्ट्रसेवादलात जाऊ लागलो. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण ही वस्तुस्थिती आहे.”
त्यांच्या भाषणातील दुसरा मुद्दा होता, ते डॉक्टर झाल्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्यांना आलेल्या एका विदारक अनुभवासंबंधीचा. त्याकाळी पुण्यामध्ये देवीची साथ आली होती. त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची नोंदणी केली जायची. एका निरक्षर बाईच्या मुलाला देवी आलेल्या होत्या. तेव्हा नोंदणी करण्यासाठी डॉक्टरांनी त्या बाईला तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. ती नाव सांगायला लाजू लागली. कारण नवऱ्याचे नाव घेतले तर त्याचे आयुष्य कमी होते, ही अंधश्रद्धा आपल्या समाजात होती. डॉक्टरांनी फिरून वेगळ्या शब्दात विचारले की, या मुलाच्या वडिलांचे नाव काय? तेव्हा ती वेळ मारून नेण्यासाठी पटकन म्हणाली, ’तुमचंच नाव लिवा.’ आज अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारताना आपल्याला दिसतात. पण त्याकाळी आपल्या समाजात नवऱ्याचे नाव घेण्याच्या बाबतीत अंधश्रद्धा किती खोलवर रुजली होती हे यावरून लक्षात येते. हा किस्सा ऐकल्यावर मला नारायण सुर्वे यांची ’मास्तर, तुमचंच नाव लिवा’, ही कविता आठवली. (जिज्ञासूंनी Google वर सर्च करून ही कविता नक्की ऐकावी.)
एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नेटका आणि सुरेख झाला. या कार्यक्रमातून अभ्यंकरांच्या दीर्घायुष्याचे रहस्य कळले. याप्रसंगी मी त्यांना सदिच्छा देत माझे ’वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी’ हे नवीन पुस्तक भेट दिले. त्यावर ’बर्थडे रिटर्न गिफ्ट’ म्हणून त्यांनी त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ’देव का नाही?’ हे पुस्तक मला भेट दिले. त्यांच्या आस्तिक मित्रांनी नास्तिक असलेल्या. डॉ. शरद अभ्यंकरांना आपले मानत हा कौतुक सोहळा आयोजित केला त्याबद्दल त्या सगळ्या मित्रांचे आभार.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




